पुणे – विद्यमान आमदार गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा भाजपतर्फे, तर रोहित टिळक यांनी कॉंग्रेसतर्फे कसबा विधानसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बापट म्हणाले , मी धंदेवाईक नाही पूर्णवेळ स्वयंसेवक आहे तर टिळक म्हणाले , कोणाशी लढत देण्यासाठी मी उभा नाही , मी मतदारांचे हक्क मिळवून देणे नागरी समस्या सोडविणे यासाठी लढतो आहे
कसबा गणपती मंदिरापासून पदयात्रा काढून आज सकाळी बापट यांनी अर्ज दाखल केला. त्या वेळी त्यांच्या सोबत गिरिजा बापट, नगरसेवक अशोक येनपुरे, किरण सरदेशपांडे, राजेंद्र येनपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. तर टिळक यांनी केसरीवाडा येथे श्रीगणेशाची आरती करून आणि मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांसह जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला. त्या वेळी नगरसेवक मिलिंद काची, माजी नगरसेवक श्याम मानकर, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, सुधीर काळे, उल्हास भट उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी बापट आणि टिळक एकाचवेळी आल्याने त्यांनी एकमेकांना भेटून शुभेच्छा दिल्या.
बापट म्हणाले, “”युतीच्या माध्यमातून गेली वीस वर्षे मी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. महायुती तुटल्यामुळे मी दु:खी झालो आहे. मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. अद्यापही मतदारसंघातील काही प्रश्न प्रलंबित आहेत. मी धंदेवाईक नसून पूर्णवेळ स्वयंसेवक आहे. माझी लढत सर्वांबरोबरच आहे. जनता सुज्ञ आहे. मी कोणत्याही उमेदवारावर वैयक्तिक टीका करणार नाही. जनताच योग्य काय तो निर्णय घेईल.‘‘
तर टिळक म्हणाले, “”गेल्या वेळेस जनतेचा विश्वास संपादन करण्यात मी कमी पडलो. परंतु गेल्या पाच वर्षांत मी मतदारसंघात काम करीत आहे. राज्यात आघाडी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकोपयोगी कामे केली आहेत. त्यांच्या बळावर मी निवडणूक लढवीत आहे. माझी लढत ही कोणाशी नसून, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी उभा आहे. मतदार योग्य तोच निर्णय घेतील, असा विश्वास मला आहे.‘‘
मी धंदेवाईक नाही तर पूर्णवेळ स्वयंसेवक- बापट ; कोणाशी लढत नाही,मतदारांच्या हक्कासाठी लढतो – टिळक
५ वर्षात केलेल्या कामाचा अहवाल लोकांपुढे ठेवणे माझे कर्तव्य- वळसे पाटील
दिलीप वळसे पाटील यांनी प्रकाशित केलेल्या विकासपर्व या पुस्तिकेवर टीका करताना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले होते, की राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवत असल्याप्रमाणे हा अहवाल छापला आहे. याला प्रत्युत्तर देताना वळसे पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे विधानसभेचा अध्यक्ष असलो, तरी माझी पहिली जबाबदारी आपल्या मतदारसंघाची होती. त्याचा एकूण गोषवारा लोकांपुढे ठेवणे, हे माझे कर्तव्य आहे. त्यामागे माझी भावना अत्यंत विनम्रपणाची आहे. ज्यांनी मला विश्वासाने व प्रेमाने पाच वेळेस निवडून दिले, त्यांचा विश्वास खरा ठरला की नाही हे जाणण्याचा त्यांना हक्क आहे. त्यामुळे केवळ कर्तव्य भावनेमधून आणि आपल्या भागात काय झाले आहे, काय होणार आहे, हे लोकांना कळण्यासाठीच अहवाल दिला आहे, असे पाटील म्हणाले.
