Home Blog Page 402

चंद्रकंस, कौशिकरंजनी, रागेश्री कंस, पुराना चंद्रकंस, मधुकंस आणि मधुरकंस रागांचे मनोहारी सादरीकरण

स्वरावर्तन आयोजित ‌‘कंस‌’ प्रकार मैफलीत आरती ठाकूर-कुंडलकर यांचे सुश्राव्य गायन

पुणे : भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत अनेकविध रागरागिण्यांनी समृद्ध आहे. यातील ‌‘कंस‌’ या प्रकारातील विविध रागांचे मनोहारी दर्शन आज रसिकांना घडले. किराणा घराण्यातील ज्येष्ठ गुरू लीलाताई घारपुरे आणि जगविख्यात शास्त्रीय गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन लाभलेल्या त्यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांनी गुरूंच्या सान्निध्यात ग्रहण केलेल्या सांगीतिक वारश्यातील ज्ञान पुढील पिढीपर्यंत प्रवाहित रहावे या हेतूने या मैफलीची मांडणी केली होती.

आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या शिष्य परिवाराच्या पुढाकारातून स्वरावर्तन फाऊंडेशनतर्फे या राग संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. मैफल न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारातील गणेश सभागृहात आयोजित करण्यात आली होती. डॉ. दिलीप देवधर यांची विशेष उपस्थिती होती.

कुंडलकर यांनी मैफलीची सुरुवात चंद्रकंस रागातील ‌‘अब कल नाही मनवा‌’ या विलंबित एकतालातील बंदिशीने केली. या नंतर तीन तालातील ‌‘मूरत मन भाए मोहन की‌’ ही बंदिश सादर करून त्याला जोडून कौशिकरंजनीतील आडा चौतालातील सुयोग कुंडलकर रचित ‌‘मोरी आली मोहे अब नाही चैन‌’ ही बंदिश प्रभावीपणे सादर केली. रागेश्री कंस सादर करताना रूपक तालातील ‌‘नाद भेद अपार कोहून‌’ आणि ‌‘ए सूर साधे षड्ज गंधार‌’ ही बाळासाहेब पुंछवाले यांची बंदिश सादर करून आरती ठाकूर-कुंडलकर यांनी रसिकांना मोहित केले.

ओडव बागेश्री म्हणजेच राग पुराना चंद्रकंस मांडताना त्यांनी ‌‘लगन तोसे लागी बनवारी‌’ ही अध्धा तीन तालातील बंदिश तयारीने सादर केली. डॉ. प्रभा अत्रे यांची राग मधुकंसमधील ‌‘माने ना माने ना कान्हा मोरी बतिया‌’ या बंदिशीची रसिकांना झलक ऐकविली. मैफलीची सांगता डॉ. प्रभा अत्रे यांच्या सांगीतिक अभ्यासातून निर्माण झालेल्या मधुरकंस रागाने केली. या रागातील ‌‘पार करो मोरी नैय्या‌’ ही गुरूंनी रचलेली बंदिश ऐकविताना आरती ठाकूर-कुंडलकर यांच्या गायनातून गुरुस्वरांची अनुभूती आली.

गुरूंकडून प्राप्त झालेले शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्ञान आरती ठाकूर-कुंडलकर यांनी संगीत अभ्यासक, विद्यार्थी, रसिक यांच्यासमोर सादर करताना त्यांची गुरूंप्रति असलेली श्रद्धा, प्रेमभाव, तल्लीनता, एकरूपता आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या ओढीतून बहरत गेलेले गायन रसिकांच्या मनात अवितरपणे गुंजत राहिले. आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या शिष्यांनी आयोजित केलेल्या या मैफलीत गुरू आणि शिष्यांमधील भावनिक अनुबंधाचे अनोखे दर्शन रसिकांना घडले. आरती ठाकूर-कुंडलकर यांना संजय देशपांडे (तबला), सुयोग कुंडलकर (संवादिनी), मीनलता जोशी-देशपांडे, कस्तुरी कुलकर्णी (तानपुरा) यांनी सुरेल-समर्पक साथ केली.

डॉ. दिलीप देवधर, आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर यांच्या हस्ते सुरुवातीस दीप प्रज्वलन झाले. अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी दहा वर्षांपासून स्वरावर्तन फाऊंडेशनच्या माध्यमातून आरती ठाकूर-कुंडलकर आणि सुयोग कुंडलकर सजगपणे कार्यरत आहेत. फाऊंडेशनच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या माहितीपटाचे अनावरण या प्रसंगी डॉ. दिलीप देवधर यांच्या हस्ते झाले. संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसह अनेक मान्यवर मैफलीस आवर्जून उपस्थित होते.

मंगळवार पेठेतील जागा आंबेडकर स्मारकासाठीच राहील

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शब्द; शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनालगतची सुमारे अडीच एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीच राहील. यासंदर्भात लवकरच निर्णय करून ही जागा स्मारक उभे करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस काल पुणे दौऱ्यावर आले असता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या शिष्टमंडळाचे त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी स्मारक उभारण्याबाबत सकारात्मकता दर्शवली असून, स्मारकाचा मार्ग प्रशस्त झाल्याची भावना शिष्टमंडळातील सर्वच प्रतिनिधींनी व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्र्यांना भेटलेल्या या शिष्टमंडळात माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, राहुल डंबाळे,ॲड. अविनाश साळवे, परशुराम वाडेकर, ॲड. जयदेव गायकवाड, शैलेंद्र चव्हाण, रोहिदास गायकवाड, ॲड. अरविंद तायडे, युवराज बनसोडे, शैलेंद्र मोरे व अतुल साळवे यांचा समावेश होता.

मंगळवार पेठेतील सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा खाजगी विकसकाला देण्याचा घाट घातला आहे. मात्र, या जागेवर शासनाने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यथोचित स्मारक व्हावे, यासाठी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष, संघटना व कार्यकर्त्यांकडून आंदोलन केले जात आहे.

मुरलीधर मोहोळ यांनीही बाबासाहेबांचे चांगले स्मारक उभारण्यासाठी लागेल तितका निधी उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. डॉ. आंबेडकरांचे स्मारक व्हावे, ही भावना पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेची आहे. यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी यावेळी सांगितले.

सुषमा अंधारेंनी गायले..ठाणे कि रिक्षा…:म्हणाल्या – आता आपटे, सोलापूरकर, कोरटकर यांच्याकडे तोडफोड कधी?

मुंबई-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचे वादग्रस्त गाणे गात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा चिमटा काढत त्यांना आता छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या आपटे, सोलापूरकर व कोरटकर यांच्याकडे केव्हा तोडफोड करायची असा सवाल केला आहे.

सुषमा अंधारे कुणाल कामराचे विडंबनात्मक गाणे गात म्हणाल्या,


ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय ! एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए। मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए ठाणे की रिक्शा, चेहरे पर दाढ़ी , आंखों ओआ चश्मा हाय। मंत्री नही है वो दल बदलू हैं और कहा क्या जाए, जिस थाली में खाये उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए। तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे ठाणे की रिक्शा चेहरे पर दाढ़ी, आंखों पर चश्मा हाय !

