Home Blog Page 356

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपाचा कुटील डाव.

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव: हर्षवर्धन सपकाळ.

मराठी बोलणारे हिंदू नाहीत का? हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपाचा अजेंडा, हिंदी भाषा सक्तीला काँग्रेसचा विरोध.

अंबाजोगाईमध्ये वकील तरुणीला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा.

मुंबई, दि. १८ एप्रिल २०२५

मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे बोलीपासून दूर ठेवायचे ही दुट्टपी भूमिका आहे. भाषा ही संवादाचे साधन आहे, संस्कृती आहे. एकाचवेळी तीन भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा. या सक्तीमुळे मुले मुलभूत ज्ञानापासून वंचित राहतील. प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे व इतर भाषांचाही आदर आहे पण भाजपाला प्रादेशीक संस्कृती व भाषा संपवायच्या आहेत. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, असे सपकाळ म्हणाले.

दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे मग महाराष्ट्रात सक्ती का? भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का? आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? असे सवाल करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भारतीय जनता पक्ष नष्ट करायला निघाले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका गँग, खोके गँग अशा गँग कार्यरत असून बीडमधील अत्याचार थांबत नाहीत. अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका तरुणीला गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. एका वकील महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न विचारून सरकारकडे थोडी लाज शरम बाकी असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी व कठोर शिक्षा करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

डिपॉझीट अभावी उपचार नाकारलेल्या दिनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास हि दोषमुक्त ?

पुणे-गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेले दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास हे ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात मात्र निर्दोष ठरले आहेत.भिसे यांच्यावरील उपाचारात दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. घैसास यांनी कुठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे नव्याने अभिप्राय मागविला आहे.

गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यावेळी दीनानाथचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे 10 लाख रुपयांची डीपॉझीट रकमेची लेखी मागणी केली. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. पण घैसास यांनी तनिषा यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीय तेथून बाहेर पडले.
दीनानाथमध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा ठपका यापूर्वीच्या आरोग्य संचालक यांच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाने 35 कोटी 48 लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याचे समोर आले होते. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीनेही वेळेत उपचार न मिळाल्याने मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला होता.यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र ससून रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली. यात महिलेच्या उपचारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा तेथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याबाबत उल्लेख नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

लाज वाटत नसेल तर स्वत:च्या वडिलांचे फोटो लावा,शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरेंनी थेट लायकीच काढली

बिहार निवडणुकीसाठी हिंदी भाषेचा विषय

मुंबई-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नासिक मधील ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडलेले नाही तर उद्धव ठाकरे यांचे विचार एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडून मांडले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची लायकी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावावे, असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची मोठी लायकी नाही. कुणाल कामरा याने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आम्हीच नाही तर त्यांचेच खासदार त्यांना साप म्हटले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आगामी काळात बिहार आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये घडलेल्या भेटीगाठी नंतरच हिंदी भाषेचा विषय समोर आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही मराठीचा विषय काढा, आम्ही हिंदीचा विषय घेतो, असे त्यांचे ठरलेले दिसते, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मराठी हे सर्वांना आलेच पाहिजे आणि ते सक्तीचे असायलाच पाहिजे, असे आमचे मत आहे. मात्र, पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हा मुलांवर दबाव टाकत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबतही आता आदित्य ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे. इतकेच नाही तर सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही त्यांनी विरोधी दर्शवला आहे.या संबंधीत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत पाण्याची समस्या ही एक मोठी समस्या आहे. भाजपने हा प्रश्न सोडवलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न सोडवलेला नाही. आम्ही याबद्दल निषेध केला, पण पोलिसांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले. कालच्या बैठकीत सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते हवामानाला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण आम्हाला हवामानाचे रक्षण करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरंवटा फिरवणारा विकास नको:राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका

मुंबई- इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, ते दिसायला छान दिसत आहेत, पण त्यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला असा विकासही नको, असे ते म्हणालेत.

महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पण आता काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने याविरोधात दंड थोपटल्यामुळे महाराष्ट्रात या मुद्यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मराठी माणसांचे अस्तित्व संपवणारा विकास आम्हाला नको

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे खूप आवश्यक आहे. नुसते भाषा दिवस साजरा करणे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसत आहे, पण यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.

आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी या शाळा आल्या. या शाळा देशभर सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. क्रांतीचा उगम म्हणतो आपण, त्यांचा इतिहास सांगता येत नाही. फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवता तुम्ही. त्याचे काय करायचे आहे? आपण इतिहासातून काय बोध घेतोय, ते शिकवणे जास्त गरजेचे आहे, असे राज ठाकरे या पॉडकास्टच्या प्रोमोत म्हणताना दिसून येत आहेत. महेश मांजरेकर यांनी हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी गुरुवारी एका पोस्टद्वारे महाराष्ट्रातील हिंदीकरणाला कडाडून विरोध केला होता. सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे ते म्हणाले होते.

नकली पिस्तूल दाखवून सोन्याचे दुकान लुटणाऱ्या ३ पैकी दोघांना पकडले

पुणे- सिंहगड रस्ता परिसरात धायरी येथील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात शिरून खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटुन नेणार्‍या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेच्या दोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने भोसरी येथून जेरबंद केले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी ससून रूग्णालयाचा आसरा घेतल्याचे देखील समोर आला आहे.

राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (40) आणि श्याम शेषेराव शिंदे (37, रा. दोघेही रा. लांडेवाडी, झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सराफाने नांदेडसिटी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती.दिनांक १५/०४/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ ते ०२.५० वा. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील श्री ज्वेलर्स, समर्थ कॉम्पलेक्स, रायकर मळा, धायरी, पुणे या नावाचे सराफ दुकानामध्ये ३ अज्ञात चोरट्याने नकली पिस्तुलाचा धाक दाखवुन दुकानातील २० लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी करुन घेवुन गेले होते. त्याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे अनोळखी ०३ इसमांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्हयाच्या तपासकामी गुन्हे शाखेकडील एकुण १२ पथके नेमण्यात आली होती, गुन्हे शाखेने कशोसीने सलग तपास करुन ४८ तासात गुन्हयामधील दोन आरोपींना अटक केली .तब्बल 80 सीसीटिव्ही फुटेज तपाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील दुचाकी सिंहगड रस्त्यावरील एका गणपती मंदिराच्या परिसरात सोडली. तेथून ते एका रिक्षात बसले. मात्र रिक्षात बसण्यापूर्वी त्यांचे चेहरे सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले. तसेच ज्या रिक्षात ते बसले त्या रिक्षाच्या मागही काढण्यात आला. ती रिक्षा ससून रूग्णालयाच्या परिसरात गेल्याचे पोलिसांना आढळले. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी जवळजवळ तासभर ससून रूग्णालयाच्या परिसरात घालवला. त्यानंतर चोरट्या मार्गाने त्यांनी भोसरी गाठली. दरम्यान आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, सहाय पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, अमंलदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली



देशात अन् जगात संपर्कासाठी हिंदी, इंग्रजी गरजेची; अजित पवारांनी केले हिंदीचे समर्थन,ज्यांना काही उद्योग नाही ते वाद घालतात या शब्दात राज ठाकरेंना टोला

मुंबई- ज्यांना काही उद्योग नाही ते वाद घालतात, देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते काही जण म्हणतात ही राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात पडायचे नाही, ज्यांना काही उद्योग नाही ते असे वाद घालतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.आणि महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, इंग्रजी ही जगात बहुतेक देशांमध्ये चालते. त्यामुळे ही देखील भाषा आली पाहिजे. पण आपली मातृभाषा असलेल्या मराठीला पहिले स्थान आहे. आज समोरच्या राजकीय पक्षांना काही राजकीय मुद्दा राहिलेला नाही. उन्हाची तीव्रता, उष्माघात असे अनेक मुद्दे आहेत. जागतिक पातळीवर 103 टक्के पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे. आता हा पाऊस पडला पाहिजे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे.

अजित पवार म्हणाले की, नाशिक दगडफेक प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आम्ही काही पक्ष म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही. जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार ते कोणत्या पक्षाचे आहे हे पोलिस पाहणार नाही. कुणीही जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याचे काही खैर नाही.

अजित पवार म्हणाले की, बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक चौकशी सुरू आहेत. या सगळ्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिपदाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. निलंबित अधिकाऱ्याच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे कुठेतरी विचार जनतेसह मिडीयाने केला पाहिजे. महिला वकीलाला जी मारहाण करण्यात आली त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश मी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी कोण जबाबदार आहे, त्याला पाठिशी घालणार नाही.

एमएनजीएलने “My MNGL” अ‍ॅप लाँच केले — ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि गॅस सेवा सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

पुणे,– महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने आपला अधिकृत मोबाइल अ‍ॅप “My MNGL” लाँच केला आहे. या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासह सर्व गॅस सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जातील.

अलीकडील काळात MNGLच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असून, त्यावर आळा घालण्यासाठी हा अ‍ॅप एक सुरक्षित, अधिकृत आणि वापरण्यास सुलभ असा उपाय ठरणार आहे.

फसवणुकीच्या घटना थांबाव्यात म्हणून MNGLने याआधी खालीलप्रमाणे विविध उपाययोजना केल्या:

आघाडीच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जनजागृतीसाठी सूचना प्रसिद्ध केल्या

SMS आणि WhatsApp मोहिमा राबवल्या

सोशल मीडियावर (Instagram, Facebook, X) फसवणूक अलर्ट्स शेअर केले

रेडिओ जिंगल्सद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला

पुणे पोलिस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली

तरीही, काही ग्राहक फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे MNGLने आपली जनजागृती अधिक तीव्र करत, “My MNGL” नावाचा एक पूर्णतः सुरक्षित आणि विश्वासार्ह अ‍ॅप ग्राहकांच्या सेवेत आणला आहे.

MNGLचे बिलिंग विभाग प्रमुख अनंत जैन म्हणाले, “ग्राहकांना सातत्याने फसवणूक करणाऱ्या कॉल्स व मेसेजेसचा त्रास सहन करावा लागत आहे, हे अतिशय दु:खद आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ‘My MNGL App’ लाँच केला आहे, जेणेकरून ग्राहक कोणत्याही जोखमीशिवाय आपले गॅस खाते डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे हाताळू शकतील.”

My MNGL अ‍ॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे:

MNGL शी संबंधित सर्व सेवा एका ठिकाणी

अधिकृत व खात्रीशीर माहिती आणि संप्रेषण

फसवणुकीपासून सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार

MNGLकडून सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, फक्त अधिकृत अ‍ॅप स्टोअरवरूनच “My MNGL” अ‍ॅप डाउनलोड करा, आणि कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नका.

“My MNGL” अ‍ॅप आजच डाउनलोड करा आणि तुमच्या गॅस सेवांवर सुरक्षितपणे नियंत्रण मिळवा!

वीजबचत; अशी करा ताजवीज

वीज ही मूलभूत झालेली आहे. दैनंदिन कामे किंवा एकूणच जीवनमान हे विजेवरच अवलंबून आहे अशी स्थिती आहे. विजेची गरज वाढल्याने स्वाभाविकच वीज वापर वाढत आहे. साधारणतः उन्हाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी वीज बिलांची रक्कम वाढत जाते. तथापि, विजेचा अनावश्यक वापर टाळून किंवा काही सोपे व साधे उपाय करून केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर आपण विजेची व पर्यायाने आर्थिक बचत करू शकतो. घरामध्ये आवश्यक अनेक उपकरणांना वीज आवश्यक असली तरी ते योग्यप्रकारे वापरले तर वीज बचत होऊ शकते.

वीजबिलात वाढ करणारे उपकरणे– घरातील पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वॉशिंग मशीन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव ओवन, ज्यूसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, संगणक, चार्जर, व्हॅक्यूम क्लिनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीज बचतीच्या जाणीवेने वापरली तर वीज बचतीला निश्चितच मोठा वाव आहे अन् उपायही खूपच साधे आहेत.

