Home Blog Page 416

पाक सैन्यावर बलुच आर्मीचा हल्ला: 90 सैनिक मारल्याचा दावा

इस्लामाबाद-बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने रविवारी दावा केला की त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर आत्मघातकी हल्ला केला होता, ज्यामध्ये ९० पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. बीएलएच्या मते, त्यांच्या माजीद ब्रिगेड आणि फतेह ब्रिगेडने लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणला.

बीएलएने म्हटले आहे की क्वेट्टाहून कफ्तानला जाणाऱ्या ८ लष्करी वाहनांवर हल्ला करण्यात आला. नोश्की येथील महामार्गाजवळ आत्मघातकी दहशतवाद्यांनी वाहनांना लक्ष्य केले. एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने लष्कराच्या ताफ्याला धडक दिली.

यानंतर, बीएलएच्या फतेह पथकाच्या सैनिकांनी सैन्याच्या ताफ्यात घुसून सैनिकांना ठार मारले. ज्या वाहनावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. जखमींना नोश्की येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरात आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

फक्त ५ दिवसांपूर्वी बीएलएने एका प्रवासी ट्रेनचे अपहरण केले होते. बीएलएने सर्व २१४ ओलिसांना मारल्याचा दावा केला. पाकिस्तानी सैन्याने म्हटले की त्यांचे फक्त २८ सैनिक मारले गेले, तर सर्व ३३ बलुच सैनिक मारले गेले.

उत्तर मॅसाडोनियाच्या नाईटक्लबला आग; 50 ठार:क्लबमधील संगीत मैफिलीत अपघात, 1500 लोक उपस्थित होते

स्कोप्जे-युरोपीय देश उत्तर मॅसेडोनियामधील एका नाईट क्लबमध्ये शनिवारी रात्री लागलेल्या आगीत किमान ५० जणांचा मृत्यू झाला तर १०० हून अधिक जण जखमी झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोकानी शहरात आयोजित एका हिप हॉप संगीत मैफिल दरम्यान हा अपघात झाला.सुमारे ३०,००० लोकसंख्या असलेल्या या शहरातील एका नाईट क्लबमध्ये प्रसिद्ध हिप-हॉप जोडी एडीएनचा संगीत कार्यक्रम सुरू असताना आग लागली. या हिप-हॉप कॉन्सर्टसाठी क्लबमध्ये १५०० लोक जमले होते.कार्यक्रमादरम्यान कोणीतरी क्लबमध्ये फटाके फोडले, ज्यामुळे आग लागली, असा अंदाज आहे. आग लागल्यानंतर गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरीत काही लोक चिरडले गेले.संगीत मैफिलीत फटाके फोडण्यात आले होते, जे आगीचे कारण असल्याचे मानले जात आहे.

अपघाताचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला…

पंतप्रधान ह्रिस्टिजान मिकोस्की यांनी X वर लिहिले: उत्तर मॅसेडोनियासाठी हा एक कठीण आणि खूप दुःखद दिवस आहे. इतक्या तरुणांचे दुःखद नुकसान कधीही भरून निघू शकत नाही. या कठीण काळात पीडितांचे दुःख कमी करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींना राजधानी स्कोप्जेसह देशभरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये अनेक स्वयंसेवी संस्थांची मदतही घेतली जात आहे. या प्रकरणात एका व्यक्तीला अटकही करण्यात आली आहे, परंतु अद्याप त्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.

पश्चिम अमेरिकेत 26 वादळे, 34 जणांचा मृत्यू:130 Kmph वेगाने धुळीचे वादळ

10 कोटी लोकसंख्या प्रभावित, 2 लाख घरे वीजेशिवाय
वॉशिंग्टन-अमेरिकेत, अर्कांसस, कॅन्सस, मिसूरी, इलिनॉयसह सुमारे 6 पश्चिमेकडील राज्ये चक्रीवादळाच्या विळख्यात आहेत. एबीसीच्या अहवालानुसार, या राज्यांमध्ये आतापर्यंत २६ वादळे आली आहेत.शनिवार आणि रविवारी आतापर्यंत ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मिसूरीमध्ये सर्वाधिक १२ मृत्यू झाले आहेत. १० कोटी अमेरिकन लोकसंख्येवर याचा परिणाम झाला आहे. २ लाख घरांमध्ये वीज गेली आहे.

कॅन्ससमध्ये धुळीच्या वादळामुळे महामार्गावर सुमारे ५० वाहने एकमेकांवर आदळली. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला. मिसिसिपीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण बेपत्ता झाले.१०० किमी/तास वेगाने धुळीचे वादळ वाहत आहे. इमारती आणि रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत. कॅनडाच्या सीमेवर हिमवादळे आणि उष्ण भागात जंगलातील आगी लागण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील वादळ अंदाज केंद्राने असा दावा केला आहे की, हे वेगाने वाहणारे वादळ गंभीर धोका निर्माण करू शकतात. आज अनेक राज्यांमध्ये बेसबॉलच्या आकाराचे गारा आणि वादळ देखील शक्य आहे.
पूर्व लुईझियाना, मिसिसिपी, अलाबामा, पश्चिम जॉर्जिया आणि फ्लोरिडामध्ये चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. टेक्सास, कॅन्सस, मिसूरी आणि न्यू मेक्सिको हे जंगलातील आगींचा धोका आहे.
टेक्सास, ओक्लाहोमा, मिसूरी, इलिनॉय, इंडियाना आणि मिशिगनमध्ये जोरदार वाऱ्यांमुळे २,००,००० हून अधिक घरांची वीज गेली आहे.
राष्ट्रीय हवामान सेवेने दक्षिण डकोटा आणि पश्चिम मिनेसोटाच्या काही भागांसाठी हिमवादळाचा इशारा जारी केला आहे. या भागात ६ इंचांपर्यंत बर्फवृष्टीची शक्यता आहे.

