Home Blog Page 354

३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रविण गायकवाड यांची निवड

पुणे- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रविण गायकवाड यांची निवड झाली असल्याची माहिती साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी दिली,समता बंधुता व एकात्मता
ही मुल्ये केंद्रस्थानी मानून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांने सामाजिक प्रबोधन व सामाजिक परिवर्तन याकरिता श्री.गायकवाड गेली ३५ वर्षे कार्यरत आहेत,मराठे शुद्र,हिंदू की ब्राम्हणी, आरक्षण,शिवचरित्रातून रामदास व दादोजी कोंडदेव हटावो,संभाजी ब्रिगेड एक अभ्यास,मराठा क्रांती मोर्चा आदी ग्रंथांचे त्यांनी लेखन केले असून सामाजिक, ऐतिहासिक विषयांवर ३ हजारांहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत,
९ व १० मे २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड या ठिकाणी हे संमेलन संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार करणार आहेत,ग्रंथदिंडी,उद्घाटन समारंभ, परिसंवाद,चर्चासत्र,कथाकथन,कविसंमेलन, असो भरगच्च कार्यक्रम होणार असून या संमेलनात देशभरातील ९००साहित्यिक उपस्थित राहणार आहेत,यापूर्वी पुणे,मुंबई,नांदेड,उदगीर,तुळजापूर,लातूर,धाराशिव,वणी,रत्नागिरी,गोंदिया,शेवगाव,बारामती,मंठा,सोलापूर,छत्रपती संभाजीनगर ,याठिकाणी संपन्न झाले होते,नारायण सुर्वे,मंगेश पाडगांवकर,द.मा,मिराजदार,शिवाजी सावंत,सुरेश भट,केशव मेश्राम,विश्वास पाटील,सुवर्णा पवार,श्रीपाल सबनीस गंगाधर पाणतावणे,जनार्दन वाघमारे, भास्कर चदनशिव,मुरहरी केळे आदी मान्यवर साहित्यिकांनी यापूर्वी संमेलनाध्यक्षपद भूषविले आहे,
नुकतीच डॉ. शरद गोरे यांच्या अध्यक्षतेखाली कराड येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वांनूमते संमेलनाध्यक्ष म्हणून प्रविण गायकवाड यांची निवड करण्यात आली,पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. नितीन नाळे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले,सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप पवार,महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हनुमंत चिकणे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष विक्रम शिंदे,कराड तालुका अध्यक्ष डॉ. शंकरराव खापे,कराड तालुका उपाध्यक्ष डॉ.दादाराम साळुंखे, कराड तालुका सचिव प्रकाश पिसाळ, किशोर पाटील, मानसिंग पाटील,वामन अवसरे,सुशील कांबळे, रामचंद्र पाटील,विजय कोळेकर, विद्या पवार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे?सवाल करत पुन्हा फडणवीसांकडून हिंदी सक्तीचे समर्थन

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा एकदा इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? असा खडा सवाल त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे. यावेळी त्यांनी नाशिक येथील दंगल जाणिवपूर्वक घडवण्यात आल्याचाही दावा केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, नाशिक येथे जाणिवपूर्वक दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला. न्यायालयाच्या निर्णयानंतर तेथील लोकांनी वादग्रस्त अतिक्रमण काढण्याविषयी प्रशासनाला सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वतःच ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. पण त्याचवेळी ही सगळी मंडळी जी दंगलीमध्ये दिसत आहेत, त्यांनी जाणिवपूर्वक दंगल घडवली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई केली जात आहे.

पत्रकारांनी यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पाणी टंचाईच्या मुद्यावरून सरकारवर केलेली टीका मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा कोण संजय राऊत? असे म्हणत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पत्रकारांनी यवतमाळमध्ये पाणी टंचाईने एका 12 वर्षीय मुलीचा बळी घेतल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांपुढे मांडला. त्यावर ते म्हणाले, जिथे टंचाई आहे, तिथे कलेक्टरला अधिकार दिलेत. कलेक्टरनी आपल्या भागात टँकरने पाणी पुरवठा करायचा की तिथे उपलब्ध असणाऱ्या इतर पद्धतीने करायचाय याचा निर्णय घ्यायचा आहे.महाराष्ट्रात एप्रिल व मे या दोन महिन्यांत विविध भागांत पाणीटंचाई निर्माण होते. प्रत्येक जिल्ह्याचा पाणी टंचाईचा आराखडा आपण तयार करतो. त्या आराखड्यानुसार ज्या ठिकाणी टंचाई निर्माण होते, तेथील उपाययोजना ठरवायच्या असतात. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीसुद्धा उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे अशा प्रकारची घटना जर कुठे होत असेल तर तिथे काय अडचणी आहेत हे समजून घेऊन त्यातून मार्ग काढू.

पत्रकारांनी यावेळी सदर घटना घडली त्या गावात 12 वर्षांपासून नळ योजना कार्यान्वित होऊनही नळाला पाणी नसल्याची बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मला या प्रकरणी आगाही माहिती नाही आणि पिच्छाही माहिती नाही. त्यामुळे मी यावर बोलू शकत नाही, असे स्पष्टपणे सांगितले.देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी पुन्हा एकदा हिंदीचे जोरदार समर्थन केले. मी या प्रकरणी परवाच माझी भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा ही कंपलसरी आहे. ती अनिवार्य आहे. सर्वांनी मराठी भाषा शिकलीच पाहिजे. त्यासोबत दुसरी एखादी भाषा शिकायची असेल तर ती ही शिकता येते. मला कधीकधी आश्चर्य वाटते की, हिंदीला विरोध व इंग्रजीला का नाही? इंग्रजीला पालख्या व हिंदीला विरोध हा कुठला विचार आहे? त्यामुळे मराठीला कुणी विरोध केला तर आम्ही सहन करणार नाही, असे ते म्हणाले.