एअर कंडिशनरवर नियंत्रण– सर्वाधिक वीज लागणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यात एसीचा मोठा वाटा आहे. या एसीला पंख्यापेक्षा नऊ पट अधिक वीज लागते. त्यामुळे आवश्यकतेनुसार एसी वापरता येईल. एसीचे नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरु असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. एसी वापरायचा असल्यास गारवा निर्माण झाला की एसी बंद करावा व त्यावेळी शक्यतो पंखाच वापरावा.

रेफ्रिजरेटर– घरात वर्षभर जेवढी वीज वापरलेली असते त्यात सुमारे २५-३० टक्के वाटा हा फक्त एकट्या रेफ्रिजरेटरचा असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात फ्रिजचा दरवाजा सतत उघडावा लागला तर आतील तापमान वाढत जाते आणि शीतकरणासाठी विजेचा वापर जास्त होतो. त्यामुळे फ्रिजमधून एकामागे एक भाजी किंवा पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकाच वेळी काढावेत. सतत फ्रिजचे दरवाजे उघडल्यास विजेचा वापर वाढतो.

एलईडी बल्बचा वापर- घरातील ४० किंवा ६० वॅटचे जुने पारंपरिक विजेचे दिवे (बल्ब) व ट्यूबलाईट त्वरीत बदलून त्याठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी बल्ब लावण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एलईडी (लाईट एमिटिंग डायोडस्) हे कमीत कमी वीज खर्च करणारे बल्ब आहेत. पारंपरिक विजेच्या बल्बचे आयुष्य सुमारे ५ हजार तास असते. याउलट एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. सोबतच एलईडी बल्ब वापरल्यास ४० किंवा ६० वॅट क्षमतेच्या बल्ब व ट्यूबलाईट्च्या तुलनेत सुमारे ८० टक्के वीजबचत होऊ शकते. घरातील बाथरूम किंवा बेडरूमध्ये ‘झिरो’ बल्बचा पूर्वीपासूनच वापर होत आहे. हा ‘झिरो’ म्हणजे पारंपरिक बल्ब तब्बल १५ वॅटचा असतो. त्यामुळे या बल्बऐवजी आता कमी वॅटचे एलईडीचे बल्ब लावता येईल. बाजारात एक वॅट, तीन वॅटमध्ये देखील एलईडी बल्ब उपलब्ध आहेत.

उपकरणे ‘अनप्लग’ करा– उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाच्या तडाख्यामुळे बहुतांश वेळ हा घरातच घालवला जातो. त्यामुळे टिव्ही, संगणक किंवा मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गेम्स किंवा चित्रपटांसाठी जादा वेळ सुरु राहतात. संगणक किंवा मोबाईलच्या चार्जिंगचा वेळ वाढतो. घरातील लहानथोरांच्या मनोरंजनासाठी सध्या हे उपकरणे महत्वाचे आहेत. मात्र ज्यावेळी हे सर्व उपकरणे वापरात नसतील तेव्हा ते बंद करताना अनप्लग करणे महत्त्वाचे आहे. वापरात नसतानाही टीव्ही, संगणक आणि चार्जर किंवा अन्य उपकरणे स्टॅण्डबायवर असल्यास वीज वापरतात. त्यामुळे ही उपकरणे स्टॅण्डबायवर ठेवू नका तर ती अनप्लग करणे वीज बचतीसाठी आवश्यक आहे.

सूर्यप्रकाशाचा वापर- विजेच्या बचतीसाठी भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे आहे. सूर्यप्रकाशाचा घरात कसा वापर करता येईल यासाठी उपाययोजना करता येतात. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विविध विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्वाचा पंखा आहे. ज्या उपकरणांमध्ये कॉईलचा वापर केला जातो ते सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात विजेचा पंखा आघाडीवर आहे. त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे वीज बचतीसाठी योग्य ठरते.

इतर काही उपकरणे- मायक्रोवेवमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे २५ अंश सेल्सिअस तापमान खाली येते व तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते. सिलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरलेला बरा. योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वाशिंग मशीन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते. आंघोळीसाठी गरम पाणी लागत असल्यास आंघोळ होईपर्यंत गिझर सुरु ठेवणे हे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य. सद्यस्थितीत वेगवेगळी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये कमीत कमी चार एनर्जी स्टार असलेले उपकरणे खरेदी केल्यास ५० टक्के विजेच्या बचतीची संधी आहे.

मोफत वीज व वीज उत्पादक होण्याची संधी- घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. छतावरील सौर प्रकल्पांतून वीजग्राहकांच्या गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.

लेखक – निशिकांत राऊतउपमुख्य जनसंपर्क अधिकारीमहावितरणपुणे.

रुहान आणि सिद्धांत कपूरच्या गायनाने मंत्रमुग्ध झाले बॉलीवूडचे दिग्गज कलाकार

आयटीएसएफ पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने, दिग्गज गायक महेंद्र कपूर यांचा मुलगा, गायक-अभिनेता रुहान कपूर आणि नातू, संगीतकार आणि गायक सिद्धांत कपूर यांच्या मनमोहक सादरीकरणाने स्टार-स्टड प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

