Home Blog Page 3300

सैन्यात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी प्रशिक्षण

0

 

पुणे, दि. 11 : भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांसाठी एसएसबी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.कंबाइन डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एन्ट्रीद्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या व जे उमेदवार पदवीधर असून सीडीएस परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन भरून पाठवतील व जे उमेदवार रोजगार समाचार 9 ऑगस्ट 2017मध्ये दिलेल्या शैक्षणिक ,शारीरिक ,वयोगट पात्रतेनुसार पात्र आहेत अशाच उमेदवारांची निवड परीक्षापूर्व प्रशिक्षणाच्या तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहेत. प्रशिक्षण कोर्स चा कालावधी दि.29 ऑगस्ट 2017 ते 11 नोव्हेंबर 2017 असा एकूण 75 दिवस आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची व भोजनाची विनामूल्य  सोय करण्यात आली आहे.

तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी दि 29 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,नवीन प्रशासकीय इमारत,पुणे येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस उपस्थित राहावे व प्रशिक्षणाचा  लाभ घ्यावा असे आवाहन, पुणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद तुंगार यांनी दिली आहे.

‘नदी अंतःकरणात वाहू द्या, जलसुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक’ – श्रावण हर्डीकर

0
पुणे : 
‘नागरीकरण, औद्योगिकीकरणामुळे नद्या अस्वच्छ झाल्या आहेत, त्या स्वच्छ, जीवित, सुंदर करण्यासाठी नदी अंतःकरणात वाहू द्या, पिंपरी-चिंचवड परिसरातील नद्यांमध्ये सांडपाणी जाऊ देणार नाही, यासाठीचे प्रकल्प पूर्ण होत आले आहेत, मात्र नदी सुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले.
डॉ.राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून आणि वित्त, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रा’चे स्वागत पिंपरी-चिंचवडमध्ये करण्यात आले. ‘ऑटोक्लास्टर’ सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हर्डीकर बोलत होते.
ते म्हणाले, ‘पाणी शुद्ध करूनच नद्यांमध्ये सोडायचे हा पिंपरी पालिकेचा निर्धार आहे. त्यासाठी मलःनिसारण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यात काही अडचणी आहेत. मात्र, बोपखेलसाठी स्वतंत्र प्रकल्प झाला की पिंपरी पालिका ही सांडपाण्यावर 100 टक्के प्रक्रिया करणारी पहिली पालिका ठरेल. त्यासाठी जैविक तंत्रज्ञान वापरण्याचीही पालिकेची तयारी आहे.’
‘नदी ही अंतःकरणातून वाहिली पाहिजे, नदीशी सर्वांनी जोडून घेतले पाहिजे. नदी सुधारणांसाठी लोकचळवळ आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.
जलबिरादारीचे संघटक सुनील जोशी म्हणाले, ‘नदी ही आई आहे, तिच्याशी असलेल्या बांधिलकीचे प्रतिक म्हणून नदी-खोरे नकाशा सरकारी कार्यालयात लावला पाहिजे.’
यावेळी ‘नमामि चंद्रभागा’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. जलप्रतिज्ञा घेण्यात आली. पथनाट्य सादर करण्यात आले. ‘सेरी’ संस्थेच्या सायली जोशी यांनी उदयपूरमधील नदी कशी जीवीत करण्यात आली याचे विवेचन केले.
सीमा सावळे, एकनाथ पवार, किरण कलमदानी, नामदेव डाके, तुषार हिंगे, प्रमोद कुटे, भैय्या लांडगे, प्रवीण लडकत, पर्यावरण विभागप्रमुख संजय कुलकर्णी, यात्राप्रमुख नरेंद्र चुघ, संघटक सुनील जोशी, धनंजय शेडबाळे उपस्थित होते.
सायंकाळी मोरया गोसावी मंदिर घाट, चिखली घाट येथे नदीपूजन, आरती करण्यात आली. महापौर नितीन काळजे, विलास मेडिगेरी, राजाभाऊ गोलांडे इत्यादी उपस्थित होते. ‘सायकल मित्र’, ‘सावरकर मंडळ’, ‘पवना जलमैत्री अभियान’, ‘भावसार व्हीजन’, ‘सेव्ह इंद्रायणी’ इत्यादी संस्था सहभागी झाल्या.
पालिकेत महापौर कक्षात कार्यकर्त्यांनी महापौरांची भेट घेतली. यावेळी एकनाथ पवार, भैय्या लांडगे उपस्थित होते. पालिका हद्दीतील नद्या स्वच्छ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ‘चिखली नाला शुद्धीकरणाचा कृती आराखडा करू’ असेही ते म्हणाले.

 

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन

0

पुणे-अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्यावतीने `विविध मागण्यासाठी पुणे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर भव्य आंदोलन करण्यात आले . हे आंदोलन अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. पनीकर सुधाकर  दास ,   संघटनेचे पुणे महापालिका युनियन अध्यक्ष सतीश लालबिगे यांच्या नेर्तृत्वाखाली करण्यात आले . या आंदोलनात संभाजी देशमुख , जयंत मोडक , अनिल भिंगारदिवे , बाबा गोणेवार , दीपक देवकुळे , सूर्यकांत यादव , अजित मापारे , अमित भारवासी , शोभा सूर्यवंशी , रत्ना काळे , तेजस्विनी सडेकर , नितीन डसूळ , संजय भोसले व मोठ्या संख्येने कामगार वर्ग सहभागी झाले होते .

यामध्ये पुणे महापालिकेमधील बहूउदेशीय पथकामधील  कर्मचारी तसेच पुणे महापालिकेचे सफाई कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या होणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे उच्च न्यायालय – औद्योगिक न्यायालय तसेच महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेल्या तक्रारीवरून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचे २८ / १० / २०१४ रोजीचे उच्च न्यायालयाचे आदेश असूनदेखील आतापर्यंत आदेशाची अंमलबजावणी न करता माजी सैनिक कर्मचाऱ्यांनी वारंवार बदली करणे , कामाचे स्वरूप बदलणे अशी कामे  करत असत .

त्यासाठी उच्च न्यायालयाचे २८ / १० / २०१४  च्या आदेशाची अंमलबजावणी करून माजी सैनिक कर्मचाऱ्यांना तातडीने कायमस्वरुपी करण्यात यावे . , माजी सैनिक नियम १९८४ कलम ४ नुसार आरक्षित केलेले १५ टक्के आरक्षण जागा भरण्यात याव्यात . , किमान वेतन कायद्यानुसार बहुउद्देशीय पथकातील कर्मचारी बांधवाना कामावर लागल्यापासून वेतनातील फरकाची रक्कम देण्यात यावी . , ज्या कामासाठी माजी सैनिकांच्या नेमणूक केल्या आहेत तेच काम देण्यात यावे . , दर महिन्याचे मासिक वेतन १ ते १० तारखेपर्यंत देण्यात यावे . ,बहुउद्देशीय पथकामधील कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याकडून अपमानास्पद वागणूक केली जाते ती थांबवावी याबद्दल महाराष्ट्र शासनाचे माजी सैनिकांना सन्माननीय वागणूक देण्याबद्दल शासकीय परिपत्रक काढले आहे . , बहुउद्देशीय पथकामधील माजी सैनिक कर्मचारी याना भरती प्रक्रियेवेळी जो गणवेश दिला आहे त्यात बदल करू नये . , कर्मचारी कामावर आल्यापासून काम संपवून परत जाईपर्यंत त्यांचा अपघात किंवा आकस्मित दुर्देवी घटना घडल्यास त्याचा सर्व खर्च पुणे महानगरपालिकेने द्यावा . सफाई कामगार यांच्या वारसा हक्क व अनुकंपाची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावी , सफाई कर्मचाऱ्यांना राहण्याकरिता जागा उपलब्ध करून देणे , डॉ . बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेतून पंचवीस वर्ष सेवा झालेल्या सेवकांची आत शिथिल करून १५ वर्ष करण्यात यावी , शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार रिक्त पदाची भरती त्वरित सुरु करावी , रोजदारीत काम करत असलेल्या व ठेकेदारीत काम करत असलेल्या सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना त्वरित कामावर कायम करावे , पर्वती व लष्कर जलकेंद्र येथील घाणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घाणभत्ता लागू करावा , सफाई कर्मचाऱ्याचे प्रश्न वेळोवेळी सोडविण्यासाठी व समजून घेण्यासाठी संघटनेला भाडे तत्वाच्या करारावर ऑफिस देण्यात यावे , घाणीत काम करणाऱ्या सेवकांच्या हजेरी कोठीवर जाऊन दर तीन महिन्यांनी आरोग्य तपासणी करण्यात यावी , २७ /२/ २०११ रोजीच्या सफाई कर्मचाऱ्यांची भरती जाणूनबुजून रद्द केली आहे ती त्वरित चालू करावी , १३० एम. एल. डी. भैरोबा पम्पिंग स्टेशन कामगारांना न्याय द्यावा . या मागण्या पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार याना निवेदनाद्वारे देण्यात आल्या . आपल्या सर्व मागण्या ४८ तासाच्या आत सोडविण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले

या मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे  ” अर्ध नग्न आमरण उपोषण आंदोलन ” करण्याचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे पुणे महापालिका युनियन अध्यक्ष सतीश लालबिगे यांनी दिला आहे .

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा विकास योजनेतील प्रस्तावित रस्ता कायम करण्याची मागणी

0

पुणे-दीनानाथ मंगेशकर रुग्णालयास डी.पी. रस्त्यावरून प्रवेश मिळावा तसेच विकास योजनेतील प्रस्तावित रस्ता कायम करावा, अशी मागणी प्रभाग क्रमांक 13 च्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा विस्तार प्रचंड वाढला असून या रुग्णालयात रोज हजारो वाहन आणि नागरिक ये जा करीत असतात. या रुग्णालयास एकच प्रवेशद्वार असून तेथील रस्ता अरुंद आहे. शेजारीच सेवासदन शाळा असून तेथे येणारे विद्यार्थी/पालक, तसेच तेथील मोठे गृहप्रकल्प संकुल /हिमाली व अन्य सोसायटीच्या रहिवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमधे रुग्णवाहिका देखील अडकून पडतात तसेच छोटे मोठे अपघातही घडत असतात, असे नगरसेविका मंजुश्री यांनी पत्रात नमुद केले आहे.

तसेच या सगळ्यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणजे रुग्णालयास मागील बाजुने प्रवेश उपलब्ध करून देणे. प्रस्तावित डी. पी. मध्ये ई पी आर (Excluded portion roads) सदर रस्ता हा डी पी रस्त्यावरून (म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावरून मल्टी स्पाईस हॉटेल शेजारून) आखलेला आहे. तरी सदर रस्ता ई पी आर मध्ये कायम करावा व तदनंतर तेथील भूसंपादन त्वरित पूर्ण करून रस्ता प्रत्यक्षात यावा, अशी मागणी मंजुश्री यांनी पत्रातून केली आहे.

वीजबिल वसुलीत हयगय केल्यास वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्धसुद्धा कारवाई

0

णे, दि. 11 ऑगस्ट 2017 : थकबाकी वसुलीमध्ये किंवा थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईत हयगय झाल्यास क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्‍यांसह त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्धही कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला आहे.

वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केलेली आहे. यासंदर्भात निर्देश देताना प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांनी हा इशारा दिला आहे. वीजबिल भरा अन्यथा थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित होणारच हा संदेश थकबाकीदारांना या मोहिमेतून गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत वीजग्राहकांच्या दरमहा वीजबिलांसह थकीत रकमेची वसुली कमी झालेली आहे. ही स्थिती अत्यंत खेदजनक आहे. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी. थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या स्थानिक अधिकारी व कर्मचारी यांच्यासह त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांविरुद्धही कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिला आहे.

तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई तसेच वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. थकबाकीदारांनी वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

दि. 12 व 13 रोजी वीजबील भरणा केंद्ग सुरु – पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्ग वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 12) व रविवारी (ता. 13) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्ग त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

‘नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा सिटी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट

0
पुणे :
नमामि चंद्रभागा जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा सिटीच्या स्वयंपूर्ण, अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देण्यात आली. यात्रेकरूंनी मगरपट्टा सिटीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला, बायोगॅस प्रकल्पाला भेट दिली .
माणिक शर्मा यांनी दीड लाख लोकसंख्या असलेल्या मगरपट्टा सिटीची माहिती दिली. सीमा भोसले यांनी कचरा, सांडपाणी व्यवस्थापनाची माहिती दिली.
जलबिरादरी’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून तसेच वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा ‘ जलसाक्षरता यात्रेदरम्यान मगरपट्टा येथील कार्यक्रमात यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी, अनिल पाटील, अनिल कानडे, पूजा डोडीया, डॉ. सतीश चव्हाण, सुहास पटवर्धन, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरांचे स्वयंपूर्ण कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प नद्या स्वच्छ ठेवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, असे सुनील जोशी यांनी सांगीतले.
नरेंद्र चुघ यांनी भीमाशंकर -ते पंढरपूर -विजापूर मार्गावर ११ दिवस चालणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ यात्रेची माहिती दिली.

भारतातील १० वेगवेगळ्या शहरांमध्ये १० किमीचा रन ~ ~ विजेत्यांकरिता एकूण रु ५० लाखांचे बक्षीस ~

0

पुणे, ऑगस्ट २०१७: भारतातील सर्वात मोठी सर्कीट असलेली एक, १०के इंन टेन रन पुण्यात १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू होईल आणि त्यानंतर इंदोर, भुवनेश्वर, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू, मुंबई, बडोदा, दिल्ली आणि ११ फेब्रुवारीला २०१८ गोवा मध्ये संपन्न होईल. प्रख्यात खेळाडू धनराज पिल्ले (पद्मश्री, ऑलिंपियन, खेलरत्न पुरस्कार), प्रल्हाद सावंत (महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशनचे सरचिटणीस) आणि पुणेरी पलटन संघ (सध्या अस्तित्त्वात असलेल्या सर्वोत्तम संघांपैकी एक संघ) प्रो कबड्डी लीग) – दीपक हुडा (कॅप्टन), धर्मराज चेरलाथान (व्हाइस कॅप्टन), संदीप नरवाल आणि गिरीश मारुती एरकीन हे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

ऍथली इव्हेंट मॅनेजमेंटने अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया, क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय, महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने देशाच्या दहा शहरांमध्ये १० सप्टेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ दरम्यान पहिली आवृत्ती आयोजित केली जाईल.

 

याप्रसंगी बोलताना अँडी इव्हेंट मॅनेजमेंटचे संस्थापक आणि संचालक माजी मेकॅनिजेश आनंद मेनेन्झेस म्हणाले, “10 के उपक्रम चालवून आम्ही जनतेपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू, आणि हरित, स्वच्छ व आरोग्यदायी भारत हा उपक्रम राबवणार आहोत. इंडियन ओलम्पियन असोसिएशन (माजी ऑलिम्पियन संघटना) यांच्या पाठिंब्याने आम्ही माजी आणि सध्याच्या ऑलिंपियन खेळाडूंना एकत्रितरित्या तयार केलेल्या पैशाचा एक भाग दान करणार आहोत. केवळ विद्यमान खेळाडूंना प्रोत्साहनच देत नाही तर भविष्यातील ऑलिम्पियनही तयार करण्यास प्रोत्साहन देणार आहोत. ”

 

उपविजेत्यासाठी तीन वर्ग आहेत – 10 किमी, 5 किमी आणि अनुक्रमे 2 किलोमीटर. हौशी आणि उच्चभ्रू धावपटू 10 किमी चालक नोंदणीसाठी नोंदणी करू शकतील परंतु महत्वाकांक्षी मुलं स्वतः 2 किमी फ्युचर चॅम्पियन्स धाव साठी नोंदणी करु शकतात. धावपटूंमध्ये अधिक उत्साह निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमात 5 किमीचा मॅन रन देखील आयोजित केला जाईल.

 

१० के तत्त्वप्रणाली चालविणा-या सहकार्यावर प्रतिक्रिया देताना पुणेरी पलटनचे सीईओ कैलाश कंडडल म्हणाले, “१०के इंन टेन सिटी या कार्यक्रमात जोडणे आमच्या साठी गर्वाची गोष्ट आहे. फिटनेस खेळामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. कबड्डी आणि धावणे ही तग धरण्याची क्षमता वाढवून उत्तम फिटनेस व्यवस्था विकसित करण्याचा सर्वोत्तम व्यायाम आहे. आम्ही एंडि इव्हेंट मॅनेजमेंटच्या या हरित , स्वच आणि स्वस्थ भारत या विषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी अभिनंदन करू इच्छितो. भविष्यातही, पुनरी पलटन आणि आमच्या संपूर्ण टीम अशा उत्कृष्ट पुढाकारांना पाठिंबा देत राहील ज्यामुळे क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि क्रीडापटू म्हणून क्रीडाजगतासाठी या देशाच्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. ”

दीपक हुडा, कॅप्टन, पुणेरी पलटन म्हणाले, “आरोग्य आणि फिटनेस बद्दल जागरुकता निर्माण करणे हा एक उत्तम उपक्रम आहे. आरोग्याबद्दल जागरुक असणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. आपल्या कबड्डी खेळाडूंसाठी फिटनेस ही तीन महिन्यांच्या हंगामासाठी टिकून राहण्याची गुरुकिल्ली आहे. खेळाडू म्हणून एक नम्र पार्श्वभूमी आहे, मला हे अतिशय आनंद होत आहे की जागरुकता निर्माण करण्यासह, हा कार्यक्रम ऑलिंपियन संघटनेद्वारे ऑलिंपियन आणि त्यांच्या अकादमीसाठी देखील निधी उपलब्ध करून देणार आहेत. ”

 

या उपक्रमामागील महत्त्वाचा संदेश हरित आणि तंदुरुस्त भारतासाठी आहे. आपले माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ व हरित भारत स्वप्नाच्या दिशेने आहे. देशाचे जागरूक नागरिक म्हणून आपण पर्यावरणासाठी काम केले पाहिजे. समाजातील सर्व नागरिकांना बालकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मी करतो. मी स्वत:यात सामील होईन असे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री विनोद तावडे म्हणाले.

 

वित्त नियोजन आणि वन मंत्री सुधीर मुंगटीवार म्हणाले भारतामध्ये जगाच्या तुलनेत सर्वात जास्त युवकांची संख्या आहे. जर आपल्याकडे एक सशक्त राष्ट्र असेल तर मजबूत भारत उदयास येईल. आपल्या माननीय पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आपण स्वच्छ भारत बनण्याच्या मार्गावर आहोत. त्यामुळे आपण ग्रीन इंडियाच्या दिशेने देखील काम केले पाहिजे. स्वच्छ शहर आणि ग्रीन सिटीचे स्वप्न साकार करू या आणि पुढाकारासाठी एकत्र येऊ या! या संधीचा लाभ सर्वाना मिळावा म्हणून आयोजक सर्वोत्तम प्रयत्न करतील अशी इच्छा आहे.

 

अॅथलेटीक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अदिले सुमारीवाल्ला म्हणाले की भारतात पहिल्यांदाच कुणी क्रीडापटू आणि ऑलिम्पिक खेळाडूंसाठी दानधर्म करत आहे. आम्ही इतर सदकारणासाठी दान केले आहे. क्रीडापटूंसाठी दानधर्म करणे खूप चांगली गोष्ट आहे. आम्हाला याचे कौतुक वाटते. तसेच निरोगी जीवन व हरितकरणाला चालना देणे ही काळाची गरज आहे. २ किमीची फ्युचर चॅम्पियन्स रन निश्चितपणे लहान मुलांना प्रेरणा देईल. मी प्रत्येकाला या उपक्रमात सामील होण्यासाठी आवाहन करतो.

 

धावपटूंना शहरातील नयनरम्य देखावे दिसावेत हा 10के इंटेनसीटी रनचा उद्देश आहे. रहिवाशांमध्ये हरित सुदृढ भारताबद्दल जनजागृती या माध्यामतून पसरविण्यात येईल. आजपासून १०के इंटेनसीटी रनच्या प्रवेशाला सुरुवात होत असून प्रत्येक शहरामध्ये रनच्या आठवडाभर आधीपासून अर्ज दाखल करता येतील. शहरांमधील 10के इंटेनसीटी रनच्या विजेत्यांकरिता एकूण रु. 50 लाखांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

जीएसटी मुळे प्रादेशिक असमतोल वाढण्याची भीती? – अभय टिळक

0
पुणे-
‘एक देश एक कर’ ही देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी नीट बसविण्यासाठी अत्यावश्यक बाब असली तरी, प्रचंड प्रमाणात असलेल्या विकासाच्या असमतोल असलेल्या भारतामध्ये ही दरी आणखीनच वाढेल अशी भीती ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या पुणे केंद्राच्या वतीने पत्रकार भवन आयोजित ‘जीएसटी: काही अनुत्तरित प्रश्न’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
जीएसटी लागू झाल्यापासून त्याचे फायदे आणि तोटे याबाबत खूप मोठा बागुलबुवा निर्माण केला असून, महागाई आटोक्यात येईल किंवा भारताचा जीडीपी वाढेल असे भाकीत करणे आत्ता तरी शक्य वाटताना दिसत नाही. तरीही जीएसटी लागू करणे हे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते. भारतासारख्या मोठ्या देशात जी.एस.टी सारख्या प्रमानिकृत कायद्यांची अंमलबजावणी किचकट प्रक्रिया असते. त्यासाठी घाई मध्ये टोकाचा जल्लोष किंवा टोकाचा प्रतिरोध करायची गरज नाही. या कायद्याने काही चमत्कार होईल अशी धारणा ठेवणे चुकीचे आहे. हा इतर कोणत्याही कायद्याप्रमाणे अनेक वर्ष अमलात आल्यावर त्याचे मुल्यांकन करता येईल.”
असे प्रतिपादन त्यांनी केले.
आज पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत ‘जी.एस.टी : काही अनुत्तरीत प्रश्न’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी नामवंत अर्थतज्ञ डॉ. अभय टिळक होते. या चर्चासत्रात सी.ए व कर सल्लागार प्रसाद झावरे पाटील, सी.ए वृषाली लोढा व जीएसटी उपायुक्त राजलक्ष्मी कदम यांनी सहभाग घेतला. जी.एस.टी कायदा लागू झाल्यापासून जनमानसात या कायद्याबाबत टोकाची भीती व टोकाचा पाठींबा अशा तीव्र प्रतिक्रिया उमटत असल्याने, त्याची सारासार चर्चा व्हावी यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला.
सी.ए वृषाली लोढा यांनी जी.एस.टी कायद्याची संकल्पना, त्यातील बारकावे व प्रक्रीयेची ओळख करून दिली. त्यांच्यानंतर  सी.ए प्रसाद झावरे पाटील यांनी तांत्रिक व कायदेशीर बाबींमध्ये कायदा कितीही स्पष्ट व अभेद्य वाटत असला तरी त्याच्या अंमलबजावणीत कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात व त्यामुळे कायद्यात आणखी सुधारणा व स्पष्टता येत राहायला हवी, असे स्पष्ट केले.
सरकारच्या वतीने भूमिका मांडत राजलक्ष्मी कदम यांनी कायद्यातील बारकावे, सरकारची भूमिका, कायदेशीर तरतुदी, कमतरता व त्यांची अपरिहार्यता याबाबत मार्गदर्शन केले. व्यापारी वर्गाने घाबरून न जाता या नव्या कर व्यवस्थेचा अंगीकार करावा, शासन त्यांना पूर्ण सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, यशवंतराव प्रतिष्ठानचे पुणे समन्वयक श्रीराम टेकाळे यांनी केले. यावेळी व्यासपीठावर श्री. दत्ता बाळसराफ व श्री. अंकुश काकडे उपस्थित होते.

पुणे महापालिकेच्या वतीने शतकोत्तरी रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाचा वाजणार बिगुल!

0

इतिहासात प्रथमच महानगरपालिकेकडून अशा प्रकारच्या उत्सवाचे आयोजन

  • या ऐतिहासिक उत्सवातील उपक्रमांची होणार गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ स्व. लोकमान्य टिळकांच्या पुढाकाराने पुण्यात झाली हे तर सर्वश्रुत आहेच. या सार्वजनिक गणेशोत्सवाचे यंदाचे वर्ष हे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष! यानिमित्त पुणे महानगरपालिकेच्या वतीने विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त मा. श्री. कुणाल कुमार, महापौर मा. सौ. मुक्ता टिळक, सभागृह नेते मा. श्री. श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महापौर मा. सौ. मुक्ता टिळक यांनी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचा शुभारंभ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी शनिवार वाडा येथे संध्याकाळी ५.३० वाजता होणार असल्याचे सांगितले. या शुभारंभ समारंभात या उपक्रमाचे बोधचिन्ह, शुभंकर, मोबाईल अॅप्स, वेबसाईट आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाची प्रसिद्धी करण्यासाठी रचण्यात आलेल्या प्रसिद्धी गीताचे उद्घाटन होणार आहे. या शुभारंभ समारंभानंतर नागरिकांसाठी श्री. अशोक हांडे यांच्या ‘मराठी बाणा’ या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवात आयोजित करण्यात आलेले उपक्रम –

  • २० ऑगस्ट, २०१७ – सकाळी ८ वाजता – दुचाकी रॅलीचे आयोजन
  • २३ ऑगस्ट, २०१७ – ३,००० ढोलांचे वादन

स्थळ – एस. पी. कॉलेज ग्राउंड, सदाशिव पेठ

(या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.)

  • २४ ऑगस्ट, २०१७ – ३,००० विद्यार्थ्यांमार्फत शाडूच्या गणेशमूर्ती बनवणे.

स्थळ – कै. बाबुराव सणस मैदान, स्वारगेट

(या उपक्रमाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होणार आहे.)

आरती १८ ऑगस्टला चित्रपटगृहात

0

मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या ‘आरती- अननोन लव्हस्टोरी या सिनेमातूनही मानवी मूल्य जपणारी वास्तवदर्शी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेमकथेसोबत  समर्पणाची अत्यंत हृदयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

 

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर माणसाचं मन प्रेम, आपुलकी, स्नेह अशा अनंत भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत असतं. कधी कधी आयुष्य अशा वळणावर उभं करत की, आपल्यामागे संयमाने दृढपणे उभ्या राहणाऱ्या आधाराची गरज भासते. आपल्याला समजून घेणारी व्यक्ती व नाती आपल्या आयुष्यात असणं फार महत्त्वाचं असतं मग ते नातं कोणतही असो. आजकाल सगळ्याच नात्याची समीकरण बदलत चालल्याने नेमकं विश्वासाच व हक्काचं नातं कोणतं हेच समजेनास झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणाऱ्या आरती व सनी यांच्या प्रेमाची अनोखी कथा ‘आरतीया सिनेमातून आपल्यासमोर येणार आहे.

 

चित्रपटाला साजेशी अशी वेगवेळ्या जॉनरची सहा गीते यात आहेत. सुजित यादव व तेजस बने यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीतांना प्रशांत सातोसे व सुजित – तेजस  यांनी  संगीत दिलं  आहे. यातील ‘पार्वतीच्या नंदना मोरया गजानना’  ‘पावसाळी मनी माझ्या पेटला काहूर का’ या गीताला गायक आदर्श शिंदे यांचा तर ‘मन बावरे’ गीताला हरिहरन व दिपाली साठे यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘नन्ही सी परी’ हे अंगाईगीत व ‘विठ्ठला’ हे भक्तीमय गीत प्रशांत सातोसे यांनी गायलं आहे. सुजित यादव यांनी ‘आम्ही जातो’ हे गीत गायलं आहे.

रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन जोतीरंजन दास यांचं आहे. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत. १८ ऑगस्टला ‘आरतीचित्रपट प्रदर्शित होणार आहे.

वीजमीटर वाटपाची नोंद न घेणाऱ्या तीन अभियंत्यांचे महावितरणकडून निलंबन

0

मुंबई, दि. 10 ऑगस्ट 2017 :

वीज ग्राहकांना वीजमीटर देतांना त्याची नोंद ठेवणे, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांना वीजमीटर देणे अशा विविध अनियमितता करणाऱ्या तीन अभियंत्यांवर महावितरणने निलंबनाची कारवाई केली आहे.  महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या आदेशान्वये मुख्यालयातील अधिकाऱ्यांमार्फत राज्यात मीटर वाटपाच्या नोंदीबाबत तपासणी करण्यात येत असून त्याअंतर्गत दोषी असणाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

          महावितरणच्या मीटर वाटपात अनियमितता करण्यात येत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी मुख्यालयातील अधिकाऱ्यांना मीटर वाटपाच्या नोंदीबाबत काही परिमंडलांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्वरीत तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे कल्याण, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद  जळगाव येथील मीटर वाटपाच्या नोंदीची तपासणी केली. कंपनीतर्फे विकत घेतलेल्या प्रत्येक मीटरची नोंद ही महावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये ठेवण्यात येते. तपासणी करण्यात आलेल्या कल्याण परिमंडलातील खालापूर उपविभाग शाखा कार्यालयात कार्यरत उपकार्यकारी अभियंता सहाय्यक अभियंता यांनी महावितरणच्या ईआरपी प्रणालीत नोंद घेता ग्राहकांना वीजमीटर दिले. ईआरपी प्रणालीत नोंद घेतल्यामुळे ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बीलच मिळू शकले नाही. हे त्यांनी जाणीवपूर्वक करून कंपनीचे आर्थिक नुकसान केले. तसेच कायस्वरुपी वीजपुरवठा खंडित थकबाकीदार ग्राहकांचे मीटर बदलून दिले. त्यामुळे अशा ग्राहकांचा वीजपुरवठा पैसे भरता सुरळीत झाला त्यामुळेही कंपनीचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे संबंधित अभियंते चौकशीत दोषी आढळल्याने या अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

          नाशिक परिमंडलातील चांदवड उपविभागांतर्गत दुगाव शाखा कार्यालयातील कनिष्ठ अभियंता यांनी ग्राहकांना वीजजोडणी दिली. मात्र त्याची नोंद महावितरणच्या ईआरपी प्रणालीत केल्याने ग्राहकाचे वीजबिलींग सुरू झाले नाही. तसेच मीटरच्या नोंदी ईआरपी प्रणालीत केल्यामुळे मीटर वापराविना पडून राहिले यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवले नाही या कारणास्तव मुख्य अभियंत्यांचेही स्पष्टीकरण मुख्यालयाने मागविले आहे.

          महावितरणने ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन केल्या असून ग्राहकांना देण्यात येणाऱ्या प्रत्येक मीटरची नोंद महावितरणच्या ईआरपी प्रणालीमध्ये असणे बंधनकारक आहे. श्री. संजीव कुमार यांनी याबाबत कठोर कारवाईचे आदेश मुख्यालयातील तपासणी अधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार कल्याण नाशिक परिमंडलांत ही कारवाई करण्यात आली. इतर परिमंडलातही दोषींवर अशाच पध्दतीची कारवाई करण्यात येणार आहे.

जोहोरची आंतरराष्ट्रीय रॅली 11 – 13 ऑगस्टला

0
पुणे, 10 ऑगस्ट ः ड्रायव्हर संजय टकले मलेशियातील जोहोर बाहरू येथे होणाऱ्या 2017 एफआयए आशिया-पॅसिफिक रॅली अजिंक्‍यपद (एपीआरसी) स्पर्धेद्वारे नवा संघ आणि नव्या कारमधून मोहीम सुरू करणार आहे.
जपानी संघ कुस्को रेसिंगसाठी 2014 पासून तीन मोसम ड्रायव्हिंग केल्यानंतर, टकले आता स्वीडिश संघ म्पार्ट स्पोर्ट या संघात दाखल झाला आहे. हा संघाचा माजी जागतिक रॅली अजिंक्‍यपद ड्रायव्हर फिनलंडचा यारी केटोमा याच्याशी करार आहे.
“”डब्ल्यूआरसी ड्रायव्हर सहकारी असणे ही बाब खूपच खास आणि समृद्ध करणारी आहे. स्वीडिश संघ मित्सुबिशी कारगाड्या वापरतो आणि गतवर्षी मलेशियात चाचणी घेतल्यानंतर एपीआरसीच्या पूर्ण मोसमासाठी दाखल होत आहे,” असे टकले यांनी आपल्या सहचराविषयी सांगितले.टकले यांनी गतमोसमात कुस्को रेसिंगकडून चालवलेल्या सुबारू इम्प्रेझाकडून आर5 मित्सुबिशी मिरेजकडे जाण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतलेला आहे. मोटरस्पोर्टसची जागतिक संघटना एफआयएकडू मित्सुबिशी मिरेजला समक्षेत्री प्रमाणपत्राची प्रतीक्षा आहे, त्यानंतर त्यास मित्सुबिशी आर 5 या नावाने ओळखले जाईल. “”ही फक्त कागदोपत्री तांत्रिक बाब आहे. कारमध्ये आर 5 स्पेक इंजिन आहे, ज्याद्वारे जागतिक रॅली अजिंक्‍यपद फेऱ्यांत भाग घेताना मोठे लक्ष्य मी बाळगले आहे,” असे टकले म्हणाले.
एकमद नवी कार स्वीडनमध्ये म्पार्टने तयार केलेली आहे, पण आवश्‍यक गियर बॉक्‍स उपलब्ध न झाल्यामुळे कारला स्वीडनमधून निघण्यास आणि नंतर इटलीतून सिंगापूरमध्ये दाखल होण्यास विलंब झाला. “”कार बुधवारी दाखल झाली आणि शुक्रवारच्या चाचणीसाठी रात्र जागून जुळवणीचे काम करावे लागले,” असे टकले म्हणाले. त्यांनी मलेशियन बनावटीच्या पेरादुआची 2016 मध्ये त्यांचे सहचालक असलेल्या नोरिको ताकेशिता यांच्यासह टेहेळणी पूर्ण केली. “”चाचणी न केलेली कार थेट स्पर्धेत उतरविताना मला गरम गॅसवर असल्यासारखे वाटते, असे टकले म्हणाले.
2017मधील आशिया कप चॅलेंजमध्ये टकले मलेशियातून सुरू होणाऱ्या फक्त आशिया फेरीतच भाग घेतील. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियातील पहिल्या दोन फेऱ्या कार तयार नसल्यामुळे टाळल्या. चीनमधील तिसरी फेरी रद्द झाली आणि त्यामुळे टकले यांना मलेशिया, जपान आणि भारतातील बाकी तीन आशियाई फेऱ्यांवर लक्ष केंद्र करता आले.
“”जोहोर बाहरू, होक्काईदो आणि चिक्कमंगळूरच्या कॉफी बागायती परिसर या वेगवेगळ्या प्रकाराच्या भूभागातून मी नव्या कारची तीन ठिकाणी चाचणी घेणार आहे. पुढील वर्षी युरोपातील बाकी काही डब्ल्यूआरसी फेऱ्यांसाठी रवाना होताना मला त्याचा लाभ होईल,” असे टकले यांनी स्पष्ट केले.
“”माझी कार स्वीडिश बंदरात अडकली. त्यानंतर तिला इटलीत पाठविण्यात आले आणि जहाजातून सिंगापूरला रवानगी झाली, परंतु विलंबामुळे कित्येक दिवस वाया गेल्यामुळे कडक दोरखंडावरून चालण्यासारखे आमची गत होती,” असे टकले यांनी हाती उशिरा कार येण्याविषयी स्पष्ट केले. कारशी जुळवून घेण्यासाठी त्यांना खूपच कमी वेळ मिळालेला आहे. त्यामुळे रॅली पूर्ण करणे हे पहिले लक्ष्य टकले यांनी बाळगले आहे. मित्सुबिशी आर 5 स्पेक या कारच्या चाचणीच्या वेळेस टकले हे केटोमा यांच्यासोबत सहचालक होते, या बनावटीची नवी कोरी कार आता त्यांच्या स्वाधीन आहे.
ग्रीडवर तीन ड्रायव्हर असलेल्या म्पार्ट स्पोर्टसाठी केटोमा हा क्रमांक एकचा ड्रायव्हर आहे. नॉर्वेचा ओले व्हिबी व भारताचा गौरव गिल यांच्यानंतर तिसऱ्या स्थानी असलेला स्वीडिश रॉबर्ट ब्लोमबर्ग हा केटोमा आणि टकले यांच्यानंतरचासंघाचा तिसरा ड्रायव्हर आहे. व्हिबी याचे 70, त्यानंतर गिलचे 68 आणि ब्लोमबर्गचे 44 गुण आहेत.
एपीआरसीमध्ये आणखी एका अनोखी बाब म्हणजे तीन भारतीय ड्रायव्हर सुरवातीच्या रेषेवर रांगेत असतील, याशिवाय दोघा सहचालकांसह भारतीयांची संख्या पाच होत आहे. पीजी अभिलाष याने यावर्षी न्यूझीलंडमधील व्हॅंगारी येथे एपीआरसीमध्ये पदार्पण केले आणि तो सध्या 35 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. केटोमा 30 गुणांसह पाचव्या स्थानी आहे.
सहचालकांत मुसा शेरिफहा अभिलाषसाठी सहचालक असेल आणि विवेक पोन्नुस्वामी मलेशियाच्या करमजित सिंगचा सहचालक असेल.
जोहोरमधील आंतरराष्ट्रीय रॅली एपीआरसीची तिसरी फेरी आहे, जी 12 व 13 ऑगस्टला नियोजित आहे, तर शुक्रवारी संध्याकाळी रॅलीस समारंभपूर्वक सुरवात होईल.
कोटा टिंग्गीजवळच्या पाम ऑईल बागायतींतील अरुंद, वेगवान आणि मऊ खडकाळ रस्त्यावरील 236 किलोमीटरच्या अंतरात 14 आव्हानात्मक विशेष टप्पे असतील.
जोहोर बाहरू शहराच्या उत्तरेस आणि सिंगापूरच्या सीमेनजीक रॅलीचे टप्पे असतील, जे देशातील सर्वोत्तम मानले जातात. वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक रस्त्यावर 80 टक्‍क्‍यापेक्षा जास्त आद्रता, 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल, सोबत धुवॉंदार, पण तात्पुरता पाऊस याचे स्पर्धकांसमोर आव्हान असेल.

‘पर्यावरणशास्त्र विद्यार्थ्यांनी जलसेवक व्हावे ‘: कुलगुरू नितीन करमळकर

0
पुणे :
‘पर्यावरण शास्त्र विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा, संशोधनाचा उपयोग नद्यांच्या शुद्धीकरणासाठी करावा. प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करून जलसेवक व्हावे ‘, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी केले.
जलबिरादरी’ चे अध्यक्ष डॉ. राजेंद्रसिंह यांच्या प्रेरणेतून तसेच वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलबिरादरी आयोजित ‘नमामि चंद्रभागा ‘ जलसाक्षरता यात्रेदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण शास्त्र विभागात जलसाक्षरता विषयावर आयोजित विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
हा कार्यक्रम गुरुवारी सकाळी विद्यापीठात झाला.
यशदा ‘ चे आनंद पुसावळे,जलबिरादरीचे संघटक सुनील जोशी, यात्रा समन्वयक नरेंद्र चुघ, प्रा. प्रभाकर देसाई, अनील पाटील, सुहास पटवर्धन , विनोद बोधनकर, डॉ. सतीश चव्हाण, संदीप चोडणकर उपस्थित होते. वन विभागाचे व्ही.व्ही. शिंदे, एस.सी. कुमकुर, एम.टी. मेरगेवाड , उष्प्रभा पागे, शैलजा देशपांडे उपस्थित होते.
‘जलरक्षण आणि नदी शुद्धीकरण मोहिमेत विद्यापीठ आपले योगदान देईल’ असेही  डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
विविध महाविद्यालयातील विद्यार्थांनी आपापल्या गावच्या नदीची सद्यस्थिती सांगीतली. नदी सुधारणांसाठी कार्यदल स्थापन करण्यात आले.
विनोद बोधनकर यांनी सांगरुण गावातील प्लास्टिकमुक्तीचा प्रयोग, तर संदीप चोडणकर यांनी पंचगंगा शुद्धीकरणाचे अनुभव सांगितला. ‘ नदी बाबतीत सजगता वाढवावी, त्यासाठी नदी आपली वाटली पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेत युवा पिढीचा सहभाग वाढला पाहिजे असे प्रतिपादन सुनील जोशी यांनी केले.
डॉ. सुरेश गोसावी यांनी स्वागत केले, डॉ. प्रभाकर देसाई यांनी आभार मानले.

संचेती हॉस्पिटल मध्ये आता ‘डान्स मूव्हमेंट थेरपी’

0

डान्स मूव्हमेंट थेरपीमध्ये शारीरिक हालचालींचा 

अद्वितीय  सायकोथेराप्युटिक वापर करून  भावनिक, संज्ञानात्मक

शारीरिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी प्रचार.

 

पुणे,  हेल्थकेअर आजच्या काळातील जगातील सर्वात क्लिष्ट, गतिमान आणि जलदगतीने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. पर्यायी थेरपीच्या प्रकारात भर घालत संचेती हॉस्पिटलने डॉ. निकिता मित्तल यांच्या संयुक्त विद्यमाने डान्स मूव्हमेंट थेरपी हा सर्टिफिकेट कोर्स सुरू केला आहे. हा अभ्यासक्रम न्यु यॉर्क स्थित कायनेक्शनशी संलग्न आहे.

 

‘डान्स मूव्हमेंट थेरपी’मध्ये भावनिक, संज्ञानात्मक, शारीरिक आणि सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठी शारीरिक हालचालींचा सायकोथेराप्युटिक वापर केला जातो. ‘डीएमटी’ ही मानसिक आरोग्याकडे एक समग्र दृष्टिकोणाने पाहणारी थेरपी आहे जी शारीरिक, संज्ञानात्मक, भावनिक आणि सामाजिक विकासाचे तांत्रिक ज्ञान वापरते. जागतिक संशोधनाद्वारे समर्थित कलेक्टिव्ह डान्स मूव्हमेंट थेरपी शरीर, मन, आणि आत्मा एकीकरणासाठी मदत करते.

 

अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात संचेती हॉस्पिटल नेहमीच आघाडीवर राहिले आहे. गुणवत्तापूर्ण आर्थोपेडिक केअर, शिक्षण आणि संशोधनासाठी हे हॉस्पिटल एक महत्त्वाचे केंद्र म्हणून अस्तित्वात आहे. आता डान्स थेरपीचे फ्यूजन सादर करत असून हा प्रोग्राम फिजिओथेरेपीच्या क्षेत्रात एक उत्तम वरदान असेल. हा कार्यक्रम यु. एस, यु. के आणि जर्मनीमध्ये लोकप्रिय आहे आणि आता संचेती हॉस्पिटलद्वारे तो भारतात पहिल्यांदाच सादर केला जात आहे.

संचेती हेल्थकेअर अकॅडमीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा सांघवी म्हणाल्या की, “सध्या भारतातील विज्ञान व पारंपरिक विज्ञान, संबंधित संसाधने आणि उपचारांमध्ये मोठ्या बदलांसाठी हा एक उत्कृष्ट काळ आहे. हा  गतिमान बदल संचेतीच्या विद्यार्थ्यांना जगभरातील व्यावसायिक अभ्यासाच्या संधी उपलब्ध करून देईल. संशोधनावर आधारित या अभ्यासाला प्रत्येक कार्यक्षेत्रात महत्त्व आहे”.

 

लाईफ अँड डान्स या डान्स/मूव्हमेंट थेरपी अकॅडमीच्या  डॉ. निकिता मित्तल म्हणाल्या की, “डान्स थेरपी आरोग्य विज्ञाना सह कलेच्या उपचारात्मक मूल्यांचे एकत्रीकरण करते. कला आणि सर्जनशीलता व वैद्यकिय शास्त्रांचा सर्वोत्तम मेळ असलेला हा कार्यक्रम आहे. ह्या अभ्यासक्रमाविषयी आम्ही संचेतीला माहिती कळविताच मनिषा संघवी यांनी आमचे ध्येय समजून घेऊन आम्हाला त्वरित साथ दिली”.

शारीरिक आणि मानसिक रुग्णांवर उपचाराकरिता हेल्थकेअर प्रोफेशनल्सना हे एक नविन साधन असेल.

 

या थेरपीचे वैशिष्ट्य हे आहे कि सर्व वयोगटातील लोकांसाठी ही फायद्याची आहे. लहान मुलांसाठी क्रिएटिव्ह डान्स, शारीरिक जखम, मनोरुग्णांचे पुनर्वसन व ज्येष्ठ नागरिक या सर्वांसाठी ही थेरपी परिणामकारक आहे.

 

डॉ. निकिता मित्तल त्यांच्या ध्येयाविषयी बोलताना म्हणाल्या की, “या कोर्सला भारतात आणून थेरपीस्ट्सना हे डान्स सायन्स एजुकेशन रास्त दारात उपलब्ध करून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. संचेती हेल्थकेअर अकॅडमी सारख्या आशियातील प्रतिष्ठित ऑर्थोपेडिक हॉस्पिटल सोबत संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबवणे यापेक्षा चांगली गोष्ट असूच शकत नाही”.

पुणे परिमंडलातील 21.77 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’ सेवा

0

पुणे, दि. 10 : वीजबिलांचा तपशील व इतर माहिती वीजग्राहकांच्या मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे महावितरणकडून पाठविण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या 21 लाख 77 हजार वीजग्राहकांना ही सेवा सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, वीजग्राहकांनी मागणी केल्यास त्यांना मराठी भाषेतून ‘एसएमएस’ उपलब्ध होणार आहे.

पुणे परिमंडलात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीत 25 लाख 59 हजार वीजग्राहक आहेत. त्यापैकी 21 लाख 77 हजार वीजग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केलेली आहे. तर 1 लाख 12 हजारांपैकी 67,755 कृषीपंपधारकांनी तसेच इतर 13752 पैकी 10457 वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.

सद्यस्थितीत ‘एसएमएस’द्वारे ग्राहक क्रमांक व बिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, विविध कारणांमुळे मीटर रिडींग घेता न आल्यास ग्राहकांनी महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे हे रिडींग पाठविण्याची विनंती तसेच तसेच तांत्रिक बिघाड किंवा नियोजित देखभाल व दुरुस्तीमुळे वाहिनीवरील बंद असलेला वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे कळविण्यात येत आहे. याशिवाय आता ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात जाऊन ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. विशेष म्हणजे मराठी भाषेतूनही ‘एसएमएस’ची सेवा महावितरणने सुरु केली आहे. ‘एसएमएस’ची भाषा बदलण्यासाठी मराठीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 1 तर इंग्रजीसाठी MLANG (ग्राहक क्रमांक) 2 असे टाईप करून 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा लागेल.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे वीजग्राहकांना स्वतःचा इमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी 9225592255 क्रमांकाला MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक)(वीजग्राहकाचा इमेल) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास इमेल आयडीची नोंदणी होईल. तसेच नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होणार आहे. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18002003435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. व www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपवर मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. पुणे परिमंडलातील सर्व वर्गवारीतील ज्या वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केलेली नाही त्यांनी नोंदणी करण्यास सहकार्य करावे व ग्राहकसेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.