Home Blog Page 322

प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,  दि. ७  : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल मॅपवर पाहता येणार आहे. प्रवाश्यांच्या वेळेची बचत करुन त्यांच्या सुलभ प्रवाशांच्या दृष्टीने ही एक उपयुक्त सुविधा उपलब्ध होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

गुगल मॅपवर बसमार्गाची माहिती या प्रणालीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना यांच्यासह संबंधित उपस्थित होते.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वेळी कोणती बस उपलब्ध होईल, ती बस मिळण्याची अचूक वेळ या गोष्टी सहजतेने आता उपलब्ध असणार आहेत, ज्यामुळे प्रवाश्यांच्या वेळेची बचत होईल आणि सोयीस्कर प्रवास करणे त्यांना शक्य होणार आहे. बेस्ट आणि गुगल मॅप यांच्यातील हे सहकार्य मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीच्या गुणवत्तापूर्ण सुविधेच्या दिशेने  एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या सुविधेमुळे ‘बेस्ट’च्या ग्राहकांच्या संख्येतही वाढ होईल. प्रवाश्यांना  या सुविधेचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी प्रत्येक बसस्थानकावर या सुविधेबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध करुन द्यावी,असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या डिजिटल उपक्रमाचे स्वागत केले आणि त्याचे कौतुक केले.

‘बेस्ट’चे महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हणाले, गुगल मॅपसोबतच्या सहकार्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या प्रवासाची आखणी अधिक सोप्या आणि सोयीस्कर पद्धतीने करता येणार आहे.” या सहकार्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरच बस कुठे आहे, किती वेळात येईल, विलंब झाला आहे का, याची माहिती मिळणार आहे. गुगल मॅपवर ही माहिती हिरव्या आणि लाल रंगात दाखवली जाईल.  हिरवा रंग वेळेत येणाऱ्या तर लाल रंग उशीर होणाऱ्या बसेस दर्शवेल.गुगल मॅप्सच्या भारत प्रमुख रोलि अग्रवाल म्हणाल्या, बेस्टसोबतच्या या सहकार्यामुळे आम्ही मुंबईतील प्रवाशांना रिअल-टाईम सार्वजनिक वाहतूक माहिती देण्यास सक्षम झालो आहोत. सार्वजनिक वाहतुकीची अचूक आणि संपूर्ण माहिती देणे हे गुगल मॅप्सचे प्राधान्य आहे आणि हे सहकार्य त्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

हा उपक्रम गुगलच्या भारतभरातील सार्वजनिक वाहतुकीची माहिती सुधारण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. सध्या गुगलने भारतातील १५ पेक्षा अधिक शहरांमध्ये मेट्रो, ट्रेन, बस यांसारख्या वाहतूक सेवांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा मराठी व हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गुगल मॅपच्या सेटिंग्जमध्ये किंवा फोनच्या भाषेच्या सेटिंग्जमध्ये जाऊन वापरकर्ता आपली भाषा निवडू शकतो.

महाव्यवस्थापक एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सविस्तर सादरीकरण केले.

प्रवाशांनी रिअल-टाईम बस माहिती पाहण्यासाठी ही पद्धत वापरावी:

एखाद्या बस स्टॉपसाठी सर्च करूनही रिअल-टाईम बस माहिती पाहता येईल.

आपल्या Android किंवा iOS डिव्हाईसवर Google Maps अ‍ॅप उघडा.

आपल्या प्रवासाचे गंतव्यस्थान टाका आणि ‘Go’ आयकॉनवर क्लिक करा.

ट्रामच्या चिन्हावर टॅप करून ‘Public Transport’ मोड निवडा.