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, चिडचिड होत आहे? बापरे… प्रचंड चिडचिड होत आहे, तोडफोड होत आहे. पण साधा प्रश्न आहे माझा… जेव्हा भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती? आपटेंमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचे कार्यालय तुम्ही का फोडले नाही? राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगण्यास सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचे कार्यालय किंवा ते ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होते ते तुम्ही का फोडायला गेला नाही.प्रशांत कोरटकरने चक्क शिवाजी महाराजांच्या जैविक वडिलांपर्यंत पोहोचण्याची भाषा केली. त्यावेळी प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत? एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही सहन केल्या. आता एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल, तर तुम्हाला एवढ्या मिर्च्या का लागल्या? येस वुई सपोर्ट कुणाल कामरा, असे सुषमा अंधारे सत्ताधारी शिवसेनेवर टीका करताना म्हणाल्या.

विरोधी बाकांकडे कटाक्ष टाकत,CM म्हणाले, कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो

छात्या बडवू नका -धडा शिकविणारच ; कॉमेडियन कामरा वरून सभा तहकूब अन CM आक्रमक

मुंबई- देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पुन्हा सांगतो, आम्हाला स्टँडअप कॉमेडी आवडते. आम्ही ती पाहतो. त्याला दाद देणारे लोकं आहोत. पण त्याच्या नावाखाली मध्यंतरीच्या कालावधीत रणवीर अलाहाबादियाने ज्या प्रकारचे स्टेंटमेंट दिले, त्या असल्या गोष्टी आम्ही सहन करणार नाही. हे लोक आई-वडिलांसंदर्भात घाणेरडे स्टेटमेंट देतील आणि कुठल्यातरी ओटीटी प्लॅटफॉर्मवरून तसल्या गोष्टी चालवतील हे चालणार नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण शांत बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. म्हणून यासंदर्भात जी काही कडक कारवाई करता येईल, ती केली जाईल. त्यात कुठल्याही परिस्थिती कुणीही कितीही दबाव आणला तरी संबंधितांना सोडले जाणार नाही.

आता जे काही लेफ्ट लिबरल विचार तयार झालेत. याला अर्बन नक्षलवादीही म्हणता येईल. त्यांचा उद्देश एकच आहे. समाजातील मानकांना अपमानित करणे, देशातील संस्थांना अपमानित करणे, देशांच्या संस्थात्मक संरचनेवरून लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशी विधाने करणे अशा प्रकारची विधाने करणाऱ्यांना कोणत्याही स्थितीत सोडले जाणार नाही. त्यामुळे यासंदर्भात कठोरातील कठोर कारवाई केली जाईल अशी मी ग्वाही सभागृहाला देतो, असे फडणवीस म्हणाले.मुख्यमंत्री म्हणाले, ज्या प्रकारे कुणाल कामरा यांनी हे अपमानास्पद शब्द वापरले ते सहन केले जाणार नाहीत. त्यांनी माझ्यावर शिंदेंवर सर्वांवर टीका करावी. व्यंग करावे. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशाप्रकारे सुपाऱ्या घेऊन कुणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचे काहीही कारण नाही. त्यामुळे मी सर्वांना सांगतो, अभिव्यक्तीवर घाला घालण्यात येत असल्याच्या छात्या बडवू नका. या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झाले तरी अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुपारी घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. ही मंडळी महाराष्ट्राचे मानसिक आरोग्य खराब करण्याचे काम ही मंडळी करत आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुमचे माझे राजकीय मतभेद असू शकतात, पण राज्यातील एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदरभाव आहे, त्या नेत्याविषयी कुणीतरी इतक्या खालच्या दर्जाचे काहीतरी बोलतो व आमच्या समोरील बाकावरील काही जण हे तत्काळ त्याचे समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचे ट्विट येते, दुसऱ्याची क्लिप येते, तिसऱ्याची क्लिप येते. त्यामुळे हे कामराशी ठरवून चालले आहे की? कामराला तुम्हीच सुपारी दिली आहे काय ? असा प्रश्न विचारण्याची वेळ येथे आली आहे.

राहुल गांधी लाल रंगाचे एक छोटेसे संविधान घेऊन फिरतात. ते संविधान हातात घेऊन कामराने एक फोटो ट्विट केला आहे. त्यांनी ते संविधान वाचले असते तर त्यांनी असा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, अमर्यादित आहे. तथापि, त्याची मर्यादा काय आहे? तुम्ही ज्याक्षणी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता, त्या क्षणी तुमचे स्वातंत्र्य मर्यादित होते. ही मर्यादा ठरलेली आहे. म्हणून तुम्हाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कुणाल कामरावर झालेल्या वादावर निवेदन केले. ते म्हणाले, सभागृहात उपस्थित झालेला विषय अतिशय गंभीर आहे. आपण कुणीही अशा प्रकारच्या विचाराचे नाही की कुणी आपले मत अभिव्यक्त करू नये. किंबहुना हास्य असेल किंवा व्यंग असेल, त्याचा पुरस्कार करणारे आपण लोक आहोत. एखादे राजकीय व्यंग झाले तरी, त्या व्यंगातून आपण कधीही त्याला कुठला दुसरा रंग देण्याचा प्रयत्न केला नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानणारे लोक आपण आहोत. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे स्वैराचाराकडे जात असेल, तर मात्र ते काही मान्य होऊ शकणार नाही. खरे म्हणजे, हा जो स्टँडअप कॉमेडियन आहे कुणाल कामरा, त्याचा इतिहास पाहिला तर देशातल्या उच्चपदस्थ लोकांसंदर्भात मग ते पंतप्रधान असो किंवा मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो अथवा न्यायव्यवस्था असो यांच्यासंदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचे बोलणे, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा पद्धतीने बोलणे ही त्याची कार्यपद्धती आहे.

मुळात या व्यक्तीला एकप्रकारे वाद तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. या हव्यासातून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला. खरे म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की, 2024 च्या निवडणुकीने जनतेनेच ठरवून दिले की, कोण खुद्दार व कोण गद्दार आहे. हा कामरा महाराष्ट्रातील जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हिंदूहृदयसम्राट यांच्या विचारांचा वारसा कुणाकडे आहे हे दाखवून दिले आहे. तो वारसा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला दिला. त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन कुणी काम करत असेल तर सहन केले जाणार नाही.

