Home Blog Page 3604

यंदा दहावीचा राज्याचा निकाल 91.46 टक्के….

0

पुणे

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील ९१.४६ टक्के विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणातील हा  टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. कोकण विभागातील विद्यार्थ्यांनी निकालात बाजी मारली असून यंदाही मुलींनी मुलांना मागे टाकलं आहे.
यावर्षी राज्यभरातून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यांच्या करिअरची दिशा ठरवणारा, या परीक्षेचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजता जाहीर झाला .
दहावीच्या परीक्षेत ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हा आजवरचा सर्वोत्तम निकाल आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८८.३२ टक्के लागला होता. त्यात यंदा ३.१४ टक्क्यांची वाढ झाली आहे.  उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.१८ टक्के असून ९२.२४ टक्के मुली यशस्वी झाल्यात. २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे, तर ४,७३१ शाळांमधील सर्वच्या सर्व विद्यार्थी पास झाले आहेत.

विभागवार निकालाची टक्केवारी-
मुंबई – 92.90 टक्के
कोकण – 96.54 टक्के
पुणे – 95.10 टक्के
कोल्हापूर- 95.12 टक्के
औरंगबाद- 90.57 टक्के
नागपूर- 87.01 टक्के
लातूर- 86.38 टक्के
नाशिक- 92.16 टक्के
अमरावती- 86.84 टक्के

मंडळाच्या संकेतस्थळांवर तुम्ही निकाल पाहू शकाल. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण उपलब्ध होतील व या माहितीची प्रिंट घेता येईल.
मंडळाची संकेतस्थळे –
www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams
SMS वरही निकाल –
एसएमएस करून मोबाइलवरही निकाल मिळेल. त्यासाठी… MH10 आसन क्रमांक टाइप करून 58888111 वर पाठवावा.
राज्य शिक्षण मंडळाची वेबसाईट – https://mahahsscboard.maharashtra.gov.in

पुणे श्रमिक पत्रकार संघ अध्यक्षपदी जितेंद्र अष्टेकर

aq

पुणे, – पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक निवडणुकीत (२०१५-१६) अध्यक्षपदी महाराष्ट्र टाइम्सच्या जितेंद्र अष्टेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

संघाचे अन्य पदाधिकारी पुढीलप्रमाणे – 

उपाध्यक्ष –  संतोष शाळिग्राम (सकाळ), नंदिनी घोडके (भास्कर)
खजिनदार – नितीनपाटील(पुढारी)
चिटणीस – पांडुरंग सरोदे (सकाळ), निनाद देशमुख (लोकमत). 
कार्यकारिणी सदस्य – योगेश बोराटे (महाराष्ट्र टाइम्स), रोहित आठवले (महाराष्ट्र टाइम्स), अमोल कुटे (अॅग्रोवन), मीनाक्षी गुरव (सकाळ), मंगेश फल्ले (दिव्य मराठी), सोमनाथ गर्जे (सकाळ), अनिल सावळे (सकाळ), विठ्ठल देवकाते (सामना), संजय नवले (सकाळ) आणि विजय जगताप (दिनमान). या निवडणुकीसाठी अॅड. प्रताप परदेशी, अॅड. सुभाष किवडे आणि रवींद्र राऊत यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीसाठीच्या ‘महा विद्या ‘ एज्युकेशनल टेब मध्ये १० टक्के सूट !

 

अकरावी ,बारावी चा अभ्यासक्रम ‘महाविद्या ‘ ई -tab ‘ वर उपलब्ध 
पुणे :
दहावीचा निकाल ऑन लाईन सोमवारी लागणार असताना उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी -बारावीचा अभ्यासक्रम असणारा ‘महा विद्या ‘  ‘ ई -tab ‘  १० टक्के सवलतीमध्ये देण्याची घोषणा पुण्यातील  ‘बाबा कॉम्प्यूटर्स ‘ चे मुख्य कार्यकारी अधिकारी नाम मोरयांनी यांनी केली आहे .
उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी बाबा कॉम्प्युटर्स च्या टोल फ्री क्रमांकावर नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे .या उपक्रमासाठी ‘महाविद्या’ची हेल्पलाइन देखील सुरू झाली  असून, 1800 233 2266 आणि 9371107057 वर विद्यार्थी-पालकांना संपर्क साधता येणार आहे. www.babacomputers.com / mahavidya आणि  www.mahavidya.co.in. येथेही संपर्क साधता येईल.
उत्तीर्ण विद्यार्थी त्यांच्या ऑन लाईन निकालाची प्रिंट घेवून कॅम्प मधील इस्ट स्ट्रीट वरील  बाबा कॉम्पुटर्स ‘ मध्ये गेल्यास त्यांना अकरावी -बारावी अभ्यासक्रम सहित असलेला ‘ ई -tab ‘ १० टक्के सवलतीत मिळणार आहे .
३० वर्षापासून पुण्याच्या संगणक क्षेत्रात कार्यरत ‘ बाबा कॉम्प्युटर्स ‘ ने महाराष्ट्र दिनापासून ‘महा विद्या ‘ ‘ ई -tab ‘  बाजारात उपलब्ध केला असून त्यावर पहिली ते बारावी पर्यंत अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी मध्ये उपलब्ध असून त्याला एनिमेशन आणि व्हाईस ओव्हर ची साथ आहे . इ -लर्निंग अध्यापनासाठी,अध्ययनासाठी  हा ‘ ई -tab ‘  उपयुक्त असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे
यामध्ये बहुपर्यायी प्रश्‍नांच्या माध्यमातून मूल्यांकन करण्याची सुविधा आहे. निकालाचे मूल्यमापन रिपोर्ट उपलब्ध आहे. चाचणी परीक्षांचे मूल्यमापन करता येणार आहे.’