मंगेशकर रुग्णालयासंदर्भातला तो अहवाल जाळून टाका:सुप्रिया सुळे संतापल्या;अगोदर कारवाई करू म्हटले आता क्लीन चीट?

पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांना वाचवणारा अहवाल जाहीर झाला आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात आमचे सहकारी प्रशांत जगताप हे न्यायालयात जात आहेत. त्यामुळे त्याचे मी जाहीर आभार मानते. एखाद्याची लेक, बायको, आई गेली आहे. असे असताना एखादा रिपोर्ट इतका चुकीचा कसा येऊ शकतो? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. एखादे सरकार महिलेबद्दल इतके असंवेदनशील कसे होऊ शकते? हे धक्कादायक असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

आम्ही तो अहवाल मानत नाही. त्या अहवालाला कचऱ्याच्या डब्यात नाहीतर जाळून टाकले पाहिजे, अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. प्रशांत जगताप या संदर्भात न्यायालयात लढत आहेत. आम्ही देखील त्यांच्या पाठीमागे ताकतीने उभे राहणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. सरकार माणुसकी विसरले असेल, मात्र आम्ही माणुसकी विसरलो नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात सुळे म्हणाल्या की, जाहीर झालेल्या या अहवालावर आमचा विश्वासच नाही. त्यामुळे अहवालात काय आहे? काय नाही? यामध्ये आम्ही वेळ घालवणार नाही. आमच्या राज्यात एका बहिणीची हत्या झाली आहे. त्या राज्यात आम्ही पुन्हा दुसऱ्या लेकीची किंवा महिलेची हत्या होऊ देणार नाही. सरकारच्या वतीने आरोपींना वाचवले जात आहे, असा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय मिळत नाही त्यामुळेच आम्हाला न्यायालयात जावे लागत आहे. या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसेल तर आम्हाला न्यायालयात जावेच लागेल. वेळ पडली तर आम्ही रस्त्यावर उतरू. मात्र, ज्यांनी ज्यांनी आमच्या लेकीची हत्या केली, त्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

जर असा खोटा रिपोर्ट केला जात असेल तर तो करणाऱ्यांना देखील सहआरोपी करायला हवे, असे मागणी त्यांनी केली. हा देश संविधानाने चालतो. अखेर विजय हा सत्याचाच होतो. कोणी कितीही मनमानी केली तरी अखेर विजय सत्याचाच होत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आम्ही भिसे कुटुंबाची भेट घेतलेली आहे. आम्ही सर्व कागदपत्रे पाहिली आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या मतावर ठाम असल्याचे सुळे यांनी म्हटले आहे. यामध्ये कोणता पक्ष हा विषय नाही. यामध्ये माणुसकीच्या नावाने लढाई लढाईची आहे. सरकारने कितीही कसाही निर्णय घेतला तरी माणुसकीच्या नात्याने न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. एका लेकीची हत्या होते आणि आरोपींच्या पाठीशी हे सरकार उभे राहिले, हे अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

ताल नृत्य अकादमी च्या वतीने दीप्ती बसवार यांचे आरंगेत्रम संपन्न

पुणे – ;- ताल नृत्य अकादमी च्या वतीने नृत्य गुरू सौ प्रेरणा तुळजापूरकर यांच्या शिष्या सौ दीप्ती राजकुमार बसवार यांचे भरतनाट्यम या कलेतील आरंगेत्रम संपन्न झाले यावेळी भरतनाट्यम मधील विविध कलांचे दर्शन दीप्ती बसवार यांनी केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध लेखिका सौ शलाका तांबे या उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संयोजन नृत्य गुरू सौ प्रेरणा तुळजापूरकर, मानसी आंबेकर, इरा पाटील , सायली देशपांडे, सायली दरेकर यांनी केले सूत्र संचालन सृष्टी राळे यांनी केले तर प्रस्तावना व आभार प्रदर्शन सौ प्रेरणा तुळजापूरकर यांनी केले यावेळी अकादमी चे सहसंस्थापक पुष्कर तुळजापूरकर रिलायन्स उद्योग समूहाचे माजी उपाध्यक्ष जैमिनी खुर्जेकर , प्रसिद्ध व्हायोलिन वादीका जान्हवी खुर्जेकर , अध्यात्मिक गुरू राजकुमार बसवार, विनायक भागवत , स्मिता भागवत आदी उपस्थित होते

मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी न्यायालयात याचिका दाखल करणार: प्रशांत जगताप

पुणे :तनिषा भिसे प्रकरणात मंगेशकर रुग्णालयावर कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे पुणे शहराचे शहराध्यक्ष जगताप यांनी दिली आहे.
प्रशांत जगताप तनिषा भिसे प्रकरणी बोलताना म्हणाले की, तनिषा भिसे प्रकरणाच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी कुटुंबाला शब्द दिला होता की, कारवाई करू. मात्र, अजूनही कारवाई ही झालेली नाही. आमच्या पक्षाच्या वतीने येणाऱ्या गुरुवारी 24 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करणार आहोत. ज्यात ससूनला देखील पार्टी करण्यात येणार आहे. दीनानाथ रुग्णालयाच्या बरोबर ससूनचे डीन आणि अधीक्षक यांना सहआरोपी करावं यासाठी याचिका दाखल करणार आहोत.


