Home Blog Page 315

‘क्षण’ आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनातून जगभ्रमंती 

स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने आयोजन : जगभरातून निवडक १५१ छायाचित्रांचा समावेश
पुणे : ऋतूंचे मनोहारी सौंदर्य, सण-उत्सवांचा रंगतदार ठसा, मानवी भावभावनांची गुंफण आणि ऐतिहासिक वास्तूंची शाही झलक हे सर्व एका ठिकाणी ‘क्षण’ या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. प्रकाश आणि छायांच्या खेळातून साकारलेल्या भावस्पर्शी क्षणांचे दर्शन या प्रदर्शनात घडत असून यानिमित्ताने जगभ्रमंती उपस्थितांनी केली.

स्टारविन्स फाउंडेशनच्या वतीने विविध छायाचित्रांच्या माध्यमातून जगभरातील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘क्षण’ हे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. यावेळी दिग्दर्शक सागर वंजारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणव तावरे, सहसंचालक राज लोखंडे, कौशिक कुलकर्णी, अक्षय जाधव, विवेक शिवेकर, सई कुलकर्णी, वृषाली वडनेरकर हे उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १७ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य सुरू आहे.

प्रदर्शनात जर्मनी, यूएसए, कॅनडा, युनायटेड किंगडम, यांसह भारतातून कलकत्ता, आगरताळा, बंगळूरु, चेन्नई, मुजफ्फराबाद, राजस्थान, कोल्हापूर अशी देश-विदेशातून छायाचित्रे आलेली आहेत. तसेच विविध शहरातून देखील छायाचित्रे प्रदर्शनात पहायला मिळत आहेत.

प्रदर्शनाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. प्रदर्शनात एकूण ५५० हून अधिक चित्रे प्रदर्शनाकरिता विविध ठिकाणांहून छायाचित्रकार यांमार्फत पाठवण्यात आली आहेत. त्यातील निवडक १५१ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला विविध ठिकाणांहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

निर्भीडपणे, आत्मविश्वासाने यशोमार्गावर चालत राहा: डॉ. कोहिनकर 

पुणे: “आई आपल्या जन्माचे मूळ असते. तिच्या वात्सल्य, संस्कारातून आपण घडतो. तिने दाखवलेल्या सन्मार्गावर चालत निर्भीडपणे व आत्मविश्वासाने यशोमार्गाकडे जायला हवे. आईच्या ऋणांतून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही. त्यामुळे तिचे थोर उपकार कायम स्मरणात ठेवून समाजात स्त्रीसन्मान जपला पाहिजे,” असे प्रतिपादन माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी केले.

जागतिक मातृदिनाचे (मदर्स डे) औचित्य साधून आयोजित ‘भारत की बेटी’ पुरस्कार सोहळ्यात डॉ. कोहिनकर बोलत होते. घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात मीडिया वर्ल्ड आणि साई बिसनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन केले होते. प्रसिद्ध अभिनेता देव गिल, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, कृषी अधिकारी श्रीकृष्ण सावंत, लेफ्टनंट कर्नल (नि.) समीर कुलकर्णी, शशिकांत धुमाळ गुरुजी, त्रिशरण एन्लायटन्मेंट फाउंडेशनच्या संस्थापिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे, ‘मीडिया वर्ल्ड’चे संचालक सुमित जैन, साई बिझनेस क्लबच्या डॉ. कृती वजीर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मनीषा पवार, मधुरा कानडे, सुवर्णा माने, आशना खोसला, मनीषा जगताप, सुनंदा पाटील, सारिका बांगर, अश्विनी पटेल, स्वप्नजा लोमटे, संगीता समुद्रे, अपेक्षा वायाळ, सायली ढोले, रुपाली इंगळे, अयोध्या टिळक, शीतल गोळे, डॉ. नीलिमा भारद्वाज, भाग्यश्री देशपांडे, रितू कैला, स्वाती माहेश्वरी, निशा काटे, निशा माने, निर्मला शेळके, मोनाली गुल्हाने, अंजली मानेकर, रूपा जाधव, सोनाली चौगुले, मनिषा रायरीकर, शुभांगी कांदे, डिंपल इंगळे, अंशू जोहरी, गीतसानिया कुलकर्णी, नेहा मराठे, प्राजक्ता जाधव, संगीता शिंदे, पूनम मांढरे, गौरी मोटे, यमुना शिवतारे, धनश्री साखरे, प्रियंका सूर्यवंशी, आरती महाले, कांचन कडू यांना ‘भारत की बेटी २०२५’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.  सन्मानचिन्ह, मानपत्र, पदक आणि तिरंगा शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते.