वाय.बी. चव्हाण सभागृहात आयटीएसएफ पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन दत्तात्रय माने यांनी केले होते. त्यांनी रूहान कपूर आणि सिद्धांत कपूर यांना ‘सन्माननीय पाहुणे’ म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कपूर कुटुंबाबद्दल मनापासून कौतुक केले आणि त्यांच्या भाषणात त्यांच्या गौरवशाली वारशाला आदरांजली वाहिली.
अनुप जलोटा, सुदेश भोसले आणि हर्षदीप कौर यांसारखे प्रसिद्ध भारतीय गायक, उषा नाडकर्णी, विंदू दारा सिंग, महेश मांजरेकर, दिव्यंका त्रिपाठी आणि निकितिन धीर यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांसह – चित्रपट आणि संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांसह – रुहान कपूर आणि सिद्धांत कपूर यांच्या मनमोहक सादरीकरणाचे साक्षीदार होण्यासाठी जमले होते, जे दिग्गज गायक महेंद्र कपूरचा समृद्ध वारसा पुढे नेत होते.
नुकतेच आपण गमावलेले दिग्गज चित्रपट निर्माते मनोज कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून, रुहान कपूरने ‘है प्रीत जहाँ’ सादर केले ज्यामुळे प्रेक्षकांना देशभक्तीच्या भावनेने आनंद झाला. त्यांच्या सादरीकरणानंतर लगेचच सभागृहात ‘जय हिंद’चा जयघोष झाला. रुहान लंडनमधील रॉयल अल्बर्ट हॉल आणि वेम्बली अरेना, व्हँकुव्हरमधील द सेंटर, दुबईतील एमिरेट्स ऑडिटोरियम आणि पॅरिसमधील पॅलेस गार्नियर यासह जगभरातील काही प्रतिष्ठित ठिकाणी लाईव्ह शो करत आहे. लाईव्ह कॉन्सर्टमधील त्यांचा व्यापक अनुभव या आदरणीय प्रेक्षकांसाठी त्यांच्या चित्तथरारक कामगिरीद्वारे स्पष्ट झाला.
सिद्धांतने त्याच्या आजोबांच्या ‘चलो एक बार फिर से’ आणि ‘नीले गगन के तले’ या प्रतिष्ठित गाण्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. दिग्गज गायक सुदेश भोसले यांनी प्रेक्षकांना सांगितले की, “सिद्धांतने गाणे सुरू करताच मला तरुण महेंद्र कपूरजींची आठवण झाली.” सिद्धांतची ओळख करून देताना सूत्रसंचालकांनी सांगितले की सिद्धांतने लहानपणापासूनच त्याचे आजोबा आणि त्याच्या वडिलांकडून संगीत शिकले आहे. भारतीय शास्त्रीय संगीत शिकण्याव्यतिरिक्त, सिद्धांतने पाश्चात्य संगीताचाही अभ्यास केला आणि लंडनमधील प्रतिष्ठित ट्रिनिटी लबान कॉलेज ऑफ म्युझिकमधून संगीत रचनामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तो चित्रपटांसाठी तसेच ओटीटीसाठी विविध आंतरराष्ट्रीय संगीत प्रकल्पांवर काम करत आहे. सिद्धांतने अलीकडेच ‘हाऊ म्युझिक इज मेड’ नावाची सोशल मीडिया मालिका सुरू केली आहे, ज्यामध्ये ६०-९० सेकंदांच्या आकर्षक रीलद्वारे संगीत रचनांच्या सर्जनशील प्रक्रियेचा पडद्यामागील देखावा देण्यात आला आहे. संगीत कसे जीवनात येते यामागील रहस्ये उलगडण्यास उत्सुक असलेल्या संगीत रसिकांनी या मालिकेचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.


कार्यक्रमाचा शेवट भारतातील सर्वात प्रतिष्ठित देशभक्तीपर गाण्यांपैकी एक, ‘मेरे देश की धरती’, रुहान आणि सिद्धांत यांच्या सादरीकरणाने झाला. मान्यवरांनी मंचावर येऊन एकता आणि अभिमानाचा एक हृदयस्पर्शी क्षण सादर केला. या उत्साही सादरीकरणाने प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि कार्यक्रमाचा शेवट उत्साहात झाला!

पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची ऑनलाइन विक्री 95% वाढली

पाळीव प्राण्यांसाठी पोषणतत्त्वांनी समृद्ध अन्नकॉस्मेटिक्स आणि हायजीनसाठी उत्पादनांची वाढती आवड ऑर्डर व्हॉल्युमला चालना देत आहे ~

कॅट आणि डॉग ब्रॉथचिकन स्टिक्सबेकन स्ट्रिप्सडेशेडिंग कंडिशनर्ससिरमडीप क्लीनिंग शॅम्पूज आणि ट्रिमर्स यांसारख्या उत्पादनांची मागणी वाढली आहे ~

मेट्रोपॉलिटन आणि टियर-1 शहरांमध्ये ऑर्डर व्हॉल्युममध्ये 120% पेक्षा जास्त वार्षिक वाढ आहे ~

टियर-II आणि टियर-III शहरांमधील पाळीव प्राणी पालकांनी क्रमशः 75% आणि 60% वार्षिक ऑर्डर व्हॉल्युम वाढीस मदत केली आहे ~

ब्रँड वेबसाइट्सवर प्रीपेड ऑर्डर्समध्ये 300% पेक्षा जास्त वाढकॅशऑनडिलिव्हरी ऑर्डर्स ऑनलाइन मार्केटप्लेसवर 200% वाढल्या आहेत ~

नवी दिल्लीपाळीव प्राणी पालनाच्या वाढत्या ट्रेंडमुळे पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. भारताने या वर्षीचा नॅशनल पेट्स डे साजरा केला, त्याच वेळी युनिकॉमर्सने 2025 आर्थिक वर्षातील पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांचे खरेदी ट्रेंड्स जाहीर केले आहेत.

युनिकॉमर्सच्या प्लॅटफॉर्मवरील प्रक्रियेत आलेल्या व्यवहारांनुसार, 2025 आर्थिक वर्षात पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांची ऑनलाइन ऑर्डर व्हॉल्युम 2024 आर्थिक वर्षाच्या तुलनेत 95% वाढला आहे, जो या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राला अधोरेखित करतो.

पाळीव प्राणी देखभाल उत्पादनांमध्ये पाळीव प्राण्यांचे अन्न, ज्यात नियमित अन्न आणि विशेष आहार उत्पादनं, प्रतिबंधात्मक देखभाल उत्पादने आणि औषधे, पाळीव प्राणी कपडे आणि अॅक्सेसरिज, खेळणी आणि ग्रुमिंग उपकरणे यांचा समावेश होतो.

नव्या युगातील डिजिटल-फर्स्ट ब्रँड्समुळे ऑनलाइन पाळीव प्राणी देखभाल बाजारात जबरदस्त वाढ झाली आहे. कुत्रे, मांजरी, मासे आणि पक्ष्यांसाठी प्रीमियम आणि वैयक्तिक गरजेनुसार तयार केलेली उत्पादने बाजारात आली असून, त्यामुळे हा वाढता ट्रेंड दिसून येतो.