तांत्रिकदृष्ट्या अत्यंत सरस निर्मिती ‘बाबा कॉम्प्युटर्स’ ने केली असून, 7 इंच टच स्क्रीन, 1.2 जीबी प्रोसेसर, अँड्रॉईड 4.2.2 ऑपरेटिंग सिस्टिम, 512 एमबी रॅम, 4 जीबी स्टोरेज, 32 जीबी एक्स्पांडेबल, कॅमेरा 0.3 एमपी, स्पिकर, 3 ते 4 तासांचा बॅटरी बॅकअप इतक्या सुविधा या ‘टॅब’मध्ये असणार आहेत.

नाम मोर्यानी म्हणाले, ‘शिक्षकांना शिकविण्यासाठी, विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी तसेच पालकांना अभ्यास घेण्यासाठी या टॅब्लेटचा उपयोग होणार आहे. केजीसाठी महाविद्या शैक्षणिक सॉफ्टवेअरसह 7,999/- असून, अकरावी व बारावीसाठी रुपये 11,999/- अशी या टॅबच्या किंमतीची रेंज आहे. एक वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे.’

‘भय’ इथले संपत नाही

माणसाचे मन ही मोठी अजब गोष्ट आहे. मनाचे भाव, भावना आणि माणसाचे वर्तन यातल्या फार कमी गोष्टींचाविज्ञानाला उलगडा झाला आहे. भीती ही प्रत्येकाच्या मनात असते.ही भीती कशाचीही असू शकते.उंचीची, गर्दीची, एकटेपणाचीअगदी कशाचीही भीती एखाद्याला सतावत असते. ह्या भीतीवर मात न करता येणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होत असेल? भीती मनात ठेऊन जगणाऱ्या व्यक्तींना काय अडचणींना तोंड द्यावे लागते याचा गुंगवून टाकणारा प्रवासम्हणजे…‘भय’हा चित्रपट.

 

एखाद्या गोष्टीचा फोबिया असणं ही पॅरानॉईड स्किझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. या आजाराने ग्रस्त व्यक्तींना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर ते कशाप्रकारे मात करू शकतात या विषयावर भाष्य करणारा ‘भय’ चित्रपट लवकरच येत आहे.सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत चालू असून चित्रपटातील मागणीनुसार एक गाणं लवकरच दुबईत चित्रित करण्यात येणार आहे.

 

‘भय’ या वेगळ्या धाटणीच्या सिनेमाच्यादिग्दर्शनाची आणि संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.कथा,पटकथा,संवाद नितीन सुपेकर यांचे असून अभिषेक प्रताप खणकर यांनी गीते लिहिली आहेत.या गीतांनाअजित समीर यांचा संगीत साज आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे याचं आहे.

 

निर्माते सचिन कटारनवरे व सहनिर्माते अजय जोशी, अनिल साबळे यांनी नाविन्यपूर्ण आशयाच्या ‘भय’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ५ जी इंटरनॅशनल प्रस्तुत या चित्रपटातअभिजीत खांडकेकर,उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर,विनीत शर्मा, संस्कृती बालगुडे, सिद्धार्थ बोडके यांचा दमदार अभिनय प्रेक्षकांना पहायला मिळेल.

 

भाजप शिवसेनेच्या सत्ताकार्यकाळात पुर्वाश्रमीच्या शिवसेना स्टाइलने एम आय एम ची होणारी वाटचाल अचंबित करणारी….