मी नेहमी कामाच्या आधारे जनतेचा कौल मागितला. या पाच वर्षांत अनेक योजना यशस्वी केल्या. शेती, शिक्षण, आरोग्य आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये केलेल्या कामातून मतदारसंघाचे रूप कसे पालटले आहे, हे दाखविणे हा प्रयत्न विकासपर्व प्रसिद्ध करण्यामागील आहे. जनतेच्या प्रेमाचा उतराई होण्यासाठीच कामाचा अहवाल प्रसिद्ध केला असल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
त्यामागची भावना ज्यांना समजलेली नाही ते राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ जोडून खिजवत आहेत. यातून ते मतदारांबद्दल अनादर व्यक्त करून राष्ट्रपती पदाचीही अप्रतिष्ठा करत आहेत. ते पुढे म्हणाले, की वास्तविक ही कामे आंबेगाव-शिरूर मतदारसंघातील लोकांच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहेत. त्यांची केवळ आठवण व्हावी, म्हणून अहवाल सादर केला आहे
भाजपच्या 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
पुणे- आज भाजपनं 172 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या मध्ये पर्वती – माधुरी मिसाळ , हडपसर -योगेश टिळेकर , पुणे लष्कर – दिलीप कांबळे , खडकवासला – भीमराव तापकीर , कोथरूड – मेधा कुलकर्णी , वडगावशेरी -जगदीश मुळीक , पिंपरी– अमर साबळे , चिंचवड -लक्ष्मण जगताप , मावळ- संजय भेगडे , पुरंदर- संगीताराजे निंबाळकर , बारामती- बाळासाहेब गावडे , शिरूर बाबुराव पाचारणे देण्यात आली आहे या यादीत बबनराव पाचपुते(श्रीगोंदा) , लक्ष्मण जगताप(चिंचवड ) , राम कदम(घाटकोपर -वेस्ट ) या नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचाही समावेश आहे दरम्यान आज आ , गिरीश बापट यांनी आहे कि , आज दिनांक २६ सप्टेंबर रोजी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या श्री कसबा गणपती चे आशीर्वाद घेऊन मी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील सर्व नागरिकांचे प्रेम आणि आशीर्वाद मला नेहमीच मिळत आला आहे. हे प्रेम असेच मिळत राहणार याबद्दल मला विश्वास आहे.कसबा मतदारसंघातील नागरिकांनी दाखवलेल्या विश्वासास याही वेळी मी पात्र ठरेन याबद्दल मला अजिबात शंका नाही.
पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादीचे सुभाष जगताप, काँग्रेसचे अभय छाजेड, अपक्ष सचिन तावरे आणि बहुजन समाज पक्षाचे राम पालखे, शिवलाल भोसले यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.
त्यातील मिसाळ व पालखे यांनी अर्जासोबत पक्षाचा एबी फॉर्म जोडला असून, इतर उमेदवारांनी अजून एबी फॉर्म जोडलेले नाहीत. आजपर्यंत ८ उमेदवारांनी १७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यातील बहुतेक सर्वांनी एक अपक्ष व एक पक्षाचा असे दोन अर्ज दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती कदम यांनी दिली.
अँड़ रमेश धर्मावत व आबा वाघमारे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत. शुक्रवारपर्यंत एकूण ७७ अर्ज नेण्यात आले आहेत.
,
उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे – बाळा नांदगावकर
ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री व्हावा अशी माझी प्रामाणिक इछ्या आहे .असे झाले तर मला आनंदच होईल उद्धव आणि राज यांनी एकत्र यावे हि माझी आणि कार्यकर्त्यांची हि भूमिका आहेच. दोघे भावू समंजस आहेत अशी प्रतिक्रिया म न से आमदार बाळा नांदगावकर यांनी दिल्याने आता खळबळ उडाली आहे
दोघे भावू संपर्कात आहेत पण राजकारणाबद्दल तेच आपसात निर्णय घेतील मी सुरुवातीपासून ठाकरे घराण्याशी प्रामाणिक आणि निष्ठेने राहिलो आहे आणि राहील अगदी कोणी मला मुख्यमंत्रीपद दिले तरी मी ठाकरे घराण्यालाच प्राधान्य देईल मी ते पद स्वीकारणार नाही उद्धव आणि राज दोघे आमचे दोन डोळे आहेत असेही बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे
उद्धवराज महाराष्ट्रात येणार काय ? बाळासाहेबांचे स्वप्न साकार होणार काय ?
मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद केवळ ठाकरे बंधूंमध्ये असून हे बंधू एकत्र येवून त्यांनी महाराष्ट्र ढवळून काढला तर तमाम मराठी माणूस एकत्र येवू शकतो आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकू शकतो असा विश्वास सेना -मनसे च्या अनेक कार्यकर्त्यांना असून गेल्या १८ सप्टेंबरलाच अमित शहा यांनी मांडलेली वेगळी चूल लक्षात घेवून या अनुषंगाने अनेक मान्यवरांनी आपापले विचार प्रवाहित करण्याचा प्रयत्न केला होता . उद्धव आणि राज यांनी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत आपापला योग्य सहभाग नोंदवून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करावे अशी हि मागणी काहीजणांनी केली आहे , युती आणि आघाडीचा घटस्फोट झाल्यानंतर राज्यात लगेचच या नुसार नव्या गणितांची जुळवाजुळव सुरू झाली असून शिवसेना आणि मनसेचे नेते एकमेकांच्या संपर्कात असल्याची जोरदार हवा राजकीय वर्तुळात पसरली आहे. योगायोग म्हणजे गेल्या आठवडाभरात आजारपणाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात दोन वेळा फोनवरून बोलणंही झाल्याचं सांगण्यात येत आहे. राज आणि उद्धव यांची युती होणार की नाही याचं उत्तर येणारा काळचं देईल पण या दोघांमध्ये नव्याने संवाद सुरू झाल्याची मात्र पक्की बातमी मिळाली आहे.उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची मुंबई वगळता राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. मोजक्या लोकांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. तर, मनसेने बहुतेक उमेदवारांचे एबी फॉर्म वाटप थांबवले आहे. राज यांनी काल सायंकाळीच 153 जागांवर उमेदवार जाहीर केले. मनसे आज किमान 50-60 जागांवर उमेदवार जाहीर करणार होते मात्र ही यादी थांबविण्यात आल्याचे कळते आहे.उद्धव ठाकरे मातोश्रीवर शिवसेनेच्या उमेदवारांची नावे निश्चित करीत आहेत. तसेच राज यांच्याशी वारंवार संपर्कात आहेत. त्यामुळे आज रात्रीपर्यंत या दोघांत काही चर्चा होऊ शकते. कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ 24 तास शिल्लक आहेत. दुसरीकडे, सेना-मनसेत निवडणूकपूर्व युती होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, निवडणुकीच्या काळात ते एकमेंकांच्या उमेदवारांना सहकार्य करू शकतात. तसेच निवडणुकीनंतरही ते एकत्र येऊ शकतात. अशी हि शक्यता आहे
नाते संबंधावरील गणितावर भाष्य करणारा ”सिद्धांत”
सिनेमा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून त्यातून सामाजिक संदेश समाजातील लोकांपर्यंत पोहचवून सकारात्मक बदल घडवून आणण्याचा अतिशय उत्तम प्रयत्न मराठीतील एक सिनेनिर्मिती संस्था करत असून त्यांच्या या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांची ही तेवढीच वाहवा मिळत आहे. आजवर शाळा, अनुमती, फॅन्ड्री अशा एकाहून एक सरस कलाकृतीतून तयार करून केवळ मनोरंजनात्मक नव्हे तर सामाजिक संदेश दिणारी सिनेनिर्मिती संस्था म्हणजे ‘नवलखा आर्ट्स आणि होली बेसिल’.
नवलखा आर्ट्स आणि होली बेसिलच्या निलेश नवलखा आणि विवेक कजारिया यांच्यासोबत अमित अहिरराव यांनी ‘सिद्धांत’ या आगामी सिनेमाची निर्मिती केली असून ‘सिद्धांत’ सिनेमाची निवड मानाच्या समजल्या जाणाऱ्या १६व्या ‘मामी’ फिल्म फेस्टिवलच्या ‘इंडिया गोल्ड २०१४’ विभागात करण्यात आली आहे. येत्या १४ ऑक्टोबरपासून २१ ऑक्टोबर दरम्यान हा सोहळा रंगणार आहे.
