भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश भाजपाचे अभिनंदन
22 एप्रिल पर्यंत एक लाख बुथ समित्यांचे गठन करण्याचे उद्दिष्ट
मुंबई/पुणे – संघटन पर्वाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे, अशा शब्दांत भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा.अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व यशस्वी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खा. सिंह बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. सदस्य नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी श्री. सिंह म्हणाले की, पक्षाच्या 70 टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून 22 एप्रिलपर्यंत 1 लाखा पर्यंत बूथ समित्या गठन करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये 12 सदस्य असतात म्हणजेच 12 लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल. संघटन सर्वोपरि या विचारधारेने कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत लोकशाही असून सामुहिक निर्णय आणि परस्पर संवाद ही दोन वैशिष्ट्ये आहेत. संघटनशक्तीला बळ देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल श्री. सिंह यांनी कौतुक केले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तमपणे काम करीत असल्याचेही खा. सिंह यांनी नमूद केले.
यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जानेवारी 2025 पासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणीचे दीड कोटींचे लक्ष्य साध्य केले. आत्तापर्यंत जवळपास 1 लाख 40 हजार सक्रीय सदस्य झाले असून 3 लाख सक्रीय सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. 20 एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे 1196 मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतर 22 एप्रिल पासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.
एवढा फायदा होणाऱ्या व्यवहाराची चौकशी होणारच.
सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून 7 कोटीला जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी याच जमिनीची विक्री 4 महिन्यात त्याच कंपनीला 58 कोटीला केली. अवघ्या चार महिन्यात जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे खा. सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.
पुणे- येथील बालेवाडी येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ बालेवाडी तसेच धर्मवीर आखाडा बालेवाडी यांच्या वतीने आयोजित जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात पैलवान सिकंदर शेख ने बाजी मारत ५ लाखाचे बक्षीस पटकावले आहे.
या उत्सव समयी स्व.पै.मगनदादा बालवडकर यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर व उद्योजक सनी मगनशेठ बालवडकर यांच्या वतीने पै.सिकंदर शेख(महाराष्ट्र केसरी) वि. पै.विशाल भोंडु(पंजाब केसरी) यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. यामध्ये पै.सिकंदर शेख यानी पै.विशाल भोंडु याला चितपट करत मानाची गदा व रोख रक्कम ५,००,००० चे बक्षिस पटकावले. या उत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन यशस्वीपणे समस्त ग्रामस्थ बालेवाडी तसेच धर्मवीर आखाडा बालेवाडी यांनी पार पाडले तसेच या कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला .
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन
पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.
“शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, “शिंदे सरकारने महिलांसाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘लाडकी बहीण’ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनजागृती करून लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे.”
मेळाव्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सभासद नोंदणी मोहीम २५ ते २७ एप्रिल रोजी पुण्यातील लाल महाल, वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड आणि कसबा याठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याचे जाहीर केले.
या कार्यक्रमात नितीन पवार, बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल यांनी आयोजक म्हणून भूमिका बजावली. तर पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत (संपर्क प्रमुख), सुनील जाधव आणि युवा सेनेचे प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना सचिव किरण साळी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.
कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आपल्या सत्तेत असूनही जर आपण निष्क्रिय राहिलो, तर जनतेचा विश्वास डळमळीत होईल. म्हणूनच आता आपण प्रत्येक प्रभागात सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करायला हवा. जुने-नवे कार्यकर्ते एकत्र येऊन संघटनेला बळकट करावे.”
त्यांनी ‘महायुती’तील समन्वय, आगामी निवडणुका, आरक्षण व्यवस्थापन, महिलांचा सहभाग, आणि कामगार-विद्यार्थी हिताच्या योजना यावरही ठामपणे आपली भूमिका मांडली.
“आजचा मेळावा म्हणजे संघटनात्मक बळाचे प्रतीक आहे. शिवसेनेच्या पुढील वाटचालीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे,” असे उद्गार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी काढले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण
पुणे, दि. १८ : ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल,’ असे प्रतिपाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, क्रांतीवीर चापेकर यांचे वंशज प्रशांत चापेकर, प्रतिभा चापेकर, स्मिता चापेकर, चेतन चापेकर, मानसी चापेकर, जान्हवी जोशी यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते चापेकरांच्या वंशांजाचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, अमोल खोमणे नाईक, विशाल खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘चापेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चापेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण १४ प्रसंग आहेत.’ चापेकर बंधूनी केलेल्या रँडच्या वधाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली.
‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा चापेकर बंधूनी घेतली होती. चापेकर वाडा येथे उभारण्यात आलेले स्मारक हे लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भारताचा सूवर्णमय इतिहास या स्मारकात पाहण्यास मिळेल, या स्मारकात दृकश्राव्य माध्यमातून त्या काळातील प्रसंग आपल्याला समजून घेता येतो असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
चापेकर स्मारकाचे भुमिपूजन आणि आज स्मारकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेले येथील समरसता गुरुकुलम संस्थेस भेट देण्याची संधी मला मिळाली या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उत्तम असून, आपण समाजातील वंचित समाजाला समरसतेतून संस्कारी कसे करू शकतो याचे आदर्श व उत्तम उदाहरण संस्थेत पहावयास मिळते. या संस्थेचे कार्य पुढे येण्यासाठी जागेची कमतरता भासणार नाही. जागा उपलब्ध करून दिली जाईल या चांगल्या उपक्रमासाठी,शासन या संस्थेस मदत करेल अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे. या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटीश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे. समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांच्या सेवा, त्याग समर्पणातून आपला देश घडला आहे. त्यांच्यामुळे मिळालेले स्वातंत्र्य अखंड राखणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे, विविधतेमध्ये असलेली एकता जपणे, हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केलेले आहे. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या चापेकर बंधु, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समानता या संविधानिक मूल्यांची जपवणूक करून ती मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,’ असेही ते म्हणाले.
चापेकर बंधूचे स्मारक म्हणजे गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र
चापेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. यामध्ये क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल तसेच स्मारकाबद्दल माहिती होती. शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, ‘क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. त्यांनी दाखवलेली राष्ट्रभक्ती, अपार साहस आणि बलिदान यामुळे देशप्रेमाला नव्या अर्थाने समृद्धी दिली. त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र आहे. हा उपक्रम आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतो आणि ‘विकसित भारत’ या आपल्या सामूहिक संकल्पाची आठवण सतत जागवतो.’
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना चापेकर स्मारकाची माहिती दिली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी क्रांतीवीर चापेकर स्मारक उभारण्याचा प्रवास तसेच गुरुकुलम बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा जोशी यांनी केले तर आभार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे तेजा पटवारी यांनी सांकेतिक भाषेत अनुवादीत केला. कार्यक्रमाला या परिसरातील नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतीवीर चापेकर वाडा येथील स्मारकास भेट
मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर वाडा येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकास भेट देऊन पाहणी केली. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी स्मारकाविषयी माहिती दिली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर समरसता गुरुकुलम संस्थेसही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली गुरुकुलम संस्थेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाविषयी व गुरुकुलमच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई, दि १८ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी घेतला. यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगताप, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, सहायक संचालक डॉ.रवींद्र शेटे आदि उपस्थित होते.
बैठकीदरम्यान मंत्री श्री.आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.
या योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, अशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावी, असे मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात याव्यात. तसेच आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही मंत्री. श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.
रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगून, यापुढेही आवश्यक निधी वेळोवेळी दिला जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.
शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार
पुणे, दि. १८: महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२- २३ व २०२३-२४ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सन २०२२- २३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना वितरित करण्यात आला.
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू शकुंतला खटावकर आणि प्रदीप गंधे यांचे विशेष अभिनंदन करतानाच सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.
खेळांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवित याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खुल्या जागांची मोठी कमतरता आहे तिथे शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक मैदाने आणि क्रीडा क्लब यांच्यासोबत सहयोग करू शकतात, असेही राज्यपाल म्हणाले. आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात क्रीडा संकुले स्थापन करण्यात आली असून क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे, असेही श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा, ‘विकसित भारत’ बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे. आपले खेळाडू त्यात यशस्वी होतील असा आशावादही राज्यपालांनी व्यक्त केला.
पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे- मुख्यमंत्री शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राजमान्यता आहे. हा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, भूतपूर्व खेळाडू आदी सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण योगदान देऊ अशा प्रकारची मानसिकता बाळगावी. छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे; आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांनी अनेक बॅडमिंटन खेळाडू घडविले. त्यांनी महाराष्ट्रात बॅडमिंटनची संस्कृती निर्माण करण्याचे काम केले. आज खेळांना समाज मान्यता आणि राजमान्यताही आहे, मात्र १९७९ ते ८२ साली महिला कबड्डीपटू म्हणून शकुंतला खटावकर राष्ट्रीय स्तरावरील १०६ सामने खेळून अनेक विजय मिळवून दिले ही कामगिरी अतिशय अतुलनीय आहे, अशा शब्दात जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे कौतुक मुख्यमंत्री यांनी केले. आपण पदकांची भरारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. तथापि, आपल्या आता राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदके मिळविण्याची गरज आहे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चांगले खेळाडू असल्यास त्यांना आवश्यकता असल्यास परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय मागील काळात घेतला आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात सर्व सुसज्ज व्यवस्थेसोबत गेल्याशिवाय खेळाडूंना चांगल्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही हे लक्षात घेऊन खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ (भौतिकोपचार तज्ज्ञ) यांना बरोबर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येते.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकून येणाऱ्या खेळाडूंचा उचित सन्मान झाला पाहिजे यासाठी बक्षिसांच्या रक्कमेत भरीव वाढ केली आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी नोकऱ्यांमध्ये दालने उभी केली असून थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रमदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तालुक्यांपर्यंत चांगल्या खेळाच्या पायाभूत सुविधा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांच्या खेळावरील प्रेम, मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. बॅडमिंटन पटू व उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडविणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे व कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ही आनंदाची बाब आहे. जीवन गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदा महिला प्रशिक्षकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगून त्यांनी यापुढे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्या-त्या वर्षीच वितरित करण्यात यावेत, अशा सूचना क्रीडा विभागाला दिल्या.
ते म्हणाले, क्रीडा विभागाला पुरवणी मागण्यांमध्ये निश्चितच निधी वाढवून देण्यात येईल. पुरस्कारार्थींनी पुढील खेळाडू घडविण्याचे काम करावे, महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राज्य शासन पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रारंभी स्वागत करताना मंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्य शासनाने खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी मानले आहे. शासकीय नोकरीत ५ टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येते. आतापर्यंत १२८ खेळाडूंना शासनाने थेट नोकरी दिली आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमच योग क्रीडा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, थेट पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, साहसी क्रीडा पुरस्कार असे सन २०२२- २३ चे ७० आणि सन २०२३-२४ च्या ८९ याप्रमाणे एकूण १५९ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
समारंभास पुरस्कारार्थी खेळाडू, खेळाडूंचे पालक आदी उपस्थित होते.
पुणे- महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हिंदी भाषा १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना शिकविणे सक्तीच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र शासनाने राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार दि १६ एप्रिल ला महाराष्ट्रावर आणि मराठीच्या मुळावर घाव घालणारा शासन निर्णय जाहीर केलाअसून असा आरोप करत या शासन निर्णयाचं दहन करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली . या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हिंदी भाषा १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना शिकविणे अनिवार्य केले गेले आहे. हा शासन निर्णय म्हणजे मराठीचे खच्चीकरण करून मराठी भाषेचे अस्तित्व संपविण्याचा शासनाचा कट आहे, उद्या काही दशकानंतर ” इथे मराठी माणसं राहत होती” अशी पाटी लावावी लागेल. मराठी अस्ताची सुरुवात ह्या मराठी द्रोही शासन निर्णयानुसार होईल असे मत यावेळी मांडण्यात आले. मुख्यमंत्री यांनी संपर्क सूत्र म्हणून हिंदी भाषा शिकवली पाहिजे या त्यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध देखील करण्यात आला. वास्तविकता हिंदी भाषेची कुठलीही गरज आम्हा मराठी माणसांना नाही, त्रिभाषा सूत्र आम्हाला मान्य नाही आणि विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक दृष्ट्या ते अडचणीचे आहे तरी ही हा हिंदी बळजबरी लाटण्याचा अट्टाहास का? हा सवाल यावेळी उपस्थित केला. जर राज्य शासनाने हा दळभद्री मराठी द्वेष्टा शासन निर्णय मागे घेतला नाही तर पुणे शहरात एक ही हिंदी पुस्तक छापू देणार नाही आणि ज्या शाळा सक्तीने हिंदी शिकवत असतील अशा शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा या आंदोलन प्रसंगी देण्यात आला सदर आंदोलनाचे आयोजन मनविसे शहराध्यक्ष धनंजय विजय दळवी यांनी केले यावेळी प्र. राज्य संघटक प्रशांत कनोजिया,राज्य उपाध्यक्ष ॲड.सचिन पवार , मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी,मनसे विभाग अध्यक्ष सुनील कदम,राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रुपेश घोलप, सारंग सराफ, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, ॲड. सचिन ननावरे, विभाग अध्यक्ष केतन डोंगरे, निलेश जोरी , आशुतोष माने, अशोक पवार, शशांक अमराळे , हेमंत बोळगे, संतोष वरे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव: हर्षवर्धन सपकाळ.
