महात्मा फुले पुण्यतिथीनिमित भारतीय जनता पार्टी ओ. बी. सी. आघाडीच्यावतीने समता भूमीमधील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर भाजप कार्यकर्त्यांनी पणत्या प्रज्वलित करून अभिवादन केले. यावेळी भारतीय जनता पार्टी ओ. बी. सी. आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष माजी नगरसेवक मनीष साळुंके यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले . भाजप युवा मोर्चा पुणे शहर अध्यक्ष गणेश घोष , विनायक साका , संजय राउत , सनी पवार , संजय व्हावळ , राजू झारखंडे , योगेश व्हावळ , दिनेश नायकू , बालम परदेशी , दीपक शिंदे , माजी नगरसेवक बाळासाहेब किरवे , संदीप जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते .
सरकारमान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूलसाठी शासनाने अनुदान द्यावे-शिकाऊ परवाना देण्याचे अधिकार मोटार ड्रायव्हिंग स्कूलला देण्यात यावे- महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन
.
महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे भव्य राज्यव्यापी अधिवेशन बिबवेवाडी जवळील गंगा धाम जवळील राजयोग लान्स येथे नुकतेच संपन्न झाले . या अधिवेशनाचे उद्घाटन माजी महापौर दत्ता गायकवाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले . यावेळी आमदार पाशा पटेल , पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे , यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक डॉ. शरणकुमार लिंबाळे , निवृत्त समापदेशक मधुकर शेबंडे , नागपूर उच्च न्यायालयातील निष्णात कायदे तज्ञ व मोटार वाहन कायद्याचे तज्ञ अड . तुषार मंडलेकर आदी मान्यवर तसेच , राज्यभरातून मोटार ड्रायव्हिंग स्कूल संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
या अधिवेशनात केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायदा , राज्यातील ड्रायव्हिंग स्कूलच्या व्यवसायावर ऑनलाईन लायसन्समधील अडचणी आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली .
या अधिवेशनात शिकाऊ परवाना देण्याचे अधिकार मोटार ड्रायव्हिंग स्कूलला देण्यात यावे , आय. टी. डी. आर. आणि आर. डी. टी. सी. याला केंद्र सरकार ज्या प्रमाणे अनुदान देते त्या प्रमाणे सरकार मान्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल अल्ट्रा मॉडेल ड्रायव्हिंग स्कूलला अनुदान देण्यात यावे , व अपग्रेडेशन दोन वर्षाचा कालावधी देण्यात यावा . देशामध्ये ३० टक्के मोटार अपघातात मृत्युमुखी पडतात . दुचाकी परवाना मोटार ड्रायव्हिंग स्कूलकडून प्रशिक्षन अनिवार्य करावे . आताचे राज्याचे मुख्यमंत्री मोटार पॉलिसी ठरविताना महाराष्ट्रातील सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलसाठी विचारात घेऊन पॉलिसी ठरवावीत . अल्ट्रा मॉडेल सुविधायुक्त मोटार ड्रायव्हिंग स्कूल करण्याची शासनाची खरीच मान्यता असेल तर मोटार ड्रायव्हिंग स्कूलला अनुदान द्यावे . मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या मागण्यासाठी केंद्र शासन , राज्य शासन , परिवहन कार्यालयाकडे यांच्याकडे पाठपुरावा करणार . जर मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर खोट्या केसेस दाखल केल्यातर महाराष्ट्र मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन त्यांना संरक्षण देणार . प्रत्येक मोटार ड्रायव्हिंग स्कूलसाठी वेगळा युझर आय डी पासवर्ड देण्यात यावा तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूलसाठी वेगळा कोटा देण्यात यावा .
या भव्य राज्यव्यापी अधिवेशनात मोटार वाहन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्कार मुंबई येथील समीर मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक शरदराव सातपुते , मुंबई येथील गाईड मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक इक्बाल कपाडिया , मुंबई येथील (पूर्वीचे )गाईड मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक जगदीश उपाध्याय , मुंबई येथील गाजमा मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक गनिभाई , पुणे येथील कुलकर्णी मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक बाबुराव कुलकर्णी , विनायक मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक कुंडलिक घाटोळे आदींचा जीवन गौरव पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले .
यावेळी रोड ट्रान्सपोर्ट बिल २०१४ चा नवीन प्रस्ताविक मोटार वाहन कायद्याच्या संदर्भात मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर होणाऱ्या संभाव्य अपघाताबाबत चर्चा करण्यात आली . राज्य अधिवेशनात सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली . यावेळी मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकांनी आपली मनोगते व्यक्त केली .
या भव्य राज्यव्यापी अधिवेशनात उपस्थितांचे स्वागत ज्ञानेश्वर वाघोले यांनी केले , प्रास्ताविक पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी केले तर सूत्रसंचालन यशवंत कुंभार यांनी केले .
‘साहित्य संमेलन हा रिकामटेकड्यांचा उद्योग’
पुणे – साहित्य संमेलन भरवणे हे रिकामटेकड्यांचा उद्योग आहे. साहित्य संमेलनांमधून केवळ चर्चा होत असून, पुढे काहीच होत नाही, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी आज (शुक्रवार) केली आहे. समता दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे नेमाडे यांना केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री उपेंद्र कुशवाह यांच्या हस्ते महात्मा फुले समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, “साहित्य संमेलन भरवणे हा केवळ रिकामटेकड्यांचा उद्योग झाला आहे. संमेलनासाठी राजकीय व्यक्तींकडून पैसा घेतला जातो, उद्या शत्रूकडूनही पैसा घेतला जाईल. संमेलनावर चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. शहाणपणाला मर्यादा असते, पण मूर्खपणाची काही हद्द नसते.‘ महात्मा फुले, शाहू-डॉ. आंबेडकर यांना सध्याच्या राजकारणात पडीक दिवस आले आहेत. राजकारणात असे दिवस येतात; परंतु खरे विचारवंत हे त्यांच्या पायाशी कायम असतात. त्यामुळे राजकारणविरहित महात्मा फुले यांच्या कार्याचा विचार झाला पाहिजे,‘ असे मत नेमाडे यांनी या वेळी व्यक्त केले.
‘नुसते पुतळे आणि तसबीरमध्ये महात्मा फुले यांना कोंडून ठेवणे योग्य नाही. ते सर्वांचे होते. त्यांनी सर्वाधिक काम हे ब्राह्मणांसाठी केले. ब्राह्मण समाजाने त्यांना आपले मानले तर त्यात गैर काय. नुसते नामस्मरण करणे योग्य नाही. नामस्मरण करण्यास फुले यांचाही विरोध होता. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन खेडोपाड्यात आणि तळागाळातील लोकांसाठी काम करण्याची गरज आहे. तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल,‘‘ असेही नेमाडे म्हणाले. दरम्यान, एका प्रश्नाला उत्तर देताना नेमाडे यांनी मातृभाषा नीट आलीच पाहिजे. एवढेच नव्हे, तर स्वप्नेदेखील मराठीच पडली पाहिजेत. आधी घरात मराठी ठीक करा. शेतकऱ्यांची मुले मुख्यमंत्री होतात; परंतु मराठीसाठी ते काय करतात. कर्नाटकात नाही चालत असे; मग महाराष्ट्रात मराठीपेक्षा इंग्रजीला महत्त्व का? इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करा, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुदळे यांनी, तर सूत्रसंचालन विजय लडकत यांनी केले. प्रीतेश गवळी यांनी आभार मानले.
अखेर पुष्कर जोग लग्नाच्या बेडीत
पुण्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नाव कमाविलेल्या प्राध्यापक सुहास जोग यांचा मुलगा अभिनेता पुष्कर जोग हा अखेर विवाह बध्द झाला . काल रात्री पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे पुष्करने लग्नाचे रिसेप्शन मोठ्या धुमधडाक्यात केले . पुष्करने जिच्याशी लग्न केले आहे ती जस्मिन हि एअर होस्टेस आहे . गुजरातमधील जयेश रावोजीभाई आणि गीता जयेश ब्रम्भार यांची हि कन्या – जस्मिन ची आणि तिची ओळख विमानातच झाली असे म्हणतात आणि बघा विमान प्रवास आता संसारीक प्रवास बनतो आहे . पुष्करचा भाऊ अमोल जोग हा वडिलांची जागा चालवितो आहे तो शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करतो आहे आणि वडिलांच्या इच्छेनुसार पुष्कर सिनेसृष्टीत वाटचाल करतो आहे . सौरभ गाडगीळ , सुधाकर जाधवर अशी व्यापार -उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील नामांकित मंडळी रिसेप्शन ला उपस्थित होती पुष्करने आपल्या लग्नाच्या रिसेप्शन ला सिनेसृष्टीतील सहकाऱ्यांना का बोलाविले नाही हे एक गूढच आहे .