मुंबई- देशात अच्छे दिन एवजी बुरे दिन पाहावे लागत असताना – महागाई त जनता होरपळत असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून राजकारण्यांचे डावपेच पद्धतशीर  पडत असून याचाच  एक भाग म्हणून महाराष्ट्रात जातीय आणि धार्मिक कुरघोड्या करण्याच्या प्रकारांना उत येवू लागला आहे . भाजप शिवसेनेच्या सत्ताकार्यकाळात एम आय एम ची पुर्वाश्रमीच्या  शिवसेना स्टाइलने होणारी वाटचाल अचंबित करणारी ठरते आहे . शिवसेनेने दिलेल्या संभाजीनगर या ओउरनगबाद च्या नावाला  विरोध  करणाऱ्या एमआयएमनं आता …
अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या स्मारकासह शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकांना विरोध केला आहे . हा विरोध एम आय एम ने करणे म्हणजेच जातीय आणि धार्मिक चिथावणी देणे आहे अगोदर एम आय एम ने मुस्लिम स्मारके हटवायला हवी होती आणि मग यावर बोलायला हवे होते . असे सांगत राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. जनतेच्या पैशातून स्मारकं उभारण्यापेक्षा त्या जागांवर हॉस्पिटल, शाळा उभारा अशी सूचना पुण्यातील पूर्वाश्रमीचे एका दूरचित्रवाहिनेचे बातमीदारआणि सध्याचे आमदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.एम आय एम ने उघड उघड अशा प्रकारे चिथावण्या देणे हा प्रकार शिवसेना आणि भाजप सरकारच्या काळातील अजबच प्रकार मानला जातो आहे .
औरंगाबादेत दूध डेअरीच्या दोन एकर जागेवर दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. तसंच, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठीही महापौर बंगल्याजवळची जागा निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भातील बातम्या प्रसिद्ध होताच, औरंगाबादमधील एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी मुंडेंच्या स्मारकावर निशाणा साधत ‘स्मारक संस्कृती’लाच विरोध केला आहे.
जनतेचे पैसे वापरून सरकारी जमिनीवर कुठल्याही नेत्याचं स्मारक उभारण्यास एमआयएमचा विरोध आहे. भाजप नेत्यांनी, विधानसभाध्यक्षांनी एकदा घाटी हॉस्पिटल किंवा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन बघावं. तिथे एमआरआय करण्यासाठी दीड-दोन महिने लागतात. हे चित्र दुर्दैवी आहे. त्यामुळे स्मारकासाठी जागा आणि पैसे खर्च करण्यापेक्षा हॉस्पिटल, शाळा उभारून त्याला नेत्यांची नावं द्यावीत, असं मत त्यांनी मांडलं. १९०० कोटी रुपये खर्च करून अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही आपला विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला ही सूचना मान्य नसेल, तर जनतेच्या हितासाठी आम्ही कोर्टात दाद मागू, असा पवित्राही त्यांनी जाहीर केला.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबादेत दूध डेअरीच्या नियोजित जागेवरच होईल, हॉस्पिटलसाठी सरकार पर्यायी जागा देईल, असं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी ठणकावून सांगितलं आहे.
जलील यांच्या मागणीस शिवसेनेने तीव्र आक्षेप नोंदविला. थोर पुरुषांची स्मारके उभारणे ही समाजाची भावना आहे, महापुरुषांची स्मारके निर्माण करायची नाही तर मग काय अफझलखानचे थडगे उभारायचे, असा सवाल शिवसेनेच्या गोऱ्हे यांनी मुंबईत वार्ताहरांशी बोलताना केला.
‘एमआयएमतर्फे समाजात भावना भडकवण्याचा प्रयत्न होत आहे. हॉस्पिटल की स्मारक असा प्रश्न उपस्थित करून, एमआयएम हे धर्मनिरपेक्ष नागरिकांना संभ्रमात टाकून त्यांची दिशाभूल करत आहे. मुंडे, बाळासाहेब आणि शिवस्मारकाला विरोध करून, एमआयएम कट्टर मुस्लिम आपल्यासोबत राहावे यासाठी धडपडत आहे,’ असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. ‘देशात पुरेशी रुग्णालयं नाहीत हे मान्य आहे. प्रगत देशातसुद्धा रुग्णालयाची कमतरता आहे, प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचता येत नाही. आज भारतात मोठ्या हॉस्पिटलमध्ये मोफत सेवा आहे. रुग्णालयांना प्राधान्य आहेच, पण भावी पिढीला प्रेरणा देण्यासाठी महापुरुषांची स्मारकेही आवश्यक आहेत,’ असे गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एमआयएमच्या सूचनेला विरोध केला आहे. महापुरुषांची स्मारकं पुढच्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी असतात. देश आणि राज्य घडवण्यात ज्यांनी योगदान दिलं त्यांची स्मारकं सरकारी जमिनीवर का उभारू नयेत, असा प्रतिप्रश्न त्यांनी जलील यांना केला आहे. सगळ्याच नेत्यांचा आक्रमक पवित्रा पाहता हा वाद येत्या काळाच चिघळण्याची शक्यता आहे.

ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचे निधन

0

Shri-Govindrao-Adik

मुंबई – माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक (वय 75) यांचे शनिवारी मध्यरात्री 12 वाजता येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
फुफ्फुसातील संसर्गामुळे त्यांना मंगळवारी येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आज दुपारनंतर त्यांची प्रकृती जास्त खालावली. रात्री उशिरा सर्व अवयव निकामी झाल्यामुळे 12.01 वाजता त्यांचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. रविवारी (ता. 7) सकाळी 9 वाजता श्रीरामपूर येथील आझाद मैदानावर त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अशोकनगर येथे त्यांच्यावर दुपारी 2 ते 4 या वेळेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे पत्नी पुष्पलता, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुंबई विभागाचे उपाध्यक्ष असलेले चिरंजीव अविनाश तसेच सुजाता, अनुराधा व अंजली या मुली तसेच ज्येष्ठ बंधू केशवराव असा परिवार आहे. दिवंगत माजी उपमुख्यमंत्री बॅरीस्टर रामराव आदिक यांचे ते कनिष्ठ बंधू होत. आपल्या कर्तुत्वाने ठसा उमटवलेले आदिक 45 वर्षे राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकुरकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. गेल्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली होती. विधी शाखेचे ते पदवीधर होते. आदिक यांनी 1966 ते 1970 च्या दरम्यान त्यांनी येथील न्यायालयात वकीली केली. येथील महाविद्यालयात काही काळ ते कायद्याचे प्राध्यापक होते. वकीली सुरु असताना ते तालुका कॉंग्रेसचे सरचिटणीस झाले. तेथून त्यांच्या राजकीय प्रवास सुरु झाला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. पुलोद सरकारच्या निर्मितीत माजी मुख्यमंत्री शरद पवारांचे ते साथीदार होते. राजकारणात पक्षसंघटनेत त्यांनी विविध पदे भुषविली. नगर जिल्हा कॉंग्रेस सोशालीस्ट फोरमचे अध्यक्ष, कॉंग्रेसचे सरचिटणीस व प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीरामपूरातून दोनदा तर वैजापूरातून एकदा ते आमदार म्हणून निवडून आले. विधानपरिषद व राज्यसभेवर प्रत्येकी दोनदा निवड झाली. पुलोद सरकारमध्ये 1978 ते 1979 या कालावधीत ते पाटबंधारे, विधी, माहिती व जनसंपर्क खात्याचे मंत्री होते. 1989 ते 1992 पर्यंत परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तर 2003 ते 2004 या कालावधीत कृषी व विधी खात्याचे मंत्री होते. मुळा प्रवरा विजसंस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष होते. सात वर्षे अशोक साखर कारखान्याची सुत्रे त्यांच्याकडे होती कामगार चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. ते राष्ट्रीय साखर कामगार फेड़रेशनचे 1995 पासून अध्यक्ष होते. इंटकचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद व नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे जनरल सेक्रेटरी होते. शेतमजूरांच्या ट्रेड युनियनची त्यांनी राज्यात पहिली नोंदणी केली. कृषक समाजाची त्यांनी स्थापना केली. राष्ट्रीय किसान सभेचे ते अध्यक्ष होते. शेतकरी व शेतमजूरांच्या प्रश्‍नासाठी त्यांनी राज्यभर संघटन उभे केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २,००० रोपांचे वाटप

unnamed

पुणे :- डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने नागरिकांना

२,००० रोपांचे वाटप  करण्यात आले.  डी. एस. कुलकर्णी फौंडेशनच्या वतीने गेल्या १० वर्षापासून हा

उपक्रम राबविला जातो. यावेळी टेरी पॉलिसी संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विनिता आपटे, डी. एस. कुलकर्णी

फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के आणि फौंडेशनच्या विश्वस्थ भाग्यश्री कुलकर्णी आदी मान्यवरांच्या हस्ते

म्हात्रे पुलाजवळील घरकुल लॉन्स येथे सर्वांना रोपांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डॉ. विनिता आपटे म्हणाल्या, पर्यावरणाचे महत्त्व जगातील प्रत्येक माणसाला लक्षात यायला हवे.

आज प्रदूषणामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळते. त्याला कुठेतरी आळा बसायला हवा. शहरीकरणाच्या

भोवऱ्यात पर्यावरणाची सुरक्षा मात्र भरकटत आहे, हे थांबायला हवं.  येणाऱ्या पिढीमध्ये  सुदृढ पर्यावरण

टिकविण्यासाठीची सुरुवात स्वत:पासून  करायला हवी ही भावना प्रत्येकामध्ये रुजवायला हवी  शासनाने

पर्यावरण रक्षणासाठी तयार केलेले कायदे हे सर्वसामान्यांचे जीवन सुखकर होण्यासाठीच्या हेतूनेच

बनविलेले आहेत.या कायद्यांची अंबलबजावणी करण्यासाठी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केल्यास पर्यावरण व

प्रदुषणाचे प्रश्न नक्कीच सोयीस्कर रित्या सोडवता येतील.