सुचवलेली सेवा निवडून बसचे थांबे आणि रिअल-टाईम माहिती तपासा.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाक कडून बेछूट गोळीबार; पूंछमध्ये ४ मुलांसह ११ जणांचा मृत्यू


जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याकडून सुरू असलेल्या गोळीबारात बुधवारी ११ जणांचा मृत्यू झाला असून यात चार लहान मुलांचाही समावेश आहे.तर जवळपास ४० लोक जखमी असल्याची माहिती मिळत आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते. मात्र बुधवारी झालेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या गोळीबाराची तीव्रता वाढली आहे.

काश्मीर खोऱ्यातील उरी आणि तंगधार सेक्टरमध्येही गोळीबार आणि तोफगोळ्यांचा आवाज ऐकू येत आहे. जम्मूतील पूंछ शहरात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाण, निवासी आणि सरकारी इमारतींवर तोफगोळ्यांचा मारा करण्यात येत आहे.भारताने ऑपरेशन सिंदूर राबविल्यानंतर पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराची तीव्रता वाढली असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानच्या या आगळीकीला भारतीय सैन्याकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यात शत्रूच्या अनेक चौक्या उध्वस्त झाल्या असून पाकिस्तानातही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त पीटीआयने लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पूंछमधील नियंत्रण रेषेवरील बालाकोट, मेंढर, मानकोट, कृष्णा घाडी, गुलपूर, केर्नी आणि पूंछ जिल्ह्य मुख्यालयासह अनेक भागात गोळीबार झाला. या हल्ल्यात डझनभर घरे आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने चांडक, लस्साना, सनई आणि सात्रा येथे सुरक्षित व्यवस्था उभारली असून स्थानिक लोकांना तिथे हलविले आहे.जम्मूतील पूंछ जिल्ह्यात शीख बांधव मोठ्या प्रमाणात राहतात. याठिकाणी असलेल्या गुरुद्वारावरही गोळीबार करण्यात आला आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून गुरुद्वाराचे मोठे नुकसान झाले आहे. शिरोमणी अकाली दलाने या हल्ल्याचा निषेध केला.गोळीबारात ११ जणांचा मृत्यू झाला असून त्यात दोन महिला आणि चार मुलांचा समावेश आहे. सध्याची परिस्थिती पाहता जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांना आज बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त रमेश कुमार यांनी दिले होते.

आता POK ताब्यात घ्या:बाबा रामदेव

Baba Ramdev on Operation Sindoor

ऑपरेशन सिंदूर च्या कारवाईने भारतीय लष्कराच्या या शौर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान, योगगुरू रामदेव बाबा यांनीही यावर आता प्रतिक्रिया दिली आहे. आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे, असे रामदेव म्हणाले आहेत. ते एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

रामदेव बाबा म्हणाले, “आता आपण लाहोर आणि कराचीमध्येही तिरंगा फडकवला पाहिजे. सैन्याने आपले शौर्य दाखवले आहे. त्यांनी आमच्या निष्पाप नागरिकांना मारले आणि आमच्या माता-भगिनींचे कुंकू पुसून टाकले, म्हणून आमच्या सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत त्या दहशतवाद्यांना ठार मारले.

बाबा रामदेव म्हणाले, आता आपल्या सैन्याने पीओके परत घ्यावे. आपण कराची आणि लाहोरमध्ये आपला तिरंगा फडकवला पाहिजे. पाकिस्तानात लपून बसलेल्या १०० हून अधिक दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारले आहे. दहशतवाद्यांना नरकातल्या हुरींमध्ये जाण्याची घाई होती, म्हणून सैन्याने त्यांना तिथे पाठवले.” रामदेव बाबा यांनी सिंध आणि बलुचिस्तानमध्ये उठणाऱ्या निषेधाच्या आवाजाचाही उल्लेख केला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केली जात होती. पाकिस्तानला धडा शिकवला जावा, अशी मागणी केली जात होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील भारताला समर्थन मिळत होतं. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या उच्चस्तरीय बैठका होत असताना लवकरच काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्याचं उत्तर आता मिळालं असून भारतानं पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (POJK) आणि थेट पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमीपर्यंत कारवाई करत तब्बल ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली असून त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीत एअर स्ट्राईक आणि उद्ध्वस्त झालेले दहशतवादी तळ याचीही माहिती मोदींनी राष्ट्रपतींना दिली.

