Home Blog Page 374

“रक्तस्राव होत असताना…साडेपाच तास तनिषा भिसेंवर कोणतेही उपचार झाले नाही ” रुपाली चाकणकर म्हणाल्या ..

पुणे-मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारास नकार दिल्याने गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याच्या आरोग्य विभागाने चौकशीसाठी नेमलेल्या समितीने गर्भवतीच्या घरी जाऊन रविवारी तिच्या नातेवाइकांचे जबाब नोंदविले. दरम्यान, या प्रकरणी समितीने प्राथमिक अहवाल आरोग्य संचालकांकडे पाठविला असून, अंतिम अहवालाविषयी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सविस्तर माहिती दिली. या अहवालानुसार गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रुपाली चाकणकरांनी आज वैद्यकीय आणि पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आढाव बैठक घेतली. याबाबत ते म्हणाले, “आढावा बैठक घेण्याआधी मी भिसे कुटुंबियांची घरी जाऊन भेट घेतली. कोणताही व्यक्ती किंवा रुग्ण डॉक्टरांशी अनेक गोष्टी शेअर करतात. जेणेकरून डॉक्टरांकडून उत्तम उपचार मिळावेत. १५ मार्च रोजी पहिल्यांदा रुग्ण डॉ. घैसास यांना भेटले होते. रुग्णाची संपूर्ण मेडिकल हिस्ट्री फक्त डॉक्टरांना माहीत होती. परंतु, ही घटना घडल्यानंतर रुग्णालयाने चौकशीसाठी जी अंतर्गत समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल दिला त्यात स्वतःला वाचवण्यासाठी जाहीररित्या रुग्णाची गोपनिय माहिती सोशल मीडियावर मांडल्या. ही माहिती गोपनिय ठेवण्याचा नियम आहे. याप्रकरणी आम्ही रुग्णालयाचा निषेध करतो.”

“रुग्णालायात ९ वाजून १ मिनिटांनी रुग्णाची एन्ट्री आहे. रुग्णाला २ एप्रिलला बोलावलं होतं. पण २८ मार्चला गर्भवती महिलेला रक्तस्राव होऊ लागल्याने त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यानुसार त्यांनी रुग्णालयात येण्यास सांगितलं. संबंधित स्टाफला डिलिव्हरीसाठी तयारी करण्यास सांगितलं. त्यानुसार स्टाफने ऑपरेशनचीही तयारी केली. रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्याअगोदर त्यांच्याकडून १० लाखांची मागणी केली. हे सर्व रुग्णासमोरच सुरू होतं. ते तीन लाख रुपये भरायला तयार होते. इतर पैशांची व्यवस्था आम्ही उद्यापर्यंत करू, असंही म्हणाले. मग मंत्रालयातून आणि विभागातून फोन गेले. तरीही याची दखल घेतली नाही. त्यामुळे रात्री अडीच वाजता रुग्ण बाहेर पडला. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असतानाही रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. उलट तुमच्याकडे असलेली औषधं असतील ते घ्या आणि तुमच्या पद्धतीने रुग्णावर उपचार करण्यास रुग्णालयाने सांगितलं. या सर्व कालावधित रुग्णाची मानसिकता खचून गेली”, असं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं.रात्री अडीच वाजता ससून रुग्णालयात नातेवाईकांनी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. या काळात रुग्णाची मानसिकता खचली होती, त्यामुळे रुग्ण १५ मिनिटांत बाहेर आला. ते रुग्णालयात कोणालाही भेटले नाहीत. तिथून ते सूर्या रुग्णालयात गेले, चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. खचलेली मानसकिता आणि रक्तस्राव यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

एक अहवाल आला, दोन अहवाल बाकी
चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा अहवाल आला आहे. डॉ. राधाकिशन पवार, डॉ. प्रशांत वाडिकर, डॉ. कल्पना कांबळे, डॉ नीना बोऱ्हाडे या सदस्यांनी हा अहवाल सादर केला आहे. दीनानाथ रुग्णालय, ससून रुग्णालय आणि सूर्या रुग्णालयाचा अहवाल यात दिला आहे. हा मृत्यू माता मृत्यू असल्याने यासंदर्भातील सखोल चौकशी माता मृत्यू अन्वेषण समितीअंतर्गत करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व बाबींचा अहवाल अंतिम अहवाल आज सायंकाळी जाहीर होईल. धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्याचा अहवाल उद्या सकाळपर्यंत सादर होईल.

