पुणे, दि. २४ : जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असून २७ एप्रिल २०२५ पर्यंत एकूण १४८ पर्यटक पुण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
आज सकाळी १० वाजता पुण्यात विमानाने ११ प्रवासी पोहचले असून आणखीन १९ प्रवासी विमानाने येत आहेत. २५ एप्रिल रोजी ७७ तर २६ एप्रिल रोजी १२ प्रवासी विमानाने येणार आहेत. २७ एप्रिल रोजी २९ पर्यटक रेल्वेने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी श्री.डूडी यांनी कळविले आहे.
काश्मिर येथे अडकलेल्या पुण्यातील ६५७ पर्यटकांचा जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
निरगुडी व वडगाव शिंदे येथे वन उद्यानासाठी आमदार बापूसाहेब पठारे प्रयत्नशील
वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर
पुणे-: वडगावशेरी मतदारसंघातील निरगुडी व वडगाव शिंदे या गावात असलेल्या वनविभागाच्या जागेत उच्च दर्जाचे वन उद्यान उभारावे, अशी मागणी आमदार बापूसाहेब पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे केली. मुंबई येथे (ता. २३) पठारे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन त्यासंबंधी निवेदन दिले.
निरगुडी व वडगाव शिंदे गावात वन विभागाच्या जवळपास २२९ हेक्टर जागेत वन उद्यान उभारण्याच्या संदर्भाने विस्तृत चर्चा यावेळी पार पडली. “मौजे निरगुडी येथील गट क्र. ५३, १३६ व १६३-अ मध्ये वनविभागाची २२९ हेक्टर जागा आहे. सदर जागा वन उद्यानासाठी वापरात आल्यास नागरिकांना चांगला फायदा होईल. झपाट्याने वाढत्या लोकसंख्येचा तसेच वाढत्या तापमानचा विचार करता वन उद्याने उभी राहणे सर्वच बाजूंनी खूप गरजेचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही आपले कर्तव्य आहे आणि त्याच दृष्टीतून सदर वनविभागाच्या जागेत वन उद्यान विकसित व्हावे”, असे मत बापूसाहेब पठारे यांनी मांडले आहे.
यापूर्वीही पठारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. त्यावर पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे समजते. गणेश नाईक यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरात लवकर हे वन उद्यान उभारण्याच्या संदर्भात सकारात्मकता दाखवली असल्याचे सांगण्यात आले आहे.
माझ्या समोरच माझ्या वडिलांना तीन गोळ्या मारल्या…; आसावरी जगदाळेंनी सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना
PAHALGAM TERROR ATTACK
पुणे : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील पाच पर्यटकांचा समावेश आहे. यात पुण्यातील संतोष जगदाळे (Santosh Jagdale) आणि कौस्तुभ गणबोटे (kaustubh Ganbote) या दोघांचा मृत्यू झाला. तर संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे हिनं हृदय पिळवटून टाकणारी संपूर्ण घटना सांगितली.
”अजान पढो” म्हणत केली फायरिंग : “मी, माझे आई-वडील आणि वडिलांचे मित्र कौस्तुभ गणबोटे आणि त्यांची पत्नी असे आम्ही पाचजण जम्मू काश्मीर येथे फिरायला गेलो होतो. पहलगाममध्ये बायसरण व्हॅली अर्थात मिनी स्विझर्लंड नावाची जागा आहे. तिथं आम्ही फिरायला गेलो होतो. नॉर्मल टुरिस्ट सारखं आम्ही देखील तिथं फिरत होतो आणि फोटोग्राफी करत होतो. अचानक डोंगरातून फायरिंगचा आवाज आला. आम्ही तेथील लोकल लोकांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, “शेर आता है तो ऐसी फायरिंग होती है…” ही गोष्ट आमच्यासाठी नवीन होती. पण काही वेळाने गोळीबाराचे आवाज आले. आम्ही प्रचंडघाबरलो आणि खूप धावपळ सुरू झाली. काही लोक पळायला लागले तर काही लोक हे लपायला लागले. तिथं जे टेंट होते तिथं आम्ही लपायचा प्रयत्न केला. तिथल्या सगळ्यांना दहशतवाद्यांनी गुडघ्यावर बसवलं आणि म्हणाले ”अजान पढो.” त्या ठिकाणी फायरिंग करून ते माझ्या वडिलांकडे आले आणि म्हणाले, “अजान पढो.” तेव्हा वडील म्हणाले की, आप बोलो वैसे हम करते है. पण ते रागात होते आणि त्यांनी माझ्या वडिलांवर 3 गोळ्या झाडल्या.” काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग आसावरी जगदाळे हिनं साश्रू नयनांसह सांगितला.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार : पुढे आसावरी म्हणाली, “त्यानंतर कौस्तुभ गणबोटे यांना उठवलं पण ते उठले नाही तर त्यांच्यावर देखील फायरिंग करण्यात आली. तिथे जे पुरुष होते त्यांच्यावरच गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर आम्ही पळून गेलो. काही वेळानं आर्मीचे लोक आले आणि त्यांनी लपलेल्या लोकांना बाहेर काढलं आणि आर्मी कॅम्पमध्ये घेऊन आले. रात्री आम्हाला कळलं की माझ्या वडिलांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर तिथली प्रोसेस करून आज डेड बॉडी पुण्यात आणली आणि वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
“पर्सनल प्लॅनिंग करून जम्मू-काश्मीरला गेलो होतो : “आम्ही कोणत्याही टूरने गेलेलो नव्हतो. आम्ही आमचं पर्सनल प्लॅनिंग करून एका एजंटच्या माध्यमातून तिकीट बुक करून जम्मू-काश्मीरला गेलो होतो. तसंच त्यांनी आम्हाला एक ड्रायव्हर देखील दिला होता. पहिल्या दिवसापासून ड्रायव्हर आम्ही पुण्यात येऊपर्यंत आमच्या सोबत होते आणि आजही त्यानी कॉल करून विचारपूस केली असं आसावरी जगदाळे हिनं सांगितलं.