प्रशांत जगताप म्हणाले,भाजपा आमदार अमित गोरखे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, एक प्रकारे तनिषा भिसे मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार आहे अशी परिस्थिती समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. यासंबंधीच्या वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याचे चित्र समोर आलं होतं. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर पाहिल्यानंतर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणाशी संबंधित डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांची एकूणच टीम दोषी आहे हे समोर आलं. पण, त्यानंतर आता पुण्यातील ज्या पोर्शे कार अपघात प्रकरण त्यातील रक्ताचे नमुने बदलले त्या रुग्णालयाकडून आलेल्या अहवालामध्ये दीनानाथ रुग्णालयाला निर्दोष सोडण्यात आले आहे.
त्याचबरोबर गेल्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री आणि स्वतः उपमुख्यमंत्री यांनी कुटुंबाला शब्द दिला होता, आम्ही त्या रुग्णालयावरती कारवाई करू. मात्र, कोणते पोलीस स्टेशनमध्ये त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने आम्ही 24 एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल करू आणि त्यामध्ये देखील ससूनला पार्टी करण्यात येईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा, त्यांची सनद रद्द करावी. ही मागणी तर आहेच, मात्र पोर्शे कार अपघात प्रकरणापासून ललित पाटील किंवा आता दीनानाथ मंगेशकर प्रकरण असेल याबाबत ससूनचे डीन आणि एकूणच संबंधित आणि इतर जे यामध्ये सामील आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी करणार आहे. त्याचबरोबर जो माणूसकीचा अंत झाला आहे, त्याच्या विरोधात याचिका दाखल करणार आहे आणि हा लढा आमचा चालू राहणार असल्याचा देखील प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.

दीड कोटी प्राथमिक सदस्यांची नोंदणी करून महाराष्ट्र भाजपाने रचला इतिहास

भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खा. अरुण सिंह यांनी केले प्रदेश भाजपाचे अभिनंदन

22 एप्रिल पर्यंत एक लाख बुथ समित्यांचे गठन करण्याचे उद्दिष्ट

मुंबई/पुणे – संघटन पर्वाअंतर्गत भारतीय जनता पार्टीचे दीड कोटींहून अधिक प्राथमिक सदस्य आणि 1 लाख 34 हजारांहून अधिक सक्रीय सदस्यांच्या नोंदणीचे उद्दीष्ट साध्य करून महाराष्ट्र भाजपाचं सदस्य नोंदणी अभियान ऐतिहासिक ठरले आहे, अशा शब्दांत भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस (मुख्यालय) खा.अरुण सिंह यांनी महाराष्ट्रातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन पर्व यशस्वी ठरत असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये खा. सिंह बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. विक्रांत पाटील, प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रदेश प्रवक्ता ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. सदस्य नोंदणीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्ष कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी श्री. सिंह म्हणाले की, पक्षाच्या 70 टक्के बुथ समित्यांचे गठन झाले असून 22 एप्रिलपर्यंत 1 लाखा पर्यंत बूथ समित्या गठन करण्याचे उद्दिष्ट आहे. पक्षाच्या रचनेनुसार एका बुथमध्ये 12 सदस्य असतात म्हणजेच 12 लाख सक्रीय कार्यकर्त्यांची फौज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी कार्य करेल. संघटन सर्वोपरि या विचारधारेने कार्य करणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत लोकशाही असून सामुहिक निर्णय आणि परस्पर संवाद ही दोन वैशिष्ट्ये आहेत. संघटनशक्तीला बळ देण्यासाठी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी झोकून देऊन काम करत असल्याबद्दल श्री. सिंह यांनी कौतुक केले. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार उत्तमपणे काम करीत असल्याचेही खा. सिंह यांनी नमूद केले.

यावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, जानेवारी 2025 पासून कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन प्राथमिक सदस्य नोंदणीचे दीड कोटींचे लक्ष्य साध्य केले. आत्तापर्यंत जवळपास 1 लाख 40 हजार सक्रीय सदस्य झाले असून 3 लाख सक्रीय सदस्यांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जोमाने प्रयत्न करीत आहोत, असेही ते म्हणाले. 20 एप्रिल रोजी राज्यातील सर्व म्हणजे 1196 मंडल अध्यक्षांची निरीक्षकांच्या देखरेखीत निवडणूक होणार आहे. मंडल अध्यक्षांच्या निवडणुका पार पडल्यानंतर 22 एप्रिल पासून संघटन पर्वातील पुढच्या टप्प्यात नवीन जिल्हा अध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवड प्रक्रियेसाठी जिल्हानिहाय निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहितीही श्री. चव्हाण यांनी दिली.

एवढा फायदा होणाऱ्या व्यवहाराची चौकशी होणारच.

सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी एका कंपनीकडून 7 कोटीला जमीन खरेदी केली. वाड्रा यांनी याच जमिनीची विक्री 4 महिन्यात त्याच कंपनीला 58 कोटीला केली. अवघ्या चार महिन्यात जमिनीची किंमत एवढी वाढवणारा व्यवहार केल्यावर त्याची चौकशी होणारच, असे खा. सिंह यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.

पै.सिकंदर शेखने पटकावले ५ लाखाचे बक्षीस

ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सव २०२५ संपन्न

पुणे- येथील बालेवाडी येथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ उत्सवाच्या निमित्ताने समस्त ग्रामस्थ बालेवाडी तसेच धर्मवीर आखाडा बालेवाडी यांच्या वतीने आयोजित जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्यात पैलवान सिकंदर शेख ने बाजी मारत ५ लाखाचे बक्षीस पटकावले आहे.