घैसास यांना डिपॉझिट मागण्याची दुर्बुद्धी सूचल्याचे सांगत केळकरांचा PC तून काढता पाय

पुणे-तनिषा भिसे मृत्यू प्रकरण बाबत सरकारने नेमलेल्या समितीचा अहवाल सादर केला आहे. डॉ. सुश्रुत घैसास हे रुग्णालयाचे मानद प्रसुती तज्ञ आहे. मागील दहा वर्ष ते रुग्णालयात काम करत आहे त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा मध्ये त्यांनी सांगितले की, माझ्यावर सध्याच्या परिस्थितीत दबाव निर्माण झाला आहे. मला माझ्या कुटुंबाची चिंता आहे, माझ्या कामावर देखील परिणाम होत आहे, मी रात्री झोपू शकत नाही, रुग्णालयाची देखील बदनामी होत आहे त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. विश्वस्त मंडळ यांच्या समोर त्यांचा राजीनामा ठेवून मंजूर केला जाईल. गुरवार पासून ते सेवेतून बाजूला होतील. त्यांच्याकडील रुग्ण इतर डॉक्टर यांच्याकडे वर्ग करण्यात येईल असे मत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

यावेळी डॉ. केळकर म्हणाले, रुग्णालय स्टाफ यांनी योग्यप्रकारे बोलावे त्याकरीता त्यांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येईल. शासनाचे तीन अहवाल आल्यावर याबाबत आम्ही आमची भूमिका मांडू. मनपाने आईचा मृत्यूस जबाबदार कोण याबाबत बैठक घेतली आहे. गुंतागुंतीच्या आणि मोठ्या खर्चाच्या प्रकरणात डिपॉझिट निधी घेतला जातो. रुग्णालय यांच्याकडून डिपॉझिट रक्कम कधी लिहिली जात नाही, पण त्यादिवशी राहू, केतू मध्ये आले माहिती नाही डॉक्टर यांच्याशी बोलणे करून संबंधित यांनी एका चौकटीत रक्कम लिहिली. हॉस्पिटलने टॅक्स थकवला नसून याबाबत न्यायालयात केस सुरू आहे त्याठिकाणी आम्ही कर भरू. मनपाची टॅक्स आकारणी पद्धत ही कमर्शियल केली आहे त्याबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे. व्यावसायिक दराने कर लावला जाऊ नये अशी आमची भूमिका आहे. चॅरिटेबल आम्ही काम करतो की नाही याबाबत धर्मदाय आयुक्त यांना दर महिन्याला आम्ही अहवाल सादर करतो.

असंवेदनशील म्हणजे कामाच्या गर्दीत मनुष्याला जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आपल्या वागण्यातून संवेदनशीलता दिसून आली पाहिजे. रुग्ण साडेपाच तास रुग्णालयात होते त्यावर उपचार झाले की नाही याबाबत संबंधित चौकशी समिती समोर निवेदन झाले. मला सीएमओ कार्यालय मधून फोन आला होता त्याबाबत मी रुग्ण नातेवाईक यांच्याशी बोलणे करून त्यांना जितके पैसे असतील तेवढा भरा सांगितले होते. एखादा रुग्ण ओपीडी मध्ये आला आणि अचानक निघून गेला तर त्याबाबत पोलिस तक्रार दिली जात नाही. अनेकदा आमच्याकडे बेड उपलब्ध नसते. अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येत असतात रोज इमर्जन्सी असतात.

तनिषा भिसेंचा मृत्यू नव्हे तर हत्या:सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का?

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पीडित भिसे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणात सरकारने काहीतरी संवेदनशीलपणा दाखवत कारवाई केली पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संताप व्यक्त केला.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. याच दरम्यान, डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्यामुळे कोणताही प्रश्न सुटत नसल्याचा दावा सुप्रिया यांनी केला.

तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला म्हणजे काय झाले? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिलाय, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्या मुलींवर आयसीयूमध्ये उपचार चालू आहे. त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दु:खातून जात आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवावी. त्या मुलीची जी हत्या झाली, तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजेत. त्या दिवशी नेमके काय झाले, ते समोर आले पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर, तसेच महिलेच्या हत्येत जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समाविष्ट आहेत, त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. शरद पवार मुख्यमंत्री असताना व श्रीनिवास पाटील कलेक्टर असताना रुग्णालयाल ही जागा दिली गेली. या साठी लता दीदींनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाला ही जमीन देण्यात आली. त्यामुळे हा दवाखाना उभा राहिला. मात्र, या रुग्णालयात गेलेल्या अनेक नागरिकांनी दवाखान्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. धर्मादाय दवाखाना असल्यामुळे सगळ्यांनी मदतीची भुमिका घेतली. मात्र. घडलेली घटना दुर्दैवी आहे. या दवाखान्याला मंगेशकर कुटुंबियांचे मोठे नाव आहे. मात्र, या प्रकरणात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाही, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नसून ते केवळ ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही ही घटना गंभीरतेने घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती करू. दीनानाथ मंगेशकरांचं यांच नाव असलेल्या या दवाखान्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे, मंगेशकर कुटुंबाचं या देशात मोठं योगदान आह, असे सुळे म्हणाल्या.

रुग्णालयाने थकवलेला २७ कोटींचा कर का वसूल करण्यात आला नाही ?