गणित हा एक असा विषय आहे जो प्रत्येकाच्या पचनी पडत नाही. पण अभ्यासातील या गणिताचा आयुष्यातील नात्यांशी ही तेवढाच जवळचा संबंध आहे. नाती जमतात म्हणून गणित सुटतात, का गणित सुटतात म्हणून नाती जमतात, त्यामुळेच गणित हा विषय जरी आवडत नसला तरी आयुष्यातील नाती टिकविण्यासाठी गणिता सारख्या पद्धातीशी मैत्री करण्याशिवाय काही पर्याय नाही. एकंदरीतच नाते संबंधातील गणितावर भाष्य करणारा असा ‘सिद्धांत’ सिनेमा असून सिनेमाचे दिग्दर्शन विवेक वाघ यांनी केले आहे. सिने दिग्दर्शनातील त्यांचे हे पहिलेच पाऊल असून ‘शाळा’ सिनेमाची निर्मिती तसेच आजवर अनेक सिनेमांसाठी क्रिएटीव्ह हेड म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
‘सिद्धांत’ सिनेमात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, गणेश यादव, किशोर कदम, स्वाती चिटणीस, नेहा महाजन, सारंग साठे, माधवी सोमण आणि बालकलाकार अर्चित देवाधर अशी या सिनेमाची स्टारकास्ट असून यांचा उत्तम अभिनय आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेखर ढवळीकर यांनी या सिनेमासाठी पटकथा- संवाद लिहिले असून सिनेमातील गाणी सौमित्र अर्थात किशोर कदम यांनी लिहिली आहेत. संगीतकार शैलेंद्र बर्वे यांनी या सिनेमाला संगीत दिले असून नुकतेच सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमातील एक गीत रेकॉर्ड करण्यात आले आहे.
नुकत्याच सोशल साईट्सवर पोस्ट करण्यात आलेल्या ‘सिद्धांत’ सिनेमाच्या पोस्टरने मनोरंजन क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली असून रसिक प्रेक्षकांचाही त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
झी मराठीवर वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयरमध्ये ‘टाइमपास’

रविवार या शब्दातच एका अर्थाने टाइमपास हा शब्द दडलेला असतो. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत रविवार म्हणजे हक्काची सुट्टी आणि टाइमपास करण्यासाठीचा हक्काचा दिवस. प्रत्येक रविवार हा तसा खासच असतो पण २८ सप्टेंबरचा रविवार हा जरा जास्तच स्पेशल असणार आहे कारण या दिवशी साजरा होणार आहे “वर्ल्ड टाइमपास डे” ज्यासाठी निमित्त असणार आहे यावर्षीचा ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट “टाइमपास”. यावर्षी बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालत यशाचे सर्व विक्रम मोडणारा आणि नवे विक्रम रचणारा “टाइमपास” हा चित्रपट येत्या २८ सप्टेंबरला रविवारी रात्री ७ वा. झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
“आई बाबा आणि साई बाबाची शप्पथ”… “चला हवा येऊ द्या”… “नया है वह” सारखे तुफान धमाल संवाद, “मला वेड लागले प्रेमाचे”, “दाटले रेशमी धुके” सारखी रोमॅंटीक गाणी, दगडु-प्राजक्ताची इनोसंट लव्ह स्टोरी , प्राजुच्या वडील लेलेंचा त्याला विरोध, त्यातून येणारी जुदाई , प्रेमाची परिक्षा असा सगळा मसाला या चित्रपटात होता. टाइमपास म्हणून सुरू झालेल्या प्रेमात दगडू सिरीयस होतो आणि त्यातून मिळणा-या आनंदाची आणि दुखःचीही कथा म्हणजे टाइमपास हा चित्रपट. वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाल उडवली होती. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण या चित्रपटाचे फॅन बनले होते. चित्रपटाचे संवाद, गाणी सोशल नेटवर्क साइट्सवरून मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. यात दगडूची भूमिका प्रथमेश परबने तर प्राजक्ताची भूमिका केतकी माटेगावकरने साकारली होती. याशिवाय वैभव मांगले, भाऊ कदम, भूषण प्रधान, उर्मिला कानेटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक पालक’ सारखे सुपरहीट चित्रपट देणा-या रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.