आगग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन त्वरित झाले पाहिजे – नीलम गोऱ्हे यांचे महापालिकेला आदेश
पुणे : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये बुधवार (दि.२३) रोजी लागलेल्या भीषण आगीत ९० हन अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त यांना त्वरीत मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, बुधवारी पहाटे चंदन नगर येथील सुंदराबाई मराठे शाळेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीमध्ये आग लागली होती. या आगीत ९० हून अधिक झोपड्या जळाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.
यात अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची, तात्पुरत्या निवाऱ्याची, अन्न-पाण्याच्या पुरवठ्याची, तसेच दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झोपडपट्टी भागातील वीज व गॅससारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून अग्निसुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आवाहनही केले आहे.
“या घटनेची तातडीने दखल घेऊन शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत,” असे स्पष्ट मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त यशदा येथे आयोजित कार्यक्रमास भेट
पुणे, दि. २४: ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त यशदा येथे आयोजित कार्यक्रमास भेट दिली. भारतीय संविधानातील ७३ व्या घटना दुरुस्तीचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असून या घटना दुरुस्तीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा व ग्रामीण विकासाला चालना मिळाली असल्याचे श्री. गोरे म्हणाले.
यावेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव उपस्थित होते.
राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त शुभेच्छा देऊन श्री. गोरे म्हणाले, यशदा ही देशाला दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी सर्वोच्च पदावर काम करत आहेत. शासन विविध योजनांद्वारे ग्रामविकासाला चालना देत असून ग्रामविकास विभागाकडून समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेची संकल्पपूर्ती अंतिम टप्प्यात आहे.
प्रारंभी श्री.गोरे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच २६ व २७ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या तयारीची पाहणी केली.
पुणे शहर तहसील कार्यालयामार्फत आधार नोंद अद्ययावतीकरण शिबीर संपन्न
पुणे, दि. 24: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार पुणे शहर तहसिल कार्यालयामार्फत संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचे आधार नोंद अद्ययावतीकरण शिबीराचे बुधवारी, (22 एप्रिल) रोजी घोलेरोड क्षेत्रिय कार्यालय, पुणे महानगरपालिका, शिवाजीनगर येथे आयोजित करण्यात आले. या शिबारात एकूण 56 दिव्यांग नागरिकांच्या थेट खात्यात रक्कम जमा करण्यात आली.
यावेळी सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे, महापालिका सहाय्यक आयुक्त,गोविंद दांगट, संजय गांधी योजना तहसिलदार सुधाकर मागाडे, नायब तहसिलदार प्रशांत मिस्त्री यांच्यासह आदी उपस्थित होते.
श्री.शिंदे यांनी शिबीराचे निरिक्षण करुन महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 बाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय’ विषयावर राष्ट्रीय परिसंवादतीन दिवसीय परिसंवाद कोथरूड येथील डब्ल्यूपीयू कॅम्पसमध्ये सुरू
पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि पर्यावरण अभ्यास शाळेतील बायोसायन्सेस आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ‘शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय स्वच्छ ऊर्जा, लवचिक शेती आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय परिसंवाद २४ ते २६ एप्रिल दरम्यान कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमधील चाणक्य बिल्डिंगमधील तोरणा हॉल मध्ये होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेते दिली.
या परिसंवादाचे उद्घाटन राष्ट्रीय विज्ञानाचे अध्यक्ष पद्मश्री प्रा.डॉ. गणपती डी.यादव यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड हे असतील. तसेच समारोप २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी आयसीएआर-डीआयएफआरचे संचालक डॉ.के.व्ही. प्रसाद आणि जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स चे मेजर विशाल कराड उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शात संपन्न होत आहेे.
या परिसंवादात परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, हवामान-लवचिक शेती, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक उत्पादने आणि कार्यात्मक अन्न या चार विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये खरगपूर आयआयटीचे डॉ. आदिपुण्य मित्र, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. भरत काळे, एसपीपीयूचे डॉ. विठ्ठल बरवकर, आयसीएआर-एनआरसीजीचे डॉ. सुजॉय साहा, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मालती वेंकटेशन, आयसीजीईबीचे डॉ. शशी कुमार रोड, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे डॉ. राजश्री जोशी, आयडब्ल्यूएमआयच्या डॉ. मानसी त्रिपाठी, सायरिओचे डॉ. समथा मॅथ्यू, डॉ. आनंद घोसाळकर, आयसीएआर एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, बिट्स पिलानीचे डॉ. उत्पल रॉय, लोयोला कॉलेजच्या डॉ. किरण कुमारी आणि आयसीटीच्या डॉ. रेखा सिंघल हे विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आंतरविद्याशाखीय सहकार्यांना व नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणे आणि शाश्वत भविष्यासाठी प्रभावी भागीदारी निर्माण करणे हे आहे.