सर्वसामन्यांच्या घरासमोर बॅंड बाजा! मंगेशकर रुग्णालयाला मात्र अभय

पुणे- दीनानाथ रुग्णालयात तनिषा भिसे यांचा मृत्यू होण्याची घटना अतिशय असंवेदनशील आहे. भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाला जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कोंग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. महानगर पालिकेवर संताप व्यक्त करत रुग्णालयाने थकवलेला २७ कोटींचा कर का वसूल करण्यात आला नाही ? असा सवाल देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.दीनानाथ रुग्णालयाने तब्बल २७ कोटी रुपयांचा कर थकवल्याने सुप्रिया सुळे संतापल्या. पालिकेकडे सर्वसामान्य नागरिकांनी कर थकवला तर कर वसूली साठी त्यांच्या घरामोर बॅंड वाजवला जातो. मात्र, दवाखान्याने एवढी मोठी रक्कम थकवून देखील कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणी पालिका आयुक्तांनी गांभीर्याने दखल घ्यावी असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुणे महागर पालिकेत मतदार संघातील विविध विकसकामांचा आढावा खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी घेतला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत दीनानाथ रुग्णालयात घडलेल्या घटनेप्रकरणी संताप व्यक्त केला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, भारताल लोकं खूप विश्वासाने आरोग्य सेवेचा लाभ घेण्यासाठी रुग्णालयात जात असतात. आपल्याकडे डॉक्टरांना देव मानतात. कोरोना काळात सर्वांनी याचा अनुभव घेतला आहे. एका हॉस्पिटलमुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा ही वाईट ठरत नाही. मात्र, तनिषा यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबादर आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूची जबाबदारी ही दवाखान्याला घ्यावीच लागले. तसेच सरकारने देखील दवाखान्याला दोषी ठरवून कारवाई करायला हवी. शरद पवार मुख्यमंत्री असताना व श्रीनिवास पाटील कलेक्टर असताना रुग्णालयाल ही जागा दिली गेली. या साठी लता दीदींनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाल ही जमीन देण्यात आली. त्यामुळे हा दवाखाना उभा राहिला. मात्र, या रुग्णालयात गेलेल्या अनेक नागरिकांनी दवाखान्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. धर्मादाय दवाखाना असल्यामुळे सगळ्यांनी मदतीची भुमिका घेतली. मात्र. घडलेली घटना दुर्दैवी आहे. या दवाखान्याला मंगेशकर कुटुंबियांचे मोठे नाव आहे. मात्र, या प्रकरणात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाही, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नसून ते केवळ ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही ही घटना गंभीरतेने घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती करू. दीनानाथ मंगेशकरांचं यांच नाव असलेल्या या दवाखान्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे, मंगेशकर कुटुंबाचं या देशात मोठं योगदान आह, असे सुळे म्हणाल्या.

मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा,म्हणाले,’रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सापडले होते वादात; प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका

पुणे- येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठत होती. अखेर या प्रकरणी राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. यासंबंधीच्या रिसिप्टवर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी दीनानाथ रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर सरकारनेही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. या समितीचा सोमवारी अहवाल आला. त्यानंतर काही तासांतच डॉक्टर घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.

डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयातील अत्यंत अनुभवी डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या विरोधात झालेले आरोप तथा त्यानंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण-तणाव आणि रुग्णालयाच्या प्रतिमेला झालेली हानी लक्षात घेता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. ते आपल्या राजीनामा पत्रात म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत आहे. विशेषतः माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका आहे.

तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. सत्ताधारी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्या नातेवाकांच्या पुण्यातील नवसह्याद्री सोसायटीतील एका हॉस्पिटलची तोडफोड केली होती. या प्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांवर दंगलीच्या आरोपासह महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सेवा संस्था (हिंसा प्रतिबंध आणि मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान) कायदा, 2010 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉक्टर घैसास यांची कृती काळीमा फासणारी -आमदार अमित गोरखे

भाजप आमदार अमित गोरखे यांनीही घैसास यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भिसे कुटुंबियांचे सुरुवातीपासून हेच म्हणणे होते की, या घटनेला डॉ. घैसास हेच जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होते. ते पुढेही करत राहील. ज्या उदात्त भावनेने आमच्या सरकारने आणि मंगेशकर परिवाराने हे हॉस्पिटल चालू केले त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचे काम डॉ. घैसास यांच्या कृतीने झाले. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आत्ता एक अहवाल आला आहे. आणखी दोन अहवाल येतील. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया होईल.

एकनाथ शिंदेंवरील विडंबन :कुणाल कामराला, मद्रास हायकोर्टाकडून अंतरिम संरक्षणात 17 एप्रिलपर्यंत वाढ

मुंबई-स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई पोलिसांच्या एफआयआरमध्ये कुणाल कामराला देण्यात आलेले अंतरिम संरक्षण न्यायालयाने 17 एप्रिलपर्यंत वाढवले आहे. मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराविरोधात एफआयआर नोंदवला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामराला 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

कुणाल कामराने त्याच्या ‘नया भारत’ शोमध्ये ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन करत त्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘गद्दार ‘ म्हटले होते. नंतर त्याने ही क्लिप यूट्यूबवरही अपलोड केली. यावर संतप्त झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर आमदार मुरजी पटेल यांनी आक्षेप व्यक्त करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती.

कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मद्रास उच्च न्यायालयाने मागील सुनावणीत कामरा यांना 7 एप्रिलपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. त्यानंतर आज पुन्हा यामध्ये वाढ करण्यात आली असून आता कुणाल कामराला 17 एप्रिलपर्यंत अंतरिम संरक्षण देण्यात आले.

मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी कामराची मुंबई हायकोर्टात धाव

दरम्यान, कुणाल कामरा यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कामरा यांनी 5 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माझ्याविरोधात नोंदवलेला एफआयआर हा संविधानाने दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. या प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती एस.व्ही. कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर होईल.

दुसरीकडे कुणाल कामरा तिसऱ्यांदा समन्स बजावूनही मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. गत 2 एप्रिल रोजी त्याला तिसरा समन्स पाठवण्यात आला होता. त्यात त्याला 5 एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. याआधी 31 मार्च रोजी मुंबई पोलिस कॉमेडियन कुणाल कामराच्या घरी पोहोचले होते. यावर कामराने सोशल मीडियावर लिहिले होते – ‘तुम्ही अशा पत्त्यावर जात आहात जिथे मी गेल्या दहा वर्षांपासून राहत नाही. हा तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे.

मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध तीन नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित प्रकरणे नाशिकमधील दोन वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.

या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी दोन समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामरा यांना पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.

इंडिगो विमानात महिलेचा मृत्यू: छत्रपती संभाजीनगर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

मुंबई-मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानात एका ८९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर, महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर विमानतळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले.

विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही महिला उत्तर प्रदेशातील मिर्झापूरची रहिवासी होती. तिचे नाव सुशीला देवी होते. ती मुंबईहून विमानात चढली. उड्डाणादरम्यान त्यांची तब्येत बिघडली.

मेडिकल इमर्जन्सीमुळे, ६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता विमान चिकलठाणा विमानतळावर उतरवण्यात आले. वैद्यकीय पथकाने विमानतळावर त्यांची तपासणी केली, परंतु तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

अधिकाऱ्याने सांगितले की, एमआयडीसी सिडको पोलिस स्टेशनने आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्या आणि विमान वाराणसीला रवाना झाले. तर महिलेचा मृतदेह छत्रपती संभाजीनगरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.
गेल्या २० दिवसांत इंडिगोच्या विमानांमध्ये २ जणांचा मृत्यू
२९ मार्च: विमानात पत्नीसमोर पतीचा मृत्यू.
पटनाहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विमानाचे लखनौमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्या प्रवाशासोबत त्याची पत्नी आणि चुलत भाऊ होते. या प्रवाशाची ओळख प्राध्यापक सतीश चंद्र बर्मन अशी झाली आहे, ते आसाममधील नलबारी येथील रहिवासी होते.

तो बराच काळ आजारी होता. इंडिगोच्या फ्लाइट क्रमांक 6E 2163 मध्ये चढल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. ते त्यांची पत्नी कांचन आणि चुलत भाऊ केशव कुमार यांच्यासोबत प्रवास करत होते.

क्रू मेंबर्सनी पायलटला याची माहिती दिली. यानंतर, विमानाचे लखनौ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानतळावरील वैद्यकीय पथकाने प्रवाशाची तपासणी केली आणि त्याला मृत घोषित केले.
२१ मार्च: पाणी पिल्यानंतर प्रवासी बेशुद्ध झाला, काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

२१ मार्च रोजी सकाळी लखनौ विमानतळावर एका प्रवाशाचा मृत्यू झाला. विमानात बसलेल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने आधी पाणी प्यायले आणि नंतर सीटवर बसून अचानक बेशुद्ध पडू लागला. त्यानंतर, सर्व प्रवासी उतरले, पण तो बसूनच राहिला. मग, विमानातील क्रू मेंबर्सनी ताबडतोब वैद्यकीय पथकाला बोलावले, परंतु तोपर्यंत प्रवाशाचा मृत्यू झाला होता.

एअर इंडियाच्या एआय-४८२५ या विमानात ही घटना घडली. दिल्लीहून येणारे हे विमान सकाळी ८.१० वाजता लखनौ विमानतळावर उतरले. मृत आसिफ अन्सारी दौला हा बिहारमधील गोपालगंज येथील रहिवासी होता. या घटनेनंतर विमानात उपस्थित असलेल्या प्रवाशांनी सांगितले की, जर क्रू मेंबर्सनी वेळीच लक्ष दिले असते तर आसिफचा जीव वाचू शकला असता.