एक कापडी पिशवी बाळगल्यास रोजच्या कचऱ्यातील तीन-चार पिशव्या कमी होऊ शकतात तसेच  ओला

आणि सुका कचरा वेगळा करून त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावूया. पर्यावरणपूरक सण साजरे

करूयात आणि प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याची जोपासना करावी, अशा छोट्या गोष्टी ज्या वरवर

पाहता फार छोट्या वाटतात पण प्रत्येकाने हळू-हळू या सवयी अंगीकारल्यास खूप मोठा बदल आपण

घडवून आणू शकतो अशी भावना श्याम भुर्के यांनी व्यक्त केली.

पर्यावरणाचा र्‍हास, प्रचंड प्रमाणात होत असलेली जंगलतोड रोखली जावी आणि आपल्या आजुबाजूचा

परिसर निसर्गसौंदर्य टिकून राहण्यासाठी वृक्ष संवर्धनाचा संदेश या उपक्रमातर्फे देण्यात आला. पंडित

पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर भाग्यश्री कुलकर्णी यांनी आभारप्रदर्शन केले.

व्यवसायनिर्मितीसाठी डिझाईन शिक्षणाचा विचार व्हावा : नाडकर्णी

पुणे – “डिझाईन शिक्षणाचा प्रवास कौशल्ये शिकण्यापासून आता डिझाईन प्रक्रियेमागच्या संकल्पना समजून घेण्यापर्यंत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ डिझाईन तयार करण्यावर मर्यादित न राहता या डिझाईनच्या कौशल्याने आपल्या व्यवसायनिर्मितीत अजून वाढ कशी करावी याचा  विचार करावा,” असे मत वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे बिझिनेस डिझाईनचे डीन प्रा. सुधाकर नाडकर्णी (माजी एचओसी, आईडीसी-आयआयटी) यांनी व्यक्त केले.

डीएसके इंटरनॅशनल कॅम्पसच्या डिझाईन प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इंडस्ट्रीयल डिझाईनच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरातील आपल्या कार्याचे सादरीकरण करण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले असून त्यात विविध स्केचेस, मॉडेल्स आणि प्रोटोटाईप्सचा समावेश आहे. जेन्स्लर बेंगलुरु येथील पारितोषिक विजेते ज्येष्ठ आर्किटेक्ट दिवाकर चिंतला यावेळी सन्माननीय अतिथी होते. याप्रसंगी डीएसके उद्योग समूहाचे अध्यक्ष  डी. एस. कुलकर्णी हेही उपस्थित होते.

”साध्या इस्त्रीच्या डिझाईन पासून विमानतळावर आपला मार्ग शोधण्यापर्यंत सर्व ठिकाणी आपल्याला विविध डिझाईन्स आढळतात. तुम्ही आपल्या आधीच्या कल्पना बाजूला ठेऊन नवीन सुरूवात करता त्यावेळीच तुम्ही काहीतरी अद्वितीय निर्माण करू शकता.” असे मत चिंतला यांनी व्यक्त केले.

मॅगीच्या विक्रीवर राज्यामध्ये बंदी-मंत्री गिरीश बापट

0

पुणे : मॅगी नूडल्सच्या नमुन्यात परवानगीपेक्षा जास्त शिशाचे (लेड) प्रमाण आढळल्यामुळे राज्यात या पदार्थाच्या विक्रीवर शनिवारपासून बंदी घालण्यात येत असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी जाहीर केले.
पुण्याच्या प्रयोगशाळेत राज्याच्या विविध भागांतून घेतलेले नमुने तपासणीसाठी देण्यात आले होते. रात्री उशिरा त्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला. बापट यांनी याबाबत तातडीने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या तातडीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्यात मॅगी विक्रीवर बंदी घालत असल्याचा निर्णय जाहीर केला. बापट म्हणाले, ” मॅगीच्या काही नमुन्यांमध्ये २.५ ऐवजी शिशाचे प्रमाण वेगवेगळे आढळले आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.” अन्न औषध प्रशासन उद्यापासून दुकानांमध्ये तपासणी सुरु करणार आहे. या बंदीचे उल्लंघन करणा-यांवार नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असे सांगून बापट म्हणाले की, खरेदीदाराला पाकिटावरून त्यातील शिसाच्या प्रमाणाविषयी काही कळत नाही. त्यांच्या आरोग्यास शिसाचे जादा प्रमाण असलेली मॅगी घातक असून उद्यापासून कोणत्या विक्रेत्याने कंपनीला किती माल परत पाठविला याचा अहवाल घेतला जाणार आहे. पुण्यातील ६ नमुन्यांपैकी ३ अप्रमाणित पुण्यात घेतलेल्या सहा नमुन्यांपैकी तीन अप्रमाणित आढळले असून उत्तराखंडमधील कंपनीत बनलेल्या एका नमुन्यात २.५५ तर दुस-या नमुन्यात ४.६६ टक्के शिसे आढळले असून गोव्यातील कंपनीच्या नमुन्यात २. ५९ तर अन्य एका नमुन्यात 0.२४ टक्के शिसे आढळले आहे. मोनोसोडियम ग्लुटामेट (एम.एस.जी.)चे प्रमाण मिठाएवढे असावे. एम.एस.जी. असल्याचे पाकिटांवर नमूद आहे, पण प्रत्यक्षात तपासणीत ते आढळले नाही, अशी माहिती बापट यांनी दिली.

