Home Blog Page 352

सनदी सेवा दिनाच्या समारंभात ‘सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्ट सेवेबद्दल पंतप्रधान पुरस्कार’ प्रदान करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सनदी अधिकाऱ्यांना 21 एप्रिल, 2025 रोजी 17व्या सनदी सेवा दिनानिमित्त संबोधित करतील. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेबद्दल  दिले जाणारे पंतप्रधान पुरस्कार देखील प्रदान करतील. केंद्र, राज्य सरकारांच्या तसेच जिल्हा प्रशासनात विशिष्ट प्राथमिकता कार्यक्रम तसेच नवोन्मेष प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वंकष विकास व नवोन्मेषाबद्दलच्या इ- पुस्तकाचे अनावरण करतील. यात विशिष्ट प्राथमिकता कार्यक्रम तसेच नवोन्मेष प्रभावी पद्धतीने राबवणाऱ्यांच्या यशोगाथा समाविष्ट असतील. पुरस्कार विजेत्या उपक्रमांवर आधारित एक चित्रफीत देखील यावेळी दाखवली जाईल.

राष्ट्रीय सनदी सेवा दिनाला संबोधित करण्याची पंतप्रधानांची ही सातवी वेळ आहे. सनदी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःला पुनर्समर्पित करण्यासाठी व लोकसेवेप्रती तसेच कामातील उत्कृष्टतेप्रती वचनबद्धतेचे स्मरण करण्यासाठी हा सनदी सेवा दिन साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली दिल्लीतल्या मेटकाफ हाऊस इथे प्रशासनिक सेवेच्या प्रशिक्षणार्थींना संबोधित केले होते, याच्या स्मरणार्थ या दिवसाची निवड केली गेली आहे. सनदी सेवा दिना निमित्ताने सरकारने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दिवसभराची सनदी सेवा दिन परिषद आयोजित केली आहे.

पंतप्रधान सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टता पुरस्कारांद्वारे जिल्हास्तरावरील व केंद्र तसेच राज्यस्तरावरील संस्थांनी सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या नवोन्मेषपूर्ण व असाधारण कामाची दखल घेतली जाईल. पंतप्रधान पुरस्कार 2024 साठीच्या योजनेत खालील प्राधान्य कार्यक्रमांची नोंद ‘सनदी सेवा दिन 2025’ च्या कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी घेतली जाईल.

अ) श्रेणी 1: जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास

ब) श्रेणी 2: आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम

क) श्रेणी 3: नवोन्मेष

सर्वसमावेशक मूल्यमापनानंतर 1588 नामांकनांमधून 14 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान पुरस्कारात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व रुपये 20 लाखाची प्रोत्साहन रक्कम असते, व पुरस्कार विजेत्या जिल्हा अथवा संस्थेने ती रक्कम एखाद्या सार्वजनिक कल्याणाच्या उपक्रमात  साधनसंपत्तीची कमतरता पूर्ण करण्यासाठी वापरण्याची अपेक्षा असते.

पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ‘सनदी सेवा सुधारणा-आव्हाने व संधी’ या विषयावर कॅबिनेट सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्र होईल.

याशिवाय पुढील विषयांवर चार सत्रांचे आयोजन करण्यात  आले आहे:- शहरी वाहतूक बळकटीकरण, आयुष्मान भारत पंतप्रधान – जन आरोग्य योजना व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या माध्यमातून स्वस्थ भारत साठी प्रोत्साहन, सक्षम अंगणवाडी मोहीम व पोषण 2.0 अभियान मार्फत महिला व बालकांच्या पोषक आहाराला प्रोत्साहन, आकांक्षीत ब्लॉक कार्यक्रम.

‘शहरी वाहतूक बळकटीकरण’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री तसेच ऊर्जामंत्री मनोहर लाल असतील, ‘आयुष्मान भारत पंतप्रधान – जन आरोग्य योजना व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या माध्यमातून स्वस्थ भारत साठी प्रोत्साहन’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायन व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा असतील, ‘सक्षम अंगणवाडी मोहीम व पोषण 2.0 अभियान मार्फत महिला व बालकांच्या पोषक आहाराला प्रोत्साहन’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी असतील आणि ‘आकांक्षीत ब्लॉक कार्यक्रम’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम असतील.

सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, उप सचिव, सह सचिव आणि भारत सरकारचे इतर अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य सरकारांचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रिन्सिपल सचिव, केंद्रीय प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख, निवासी आयुक्त, केंद्रीय सेवांचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी या दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मौज मजेसाठी दुचाकी चोरी: २ भामट्यांकडून दहा मोटार सायकल जप्त

