Home Blog Page 388

“विराट हिंदू संत संमेलन” घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाची मंजूरी-प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “हिंदू वीर पुरस्कार”

मुंबई- मालेगाव येथे 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना “विराट हिंदू संत संमेलन” नावाचा कार्यक्रम आयोजित करण्याची आणि “हिंदू वीर पुरस्कार” प्रदान करण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने एका हिंदू संघटनेला दिली आहे. या प्रकरणात होणाऱ्या विरोधाला न जुमानता, या कार्यक्रमामुळे प्रक्षोभक भाषणे आणि सांप्रदायिक तणाव निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात होती.

या संदर्भात न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, स्वातंत्र्याच्या 78 वर्षांनंतर, भारतीय जनता विविध धर्मांचा आदर करणे आणि सांप्रदायिक सलोखा राखण्याचे महत्त्व समजून घेण्यासाठी पुरेशी सुज्ञ आणि सुशिक्षित आहे. 30 मार्च रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी देण्यात आली आहे, परंतु काही विशिष्ट अटींसह, ज्यामध्ये विशिष्ट वेळ (सकाळी 7 ते संध्याकाळी 5) आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याची जागा टाळण्यासाठी एक निश्चित नियमांचाही समावेश आहे.

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर कथित भूमिकेसाठी सध्या खटल्याला सामोरे जात आहेत. ज्यामध्ये सहा लोकांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या खटल्यात आरोग्याच्या कारणास्तव प्रज्ञा सिंह ठाकूर यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. आता होणाऱ्या या कार्यक्रमामुळे वाद निर्माण झाला आहे, काहींनी बॉम्बस्फोटांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमुळे ठाकूर यांना पुरस्कार देण्यास विरोध केला आहे.

प्रज्ञा सिंह ठाकूर या एक भारतीय राजकारणी आणि माजी खासदार आहेत. त्यांनी लोकसभेत भोपाळचे प्रतिनिधित्व केले होते. त्या भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. 2 फेब्रुवारी 1970 रोजी जन्मलेल्या ठाकून यांना साध्वी प्रज्ञा म्हणूनही ओळखले जाते. ठाकूर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यासह विविध संघटनांमध्ये सहभागी आहेत.त्यांनी 2019 ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक भोपाळ मतदारसंघातून लढवली आणि 3,64,822 मतांच्या लक्षणीय फरकाने जिंकली होती. त्या अनेक वादात देखील अडकलेल्या आहेत. विशेषतः 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोटात कथित सहभागाबद्दल दहशतवादी आरोपांवरून अटक करण्यात आली होती. सध्या देखील बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्याअंतर्गत अनेक आरोपांसाठी खटला सुरू आहे. ठाकूर यांनी संसदेत केलेल्या भाष्यांबद्दलही त्यांच्यावर टीका झाली आहे. ज्यात गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे याला देशभक्त म्हणणे याचाही सामवेश आहे. त्यामुळे त्यांना संरक्षण संसदीय समिती आणि भाजप संसदीय पक्षाच्या बैठकींमधून काढून टाकण्यात आले होते.

मातृशक्तीला नमन करीत मध्य पुण्यात भव्य शोभायात्रा 

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी  होळकर रथ…वंदे मातरम या काव्याला १५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल माहितीपूर्ण रथ…पर्यावरणचे भान राखून प्रबोधनपर पाणी या विषयावर  जनजागृती रथ यांसह छत्रपती शिवाजी महाराज रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग आणि पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत सहभागी होत मातृशक्तीला नमन केले.

गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन  करण्यात आले होते. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, रा.स्व.संघ मोतीबाग नगर संघचालक अ‍ॅड. शरद चंद्रचूड, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे डॉ. मेधा कुलकर्णी यांसह निवेदिता एकबोटे, गायत्री खडके, पुणे शहर भाजपा महिला उपाध्यक्ष हर्षदा फरांदे, प्राची वाईकर, दीप्ती शिदोरे, सीमा गोवंडे यांच्या हस्ते ग्राम गुढी उभारण्यात आली. यात्रा प्रमुख म्हणून अथर्व दातार व चैतन्य कुसूरकर यांनी नियोजन केले.  

ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी झाले होते. याशिवाय सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ, मराठी अभिजात भाषा रथ यांसह अनेक विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी झाले. तुळशीबाग मंडळ, नवनीत मित्र मंडळ, कडबे आळी तालीम मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, चिमण्या गणपती मंडळ यांनी देखील सहभाग घेतला.  

याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत शोभायात्रेत होते. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली.

अवास्तव अपेक्षा, अपराधी भाव यामुळे स्त्रिया घेतात टोकाचा निर्णय’

कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’वर आयोजित परिसंवादामध्ये उमटला सूर

पुणे, ता. ३०: “भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रिया बहुतेकवेळा अवास्तव अपेक्षा आणि स्वतःविषयीचा अपराधी भाव घेऊन जगतात. त्यामुळे त्या मुक्त संवादापासून वंचित राहतात. सतत दडपण, दबाव यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कुणीच नाही, या भावनेचा ताण असह्य होऊन अनेक स्त्रिया आत्मघातकी विचारांपर्यंत पोचतात,” असे निरीक्षण मान्यवर वक्त्यांनी परिसंवादात नोंदवले.

काही प्रसंगाने निराश, दुःखी किंवा आत्मघातकी विचारांचा प्रभाव असल्यास, त्यापासून परावृत्त करण्याचे महत्त्वाचे सामाजिक कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त (२० वर्षे) ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’ या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. एकेएस फाऊंडेशनच्या संस्थापक बरखा बजाज, ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापक सिस्टर ल्यूसी कुरियन, विधिज्ञ संध्या देशपांडे, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख व वरिष्ठ संपादक कोरिना मॅन्यूअल यांनी विचार मांडले. समाजशास्त्र अभ्यासक डॉ. मेघा देऊसकर यांनी परिसंवादाचे संचलन केले.