ऑपरेशन सिंदूर… भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय: पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन – मंत्री चंद्रकांत पाटील

पुणे :जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ असे एकूण ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारताच्या या कारवाईनंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे पाटील यांनी म्हटले.

चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि ,पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा दलानी पुरेपूर बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तब्बल ९ तळ क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनाच्या तळांचा समावेश आहे. जिवाची बाजी लावून भारतीय सुरक्षा दलानी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. भारतीय सुरक्षा दलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत, असे पाटील यांनी म्हटले. जगातील महत्वाच्या देशांशी संवाद साधून आणि भारताची न्याय्य बाजू पटवून देत, अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन द्याव्यात-व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

पुणे, दि. 7: शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांना जलदगतीने उपलब्ध करुन नागरिकांचे जीवन अधिक सुखकर बनविण्यासाठी तसेच उपलब्ध असलेल्या ऑनलाईन सेवांमध्ये वाढ करून विभागाच्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी केले

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (6 मे) आयोजित जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र चालकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पुणे सुहास मापारी, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, पिंपरी चिंचवड तहसीलदार जयराज देशमुख, सर्वसाधारण शाखेचे तहसीलदार श्वेता पवार , नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, माहिती तंत्रज्ञान कक्षातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्री.काटकर म्हणाले, आपले सरकार सेवा केंद्र चालकांना नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी. इयत्ता दहावी व बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवेशाकरीता लागणारे दाखले विहित काल मर्यादेत उपलब्ध करून द्यावे. आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून संकेतस्थळावर कामकाज करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींबाबतची माहिती घेतली. त्यावर संबंधितांनी उचित कार्यवाही करावी. क्षमता बांधणीसाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांना विशेष प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.

नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा एकाच एकाच ठिकाणाहून मिळण्याकरीता महानगरपालिकांच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवांचासुद्धा समावेश आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्या लॉगिनला करण्यात येईल, असेही श्री. काटकर म्हणाले.

श्री. मापारी यांनी जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘सेवादूत’ उपक्रमाबाबत माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना अधिकाधिक सेवा विहित कालमर्यादेमध्ये घरपोच देण्याबाबतचे प्रशासनाचे नियोजन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरी व ग्रामीण भागात ऑपरेशन अभ्यासातंर्गत सहा ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वी -जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ७ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विधानभवन, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वनाज औद्योगिक परिसर, तळेगाव, मुळशी या सहा ठिकाणी ‘ऑपरेशन अभ्यास’ अंतर्गत मॉक ड्रिल घेण्यात आले. या सर्व ठिकाणी मॉक ड्रिल यशस्वीपणे पार पडल्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी माहिती दिली.

यावेळी विधान भवन परिसरात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, अपर आयुक्त अरुण आनंदकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, या मॉक ड्रिलमध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आला होता. सुरुवातीला भोंगा वाजविण्यात आला. त्यानंतर कृत्रिम पद्धतीने स्फोट करण्यात आला, त्यानंतर अश्रू धूराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. याप्रसंगी परिसरातील इमारतीत काही लोक अडकले होते, त्यांना एनडीआरएफच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत आरोग्य विभाग, अग्निशमन दल व नागरी संरक्षण दल यांनी समन्वयाने काम केले. यानुषंगाने सर्व उपाययोजनेत प्रतिसादाची वेळ योग्य होती. सर्व यंत्रणांनी तात्काळ प्रतिसाद दिला. आरोग्य यंत्रनेने आरोग्य सुविधा रुग्णवाहीका सेवा वेळेत उपलब्ध करुन देण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. अग्निशमन वाहनाने आपली जबाबदारी योग्य रितीने पार पाडली. मॉक ड्रिलची सर्व प्रक्रिया २५ ते ६० मिनिटात पूर्ण करण्यात आली.