उद्यापासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ

नवी दिल्ली-घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाला आहे. आज म्हणजेच सोमवार ७ एप्रिल रोजी पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या दिल्लीत गॅस सिलिंडर ८०३ रुपयांना उपलब्ध आहे. किमती वाढल्यानंतर ही किंमत ८५३ रुपये होईल. तर मुंबईत हीच किंमत आधी 802.50 रुपये होती, ती आता 852.50 रुपये होईल.

सरकारने शेवटच्या वेळी ८ मार्च २०२४ रोजी महिला दिनी सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीत सिलिंडरची किंमत ९०३ रुपये होती

गिर्यारोहण सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे 

ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ उमेश झिरपे जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात गिर्यारोहण आणि माउंट एव्हरेस्ट या विषयावर व्याख्यान

पुणे: केवळ भटकंती करणे म्हणजे पर्यटन, असा सर्वसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. भटकंती कोणीही करू शकतो, परंतु गिर्यारोहणासाठी ठराविक प्रशिक्षण आणि त्याचा सराव असणे गरजेचे असते. गिर्यारोहण हे आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गिर्यारोहण करणे गरजेचे असून, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ आणि ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.

सद्गुरु श्री जंगली महाराज मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवात उमेश झिरपे यांचे “एव्हरेस्ट आणि गिर्यारोहण” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष  राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते उमेश झिरपे यांचा सत्कार करण्यात आला.

उमेश झिरपे म्हणाले, एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु प्रत्येक गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर केलेच पाहिजे, असे नाही. मात्र गिर्यारोहण करताना आयुष्यामध्ये जे सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळतात, ते अनुभवण्यासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण करणे गरजेचे आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार आपण जर गिर्यारोहण केले, तर त्याचा उपयोग आपल्याला आरोग्य चांगले राहण्यासाठी होऊ शकतो.

शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ होणे, आपल्या क्षमतांची जाणीव होणे, तसेच संकटांना सहज तोंड देण्यासाठी प्रेरणा मिळणे, असे महत्त्वाचे बदल आपल्या आयुष्यात गिर्यारोहणाच्या माध्यमातून होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यामध्ये गिर्यारोहणाचा छंद जोपासला पाहिजे,असेही उमेश झिरपे यांनी यावेळी सांगितले.

यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द आणि सुहृदांचे आशीर्वाद महत्त्वाचे : अंजली भागवत

पुणे : माझ्यातील खिलाडू वृत्तीला मुंबईतील गणेश मंडळात चालना मिळाल्याने खेळाडू म्हणून जडण-घडण झाली. पदकमंचापर्यंत पोहोचणारा एकच खेळाडू असतो. त्याच्या यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द या बरोबरीनेच सुहृदांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद महत्त्वाचे असतात, असे प्रतिपादन जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांनी केले. आजच्या काळात समाज एकत्र राहण्यासाठी हिंदुत्व टिकविण्याची गरज आहे. ते कार्य गणेश मंडळांमार्फत घडावे. कारण गणेश मंडळे फक्त सामाजिक कामच नाही तर वैचारिक देवाणघेवाणीचे कार्यही मोठ्या प्रमाणात करतात, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांचा साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे साई पुरस्काराने आज (दि. 6) गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण आमदार हेमंत रासने, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार, अर्जुन आणि महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्राप्त रेखा भिडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पियूष शहा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने मंचावर होते. बुधवार पेठेतील श्री साईबाबा मंदिरच्या आवारात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तिरंगी पुणेरी पगडी, शाल, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे यंदाचे 18वे वर्ष आहे. सुरुवातीस सुवासिनींनी मान्यवरांचे औक्षण केले.

साईंच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा माझा भाग्ययोग आहे, असे सांगून अंजली भागवत म्हणाल्या, पुरस्कार कुठले आणि कुठे मिळतात याचे महत्त्व आहे. श्री साई पुरस्कार हा माझ्यासाठी बहुमूल्य आहे. सिडनी ऑलिंपिकमध्ये माझी निवड होण्याकरीता बरीच वाट बघावी लागली. त्यावेळी माझ्या वडिलांना शिर्डीला जाऊन साईंकडे प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी निवड झाल्याचे समजले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

डॉ. सदानंद मोरे म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांना खूप मोठी परंपरा आहे. गणेश उत्सवातच नव्हे तर वर्षभर गणेश मंडळे आदर्शवत काम करीत असतात. अंजली भागवत यांना रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराचे वितरण होत आहे हा मणिकांचन योग आहे, असे सांगून डॉ. मोरे पुढे म्हणाले, साई म्हणजे सावली किंवा छाया. या पुरस्काराच्या माध्यमातून साईंच्या कृपेची सावली लाभली आहे.

रेखा भिडे म्हणाल्या, मी साईभक्त असून लहानपणापासून अनेकदा शिर्डीला गेले आहे. साईनाथ मंडळाचे कार्यकर्ते अत्यंत उत्स्फूर्ततेने सामाजिक कार्य करत आहेत ही कौतुकास्पद गोष्ट आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे अत्यंत आवश्यक आहे. अंजली भागवत या अतिशय निष्ठावान खेळाडू असून युवा पिढीला मार्गदर्शन करीत आहेत, याचे कौतुक आहे.