वीजग्राहकांसाठी लोकपाल आपल्या दारी

पुणे – वीजग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी नव्याने लोकपाल आपल्या दारी ही संकल्पना राबविण्यात येत असून, जिल्हास्तरावरील तक्रारींचे निवारण करण्यावर भर देण्यात येत आहे, अशी माहिती विद्युत लोकपाल (मुंबई) आर. डी. संखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तक्रारी सोडविण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण कक्ष (आयजीआरसी), ग्राहक तक्रार निवारण मंच (सीजीआरएफ) आणि विद्युत लोकपाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, बहुतांश नागरिकांना याविषयीची पुरेशी माहिती नसते. त्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.

संखे म्हणाले, “”वीजबिलावर आयजीआरसी, सीजीआरएफकडे संपर्क कसा साधावा, याविषयीची माहिती दिलेली असते. ग्राहकांनी प्रथम त्यांच्याकडे जावे. साठ दिवसांच्या आत तक्रारींचे निराकरण झाले नाही, तर ते ग्राहक लोकपालकडे येऊ शकतात. राज्याकरिता मुंबई व नागपूर येथे दोन लोकपालची नियुक्ती झाली आहे. दाखल करायवयाचा अर्ज रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा ई-मेलद्वारे करता येऊ शकतो. याबाबतची माहिती www.mercombudsman.org.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.‘‘

“”मंचापुढे अथवा विद्युत लोकपालकडे सुनावणीदरम्यान ग्राहकास स्वतःची बाजू मांडण्याची तरतूद आहे. ग्राहकास वकिलाची नेमणूक करता येत नाही. लोकपालकडे अर्ज दाखल केल्यास साठ दिवसांत तडजोड होणे अपेक्षित आहे. तक्रार दाखल झाल्यावर दीड महिन्यातच त्यांचे निवारण करण्यात येते. लोकपालचा निर्णय अंतिम आहे. परंतु ग्राहकास जर समाधान झाले नाही, तर त्यास आयोगाकडे अपील करता येत नाही. पण निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करू शकतात. गेल्या सहा महिन्यांत कोल्हापूर व सांगली (35) नाशिक (दोन), जळगांव (सात) पुणे (दहा) येथील ग्राहकांची प्रकरणे सोडविण्यात आली आहेत,‘‘असेही संखे यांनी सांगितले.

“हॅलो माय फ्रेंड’ हेल्पलाइनचे उद्‌घाटन

पुणे – शहरातील युवावर्गाचे शैक्षणिक, व्यावसायिक, वैयक्तिक प्रश्‍न सोडविण्यासाठी, त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्यासाठी व्याख्याने व कार्यशाळा घेण्यासाठी “हॅलो माय फ्रेंड‘ या हेल्पलाइनचे उद्‌घाटन युवावर्गाच्या उपस्थितीत शुक्रवारी जल्लोषात झाले. या हेल्पलाइनमार्फत 16 ते 25 या वयोगटातील युवक-युवतींच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न तज्ज्ञांद्वारे केला जाईल.

पुणे महापालिकेच्या “हॅलो माय फ्रेंड‘ या हेल्पलाइनचे उद्‌घाटन महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी केले. महापालिका आयुक्त कुणाल कुमार, उपमहापौर आबा बागूल, माजी आमदार उल्हास पवार, निवेदक सुधीर गाडगीळ, स्थायी समितीच्या अध्यक्षा अश्‍विनी कदम, शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत, विवेक वेलणकर, नगरसेवक अरविंद शिंदे, अशोक हरणावळ, रवींद्र माळवदकर, अविनाश बागवे, लक्ष्मी घोडके, अनिरुद्ध पावसकर, अरुण कामठे, संजय कुमार, डॉ. विकास अधिकारी उपस्थित होते. हेल्पलाइनसाठी युवकांनी 18002336850 या विनामूल्य क्रमांकावर दूरध्वनी करावा.

धनकवडे म्हणाले, “”सध्याचे जग स्पर्धेचे असून प्रत्येक जण स्वत:ला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यामध्ये युवावर्गाची संख्या मोठी असल्याने त्यांना काही वेळेस अपयशी व्हावे लागते. या नैराश्‍यातून त्यांना बाहेर पडण्यासाठी ही हेल्पलाइन मदत करणार आहे.‘‘

कुमार म्हणाले, “”समाजात युवावर्गाच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि प्रश्‍नांबद्दल बोलले जात नाही. त्यावर चर्चा होत नाही, ही गंभीर समस्या आहे. अशा प्रकारच्या कारणांमुळे युवावर्गामध्ये नैराश्‍याची भावना निर्माण होते. त्यांच्यातील नैराश्‍य दूर करण्यासाठी या हेल्पलाइनचा उपयोग होणार आहे.‘‘

पवार म्हणाले, “”युवक आणि युवतींनी उत्तम व्यक्ती होण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. त्यासाठी त्यांनी समाजातील थोर महापुरुषांचा आदर्श घेतला पाहिजे. स्वत:मध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याची गरज आहे.‘‘

क्षेत्रसभेच्या कायद्यानुसार सर्वच नगरसेवक आणि आयुक्तांवर कारवाई ची मागणी – मुख्यमंत्र्यांची गोची ….

पुणे-
क्षेत्रसभेच्याकायद्याची उघड उघड पायमल्ली करून वावरणाऱ्या सर्वच नगरसेवकांवर आणि महापालिका आयुक्तांवारही तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे – अर्थात याप्रकरणी मुख्यमंत्र्यांची गोची होणार असल्याचे स्पष्ट आहे . २०१७ मध्ये महापालिका निवडणुका होत आहेत या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांकडून  तातडीने कार्यवाही होणे आणि त्यासाठी दबाव आणणे गरजेचे आहे पण हे नेमके करणार कोण हा हि प्रश्नच आहे .

विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे कि ,

३ जुलै २००९ रोजी ‘२००९ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.२१’ या नावाने क्षेत्रसभेचा कायदा अंमलात आला. शहराचे धोरण ठरविण्याच्या प्रक्रियेमध्ये नागरिकांचा थेट सहभाग असावा ह्यासाठी क्षेत्रसभेचा कायदा व क्षेत्रसभेची रचना करण्यात आली आहे. क्षेत्रसभा ज्या महापालिकेच्या प्रभागातील असते त्या प्रभागाचा नगरसेवक क्षेत्रसभेचा अध्यक्ष असतो. क्षेत्रसभा भरवणे ही जबाबदारी त्याची असते. दोन वर्षात किमान चार क्षेत्रसभा घेतल्या नाहीत तर संबधित नगरसेवकाचे सदस्यत्व रद्द होउ शकते.तसेच असे नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार त्या त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना राज्य सरकारने दिलेले आहेत.

क्षेत्र सभा हे प्रभाग आणि शहर पातळीवरील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्याचे आणि धोरणात्मक किंवा विशिष्ट गोष्टीशी संबंधित निर्णय घेण्याचे व्यासपीठ असते. क्षेत्रसभेमध्ये धोरणात्मक आणि निर्णय घेण्याबाबत ठराव मांडायचे असतात. क्षेत्रसभा सदस्य शासकीय यंत्रणेला जाब विचारू शकतात . आपलं शहर, आपला परिसर कसा असावा हे  क्षेत्रसभेच्या माध्यमातून त्या भागातील नागरिकांनीच ठरवणे या कायद्याला अपेक्षीत आहे. जेणेकरून लोकशाहीत लोकांचा थेट सहभाग वाढेल.

पुण्यात विद्यमान नगरसेवकांपैकी कोणीही अशी क्षेत्रसभा घेतलेली नाही अशी माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली आहे . असे असेल तर ही बाब गंभीर आहे.

अशी क्षेत्रसभा भरवण्यासाठीची क्षेत्रे आयुक्तांनी अधिसूचनेद्वारे निर्धारित करावयाची असतात .त्यासाठीचे निकष कायद्याने ठरवून दिलेले आहेत .कायद्यात राज्यशासनावर, म्हणजेच महानगरपालिकेच्या पातळीवर पालिका आयुक्तांवर क्षेत्रसभा निर्धारित करण्याची जबाबदारी सोपवली आहे. म्हणजेच आयुक्तांनी याद्या आणि सीमा निश्चित करणं गरजेचं आहे.परंतु पुण्यासह अनेक महापालिकांच्या आयुक्तांनी अशा प्रकारची क्षेत्रनिश्चिती केल्याचे आढळून येत नाही.त्यामूळे क्षेत्रसभा न घेतल्याबद्दल  जितके दोषी नगरसेवक आहेत त्यापेक्षा जास्त दोषी महापालिका आयुक्त आहेत.

वरील बाबींचा विचार करून ज्या महापालिकांनी क्षेत्रसभेचे क्षेत्र अद्याप निश्चित केलेले नाही त्या आयुक्तांवर कारवाई करावी. तसेच ज्या महापालिकानी अशी क्षेत्र निश्चिती केली आहे परंतु नगरसेवकांनी क्षेत्रसभा घेतल्या नाहीत त्या पालिकांच्या आयुक्तांना संबधित नगरसदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती. असे कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना  दिलेल्या पत्रात म्हटले आहे

अलर्ट च्या वतीने “संकल्प करूया – पृथ्वीला वाचवूया” मोहीम

1 2 3
पुणे :
       संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने “सात अब्ज स्वप्ने – एक पृथ्वी: चला तिची काळजी घेवूया” ही थीम घोषित करण्यात आली होती. याच थीमवर संपूर्ण जगामध्ये आज ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा होत आहे. याच निमित्ताने अलर्ट संस्थेच्या वतीने आज दि. ५ जुन २०१५ रोजी, सारसबाग पुणे येथे “जागतिक तापमान वाढ” विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्यानामध्ये फिरते प्रदर्शन नागरिकांसाठी लावण्यात आले होते.  “संकल्प करूया – पृथ्वीला वाचवूया” या साइन बोर्ड वर नागरिकांनी आपला संकल्प लिहून सह्या या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलतांना वंदना चव्हाण म्हणाल्या कि, “पर्यावरणाची समस्या ही केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीलाच धोक्यात टाकणारी आहे. निसर्गाने वेळोवेळी आपले रौद्र रूप दाखवून त्याची पूर्वसूचना दिली आहे. आपण वेळीच जागे झालो नाही तर संपूर्ण जगच विनाशाच्या खायीत लोटले जाणार आहे. आपल्या भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य द्यायचे असेल तर आजच आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.”
या उपक्रमासाठी अलर्ट संस्थेचे श्रीराम टेकाळे, बाळकृष्ण राठोडे यांनी विशेष प्रयत्न केले.

मला गृहमंत्री करा ;काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना जेलमध्ये टाकायचं आहे- पर्यावरणमंत्री रामदास कदम

मुंबई- काही लोकांना जेलमध्ये टाकण्यासाठी माझ्याकडे गृहमंत्री द्यायला हवे आहे. आमचे सरकार येण्याआधीपासूनच मी मला गृहमंत्री करा असे सांगत होतो. प्रचारादरम्यानही मी हेच सांगत होतो. गृहमंत्री झालो तर मंत्रालयात बसून दिवसा ढवळ्या भ्रष्टाचार केलेल्यांना व लोकांचे मुडदे पाडणा-यांना मला जेलमध्ये टाकायचं आहे असे सांगत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
पर्यावरणदिनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान रामदास कदम यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. कदम म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना व काही लोकांना मला जेलमध्ये टाकायचं आहे. मात्र, आमच्याकडे गृहमंत्रीपद आले नाही. मला जर गृहमंत्रीपद दिलं असतं तर या लोकांची काही खैर नव्हती.
शिवसेनेने गृहमंत्री मागितले होते पण दिले नाही याबाबत छेडले असता कदम म्हणाले, आम्हाला आजही गृहमंत्रीपद हवे आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा आमची ही मागणी आहे व बातमी करा म्हणजे मला गृहमंत्रीपद मिळेल असे वक्तव्य करीत कदमांनी पत्रकारांनाच अडचणीत आणले. कोणाकोणाला जेलमध्ये टाकायचं आहे असे विचारल्यावर मात्र क्षणभर नाव घेण्याच्या विचारात असतानाच त्यांनी आवरते घेतले व कोणाचेही नाव घेतले नाही.

आला रे … आला मान्सून आला ……

0

चेन्नई –
चार दिवस उशिरा का होईना, शुक्रवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून तो सात दिवसांच्या आतच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्यानं बुधवारी वर्तवला होता. त्यानुसार केरळमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कालपासूनच आकाशात ढग जमू लागले होते. त्यामुळे मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आज उकाड्याने हैराण झालेल्यांची प्रतीक्षा संपवत केरळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात लक्षद्विप बेटाजवळ शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस चांगलाच बरसला. राज्याच्या ७० टक्के क्षेत्रात सरासरी २.५ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत केरळ आणि कर्नाटकच्या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण अरबी समुद्रात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. बंगाल उपसागराच्या दक्षिण भागातही मान्सून वेगाने पुढे सरकत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती असून तो सात दिवसांच्या आतच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.