या उत्सव समयी स्व.पै.मगनदादा बालवडकर यांच्या स्मरणार्थ नगरसेवक अमोलभैय्या बालवडकर व उद्योजक सनी मगनशेठ बालवडकर यांच्या वतीने पै.सिकंदर शेख(महाराष्ट्र केसरी) वि. पै.विशाल भोंडु(पंजाब केसरी) यांच्यामध्ये महत्वपूर्ण लढत झाली. यामध्ये पै.सिकंदर शेख यानी पै.विशाल भोंडु याला चितपट करत मानाची गदा व रोख रक्कम ५,००,००० चे बक्षिस पटकावले.
या उत्सवाच्या निमित्ताने भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्याचे नियोजन यशस्वीपणे समस्त ग्रामस्थ बालेवाडी तसेच धर्मवीर आखाडा बालेवाडी यांनी पार पाडले तसेच या कुस्ती स्पर्धेस उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला .

“शिवसैनिकांनी विकासाचे दूत व्हावे” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन

पुणे : विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आणि शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ. गोऱ्हे यांनी विविध योजनांचा आढावा घेत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीचे महत्त्व पटवून दिले.

“शिवसैनिकांनी आता सत्तेत असल्याचा फायदा घेऊन विकासाचे दूत म्हणून काम करावे,” असा ठाम संदेश डॉ. गोऱ्हे यांनी दिला. त्यांनी पुढे सांगितले की, “शिंदे सरकारने महिलांसाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘लाडकी बहीण’ यांसारख्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. याबाबत कार्यकर्त्यांनी अधिकाधिक जनजागृती करून लोकांना त्याचा लाभ मिळवून दिला पाहिजे.”

मेळाव्यादरम्यान डॉ. गोऱ्हे यांनी सभासद नोंदणी मोहीम २५ ते २७ एप्रिल रोजी पुण्यातील लाल महाल, वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड आणि कसबा याठिकाणी मोठ्या प्रमाणात राबवली जाणार असल्याचे जाहीर केले.

या कार्यक्रमात नितीन पवार, बाळासाहेब मालुसरे, आनंद गोयल यांनी आयोजक म्हणून भूमिका बजावली. तर पूजा रावेतकर, सुदर्शना त्रिगुणाईत (संपर्क प्रमुख), सुनील जाधव आणि युवा सेनेचे प्रमुख निलेश गिरमे, युवा सेना सचिव किरण साळी यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली.

कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आपल्या सत्तेत असूनही जर आपण निष्क्रिय राहिलो, तर जनतेचा विश्वास डळमळीत होईल. म्हणूनच आता आपण प्रत्येक प्रभागात सक्रिय राहून शिवसेनेच्या विचारसरणीचा प्रसार करायला हवा. जुने-नवे कार्यकर्ते एकत्र येऊन संघटनेला बळकट करावे.”

त्यांनी ‘महायुती’तील समन्वय, आगामी निवडणुका, आरक्षण व्यवस्थापन, महिलांचा सहभाग, आणि कामगार-विद्यार्थी हिताच्या योजना यावरही ठामपणे आपली भूमिका मांडली.

“आजचा मेळावा म्हणजे संघटनात्मक बळाचे प्रतीक आहे. शिवसेनेच्या पुढील वाटचालीत कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करत जनतेचा विश्वास जिंकला पाहिजे,” असे उद्गार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शेवटी काढले.

क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण

पुणे, दि. १८ : ‘हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते. स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यांचे कार्य चापेकर स्मारकाच्या माध्यमातून नागरिकांसमोर येणार असून हे केंद्र खऱ्या अर्थाने युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे ठरेल. हे स्मारक उभारताना तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तमरित्या वापर करण्यात आला असून ते केवळ पिंपरी चिंचवडसाठी मर्य़ादित न राहता महाराष्ट्राच्या वैभवात भर घालणारे ठरेल,’ असे प्रतिपाद महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण व राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार होते. कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, प्रशांत बंब, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, अमर साबळे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डिकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, क्रांतीवीर चापेकर यांचे वंशज प्रशांत चापेकर, प्रतिभा चापेकर, स्मिता चापेकर, चेतन चापेकर, मानसी चापेकर, जान्हवी जोशी यांची विशेष उपस्थिती होती. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते चापेकरांच्या वंशांजाचा सन्मान यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमास स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांचे वंशज विक्रमसिंह मोहिते, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचे वंशज चंद्रकांत खोमणे नाईक, अमोल खोमणे नाईक, विशाल खोमणे नाईक, हुतात्मा राजगुरू यांचे वंशज सत्यशील राजगुरू यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, ‘चापेकर वाडा येथे उभारण्यात येत असलेले स्मारक अतिशय सुंदर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या स्मारकात चापेकर बंधू यांच्या जीवनाशी संबंधित एकूण १४ प्रसंग आहेत.’ चापेकर बंधूनी केलेल्या रँडच्या वधाबद्दल सविस्तर माहितीही यावेळी त्यांनी दिली.

‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा चापेकर बंधूनी घेतली होती. चापेकर वाडा येथे उभारण्यात आलेले स्मारक हे लवकरच राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भारताचा सूवर्णमय इतिहास या स्मारकात पाहण्यास मिळेल, या स्मारकात दृकश्राव्य माध्यमातून त्या काळातील प्रसंग आपल्याला समजून घेता येतो असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

