Home Blog Page 3303

अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना बांधल्या राख्या

0

पुणे- रक्षाबंधनानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलातील कर्मचारी बांधवाना पुणे लष्कर भागातील महिलांनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले .या कार्यक्रमाचे आयोजन राजाभाऊ चव्हाण व विशाल मोरे यांनी केले होते .

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून रुपाली चाकणकर , अर्चना हनमघर , मीना पवार , रंजना सोनवणे ,छाया जाधव अंजली परेरा , निता गलांडे , राजश्री कसबेकर , मीना गायकवाड , दीप्ती खुंटे , कामिनी थोरात , उषा घोगरे , सीमा वाघमारे आदी महिला उपस्थित होत्या . तसेच विशेष उपस्थितीमध्ये भोलासिंग अरोरा , रुपेश डाके , रणजित परदेशी , विकास भांबुरे , मुस्ताक पटेल , मोहन नारायणे ,अझीम गुडाकूवाला , राजू नायडू , विजय भोसले , महेंद्र गायकवाड आदी मान्यवर  उपस्थित होते .

यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले कि , आपला जीव धोक्यात घालून अग्निशमन कर्मचारी आग विझविण्याचे महत्वपूर्ण काम करत असतो . वेळ प्रसंगी जीव गमवावा लागला तरी ते अनेकांचे प्राण वाचवितात . अशा कर्मचारी बांधवाना राखी बांधून आम्ही बहिणींनी संकटाना सामना करण्यासाठी शक्ती दिली असून त्यामुळे आमचे कर्तव्य म्हणून आम्ही महिला आज रक्षाबंधन साजरा करीत आहोत .

हा  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विक्रम जाधव , यश कांबळे , विनायक राठोड , कुणाल पुंजानी , योगेश होळकर ,आदित्य यादव , शिवशरण कांबळे , आकाश चव्हाण , प्रणव ठक्कर आदींनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी  पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश हसबे , विकास खराडे , शम्मी कसोटे , असिफ शेख , कुंडलिक गायकवाड , दिनेश शिंदे , मयूर सावंत , महेश जगताप , अशफाक शेख आदी अग्निशमन कर्मचारी उपस्थित होते .

राज्यात दोन वर्षांत दुष्काळमुक्ती- मुख्यमंत्री;पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेचे बॉलीवूड च्या गराड्यात आणि थाटात पारितोषिक वितरण

0

 

 

पुणे –

‘जल, जमीन आणि जंगल याची व्यवस्थित राखण केली, तर राज्यात पुन्हा शेतकरी कर्जमाफीची गरज भासणार नाही. जलयुक्त शिवारसह राज्यात आता साडेचार कोटी वृक्षलागवड केली जात आहे. दुसरीकडे राज्यातील ५४ हजार तलावातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. या सर्व उपायांमुळे येत्या दोन वर्षांत राज्यात दुष्काळमुक्ती झालेली असेल,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

सत्यमेव जयते व पाणी फाउंडेशनच्या वतीने राज्याच्या ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये घेण्यात आलेल्या ‘वॉटर कप’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात फडणवीस बोलत होते.

राज्‍याचे जलसंधारण मंत्री  प्रा. राम शिंदे, सामाजिक न्‍याय राज्‍यमंत्री दिलीप कांबळे,  पुण्‍याच्‍या महापौर मुक्‍ता टिळक, जलतज्ञ राजेन्द्र सिंह, प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, चित्रपट अभिनेते शाहरुख खान, उद्योगपती नीता अंबानी, राजीव बजाज, अजय पिरामल, जिया लालकाका,  प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ,  पोपटराव पवार  आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्‍यमंत्री श्री. फडणवीस म्‍हणाले, एका व्‍यक्‍तीने मनात आणले तर काय काम होऊ शकते, तसेच सर्वसामान्‍य जनतेने निर्धार केल्‍यास काय होऊ शकते याचे जिवंत उदाहरण म्‍हणजे सर्वांनी केलेले जलसंधारणाचे कार्य होय. अशाच प्रकारे काम झाल्‍यास येत्‍या दोन वर्षात राज्‍य टंचाईमुक्‍त होईल, असा विश्‍वास त्यांनी व्‍यक्‍त केला. जल, जमीन आणि जंगल यांचे संवर्धन केल्‍यास महाराष्‍ट्र जलयुक्‍त होईल, असे सांगून ते म्‍हणाले, यंदाच्‍या वॉटरकप स्‍पर्धेत तीस तालुक्‍यांतील 1300 गावांनी सहभाग घेतला. पुढील वर्षी 100 तालुक्‍यांमध्‍ये ही स्‍पर्धा घ्‍यावी, अशी सूचना त्‍यांनी केली.  राज्‍य जलयुक्‍त झाले तर पुन्‍हा कर्जमाफी करण्‍याची आवश्‍यकता पडणार नाही, असे सांगून त्‍यांनी सर्वांना जलसंवर्धनासाठी एकजुटीने कार्य करण्‍याचे आवाहन केले. पाणी फाउंडेशनच्या पाठीशी शासन पूर्ण ताकदीने उभे असून शासनाच्‍यावतीने साडे सहा कोटींचे पुरस्‍कार जाहीर केले असल्याचे त्‍यांनी  सांगितले.

जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी, महाराष्‍ट्र निर्मितीनंतर जलयुक्‍त शिवार अभियान हे लोकचळवळीच्‍या माध्‍यमातून यशस्‍वी झालेले अभियान असल्‍याचे सांगितले. पाणी चळवळीत अनेक दिग्गज सहभागी झाल्‍याचा उल्‍लेख करुन त्‍यांनी भविष्‍यात समृध्‍द महाराष्‍ट्र घडेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला. मा. प्रधानमंत्री यांनी या अभियानाची दखल घेतल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

अभिनेते शाहरुख खान यांनी  उन्‍हा-तान्‍हात काबाडकष्‍ट करणारा शेतकरी हा खरा  हिरो असल्‍याचे सांगून जलसंधारणासाठी मदत करणा-या सर्वांचे कौतुक केले. रिलायन्‍स फाऊंडेशनच्‍या नीता अंबानी यांनी पृथ्‍वी ही माता असून आपण सर्वांनी पाणी संवर्धन करुन मातेचा गौरव केला असल्‍याचे सांगितले. थेंबे थेंबे तळे साचे या म्‍हणीनुसार महाराष्‍ट्राचे परिवर्तन करुन राज्‍य समृध्‍द करु, असे त्या म्‍हणाल्‍या.

शांतीलाल मुथा यांच्या संस्थेने जेसिबी व पोकलेन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. श्री. मुथा यांनी आपल्या मनोगतात मुख्यमंत्री व आमीर खान यांचे कौतुक केले. यावेळी जलतज्ञ राजेन्द्र सिंह यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री व पाणी फाऊंडेशनच्या कार्याबद्ल गौरवोद्गार काढले. अभिनेते आमीर खान प्रकृती अस्वास्थ्यामुळे ‍उपस्थित राहू शकले नाही. त्‍यांचा संदेश अतुल कुलकर्णी यांनी वाचून दाखवला.

याप्रसंगी डॉ. अविनाश पोळ, अजय पिरामल, आर. वेंकट, पोपटराव पवार, राजीव बजाज यांनी  जलसंवर्धनाचे महत्‍त्‍व विशद करणारे मनोगत व्‍यक्‍त केले.

प्रारंभी सत्यजित भटकळ यांनी प्रास्तविक केले. ते म्‍हणाले,  महाराष्ट्राला टंचाईमुक्‍त करण्‍यासाठी 2016 मध्ये आमीर खान आणि किरण राव यांनी पाणी फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. पाणी फाउंडेशन ही ना-नफा या तत्वावर काम करणारी संस्था आहे. पाणी फाउंडेशनमध्ये ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाच्या कोअर टीमचा समावेश आहे. केवळ लोकचळवळीतून दुष्काळावर मात करता येते, या विचारातून पाणी फाउंडेशनचे वेगळेपण अधोरेखित होते. जर लोकांना जागृत, प्रोत्साहीत आणि प्रशिक्षित केले तर बिकट झालेला पाणीप्रश्न सोडवण्याची क्षमता आणि ताकद त्यांच्यात येईल, असे त्‍यांनी सांगितले.  हेच ध्यानात ठेवून पाणी फाउंडेशनने लोकांना जलसंधारणाचे विज्ञान शिकवण्यासाठी आणि नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी खास ट्रेनिंग प्रोग्रॅमची आखणी केली आहे. गावातल्या लोकांना एकत्र आणून ट्रेनिंगमध्ये मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर गावकऱ्यांनी करावा यासाठी पाणी फाउंडेशनतर्फे दरवर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे आयोजन केले जाते.

या स्‍पर्धेत 50 लाख रुपयांचे पहिले पारितोषिक काकडदारा (ता. आर्वी) या गावाला प्राप्‍त झाले. दुसरे पारितोषिक भोसरे खटाव आणि जायभायवाडी यांना विभागून देण्‍यात आले. तिसरे पारितोषिक पळसखेडा आणि बिदाल यांना विभागून देण्‍यात आले.  ज्‍या गावांना विभागून पारितोषिके मिळाली, त्या गावांना राज्य शासनातर्फे तेवढीच रक्‍कम जाहीर करण्‍यात आली आहे.

वॉटर कप 2017  मध्ये सहभागी झालेल्या 13  जिल्हयातील 30  तालुक्यांची नावे पुढीलप्रमाणे:

बीड जिल्हयातील अंबाजोगाई, केज आणि धारुर, लातूर जिल्हयातील औसा आणि निलंगा, उस्मानाबाद जिल्हयातील भूम, परांडा आणि कळंब,  औरंगाबाद जिल्हयातील फुलंब्री आणि खुलताबाद

सातारा जिल्हयातील कोरेगाव, माण आणि खटाव, पुणे जिल्हयातील पुरंदर आणि इंदापूर

सांगली जिल्हयातील खानापूर, आटपाडी आणि जत, सोलापूर जिल्हयातील सांगोला आणि उत्तर सोलापूर

अकोला जिल्हयातील बार्शी-टाकळी, पातूर आणि आकोट, वाशिम जिल्हयातील कारंजा

यवतमाळ जिल्हयातील राळेगाव, कळंब आणि उमरखेड, वर्धा जिल्हयातील आर्वी

अमरावती जिल्हयातील वरुड आणि धारणी

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र जोशी व सोनाली कुलकर्णी यांनी केले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून लोक आले होते.  सुरूवातीला फुलवा खामकर यांच्या नृत्य पथकाने पाणी फाऊंडेशनच्या ‘तुफान आलंया’ या शीर्षक  गीतावर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली.