चुकीच्या मोजणीने २ सोसायट्या संकटात:खासगी मिळकतदारासाठी कारस्थान केल्याचा आरोप 

इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा बंद होण्याचा धोका

पुणे :भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या चुकीच्या मोजणीने सोसायटीची ये-जा करण्याचा पूर्ण रस्ता दुसऱ्याच मिळकतीत दाखवला गेल्याने  बालेवाडीतील २ सोसायट्या संकटात सापडल्या आहेत.भविष्यात या इमारती पाडल्या जाण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा बंद होण्याचा धोका निर्माण झाला असून या संशयास्पद कृतीविरुद्ध संबंधित भू-कर मापक कर्मचाऱ्यावर कारवाई करावी,अशी लेखी तक्रार आणि  मागणी  सोसायटी पदाधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडे केली आहे. बालेवाडी येथील  अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी ही तक्रार नोंदवली आहे.खासगी मिळकतदारासाठी हे कारस्थान केल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे २४  मार्च २०२५ रोजी सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत दोन्ही सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली.अमित इम्राल्ड पार्क चे अध्यक्ष डॉ. विजय भिलवाडे,सेलिब्रेशन सोसायटीचे सचिव  संतोष छाजेड, राजाराम ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी,फ्लॅट धारक या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

बालेवाडी येथे स. नं ३१/१ मध्ये अमित एमराल्ड पार्क सोसायटी आणि सेलिब्रेशन सोसायटी आहे. इमारती चे नकाशे २००७ आणि २०१० ला महापालिकेकडून मान्य झाले व त्यानंतर बांधकाम होऊन लोकांनी ह्या इमारती मधे सरकारी स्टैम्प ड्यूटी भरून फ्लॅट विकत घेतले व त्याला महापालिकेने भोगवटा पत्र सुद्धा दिले आहे.  त्यासाठी आवश्यक त्या सरकारी मोजण्या २००५ आणि २०१० झालेल्या आहेत ,पुणे महापालिकेच्या परवानग्या घेतल्या गेलेल्या आहेत आणि ह्या सर्व इमारती अधिकृत आणि कायदेशीर आहेत. अमित एमराल्ड पार्क चा रस्ता महापालिकेने एफ एस आय स्वरूपात मोबदला देऊन ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी ह्या दोन्ही सोसायटी ने हायकोर्टात महापालिकेच्या विरोधात रस्ता दुरुस्त करून द्यावा असा दावा सुद्धा दाखल केलेला आहे आणि आज भूमीअभिलेख ने रस्ता गायब करून दुसऱ्यालाच देऊन टाकला आहे.

दिनांक ०३-०२-२०२५ रोजी भूमी अभिलेख कार्यालयाचे  हद्दीच्या खुणा दाखविणा बद्दल पत्र सेलिब्रेशन  आणि अमित इमराल्ड सोसायटीला मिळाले व भूमी अभिलेख चे भूकरमापक व्ही व्ही कोकरे यांनी दोन्ही सोसायटी च्या लोकांना विश्वासात न घेता जागेवर येऊन परस्पर हद्दी दाखवल्या व हा रस्ता दुसऱ्याच्या मिळकती मधे दाखवला व सोसायटीच्या हरकती न नोंदवता व्ही व्ही कोकरे निघून गेले. त्यानंतरसोसायटीनी  त्वरित ४ तारखेला हरकत दाखल केल्या. हद्द दाखविण्यासाठी आलेले भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी हद्दींची नोंद चुकीच्या पद्धतीने केली आणि सोसायटी चा रस्ता म्हणजे स. नं ३१/१ मधील भाग शेजारच्या खासगी  मिळकतीत म्हणजे स. न. २९ मधे दाखविला गेला .त्यामुळे तेवढी जागा आणि रस्ता कागदोपत्री महापालिकेचा भाग राहिलेला नाही व ती मिळकत खासगी झाली आहे. भविष्यात संबंधित मिळकतीचे मालक ती जागा ताब्यात घेऊन अमित एमराल्ड सोसायटीच्या इमारती पाडण्याचा आणि ६० कुटुंबाची ये-जा असलेला रस्ता बंद करू शकतात. त्यामुळे दोन्ही सोसायटयांनी सावध होऊन या मोजणीला आणि चुकीच्या हद्दीला हरकत घेऊन भूमी अभिलेख कार्यालयात तक्रार दाखल केली आहे.चुकीची नोंद दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

भू -करमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी दाखविलेल्या हद्दी चुकीच्या आणि भ्रष्ट पद्धतीने केल्या असल्यामुळे सदर चुकीचे नकाशा ची प्रत कोणालाही देऊ नये, वरिष्ठांनी  स्वतः खातरजमा केल्या शिवाय मोजणी प्रक्रिया निकाली काढू नये,सदर नकाशे  संपूर्ण रेकोर्ड सहित म्हणजेच गुगल नकाशे, जुन्या मोजणी, टिपण, फाळणी वर्गरे पुन्हा तपासून त्याची वरिष्ठांनी  स्वतः खातरजमा करून जागेवर पुन्हा हद्दी दाखविण्यात याव्यात,अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे.भुकरमापक व्ही. व्ही. कोकरे यांनी सदर प्रकरणात भ्रष्टाचार करून हद्दी दाखविल्या असल्यामुळे भु-करमापक व्ही. व्ही. कोकरे यांची चौकशी करावी आणि सदर प्रकरण त्यांच्याकडून काढून इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या नावे वर्ग करणेत यावे  व नव्याने त्याच्या हद्दी दाखवाव्यात असेही या तक्रारीत म्हटले आहे.
जमाबंदी आयुक्तांनी ह्या गैरप्रकारात स्वतः लक्ष घालावे आणि त्याच बरोबर हा रस्ता महापालिकेने २००८ सालीच ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे महापालिका आयुक्तांनी जागेवर येऊन पाहणी करून ह्या बाबतीत निर्णय घ्यावा आणि हा रस्ता दुसऱ्यांच्या घशात घालू नये अशी मागणी सोसायटीच्या सभासदांनी पत्रकार परिषदेत  केली आहे..

तर माझ्यावर,आमदारांवर,आणि शिंदेंवर देखील दररोजच गुन्हे दाखल होतील- संजय राऊत


मुंबई-मी तर रोजच टीकात्मक लिहित असतो. ते माझे काम आहे. त्यामुळे माझ्यावर तर दररोजच गुन्हे दाखल होतील. विधानसभेतील सदस्यांचे कामकाज पाहिले तर त्यांच्यावर देखील रोज गुन्हे दाखल होतील. एकनाथ शिंदे यांचे सभागृहातील भाषण वाचले तर त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल होतील. कमजोर लोकांवर का गुन्हे दाखल करता? असा प्रश्न राऊत यांनी विचारला आहे. एकनाथ शिंदे हे या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचे देखील ते म्हणाले.