चापेकर स्मारकाचे भुमिपूजन आणि आज स्मारकाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजतो, क्रांतिवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने चालविण्यात येत असलेले येथील समरसता गुरुकुलम संस्थेस भेट देण्याची संधी मला मिळाली या संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य उत्तम असून, आपण समाजातील वंचित समाजाला समरसतेतून संस्कारी कसे करू शकतो याचे आदर्श व उत्तम उदाहरण संस्थेत पहावयास मिळते. या संस्थेचे कार्य पुढे येण्यासाठी जागेची कमतरता भासणार नाही. जागा उपलब्ध करून दिली जाईल या चांगल्या उपक्रमासाठी,शासन या संस्थेस मदत करेल अशी ग्वाही श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले की, क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे बांधकाम अतिशय अप्रतिम केले आहे. या वाड्याच्या पुनर्बांधणीमुळे देशभक्तीचा नवा हुंकार पेटला आहे. क्रांतीवीर चापेकर स्मारकाच्या उद्घाटनाचा हा क्षण देशभरातील जनतेसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा आणि आनंदाचा क्षण असून ब्रिटीश सरकारच्या अन्यायाविरोधात केलेल्या एल्गाराची आठवण आहे. समाजसुधारकांच्या आणि क्रांतिकारकांच्या सेवा, त्याग समर्पणातून आपला देश घडला आहे. त्यांच्यामुळे मिळालेले स्वातंत्र्य अखंड राखणे, संविधानिक मूल्यांचे संरक्षण करणे, विविधतेमध्ये असलेली एकता जपणे, हे आपले कर्तव्य आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व महाराष्ट्राने नेहमीच केलेले आहे. तसेच आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या चापेकर बंधु, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे. न्याय, समता, बंधुता, स्वातंत्र्य, समानता या संविधानिक मूल्यांची जपवणूक करून ती मूल्ये पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे,’ असेही ते म्हणाले.

चापेकर बंधूचे स्मारक म्हणजे गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र

चापेकर स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शुभेच्छा संदेश असणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. यामध्ये क्रांतीवीर चापेकर बंधू यांच्या त्याग आणि बलिदानाबद्दल तसेच स्मारकाबद्दल माहिती होती. शुभेच्छा संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, ‘क्रांतीवीर चापेकर बंधूंचा इतिहास हा आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या तेजस्वी आणि प्रेरणादायी अध्यायांपैकी एक आहे. त्यांनी दाखवलेली राष्ट्रभक्ती, अपार साहस आणि बलिदान यामुळे देशप्रेमाला नव्या अर्थाने समृद्धी दिली. त्यांच्या स्मृतीस समर्पित हे राष्ट्रीय संग्रहालय केवळ एक स्मारक नाही, तर ते आपल्या गौरवशाली इतिहासाशी भावनिक नाते जोडणारं केंद्र आहे. हा उपक्रम आपल्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा अभिमान बाळगण्यास प्रेरणा देतो आणि ‘विकसित भारत’ या आपल्या सामूहिक संकल्पाची आठवण सतत जागवतो.’

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी प्रास्ताविक करताना चापेकर स्मारकाची माहिती दिली. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी क्रांतीवीर चापेकर स्मारक उभारण्याचा प्रवास तसेच गुरुकुलम बद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निरजा जोशी यांनी केले तर आभार महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले. हा संपूर्ण कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दिव्यांग भवन फाऊंडेशनतर्फे तेजा पटवारी यांनी सांकेतिक भाषेत अनुवादीत केला. कार्यक्रमाला या परिसरातील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्रांतीवीर चापेकर वाडा येथील स्मारकास भेट

मुख्य कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड गावातील क्रांतीवीर चापेकर वाडा येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकास भेट देऊन पाहणी केली. क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी यावेळी स्मारकाविषयी माहिती दिली. श्री. फडणवीस यांच्या हस्ते क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर समरसता गुरुकुलम संस्थेसही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भेट दिली गुरुकुलम संस्थेत सुरु असलेल्या विविध उपक्रमाविषयी व गुरुकुलमच्या कार्याविषयी माहिती जाणून घेतली. तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, विधान सभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी मान्यवर उपस्थित होते.

अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि १८ : रुग्णांना वेळेवर दर्जेदार तसेच कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी रुग्णालये, सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांना कठोर दक्षता बाळगावी. यात गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत व अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यवाही करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनांच्या कामकाजाचा आढावा मंत्री श्री. आबिटकर यांनी घेतला. यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दयानंद जगताप, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, सहायक संचालक डॉ.रवींद्र शेटे आदि उपस्थित होते.

बैठकीदरम्यान मंत्री श्री.आबिटकर यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये योजनेतील अंगीकृत रुग्णालयांची संख्या १७९२ वरून ४१८० पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे त्यांनी आदेश दिले.

या योजनेतील उपचार संख्येत वाढ, दरामध्ये सुधारणा, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे, तसेच प्राथमिक आरोग्य सेवाही योजनेत समाविष्ट करण्यासाठी अभ्यास समिती गठित करण्यात आली असून एक महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले. जनतेसाठी योजनेतील रुग्णालयांची माहिती, बेडची उपलब्धता आणि तक्रारी नोंदविण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲप विकसित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करून किमान पाच रुग्णांवर कॅशलेस उपचार करावेत, अशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेऊन त्याची पूर्वप्रसिद्धी करावी, असे मंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून त्यांच्या बैठका त्वरित आयोजित करण्यात याव्यात. तसेच आयुष्मान कार्ड वाटप मोहिमेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्रांच्या माध्यमातून वाटप करण्याची योजना आखण्यात आली आहे. या कार्यासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देशही मंत्री. श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे १,३०० कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगून, यापुढेही आवश्यक निधी वेळोवेळी दिला जाईल. या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी पूर्ण पारदर्शकपणे केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार सहन केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश आरोग्यमंत्री श्री.आबिटकर यांनी यावेळी दिले.

शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे- मुख्यमंत्री

शंकुतला खटावकर, प्रदीप गंधे यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे, दि. १८: महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्राने देशाचे अनेक क्षेत्रात नेतृत्व केले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२- २३ व २०२३-२४ वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पणनमंत्री जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, प्रशांत बंब, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सन २०२२- २३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांना तर सन २०२३-२४ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना वितरित करण्यात आला.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडू शकुंतला खटावकर आणि प्रदीप गंधे यांचे विशेष अभिनंदन करतानाच सर्व पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे अभिनंदन करून राज्यपाल म्हणाले, आज खेळ हे तांत्रिकदृष्ट्या तसेच शारीरिकदृष्ट्या अत्यंत स्पर्धात्मक झाले आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आशियाई तसेच ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्या मुलांना खूप लहान वयापासूनच खेळांमध्ये सहभागी करून घ्यावे लागेल. शाळा आणि पालकांनी मुलांना खेळ आणि स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे.

खेळांमध्ये अनेक मुली पुढे येत विविध स्पर्धांमध्ये पदके मिळवित याचा आनंद आहे. गेल्या काही वर्षात आपल्या दिव्यांग खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भविष्यात सर्व क्रीडा प्रकारात आपण वर्चस्व गाजवू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये खुल्या जागांची मोठी कमतरता आहे तिथे शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी स्थानिक मैदाने आणि क्रीडा क्लब यांच्यासोबत सहयोग करू शकतात, असेही राज्यपाल म्हणाले. आंतर विद्यापीठीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात क्रीडा संकुले स्थापन करण्यात आली असून क्रीडा सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे, असेही श्री. राधाकृष्णन यांनी नमूद केले.

देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्यात यासाठी प्रयत्न करीत असून महाराष्ट्राने आपल्या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी तयार करण्यास पुढाकार घ्यावा, ‘विकसित भारत’ बाबत चर्चा करत असतानाच आपण ऑलिंपिकमध्येही सर्वाधिक पदके मिळविण्याबाबतही विचार केला पाहिजे. आपले खेळाडू त्यात यशस्वी होतील असा आशावादही राज्यपालांनी व्यक्त केला.

पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे- मुख्यमंत्री
शिवछत्रपतींचे नाव या पुरस्काराच्या माध्यमातून खेळाडूंच्या नावासोबत लागत आहे, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही आपण केलेल्या मेहनतीला एक प्रकारची राजमान्यता आहे. हा पुरस्कारप्राप्त खेळाडू, प्रशिक्षक, भूतपूर्व खेळाडू आदी सर्वांनीच आपली भूमिका ठरवून खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी आपले पूर्ण योगदान देऊ अशा प्रकारची मानसिकता बाळगावी. छत्रपती शिवरायांनी जशी महाराष्ट्राला दिशा दाखवली तशीच महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम सर्व पुरस्कार विजेत्यांनी करावे; आणि सर्व प्रकारच्या खेळांमध्ये महाराष्ट्रच प्रथम क्रमांकावर राहील अशा प्रकारचा संकल्प घेऊ या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे यांनी अनेक बॅडमिंटन खेळाडू घडविले. त्यांनी महाराष्ट्रात बॅडमिंटनची संस्कृती निर्माण करण्याचे काम केले. आज खेळांना समाज मान्यता आणि राजमान्यताही आहे, मात्र १९७९ ते ८२ साली महिला कबड्डीपटू म्हणून शकुंतला खटावकर राष्ट्रीय स्तरावरील १०६ सामने खेळून अनेक विजय मिळवून दिले ही कामगिरी अतिशय अतुलनीय आहे, अशा शब्दात जीवनगौरव पुरस्कार प्राप्त खेळाडूंचे कौतुक मुख्यमंत्री यांनी केले. आपण पदकांची भरारी पुन्हा एकदा सुरू केली आहे. तथापि, आपल्या आता राष्ट्रीय स्तरावर उत्तम खेळ खेळणाऱ्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदके मिळविण्याची गरज आहे, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चांगले खेळाडू असल्यास त्यांना आवश्यकता असल्यास परदेशी प्रशिक्षक देखील देण्याचा निर्णय मागील काळात घेतला आहे. आजच्या स्पर्धात्मक जगात सर्व सुसज्ज व्यवस्थेसोबत गेल्याशिवाय खेळाडूंना चांगल्या प्रकारची स्पर्धा करता येणार नाही हे लक्षात घेऊन खेळाडूंसोबत त्यांचे प्रशिक्षक, फिजिओ (भौतिकोपचार तज्ज्ञ) यांना बरोबर घेऊन जाण्याची परवानगी देण्यात येते.

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जिंकून येणाऱ्या खेळाडूंचा उचित सन्मान झाला पाहिजे यासाठी बक्षिसांच्या रक्कमेत भरीव वाढ केली आहे. त्यांना सामावून घेण्यासाठी नोकऱ्यांमध्ये दालने उभी केली असून थेट नोकऱ्या देण्याचा कार्यक्रमदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. तालुक्यांपर्यंत चांगल्या खेळाच्या पायाभूत सुविधा तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सर्वच पुरस्कारार्थींनी त्यांच्या खेळावरील प्रेम, मेहनत आणि क्रीडा कौशल्याने क्रीडा क्षेत्राचा आणि देशाचा गौरव वाढविला आहे. बॅडमिंटन पटू व उत्तम खेळाडूंच्या पिढ्या घडविणारे उत्तम प्रशिक्षक म्हणून प्रदीप गंधे व कबड्डीपटू शकुंतला खटावकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ही आनंदाची बाब आहे. जीवन गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाल्यापासून पहिल्यांदा महिला प्रशिक्षकाला हा पुरस्कार देण्यात आला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे असे सांगून त्यांनी यापुढे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्या-त्या वर्षीच वितरित करण्यात यावेत, अशा सूचना क्रीडा विभागाला दिल्या.