युनिकॉमर्सच्या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, अलीकडेच ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर विविध नैसर्गिक आणि सेंद्रिय पाळीव प्राणी अन्न, तसेच प्रोबायोटिक्स, ओमेगा फॅटी अॅसिड्स आणि अँटीऑक्सिडंट्ससारख्या सप्लिमेंट्स असलेले थेरप्युटिक अन्न यांसारखी उत्पादने लोकप्रिय ठरत आहेत. यातून हे स्पष्ट होते की, पाळीव प्राणी मालक त्यांच्या प्राण्यांच्या आरोग्याला आणि प्राणीप्रेमाला अधिक प्राधान्य देत आहेत, ज्यामुळे उच्च-गुणवत्तेच्या आणि विशेषीकृत पाळीव प्राणी उत्पादनांची मागणी वाढत आहे.

युनिकॉमर्स भारतातील काही आघाडीच्या पाळीव प्राणी देखभाल ब्रँड्सना तांत्रिक पाठबळ पुरवत आहे, ज्यामध्ये Zigly, Just Dogs, Petwale, Pet Snugs, Pawpourii, Petedge आणि Pawpular Pets यांचा समावेश आहे.

तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पाळीव प्राणी ब्रँड्स त्यांच्या अधिकृत वेबसाइट्सवर अधिक विस्तृत उत्पादनांची श्रेणी आणि वैयक्तिकृत खरेदीचा अनुभव ग्राहकांना देत आहेत. या उत्पादनांमध्ये कस्टमाइज्ड पाळीव प्राणी कपडे, पट्टे आणि कॉलर, नेम टॅग्स, खास बेडिंग आणि चटया यांचा समावेश होतो. अनेक ब्रँड्स सबस्क्रिप्शनआधारित सेवाही देतातज्यामध्ये नियमितपणे वैयक्तिक आहार योजनाऔषधांची घरपोच डिलिव्हरी आणि इतर पशुवैद्यकीय सेवा समाविष्ट असतात. या विश्लेषणात असे आढळून आले आहे की, पाळीव प्राणी पालक आता ऑनलाइन मार्केटप्लेसपेक्षा थेट ब्रँड वेबसाइट्सवरून खरेदी करण्याकडे अधिक कल दर्शवत आहेत.

एक अन्य निरीक्षण असे दर्शवते की, आर्थिक वर्ष 2025 मध्ये ब्रँड वेबसाइट्सवर प्रीपेड ऑर्डरच्या संख्येत वर्षभरात 300% पेक्षा अधिक वाढ झाली, तर त्याच कालावधीत ऑनलाइन मार्केटप्लेसवर ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ (COD) ऑर्डरमध्ये 200% पेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली.

पाळीव प्राणी पालनाचा हा ट्रेंड आता केवळ उच्च उत्पन्न गटातील आणि अनेक पाळीव प्राणी ठेवण्याची आवड असलेल्या सुस्थित वर्गापुरता मर्यादित राहिलेला नाही. हा ट्रेंड आता मध्यम उत्पन्न गट, मिलेनियल्स आणि Gen-Z या पिढ्यांमधील पाळीव प्राणीप्रेमींमुळेही वेगाने वाढत आहे.

पाळीव प्राणी पालनाची संस्कृती आता केवळ मेट्रोपॉलिटन आणि टियर I शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. या शहरांमध्ये आर्थिक वर्ष 2025 दरम्यान ऑर्डर व्हॉल्युममध्ये 120% पेक्षा अधिक वाढ नोंदविली गेली. टियर II आणि टियर III शहरांमध्येही अनुक्रमे 75% आणि 60% इतकी लक्षणीय वाढ झाली आहे, जी या भागांमधील ग्राहकांचा प्रीमियम पाळीव प्राणी उत्पादने खरेदी करण्याकडे वाढलेला कल दर्शविते.

आर्थिक वर्ष 2025 दरम्यान मेट्रोपॉलिटन आणि टियर I शहरांमधील प्रमुख मागणी केंद्रांमध्ये मुंबई, बेंगळुरू, पुणे, दिल्ली, हैदराबाद आणि गुरगाव यांचा समावेश होता. टियर II शहरांमध्ये इंदूर, नागपूर, सुरत, राजकोट, वडोदरा आणि लखनऊ येथेही पाळीव प्राणी उत्पादने खरेदीसाठी लक्षणीय मागणी दिसून आली. टियर III शहरांमध्ये ठाणे, पणजी, एर्नाकुलम, गांधीनगर, उडुपी आणि रूपनगर येथेही पाळीव प्राणी काळजीसंबंधित उत्पादने खरेदीसाठी वाढती मागणी नोंदविली गेली.

झिगली ही भारतातील पहिली खऱ्या अर्थाने ओम्नीचॅनेल पाळीव प्राणी काळजी इकोसीस्टिम आहे, याचा आम्हाला अभिमान आहे,” असे झिगलीचे IT प्रमुख अंकुर गुप्ता यांनी सांगितले. पाळीव प्राणी पालकत्व नव्या उंचीवर पोहोचत असतानाआजच्या पाळीव प्राणी कुटुंबांसाठी अखंडशेवटपर्यंतचा अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा आधार ठरत आहेयामध्ये युनिकॉमर्सबरोबरची आमची भागीदारी आमचे हेच वचन पक्के करते. ती आमच्या ऑपरेशनल कार्यक्षमतेत वाढ करून ग्राहकाचा खरेदीनंतरचा प्रवास अधिक सुलभ करते,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.

जस्ट डॉग्सचे संस्थापक आशीष अँथनी म्हणाले, आम्ही पाळीव प्राणी पालकांसाठी एक अशी कम्युनिटी उभारत आहोतजी त्यांना त्यांच्या पाळीव प्राण्यांच्या गरजा समजून घेण्यास आणि शिकण्यास मदत करेलआमच्या व्यवसायात तंत्रज्ञानाचा गाभा असतानाआम्ही आमच्या ओम्नीचॅनेल कार्यपद्धतीचा विस्तार करत आहोत, जेणेकरून ग्राहकांच्या वाढत्या गरजा सहजपणे पूर्ण करता येतीलयुनिकॉमर्स आमच्या ऑनलाइन ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असूनदेशभरात आमच्या उत्पादनांची स्वयंचलित पूर्तीप्रक्रिया सुनिश्चित करण्यात ते आम्हाला सहकार्य करत आहेत.’’

पाळीव प्राणी काळजी उद्योगातील बदलत्या ट्रेंड्सबद्दल बोलताना युनिकॉमर्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल माखिजा म्हणाले, ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर पाळीव प्राणी निगा राखणाऱ्या उत्पादनांबाबत ग्राहकांची वाढती आवड पाहून आम्हाला अत्यंत आनंद होत आहेआमचे तंत्रज्ञान हे विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ब्रँडसाठी एक मजबूत आधारव्यवस्था म्हणून कार्य करतेज्यामुळे त्यांना वाढ साधता येते आणि या सतत विकसित होणाऱ्या बाजारपेठेत ग्राहकांचा विश्वास अधिक मिळविता येतो.

राज्याच्या उत्पादनक्षमतेत भर घालणारी रस्त्यांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

पुणे, दि. १७: औद्योगिक क्षेत्रे, विमानतळ, बंदरे, पर्यटनस्थळे आदींना जोडणाऱ्या आणि राज्याच्या उत्पादन क्षमतेत वाढ होईल अशा प्रकारे रस्त्यांच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवून कामे हाती घ्यावीत, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

सार्वजनिक बांधकाम पुणे प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता अतुल चव्हाण, पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, सोलापूर मंडळाचे एस. एस. माळी, सातारा मंडळाचे एस. बी. रोकडे, कोल्हापूर मंडळाचे तुषार बुरुड, दक्षता व गुण नियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेंद्र कंकरेज यांच्यासह विभागातील कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

राज्यात औद्योगिक गुंतवणूक, परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी राज्यशासन मोठ्या प्रमाणात काम करीत आहे, असे सांगून मंत्री श्री. भोसले म्हणाले, राज्याच्या प्रगतीला गती देण्यासाठी रस्त्यांचे जाळे वाढणे महत्त्वाचे असते. त्यादृष्टीने प्राधान्यक्रम ठरवून नवनवीन रस्ते प्रकल्प हाती घ्यायचे आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमानुसार रस्ते, इमारतींच्या कामांचे लक्ष्य गाठतानाच त्यांची गुणवत्ता, अधिकार क्षेत्रातील इमारतींची स्वच्छता, व्यवसायस्नेही वातावरण निर्मिती आदींवर लक्ष द्यावे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे पुनुरुज्जीवन करण्याबाबत टप्प्याटप्प्याने काम हाती घ्यावयाचे आहे, या किल्ल्यांना रस्त्यांची जोडणी करायची असून पर्यटक अधिक काळ तेथे थांबतील यादृष्टीने पायाभूत सुविधा व आकर्षणकेंद्रे निर्माण कशी करता येतील याबाबत अभ्यास करावा. पर्यटन हा मोठा रोजगार देणारा उद्योग असून राज्यात या क्षेत्राच्या विकासाला मोठा वाव आहे. त्यासाठी महत्त्वाची पर्यटनस्थळे मोठ्या रस्त्यांनी जोडणे आवश्यक असून त्या दृष्टीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

रस्ते, सार्वजनिक इमारतींची कामे करताना त्यांच्या दर्जाला सर्वाधिक महत्त्व द्यावे. त्यासाठी नियमित संनियंत्रण करावे. रस्त्यांच्या कडेला, इमारतील वृक्षारोपणासाठी येथील हवामानात वाढणाऱ्या स्थानिक प्रजातींना महत्त्व द्यावे. सातारा जिल्ह्यातून महाबळेश्वर येथे आणि कोकणात जाताना वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्गाचे सर्वेक्षण करावे, असे निर्देशही श्री. भोसले यांनी दिले.

यावेळी मुख्य अभियंता श्री. चव्हाण यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे विभागाचा आढावा दिला. रस्त्यांचे खड्डे असल्यास त्याची माहिती विभागाला कळविण्यासाठी ‘पॉटहोल कंप्लेंट रिड्रेसल सिस्टीम (पीसीआरएस)’ हे मोबाईल ॲप तयार करण्यात आले असून विभागाच्या संकेतस्थळावर, अँड्रॉईड प्ले-स्टोअर तसेच भारत सरकारच्या एमसेवा पोर्टलवरदेखील ते उपलब्ध करण्यात आल्याचे सांगितले.

बैठकीदरम्यान छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू येथील समाधीस्थळ आणि तुळापूर बलिदान स्थळ विकास आराखड्यातील कामांचे चित्रफीतीद्वारे सादरीकरण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सद्यस्थितीत ‘हायब्रीड ॲन्युईटी मॉडेल अर्थात हॅम’, आशियाई विकास बँक (एडीबी), नाबार्ड, केंद्रीय मार्ग निधी योजना तसेच अर्थसंकल्पित निधीतून सुरू असलेली रस्ते, पुलांची कामे, भविष्यातील नियोजन, सुरु असलेल्या इमारतींची कामे, नाविन्यपूर्ण योजना आदींबाबतही यावेळी सादरीकरण करण्यात आले.

पुणे शहरातील तसेच शिक्रापूर, चाकण तळेगाव रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित महत्त्वाकांक्षी असा शिरूर-खेड-कर्जत-पनवेल रस्ता तसेच लोणावळा येथे प्रस्तावित सार्वजनिक बांधकाम प्रशिक्षण व संशोधन प्रबोधिनीबाबत सादरीकरण करण्यात आले.

ईव्हीएम फ्रॉड पासून कराडच्या एन्काऊंटरबाबत दावा करणाऱ्या सस्पेंड PSI रणजीत कासलेंना स्वारगेटच्या हॉटेलमधून अटक

सोशल मीडियावर व्हिडिओमधून थेट CM आणि एसपींवर‎ आरोप
पुणे- निलंबित झालेला पोलिस ‎उपनिरीक्षक रणजित कासले शरण‎ आला नसतानाच त्याला पुण्यातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. निलंबनानंतर‎ त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ ‎टाकून थेट मुख्यमंत्री आणि एसपींवर‎ आरोप केले होते. वाल्मीक कराडच्या ‎एन्काऊंटरसाठी आपल्याला 50 कोटींची ऑफर ‎मिळाल्याचा दावाही त्याने केला‎ होता. त्यानंतर आपण शरण जाणार असल्याचेही त्याने म्हटले होते. मात्र, तो शरण आला नव्हता. अखेर कासले याला स्वारगेट येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले कालच पुण्यात दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक मोठे दावे केले होते. मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी दिले होते, असा दावा कासले यांनी केला आहे. तसेच एन्काउंटरची सर्व चर्चा बंद दाराआड झाली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले होते.

रणजित कासले काल पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते की, पुण्यात मी शरण जाण्यासाठीच आलो आहे. मी अजून 15 दिवस जरी गेलो असतो तरी मला कोणी पकडले नसते. परंतु मी माझ्या मित्रांशी बोलून हा निर्णय घेतला आहे. बीडला जाऊन मी शरण जाणार आहे. पुणे पोलिसांना तशी मी विनंती केली आहे की मला संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या स्वाधीन करावे. दिल्लीत असताना मी पबमध्ये, लाल किल्ल्यात सगळीकडे जाऊन आलो. दिल्लीत असताना मी केंद्र स्तरावर ईव्हीएमवर चर्चा केली आहे.

वाल्मीक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई येथे जात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपन्यातून माझ्या अकाउंटला दहा लाख आले त्यातले सात लाख साडेसातला परत केले उरलेल्या अडीच लाखात माझे जे काही आहे ते सगळं करतोय. हे जे अडीच खर्च करतोय ते सुद्धा मी प्रामाणिकपणे परत करणार आहे. हे पैसे ईव्हीएम पासून दूर राहण्यासाठी होते जे काही ईव्हीएमला छेडछाड होईल ते दूर राहून गप्प बसून बघत राहायचं यासाठी हे पैसे पाठवण्यात आले होते.

पुढे बोलताना रणजित कासले म्हणाले होते की, माझ्या खात्यात ईव्हीएम आणि धनंजय मुंडे यांच्यापासून दूर राहण्यासाठी पैसे दिले होते. कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दारामागे करण्यात आली होती. परळीमध्ये माझी आणि वाल्मीक कराडची भेट झाली होती. बोगस एनकाऊंटर म्हणजे काय तर मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री सोबत येऊन चर्चा करतात, त्यानंतर एनकाऊंटर केला जातो, जसा अक्षय शिंदेचा करण्यात आला. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकारी कराडचे हस्तक असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

माझ्यावर चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात आली. एडीजी निखिल गुप्ता यांनी मला सहा तासांच्या आत निलंबित केले. कारवाईचे पत्र यायला 48 तास लागतात. पण सहा तासांत माझी चौकशी केली आणि मला निलंबित केले. माझ्या सात वर्षांत एकूण सात बदल्या झाल्या आहेत. दोन वर्षांत माझ्या या बदल्या झाल्या आहेत. मला ज्युनिअर तुकाराम मुंडे करण्यात आले, असा दावा कासले यांनी केला होता.

पुणे पोलिसांनी संरक्षण देऊन बीड पोलिसांकडे सोपवावे अशी मागणी

बीडमधील निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले रात्री 9 वाजता पुण्यात येणार असल्याचे त्यांनी सोशल मीडियातून जाहिर सांगितले होते. तसेच पुणे पोलिसांनी संरक्षण देऊन बीड पोलिसांकडे आपल्याला सोपवावे, अशी मागणी देखील रणजित कासले यांनी सोशल मीडियात या व्हिडिओच्या माध्यमातून केली होती.निलंबित पोलिस अधिकारी रणजित कासले यांनी गेल्या काही दिवसात व्हिडिओच्या माध्यमातून अनेक खळबळजनक आरोप केले होते. वाल्मीक कराडला मारण्याची सुपारी देखील आपल्याला देण्यात आली होती, असा दावा देखील रणजित कासले यांनी केला होता. याच सोबत धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक गंभीर आरोप त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केले होते. त्यानंतर आणखी एक व्हिडिओ शेअर करत रणजित कासले यांनी बीड पोलिसांना आपल्याला पकडून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले होते. त्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ शेअर करत आपण स्वतःहून पोलिसांना शरण येणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, ते शरण आले नव्हते.

व्हिडिओमध्ये काय म्हणाले होते रणजित कासले?

रणजित कासले हे आता पोलिसांना शरण येणार आहेत. दिल्ली येथून विमानाने पुण्यात रात्री 9 वाजता पोहोचणार आहेत. रणजित कासले म्हणाले, मी दिल्ली एयरपोर्टला आहे आणि माझी फ्लाइट लेट झाली होती. सव्वा तीन वाजताची होती. पण ती आता पावणे सातची आहे. 9 वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो. मी एवढा वेळ खरे सांगत नव्हतो. परंतु आता आतमध्ये एंट्री झालेली आहे, चेकिंग झालेली आहे. बोर्डिंग पास घेतलेला आहे. अगोदरच बरोबर साम टीव्हीने ओळखले होते मला की मी दिल्लीमध्ये आहे. त्यांनी सकाळीच माझे लोकेशन पोलिसांना देऊन टाकले होते. तर येतोय मित्रांनो पुण्यात. जेव्हा येईल मी पुण्यात, तेव्हा अटक करा मला गुन्ह्यात. माझी एक विनंती प्रशासनाला व पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावे आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावे मला, ही माझी पुणे पोलिसांना विनंती आहे, असे ते म्हणाले होते. मात्र, त्या आधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

‘दगडूशेठ’ गणपतीला ५० लाख मोग-यांचा पुष्पनैवेद्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजन ; अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे वासंतिक उटीचे भजन

पुणे : मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या ५० लाख फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांनी सजलेल्या गाभा-यातील गणरायाचे रुप अधिकच मनोहारी दिसत होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उपाध्यक्ष डॉ. रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, माणिक चव्हाण, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी तब्बल १४० महिला व ८० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ३००० गुलाब बंडल, १५०० लिली बंडल, १४०० किलो झेंडू, १५०० किलो शेवंती, १००० किलो गुलछडी, २० हजार चाफा, १०० किलो गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