पुणे-मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या २ भामट्यांकडून पोलिसांनी दहा मोटार सायकल जप्त केल्या आहेत. या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’विमानतळ पोलीस ठाणेचे तपास पथकातील अंमलदार दादासाहेब बर्डे व ज्ञानदेव आवारी यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दुचाकी मोटार सायकल चो-या करणारे दोन इसम चोरीचे बुलेट मोटार सायकलसह संजयपार्क मध्ये आहेत. सदरची बातमी तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळविली असता,त्याप्रमाणे स्टाफचे मदतीने विमानतळ तपास पथकाने सापळा रचुन चोरीची बुलेट मोटार सायकल व त्यावरील दोन इसम नामे १) मनिषसिंग जितेंद्रसिंग भदोरिया वय २१ वर्ष रा. लेन नंबर ०५, महादेवनगर, अवधुत बंगल्याचे बाजुला संतनगर, लोहगाव पुणे २) कार्तिक अनिल फुलपगार वय २१ वर्ष रा. गुरुद्वारा कॉलनी, स्मशानभुमी जवळ लोहगाव पुणे यास ताब्यात घेतले त्याचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करता एकुण दहा चोरीच्या मोटार सायकल मिळुन आल्या आहेत. त्यापैकी विमानतळ पोलीस स्टेशनचे हद्दीतील सात दुचाकी चोरीचे गुन्हे, कोथरुड पोलीस स्टेशनचे हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आलेला आहे. तसेच उर्वरीत दोन मोटारसायकल बाबत तपास सुरु आहे. नमुद आरोपी यांचेकडुन एकुण ७,००,०००/-रु (सात लाख रुपये) किं. च्या दहा दुचाकी मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, मनोज पाटील , पोलीस उपायुक्त परि-०४ , हिम्मत जाधव, सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती आशालता खापरे सहा. पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ, शैलेश नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, योगेश थोपटे, दादासाहेब बर्डे, ज्ञानदेव आवारी, हरीप्रसाद पुंडे, लालु कहे, गिरीष नाणेकर, रुपेश तोडेकर यांचे पथकाने केली आहे.

खेडी आणि आदिवासी पाड्यांपर्यंत आजही वैद्यकीय विकास पोहोचला नाही

पद्मश्री दादा उर्फ भिकू रामजी इदाते यांचे मत : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पदग्रहण समारंभ

पुणे: वैद्यकीय विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो, परंतु हा विकास खेड्यापाड्यातील, दरी खोऱ्यातील आदिवासी पाड्यापर्यंत आजही पोहोचला नाही. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडविणार. वसुधैव कुटुम्बकम असे आपण म्हणतो परंतु त्या कुटुंबाचे आपण काय करायचे. देश धर्म आणि संस्कृती सुस्थितीत राहण्यासाठी समाज सुदृढ असायला पाहिजे, असे मत पद्मश्री भिकू रामजी इदाते यांनी व्यक्त केले.

जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणेचे संचालक डॉ.नवीन कुमार, संघटनेच्या मावळत्या अध्यक्ष डॉ.शुभदा जोशी, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनिल भुजबळ, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत- मेहता तसेच विविध वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

सन २०२५ – २०२६ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. सुनिल भुजबळ, उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब काकडे, खजिनदार डॉ.संदीप निकम, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ.राजेश दोशी, सहसचिव डॉ.दीपक गांधी, डॉ.सिद्धार्थ शिंदे यांची निवड झाली आहे.

डाॅ. नवीन कुमार म्हणाले, कोविड-१९ नंतर जगात अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज २०२५ मध्ये १५ हजारपेक्षा अधिक विषाणू आहेत आणि २३४ विषाणू कुटुंबांची नोंद आहे, आणि प्रत्येक वर्षी तीनशे ते चारशे नवीन विषाणू निर्माण होत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी सारख्या ४ इन्स्टिट्यूट भारताच्या विविध भागात स्थापन करण्यात येणार आहेत. जर आपण देशात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणायचे ठरवले तर ते शक्य नाही, यासाठी एकत्रित आणि एकसूत्री दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. आपण विषाणूंना प्रतिबंध करू शकत नाही, परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी च्या माध्यमातून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण तयार आहोत.

डॉ. सुनिल भुजबळ म्हणाले, आजारांना प्रतिबंध करा, संरक्षण करा आणि आरोग्य संस्कृतीला प्रोत्साहन द्या, हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाच्या वर्षी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन काम करणार आहे. डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी यासोबतच सामाजिक आरोग्य जनजागृतीसाठी शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम यंदा राबविण्यात येणार आहेत. डॉ. भाग्यश्री मुनोत मेहता यांनी सूत्रसंचालन केले. 

सुमधुर गीत संगीताने रंगला ‘दिल ने कहा है दिल से’स्वच्छंद पुणे सांगीतिक कार्यक्रम

पुणे : सुमधुर संगीत, गायकांचे अप्रतिम सादरीकरण, वादकांची चपखल संगत आणि जोडलेला रसिकांची दिलखुलास दाद, अशा आणि संगीताने नटलेल्या वातावरणात ‘दिल ने कहा दिल से’ हा रंगला.

स्वच्छंद पुणे ईगल इन्फ्रा ग्रुपच्या प्रस्तुत आणि हिंदीत ‘दिल ने दिल से’ हा जोडून मराठी संगीताचा कार्यक्रम कोथरूडमधील यशवंतराव नाट्यगृह येथे रंगला. या कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरण रसिक हिंदी संगीताच्या सुवर्ण युगाल हरवले.

पलवी आनदेव यांनी ‘येलवी समाज आहे ये का’ गाण्याने कार्यक्रमाची प्यार केली. यानंतर रवींद्र शाळू यांनी ‘आणि हा हृदयात काय आहे’ हे गाणे सादर केले तसेच संजय कांबळे यांनी ‘मी शायर तो नही’ या गाण्याचे सादरीकरण आपल्या कार्यक्रमात रंगत आणली.

