Home Blog Page 346

पाकचे २ तुकडे होण्याची शक्यता:ज्योतिर्विद सिद्धेश्वर मारटकर यांचा अंदाज

जुलै पर्यंत अतिरेकी कारवायांचा धोका

पुणे :’पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईला  प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून मोठी कारवाई पाकिस्तानवर तसेच अतिरेक्यांच्या  ठिकाणावर करण्याची शक्यता असून पाकिस्तानचे २ तुकडे होण्याची शक्यता वाटते’, असे पुण्यातील ज्येष्ठ ज्योतिर्विद व ‘ज्योतिषज्ञान’ मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर  यांनी सांगितले

‘एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ मध्ये मंगळ-प्लूटो प्रतियोगामुळे देशावर आपत्ती,अतिरेकी कारवाया होण्याच्या शक्यता असल्याचे भाकीत मागील वर्षी २०२४ च्या दिवाळी अंकात केले होते’,असा दावा पुण्यातील ज्येष्ठ ज्योतिर्विद व ‘ज्योतिषज्ञान’ मासिकाचे संपादक सिध्देश्वर मारटकर यांनी केला आहे.अतिरेकीविरोधी कारवाईची तीव्रता ६ जून २०२५ पर्यंत राहील.जुलैपर्यंत अतिरेकी मारले जातील,असेही भाकीत त्यांनी वर्तवले आहे.सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ज्योतिषशास्त्रानुसार देशाची,प्रदेशाची कुंडली मांडून मारटकर यांनी हे भविष्य वर्तवले आहे.२०२४ च्या ‘ज्योतिष ज्ञान’ दिवाळी अंकात ते प्रसिद्ध झाले आहे. ‘पोलीस,मिलिटरीसाठी हा काळ प्रतिकूल ठरेल.गुन्हेगारी वाढीस लागेल.अतिरेकी कारवाया वाढतील.काश्मीर,उत्तर प्रदेश,दिल्ली याठिकाणी स्फोटक घटना संभवतात.शेजारील देशात अशांतता निदर्शनास येईल’,असे त्यांनी या अंकात लिहिले होते.

‘पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी कारवाईला  प्रत्यूत्तर म्हणून भारताकडून मोठी कारवाई पाकिस्तानवर तसेच अतिरेक्यांच्या  ठिकाणावर करण्याची शक्यता असून पाकिस्तानचे २ तुकडे होण्याची शक्यता वाटते’, असे मारटकर  यांनी सांगितले संक्रमण पोर्णिमा,अमावस्या,कुंडलीनुसार देशाचे भविष्य घातपात,दुर्घटना,युद्ध यांचा विचार करता येतो आणि अंदाज बांधता येतो.दर वर्षी दिवाळी अंकात हे भविष्य वर्तवले जाते.मारटकर हे सामाजिक,राजकीय परिस्थितीचे भाकीत वर्तवत असतात.त्यांची क्रिकेट  स्पर्धा,निवडणूक निकाल,दुर्घटना विषयक अनेक भाकिते यापूर्वी खरी ठरली आहेत.  

मृतदेह घरी येताच पत्नीला अश्रू अनावर,शरद पवारांनी केले गणबोटे- जगदाळे कुटंबाचे सांत्वन

संगीता गणबोटे यांनी सांगितला थरारक अनुभव….गणबोटे- जगदाळे यांच्यात गेल्या 25 वर्षांपासून मैत्री

पुणे- पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले संतोष जगदाळे यांचे पार्थिव पुण्यात दाखल झाले आहे. संतोष जगदाळे हे त्यांच्या 86 वर्षांच्या वृद्ध आईला काश्मीरला जाण्यापूर्वी भेटून निघाले होते. मी काश्मीरला फिरायला जातोय, लवकर परत येईल, असे त्यांनी आईला सांगितले होते. मात्र जगदाळे यांचा मृतदेह घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. त्यांच्या पत्नी धाय मोकलून रडत होत्या.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कर्वे नगर येथे जगदाळे कुटुंबाला भेटण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांच्यासमोर जगदाळे कुटुंबियांना अश्रू अनावर झाले. कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी ही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