ग्रामीण भागातील लोकांमध्ये या मॉक ड्रिलद्वारे जनजागृती होण्यासाठी तेथील सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक नागरिक यांनीही यात सहभाग घेतला होता. या मॉक ड्रिलमध्ये खूप कमी वेळात प्रशासनाने तयारी करुन सर्व विभागांनी आपाआपली जबाबदारी, नेमून दिलेले काम योग्य पद्धतीने पार पाडले.

विधानभवन प्रांगण, पुणे महानगरपालिका प्रशासकीय इमारत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासकीय इमारत, वनाज औद्योगिक परिसर, मुळशी पंचायत समिती आणि तळेगाव नगरपरिषद या शहरी व ग्रामीण भागात एकाच वेळी दुपारी चार वाजता मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये संरक्षण दल, नागरी संरक्षण दल, एनडीआरएफ, पोलीस, महसूल, आरोग्य, नगरपालिका, महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थान विभाग, रेड क्रॉस सोसायटी, तसेच संबंधित शासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्टीय सेवा योजनेचे विद्यार्थी, नेहरु युवा केंद्राचे विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. ही मॉक ड्रिल दक्षता म्हणून घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी सांगितले.
०००००

‘ऑपरेशन सिंदूर’ : नव्या भारताच्या सामर्थ्याचे प्रतिक !

ॲापरेशन सिंदूर’वर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया

‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतीय सैन्याची अत्यंत धाडसी, यशस्वी आणि ऐतिहासिक कारवाई आहे! दहशतवाद्यांना कठोर प्रत्युत्तर देताना सैन्याने देशाचा अभिमान आणखी वाढवला. या स्ट्राईकला ‘सिंदूर’ हे नाव देऊन आपल्या संस्कृतीचा सन्मान तर केला गेलाच, शिवाय पीडितांना न्यायही मिळवून दिला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही दलांना प्रत्युत्तर देण्यासाठी दिलेली मोकळीक सैन्यदलाचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी महत्त्वाचा धागा ठरली. नवा भारत असे भ्याड हल्ले सहन करणार नाही आणि चोख उत्तर दिल्याशिवाय स्वस्थही बसणार नाही, हे मोदी सरकारने अधोरेखित केले आहे.

स्वागतार्ह बाब म्हणजे केवळ पहलगामच नाही, तर आधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचाही बदला घेतला गेला असून ही कारवाई नव्या भारताच्या सामरिक ताकदीची आणि आत्मविश्वासाची साक्ष देणारी आहे.

“मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं…”; सयाजी शिंदे मॉक ड्रीलविषयी काय म्हणाले?

पुणे:


पहलगाम हल्लाला भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून चोख प्रत्युत्तर दिलंय. त्याबाबत आनंद आणि जल्लोष सर्वत्र होतो आहे भारताने दहशतवाद्यांचे ९ तळ उद्धवस्त केले. सध्या भारतात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचं?याविषयी नागरीकांना जागरुकता देण्यासाठी मॉक ड्रील राबवलं जात आहे. आज मुंबईत, पुण्यात हे मॉक ड्रील राबवलं जात आहे. अशातच मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे (sayaji shinde) यांनी मॉक ड्रील संदर्भात त्यांचं स्पष्ट मत दिलं आहे.

मॉक ड्रीलविषयी सयाजी शिंदे काय म्हणाले?

सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आगामी सिनेमाच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “आग लागली की विहीर खोदायला घ्यायची आणि पाणी पाहिजे असं म्हणायचं, हे कितपत सत्य होईल मला माहिती नाही. एखाद्या बिल्डिंगमध्ये आग लागली तरी माणसं खाली यायला नाही म्हणतात. नैराश्य किंवा कंटाळा हा आपला स्वभाव आहे, त्यामुळे मॉक ड्रील करून आपण जागरुक झालं पाहिजे.