यावेळी कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अर्नवाज दमानिया उपस्थित होत्या. थरमॅक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. परिसंवादापूर्वी मुसकान संस्थेच्या कीर्ती, स्त्री मुक्ती संघटनेच्या स्वप्नाली यांनी मनोगत व्यक्त केले. फरिदा आणि सुहासिनी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.

कादंबरी शेख यांनी ‘ट्रान्सजेंडर व्यक्तींचे भावविश्व अधिक गुंतागुंतीचे असते. सर्वप्रथम कुटुंबच त्यांना नाकारते, मग समाज नाकारतो आणि विशिष्ट जीवनशैली अनुसरायला भाग पाडतो. माझ्याही वाट्याला अनेक भीषण अनुभव आले. पण मी प्रयत्नपूर्वक सगळे सोसून बाहेर पडले. द्विपदवीधर झाले. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पण समाजाचा, कुटुंबाचा दबाव मर्यादा आणतो’, असे मत मांडले.  

सिस्टर ल्यूसी यांनी तळागाळातील स्त्रियांच्या दडपणाचे चित्र उदाहरणासह मांडले. ‘निरक्षर, अर्धशिक्षित स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्यांच्या वाट्याला हतबलता, असहायता अधिक येते’, असे त्या म्हणाल्या. संध्या देशपांडे यांनी वकील म्हणून काम करताना कौटुंबिक स्तरावरचे विदारक वास्तव सोदाहरण सांगितले. ‘दडपल्या गेलेल्या स्त्रियांना बोलण्याच्या अवस्थेत आणणे, हेच मोठे आव्हान असते’, असे त्या म्हणाल्या.

बरखा बजाज यांनी नातेसंबंधांचा ताण आणि दडपण स्त्रियांवर अधिक प्रतिकूल परिणाम करते. संकोच, लाज, भीती, लोक काय म्हणतील, या भावनेचे दडपण स्त्रिया अधिक बाळगतात, असे मत मांडले. कोरिना मॅन्युअल यांनी आपण सदैव एकमेकींसाठी आहोत, हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. गायत्री दातार यांनी सूत्रसंचालन केले.

अर्नवाझ दमानिया यांनी ट्रस्टचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्त्रीपण हा एक आव्हानात्मक प्रवास असतो, असे सांगून ट्रस्टचे काम २० वर्षे सुरू ठेवण्यात सहकाऱ्यांचे परिश्रम, सातत्य, निष्ठा आणि समाजाप्रती सहसंवेदना मोलाची ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.

समाज स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व
आभाळभर होते : मेहेर पदमजी
शतकानुशतके स्त्रियांचा आवाज दाबला गेला आहे. विशेषतः मोकळेपणाने बोलू न शकल्याने दडपण असह्य होऊन आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात अधिक आहे. त्यामुळे स्त्रियांना मोकळेपणाने बोलता येणे, संवादासाठी त्यांना त्यांचा अवकाश मिळणे, गरजेचे आहे. समाज जेव्हा स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व आभाळभर होते, असे प्रतिपादन थरमक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी यांनी केले. ऐकणे आणि ऐकून घेणे, ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. कनेक्टिंग ट्रस्टच्या माध्यमातून स्त्रियांचे असे अ-बोलणे समजून घेण्याचा अवकाश मिळतो, त्या मोकळ्या होत जातात, हे महत्त्वाचे आहे, असे मेहेर पदमजी यांनी सांगितले.

अवीट सुरावटींनी उजाडली पाडव्याची ‘सुरेल पहाट’

पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व मनीषा निश्चल यांचे बहारदार गायन

पुणे: ‘ओंकार स्वरूपा, सद्गुरू समर्था’ भजन असो की, ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी’ हरिपाठ, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ हे पटदीप रागातील भजन असो की, ‘मोगरा फुलला’ भावगीत, ‘मेघा रे मेघा रे’, ‘चिंब पावसानं रान झालं’ अशा अजरामर गीतांच्या अवीट सुरावटींनी गुढी पाडव्याची सुरेल पहाट उजाडली.या विशेष संगीत मैफलीने पुणेकरांना भक्तिरसात न्हाल्याचा आनंद दिला.

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गीत-संगीताने नटलेल्या गायिका मनीषा निश्चल्स महक प्रस्तुत ‘सुरेल पहाट’ या सांगीतिक मैफलीचे गेट सेट गो हॉलिडेज व पूना गेस्ट हाऊस यांच्या वतीने आयोजन केले होते. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रविवारच्या भल्या पहाटे पुणेकरांनी ‘सुरेल पहाट’ची ही पर्वणी अनुभवली. पद्मश्री सुरेश वाडकर, पंडित रघुनंदन पणशीकर व गायिका मनीषा निश्चल यांच्या सुमधुर गायनाने उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

शास्त्रीय, उपशास्त्रीय, अभंग व भक्तिसंगीताच्या सुरावटींनी पहाटेचे वातावरण भारावून गेले. पं रघुनंदन पणशीकर यांनी शास्त्रीय रचनांमधून पहाटेच्या रागांचा सुरेल आविष्कार घडवला. मनीषा निश्चल यांनी आपल्या सुमधुर आवाजात गायन केले. तर सुरेश वाडकर यांनी ‘ओंकार स्वरुपाने’ ने स्वतःच्या गायनाची सुरुवात केली. पंडित रघुनंदन पणशीकर यांनी ‘सहेला रे’, ‘राम का गुणगान’, ‘बोलावा विठ्ठल’, ‘बाजे रे मुरलीया बाजे’ ही भजने, तर मनीषा निश्चल यांच्यासोबत ‘हे शाम सुंदर राजसा’ युगुलगीत सादर केले. 