झी मराठीवरून या चित्रपटाचा आता वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला होता तेंव्हा अनेकांनी चित्रपटगृहांत जाऊन तो बघितला होता. याशिवाय हा चित्रपट अनेकवेळा बघणा-या प्रेक्षकांची संख्याही खूप जास्त होती. ज्यांनी तेव्हा बघितला त्यांना अजून एकदा आनंद देण्यासाठी आणि ज्यांना त्यावेळी बघता नाही आला अशा प्रेक्षकांसाठी ही खास मेजवानी असणार आहे. झी मराठीचे प्रेक्षक केवळ राज्यातच नव्हे तर देशात आणि परदेशातही आहेत. अशा सर्व मराठी प्रेक्षकांसाठी टाइमपासचा टीव्ही प्रिमीयर हा खास नजराणा ठरणार आहे. येत्या २८ सप्टेंबरला सायंकाळी ७ वा. टाइमपासचा हा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमीयर झी मराठीवरून प्रसारीत होणार आहे.
ॐ कारांनी दुमदुमली पुण्यनगरी

अथर्वशिर्ष व श्रीसुक्ताचे पवित्र शब्द १२३ शाळेतील १३,००० चिमुकल्यां च्या मुखी
· पुण्यातील सारसबागेसमोरील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रसच्या महालक्ष्मी मंदिरा तर्फे १२३ शाळेतील १३,००० विद्यार्थ्यांसाठी अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमास अभिनेत्री सोनाली कुलकर्णी , शोभा धारिवाल, खासदार अनिल शिरोळे , प्रताप परदेशी,उपस्थित होते.
यावेळी खासदार अनिल शिरोळे म्हणाले “मला अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठणाच्या मंगलमय कार्यक्रमाला उपस्थित राहता आले त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि अथर्वशिर्ष व श्रीसुक्त पठण याचे आपल्या सर्वांच्या आयुष्यात फार महत्वाचे स्थान आहे आणि याच्या पठणामुळे विद्यार्थ्यांचे चांगले भविष्य घडण्यास मदत होते.”
१३,००० विद्यार्थ्यांनी केलेल्या पवित्र स्तोत्र पठणांनी पुण्यनगरी अधिकच पावन झाली व भक्ती रसात न्हाऊन निघाली.उत्सवाचे पावित्र्य लक्षात घेऊन प्रार्थनेतून भक्ती देवीपर्यंत पोहचविण्याच्या मुख्य उद्देशाने हा धार्मिक कार्यक्रम राबविण्यात आला होता. उद्याचे भवितव्य असणार्या या विद्यार्थांना धार्मिक कार्यक्रमात तल्लीन झालेले पाहून उपस्थितांनाही अभिमान वाटला.
श्री गणेश व महालक्ष्मी हे बुद्धी व वैभवाचे दैवत आहेत. असीम बुद्धीमत्ता व वैभव हवे असणार्यानी यांची आराधना करणे अनिवार्य आहे. आज मुलांनी केलेली आराधना भविष्यात नक्कीच त्यांना काहीतरी गोड फळ देईल हे निश्चित. असेही ते म्हणाले
शिवसेनेची पहिली यादी जाहीर
शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर झाली आहे. शिवसेनेने माजी महापौर सुनील प्रभु यांच्यासह विद्यमान चार आमदारांना पुन्हा संधी दिली आहे.
शिवसेनेचे उमेदवार-
शिवडी – अजय चौधरी
माहिम – सदा सरवणकर
अंधेरी (पूर्व) – रमेश लटके
अंधेरी (पश्चिम) – जयवंत परब
वरळी – सुनील शिंदे
दिंडोशी – सुनिल प्रभु
कांदिवली पूर्व – अमोल कीर्तिकर
गोरेगाव – सुभाष देसाई
वांद्रे पूर्व – बाळा सावंत
जोगेश्वरी – रवींद्र वायकर
दहिसर – विनोद घोसाळकर
धारावी – बाबुराव माने
विलेपार्ले – शशिकांत पाटकर
कल्याण (प.) – विजय साळवी
‘जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…राज ठाकरे

महाराष्ट्रातील तरुणांना दर्जेदाज शिक्षण मिळायला हवे, पोलिस भरतीत नोकरीसाठी येणाऱ्या लाखो तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी खासगी सिक्युरिटी कंपन्या बंद करून राज्य सरकारनेच सिक्युरिटी कंपनी काढायला हवी, बिल्डरांचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी एसआरए योजना सरकारनेच राबवली पाहिजे, गुन्हेगारी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व वाहनांना डिजिटल नंबरप्लेट लावल्या पाहिजेत, मराठी संस्कृतीची १०० मंदिरे उभारली पाहिजेत, गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महामंडळ, तरुणांना रोजगार मिळावे यासाठी रोजगार कार्ड आदी असलेली म न से ची ब्ल्यू प्रिंट राज ठाकरे यांनी सादर केली महाराष्ट्र स्वायत्त करण्याचा, महिलांच्या नावावर घरांची नोंदणी केल्यास करात माफी देण्याचा अशा अनेक विषयांचा समावेश या ब्ल्यू प्रिंट मध्ये आहे
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवूया…हो, हे शक्य आहे’, अशी ‘कॅचलाइन’ घेऊन मनसेने महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून सुमारे दोन ते अडीच तास या ब्ल्यू प्रिंटचे षण्मुखानंद सभागृहात राज ठाकरे यांनी सादरीकरण केले. गेली नऊ वर्षे यासंदर्भात अभ्यास सुरू होता, या आराखड्याची वेबसाइट तयार करण्यात आली असून सुमारे तीन ते साडेतीन लाख शब्दांचा मजूकर त्यावर आहे, अशी माहिती राज यांनी यावेळी दिली.