येथे तळागळातील उदयोन्मुख नवोपक्रम आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे संशोधन विद्वान आणि तरूण शास्त्रज्ञांचे मौखिक आणि पोस्टर सादरीकरण देखील असेल.
या परिसंवादात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योग तज्ञ आणि तरूण वैज्ञानिक विचारांना आणि काही सर्वात महत्वाच्या शाश्वत आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक संगम म्हणून कार्य करणार आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनचे पाठबळ आहे. तसेच शाश्वत ग्रामीण विकास, स्वच्छ ऊर्जा आणि वर्तुळाकार जैव अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रणी असलेल्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनची भागीदारी आहे. नेक्स्ट जेन सायन्सेस हे उद्योग प्रायोजक आहे.
या पत्रकार परिषदेत डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ सायन्स अँड एर्न्व्हामेंटल स्टडीजचे डीन इनचार्ज डॉ. अनुप काळे, डॉ. शिल्पा चापडगावकर आणि सहयोगी प्रा. डॉ. मानसी मिश्रा उपस्थित होत्या.
आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही-राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे
‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना प्रदान
शनिवार पेठेतील वीर मारुती मंदिर : ‘वीर’ परंपरेच्या जतनासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान
पुणे : आपण खऱ्या अर्थाने आजही धर्मनिरपेक्ष झालो नाही. शिक्षा आणि पुरस्कार हे धर्म बघूनच दिले जातात. मणिपूर मध्ये हिंसाचार झाला तेव्हा अनेक जण बोलत होते परंतु आज पश्चिम बंगाल मधल्या हिंसाचाराबद्दल ते लोक बोलत नाहीत. मुस्लिम मेले तर संविधान संकटात येते हिंदू मेले तर येत नाही का? , असे मत राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी व्यक्त केली.
शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे पेशवे काळापासून सुरू असलेली आणि आजही अखंडपणे जपली जाणारी कीर्तन परंपरा यंदाही हनुमान जयंतीपासून अक्षयतृतीया पर्यंत सलग १८ दिवस साजरी होत आहे. महाराष्ट्रातील सलग १८ दिवस कीर्तन उत्सव सुरु असणारे हे बहुधा एकमेव मारुती मंदिर मानले जाते.
‘शनिवार वीर मारुती उत्सव मंडळा’च्या पुढाकाराने आणि गुरुवर्य श्री श्रीराम धोंडूराम दहाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘लोकपरंपरा पुरस्कार’ शिवाजीराव गोपाळे यांना राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त बुवा आफळे यांच्या हस्ते शनिवार पेठेतील वीर मारुती चौक येथे प्रदान करण्यात आला. यावेळी राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी उपस्थित होते.
ह. भ. प. चारुदत्त बुवा आफळे म्हणाले, पानिपतचे युद्ध मराठ्यांनी जिंकावे यासाठी मारुतीला नवस करण्यात आला. ज्या ज्या वीरांच्या कुटुंबीयांनी नवस केला ते शनिवार पेठेतील मंदिरात आजही येतात. अशा वीरांच्या कुटुंबाचे संकलन शिवाजीराव गोपाळे यांनी केले, त्यांचे काम मोठे आहे. तब्बल २५ वर्षापेक्षा जास्त काळ ते झटले आणि २०० सरदारांची नावे पुढच्या पिढीपर्यंत दिली, अशा तपोवृद्ध माणसाचा सन्मान करायला मिळणे हा आमचा सन्मान आहे, अशी भावना आफळे यांनी व्यक्त केली.
राम दहाड म्हणाले, कीर्तन उत्सवाच्या या पावन परंपरेत चारुदत्त बुवा आफळे, वासुदेव बुवा बुरसे, मकरंद बुवा दीक्षित यांसारख्या नामवंत कीर्तनकारांनी सहभाग घेतला असून, आजही ही परंपरा अखंड सुरू आहे. हा उत्सव कोणतीही वर्गणी न घेता, लोकवर्गणीतून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या परंपरांना जपणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींना ‘लोकपरंपरा पुरस्कार’ देण्यात येतो.
ही परंपरा अधिक जिवंत राहावी म्हणून राम दहाड, महेश पानसे, सचिन दाते, मयुरेश जोशी, प्रवीण जोशी व सहकारी मंडळी ही उत्साहाने प्रयत्नशील आहेत.
पश्चिम भारतातील 87% लोक डासांमुळे त्रस्त ; जागतिक मलेरिया दिनाच्या पार्श्वभूमीवरगुडनाईट सर्वेक्षण
– सर्व वयोगटांतील सुमारे 61% प्रौढांनी डासांचा त्रास याला अस्वस्थ झोपेसाठीच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हटले आहे
– प्रौढ दररोज रात्री 2 तासांपर्यंतची झोप गमावतात; मुलं जवळजवळ 4 तास झोप गमावतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि आजाराचा धोका वाढतो
– उत्तर, पूर्व आणि पश्चिम भारतातील 87% आणि दक्षिण भारतातील 86% लोक याच मताशी सहमत
मुंबई: झोपेमधील अडथळे, विशेषतः मुलांना झोपेत येणारा व्यत्यय त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर थेट परिणाम करत आहे अशी पश्चिम भारतातील 87% लोकांची खात्री आहे. जागतिक मलेरिया दिनाच्या (25 एप्रिल) पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)च्या गुडनाईट या भारतातील आघाडीच्या घरगुती कीटकनाशक ब्रँडने सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालातून हा महत्त्वाचा निष्कर्ष समोर आला आहे. गुडनाईटने ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ या नावाने सादर केलेले हे अखिल भारतीय सर्वेक्षण YouGov या मार्केट रिसर्च फर्मकडून राबविण्यात आले. यात जनतेची मतं आणि डासांमुळे होणाऱ्या रोगांचा धोका याचे मूल्यमापन केले गेले. सर्वच भागांमध्ये ही चिंता व्यक्त करण्यात आली. उत्तर, पूर्व भारतात 87% आणि दक्षिणेत 86% प्रतिसादकर्ते याच मताशी सहमत आहेत.
या अभ्यासानुसार, झोपेची कमतरता हा भारतीय घरांमध्ये चिंतेचा विषय निर्माण झाला आहे. रोज रात्री प्रौढ लोक सुमारे 2 तास झोप गमावतात, तर मुलांची झोप त्यांना गरजेच्या असलेल्या वेळेपेक्षा जवळपास 4 तास कमी होते. ही सततची झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करते, तणावाची पातळी वाढवते आणि विशेषतः मलेरिया व डेंग्यूसारख्या डासांमुळे पसरणाऱ्या रोगांप्रती संवेदनशीलता वाढवते.
पश्चिम भारतातील प्रौढांमध्ये डास हे झोपेच्या व्यत्ययाचे एक प्रमुख कारण ठरले आहेत. विविध वयोगटांमध्ये सुमारे 61% लोकांनी डासांच्या प्रादुर्भावाला अस्वस्थ झोपेसाठी जबाबदार धरले आहे. मुलांमध्ये याचा परिणाम अधिक तीव्र असून, पालक सांगतात की डास चावणे व सतत त्यांची कानाशी होणारी भूणभूण हे झोपेमधील अडथळ्याचे प्रमुख कारण बनले आहे. हे आजार किंवा अभ्यासाच्या तणावापेक्षाही अधिक ठरते.
गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अश्विन मूर्ती म्हणाले, “गुडनाईटचा ‘वन मॉसक्युटो, काऊंटलेस थ्रेट्स’ हा एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण अहवाल असून तो जनतेच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करतो आणि डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या धोक्याचे मूल्यमापन करतो. अशा उपक्रमांद्वारे आमचे उद्दिष्ट म्हणजे भारतात डासांच्या समस्येबाबत जनजागृती वाढवणे, कुटुंबांना डासांचा अटकाव करण्यासाठी कृती करण्याकरता सक्षम बनवणे आणि देशासाठी परवडणाऱ्या पण नाविन्यपूर्ण उपाययोजना सादर करणे हे आहे. भारतात दरवर्षी 40 दशलक्षाहून अधिक नागरिक मलेरिया, डेंग्यूसारख्या डासांमुळे होणाऱ्या रोगांनी ग्रासतात. आजारामुळे काम, शाळा, सामाजिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्यांपासून लांब राहावे लागते, सक्तीची रजा घ्यावी लागते. आरोग्यसेवेसाठी खर्च करावा लागतो आणि उत्पादकतेत घट होते. हे सर्व आर्थिक नुकसानीचे कारण ठरतात. भारतीय अर्थव्यवस्थेची उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी आणि जीडीपी टिकवण्यासाठी एक सक्षम आणि निरोगी कामकाज करणारा वर्ग आवश्यक असतो. डासांमुळे पसरणाऱ्या रोगांच्या वाढत्या प्रमाणावर मात करण्याचा एक व्यावहारिक मार्ग म्हणजे हे प्रश्न वेळेवर सोडवणे.”
फक्त थकवा नाही, तर झोपेच्या अभावाचे परिणाम दूरगामी असतात. वैद्यकीय तज्ज्ञ चेतावणी देतात की झोपेची कमतरता रोगप्रतिकारक शक्ती कमजोर करू शकते. त्यामुळे डासांमुळे होणाऱ्या आजारांसह अनेक संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. याचा भावनिक आरोग्यावरही परिणाम होतो. तणाव वाढतो, चिडचिड वाढते आणि दिवसभर एकाग्रता कमी होते.
गुडनाईटच्या अहवालावर भाष्य करताना मुंबईतील मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग तज्ज्ञ डॉ. कीर्ती सबनीस म्हणाल्या, “एक डास देखील प्राणघातक रोग पसरवण्याची क्षमता ठेवतो हे समजणे अत्यावश्यक आहे. हे लहानसे कानाशी भूणभूण करणारे कीटक डेंग्यू, मलेरिया व इतर अनेक रोगांच्या फैलावामागचे धोकादायक कारण आहेत. ते रोगप्रतिकारक शक्ती दुर्बल करतात. त्यामुळे इतर रोग होण्याची शक्यता वाढते. ही सततची भीती आपल्या आरोग्याला धोका पोहोचवते आणि निरोगी व उत्पादक जीवन जगण्याची क्षमता बाधित करते. डासांमुळे होणाऱ्या रोगांपासून संरक्षण करणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून, ती आपली आणि आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे.”
गुडनाईटने फ्लॅश वेपोरायझर, अगरबत्त्या आणि अॅडव्हान्स फास्ट कार्ड यांसारख्या नाविन्यपूर्ण डास प्रतिबंधक उपाययोजना सादर करत एक दीर्घकालीन परंपरा जपली आहे. अलीकडच्या काळात बेकायदेशीर, अनियमित व चीनी घटक असलेल्या कीटकनाशकांमुळे निर्माण झालेल्या आरोग्यविषयक धोक्यांच्या पार्श्वभूमीवर, गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL) मधील शास्त्रज्ञांनी त्यांच्या भागीदारांसोबत मिळून ‘Renofluthrin’ हे भारतातील पहिले देशी बनावटीचे व पेटंट केलेले मॉलिक्यूल विकसित केले आहे. डास नियंत्रणासाठी हे सर्वात प्रभावी लिक्विड वॅपोरायझर फॉर्म्युलेशन तयार करते. GCPL हे घरगुती कीटकनाशक क्षेत्रात आघाडीवर असून त्यांनी हे Renofluthrin फॉर्म्युलेशन त्यांच्या नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझरमध्ये सादर केले आहे. हे भारतातील सर्वात प्रभावी लिक्विड वेपोरायझर आहे. Renofluthrin वापरून तयार केलेले हे नवीन गुडनाईट फ्लॅश लिक्विड वेपोरायझर भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोणत्याही नोंदणीकृत लिक्विड वेपोरायझर फॉर्म्युलेशनच्या तुलनेत 2 पट अधिक प्रभावी आहे.
सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांचे अभिनंदन
मुंबई-शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या आतापर्यंतच्या अंमलबजावणीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मुंबईत ऊर्जा खात्याच्या अधिकाऱ्यांचे तसेच जिल्हाधिकारी आणि सर्व संबंधित कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीस अपारंपरिक ऊर्जामंत्री अतुल सावे, ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डिकर, राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, अपर मुख्य सचिव (महसूल) राजेश कुमार, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, मा. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे व सचिव श्रीकर परदेशी, महावितरणचे संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी तसेच सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी योजनेच्या अधिक गतिमान अंमलबजावणीसाठी तयार केलेल्या सिंगल विंडो पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी योजनेच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय व तांत्रिक अडचणींचा आढावा घेतला आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्राधान्याने अडचणी दूर करण्याची सूचना केली.
सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतील विलंबाबद्दल तक्रार केली जाते. तथापि, अचूक धोरण आणि निश्चित अंमलबजावणी असेल तर सरकारी योजनासुद्धा गतीने अंमलात आणली जाते याचे ही योजना उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
या योजनेच्या अंतर्गत राज्यात ठिकठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून त्याच्या आधारे सर्व कृषी फीडर चालविण्यात येणार आहेत. आतापर्यंत राज्यात १३५९ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झाले असून त्यामुळे २ लाख १४ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत राज्यात १५,२८४ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे काम चालू आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचा हा जगातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहे.
सध्या शेतकऱ्यांना कृषीपंपांसाठी दिवसा आणि रात्री असा दोन पाळ्यांमध्ये वीज पुरठा होतो. केवळ दिवसा वीज पुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी या योजनेमुळे पूर्ण होणार आहे. सप्टेंबर २०२६ पर्यंत योजनेची अंमलबजावणी पूर्ण होईल.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये या योजनेचा शुभारंभ झाला. त्यानंतर अल्पावधीत सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी ४० हजार एकर जमीन उपलब्ध करणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठीची टेंडर काढून खासगी विकासकांना कार्यादेश देणे, नव्याने निर्माण होणारी वीज कृषी पंपांपर्यंत कार्यक्षमतेने पोहचविण्यासाठी वीज जाळे बळकट करणे अशी कामे गतीने सुरू आहेत. या योजनेत सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक होणार आहे व ग्रामीण क्षेत्रात ७०,००० रोजगार उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मध्ये महावितरणला सरासरी तीन रुपये प्रती युनिट इतक्या किफायतशीर दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे कृषी पंपांना मोफत वीज देण्यासाठी राज्य सरकारकडून द्याव्या लागणाऱ्या अनुदानात मोठी कपात होईल. तसेच उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा हटविणे शक्य होणार आहे. एकूणच कृषी आणि उद्योग क्षेत्रांसाठी ही गेमचेंजर योजना आहे.
केंद्र सरकारने या योजनेची प्रशंसा केली असून अन्य राज्यांना तिचे अनुकरण करण्याची सूचना केली आहे. या योजनेसाठी महावितरणला इंडियन स्मार्ट ग्रीड फोरमचा राष्ट्रीय पुरस्कार, स्कोच ॲवॉर्ड असे राष्ट्रीय स्तरावरील सुमारे २० पुरस्कार मिळाले आहेत.
महावितरणचा लकी डिजिटल पहिला ड्रॉ जाहीर २३० वीजग्राहकांना स्मार्ट फोन, स्मार्टवॉच मिळणार
मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याहस्ते बक्षिसांचे प्रातिनिधिक वितरण
पुणे, दि. २५ एप्रिल २०२५: सलग तीन किंवा किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांपासून वीजबिल ऑनलाइन भरणाऱ्या लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने जानेवारी ते मे महिन्याच्या कालावधीसाठी ‘लकी डिजिटल ग्राहक योजना’ सुरु केली आहे. यात पहिल्या ड्रॉमध्ये पुणे परिमंडलातील २३० वीजग्राहकांना बक्षिसे जाहीर झाली आहे. गुरुवारी (दि. २५) मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरूपात ५ वीजग्राहकांना स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
‘लकी डिजिटल ग्राहक योजने’त प्रत्येक उपविभागस्तरावर ५ बक्षिसे असून एकूण तीन लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक उपविभागासाठी प्रथम – एक स्मार्ट फोन, द्वितीय – दोन स्मार्ट फोन आणि तृतीय बक्षिस म्हणून दोन स्मार्ट घड्याळ असे प्रत्येकी पाच बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यानुसार पुणे परिमंडलातील ४६ उपविभागांसाठी एकूण २३० बक्षिसांसाठी पहिला लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ एप्रिलला काढण्यात आला. या योजनेतील प्रातिनिधिक विजेते अनिल माने, मारूती मगर, छगनलाल सोळंकी, विद्या देशपांडे, एनरीच एनर्जी लिमिटेड यांना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते स्मार्ट फोन व स्मार्ट वॉच बक्षिसांचे वितरण करण्यात आले. उर्वरित विजेत्यांना विभाग व उपविभागस्तरावर बक्षिस वितरीत करण्यात येत आहे.
ग्राहकांना येत्या दि. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ पर्यंत सलग तीन किंवा त्यापेक्षा अधिक महिन्यांत नेटबँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस आदींद्वारे ऑनलाइन वीजबिल भरून योजनेत सहभागी होता येईल. तसेच मागील महिन्याच्या वीजबिलाची १० रुपयांपेक्षा अधिक थकबाकी नसावी. ऑनलाइन व संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार असून योजनेच्या कालावधीत ग्राहक/ ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र राहील.
या योजनेत यापुढे मे आणि जून महिन्यात संगणकीय पद्धतीने लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. त्याचा निकाल संबंधित महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात महावितरणच्या वेबसाईटवर जाहीर होईल. तसेच संबंधित विजेत्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर बक्षिस जिंकल्याची माहिती देण्यात येईल. किंवा विजेते ग्राहक देखील तीन दिवसांच्या आत जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात. लकी डिजिटल ग्राहक योजनेबाबत महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट अधिक माहिती उपलब्ध आहे.
पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल,दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे-PM मोदी
मधुबनी-
पहलगाम हल्ल्यानंतर गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल.’दहशतवादी हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला.’ त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही गुजराती, तर काही बिहारचे होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, सर्वांच्या मृत्यूबद्दल आपला राग सारखाच आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल जगाला संदेश देण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी व्यासपीठावरून इंग्रजीत म्हटले, ‘आम्ही त्यांना पृथ्वीच्या शेवटच्या कोपऱ्यात हाकलून लावू.’ दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवादाला शिक्षा होईल.‘न्याय सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.’ या संकल्पात संपूर्ण देश एक आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या जनतेचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी ज्या प्रकारे निष्पाप लोकांना मारण्यात आले. संपूर्ण देश यामुळे त्रस्त आहे. त्यांच्या दुःखात संपूर्ण देश त्यांच्यासोबत उभा आहे.’सध्या उपचार घेत असलेले लोक लवकर बरे व्हावेत यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.’ मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की, हल्लेखोरांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना तुम्ही कल्पना करू शकत नाही त्यापेक्षाही वाईट शिक्षा मिळेल.
पंचायती राज कार्यक्रमात सहभागी झालेल्या पंतप्रधानांनी मंचावरून मृतांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, ‘माझे भाषण सुरू करण्यापूर्वी, मी तुम्हा सर्वांना एक प्रार्थना करू इच्छितो.’तुम्ही कुठेही असलात तरी, तुमच्या जागी बसून, २२ तारखेला गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांची आठवण आपण करू शकतो. आपण त्याला श्रद्धांजली अर्पण करू. यानंतर मी माझे भाषण सुरू करेन.
पंचायती राज कार्यक्रमात सहभागी झालेले पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आज, पंचायती राज दिनानिमित्त, संपूर्ण देश मिथिलाशी, बिहारशी जोडलेला आहे. आज, देशातील बिहारच्या विकासाशी संबंधित हजारो कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन येथे करण्यात आले.आज राष्ट्रीय कवी रामधारी सिंह दिनकर सिंह यांचीही पुण्यतिथी आहे.’ मी त्यांना सलाम करतो. बिहार ही ती भूमी आहे जिथून बापूंनी त्यांचा सत्याग्रह सुरू केला होता. त्यांचे विचार असे होते की जोपर्यंत खेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत भारताचा विकास होणार नाही.’अलिकडच्या काळात, पंचायतींना बळकटी देण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. २ लाखांहून अधिक पंचायती इंटरनेटशी जोडल्या गेल्या आहेत. गावांमध्ये ५.५ लाखांहून अधिक सामान्य सेवा केंद्रे बांधण्यात आली. यामुळे, आता अनेक कागदपत्रे सहज उपलब्ध आहेत.
ग्रामपंचायतींमध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे जमिनीचा वाद. यावर उपाय म्हणून, जमिनीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन केले जात आहे. बिहार हे देशातील पहिले राज्य होते जिथे महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले.मी नितीशजींचे अभिनंदन करतो. आज दलित, मागास आणि अत्यंत मागासलेल्या समाजातील मुली मोठ्या संख्येने सेवा देत आहेत. लोकशाहीतील हा सर्वात मोठा सहभाग आहे.
सुरत आयएनएस युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी:भारतीयांना पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश;रशियन मीडियाचा दावा- काहीतरी मोठे होणार आहे
भारताने पाकिस्तानी नागरिकांची व्हिसा सेवा स्थगित केली:भारतीयांना पाकिस्तानला न जाण्याचे निर्देश; रशियन मीडियाचा दावा- काहीतरी मोठे होणार आहेपहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्काळ प्रभावाने स्थगित केल्या.परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द करण्यात आले आहेत, त्यामुळे त्यांनी भारत सोडावा. ज्यांना वैद्यकीय व्हिसा मिळाला आहे त्यांना २९ एप्रिल २०२५ पर्यंत भारत सोडावा लागेल.
परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांनाही पाकिस्तानचा प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे.
गुरुवारी दुपारी आयएनएस सुरत युद्धनौकेवरून भारताने या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. चाचणी यशस्वी झाली. जमिनीवरून समुद्रात हल्ला करण्याची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.
यापूर्वी, भारताच्या प्रत्युत्तराच्या भीतीने, पाकिस्तानने २४-२५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्यावरील त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी करण्याची अधिसूचना जारी केली होती.
पाकिस्तानी हवाई दलाने संपूर्ण रात्र भीतीच्या सावटाखाली घालवली. कराची एअरबेसवरून भारताच्या सीमेवरील पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर १८ लढाऊ विमाने पाठवण्यात आली आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी घटनेवर सरकारने संसद भवनात सायंकाळी ६ वाजता सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह त्याचे अध्यक्षस्थान भूषवतील. राहुल गांधीही यात सामील होतील.
रशिया टुडे या रशियन माध्यमाने दावा केला आहे की सध्याची परिस्थिती पाहता भारत काहीतरी मोठे करणार आहे.
भारत सरकारने अटारी सीमा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर, व्हिसावर भारतात आलेले पाकिस्तानी नागरिक पंजाबमधील अटारी चेकपोस्टवरून परत जात आहेत.
केंद्र सरकारने पाकिस्तान सरकारच्या एक्स हँडलवर भारतात बंदी घातली आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने आपल्या नागरिकांना जम्मू आणि काश्मीरला न जाण्याचा सल्ला देणारा एक सल्लागार जारी केला आहे.
पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी श्रीनगरमधील दुकानदारांनी काळे झेंडे दाखवले आहेत.
पाकिस्तान राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली
पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक संपली आहे. तथापि, या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दोन तास चाललेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ होते. या बैठकीला लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यासह अनेक उच्च अधिकारी आणि मंत्री उपस्थित होते. काल रात्री भारतात झालेल्या सीसीएस बैठकीनंतर ही बैठक बोलावण्यात आली होती.
पर्यटकांच्या रक्षणासाठी आतंकवाद्यांना विरोध करता करता मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह ला सरकारने मरणोत्तर राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करावे- संजय सोनवणी
पुणे-पर्यटकांच्या रक्षणासाठी आतंकवाद्यांना विरोध करता करता मरण पावलेल्या सय्यद आदिल हुसेन शाह ला सरकारने मरणोत्तर शौर्य पुरस्काराने सन्मानित करावे अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांनी केली आहे. त्यांनी या सय्यद हुसेन शह च्या कामाबाबत जागरण , ANI आणि विविध हिंदी दैनिकांनी घेतलेली दखल सरकारने लक्षात घ्यावी असेही म्हटले आहे.
#WATCH | J&K | Mother of the Anantnag resident Syed Hussain Shah, who lost his life in the #PahalgamTerroristAttack, gets emotional, says, "He was the only bread earner of the family…" pic.twitter.com/W7BgzeVOEC
— ANI (@ANI) April 23, 2025
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेला एका मुस्लिम तरुणाची स्टोरी माध्यमे आणि सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. तो तेथील स्थानिक घोडेस्वार सय्यद आदिल हुसेन शाह या नावाचा युवक आहे. (Syed adil Hussain Shah) ज्याला पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सय्यद आदिल हुसेन शाहला जीव गमवावा लागला आहे. तो दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता अशी माहिती समोर आली आहे.
#WATCH | अनंतनाग, जम्मू-कश्मीर: #पहलगाम आतंकी हमले में जान गंवाने वाले अनंतनाग निवासी सैयद हुसैन शाह के परिवार के एक सदस्य ने बताया, "वह(सैयद हुसैन शाह) पहलगाम मजदूरी करने गया था… 3 बजे हमें हमले की सूचना मिली। हमने जब (सैयद हुसैन शाह को)फोन किया तो फोन नहीं लगा… हमने थाने… pic.twitter.com/SdCWxvZmOl
— ANI_HindiNews (@AHindinews) April 23, 2025
त्याने निर्दोष पर्यटकांना मारु नये अशी विनंती दहशतवाद्यांना केली तसेच पर्यटक हे काश्मिरी लोकांचे पाहुणे आहे, त्यांची सेवा करणे आमचे काम आहे आणि कामाचे दुसरे नाव जिंदगी आहे , त्यांना मारु नका असं देखील तो म्हणत होता.सय्यद आदिल हुसेन शाह घोडेस्वार होता आणि तो त्याच्या कुटुंबात एकमेव कमावणारा होता. सय्यद आदिल हुसेन शाह याच्या मृत्यूनंतर माध्यमांशी बोलताना त्याची आई भडभडून रडत होती . सय्यद आदिल हुसेन शाहच्या आईने सांगितले की, आदिल कुटुंबातील एकमेव कमावणारा पुरुष होता. तो आमचा एकमेव आधार होता. तो घोडेस्वारी करून कुटुंबाचा खर्च चालवत होता. आता आम्हाला दुसरा कोणी नाही. असं रडक्या आवाजात आदिलच्या आईने माध्यमांना सांगितले.दैनिक जागरणने काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, सय्यद आदिल हुसेन शाह पर्यटकांना फिरायला घेऊन घोड्यावरून बैसरनला गेला होता मात्र जेव्हा हल्ला सुरु झाला तेव्हा त्याने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे काश्मीरचे पाहुणे आहेत. निर्दोष आहे. त्यांना मारू नका.अशी विनंती आदिल दहशतवाद्यांना करत होता. त्यानंतर त्यांने दहशतवाद्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावरच गोळीबार केला ज्यात त्याचा मृत्यू झाला.
माँसाहेब, शिवराय आणि शंभूराजांच्या जयघोषात बालकुमार चित्रपट महोत्सवाला सुरुवात
पुणे : ‘जय जिजाऊ’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत आणि रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून बालकुमार चित्रपट महोत्सवाचा आज (दि.24) शुभारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी ‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाद्वारे मुलांनी वीरश्रीची अनुभूती घेतली.
संवाद, पुणे, कोहिनूर ग्रुप व कावरे आईस्क्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 24 ते बुधवार, दि. 30 एप्रिल 2025 या कालावधीत कोथरूड येथील सिटी प्राईड चित्रपट गृहात बालकुमार चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी प्रतिथयश युवा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर, प्रकाश चाफळकर, कावरे आईस्क्रीमचे राजूशेठ कावरे, जान्हवी कावरे, संवाद पुणेचे सुनील महाजन, निकिता मोघे, केतकी महाजन-बोरकर, प्रसाद मिरासदार यांची उपस्थिती होती. या महोत्सवात लांजेकर यांनी दिग्दर्शित केलेले पाच चित्रपट दाखविण्यात येत असल्याने त्यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला. महोत्सवाचे यंदाचे 27वे वर्ष आहे.
भविष्यात नवीन दिग्पाल दिसेल..
उद्घाटनप्रसंगी चित्रपट महोत्सवाच्या आठवणी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, लहानपणापासून मी हा बालचित्रपट महोत्सव अनुभवला आहे. सातत्याने या महोत्सवाचे आयोजन करणे कठीण आहे. परंतु आम्हा बालगोपाळांना या चित्रपट महोत्सवातून उत्तमोत्तम चित्रपट दरवर्षी पहायला मिळत गेले आणि त्यातूचन माझ्यातील कलावंत-दिग्दर्शक घडला. हा महोत्सव वर्षांनुवर्षे अखंडितपणे बालकुमारांना आनंद देईल आणि यातूनच नवीन दिग्पाल उदयास आलेला दिसेल.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बालगोपाळांसाठी त्यांच्या वयाला रुचतील असे चित्रपट दर्शविण्याचे काम कावरे आईस्क्रीम आणि कोहिनूर ग्रुपच्या सहकार्याने करण्यात येत आहे. या वर्षी चित्रपट महोत्सवात पहिल्यांदाच एकाच दिग्दर्शकाचे पाच चित्रपट दाखविण्यात येत आहे याचा आनंद आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा आणि वैभवशाली इतिहास मुलांना कळावा या हेतूने ऐतिहासिक चित्रपट दाखविण्यात येत आहेत.
सुरुवातीस विद्या भोपे हिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती विशद केली. मान्यवरांचे स्वागत राजूशेठ कावरे आणि सुनील महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.
समारोपाला ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलावंतांची उपस्थिती..
शुक्रवार, दि. 25 रोजी ‘पावनखिंड’, शनिवार, दि. 26 रोजी ‘फर्जंद’, रविवार, दि. 27 रोजी ‘फत्तेशिकस्त’, सोमवार, दि. 28 रोजी ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’, मंगळवार, दि. 29 रोजी ‘तेंडल्या’, बुधवार, दि. 30 रोजी ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हे चित्रपट महोत्सवात दाखविले जाणार आहेत. समारोप समारंभास केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, प्रसिद्ध उद्योजक, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उद्योजक प्रवीण बढेकर, सिटी प्राईडचे अरविंद चाफळकर तसेच ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटातील कलावंतांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