मनीषा निश्चल यांच्या ‘मोगरा फुलला’, ‘सूर येती  विरून जाती’ ‘मै एक सादि से’, ‘केंव्हा तरी पहाटे’, ‘मोहे नैहर से अब तो’ या अजरामर गीतांना ‘वन्स मोअर’ची दाद मिळाली. तर ‘पाहिले न मी तुला’, ‘काळ देहासी’, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘चप्पा चप्पा’ या गीतांनी पद्मश्री सुरेश वाडकर यांनी मैफल टिपेला नेली. तसेच ‘चिंब पावसानं’ व ‘मेघारे मेघारे’ या सुरेश वाडकर व मनिषा निश्चल यानी गायलेल्या युगुलगीतांना श्रोत्यांनी वन्समोअरसह टाळ्यांची उत्स्फूर्त दाद दिली.

विघ्नेश जोशी यांच्या ओघवत्या निवेदनाने श्रोत्यांच्या आनंदात भर घातली. अमर ओक (बासरी), सत्यजित प्रभू (कीबोर्ड), डॉ. राजेंद्र दूरकर (पखवाज) व विनायक नेटके (तबला), अभिजित भदे (आक्टोपॕड) यांनी वाद्यांवर साथसंगत केली. कार्यक्रमास संगीतप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक केले. नववर्षाच्या स्वागताला संगीताचा सुरेल सोहळा लाभल्याने उपस्थितांना अनोखी अनुभूती मिळाली.

रेल्वेला मालवाहतुकीतून मिळालेल्या महसुलात  गेल्या 4 वर्षात 54,805 कोटी रुपयांनी वाढ 

प्रवासी महसूल  4 वर्षात 20,024 कोटी रुपयांनी वाढला

गेल्या पाच वर्षात भारतीय रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीतून मिळविलेल्या महसूलाचा तपशील  पुढीलप्रमाणे आहे: –

Financial YearRevenue (₹ in Cr)
FreightPassenger
2019-201,13,48850,669
2020-21*1,17,23215,248
2021-22*1,41,09639,214
2022-231,62,26363,417
2023-241,68,29370,693

*कोविड वर्षे

भारतीय रेल्वेने 2019-20 ते 2023-24 या कालावधीत फ्लेक्सी भाडे, तत्काळ आणि प्रीमियम तत्काळ याद्वारे कमावलेला महसूल प्रवासी सेवांमधून कमावलेल्या एकूण महसुलाच्या अंदाजे 5.7% इतका आहे.  तिकीट रद्द केल्यानंतर  जमा झालेली रक्कम वेगळी मोजली जात नाही.

01.04.24 पर्यंत माहितीनुसार, रेल्वे सेवा चालवण्यासाठी सुमारे 79,000 डब्यांचा वापर करण्यात आला आहे आहेत. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

ClassNo. of coachesNo. of seats
General and non-AC Sleeper~56,000(70% of total) ~51 lakhs
AC Coaches~ 23,000~14 lakhs
Total~ 79,000~ 65 lakhs

2019-20 ते 2023-24 या कालावधीतील, प्रवासी सीट्स आणि मिळालेला महसूल यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

ClassAvg %share of total seats during
 2019-20 to 2023-24
Avg % share of total passenger revenue during2019-20 to 2023-24
Non-AC coaches (General / Sleeper etc.)~ 82%~  53%
AC Coaches~ 18%~  47%

ही माहिती  रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव यांनी काल राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

आरएसएस स्वयंसेवकासाठी सेवा हेच जीवन:आपण देवापासून देश-रामापासून राष्ट्र या मंत्राने पुढे जातोय- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांची नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट

पंतप्रधान  नरेंद्र मोदी आज नागपुर येथील स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. के. बी. हेडगेवार आणि  एम. एस. गोळवलकर यांना  आदराजली अर्पण केली.

एक्स वरील एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले:

“नागपूर येथील स्मृती मंदिराला भेट देणे हा एक विशेष अनुभव आहे.आजची ही भेट आणखी खास यासाठी आहे, कारण ती वर्षप्रतिपदेच्या शुभदिनी झाली आहे, जो परम पूज्य डॉक्टरसाहेबांचा जयंती दिवस देखील आहे.माझ्यासारख्या असंख्य लोकांना परम पूज्य डॉक्टरसाहेब आणि पूज्य गुरुजी यांच्या विचारांतून प्रेरणा आणि शक्ती मिळते. या दोन महान व्यक्तींना  आदरांजली अर्पण करण्याचा सन्मान मिळाला, असून ज्यांनी एक मजबूत, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या गर्व करण्याजोग्या भारताची कल्पना केली होती.”

पंतप्रधान मोदी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) मुख्यालय केशव कुंज येथे पोहोचले. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (गुरुजी) यांच्या स्मृती मंदिराला भेट देऊन श्रद्धांजली वाहिली.

यानंतर ते दीक्षाभूमीला गेले आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली. दीक्षाभूमी हे आरएसएस कार्यालयाच्या अगदी जवळ आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी येथे येऊन ध्यानधारणा केली होती.यानंतर, पंतप्रधानांनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन विस्तारित इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचे सरकार जनऔषधी केंद्राच्या माध्यमातून गरिबांना स्वस्त दरात औषधे पुरवत आहे. डायलिसिस सेंटर्स खुली आहेत, जिथे मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध आहेत. आपण देशाला प्रगतीच्या नवीन उंचीवर घेऊन जाऊ.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मोदी शेवटचे १६ जुलै २०१३ रोजी संघाच्या मुख्यालयात गेले होते. २०१२ मध्ये संघ प्रमुख के एस सुदर्शन यांच्या निधनानंतरही ते येथे आले होते. पंतप्रधान पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देत आहेत.हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी संघ कार्यालयात होणाऱ्या प्रतिपदा कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहतील. ते कार्यक्रमाला संबोधित देखील करू शकतात.पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित आहेत.

नागपूरातील दीक्षाभूमीला दिलेल्या भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टिकोनाप्रती आपल्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

सामाजिक न्यायाचे आणि वंचितांना सक्षम बनवण्याचे प्रतीक म्हणून नागपुरातील दीक्षाभूमीची प्रशंसा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पना केलेल्या भारताला साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुचार केला.