‘चांद सिफारिश जो करते हो’, ‘जादू तेरी नजर’, ‘दिल ने कहा है दिल से’, ‘करवते बदले’, ‘सुरज हुआ मद्ध’, ‘दिवाने है दिवानो को ना घर चाहिये’, ‘गाता है मेरा दिल’ अशा नवीन बहारदार हिंदी संगीतकारांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

पल्लवी आनदेव ,संजय कांबळे, मनोज सेठिया, रवींद्र शाळू कार्यक्रमाचे खास आकर्षण असलेल्या मुंबईतील कलाकार व्हाईस ऑफ लतादी ओळखल्या जाणाऱ्या प्रताजक सातार्डेकर यांनी अटम गाणी सादर केली. प्राजक्ता सातार्डेकर यांनी गायलेल्या मोसे छेले जा, रंगीला रे या गाण्यांना विशेष दाद दिली. प्राजक्ता श्रावणे यांनी निवेदन केले. यश भंडारे यांनी संगीत संयोजन केले. केदार परांजपे, शैलेश देशपांडे, नागेश भोसेकर, आसीफ इनामदार, रोहित जाधव या सर्व वादक कलाकारांनी आपले वादन रसिकांना भारावून टाकले.

जागतिक मूळव्याध परिषदेत डॉ. सुनिल अंभोरे यांचे संशोधन सादर 

इजिप्तमध्ये स्थानिक भूल वापरून शस्त्रक्रियेचे सादरीकरण : कैरो येथे १९ वी जागतिक परिषद संपन्न

पुणे : मुळव्याध तज्ञ डॉ. सुनिल दिवाकर अंभोरे यांना इजिप्तमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय जागतिक मुळव्याध परिषदेत स्थानिक संज्ञाहरण (लोकल अनास्थेशिया / प्यूडेंडल नर्व्ह ब्लॉक) वापरून शस्त्रक्रियेचे सादरीकरण करण्याचा बहुमान मिळाला. भारतातून केवळ चार तज्ञांची निवड परिषदेसाठी करण्यात आली होती, त्यामध्ये डॉ. अंभोरे यांचा समावेश होता.

 कैरो येथे संपन्न झालेली ही परिषद इजिप्शियन सोसायटी ऑफ कोलन अ‍ॅन्ड रेक्टम,मेडिटेरिनियन सोसायटी ऑफ पेल्विक फ्लोअर डिसऑर्डर्स आणि कैरो पेल्विक फ्लोअर अ‍ॅन्ड कोलोरेक्टल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. हे परिषदेचे १९ वे वार्षिक अधिवेशन होते.

या परिषदेसाठी भारतासह एकूण १९ देशांमधून विविध मुळव्याध तज्ञ, कोलोरेक्टल सर्जन आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आमंत्रित करण्यात आले होते. 

डॉ. अंभोरे यांनी पेनलेस लोकल अनेस्थेशिया (प्यूडेंडल नर्व्ह ब्लॉक) वापरून मुळव्याध, भगंदर, फिशर आणि पायलोनिडल साइनस यांसारख्या विकारांवरील शस्त्रक्रिया कशा सुरक्षित, वेदनारहित आणि रुग्णस्नेही पद्धतीने करता येतात याचे प्रत्यक्ष सादरीकरण परिषदेत केले.

त्यांच्या नवीन आणि प्रभावी कामाच्या पद्धतीला आणि कौशल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय पद्धतीचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाला द्राक्षाची आरास

भाविकांची दर्शनासह सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी

पुणे :- हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाला संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने द्राक्षाची सजावट करण्यात आली होती. ही सजावट पाहण्याबरोबरच बाप्पाच्या दर्शनासाठीही भाविकांनी गर्दी केली होती.

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. संकष्टी चतुर्थी निमित्ताने मंदिरात बाप्पाला निळ्या आणि काळ्या द्राक्षाचा नैवद्य वाढवून त्यातून आकर्षक सजावट करण्यात आली होती. या द्राक्षांचे पुण्यातील ‘सुर्योदय फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेला वाटप करण्यात आले.

साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेत जीवन संपवले:छेडछाडीतून तरुणीची आत्महत्या, बीड प्रकरणातील पीडित मुलीच्या आईचे एकनाथ शिंदेंना पत्र

बीड-बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एका तरुणीने छेडछाड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साक्षी कांबळे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 14 मार्च रोजी मामाच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. एक महिना उलटून गेला असून कुटुंब अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात आता साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे.

एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात साक्षी कांबळे यांच्या आई म्हणतात, साहेब, मी तुमची लाडकी बहीण. तुम्ही मुख्यमंत्री झाला आणि राज्यातील अस्वस्थ झालेल्या बहि‍णींना आधार मिळाला. आपण मुख्यमंत्री असताना आपल्या म्हणजेच आम्हासारख्या अगणित बहि‍णींना भावाचा बंध मिळाला. मी नाराज आहे. आज आपण उपमुख्यमंत्री आहात. मात्र माझ्यासाठी तुम्हीच लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री आहात. आज आम्हाला तुमची कमतरता भासते, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले आहे.

पुढे त्या म्हणतात, माझी मुलगी साक्षी तिला हवाई सुंदरी व्हायचे होते. मात्र एका क्षणात ती नाहीशी झाली. काही मुलांनी तिची छेड काढली आणि साहेब तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेऊन जीवन संपवले. साहेब आम्ही आस धरुन आहोत. तुमची भाची साक्षी या जगात परत येणार नाही, हे आम्हाला देखील माहिती आहे. मात्र त्या क्रूर नराधमांना देखील तेवढी शिक्षा होणे अपेक्षित आहे.