कुणाल कामरा वादावर संजय राऊत म्हणाले की, मी कुणाल कामराला खूप दिवसांपासून ओळखतो… तो आमच्यावर अशाच प्रकारे टिप्पणी करायचा. माझा असा विश्वास आहे की, देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जर वैयक्तिक टिप्पणी नसेल तर ती स्वीकारली पाहिजे. जर टिप्पणी कोणत्याही राजकीय विचारसरणीवर असेल तर ती स्वीकारली पाहिजे. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचे सौंदर्य आहे. कुणाल कामरा यांचे कार्यालय, स्टुडिओची तोडफोड करण्यात आली… ही गुंडगिरी असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राला अतिशय कमजोर मुख्यमंत्री मिळाला असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 353(1)(b) (सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधाने) आणि 356(2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती. रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. त्यांनी रात्री उशिरा, मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे. शिवसेना समर्थकांनी स्टुडिओची तोडफोड केली. यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे. यावरुन देखील संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

आता सभागृह हे खोक्यांनी भरलेले आहे. विधिमंडळात खोकेबाजांनी भरलेले असल्याचे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांचे हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे, त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवले असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे. ते सर्वच खोके बाज असल्याने सहज निवडून येऊ शकतात. त्यांना विचार नाही, भूमिका नाही, नैतिकता देखील नाही. ते सर्व खोके भाई एकत्र झाले आणि त्यांनी सरकार बनवले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना गृहमंत्रालय चालवणे झेपत नाही, हे आता स्पष्ट दिसत आहे. कालच्या घटने बद्दल मुंबई पोलिस आयुक्तांची बदली झाली पाहिजे, अशी मागणी देखील संजय राऊत यांनी केली आहे. हा संपूर्ण कट दीड ते दोन तास आधी शिजला. मग त्यावेळी मुंबई पोलिस काय करत होते? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत राज्याची नाचक्की होत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. सोशल मीडिया वरून कुणाल कामरा यांना धमक्या दिल्या जात आहेत. धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. मात्र, या धमक्या देणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले कामराचे गाणे योग्यच ..

मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोमवारी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मिंधे असा करत स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराची पाठराखण केली आहे. विनोदी कलाकार कुणाल कामराने एकनाथ मिंधे यांच्यावर केलेले गाणे योग्यच आहे. आता मिंधे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही कमकूवत केले आहे, असे ते म्हणालेत.

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्यंगात्मक गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याद्वारे त्याने शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य केले होते. विशेषतः एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांचा उल्लेख त्यांनी गद्दार असा केला होता. त्यांच्या या विधानामुळे सत्ताधारी शिवसेनेचे पित्त खवळले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमधील कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी कुणाल कामराची पाठराखण करत एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, विनोदी कलाकार कुणाल कामराने जिथे एकनाथ मिंधेंवर गाणे सादर केले, त्या कॉमेडी शोचा स्टेज मिंधेंच्या भ्याड टोळीने फोडला. कुणाल कामराचे गाणे 100 टक्के खरे होते. एखाद्याच्या गाण्यावर फक्त एक असुरक्षित घाबरट व्यक्तीच अशी प्रतिक्रिया देईल. राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली आहे का? एकनाथ मिंधे यांनी राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना कमकुवत करण्याचा हा आणखी एक प्रयत्न आहे.

कॉमेडी करण्याचा सर्वांना अधिकार, पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही -फडणवीस

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉमेडियन कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.स्टँडअप कॉमेडी करणाऱ्या सर्वांना अधिकार. पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने 2024 च्या निवडणुकीत कोण गद्दार व कोण खुद्दार आहे हे दाखवून दिले आहे. कुणाकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा कुणाला मिळाला आहे हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा अनादर करण्याचा अधिकार कुणालाही नाही. तुम्ही जरूर व्यंग व कॉमेडी करा. पण कुणालाही कुणाचा अपमान करण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणालेत.
कुणाल कामराला नाक घासायला लावणार
तुम्ही तुमचा वेळ मोजण्यास सुरुवात करा. माझे शब्द लक्षात ठेवा. तुम्ही जिथे सापडाल, तिथे तुम्हाला मारहाण केली जाईल. कुणाल कामरा, तुम्ही कुणाच्याही तालावर नाचा, मी तुम्हाला नाक घासायला लावले नाही तर मी ही कुणाल हे नाव सांगणार नाही. शिवसेना स्टाईलमध्ये तुला उत्तर मिळेल हे लक्षात ठेवा, असा इशारा शिंदे गटाचे पदाधिकारी कुणाल सरमणकर यांनी कुणाल कामराला दिला आहे.

एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटले :कॉमेडियन कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड.

मुंबई -महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध सोमवारी सकाळी एफआयआर दाखल करण्यात आला.तर शिंदे यांच्सया शिवसेनेच्या समर्थकांनी कामराच्या शोच्या स्टुडिओ आणि हॉटेलमध्ये तोडफोड केल्याबद्दल ४० शिवसेनेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी कामरा यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (BNS) कलम 353(1)(b) (सार्वजनिक अराजकता निर्माण करणारी विधाने) आणि 356(2) (बदनामी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

खरंतर, महाराष्ट्राच्या राजकारणावर कामराचा व्हिडिओ वादात सापडला आहे. व्हिडिओमध्ये कुणालने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांची खिल्ली उडवली होती.रविवारी व्हिडिओ समोर आल्यानंतर शिंदे गटातील शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. रात्री उशिरा, मोठ्या संख्येने समर्थक मुंबईतील खार येथील द युनिकॉन्टिनेंटल कार्यालयात पोहोचले. असा दावा केला जात आहे की हा व्हिडिओ येथे शूट करण्यात आला आहे.

यानंतर तो तक्रार दाखल करण्यासाठी खार पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. कुणाल कामराला तात्काळ अटक करावी अशी त्यांची मागणी आहे.

कुणाल कामराच्या गाण्याचे बोल, ज्यामुळे वाद निर्माण झाला…

शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणाले- शिवसेना स्टाईलने धडा शिकवू
शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हेगडे म्हणाले – मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला तत्काळ अटक करावी. उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध अशा शब्दांचा वापर अजिबात सहन केला जाणार नाही. आम्ही शिवसेना स्टाईलने धडा शिकवू.

शिवसेना खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, कुणाल कामरा तुला केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात प्रवास करू देणार नाही. यूबीटी ग्रुप आणि संजय राऊत यांच्याकडून पैसे घेतल्यानंतर तू एकनाथ शिंदे यांच्यावर भाष्य करत आहेस. आम्ही बाळ ठाकरेंचे शिवसैनिक आहोत, जर आम्ही तुमच्या मागे लागलो तर तुम्हाला भारतातून पळून जावे लागेल.

आंतरराष्टीय सहकार वर्षानिमित्त सहकार सोसायटीच्या महामेळाव्याचा समारोप 

महाराष्ट्र हौसिंग फेडरेशन आणि पुणे जिल्हा फेडरेशन आयोजित

पुणे : सहकारी गृहनिर्माण संस्थाना सहकारात स्थान नव्हते, त्यावेळी २०१९ साली त्याकरिता स्वतंत्र चॅप्टर आम्ही केला. त्यामुळे कायद्याने आधार मिळाला. येत्या १० ते १२ दिवसात  उर्वरित नियम देखील आम्ही प्रसिद्ध करू, तसेच अपार्टमेंट कायद्यात देखील येत्या महिन्याभरात आवश्यक पूर्तता करू. सहकारातून समृद्धीकडे नेण्याचे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे धोरण हे स्वयंपूनर्विकासातून साध्य करण्याचा विचार आहे. स्वयंपुर्नविकास हा आणखी सोप्या पद्धतीने व्हायला हवा. त्यामध्ये सहकारातून समृद्धीकडे नेण्याचे धोरण आहे, असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघ, सहकारी पतसंस्था महासंघ, सहकारी बँक महासंघ यांच्यावतीने महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांना मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, यासाठी पुण्यात महाअधिवेशन आणि प्रदर्शनाचे आयोजन गणेश कला क्रीडा मंच येथे करण्यात आले होते.