काश्मीर मधील पहलगाम परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील देखील सहा पर्यटकांचा समावेश आहे. त्यातील पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचा मृतदेह सकाळी पुण्यात दाखल झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी अंतिम दर्शनासाठी नेण्यात आला. या वेळी घरातील सर्व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता. जगदाळे यांना अंतिम निरोप देण्यासाठी पुण्यातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

जम्मू कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पुण्याचे उद्योजक कौस्तुभ गणबोटे दुर्दैवी मृत्युमुखी पडले. त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले असून त्यांच्या पार्थिवाचे राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी अंत्यदर्शन घेतले. गणबोटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेत गणबोटे कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी शरद पवार यांच्या समोर कौस्तुभ यांची पत्नी यांनी घडलेला सर्व थरारक अनुभव सांगितला.“तिथं एकही सुरक्षा रक्षक नव्हता. रक्तात पडलेली आमची माणसं होती. आम्ही कोणाला आवाज देणार तिथं? आम्ही खूपच घाबरलो होतो. ते बंदूक घेऊन आले आणि त्यांनी गोळ्या मारायला सुरुवात केली. त्यांनी काहीच बघितलं नाही. डोक्यात, डोळ्यात, छातीत गोळ्या मारल्या. ते सहा ते सात लोक होते आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी येऊन गोळ्या झाडल्या व निघून गेले,” काळजाचा थरकाप उडवणारा असा हा प्रसंग संतोष जगदाळे यांच्या पत्नीनं शरद पवारांना सांगितला.

मुलगा पित्याचा मृतदेह आणण्यास गेला; घरात फक्त सून, नातू होते

गनबोटेंची पुण्यात फरसाणची १६ दुकाने आहेत. काेंढवा परिसरातील सुखसागरमधील साईनगर येथे दाेनमजली गनबाेटे फरसाणचा बाेर्ड येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतो. घराशेजारीच फरसाण बनवण्याचे युनिट आहे. ताजे फरसाण मिळण्याचे ठिकाण म्हणून इथे गर्दी असते. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये गनबाेटे फरसाणची तब्बल १६ दुकाने असल्याने व्यवसाय एकदम व्यवस्थितरीत्या सुरू हाेता. मात्र, बुधवारी या ठिकाणी फरसाण कारखान्यातील कामगार घरातील मदतीसाठी झटत हाेते, तर काैस्तुभ गनबाेटेंचा मुलगा कुणाल सकाळच्या विमानाने श्रीनगरला रवाना झाल्याने घरी केवळ सून व नातू हाेते. लाडक्या नातवाचे बारसे मित्राला धूमधडाक्यात करण्याची इच्छा हाेती. परंतु त्यापूर्वीच देवाने त्याला हिरावून नेल्याचे सांगत गनबाेटेंचे मित्र प्रवीण कुलकर्णी म्हणाले, तो मलाही सहलीला साेबत चल म्हणाला हाेता, परंतु मी यापूर्वी काश्मीरला जाऊन आलाे असल्याने त्यास नकार दिला हाेता. आज मी बचावलाे आहे. मात्र, माझ्या मित्राच्या कुटुंबावर आज दु:खाचा डाेंगर काेसळल्याचे ते म्हणाले.

#pahalgamterrorattack#jammukashmirattack#kaustubhganbote

कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव पहाटे सव्वाचार वाजता पुण्यात …

पुणे:पहलगाम येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पुण्यातील कौस्तुभ गनबोटे आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव आज पहाटे विशेष विमानाने पुण्यात आणण्यात आले. यावेळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी केंद्रीय मंत्री, मुरलीधर मोहोळ राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे, कॅबिनेट मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बाप्पू पठारे आणि प्रशासकीय अधिकारी समवेत होते.

पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्ग होणे गरजेचे

आमदार बापूसाहेब पठारे यांची महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी मार्गांची पाहणी

पुणे: वडगावशेरी मतदारसंघातील पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा तसेच इतर वाहतूक संदर्भातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत पर्यायी रस्त्यांची पाहणी केली. यात प्रामुख्याने, नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता, ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी यांचा समावेश होता.महानगरपालिका शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता संजय धारव, राजेश भुतकर, अजित सुर्वे, मकरंद वाडेकर आदि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सद्यस्थितीनुसार वाहतूकीचे प्रश्न सोडवण्यासाठी पर्यायी वाहतूक मार्गाचा विचार करून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. पुणे-नगर रस्त्याची वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी नदीपात्रालगतचा खराडी-शिवणे रस्ता महत्त्वाचा मानला लागतो. जो की भूसंपादनामुळे रखडला आहे. तसेच, पुणे विमानतळाचा रन-वे वाढवल्यामुळे ५०९ चौक ते लोहगाव हा एअर फोर्स हद्दीतील रस्ता बंद होण्याची शक्यता आहे. पर्यायी मार्ग म्हणून ५०९ चौक ते धानोरी जुना जकात नाका तसेच विमानतळ ते रामवाडी हे रस्ते होणे क्रमप्राप्त आहे.

पाहणीदरम्यान, सदर रस्ते येत्या वर्षभरात पूर्ण करणार असल्याचे आश्वासन अधिकारी वर्गाने दिले आहे. पठारे यांनी अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या खराडी-शिवणे रस्त्याच्या भूसंपादनाबाबत अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. त्यावर प्रशासकीय मार्गाने तोडगा काढण्याबाबत सूचना केल्या.


लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांना सहन करावा लागणारा वाहतुकीचा गंभीर प्रश्न सोडवण्याकरिता सातत्याने विविध मध्यमातून व विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. पर्यायी मार्ग सुरू झाल्यास वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल आणि नागरिक बांधव यातून सुटकेचा नि:श्वास घेतील, ही खात्री आहे.

बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ)

दहशतवादा विरोधात “तेरी जान,मेरी जान, हिंदुस्थान”चा नारा देत काश्मीरी सारे रस्त्यावर…

Pahalgam Terror Attack:

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात उमटत आहेत. काश्मीर खोऱ्यातील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारले. खुद्द काश्मीर मध्येही लोक दहशतवाद विरोधात रस्त्यावर आले आहेत. आणि हिंदू मुस्लिम यांच्यात मोठी दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काश्मिरी लोक करू लागले आहेत.

अनेक ठिकाणी केंडल मार्च निघत असून, मिडिया ने हिंदू मुस्लीम यात दुराव्याचे वातावरण होईल असे वृत्त देऊ नये असे येथील लोक सांगत आहेत.

या शिवाय गेल्या 3 वर्षात पर्यटन स्थळावरील सिक्युरिटी हटविल्याचे सांगण्यात येते.पूर्वी पहलगाम,गुलमर्ग , सोनमर्ग या स्थळी मोठी सिक्युरिटी असत ती रहिली नव्हती.


दरम्यान या भ्याड हल्ल्यानंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली. हा हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोन जण पाकिस्तानी असल्याचे समजले असून बाकीचे दोघे स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे. याचदरम्यान, जम्मू काश्मीर पोलिसांनी या दहशतवाद्यांनी माहिती देणाऱ्यांसाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे.


दहशतवाद्यांची माहिती द्या, बक्षीस मिळवा.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांनी मोठी घोषणा केली आहे. हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सुरक्षा दलांना आणि संस्थांना दहशतवाद्यांची ओळख, त्यांचा ठावठिकाणा किंवा इतर कोणतीही विश्वसनीय माहिती देणाऱ्या लोकांना हे बक्षीस दिले जाणार आहे. हल्ल्याचा तपास जलदगतीने करणे आणि गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे या उद्देशाने काश्मीर पोलिसांनी हे पाऊल उचलण्यात आले
पहलगाममधील बैसरन येथे एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला, तर आणखी तीन दहशतवादी हे त्यांच्या कारवाईवर लक्ष ठेवून होते, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघेजण पश्तून भाषेत बोलत असल्याचीही माहिती मिळाली आहे. या दहशतवाद्यांनी सुमारे १५ ते २० मिनिटे एके-४७ च्या माध्यमातून गोळीबार करत पर्यटकांना टिपून टिपून लक्ष्य केल्याचंही समोर आले आहे.