आमदार हेमंत रासने म्हणाले, नेमबाजीत उच्च यश प्राप्त केलेल्या अंजली भागवत यांना हॉकी या क्रीडा प्रकारातील महनीय खेळाडू रेखा भिडे यांच्या हस्ते साई पुरस्काराने सन्मानित केले ही गौरवास्पद बाब आहे. या निमित्ताने व्यासपीठावर क्रीडा क्षेत्रातील रणरागिणी उपस्थित आहेत.

साईनाथ मंडळ ट्रस्टच्या कार्याची माहिती देताना प्रास्ताविकात पियूष शहा म्हणाले, पुण्यात सामाजिक क्षेत्रात गणपती मंडळांचे काम मोठे असून ही मंडळे म्हणजे पुण्याच्या रक्तवाहिन्याच आहेत. या पुरस्काराच्या माध्यमातून एका हृदयापासून दुसऱ्या हृदयापर्यंत जाण्यासाठी गौरव सोहळा आयोजित केला जातो.

मान्यवरांचे स्वागत पियूष शहा, प्रविण गोळवडेकर, प्रशांत पंडित, प्रसाद भोयरेकर यांनी केले. सूत्रसंचालन आणि मानपत्राचे वाचन जतीन पांडे यांनी केले. अमर राव, नरेंद्र व्यास, प्रवीण वळवडेकर, शंकर निंबाळकर, प्रसाद भोयरेकर, अमित दासानी, संकेत निंबाळकर, प्रशांत पंडित यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. आभार पियूष शहा यांनी मानले.

गिरीश महाजनांचे महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध:एकनाथ खडसेंचा आरोप,महाजनांचाही जोरदार पलटवार

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याबाबत सनसनाटी आरोप केला आहे. गिरीश महाजन यांचे महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचे एकनाथ खडसे म्हणालेत. यासंदर्भात अमित शहा यांच्याकडे कॉल रेकॉर्ड असल्याचा दावा देखील एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसेंच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ खडसे आणि गिरीष महाजन यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आत एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराने व्हायरल केलेल्या क्लीपच्या आधारावर गिरीश महाजन यांच्यावर उपरोक्त गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांवर गिरीश महाजन यांनीही प्रत्युत्तर दिले. एकनाथ खडसे यांनी यांच्याकडील एक पुरावा तरी लोकांना दाखवावा, असे आव्हान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिले.

एकनाथ खडसे म्हणाले की, गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी आपली एक क्लिप प्रकाशित केली. त्यात असे म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्या ‘रंगला रात्री अशा’, त्यात त्यांनी डिटेल सांगितले आहे की, गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत. तिचे नाव मला माहित आहे. पण ते सांगणे उचित होणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमित शहा यांच्याकडे ज्यावेळेस मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी चर्चा झाली. त्यावेळेस अमित शहा यांनी गिरीश महाजन यांना बोलावून घेतले होते. त्यांना सांगितले की, महिला आयएएस अधिकाऱ्यांशी तुझे संबंध आहे. यावेळी महाजनांनी सांगितले की, नाही, माझे अनेकांशी कामानिमित्त संबंध आहेत. कामानिमित्त मी बोलतो. अमित शाह यांनी त्यांना सांगितले की, तुझे कॉल डिटेल रिपोर्ट आमच्याकडे आहे. रात्री एक वाजेनंतर दिवसभरात शंभर शंभर कॉल तुझे झालेले आहेत. त्यामुळे तू आता काहीही सांग. पण, तुझे सीडीआर खरे बोलतो. रोज बोलण्याचे काय कारण आहे? असे प्रश्न अनिल थत्तेंनी शहांच्या वक्तव्याचा हवाला देऊन उपस्थित केले, असेही एकनाथ खडसे म्हणाले.

मला वाटते की, खरोखर गिरीश महाजन यांचे दहा वर्षाचे सीडीआर तपासले तर खरी वस्तुस्थिती समोर येईल, असेही एकनाथ खडसे म्हणाले. गिरीश महाजनांच्या रंगलेल्या रात्री थत्तेंनी म्हटल्याप्रमाणे मी देखील अमित शहांना भेटणार आहे. अमित शहा आणि माझी भेट होतच राहते. त्यावेळी मी त्यांना हे खाली जे चालले आहे ते काय आहे? याबाबत विचारणा करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

खडसेंचे सगळे संपले, त्यामुळेच ते असे बरळतात – महाजन

दरम्यान, भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनीही एकनाथ खडसेंच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. कमरेच्या खाली वार केल्याशिवाय त्यांना दुसरे काही जमत नाही. त्यांची अवस्था किती वाईट आहे, हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला बोलायचे असेल तर त्यांना बाहेर पडणे मुश्किल होईल. त्यांचे सगळे संपलेले आहे. त्यांचे दुकान बंद झालेले आहे, त्यामुळे वाटेल तशी भाषा करतात आणि बरळतात, असा पलटवार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केला.