मराठी बोलणारे हिंदू नाहीत का? हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपाचा अजेंडा, हिंदी भाषा सक्तीला काँग्रेसचा विरोध.
अंबाजोगाईमध्ये वकील तरुणीला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा.
मुंबई, दि. १८ एप्रिल २०२५
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे बोलीपासून दूर ठेवायचे ही दुट्टपी भूमिका आहे. भाषा ही संवादाचे साधन आहे, संस्कृती आहे. एकाचवेळी तीन भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा. या सक्तीमुळे मुले मुलभूत ज्ञानापासून वंचित राहतील. प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे व इतर भाषांचाही आदर आहे पण भाजपाला प्रादेशीक संस्कृती व भाषा संपवायच्या आहेत. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, असे सपकाळ म्हणाले.
दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे मग महाराष्ट्रात सक्ती का? भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का? आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? असे सवाल करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भारतीय जनता पक्ष नष्ट करायला निघाले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका गँग, खोके गँग अशा गँग कार्यरत असून बीडमधील अत्याचार थांबत नाहीत. अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका तरुणीला गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. एका वकील महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न विचारून सरकारकडे थोडी लाज शरम बाकी असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी व कठोर शिक्षा करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पुणे-गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेले दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास हे ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात मात्र निर्दोष ठरले आहेत.भिसे यांच्यावरील उपाचारात दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. घैसास यांनी कुठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे नव्याने अभिप्राय मागविला आहे.
गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यावेळी दीनानाथचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे 10 लाख रुपयांची डीपॉझीट रकमेची लेखी मागणी केली. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. पण घैसास यांनी तनिषा यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीय तेथून बाहेर पडले. दीनानाथमध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा ठपका यापूर्वीच्या आरोग्य संचालक यांच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाने 35 कोटी 48 लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याचे समोर आले होते. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीनेही वेळेत उपचार न मिळाल्याने मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला होता.यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र ससून रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली. यात महिलेच्या उपचारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा तेथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याबाबत उल्लेख नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
मुंबई-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नासिक मधील ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडलेले नाही तर उद्धव ठाकरे यांचे विचार एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडून मांडले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची लायकी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावावे, असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची मोठी लायकी नाही. कुणाल कामरा याने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आम्हीच नाही तर त्यांचेच खासदार त्यांना साप म्हटले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
आगामी काळात बिहार आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये घडलेल्या भेटीगाठी नंतरच हिंदी भाषेचा विषय समोर आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही मराठीचा विषय काढा, आम्ही हिंदीचा विषय घेतो, असे त्यांचे ठरलेले दिसते, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मराठी हे सर्वांना आलेच पाहिजे आणि ते सक्तीचे असायलाच पाहिजे, असे आमचे मत आहे. मात्र, पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हा मुलांवर दबाव टाकत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबतही आता आदित्य ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे. इतकेच नाही तर सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही त्यांनी विरोधी दर्शवला आहे.या संबंधीत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत पाण्याची समस्या ही एक मोठी समस्या आहे. भाजपने हा प्रश्न सोडवलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न सोडवलेला नाही. आम्ही याबद्दल निषेध केला, पण पोलिसांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले. कालच्या बैठकीत सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते हवामानाला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण आम्हाला हवामानाचे रक्षण करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई- इयत्ता पहिलीपासून हिंदीची सक्ती करणाऱ्या राज्य सरकारच्या धोरणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती आम्हाला नको. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, ते दिसायला छान दिसत आहेत, पण त्यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपणार असेल तर आम्हाला असा विकासही नको, असे ते म्हणालेत.
महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकण्याच्या अनिवार्यतेवर नुकतेच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ‘राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024’नुसार, मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीसाठी माध्यम भाषा, मराठी व इंग्रजी अशा 3 भाषा असणार आहेत. येत्या जून महिन्यापासून सुरू होणाऱ्या नव्या शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. पण आता काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह मनसेने याविरोधात दंड थोपटल्यामुळे महाराष्ट्रात या मुद्यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मराठी माणसांचे अस्तित्व संपवणारा विकास आम्हाला नको
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना हिंदीच्या सक्तीला कडाडून विरोध केला आहे. ते म्हणाले, आपल्याकडे शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठीकडे पाहणे खूप आवश्यक आहे. नुसते भाषा दिवस साजरा करणे किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळणे याने मराठी राहणार नाही. मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती होणार असेल तर अशी प्रगती नको आम्हाला. आज जे काही फ्लायओव्हर होत आहेत, हे दिसायला छान दिसत आहे, पण यातून मराठी माणसाचे अस्तित्व संपत असेल तर आम्हाला असा विकास नको.
आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जात नाहीत. आयएएस अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी या शाळा आल्या. या शाळा देशभर सुरू झाल्या. यामध्ये तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवता येत नाहीत. क्रांतीचा उगम म्हणतो आपण, त्यांचा इतिहास सांगता येत नाही. फ्रेंच रिव्हॉल्युशन शिकवता तुम्ही. त्याचे काय करायचे आहे? आपण इतिहासातून काय बोध घेतोय, ते शिकवणे जास्त गरजेचे आहे, असे राज ठाकरे या पॉडकास्टच्या प्रोमोत म्हणताना दिसून येत आहेत. महेश मांजरेकर यांनी हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी गुरुवारी एका पोस्टद्वारे महाराष्ट्रातील हिंदीकरणाला कडाडून विरोध केला होता. सरकारचं सध्या जे सर्वत्र ‘हिंदीकरण’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही. ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे. ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची ? तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे, ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका. या देशात भाषावार प्रांतरचना झाली, आणि ती इतकी वर्ष टिकली. पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरु झालेत? भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे, असे ते म्हणाले होते.
पुणे- सिंहगड रस्ता परिसरात धायरी येथील रायकर मळा येथे श्री ज्वेलर्स या सराफी दुकानात शिरून खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून सोन्याचे दागिने लुटुन नेणार्या दोन सराईत आरोपींना गुन्हे शाखेच्या दोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने भोसरी येथून जेरबंद केले. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी आरोपींनी ससून रूग्णालयाचा आसरा घेतल्याचे देखील समोर आला आहे.
राजेश उर्फ राजू चांगदेव गालफाडे (40) आणि श्याम शेषेराव शिंदे (37, रा. दोघेही रा. लांडेवाडी, झोपडपट्टी, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सराफाने नांदेडसिटी पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली होती.दिनांक १५/०४/२०२५ रोजी दुपारी ०२.४५ ते ०२.५० वा. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील श्री ज्वेलर्स, समर्थ कॉम्पलेक्स, रायकर मळा, धायरी, पुणे या नावाचे सराफ दुकानामध्ये ३ अज्ञात चोरट्याने नकली पिस्तुलाचा धाक दाखवुन दुकानातील २० लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरी करुन घेवुन गेले होते. त्याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे अनोळखी ०३ इसमांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला होता.गुन्हयाच्या तपासकामी गुन्हे शाखेकडील एकुण १२ पथके नेमण्यात आली होती, गुन्हे शाखेने कशोसीने सलग तपास करुन ४८ तासात गुन्हयामधील दोन आरोपींना अटक केली .तब्बल 80 सीसीटिव्ही फुटेज तपाल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील दुचाकी सिंहगड रस्त्यावरील एका गणपती मंदिराच्या परिसरात सोडली. तेथून ते एका रिक्षात बसले. मात्र रिक्षात बसण्यापूर्वी त्यांचे चेहरे सीसीटिव्ही कॅमेर्यात कैद झाले. तसेच ज्या रिक्षात ते बसले त्या रिक्षाच्या मागही काढण्यात आला. ती रिक्षा ससून रूग्णालयाच्या परिसरात गेल्याचे पोलिसांना आढळले. मात्र पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी जवळजवळ तासभर ससून रूग्णालयाच्या परिसरात घालवला. त्यानंतर चोरट्या मार्गाने त्यांनी भोसरी गाठली. दरम्यान आरोपी हा भोसरी परिसरात असल्याची माहिती मिळताच दोघांना अटक करण्यात आली. अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलिस आयुक्त गणेश इंगळे, सहाय पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदिपान पवार, सहायक पोलिस निरीक्षक सी. बी. बेरड, सहायक पोलिस उपनिरीक्षक दिनकर लोखंडे, अशोक आटोळे, अमंलदार गणेश लोखंडे, सुरेश जाधव, शशिकांत नाळे, अमोल सरतापे यांच्या पथकाने केली
मुंबई- ज्यांना काही उद्योग नाही ते वाद घालतात, देशातील अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालते काही जण म्हणतात ही राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात पडायचे नाही, ज्यांना काही उद्योग नाही ते असे वाद घालतात, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.आणि महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्याला मराठी आलेच पाहिजे.
अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, इंग्रजी ही जगात बहुतेक देशांमध्ये चालते. त्यामुळे ही देखील भाषा आली पाहिजे. पण आपली मातृभाषा असलेल्या मराठीला पहिले स्थान आहे. आज समोरच्या राजकीय पक्षांना काही राजकीय मुद्दा राहिलेला नाही. उन्हाची तीव्रता, उष्माघात असे अनेक मुद्दे आहेत. जागतिक पातळीवर 103 टक्के पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली आहे. आता हा पाऊस पडला पाहिजे ही पांडुरंगा चरणी प्रार्थना आहे.
अजित पवार म्हणाले की, नाशिक दगडफेक प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आम्ही काही पक्ष म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले नाही. जो दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार ते कोणत्या पक्षाचे आहे हे पोलिस पाहणार नाही. कुणीही जर कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत असेल तर त्याचे काही खैर नाही.
अजित पवार म्हणाले की, बीड संतोष देशमुख हत्या प्रकरणी अनेक चौकशी सुरू आहेत. या सगळ्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर मंत्रिपदाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. निलंबित अधिकाऱ्याच्या आरोपांना किती महत्त्व द्यायचे हे कुठेतरी विचार जनतेसह मिडीयाने केला पाहिजे. महिला वकीलाला जी मारहाण करण्यात आली त्या संदर्भात कारवाई करण्याचे आदेश मी एसपी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी कोण जबाबदार आहे, त्याला पाठिशी घालणार नाही.
पुणे,– महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने आपला अधिकृत मोबाइल अॅप “My MNGL” लाँच केला आहे. या अॅपद्वारे ग्राहकांना डिजिटल फसवणुकीपासून सुरक्षित ठेवण्यासह सर्व गॅस सेवा एकाच ठिकाणी सुलभपणे उपलब्ध करून दिल्या जातील.
अलीकडील काळात MNGLच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात असून, त्यावर आळा घालण्यासाठी हा अॅप एक सुरक्षित, अधिकृत आणि वापरण्यास सुलभ असा उपाय ठरणार आहे.
फसवणुकीच्या घटना थांबाव्यात म्हणून MNGLने याआधी खालीलप्रमाणे विविध उपाययोजना केल्या:
आघाडीच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये जनजागृतीसाठी सूचना प्रसिद्ध केल्या
SMS आणि WhatsApp मोहिमा राबवल्या
सोशल मीडियावर (Instagram, Facebook, X) फसवणूक अलर्ट्स शेअर केले
रेडिओ जिंगल्सद्वारे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला
पुणे पोलिस आयुक्तांकडे अधिकृत तक्रार दाखल केली
तरीही, काही ग्राहक फसवणुकीला बळी पडत आहेत. त्यामुळे MNGLने आपली जनजागृती अधिक तीव्र करत, “My MNGL” नावाचा एक पूर्णतः सुरक्षित आणि विश्वासार्ह अॅप ग्राहकांच्या सेवेत आणला आहे.
MNGLचे बिलिंग विभाग प्रमुख अनंत जैन म्हणाले, “ग्राहकांना सातत्याने फसवणूक करणाऱ्या कॉल्स व मेसेजेसचा त्रास सहन करावा लागत आहे, हे अतिशय दु:खद आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही ‘My MNGL App’ लाँच केला आहे, जेणेकरून ग्राहक कोणत्याही जोखमीशिवाय आपले गॅस खाते डिजिटल पद्धतीने सुरक्षितपणे हाताळू शकतील.”
