Home Blog Page 3255

मुद्रा योजनेचा लाभ घेऊन स्वाभिमानाने जगा-मंत्री प्रकाश जावडेकर

0

पुणे –:  मुद्रा योजनेच्या माध्यमातून लाखो तरुण स्वयंरोजगाराकडे वळत आहेत.या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारचे भांडवल लागत नसल्यामुळे तरुणांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. त्यामुळे तरुणांनी या योजनेचा लाभ घेऊन रोजगार मिळवण्यापेक्षा रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे, असे प्रतिपादन केंद्रीय मानवसंसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.

राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र राज्य तसेच जिल्हा प्रशासन पुणे आयोजित ‘मुद्रा प्रोत्साहन अभियान’,बालगंधर्व रंगमंदिर,पुणे येथे ते बोलत होते.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,खा.अनिल शिरोळे,महाराष्ट्र बँकेचे मुख्य व्यवस्थापक रवींद्र मराठे, महापौर मुक्ता टिळक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, डीएफएस दिल्लीचे अशोककुमार डोगरा,एमएसएलआरएमच्या मुख्य व्यवस्थापक आर.विमला,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे दिनेश डोके आदी मान्यवर तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

यावेळी सर्व बँकेच्या वतीने विविध प्रकारच्या योजनांबद्दल  माहिती देण्यासाठी 38 स्टॉल्स लावले होते. त्याद्वारे नागरिकांना मुद्रा योजनेविषयी माहिती तसेच रजिस्ट्रेशन करून देण्यात आले. कार्यक्रमात बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करणाऱ्या महिलांना कर्जवाटप करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गतच्या लाभार्थ्यांना धनादेश देण्यात आला. तसेच मुद्रा योजनेअंतर्गत मंजूर तरुणांना मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. ‘मुद्रा यशोगाथा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित लाभार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.    शासनाच्या विविध योजनाप्रमाणेच मुद्रा योजना ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे. यामधून मोठ्या प्रमाणात उद्योजक तयार व्हावेत हा सरकारचा मुख्य उद्देश आहे.कुठल्याही प्रकारचे तारण नसल्यामुळे लाभार्थ्याला याद्वारे कर्ज मिळवणे सोपे जाते.सामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबविण्यात येत आहे. 4 कोटी तरुणांचा पूर्वी कुठल्याही प्रकारचा व्यवसाय नसताना त्यांनी  मुद्रा योजनेच्या साह्याने व्यवसायात उडी घेतली आहे. मुद्रा योजनेच्या मदतीने सावकाराच्या जाळ्यातून मुक्तता होईल. मुद्रा योजना ही स्वयंरोजगाराचे नवे दालन आहे. ‘नव्या भारताची नवी आकांक्षा, नवी योजना मुद्रा योजना’ अशी घोषणा श्री. जावडेकर यांनी दिली.

हडपसर-सासवड-जेजुरी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्या जलसंपदा राज्यमंत्री

0

पुणे : हडपसर-सासवड-जेजुरी हा पालखी रस्ता असून या रस्त्यावरील खड्डे तसेच अन्य दुरुस्तीचे काम तातडीने हाती घ्यावे असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

येथील शासकीय विश्रामगृहात हडपसर-सासवड-जेजुरी तसेच मंतरवाडी-पिसोळी-कोंढवा रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामांची आढावा बैठक आज जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसंबधी कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जे.बी.चवरे, सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता नम्रता रेड्डी, संबंधित परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

या बैठकीत, हडपसर-सासवड-जेजुरी या मार्गावरील खड्डयांच्या दुरुस्तीचा विशेष आढावा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला. रस्ते दुरुस्तीच्या कामात सर्व शासकीय यंत्रणांनी ताळमेळ ठेवावा, रस्ते दुरुस्तीचे काम युध्दपातळीवर हाती घ्यावे, आवश्यक असेल तेथे काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रस्ता दुरुस्तीचे काम करावे, रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजविणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मदतीने रस्त्याची दुरुस्ती करणे इत्यादी काम करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्र्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे त्वरीत काढण्याची सूचना त्यांनी केली.

मंतरवाडी-पिसोळा-कोंढवा रस्त्याच्या कामाला अंदाजपत्रकात अनुदान मंजूर करण्यात येऊनही, विविध विभागांनी आवश्यक परवानग्या प्राप्त न केल्याची गंभिर दखल जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतली. यासाठी गरज पडल्यास शॉर्ट टेंडर काढणे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री महोदयांची या कामास  मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. कात्रज-कोंढवा-उंड्री-पिसोळी-मंतरवाडी राज्य मार्गावरील 71 ते 73 किमी दरम्यान हाती घेण्यात येणाऱ्या 48 कोटी 71 लाख रुपयांच्या तसेच 73 ते 76 किमी दरम्यानच्या 15 कोटी रुपयांच्या कामांच्या प्रगतीचा आढावा यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला.

कोपर्डीप्रकरणी महिन्यानंतर निकाल अपेक्षित असताना सुप्रिया सुळेंचे राजकारण कशासाठी ? खासदार काकडेंचा सवाल

0

पुणे : कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेली अत्याचाराची घटना लाच्छनास्पदच आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशीच इच्छा सर्वांसोबतच सरकारचीदेखील आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी संबंधीत घटनेचा निकाल नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लागण्याची शक्यता वर्तविलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे कोपर्डी घटनेचे राजकारण करीत आहेत. ते त्यांनी करू नये, अशी अपेक्षा भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी आज व्यक्त केली.

खासदार सुळे यांनी कोपर्डी घटनेचा निकाल 1 जानेवारीपर्यंत न लागल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असे वक्तव्य आज पुण्यात केले आहे. त्यावर खासदार संजय काकडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. खासदार काकडे म्हणाले की, कोपर्डी घटनेबद्दल जेवढी काळजी राष्ट्रवादीच्या खासदारांना आहे. त्यापेक्षा अधिक काळजी फडणवीस सरकार घेत आहे. कोपर्डी घटनेतील पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी काम केले गेले आहे. तसेच, आरोपींना फासावर लटकवेपर्यंत सरकार शांत बसणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे व याकामी सर्वांनी एकत्र येऊन एकजूट दाखविण्याचे आवाहनदेखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले होते.

सर्वोत्तम सरकारी वकील उज्ज्वल निकम हे त्या खटल्याचे काम पाहात आहेत. स्वत: निकम यांनीच नोव्हेंबरमध्येच निकाल लागेल असे म्हटलेले असताना खासदार सुळे यांनी या विषयाला आता वेगळे वळण देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु, राष्ट्रवादी काँग्रसविषयी लोकांची गेलेली सहानुभूती अशा घटनेच्या माध्यमातून परत मिळविण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांनी केलेली ही केविलवाणी धडपड वाटते, असेही खासदार काकडे यांनी सांगितले.

सर्वसामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर भीमआर्मी संघटना लढा उभारणार

0

पुणे-भीमआर्मी हि आंबेडकरी चळवळीतील आक्रमक संघटना असून युवक , विद्यार्थी , महिला वर्ग तसेच आंबेडकरी विचारांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचत आहे . येणाऱ्या काळात सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर लढा उभा करणार असल्याचे मत भीमआर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी संघटनेच्या विविध शाखांच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले .

पुणे शहरातील कात्रज , आंबेगाव , सूर्या चौक , वारजे माळवाडी , कामगार पुतळा , विश्रांतवाडी , मुंढवा , केशवनगर तसेच मंगळवार पेठ या विविध भागात  भीमआर्मी संघटनेच्या शाखांची उद्घाटने झाली . त्यावेळी भीमआर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ बोलत होते .

यावेळी भीमआर्मी संघटनेचे  महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे , महिला आघाडी महाराष्ट्र प्रमुख कविता पवार यावेळी शाखांची उदघाटने झाली . यावेळी भीम आर्मी संघटनेचे  महाराष्ट्र सरचिटणीस विजय कांबळे , संघटक मनोहर वावळे , कैलास पगारे , केतन पगारे , ऍड. रत्नाकर ढावरे , नेहा शिंदे , वर्षा काळे , सर्जेराव कांबळे , राजू कांबळे, अमोल मेडामे , सुनील गायकवाड, प्रिती पिल्ले, राहुल शिंदे , सीताराम गंगावणे   व अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .

या कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले . तर आभार बाळू गायकवाड यांनी मानले . यावेळी भीमआर्मी संघटनेचे सुनील बेंगळे   ,  विवेक सावंत , नागेश गायकवाड , राकेश साबळे , शरद घोडके , दीपक बलाढे , आप्पा आखाडे , मुकेश गायकवाड ,  विक्की जावळे , सचिन शेरखाने  आदी उपस्थित होते .

​वाचक प्रेरणा दिनानिमित्त अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुलच्या डिजिटल लायब्ररी तील प्रोजेक्टरचे उदघाटन

0
पुणे :
‘वाचक प्रेरणा दिन ‘निमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल-ज्युनियर कॉलेज च्या डिजिटल लायब्ररी मधील प्रोजेक्टर चे उदघाटन जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे ,उपशिक्षणाधिकारी डॉ कारेकर यांच्या हस्ते झाले . अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ .पी . ए . इनामदार होते . प्राचार्य परवीन शेख ,ग्रंथपाल आस्मा शेख यांनी स्वागत केले . पुस्तकांचे प्रदर्शन देखील भरविण्यात आले होते . विद्यार्थ्यांनी वाचन प्रतिज्ञा घेतली .

वीजग्राहकांकडून सेवाजोडणी शुल्क व मीटर आकारासाठी वसूल केलेली रक्कम महावितरण परत करणार

0

मुंबई, दि. 17 ऑक्टोबर 2017 : वीजग्राहकांकडून दि. 20 जानेवारी 2005 ते 30 एप्रिल 2007 या कालावधीत सेवाजोडणी आकार (सर्व्हिस लाईन चार्जेस) व मीटर आकारापोटी वसूल केलेली रक्कम वीजग्राहकांना परत करण्याची प्रक्रिया महावितरणने सुरू केली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ग्राहकांकडून दि. 20 जानेवारी 2005 ते 30 एप्रिल 2007 या कालावधीची सेवाजोडणी आकार व मीटर आकार यापोटी वसूल केलेली रक्कम व्याजासह ग्राहकांना परत करण्याबाबत आदेशित केले होते. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार महावितरणने ही रक्कम व्याजासह परत करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ग्राहकांना ही रक्कम वीजदेयकात समायोजित करून मिळणार आहे. सविस्तर माहिती असलेले याबाबतचे परिपत्रक महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

दिवाळीत शेतकऱ्यांना गायींची भेट !

0
पुणे :
दिवाळीच्या  सणाचा  मुहूर्त साधून रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड च्या वतीने मुळशी तालुक्यातील होतले गावी शेतकऱ्यांना ८ गायीं भेट देण्यात आल्या .  वसुबारसेच्या दिवशी हा उपक्रम करण्यात आला . येत्या महिन्यात एकूण २५ गायी दान करण्यात येणार आहेत . या गावात रोटरीचा उत्तम गोठा बांधकाम , अद्ययावत गोपालन प्रशिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प सुरु आहे . या प्रकल्पांतर्गत या गायी देण्यात आल्या .
रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड चे अध्यक्ष अशोक भंडारी ,प्रोजेक्ट चेअरमन सुरेश नारके ,मिलिंद बिवलकर ,अनिता पंडित ,श्रीकांत पाटणकर ,सतीश खाडे उपस्थित होते

ही नरकासुराची कथा !

0
महात्मा बळीची कथा जशी धुसर करत नेली गेली तशीच नरकासुराचीसुद्धा गत आहे. नरकासुराची कथा अवतरते महाभारतात व नंतर विस्तृत स्वरुपात हरीवंशात. आधी आपण नरकासुराच्या उपलब्ध काहे कथांचा आढावा घेऊ!
भागवतानुसार नरकासूर हा भुदेवीचा पुत्र होता. बाणासुराच्या सहकार्याने त्याने प्राग्ज्योतिषपुरचा (आसाम) राजा घटकासुराला हटवून स्वत:चे राज्य स्थापन केले. विष्णुचा एक भविष्यातील अवतार नरकासुरास नष्ट करेल अशी भविष्यवाणी असल्याने भुदेवीने विष्णुचीच प्रार्थना करून त्याच्यासाठी दिर्घायुष्य आणि तो सर्वशक्तीमान असावा असे वरदान मागितले. शक्तीने उन्मत्त झालेल्या नरकासुराने सरळ स्वर्गाकडेच मोर्चा वळवला आणि देवांना पळवून लावले. अशा रितीने नरकासूर स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला व त्याने पराजित केलेल्या सर्व राजांच्या १६००० राजकन्यांना पळवून प्राग्ज्योतिषपूर येथे बंदिवासात ठेवले. सर्व भयभीत देव मग विष्णुकडे गेले व या आपत्तिपासून सुटकारा मागितला. विष्णुने आपण नरकासुराला दिर्घायुष्य दिले असल्याने कृष्णावताराच्या वेळीस त्याला ठार मारू असे देवांनाही वरदान दिले. नरकासुराचा जन्म वराह अवताराच्या वेळीस झाला असेही ही कथा म्हणते. वराहानंतर कृष्ण अवतारापर्यंत किती कालावधी लोटला आणि मधे किती अवतार झाले याची कल्पना करा! तोवर विष्णुने देवांना स्वर्गाबाहेरच ठेवले, मधल्या, रामावतारानेही काहीच केले नाही असेच ही कथा सुचवत नाही काय?
कृष्णाला नरकासुराबाबत मात्र काहीच माहित नव्हते. त्याला नरकासुराच्या स्त्रीयांवरील अन्यायाची माहिती सत्यभामेकडून समजली. माहिती समजताच कृष्णाने गरुडावर बसून प्राग्ज्योतिषपुरच्या नरकासुराच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. नरकासुरही ११ अक्षौहिन्यांचे सैन्य घेऊन कृष्णावर तुटून पडला. पण शेवटी कृष्णाने सुदर्शन चक्राने त्याचे मस्तक उडवले. मरण्यापुर्वी नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला कि आपल्या मृत्युदिवसाचे स्मरण पृथ्वीतलावरील लोकांनी विशेष दिपप्रज्वलन करून सण साजरा करून करावे. त्या स्मृतिदिनालाच आपण नरक चतुर्दशी समजतो.
याच कथेची वेगळ्या स्वरुपात अजून एक आवृत्ती येते. नरकासुराशीच्या युद्धात कृष्ण जखमी होऊन बेशुद्ध पडला. यामुळे संतप्त सत्यभामेने दुप्पट आवेशाने युद्ध केले व त्यात अखेरीस नरकासूर ठार झाला. येथेही मरण्यापुर्वी त्याने सत्यभामेकडे वरीलप्रमाणेच वरदान मागितले. म्हणजे नेमके कोणाकडुन नरकासुराला मारलेले दाखवावे याचा संभ्रम पुराणकथाकारांच्याही मनात होता.
नरकासुराने बंदीवासात ठेवलेल्या या सोळा हजार स्त्रीयांशी नंतर कृष्णानेच विवाह केला असे मानले जाते! या राजकन्या कोणाच्या राजांच्या व कोठकोठल्या होत्या याचा उल्लेख नाही आणि किती काळ त्या बंदीवासात होत्या याचाही उल्लेख नाही! कारंण नरकासुराने (ही कथा खरी मानली तर हजारो वर्ष राज्य केले!) बरे, सर्व पृथ्वीवर त्याचे राज्य असते तर रामाचे, रावणाचे कौरवांचे, जरासंघाचे अणि जनकादि अन्य शेकडो राजांचे राज्य भारतात कोठून आले असते? एवतेव ही भाकडकथा नरक चतुर्दशी साजरी होण्याचे खरे कारण विकृत बनवण्यासाठी बनवण्यात आलीय हे उघड आहे.
ही झाली पुराणकथा. शाप-वरदानकथा भाकड असतात व सणांचे स्पष्टीकरण देण्यासाठी अथवा जुने माहात्म्य पुसट करण्यासाठी बनवलेल्या असतात हे उघड आहे. मिथके तयार करून इतिहास धुसर केला जातो. वैदिक त्यात किती चतूर होते हे सर्वांना माहितच आहे. मुख्यत्वे या कथेकडे असूर आणि वैदिक संस्कृतीतील संघर्षातुन पहावे लागते. वैदिक साहित्यात पुर्वेकडील व दक्षीणेकडील सर्व प्रदेश असुरांनीच व्यापला असल्याचे म्हटले आहे. (शतपथ ब्राह्मण). कामरुप हे शाक्त तांत्रिकांचे एक पुरातन केंद्रस्थान होते. नरकासूर आणि कामाख्याची एक कथा भ्रष्ट स्वरुपात आजही अवशिष्ट आहे. ती पाहता तो शक्तीभक्त होता यात शंका राहत नाही. त्याला भुदेवीचा पुत्र दाखवून तेवढे स्मरण पुराणकारांनी ठेवले. (भुदेवी शक्तीचेच एक स्वरुप आहे) महाभारत युद्धात नरकासुराचा पुत्र भगदत्त कौरवांच्या बाजुने लढला असे म्हटलेले आहे. पण महाभारत आजच्या रुपात बनले तेच मुळात चवथ्या शतकात आणि हरिवंश लिहिले गेले ते सहाव्या-सातव्या शतकात. महाभारतात जवळपास आशिया खंडातील सर्वच राजे या ना त्या बाजुने सामील झाले होते असे लिहिलेले आहे. त्यामुळे ते ऐतिहासिक मानता येत नाही.
कृष्णाचे म्हणावे तर आईच्या बाजुने तोही असुरच होता. पित्याची बाजू स्पष्ट होत नसली तरी तीही असुरच असण्याची शक्यता आहे. बाणासुराच्या राज्यातील असूर कन्यकांशी विवाह करायला यादव गणातील किती तरुण धावले व खुद्ध बाणासुराच्या कन्येशी, उषेशी, कृष्णपुत्र अनिरुद्धाने कसा विवाह केला याचे वर्णन महाभारतातच येते. कृष्णाचे वैदिकीकरण करतांनाही मिथके जोडली तरी मुळचे वास्तव लपवता आले नाही. बाणासूर महात्मा बळीचा पुत्र मानला जातो व तोही महान शिवभक्त होता. बाणासुराचा बळीशी का संबंध जोडला हे अनाकलनीय असले तरी असुरश्रेष्ठांना बदनाम करण्यातील मोहिमेचा भ्रष्ट कथा बनवणे हा एक भाग आहे असे स्पष्टपणे म्हणता येते. थोडक्यात पुराणकथांनी नरकासुराला बदनाम करत मुळचे नरकासुराचे रुप विकृत केले आहे. असे असले तरी त्याच्या नांवाचा विशेष दिवस प्रतिवर्षी साजरा होतो, त्यात खंड पडलेला नाही व असे का याच्या स्पष्टीकरणासाठीच मरण्यापुर्वी ’त्याने तसे वरदानच मागितले होत” अशा स्पष्टीकरण कथा नंतर बनवल्या गेल्यात हे उघड आहे.
प्रत्यक्षात आसाममध्ये आजही नरकासुराचा सांस्कृतिक जीवनावर मोठा प्रभाव आहे. कामरुपावर सत्ता गाजवणा-या अनेक घराण्यांनी आपला पुर्वज नरकासुरास मानले आहे. गौहत्तीच्या  दक्षीणेकडील एका पर्वतास त्याचे नांव आहे. कामाख्या मंदिराशी नरकासुराच्या अनेक दंतकथा (चांगल्या अर्थाने) निगडित आहेत.
म्हणजे, कधीही झाला असो, असूर शैव संस्कृती प्रबळ असण्याच्या काळात आसाममद्धे नरकासूर होऊन गेला असावा. पुर्वेकडील बालेय देश (म्हणजे बळीवंशाने स्थापन केलेली राज्ये) व त्याहीपलीकडील असुरांचीच राज्ये ही वैदिक धर्माच्या प्रसाराला अडथळा होती. त्याबाबत अनेक तक्रारी शतपथ व ऐतरेय ब्राह्मणात नोंदवलेल्या दिसतात. पण नरकासुराचे नांव या दोन्ही ब्राह्मणांत येत नाही. येते ते उत्तरकालीन साधनांत व विपर्यस्त स्वरुपात. त्याच्या मृत्युशी कृष्णाचा संबंध, अगदी कथात्मक का होईना जोडणे, अनैतिहासिक आहे कारण मुळात त्या युद्धाची कथाच दोन वेगवेगळ्या रुपात येते. ती खरी असती तर अशी वेगळी संस्करणे दिसली नसती.
म्हणजेच असले युद्ध काही झाले नाही. नरकासुराला कोणी युद्धात मारले नाही. त्याला कोणी भविष्यातील अवतार घेईपर्यंत निरंकुश राज्य करण्याचे दिर्घायुष्याचे वरदानही दिले नव्हते कि त्याच्या नांवाने कोणता तरी सण लोक साजरा करतील असे विधानही केले नव्हते. कीर्तिवंत नीतिमान असूरश्रेष्ठ म्हणुनच लोकांनी स्वयंस्फुर्तीने त्याला बळीसोबतच त्याचे माहात्म्य दिले. स्वर्गाचा त्याने पराभव केला म्हणजे वैदिकांचा पराभव केला एवढाच मिथ्थकथेचा अर्थ. त्याचे राज्य कामरुपापर्यंत मर्यादित होते. तो बाणासुराचा समकालीन असू शकतो, पण भाकड पुराणकथांतून तसा ठाम निष्कर्श काढता येत नाही.
नरकासूराचा संबंध “नरक” या पापी मृतात्म्यांना यातना देण-या लोकाच्या नांवाशी जोडला जातो. मुळात “नरक” या शब्दाची संस्कृतात कोणतीही व्युत्पत्ती नाही. यास्कानेही ती केलेली नाही. हा शब्द मुळचा संस्कृतातील नाही असे स्पष्ट दिसते. तरीही मोठ्या कष्टाने ती शोधण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला आहे. Comparative etymological Dictionary of classical Indo-European languages (Rendich Franco) मद्ध्ये “क” म्हणजे प्रकाश. आनंद. उत्साह. (मूळ धातू “काश” धातुपासून अर्धांग का घेतले तर.)
नर म्हणजे माणुस व अक हा शब्द लागून नरक…म्हणजे आनंदविहिन माणूस असा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला आहे. याचा व नरकाच्या वर्णनाशी काही संबंध नाही हे उघड आहे. खरे तर त्याने नर+क=आनंदी-उत्साही माणुस असा अर्थ का घेतला नाही? कि नरक हा शब्द्च मृत्युशी जोडला गेल्याने नाईलाजाने त्याने तसे केले? खरे तर नरकचतुर्दशी लोक आनंदानेच साजरा करतात तेंव्हा ’नर+क=आनंदी-उत्साही माणुस’ अशीच व्युत्पत्ती घेणे योग्य नाही काय?
थोडक्यात नरकासूर ही एक ऐतिहासिक, दंतकथा बनलेली पण महान, व्यक्ती असावी. आसाममद्ध्ये राज्य करत असतांनाही देशव्यापी किर्ती त्याने निर्माण केली, इतकी कि आजही आपण देशभर नरकासुराचे स्मरण करतो, भलेही ते वैदिक कलमांमुळे विपर्यस्त स्वरुपात असो! शिव-शक्तीच्या या देशातील पुरातन आगमिक संस्कृतीने आपले अस्तित्व निरपवाद टिकवले आहे. प्रश्न फक्त त्यांवरील वैदिक पुटे काढण्याचा आहे. आणि यांच्या भोंगळ कथांत एवढ्या विसंगत्या आहेत कि ते सहजशक्यही आहे. नरकासुराच्या पाठोपाठ आपण महात्मा बळीचे पुजन करतो…नववर्ष सुरू करतो ते उगीच नाही. वैदिक धर्मसंस्कृतीचा हिंदुंवरील प्रभाव असला तर तो फक्त भोंगळ कथात्मक आहे. बाकी आगमिक संस्कृतीचा प्रवाह अव्याहत आजही वहात राहिलेला आहे व पुढेही वहात राहील.
लेखक -संजय सोनवणी

सीबीएसई क्लस्टर फुटबॉल स्पर्धा संपन्न

0

पिंपरी :-मुलांच्या सीबीएसई क्लस्टर फुटबॉल स्पर्धा २०१७ नुकतीच पिंपरी येथे संपन्न झाली. १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली.  अंडर १७ची फायनल ट्रॉफी नेव्ही चिल्ड्रेन स्कूल मुंबईने तर अंडर १९ ची फायनल ट्रॉफी रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांनी जिंकली.

यात अंडर १७ चे ७९ संघ आणि अंडर १९चे ३८ संघ असे एकूण ११७ संघ यात सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील आणि गोव्यातील सीबीएसईच्या शाळांचा समावेश आहे.गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल या स्पर्धेचे यजमानपद भूषवले असून ते या स्पर्धेत सहभागी देखील झाले.

अंडर १७ गटात अटीतटीच्या या लढतीत नेव्ही चिल्ड्रेन स्कूलने ४-२ अशा फरकाने आर्मी पब्लिक स्कूलला तर अंडर १९ गटात मध्ये जोसेफ हायस्कूल पनवेल ला ३-० रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांनी मात दिली.

अंडर १७ गटात नेव्ही चिल्ड्रेन स्कूलच्या रोहित पांडे याला तर अंडर १९च्या गटात रायन इंटरनॅशनल स्कूलच्या  सिद्धार्थ येवले याला सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले.

यावेळी टेबल टेनिस विजेते भूषण ठाकूर, बुद्धीबळ ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, सीबीएसई बोर्डाचे अधिकारी  दीपक म्हेत्रे, रवी पिल्लई तसेच गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती भागवानी देखील या प्रसंगी उपस्थित होते.

कोल्हापूरच्या रेश्मा माने ची पोलंड येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड

0
पुणे-  21 ते 26 नोव्हेंबर पोलंड येथे होणाऱ्या 23 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी लक्ष्य व कांतीलाल लुंकड फाऊंडेशन यांचा पाठिंबा लाभलेल्या महाराष्ट्राच्या रेश्मा माने हीची 63 किलो महिला कुस्तीप्रकारात निवड झाली आहे.
याआधी लखनऊ येथे पार पडलेल्या चाचणी स्पर्धेत हरियाणाच्या पुजाचा10-0 असा पराभव केला.
रेश्मा माने कोल्हापूर च्या शाहू विजय गंगावेश तालीम येथे वस्ताद विश्वास (दादा) हारुगले व तानाजी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

पिंपळे गुरवमधील दिवाळी पहाटमध्ये रसिक मंत्रमुग्ध

0
आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचच्या वतीने दिपावली संगीत महोत्सवाचे आयोजन
पिंपरी / प्रतिनिधी
जय जय राम कृष्ण हारी…., रुप पाहता लोचनी…, काया ही पंढरी…., ज्ञानियांचा राजा गुरु महाराज…, नाव किनारे लगाओ प्रभूजी…, मन कर मोह तू रे हरी भजन को मान रे…, आनंदाचे डोही आनंद तरंग…, देहूला जावून देह विसरावा…, आदी गीतांनी पिपळेगुरवकर संगीत रसिक मंत्रमुग्ध झाले.
     पिंपळे गुरव येथील नाट्यसम्राट निळूभाऊ फुले नाट्यगृहामध्ये आमदार लक्ष्मण जगताप सांस्कृतिक कला मंचच्या वतीने दिपावली संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने हाजेरी लावली. याप्रसंगी ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, ह प्रभाग अध्यक्ष अबंरनाथ कांबळे, नगरसेवक नवनाथ जगताप, सागर अंगोळकर, नगरसेविका उषा मुंडे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले, चंदा लोखंडे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे आदी उपस्थित होते.
           नाट्यगृहामध्ये प्रथमच पं.  सुधाकर चव्हाण यांनी संत एकनाथ , संत ज्ञानेश्वर, संत कबीर, संत मीराबाईंच्या संतवाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांना प्रभाकर पांडव (हार्मोनियम), नंदकिशोर ढोरे (तबला), गंभीर महाराज (पखवाज) यांनी साथसंगत केली. नामदेव तळपे यांनी सुत्रसंचलन केले.

महेंद्रचे काम तरुणांना प्रेरणादायी : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : घरातील बिकट परिस्थितीवर मात करून मंगोलिया येथे झालेल्या जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलेल्या महेंद्रचे काम सध्याच्या तरुणांना प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या महेंद्र चव्हाण याला  पालकमंत्री गिरीश बापट यांनी १ लाख रुपये देवून सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.

पालकमंत्री म्हणाले, मुळचे चिपळूण तालुक्यातील तळसर येथे राहणाऱ्या महेंद्रचे आई वडील अपंग आहेत. त्याचबरोबर त्याची घरची परिस्थिती बिकट होती. अशा परिस्थितीत महेंद्र पुण्यात त्याच्या नातेवाईकांकडे राहण्यास आला. येथे आल्यानंतर त्याने सिंहगड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेल मध्ये काम केल.

याकाळात तो या हॉटेल मध्येच राहत असे. त्यानंतर त्याला जनता वसाहतीत राहण्यासाठी थोडी जागा मिळाली. त्यानंतर त्याने बांधकाम मजूर म्हणून काम सुरु केल. लहान पानापासून त्याला व्यायामाची आवड असल्याने तो शरीरसौष्ठव या क्रिडा प्रकाराकडे आकर्षिला गेला. बांधकामावर दगड विटा उचलून तो वेटलिफ्टिंग करत होता. आज पर्यंत त्याला विविध स्पर्धेत २०० हून अधिक बक्षीस मिळाले आहेत.

जागतिक स्पर्धेत यश मिळवल्यानंतर त्याचा पुणेकरांकडून योग्य सत्कार झाला नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी त्याला पुढील आयुष्यासाठी उपयोगी म्हणून १ लाख रुपये देत असल्याचे सांगितले. ही सुरुवात असून भविष्यात राज्य पातळीवर तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून आणखी मदत करण्याच आश्वासन त्यांनी दिले.  अत्यंत कठीण परिस्थितीत महेंद्रने मिळवलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद आहे. असं ही ते म्हणाले.

यावेळी बोलताना महेंद्र चव्हाण म्हणाला, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर जो आज सत्कार होत आहे. या सत्काराने मी भारावून गेलो आहे. स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवल्यानंतर माझ्या साठी राष्ट्रगीत वाजवण्यात आलं तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. स्पर्धेचा अनुभव सांगताना तो म्हणाला, या स्पर्धेत जवळपास ४० देशांच्या ५०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता.

त्यामुळे ही स्पर्धा कठीण होती. पण मला माझ्यावर आत्मविश्वास होता. मला मिळालेल्या या यशाला शॉर्टकट नाही असे सांगत त्याने या यशा पाठीमागे  गेल्या १५ वर्षाची मेहनत असल्याचे सांगितले.

जिल्हा क्रिडा अधिकारी विजय संतान यांनी महेंद्र ला जिल्हा प्रशासनामार्फत मदत करण्याचे आश्वासन दिले.

हिंजेवाडीच्या रॅडिसन ब्लूने पटकविला प्रतिष्ठित कौस्तभ पुरस्कार

0

पुणे: या वर्षीच्या इंडिया एमआयसीई अवॉर्ड्स २०१७ मध्ये हिंजेवाडीच्या रॅडिसन बलूला ‘बेस्ट बिझनेस हॉटेल – वेस्ट इंडिया’ हा पुरस्कार मिळाला. ट्रॅव्हटूरने होस्ट केलेल्या या कार्यक्रमात अप्रतिम सादरीकरण व आपल्या उत्तम बिझनेस हॉटेल स्टँडर्ड्ससाठी रॅडिसन ब्लुला या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात संपर्पण आणि वचनबद्धतेने कार्यरत असलेल्या नेतृत्त्वांना त्यांच्या अथक परिश्रमाबद्धल इंडिया एमआयसीई अवॉर्ड्स सन्मानित करते.

माजी केंद्रीय पर्यटन मंत्री कुमारी सेलजा व माजी पर्यटन कॅबिनेट मंत्री सुबोध कांत सहाय सारखे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील दिग्गज या कार्यक्रमावेळी हजर होते.

यावेळी रॅडिसन ब्लूचे जनरल मॅनेजर, पंकज सक्सेना म्हणाले की, “आमच्या ग्राहकांना एक अद्वितीय अनुभव देणारी सेवा देणे हे आमचे ध्येय आहे. आमच्या हॉटेलला ‘बेस्ट बिझनेस हॉटेल – वेस्ट इंडिया’ या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कारांने सन्मानित केल्याचे समजताच मला खूप आनंद झाला. ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाची सेवा मिळत राहावी यासाठी आम्ही नेहमीच प्रत्यनशील राहु”

महापालिका सभागृहात उसळले जोश (पहा व्हिडीओ)

0

 

पुणे-राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने ‘भाजपचे गुंड ‘असा उल्लेख करताच त्याचे वाक्य पूर्ण न होऊ देता महापालिका सभागृहात जो गोंधळ उडाला आणि या गोंधळातच  भाजपच्या आणखी तरुणाने विरोधीपक्षनेते यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याच्या संशयाने काही मिनिटे सभागृहात वातावरण तप्त झाले होते. राजकीय गोंधळाला वैमनस्याचे स्वरूप येते कि काय ? अशी शंका येण्याजोगी  परिस्थिती बिघडली .अरविंद शिंदे, श्रीनाथ भिमाले, गोपाळ चिंतल ,मुरलीधर मोहोळ, प्रशांत जगताप ,अविनाश बागवे आदींनी अखेर उडू पाहणाऱ्या भडक्यावर पाणी शिंपडून या तप्त वातावरणाची अखेर केली … नेमके काय झाले ? विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना कोण काय म्हणाले ? असे प्रश्न या वातावरणात निर्माण झाले होते .
महापालिकेची मुख्यसभा आज वसूबारस असूनही सुरु झाली होती. सुरुवातीलाच राष्ट्रवादी सह कॉंग्रेस, भाजपा, सेना साऱ्यांचाच एकमताने ज्या प्रश्नावर आक्षेप होता ..तो प्रश्न म्हणजे .. सुमारे ४० कोटीहून अधिक थकबाकी असूनही मोबाईल कंपन्यांच्या टॉवरला , त्यासाठी रस्ते खोदाईला प्रशासन का मान्यता देते ?यावर सुरुवातीला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने आंदोलन केले . आणि नंतर आपल्या जागेवर सभासद जावून बसले…. याच प्रश्नावर चर्चा चालू असताना राष्ट्रवादीचे नगरसेवक महेंद्र पठारे महापौरांच्या परवानगीने बोलायला उभे राहिले . .. माझ्या भागात रिलायन्सचे अधिकारी आणि एक भाजपचा गुंड पोलीस संरक्षणात ….. एवढेच वाक्य त्यांचे अर्धवट झाले आणि … भाजपच्या नगरसेवकांनी त्यास आक्षेप घेतला. पठारेंना माफी मागायला लावा अशी मागणी श्रीनाथ भिमाले आणि गोपाळ चिंतल यांच्यासह अनेकांनी केली . यावर राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि विपक्षनेते पठारे यांच्याकडे जावून त्यांना याबाबत विचारणा करत असताना कॉंग्रेसच्या अरविंद शिंदे यांनी … शब्द कामकाजातून वगळून टाका महापौर  .. अशी सूचना केली . पण पुढे गोंधळ वाढतच गेला … आणि या गोंधळात कोणी ? कोणाला ? अपशब्द वापरले आणि पुढे सुरु झाले वाकयुद्ध …घोषणाबाजी .. लठ्ठालठ्ठी … विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील प्रथमच एवढे सभागृहात संतापलेले दिसले .. आणि त्यांचा यावेळी प्रतिस्पर्धी  जाणवत होता तो .. एक तरुण नगरसेवक .. भाजपचे दीपक पोटे.. ही बाब  लक्षात येताच .. भिमाले , मोहोळ, अरविंद शिंदे ,गोपाळ चिंतल अविनाश बागवे आणि प्रशांत जगताप यांनी हा सारा प्रकार सभागृहात  तरी यशस्वीपणे थांबविला … त्यानंतर काही वेळाने थकबाकीदार असलेल्या मोबाईल कंपन्यांच्या खोदाईला विरोध करणाऱ्या आपल्या भाषणातही या प्रसंगाचा उल्लेख केल्यावाचून
बाबुराव चांदेरे ,सुभाष जगताप यांना राहवले नाही . पहा ही वसू बारस दिनी झालेली महापालिकेची मुख्यसभा .

ओम दळवी मेमोरिअल करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत धरणीधर मिश्राला दुहेरी मुकूट

0

पुणे:  ओम दळवी मेमोरिअल ट्रस्ट यांच्या तर्फे ओम दळवी मेमोरिअल  करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत धरणीधर मिश्रा याने पुरुष एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला. तर, हौशी दुहेरी गटात जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल यांनी विजेतेपद पटकावले.

महाराष्ट्र पोलिस मोटर ट्रान्सपोर्ट डिव्हिजन टेनिस जिमखाना, परिहार चौक, औंध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत पुरुष एकेरी गटात अंतिम फेरीत अव्वल मानांकीत धरणीधर मिश्राने दुस-या मानांकीत पार्थ चिवटेचा 9-0 असा सहज पराभव करत विजेतेपद संपादन केले. याआधी उपांत्य फेरीत अव्वल मानांकीत धरणीधरने वेंकी आचार्यचा 9-3 असा पराभव केला.

पुरुष दुहेरी गटात अंतिम फेरीत धरणीधर मिश्राने आकाश खैफच्या साथीत मंदार वाकणकर व रोहित शिंदे या जोडीचा 6-3, 6-2 असा पराभव करत एकेरी गटांतील विजेतेपदाबरोबरच या गटाचेही विजेतेपद राखले. उपांत्य फेरीत धरणीधर मिश्रा व आकाश खैफ यांनी बालाजी इरकल व संतोष एन यांचा 9-1 असा पराभव केला.

हौशी दुहेरी गटात अंतिम फेरीच्या लढतीत जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल यांनी नितिन सावंत व रोहन यांचा 6-1, 6-3 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत जॉय बॅनर्जी व राजेश मित्तल या जोडीने संग्राम सावंत व पारी एस यांचा 6-0, 6-0 असा पराभव केला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक पारितोषिक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मछिंद्र बनसोडे व मारुती राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पुरुष एकेरी गट:  उपांत्य फेरी: 

धरणीधर मिश्रा(1)वि.वि.वेंकी आचार्य 9-3;

पार्थ चिवटे(2)वि.वि.संतोष कुरळे (4)9-5;

अंतिम फेरी- धरणीधर मिश्रा(1)वि.वि.पार्थ चिवटे(2)9-0;

पुरुष दुहेरी गट: उपांत्य फेरी: 

मंदार वाकणकर/रोहित शिंदे वि.वि.राकेश झडपे/रोहित कुरडे 9-1;

धरणीधर मिश्रा/ आकाश खैफ वि.वि.बालाजी इरकल/संतोष एन 9-1;

अंतिम फेरी- धरणीधर मिश्रा/ आकाश खैफ वि.वि.मंदार वाकणकर/रोहित शिंदे 6-3, 6-2;

हौशी दुहेरी गट: उपांत्य फेरी:

जॉय बॅनर्जी/राजेश मित्तल वि.वि संग्राम सावंत/पारी एस. 6-0, 6-0;

नितीन सावंत/रोहन वि.वि.रवी कोठारी/अनिल कोठारी 6-3, 6-1;

अंतिम फेरी- जॉय बॅनर्जी/राजेश मित्तल वि.वि.नितीन सावंत/रोहन 6-1, 6-3.