राज्यात ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार: हर्षवर्धन सपकाळ

औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक, महाराजांचे शौर्य पुसून टाकण्याचा भाजपाचा डाव.

रत्नागिरी, दि. १६ मार्च २५
राज्यातील भाजपा युती सरकारने आश्वासन देऊनही शेतमालाला भाव दिला नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. लाडक्या बहिणीच्या मतांवर सत्तेत आले पण सत्तेत आल्यानंतर १० लाख बहिणींना लाभापासून वंचित ठेवले आहे. आश्वासन देऊन न पाळणे हे सरकारचे अपयश आहे. भाजपा युती सरकार मस्तीत चालले असून मंत्र्यांमध्ये बेबनाव आहेत, सत्तापिपासू वृत्तीची माणसे सत्तेत आहेत. गँग्ज ऑफ वासेपूर सारखे हे टोळयांचे सरकार असून त्याची किंमत मात्र जनतेला चुकवावी लागत आहे, असा घणाघाती हल्लाबोल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा युती सरकारवर कडाडून हल्ला केला, ते पुढे म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे. बीड जिल्ह्यात सरपंचाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली, त्यामागे कोण आका होता ते जनतेने पाहिले, आता आकानंतर खोक्या आला आहे. एक मंत्री खोटी कागदपत्रे दिल्याप्रकरणी दोषी ठरला आहे तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री रोज बेताल वक्तव्य करून राज्यातील शांतता व सौहार्दाला छेद देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पसरवली जात आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कायदा सुव्यवस्था बिघडली आहे, कोकण व मुंबईचा घनिष्ठ संबंध आहे. कोकणातील मराठी बाणा बिघडवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. कोकणात विपुल प्रमाणात खनिज सापडले आहे ते उद्योगपतींना द्यायचे आहे आणि याप्रकरणी कोकणातील माणूस आडवा येऊ नये म्हणून जाती धर्मात तेढ वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी फक्त उद्योगपतींच्या हितासाठी कोकण उद्धवस्थ करू पहात आहे. शक्तीपीठ सुद्धा उद्योगपतींच्या फायद्यासाठीच केला जात आहे. बहुजन समाजातीला लोकांना गोव्याला तीर्थ पिण्यास पाठवायचे आणि उद्योगपतींना आयात निर्यात मोठ्या प्रमाणात करता यावी यासाठी हा शक्तीपीठाचा घाट घातला जात आहे.

देशाच्या व राज्याच्या राजकारणात आघाड्या, युतीची अपरिहार्य आहे, त्याची किंमत काँग्रेसने मोजलेली आहे. युती, आघाडीमुळे कोकणात काँग्रेस निवडणुका लढू शकली नाही. इंडिया आघाडी वा मविआ म्हणून काम करत असताना काही मर्यादा व अडचणी येणे स्वाभाविक आहे. आता कोकणातही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. सिंधुदुर्गपासून या कामाला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातही काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत, असेही सपकाळ म्हणाले.

औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक..
औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्याने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकले, भावाचा खून केला, लहान भावाला वेडे ठरवले. या क्रूरकर्मा औरंगजेबाला मराठी माणसाने या मातीत गाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आम्हाला प्रमाण आहे पण भाजपाला शिवाजी महाराजांचा इतिहास व शौर्य पुसून टाकायचे आहे म्हणून एक प्रवृत्ती औरंगजेबाची कबर उखडून टाका असे सांगत आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे, ते शौर्य पुसून टाकायचे षडयंत्र आहे. औरंगजेबाचे उदात्तिकरण कोणीच करू नये पण भाजपा स्पॉन्सरच त्याचे उदातिकरण करत आहेत असेही सपकाळ म्हणाले.

शिवेंद्रराजे, छत्रपतींचा अपमान का सहन करता?
भाजपा ज्या कुशीत जन्मला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांना छळणारा विचारही तोच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर याच विचाराने २०० वर्ष महाराजांची समाधी जनतेला कळू दिली नाही. महात्मा जोतीबा फुलेंनी महाराजांची समाधी शोधून काढली. महाराजांचा विचार व कार्य लोकांना कळू नये हा त्यामागचा डाव होता. भाजपा संविधान मानत नाही ते सरसंघचालक गोलवकर यांचे ‘बंच ऑफ थॉट्स’ मानते, याच पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले आहे, ते शिवेंद्रराजेंनी वाचावे. सावरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काय लिहिले ते वाचावे. भाजपाच्या पिल्लावळी छत्रपती शिवाजीराजे व संभाजीराजे यांचा सातत्याने अपमान करत आहेत. अपमान करा व संरक्षण मिळवा, अपमान करा व पुरस्कार मिळवा हे काम भाजपा करत आहे. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकर व कोरटकरला संरक्षण दिले जाते त्या सरकारमध्ये शिवेंद्रराजे भोसले आहेत, आपण हा अपमान का सहन करता? असा प्रश्न विचारून महाराजांचा अपमान करणाऱ्या सरकारमधून राजीनामा द्या, असे आवाहन हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.
या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते व माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश कीर उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा.
तळकोकणात सामाजिक सौहार्द बिघडवून येथील शांतता नष्ट करण्याचा सत्ताधारी लोकांचा डाव आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात खनिजे सापडली आहेत, ती उद्योगपतींना द्यायची आहेत. कोकणातील माणूस स्वाभिमानी आहे त्याचा अडसर यात येऊ नये म्हणून जातीय व धार्मिक मुद्द्यांवरून वातावरण अशांत करून त्यांना त्यांचा कुटील हेतू साध्य करायचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महिनाभरात स्थानिक लोकांशी चर्चा करुन निर्णय घेतले जातील. आता रडायचे नाही तर लढायचे आहे. पक्ष मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर काम करा, प्रदेश काँग्रेस तुमच्या पाठीशी आहे असे प्रांताध्यक्ष सपकाळ म्हणाले.
यावेळी आमदार भाई जगताप, ज्येष्ठ नेते माजी खासदार हुसेन दलवाई, माजी आमदार हुस्नबानो खलिफे, रमेश कीर, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन गणेश पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

तमाशा सम्राट काळू -बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देणारा “रंगबाजी” हा सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई १६ मार्च – ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या विनोदातून मनमुराद हसविले, असे तमाशा सम्राट काळू- बाळू कवलापूरकर यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सोमवारी (ता. १७ मार्च ) सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीमध्ये “रंगबाजी”हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात काळू – बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार आणि निलेशकुमार सहभागी होणार आहेत.