अजय अतुल चे संगीत , महेश कोठारे यांचे दिग्दर्शन असलेला ‘जबरदस्त ‘ तसेच राजू , सत्य ,कांचन अधिकारींचा तुक्या तुकाविला, नाग्या नाचविला ,धूम २ धमाल , सासुच स्वयंवर ,अशा मराठी चित्रपटांबरोबर संजय दत्त बरोबर इ एम आय , इट्स टू मच , डोन्ट वरी बी ह्यापी , गुड्बडी गडबडी अशा हिंदी चित्रपटातून आणि संतोष कोल्हे दिग्दर्शित जल्लोष सुवर्ण युगाचा , तसेच नच बलिये , एकापेक्षा एक अशा टी व्ही शो मधून आपली कारकीर्द रेखाटलेला पुष्कर संसारिक जीवनात आणि फिल्मी जगतात यापुढे आपली कारकीर्द कशी उभी करतो याकडे मराठी रसिक आणि पुणेकरांचे लक्ष लागून राहील . पुष्कर आणि जस्मिन ला आमच्याकडून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेछ्या …
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यतिथीनिमित्त समताभूमी येथे अभिवादन
पुणे:
“राष्ट्रीय समाज पक्ष’ पुणे च्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी सकाळी ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपकबिडकर,बाळासाहेब कोकरे, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख डॉ. उज्ज्वला हाके, रा. स. प. पुणे शहराध्यक्ष देवेंद्र धायगुडे, संदीप चोपडे, स्वप्नील आडे, रोहीणी कसबे, विठ्ठल बोरकर इत्यादी उपस्थित होते.

पुणे-मुंबई हायवे अपघातग्रस्तांना महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल 108) चा मदतीचा हात
पुणे:
पुणे-मुंबई महामार्गावर रात्री नुकत्याच झालेल्या एस.टी. बसला झालेल्या अपघातानंतर “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या “डायल 108′ रूग्णवाहिकांनी जखमींवर उपचार करण्याचे काम केले.
घाटात दस्तुरीजवळ एस. टी. बस उलटल्यावर 15 प्रवाशांना जखमा झाल्या होत्या. एमईएमएसच्या “डायल 108’च्या 2 सुसज्ज रूग्णवाहिका ताबडतोब घटनास्थळी पोहोचल्या. खंडाळा प्राथमिक आरोग्य केंद्र रूग्णालय व कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रूग्णवाहिकांनी मदतकार्याच्या घटनास्थळी पोहोचून जखमींसाठी उपचार मदतकार्य तातडीने सुरू केले. रूग्णवाहिकांनी 7 जखमी रूग्णांवर प्राथमिक उपचार करून नजिकच्या रूग्णालयात दाखल केले.
“26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी 108 या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. 108 डायल वातानुकुलित विनामूल्य सेवा रूग्णवाहिकांमध्ये प्राण वाचविण्यासाठी व्हेंटीलेटरसहित सर्व अत्याधुनिक वैद्यकीय साधने आहेत. या सेवेचे मुख्य संचालन केंद्र व “रिस्पॉन्स सेंटर’ औंध उरो रुग्णालय (पुणे) येथे आहे. दुर्घटनास्थळी बचाव कार्य पुर्ण होईपर्यंत रूग्णवाहिका 24 तास कार्यरत राहतील’ असे “बी.व्ही.जी. इंडिया’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड यांनी सांगितले.