ते ज्येष्ठ आहेत, वयाने मोठे आहेत. बोलताना त्यांनी माझ्या कामाबद्दल बोलावे, माझ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलावे. जे सत्य असेल ते बोला. मात्र काही नसताना लोकांना खोट्या बातम्या द्यायच्या. वारंवार ते म्हणतात, त्यांच्याकडे हे आहे, ते आहे. मात्र कशासाठी ते असे करतात? ते लोकांची दिशाभूल करतात. मात्र मी जर काही सांगितले तर लोक त्यांना जोड्याने मारतील. मी त्यांच्या प्रमाणे खालच्या पातळीवर जाऊ शकत नाही. मला कमरेखालची भाषा शोभत नाही, असेही गिरीश महाजन म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार घाणेरडी भाषा करायची. काही सिद्ध करता येत नाही. काहीतरी चरित्रहणन करायचं, याशिवाय त्यांच्याकडे दुसरं काही राहिलेले नाही. त्यांनी एक पुरावा दाखवावा, मी सक्रिय राजकारणातून बाहेर पडेन. अमित शहा यांना काय पुरावा दाखवता? तुमच्याकडे पुरावा असेल तर तो लोकांना दाखवा. यांना दिले, त्यांना दिले माझ्या मोबाईलमध्ये होते, डिलिट झाले, मोबाईल हरवला हे खोटं बोलताना लाज वाटत नाही का? माझे आव्हान आहे त्यांनी एक पुरावा दाखवावा. माझा अंत बघू नका, असा इशाराही महाजन यांनी खडसेंना दिला.

चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा श्रीराम सन्मान पुरस्काराने गौरव

पुणे : कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे आज (दि.6) श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने, भक्तीभावाने आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथाश्रमातील लहान मुलांसमवेत साजरा करण्यात आला. समाजभान जपत चव्हाण परिवारातर्फे दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने रामजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते.
या सोहळ्यानिमित्त सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून नागरिकांची मोफत आरोग्य तपसाणी करण्यात आली. सामाजिक, शैक्षिणक, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा श्रीराम सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. विनोद शहा यांचा विशेष सत्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा फाऊंडेशनमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता चव्हाण परिवाराच्या वतीने 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली. शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्रीराम चव्हाण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चव्हाण, बापू गायकवाड, दत्ता सागरे, डॉ. नितीन भालेराव, मारुतराव देशमुख, अप्पासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय खो-खो संघाचे कर्णधार प्रतिक वाईकर, उपकर्णधार सुयश गरगटे, खो-खो खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदित्य गणपुले तसेच भारतीय खो-खो पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, भारतीय खो-खो महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा श्रीराम सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा 260 नागरिकांनी लाभ घेतला.

श्रीराम जन्मसोहळ्यानिमित्त विद्या यंदे यांनी कीर्तनसेवा सादर केली. त्यांना अशोक मोरे (तबला), प्रणव तळवलकर (संवादिनी), धनंजय साळुंके (तालवाद्य), डॉ. अनघा धायगुडे, कल्याण हुद्दार (सहगायन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा धायगुडे यांनी केले.

स्मार्ट सिटी च्या नावाने पुणेकरांची फसवणूकच -माजी आमदार मोहन जोशी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना बंद पडली असून या योजनेचे आमीष दाखवत भाजपने पुणेकरांना फसविले आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.

स्मार्ट सिटी योजना पुण्यासह सर्व शहरात अपयशी ठरत आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. स्मार्ट सिटी योजना मोदी सरकार अचानक गुंडाळून टाकेल आणि पळ काढेल, असे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते आणि नेमके तेच घडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

देशातील शंभर शहरे स्मार्ट केली जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेत २०१६ साली शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश केला. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. मात्र विकसित असलेल्या या परिसरातही स्मार्ट सिटी योजना अपयशी ठरली. संपूर्ण शहर स्मार्ट करणे दूरच राहिले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आश्वासनं देत राहिले आणि पुणेकरांनी भाजपला मते दिली. प्रत्यक्षात मात्र पुणेकरांची फसगत झाली, पारदर्शी प्रशासन, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, शैक्षणिक सुविधा, आधुनिक आरोग्य केंद्रे, कार्यक्षम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प अशी उद्दिष्टे स्मार्ट सिटी योजनेची सांगण्यात आली. मात्र, १० टक्केही सुधारणा झालेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

काँग्रेस आघाडी सरकारने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनयूआरएम) हाती घेतले. या योजनेतून पुण्यात सुमारे ४ हजार कोटींची विकास कामे झाली. सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेऊन जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर ‘ भारतीयांना दाखविले. या राजकारणात पुणे आणि महानगरे विकासकामांपासून वंचित राहिली. ही बाब संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.

स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात अकराशे कोटींचा खर्च झाला. यात भ्रष्टाचारच झालेला आहे. ४५ प्रकल्प पूर्ण झाले, असा दावा सरकारकडून केला जातो. त्याचा हिशेब आणि तपशील केंद्र सरकारने द्यावा आणि पुणेकरांसमोर वस्तूस्थिती मांडावी. जनतेनेही सरकारला जाब विचारावा, स्मार्ट सिटी योजनेबाबत मोदी सरकार दिशाभूल करीत आहे, याकडे काँग्रेसने सातत्याने लक्ष वेधले होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांवर कारवाई करा -परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

पुणे- सुट्टीच्या काळात प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस मालकांच्या वर कडक कारवाई करा असे आदेश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी RTO आणि पोलीस या दोहोंना दिले आहेत .

या संदर्भात भाजपा प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी सांगितले कि,’दिनांक 1 एप्रिल रोजी खासगी बस ने प्रवासासाठी ऑनलाईन वेबसाईट ची तपासणी केली असता आजचे दर आणि मे महिन्यातील सुट्टीतील दर यात मोठी तफावत असल्याचे दिसून आले. ह्या अन्यायाविरुद्ध आणि ग्राहकांच्या लुटी विरुद्ध कारवाई करण्याबाबतचे पत्र सप्रमाण परिवहन राज्यमंत्री ना. माधुरी मिसाळ यांना सादर केले.त्यांचे स्वीय सहाय्यक मंदार रांजेकर यांनी अत्यन्त सौजन्याने संवाद साधून नेमका प्रश्न समजून घेतला. त्यानंतर मंत्री महोदयांचे ओ एस डी संजय शिंदे यांनी तत्परतेने हालचाल करून ना. माधुरी मिसाळ यांच्याशी चर्चा करून परिवहन आयुक्तांना प्रवाश्यांची लूट करणाऱ्या खासगी बस चालकांवर कारवाई चे निर्देश दिले.माधुरीताईंच्या कार्यालयातील लिपिक उत्तम आव्हाड यांनी ते पत्र मला प्रेषित केले. गतिमान प्रशासनाचे हे उत्तम उदाहरण असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील टीम किती संवेदनशीलतेने सर्व प्रश्न हाताळते हे ह्यावरून दिसून येते.
आता प्रत्यक्ष कारवाई ची प्रतीक्षा असून ह्या कार्यतत्परते बद्दल माधुरी मिसाळ यांचे अभिनंदन व आभार.
खर्डेकर म्हणाले कि,’ उन्हाळ्याची सुट्टी असो व सणासुदीची, ह्या काळात नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मूळ गावी जाणे असो नातेवाईकांना भेटण्यासाठीचा प्रवास असो अथवा सहलीला जाण्याचे नियोजन करतात अशा वेळी रेल्वे, राज्य परिवहन अश्या सर्वच ठिकाणी बुकिंग फुल्ल असते. अश्या वेळी बहुतांश नागरिक प्रवासासाठी खासगी बस चा वापर करतात.त्या काळात दुप्पट टिप्पट दर आकारून ग्राहकांची लूट केली जाते.

रामनवमी निमित्त कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जनजागृती व स्वच्छता अभियान

पुणे-आज रामनवमीचे औचित्य साधून मुख्यमंत्री महोदय १०० दिवस ७ कलमी उपक्रमाच्या अनुषंगाने ,उप आयुक्त , परिमंडळ क्र. ४ व उप आयुक्त घनकचरा व्यवस्थापन विभाग पुणे महानगरपालिका यांचे मार्गदर्शनाखाली विक्रांत सिंह , ब्रँड अँबेसिडर , पुणे महानगरपालिका व VIIT कॉलेज – कोंढवा यांच्या माध्यमातून सकाळी ७ ते १० या वेळेत ऐतिहासिक पेशवे तलाव व परिसरात स्वच्छता अभियानाचे आयोजन कण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास २५० विद्यार्थी तसेच क्षेत्रिय कार्यालय कडील ४० अधिकारी / कर्मचारी यांचे मार्फत परिसर स्वच्छ करणेत आला. १ कॉम्पॅक्टर व २ छोटा हत्ती या वाहनामार्फत अंदाजे २ टन १५० किलो कचरा गोळा करण्यात आला.
स्वच्छता अभियान दरम्यान नागरिकांमध्ये उघड्यावर्ती कचरा न टाकने , सिंगल use प्लास्टिक वापर न करणे , सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये इत्यादी बाबत विक्रांत सिंह व राजू दुल्लम यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सहाय केले
सदर स्वच्छता मोहिमेदरम्यान महापालिका सहाय्यक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी स्वच्छतेबाबत माहिती देवून या वर्षी संपूर्ण देशात अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करणेत येत असून त्याबाबत मार्गदर्शन करुन संविधान उद्देशिकाचे वाचन करणेत आले. सदर अभियाना दरम्यान कोंढवा येवलेवाडी कार्यालयातील प्रशासन अधिकारी सुनिल मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्लम व अधिकारीकर्मचारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.