सायकल रैली वर प्रचार करीत निम्हण यांचा अर्ज दाखल
घटस्थापनेच्या दिवशीच सायकल चालवा, पर्यावरण वाचवा, देश वाचवा व लेक वाचवा चा संदेश देत आ. विनायक निम्हण यांनी पूर्ण मतदार संघात सायकलवऱ फिरून उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे आमदार विनायक निम्हण यांच्या कुटुंबीयांकडे २१ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता असून पन्नासहून अधिक ठिकाणी निम्हण यांच्याकडे १०० हेक्टरपेक्षा अधिक जमीन आहे. उमेदवारी अर्ज भरताना निम्हण यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे
आमदार निम्हण यांच्या नावावर सोळा कोटी रुपयांची मालमत्ता असून यामध्ये २ लाख ३५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. तर, निम्हण यांच्या पत्नी स्वाती यांच्याकडे ५ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये ३ लाख ८५ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. निम्हण कुटुंबीयांकडे ७१ लाख ५८ हजार रुपयांचे सोन्या चांदीच्या वस्तू, दागदागिने आहेत. यामध्ये हिऱ्याचे आणि सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. शहर आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक ठिकाणी निम्हण कुटुंबीयांकडे १०० हेक्टरहून अधिक जमीन असल्याचे निम्हण यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
१६ मोटारी –
आमदार विनायक निम्हण यांच्याकडे सोळा चारचाकी गाड्या असून यासर्वांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. निम्हण यांच्याकडे ७ हायवा, दोन आयशर, आय १०, टोरँग, डस्टर, होंडा ब्रायो, यासह टाटा टेम्पो आणि एक मर्शिडीज बेंन्स यांचा समावेश आहे. इतक्या गाड्या असतानाही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मात्र निम्हण यांनी सायकल रॅली काढून अर्ज भरणे पसंत केले.
श्री जगद्गुरू शंकराचार्य- विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना आणि सरकारी वकीलउज्ज्वल निकम यांच्या हस्ते पूजा संपन्न
दिव्यशक्ती असणारया दुर्गा देवीचे स्वागत आणि पुजा या गोष्टींनी विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते नवरात्रीच्या महोत्सवाला सुरवात झाली. २५ सप्टेंबर २०१४ ला विविध रंगांची उधळण, दिव्यांची सजावट, प्रवचन या सर्व गोष्टींनी युक्त अशा मंगलमय वातावरणाने सारसबागेजवळील बन्सीलाल रामनाथ अग्रवाल ट्रस्टचे महालक्ष्मी मंदिर उजळुन निघाले. हजारोंच्या संख्येने भक्त देवीची, सरस्वतीची,महालक्ष्मीची, कालीची पुजा मनोभावाने, प्रेमाने करण्यासाठी एकत्रित आले होते. पार्वतीची पुजा या उत्सवाचा महत्वाचा भाग मानतात, तसेच माता शैलापुरी उजव्या हातात त्रिशुळ धारण आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैलावर विराजमान असते या देवीची पुजा करणे आणि हा उत्सव साजरा करणे हा प्रत्येक भक्ताला खुप मोठा आनंदाचा क्षण होता .