महाराष्ट्रात राजदंड प्राप्त प्रथम स्त्री संन्यासिनी सद्गुरु श्री वेणाभारती महाराज यांचा श्री क्षेत्र काशी येथे सन्मान चिन्ह व सन्मान पदवी देऊन सत्कार
काशी विद्वत परिषदेच्या इतिहासातील पहिलीच घटना

पुणे- महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आणि भारतभर गावात-शहरात गेली अनेक वर्षे आध्यात्मिक विचारांचे आणि भक्तीधर्मांचे प्रसार कार्य करणार्या सद्गुरु श्री वेणाभारती महाराज यांचा काशी येथे काशीपेठाचे शंकराचार्य जगद्गुरु स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांच्या संमंतीने सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
ज्योतिर्पीठ, द्वारिकापीठ आणि शारदापीठाचे शंकराचार्य यांच्यावतीने दीक्षित स्वामी श्रीअक्षय्यानंद महाराज यांच्या दिव्य हस्ते तसेच संस्कृत विद्वान श्रीमान वसिष्ठ त्रिपाठी, महंत श्रीमंडलाचार्य डॉ. अनिकेत शास्त्री-देशपांडे आणि काशीचे विद्वत परिषदेचे समस्त विद्वतजन आणि नारायण स्वरुप समस्त दंडी स्वामी यांच्या उपस्थितीत वेदमंत्रोच्चाराने अभिषेक करुन सद्गुरु वेणाभारती महाराजांना राजछत्र, राजदंडासह व त्यांचे कार्याचे वर्णन करणारे संस्कृत अष्टलोकी काव्य लिहिलेले सन्मानपत्र आणि श्री महंत तपोमूर्ती सद्गुरु मां एवम् कपिकुल सिद्धपीठम् पीठाधिश्वरी वेणाभारती महाराज यांचा पदवीने सन्मान केला.
श्री वेणास्वामींनी ग्रंथराज दासबोध, श्रीज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, भीमरुपीस्त्रोत्र, हनुमान उपासना, श्रीमद्भागवत, हरीपाठ, मनाचे श्लोक, भगवत गीता, श्रीगजानन विजय ग्रंथ, श्रीगुरु गीता आदी अनेक ग्रंथावर अभ्यासपूर्ण प्रवचने करुन नवीन युगात घरात राहून जमेल अशी सहज उपासना, कुळधर्म कुळाचार करण्याचे महत्व पटवून दिले. स्त्री शक्ती जागरण, उत्तम गृहस्थ-गृहिणी लक्षण, साधक सिद्ध लक्षण आत्मनिरुपण इत्यादी बोधपर व्याख्याने, प्रवचने देऊन मार्गदर्शन केले.
‘ स्वामी ‘ २८ नोव्हेंबरपासून प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटाची झलक
तडफदार निर्माती पुनम शेंडे यांच्या सारथी एन्टरटेनमेंट च्या वतीने आजच्या काळात ही भक्तीचे -श्रद्धेचे कसे मार्केटिंग केले जाते यावर भाष्य करणारा हा चित्रपट असल्याचे विनोद सातव यांनी सांगितले , सुबोध भावे , चिन्मय मांडलेकर , विक्रम गोखले ,नीना कुलकर्णी , विनय आपटे , सविता मालपेकर अशी बडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट रसिक प्रेक्षकांना किती भावतो आहे ते सिनेमागृहावरच स्पष्ट होईल
” भारताचे संविधान ” व शहीद दिनानिमित ” सर्वधर्मीय प्राथना ” अभिवादन कार्यक्रम संपन्न
पुणे कॅंटोन्मेंट मतदार संघ कॉंग्रेस पक्षाच्या विद्यमाने संविधान दिन व शहीद दिन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला . संविधान दिनानिमित पुणे कॅम्प भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली . त्यानंतर शहीद दिनानिमित २६ / ११ मधील शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . त्यानंतर उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी हातामध्ये दहशतवादाविरोधात जन जागृतीपर फलके हातात धरून दहशत वादाचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला . त्यानंतर समाजात शांतता राखण्यासाठी ” सर्वधर्मीय प्राथना ” करण्यात आली . यामध्ये बौध्द समाजातील भन्ते नाघघोष , शीख समाजातील धर्मगुरू ग्यानी अमरजितसिंग , ईसाई धर्मातील फादर डेनिस जोसेफ , मुस्लिम धर्मातील मौलाना अकबर हाश्मी , हिंदू धर्मातील महेश दवे आदींनी यावेळी समाजात शांतता राखण्यासाठी ” सर्वधर्मीय प्राथना ” केली .