X या समाज माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“नागपूरातील दीक्षाभूमी सामाजिक न्यायाचे आणि  वंचितांना सक्षम बनवण्याचे प्रतीक म्हणून उंच उभी आहे.

आपली प्रतिष्ठा आणि समानता सुनिश्चित करणारे संविधान दिल्याबद्दल भारताच्या भावी पिढ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सदैव आभारी राहतील.

आपले सरकार नेहमीच पूज्य बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आले असून त्यांच्या कल्पनेतील भारत साकार करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा आम्ही पुनरुच्चार करत आहोत.”

कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला

संजय राऊत म्हणाले की, भाजप व त्यांच्या टोळ्यांचे ढोंग युद्धाच्या मैदानात टिकले नाही. कुणाल कामराने ते दीड मिनिटात संपवले. भाजपची झुंडशाही पोकळ पायावर उभी आहे हे कामराने दाखवले. पुन्हा कामरा गुडघे टेकायला तयार नाही. तो बलिदानासही तयार आहे. अशा माणसाचे शिंदे-फडणवीस काय वाकडे करणार! कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला… उखाड दिया! असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
मुंबई-महाराष्ट्रातील किंवा भारतातील राजकारणी म्हणजे प्रेषित नाहीत. प्रेषितांचे व्यंगचित्र काढले म्हणून फ्रान्ससह अनेक देशांत दंगली उसळल्या. महाराष्ट्रात कोणी स्वत:ला प्रेषित समजत आहेत काय? कुणाल कामरावरील पेटलेल्या राजकारणावरुन असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, भाजपची झुंडशाही पोकळ पायावर उभी आहे हे कामराने दाखवले. पुन्हा कामरा गुडघे टेकायला तयार नाही. तो बलिदानासही तयार आहे. अशा माणसाचे शिंदे-फडणवीस काय वाकडे करणार! कामराने दीड मिनिटात हुकूमशाहीच्या खुर्चीखाली स्फोट केला… उखाड दिया! मोदी यांच्या काळात सत्य बोलण्यावर बंदी आहेच. आता बोलण्यावर आणि हसण्यावरही बंदी आली काय, असा प्रश्न पडतो. एका व्यंगात्मक गाण्यावरून महाराष्ट्रात तोडफोड झाली. हिंसाचार आणि कुणाल कामराला ठार करण्याची भाषा सुरू आहे.

संजय राऊत म्हणाले की, भारतात सत्य बोलण्यावर अलीकडच्या काळात बंदी होतीच, आता बोलण्यावरही बंदी येताना दिसत आहे. लोक बोलत नाहीत. लोक आरडाओरड करतात नाहीतर हाती काठय़ा घेऊन तोडफोड करतात. हे चित्र विचलित करणारे आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातली आरडाओरड औरंगजेबापासून सुरू झाली ती कामेडियन कुणाल कामरापर्यंत येऊन थांबली. आफ्रिकेतील काही देशांत आजही वंशयुद्ध आणि टोळीयुद्ध चालते. तसेच हे घडताना दिसले. आपण सगळेच किती असहिष्णू झालो आहोत याचा हा नमुना. काही वर्षांपूर्वी बराक ओबामा भारतात आले. त्यांनी भारताला सहिष्णुतेवर `लेक्चर’ दिले. त्या वेळी भारतातला एकही प्रतिष्ठित नागरिक उभा राहिला नाही व त्याने ओबामा यांना सांगितले नाही की, “साहेब, भारताची जगात ओळख सहिष्णू अशीच आहे. तुम्ही आम्हाला सहिष्णुतेचे धडे कृपया देऊ नका.” आता वाटते, ओबामा खरे तेच बोलले होते. भारतातून सहिष्णुता तडीपार झाली आहे.

संजय राऊत म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीचे राजकारण संपल्यावर नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील समर्थकांनी रात्रीच्या अंधारात कुणाल कामरा या स्टाण्डअप कामेडियनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तो सापडला नाही तेव्हा तो जेथे कार्पाम करतो त्या स्टुडिओवर हल्ला केला व ते कलाकारांचे व्यासपीठ उद्ध्वस्त केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर एक राजकीय व्यंगात्मक गाणे रचले म्हणून शिंदे यांचे लोक भडकले. त्यांच्या भावना भडकल्या. शिंदे यांच्या भाषेत आक्शनला रिआक्शन झाली. शिंदे यांचे हे बोलणे अगदीच हास्यास्पद आहे. शिंदे यांच्यासाठी जे लोक कामराच्या स्टुडिओवर चाल करून गेले ते सर्व लोक भाडोत्री आहेत. कालपर्यंत हे लोक मूळ शिवसेनेसाठी हाणामाऱ्या करीत होते. आज ते शिंदेंसाठी करतात. शिंदेंची सत्ता नसेल तेव्हा ते दुसरा मालक शोधतील. यात भावना वगैरे आल्या कोठून? सगळा पैशांचा आणि सत्तेचा खेळ.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे सगळ्यात जास्त नुकसान त्यांच्या सभोवतीचे बिनडोक लोकच करीत आहेत. बिनडोक सेनेचे ते नेते झाले आहेत. कुणाल कामरा प्रकरणात ते स्पष्ट दिसले. कामराने ठाण्यातील रिक्षावाल्याचा त्रास केंद्रस्थानी ठेवून एक व्यंगगीत रचले व गायले. त्यात तो दाढीधारी रिक्षावाला गद्दारी करून आपल्या लोकांना घेऊन गुवाहाटी येथे जातो असे लिहिले. गाण्याचे शब्द त्यांच्या काळजात आरपार घुसले, ते नक्की काय आहेत? कामराने ‘दिल तो पागल है’चे पारोडी गीत त्याच्या शोमध्ये गायले. त्यात शिंदे यांचे नाव कोठेच नाही.