४७३ वाहने स्क्रॅप करून महापालिकेने मिळविले ८.१३ कोटी

पुणे- महानगरपालिकेच्या मालकीची १५ वर्षे आयुर्मान संपलेली एकूण ४७३ वाहने केंद्र सरकारच्या सन २०२१ च्या वाहन निरस्त करावयाच्या धोरणानुसार निरस्त करण्यात आली होती. सदर वाहनांच्या विक्रीसाठी पुणे मनपाच्या अपसेट कमिटीने एकत्रित र.रू ६.३३ कोटी इतकी अपेक्षित रक्कम निर्धारित केली होती.या वाहनांचा दि. २५/०३/२०२५, दि.२८/०३/२०२५ व ०३/०४/२०२५ रोजी एमएसएसटीसी ई कॉमर्स या वेब पोर्टलद्वारे इ-लिलाव करण्यात आला असून सदर लिलाव प्रक्रियेमध्ये रजिस्टर व्हेईकल स्क्रैपिंग फॅसिलीटी असणाऱ्या तीन कंपन्या सहभागी झाल्या होत्या. या तीन कंपनीच्या माध्यमातून सदर वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. सदर लिलाव प्रक्रियेत पुणे मनपास जीएसटी सह एकूण र.रू. ८.१३ कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले असून तीनही कंपन्याद्वारे सदरची रक्कम महानगरपालिकेच्या कोषागारात जमा केलेली आहे.
या वाहनांची संबंधित कंपन्याना डिलीव्हरी देण्याची प्रक्रीया दोन दिवसात सुरू होणार आहे. सद्यस्थितीत सदर वाहने एच एम पार्किंग, कोंढवा येथील सुमारे ४.५ एकर जागेवर उभी करण्यात आली असून सदर वाहनांमुळे स्थानिक शाळा व रहिवासी वसाहत यांना होत असलेल्या त्रासाबाबत पुणे महानगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत होत्या, सदर वाहने डिलीव्हरीची प्रक्रिया पूर्ण झालेनंतर सदर जागा पूर्णपणे मोकळी होणार असून त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास पूर्णतः बंद होणार आहे.

राज्यातील बालिका आणि बालक आश्रमांचा सर्व्हे करून अवैध आश्रमांवर कठोर कारवाई करा … उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी खडवली येथील लैंगिक अत्याचार प्रकरणी ठाणे जिल्हा महिला व बालविकास विभागाला भेट देत, शासकीय निरीक्षण गृहाची केली पाहणी

संस्थेतील संशयास्पद नोंदींची चौकशी करा; बालिका आश्रमांवर देखरेख वाढवण्याचे निर्देश

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील खडवली येथील लहान मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणाची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ दखल घेतली आहे. त्यांनी आज स्वतः उल्हासनगर येथील ठाणे जिल्हा महिला व बाल विकास विभागाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली.

या प्रकरणातील पीडित २० मुली आणि ९ मुले यांची त्यांनी शासकीय निरीक्षणगृहात जाऊन प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. याप्रकरणी भा.न्या. संहिता २०२३ चे कलम ६૪ (१), ६५(૨), ७૪, ११૮(२), ३(५), बालकांचे लैंगिक अपराधापासुन संरक्षण अधि.२०१२ चे कलम ४,६,८, सह अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधि. २०१५ चे कलम ४२,७५,८२(१) प्रमाणे पाच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या वेळी डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. याप्रकरणी शासनाची भूमिका अत्यंत गंभीर असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकील नेमले जातील.”

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातील पीडित मुलींच्या पुढील शिक्षणाची आणि पुनर्वसनाची जबाबदारीही लक्षात घेतली असून, “मुलांचे शिक्षण खंडित होता कामा नये. त्यांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे. मुली व मुलांना कुठे राहायचे आहे, याबाबत बाल न्यायालय निर्णय घेईल,” असे त्या म्हणाल्या.

तसेच, जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या शाळांमध्ये एकच पत्ता असलेली मुले आढळल्यास, त्या ठिकाणी अवैध बालिका आश्रम आहेत का, हे तपासून पाहण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

“पसायदान संस्थेत जिथे पीडित मुलं राहत होते तिथे प्रत्येक मुलाचा पत्ता ‘रेल्वे स्टेशन’ असा नमूद आहे, हे अत्यंत संशयास्पद आहे. ही मुले खरंच स्टेशनवर राहत होती का? की संस्थाचालकांनी मुद्दाम चुकीची माहिती दिली आहे?” असा सवाल करत त्यांनी पोलिसांना या सगळ्या बाबींची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

महानगरपालिका आणि महिला विभागांशी समन्वय

या मुद्द्यांवर उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री. स्वामी, महिला व बालविकास विभागाच्या सुवर्णा पवार, अधिकारी संतोष भोसले, तसेच समुपदेशकांशी संवाद साधून त्यांनी माहिती घेतली. याच दरम्यान, उल्हासनगरमधील इतर बालिकाश्रमांची चौकशी करण्याची विनंतीही त्यांनी आयुक्तांना केली आहे.

या प्रकरणाच्या अनुषंगाने उल्हासनगर शहरातील इतर सामाजिक प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा करून येत्या महिन्यात आढावा बैठक घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

मुलींच्या सशक्तीकरणासाठी पुढाकार

महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “या मुलींच्या मार्गदर्शनासाठी ऑनलाइन बैठकांचे आयोजन करा, त्यांच्याशी सतत संपर्कात रहा. बालिका आश्रमातून वातावरणामुळे काही वेळेस मुली पळून जातात त्यांना मानसिक सशक्तिकरणाची गरज असते. त्यामुळे त्यांच्यासाठी मन रमेल असे सांस्कृतिक व सृजनशील कार्यक्रम आयोजित करा.”

त्यांनी हेही सुचवले की, समुपदेशक यांनी मुलांमुलींनी सांगितलेली घटना डायरीत लिहून त्याची प्रत CWC, पोलीस व महिला बालविकास विभागाकडे सादर करावी. दोष सिद्धीचे प्रमाण वाढावे यासाठी बी-समरी रिपोर्ट्सची तपासणी व सक्षम वकिलांची नेमणूक गरजेची आहे. “सीसीटीव्ही मॉनिटरिंग योग्य पद्धतीने केल्यास असे प्रकार टाळता येतील,” असेही त्या म्हणाल्या.