पहलगाम हल्ला, पाक संरक्षणमंत्री म्हणाले,आमचा संबंध नाही, लष्कर-ए-तैयबाच्या सैफुल्लानेही केला इन्कार

पहलागमजवळ दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्याशी पाकिस्तानचा काहीही संबंध नसल्याचं पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी स्पष्ट केलं.तसंच,भारतच पाकिस्तानात अशांतता पसरवल्याचा आरोप त्यांनी भारतवार केला. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.एवढेच काय तर लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी याने ही या हल्ल्यात आपला संबंध विनाकारण जोडत असल्याचा दावा केला आहे.त्याचा व्हिडिओ रात्री उशिरा त्यागी यांच्या x अकाऊंट वर पोस्ट करण्यात आला आहे, या व्हिडीओमध्ये सैफुल्ला याने भारताने हा ड्रामा रचल्याचा उलटा आरोप केला.

सत्ताधारी पीएमएल-एन पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पंतप्रधान शेहबाज शरीफ यांचे जवळचे सहकारी असलेले संरक्षण मंत्री आसिफ यांनी हल्ल्याची जबाबदारी फेटाळून लावताना या हल्ल्यासाठी भारतालाच जबाबदार धरलं आहे.

Pahalgam Terror Attack Updates

पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, “पाकिस्तानचा या दहशतवादी हल्ल्याशी काही संबंध नाही. (भारतातील) देशातील लोकांचाच यात समावेश आहे. भारतातील अनेक राज्यांत सरकारविरोधात रोष आहे. तिथे नागालँडपासून काश्मीर आणि साऊथमध्ये छत्तीसगड, मणिपूरमध्ये लोक सरकारविरोधात आहेत. भारत सरकार लोकांच्या हक्कांवर गदा आणत आहे. त्यांचं शोषण करत आहे. अल्पसंख्यांकांचं शोषण होत आहे. याविरोधात लोक उभे राहिले आहेत. आमचा याच्याशी काही संबंध नाही. आम्ही दहशतवादी कृत्यांचं समर्थन करत नाही. कोणत्याही स्थानिक संघर्षात निष्पाप लोकांना लक्ष्य करू नये”, असं ते म्हणाले. ते लाईव्ह ९२ चॅनेलशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, “आपल्या राष्ट्रीय धोरणात सामान्य लोकांना लक्ष्य करण्याची परवानगी नाही यात शंका नाही, परंतु जर लष्कर किंवा पोलिस भारतात सामान्य माणशांवर शस्त्रे उचलत असतील तर पाकिस्तानला दोष देणे सोपे आहे.”
“आमच्याकडे जवळजवळ दररोज असे पुरावे गोळा होतात जे आम्ही दिले आहेत. एकदा नाही तर अनेक वेळा दिलेत की भारत बलुचिस्तान आणि पाकिस्तानच्या इतर भागात अशांततेला प्रोत्साहन देत आहे. ते अफगाणिस्तानात किंवा इतर कुठूनही पाकिस्तानात अशांतता पसरवत आहे, याचा मोठा इतिहास आहे”, असंही ते म्हणाले. दरम्यान, ख्वाजा आसिफ यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावर भारताकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

पुणे शहरातील ४.५७ लाख वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित,महापारेषणच्या वीजवाहिनीत बिघाड

कोथरूड, पद्मावती, हडपसर, वडगाव धायरी भागात परिणाम

पुणे, दि. २३ एप्रिल २०२५: महापारेषणच्या ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये बिघाड झाल्यामुळे बुधवारी (दि. २३) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास पुणे शहरातील अतिउच्चदाब व उच्चदाबाच्या उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवेपार्क, मंडई, फुरसुंगी आदी भागातील सुमारे ४ लाख ५७ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा देखील खंडित झाला.