समारोपप्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, आमदार हेमंत रासने, धीरज घाटे, दीपक मिसाळ, संघटनेचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, सीताराम राणे, मुंबई गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सचिव मनिषा कोष्टी, नॅशनल को-ऑपरेटिव्ह युनियन ऑफ इंडिया नवी दिल्लीचे कार्यकारी संचालक आशिष त्रिवेदी आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक ऑनलाईन सेवा व स्मरणिका, विविध पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, क्लस्टर पद्धतीने स्वयंपुर्ण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. गृहनिर्माण संस्थाना टँकरमुक्त आम्ही करू. मात्र, सोलरयुक्त संस्था हा उपक्रम सर्वत्र राबविणे गरजेचे आहे. त्याकरिता प्रधानमंत्री सूर्य धन योजनेचा संस्थानी लाभ घ्यायला हवा. पुढील ३ महिन्यात संस्थाशी निगडित ऑनलाईन प्रणाली सुरु होत असून पुढील सहा महिन्यात व्हाट्स अँप वर सुविधा उपलब्ध होतील. यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार नाहीत, असे आश्वासनही त्यांनी दिले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, भारत हा कृषीप्रधान देश असल्याने ४० टक्के  पेक्षा अधिक लोकसंख्या सहकाराशी जोडली गेली आहे. देशात ८ लक्ष तर राज्यात २.२५ लक्ष सहकारी संस्था असून त्यातील १.२५ लक्ष गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे ही चळवळ मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. आज ३० वेगवेगळ्या क्षेत्रात अशा पद्धतीचे काम सुरु आहे.

आशिष शेलार म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाशिवाय सहकार चळवळ चालू शकत नाही. कोविड काळात गृहनिर्माण संस्थाच्या सभा या ऑनलाईन पद्धतीनेच होत होत्या. त्यामुळे यामध्ये माहिती तंत्रज्ञानाला महत्व आहे. व्यवसायिकीकरण आणि स्वायत्तता या दोन गोष्टी सहकारी संस्थांमध्ये असायला हव्या. संस्थांच्या कार्यपद्धतीवर लोकांचा विश्वास अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रवीण दरेकर म्हणाले, आज स्वयंपुर्नविकास मोठी गती घेत आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये याकरिता खूप मोठा वाव आहे. बिल्डर शिवाय पुर्नविकास करण्याबाबत आपण आत्मनिर्भर होत आहोत. याबाबत मुंबई मध्ये केलेले प्रकल्प यशस्वी झाले आहेत. त्यामुळे पुणेकरांनी पुर्नविकास चळवळीत मागे राहू नये.

विद्याधर अनास्कर म्हणाले, गृहनिर्माण संस्थांमध्ये सहकार संस्कृती विकसित होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. गृहनिर्माण संस्था म्हणजे भांडण हे सगळ्यांचे असलेले मत आपण दुरुस्त करायला हवे. अनेक संस्थांमध्ये चांगली संस्कृती आहे. एकमेकांना मदत देखील केली जाते. एकी हेच बळ हे सहकाराचे तत्व असून सहकाराची शिस्त आपल्यामध्ये सहकार टिकवण्यासाठी हवी.

सुहास पटवर्धन म्हणाले, नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास २०१९ च्या आदेशानुसार अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. तसेच २०१९ च्या सहकार कायद्याच्या नियमावलीची देखील अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मानीव हस्तांतरण ऑनलाईन पद्धतीने, एका खिडकी योजना, बिगरशेती कर आकारणी कायम स्वरूपात रद्द व्हावी. जिल्हा आणि राज्य महासंघास कार्यालय आणि सहकार संवाद ऑनलाईन पोर्टलचा विकास आवश्यक असल्याच्या मागण्या त्यांनी केल्या.

पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांची अनोखी आदरांजली

बंगळुरूच्या निरुपमा आणि राजेंद्र यांच्या नृत्याविष्कार ठरला नृत्य महोत्सवाचे प्रमुख आकर्षण

नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित दुसऱ्या पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाची उत्साहात सांगता

तिसऱ्या रोहिणी भाटे नृत्य महोत्सवात राज्याचा सांस्कृतिक विभाग सहभागी होणार!

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा

विख्यात भरतनाट्यम नृत्यांगना निरुपमा आणि राजेंद्र यांचा डौलदार पदन्यास, समर्थ अभिनय आणि आकर्षक हस्तमुद्रा यांचा मेळ जमलेला नृत्याविष्कार हे नामदार चंद्रकांतदादा पाटील आयोजित युवा सुराज्य प्रतिष्ठानच्या संयोजनातून आणि शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या वतीने प्रस्तुत पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाच्या अखेरच्या सत्राचे प्रमुख आकर्षण ठरले.

श्रीकृष्णाच्या रासलिलेवर आधारित कथाभागातून सादर केलेल्या नृत्याविष्कारातून संवेदनशील अभिनयाचे, सुंदर देहबोलीचे दर्शन रसिकांना घडले. तर मनिषा नृत्यालयाने कथ्थकच्या माध्यमातून शिवभूषण सादर केले. या कलाकृतीस रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याशिवाय कलासक्त नृत्य संस्थेने सादर केलेल्या योगिनी या ओडिसी नृत्याविष्कारास आणि उत्तुंग अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

आजच्या कार्यक्रमात मुद्रा कथक नृत्य संस्थेने ‘गणेश ध्रुपद’ (कथ्थक), स्वरदा नृत्य संस्था ‘चरिष्णू’ (भरतनाट्यम्), आरोहिणी नृत्य संस्थेने ‘शिव ध्रुपद’ (कथ्थक), स्नेहललितने ‘तिल्लान’ (भरतनाट्यम्), रुपक नृत्यालयने ‘चतरंग’ (कथ्थक), शिल्पा नृत्यालयाने एक श्लोकी रामायण (कथ्थक), नृत्यांजली संस्थेचे श्री गणेश (भरतनाट्यम्), नृत्यभारती संस्थेचे राग सागर (कथ्थक), कलासाधनम् नृत्य संस्थेचे डमरु (भरतनाट्यम्), अर्चना नृत्यालयाचे ठुमरी (कथ्थक), रुपक कलासदनने अंजनेय स्तुती (भरतनाट्यम्) आदी नृत्याविष्कार सादर केले.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवातील नृत्याविष्कार पाहून थक्क झालो. वास्तविक अशाप्रकारचा शास्त्रीय नृत्यासाठी समर्पित महोत्सव हा पुण्यातच होऊ शकतो, हे आजच्या महोत्सवाने दाखवून दिले आहे. रोहिणी ताईंच्या नावाने होणारा हा महोत्सव म्हणजे एकप्रकारे महादेव शंकरांची उपासना आहे. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था नृत्य संकुल उभारण्यासाठी प्रयत्सांनशील आहे. स्कृतिक विभाग त्यासाठी सर्वतोपरी मदत करेल.

ते पुढे म्हणाले की, रोहिणी भाटे नृत्य महोत्सव हा खरंच अविस्मरणीय आहे. त्यामुळे शास्त्रीय नृत्य महोत्सवाचा प्रतिसाद पाहून; पुढील वर्षीचा तिसरा महोत्सव अधिकाधिक भव्यदिव्य करण्यासाठी महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग देखील सहभागी होईल. त्यासोबतच  सांस्कृतिक विभागाच्या वतीने आगामी ३६५ दिवस १२०० कार्यक्रम राज्यभर राबविणार असल्याची माहिती देखील मंत्री शेलार यांनी यावेळी दिली.

समारोप प्रसंगी पंडिता रोहिणी भाटे यांना पुणेकरांनी दिव्याच्या प्रकाशात अनोखी आदरांजली वाहिली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, नृत्य गुरु शमाताई भाटे, मनिषा साठे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या सर्व पदाधिकारी, आयोजक अजय धोंगडे, संयोजक तथा भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

जनसुरक्षा विधेयक म्हणजे हुकूमशाहीची सनद:विरोधी पक्ष-संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने

पुणे दिनांक २३- जनसुरक्षा विधेयक रद्द करा रद्द करा… ! जनसुरक्षा नाही.. ही तर उघड दडपशाही ! मोदी-शहा-फडणवीस सरकारसे संविधान बचाव,संविधान बचाव !! अशा तीव्र संतप्त घोषणांच्या गजरात आज लोकमान्य टिळक चौक, अलका टॉकीज, येथे प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात विविध पक्ष संघटनांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.त्यामध्ये सुमारे ५०० कार्यकर्ते-नेते आणि नागरिकांनी उस्फूर्त सहभाग घेतला.

महाराष्ट्र सरकारने नुकतेच जनसुरक्षा विधेयक २०२४ या नावाने एका कायद्याचा मसुदा विधानसभेसमोर ठेवला आहे. त्या कायद्याचे उद्दिष्ट शहरी नक्षलवादी संघटनांचा बिमोड करणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कायद्याच्या मसुद्य़ातच्या प्रस्तावनेत नमूद केलेले आहे. परंतु प्रत्यक्ष कायद्यात नक्षलवादाचा एका शब्दाने किंवा सूचकपणेदेखील उल्लेख नाही. उलट बेकायदेशीर कृत्य याची अत्यंत व्यापक अशी व्याख्या केल्याने, कोणतेही जनआंदोलन किंवा संघटना ही बेकायदेशीर ठरवून तिची सर्व मालमत्ता जप्त करणे, तिच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सहानुभूतीदारांनादेखील २ ते ७ वर्षांपर्यंतची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.असे आक्षेप यावेळी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी नोंदविले .

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौताम्याचा आजचा दिवस असल्याने सर्वप्रथम या हुताम्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या नावाच्या आणि कार्याच्या घोषणा देण्यात आल्या.

या विधेयकाच्या विरोधात झालेल्या या निदर्शनांच्या कार्यक्रमात आज ऱाष्ट्रीय काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार,) शिवसेना(उबाठा),मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी,सुराज्य संघर्ष समिती, जबाब दो आंदोलन, अंगमेहनती संघर्ष समिती, क्रांतिकारी कामगार पक्ष, लाल निशाण पक्ष, स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया, नव समाजवादी पर्याय, सिटू इत्यादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तेथे झालेल्या सभेत मोहन जोशी,अभय छाजेड (काँग्रेस), प्रशांत जगताप, विकास लवांडे,(राष्ट्रवादी काँग्रेस(शप), रेखा मुंडे, गजानन थऱकुडे (शिवसेना (उबाठा), अजित अभ्यंकर (माकप), सिद्धार्थ धेंडे (रिपब्लिकन पार्टी आय्)दत्ता पाकिरे (समाजवादी पार्टी), विजय कुंभार, डॉ. अभिजीत मोरे (आम आदमी पार्टी )सुरेश खोपडे(निवृत्त पोलीस अधिकारी),सारंग यादवाडकर(पर्यावरण तज्ञ),अब्राहम आढाव(माहिती अधिकार समूह), परमेश्वर जाधव(क्रांतिकारी कामगार पक्ष) दत्ता गायकवाड (रिपाई युवामोर्चा) इत्यादी नेत्यांनी आपले विचार मांडले. ऍडव्होकेट संदीप ताम्हनकर यांनी सूत्रसंचालन केले.

“मोदी-शहा-फडणवीस यांनी देशात आणू घातलेल्या धार्मिक द्वेषावर आधारित राजवटीच्या विरोधात जनतेचा असंतोष व्यक्त होऊ नये, यासाठी लोकांचा आवाज, त्यांना नक्षलवादी ठरवून दाबण्याचे हा कारस्थान उधळून लावले पाहिजे. जोपर्यंत सरकार हे विधेयक संपूर्णतः मागे घेत नाही, तो पर्यंत हे आंदोलन तीव्रपणे असेच चालू राहिल”  असे विचार सर्व वक्त्यांनी मांडले. तसेच सरकारच्या या भीषण दडपशाहीची आणि अन्यायाची कित्येक उदाहरणे वक्त्यांनी दिली.हे आंदोलन हे विधेयक मागे घेईपर्यंत चालविण्याचा निर्धार व्यक्त केला.

जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या नवव्या आवृत्तीला हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली, २३ मार्च २०२५ : संसद सदस्यांसाठी प्रतिष्ठित जेके टायर-कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया कार रॅलीच्या ९ व्या आवृत्तीला आज नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) परिसरातून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ,संसदीय कार्य मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू, सन्माननीय पाहुणे, जेके टायर अँड इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अंशुमन सिंघानिया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

२०१० मध्ये स्थापन झाल्यापासून, सीसीआय रॅलीने रस्ते सुरक्षेला प्रोत्साहन देणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. जबाबदार ड्रायव्हिंगबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी या अनोख्या उपक्रमामुळे धोरणकर्त्यांना एकत्रितपणे एकत्र आणले जाते. या वर्षी, ५० हून अधिक संसद सदस्य, ज्यामध्ये श्री. अनुराग ठाकूर, श्री. निशिकांत दुबे आणि श्री. राजीव प्रताप रुडी आणि इतर संसद सदस्यांसह आमंत्रित नोकरशहा, वरिष्ठ पत्रकार आणि सशस्त्र दलांच्या तुकड्या त्यांच्या वैयक्तिक गाड्यांमध्ये रॅलीत सहभागी झाल्या होत्या, त्यांनी सुरक्षित रस्त्यांप्रती त्यांच्या समर्पणाची पुष्टी केली आणि रस्ते अपघातात दुःखदपणे प्राण गमावलेल्या संसद सदस्यांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रयत्नाला आणखी पाठिंबा देण्यासाठी, रॅलीच्या मार्गावर ट्रॅफिक पार्क येथे थांबा होता, जिथे सहभागींनी ड्रायव्हिंगच्या मूलभूत नियमांची पुनरावृत्ती केली आणि रस्ता सुरक्षा चिन्हांबद्दलचे त्यांचे ज्ञान तपासले. या परस्परसंवादी उपक्रमाने एकूण अनुभव वाढवला आणि सुरक्षित ड्रायव्हिंगचे महत्त्व अधोरेखित केले. क्लासिक आणि व्हिंटेज कारच्या आश्चर्यकारक प्रदर्शनाने कार्यक्रमाची भव्यता आणखी वाढवली, ज्यांनी उपस्थितांना त्यांच्या शाश्वत आकर्षणाने मोहित केले.