ते म्हणाले, क्रीडा विभागाला पुरवणी मागण्यांमध्ये निश्चितच निधी वाढवून देण्यात येईल. पुरस्कारार्थींनी पुढील खेळाडू घडविण्याचे काम करावे, महाराष्ट्र राज्य खेळाच्या बाबतीत मागे राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी राज्य शासन पाठीशी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रारंभी स्वागत करताना मंत्री श्री. भरणे म्हणाले, राज्य शासनाने खेळाडूंना नेहमीच केंद्रस्थानी मानले आहे. शासकीय नोकरीत ५ टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येते. आतापर्यंत १२८ खेळाडूंना शासनाने थेट नोकरी दिली आहे. २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रथमच योग क्रीडा पुरस्कार देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात राज्यातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडू, संघटक, प्रशिक्षकांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यामध्ये जीवन गौरव पुरस्कार, दिव्यांग खेळाडू पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, थेट पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक- जिजामाता पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, साहसी क्रीडा पुरस्कार असे सन २०२२- २३ चे ७० आणि सन २०२३-२४ च्या ८९ याप्रमाणे एकूण १५९ पुरस्कार प्रदान करण्यात आले.

समारंभास पुरस्कारार्थी खेळाडू, खेळाडूंचे पालक आदी उपस्थित होते.

पुण्यात हिंदी सक्ती निर्णयाची रस्त्यावर होळी -मनसे आक्रमक

पुणे- महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हिंदी भाषा १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना शिकविणे सक्तीच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून महाराष्ट्र शासनाने राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा २०२४ नुसार दि १६ एप्रिल ला महाराष्ट्रावर आणि मराठीच्या मुळावर घाव घालणारा शासन निर्णय जाहीर केलाअसून असा आरोप करत या शासन निर्णयाचं दहन करत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पुणे शहराच्या वतीने उग्र निदर्शने करण्यात आली .
या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेत हिंदी भाषा १ ली ते ५ वी च्या विद्यार्थांना शिकविणे अनिवार्य केले गेले आहे. हा शासन निर्णय म्हणजे मराठीचे खच्चीकरण करून मराठी भाषेचे अस्तित्व संपविण्याचा शासनाचा कट आहे, उद्या काही दशकानंतर ” इथे मराठी माणसं राहत होती” अशी पाटी लावावी लागेल. मराठी अस्ताची सुरुवात ह्या मराठी द्रोही शासन निर्णयानुसार होईल असे मत यावेळी मांडण्यात आले.
मुख्यमंत्री यांनी संपर्क सूत्र म्हणून हिंदी भाषा शिकवली पाहिजे या त्यांच्या भूमिकेचा तीव्र निषेध देखील करण्यात आला.
वास्तविकता हिंदी भाषेची कुठलीही गरज आम्हा मराठी माणसांना नाही, त्रिभाषा सूत्र आम्हाला मान्य नाही आणि विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक दृष्ट्या ते अडचणीचे आहे तरी ही हा हिंदी बळजबरी लाटण्याचा अट्टाहास का? हा सवाल यावेळी उपस्थित केला.
जर राज्य शासनाने हा दळभद्री मराठी द्वेष्टा शासन निर्णय मागे घेतला नाही तर पुणे शहरात एक ही हिंदी पुस्तक छापू देणार नाही आणि ज्या शाळा सक्तीने हिंदी शिकवत असतील अशा शाळांना टाळे ठोकण्याचा इशारा या आंदोलन प्रसंगी देण्यात आला
सदर आंदोलनाचे आयोजन मनविसे शहराध्यक्ष धनंजय विजय दळवी यांनी केले यावेळी प्र. राज्य संघटक प्रशांत कनोजिया,राज्य उपाध्यक्ष ॲड.सचिन पवार , मनसे कामगार सेना राज्य उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी,मनसे विभाग अध्यक्ष सुनील कदम,राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक थिटे, रुपेश घोलप, सारंग सराफ, शहर उपाध्यक्ष विक्रांत भिलारे, परिक्षीत शिरोळे, ॲड. सचिन ननावरे, विभाग अध्यक्ष केतन डोंगरे, निलेश जोरी , आशुतोष माने, अशोक पवार, शशांक अमराळे , हेमंत बोळगे, संतोष वरे इत्यादी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची भाषा नष्ट करण्याचा भाजपाचा कुटील डाव.

हिंदीची सक्ती करून मराठी भाषा, अस्मिता व संस्कृती नष्ट करण्याचा डाव: हर्षवर्धन सपकाळ.

मराठी बोलणारे हिंदू नाहीत का? हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भाजपाचा अजेंडा, हिंदी भाषा सक्तीला काँग्रेसचा विरोध.

अंबाजोगाईमध्ये वकील तरुणीला केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करा.

मुंबई, दि. १८ एप्रिल २०२५

मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृती असून आपल्या संस्कृतीवरच घाला घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे सरकार करत आहे. विविधेत एकता ही आपली ओळख असून ती ओळख पुसण्याचा भाजपाचा डाव आहे. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा सरकारचा निर्णय अत्यंत चुकीचा असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, एकीकडे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा व दुसरीकडे बोलीपासून दूर ठेवायचे ही दुट्टपी भूमिका आहे. भाषा ही संवादाचे साधन आहे, संस्कृती आहे. एकाचवेळी तीन भाषांची सक्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी इतर विषयांचा अभ्यास कसा करायचा. या सक्तीमुळे मुले मुलभूत ज्ञानापासून वंचित राहतील. प्रादेशिक भाषांचा सन्मान झाला पाहिजे व इतर भाषांचाही आदर आहे पण भाजपाला प्रादेशीक संस्कृती व भाषा संपवायच्या आहेत. या निर्णयामुळे इतर भाषा शिक्षकांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. हिंदू, हिंदी व हिंदूराष्ट्र लादण्याचा भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा असून अशा सक्तीला काँग्रेसचा विरोध आहे, असे सपकाळ म्हणाले.