शशिकांत धुमाळ गुरुजी यांनी सर्व उपस्थितांना शुभाशीर्वाद दिले. अश्विनी कदम यांनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन करीत यापेक्षा आणखी चांगले यश प्राप्त करण्याचा सल्ला दिला. देव गिल यांनी कोणतेही काम करताना सचोटी, जिद्द आणि अथक परिश्रम खूप गरजेचे असल्याचे नमूद केले. श्रीकृष्ण सावंत, समीर कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली.

हा फक्त एक पुरस्कार सोहळा नसून भारत देशाला उज्ज्वल भविष्य देऊ पाहणाऱ्या प्रत्येक माता आणि भगिनींचा सन्मान आहे. जात-पात धर्म बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम हा संस्कार रुजवण्याचे काम आईच करू शकते. ‘भारत की बेटी’ हा उपक्रम अनेकांना प्रेरणा देईल, अशी भावना सुमित जैन यांनी प्रास्ताविकात व्यक्त केली.

सूत्रसंचालन गौरी देशपांडे आणि शेख निम्रा यांनी केले. आभार डॉ. कृती वजीर यांनी मानले.

स्व-संरक्षण प्रशिक्षणाने आत्मविश्वास वाढला 

राणी लक्ष्मीबाई ब्रिगेड प्रशिक्षणातील सूर 

पुणे-,  महिलांच्या प्रश्नांवर सजगपणे काम करणाऱ्या अभिव्यक्ती संघटनेने रविवार दि. ११ मे रोजी आयोजित केलेले राणी लक्ष्मीबाई ब्रिगेडने घेतलेल्या स्वसंरक्षण कार्यशाळेत उपस्थित मुली-महिलांमधील अनुराधा साठे म्हणाली की शिबिरात येण्याआधी वाटलं की हे कराटेच असेल मात्र इथली सर्व चर्चा ऐकली. प्रशिक्षित गटाने दाखवलेली प्रात्यक्षिके आणि आम्हा उपस्थितांकडून घेतलेला काहीवेळेचा सराव, यातून आत्मविश्वास वाढल्याचे वैयक्तिक पातळीवर जाणवले. 

साधरणतः प्रत्येक मुली/महिलेने कधी ना कधी बसमधला धक्का, वाईट स्पर्श, वाईट नजरेने बघणे अशा गोष्टी अनुभवलेल्या आहेत. बऱ्याचदा महिला त्याला प्रतिकार करत नाहीत किंवा घाबरतात. त्या स्वतःला कमजोर समजायला लागतात. पण खरं तर त्यांना त्यांच्यातील ताकदीची जाणीव  कधी कोणी करून दिलेली नाही. याच ताकदीची जाणीव करून देण्यासाठी आणि महिला व मुलींना स्वतःची सुरक्षा करण्यास सक्षम बनवण्यासाठी महिलांसाठी स्व-संरक्षणाचे प्रशिक्षणातील प्रात्यक्षिके तयार केली आहेत, ज्यातून स्वतःतली ताकद आजमावता येते. मुळात मी स्वतः एखाद्या छेडछाड करणाऱ्या मुलाला न घबरता विरोध माझ्यातील ताकदीचा वापर करत स्वतःचे संरक्षण करू शकते हा आत्मविश्वास देणे हाच यामागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच हे प्रशिक्षण कराटे  या खेळापेक्षा वेगळे आहे, असे प्रशिक्षक स्नेहल शुभांगी बाळकृष्ण यांनी सांगितले. 

यावेळी साधरणा ५० ते ७० मुली महिला उपस्थित होत्या. प्रत्येकीलच आत्मविश्वास दुणावल्याचे जाणवत होते. 

मौन सोडून आज रात्री ८ वाजता गरजणार PM मोदी

नवी दिल्ली- मौनी बाबा म्हणून गेल्या पंतप्रधानांना हिणविले गेले आणि नंतर आलेल्या पंतप्रधान मोदी यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना कधीच सामोरे न जाता मन कि बात , जनतेशी थेट संबोधन करत एक तर्फी संवाद सुरु ठेवला, मणिपूर ची दुर्घटना असेल हाथरस चा अत्याचार आणि आता भारत -पाक युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता राष्ट्राला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे. . शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली. यानंतर, तिन्ही सैन्याचे डीजीएमओ गेल्या तीन दिवसांपासून पत्रकार परिषदा घेत होते.पंतप्रधान , गृहमंत्री यांनी यावर आतापर्यंत मौन पाळले आहे , संरक्षण मंत्री कमीत कमी बोलले आहेत आता रात्री ८ वाजता PM मोदी काय बोलणार याबाबत आता उत्सुकता लागून आहे. ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या परिस्थितीबद्दल पंतप्रधान माहिती देऊ शकतात. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यापासून, पाकिस्तानी गोळीबारात ५ लष्कर आणि २ बीएसएफ जवान शहीद झाले आहेत आणि ६० जण जखमी झाले आहेत. याशिवाय २७ नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे.हलगाम हल्ल्याच्या दोन दिवसांनंतर २४ एप्रिल रोजी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी म्हटले होते की – पहलगामच्या गुन्हेगारांना दफन करण्याची वेळ आली आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल.दहशतवादी हल्ल्यात कोणीतरी आपला मुलगा गमावला, कोणीतरी आपला भाऊ गमावला, कोणीतरी आपला जीवनसाथी गमावला. त्यापैकी काही बंगाली बोलत होते, काही कन्नड, काही गुजराती, तर काही बिहारचे होते. आज, कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत, सर्वांच्या मृत्युबद्दलचा आपला राग सारखाच आहे.पहलगाम हल्ल्याच्या ५ दिवसांनंतर २७ एप्रिल रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १२१ व्या भागात म्हटले होते – या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश एका सुरात बोलत आहे. संपूर्ण जगाने शोक व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्यामुळे देशातील जनता रक्तबंबाळ झाली आहे. पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल.

तत्पूर्वी, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी १० मे रोजी रात्री ११.३० वाजता पाकिस्तानच्या जनतेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी भारताविरुद्ध पाकिस्तानी सैन्याच्या ऑपरेशन ‘बुनियान-उन-मरसूस’च्या यशाचा दावा केला. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये ‘यौम-ए-तशक्कूर’ साजरा केला जात आहे. यौम-ए-तशक्कुर हा उर्दू शब्द आहे, ज्याचा अर्थ आभार मानण्याचा दिवस आहे.

शनिवारी संध्याकाळी ५ वाजता भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी लागू झाली. तथापि, ती लागू झाल्यानंतर अवघ्या ३ तासांतच पाकिस्तानने ती मोडली. जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये १५ ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले, जे भारतीय हवाई संरक्षण दलाने हाणून पाडले.

अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी युद्धबंदीवर सहमती दर्शवल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी संध्याकाळी केला होता. यानंतर भारत आणि पाकिस्ताननेही युद्धबंदीची पुष्टी केली.

सामाजिक कार्यकर्ते रामदास मारणे यांना  ‘विद्यावाचस्पती सन्मान’ प्रदान 

अयोध्येतील दीक्षांत समारंभात सामाजिक सेवेबद्दल सन्मान
पुणे : सामाजिक कार्यकर्ते रामदास मारणे यांना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘विद्यावाचस्पती सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ यांच्या वतीने हॉटेल रेडिसन पार्क इन, अयोध्या धाम येथे आयोजित राष्ट्रीय संगोष्ठी आणि दीक्षांत समारंभ प्रसंगी प्रदान करण्यात आला.