श्री. जगद्गुरू शंकराचार्य- श्री. विद्यानृसिंह भारती, करवीर पीठ, कोल्हापूर यांच्या उपस्थित घटस्थापनेचा विधी करण्यात आला. ते म्हणाले, ‘आपल्या आयुष्यात देवी सरस्वती, महालक्ष्मी आणि काली यांना खूप महत्त्व आहे. घटस्थापनेचा विधी करावयास मिळणे हा मी माझा सन्मान समजतो. पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि धार्मिक मंदिराची स्थापना केल्याबद्दल मी विश्वकर्मा कुटुंबाचा आभारी आहे.’
संध्याकाळची आरती सरकारी वकील श्री. उज्ज्वल निकम आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली.श्री. उज्ज्वल निकम म्हणाले, ‘या भक्तीपूर्ण उत्सवात सहभागी होताना मला फार आनंद होत आहे. यादेवळात तीन आदिशक्तींचा वास असून त्या तुम्हाला शांती आणि समृद्धी देतील.’
मंदिराच्या सर्व कर्मचारयानी अविरत घेतलेल्या कष्टामुळे मंदिरामध्ये चैतन्यमय वातावरण होते. तसेच मंदिरात येणारया सर्व भक्तांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी या मंदिराच्या सर्व कर्मचारयानी रात्रंदिवस मेहनत घेतली. या मंदिरात सर्व पंथाचे, जाती धर्माचे, भक्त एकत्रित आले त्यामुळे या मंदिरात विविधतेत एकता दिसली.
२५ वर्षांच्या अहंकारी नेतृत्वाचा अस्त होणार – आढळराव पाटील

आंबेगाव-शिरुर मतदार संघामध्ये इतिहास घडणार आहे.पंचवीस वर्षांचे अहंकारी व हुकुमशाही नेतृत्वाचा अस्त आता होणार असून अरुण गिरेंच्या रूपाने अरूणोदय होत या मतदार संघावर भगवा फडकणार आहे असा ठाम विश्वास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मलठण (ता. शिरुर)येथे व्यक्त केला. शिवसेनेने ३९ गावातील तरुणांचा मेळावा आयोजीत केला होता.
या भागातील विकासाठी रावडेवडी येथे साखर कारखान्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र हा प्रस्ताव रद्द करायला लावला. लोकप्रतिनिधी न केलेल्या कामाचे श्रेय घेत आहेत. डिंभा धरणाचे काम लोकनेते किसनराव बाणखेले यांच्या कारकिर्दीत झाले. डिंभा धरण स्वत: बांधल्याच्या अविर्भावात सांगतात. या वेळी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे प्रचाराला माणसे नाही. त्यांचा प्रचार भीमाशंकरचे संचालक त्यातले ही काही आपलाच प्रचार करत आहे.
शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे म्हणाले की, लोकांना फार काळ फसवता येत नाही. त्यामुळे आता मतदार संघात बदलाचे वारे वाहत आहे. दुष्काळी भागातील जनतेला झुलवत ठेवले म्हणजे चार-पाच निवडणुका पाणी देतो, म्हणून सांगत जिंकता येतात ही त्यांची वृत्ती आहे.
सह-संपर्कप्रमुख अविनाश रहाणे, प्रा. राजाराम बाणखेले, उपजिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांनी आपले विचार मांडले. या वेळी उपजिल्हा प्रमुख संजय सातव पाटील, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, युवासेनेचे गणेश जामदार, बाळासाहेब वाघ, विक्रम पाचुंदकर, गुलाबराव धुमाळ, बबनराव पोकळे, किरण देशमुख, सोपानराव जाधव, राज गायकवाड, माउली घोडे आदी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
वळसे पाटील यांचा झंजावती प्रचार सुरु
घटस्थापनेच्या मुहूर्तावर वळसे पाटील यांनी घोडेगाव येथे आज सहाव्यांदा आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात झालेल्या सभेत ते बोलत होते.
यावेळी तुतारीची ललकारी, कार्यकर्त्यांच्या घोषणा, जोश भरणारी गाणी, टाळ्यांचा कडकडाट सर्वत्र फडकणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्वज आणि ओसंडून वाहणारी गर्दी अशा उत्सवी वातावरणात वळसे पाटील यांच्या यांच्या प्रचाराचा जोरदार आरंभ झाला
शिरूरचे आ. अशोक पवार, आ. जयदेव गायकवाड, जि. प. अध्यक्ष प्रदीप कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष जालिंदर कामठे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, आंबेगाव तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सचिन भोर, शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष व पराग मिल्क फुड्सचे चेअरमन देवेंद्रशेठ शहा, खेडचे माजी आ. अँड़ रामभाऊ कांडगे, शिरूरचे माजी आ. पोपटराव गावडे, आंबेगाव तालुका काँग्रेस अध्यक्ष कौस्तुभ गुजर, सूर्यकांत थोरात, गंगूताई वाघ, विष्णूकाका हिंगे, बाळासाहेब घुले, प्रमोद वळसे पाटील, विवेक वळसे पाटील, शंकरराव ढोबळे, पुंडलिकदादा थोरात, सुदाम खिलारे तसेच वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे हे उपस्थित होते. आई-वडिलांनी मला जेवढे प्रेम दिले तेवढेच आंबेगाव तालुक्यातील सर्वच समाजाच्या लोकांनी दिले. उत्तर पुणे जिल्ह्यात झालेली सर्व विकासकामे तुमच्या समोर आहेत. त्या जोरावर मी आणखी एक संधी मागत असल्याचे आवाहन वळसे पाटील यांनी यावेळी केले. तत्पूर्वी, वळसे पाटील यांनी निरगुडसर, अवसरी खुर्द व अवसरी बुद्रुक या भागांचा दौरा केला व भैरवनाथ मंदिरात नारळ फोडला . वळसे पाटील म्हणाले, आजपर्यंत लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणुका लढविल्या. मात्र, त्या प्रत्येकवेळी मी केवळ विकासावर भर दिला. छोट्यातील छोट्या माणसाला मोठे करण्याची ताकद शरद पवार यांच्या विचारात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या मी स्वत:, अजित पवार व सुनील तटकरे या मंत्र्यांनी काम केल्यामुळे आज राज्य भारनियमनमुक्त झाले आहे. खुद्द भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय वीजमंत्री पियूष गोयल यांनी या कामाचे कौतुक करून अन्य राज्यांना या कामापासून धडा घेण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रवादी ने हि सोडली काँग्रेस ची साथ
शिवसेना-भाजपची 25 वर्षे जुनी युती संपुष्टात आल्यानंतर अर्ध्या तासामध्येच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची 15 वर्षे जुनी आघाडीही तुटली. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ला पटेल यांनीच पत्रकार माहिती दिली यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील चारही प्रमुख पक्ष आणि म न से नेही १५३ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने हे पाचही पक्ष स्वबळावर विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आज गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली . यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, “गेली १५ वर्षे राज्यामध्ये राष्ट्रवादीचे सर्व आमदार, मंत्री यांनी कॉंग्रेसला साथ देण्याचा निर्णय घेतला. २००४मध्ये कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार जास्त होते. तरीही राष्ट्रवादीने सौम्य भूमिका स्वीकारली. यंदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दीड-दोन महिन्यांपूर्वी शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट झाली. त्यावेळी आघाडी करू इच्छितो आणि जागावाटपाची चर्चा लवकर झाली पाहिजे, असे सांगितले. सोनिया गांधी यांनी त्यास अनुकुलता दर्शविली होती. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीची भूमिका मांडली. २००९ मध्ये लोकसभेचे खासदार जास्त असल्याने विधानसभामध्ये कमी जागा देण्याची भूमिका कॉंग्रेसने घेतली. २००४मधील फॉर्म्युला कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसपेक्षा दुप्पट जागा निवडून आल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्येही राष्ट्रवादीचेच सर्वाधिक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडून आले आहेत. ही ताकद लक्षात घेऊन निम्म्या जागा देण्याची मागणी केली होती. हे जागावाटप लवकरात लवकर झाले पाहिजे, अशी मागणी आम्ही करत होतो. कधी ना कधी हा पेच सुटेल, अशी आशा होती.. १५ वर्षे सातत्याने तुमच्याकडे मुख्यमंत्रीपद राहिले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा प्रस्ताव मांडला. पण दिल्लीवरून किंवा राज्यातूनही चर्चा झाली नाही.