साक्षी कांबळे यांच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, 20 एप्रिल रोजी मुलीचे लग्न होणार होते. पण त्याआधीच छेडछाडीला कंटाळून माझ्या मुलीने आत्महत्या केली. अभिषेक कदम आणि 10 ते 12 मुलांची एक टोळी आहे. ही टोळी मुलींना फसवतात, त्यांचे फोटो काढून ब्लॅकमेल करतात. हे एक रॅकेट आहे. यात दोन मुलींचाही समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अभिषेक कदमवर मकोका लावावा आणि कायमचा जेलमध्ये टाकावा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

दरम्यान, या घटनेवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले, राजकीय दबावाला पोलिसांनी बळी पडू नये. बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये. पोलिसांनी कडक कारवाई करावी. मुलींची छेडछाड असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे दानवे यांनी म्हटले आहे.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयाच्या फॅशन टेक्नॉलॉजी विभागातील विद्यार्थ्यांचा “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” उत्साहात संपन्न

चिंचवड : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्त्र आणि डिझाइन्स चा भव्य फॅशन शो “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सामान्य घरातून आलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील फॅशन शो चा अनुभव देणे आणि त्यांना फॅशन, वस्त्र, डिझाईन क्षेत्रातील दिग्गजांशी संवाद साधता यावा यासाठी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी हा फॅशन शो आयोजित केला होता. यंदाचा फॅशन शो हा खादी आणि ज्युट या भोवती गुंफन्यात आलेला होता.

एलप्रो सिटी स्क्वेअर मॉल ऑडिटोरियम,चिंचवड, पुणे​ येथे संपन्न झालेल्या या फॅशन शो प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रा.कुलगुरू पराग काळकर, विद्यापीठाच्या कुलसचिव ज्योती भाकरे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक प्रभाकर देसाई,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य,पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲड. संदिप कदम,प्राचार्य डॉ.संगीता व्ही. जगताप, विभागप्रमुख प्रा.प्रिती सदाशिव जोशी, ज्युरी दीपाली जोशी, पूजा वाघ, प्राजक्ता साळवे ,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथळकर,डॉ नितीन घोरपडे, डॉ देविदास वायदंडे,डॉ.डी.बी. पवार, संदीप पालवे, प्राचार्य पंडित शेळके, डॉ तुषार शितोळे, डॉ. शर्मिला चौधरी, डॉ अंजली काळकर, सरोज पांडे,योगेश पवार आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

संदीप कदम म्हणाले, मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी या “सृजन – द क्रिएटिव विंग्स २०२४-२५” चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना फक्त व्यासपीठ मिळवून न देता त्यांना प्रत्यक्ष इंडस्ट्री शी जोडण्याचे काम आम्ही या शो च्या माध्यमातून करत आहोत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य , प्राचार्य डॉ संगीता जगताप म्हणाल्या, अलीकडे एक दोन महीने कपडे वापरुन नवीन ट्रेंडचे कपडे वापरण्याकडे कल असतो. मात्र आमच्या विद्यार्थ्यांनी ज्युट आणि खादी यातून आधुनिक कपडे निर्माण केले आहेत. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी आज विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत, यातूनच मुलांना भविष्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

विभागप्रमुख प्रा. प्रीती सदाशिव जोशी म्हणाल्या, आमच्याकडे विविध कोर्सेस चालतात, हा फॅशन शो पदवीच्या विद्यार्थ्यांचा आहे. एका थीम वर रिसर्च करून या शो मध्ये सादरीकरण केले जाते. आजच्या शो मध्ये ज्युट ला पारंपारिकता जपत मॉडर्न लुक दिल्याचे बघायला मिळते

या फॅशन शोच्या यशस्वीतेसाठी फॅशन टेक्नॉलॉजी विभागाच्या वद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी फॅशन टेक्नॉलॉजीच्या विभाग प्रमुख प्रा प्रीती सदाशिव जोशी, वीणा करांडे, फातेमा सय्यद, अंजली बोंद्रे, ऋतुजा पाटसकर यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांचे पालकही मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर जे बंड्या यांनी केले.

फॅशन शो स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे

सर्वोत्तम संग्रह श्रेणी 2 क्रम – कार्निवल्स ऑफ कलर्स
1) मोहिनी खेमनार
२) समिक्षा नवले
3) रोनीत तिकोणे

अनुक्रम – अर्थ एलिगन्स
1) आकांशा आखाडकर
२) कावेरी हिवरेकर
3) दीपाली गायकवाड
4) दिव्या पवार

सर्वोत्कृष्ट डिझाइन पुरस्कार

अनुक्रम – स्टिचरी फ्लोरेन्स
1) निवेदिता चव्हाण
२) स्मिता पडुल
3) अवंतिका मगरे

क्रम – लँड्स ऑफ डेनिम
१) मनीषा कोरे
२) कल्याणी गोसावी
3) सायली सरादे

सर्वोत्कृष्ट नाविन्यपूर्ण पुरस्कार
क्रम – ट्रीब ट्विस्ट
1) तन्वी बिबावे
२) दिपाली चव्हाण

ज्युरी विशेष पुरस्कार
देसी चार्म खादी
सर्व MVoc PG विद्यार्थी

बहारदार, सुश्राव्य गायन-वादन मैफलीने ब्रह्मनाद संगीत महोत्सवाला उत्साहात सुरुवात

ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानतर्फे धायरीत आयोजन-युवा, ज्येष्ठ कलाकारांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध

पुणे : नव्या पिढीतील आश्वासक गायक गंधार देशपांडे, प्रसिद्ध संवादिनी वादक सुधीर नायक आणि किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी पद्माताई देशपांडे यांच्या बहारदार आणि सुश्राव्य सादरीकरणाने रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवातील पहिला दिवस संगीत रसिकांसाठी आनंददायी ठरला.

ब्रह्मनाद कला मंडळ आणि धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठान, धायरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय 24व्या ब्रह्मनाद संगीत महोत्सवाचे आयोजन कै. बंडोजी खंडोजी चव्हाण विद्यालयातील राजमाता जिजाऊ माँसाहेब बहुउद्देशीय सभागृहात करण्यात आले आहे. महोत्सवाला युवा रसिक, कलाकारांसह ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

सुरुवातीस धारेश्वर विद्या व क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष काका चव्हाण, संचालक अनिकेत चव्हाण, डॉ. पंडित संजय गरुड, रागिणी गरुड, कॉसमॉस बँकेचे माजी संचालक मिलिंद पोकळे, सुभाष चाफळकर, ह. भ. प. विजय महाराज जगताप, माजी कामगार आयुक्त विकास पनवेलकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन झाले. या प्रसंगी ब्रह्मनाद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सरस्वती वंदना सादर केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित डॉ. राम देशपांडे यांचे सुपुत्र आणि शिष्य गंधार देशपांडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी आपल्या मैफलीची सुरुवात धानी रागातील रचनेने केली. विलंबित आणि द्रुत तालावर आधारित भगवान शंकरांवरील पंडित राम देशपांडे यांनी रचलेली ‌‘शंभो महोदव‌’ ही बंदिश तयारीने सादर केली. त्यानंतर भगवान शंकरांच्या तांडव नृत्याचे वर्णन करणारी ‌‘डम डम डमरू बाजे‌’ ही रचना सादर करून शास्त्रीय संगीतावरील आपली पकड दर्शविली. ‌‘गाओ विद्या गुणी सम‌’ ही रचना सादर करून ‌‘अबिर गुलाल उधळीत रंग‌’ हे सुप्रसिद्ध भजन सादर करत रसिकांची मने जिंकली. अखेरीस ‌‘श्री राम जय राम जय जय राम‌’ आणि ‌‘विठ्ठल‌’ नामाचा गजर करताना गंधार यांना रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ करत वातावरणात भक्तिरसाची निर्मिती केली. उदय कुलकर्णी (संवादिनी), ऋषिकेश जगताप (तबला), ज्ञानेश्वर दुधाणे (पखवाज), ओम देशमुख, सिद्धार्थ गोडांबे (सहगायन, तानपुरा) यांनी साथसंगत केली.
रसिकांशी संवाद साधताना गंधार देशपांडे म्हणाले, पुण्यातील उपनगरात पहिल्यांदाच गायनसेवा करीत आहे. पंडित संजय गरुड यांनी या परिसरात भारतीय अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर केल्यामुळे रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे याचा आनंद आहे.

दुसऱ्या सत्रात पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य प्रसिद्ध संवादिनी वादक पंडित सुधीर नायक यांचे एकल संवादिनी वादन झाले. त्यांनी मैफलीची सुरुवात राग पूरिया कल्याण सादर करून केली. त्यानंतर गुरू पंडित तुळशीदास बोरकर यांची झपतालातील एक रचना ऐकविली. पंडित रामाश्रय झा रचित बंदिश सादर करून तिलक कमोद रागातील रचना ऐकविली. कार्यक्रमाची सांगता पिलू रागातील ठुमरीने केली. संवादिनीच्या सप्तकावर सहज फिरणारी बोटे आणि गायकी अंगाने सादर केलेले वादन हे वैशिष्ट्य रसिकांना विशेष भावले. शुभदा गायकवाड (स्वरमंडल), ऋषिकेश जगताप (तबला) यांनी साथसंगत केली.

महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता किराणा घराण्याच्या ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका विदुषी पद्माताई देशपांडे यांच्या गायन मैफलीने झाली. त्यांनी सुरुवातीस राग चंद्रकंसमधील पारंपरिक ख्यालातील बंदिश सादर करून त्याला जोडून द्रुत एकतालातील ‌‘रुम झुम बिछुआ बाजे‌’ ही स्वरचित व स्वत: संगीतबद्ध केलेली रचना सादर केली. जगत्‌‍गुरू संत तुकाराम महाराज यांचा ‌‘बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल‌’ हा अभंग स्वत: रचलेल्या वेगळ्या चालीत सादर केला. मैफलीची सांगता भैरवीतील ‌‘श्याम बिन राधा भयी बावरी‌’ या बंदिशीने केली. या रचनेचे शब्द व संगीत विदुषी पद्माताई देशपांडे यांचेच होते. अनुभवाने परिपूर्ण कलाकाराला, त्याच्या गायन साधनेला समजून घेण्याची संधी पद्माताई देशपांडे यांच्या मैफलीने युवा कलाकारांना लाभली. तुषार केळकर (संवादिनी), रोहन पंढरपूर (तबला), माऊली दुधाणे (पखवाज), निषाद गरुड (टाळ) ऋतुजा बोऱ्हाडे आणि नात ऐश्वर्या देशपांडे यांनी गायनसाथ केली.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब ,रिंग रोड भूसंपादनाचा मोबदला देताना कमिशन खातंय कोण ? चौकशीची मागणी