या गाण्यातला आशय नवा नाही. याला `सटायर’ म्हटले जाते. गेल्या चारेक वर्षांपासून गद्दारी आणि खोके या विषयावर महाराष्ट्रात विनोदी गाण्यांचा आणि जोक्सचा पाऊस पडला आहे. विधानसभा निवडणुकीत गद्दारीवरील गाणी प्रचारात आणली. त्यावर कुणाच्याच भावना भडकल्या नाहीत, पण कामराच्या गाण्याने त्या भडकल्या. शिंदेंच्या लोकांनी कामराच्या स्टुडिओवर हल्ला केला व त्यामुळे रिक्षावाल्यांचे गद्दारीवरचे गाणे कोटय़वधी लोकांपर्यंत पोहोचले. जे काम विधानसभेतील प्रचारात झाले नाही ते शिंदे व त्यांच्या लोकांनी केले. त्याबद्दल मूळ शिवसेनेने शिंदे यांच्या भाडोत्री लोकांचे आभार मानायला हवेत. मूर्ख राजकारण्यांना विनोद कळत नाही. विनोद हा जीवनाचा विरंगुळा आहे. विनोद आणि व्यंग नसते तर माणसाचे जगणे कठीण झाले असते. माणसांचे खळखळून हसणे मोदींच्या अमृत काळात बंद पडले आहे. त्यामुळे विनोदी लेखक व कलाकारांवर हल्ले होत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, काव्य स्वर्गात निर्माण होते आणि विनोद पृथ्वीवर उत्पन्न होतो. विनोदाची पुढची पायरी विडंबन. उपहास हा विडंबनाचा आत्मा असल्यामुळे ते अनेकदा प्रखर भासते. समाजातील फसवणूक, लांडय़ालबाडय़ा, राजकारण्यांचा ढोंगीपणा, केवळ पैसा व सत्ता मिळविण्यासाठी रचलेले निष्ठावंतांचे सोंग चव्हाट्यावर आणण्यासाठी विडंबनाचा फार उपयोग होतो. आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात विडंबनाचे हत्यार चालवले व महाराष्ट्राचे शत्रू लटपटले. महाराष्ट्रातील लोकांना फसवण्याचा उद्योग गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्या फसव्यांना `झटका’ देण्याचे काम कुणाल कामराच्या व्यंगकाव्याने केले.

संजय राऊत म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. त्यांचा कुंचला म्हणजे वाघाचा पंजा होता. त्या पंजाच्या फटकाऱ्यांनी अनेकांना घायाळ केले. डेव्हिड लो हा व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुखांचा आदर्श. बाळासाहेब नेहमी सांगत, “शंभर अग्रलेखांची ताकद एका टोकदार व्यंगचित्रात असते.” दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डेव्हिड लो याच्या व्यंगचित्रांमुळे हिटलर बेजार झाला होता. शेवटी त्याने आपल्या सैन्याला आदेश दिला, “व्यंगचित्रकार डेव्हिड लो याला जिवंत किंवा मुडदा’, जसा मिळेल तसा माझ्यासमोर घेऊन या.” हिटलर जसा डेव्हिड लो याला घाबरला, त्याप्रमाणे मोदी व त्यांचे समर्थक कुणाल कामरासारख्या व्यंगकलाकारांना घाबरलेले दिसतात. शिंदे व त्यांच्या लोकांनी कामरा यालाजिंदा वा मुर्दा’ ताब्यात घ्यायचे ठरवले आणि मुख्यमंत्री फडणवीस हा तमाशा सहन करीत आहेत.

संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामराने राहुल गांधी, मनमोहन सिंग यांच्यावरही विडंबन केले, पण तोच कुणाल राहुल गांधींच्या `भारत जोडो’ यात्रेत गांधींबरोबर चालताना दिसला. राहुल गांधींनीही राग मनात ठेवला नाही. याला सहिष्णुता म्हणतात. ही सहिष्णुता मारली जात असताना जे लोक शांत बसतात ते हुकूमशाही बळकट करण्यास मदत करतात. शिंदे यांच्या लोकांनी कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली व गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री फडणवीस सांगतात, “कुणाल कामराने शिंदे यांची माफी मागावी.” मग तुमच्याकडे असलेले गृहखाते काय कामाचे? दंगलखोरांना मुक्त रान देऊन आपण कामराला माफी मागायला सांगत आहात. शिंदे व त्यांच्या लोकांनी तीन वर्षांत जे स्वार्थी राजकारण केले, त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झाली. शिंदे व त्यांच्या लोकांनीच महाराष्ट्राची माफी मागायला हवी.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात शिमगा हा सण आवडीने खेळला जातो. शिमग्यात आपल्या विरोधकांच्या नावाने शिवराळ बोंबा मारणे, त्यांच्यातील व्यंग शोधून चिखलफेक करणे असले सनातनी आणि हिंदुत्ववादी प्रकार होतात. कुणाल कामराने त्याच `सनातनी’ पद्धतीने शिमगा केला. यावर नकली हिंदुत्ववादी दंगल करण्यापर्यंत भडकावेत? नागपुरात दंगल झाली. त्या दंगलीत झालेले नुकसान दंगलखोरांकडून वसूल करू असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. आता मुंबईतील ज्या हाबिटॅट स्टुडिओवर दंगलखोरांनी हल्ला केला व नासधूस केली ते साधारण 45 लाखांचे नुकसान याच दंगलखोरांच्या म्होरक्यांकडून वसूल केले पाहिजे. नागपूरचे दंगलखोर वेगळे व कामराचा स्टुडिओ तोडणारे दंगलखोर वेगळे, असा भेद करता येणार नाही. कायदा सगळय़ांसाठी सारखाच असायला हवा. नागपूरची दंगल हा महाराष्ट्राला लागलेला कलंक असेल तर मुंबईतली स्टुडिओ तोडण्याची दंगलदेखील कलंकच म्हणायला हवी, पण श्री. फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना उघडे पाडू इच्छितात. महाराष्ट्राचे वातावरण शिंदे व त्यांचे लोक बिघडवत असल्याचे फडणवीस यांना लोकांना दाखवायचे आहे. त्यामुळे ते कायद्याची भाषा करीत नाहीत व कामराने शिंदेंची माफी मागावी अशी अलोकशाही भाषा ते करतात. देवेंद्र फडणवीस हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मानायला तयार नाहीत असेच दिसते. कंगना राणावत या महिलेच्या बेताल वक्तव्यांना पाठिंबा देताना त्यांना हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवले, पण कुणाल कामरा प्रकरणात ते स्वातंत्र्य मानत नाहीत. कंगना राणावतने मुंबईची तुलना तेव्हा पाकिस्तानशी केली म्हणून लोक भडकले. पण फडणवीस कंगनाच्या समर्थनासाठी उतरले. हा दुटप्पीपणा आहे. नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही, एकनाथ शिंदेंची झुंडशाही व फडणवीस यांची बनवाबनवी यांच्या ठिकऱया कुणाल कामराच्या दीड मिनिटाच्या व्यंगकाव्याने उडवल्या!

