Home Blog Page 342

इंद्रायणी नदीवर घाटाची तोडफोड थांबविण्यासाठी उपजिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

संपूर्ण राज्यातील शेकडो वारकरी सहभागी
पुणे २५ एप्रिल : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदीच्या इंद्रायणी नदीवर बांधण्यात आलेल्या दगडी घाटाची जी तोडफोड सुरू आहे ती त्वरीत थांबवावी. तसेच ते कार्य पूर्ववत करावे या मागणीसाठी शुक्रवारी सदगुरू बाबाजी चैतन्य महाराज पालखी सोहळा आणि संत श्रीपाद बाबा व संत रामदास बाबा पालखी सोहळ्याच्या वतिने निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी यांनी आश्वासन दिले की संबंधित मागणी वरिष्ठांपर्यंत पोहचविल्या जाईल.
उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना हभप धर्मराज महाराज हांडे, हभप महेश महाराज नलावडे, हभप शालीकराम महाराज खंदारे, हभप तुकाराम महाराज कापसे आणि आळंदीचे हभप संतोष महाराज सांगळे यांच्या सहित संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले शेकडो वारकरी उपस्थित होते.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च केले. त्यामाध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या कार्यासाठी एमआयटीचे डॉ. विश्वनाथ दा. कराड, वै.किसन महाराज साखरे, वै. पद्मश्री शंकर बापू आपेगावकर व वै. धुंडा महाराज देगलूरकर तसेच संप्रदायातील शेकडा थोर मान्यवरांनी पुढाकार घेतला होता. तसेच येथे घाटाचे सुंदर रेखीव व कोरीव कार्य सुरू आहे. दर्शनबारी, गोमुखाद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाण्याचे व्यवस्थापन, तिर्थक्षेत्राकडून ज्ञान तीर्थ क्षेत्राकडे हा वारकरी व समाजातील लोकांसाठी अभिनव उपक्रम सुरू आहे. सुमारे १४५ फूट उंच सुवर्णजडित गरूड स्तंभाची निर्मिती ही सौदर्यात भर पाडणारी आहे.
सध्या स्थितीला येथे सांडपाणी वाहिनी टाकण्यासाठी जे कार्य सुरू आहे. त्यामुळे वारकरी भाविक भक्तांचे मन दुखावलेले आहे. याच भाविकांनी आपल्या आई वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ घाटाच्या कार्यासाठी आर्थिक योगदान देऊन एक एक दगड लावला आहे. सध्या घाटाची दुरावस्था पाहून त्यांच्या अंतकरणात तिव्र वेदना होत आहे. त्यामुळेच हे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
येथे समस्त वारकर्‍यांनी शांततामय मार्गाने भजन करीत निषेध केला. यामध्ये संपूर्ण राज्यातील कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दुकानदाराचा धर्म विचारून सामान विकत घ्या:कुणी खोटे बोलल्यास हनुमान चालीसा म्हणण्यास सांगा;मंत्री नीतेश राणे यांचे हिंदुंना आवाहन

दापोली-हिंदुंनी कुठल्याही दुकानदाराकडून काही सामान विकत घेण्यापूर्वी दुकानदाराचा धर्म विचारला पाहिजे, असे वक्तव्य नीतेश राणे यांनी केले आहे. तर दुकानदाराला हनूमान चालीसा येत नसेल, तर त्याच्याकडून सामान विकत घेऊ नका असेही त्यांनी म्हटले आहे.नीतेश राणे म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मारण्याआधी त्यांनी आपला धर्म विचारला आणि मग मारले. पण आता आपण काही विकत घेण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला पाहिजे, तुम्हाला जर धर्म विचारुन मारले जात असेल तर तुम्ही सामान धर्म विचारत घेतले पाहिजे, असे त्यांनी दापोलीमध्ये एका जनसभेला संबोधित करताना म्हटले आहे.