दरम्यान महापारेषणकडून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सर्व भागात रात्री ११.३० ते ११.४५ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू होईल अशी शक्यता आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून उष्णतेची प्रचंड लाट आली आहे. पर्यायाने विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे महापारेषणच्या काही अतिउच्चदाबाचे उपकेंद्र व वीजवाहिन्यांवर ताण येत आहे. त्यातच महापारेषणच्या जेजुरी ४०० केव्ही जेजूरी टॉवर लाइनमध्ये आज रात्री ९.४५ वाजता बिघाड झाला. तसेच पारेषण वाहिन्यांमध्ये विजेची मोठी तूट निर्माण झाली. त्यामुळे पारेषण यंत्रणेतील संभाव्य धोके व बिघाड टाळण्यासाठी स्वयंचलित भारव्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘एलटीएस’ (Load Trimming Scheme) यंत्रणा कार्यान्वित झाली. परिणामी फुरसुंगी, कोथरूड, नांदेड सिटी, पर्वती येथील महापारेषणचे अतिउच्चदाबाचे उपकेंद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे कोथरूड, हडपसर, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, वडगाव धायरी, सिंहगड रस्ता, नऱ्हे, येवलेवाडी, एनआयबीएम रस्ता, पर्वती, पेशवे पार्क, मंडई, फुरसुंगी परिसरातील सुमारे ४ लाख ५७ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला. दरम्यान महापारेषणकडून पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहेत.

महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्यासाठी दोन विशेष विमानांची व्यवस्था

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

१८३ प्रवाशांची मोफत आणण्याची व्यवस्था

पुणे (प्रतिनिधी)

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटक अडकले असून त्यांना पुन्हा आणण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दोन विशेष विमानांची व्यवस्था केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या खर्चातून ही व्यवस्था मोहोळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मोहोळ यांच्यात पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाल्यानंतर मोहोळ यांनी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. इंडिगो आणि एअर इंडिया या दोन कंपन्यांच्या विमानांमधून १८३ महाराष्ट्रातील पर्यटकांना श्रीनगर मुंबई येथे आणण्यात येणार आहे

गुरुवारी दोन विशेष विमाने आल्यानंतर आणखी काही पर्यटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असून जितके महाराष्ट्रातील नागरिक असतील, त्या सर्वांना महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे या पर्यटकांना मोफत आणले जात असून याचा खर्च राज्य सरकार करत आहे.

याबाबत केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘मंगळवारी संध्याकाळपासून माझ्या कार्यालयासह वैयक्तिकरित्या मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून संपर्क होत असून महाराष्ट्रातील पर्यटक घडलेल्या घटनेमुळे भीतीच्या वातावरणात होते. मात्र सर्वांशी संवाद साधल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला असून प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था केली जात आहे. गुरुवारी दोन विशेष विमाने पोहोचल्यानंतर उरलेल्या पर्यटकांना देखील आणण्याची जबाबदारी आमची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही व्यवस्था आम्ही उपलब्ध करून देत आहोत. महाराष्ट्रातील शेवटचा नागरिक महाराष्ट्रात येईपर्यंत आमचे प्रयत्न सुरू राहणार आहेत.

मोहोळ यांच्याकडून २४ तास वॉररूम कार्यान्वित…

महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असण्याची शक्यता असून घटनेच्या 24 तासानंतरही विविध ठिकाणी अडकलेल्या पर्यटकांचे फोन मोहोळ यांच्या कार्यालयात धडकत आहेत. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी गेल्या 24 तासापासून वॉर रूम कार्यान्वित केली असून या माध्यमातून अडकलेल्या प्रवाशांची माहिती एकत्रित करणे, विमानांची सोय झाल्यानंतर प्रवाशांना सुचित करणे आणि गरजूंना आवश्यक ती मदत पुरवणे याबाबत वॉर रूममधून काम सुरु झाले आहे. मोहोळ यांनी स्वतः वॉररूममध्ये थांबून अडकलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश…

भारताने इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातून स्वतःचे संरक्षण, नौदल आणि हवाई सल्लागारांना माघारी बोलवण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली :पंतप्रधान मोदींनी बुधवारी सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची ची सुमारे २ तास बैठक घेतली आणि पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारने कठोर पाऊल उचलत पाच मोठे निर्णय घेतले आहेत.
या निर्णयानुसार पाकिस्तानी नागरिकांना पुढील ४८ तासांत भारत सोडावा लागणार आहे. याचबरोबर कोणत्याही पाकिस्तानी नागरिका भारतात प्रवेश मिळणार नाही. याचबरोबर केंद्र सरकारने १९६० चा सिंधू पाणी करारही स्थगित करण्यात आला आहे. पाकिस्तानने सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाठिंबा देणे बंद करणार नाही तोपर्यंत या करारावरील स्थगिती कामय राहणार आहे. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “या दहशतवादी हल्ल्याचे गांभीर्य ओळखून, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने खालील निर्णय घेतले आहेत.

१९६० चा सिंधू पाणी करार तात्काळ प्रभावाने स्थगित करण्यात येत आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील.
संयुक्त चेकपोस्ट अटारी तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत आहे. ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे, ते १ मे २०२५ पूर्वी त्या मार्गाने परत येऊ शकतात.
पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांना जारी केलेले व्हिसा रद्द मानले जातील. एसपीईएस व्हिसाद्वारे सध्या भारतात असलेल्या सर्व नागरिकांनी तत्काळ भारत सोडावा. यासाठी त्यांना ४८ तासांची मुदत आहे.
नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील संरक्षण, लष्करी, नौदल आणि हवाई अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात भारत सोडावा.
भारत संरक्षण, नौदल आणि इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयातील हवाई सल्लागार. संबंधित उच्चायुक्तालयातील ही पदे रद्द मानली जातात.

जगदाळे,गणबोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला

पुणे:येथील कोंढव्यातील कौस्तुभ गणबोटे आणि कर्वे न गरचे संतोष जगदाळे यांच्या पहलगाम येथील आतंकी हल्ल्यातील हत्येने या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कर्वेनगर येथील गल्ली क्रमांक 02 मधील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे जगदाळे कुटुंब. एकाच इमारतीत तिघे भाऊ आनंदात राहत होते. यामधील सर्वात लहान असणारा संतोष जगदाळे हे आपली पत्नी व मुलगी व त्यांचा मित्र कौस्तुभ गणबोटे व त्यांची पत्नी असे एकूण पाच जण जम्मू-काश्मीरला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तीनच दिवसापूर्वी गेले होते.मात्र कालच्या अतिरेकी हल्ल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले.

संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तेथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी प्रगती संतोष जगदाळे, मुलगी आसावरी संतोष जगदाळे या सुखरूप आहेत.

जगदाळे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीशी संबंधित गटासोबत काश्मीरला गेले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संतोष जगदाळे हे एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करतात. हे कुटुंब त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्या राहतात. तर पहिल्या मजल्यावर संतोष यांचा भाऊ अविनाश व आई राहतात. त्यांचा दुसरा भाऊ अजय याच इमारतीत राहतात.

संतोष गेल्याने या जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसता खेळणारा माणूस तसेच कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. संतोष यांना बाहेर फिरण्याची मोठ्या प्रमाणात आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौराही केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार संतोष जगदाळे यांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता पुणे विमानतळावरती आणण्यात येणार आहे. तेथून रात्रभर रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान कर्वेनगर येथील त्यांच्या घरी दर्शनासाठी नेण्यात येणार आहे.

गुरुवारी नऊ वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारून दिली आहे.

कोंढव्यातील साईनगर भागातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे हे शनिवारी (ता. १९) पुण्यातून विमानाने जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते.
काश्मीर खोऱ्यातील पहेलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने नातेवाईकांत आणि मित्र परिवारात मनमिळावू व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली आहे.

कौस्तुभ यांचा मागील तीस वर्षांपासून गणबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय आहे. अगदी छोट्याशा व्यवसायातून त्यांनी गणबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती.

त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने रात्री बाराच्या सुमारास पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

गोळीबार सुरु होता तेव्हा संतोष आणि कौस्तुभ व इतर पर्यटक हॉटेलबाहेर बसले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने आरडाओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभ यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली.

गोळीबारानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती. कौस्तुभ यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांचा मुलगा कुणाल हा कौस्तुभ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पुण्यातून त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला आहे.

कौस्तुभ यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर, जवळच असणारे संतोष यांनाही मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ घाबरून गेले. गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही.

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा: हर्षवर्धन सपकाळ

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.

मुंबई, दि. २३ एप्रिल २०२५
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करत काँग्रेस पक्षाने दादरमध्ये मोर्चा काढला. हा पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी हल्ला असून हा हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांवर कठोर कारवाई करत दहशतवादाचा कायमचा बिमोड करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पहलगाम हल्ल्यातील मृतांना दोन मिनिटे मौन राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व त्यानंतर मोर्चा काढण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद, भारत माता की जय अशा घोषणा देत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाम येथे केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पहलगाम हल्ल्याप्रकरणी सरकारने सर्व पक्षीय बैठक घेऊन एकमुखी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचा कोणताही दहशतवादी हल्ला खपवून घेतला जाणार नाही हा संदेश यातून गेला पहिजे. या कठीण प्रसंगी आपण सर्व भारतीयांनी एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध केला पाहिजे, असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला, यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे. एवढा मोठा हल्ला होत असताना गुप्तचर विभागाला याची माहिती मिळाली नाही का? हे सुरक्षा यंत्रणेचे अपयश आहे. पर्यटकांच्या आजूबाजूला कोणतीच सुरक्षा यंत्रणा नव्हती, सरकार काय करत होते, याचे उत्तर दिले पाहिजे आणि अतिरेक्यांचा बिमोड केला पाहिजे असे वडेट्टीवार म्हणाले.

या मोर्चात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार हुसेन दलवाई, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, प्रदेश सरचिटणीस रमेश शेट्टी, श्रीरंग बरगे, प्रदेश सचिव झिशान अहमद, आनंद सिंह, धनराज राठोड यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी निर्णायक पावले; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा बैठक

रुग्णालयातील नवजात अर्भक अपहरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे – डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई, दि. २३ एप्रिल २०२५ : विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महत्त्वपूर्ण विषयांवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि अधिकारांसंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांनी या बैठकीस उपस्थित राहून आपल्या सूचना आणि अनुभव मांडले.

नवजात अर्भक चोरी आणि मातेच्या मृत्यूप्रकरणी गंभीर चिंता

उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन रुग्णालयांमध्ये होत नसल्याबाबत चिंता व्यक्त केली. शासकीय व खासगी रुग्णालयांतील बेफिकीरपणामुळे प्रसूतीनंतर मातेच्या मृत्यूच्या वाढत्या घटनांकडेही त्यांनी लक्ष वेधले. रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकांचे अपहरण रोखण्यासाठी व नवजात अर्भकांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात यावे, जेणेकरून नवजात अर्भक अपहरण व पळवून नेण्याच्या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.

ऊसतोड कामगार महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिन्स वाटप — गरज आणि जबाबदारी

ऊसतोड कामगार महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सची आवश्यकता आणि त्याचे पर्यावरणपूरक पर्याय शोधण्यावर भर देत त्यांनी सांगितले की, डिस्पोजल व्यवस्थेचा विचार करणे तितकाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नासाठी महिला अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती स्थापण्याची सूचना त्यांनी केली.

त्याचबरोबर, १६ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरविरोधात प्रतिबंधात्मक इंजेक्शन देण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण असून, यासंदर्भात जनजागृती वाढवण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

महिलांच्या आरोग्यविषयक योजनांचा अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्यासाठी आरोग्य व महिला बालकल्याण विभागांमध्ये समन्वय, तसेच तीन टक्के निधीचा समर्पक वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी बैठकीला छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, वाशिम, लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी व प्रतिनिधी, गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महा मंडळाचे कार्यकारी संचालक ऑनलाइन उपस्थित होते.

भाजपा शहर अध्यक्षांनी जाळला पाकचा झेंडा

पुणे-पहल गाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकीज) येथे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निदर्शने करण्यात आली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह दहशतवाद्यांना चोख उत्तर देतील, देशातील जनतेने एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे मत भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केले.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाच्या चिटणीस वर्षा डहाळे पहालगाम येथे मृत्यू मुखी पडलेल्या कै.कौस्तुभ गनबोटे यांच्या भगिनी श्रीमती अर्चना देवधर यांची प्रमुख उपस्थिती होती.जावडेकर म्हणाले, काश्मीरमधील 370 कलम हटवल्यानंतर, तेथील पर्यटनाला मोठी चालना मिळाली होती. त्यामुळे तेथील अर्थव्यवस्था सुधारत होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला आणि विकासाला खिळ बसावी या उद्देशाने हा भ्याड हल्ला केला. त्याला चोख उत्तर दिले जाईल.यावेळी पुणे शहरातील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मीर पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली तसेच या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध – शहराध्यक्ष दीपक मानकर

पुणे-जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याने माणुसकीला काळिमा फासली आहे, संपूर्ण देशाचे मन या घटनेने व्याकूळ झाले असून या भ्याड हल्ल्यात पुणे शहरातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी संतोष जगदाळे यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्या वडिलांसह कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना आधार दिला.
पहलगाम येथील भ्याड हल्ल्यात निष्पाप जीवांचा बळी गेल्याने माझे अंत:करण हेलावले आहे.
या हृदयद्रावक घटनेत आपला प्राण गमावलेल्या सर्व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. तसेच यामध्ये जखमींच्या प्रकृतीत त्वरित सुधारणा व्हावी, हीच सदिच्छा व्यक्त करतो. जम्मू काश्मीर येथे महाराष्ट्रातील अडकलेले पर्यटकांना त्यांच्या घरी आणण्यासाठी विविध पातळीवर सर्वजण सर्वोत्परी प्रयत्न करीत असून लवकरच सर्व पर्यटकांना त्यांच्या घरी सुखरूप आणले जाईल.
भारत देश आज सक्षमपणे दहशतवादाविरोधात उभा असून, या हल्ल्यात आपल्या जवळच्यांना गमावलेल्या कुटुंबांच्या दुःखात सर्व देशवासीय सहभागी आहेत.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची श्रद्धांजली

खा.सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत श्रद्धांजली सभा

पुणे-
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात जवळपास २८ नागरिक मृत्युमुखी पडले. यात महाराष्ट्रातील ६ तर पुण्यातील २ नागरिकांचा समावेश आहे. या सर्व मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी खासदार सौ. सुप्रिया सुळे व शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत कात्रज येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला हल्ला अत्यंत निषेधार्ह व दुर्दैवी आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांच्या कुटुंबांच्या दुःखात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सहभागी आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी केंद्र सरकारच्या प्रयत्नांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा आहे. पण, यासोबतच देशात धार्मिक सलोखा कायम राखण्यासाठीही प्रयत्न करावेत असे आवाहन शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

यावेळी युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे,विशाल तांबे , स्वाती पोकले, काका चव्हाण, स्मिता कोंढरे, यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.