समाधी अभ्यंगस्नान व पूजेने श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ 

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने आयोजन ; व्याख्याने, संगीतसभा, भजने आणि विविध धार्मिक कार्यक्रम
पुणे : चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याला ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ व्या पुण्यतिथी उत्सवाला’ महाराजांच्या समाधीस अभ्यंगस्नान घालून पूजेने प्रारंभ झाला. समाधीस व सभामंडपासह संपूर्ण परिसरात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. सनईच्या मंगल सुरावटींनी देवस्थानचा परिसर भक्तीमय झाला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली.

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने ‘सद््गुरु श्री जंगली महाराज १३५ वा पुण्यतिथी उत्सव’ साजरा करण्यात येत आहे. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर, उपाध्यक्ष चंद्रकांत शिरोळे, सेक्रेटरी शिरीष लोखंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्सवाचे नियोजन केले आहे. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.

रविवारी सकाळी ६ वाजता आढाव बंधू यांचे सनईवादन झाले. त्यानंतर सकाळी ७ वाजता समाधीस अभ्यंगस्नान, पूजा, श्री सद््गुरु जंगली महाराज भजनी मंडळाचे भजन आणि आरती करण्यात आली. शुक्रवार, दि. ११ एप्रिल २०२५ पर्यंत दररोज जंगली महाराज मंदिरात होणा-या उत्सवात धार्मिक कार्यक्रम, भजने, व्याख्याने आणि संगीत सभा होणार आहेत.

दिनांक ३० मार्च ते ११ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी ८ ते १० यावेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि सकाळी १० ते सायंकाळी ५.४५ पर्यंत विविध महिला भजनी मंडळांचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. ६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते दुपारी २ पर्यंत श्री गजानन महाराज परिवार संघ, पुणे तर्फे श्री गजानन विजय ग्रंथ अखंड पारायण आयोजित करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

शिक्षीकेचा विनयभंग, आरोपीविरुध्द २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र

पुणे- शिक्षीकेचा विनयभंग प्रकरणी पुणे पोलिसांनी आरोपीविरुध्द २४ तासांचे आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. दोषारोपपत्र सा दर करण्यास ९० दिवसांचा अवधी दिला जातो. महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन लवकर आणि जास्तीत जास्त शिक्षा व्हावी या अनुषंगाने पोलिसांनी लवकरात लवकर दोषारोपपत्र सदर करण्याच्या कामाला वेग दिला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी सांगितले कि,’ दिनांक २८/०३/२०२५ रोजी कदमवाकवस्ती गावातील एका शाळेमधील शिक्षीकेवर विनयभंगाचा प्रकार घडला आहे. सदर बाबत पिडीत महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाणेस तक्रार दाखल केली. त्याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणेस आरोपी नामे गणेश सुरेश अंबिके वय ४५ वर्षे रा.लोणी काळभोर पुणे याचेविरुध्द गु. र. नं. १४७/२०२५ बी. एन. एस. कलम ७४, ११५ (२), ३५२, ३५१(२) (३) प्रमाणे दि.२८/०३/२०२५ रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपीने पिडीत महिला शाळेतील वर्गामध्ये बसल्या असताना, शाळेत जावुन त्यांचेशी महत्वाचे बोलायचे आहे असे सांगुन वर्गाबाहेर बोलावले. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला असता आरोपीने पिडीत शिक्षीका महिलेचा हात पकडुन जवळ ओढुन त्यांचे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होण्याजोगे कृत्य करुन विनयभंग केला. तसेच पिडीत महिलेस हाताने मारहाण करुन अश्लिल शिवीगाळ केली. त्याबाबत गुन्हा दाखल करणेत आला होता.
सदर गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी वेगाने गुन्हयाचा तपास पूर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावे संकलीत केले. तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक दिगंबर सोनटक्के यांनी अवघ्या २४ तासांचे आतच आरोपीविरुध्द सबळ व प्रभावी पुरावे प्राप्त करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्याचा कोर्ट केस नंबर १६३०/२०२५ दि. २९/०३/२०२५ असा आहे. तसेच यातील आरोपीस दोषारोपपत्रासह न्यायलायात हजर करणेत आले होते त्यामुळे मा. न्यायालयाने आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महिला सुरक्षीतता व महिलांना न्याय देण्याचे उदात्त हेतुने, महिलांविरुध्दचे विनयभंगांचे गुन्हयाचा तपास अतिशय शिघ्रगतीने पूर्ण करुन २४ तासांचे आत आरोपीसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणेबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर श्रीमती अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पोलीस ठाणे पुणे शहर राजेंद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारीदिगंबर सोनटक्के व दप्तरी पोलीस अंमलदार अमोल जाधव यांनी सदर गुन्हयाचा तपास २४ तासांचे आत पूर्ण करुन आरोपीविरुध्द न्यायालयात दोषोरोपपत्र दाखल करुन पिडीत महिलेस न्याय देण्याचे दृष्टीने प्रभावी प्रयत्न केले.