यावेळी संविधान दिनानिमित भारताचे संविधान या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी सर्व उपस्थितांना या पुस्तकाचे माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले . यावेळी आपल्या भाषणात रमेशदादा बागवे यांनी सांगितले कि , शहिदांचा त्याग देश विसरू शकणार नाही , देशातला दहशतवाद संपविण्यासाठी समाज एकसंघ राहणे गरजेचे आहे . आपल्या जीवाची बाजी लावून आपले वीर जवान लढले , त्यांच्या त्यागाची आठवण ठेवण्यासाठी समाजात आपण एकसंघ राहण्याचा हा दिवस आहे . भारतात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविदाने राहतात सरकारवर अंकुश ठेवण्याचे काम प्रत्येकाचे आहे , ती ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला संविधानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली . त्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी संविधानाचा आदर केला पाहिजे . महाराष्ट्रात नुकत्याच स्थापन झालेल्या सरकारने विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेस आवाजी मतदान घेऊन घटनेची पायमल्ली केली . या राज्याच्या इतिहासामध्ये कधीही असे कृत्य घडले नव्हते . या सरकारने सत्तेवर आल्यास एल. बी . टी. रद्द करू , टोलनाके बंद करू , शंभर दिवसात परदेशातील काळा पैसा आणू ,अशी दिलेली आश्वासने हवीत विरली आहेत . त्यासाठी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून त्यांच्या आश्वासनाचा जाब विचारला पाहिजे . आणि जनतेला त्यांचा खरा चेहरा दाखवला पाहिजे .
यावेळी माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख , सदानंद शेट्टी , पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस अध्यक्ष असिफ शेख , स्थानिक नगरसेवक शैलेन्द्र बिडकर , करण मकवानी , मंजूर शेख , संगीता पवार , विनोद मथुरावाला , गौतम महाजन , अझीम गुडाकूवाला , सुनील दैठणकर , चांद शेख , बबलू सय्यद , केविन मेनवेल , मनजितसिंग विरदी , सुजित यादव , अमीन शेख , भगवान धुमाळ , उस्मान तांबोळी , मंदाकिनी गायकवाड , नलिनी सारथे , अंजली परेरा , मीराताई शिंदे , स्मिता मुळीक , राजेश शिंदे , क्लेमंट लाझरस , वाल्मिक जगताप , विनोद सोळंकी , रशीद खिजर , लतीफ शेख , नूरमोहम्मद रंगरेज , मनीष सोनिग्रा , बाळासाहेब घोडके , प्रदीप परदेशी , दयानंद अडागळे , विठ्ठल थोरात , पीटर मकवाना , परेश गायकवाड , मनोज पवार आदी मान्यवर व कॉंग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस रमेश अय्यर यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले .
अभिनेत्री वीणा मलिक, पाकिस्तानी न्यूज चॅनल मालकासह चौघांना 26 वर्षे कैदेची शिक्षा
इस्लामाबाद – पाकिस्तानमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने देशातील सर्वांत मोठा माध्यमसमूह असलेल्या जिओ टीव्हीचे मालक मीर शकील उर रेहमान, बॉलिवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री वीणा मलिक व तिच्या पतीस एक “पाखंडी‘ कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल 26 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
जियो टीव्ही चा मॉर्निंग शो ‘उठो जागो पाकिस्तान’ शाइस्ता लोधी होस्ट करते. या शोमध्ये वीना मलिकच्या मेहंदी आणि लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात एका म्युझिक बँडने सुफी गाणे गायले होते. त्यामुळे कट्टपंथी संघटना नाराज झाल्या होत्या. ते गाणे होते, ‘अली के साथ है जहरा की शादी’. त्यावेळी उलेमा पॅनलने तर जियो टीव्ही पाहाणे देखील ‘हराम’ असल्याचे म्हटले होते. एआरवाय न्यूज अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार मुबाशिर लुकमान यांनी या शो आणि लग्नातील गाण्याचा जोरदार विरोध केला होता.
कोर्टाने 40 पानांचा निकाल देताना सर्व दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. मात्र, सर्व दोषी हे पाकिस्तान बाहेर आहेत. रहमान यूएई मध्ये राहातो तर, इतर तिघे दहशतवादी संघटनेच्या धमकीनंतर देश सोडून परागंदा झाले झाले आहेत. टीव्ही चॅनलवर आरोप झाल्यानंतर जियो टीव्हीने माफी मागितली होती, मात्र कट्टरपंथींचे त्यावर समाधान झाले नाही.
पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यात, धार्मिकस्थळांना अपवित्र करणे, त्यांची विटंबना, धार्मिक भावना चेतवणे, पैगंजबर हजरत मोहम्मद यांच्यावर टीका आणि कुराण शरीफ अपशब्द, आक्षेपार्ह कृती करणे या सारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यानुसार कुराण शरीफला नुकसान पोहोचवणार्यांना जन्मठेप. तर पैगंबरांची निंदा करणार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायदा ब्रिटीशांच्या काळातच अर्थात भारत-पाक फाळणीआधी आंमलात आणला गेला होता.
पाकिस्तानचा कलंकित क्रिकेटर मोहम्मद आसिफसोबतच्या संबंधामुळे वीना मलिक प्रथमच चर्चेत आली. एका नियतकालिकासाठी तिने विवस्त्र पोज दिल्यामुळे पाकिस्ताना आणि भारतातही तिला ओळखले जाऊ लागले होते.
त्यानंतर टीव्ही शो बिग बॉसच्या चौथ्या पर्वात वीना सहभागी झाल्यानंतर भारतात अधिक प्रसिद्ध झाली.
रितेश-जेनेलियाला पुत्ररत्न
मुंबई- बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलियाच्या घरी एक नवा पाहुणा आला आहे. अर्थात या दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. जेनेलियाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
रितेश याने ‘ट्विटर’वरून ही गूड न्यूज दिली आहे. ‘It’s a BBOOOOYYYYYY!!!!!!!!’ असे रितेश याने ‘ट्विट’ केले आहे. या गोड बातमीने देखमुख कुटुंबात आनंदाचे वातावरण पसरले आहे. रितेश आणि जेनीलिया या दोघांनी आपले फिल्मी करियर 2003 मध्ये सुरु केले होते. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमातून ही जोदी पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकली होती. रितेश आणि जेनेलिया यांचा विवाह फेब्रुवारी, 2012 मध्ये झाला.
शहरातील ८ हजार अधिकृत स्टॉल पाच फूट बाय तीन फूट करण्याची महापालिकेने उघडली मोहीम
पुणे – शहरातील सुमारे आठ हजार अधिकृत व्यावसायिकांचे स्टॉल एकाच आकाराचे म्हणजे पाच फूट बाय तीन फूट करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे. अधिकृत पथारी व्यावसायिकांना प्रमाणपत्रे देण्यासही सुरवात करण्यात आली आहे.
महापालिकेने शहरातील स्टॉल, पथारी व्यावसायिकांचे नुकतेच सर्वेक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार शहरातील पंधरा रस्त्यांवर त्यांना व्यवसायाच्या जागा निश्चित करून प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रभारी प्रमुख माधव जगताप यांनी दिली. ओळखपत्र देतानाच व्यावसायिकांकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाणार आहे. त्यात स्टॉल असल्यास त्याचा आकार पाच फूट बाय तीन फुटाचा असेल, असे लिहून घेण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सर्व स्टॉल एकाच आकाराचे होतील, असे जगताप यांनी स्पष्ट केले. तसेच पथारी व्यावसायिकांच्या प्रतिज्ञापत्रात ते दररोज त्यांचा माल व वस्तू घरी घेऊन जातील, सकाळी सात ते ते रात्री आठपर्यंतच त्यांना त्या जागेवर व्यवसाय करता येईल, ती जागा कोणाला भाडेतत्त्वावर देता येणार नाही, विकता येणार नाही, त्या ठिकाणी जागा वाढवून घेता येणार नाही आदी विविध अटींचा समावेश आहे. त्यांचे उल्लंघन झाल्यास त्याबाबत कारवाईस पात्र असेल, असेही त्यात म्हटले आहे.
दरम्यान, अधिकारी पथारी व्यावसायिकांना पथारीच्या जागा निश्चित करताना वाहतुकीला अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे काही ठिकाणांवरून त्यांना हलविले जाणार आहे. याबाबत शहरातील सध्या 225 ठिकाणांचा आढावा घेतला जात आहे. त्यातील काही ठिकाणी व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात येणार आहे, तर काही ठिकाणांवर पूर्वी दिलेली परवानगी रद्द करण्यात येणार आहे. तसेच खाद्यपदार्थ व्यावसायिकांसाठी “फूड प्लाझा‘ उभारण्यात येणार आहे. त्या ठिकाणी त्यांना खाद्यपदार्थ विक्रीस परवानगी दिली जाणार आहे. अन्य ठिकाणी त्यांना परवानगी नसेल, असेही जगताप यांनी नमूद केले.