दक्षिण भारतात हिंदी भाषेला तीव्र विरोध आहे मग महाराष्ट्रात सक्ती का? भाषा लादण्याचा हा प्रकार देशाचे तुकडे पाडण्यासाठी आहे का? आणि मराठी भाषा बोलणारे हिंदू नाहीत का? असे सवाल करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याचा कारभार ज्या भाषेत चालत होता ती भाषाच भारतीय जनता पक्ष नष्ट करायला निघाले आहे, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केला.

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येची घटना जगाने पाहिली आहे. बीडमध्ये आका गँग, खोके गँग अशा गँग कार्यरत असून बीडमधील अत्याचार थांबत नाहीत. अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकीली करणाऱ्या एका तरुणीला गावातील ध्वनी प्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन रिंगण करून बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाइप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे महिला बेशुद्ध पडली. तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत क्रूर आणि निंदनीय आहे. एका वकील महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? असा प्रश्न विचारून सरकारकडे थोडी लाज शरम बाकी असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी व कठोर शिक्षा करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

डिपॉझीट अभावी उपचार नाकारलेल्या दिनानाथ रुग्णालयासह डॉ. घैसास हि दोषमुक्त ?

पुणे-गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांच्या मृत्यूला जबाबदार ठरलेले दीनानाथ रुग्णालय आणि डॉ. सुश्रृत घैसास हे ससून रुग्णालयाच्या चौथ्या अहवालात मात्र निर्दोष ठरले आहेत.भिसे यांच्यावरील उपाचारात दीनानाथ रुग्णालय किंवा डॉ. घैसास यांनी कुठेही हलगर्जीपणा केला नसल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविण्यात आले आहे. यानंतर पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाकडे नव्याने अभिप्राय मागविला आहे.

गर्भवती तनिषा (ईश्वरी) भिसे यांनी 2 जुळ्या मुलींना जन्म दिल्यानंतर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यापूर्वी भिसे यांना रक्तस्त्राव होत असल्याने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी आणले. मात्र, त्यांनी दाखल करून घेतले नाही. त्यावेळी दीनानाथचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांनी नातेवाइकांकडे 10 लाख रुपयांची डीपॉझीट रकमेची लेखी मागणी केली. मात्र, नातेवाइकांनी तीन लाख रुपये भरण्याची तयारी दाखवली. पण घैसास यांनी तनिषा यांना दाखल करून घेतले नाही. त्यामुळे भिसे कुटुंबीय तेथून बाहेर पडले.
दीनानाथमध्ये उपचारांना उशीर झाल्यामुळे ईश्वरी भिसे यांचा मृत्यू झाला, असा ठपका यापूर्वीच्या आरोग्य संचालक यांच्या चौकशी समितीने ठेवला होता. याशिवाय धर्मादाय सह आयुक्तांच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाने 35 कोटी 48 लाखांच्या धर्मादाय निधीचा वापरच केला नसल्याचे समोर आले होते. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू समितीनेही वेळेत उपचार न मिळाल्याने मेंदूला प्राणवायुचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मृत्यू झाल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला होता.यानंतर पुणे पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्याचे पत्र ससून रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार ससून रुग्णालयाने त्यासाठी चौकशी समिती तयार करून त्या मार्फेत तनिषा भिसे ज्या ज्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या होत्या त्या सर्व रुग्णालयांची चौकशी केली तसेच त्यांचे उपाचाराचे कागदपत्रे तपासली. यात महिलेच्या उपचारात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा तेथील डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याबाबत उल्लेख नाही, अशी माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

लाज वाटत नसेल तर स्वत:च्या वडिलांचे फोटो लावा,शिंदेंवर टीका करताना आदित्य ठाकरेंनी थेट लायकीच काढली

बिहार निवडणुकीसाठी हिंदी भाषेचा विषय

मुंबई-बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नासिक मधील ठाकरे गटाच्या मेळाव्यात मांडलेले नाही तर उद्धव ठाकरे यांचे विचार एआयच्या माध्यमातून बाळासाहेबांच्या तोंडून मांडले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्याला आता आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची लायकी नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आम्हाला चोरांनी सांगण्याची आवश्यकता नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचे फोटो लावावे, असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज वापरून एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करावी एवढी त्यांची मोठी लायकी नाही. कुणाल कामरा याने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे. आम्हीच नाही तर त्यांचेच खासदार त्यांना साप म्हटले असल्याचा दावा देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आगामी काळात बिहार आणि मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे. त्यामुळेच गेल्या काही काळामध्ये घडलेल्या भेटीगाठी नंतरच हिंदी भाषेचा विषय समोर आला असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तुम्ही मराठीचा विषय काढा, आम्ही हिंदीचा विषय घेतो, असे त्यांचे ठरलेले दिसते, असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मराठी हे सर्वांना आलेच पाहिजे आणि ते सक्तीचे असायलाच पाहिजे, असे आमचे मत आहे. मात्र, पहिलीपासून तीन भाषा शिकवणे हा मुलांवर दबाव टाकत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुंबईतील पाण्याच्या समस्येबाबतही आता आदित्य ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना दोषी ठरवले आहे. इतकेच नाही तर सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला असून त्यालाही त्यांनी विरोधी दर्शवला आहे.या संबंधीत आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत पाण्याची समस्या ही एक मोठी समस्या आहे. भाजपने हा प्रश्न सोडवलेला नाही आणि मुख्यमंत्र्यांनीही हा प्रश्न सोडवलेला नाही. आम्ही याबद्दल निषेध केला, पण पोलिसांनी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले. कालच्या बैठकीत सरकारने धरण बांधण्यासाठी पाच लाख झाडे तोडण्याचा निर्णय घेतला आहे. ते हवामानाला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही विकासाच्या विरोधात नाही, पण आम्हाला हवामानाचे रक्षण करावे लागणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.