“आपण मतदान नीट कुठे करतो? मतदान नीट केलं असतं तर हे झालंच नसतं ना! आपल्याकडे मतदानाची प्रकिया तरी कुठे नीट होते? यातच आपलं मूळ आहे आणि एकदा निवडून दिलं तर आपल्या हातात काय राहतं? मतदान केलं आता काय होतं ते बघत बसा एवढंच आपल्या हातात आहे. आपण काही म्हटल्याने फरक पडणार आहे का? युद्ध कधीच नाही व्हायला पाहिजे. देशात नाही किंवा राज्यातही नाही. माणूस म्हणून माणसाने माणसाकडे बघितलं पाहिजे. अशी घटना परत घडू नये म्हणून जे हवं ते करायला हवं.”

सोशल मीडियामध्ये गाजणारे छायाचित्र:विविध घोटाळ्यांतील घेऊन रथी महारथी..निवांत झालेत प्रमुख अतिथी

मुंबई- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अंजली दमानिया यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्रातल्या विविध घोटाळ्यांविरुद्ध, विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कोण रथी महारथी आहेत बघूया, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे.

अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, आमदार छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण तसेच सुनील तटकरे दिसत आहेत. यात अंजली दमानिया यांनी प्रत्येकाच्या नावासमोर घोटाळ्याचे नाव नमूद केले आहे.

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. अंजली दमानिया यांनी यापूर्वी देखील सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार तसेच सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता.

सिंचन घोटाळा

1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असे निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होते. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते.

आदर्श सोसायटी घोटाळा

अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श सोसायटी घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांवर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आदर्श सोसायटीला अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याच्या बदल्यात सासू आणि मेव्हण्याला या इमारतीत फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला होता.

महाराष्ट्र सदन घोटाळा

2005 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. छगन भुजबळ यांनी आपल्या कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिल्याचा आरोप केला गेला. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला होता. 11 जून 2015 साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमपीएल) त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांच्यासहीत एकूण 52 जणांच्या नावाचाही समावेश होता.

एविएशन घोटाळा

2008-09 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात झालेल्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाशी संबंधित कथित विमान वाहतूक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने 2019 साली समन्स बजावले होते.

पुण्यातला मटका किंग नंदू नाईकला पुन्हा अटक

पुणे-पुण्यात जुगार, मटका अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल असलेला सराईत नंदू उर्फ नंदकुमार नाईक याच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. मुंबईत गृहविभागाने आठ दिवसात ही कारवाई रद्द केल्यानंतर नागपूर कारागृहातून बाहेर पडलेला नंदू नाईकने पुन्हा मटका अड्डा सुरू केल्याचे उघडकीस आले. खडक पोलिसांनी पुन्हा मटका अड्ड्यावर कारवाई करुन नाईकसह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी नंदू नाईक (वय ७०, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता, शुक्रवार पेठ), विजय रंगराव शिंदे (वय ६९, रा. शाहू चौक, छत्रपती शिवाजी रस्ता), शंकर सायअण्णा मॅडम (वय ६५, रा. महात्मा फुले पेठ) यांच्यासह एका अल्पवयीनाविरुद्ध याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक आशिष चव्हाण यांनी याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदू नाईक याच्याविरुद्ध मटका, तसेच जुगार अड्डा चालविण्याचे ६३ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हेगारी क्षेत्रात तो ‘मटका किंग’ नावाने ओळखला जातो. त्याच्याविरुद्ध वेळोवेळी पोलिसांनी कारवाई केली होती.परंतु त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नव्हती. महापालिकेेने त्याच्या छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी कारवाई केली होती. त्याच्याविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंजूर केला होता. त्यानंतर १७ मार्च रोजी नाईक याला वर्षभरासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. नाईक याने ही कारवाई रद्द करण्यासाठी त्याच्या नामांकित वकिलांमार्फत गृहविभागात प्रयत्न केले. गृहविभागाने ही कारवाई नुकतीच रद्द केली होती . नाईक कारागृहातून बाहेर पडला आणि त्याने छत्रपती शिवाजी रस्त्यावरील इमारतीत पुन्हा मटका अड्डा सुरू केला. याबाबतची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत नाईक याच्यासह साथीदार, तसेच अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मोबाइल , मटका खेळण्याच्या चिठ्ठया जप्त करण्यात आल्या. पोलीस हवालदार एस घोलप पुढील तपास करत आहेत.

कॉस्ट अकाउंटंट्स संस्थेच्या पुणे विभागाचा हीरक महोत्सव पुण्यात

द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण

पुणे : द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया या देशातील अग्रगण्य संस्थेच्या पुणे विभागाच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त हीरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दिनांक ९ ते ११ मे दरम्यान तीन दिवसांचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात औद्योगिक क्षेत्रातील सभासदांसाठी विशेष सत्र, व्याख्याने, मान्यवरांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया, पुणे शाखा अध्यक्ष निलेश भास्कर केकाण  यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया (आयसीएमए) माजी अध्यक्ष सीएमए अमित आपटे, केंद्रीय समिती सदस्य सीएमए नीरज जोशी, वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल माजी अध्यक्ष सीएमए चैतन्य मोहरीर, माजी केंद्रीय समिती सदस्य सीएमए संजय भार्गवे, इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया, पुणे शाखा माजी अध्यक्ष सीएमए नागेश भागणे, पुणे शाखा सदस्य सीएमए विश्वनाथ जोशी उपस्थित होते.

शुक्रवार (दि.९) आणि शनिवारचे (दि.१०) सत्र कर्वेनगर येथील सीमए भवन येथे तर रविवारचे (दि.११)  सत्र एरंडवणे येथील डॉ. कलमाडी शामराव शाळेच्या शकुंतला शेट्टी आॅडिटोरियम मध्ये पार पडणार आहे. महोत्सवात दिनांक ९  मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच तीन दिवसात विविध विषयांवर सत्रे होणार आहेत.

दिनांक १० मे रोजी मेंबर्स इन इंडस्ट्री कॉन्क्लेव आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिक्लचर (एमसीसीआयए) चे २०२२-२०२४ कालावधीतील अध्यक्ष दीपक करंदीकर उपस्थित राहणार आहेत. या कॉन्क्लेवमधील मुख्य आकर्षण म्हणजे ६० हून अधिक ज्येष्ठ सीएमए यांचा सीएमए अचिव्हर्स म्हणून गौरव केला जाणार आहे. तसेच, दिनांक ११ मे रोजी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे, किशोर पंप प्रायव्हेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक किशोर देसाई उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात गुरुदेव श्री श्री रविशंकर हे आॅनलाइन माध्यमातून संवाद साधणार आहेत.

सन १९६५ साली पुण्यात स्थापन झालेल्या या विभागाने आजवर ४० हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिले असून २२०० हून अधिक विद्यार्थी प्रमाणित कॉस्ट अकाउंटंट्स म्हणून घडवले आहेत. सल्लागार समितीतील द इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया पुणेचे माजी अध्यक्ष डॉ. नरहर निमकर,  पुणे विभाग माजी अध्यक्षा मीना वैद्य, उपाध्यक्ष श्रीकांत इप्पलपल्ली, मानद सचिव राहुल चिंचोलकर, खजिनदार हिमांशू दवे, सदस्य नागेश भागणे, अमेय टिकले, तनुजा मंत्रवादी, अनुजा दाभाडे, निखिल अग्रवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांसह कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माजी अध्यक्ष सीमए डॉ. धनंजय जोशी मार्गदर्शक असून विविध मान्यवर सल्लागार व कार्यकारी मंडळ यासाठी सक्रिय आहेत. सध्याचे अध्यक्ष सीमए निलेश भास्कर केकाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे विभागाचा महोत्सव होत आहे.

इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडिया ही संस्था जागतिक स्तरावरील उद्योगांच्या आर्थिक नेतृत्वासाठी संसाधने आणि व्यावसायिकांची प्राधान्याने निवडलेली स्त्रोत संस्था असेल, हे संस्थेचे व्हिजन आहे, तर कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट व्यावसायिक जागतिक स्तरावर नैतिकतेने उद्योग चालवतील आणि धोरण, व्यवस्थापन व लेखा यांचे एकत्रित कौशल्य वापरून सामाजिक-आर्थिक संदर्भात भागधारकांसाठी मूल्यनिर्मिती करतील हे संस्थेचे ध्येय आहे.

सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

मुंबई, दि. ०७ मे २०२५: महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून कार्यरत होते. श्री. तालेवार गेल्या २८ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

नवनियुक्त संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार मूळचे नागपूर जिल्ह्याचे असून त्यांचे शालेय शिक्षण छिंदवाडा (मध्यप्रदेश) येथे झाले आहे. विद्युत अभियांत्रिकी पदवी संपादन केल्यानंतर श्री. तालेवार १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून चंद्रपूर येथे रूजू झाले. पदोन्नतीने सहायक अभियंता म्हणून कार्यरत असताना सन २००६ मध्ये सरळ सेवा भरतीद्वारे त्यांची कार्यकारी अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर त्यांनी वर्धा, नागपूर व जालना येथे काम केले आहे. दरम्यान महावितरणकडून त्यांची गूडगाव येथील मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटमधील (एमडीआय) एनर्जी मॅनेजमेंटच्या पोस्ट ग्रॅज्यूएशन डिप्लोमा इन बिझीनेस मॅनेजमेंट (पीजीडीएम) अभ्यासक्रमासाठी निवड झाली होती. सन २००७-०८ मध्ये हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

 त्यानंतर सन २०१६ मध्ये झालेल्या सरळसेवा भरतीमध्ये श्री. सचिन तालेवार यांची अधीक्षक अभियंता म्हणून निवड झाली. या पदावर लातूर येथे काम केले. तर सन २०१८ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे त्यांची मुख्य अभियंता म्हणून निवड झाली. पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी जून २०१८ ते डिसेंबर २०२२ पर्यंत काम केले. बदलीद्वारे छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत असताना मे २०२३ मध्ये श्री. तालेवार यांची इंदूर येथील मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्युत वितरण कंपनीचे संचालक (तांत्रिक) म्हणून निवड झाली. या कंपनीत ते दोन वर्षांपासून कार्यरत होते. त्यानंतर महावितरणचे संचालक (प्रकल्प) म्हणून नुकत्याच झालेल्या थेट भरती प्रक्रियेत त्यांची निवड झाली आहे.

‘महावितरणच्या ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा करण्यासाठी सुधारित वितरण क्षेत्र योजनेसह (आरडीएसएस) विविध योजनांमधून पायाभूत वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांसोबतच प्रामुख्याने सौर ऊर्जा प्रकल्पांच्या सर्व योजनांना आणखी गती देत कामे लवकर पूर्ण करण्यात येईल’, असे महावितरणचे संचालक (प्रकल्प) श्री. सचिन तालेवार यांनी सांगितले.

पहलगामला सुरक्षा का नव्हती याबाबत आणि हल्लेखोर अतिरेकी हुडकून काढणे याबाबत कोम्बिंग ऑपरेशन करा ..

0

मुंबई- आपल्या भारतात पहलगाम इथे जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मी पहिले ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला आहे अतिरेकी, दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे, अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध नसते, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, युद्ध हे काही उत्तर नाही. आता अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले, पेंटागॉनवर हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केले. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. हे युद्ध परिस्थिती आणायची आणि आता मॉक ड्रिल करायचे आणि ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे. मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखे आहे. मला असे वाटते की थोडे अंतर्मुख होऊन होणे गरजेचे आहे.

देशभर कोम्बिंग ऑपरेशन करा-दुसरी गोष्ट म्हणजे आता कसे झाले आहे याच्यात सरकारच्या चुका या तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत. ज्यावेळेला हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते, तिथला दौरा अर्धवट सोडला त्यांनी आणि नंतर बिहारला कॅम्पेनला गेले. मला वाटते हे करायची गरज नव्हती. परत केरळमध्ये जाऊन तिथे अदानीच्या पोर्टचे उद्घाटन केले. परत वेव्हचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. नंतर येऊन मॉक ड्रिल करायचे वगैरे हे काही उत्तर नाही यावरचे. जे अतिरेकी आहेत त्यांना हुडकून काढणे हे करणे महत्त्वाचे आहे.

आज आपल्या देशातला पोलिस दल विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलिसांची तर प्रशंसाच करेल की त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीयेत आणि आपण युद्धाला सामोरे जातो आहोत, मला असे वाटते ही काही योग्य गोष्ट नाही. आज नाक्या नाक्यावर ड्रग्स मिळत आहेत, हे ड्रग्स कुठून येत आहेत, या गोष्टीच्या खोलात जाणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

ऑपरेशन सिंदूर या नावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हे नाव वगैरे देऊन याने काही भावनांचा विषय येत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही काय पाऊल उचलत आहात आणि इतके दिवस हे जे काही कार्यक्रम झाले, या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

आडकर फौंडेशनतर्फे रविवारी राजेंद्र पवार यांचा सत्कार

पुणे : पुणे येथे महावितरणचे मुख्य अभियंता या पदावर कार्यरत असताना राजेंद्र पवार यांनी अतुलनीय योगदान देत आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांची पदोन्नतीवर महावितरणच्या मुख्य कार्यालयात संचालकपदी (मानवसंसाधन विभाग) नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त आडकर फौंडेशनतर्फे त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्कार समारंभ रविवार, दि. 11 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून सत्कार डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर आणि ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात सहा ठिकाणी ‘मॉक ड्रिल’-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ७ : केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे युद्धजन्य परिस्थितीत काळजी घेण्याच्यादृष्टीने विधानभवन, मुळशी पंचायत समिती, तळेगाव नगरपरिषद, वनाज औद्योगिक वसाहत, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका या ठिकाणी आज (दि.७ मे)दुपारी चार वाजता ‘मॉक ड्रिल’घेण्यात येणार आहे; मॉक ड्रिलची गांर्भियता लक्षात घेता सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने काम करावे, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मॉक ड्रीलबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक कर्नल प्रशांत चतुर, एनसीसी पुणे मुख्यालयाचे कमांडिग ऑफीसर कर्नल निशाद मंगरुळकर, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त मिलींद मोहिते, पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक रमेश चोपडे, यांच्यासह सर्वसंबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. डुडी म्हणाले, केंद्र सरकारने युद्धजन्य परिस्थितीत देशाच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने मॉक ड्रिल करण्याचे सर्व राज्यांना निर्देश दिले आहेत. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास कमीत कमी वेळेत अधिकाधिक नागरिकांपर्यंत मार्गदर्शन आणि मदत पोहोचविण्यासाठी खबरदारी घेण्याच्यादृष्टीने दक्षता म्हणून मॉक ड्रील घेत आहोत. यावेळी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास जीवितहानी टाळण्याच्यादृष्टीने विविध प्रात्यक्षिके केली जाणार आहेत,त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही.

केंद्रीय संरक्षण दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), जिल्हा प्रशासन, पोलीस, महानगरपालिका, नगरपालिका, आरोग्य, अग्निशमन दल, महाविद्यालयीन विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आदी या मॉक ड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत.