Home Blog Page 350

मुंबई-पुणे महामार्गावरील पुण्यातील तिघांचा मृत्यू

पुणे:मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा परिसरात रविवारी रात्री भरधाव ट्रकने मोटारीला धडक दिली. त्यानंतर मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेसह तिघे जण पुण्यातील आहेत. अपघातात १४ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रिया सागर इंगुळकर (वय ३५, रा. टिळक रस्ता, १०४१, शुक्रवार पेठ), निलेश संजय लगड (वय ४२), श्राव्या निलेश लगड (वय १२, दोघे रा. गिरिजाशंकर अपार्टमेंट, सदाशिव पेठ) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत सागर पांडुरंग इंगुळकर (वय ४०) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपघातात शरयू लगड, रुद्राक्ष लगड, अंशिका मोगल, आरव मोगल, अर्श लगड, अर्षित लगड, तसेच मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील अश्विनी रमेश जाडकर (वय ४३), ओमकेश रमेश जाडकर (वय २३), सुमीत तुकाराम कदम (वय २४), पुष्कर लक्ष्मण शेळकंदे (वय २५), जिग्नेश रमेश जाडकर (वय १२), संजय नामदेव वाल्हेकर (वय ४२), विमल नामदेव वाल्हेकर (वय ६९, सर्व रा. भिवंडी, जि. ठाणे) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, लगड आणि इंगुळकर हे नातेवाईक आहेत. ते कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त परगावी गेले होते. रविवारी रात्री जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरुन ते मोटारीतून पुण्याकडे परतत होते. त्या वेळी मुंबईकडे भरधाव वेगात ट्रक निघाला होता. मुंबईकडे जाणाऱ्या मोटारीला भरधाव ट्रकने पाठीमागून धडक दिली. त्या वेळी मोटारचालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार पुण्याकडे येणाऱ्या मोटारीवर आदळली.

अपघातात सागर इंगुळकर यांची पत्नी प्रिया, साडू निलेश लगड आणि त्यांची मुलगी श्राव्या गंभीर जखमी झाले. मुंबईकडे निघालेल्या मोटारीतील चालकासह सात जण जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड तपास करत आहेत.

मुंबईवरील 26/11 हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात:भाजप नेत्याचा खळबळजनक आरोप

रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारी यांच्या आरोपावर पलटवार केला आहे.
उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी माधव भंडारींवर बोचरी टीका केली. भंडारींना पक्षात कोणीच विचारत नाहीय.‌ ते आऊटडेटेड झालेली बॅटरी असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे.

मुंबईवरील 26/11 च्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते माधव भंडारी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसने माधव भंडारी एक सडकछाप व्यक्ती असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.माधव भंडारी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या व मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला. मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. मुंबईवर हल्ला होणार याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम एम कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्त्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले.

नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. पण या प्रकरणी ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी म्हणाले.

माधव भंडारी यांनी यावेळी गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. भारतात गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण, व्यवस्था म्हणजे पोलिस, महसूल, न्यायव्यवस्था तीच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

‘चित्र’ कलेच्या दुनियेत रमले कलाप्रेमी  

द्विज आर्ट्सच्या माध्यमातून ‘कला उत्सव’ चित्र प्रदर्शनाचे आयोजन ; तब्बल ११२ कलाकारांच्या ६५० हून अधिककलाकृतींचा समावेश
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन, दिलीप जोशी (जेठालाल) यांचे अत्यंत सूक्ष्म आणि प्रभावी चित्ररूप…अयोध्या श्रीराम मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, ताज महाल…भगवान श्रीकृष्ण, महादेव, गणपती, नटराज यांच्या विविध रूपांचे दर्शन अशा ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांच्या सुंदर कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली. ऐतिहासिक स्मारकांची भव्यता, धार्मिक व पौराणिक कलाकृती यांसह विविध कलाकृती प्रदर्शनात मांडण्यात आल्या.

द्विज आर्ट्सच्या माध्यमातून पुण्यातील कला क्षेत्रात विशेष स्थान मिळवलेल्या चार कलाकारांनी एकत्र येत ‘कला उत्सव’ या आगळ्यावेगळ्या कला प्रदर्शनाचे आयोजन बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहाच्या कलादालनात केले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन प्रख्यात चित्रकार चारूहास पंडित यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमाला ज्येष्ठ चित्रकार मुरली लाहोटी, महेश थोरात आणि  हनुमंत जगनगडा हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. चित्रकार हेतल शहा, दीपाली जगताप, अवंती कारंजावाला आणि मोहिनी गेंदे या आपापल्या कला वर्गांमधून कलाकार घडवणाऱ्या गुरू असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या सुंदर कलाकृती प्रदर्शनात आहेत.

दीपाली जगताप म्हणाल्या, या प्रदर्शनात एकूण ११२ कलाकार सहभागी झाले आहेत, विशेष म्हणजे ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ७० वर्षांच्या ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सर्व वयोगटातील कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे. प्रदर्शनात एकूण ६५० हून अधिक चित्रे आहेत. चारकोल, सॉफ्ट पेस्टल, वॉटर कलर्स, ऍक्रेलिक पेंटिंग्स, कॅलिग्राफी, टेक्स्चर आर्ट अशा विविध माध्यमांतील कलाकृती प्रदर्शनात आहेत. दिनांक २२ एप्रिल पर्यंत सकाळी १०.३० ते सायंकाळी ६ या वेळेत हे प्रदर्शन विनामूल्य पाहण्यास खुले आहे.

फर्ग्युसनमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट

पुणे : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात यंदा 81 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या असून, ग्रीन वॉर्बलर, रेड ब्रेसेड फ्लायकॅचर आणि ट्री पपेट असे युरोपातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती कॉलेजच्या नेचर क्लबने नुकत्याच केलेल्या पक्षीगणनेत आढळून आली आहे.

वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी महाजन म्हणाल्या, “हे पक्षी खूप अंतर प्रवास करून भारतात येतात. त्यांचा आकार छोटा असतो. प्रवासादरम्यान त्यांचे वजन कमी होते. या कालावधीत युरोपात बर्फ आणि थंडी असते. त्यांना खाद्य मिळत नाही. ते सुरक्षित आणि खाण्यापिण्यासाठी योग्य अधिवासाच्या शोधात असतात. फर्ग्युसनचा आवार जैववैविध्य संपन्न असल्याने या परिसरात ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ते वास्तव्य करतात.”

तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) हा पक्षी वारंवार आपल्या घरट्याकडे येताना निरीक्षणात दिसला. तो जमिनीपासून 10 ते 12 फूट उंचीवरील वाळलेल्या खोडावर खालच्या बाजूने घरटे बनवितो. त्याबरोबर घार, पोपट, मैना, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, तांबोली, शिपाई बुलबुल, घुबड हे स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आढळले.

या वर्षी 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत पक्षी गणना करण्यात आली. त्यामध्ये 68 विद्यार्थ्यांनी सहभागी होत 81 प्रकारच्या पक्षांची नोंद केली. त्यासाठी 2186 निरीक्षणे ॲपद्वारे नोंदविण्यात आली. हा उपक्रम ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक उपक्रमाचा भाग होता. कॅर्निल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडुबॉन सोसायटीचा त्यासाठी पुढाकार होता.

देशभरात साडेसहा हजार सहभागींनी 66 हजार निरीक्षणे सादर करीत 1086 प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले. राज्यात 500 हून अधिक सहभागींनी पाच हजारहून अधिक निरीक्षणे करीत 400 प्रजातींची नोंद केली.

सिद्धांत म्हात्रे हा विद्यार्थी म्हणाला, “हवामान बदलामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना अधिवास गमवावा लागत आहे. शहरीकरणामुळे पक्षी संकटात आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जागृती करण्यासाठी पक्षीगणनेसारखा उपक्रम प्रेरणादायी वाटला.”

पर्यावरणशास्त्र शिकणारी मुस्कान श्रीवास्तव म्हणाली, “या उपक्रमामुळे पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. विज्ञान, सर्जनशीलता आणि महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य एकत्र उपयोगात आणता आले. त्यामुळे शिक्षणाला कृतिशील उपक्रमाची जोड मिळाली.”

डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. विजय तडके, डॉ. मीनाक्षी महाजन यांनी मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणी करुन घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २१: कौशल्य रोजगार उद्योजकता नावीन्यता विभागाच्यावतीने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतर्गत कार्यप्रशिक्षणार्थीचा प्रशिक्षण कार्यकाळ ६ महिने ऐवजी आता ११ महिने करण्यात आला आहे. तसेच प्रशिक्षणार्थींचे विद्यावेतन डीबीटीद्वारे ऑनलाईन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते.

त्यामुळे ज्या उमेदवारांनी १० मार्च २०२५ किंवा त्यापूर्वी सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले असेल अशा प्रशिक्षणाचीना उर्वरित पाच महिने कार्य प्रशिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या वाढीव ५ महिन्यांच्या कालावधीसाठी कार्य प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवार तसेच सद्यस्थितीत प्रशिक्षण घेत असलेले उमेदवार व याजनेचा नव्याने लाभ घेणाऱ्या इच्छुक उमेदवारांची आधार व आवश्यक कागदपत्रे (उदा. आधार, शैक्षणिक पात्रता, वय, अधिवास प्रमाणपत्र इ.) तपासणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे योजनेच्या https://www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील प्रतिज्ञापत्राचा नमुना प्रशिक्षणार्थी व आस्थापना यांनी संबंधित सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे, यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे यापुढे आधार जोडणीनंतर डीबीटीद्वारे आर्थिक लाभ दिला जाणार असल्याने प्रशिक्षणार्थ्यांनी बँक खाते आधारशी संलग्न करुन घेणे आवश्यक आहे.

आधार व कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षणासाठी रुजू करुन घेण्यात येणार नाही. तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीची नोंदणी आधार पडताळणी अनिवार्य आहे. ज्या बँक खात्याला आधार लिंक आहे, त्याच बँक खात्याचा क्रमांक योजनेच्या विद्यावेतन स्वीकारण्यासाठी नमूद करणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराचे स्वतःचे आधार अद्यावत असणे आवश्यक आहे. आधार संलग्न मोबाईल नंबर व बँक खाते याबाबतची पडताळणी उमेदवारांनी स्वतः करायची असून, ही जबाबदारी ही उमेदवाराची असेल,

सर्व इच्छुक कार्य प्रशिक्षणार्थी उमेदवार आणि आस्थापना यांना आवाहन करण्यात येते की, प्रशिक्षणार्थीनी आधार पडताळणी करणे तसेच, आस्थापना / नियोक्ते यांनी कागदपत्र तपासणीसाठी जिल्हा कोशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८२. रास्ता पेठ, पुणे येथे ३० एप्रिल, २०२५ पर्यंत संपर्क साधून आवश्यक तो तपासणी करुन घ्यावी व या योजनेचा जास्तीत जास्त लाभ उमेदवार तसंच, आस्थापना / नियोक्ते यांनी घ्यावा. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाशी प्रत्यक्ष अथवा ०२०-२६१३३६०६ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सा. वा. मोहिते, प्र. सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्याेजकता, पुणे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.
0000

“अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतूट” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचा सन्मान

सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन अक्षय भोसले यांनी केले होते

पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या शुभहस्ते आज अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. हा विशेष सोहळा शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना आणि श्रीमंत माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात बोलताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्या प्रेरणेने महिलांच्या सामाजिक आणि अध्यात्मिक सन्मानासाठी या उपक्रमाला बळ मिळाले आहे. अध्यात्म आणि विकास यांचे नाते अतिशय जवळचे असून महिलांनी अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.”

“आळंदीच्या धाडसी महिलांचा उल्लेख करत भावनिक आठवण”

लाडक्या बहिणींच्या योजनेच्या पार्श्वभूमीवर डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “मला आठवतंय, निधी वितरणाच्या वेळी मी आळंदीला आले होते. तिथल्या महिलांचे धाडस, आत्मसन्मान आणि कष्ट पाहून मला नेहमीच अभिमान वाटतो.”
अक्षय महाराज भोसले यांनी या महिलांचा सन्मान करण्याची कल्पना मांडली आणि ती लगेच मनापासून स्वीकारली गेली, असेही त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात त्यांनी संत जनाबाईंचे उदाहरण देत सांगितले की, “समाजात टीका झेलूनही त्यांनी आपले अध्यात्मिक कार्य थांबवले नाही.” ही परंपरा आजच्या महिलांनीही पुढे नेली पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.

डॉ. गोऱ्हे यांनी शेवटी माहिती दिली की, “३ मे ते १० मे या कालावधीत धर्मवीर सेनेच्या वतीने, महानगरपालिका व स्थानिक संस्थांच्या सहकार्याने भव्य अध्यात्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.”

सन्मान सोहळ्याचे प्रभावी संयोजन

यावेळी राष्ट्रीय कीर्तनकार अनिताताई सुद्रिक, जेष्ठ कीर्तनकार गयाबाई यादव, मृदंगाचार्य देविदास महाराज मांडगे, विठ्ठल महाराज कापसे व वारकरी संप्रदायातील मोठे योगदान असणाऱ्या सर्व महिलांचा विशेष पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्रीमंत माऊली प्रतिष्ठानच्या प्रमुख विनित माऊली सबनीस आणि सहअध्यक्ष प्रभंजन दादा महातोले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. तर, अखिल वारकरी गुरुकुल संघाचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज शेळके, माऊली महाराज सुरडकर, ज्ञानेश्वर माऊली जाधव, कैलास महाराज गायकवाड, अनंत महाराज धर्मे, किशोर महाराज धुमाळ, अंकुश महाराज कदम व सर्व आळंदीतील गुरुकुलाचे अध्यक्ष महाराज मंडळी यांचा प्रमुख सहभाग होता.

त्याचबरोबर शिवसेना प्रवक्त्या, उपनेत्या संजना घाडी, उपनेत्या सुलभा उबाळे, संर्पक प्रमुख सारिका पवार, जिल्हा प्रमुख मनिषा परांडे, तालुका प्रमुख प्रिया पगडे, आळंदी नगराध्यक्ष सौ.घुंडरे, रामशेठ गावडे, नितीन गोरे, प्रकाश वाडेकर, आळंदी शहर प्रमुख राहुल चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित होते.

गिरणी कामगारांच्या प्रश्नावर सरकार गप्प का? – नारायण पांचाळ अध्यक्ष,जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र

राजापूर – मुंबई ही कामगारांची,एके काळी गिरणी कामगारांमुळे मुंबई गजबजलेली होती,मात्र,गिरण्या बंद झाल्या आणि मुंबईतला गिरणी कामगार संकटात सापडला,तो स्थलांतर करू लागला,कोकणातले अनेक चाकरमानी गिरणी कामगार आपापल्या गावाकडे परतले,खऱ्या अर्थाने अशा गिरणी कामगारांना मुंबईतच घर मिळाले पाहिजे,आजच्या वृद्धावस्थेत सुद्धा शेकडो कामगार आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकतात याचा सरकारने विचार करायला हवा,गिरणी कामगार व कामगारांच्या वारसांची घराची मागणी रास्त असून अशा घटकांच्या पाठीशी आपण उभे राहणार असल्याचे पत्रकार नारायण पांचाळ यांनी राजापूरच्या मेळाव्यात प्रतिपादन केले.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घरांसाठी पुकारलेला लढा न्याय असून या लढ्याला जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांनी येथे गिरणी कामगार आणि वारसांच्या सभेत बोलताना पाठिंबा दिला आहे.सरकार दिवसागणिक अनेक प्रश्नांवर शासन निर्णय जाहीर करते, मग गिरणी कामगारांच्या प्रश्नावर गप्प का? असा सवाल नारायण पांचाळ यांनी आजच्या राजापूर सभेत केला आहे. गिरणी कामगार घराच्या प्रश्नांवर अनेक संस्था संघटनांकडून पाठिंबा मिळू लागला आहे.
गिरणी कामगार घरांच्या रखडलेल्या प्रश्नावर राष्ट्रीय मजदूर संघाच्या वतीने अध्यक्ष सचिन भाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी बुधवारी महात्मा गांधी सभागृहात पार पडलेल्या कामगार आणि वारसांच्या सभेत सरकारला अल्टिमेशन देऊन एल्गार आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण व पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांमध्ये प्रचार दौरे आयोजित करण्यात आले आहेत.काल सावंतवाडी आणि कणकवली येथे कामगार आणि वारसांच्या सभा पार पडल्या.या जनसंपर्क अभियानाअंतर्गत आज राजापूर येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.
गिरणी कामगारांवर अन्याय का?
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत योगदान देणारा, मुंबईचा गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर मागे का? असा सवाल राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर यांनी केला आहे.गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आलेल्या अनेक संकटांवर संघाने वेळोवेळच्या लढ्याद्वारे 2मात केली आहे्.