‘द सीज‘ पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन
पुणे – देशासाठी ठरलेला “ब्लॅक वेन्सडे‘ 26/11चा दिवस…पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम ओंबाळे यांच्यामुळे पकडला गेलेला कसाब…त्यानंतर अवघ्या 98 अधिकारी, अंमलदार यांनी पूर्ण केलेलं तपास कार्य…अन् त्यानंतर सादर झालेले सुमारे 11 हजार 350 पानांचे आरोपपत्र, अशा प्रकारे दहशतवादी अजमल कसाबच्या चौकशीतील तपास कार्याचा अनुभव सांगत मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी “26/11‘च्या मुंबई हल्ल्यातील आठवणी सांगितल्या. या वेळी कसाबचे आरोपपत्र दाखल केल्यापासून त्याला फाशीपर्यंतचा प्रवास महाले यांनी पुणेकरांसमोर मांडला.
मेनका प्रकाशनतर्फे ब्रिटिश पत्रकार ऍड्रियन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांच्या “द सीज‘ पुस्तकाचा मराठी अनुवाद मंगळवारी महाले यांच्या उपस्थितीत एस. एम. जोशी सभागृहात प्रकाशित झाला. या पुस्तकाचा अनुवाद “साम टीव्ही‘चे ब्युरो चीफ अमित गोळवलकर यांनी केला आहे. या वेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, प्रकाशक आनंद आगाशे, अभय कुलकर्णी उपस्थित होते.
महाले म्हणाले, ‘मुंबईच्या हल्ल्यात अतिरेक्यांनी वापरलेले मोबाईल, जीपीएस यंत्रणा, मोटार बोटमधील मशिन, नागरिकत्वाचे पुरावे हे सगळे पाकिस्तानमधील असल्याचे कागदोपत्री पुरावे आम्ही दिले. म्हणूनच या वेळी पहिल्यांदा पाकिस्तान सरकारला हा कट आमच्याकडे शिजल्याचे मान्य करावे लागले. या हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानमधील सात आरोपींवर सध्या खटला सुरू असला तरीही ते सरकार त्याबाबत फारसे गंभीर नसल्याचे दिसते. त्यामुळे हा खटला किती दिवस चालेल हे सांगता येत नाही.‘‘
धर्माधिकारी म्हणाले, ‘कसाबने शस्त्र घेऊन भारताची सीमा ओलांडली होती. हे कृत्य देश व आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार युद्धाला आव्हान देणारे आहे. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणे ही धोरणात्मक चुक होती. इस्लामिक दहशतवाद हा आज जगासमोरील आव्हान असून, त्याचे मुख्य केंद्र पाकिस्तानमध्ये आहे. देशा-देशांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा दहशतवाद फोफावत आहे; परंतु हे रोखण्यासाठी आता इस्लाम आणि इस्लामिक दहशतवाद वेगळं करणे महत्त्वाचे ठरेल आणि हा बदल घडवून आणण्यासाठी भविष्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावेल.‘‘
गोळवलकर म्हणाले, ‘शोध पत्रकारिता, रिपोर्ताज आणि कादंबरीच्या अंगाने जाणारे हे पुस्तक आहे. यामध्ये पडद्यामागे राहून आपले कर्तव्य बजावलेल्या अनेकांच्या धैर्याचा उलगडा झाला आहे.‘‘ सूत्रसंचालन सुजाता देशमुख यांनी केले.
‘रुपी बॅंकेची जबाबदारी कॉसमॉसने घ्यावी,-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे – ‘रुपी बॅंकेची जबाबदारी कॉसमॉसने घ्यावी,‘ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. काही तांत्रिक अडचणी असल्यास दूर करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आणि रिझर्व्ह बॅंकेशी चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावर उभारलेल्या कॉसमॉस बॅंकेच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी महापौर दत्तात्रेय धनकवडे, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,
खासदार अनिल शिरोळे, बॅंकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मिलिंद काळे आणि संचालक डॉ. मुकुंद अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रुपी बॅंकेचे पुनरुज्जीवन करावे, अशी लोकांची अपेक्षा आहे. त्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले,””कॉंसमॉस बॅंकेने आतापर्यंत पंधरा सहकारी बॅंकांचे यशस्वीरीत्या विलीनीकरण केले आहे. रुपीचीही जबाबदारी त्यांनी घेऊन सोळावी बॅंक विलीनीकरण करून गौरवशाली परंपरा पुढे सुरू ठेवावी. येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करेल.
सहकार हा संस्कार आहे. त्यामुळे विश्वस्तांच्या भावनेतून काम केले पाहिजे. कॉसमॉस त्या भावनेतून काम करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘सहकारी बॅंकांचे नागरिकांशी जवळचे संबंध असतात. राज्यात 60 टक्के बॅंका या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यामुळे त्या भागाचा विकास झाला आहे. पन्नास टक्के नागरिकांची बॅंक खाती नाहीत. त्यामुळे या क्षेत्राचा विस्तार होण्याची गरज आहे. बॅंक नसल्यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकाराची मदत घ्यावी लागते. त्यातून आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. बॅंकांनी कार्यपद्धतीत फेरविचार करण्याची गरज आहे.‘‘
हेल्मेट सक्ती राबविण्यामागे मागे भाजप सरकार चा हात ?
पुणे -हेल्मेट सक्ती विरोधात रस्त्यावर येणाऱ्या भाजप आमदारांसह अन्य प्रतिनिधींनी मुख्यमंतरी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत हेल्मेट चे अवाक्षर हि न उच्चारल्याने हेल्मेट सक्तीमागे भाजप सरकार चा तर हात नाही ना ?असा प्रश्न आता निर्माण झाला आहे पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांनी दोन्ही शहरांतील खासदार, आमदार, महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विरोधी पक्षनेते आदींच्या स्वतंत्र बैठका विधान भवनात मंगळवारी घेतल्या. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यावर फडणवीस यांनी पहिल्यांदाच शहराच्या विकासासाठी बैठक घेतली. त्यामुळे तिच्याबद्दल उत्सुकता होती. दोन्ही महापालिकांचे आयुक्त; तसेच अन्य अधिकारीही बैठकीस उपस्थित होते.
शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडचा एकत्रित विकास करण्यासाठी पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) तातडीने स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली. तसेच “पीएमपी‘मध्ये एक आठवड्यात भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) सक्षम अधिकारी नियुक्ती करणार असल्याचेही आश्वासन त्यांनी दिले.
बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, “”पुणे महानगरचा विकास करण्यासाठी मुंबईतील एमएमआरडीच्या धर्तीवर “पीएमआरडीए‘ तातडीने स्थापन करण्यात येईल. हे प्राधिकरण केवळ नियोजन करणारे नव्हे, तर अंमलबजावणीचेही त्यांना अधिकार असतील. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षमही करण्यात येईल.‘‘ प्राधिकरणाची रचना कशी असेल, याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, असा आदेश त्यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिला.
शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या समस्या जटिल झाली आहे. त्यामुळे पीएमपीला सक्षम करावे लागणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात येत्या आठवड्यात सक्षम अधिकाऱ्याची व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करून सक्षमीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच पीएमपीला पाठबळ देण्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांची जबाबदारी आहे, राज्य सरकार त्यांना पाठबळ देईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पीएमपीला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी तिच्या मालमत्तांना अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्यासही त्यांनी अनुकूलता दर्शविली.
कचऱ्याच्या प्रश्नासाठी प्रस्ताव सादर करा.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारकडील काही खाणींची आणि जागांची मागणी महापालिकेने केली आहे. तिचा आढावा घेत, यासाठीचे नेमके प्रस्ताव सादर केल्यास त्यावर लवकरच निर्णय घेऊ, असे त्यांनी नमूद केले. जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निमाण योजनेचा (जेएनएनयूआरएम) पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्याच्या प्रश्नांबाबत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी, ही काही पहिलीच आणि शेवटची बैठक नाही, असे नमूद केले. शहराच्या विकासाचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत. ते तसेच राहू नयेत, यासाठी मी स्वतः काळजी घेणार आहे. यापूर्वी शहराचे प्रश्न नगर विकास विभागात येऊन अडकत होते. आता तसे होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
पुण्यातील वाहतुकीची समस्या गंभीर स्वरूपाची आहे. ती सोडविण्यासाठी एकत्रित आराखडा करून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या नियोजनात राज्य सरकारबरोबरच रेल्वे प्रशासनालाही सहभागी करून घेता येईल. तसेच दोन्ही महापालिकांचाही त्यात मोलाचा वाटा असेल. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी सर्व शासकीय घटकांना बरोबर घेऊन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाईल.‘‘