My MNGL अॅपच्या वैशिष्ट्यांमध्ये समाविष्ट आहे:
MNGL शी संबंधित सर्व सेवा एका ठिकाणी
अधिकृत व खात्रीशीर माहिती आणि संप्रेषण
फसवणुकीपासून सुरक्षितता आणि पारदर्शक व्यवहार
MNGLकडून सर्व ग्राहकांना आवाहन करण्यात येत आहे की, फक्त अधिकृत अॅप स्टोअरवरूनच “My MNGL” अॅप डाउनलोड करा, आणि कोणत्याही अनधिकृत लिंक किंवा कॉल्सवर विश्वास ठेवू नका.
“My MNGL” अॅप आजच डाउनलोड करा आणि तुमच्या गॅस सेवांवर सुरक्षितपणे नियंत्रण मिळवा!
वीज ही मूलभूत झालेली आहे. दैनंदिन कामे किंवा एकूणच जीवनमान हे विजेवरच अवलंबून आहे अशी स्थिती आहे. विजेची गरज वाढल्याने स्वाभाविकच वीज वापर वाढत आहे. साधारणतः उन्हाळ्यात विजेचा वापर सर्वाधिक होतो. परिणामी वीज बिलांची रक्कम वाढत जाते. तथापि, विजेचा अनावश्यक वापर टाळून किंवा काही सोपे व साधे उपाय करून केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षभर आपण विजेची व पर्यायाने आर्थिक बचत करू शकतो. घरामध्ये आवश्यक अनेक उपकरणांना वीज आवश्यक असली तरी ते योग्यप्रकारे वापरले तर वीज बचत होऊ शकते.
वीजबिलात वाढ करणारे उपकरणे– घरातील पंखे, एअर कंडिशनर, गीझर, वॉशिंग मशीन, इस्त्री, रेफ्रिजरेटर, मायक्रोवेव ओवन, ज्यूसर, फूड प्रोसेसर, मिक्सर, ग्राइंडर, संगणक, चार्जर, व्हॅक्यूम क्लिनर अशा उपकरणांचा समावेश होतो. ही उपकरणे वीज बचतीच्या जाणीवेने वापरली तर वीज बचतीला निश्चितच मोठा वाव आहे अन् उपायही खूपच साधे आहेत.
एअर कंडिशनरवर नियंत्रण– सर्वाधिक वीज लागणारे उपकरण म्हणजे एअर कंडिशनर आहे. उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यात एसीचा मोठा वाटा आहे. या एसीला पंख्यापेक्षा नऊ पट अधिक वीज लागते. त्यामुळे आवश्यकतेनुसार एसी वापरता येईल. एसीचे नियमितपणे फिल्टर तपासणे, स्वच्छ करणे, एसी सुरु असताना दरवाजे, खिडक्या व्यवस्थित बंद करणे आवश्यक आहे. एसी वापरायचा असल्यास गारवा निर्माण झाला की एसी बंद करावा व त्यावेळी शक्यतो पंखाच वापरावा.
रेफ्रिजरेटर– घरात वर्षभर जेवढी वीज वापरलेली असते त्यात सुमारे २५-३० टक्के वाटा हा फक्त एकट्या रेफ्रिजरेटरचा असतो. प्रामुख्याने उन्हाळ्यात फ्रिजचा दरवाजा सतत उघडावा लागला तर आतील तापमान वाढत जाते आणि शीतकरणासाठी विजेचा वापर जास्त होतो. त्यामुळे फ्रिजमधून एकामागे एक भाजी किंवा पदार्थ काढण्याऐवजी आवश्यक भाज्या किंवा पदार्थ एकाच वेळी काढावेत. सतत फ्रिजचे दरवाजे उघडल्यास विजेचा वापर वाढतो.
एलईडी बल्बचा वापर- घरातील ४० किंवा ६० वॅटचे जुने पारंपरिक विजेचे दिवे (बल्ब) व ट्यूबलाईट त्वरीत बदलून त्याठिकाणी नवीन तंत्रज्ञानाचे एलईडी बल्ब लावण्यास प्राधान्य दिले पाहिजे. एलईडी (लाईट एमिटिंग डायोडस्) हे कमीत कमी वीज खर्च करणारे बल्ब आहेत. पारंपरिक विजेच्या बल्बचे आयुष्य सुमारे ५ हजार तास असते. याउलट एलईडी बल्बचे आयुष्य तब्बल एक लाख तास एवढे असते. सोबतच एलईडी बल्ब वापरल्यास ४० किंवा ६० वॅट क्षमतेच्या बल्ब व ट्यूबलाईट्च्या तुलनेत सुमारे ८० टक्के वीजबचत होऊ शकते. घरातील बाथरूम किंवा बेडरूमध्ये ‘झिरो’ बल्बचा पूर्वीपासूनच वापर होत आहे. हा ‘झिरो’ म्हणजे पारंपरिक बल्ब तब्बल १५ वॅटचा असतो. त्यामुळे या बल्बऐवजी आता कमी वॅटचे एलईडीचे बल्ब लावता येईल. बाजारात एक वॅट, तीन वॅटमध्ये देखील एलईडी बल्ब उपलब्ध आहेत.