काळू -बाळू म्हटलं तरी मराठी माणसांच्या चेहऱ्यावर सहज हसू उमटतयं, असे हे वाक्य केवळ काळू-बाळू कवलापूरकर यांच्या एका गाजलेल्या वगनाट्याच्या विनोदामुळे प्रचलित झाला आहे. ते वगनाट्य म्हणजे ‘जहरी पेला’, म्हणूनच या जोडगोळीच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने सोमवार दिनांक १७ मार्च रोजी “रंगबाजी”हा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे.
कलिना येथील मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीच्या सांस्कृतिक भवनामध्ये (उत्तर द्वार) सदर सांस्कृतिक कार्यक्रम सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना ॲड. आशिष शेलार मा मंत्री सांस्कृतिक कार्य तथा माहिती तंत्रज्ञान यांची असून या कार्यक्रमास मार्गदर्शन श्री विकास खारगे मा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग यांचे लाभले आहे. प्रा. डॉ.गणेश चंदनशिवे, डॉ. शिवाजी वाघमारे, काळू बाळू यांच्या पाचव्या पिढीतील वंशज सूरजकुमार, निलेशकुमार आणि इतर कलाकार या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. लोककला अकादमी आणि लोकजीवन फाउंडेशन, मुंबई हे सदर कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.

विशेष चर्चा सत्र….!
या दरम्यान तमाशा कला क्षेत्राच्या परंपरेवर विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड, मराठी नाट्यक्षेत्रातील अभिनेते, दिग्दर्शक संतोष पवार सहभागी होणार आहेत. तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका ठक्कर हे करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांना निशुल्क असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री बिभीषण चवरे संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी केली आहे

जिल्ह्यात १७ मार्च रोजी तालुकास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे दि. १६ : नागरिकांना शासनाच्या विविध योजना उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांच्या स्थानिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सोमवार १७ मार्च रोजी सकाळी ११ वा. तालुकास्तरीय लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

जिल्ह्यात पुणे शहर- मुंढवा, शिरुर-तहसिल कार्यालय, हवेली-कोंढवे धावडे, लोणी काळभोर- अष्टापूर, पिंपरी चिंचवड-निरगुडी, मावळ-लोणावळा, मुळशी-माले, खेड-वाडा, दौंड-यवत, पुरंदर-जेजुरी, जुन्नर-निमगाव सावा, आंबेगाव-मंचर, भोर-निगुडघर, वेल्हा-कोंढावळे खुर्द, बारामती-लोणी भापकर आणि इंदापूर- बावडा येथे लोकशाही दिन आयोजित करण्यात आला आहे.

नागरिकांचे प्रश्न तालुकास्तरावर मार्गी लावण्याच्या अनुषंगाने लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये अधिकाधिक नागरिकांनी
आपल्या अडचणी सोडवण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे

येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशीला समारंभ संपन्न

पुणे: पंचवीस ते तीस वर्षे प्रलंबित न्यायालयीन खटले येत्या दोन वर्षात निकाली काढण्याच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने कृती आराखडा तयार केला असून या आराखड्याची अंमलबजावणी योग्यरीत्या करावी यासाठी वकील वर्गाने सहकार्य करावे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले.

येरवडा येथील फौजदारी न्यायालय इमारतीचा कोनशीला समारंभ न्या. ओक यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे, न्यायमूर्ती संदीप मारणे, आरीफ सा. डॉक्टर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, जिल्हा न्यायाधीश अरविंद वाघमारे, पुणे वकील संघाचे अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड आदी उपस्थित होते.

सर्वसामान्य पक्षकारांना योग्य दर्जाचा न्याय मिळावा यासाठी न्यायाधीश आणि वकील वर्गाने तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून न्या. ओक म्हणाले, पुणे जिल्हा हा संपूर्ण देशात सर्वात मोठा न्यायालयीन जिल्हा आहे. राज्यात ५५ लाख ७६ हजार खटले प्रलंबित असून त्यापैकी ३८ लाख ७१ हजार खटले फौजदारी खटले आहेत. ७ लाख ४३ हजार म्हणजेच १२ ते १३ टक्के खटले एकट्या पुणे जिल्ह्यातील प्रलंबित असून ३१ टक्के खटले हे ५ वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून प्रलंबित असलेल्या आहेत. त्यामुळे हे खटले प्रलंबित काढण्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रीकरण करण्यासह न्यायालयांना अधिकाधिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

न्या. वराळे म्हणाले, संविधानाकडे आता आपल्याला केवळ दस्ताऐवज म्हणून नव्हे तर जीवनप्रणालीचे सूत्र म्हणून पहावे लागेल. त्यासाठी आपण संविधानाची तत्त्वे अंगिकारली पाहिजेत तसेच आचरणात आणली पाहिजेत. महाराष्ट्राने आपला पुरोगामी, विकसनशील, प्रागतिक वारसा जपावा, असेही ते म्हणाले.

राज्यमंत्री मोहोळ म्हणाले, पुणे जिल्ह्याची व महानगराची वाढलेली लोकसंख्या पाहता मोठ्या संख्येने खटले न्यायालयात आहेत. त्याचा ताण न्यायालयीन यंत्रणेवर येतो. तसेच शिवाजीनगर येथील न्यायालयामध्ये पक्षकारांची मोठी गर्दी दिसून येते. आज या इमारतीचे भूमिपूजन झाल्यामुळे भविष्यात शिवाजीनगर येथील गर्दी मोठ्या प्रमाणात कमी होईल.