या कार्यक्रमास उद्योगपती, दानशूर व्यक्ती, चित्रपट जगतातील मान्यवर, जलतज्ज्ञ, वैज्ञानिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती.  यावेळी पाणी फाऊंडेशनच्या यशस्वीतेत ज्यांनी योगदान दिले त्या पाणलोट सेवक, सोशल ट्रेनर, टेक्नीकल ट्रेनर यांचे आगळ्या-वेगळ्या पध्दतीने स्वागत  करण्‍यात आले. तसेच यावेळी स्पर्श संस्था, वॉटर संस्‍था यांच्‍या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. राज्य शासनाच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचाही  सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी, जिल्‍हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांच्‍यासह इतर मान्‍यवर उपस्थित होते.

नव्या पिढीच्या नाविण्यपूर्ण कल्पनांचा उपयोग सुशासन अधिक कार्यक्षमतेने राबविण्यासाठी केला जाईल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई, दि. 5 : ‘सीएम फेलोशिप प्रोग्राम’अंतर्गत नव्या पिढीच्या नाविण्यपूर्ण कल्पना, सूचनांचा उपयोग शासनात अधिक कार्यक्षमतेने सुशासनाची अंमलबजावणी करण्यासाठी निश्चितच केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले. ‘सीएम फेलोशिप प्रोग्राम’अंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांशी (फेलोज) वर्षा निवासस्थानी संवाद साधताना ते बोलत होते.

‘सीएम फेलोशिप प्रोग्राम’ अतंगर्तच्या दुसऱ्या वर्गाचा प्रशिक्षण कालावधी संपत आल्याने या  प्रशिक्षणार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सचिव प्रवीण दराडे, अर्थ व सांख्यिकी संचालनालय विभागाचे संचालक आर. आर. शिंगे उपस्थित होते.

यावेळी प्रशिक्षणार्थ्यांनी डिजीधन योजनेबाबत जनजागृती, स्टार्ट-अप धोरण, शासनामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर आदी विविध विषयांवर सादरीकरण केले.  आरोग्य, शिक्षण, पाणी, रेनवॉटर हार्वेस्टींग, सौरऊर्जेचा कार्यक्षम वापर, पर्यावरण रक्षण, हवामान बदल, न्याय आदी क्षेत्रामध्ये शासनाने खासगी संस्थांशी भागीदारी करावी, असेही मत प्रशिक्षणार्थ्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, नवीन कल्पना स्वीकारणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे यासाठी काही प्रमाणात अडचणी येतात. मात्र, एकदा का त्यांची उपयुक्तता पटवून देता आली की पुढील काम सोपे होते. डिजीटल यंत्रणांचा वापर तसेच आर्थिक व्यवहारांमध्ये डिजीटल पद्धतीचा वापर कमी होऊ नये यासाठी सातत्याने शासन प्रयत्नशील राहील. राज्याचा माहिती तंत्रज्ञान विभाग अधिकाधिक सक्षम करण्यास प्राधान्य दिले जात असून ई- प्रशासनाचा गतीमान वापर करण्याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. जनतेनेही माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे, असेही ते म्हणाले.

डिजीआयपीआर उपयोग करत असलेल्या ‘फ्लॉक’ संवाद माध्यमाचे कौतुक

नितुल शाह या प्रशिक्षणार्थ्याने शासनामधील प्रत्येक विभागात अंतर्गत संवाद माध्यमाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त केली. यावेळी त्याने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून (डीजीआयपीआर) ‘फ्लॉक’ या गटांतर्गत माध्यमाचा उपयोग कार्यक्षमतेने केला जातो याची माहिती देऊन महासंचालनालयाचे कौतुक केले.

 

 

कीर्ती खंडेलवाल हिने डिजीधन जनजागृतीबाबत शेवटच्या स्तरापर्यंत झालेले काम आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कॅशलेस पद्धतीस प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल याबाबत सादरीकरण केले. तन्मय पै आणि उमेश बलवाणी यांनी महाराष्ट्रात स्टार्टअप पॉलीसीअंतर्गत अधिक स्टार्टअप सुरु व्हावेत यासाठी ‘इनक्युबेटर्स’ची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त केली. नितुल शाह याने शासनांतर्गत संवादमाध्यम, पुढील घटनांचा अंदाज घेत स्वयंप्रेरणेने माहितीचे प्रसारण, शासनाच्या संकेतस्थळांची आकर्षकता आणि गतीमानता वाढविणे आदी बाबींबाबत सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्यमंत्र्यांनी प्रशिक्षणार्थ्यांकडून भविष्यातील त्यांच्या करियरबाबत माहिती घेतली. प्रशासकीय सेवा, समाजकार्य, आर्थिक सेवा, राजकारणामध्ये जाण्यास आवडेल असे विविध प्रशिक्षणार्थ्यांनी सांगितले.

पुणे मनपा ५००० विद्यार्थ्यांना शाडूचे गणपती बनविण्यासाठी प्रशिक्षित करून जागतिक विक्रम करणार -मुरलीधर मोहोळ.

0
पुणे -महानगरपालिका तब्बल ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन विक्रम करणार असून त्याची नोंद गिनीज बुक मध्ये केली जाईल असे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळेतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणोशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित करण्याचा कार्यक्रम कौतुकास्पद असून जास्तीतजास्त नागरिकांनी आपला उत्सव साजरा करताना पर्यावरण रक्षण होईल याकडे लक्ष द्यावे असे ही ते म्हणाले.तसेच यासाठी मनपा सज्ज असून आज या उपक्रमाची सुरुवात झाली असे ही ते म्हणाले.क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले,भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर,नगरसेवक दीपक पोटे,माणिकताई दीक्षित,सुवर्णाताई काकडे,नारायण वायदंडे इ मान्यवर यावेळी उपस्थित होते.मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ही आपली नदी प्रदूषित करते व ती पाण्यात विरघळत नसल्याने पाणी दूषित होते,त्या मूर्तींचा विषारी रंग हा ही पाणी प्रदूषित करतो.थर्मोकोल, प्लॅस्टिकच्या किंवा इतर तत्सम शोभिवंत वस्तूंमुळे आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत असून आता मुलांनीच याबाबत जनजागृती करावी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा असेही त्या म्हणाल्या.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी ” पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाची ही शाळा आदर्श शाळा करण्याकडे लक्ष द्या असे सांगून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा अशी सूचना श्री मोहोळ यांना केली,तसेच गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असेही ते म्हणाले.श्री मुरलीधर मोहोळ व श्री श्रीनाथ भिमाले यांनी असे ही स्पष्ट केले कि ” विसर्जनाच्यावेळी नागरिकांचे पर्यावरण विषयक प्रबोधन करण्यात येणार असून ,निर्माल्य ही वेगळ्या पेटीत टाकण्यासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात येईल “
शाळेतील विद्यार्थ्यांना राज तांबोळी,अनुराधा एडके,कन्याकुमारी घाडगे या प्रशिक्षकांनी शाडूच्या मातीचे गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले.मुले मूर्ती बनविण्यात हरखून गेली होती व अनेकांनी आपली कल्पनाशक्ती वापरून गणरायाच्या मूर्तीला विविध आकार दिले.आपली मूर्ती सुबक करण्यासाठी विद्यार्थी प्रयत्शील होते.
उपस्थितांचे स्वागत मुख्याध्यापिका एलिझाबेथ काकडे यांनी केले,मंजुश्री खर्डेकर यांनी प्रास्ताविक तर राज तांबोळी व अनुराधा एडके यांनी स्वागत केले.सूत्रसंचालन शर्मिला जाधव यांनी केले,

कलेचा धागा तुटू देणार नाही

0

भाऊ-बहिणीचं नातं दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाच्या माध्यमातून भाऊ बहिण यांच्यातील प्रेम व्यक्त केले जाते. ग्लॅमरस दुनियेत वावरणारे कलाकार ही वेळात वेळ काढून या सणाचा आनंद घेत तो साजरा करतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री प्रितम कागणे हिच्यासाठी ही या वेळेचं रक्षाबंधन खूप खास ठरलं आहे. भाऊ अमोल कागणे यांनी आपल्या बहिणीसाठी खास हलाल या चित्रपटाची निर्मिती केली असून येत्या २९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. आपल्या भावाकडून मिळालेली ही भेट माझ्यासाठी खास असून आम्ही जपलेला हा कलेचा धागा तुटू देणार नाही असं वचन घेत यंदाच्या रक्षाबंधनाचा आनंद हे दोघे घेणार आहेत. खरं तर कुटुंबीय व भावांमुळेच मी आज इथंवर पोहचली असल्याने हा सण माझ्यासाठी खूपच स्पेशल असल्याचं प्रितम सांगते.

रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे -अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

0

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन अत्यंत महत्वाचे आहे. संदिप आणि संदेश ह्या दोन भावांच्या पाठची सोनाली लहानपणापासून दरवर्षी आपल्या भावांसोबत रक्षाबंधन साजर करण्याचा नियम पाळतेच.

सोनाली आपल्या भावांविषयी सांगते, “माझे भाऊ माझे मेन्टॉर आहेत. माझं पहिलं पुस्तक ‘सो कुल’ मी त्यांना डेडीकेट केलं होतं. आणि आता दूसरं पुस्तक जेव्हा येईल तेव्हा ते ही मी त्यांना डेडीकेट करणार आहे. ते दोघंही लहानपणापासूनच माझं अवघं विश्व आहेत.”

रक्षाबंधन साजरं करण्याबाबत ती म्हणते, “संदिप परदेशांत राहतो. त्यामूळे त्याची दर रक्षाबंधनाला भेट घडणं शक्य होत नाही. पण मी तिला इ-मेल पाठवायचे. त्यावेळी लिहायचे, की, तू तुझी मुलगी माहीला जेव्हा कडेवर घेशील तेव्हा माझी राखी तुला पोहोचली असे समजेन.”

संदेशसोबत रक्षाबंधन साजरं करण्याच्या आठवणी खूपच मजेशीर असल्याचं ती सांगते, “संदेश आणि मी रक्षाबंधनाला भेटतोच. यंदाही मी पूण्याला एका समाजसेवी उपक्रमात व्यस्त आहे. पण तो उपक्रम आटपून त्याच्यासोबत रक्षाबंधन साजरं करायला मुंबईत परतणार आहे. मी चित्रपटसृष्टीत व्यस्त असल्यापासून रक्षाबंधन फारच धावत-पळत होतं. कधी माझ्या चित्रपटाच्या सेटवर, तर कधी एअरपोर्टवर, एकवर्षी तर आम्ही दोघं खूप व्यस्त असल्याने कारमध्येच रक्षाबंधन साजर केलं होतं.

सोनालीचे दोघंही भाऊ खूप सुंदर गिफ्ट्स देतात, असं ती सांगते, “मला पुस्तक वाचायला खूप आवडतात. म्हणून संदेश दरवर्षी मला पुस्तकं देतं. त्याने दिलेली पुस्तक अनेकदा मला जगण्याचा नवा दृष्टीकोण देऊन जातात. मी लेखिकाही असल्याने, संदिप मला खूप सुंदर फाऊंटन पेन, नोटपॅड, फाइल्स अशी काही ना काही लेखनाशी निगडीत गिफ्ट्स देतो.”

सर्व शाळा-महाविद्यालयात पोलीस काकांची नियुक्ती

0

पुणे-शहरातील शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोलीस दलातर्फे पोलीस काका हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक शाळेसाठी एक वरिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्या-त्या शाळात आणि महाविद्यालयात त्या पोलीस काकांचा मोबाईल क्रमांक आणि फोटो प्रथमदर्शनी भागात लावण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी एसपी महाविद्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन होईल.

बऱ्याचदा शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना छेडछाड, दादागिरी, रॅगिंग या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा प्रकारच्या वाढत्या समस्यांना आळा घालण्यासाठी या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे, अशी माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 1180 शाळा व महाविद्यालय असून यामध्ये 10 लाख विद्यार्थी शिक्षण घेतात.

 

अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून ससून सर्वोपचार रुग्णालयात बालरोग रुग्णालयात अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर मशीन भेट

0

ससून सर्वोपचार रुग्णालयात बालरोग रुग्णालयात अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वसन यंत्रणा व्हेंटिलेटर मशीन आमदार अनंतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीतून भेट देण्यात आले . सुमारे बारा लाख रुपयांचे हे व्हेंटिलेटर मशीन आहे .

ससून सर्वोपचार रुग्णालया हे संदर्भीय रुग्णालय असल्यामुळे  व्हेंटिलेटर मशीनची नितांत आवश्यकता होती सध्या स्वाइन फ्ल्यू , न्यूमोनिया , डेंग्यू रुग्णाची संख्या वाढल्यामुळे या यंत्राची आवश्यकता होती .त्यामुळे  आमदार अंनतराव गाडगीळ यांच्या आमदार निधीमधून हे व्हेंटिलेटर मशीन बसविण्यात आले .

यावेळी ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले , वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे , बालरोग विभागप्रमुख डॉ. आरती किणीकर , डॉ. शिल्पा नाईक , डॉ. राजेश कुलकर्णी , डॉ. छाया वळवी , डॉ. उदय राजपूतडॉ. रिमा नागपाल , डॉ. हरीश टाटिया , डॉ . इब्राहिम अन्सारी , डॉ. उषा निकुंभ , डॉ. नितेश अग्रवाल, डॉ. सोमनाथ सलगर  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , शिक्षण व  आरोग्य यावर आपण  आपल्या आमदार निधीमधून जास्तीत जास्त खर्च करण्यावर भर असतो . त्यासाठी आपण ग्रामीण भागातील तसेच शहरी भागामधील शैक्षणिक संस्थांना संगणक भेट दिले आहेत . ससून रुग्णालयामध्ये यापुढील काळात देखील आपण आपल्या आमदार निधीमधून मदत करणार आहे .ससून रुग्णालयासाठी सुसज्ज्य अशी रुग्णवाहिका देण्याचा आपला प्रयन्त राहील असे आश्वासन त्यांनी दिले .

यावेळी  ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णायाबाबत माहिती दिली .

स्वराज्य आहे पण सुराज्य बनवणारी पिढी घडायला हवी – महापौर मुक्ता टिळक यांचे प्रतिपादन ; एमआयटीचा ३५ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

0
पुणे: “ आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, हे ओळखून एमआयटीने तंत्रज्ञानावर भर देत ३५ वर्षांचा टप्पा गाठला. सोबतच विज्ञानाविषयी आस्था, देशाविषयीचे प्रेम आणि अध्यात्माची साथ घेऊन हा प्रवास सुरू आहे. आजच्या स्वराज्याला सुराज्य बनवणारी पिढी नक्कीच या संस्थेतून घडेल,” असे प्रतिपादन महापौर मुक्ता टिळक यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहातर्फे एमआयटीचा ३५ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
याप्रसंगी एमआयटीचे संस्थापक विश्‍वस्त प्रकाश जोशी, माईर्स एमआयटीचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, कोषाध्यक्ष डॉ. सुनिल कराड, कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड – चाटे, एमआयटीचे कुलसचिव नाना कुलकर्णी, अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे, प्राचार्य डॉ.एल.के.क्षीरसागर व ( ग्रुप कॅप्टन ) डी. पी. आपटे  आदी उपस्थित होते.
एमआयटीच्या ३५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्‍या दहा कर्मचार्‍यांचा महापौरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये प्रा. प्रकाश माईणकर, श्री. पांडुरंग कदम, प्रा. महेश चोपडे, प्रा. अमर मोरे, श्री. दयानंद घंटे, डॉ. रोहिणी गायकवाड, श्री. गिरीश दाते, श्री. नागनाथ सानप, श्री. बी. संगप्पा यांचा ‘ एमआयटी फाउंडेशन डे ’ पुरस्काराने सन्मान केला गेला.
मुक्ता टिळक म्हणाल्या, “ तंत्रज्ञानाचा वापर करून आज आपण प्रगतीपथावर आहोत. मात्र याच तंत्रज्ञानामुळे आज भारतासह ऊनेक देशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. आज त्या सामाजिक प्रश्‍नांचा विचार करून एमआयटीने अध्यात्माची सोबत धरली आहे. टिळकांच्या स्वप्नातील सुराज्य बनवणारी पिढी या संस्थेत पाहावयास मिळते आहे. सोबतच भगवान बुद्धांनी दिलेली शाश्‍वत विकासाची शिकवणही येथेच दिसते. आपल्याला घडविण्यात आपल्या पालकांचा जितका वाटा असतो, तितकाच किंबहुना त्याहून कैकपटीने जास्त शिक्षकांचा व पर्यायाने संस्थेचा असतो.  ”
प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ ज्यावेळी ही संस्था निर्माण झाली, त्यावेळी या संस्थेतून नोबेल लॉरेटस निर्माण व्हावेत ही भावना होती. ती आजही आहे. मात्र त्यावेळी उद्घाटनासाठी आलेल्या पंतप्रधान चंद्रशेखर यांनी सांगितले होते, की या संस्थेतून नोबेल लॉरेट्स सोबतच संत ज्ञानेश्‍वर निर्माण व्हायला हवेत. भारताला नेहमीच आदर्शांची उज्ज्वल परंपरा आहे. त्या परंपरांचा येथे आदर आणि अनुकरणही होते. स्वामी विवेकानंदांनी जे शब्द भारतभूमीबद्दल काढले होते, ते शब्द सत्यात उतरवण्यासाठी सर्वांचेच योगदान गरजेचे आहे. ”
डॉ. मंगेश कराड म्हणाले, “ आज समाजावर चांगला परिणाम करणारे विद्यापीठ असणे आवश्यक आहे. ते काळाप्रमाणे बदलणारे आणि सोबतच आपल्या परंपराचा वारसा जपणारे असावे. एमआयटी ही खर्‍या अर्थाने वैश्‍विक शांतीचा वसा जपणारी संस्था आहे. ”
डॉ. सुनिल कराड म्हणाले, “ कोणतीही संस्था तेथील प्रशासकीय यंत्रणेमूळे मोठी होत नाही. तर तेथील शिक्षकच त्या संस्थेला घडवितात. एमआयटीचा पाया रोवणारी सगळीच मंडळी शिक्षक होती. त्यामूळे एमआयटीरूपी रोपाचा आज एवढा विस्तार झाला आहे. ”
डॉ. रोहिणी गायकवाड, प्रा. शोभना आनंद, प्रा. बी. संगप्पा, प्रा. महेश चोपडे, प्रा. सानप, गिरीश दाते यांनी सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले.
प्रा. अतुल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षिरसागर यांनी आभार मानले.

आधार सक्तीमुळे जनसंताप

0

पुणे- दिवसेंदिवस प्रत्येक कागदपत्रांच्या वाढत चाललेल्या सक्ती , नव्याने उभा राहिलेला ‘आधार ‘चा राक्षस .. यामुळे जनतेत प्रचंड संताप आहे .पण सत्ता ज्याच्या हाती त्याला हा संताप नाही दिसत … त्याला आपण काही तरी फार चांगले काम करतो आहे, जनतेला शिस्त लावतो आहे अशा बढाया मारण्याची सवय असते . इथे खायला नाही दाणा,आणि म्हणे आधार कार्ड आणा…लोकांना जीवन जगण्यासाठी रोटी कपडा मकान साठी आयुष्यभर लढाई करावी लागते आहे . आता सरकार त्यात अशा नव्या आधारसाठीच्या सक्तीची भर टाकून लोकांना सतावत असल्याची भावना व्यक्त होते आहे .मृत्यू प्रमाणपत्रासाठी ला आधार च्या सक्तीच्या बातमीने आता अंत्यसंस्कारासाठी पास मिळेल काय ?अशासारख्या अन्य  प्रश्नांचा ही मारा होतो आहे

क्रांतीचा धगधगता अंगार… तरूणांची प्रेरणा म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील… – संतोष शिंदे

0
पुणे- क्रांतीसिंह नाना पाटील जयंती सिंचन भवन, येथे नुकतीच  साजरी करण्यात आली. यावेळी संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे, उपविभागीय अभियंता इंजी. विजय काळे, अर्जुन देशमुख, श्री. जानराव साहेब, इंजी. अनिल कोळी उपस्थित होते.
संतोष शिंदे यावेळी म्हणाले,क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिवनपट प्राथमिक शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकरूपात आभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे.  कारण क्रांतीसिंह नाना पाटील यांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून जसे ब्रिटीशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभे केले होते तसेच समाजात एक चांगली शासनव्यवस्था निर्माण केली होती. भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयाची स्थापना करण्याचे महत्वाचे कार्य नानांनी केले होते. व्यसनमुक्तीसाठीही नानांनी प्रतीसरकारच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या खांद्याला खांदा लावून नाना उभे होते. गावोगावी ग्रंथालये उभी करून समाजपरिवर्तनात मोलाची कामगिरी बजावली. नानांवर महात्मा फुल्यांचा व सत्यशोधक समाजाच्या विचारांचा विशेष प्रभाव होता. भटशाही व सावकारशाही गरीब शेतकऱ्यांना नडत आहेत म्हणून नानांनी या प्रवृत्तीं विरुद्ध आवाज उठवला. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामीही नानांचे योगदान खूप आहे.
     सातारा-सांगली भागात सुमारे १५०० गावात नानांचे प्रतिसरकार कार्यरत होते. सामान्य बहुजन समाज व शेतकऱ्यांवर होणाऱ्या प्रत्येक अन्यायाला प्रतिसरकारच्या माध्यमातून वाचा फोडली जाई. त्यामुळे सामान्य जनतेला प्रतिसरकार आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्याबद्दल फार आत्मीयता होती. म्हणून क्रांतीसिंह नाना पाटीलांचे कार्य सर्व समाजाला कळण्यासाठी व तरूणांना अजून प्रेरणामिळण्यासाठी क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जिवनपट प्राथमिक शिक्षण विभागाने पाठ्यपुस्तकरूपात आभ्यासक्रमात शिकवला गेला पाहिजे. त्यासाठी संभाजीब्रिगेड पाठपुरावा करेल. असे मत संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

वेदिक विज्ञानामुळे संपूर्ण मानवजातीचे कल्याण ः डॉ भटकर – एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सचे उद्घाटन

0
पुणे :“वेदिक सायन्सचा अभ्यासक्रमामुळे मानवाच्या जीवनात आमुलाग्र परिवर्तन येईल. त्यामुळे विद्यार्थांनी कार्पोरेटक्षेत्रात चांगली नोकरी मिळविण्यासाठी आणि केवळ अध्ययनासाठी याचा वापर न करता संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी करावा,” असा सल्ला नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांनी विद्यार्थांना दिला. राजबाग, लोणी-काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी आर्ट, डिझाईन अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड हे होते.सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन व स्तंभलेखक डॉ.दीपक रानडे हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
 यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, महर्षी वेदव्यास एमआयटी स्कूल ऑफ वेदिक सायन्सच्या कार्यकारी संचालिका प्रा.स्वाती कराड-चाटे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. सुनिल राय, वेदिक सायन्सचे अधिष्ठाता डॉ. साई सुसरल, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण, माजी कुलगुरू डॉ.सुभाष आवळे व डॉ. अरविंद कुलकर्णी हे उपस्थित होते.
डॉ. विजय भटकर म्हणाले,“वेदिक सायन्समध्ये संपूर्ण विश्‍वाचे ज्ञान दडलेले आहे. यामध्ये मानवाच्या जीवनशैलीबरोबरच संपूर्ण सामाजिक व्यवहाराचे विस्तृत ज्ञान समाविष्ठ आहे. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मानवाची नवनिर्मिती होत आहे, त्यामध्ये वेदिक सायन्सची महत्वपूर्ण भूमिका असेल. बुद्ध आणि आइनस्टाइन म्हणजेच अध्यात्म आणि सायन्स हे परिवर्तनाचे स्त्रोत असेल. ज्ञानाची पद्धत सृजनात्मक असावी. आजही आपली ज्ञानेश्‍वरी, गाथा व उपनिषेद याला जगामध्ये तोड नाही. ते कधीही जुने होणार नाहीत,”
डॉ. दीपक रानडे म्हणाले,“ ज्ञान प्राप्त करण्यासाठी वयाची अट नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सदैव ज्ञान घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक मानवाच्या शरिरात काही सेल असतात त्यांना नियंत्रित करण्यासाठी आम्हाला अध्यात्माची व मन शांतीची गरज भासते. अशा वेळेस वेदिक सायन्स सारखा नवा पाठ्यक्रम महत्वपूर्ण आहे.,”
प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ विज्ञान, अध्यात्म आणि तंत्रज्ञानाची जोड देऊन या विद्यापीठामार्फत विद्यार्थी घडविण्याचे काम केले जात आहे. वेदिक सायन्सच्या गोल्डन बॅचच्या विद्यार्थ्यार्ंंचे  भविष्य उज्ज्वल आहे. या पाठ्यक्रमात भारतीय संस्कृती व ज्ञान दर्शन घडणार आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, विकार व विकृती या सारखे दुर्गुण दूर करण्याचे अध्यात्म शास्त्र आहे. स्वामी विवेकांनदांनी 1897 मध्ये सांगितल्यानुसार भारत संपूर्ण विश्‍वात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल आणि ते आता साकार होतांना दिसत आहे,”
प्रा. डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले ,“ सामाजिक आणि भारताची आवश्यकता पाहून या वर्षापासून पाठ्यक्रम सुरू केला आहे. जागतिक दर्जाच्या या कोर्समध्ये विद्यार्थाना उद्योगजगत आणि विभिन्न संस्थांमध्ये भरपूर प्रमाणात वाव आहे.,”
डॉ. सुनिल राय म्हणाले,“ श्रद्धा, श्रम आणि समन्वय या तीन गोष्टीच्या आधारावर विद्यार्थी आपले जीवन घडवू शकतो. वेदीक सायन्स हा अभ्यासक्रम अध्यात्माशी जुळलेला असल्यामुळे येणार्‍या काळात प्रत्येक मनुष्याच्या जीवनात याची आवश्यकता भासेल. देवाने सर्वांना बुद्धि दिलेली आहे त्याचा वापर कसा करावा हे त्याचे त्याने ठरवावे,”
डॉ. साई सुसरल म्हणाले,“ आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानाबरोबरच सर्वच क्षेत्रात भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. वेदिक सायन्सेस मधून पदवी घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी येणार्‍या काळात संपूर्ण जगाचे नेतृत्व करतील,”
आकांक्षा पांडे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रा.स्वाती कराड-चाटेे यांनी आभार मानले.
विश्‍वशांती प्रार्थनेने कार्मक्रमाची सुरुवात होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.

क्रेडाई महाराष्ट्र कडून रेराच्या नोंदणीनंतरच्या प्रक्रियेसाठी मार्गदर्शन केंद्रांची स्थापना

0

पुणे :- रेरा कायद्यांतर्गत प्रकल्पाची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यापुढील प्रक्रियेसाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या वतीने १५ ऑगस्ट ला क्रेडाईच्या सर्व ४४ शहर संस्थांमध्ये क्रेडाईच्या सदस्यांसाठी मार्गदर्शन केद्रांची सुरुवात करणार असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी दिली.

प्रत्येक जाहिरातीमध्ये रेरा नोंदणी क्रमांकांची नोंद करणे,दर ३ महिन्यांनी प्रकल्पांविषयीची प्रगती अहवाल वेबपेज वर टाकत राहणे, कायदेशीर काळजी कशी घ्यावी,आदी गोष्टींचे मार्गदर्शन या केंद्रावर दिले जाणार आहे.

“कायदा चांगला असून त्याचे स्वागतही आम्ही केले आहे.पण प्रत्येक विकसकाला रेराच्या लहानात लहान पैलूची माहिती असणे आवश्यक आहे यामुळेच भविष्यात होणाऱ्या चुका कमी होण्यासाठीच  क्रेडाई महाराष्ट्र रेरा अभ्यास समिती मार्फत हे मार्गदर्शन केले जाणार आहे. यामुळे निश्चितच क्रेडाईच्या सर्व सदस्यांना या कायद्यांशी अधिक सुसंगतपणा साधता येईल आणि त्यांचे व्यवसाय सहजतेने चालवण्यासाठी मदत होईल. याशिवाय  जास्तीत जास्त प्रकल्प  रेरा अंतर्गत येऊ शकणार असल्याने याचा फायदा पर्यायाने ग्राहकांनाच होईल.” असेही ते म्हणाले.

– क्रेडाई महाराष्ट्रही संघटना ही  राज्यातील ७५टक्क्यांपेक्षा जास्त महत्वाच्या विकासकांच्या  संघटीत बांधकाम क्षेत्रासाठी (मुंबई वगळता) ओळखली जाते. यात ४४ शहर संघटनांमधील २६०० विकासकांचा समावेश आहे.

२०० कोटींच्या कर्जरोख्यांमुळे पुणेकरांवर प्रतिदिन ५ लाखांच्या व्याजाचा ‘भार ‘ उचललेले कर्ज तात्काळ बँकेला परत करा; माजी उपमहापौर आबा बागुल

0
पुणे-
 समान पाणीपुरवठा योजनेतील अनागोंदीचा पर्दाफाश झाल्याने आता पुन्हा नव्याने फेरनिविदा काढण्यात येणार आहे मात्र मोठ्या गाजावाजाने कर्जाचे सेलिब्रेशन करून देशातील पहिली महापालिकेचा ‘किताब ‘ मिळविण्याचा खटाटोप आता प्रशासनाच्या अंगलट आला आहे. पालिका प्रशासनाने कर्ज उचलले मात्र त्याच्या व्याजाचा ‘ भार’ पुणेकरांवर नाहक पडणार आहे. प्रतिदिन पाच लाख रुपये व्याजापोटी द्यावे लागणार असल्याने तात्काळ हे कर्ज बँकेला परत करण्याची मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांसह मुख्यलेखापालांकडे केली आहे. 
यासंदर्भात माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि,  महापालिकेच्या चालू अंदाजपत्रकात  समान पाणीपुरवठा योजनेसाठी ५०० कोटींची तरतूद असताना तसेच चोवीस तास पाणीपुरवठ्याचे कोणतेही काम  सुरु झालेले नसताना कर्जरोख्यातून उभारलेले दोनशे कोटी रुपये बँकेकडून उचलले ;पण व्याजापोटी प्रतिदिन पाच लाख रुपये आपल्याला नाहक अदा करावे लागत आहे.  आता तर समान पाणीपुरवठा योजनेची निविदा रद्द झाली असून पुन्हा नव्याने प्रक्रिया होणार आहे त्यासाठी सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे त्याचा हिशोब केला तर सुमारे साडेचार कोटी रुपये व्याजापोटी द्यावे लागणार आहे. ही , करदात्या पुणेकरांच्या रकमेची उधळपट्टी आहे. कर्ज  बँकेकडे  तात्काळ परत करण्यासंदर्भात प्रशासनाकडे  आधीपासूनच  सतत पाठपुरावा केलेला आहे. काँग्रेससह अन्य पक्षांनी या   कर्जरोख्यांना विरोध केला पण एक महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून पुणे महापालिका गहाण ठेवण्यास परवानगी दिली, त्यामागे पुणेकरांना समान पाणी पुरवठा व्हावा हा उद्देश होता. असे असतानाही आम्ही व्याजाचा नाहक  भुर्दंड करदात्या पुणेकरांवर बसू देणार नाही ही भूमिकाही याअगोदरच  स्पष्ट केलेली आहे .असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले. 

भिकारी सिनेमातील कलाकारांचा आईसोबत रेड कार्पेट वॉक

0

गणेश आचर्य दिग्दर्शित भिकारी सिनेमाचा प्रीमियर सोहळा नुकताच अंधेरीमध्ये पार पडला. गणेश आचर्य, स्वप्निल जोशी, ऋचा ईनामदार, कीर्ती अडारकर या सर्व कलाकारांनी त्यांच्या आईसोबत हजेरी लावली तसेच  सिनेमातील गुरु ठाकूर आणि मिलिंद शिंदे हे कलाकार देखील उपस्थित होते. मराठी सिनेसृष्टीतील जयंत वाडकर, विजय पाटकर, सचिन पिळगावकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे, सायली संजीव, संगीतकर अमितराज, मानसी नाईक, सिद्धार्थ चांदेकर, मयुरी वाघ, पियुष रानडे  या सर्व कलाकारांनी विशेष उपस्थिती लावली होती. या सोहळ्याचे आकर्षण म्हणजे सिनेमातील कलाकारांनी आपल्या आई बरोबर यावेळेस रेड कार्पेटवर वॉकदेखील केला. त्यामुळे भिकारी सिनेमाच्या प्रिमियर सोहळ्याची रंगत आणखीच वाढली.