उपकरणे ‘अनप्लग’ करा– उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आणि उन्हाच्या तडाख्यामुळे बहुतांश वेळ हा घरातच घालवला जातो. त्यामुळे टिव्ही, संगणक किंवा मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे गेम्स किंवा चित्रपटांसाठी जादा वेळ सुरु राहतात. संगणक किंवा मोबाईलच्या चार्जिंगचा वेळ वाढतो. घरातील लहानथोरांच्या मनोरंजनासाठी सध्या हे उपकरणे महत्वाचे आहेत. मात्र ज्यावेळी हे सर्व उपकरणे वापरात नसतील तेव्हा ते बंद करताना अनप्लग करणे महत्त्वाचे आहे. वापरात नसतानाही टीव्ही, संगणक आणि चार्जर किंवा अन्य उपकरणे स्टॅण्डबायवर असल्यास वीज वापरतात. त्यामुळे ही उपकरणे स्टॅण्डबायवर ठेवू नका तर ती अनप्लग करणे वीज बचतीसाठी आवश्यक आहे.
सूर्यप्रकाशाचा वापर- विजेच्या बचतीसाठी भरपूर असलेल्या सूर्यप्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे आहे. सूर्यप्रकाशाचा घरात कसा वापर करता येईल यासाठी उपाययोजना करता येतात. घराची सजावट व खिडक्यांची पडदे फिकट रंगाचे असणे वीजबचतीसाठी उपयुक्त आहे. ज्यावेळी उपयोगात नसतील तेव्हा घरातील विविध विद्युत उपकरणे व लाईट बंद करणे आवश्यक आहे. यातही महत्वाचा पंखा आहे. ज्या उपकरणांमध्ये कॉईलचा वापर केला जातो ते सर्वच उपकरणे वीज अधिक खातात. त्यात विजेचा पंखा आघाडीवर आहे. त्यामुळे पंख्याला गरज नसताना विश्रांती देणे वीज बचतीसाठी योग्य ठरते.
इतर काही उपकरणे- मायक्रोवेवमधील पदार्थ तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी वारंवार दार उघडले की प्रत्येक वेळी सुमारे २५ अंश सेल्सिअस तापमान खाली येते व तेवढेच तापमान वाढायला अधिकची वीज खर्च होते. सिलिंग पंख्यासाठी पारंपरिक रेग्युलेटर वापरण्याऐवजी इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर वापरलेला बरा. योग्य प्रमाणात कपडे धुण्याची पावडर वापरून वाशिंग मशीन तसेच ओव्हनमध्ये टायमरचा वापर केल्यास अधिक खर्च होणारी वीज नियंत्रणात राहते. आंघोळीसाठी गरम पाणी लागत असल्यास आंघोळ होईपर्यंत गिझर सुरु ठेवणे हे वीज खर्चाचे आणखी एक कारण आहे. त्यापेक्षा गरम झालेले पाणी एकदाच बादलीत घेऊन गिझर बंद करणे योग्य. सद्यस्थितीत वेगवेगळी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये कमीत कमी चार एनर्जी स्टार असलेले उपकरणे खरेदी केल्यास ५० टक्के विजेच्या बचतीची संधी आहे.
मोफत वीज व वीज उत्पादक होण्याची संधी- घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे महावितरणच्या घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत आहे. या योजनेसाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅट व त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८ हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे. तसेच गृहनिर्माण संस्था, घरसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व कॉमन उपयोगासाठी ५०० किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट १८ हजार रुपये असे कमाल ९० लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. छतावरील सौर प्रकल्पांतून वीजग्राहकांच्या गरजेपेक्षा वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून विकत घेण्यात घेते व त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे.
लेखक – निशिकांत राऊत, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, पुणे.