रेवती मोहिते डेरे म्हणाल्या, लोकसंख्या वाढत असून खटलेही मोठ्या प्रमाणात वाढल्याने नवीन न्यायालये होणे ही काळाची गरज आहे. शिवाजीनगर न्यायालय आवारातच दोन नव्या इमारतींचे काम सुरू असून त्यात एका इमारतीत १४ न्यायालये तर दुसऱ्या इमारतीत फक्त पोक्सोसाठीचे ८ न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच येरवडा येथील आज कोनशीला समारंभ झालेल्या इमारतीत २८ न्यायालये स्थापन करण्यात येणार आहेत. राज्य शासनाकडून न्यायालयीन पायाभूत सुविधांसाठी आवश्यक निधी तत्परतेने मिळतो, असेही त्या म्हणाल्या.

यावेळी न्यायाधीश श्री. महाजन यांनी प्रास्ताविक केले.

कार्यक्रमास न्यायालयीन अधिकारी, वकीलवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देहू येथे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पुरस्काराने सन्मान

वारकरी संप्रदायामार्फत संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम -एकनाथ शिंदे

पुणे, दि. १६ : संत तुकोबांनी जगण्याचे तत्त्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितले. या संतांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे लाखमोलाचे काम वारकरी संप्रदाय करत असून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कामही वारकरी संप्रदाय करत आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशकोत्तर अमृत महोत्सवी ३७५ वा सदेह वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त देहू येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार विजय शिवतारे, शरद सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, देहू संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, अक्षय महाराज मोरे, आळंदी संस्थानचे योगी निरंजन नाथ आदी उपस्थित होते.

वारकरी संप्रदायातील हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार प्रेरणादायी ठरेल असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, ज्ञानोबा- तुकोबांच्या जयघोषाने प्रेरणा मिळते. रंजल्या- गांजल्यांची सेवा करण्याचे बळ संत तुकारामांच्या अभंगातून मिळते. नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने मराठी भाषेचा अभिमान वाढला आहे. परंतु, तुकाराम महाराजांनी ४०० वर्षांपूर्वीच क्लिष्ट तत्त्वज्ञान सर्वांना समजेल अशा सोप्या मराठी भाषेत सांगितले. भेदभाव न करता लोकहितासाठी काम करण्याचा उदात्त संदेश त्यांनी दिला. तुकोबांच्या संदेशानुसार शासन काम करत असून सर्वसामान्यांना न्याय देण्याचे, त्यांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी काम करत आहे. वारकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय शासनाने घेतले आहेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी देहू येथे आवश्यक असणारी सर्वतोपरी मदत शासन करेल, अशी ग्वाही श्री. शिंदे यांनी दिली.

पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी लाखो वारकरी येत असतात. आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा सुरु असताना दर्शन बारी सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वारकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. निसर्गाचे रक्षण करणेही आपले कर्तव्य आहे. नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी ठोस प्रयत्न शासन करत आहे. नद्यांच्या प्रदूषण मुक्तीची चळवळ ही लोकचळवळ व्हावी, देशातील सर्वात आदर्श नद्या महाराष्ट्रात आहेत असा नावलौकिक करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ते म्हणाले, तरुण पिढीसाठी संत तुकाराम यांची गाथा ई-बुक स्वरूपात उपलब्ध करुन देण्याचे काम मराठी भाषा विभागाच्या वतीने करण्यात येत असून लवकरच सर्व शाळांमध्ये हे ई-बुक उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.

यावेळी मोठ्या संख्येने वारकरी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटलांकडून अपक्ष खासदाराला खुली ऑफर:म्हणाले – विशाल पाटील सोबत आल्यास सांगलीच्या विकासाला गती मिळेल, त्यांनी विचार करावा

पुणे-भाजपचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपसोबत येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. विशाल पाटील आमच्यासोबत आल्यास केंद्रातील आमची संख्या वाढेल आणि सांगलीच्या विकासालाही गती मिळेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर मला भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगले काम करतोय असे मी समजतो, अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली. तसेच भाजप प्रवेशाबाबत माझा कोणताही विचार नसल्याचे ते म्हणाले.राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका संपल्यानंतरही राजकीय पक्षांमध्ये नेत्यांच्या पक्ष बदलण्याचा सिलसिला सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत शिवधनुष्य हाती घेतले. त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करणारे सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये सामील होण्याची खुली ऑफर दिली आहे.

राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावे लागते पुढे काय होईल माहित नाही, वर्तमान काळात त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत. या कालावधीचा आम्ही विचार करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणालेत. जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली संख्या देखील वाढते, सोबतच सांगली जिल्ह्यातील विकासाच्या कामाला त्यांना जे काय करायचे आहे. त्याला देखील सोपे जाईल, म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर पुन्हा एकदा देत आहोत, त्याचा त्यांनी विचार करावा, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

विशाल पाटलांची प्रतिक्रिया

चंद्रकांत पाटील यांनी भाजपसोबत येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय, ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल. मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर येत असेल तर मी चांगलं काम करतोय असे मी समजतो, असे विशाल पाटील म्हणाले. पण भाजप प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही. मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही. सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गट तट बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझे धोरण आहे, असे विशाल पाटील यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना आधीच उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे विशाल पाटील यांची या मतदारसंघात दोन वर्षांपासून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू होती. पण ठाकरे गटाच्या उमेदवाराला तिकीट जाहीर झाल्याने विशाल पाटील बंडखोरी करत लोकसभेच्या रिंगणात उतरले आणि त्यांनी भाजपचे संजय काका पाटील यांचा पराभव करत ठाकरे गटाला मोठा धक्का देत निवडणूक जिंकली. विशाल पाटील यांनी 5 लाख 71 हजार 666 मतांनी विजय मिळवला, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संजय काका पाटील यांना 4 लाख 71 हजार 613 मते मिळाली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार सुभाष पाटील तिसऱ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांना फक्त 60 हजार 860 मते मिळाली होती.

औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा:पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक एकबोटेंना छत्रपती संभाजीनगर जिल्हा बंदी

छावा चित्रपटातील संभाजी महाराजांच्या मृत्युपूर्व दृश्यांनी कबरीबाबतच्या भावना तीव्र

छत्रपती संभाजीनगर-मागील काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील मुघल सम्राट औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्यातच पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक ,कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याचे वृत्त पसरले. प्रशासनाने त्यांच्या इशाऱ्याची गंभीर दखल घेतली असून मिलिंद एकबोटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा बंदी करण्यात आली आहे. 16 मार्च 2025 ते 5 एप्रिल 2025 पर्यंत जिल्हा बंदीचे आदेश काढण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगरला जाण्याचं माझं कोणतही प्रयोजन नाही, असे असतानाही मला जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली आहे. ही नोटीस दिल्यामुळं माझी करमणूक झाली असल्याचे मिलिंद एकबोटे म्हणाले. माझं सर्व लक्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यततिथीच्या कार्यक्रमाच्या नियोजनावर आहे. हा कार्यक्रम भव्य प्रमाणात व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे एकबोटे म्हणाले. मला दिलेली नोटीस संपूर्णपणे खोटी आहे. माझा उल्लेख माजी आमदार म्हणून करण्यात आला आहे. मी कोणताही माजी आमदार नाही. कदाचीत भावी आमदार असेन असे एकबोटे म्हणाले. काल्पनिक गोष्टी डोक्यात ठेऊन पोलिस अधिकाऱ्याने ही गोष्ट केलेली आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारीत छावा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात मोगल बादशहा औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे कशाप्रकारे हाल केले ते दाखवण्यात आले. या चित्रपटामुळे मराठा समाज व हिंदू धर्मातील लोकांच्या औरंगजेबाच्या कबरीबाबत भावना तीव्र झालेल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचे हाल करणाऱ्याची कबर कशाला पाहिजे? असा सवाल करत ही कबर हटवण्याची मागणी होत आहे. त्याबाबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणावर आक्रोश पाहावयास मिळत आहे. मिलिंद एकबोटे यांनी औरंगजेबाची कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्याच्या माहिती नंतर त्यांना जिल्हाबंदी करण्यात आली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदीचे आदेश काढले आहेत.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांनी अहवालात नमूद केले आहे की, मिलिंद एकबोटे हे अत्यंत कडवट हिंदूत्ववादी कार्यकर्ते असून त्यांचेवर भिमा कोरेगाव दंगलीत सहभागी असल्याचा व इतर धर्मीयांच्या, समाजाच्या धार्मिक भावना दुखावण्याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यांनी प्रतापगडावरील अफजलखान कबर हटवण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. तसेच त्यांचे संघटनेचे अनेक सदस्य व सक्रीय कार्यकर्ते छत्रपती संभाजीनगर व आजूबाजूच्या जिल्ह्यात आहेत. गोपनिय माहितीनुसार जर सदर लोक तुळापूर वरून खुलताबाद येथे यायला निघाले तर हिंदूत्ववादी संघटनांचे अनेक सक्रीय सदस्य, कार्यकर्ते व कट्टर हिंदू लोक त्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे. सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना चालू आहे. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन देखील चालू असून सदर आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास त्याचे हिंसक पडसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात उमटण्याची दाट शक्यता असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 163(1) अन्वये मिलिंद रमाकांत एकबोटे, माजी नगरसेवक तथा अध्यक्ष “धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठाण”, “हिंदू एकता मोर्चा”, “समस्त हिंदू आघाडी”, “शिवप्रताप भुमी मुक्ती आंदोलन” यांना व त्यांच्या समर्थकांना दिनांक १६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हा हद्दीमध्ये प्रवेश करण्याबाबत मनाई आदेश निर्गमित करण्याची विनंती अहवालातून करण्यात आली. अपर जिल्हाधिकारी खिराळकर यांनी जिल्हा बंदी आदेश काढले आहेत.

मिलिंद एकबोटे यांच्यासह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून कबर नष्ट करण्याचा इशारा दिल्यानंतर औरंगजेबाच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. एसआरपीएफची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. या बंदोबस्तात दोन पोलिस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी आणि फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाची तपासणी करूनच सोडले जात आहे.

औरंगजेब 1707 मध्ये वयाच्या 87 व्या वर्षी मरण पावला. त्याला औरंगाबाद आताचे छत्रपती संभाजीनगरपासून 25 किलोमीटर अंतरावर खुलताबाद येथे दफन करण्यात आले. संभाजीनगरमध्ये त्यांच्या पत्नीची कबर ‘बीबी का मकबरा’ आहे. औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात खुलताबादमध्ये दफन करण्याची इच्छा व्यक्त केली होती. जिथे त्यांचे गुरु, सुफी संत सय्यद जैनुद्दीन यांना दफन करण्यात आले होते. ही कबर सय्यद जैनुद्दीन यांच्या कबरीच्या संकुलातच आहे. त्याने त्याला एका साध्या उघड्या कबरीत पुरण्याचा आदेशही दिला होता. नंतर हैदराबादच्या निजामाने तत्कालीन भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड कर्झन यांच्या विनंतीवरून थडग्याभोवती संगमरवरी ग्रील बसवली.

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनमध्ये शनिवारी (दि. १५) दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी ३४६ मेगावॅटची तूट निर्माण झाल्याने स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा (एलटीएस) कार्यान्वित होऊन महावितरणच्या ८० वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे पिंपरी चिंचवड, चाकण एमआयडीसी व परिसर, भोसरी गाव व भोसरी एमआयडीसी, मंचर ग्रामीण परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता.