या कार रॅलीचे ब्रीदवाक्य “रस्ते सुरक्षा” आहे. या प्रसंगी आपण रस्ते अपघातात गमावलेल्या संसदेतील आपल्या प्रतिष्ठित सदस्यांचे स्मरण करतो. काही प्रमुख नावांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, केंद्रीय मंत्री राजेश पायलट, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा, केंद्रीय मंत्री येरननैडू, खासदार एस.पी. मुथुकुमारन, खासदार श्रीकांत जिचकर, खासदार महेंद्र सिंग भाटी आणि खासदार दयानंद सहाय, केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे, खासदार नंदमुरी हरिकृष्ण, खासदार एस. राजेंद्रन आणि इतर अनेकांचा समावेश आहे.

भारतात जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जाळे आहे, ज्यामध्ये बहुतेक आधुनिक महामार्गांपासून ते अरुंद, कच्च्या रस्त्यांपर्यंतचा समावेश आहे. रस्ते हा देशाच्या कोणत्याही भागात पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. महत्त्वाचे म्हणजे, आपले राजकारणी त्यांच्या आयुष्याचा मोठा भाग निवडणूक प्रचारासाठी प्रवास करण्यात, त्यांच्या संबंधित मतदारसंघातील लोकांना भेटण्यात किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यात घालवतात. तथापि, वेळेचा ताण, कामाचे तास आणि सकाळी लवकर ते रात्री उशिरापर्यंत प्रवास केल्याने त्यांना रस्त्यावर होणाऱ्या मृत्यूंचा धोका अधिक असतो. रस्ते अपघातात आपण अनेक खासदार आणि मंत्री गमावले आहेत.

मंत्री किरेन रिजिजू यांनी रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांचे मत मांडले की अशा प्रकारच्या रॅली केवळ सदस्यांसाठीच नव्हे तर देशातील सामान्य लोकांमध्ये रस्ते सुरक्षेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक आहेत.

 जेके टायरचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अंशुमन सिंघानिया म्हणाले, “ जेके टायर-सीसीआय रॅली सुरक्षित आणि जबाबदार ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्याच्या आमच्या सामायिक वचनबद्धतेचे उदाहरण देते. रस्ता सुरक्षा म्हणजे केवळ नियमांचे पालन करणे नाही तर ते जीव वाचवणे आहे. भारतीय रस्ते आणि राष्ट्रीय महामार्गांच्या विस्तारत्या जाळ्यासह, रस्ता सुरक्षेचा संदेश अधिक बळकट करण्याची गरज आणखी गंभीर बनली आहे आणि जेके टायरमध्ये आम्ही तीन दशकांहून अधिक काळ या कारणासाठी समर्पित आहोत. जागरूकता मोहिमा आणि उत्पादन नवोपक्रमांद्वारे, आम्ही आमचे रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी आणि जबाबदार नागरिक आणि उद्योग नेते म्हणून रस्ते शिस्तीचे समर्थन करण्यासाठी समर्पित आहोत.”

सीसीआयचे सचिव श्री राजीव प्रताप रुडी यांनीही रस्ते अपघातांबद्दल चिंता व्यक्त केली. भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि माननीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांच्या दृष्टीकोनातून मंत्रालयाने ऑटोमोबाईल सुरक्षा मानके मजबूत करण्यासाठी, रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि इतर प्रमुख उपक्रमांसाठी बहुआयामी प्रयत्न केले आहेत.

काही सामान्य कारणे म्हणजे जास्त वेगाने गाडी चालवणे, मोबाईल फोनचा वापर करणे, हेल्मेटशिवाय गाडी चालवणे आणि सीटबेल्टशिवाय गाडी चालवणे आणि अनधिकृत ठिकाणी, रस्ते आणि पादचाऱ्यांच्या क्रॉसिंगवर महामार्गावर जाणे इत्यादी आढळून येतात.

श्री रुडी यांनी पंतप्रधानांनी “मन की बात” मध्ये रस्ते अपघातांवरील दिलेल्या संदेशाची आठवण करून दिली, जिथे पंतप्रधानांनी रस्ते अपघातांमुळे होणाऱ्या दुःखद घटनेचा गंभीरपणे उल्लेख केला होता.

रस्ते अपघात आणि मृतांच्या या चिंताजनक प्रवृत्तीमुळे त्यांची तीव्रता वाढली आहे आणि रस्ते अपघातांची वाढती संख्या या देशातील जनतेमध्ये जागरूकता वाढवण्याची निकड आणि गरज समोर आणते.

याच कारणास्तव, कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाने जेके टायरच्या भागीदारीत जीव वाचवण्याची मोहीम सुनिश्चित करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे जेणेकरून देशाला त्याचा आर्थिक लाभ देखील मिळू शकेल.

जेके टायर-सीसीआय रॅलीने राजधानीच्या प्रतिष्ठित ठिकाणांमधून काळजीपूर्वक नियोजित मार्गाचा अवलंब केला, ज्यामुळे रस्ता सुरक्षेचा महत्त्वाचा संदेश अधिक स्पष्ट झाला. सहभागींनी टीएसडी (वेळ, वेग, अंतर) स्वरूपात स्पर्धा केली, जी शिस्तबद्ध ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देण्यासाठी वेगापेक्षा अचूकतेवर लक्ष केंद्रित करते. प्रत्येक संघात एक ड्रायव्हर आणि एक नेव्हिगेटर होता, नेव्हिगेटर मार्ग सूचनांचे पालन करण्यासाठी, सरासरी वेग मोजण्यासाठी आणि कोणत्याही विचलनामुळे दंड गुण मिळत असल्याने टीम वेळापत्रकानुसार राहील याची खात्री करण्यासाठी जबाबदार होता. कायदेशीर मर्यादेत निर्दिष्ट वेळा आणि वेग निश्चित करून, एफएमएससीआय-अनुपालन रॅलीने सहभागींच्या नेव्हिगेशन कौशल्याची चाचणी घेतली आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित केले.

रस्ता सुरक्षेच्या या उदात्त कार्याला जेके टायर, आयओसीएल, गेल, युनियन बँक ऑफ इंडिया, पतंजली आयुर्वेद लिमिटेड, पेट्रोनेट एलएनजी लिमिटेड, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड, एनबीसीसी, बीपीसीएल आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी पाठिंबा दिला.

संध्याकाळी कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया येथे एका भव्य पारितोषिक वितरण समारंभाने या कार्यक्रमाचा समारोप होईल, जिथे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि अंशुमन सिंघानिया यांच्या हस्ते विजेत्यांचा सत्कार केला जाईल.

जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल

जेके ऑर्गनायझेशनची प्रमुख कंपनी, जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेड ही जगातील टॉप २० टायर उत्पादकांपैकी एक आहे. त्यांच्याकडे ११ जागतिक स्तरावर बेंचमार्क केलेल्या ‘शाश्वत’ उत्पादन सुविधा आहेत – ९ भारतात आणि २ मेक्सिकोमध्ये – ज्या एकत्रितपणे दरवर्षी सुमारे ३५ दशलक्ष टायर्सचे उत्पादन करतात. भारतात रेडियल तंत्रज्ञानाचा पाया रचत, कंपनीने १९७७ मध्ये पहिले रेडियल टायर तयार केले.

जेके टायरची नावीन्यपूर्णतेप्रती अटल वचनबद्धता म्हैसूरमधील त्यांच्या अत्याधुनिक जागतिक संशोधन आणि तंत्रज्ञान केंद्र “रघुपती सिंघानिया सेंटर ऑफ एक्सलन्स” द्वारे दिसून येते, ज्यामध्ये अत्याधुनिक चाचणी आणि प्रमाणीकरण उपकरणे आहेत.

जेके टायरने त्यांच्या उत्कृष्ट पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन (ESG) पद्धतींना मान्यता देऊन ESG कामगिरीमध्ये ‘बेस्ट इन क्लास’ रेटिंग मिळवले.

जेके टायरला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल, यूके कडून त्यांच्या सर्व प्लांट्समध्ये सुरक्षिततेसाठी जगातील सर्वात प्रतिष्ठित सुरक्षा पुरस्कार – ‘सन्मानाची तलवार’ प्रदान करण्यात आली आहे. बिझनेस वर्ल्डने जेके टायरला भारतातील टॉप 30 मोस्ट सस्टेनेबल कंपन्यांमध्ये देखील मान्यता दिली आहे आणि जेके टायर ही RE100 मध्ये सामील होणारी भारतातील पहिली टायर कंपनी आहे.

पिंपरी चिंचवडकरांनी अनुभवाला लोकसंस्कृतीचा कलाविष्कार – आ. उमा खापरे

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र,भारत सरकार, उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय लोकोत्सवाचा समारोप

पुणे (दि. २३ मार्च २०२५) लोकोत्सवामुळे पिंपरी चिंचवडकरांना महाराष्ट्र व ओरिसा मधील आदिवासी लोक संस्कृतीचा कलाविष्कार पाहण्याची संधी मिळाली. हा ठेवा अनुभवणे म्हणजे सामाजिक परंपरा, संस्कृतीचे जतन करणे देशाच्या ऐक्यासाठी नितांत गरजेचे आहे हे स्पष्ट झाले. यासाठी पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशने समन्वयाची भूमिका महत्त्वाची होती, असे मत विधानपरिषदेच्या आमदार उमा खापरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, भारत सरकार उदयपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत – लोकोत्सव हा महाराष्ट्र व ओरिसा राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविणारा तीन दिवसीय उत्सवाचा शनिवारी (२२ मार्च) प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे समारोप झाला. या लोकोत्सवाचे संयोजन पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनने केले केले होते. यावेळी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालयाच्या पुणे विभागीय अधिक्षक जान्हवी जानकर, पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशनचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे, मलाप्पा कस्तुरे आदी उपस्थित होते.


समारोप समारंभात मुंबई येथील रूद्राक्ष कला विष्कारच्या कलाकारांनी ‘महाराष्ट्र सोहळा संस्कृतीचा’ यामध्ये गण, गवळण, लावणी, वासुदेव, गोंधळ, शेतकरी नृत्य, पोतराज, कोळी नृत्य असे विविध प्रकार सादर करून रसिकांची मने जिंकली. नृत्य दिग्दर्शन उमेश देसाई व राजेश शिर्के आणि सूत्रसंचालन संतोष पेटकर यांनी केले. त्यानंतर ओरिसा येथील कौशल फोक ग्रुप मधील कलाकारांनी थापा नृत्य, दालखाई नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी उमेश देसाई, नवगंध दास आणि कलाकारांचा आ. उमा खापरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मुख्य समन्वयक प्रवीण तुपे, अनिल गालिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन चिंचवडे, सुनील पोटे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन अभिजित कोळपकर यांनी केले. आभार अविनाश आवटे यांनी मानले.

राजकुमार ठाकूर यांनी मिळविला सहस्रबुद्धे चषक कॅरम स्पर्धेत विजय आणि ठरले चषकाचे मानकरी


पुणे
पटवर्धन बाग येथील डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाजवळ असलेल्या एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात संपन्न झालेल्या जी पी सहस्रबुद्धे एकेरी कॅरम स्पर्धेचा काल अंतिम सामना झाला.अत्यंत अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात क्षणा क्षणाला उत्कंठा वाढवित रंगतदार खेळ करत राजकुमार ठाकूर याने रझाक शेख यांचा २२-७,२२- २० अशा गुणांनी दीड तास सलग सामना खेळून पराभव केला व विजेता ठरले .व जी पी सहस्रबुद्धे चषक एकेरी कॅरम स्पर्धेत अपराजित राहून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले व रोख रुपये तीन हजाराचे बक्षिस ही मिळविले.रझाक शेख यांनी याच बरोबर राजकुमार ठाकूर यांच्या बरोबर चुरशीची लढत देऊन उप विजेते पद मिळवले.रझाक शेख यांनी द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार व चषक मिळविले.

स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी व मुख्य पंच अभय अटकेकर यांनी घोषित केलेले स्पर्धेतील प्रथम आठ विजेते या प्रमाणे
१) राजकुमार ठाकूर – प्रथम पारितोषिक रुपये तीन हजार व चषक.
२) रझाक शेख – द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार व चषक
३) रवी श्रीगादी – तृतीय पारितोषिक रुपये एक हजार व चषक.
४) सुनील वाघ – चतुर्थ रुपये एक हजार व चषक.
५) माधव तिळगुळकर – पाचवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह.
६) दत्तात्रय सलागरे – सहावे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह
७) श्रीकांत बाबर – सातवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह
८) पंकज कुलकर्णी – आठवे रुपये पाचशे व स्मृतिचिन्ह.

एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात अंतिम सामना बघण्यास खूप मोठी गर्दी झाली होती.या नंतर लगेचच कॅरम स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष अजित गोखले यांनी केले.स्पर्धा प्रमुख शिरीष जोशी यांनी वीस तारखेपासून चाललेल्या ह्या स्पर्धेविषयीचा अहवाल सादर केला.प्रमुख पाहुणे दीपक पोटे,संदीप खर्डेकर,जयंत भावे यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना बक्षिसे व स्मृतिचिन्ह प्रदान करेण्यात आली.
कार्यक्रमास कॅरम प्रेमी, शहरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अजित गोखले,सचिव उर्मिला शेजवलकर,कार्याध्यक्ष प्राजक्ता मोघे,पंच अभय अटकेकर,सतीश सहस्रबुद्धे,पंकज कुलकर्णी,माधव तिळगुळकर, विनय फाटक,जयंत मुळ्ये यांनी परिश्रम घेतले.