आता माघार नाही!
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपा ध्यक्ष सुनिल बोरकर म्हणाले, गिरणी कामगार घरांच्या प्रश्नावर संघटनेने जे आक्रमक पाऊल उचलले आहे,ते कदापि मागे घेतले जाणार नाही.फॉर्म भरलेला अपात्र ठरता कामा नये.1982 नंतर कामावर आलेल्या कामगाराने एक जरी पुरावा दिला तरी तो ग्राह्य धरला पाहिजे. संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी तसा म्हाडाशी पत्र व्यवहार केला आहे. कामगार आयुक्तांनी या प्रश्नावर गांभिर्याने विचार करायचे ठरविले आहे.मुंबईत एकही गिरणी कामगार घरांच्या हक्कापासून वंचित रहाता कामा नये,हि संघटनेची भुमिका आहे
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कानडे, प्रसिद्धी प्रमुख काशिनाथ माटल यांची भाषणे होऊन, कामगारांनी या लढ्यामागे‌ खंबीरपणे उभे राहिले पाहिजे,असे आपल्या भाषणात आवाहन केले.राजापूर तालुका उबाठा गटाचे‌ प्रमुख कमलाकर कदम यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरते.ते या सभेला
आवर्जून उपस्थित होते.

कात्रजच्या धरणात उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार ….

पुणे-कात्रजच्या धरणात उडी मारलेल्या तरुणीस वाचविणारे दशरथ तळेवाड यांचा कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात सत्कार करण्यात आला .

कात्रज येथील पेशवे कालीन धरणात सकाळच्या सुमारास एका युवतीने उडी घेतली असता जवळच असलेल्या नागरिक तसेच सुरक्षा रक्षकाच्या ओरडण्याच्या आवाजावरून कामावर निघालेले दशरथ तळेवाड यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तलावात उडी मारून तरुणीला सुखरूप बाहेर काढून तिचे प्राण वाचविले आहेत.
अनेकवेळा अपघात व दुर्घटना स्थळी नागरिक उपस्थित असताना मदतीसाठी न जाता व्हिडीओ काढणे , पळून जाणे असे प्रकार सरार्स घडत असतात. मात्र दशरथ तळेवाड यांच्यासारखे माणुसकी दाखविणाऱ्या देवदूताच्या धाडसाचे कौतुक सत्कार स्वरुपात कोंढवा येवलेवाडी कार्यालयाचे सहायक आयुक्त लक्ष्मण कादबाने यांनी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे हस्ते शाल , श्रीफळ व पर्यावरणपूरक झाडाचे रोप असलेली कुंडी मानचिन्ह , सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तळेवाड हे देवदूत असुन त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे तसेच समाजाप्रती प्रेम असलेले लोकांचा आपण आदर , सत्कार केला पाहिजे असे डॉ.दत्ता कोहिनकर यांनी सांगितले.
कार्यक्रमास उप अभियंता राखी चौधरी , प्रशासन अधिकारी सुनील मोरे , वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राजू दुल्ल्म , जालिंदर कदम यांचे सह सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

शेतकऱ्यांना अर्थक्षम करा;सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करा- शिवसंग्राम पक्षाची मागणी

पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याविषयी कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, वारंवार कर्जमाफीवर चर्चा करण्यापेक्षा शेतकऱ्यांना अर्थक्षम करण्यावर अधिक भर देण्याची गरज आहे. त्यांच्या कृषी उत्पादनांना चांगला भाव देण्यासह कृषी उत्पादनावर प्रक्रिया, शेतीक्षेत्राला बिगरशेती क्षेत्राची जोड, कृषी व सहकार विभागातील समन्वय आणि सहकार व महसूल विभागाच्या समन्वयातून खरीप व रब्बी हंगामात १०० टक्के पीककर्ज उपलब्ध करून द्यावे,” अशी मागणी शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्षा ज्योती विनायक मेटे यांनी केली.

पुण्यातील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे कलादालनात शिवसंग्राम पक्षाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. त्यानंतर ज्योती मेटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला. प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, प्रदेश चिटणीस योगेश विचारे, पुणे शहराध्यक्ष भरत लगड, ज्येष्ठ पदाधिकारी शेखर पवार, वसंत पाटील, पी. के. चव्हाण यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्योती मेटे म्हणाल्या, “आजच्या बैठकीत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊनही स्मारकाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी तातडीने लक्ष देऊन मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडून स्मारकाचे कामकाज त्वरित सुरु करावे. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व स्मृतीस्थळ, तसेच पानिपत येथील मराठ्यांच्या शौर्य इतिहासाच्या प्रतिक असलेले स्मृतीस्थळ उभारणीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन करते. स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचे हौदेगिरी (दावणगिरी) कर्नाटक येथे स्मृतीस्थळ उभारणेबाबत कार्यवाही करावी.”

केंद्रीय अर्थसंकल्पात महिलांच्या स्टार्टअपसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने महिलांच्या स्टार्टअपला प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हा स्तरावर इनक्युबेशन सेंटर, जिल्हा उद्योग केंद्रामध्ये विशेष कक्ष निर्माण करावा. महाराष्ट्र शासनातील चतुर्थश्रेणी आणि अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे सेवानिवृत्तीचे वय सध्या ६० वर्षे आहे, तर केंद्र शासनासह २५ राज्यांत सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे आहे. महाराष्ट्रात मात्र सेवानिवृत्तीचे ५८ वर्षे आहे. त्यामुळे ही बाब अत्यंत अव्यवहार्य आहे. शासन धोरणानुसार ५५ वर्षे वयांवरील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यास पात्रतेनुसार तृतीय श्रेणीत पदोन्नती मिळाली तरी निवृत्ती वय ५८ वर्षे असल्याने त्याचा लाभ होत नाही. त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये सर्वदूर नाराजीची तीव्र भावना होत आहे. त्यामुळे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे,” असेही मेटे यांनी नमूद केले.

बीडमधील गुन्हेगारीवर बोलताना ज्योती मेटे म्हणाल्या, “सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निंदनीय असून, हत्येप्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी सुरुवातीपासून करत आहे. यातील आरोपींना अटक झाली आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडत पोलीस प्रशासनाने निःपक्षपातीपणे तपास करून आरोपींना शिक्षा होईल, याकडे लक्ष द्यावे. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बीडच्या जनतेप्रमाणे आम्हालाही प्रशासन चांगले काम करेल, अशी आशा आहे. अजित पवार यांचा प्रशासनावर वचक असून, अपेक्षेप्रमाणे काम होत असल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाईमध्ये वकील महिलेला झालेली मारहाण चीड आणणारी आहे. अशा घटनांमुळे बीडची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा करणारा राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी याकडे न पाहता कठोर कारवाई करावी, अशीच आमही मागणी आहे.”

आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत शिवसंग्रामची भूमिका त्यावेळी जाहीर करू. आता शेतकऱ्यांचे, महिलांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देत आहोत. तसेच राज्यभरात शिवसंग्रामची सदस्य नोंदणी मोहीम सुरु असून, पक्षबांधणीवर भर दिला जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात अधिकाधिक संख्येने शिवसंग्राम पक्षात लोकांना सामावून घेतले जात असल्याचेही मेटे यांनी सांगितले.

लहुजी क्रीडा संकुलचा तिसरा खेळाडू शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते रेनॉल्ड जोसेफ यांचा पुणे शहर बॉक्सिंग संघटनेकडून सत्कार

पुणे-महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा “शिवछत्रपती पुरस्कार” पटकावणारा जन. अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथील आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र येथील तिसरा खेळाडू रेनॉल्ड जोसेफ याचा सत्कार माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते पुणे शहर संघटनेचे अध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

जन. अरुणकुमार वैद्य स्टेडियम, भवानी पेठ, पुणे येथे १९९३ साली तत्कालीन बॉक्सिंग कोच व महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे माजी महासचिव भरतकुमार व्हावळ यांनी रमेश बागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रातील असंख्य खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. सदर ठिकाणी प्रशिक्षण घेऊन अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या गिरीश पवार यांना २००५- ०६ या वर्षी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले.

त्यानंतर बॉक्सिंग चे आंतरराष्ट्रीय कोच विजय गुजर यांनी या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राची प्रशिक्षकाची जबाबदारी घेतली. कालांतराने माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे व नगरसेवक अविनाश बागवे यांच्या प्रयत्नाने या बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्राचे अतिशय सुसज्ज अशा “क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्रा”मध्ये रूपांतर करण्यात आले. बॉक्सिंग कोच विजय गुजर यांच्या प्रशिक्षणाने सुद्धा असंख्य बॉक्सिंग खेळाडूं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकले. या प्रशिक्षण केंद्रातील दुसरा शिवछत्रपती पुरस्कार अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदके पटकावणाऱ्या सलमान शेख यास २०१५-१६ या वर्षांकरिता व त्यानंतर तिसरा पुरस्कार रेनॉल्ड जोसेफ यास २०२२-२३ या वर्षांकरिता मिळाला.

याप्रसंगी शिवछत्रपती पुरस्कार विजेता रेनॉल्ड जोसेफ याचे कोच विजय गुजर व रेनॉल्ड जोसेफ याचे आई वडील यांनाही विशेष सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे कार्याध्यक्ष भरतकुमार व्हावळ, पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे रिंग ऑफिशियल चेअरमन सुरेशकुमार गायकवाड, शहर संघटनेचे उपाध्यक्ष अशोक मेमजादे , छत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, बॉक्सिंग कोच उमेश जगदाळे, पंच प्रदीप वाघे, राष्ट्रीय बॉक्सर अक्षय मानकर, रोहित चव्हाण, प्रदीप वाघे आदी मान्यवर त्याचप्रमाणे पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अनेक खेळाडू, प्रशिक्षक, पंच व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 21: शेतीमध्ये उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, निविष्ठा आदींचा खर्च कमी करणे तसेच उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाच्यावतीने राबविण्यात येणारा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा उपक्रम कृषी क्षेत्राला दिशा देणारा ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ या पंचवार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित कार्यक्रमात श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार बापूसाहेब पठारे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सूरज मांढरे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, कृषी संचालक रफीक नायकवडी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, केवळ लक्ष्यांक आणि आकड्यांवर भर न देता आपल्या जिल्ह्यातील कृषी क्षेत्राची बलस्थाने तसेच उणिवा या ओळखून त्यावर वैज्ञानिक आणि व्यवहारिक उपाययोजनांचा ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा पंचवार्षिक आराखडा तयार करण्यात आला आहे. जग पुढे जात असताना सर्व क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळे राज्यानेही दोन वर्षासाठी 500 कोटींची तरतूद केली असून पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधीबाबत विचार करण्यात येईल.

राज्यात धरणे बांधण्याजोग्या जागा जवळपास संपल्या असून लोकसंख्यावाढीमुळे महानगरांना पिण्यासाठी अधिकाधिक पाणी द्यावे लागत आहे. आता मुळशीसारख्या जलविद्युत प्रकल्पांतून वीजनिर्मिती करण्याऐवजी सौरउर्जा प्रकल्प, सहवीज प्रकल्प, आण्विक वीज निर्मिती प्रकल्प आदी पर्याय उपलब्ध आहेत. तर जलविद्युत प्रकल्पांचे पाणी पिण्यासाठी दिले पाहिजे. जेणेकरुन अन्य प्रकल्पांचे पाणी शेतीसाठी देता येईल, असेही श्री. पवार यांनी नमूद केले.

पुण्यात राबविण्यात येणारा ॲग्री हॅकॅथॉन उपक्रम टप्प्या- टप्प्याने राज्यभरात राबविण्यात येईल. या उपक्रमात राज्य शासन, कृषी विभाग, महाविद्यालय, विविध औद्योगिक संघटना, कंपन्या, मायक्रोसॉफ्टसारखी संस्था, पाणी फाऊंडेशन आदी सहभागी असून त्याचा कृषी क्षेत्रासाठी मोठा उपयोग होणार आहे. कृषीच्या क्षेत्रात नावाजलेले, योगदान देणाऱ्या सर्व घटकांची मदत राज्यातल्या कृषी क्षेत्राला पुढे नेण्यासाठी घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.

करोना संकटाच्या काळात आपल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्रानेच तारले आहे. शेतीसमोर बदलते हवामान, दुष्काळ, घटत चाललेले शेतीचे आकारमान या समस्या आहेत. त्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर आवश्यक आहे. बदलत्या शेतील आधुनिक तंत्रज्ञानाची गरज देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी कधीही खचू नये, नाउमेद होऊ नये, त्यांना राज्य शासन कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. फक्त आत्मविश्वास ढळू देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

कृषी मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, राज्यात नवीन कृषी धोरण तयार करण्याच्या दृष्टीने सर्व विभागातील शेतकरी, प्रगतीशील शेतकरी, महिला शेतकरी आदींशी संवाद साधण्यात येत आहे. शेतकरी आणि शेती क्षेत्राचा चांगले दिवस आणल्याशिवाय कृषी विभाग स्वस्थ बसणार नाही. यासाठी राज्यातील यशस्वी, चांगले प्रयोग केलेले शेतकरी यांचे ज्ञान, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पाहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

निर्यातक्षम कृषी उत्पादनात वाढ, मूल्यवर्धन, प्रक्रिया आदी विविध उपाययोजनांच्या माध्यमातून राज्याची सध्याची कृषी निर्यात 1 हजार 500 कोटी रूपयांवरून 50 हजार कोटींवर कशी जाईल, शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. कृषीमालाचे उत्पादन वाढविणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, केलेल्या उत्पादनासाठी बाजारपेठ निर्माण करणे महत्त्वाचे असून अशी 100 टक्के खात्री झाल्यावर तरुण शेतकरी शेतीकडे वळतील, असा विश्वासही कृषीमंत्र्यांनी व्यक्त केला.

प्रधान सचिव श्री. रस्तोगी म्हणाले, कृषीतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती घेणे, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या प्रयोगांची माहिती व ते अन्य शेतकऱ्यांकडे पोहोचविण्याची मोठी जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे. विभागाने जैविक खते तयार करण्याच्या दृष्टीने एक मोठा उपक्रम हाती घेतला असून शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या आदींना सहभागी करुन घेण्यात येणार आहे. सत्यापित (ट्रुथफुल) बियाण्यांच्या अनुषंगानेही विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आपल्या कामकाजाची तसेच अन्य माहिती भरण्यासाठी एक ॲप तयार केले असून त्यामुळे त्यांचा वेळ वाचणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी प्रास्ताविकात माहिती दिली, ‘दिशा कृषी उन्नतीची- 2029’ हा आराखडा पुढील पाच वर्षात राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात निर्यातक्षम पिकांचे क्लस्टर करण्यात येणार असून सूक्ष्म सिंचन पद्धतीद्वारे पाण्याचा, खते आदींचा कार्यक्षम वापर, कृषी यांत्रिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञान आदींच्या माध्यमातून खर्चात बचत आणि उत्पादन वाढ. निर्यातसाखळी तयार करणे यातून निर्यातीत वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. येत्या 1 ते 3 जून दरम्यान जिल्ह्यात ॲग्री हॅकॅथॉन राबविण्यात येणार असून त्यातून पुढे येणारे तंत्रज्ञान 1 जूनपासून प्रत्यक्ष शेतीमध्ये राबविण्यात येईल, असेही ते म्हणाले.

यावेळी कृषी क्षेत्राशी निगडीत उद्योग संघटना, कंपन्या, महाराष्ट्र बँक आदींशी जिल्हा प्रशासनाच्यावतीने विविध सामंजस्य करार करण्यात आले.

यावेळी प्रगतीशील शेतकरी तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ‘कृषी संवाद- पुणे जिल्हा’ व्हॉट्स ॲप चॅनेलच्या क्यू आर कोडचे लोकार्पण करण्यात आले. तसेच महसूल विभागाच्या सेवा, दाखले घरपोच मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तयार केलेल्या सेवादूत ॲप व प्रणालीचे संगणकीय कळ दाबून उद्घाटन करण्यात आले.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधीष्ठाता डॉ. महानंद माने, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे महासंचालक प्रशांत गिरबने, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्सचे राजन राजे यांच्यासह विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, शेतकरी उत्पादक गटांचे शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, संशोधक, तंत्रज्ञ, कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

दूधात भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

पुणे दि. 21 : जिल्ह्यातील दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीमध्ये अपर पोलीस अधिक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुण हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव असतील.
दूधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी असे आवाहन समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
दूध आपल्या दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापि हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दुध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत. तर मानवी शारिरीक समस्या, पचन, अॅर्लजी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान या सारख्या गंभीर आरोग्य समस्या देखील होऊ शकतात. या समस्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.
जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, पुणे जिल्ह्यातील, जिल्ह्याबाहेरील तसेच परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यांत आले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणा-या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून भेसळ केल्याचेआढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी 1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID.:- FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बाबासाहेब ज्ञानाचे, तर रमाई त्यागाचे प्रतीक-हर्षवर्धन सपकाळ यांचे मत

पुणे: “भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानाचे, तर रमाई आंबेडकर त्यागाचे प्रतीक आहेत. रमाईंच्या त्यागाची साथ मिळाल्याने बाबासाहेबांना संविधान लिहिण्यासह अनेक गोष्टींमध्ये भरीव योगदान देता आले. बाबासाहेबांचे संविधान आणि रमाईचा त्याग यातून प्रेरणा घेत महाराष्ट्रात पुन्हा एकदा संविधानाला अभिप्रेत सरकार आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे,” असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

पुणे स्टेशन येथील महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाला हर्षवर्धन सपकाळ यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. यावेळी माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, , माजी नगरसेविका लता राजगुरू, सुजित यादव यांच्यासह मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.पुणे महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते ॲड. अविनाश साळवे यांच्या हस्ते हर्षवर्धन सपकाळ यांचा भारतीय संविधानाची प्रत, सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.

एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला ?

जलजीवन योजनेतील प्रचंड भ्रष्टाचारामुळे हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाचः हर्षवर्धन सपकाळ

माधव भंडारीचींही तहव्वूर राणासोबत चौकशी करावी, चौकशी होईपर्यंत अजित पवारांना मंत्रीमंडळातून बरखास्त करावे

हिंदी सक्ती करण्यामागे भाजपाचे मोठे षडयंत्र, भाजपाने अगोदर गुजरातमध्ये सक्ती करावी

मुंबई दि. २१ एप्रिल २०२५

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा गाजावाजा करून जलजीवन मिशनची घोषणा करून २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल असे सांगितले होते. मात्र २०२५ उजाडले तरी महाराष्ट्र तहानलेलाच आहे. हंडाभर पाण्यासाठी माता भगिणींना पायपीट आणि संघर्ष करावा लागत आहे. या योजनेतील भ्रष्टाचार माता भगिणींचे बळी घेत आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील पाणीटंचाईवरून सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की, राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला अशी सरकारची स्थिती आहे. घोषणा मोठमोठ्या होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी होतं नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हर घर नल आणि हर नल जल असे नरेंद्र मोदी सातत्याने सांगत होते. यासाठी केंद्र व राज्य सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली पण केंद्रीय अर्थमंत्रालयानेच भ्रष्टाचार झाल्याचे मान्य करून एका नळाचा खर्च ३० हजारावरून १ लाख ३७ हजारांवर कसा गेला याचे स्पष्टीकरण मागवले आहे.
या योजनेचा फायदा फक्त अधिकारी आणि कंत्रादारांनाच झाला आहे. माता भगिणींना पाण्यासाठी संघर्षच करावा लागतो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एक मुलगी पाणी आणण्यासाठी जात असताना तिचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरावे लागते यावरून जलजीवन मिशन भ्रष्टाचाराची बळी ठरली आहे हे स्पष्ट होते. आता तर केंद्र सरकारने या योजनेच्या निधीत ४७ टक्के कपात केली आहे त्यामुळे निधीअभावी कामे होणार नाहीत. यामुळे महिलांची पाण्यासाठीची वणवण पुढची काही वर्ष सुरुच राहणार आहे.

पोलिसांनी माधव भंडारींचीही चौकशी करावी
मुंबईवरील दहशतवादी २६/११ च्या हल्ल्या प्रकरणी भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही त्याचा निषेध करतो. या प्रकरणातला आरोपी डेव्हिड कोलमन हेडली अद्याप फरार आहे. तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करून त्याला मुंबईत आणले आहे. माधव भंडारींना ताब्यात घेऊन त्यांचीही राणासोबत चौकशी करावी. त्यांनी केलेले वक्तव्य गंभीर आहे. त्यांच्या वक्तव्यानुसार त्यावेळी सरकारमध्ये असलेले अनेक नेते आज भाजपामध्ये आहेत. अजित पवारांसह अनेकजण त्यावेळीही मंत्रिमंडळात होते, आताही मंत्रिमंडळात आहेत. त्यामुळे अजित पवारांना मंत्रीपदावरून बरखास्त करून त्यांचीही चौकशी करावी. कायम राष्ट्रहिताच्या गप्पा मारणा-या भाजपचे नेते किती खरे बोलतात ते समोर येईल असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

हिंदीच्या सक्तीमागे मोठे षडयंत्र
पहिलीपासून हिंदीची सक्ती करणे हे एक मोठे षडयंत्र आहे. मराठी भाषा आणि मराठी संस्कृती संपवण्यासाठीच हिंदी लादली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची मराठी भाषा संपवण्याचा हा डाव आहे. सरसंघचालक गोळवलकर यांच्या बंच ॲाफ थॅाट्स या पुस्तकात जे लिहिले त्याची अंमलबजावणी सरकारकडून सुरु आहे. हिंदीची सक्ती अगोदर गुजरात मध्ये करावी. पहिलीच्या वर्गापासून तीन भाषा सक्तीच्या करणे हे अशास्त्रीय आहे त्याचा भार विद्यार्थ्यांना झेपेल का ? सरकारने याचा काही विचार केलेला नाही. भाषा सल्लागार समितीने या निर्णयाला विरोध केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी घुमजाव केले आहे. त्यांना सक्ती करण्याची आवड आहे पण त्यांनी हा निर्णय परत घ्यावा ही आमची मागणी कायम आहे.

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले संग्राम थोपटे यांनी घेतलेला निर्णय आत्मघातकी आहे. संग्राम थोपटे यांचं नाव विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षाने निश्चित केले पण देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होऊ दिली नाही. त्यामुळे त्यांची संधी हुकली होती. ज्यांनी विश्वासघात केला, थोपटे त्यांच्याकडेच जात आहेत.

संत निरंकारी मिशन कडून मानव एकता दिवसाचे आयोजन

संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी सह देश-विदेशात ५०० ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन

भोसरी,पिंपरी-चिंचवड २१ एप्रिल, २०२५:
आध्यात्मिकताच मानव एकता मजबूत करु शकते तसेच मानवाला मानवाच्या जवळ आणून परस्पर प्रेम व सौहार्दाचे वातावरण निर्माण करु शकते. हेच उद्दिष्ट समोर ठेऊन सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजी यांच्या आशीर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी २४ एप्रिल, २०२५ रोजी दिल्लीतील ग्राउंड नं.८, निरंकारी चौक, बुराडी रोड येथे ‘मानव एकता दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त देशभरातील मिशनच्या समस्त शाखांमधील भाविक भक्तगणदेखील एकत्रित येऊन बाबा गुरबचनसिंहजी आणि मिशनचे अनन्य भक्त चाचा प्रतापसिंहजी यांना आपली श्रद्धा सुमने अर्पित करतील व त्यांच्या महान जीवनातून प्रेरणा प्राप्त करतील.
संत निरंकारी मंडळाचे सचिव व समाज कल्याण विभागाचे प्रभारी जोगिंदर सुखीजा यांनी माहिती देताना सांगितले, की सदगुरुंच्या असीम कृपेने यावर्षी देखील जगभरातील सुमारे ५०० पेक्षा अधिक ठिकाणी संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन च्या विद्यमाने रक्तदान शिबिरांच्या अविरत श्रृंखलेचे व्यापक आयोजन केले जाईल ज्यामध्ये जवळपास ५०,००० पेक्षा अधिक रक्तदाते मानवतेच्या भल्यासाठी रक्तदान करुन नि:स्वार्थ सेवेचे उदाहरण प्रस्तुत करतील.
उल्लेखनीय आहे, की स्थानिक स्तरावर संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी येथे गुरुवार दिनांक २४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ ते सायं. ५ या वेळात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून रक्त संकलन करण्यासाठी विविध रुग्णालयाच्या प्रशिक्षित डॉक्टर व वैद्यकीय तज्ञांच्या टीम सहभागी होतील ज्यामध्ये वाय.सी.एम. रुग्णालय रक्तपेढी,ससून रुग्णालय रक्तपेढी, तसेच संत निरंकारी रक्तपेढी विलेपार्ले ची टीम देखील अंतर्भूत असेल. मानव एकता दिवसाच्या निमित्ताने याच ठिकाणी सायंकाळी ६.०० ते ९.०० यावेळेत विशाल सत्संग समारोहाचे ही आयोजन करण्यात आले आहे.
हे सर्वविदित आहे, की युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी महाराज समाज कल्याणासाठी सातत्याने प्रयासरत राहिले. प्रत्येक भक्ताच्या जीवनाला त्यांनी वास्तविक रूपात एक व्यावहारिक दिशा प्रदान केली ज्यासाठी मानवता त्यांची सदैव ऋणी राहील. युगदृष्टा बाबा हरदेव सिंह जी यांनी सन् १९८६ पासून सुरु केलेली रक्तदान अभियानाची ही मोहीम आज महाअभियानाच्या रुपात आपल्या चरम उत्कर्ष बिंदूवर पोहचली आहे. मागील जवळपास ४ दशकांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ८६४४ शिबिरांमध्ये मिशनमार्फत १४,०५,१७७ युनिट रक्त मानवमात्राच्या भल्यासाठी दिले गेले आहे आणि या सेवा निरंतर चालू आहेत. निश्चितच लोककल्याणार्थ चालविण्यात येत असलेले हे अभियान निरंकारी सदगुरुंकडून प्रदत्त शिकवणुकीचे दर्शन घडवत असून एक दिव्य संदेश प्रसारित करत आहे ज्यायोगे प्रत्येक मनुष्य प्रेरणा प्राप्त करुन आपले जीवन कृतार्थ करत आहे.
संत निरंकारी मिशनचे स्वयंसेवक भोसरी आणि दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तगड पायथा, मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करत आहेत. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वानी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन संत निरंकारी मिशनद्वारे करण्यात आले आहे.