याबाबत माहिती अशी की, पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (पीजीसीआयएल) तळेगाव येथे ४००/२२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्र आहे. या उपकेंद्राबाहेर अदानीच्या कार्यक्षेत्रातील ४०० केव्ही टॉवर लाइनखाली अज्ञाताने गवत पेटवल्याने महापारेषणच्या तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला आज दुपारी ३.०५ वाजता ट्रिपिंग आले. परिणामी तब्बल ३४६ मेगावॅटची पारेषण तूट निर्माण झाली. पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. त्यामुळे महापारेषण कंपनीच्या चाकण ४०० केव्हीसह चाकण, चिंचवड, भोसरी, ब्रीज स्टोन, थेऊर आणि काठापूर या २२० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रांमधून महावितरणच्या ८० उच्चदाब वाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला.

एलटीएस कार्यान्वित झाल्यामुळे चाकण एमआयडीसी तसेच शिंदेगाव, सावरदरी, वराळे, वासुली, येलवाडी, खालुंब्रे, सांगुर्डी, एमआयडीसी फेज दोन, भांबोली, कुरुळी, नाणेकरवाडी, चिंबोली, निघोजे, सारा सिटी, आळंदी फाटा, मोई आदी गावांतील ८०० उच्चदाब व ४ हजार लघुदाब औद्योगिक ग्राहक आणि ३५ हजार घरगुती व व्यावसायिक ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर खंडित होता. यासह पिंपरी चिंचवड शहर, भोसरी गाव, भोसरी एमआयडीसी, जय गणेश साम्राज्य, किवळे, ताथवडे, रहाटणी, थेरगाव, निगडी, प्राधीकरण, नाशिक रोड, इंद्रायणीनगर, ब्लॉक जे, क्यू, एस, ईएल, टी, जनरल ब्लॉक, मंचरचा ग्रामीण परिसर, नारायणगावचा पूर्व परिसर, केसनंदआव्हाळवाडीपेरणेथेऊरवडतीकुंजीरवाडीलोणी काळभोरसोरतापवाडीफुरसुंगीउरुळी देवाची आदी परिसरातील सुमारे २ लाख ४९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा आज दुपारी ३.०५ ते ४.०५ वाजेपर्यंत तासभर बंद होता.  

तळेगाव-लोणीकंद ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग आल्यामुळे महापारेषणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पाहणी सुरू केली. यामध्ये पीजीसीआयएल अतिउच्चदाबाच्या उपकेंद्राबाहेर टॉवर लाइनखालीच गवत पेटवल्यामुळे हा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. पेटवलेल्या गवताच्या धुरामध्ये बाष्प असल्यामुळे ४०० केव्ही लाइनमध्ये ट्रिपिंग आले. ही आग तातडीने विझवल्यानंतर त्या ठिकाणच्या टॉवर लाइनची तपासणी करून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला.

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा

पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर वस्तीतील पारी कंपनी जवळील पुणे महापालिकेचा दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प हटविण्यात यावा अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पक्षाने दिला आहे.काल रात्री लागलेल्या भिषण आगीत कचरा विलिनीकरण प्रकल्प जळुन खाक झाला. प्रकल्पातील कामगार गावी गेल्याने सुदैवाने कोणी मृत्यूमुखी पडले नाहीत.याबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,मुंबई महापालिका अधिनियम कायद्यानुसार लोकवस्तीच्या पाचशे मीटर दूर अंतरावर कचरा विलिनीकरण प्रकल्प असावा असा नियम आहे याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने दाट लोकवस्तीच्या मध्यभागी प्रकल्प उभारला आहे . प्रकल्प सुरू झाल्या पासून सातत्याने या प्रकल्पाला भीषण आगी लागत आहे.त्यामुळे स्थानिक रहिवाशांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे ‌

रात्री सुदैवाने कामगार व आसपासच्या लोकवस्त्यांतील रहिवाशांचे प्राण वाचले मात्रआगीत लाखो रुपयांची साहित्य जळुन खाक झाले‌
धायरीच्या मध्यवस्तीतील या प्रकल्पामुळे सोसायट्यांसह परिसरात भितीचे वातावरण आहे.प्रशासनाने तातडीने प्रकल्प बंद करावा.भीषण आगीच्या घटनांमुळे प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे.अशी तक्रार धनंजय बेनकर, निलेश दमिष्टे, सनी रायकर, संदीप विठ्ठल पोकळे,संतोष चौधरी, चिंतामणी पोकळे, अमर खेडेकर,नेताजी बाबर, सुरेश परकर, अजय बेनकर या स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे, न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणातून त्यांच्या हक्कांचे संरक्षण- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने जागतिक महिला आयोगाच्या अंतर्गत ६९ व्या सत्रानिमित्त ऑनलाइन चर्चासत्राचे आयोजन

मुंबई, दि. १४ मार्च २०२४ : “शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये स्त्री-पुरुष समानता साध्य करणे आणि महिला व बालकांवरील हिंसाचार रोखण्यासाठी न्याय व्यवस्थेत ठोस सुधारणा आवश्यक आहेत,” असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती तथा स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. जागतिक महिला आयोगाच्या ६९ व्या सत्रानिमित्त स्त्री आधार केंद्राने ऑनलाइन चर्चासत्र आयोजित केले होते.

या परिसंवादात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा पाठक यांनी केले.

शिक्षण, महिला चळवळ आणि साहित्याचे महत्त्व – तारा भवाळकर

साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी यावेळी सांगितले की, “पूर्वी महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असे, परंतु मौखिक परंपरेद्वारे ज्ञानाचे जतन आणि प्रसार करण्यात महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.” त्यांनी ग्रामीण महिलांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानावर प्रकाश टाकला. “गृहकृत्ये करताना स्त्रिया गाणी गात असत, त्यातून त्यांचे दुःख आणि आनंद व्यक्त होत असे. साहित्य हे केवळ औपचारिक शिक्षणापुरते मर्यादित नसून, ते अनुभवांवर आधारित आहे,” असे त्यांनी सांगितले.
आपत्ती व युद्धानंतर महिलांचे प्रश्न बाजुला पडतात : चांदनी जोशी , नेपाळ
नेपाळमध्ये, जेव्हा मला समजले की सुमारे तीन वर्षांपूर्वी महिला मंत्रालयाला इतर मंत्रालयांसोबत एकत्र केले जाणार आहे, तेव्हा सर्व महिलांच्या विचारमंथन गटाने पंतप्रधानांकडे धाव घेतली. त्यामुळे, आम्ही तिथे गेलो, त्यांच्याशी संवाद साधला आणि समजून घेतले की त्यांनाही याबाबत कल्पना नव्हती. त्यानंतर, आता तिथे एक स्वतंत्र आणि पूर्ण सक्षम महिला मंत्रालय अस्तित्वात आहे.
असे चांदनी जोशी, नेपाळ यांनी मांडले
युरोपमधील कायदे आणि महिलांवरील हिंसाचार – अॅड. प्रणिता देशपांडे

युरोपमधील महिलांविरोधी हिंसाचार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांवर बोलताना अॅड. प्रणिता देशपांडे यांनी स्पेन आणि स्वीडनमध्ये घरगुती हिंसाचारासाठी विशेष न्यायालये कार्यरत आहेत असे सांगितले. “इस्तंबूल करार हा महिलांच्या हक्कांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून, अशा आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी भारतातही प्रभावीपणे होणे गरजेचे आहे.”

चौथे राज्य महिला धोरण आणि ६९ वा जागतिक महिला आयोग – जेहलम जोशी

स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी यांनी महाराष्ट्राच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीबाबत चर्चा केली. “लिंग समानता आणि महिला सक्षमीकरणासाठी समन्वय साधणे अत्यावश्यक आहे. पर्यावरण, निर्णय प्रक्रिया, गरिबी निर्मूलन, आरोग्यसेवा आणि सशस्त्र संघर्ष थांबवणे या महिलांशी संबंधित क्षेत्रांमध्ये धोरणात्मक सुधारणा गरजेच्या आहेत,” असे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले.

आंतरराष्ट्रीय महिला धोरण आणि बदलते सामाजिक संदर्भ – डॉ. पाम रजपूत

राष्ट्रीय महिला आंदोलन अभ्यासक डॉ. पाम रजपूत यांनी बीजिंग+30 संदर्भात चर्चा करताना सांगितले की, “जागतिक ६९ व्या आयोगाच्या सत्रात पहिल्याच दिवशी जागतिक राजकिय सनद घोषित करण्यात आली. ९५ च्या कृती रूपरेषा निर्णयांचे महत्व अधोरेखित करण्यात येऊन शाश्वत विकास ऊद्दिष्टांशी समन्वयावर भर देण्यात आला आहे. न्युयॅार्कच्या येथील वातावरणातही स्री आधार केंद्राच्या या कृतीसत्रात ग्लोकल अशा दोन्हीवरील कृतीबाबत विचार केला जात आहे हे स्वागतार्ह आहे.’

स्त्री आरोग्य हक्क आणि समाजातील बदल – नीरजा भटनागर

विकास सल्लागार नीरजा भटनागर यांनी प्रजनन आरोग्य आणि मासिक पाळी व्यवस्थापन यासारख्या महिलांसंबंधी समस्यांवर प्रकाश टाकला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “भारतासह अनेक देशांमध्ये महिलांच्या आरोग्यासंबंधी मूलभूत अधिकारांकडे अद्याप पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. त्यामुळे धोरणे आणि योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे प्रत्यक्षात व जागतिक महिला आयोगाच्या सत्रातही सनदेतुन हा विषय वगळला गेला हे चिंताजनक आहे .’

कचरा व्यवस्थापन आणि महिला सशक्तीकरण – शिरीष फडतरे

शिरीष फडतरे यांनी महिलांच्या सशक्तीकरणासाठी कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील संधींवर चर्चा केली. “कचऱ्यातील प्लास्टिकचा पुनर्वापर करून त्याचा उपयोग इंधन निर्मितीसाठी करता येतो. अशा पर्यावरणपूरक उपक्रमांत महिलांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात,” असे त्यांनी सांगितले.

नीलमताईंमुळे संकटग्रस्त महिलांना मदत – अंजली वाघमारे

सामाजिक कार्यकर्त्या अंजली वाघमारे यांनी संकटग्रस्त महिलांना त्यांच्या अडचणींवर मात करण्यास मदत केल्याबद्दल डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, डॉ. नीलमताईंमुळे महिलांची राजकारणातील प्रतिमा सुधारली असून, काही महिला सरपंच किंवा गावप्रमुख बनू शकल्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि पाठिंब्यामुळे हे शक्य झाले.

त्यानंतर, परिसंवादाच्या समारोपात ओएसडी श्री. अविनाश रणखांब यांनी सर्वांचे आभार मानले.
समारोप करतांन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणावर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की, महिलांना समान वेतन आणि संधी मिळण्यासाठी केवळ कायदे असणे पुरेसे नाही, तर त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढण्यासाठी न्यायसंस्थेने अधिक सक्रिय भूमिका बजावली पाहिजे. तसेच, समाजातील लिंगभेद दूर करून महिलांना सर्वच स्तरांवर समता मिळवून देण्यासाठी शिक्षण, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक बदल आवश्यक आहे.

त्यांनी ऊसतोड मजूर महिलांच्या समस्यांकडे लक्ष वेधत सांगितले की, मजुरीच्या क्षेत्रात महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे, त्यांच्यासाठी विशेष धोरणे आखून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात महिलांना डिजिटल शिक्षण मिळावे, सायबर गुन्हेगारी आणि ऑनलाइन छळ यांसारख्या समस्यांवर कठोर कायदे करणे गरजेचे आहे. शेवटी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी केवळ कायद्यांवर अवलंबून राहणे पुरेसे नाही, तर संपूर्ण समाजाने महिलांच्या न्याय्य हक्कांसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. “जगभरातील विविध देशांमध्ये महिलांच्या हक्कांसाठी लढा सुरू आहे. परंतु लिंग समानतेच्या दिशेने अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे. यासाठी महिला कार्यकर्त्यां, लाडकी बहिणींचा नेतृत्व विकास , महिलांसाठी सुरक्षित आणि न्यायसंगत समाज घडवण्यासाठी अंमलबजावणीस चालना देण्याच्या सुचना सरकारकडे केल्या जाणार आहेत. ना. देवेंद्र फडणवीस, ना. एकनाथ शिंदे, ना.अजित पवार यांचेकडे मी अधीवेशनात मांडलेल्या मुद्द्यावर सातत्याने पाठपुरावा करायला सर्वांनी एकत्र यावे,” असे आवाहन करत त्यांनी परिसंवादाची सांगता केली.

औरंगजेबाला 27 वर्षे राहूनही इथे राज्य करता आले नाही त्याचे प्रतीक म्हणजे ही कबर -रोहित पवार

मुंबई- औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणून त्याच्या खुलताबाद येथील कबरीला हात न लावणे योग्य ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी नुकतेच औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचे विधान केले होते. त्यानंतर आज रोहित पवारांनी हे विधान केल्यामुळे या प्रकरणी शरद पवार गटात मतभेद असल्याचे अधोरेखित झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीवरून राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप आमदार तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. त्यानंतर विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने औरंगजेबाची कबर पाडा, अन्यथा बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथील कबर परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त मत व्यक्त केले आहे.

रोहित पवार शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मोगल बादशहा औरंगजेब उत्तरेतून येऊन महाराष्ट्रात तब्बल 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे राज्य करता आले नाही. त्याचे प्रतीक म्हणजे त्याची ही कबर आहे. ही कबर आज उखडून टाकली, तर भविष्यात लोक गडबड करतील. त्यामुळे एक प्रतीक म्हणून या कबरीला हात न लावणे योग्य ठरेल.

तत्पूर्वी, शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनीही औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्याचा दावा केला होता. औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य व गौरवाचे प्रतीक आहे. त्यांच्या शौर्यांचा इतिहास पुढच्या पिढीला कळाला पाहिजे. त्यामुळे ही कबर उखडून टाकू नये. सरकार राज्यातील मुख्य प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी असे काहीतरी समोर आणत आहे. ते सर्वसामान्यांच्या मुलभूत प्रश्नांवर बोलण्यास तयार नाही, असे म्हणाले होते.

उल्लेखनीय बाब म्हणजे शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके यांनी रोहित पवार व अभिजीत पाटील यांच्याहून वेगळी भूमिका मांडली आहे. त्यांनी औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष नव्हता असे म्हणत थेट औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची भाषा केली आहे. ते गत 11 मार्च रोजी पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, औरंगजेब हा काही राष्ट्रपुरुष किंवा समाजसेवक नव्हता. त्याला तुम्ही सामाजिक रूप देऊ नका. त्याची कबर हटवण्यात गैर नाही. त्यामुळे त्याची कबर काढून टाकली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे.नीलेश लंके यांच्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात औरंगजेबाच्या कबरीवरून मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुसरीकडे, विश्व हिंदू परिषदेने आज अहिल्यानगर येथे पत्रकार परिषद घेऊन याविषयी 17 तारखेला सर्वच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तर औरंगजेबाची कबर काढून टाकली नाही तर लाखो हिंदू छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन कार सेवा करतील, असा इशारा बजरंग दलाचे महाराष्ट्र गोवा संयोजक विवेक कुलकर्णी यांनी दिला आहे. त्यामुळेखुलताबाद येथील औरंगजेब कबर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या ठिकाणी एसआरपीएफची 1 तुकडी, तसेच 2 अधिकारी आणि 15 कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठवण्यात आले आहेत. कबरीकडे जाणाऱ्या प्रत्येक माणसाला चेक करून सोडले जात आहे .

विकास कामांची बिले २४ मार्च पर्यंतच सादर करा, मुदतवाढ मिळणार नाही- आयुक्तांनी केले स्पष्ट

पुणे – महापालिकेच्या विविध विभागाकडून आर्थिक वर्ष ३१ मार्चला संपत असतानाही अखेरच्या दिवसापर्यंत कामाची बिले सादर करतात. यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च झालेला दिसतो. हे प्रकार बंद करण्यासाठी २४ मार्च ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच तरतूद लॅप्स झाली तर त्याची जबाबदारी विभाग प्रमुख यांच्यावर असणार आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

आयुक्तांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका प्रशासनाने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये विविध विकास कामांसाठी अंदाजपत्रकीय तरतूदी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मोठ्या प्रमाणात देयके अदा करण्यासाठी सादर केली जातात. त्यामुळे या महिन्यात प्रमाणाबाहेर खर्च (Rush of Expenditure) झालेला दिसतो. सदर बाब वित्तीय नियमांशी विसंगत असून प्रशासकीय दृष्ट्याही उचित नसल्याने सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या कामांची देयके २४ मार्च पर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आदेशात म्हटले आहे की, या मुदतीत बिला सोबत सादर करावयाच्या सर्व आवश्यक कागदपत्रासंह परिपूर्ण असे देयक सादर करण्यात यावे. अपूर्ण कागदपत्रासह देयक सादर केल्यास व त्यामुळे देयक अदा करण्यास विलंब झाल्यास किंवा तरतूद व्यपगत झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व व जबाबदारी संबधित खात्याची, विभागाची राहील. याबाबत कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.सर्व खातेप्रमुख यांनी आपले विभागातील सर्व संबधितांना वरील बाबतची सूचना देऊन विहित केलेल्या वेळेत बिले मुख्य लेखा व वित्त विभागाकडे पाठविण्याची सर्व खाते प्रमुख यांनी दक्षता घ्यावी. असेही आदेशात म्हटले आहे.