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला नव्या संचातील ‘तुझे आहे तुजपाशी’चा रौप्यमहोत्सवी प्रयोग सादर

पुणे: प्रदीर्घ काळ मराठी नाट्यरसिकांचे प्रेम लाभलेल्या ‘तुझे आहे तुजपाशी’ या नाटकाचा नव्या संचातील रौप्य महोत्सवी 25 वा प्रयोग गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात उत्साहात पार पडला.

मराठी माणसाचे प्रेम आणि आदर प्राप्त असलेले हरहुन्नरी व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले हे नाटक दीर्घकाळ रंगभूमीची सेवा करणारे निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी नव्या संचात रंगमंचावर आणले आहे. या नाटकातील काकाजी ही मध्यवर्ती भूमिका नाटक, सिनेमा आणि मालिका या सर्व माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ गिरीश ओक यांनी साकारली आहे.

विजय पटवर्धन हे नाटकाचे दिग्दर्शक असून सुनील गोडबोले, अमोल बावडेकर, डॉ प्रचिती सुरू- कुलकर्णी, रूपाली पाथरे,मुक्ता पटवर्धन,वसंत भडके,दिपक दंडवते,मंदार पाठक,मनोज देशपांडे,मेधा पाठक,आशा तारे यांनी देखील या नाटकात भूमिका साकारल्या आहेत.नाटकाचे सूत्रधार भैरवनाथ शेरखाने आणि नाटकाचे व्यवस्थापक राजेंद्र बंग हे आहेत.

विविध संचात या नाटकात तीन भूमिका करण्याची संधी मिळालेले आणि सध्या या नाटकातील काकाजींची भूमिका करणारे डॉ. गिरीश ओक या नाटकाबद्दल बोलताना म्हणाले की, या नाटकातील संदर्भ जुने आहेत. वातावरण जुन्या काळातील आहे. तरीदेखील हे नाटक तब्बल तीन पिढ्यांच्या पसंतीला उतरले आहे. त्यामुळे हे नाटक अजरामर ठरले आहे.

जुने नाटक नव्या संचात सादर करताना आनंद तर मिळतोच. मात्र, ते आव्हानात्मकही आहे. विशेषत: जुन्या नाटकाचे सादरीकरण आणि जुन्या नाटकातील भूमिका सादर करणारे अभिनेते यांच्याशी तुलना होते. अनेक वेळा ती त्रासदायक ठरते, असेही डॉ ओक यांनी नमूद केले.

‘तो मी नव्हेच,’ ‘ती फुलराणी’ आणि आता ‘तुझे आहे तुजपाशी’ अशा तीन नाटकांमध्ये नव्या संचात भूमिका करण्याची संधी मला मिळाली. ‘तो मी नव्हेच’च्या दोनशे प्रयोगांपैकी पहिल्या पंचवीस प्रयोगात माझ्या कामाची जुन्या अभिनेत्यांबरोबर तुलना झाली. ‘ती फुलराणी’ हे नाटक तर अनेक वेळेला अनेक अभिनेत्यांनी केले असल्यामुळे या नाटकातील भूमिकेची सतत तुलनाच होत राहिली.

मात्र, ‘तुझे आहे तुजपाशी’ करताना हा त्रास फारसा जाणवला नाही. या नाटकाशी मी दीर्घकाळ संबंधित राहिलो आहे. महाविद्यालयात असताना या नाटकात मी श्यामची भूमिका साकारली. त्यानंतर दीर्घकाळ डॉ सतीश ही भूमिका केली आणि आता 25 प्रयोग काकाजींची भूमिका करत आहे. एकाच नाटकात तीन भूमिका करण्याची संधी एकाच अभिनेत्याला तेव्हाच मिळू शकते, जेव्हा त्या नाटकामुळे प्रदीर्घ काळ चालण्याची क्षमता असते, असेही डॉ. ओक म्हणाले.

‘तुझे आहे तुजपाशी’च्या रौप्यमहोत्सवी प्रयोगाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. त्यांनी या नाटकाचे तोंड भरून कौतुक केले. या नाटकाचे लेखन अप्रतिम असून कलाकार ते उत्तमपणे सादर करत असल्याचे सांगून जोशी यांनी आतापर्यंत हे नाटक बघण्याची संधी न मिळाल्याबद्दल खंत व्यक्त केली.

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेने उभारली सांस्कृतिक कलावंत गुढी

पुणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे आज मराठी नववर्षारंभ (गुढी पाडवा) आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे निमित्त साधून सांस्कृतिक कलावंत गुढी उभारण्यात आली. साहित्यिक, कलावंत आणि रसिकांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
‌‘कुटंब कीर्तन‌’ या नाटकातील कलाकार सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते आणि सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांच्या हस्ते गुढी पूजन करण्यात आले. माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, सुगंधा शिरवळकर, बालसाहित्यिक राजीव तांबे, नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, महापालिकेच्या नाट्यगृहांचे प्रमुख व्यवस्थापक राजेश कामठे, नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, उपाध्यक्ष समीर हंपी, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, सांस्कृतिक विभाग प्रमुख अनुराधा हटकर, अश्विनी थोरात, अभिजित आपटे, धनंजय पूरकर, प्रसिद्ध गायिका मनिषा निश्चल, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, गेल्या 22 वर्षांपासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कलावंतगुढी उभारण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
सत्यजित धांडेकर यांनी कोथरूड शोखेच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या सांस्कृतिक उपक्रमांची माहिती सांगितली.
सांस्कृतिक गुढी उपक्रमाचे कौतुक करून वंदना गुप्ते म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची वास्तू खूप छान आणि प्रसन्न असून रसिकांच्या अलोट गर्दीने कायम फुललेली असते. अभिनयाच्या माध्यमातून 50 वर्षांपूर्वी रसिकांसाठी गुढी उभारली असून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात 1125वा प्रयोग करीत असल्याचा आनंद आहे. नाट्यगृहाचा नावलौकिक कायम वाढत रहावा, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
संकर्षण कऱ्हाडे म्हणाले, नाट्यगृहाचे पाठबळ आणि रसिक प्रेक्षकांच्या साथीने भविष्यकाळात सांस्कृतिक क्षेत्रात उंचच उंच गुढी उभारू.
नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेच्या माध्यमातून बालनाट्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत या बद्दल राजीव तांबे यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. पृथ्वीराच सुतार यांनी नववर्षानिमित्त कलाकार आणि रसिकांना शुभेच्छा देऊन भविष्यात सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित धांडेकर यांनी केले तर आभार समीर हंपी यांनी मानले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्य कार्यशाळेचा समारोप

पुणे : नाटक हे जीवंतपणाचे लक्षण असून व्यक्तिमत्व विकासाचे मोलाचे साधन आहे. मुलांना विविध विषयांवरील बालनाट्ये दाखविल्यास, बालनाट्याविषयी त्यांच्याशी चर्चा केल्यास ती सर्वार्थाने प्रगल्भ होतील, असा प्रतिपादन वंदेमातरम्‌‍चे अभ्यासक, बालनाट्य चळवळीतील मार्गदर्शक मिलिंद सबनीस यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे 5 ते 16 वर्षे वयोगटातील मुलांसाठी नाट्य कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या समारोपानिमित्त आयोजित कार्यक्रमात सबनीस आणि रंगकर्मी रवींद्र सातपुते यांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. त्यावेळी सबनीस यांनी कार्यशाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधला. टिळक रोड वरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस कार्यशाळेतील मुलांनी विविध नाटिका, नाट्यछटांचे सादरीकरण केले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी, विश्वस्त संध्या कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, अश्विनी आरे, पूजा पारखी, राधिका देशपांडे, हर्षदा टिल्लू यांची उपस्थिती होती. नाट्यकार्यशाळेचे संयोजन प्रतीक पारखी यांनी केले होते. कार्यशाळेतील लहान गटातून अबीर वाळिंबे आणि आद्या पटवर्धन तर मोठ्या गटातून श्रावणी गोरे यांची सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून निवड करण्यात आली. त्यांचा या वेळी विशेष गौरव करण्यात आला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या ललित कला केंद्र आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे घेण्यात आलेल्या बारावी नंतरच्या मोठ्यांसाठीच्या अभिनय प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना या प्रसंगी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
रवींद्र सातपुते म्हणाले, नाट्य प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्येक मुलगा किंवा मुलगी अभिनेता-अभिनेत्री होईलच असे नाही. मात्र नाट्य कलेचे प्रशिक्षण घेतलेला विद्यार्थी भविष्यात चांगला माणूस मात्र नक्की घडू शकतो. चांगला चांगला नट किंवा प्रेक्षक घडण्याची प्रक्रिया नाटकाच्या माध्यमातून घडू शकते.
प्रास्ताविकात नाट्यसंस्कारचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी नाटक ही कला खूप उपयुक्त आहे. नाट्य प्रशिक्षणाकडे क्रमिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणूनच बघावे. संस्थेच्यावतीने पुण्यातील काही शाळांमध्ये अभ्यासनाट्य चळवळ राबविण्यात येत आहे. कंटाळवाणे विषयही मुलांना नाट्यात्मक पद्धतीने शिकविले जात असल्यामुळे त्याचा मुलांच्या अभ्यासावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अभ्यासनाट्य चळवळ भविष्यात संपूर्ण राज्यात राबविण्याचा विचार आहे.

कुणाल कामराला त्वरित अटक करा-हडपसर भाजपा महिला कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन

पुणे: उच्चपदस्थ नेत्यांवर अवमानकारक टीका करणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कुणाल कामरावर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल करून त्याला त्वरित अटक करावी, अशी मागणी हडपसर विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी महिला मोर्चाच्या सरचिटणीस छाया संजीव गदादे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

यावेळी नलिनी मोरे, संगीता पाटील, अश्विनी सूर्यवंशी, रेखा अबनावे, भावना कांबळे, मीरा फडणवीस, जयश्री गदादे व निकिता उबाळे उपस्थित होत्या.  योगेश टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  निवेदन देण्यात आले.

छाया गदादे म्हणाल्या, कुणाल कामरा या कलाकाराने भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्याविषयी अतिशय खालच्या पातळीवर टीका करत अपमानास्पद कविता केली आहे. या तथाकथित ‘कॉमेडी शो’ मध्ये त्याने पंतप्रधानांसह गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अनेक उच्चपदस्थ नेत्यांवरही अवमानकारक वक्तव्ये केली आहेत.

 नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचा विकास मोठ्या प्रमाणात होत आहे. ही प्रगती काही लोकांना खटकत असावी आणि त्यामुळे अशा लोकांकडून योजनाबद्धपणे बदनामीकारक प्रचार केला जात असावा. त्यामुळे याची सखोल चौकशी करून कुणाल कामरावर कठोर कारवाई करावी.

या वेळी पुणे शहर ओबीसी मोर्चाच्या सरचिटणीस स्मिता गायकवाड यांनी देखील कुणाल कामरावर त्वरित कारवाई करून त्याच्या कार्यक्रमासह यूट्यूब चॅनेलवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली.

गौतमी पाटीलने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शेअर केलं “कृष्ण मुरारी” गाण्याचं पोस्टर

आपल्या नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलने साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्याचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिने हे गाणं गायलं असून विशाल शेलार यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचे संगीत आयोजन आदित्य पाटेकर व करण वावरे यांनी केले आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.

गौतमी तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी सांगते, “लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “कृष्ण मुरारी” या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतच शेअर केल आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीज़र ३ एप्रिलला प्रदर्शित होईल.”