पुणे : पुण्याच्या भवतालच्या परिसरात होणारा रिंग रोड त्यासाठी होणारे भूसंपादन यांचे काम वेगाने होऊ लागले असले तरी या भूसंपादनाचा मोबदला देताना कोणते अधिकारी आणि एजंट शेतकऱ्यांकडून आणि जमिन्माल्कांकडून कमिशन खात आहेत याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी अशी मागणी गेल्या वर्षभरापासून होते आहे.मात्र यासाठी उघडपणे पुढे यायला कोणी धजावत नसल्याने या मागणीला म्हणावे तसे पाठबळ मिळेनासे झाले आहे. मात्र अशी चौकशी जर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली तर मोठ मोठे मासे गळाला लागतील आणि जमीन मालकांना दिलासा मिळेल अशीही निश्चिती दिली जाते आहे.

दरम्यान आतापर्यंत पुणे रिंग रोडच्या पश्चिम भागातील जमिनीचे संपादन पूर्ण होत आले आहे. त्या भागात कामांसाठी कंपन्यांना आदेश दिल्याने त्यांच्याकडून काम सुरू करण्यात आले आहे. पूर्व भागाच्या २६५ हेक्टर भूसंपादनापैकी आतापर्यंत ३० हेक्टरचे संपादन शिल्लक आहे. याबाबत सध्या हालचाली देखील सुरु करण्यात आल्या आहेत.याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात रिंग रोड संदर्भात आढावा बैठक घेतली. त्या बैठकीत ‘एमएसआरडीसी’चे सहसंचालक लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह खेड, हवेली तालुक्यातील उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’तर्फे रिंग रोड केला जात आहे. या रोडसाठी हवेली, पुरंदर, खेड, भोर, मावळ आणि मुळशी या तालुक्यातील गावांमधली जमीन संपादित करण्यात आली आहे.याबाबत संपादनाचे निवाडे लवकर जाहीर करून संपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे निवाडे २५ एप्रिलपर्यंत पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत संपादन पूर्ण करण्यात येणार आहे. आता रिंग रोडचे नऊ टप्प्यांच्या कामांचे कार्यादेशही देण्यात आले आहेत.रिंग रोडजवळ सेवा रस्ते, विविध सुविधा तयार करण्यासाठी अतिरिक्त जमीन आवश्यक आहे. त्याकरिता महामंडळाने जिल्हा प्रशासनाकडे अतिरिक्त जमिनीची मागणी असल्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. रिंग रोड साकारताना सेवा रस्ते, विविध सुविधांसाठी पूर्व आणि पश्चिम भागातील अनुक्रमे १० आणि २२ गावांमधील जमिनीचे अतिरिक्त संपादन करावे लागणार आहे.एमएसआरडीसीने याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला असून लवकरच त्याची अधिसूचना प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. याशिवाय पुरंदर तालुक्यातील चांबळी आणि हिवरे गावातील रिंग रोडची आखणी बदलल्याने दोन्ही गावांतील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.आखणीमध्ये चांबळी गावाचा समावेश होता. चांबळी गावातील जमीन संपादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. आता रिंग रोडसाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाल्याने चांबळी, हिवरे या गावातील शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दाखविली आहे. मावळ तालुक्यातील चांदखेड, उर्से, परंदवाडी, कासार आंबोली, मुळशी तालुक्यातील मुठे, घोटावडे, कातवडी, भोरमधील खोपी, हवेलीतील रहाटवडे, बहुली या गावांमधील काही प्रमाणात अतिरिक्त जमीन आवश्यक आहे.तसेच नानोली तर्फे आकुर्डी, वडगाव, सुदुंबरे, हवेली तालुक्यातील लोणीकंद, बिवरी, कोरेगाव मूळ, बकोरी, वळती या गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील पवारवाडी, गराडे, दिवे, चांबळी, सोनोरी, थापेवाडी, हिवरे या गावातील काही जमीन अतिरिक्त म्हणून संपादित केली जाणार आहे. खेड तालुक्यातील खालुंब्रे, कुरोळी, सोळे, निघोजे, धानोरे आणि भोरमधील शिवरे या गावांमधली जमीन घेण्याचा प्रस्तावात समावेश आहे.

भाजपकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकच्या तयारीची मजबूत पायाभरणी: महाराष्ट्रात ९६३ मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण

भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संघटन विस्तारात ऐतिहासिक घोडदौड

२५८ नव्या मंडळांची स्थापना, ९६३ कार्यरत मंडळांतून पक्षशक्ती अधिक भक्कम

मुंबई-/पुणे – भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे .राज्यभरात एकूण १२२१ मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी ९६३ मंडळ अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि प्रभावी पद्धतीनं पूर्ण झाली आहे. “संघटन हेच खरे बळ” या तत्त्वावर चालत, भाजपनं आता महाराष्ट्रात मजबूत गड उभारण्याची तयारी सुरू केली आहे.

भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा हा टप्पा महाराष्ट्राच्या सर्व भागांतील राजकीय ताकद दृढ करण्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरतोय. संपूर्ण राज्यभर १२२१ मंडळ गठीत करण्यात आले आहेत, त्यापैकी ९६३ मंडळांची रचना जाहीर करण्यात आली असून, यातील २५८ मंडळे नव्यानं स्थापन केली गेली आहेत.

प्रमुख विभागवार पाहता:
• कोकण-ठाणे विभागात १८४ मंडळ
• उत्तर महाराष्ट्रात १८४ मंडळ
• पश्चिम महाराष्ट्रात २२२ मंडळ
• विदर्भात ३१३ मंडळ
• मराठवाड्यात २०७ मंडळ
• मुंबई विभागात १११ मंडळ

मंडळ गठीत करण्यात आले आहेत. या संपूर्ण नियुक्त्या केवळ आकडेवारी नाही, तर पक्षाची जनाधारावर आधारित शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. यातून भाजपच्या कार्यपद्धतीतील शिस्त, संघटन आणि वेळेचं भान प्रकर्षानं अधोरेखित होतं.

भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. भाजपची रणनीती आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधण्याचा ध्यास घेतेय.

‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’, ‘खालिद का शिवाजी’सह ‘जुनं फर्निचर’ चित्रपटाची कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड

सातासमुद्रापार मराठीचा डंका!

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई, दि. 20 एप्रिल.2025

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes Film Festival) तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात ‘स्थळ’, ‘स्नो फ्लॉवर’ आणि ‘खालिद का शिवाजी’ या तीन मराठी चित्रपटांचा समावेश आहे. तर ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची विशेष निवड करण्यात आल्याची घोषणा, सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

फ्रान्समध्ये येत्या १४ ते २२ मे २०२५ या कालावधीत कान चित्रपट महोत्सव संपन्न होणार आहे. कान या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची एन्ट्री झाली आहे. महामंडळामार्फत सन २०१६ पासून कान महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपट पाठवले जात आहेत. मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावा आणि जागतिक सिनेप्रेमींना मराठी चित्रपटाची भूरळ पडावी, हा यामागचा हेतू आहे. या चित्रपट निवडीसाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने तज्ज्ञ परीक्षण समिती तयार केली होती. आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, गणेश मतकरी, इरावती कर्णिक, अपूर्वा शालिग्राम यांचा यात समावेश होता.

स्थळ
भारतातील ग्रामीण भागातील पारंपारिक अरेंज मॅरेज व्यवस्थेवर भाष्य करणारा ‘स्थळ’ हा चित्रपट आहे. समाजात खोलवर रुजलेली पितृसत्ताक पद्धत, रंगभेद आणि सामाजिक दृष्टिकोन अशा अनेक गोष्टींवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. अभिनेत्री नंदिनी चिकटे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. जयंत सोमलकर यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

स्नो फ्लॉवर
‘स्नो फ्लॉवर’ या मराठी चित्रपटात मार्मिक, क्रॉसकंट्री कथा सांगणारा आहे. रशिया आणि कोकण या दोन वेगळ्या संस्कृतींना जोडणारा हा चित्रपट आहे. बर्फाळ सायबेरिया आणि हिरवेगार कोकण यांच्या विरोधाभासी पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. गजेंद्र अहिरे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

खालिद का शिवाजी
राज मोरे यांच्या ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद हा मुलगा मुस्लिम धर्मीय असल्याने त्याला इतर मुलं एकटं पाडतात. त्याचे निरागस डोळे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेतात, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.

जुनं फर्निचर
महेश मांजरेकर अभिनीत आणि दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्त्वावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात वृद्धापकाळात पोहोचल्यावर आपलीच मुले आपल्याला कशाप्रकारे नाकारतात आणि त्यामुळे होणारे हाल दाखवण्यात आले आहेत. अभिनेता भूषण प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. मेधा मांजरेकर, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकारी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून म्हातोबा मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी

मंदिरे सामाजिक ऐक्य आणि संस्काराचे केंद्र- ना. पाटील

पुणे-कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणे अधिक सुकर झाले आहे. ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारातून सदर मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात आली असून, त्यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोथरूडचे ग्रामदैवत श्री म्हातोबा यांचे एआरआय टेकडीवरील मूळ ठाणे असून, मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची अतिशय दुरवस्था झाली होती. सदर पायऱ्या अतिशय जीर्ण आणि भग्न झाल्याने मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठी कसरत करावी लागत होती. सदर पायऱ्यांची पुनर्बांधणी करुन; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची व्यवस्था व्हावी; अशी ग्रामस्थांची सातत्याने मागणी होती.

त्यामुळे ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेत; या पायऱ्यांची पुनर्बांधणी केली असून; घडीव दगडी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिर परिसराचे वैभव देखील वाढले असून; दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की मंदिर हे सामाजिक ऐक्य आणि संस्कारांचं केंद्र आहे. त्यामुळे तिथे होणाऱ्या एकत्रिकरणातून सामाजिक ऐक्य जपले जाते. राज्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना; अनेक मार्ग उभारले. पण मी लहानपणापासून ज्या देवस्थानात जायचो; त्या कोल्हापूरमधील तळे माऊली मंदिराकडे जाणारा मार्ग तयार केला.

ते पुढे म्हणाले की, कोथरुड मतदारसंघातील म्हातोबाचे मूळ ठिकाण असलेल्या एआरआय टेकडीवरील मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे हे काम करुन; म्हातोबांच्या चरणी अर्पण करतो. भविष्यात ही या परिसराच्या विकासासाठी एकात्मिक आराखडा तयार करावा; त्यासाठी आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही यावेळी दिली. दरम्यान, नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराबद्दल म्हातोबा सेवक संघाच्या वतीने समाधान व्यक्त केले.

उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी-शर्ती नाहीत:दोघे भाऊ एकत्र येत असल्याच्या वृत्ताने शिंदे-फडणवीसांच्या पोटात गोळा – संजय राऊत

संदीप देशपांडे यांना दिले प्रत्युत्तर, चांगल्या कामात अडथळे आणण्यासाठी पक्षाबाहेरून यांना कोणी ऑपरेट करतेय ?

मुंबई-राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हिताचा विषय मांडला. त्याला उद्धव ठाकरे यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. मात्र, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, असे काही लोकांना वाटत नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्र हितासाठी दोन भाऊ एकत्र येण्यावर सहमती होत आहे. तर त्यामध्ये वाद करण्यासारखे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या समोर कोणत्याही अटी-शर्ती ठेवलेल्या नसल्याचा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.

या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र हिताच्या फॉर्मुलामध्ये भारतीय जनता पक्ष बसत नाही. त्यांच्यासोबत असलेले लोक या फॉर्मुलात बसत नाही. त्याला तर कोणी अटी आणि शर्ती म्हणत असतील, तर त्यांनी थोडा विचार करावा. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही महाराष्ट्रासाठी काम करायला तयार आहोत. माझ्यासारखा माणूस देखील त्यासाठी सकारात्मक आहे.

मी अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. मी श्रीकांत ठाकरे सोबत देखील एकत्र काम केले आहे. आता मी आदित्य सोबत देखील काम करत आहे. मात्र महाराष्ट्र हित कशात आहे? मराठी माणसांचा स्वाभिमान कशात आहे? हे आम्हाला माहिती आहे. बाळासाहेबांचे ध्येय महाराष्ट्र आणि मराठी माणूस होता. त्यासाठी दोन भाऊ एकत्र येत असतील तर चांगले आहे. तर आम्ही त्यांचे स्वागतच केले आहे. केवळ महाराष्ट्र द्रोही असलेल्या लोकांना पंगतीला देखील बसू नका, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले असल्याचे संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे यांनी जे विधान केले आहे, त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रति विधान केले आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते काय बोलतात, त्यावर मी उत्तर देणार नाही. राज ठाकरे बोलल्यानंतर त्यावर बालू. राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र हिताला सर्वोच्च प्राधान्य देत उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे

महाराष्ट्र द्रोही कोण? हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि ते जर तुम्हाला समजत नसेल, तर राज ठाकरे यांना एक ट्रेनिंग स्कूल काढावी लागेल. अशा शब्दात संजय राऊत यांनी संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे अत्यंत हुशार नेते आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना देखील महाराष्ट्र द्रोही कोण? हे माहिती आहे. मात्र, काही लोक चांगल्या कामात अडथळे निर्माण करत असतील, तर पक्षाच्या बाहेर राहुन कोणीतरी हे सर्व ऑपरेट करत आहे, हे मी ठामपणे सांगू सांगतो. या माध्यमातून संजय राऊत यांनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

22 एप्रिलला मुंबईत संग्राम थोपटेंचा भाजप प्रवेश

पुणे-काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा 22 एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे. त्यामुळे दुःख वाटत आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की, भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महा विकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. महा विकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महा विकास आघाडीचे काम केले. आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत. मात्र, जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे.

सोनिया गांधीचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे संग्राम थोपटे पुत्र आहेत. संग्राम थोपटे यांना वडिलांपासून राजकीय वारसा मिळाला आहे.त्यांच्या वडीलांना कॉंग्रेसनेच मोठे केले.अनंतराव थोपटे सलग 14 वर्ष मंत्री राहिले आहेत. 40 वर्षांपासून भोर विधानसभेवर कॉंग्रेस पक्षामुळे थोपटे कुटुंबियांचे वर्चस्व निर्माण झालेले आहे. सहा वेळा अनंतराव थोपटे आमदार झाले आहेत. 3 वेळा संग्राम थोपटे आमदार म्हणून निवडून आले आहेत. पश्चिम महाराष्ट्रमधील काँग्रेसचे मोठे नाव म्हणून थोपटे यांची ओळख आहे.कॉंग्रेसला अनंतराव थोपटे यांनी मोठे केले असे मात्र दिसलेले नाही.मात्र मंत्रिपदासाठी संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या कॉंग्रेस भवनवर हल्ला केला होता आणि मोठ्या प्रमाणात मोडतोड देखील केली होती.तरीही गेल्या नजीकच्या काळात संग्राम यांच्यावर कॉंग्रेसने मोठी जबाबदारी देखील टाकली होती .
2002 मध्ये संग्राम थोपटे भोर पंचायत समितीमध्ये उपसभापती झाले होते.
2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवत ते भोर विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 2014 आणि 2019 विधानसभा निवडणुकीत विजयी होत हॅट्रिक केली.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या विरोधात संग्राम थोपटे यांना पराभव स्वीकारावा लागला.
संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रुजवण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोठे योगदान दिले. सध्याच्या अनेक बड्या नेत्यांना अनंतराव थोपटे यांनी त्यांच्या काळात निवडणूक लढवण्यासाठी पक्षाच तिकीट देऊन संधी दिली होती. त्यामुळे आजही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे.