Home Blog Page 3271

फुलपाखरू मध्ये वाईट प्रवृत्तींचे ‘ रावण दहन ‘

0

मराठी संस्कृती प्रमाणे , दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे.. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव, गण इत्यादींवर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो.दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच दसरा हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात. प्रभु श्रीराम याच दिवशी रावण वधाकरिता निघाला होता. श्रीरामाने रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला त्यामुळे या दिवसाला ‘विजयादशमी’ असे नाव मिळाले आहे.. पूर्वीच्या काळात चांगल्या गोष्टींचा वाईट गोष्टीवर होणारी कुरघोडी दाखवण्यासाठी वर्षोनवर्षे रावण दहनाची गोष्ट सांगितली जाते . सध्या नवरात्र सुरु आहे. त्याच प्रमाणे फुलपाखरू मालिके मध्ये सुद्धा नवरात्र आणि दांडिया गरबा यांची मजा दाखवण्यात आली. दसऱ्याचा विशेष भागात फुलपाखरू मालिकेतील मानस आणि वैदेही सकट कॉलेजमधील सर्व मित्र मंडळी वाईट प्रवृत्तीचे दहन दसऱ्याच्या दिवशी ‘रावण दहन’ करून करणारआहेत.

 

फुलपाखरू या मालिकेत या ‘रावण दहन’या विशेष भागात, एक १५ फुटी रावण बनवला आहे .  ह्या रावणाच्या प्रत्येक शिराखाली बलात्कार, स्त्रीभूण हत्या, विनयभंग , अल्पवयीन मुलींवर अत्याचार , व्यसनाधीनता , बाल कामगार , भ्रष्टाचार , फसवणूक , गुंडगिरी , वृद्धांचा अपमान  समाजातील वाईट प्रवृत्तींबद्दल लिहिले असून ,कॉलेज मधील सर्वच मुले देशाचे सिटीझन म्हणून ह्या सर्व प्रवृत्ती नष्ट करायला हातभार लावण्याचे रेसोलुशन करतात . सध्या फुलपाखरू या मालिकेने तरुणाईच्या हृदयात घर केले असून मानस आणि वैदेही यांचे लाखोंनी चाहते झाले आहेत. कॉलेज जीवनातील मानस म्हणजेच यशोमन आपटे आणि वैदेही म्हणजेच हृता दुर्गुळे यांचे निरागस प्रेम दाखवणारी ‘फुलपाखरू’ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ७:३० वाजता झी युवावर प्रदर्शित होते.

एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहू नये. -खा.अनिल शिरोळे

0

 पुणे दि. 29: पुणे परिसरातील दिव्यांग नागरिकांसाठी पुणे येथे विकलांग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे.दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे.यासाठी अपंग कल्याण आयुक्त कार्यालय,पुणे महानगरपालिका,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका,स्वयंसेवी संस्था अपंग कल्याणकारी संस्था यांच्या सहकार्याने पुणे परिसरातील पात्र  दिव्यांग व्यक्तींची अद्यावत यादी बनविण्याचे काम चालू आहे. यादी बनवताना एकही पात्र व्यक्ती या लाभापासून वंचित राहणार नाही, याची संबंधित विभागांनी काळजी घ्यावी अशा सूचना खा.अनिल शिरोळे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित विकलांग शिबिराच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी सौरभ राव, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार मीनल कळसकर, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. संजय देशमुख, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे समाज कल्याण विभाग तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्वाचा : पालकमंत्री गिरीश बापट – नामदार करंडक क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

0

पुणे : उत्तम आरोग्यासाठी खेळ महत्वाचा आहे.त्यामुळे प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. कसबा मतदार व अनिल बेलकर मित्र परिवार यांच्या वतीने येथील शिंदे हायस्कुलच्या मैदानावर नामदार करंडक या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

उदघाटन प्रसंगी नगरसेवक हेमंत रासने, गायत्री खडके, अनिल बेलकर, नितीन पंडित, उदय लेले, राहुल माने, रोहित करपे, प्रतिक शहा यांच्यासह कसबा मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री बापट म्हणाले, आपले शरीर आणि मन स्वस्थ राहण्यासाठी प्रत्येकाने नियमितपणे  मैदानी खेळ खेळले पाहिजेत. त्याचप्रमाणे त्यांनी पावसाच्या अडथळा आल्याने रद्द करण्यात आलेल्या स्पर्धा पुन्हा जिद्दीने भरवल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले.

नगरसेवक हेमंत रासने यांनी  नामदार गिरिश बापट राजकारणाच्या पिचवर ४० वर्षे नाबाद असल्याचे सांगत या स्पर्धेचे नामदार करंडक हे नाव सार्थक असल्याचे सांगितले.

तरुणांना एकत्रित आणून विधायक उपक्रम राबवायचा म्हणून या स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे अनिल बेलकर यांनी सांगितले.

वादळाच्या तडाख्यात हडपसरमध्ये 16 वीजखांब, वाहिन्या जमीनदोस्त हडपसर, मगरपट्टा परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा

0

पुणे, दि. 29 : पुणे शहरात शुक्रवारी (दि. 29) दुपारी दोनच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने तसेच वीजतारांवर झाडे व फांद्या पडल्याने हडपसर व परिसरातील 4 वीजवाहिन्यांचे 16 वीजखांब व त्यावरील वाहिन्या जमीनदोस्त झाल्या. त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरु झाली आहे.

या वादळाच्या तडाख्यात वीजयंत्रणा नादुरुस्त झाल्याने हडपसर गाव व सोलापूर रोड परिसरातील सुमारे 22 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यापैकी सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सायंकाळी सुरु करण्यात आला आहे तर उर्वरित भागातील वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून रात्री सुरु करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, बंडगार्डन विभाग अंतर्गत हडपसर इंडस्ट्रीयलमधील हेन्ले 22 केव्ही उपकेंद्रातून रामटेकडी, सेंट मेरी, हेन्ले 1 व 2 अशा 22 केव्हीच्या 4 ओव्हरहेड वाहिन्यांद्वारे हडपसर गाव, हडपसर मार्केट, साडेसतरानळी, सातववाडी, शिंदेवस्ती, रामटेकडी, सोलापूर रोड, मगरपट्टा रोड, बी.टी. कवडे रोड आदी परिसरात वीजपुरवठा केला जातो. आज दुपारी 2 वाजताच्या सुमारास वादळ व मुसळधार पाऊस यामुळे या चारही वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या. वीजवाहिन्यांवर ताण आल्याने वीजवाहिन्यांवरील 16 वीजखांब जमीनदोस्त झाले. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. महावितरणचे अभियंता व कर्मचार्‍यांनी तातडीने सर्वप्रथम खाली पडलेल्या वीजवाहिन्यांची पाहणी करून त्यात सार्वजनिक सुरक्षेचा धोका नसल्याची खात्री केली आणि पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले. मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनीही सूचना करून पर्यायी व्यवस्थेतून संबंधीत परिसरात वीजपुरवठा सुरु करण्याचे निर्देश दिले व कोसळलेले वीजखांब व वाहिन्या उभारण्यासाठी तातडीने काम सुरु करण्यास सांगितले.

सायंकाळपर्यंत 22 केव्ही रुबी हॉल वीजवाहिनीवरून नादुरुस्त झालेल्या सेंट मेरी व रामटेकडी वीजवाहिनीवरील ग्राहकांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तसेच इतर ठिकाणीही पर्यायी सोय उपलब्ध करून हडपसर इंडस्ट्रीयल, हडपसर मार्केट, रामटेकडी इंडस्ट्रीयल, सातववाडी, मगरपट्टा, सेंट मेरी आदी भागातील सुमारे 18 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर शिंदेवस्ती, साडेसतरानळीचा काही भाग, बी. टी. कवडे मार्ग, गाडीतळ या परिसरातील ग्राहकांचाही वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात येत असून रात्री उशिरा त्याचे काम पूर्ण होईल. दरम्यान वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेले वीजखांब व वाहिन्यांची दुरुस्तीला सुरवात झाली असून येत्या दोन दिवसांत त्याचे काम पूर्ण होणार आहे. या कालावधीत पर्यायी व्यवस्थेतून भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर हडपसर, सोलापूर रोड, मगरपट्टा, रामटेकडी आदी परिसरात नाईलाजास्तव दोन ते तीन तासांचे भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे. वीजयंत्रणेची दुरुस्ती व पुरवठा सुरळीत करण्यासाठी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, कार्यकारी अभियंता श्री. मुरलीधर येलपले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. चंद्गकांत चव्हाण यांच्यासह सुमारे 55 अभियंते व कर्मचारी कार्यरत आहेत.

चौकट – शिवाजीनगर, रास्तापेठ, पिंपरी विभागात काही ठिकाणी वीजखंडित – शुक्रवारी (दि. 29) दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे महावितरणच्या शिवाजीनगर, रास्तापेठ व पिंपरी विभागातील वीजपुरवठा काही ठिकाणी खंडित झाला होता. यात फातिमानगर, शिंदेछत्री, एनआयबीएम रोड, लुल्लानगर, रहेजा गार्डन, कोंढवा, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वाकड रोड, कस्पटेवस्ती, जगताप डेअरी, शितोळेनगर, ताथवडे आदी परिसरात झाडे, फांद्या पडल्याने तसेच काही फलके वादळाने उडून वीजतारांवर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. शिवाजीनगर, रास्तापेठ विभागातील सर्व ठिकाणी वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. तर पिंपरीमधील जगताप डेअरी, वाकड रोडचा काही परिसर, शितोळेनगरमधील वीजपुरवठा यंत्रणेची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था करून रात्री उशिरापर्यंत सुरु करण्यात येत आहे.

आजच खर्‍या अर्थाने विश्वशांती ची गरज डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे मत;

0
एमआयटी डब्लूपीयू तर्फे डॉ.विजय भटकर आणि डॉ. स्कॉट हॅरियाट यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान
पुणे-आजची परिस्थीती ही अत्यंत भयावह आहे. ही परिस्थीती पाहता जुन्या काळापेक्षा आजच्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत असणार्‍या काळातच  खर्‍या अर्थाने विश्वशांतीची गरज आहे. असे मत जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी) व एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे तर्फे जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ, नालंदा विद्यापीठाचे कुलपती पद्मभूषण डॉ.विजय भटकर आणि अमेरिका येथील महर्षी युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंटचे कुलगुरू डॉ.स्कॉट हॅरियट यांना पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी  डॉ. विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड,
 थोर तपस्वी श्रीकृष्ण कर्वे उर्फ कर्वे गुरुजी,  जे. के. लक्ष्मीपत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रोशनलाल रैना, शारदा ज्ञानपीठाम्चे अध्यक्ष पंडित वसंत गाडगीळ, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील, प्रा. डी.पी. आपटे, डॉ. एल. के. क्षीरसागर हे  उपस्थित होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, “ विज्ञान आणि अध्यात्म या दोघांनी एकत्र येत संपूर्ण जगात शांती प्रस्थापित करणे गरजेचे आहे. आणि हे केवळ आपला भारत देशच करू शकतो. त्यामूळे त्या उद्देशाप्रत पोचण्यासाठी आज प्रत्येक व्यक्तीने आपापल्या ध्येयाप्रती अत्यंत प्रामाणिक असणे गरजेचे आहे.     ”
डॉ. विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले, “ संत वृत्तीचे शास्त्रज्ञ म्हणून डॉ.  विजय भटकर आणि स्कॉट हॅरियाट  यांचा उल्लेख करावा लागेल.  खरे म्हणजे राष्टृाची आणि भाषेची बंधने ओंलाडून जाणारे त्यांचे कार्य आहे.  ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. विजय भटकर म्हणाले, “ आजच्या काळात विज्ञान निश्चितच महत्वाचे आहे. त्यातच आता तंत्रज्ञानाची भर पडली आहे. मात्र आज या विज्ञान व तंत्रज्ञानापेक्षा अधिक गरज अध्यात्माची आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे तुम्हाला जगाचे, विश्वाचे भौतिक ज्ञान देते पण अध्यात्म तुम्हाला जगण्याचा अर्थ शिकवते. ”
सत्काराला उत्तर देतांना डॉ. स्कॉट हॅरियाट म्हणाले, “ जेव्हा तुम्ही  निसर्गाला सोबत घेऊन एखादी कृती करता तेव्हांच त्या कृतीला सफलतेचा भाव असतो. ज्या क्षणी तुम्ही निसर्गाचा व पर्यायाने संपूर्ण समाजाचा देखील विचार करेनासे होता, तेंव्हा तुम्ही कितीही बौद्धिके देत असलात तरी तुम्हाला कोणीही बुद्धीवादी म्हणणार नाही. त्यासाठी असणारा विवेकच तुम्हाला बुद्धीवादी ठरवेल. संपूर्ण जगात विवेका इतके महत्त्वाचे दुसरे काहीच नाही.  ”

अजित पवार रस्त्यावर उतरल्याने मोठ्ठा जनआक्रोश -पोलीस गायब (व्हिडीओ)

0
पुणे-राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः रस्त्यावर उतरल्याने पावसाची कोणतीही तमा न बाळगता दीपक मानकर ,सुभाष जगताप ,चेतन तुपे पाटील, योगेश ससाणे , भैयासाहेब जाधव , प्रिया गदादे ,बाबुराव पाचारणे  आदी नगरसेवकांनी कसलेली कंबर ,आणि त्यांचे मैदानात उतरलेले कार्यकर्ते  यांच्यामुळे पुणे शहर राष्ट्रवादी चा मोर्चा मोठ्ठा जन आक्रोश करणारा मोर्चा ठरला .विशेष म्हणजे टिळक रस्त्यावरील अभिनव चौकात मोर्चासाठी जमलेले दीपक मानकर, योगेश ससाणे,प्रिया गदादे ,सुनील टिंगरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली त्यामुळे चारही दिशांची वाहतूक जाम झाली . खुद्द अजित पवार यांची मोटार स .प. महाविद्यालयाजवळ अडकून पडली तर चेतन तुपे पाटील स्वतः स्वारगेटला अडकून पडले , तुपे पाटील आपली मोटार सोडून दुचाकीने येवून मोर्चात सहभागी झाले . तर अंकुश काकडे आणि कार्यकर्त्यांनी अभिनव चौकात स्वारगेट कडे जाणारी वाहनेच केवळ सोडल्याने अजित पवार मोर्चाच्या प्रारंभ स्थळी पोहोचू शकले .अभिनव चौका पासून हा मोर्चा शानिपारापर्यंत आला यावेळी चारही दिशांनी वाहतूक जाम झाली होती .मात्र कुठेही पोलिसांचा एखादा चेहरा हि नजरेस पडत नव्हता . पोलीस नसल्याची हि बाब मोठ्ठी आश्चर्यकारक मानली जात होती .
भाजप सरकार फक्त घोषणाबाज सरकार असून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न उध्वस्त झाल्याचा घणाघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये केला. वाढत्या महागाईच्या विरोधात  पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. या आंदोलनाच्या समारोप प्रसंगी झालेल्या सभेत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.
वाढत्या महागाईच्या विरोधात  पुणे शहरात आज राष्ट्रवादीने जनआक्रोश आंदोलन केले. यावेळी टिळक रस्त्यावरील वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून शनिवारवाड्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अजित पवार यांच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेसचे शहरातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध सेल आणि आघाड्यांचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते त्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .
 
शनिवारवाड्यावर झालेल्या सभेत अजित पवार यांनी भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला . पवार म्हणाले की, भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली नाहीत. नोटाबंदीचा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरला यामुळे तरुणांच्या नोकऱ्या गेल्या, डिझेल, पेट्रोलचे दर या सरकारने वाढवून ठेवले आहेत.  मुख्यमंत्री, पंतप्रधानच्या विरोधात बोलले तर गुन्हे दाखल होतात ही वेगळ्या प्रकारची आणीबाणी या सरकारच्या काळात नागरिकांवर लादली जात असल्याची टीका देखील त्यांनी केली. कर्जमाफीच्या घोषणेला चार महिने पूर्ण झाल्यानंतर अद्याप शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली नाही त्यामुळे हे सरकार घोषणाबाजी करून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत सरकारला महागाई कमी करण्याचा निर्वाणीचा इशारा त्यानी दिला.
 
 

 

रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा घेवून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला पाहिजे -अजित पवार (व्हिडीओ)

0


पुणे- मुंबईत परळ-एल्फिन्सटन स्थानकावर झालेली दुर्घटना हा प्रकार मोठा दुखः कारक  असून याप्रकरणी तातडीने रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा आणि त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाजीराव रस्त्यावरील जन आक्रोश मोर्चात सह्भागी झालेले असताना दिली आहे ..
मुंबईत एल्फिन्सटन रेल्वे स्थानकावर चेंगरा-चेंगरी होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याच्या दुदैवी घटनेबद्दल पवार म्हणाले,’ बुलेट ट्रेनवर एक लाख कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा याच खर्चात रेल्वे स्थानकाचे मजबुतीकरण केले असते. प्रवाशांना पुरेशा सेवा सुविधा दिल्या असत्या तर, अशा दुर्घटना घडल्या नसत्या  या खर्चात प्लॅटफॉर्मची उंची वाढविणे, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे , ही कामे करता आली असती.’ बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे प्रवाशांना अधिक सुविधा देण्याबाबत आग्रही भूमिका घेतल्यानेच सुरेश प्रभू यांच्या जागी पियुष गोयल यांना रेल्वे मंत्रिपद दिले गेले असा आरोप पवार यांनी केला

पालकमंत्री शिवसृष्टीचं झालं काय ? मेट्रोबाबत पंतप्रधानांवर भरवसा नाय काय ? चेतन तुपेंचा सवाल (व्हिडीओ)

0

पुणे- आज वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन भाजपच्या शहरातील नेत्यांनी केल्यानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी भाजपवर टीकेची झोड उठविली असून
पालकमंत्री शिवसृष्टीचं झालं काय ? मेट्रो बाबत पंतप्रधानांवर भरवसा नाय काय ? असा सवाल केला आहे .
एकदा पंतप्रधानांनी मेट्रोचे गेल्या वर्षीच भूमिपूजन केल्यावर आज पुन्हा त्यातील वेगळ्या मार्गाचे भूमिपूजन करण्याचे प्रयोजन काय ? मेट्रोच्या एकूण सहा मार्गिका आहेत .पंतप्रधानांनी  केवळ निवडणुका डोळ्यापुढे ठेवून भूमिपूजन केले होते ,हेच आजच्या भूमिपुजानामुळे स्पष्ट झाले आहे असा आरोप हि त्यांनी केला आहे . नेमके तुपे पाटलांनी काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात इथे ऐका ..पहा  व्हिडीओ ….

माजी महिला महापौरांच्या उपस्थितीत भक्ती -शक्तीचा जागर

0
 पुणे नवरात्रौ महिला महोत्सव: महिलांच्या लक्षणीय उपस्थितीत महाआरती 
 
पुणे –महिलांच्या लक्षणीय गर्दीत आणि पुण्यनगरीच्या माजी महिला महापौरांच्या प्रमुख उपस्थितीत श्री. लक्ष्मी मातेची महाआरती करून भक्ती-  शक्तीचा जागर करण्यात आला.  
 
अष्टमीनिमित्त पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्यावतीने शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री. लक्ष्मीमाता मंदिरात महाआरती करण्यात आली.  यावेळी  माजी महापौर कमल व्यवहारे, मा. आमदार कमल ढोले पाटील , दीप्ती चवधरी , रजनी त्रिभुवन,  चंचला कोद्रे , तसेच सुनंदा गडाळे ,ज्योती अंकुश काकडे , भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई ,अभिनेत्री प्राजक्ता माळी,शुभांगी गायकवाड , जी. एम. केंजळे आणि   महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल,उपाध्यक्षा निर्मला जगताप , माजी उपमहापौर व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक आबा बागुल , अमित बागुल   आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी मान्यवरांसह उपस्थित महिलावर्गानी मनोभावे महाआरती केली. तत्पूर्वी आबा बागुल यांनी माजी महिला महापौरांचा राजकारणातील प्रवेश आणि महत्वाचे पद भूषविल्याबद्दल मुलाखतही घेतली. त्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त दादही दिली. महाआरतीचे संयोजन  हर्षदा बागुल , दीपा बागुल ,नम्रता जगताप , सोनम बागुल, नूपुर बागुल ,प्राजक्ता ढवळे यांनी केले. 

गांधी जयंती पासून स्वच्छता स्पर्धा -विजेत्यांना स्वच्छता पुरस्काराने सन्मानित करणार -महापौर

0
पुणे-स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी स्वच्छता हीच सेवा या अभियाना अंतर्गत पुणे महापालिका शहरातील नागरिकांसाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी स्वछता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना पालिकेतर्फे स्वछता पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदे मध्ये सांगितले.
महापालिकेतर्फे नियोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 2 ऑकटोबर ते 26 जानेवारी दरम्यान होणार आहे. या मध्ये कुटुंब, गृहनिर्माण संस्था, शाळा/ महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक संस्था, खाजगी संस्था व पुणे महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी सहभागी होऊ शकतील
महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन प्रवेशिका दाखल करता येणार आहे. या स्पर्धेत 15 क्षेत्रीय कार्यालयातील स्वछतेच्या संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य असणार आहे. या स्पर्धेचे मूल्यांकन 2 ऑक्टोबर पूर्वीची परिस्थिती आणि त्या नंतरच्या परिस्थिती यांच्या विश्लेषणातून त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर निश्चित करण्यात अली असून 20 जानेवारीला विजेत्याची घोषणा करण्यात येणार आहे. 26 जानेवारी नंतर पुरस्कार वितरण करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

न्यायालयाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला खडसावले

0
पुणे-निगडी – देहूरोड दरम्यानच्या वृक्षतोड संदर्भात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेने न्यायायलात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रवर महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला उत्तर देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु रस्ते विकास महामंडळाकडून अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यावर आज न्यायालयाने महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला उत्तर देण्याबाबत खडसावले व लवकरात लवकर उत्तर देण्याचे आदेश दिले.अशी माहिती विकास कुचेकर यांनी दिली. पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे
निगडी-देहूरोड दरम्यानच्या नियमबाह्य वृक्षतोड संदर्भात मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या दाव्यात मागील सुनावणी दरम्यान महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून देहुरोड-निगडी दरम्यानची देहुरोड कँनटामेंन्ट बोर्डाकडून ना हरकत दाखला घेऊन केलेली वृक्षतोड ही नियमबाह्य आहे व सदर रस्त्याची मालकी व भोगवटादार म्हणून महाराष्ट्र शासन आहे. त्यामुळे सदर जमिनीवरील वृक्षतोड करण्याची परवानगी देण्याचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 25 प्रमाणे जिल्हाधिका-यांकडे आहेत. परंतु रस्ते महामंडळाने जिल्हाधिका-यांकडून परवानगी न घेता सदर ठिकाणी वृक्षतोड केली असल्याने ही बाब नियमबाह्य आहे.
निगडी – देहूरोड मार्गावरील वृक्षतोडीचा दावा न्यायालयात प्रलंबित आहे. ज्या वृक्षांची तोड थांबवावी यासाठी न्यायालयात धाव घेण्यात आली आहे, तेच वृक्ष रस्ते विकास महामंडळाकडून तोडले जात आहेत. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन संबंधितांवर गुन्हा दाखल कारण्यासाठी जिल्हाधिका-यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचेविकास कुचेकर यांनी कळविले आहे

‘कारागृहात कीर्तनाचा जागर’

0

अहमदनगर जिल्ह्यात माध्‍यम क्षेत्रात ‘पत्रकार महाराज’ म्‍हटले की एकच नाव समोर येते ते म्‍हणजे पत्रकार महेश महाराज. पत्रकारितेप्रमाणेच विविध सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग हे त्‍यांचे वैशिष्‍ट्य आहे. आजू-बाजूला नकारात्‍मक गोष्‍टी घडत असल्‍या तरी त्‍यातील सकारात्‍मक बाबींवर लक्ष केंद्रीत करुन त्‍यांना प्रकाशझोतात आणण्‍याचे काम ते करीत असतात. त्‍यांच्‍यातील या सकारात्‍मक ऊर्जेमुळेच ते प्रशासनातील नवीन अधिका-यांचेही सहजतेने मित्र बनतात. लेखणी आणि वाणी या दोन्‍ही साधनांचा वापर समाजहितासाठी करण्‍यावर त्‍यांचा भर असतो.

गेल्‍या पाच वर्षांपासून पत्रकार महेश महाराज हे ‘जागर उपक्रम’ राबवत आहेत. या उपक्रमाला  अरुण पुंडे वकिलांचे सहकार्य लाभत आहे. ‘जागर उपक्रम’ म्‍हणजे राज्यातील विविध कारागृहात जाऊन वारकरी कीर्तनाद्वारे बंदीजनांच्या मानसिक परिवर्तनाचा प्रयत्न करणे.

अविचारामुळे मोलाचा मानवजन्म वाया घालणे खेदजनक आहे. चुका होणे स्वाभाविक आहे. मात्र चुकांची पुनरावृत्ती करणे हे पाप होय. सुधारणा व पुनर्वसनाची संधी ही न्याय व्यवस्था व कारागृह विभाग बंदीबांधवांना उपलब्ध करुन देतो. या संधीचा लाभ घेवून सदाचार, सन्मार्गाची कास धरा. परिवर्तनाचा संकल्प करा, न्यायव्यवस्थेने सुनावलेली सजा सुधारण्याची संधी मानून कारागृह साधनेची जागा बनू दे, असे आवाहन महेश महाराज देशपांडे बंदीबांधवांना करत असतात. कारागृह विभागाच्या “सुधारणा व पुनर्वसन” या ब्रीदवाक्यास अनुसरुन मागील पाच वर्षापासून ‘जागर’ या उपक्रमांतर्गत पत्रकार महेश महाराज देशपांडे व अरुण पुंडे वकील हे दोघे राज्यातील विविध कारागृहात जाऊन वारकरी कीर्तनाद्वारे बंदीजनांच्या मानसिक परिवर्तनाचा प्रयत्न करीत आहेत.

दोघेही वंशपरंपरेने वारकरी संप्रदायातील आहेत. दोघेही कीर्तनकार म्‍हणून गेल्‍या 31 वर्षांपासून राज्यातील विविध गावात संपन्न होणाऱ्या प्रतिवार्षिक अखंड हरिनाम सप्ताहांत कीर्तन सेवा करीत आहेत. महेश महाराज अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्‍यातील तर पुंडे वकील कर्जत तालुक्‍यातील राशीन गावचे रहिवाशी.

कारागृहात जाऊन जात, धर्म, पंथ, वर्गभेद रहित माणुसकीची, सदाचाराची शिकवण देणाऱ्या सर्वधर्मीय संतांच्या विचारांचा कीर्तनातून जागर केला जातो. ‘पुंडलिकवरदा हरीविठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम’ असा नामघोष करतानाच “अल्ला तुही तू – मौला तुही तू”, “वाहे गुरु का खालसा – वाहे गुरु की फतेह”, “बुध्दं शरणं गच्छामि” चा गजर करीत बंदीजनांच्या सद्सद्विवेक बुध्‍दीस साकडे घालतात. कीर्तनातून ज्ञानेश्वर, तुकाराम, सोपान, मुक्‍ताबाई, एकनाथ, नामदेव, चोखोबाराय, सावताबाबा आदी संतांचे मराठी अभंग गातानाच कबिराचे दोहे, मिराबाईंची पदे, गोस्वामी तुलसीदासांची चौपाई, हिंदी-उर्दूतील कव्वाली आळविली जाते. सर्वधर्मीय संतांच्या चरित्रातील कथाभाग सांगून प्रबोधन केले जाते.

‘दो आँखे बारा हाथ’ या चित्रपटाचा उल्लेख करीत “सुधरा रे भावांनो” अशी आर्त साद घातली जाते.   बंदीवासात साने गुरुजींनी लिहीलेल्‍या ‘श्‍यामची आई’, पं. जवाहरलाल नेहरूंनी लिहिलेल्या ‘डिस्कव्हरी ऑफ़ इंडिया’, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या ‘गुब्बारे खातिर’ या ग्रंथ निर्मितीचा आवर्जून उल्लेख केला जातो.  घरी आई, वडील, बायको, मुलं वाट पहात असून चुकीचा पश्‍चाताप करा, न्यायव्यवस्थेने सुनावलेली सजा स्वीकारून परिवर्तनाच्या मार्गावर पाऊल टाका, असे भावनिक आवाहन केले जाते.

पोटतिडीकेने व आर्ततेने केलेले जागराचे आवाहन ऐकून कारागृहात बंदीजन या किर्तनात अनेकवेळा गहिवरतात. कायदा मोडणारे हात कीर्तनातील भजनानंदात टाळी वाजवीत तल्लीन होतात. अनेकांच्या डोळ्यांतून आसवे पाझरतात…तीच प्रायश्चिताची  खूण. संतविचारावर श्रध्दा ठेवून सदाचारी झाला तर ‘वाल्याचा वाल्मिकी’ होतो, हा इतिहास आहे. त्याची वर्तमानात पुनरावृत्‍ती व्‍हावी यासाठीच पत्रकार महेश देशपांडे महाराज व पुंडे वकील ‘कारागृहातून किर्तनाचा जागर’ हा उपक्रम एखादा वसा उचलावा त्‍याप्रमाणे राबवत आहेत.

नगर उपजिल्हा कारागृहात कारागृह अधीक्षक नागनाथ सावंत, वरिष्‍ठ तुरुंगाधिकारी शामकांत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  बंदीजनांसाठी महेश महाराज देशपांडे यांचे हरिकीर्तन नुकतेच संपन्न झाले. यावेळी प्रेस क्लबचे अध्यक्ष मंसूर शेख, राजाभाऊ महाराज म्हेत्रे, विष्णुपंत म्हेत्रे यांसह कारागृहाचे कर्मचारी व बंदीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या

‘आता तरी पुढे हाचि उपदेश। नका करू नाश आयुष्याचा॥

सकाळांच्या पाया माझे दंडवत । आपुलाले चित्त शुध्द करा॥

हित ते करावे देवाचे चिंतन। करोनिया मन एकविध॥

तुका म्हणे हित होय तो व्यापार। करा, काय फार शिकवावे॥

या उपदेशपर अभंगावर महेश महाराज यांनी निरुपण केले. ते म्हणाले, ‘घडलेल्या चुकांविषयी पश्‍चाताप मानला तर परिवर्तन होणे शक्य आहे. न्याय व्यवस्थने सुनावलेली सजा ही सुधारणेची संधी समजा. संतविचारांचा अंगीकार कराल, तर कारागृह परिवर्तनाची पंढरी ठरेल. वाममार्गाचे “वार”करी होण्यापेक्षा संतविचाराचे वारकरी व्हा’.

सुमारे दोन तास महेश महाराज यांनी ज्ञानेश्‍वर, तुकाराम, सावता बाबा, कबीर यांच्या अभंगरचनेचे प्रमाण देत किर्तन केले. तसेच व्यवहारातील दाखले देत विठुनामाचा गजर आणि संतविचाराचा जागर केला. टाळ-मृदुंगाच्या निनादात टाळी वाजवित हरिनामाच्या गजरात कारागृहातील बंदीजन तल्लीन झाले होते. या कीर्तनास निवृत्तीबाबा चोपदार, धनंजय एकबोटे, केदार देशपांडे यांनीही सेवा बजावली.

 

‘कारागृहात किर्तनाचा जागर’ या उपक्रमाविषयी बोलतांना महेश महाराज म्‍हणाले, स्वर्गीय ग. स. तथा बाळासाहेब देशपांडे (जामखेड) व स्वर्गीय श्रीधर पुंडे गुरूजी (राशिन) यांच्या प्रेरणेतून मी आणि अ‍ॅड.अरुण महाराज पुंडे गेल्‍या पाच वर्षापासून विभिन्न कारागृहात बंदिस्त असणाऱ्या बंदीजनांच्या वैचारिक परिवर्तनासाठी हा उपक्रम निःशुल्क राबवत आहोत. नगर उपजिल्हा कारागृहात तत्कालीन अधीक्षक ज्ञानेश्वर काळे यांनी 2012 साली गणेशोत्सवात भजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यातूनच या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  पुढे दिवाळी निमित्त कारागृहात हरिकीर्तन केले. त्यानंतर राज्यातील पैठण खुले कारागृह (जि. औरंगाबाद ), येरवडा (पुणे), हर्सूल (जिल्‍हा औरंगाबाद ), बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर या कारागृहात बंदीजनांसाठी कीर्तन कार्यक्रम करण्यात आला. गुन्हेगारीच्या वाटेस लागलेली पावले संतविचाराने परिवर्तनाच्या दिशेने वळावीत. आजचा बंदीजन भविष्यात देशाचा सुजाण नागरिक व्हावा. या एकमात्र उद्देशाने ‘जागर’ या  उपक्रमाचे आयोजन कारागृह विभागाच्‍या “सुधारणा आणि पुनर्वसन” या  ब्रीदवाक्यास अनुसरुन  करीत आहेत. राज्यभरातील सर्व कारागृहात किर्तन करण्याचा आम्‍हा दोघांचा मानस आहे. कारागृह हे सजा सुधारण्याची संधी व साधनेची जागा बनू दे, हीच त्यांची भावना आहे.

सोना मोहपात्रा करणार ज्ञानोबा माऊलीचा गजर

0

‘टाटा सॅाल्ट कल का भारत है’ आणि ‘क्लोज अप पास आओ ना’ या प्रसिद्ध जिंगल्स तसेच ‘दिल्लीबेल्ली, फुक्रे’, ‘हंटर’, ‘रामण राघव २.०’ या सारख्या अनेक हिंदी चित्रपटातील गीतांना स्वरसाज देणाऱ्या गायिका सोना मोहपात्रा यांनी आगामी घाट या मराठी सिनेमातील भक्तीमय गीत नुकतेच स्वरबद्ध केलं आहे. घाट चित्रपटाची निर्मिती सचिन जरे यांची असून दिग्दर्शन राज गोरडे यांचं आहे. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा घाट हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

घुमला गजर आभाळी

ज्ञानराज माझी माऊली

ज्ञानोबा माऊली चित्त तुझ्या पावली

ज्ञानोबा माऊली चंदनाची सावली

असे बोल असलेले हे गीत वैभव देशमुख यांनी लिहिले असून रोहित नागभिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. माझ्या मनाला स्पर्शून गेलेलं हे भावगीत प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास व्यक्त करताना मराठीत गाण्याचा अनुभव माझ्यासाठी नेहमीच चांगला राहिला असल्याचं ही सोना मोहपात्रा आवर्जून सांगतात. या गाण्याच्या निमित्ताने गायिका सोना मोहपात्रा यांच्यासोबत काम करायला मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना माऊलीचा हा गजर म्हणजे माऊलीची सेवाच असल्याचं संगीतकार रोहित नागभिडे सांगतात.

आयुष्याची अनाकलनीय आव्हाने आणि घटनांकडे किती वेगवेगळ्या बाजूने बघता येते याचा वेध घाट चित्रपटातून घेण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा–पटकथा–संवाद राज गोरडे यांचे आहेत. छायांकन अमोल गोळे तर संकलन सागर वंजारी यांचं आहे. प्रोडक्शन मॅनेजर विनायक पाटील आहेत.

अरविंद एज्युकेशन सोसायटीचे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यश

0

पिंपरी । प्रतिनिधी
जुनी सांगवीतील अरविंद एज्यूकेशन सोसायटीच्या विद्यार्थीनींनी यशाची परंपरा कायम राखत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश संपादन केले.
भोसरीतील महेश दादा लांडगे स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये प्रशालेच्या १७ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी संघाने चांगली कामगिरी करीत प्रशालेचे नाव उचांवले आहे. या स्पर्धेत ६० शालेय संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेतील चारही गटामधील सामने जिंकून अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या संघाने पिपरी – चिंचवड महापालिकेमध्ये पाचवा क्रमांक पटकावला.  या यशाबद्दल महेश दादा लांडगे स्पोर्ट्स क्लबचे सचिव आणि आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते मुलींना सन्मानित करण्यात आले.

           क्रीडा शिक्षक रामेश्वर हराळे, जीवन सोलंकी यांनी विद्यार्थांची तयारी करून घेतली. विजेत्या संघाचे संस्थेच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 28 : केंद्र शासनाने 1 जानेवारी, 2016 पासुन बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदर्श नियमावली सप्टेंबर 2016 पासून देशभरात लागू केली आहे. या कायद्याच्या कलम 41(1) अंतर्गत बालकांसाठी कार्यरत आणि इच्छुक असणाऱ्या सर्व अनुदानित, विना अनुदानित, शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी संस्था यांनी शासनाकडून नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांची काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील, अशा अवैध संस्थांवर या कायद्याच्या कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या कलमाअंतर्गत कमाल 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व रु 1 लाखापर्यंत दंड अथवा दोन्हीची तरतुद करण्यात आली आहे.

बालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत असणाऱ्या सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 41  अनुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव आदर्श नियमावलीच्या परिशिष्ठ 27 मध्ये दिलेल्या विहित नमुन्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक त्या कागदपत्रासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, 103, शिवाजीनगर, चुनावाला चेंबर्स, जुना तोफखाना, पुणे-05 या पत्त्यावर 30 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांच्या दुरध्वनी क्र. 020-25536871 संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, पुणे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.