नीतेश राणे म्हणाले की, तुम्ही सामान घ्यावे म्हणून काही दुकानदार त्यांचा धर्म सांगणार नाही किंवा खोटं सांगतील. त्यांनी जर हिंदू सांगितले तर त्यांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा, ती म्हणता आली नाही तर त्यांच्याकडून काही घेऊ नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

नीतेश राणे म्हणाले की, जर ते त्यांच्या धर्माबद्दल इतके कट्टर आहेत तर आपण त्यांना श्रीमंत का बनवत आहोत? जर ते धर्मासाठी जिहाद करत असतील तर आपण त्यांच्याशी बंधुत्वाबद्दल का बोलतो? तुम्ही या धार्मिक मेळाव्यातून शपथ घ्यावी की आतापासून आम्ही फक्त हिंदूंकडूनच वस्तू खरेदी करू, मग ते कसे थरथर कापू लागतील ते पहा… आम्ही त्यांना दूध पाजू आणि नंतर आम्हाला चावू. औरंगजेबाने आपल्या वडिलांना मारले, त्याचे कुटुंब उद्ध्वस्त केले, स्वतःच्या भावाला आणि वडिलांना मारले. जे लोक स्वतःच्या लोकांसोबत उभे राहिले नाहीत, ते तुमच्यासोबत कसे उभे राहतील, याचा विचार करा.

काश्मीरमध्ये स्फोटात 6 दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त:अहमदाबाद-सुरतमध्ये घुसखोरांवर कारवाई, 500 हून अधिक बांगलादेशी ताब्यात


भारताने परदेशी सरकारांना सांगितले – पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात आहे
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जागतिक नेत्यांना फोन करून दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. इंडियन एक्सप्रेसने एका वृत्तात दावा केला आहे की पंतप्रधानांनी जागतिक नेत्यांना सांगितले की सुरुवातीच्या तपासात पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. पंतप्रधान म्हणाले की भारताकडे याबद्दल तांत्रिक माहिती आहे आणि आमच्या सूत्रांनीही याची पुष्टी केली आहे. दिल्लीत ३० राजदूतांची बैठकही झाली होती, ज्यामध्ये भारताने हीच माहिती दिली.


नवी दिल्ली-पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये आतापर्यंत ६ दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यामध्ये लश्कर ए तय्यबाचा आसिफ शेख, आदिल ठोकर, हरिस अहमद, जैशचे अहसान उल हक, झाकीर अहमद गनई आणि शाहिद अहमद कुटे यांचा समावेश आहे.यापैकी जैशचा अहसान २०१८ मध्ये पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन परतला होता. पहलगाम हल्ल्यात आसिफ आणि आदिलची नावे समोर आली होती. त्राल, अनंतनाग, पुलवामा, कुलगाम आणि शोपियान येथे शोध मोहिमेदरम्यान लष्कराने ही कारवाई केली.

शुक्रवारी सकाळनंतर, शनिवारी पहाटे पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. भारतीय सैन्यानेही याला प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.दरम्यान, शनिवारी सकाळी गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये पोलिसांनी घुसखोरांवर कारवाई केली. दोन्ही शहरांमध्ये ५०० बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले. गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांना घुसखोरांची लवकरात लवकर ओळख पटवून त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचे आवाहन केले होते.

फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका भागाचा पुणे ते शिरूर’ उन्नत पुलात समावेश; बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश.

पुणे: ‘पुणे ते शिरूर’ या प्रस्तावित उन्नत पुलामधून वडगावशेरी मतदारसंघातील ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ हा महत्त्वाचा पाच किलोमीटरचा भाग वगळण्यात आला होता. आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा विचार करून फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका या वगळलेल्या भागाचा पुन्हा समावेश करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरदचंद्र पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे पठारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नवी दिल्ली तसेच नागपूर येथे नितीन गडकरी यांच्याकडे पठारे यांनी प्रत्यक्ष ४ वेळा भेटून निवदेनाद्वारे मागणी केली होती. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून पठारे यांनी वगळलेला भाग समाविष्ठ करून घेण्याची मागणी केली.
राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार, पुणे महापालिका हद्दीतील ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ (सा.क्र. द.कि.मी. ५/८०० ते १०/८००) हा पाच किलोमीटरचा भाग देखील उन्नत पुलाच्या प्रस्तावात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर निर्णयामुळे पुणे नगर रस्त्यावरील वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर होणार असून संपूर्ण ‘फिनिक्स मॉल ते शिरूर’ मार्ग सुसंगत आणि उच्च दर्जाचा होणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांना याचा प्रत्यक्ष फायदा होईल, अशी माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली. या निर्णयात सहकार्य केलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच, एमएसआयडीसी तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचेही आमदार पठारे यांनी विशेष उल्लेख करत आभार मानले आहेत.
“झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तसेच सातत्याने होणारी वाहतुक कोंडी आणि रस्त्यांवरील ताण लक्षात घेता ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ हा भाग उन्नत पुलात समाविष्ट होणे अत्यंत आवश्यक होते. मी हा विषय सातत्याने केंद्रीय मंत्री गडकरी जी आणि राज्य पातळीवर मांडत होतो. आज शासन निर्णयाच्या माध्यमातून या भागाचा समावेश झाल्याने मतदारसंघासह परिसरातील नागरिक बांधवांचा कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे या निर्णयावर, पठारे यांनी मत व्यक्त केले.

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या चऱ्होली आणि माण ई- बस डेपोचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांना उत्तम वाहतूक सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. २५ : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच दीड हजार बसेस दाखल होणार आहेत. मेट्रो मार्गांचा विस्तार, बाह्य वर्तुळ मार्ग, बससेवांचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) च्या चऱ्होली बु. येथील ई- बस डेपोचे तसेच माण ई- बस डेपोचे (ऑनलाइन पद्धतीने) उद्घाटन व लोकार्पण उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळीते बोलत होते. कार्यक्रमास विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार बापूसाहेब पठारे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ – मुंडे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पीएमपीएमएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर आदी उपस्थित होते.

माण डेपोला ३० ई- बसेस, चऱ्होली डेपोला ६० ई- बसेस ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट (जीसीसी) तत्त्वावर उपलब्ध होणार आहेत असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, पीएमपीएमएलला बसेस घेण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २३० कोटी रुपये रक्कम दिली असून त्यातून लवकरात लवकर ५०० सीएनजी बसेस घेण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. तसेच पुणे महानगरपालिकेला १५० कोटी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने १०० कोटी रुपये द्यावेत त्यातून अजून ५०० सीएनजी बसेस घेण्यात येतील. त्याव्यतिरिक्त अजून ५०० इलेक्ट्रिक बसेस जीसीसी तत्त्वावर घेण्यात येणार आहेत. अजूनही टप्प्या-टप्प्याने बसेस घेण्यात येतील. या ई-डेपोच्या माध्यमातून राज्य शासनाचा ग्रीन महाराष्ट्र हा दृष्टीकोन समोर येतो, असेही श्री. पवार यांनी सांगितले.

श्री. पवार यांनी पुढे माहिती दिली, शहरातील वाहतुकीला चालना आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी महाराष्ट्र राज्य् रस्ते विकास महामंडळामार्फत बाह्य वर्तुळ मार्गाचे काम सुरू असून पीएमआरडीकडूनही आतील वर्तुळ मार्गाचे काम लवकरच सुरू होईल. याशिवाय मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. प्रत्येकी २० टक्के रक्कम केंद्र व राज्य शासन, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका १० टक्के रक्कम आणि उर्वरित ५० टक्के रक्कम वित्तीय संस्थांमार्फत उभी करून दोन्ही शहरात मेट्रो मार्गाचे जाळे उभारण्यात येणार आहे. स्वारगेट ते कात्रज मेट्रोला केंद्र शासनाने मान्यता दिली आहे. खडकवासला- स्वारगेट- हडपसर- खराडी आणि नळ स्टॉप्- वारजे- माणिकबाग मेट्रोसाठीही केंद्र शासनाकडे मान्यतेचा प्रस्ताव पाठविला आहे, असेही ते म्हणाले.

पीएमपीएमएलच्या कामगारांसाठीही चांगले निर्णय घेण्यात आले असून २०१५ साली वर्षभरात २४० दिवस नियमित कामावर असणाऱ्या १ हजार ४६७ बदली कामगारांना तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये १ हजार ७०० बदली कामगारांना नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम चार टप्प्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला, असेही त्यांनी सांगितले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही शहरे स्मार्ट सिटी प्रगत, सुरक्षित आणि समतोल नागरी जीवनशैलीचे आदर्श प्रारुप बनावे यासाठी प्रशासन आणि शासनासोबत जनतेने काम करावे, असे आवाहन श्री. पवार यांनी केले.

पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या २०४१ साली ६१ लाख होण्याचा अंदाज असून या लोकसंख्येला पाणी, रस्ते, मेट्रो, रेल्वे, वाहतूक सेवा चांगली प्रकारे मिळावी यासाठी नियोजन सुरू आहे. शहराला पवना आणि आंद्रा धरणाचे पाणी देण्यात येत असून ठोकरवाडी धरणाचे पाणीही मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुळशी धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.

कामगार, कष्टकऱ्यांना अत्यल्प उत्पन्न गटातील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना घरकुले मिळावीत यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात 30 हजार घरे तर ग्रामीण भागात ५ हजार घरांचे निर्माण होत आहे. हे करत असताना प्रधानमंत्री आवास योजनेतून २ लाख ५० हजार रुपये, बांधकाम कामगार असल्यास बांधकाम कामगार महामंडळाकडून २ लाख रुपये तसेच प्रत्येक घरासाठी सूर्यघर योजनेतून सौरवीजेसाठी ३० हजार रुपये दिले जाणार आहेत, असेही ते म्हणाले.

श्रीमती मुधोळ- मुंडे म्हणाल्या, महामंडळाच्या सेवेत १ हजार ९६७ बसेस असून रोज ३ लाख १० हजार कि.मी. धावतात. यातून दररोज सुमारे १२ लाख ५० हजार प्रवासी प्रवास करतात. सध्या १५ बसडेपो असून आज २ ई-बस डेपो सेवेत दाखल होत आहेत. महामंडळाच्या सेवेत मोठ्या प्रमाणात बसेस याव्यात यासाठी नियोजन सुरू आहे. आपली पीएमपीएमएल मोबाईल ॲपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. डिजिटल पुढाकारांबद्दल राष्ट्रीय स्तरावरील दोन पुरस्कारही महामंडळाला मिळाले आहेत. भविष्यात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन स्मार्ट बस सिस्टीम ही कंडक्टर विरहीत सेवा सुरु करण्याचा मानस ठेवला असून सुरक्षितता आणि अपघातविरहीत सेवा हे ध्येय ठेऊन पीएमपीएमएल काम करत आहे, असेही त्या म्हणाल्या.

प्रारंभी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृत नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

श्री. पवार यांच्या हस्ते बस डेपोंचे उद्घाटन व लोकार्पण झाल्यानंतर ई- बसेसचेही लोकार्पण त्यांनी केले, तसेच बसेसची पाहणी केली.
0000

बारामतीच्या शासकीय नर्सिंग महाविद्यालयास प्रथम मान्यता मंजूर;येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’ची प्रवेशप्रक्रिया सुरू होणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली
बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…

बारामती, दि. २५ :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती अंतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली असून या बाबतच्या मान्यतेचे पत्र आज आरोग्य विद्यापीठाकडून देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बारामतीने शिक्षण क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून यंदापासून ‘बीएससी नर्सिंग’चा अभ्यासक्रम सुरु होत असल्याने बारामतीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षात बारामती शैक्षणिक हब म्हणून विकासीत होत आहे. कोविडपश्चात राज्यातील वैद्यकीय सेवा अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्यशासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. त्यामध्ये राज्याच्या विविध भागात कुशल वैद्यकीय मनुष्यबळ तयार करण्याच्या उद्देशाने शासकीय नर्सिंग महाविद्यालय उभारणीचाही प्रस्ताव होता. त्यानुसार राज्यात बारामतीसह जळगाव, लातूर, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया या सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय उभारण्यास राज्यमंत्री मंडळाने दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली होती.
त्यानुसार सर्व निकष पूर्ण केल्याने महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडून शैक्षणिक वर्ष २०२५-२६साठी बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत शासकीय नर्सिंग महाविद्यालयाला प्रथमच संलग्नता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘बीएससी नर्सिंग’च्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी शंभर प्रवेश देण्यात येणार आहेत. बारामती शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणार असल्याने पॅरामेडिकल शिक्षणाचे नवीन दालन खुले होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीत हे महाविद्यालय सुरु होत आहे.
गेल्या काही वर्षात बारामती मेडीकल हब म्हणून उदयास आले. येथील अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून दररोज किमान पाचशे ते सहाशे रुग्ण येथे औषधोपचार घेतात. आयुर्वेदीक महाविद्यालयाची चौथी बँच यंदापासून बारामतीत येणार आहे. बारामती पंचक्रोशीसाठी शासकीय नर्सिंग महाविद्यालय सुरु होणे महत्वाचे ठरणार आहे. या मान्यतेमुळे बारामती आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सरकारी मान्यतेचा आणि दर्जेदार वैद्यकीय शिक्षणाचा एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विशेषतः नर्सिंगसारख्या सेवाभावी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी संधी मिळणार असून, आरोग्यसेवा क्षेत्रात नवे योगदान देणारे मनुष्यबळ निर्माण होण्यास मदत होणार आहे.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तेदापोडी पोलिस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

0

पुणे, दि. 25: पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील दापोडी पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. पवार यांनी नवीन इमारतीची पाहणी केली.यावेळी अधिकारी कक्ष, आवक जावक बारनिशी, सी.सी.टीव्हि, वायरलेस, डे-बुक, मुद्देमाल कारकून कक्ष,तपास पथक कक्ष, हिरकणी कक्ष, पुरुष व महिला विश्रांती कक्ष, खेळाचे मैदान, बैठक कक्ष, प्रसाधन गृह, आदी कक्षांची पाहणी करून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमात मुख्यमंत्री सात कलमी कार्यक्रमाचे सादरीकरण दाखविण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत करण्यात आलेल्या नवीन विकासकामांची माहिती देण्यात आली. यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार अमित गोरखे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उप आयुक्त श्रीमती स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे, पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

0000

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस विभागाला आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत आहे, असे ते यावेळी म्हणाले.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार भीमराव तापकीर, शंकर मांडेकर, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते आदी उपस्थित होते.

या नवीन वास्तूच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या वास्तूमधून पारदर्शक कारभार करुन येणाऱ्या नागरिकांना समाधानकारक सेवा देण्याचे काम करावे, असेही श्री. पवार म्हणाले.

श्री. चौबे यांनी पोलीस ठाण्याविषयी माहिती दिली.
0000

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

पुणे, दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. राज्यशासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा धीर त्यांनी दिला.

यावेळी स्व. संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आशावरी जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता गणबोटे, मुलगा कुणाल गणबोटे आदी कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
0000

दहशतवाद्यांनी हिंदू: मुस्लीम द्वेष वाढीच्या हेतूने भारतीयांना मारले : राहुल डंबाळे

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी तर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्या विरोधात कॅण्डल मार्च व निषेध सभा

पुणे : पहेलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना हिंदूंना नव्हे तर भारतीयांना मारायचे होते , तसेच या घटनेच्या आधारे हिंदू मुस्लिम धृवीकरण करणारे यांचा व दहशतवाद्यांचा धर्म एकच असल्याची टीका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केली.

पुणे कॅम्प येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शेकडोंच्या उपस्थितीमध्ये पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात कॅन्डल मार्च व निदर्शनाचे आयोजन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा देखील घेण्यात आली व या सभेत या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत हल्लेखोरांवर कठोर शिक्षा करावी तसेच दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर देखील कठोर निर्बंध लावावे यासाठी सरकारच्या भूमिकेसोबत सर्व भारतीय आहेत असा विश्वास सर्वांच्या वतीने डॉ. सिध्दार्थ धेंडे व रशिद शेख यांचेद्वारे व्यक्त करण्यात आला. तसेच या अनुषंगाने केंद्र सरकारने सुरक्षा संदर्भामध्ये चूक झाल्याचे मान्य केले असल्याने यातील दोषींवर देखिल कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली.

अंजुम इनामदार यांनी सांगितले की ” पाकिस्तानचा दहशतवाद कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय मुसलमान खपवून घेणार नाही. देशात आम्ही एकत्रित राहतो वेळप्रसंगी मुसलमान हिंदूंना तर हिंदू मुसलमानांना मदत करतात अशा पद्धतीच्या दहशतवादी कारवाई करून पाकिस्तानचा हेतू साध्य होणार नाही. “

याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक रशीद शेख, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे , माजी नगरसेवक राहुल तुपेरे , माजी नगरसेवक मुक्तार शेख , रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर , कारी इद्रीस , जाहीद शेख , मुनव्वर कुरैशी , जुबेर मेमण , सुफियान कुरैशी, अहमद सय्यद , सलिम मौला पटेल अंजुम इनामदार, खिसाल जाफरी, लुकस केदारी , सुवर्णा डंबाळे, स्नेहा माने , इब्राहीम यवतमाळवाला, सिध्दांत सुर्वे , राम डंबाळे , सत्यवान गायकवाड , शाकीर शेख , अश्पाक शेख , राहुल नागटिळक , स्वाती गायकवाड, अर्चना केदारी, वसिम पैलवान आदी मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नॅशनल फॉर मायनॉरिटीच्या स्नेहा माने , शहाबुद्दीन शेख , आसिफ शेख , प्रतिक डंबाळे यांनी केले होते.

पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न

पुणे, दि. : 25: जिल्ह्यातील पाणंदरस्ते, शिवरस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचे कामही वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामांसाठी संबंधित यंत्रणांनी 31 मे पर्यंत प्रशासकीय मान्यता घेऊन डिसेंबरअखेर कामे पूर्ण करावीत, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

विधानभवन येथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष आण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, दिलीप वळसे पाटील, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, राहुल कुल, सुनील कांबळे, सुनील शेळके, सिद्धार्थ शिरोळे, महेश लांडगे, शरद सोनवणे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके, बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, शंकर मांडेकर, हेमंत रासणे, शंकर जगताप, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, जिल्हा ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिंधी विकास कामांची माहिती 15 मे पर्यंत प्रशासनाकडे सादर करावी. सर्व संबंधित यंत्रणांनी 31 मे अखेर प्रशासकीय मान्यता घेवून पुढील कार्यवाही डिसेंबरअखेर पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीमध्ये मंजूर कामाचा आढावा घेतला जाणार असून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विकासकामे वेळेत, दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होईल याकडे लक्ष द्यावे. गडकिल्ले, पर्यटनस्थळे आदी ठिकाणे पर्यटकांना सुरक्षित वाटली पाहिजे, याकरीता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

जिल्ह्यात पुणे मॉडेल स्कूल अर्थात आदर्श शाळांचा उपक्रम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून त्या अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील केंद्र शाळा स्तरावर एका मोठ्या शाळेचा भौतिक तसेच दर्जात्मक विकास करण्यात येणार आहे. भौतिक सुविधांसोबतच शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे.

नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्यावे. लोकप्रतिनिधी सूचित केलेल्या सूचना, तक्रारीचे दखल घेत त्यांना विश्वासात घेवून त्या निकाली काढाव्यात. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकसारखा निधी दिला जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णालयात विविध आजाराकरीता उपचारासाठीची लागणारी पुरेशी औषधे उपलब्ध ठेवावीत. धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम घेऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, याकामी जिल्हाप्रशासन, महानगरपालिका आयुक्त आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालावे,असेही श्री. पवार म्हणाले.

यावेळी मंत्री श्री. पाटील, मंत्री श्री. भरणे, राज्यमंत्री श्रीमती मिसाळ, श्रीमती गोऱ्हे यांच्यासह आमदार यांनी विविध सूचना केल्या.

यावेळी जिल्ह्यासाठी सन २०२५- २६ च्या सर्वसाधारण योजनेसाठी १ हजार ३७९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १४५ कोटी रुपये आणि आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ६५ कोटी ४६ लाख रुपये या प्रमाणे एकूण १ हजार ५८९ कोटी ४६ लाख रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजना आराखड्यास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याचे माहिती जिल्हाधिकारी श्री. डूडी यांनी दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनीही प्रस्तावित योजना व तरतुदींच्या अनुषंगाने सादरीकरण केले.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद आणि आयुका संस्थेत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना आयुका, नासा व इस्त्रो या संस्थेस भेटीबाबत मदत करण्यासोबतच तेथील कामकाजाबाबत माहिती व शास्त्रज्ञाच्या भेटीबाबत सामंजस्य करार करण्यात आला. तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या ‘वॉर्ड हेल्थ ॲक्शन प्लॅन’चे प्रकाशन करण्यात आले.

बैठकीत सन २०२४-२५ च्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.

बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध कार्यान्वयन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0000

डॉ.किरण मोघे माहिती उपसंचालक पदी रुजू

0

पुणे, दि. २५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांची माहिती उपसंचालक पदी पदोन्नती झाल्याने त्यांनी पुणे विभागीय माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार स्विकारला. प्रभारी उपसंचालक श्रीमती वर्षा पाटोळे यांच्याकडून त्यांनी उपसंचालक पदाचा पदभार स्विकारला.

डॉ. मोघे हे यापूर्वी मुख्यमंत्री सचिवालयात जनसंपर्क अधिकारी तथा माहिती अधिकारी म्हणून तर नांदेड, रत्नागिरी, नंदूरबार, अहिल्यानगर, नाशिक तसेच पुणे येथे जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्यरत होते. त्यांच्याकडे नाशिक विभागीय माहिती उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आला आहे.

प्रभारी उपसंचालक श्रीमती पाटोळे यांनी प्रभारी उपसंचालक म्हणून चांगले काम केल्याचे यावेळी उपसंचालक डॉ. मोघे यांनी नमूद केले. सामुहीक प्रयत्नातून सर्वांनी कार्यालयाचे कामकाज अधिक चांगले होईल असे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.

श्रीमती पाटोळे आणि कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ.मोघे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रविंद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे,प्रदर्शन सहायक विलास कसबे, वरिष्ठ लिपिक सचिन बहुलेकर, वैशाली रांगणेकर, स्वाती साळुंके, सुहास सत्वधर, सुवर्णा पालकर, आराध्या लोंढे, रावजी बांबळे, वर्षा कोडलिंगे आदी उपस्थित होते.

0000

सरहद शौर्याथॉन‌’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण

सरहद शौर्याथॉन‌’मधून शांती, एकात्मता, सद्भावनेचा संदेश : अजित पवार
22 जून 2025 रोजी झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजन
यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित : संजय नहार

पुणे : कारगील युद्धात भारतीय सेनेने दाखविलेले धैर्य, साहस आणि बलिदान याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेली आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ ही फक्त क्रीडा स्पर्धा नसून भारतातील सर्व धर्मीयांना व संस्कृतींना एकत्र आणण्याचा मोलाचा उपक्रम करीत आहे. या स्पर्धेद्वारे शांती, एकात्मकता आणि सद्भावनेचा संदेश दिला जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
झोजी ला युद्ध विजय अमृत महोत्सव आणि कारगील युद्ध विजय रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक, लडाख यु. टी. यांचे युनिट, सरहद, पुणे आणि अर्हम्‌‍ फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जून 2025 रोजी लडाख येथील झोजी ला वॉर मेमोरिअल ते कारगिल वॉर मेमोरिअल दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‌‘सरहद शौर्याथॉन‌’ 2025 स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते आज (दि. 25) व्हीव्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे झाले. त्या वेळी पवार बोलत होते. क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, रेस डायरेक्टर सुमंत वाईकर, टेक्निकल रेस डायरेक्टर वसंत गोखले, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, लेशपाल जवळगे, संतोष बालवडकर, अर्हम्‌्‌‍ फाऊंडेशन, पुणेचे विश्वस्त स्वराज पगारिया आदी उपस्थित होते. दिनेश कोल्हे यांनी संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
काश्मीरमध्ये सरहद संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करून अजित पवार पुढे म्हणाले, युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणाप्रित्यर्थ 2017 पासून ‌‘सरहद शौर्याथॉन‌’चे आयोजन करण्यात येत असून स्पर्धा देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.
पहलगाम येथे झालेल्या नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून अजित पवार म्हणाले, या घटनेचा भारतातूनच नव्हे तर जगभरातून तीव्र निषेध नोंदविला जात आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात बदल्याची भावना आहे. सर्व जण पेटून उठले आहेत. पंतप्रधानांनी तातडीने पावले उचलली आहेत.
स्पर्धेविषयी माहिती देताना सुमंत वाईकर म्हणाले, जगाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू या स्पर्धेत सहभागी होतात. या वर्षी अडीच ते तीन हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्त्री व पुरुष विभागासाठी पाच, दहा आणि 21 किमी तर मुली आणि मुलांसाठी तीन किमीची स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेतील विजेत्यांना भरघोसे बक्षीस देऊन गौरविले जाते. स्पर्धेसाठी 13 जे. के. रायफल्स आर्मी युनिट, द्रास टाऊन, कारगिल डिस्ट्रिक्ट, लडाख यु. टी. युनिटचे मुख्य अधिकारी कर्नल राजेश बांदे यांचे सहकार्य लाभले आहे. वर्ल्ड ॲथेलेटिक आणि इंडियन ॲथेलेटिक यांच्या नियमानुसार ही स्पर्धा होत आहे.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सरहद संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्याची माहिती देताना संजय नहार म्हणाले, काश्मीरमधील युवकांच्या सहकार्याने अडकलेल्या पर्यटकांना निवास, भोजनासह अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे काश्मीरमधील सामाजिक स्थितीबाबत अयोग्य माहिती पसरविली जात आहे. पण सरहदच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेऊन परतलेल्या काश्मिरी युवकांनी केलेल्या मदतीमुळे लोकभावना बदलली असून सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यंदाची स्पर्धा पहलगाम येथे शहीद झालेल्या नागरिकांना समर्पित करण्यात आली आहे.

पहलगाम हल्ल्यामागील हेतू समाज तोडणे,एकाच घरातील भावाला भावाविरुद्ध लढवणे

श्रीनगर – पहलगाम हल्ल्यानंतर राहुल गांधी जम्मू आणि काश्मीरला पोहोचले. त्यांनी येथे जखमींची भेट घेतली.त्यांनी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला आणि स्थानिक नेते कार्यकर्ता आणि नागरिकांशी भेटी गाठी करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे यावेळी ते म्हणाले , आम्ही नफरत आणि आतंकवादाच्या विरोधातच आहोत त्यासाठी सरकार जी जी कार्ये करेल त्या त्या कार्यांच्या सोबत आम्ही राहू .. त्यासोबत हेही लक्षात घ्यायला हवे कि,आज पर्यंत इथे कधीही नागरिक अथवा पर्यटक यांच्यावर आतंकी हल्ला झाला नव्हता पहलगाम चा जो हल्ला पर्यटकांवर झाल्या तो सामाजिक एकता तोडणे आणि एकाच घरात राहणाऱ्या भावा भावात दुष्मनी निर्माण करण्याच्या हेतूने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही एक भयानक दुर्घटना आहे. मी येथे काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी आणि मदत करण्यासाठी आलो आहे. जम्मू आणि काश्मीरच्या संपूर्ण लोकांनी या भयानक कृत्याचा निषेध केला आहे आणि यावेळी देशाला पूर्ण पाठिंबा देत आहेत. जखमी झालेल्यांपैकी एकाला मी भेटलो.
माझे प्रेम आणि आपुलकी प्रत्येकाला आहे ज्यांनी कुटुंबातील सदस्य गमावले आहेत. मी सर्वांना हे कळावे असे वाटते की देश त्यांच्यासोबत एक आहे. काल आम्ही सरकारसोबत बैठक घेतली आणि संपूर्ण विरोधी पक्षाने या कृतींचा निषेध केला आणि सरकार जे काही कारवाई करेल त्याला पूर्ण पाठिंबा दर्शविला.


जे घडले त्यामागील कल्पना म्हणजे समाजात फूट पाडणे आणि प्रत्येक भारतीयाने एकत्र येऊन दहशतवादी जे करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा पराभव करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. काही लोक काश्मीर आणि देशातील माझ्या बंधू आणि भगिनींवर हल्ला करत आहेत हे पाहून दुःख होते. या घृणास्पद कृत्याशी लढण्यासाठी आणि दहशतवादाला कायमचा पराभूत करण्यासाठी एकजूट आणि एकत्र उभे राहणे आवश्यक आहे.
मी मुख्यमंत्री आणि उपराज्यपालांनाही भेटलो. त्यांनी मला घडलेल्या घटनेची माहिती दिली आणि मी दोघांनाही आश्वासन दिले की मी आणि आमचा पक्ष त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ.

राहुल म्हणाले- अतिरेक्यांनी काहीही केले, तरी आपण त्यांना हरवू

श्रीनगर -काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी श्रीनगरमध्ये पहलगाम हल्ल्यातील जखमींची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही त्यांना पराभूत करू. प्रत्येक भारतीय एकत्र आहे.

तत्पूर्वी, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना ओळखून परत पाठवण्याचे आवाहन केले.

हल्ल्यानंतर 3 दिवसांनी लष्कराने मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीरच्या त्राल आणि अनंतनागच्या बिजबेहरा येथे लश्कर ए तय्यबाच्या २ दहशतवाद्यांच्या घरांवर शोध मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान, दोघांच्याही घरात ठेवलेली स्फोटके फुटली. स्फोटात आसिफ शेख आणि आदिल ठोकर यांची घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

येथे, बांदीपोरा येथे शोध मोहिमेदरम्यान सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. २ सैनिकही जखमी झाले आहेत. २२ एप्रिल रोजी दुपारी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर १० हून अधिक जण जखमी झाले होते.