या विशेष प्रसंगी पद्मश्री डॉ. अरविंद कुमार, माजी कुलगुरू, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झांसी यांच्या हस्ते रामदास मारणे यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. इंद्रभूषण मिश्रा, कुलगुरू, पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ तसेच वृंदावन धाम, मथुरा येथील प्रसिद्ध कथावाचिका दीपा मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

रामदास मारणे हे “युवा भारती” या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच ते ग्रीनगाई पर्यावरण व शाश्वत विकास फाउंडेशन या पर्यावरण शिक्षण व शाश्वत विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत. यावेळी पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारसरणीवर आधारित सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक विकास यावर सखोल चर्चा झाली.

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिरात वीर पत्नी- मातांच्या उपस्थितीत सैनिकांना सलाम 

कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट : नागरी सज्जता सूची ची वितरण
पुणे : कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने देशवासीयांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी आणि सैनिकांना अभिवादन करण्यासाठी वैशाख पौर्णिमा निमित्त श्री दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते माध्यान्ह आरती आणि सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. आनंद सराफ, शिरीष मोहिते व वीर पत्नी दिपाली मोरे यांनी यासाठी नियोजन केले.

नयना बेंद्रे व कर्नल नवीन बालकृष्ण बेंद्रे (निवृत्त) यांच्या हस्ते दत्तयाग संपन्न झाला. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते.

विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी सांगितले की युद्धजन्य संकट येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी जागरूक आणि शांत राहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवा. अफवा पसरवू नका. केवळ खात्रीलायक माहितीच शेअर करा. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा. प्रथमोपचार पेटी, वैद्यकीय आणि ओळखपत्रांची कागदपत्रे तयार ठेवा. प्रत्येकासाठी एक आपत्कालीन बॅग तयार ठेवा. शांत रहा. मनोबल वाढवा. एकमेकांच्या मदतीला धावून जा. सैनिकांबद्दल आदर ठेवा आणि देशासाठी प्रार्थना करा, अशी नागरी सज्जता सूची यावेळी वितरीत करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, आपले वीर सैनिक आपल्याला सुरक्षितता मिळावी म्हणून लढले. त्यांच्या रक्षणासाठी आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सामूहिक प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात वीर माता -पत्नीच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते.

जग युद्धात नाही तर बुद्धात उपाय शोधू शकतो-डॉ. विश्वनाथ दा. कराड

पुणे, दि.१२ मे: ” जगाला युद्धात नाही तर बुद्धात उपाय सापडू शकतो. जगाने बुद्धांच्या शिकवणींपासून शिकून शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. अस्थिरतेने ग्रासलेल्या या पृथ्वी वर भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानाच्या मार्गाचे अनुसरण करून जीवन समृद्ध होऊ शकते. ” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कवी डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण,  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, माईर्स एमआयटीचे   कुलसचिव प्रा.डॉ. रत्नदीप जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, प्रा. विक्रांत गायकवाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अध्ययन प्रमुख प्रा.डॉ. विनोद जाधव उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात. बुद्धांनी जागतिक धर्म, मानवता कल्याण आणि जातीभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. भारत हा जगभर भगवान बुद्ध आणि महात्मा गांधीसाठी ओळखला जातो.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,”भगवान बुद्धांनी जगाला शांती व अहिंसेचा संदेश दिला. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देईल.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” वर्तमान काळात संपूर्ण देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. या धर्मामध्ये सर्व धर्मांचे तत्व व वैचारिकतेचा समावेश आहे. पाप पुण्याचा विचार सोडून सदाचाराने व्यवहार करावा.”
प्रा.दत्ता दंडगे म्हणाले,” २५०० वर्षापूर्वी स्थापन झालेला बौद्ध धर्म असून भगवान बुद्धांचे विचार आज ही आहे. हा धर्म पूर्ण तृप्तीतून उद्गम झालेला आहे. ज्ञानातून करूणा निर्माण होते आणि ती करूणा आचरणातून दिसायला हवी.”
या नंतर डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मुकेश शर्मा, प्रा. गणेश पोकळे व प्रा. विक्रांत गायकवाड  यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार सांगितले आणि त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले.
प्रा.डॉ. विनोदकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रा.डॉ. विक्रांत गायकवाड यांनी आभार मानले.

संवेदनातूनच बुद्ध विचारांची निर्मिती : राहुल डंबाळे


बौद्ध जयंतीनिमित्‍त शहीद जवानांच्‍या कुटुंबियांसाठी एक लाखांचा धनादेश सुपुर्त
डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराचा उपक्रम

पुणे : प्रतिनिधी

युद्ध नको बुद्ध हवा, हा संदेश जगाला मिळणे आवश्‍यक आहे. युद्धाला अंत नसतो हे युक्रेन आणि रशियाच्‍या युद्धाच्‍या स्‍थितीवरून समजते. संवेदनामधूनच भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले. त्‍यांनी बुद्ध विचारांवर चालत शांततेचा पुरस्‍कार केला. शहीद जवानांच्‍या कुटुंबियांच्‍या संवेदनातूनच कार्यक्रमासाठी येणारा खर्च आर्मी रिलिफ फंडाला देण्याचा उपक्रम स्‍तुत्‍य आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले.

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि मित्र परिवाराच्या वतीने प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी उद्यानात दरवर्षी बुद्धपौर्णिमेला भीम-बुद्ध गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जातो. यंदाच्या वर्षी शहीद जवानांना मानवंदना म्हणून हा कार्यक्रम रद्द केला. या कार्यक्रमासाठी येणारा खर्च शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देऊन आपल्या सहवेदना व्यक्त करण्याचा संकल्प डॉ. धेंडे यांनी व्यक्त केला. त्‍यानुसार महार बटालियनच्‍या निवृत्‍त माजी सैनिकांकडे एक लाख रुपयांचा धनादेश आर्मी रिलीफ फंड नावाने सुपुर्द करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यक्रमात डंबाळे बोलत होते.  

भंते नागघोष, भंते धम्मानंद, भंते प्रियदर्शी, भंते अंकुश माला आदी भिख्खुंनी त्रिसरण, पंचशील आणि धम्‍मदेसना दिली. या वेळी आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे, सुवर्णा पवार, यशवंत शिर्के, विजय गायकवाड, विजय कांबळे, गजानन जागडे, नामदेव घाडगे, सोपान लभाणे, सुभाष कांबळे, अनिल ननावरे, मेजर रणपिसे, मालती धीवार, रजनी वाघमारे, कविता घाडगे, मंगला गमरे, महार बटालियनचे कॅप्टन पोळके, सुभेदार वानखेडे आणि सहकारी उपस्‍थिती होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्रिसरन, पंचशील ग्रहण करण्यात आले.  धम्मदेसना घेण्यात आली. या वेळी देशसेवेत भूमिका बजाविणाऱ्या महार बटालियन मधील माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. भंते संघाचे स्वागत करण्यात आला.

या वेळी डॉ. सिद्धार्थ धेंडे म्‍हणाले की, केंद्र आणि राज्‍य सरकारला आवाहन आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्‍ल्‍यात मृत्‍युमुखी पडलेल्‍या नागरिकांच्‍या कुटुंबियांना सरकारने ५० लाख रुपये मदत म्हणून दिले आहे. मात्र दुसरीकडे देशातील आपल्‍या सैनिकांना युद्धात वीरमरण आले. ते शहीद झाले की त्‍यांच्‍या कुटुंबियांना मात्र तुटपुंजी मदत दिली जाते. त्‍यामुळे शहीद झालेल्‍या वीर जवानांच्‍या कुटुंबियांना देखील ५० लाखांची मदत द्यावी, असे आवाहन डॉ. धेंडे यांनी केले. तसेच शहीद जवानांच्‍या कुटुंबियांची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

या वेळी उपस्‍थित भंतेकडून युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश देत असताना बुद्धाने शांतता व करुणाची शिकवण दिली आहे. परंतु स्वरक्षण करताना (स्वतःचे किंवा देशाचे) हिंसा करणे यात गैर नसते, हे उदाहरण देऊन तथागत गौतम बुद्धांचा खरा शांततेचा संदेश काय हे समजावून सांगितले.

वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या पुस्तकांमुळे मानवी जीवन समृद्ध

किशोर कदम यांचे प्रतिपादन; ‘पुस्तकांवरील पुस्तकं’ या विषयावर रंगल्या मनमोकळ्या गप्पा

पुणे: “पुस्तके मानवी जीवन समृद्ध करतात. वाचनाची आवड निर्माण करणारे साहित्य खिळवून ठेवते. मानवी व समाज जीवनाचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न लेखक करीत असतो. साहित्याचा वेध घेणारी पुस्तके निर्माण होणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन कवी व अभिनेते किशोर (सौमित्र) कदम यांनी केले.

कृष्णा पब्लिकेशन्सच्या वतीने ‘द हाऊस ऑफ पेपर’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात किशोर कदम बोलत होते. भांडारकर संशोधन संस्थेच्या सभागृहात आयोजित सोहळ्यात शरद पवार फेलोशिपचे समन्वयक व लेखक नितीन रिंढे, कवी व समीक्षक गणेश विसपुते, साहित्यिक प्रवीण बांदेकर, अनुवादक करुणा गोखले, यशवंतराव चव्हाण सेंटरचे मानद व्यवस्थापक दत्ता बाळसराफ, लेखक व संपादक अभिषेक धनगर, प्रकाशक चेतन कोळी, अनिल पवार आदी उपस्थित होते.

किशोर कदम म्हणाले, “चांगल्या पुस्तकांचा शोध घेणे, संग्रह करणे आणि त्याचे वाचन करणे आयुष्याला घडवीत असते. काव्य आपल्याला भावना व्यक्त करण्याचे व्यासपीठ देते. साहित्य हवेहवेसे आणि आनंददायी असावे. पुस्तकांच्या सानिध्यात राहिले, तरी आपल्या आयुष्यात ऊर्जा निर्माण होत राहते.”

नितीन रिंढे म्हणाले, “पुस्तकांवर लिखाण करणे ही एक कला आहे. पुस्तके वाचली जातात की नाही, याची चिंता करण्यापेक्षा पुस्तकांच्या गर्दीत जगणे अतिशय सुंदर असते. पुस्तकांना केंद्रबिंदू मानून मराठीत पुस्तकांवरील पुस्तक येण्याची गरज आहे. पुस्तकांसोबतच पुस्तकांबद्दल मार्गदर्शन करणारा एक तरी मित्र आयुष्यात असावा.”

गणेश विसपुते म्हणाले, “वास्तवाच्या जवळ जाणारी पुस्तके मनाला भिडतात. या पुस्तकात अनेक वास्तविक प्रसंग असून, आपल्याला अचंबित करतात. पुस्तकांचा संग्रह करण्याचे वेड असावे. जगभरातील अनेक चांगली पुस्तके शोधून त्याचा विविध भाषांत अनुवाद झाला, तर सर्व भाषिकांना समृद्ध साहित्य वाचण्याची संधी मिळेल.”

प्रवीण बांदेकर यांनी साहित्याचा मानवी जीवनावर होणारा परिणाम विशद केला. वाचन माणसाला माणूस बनवते. जीवनाला एक नवी दिशा देते. विचार करायला शिकवते. त्यामुळे आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करा. वाचनामुळे मी घडलो, वाचनामुळेच माझ्यातील साहित्यिक निर्माण झाला व मला वेगळी ओळख मिळाली, असे त्यांनी सांगितले.

करुणा गोखले, दत्ता बाळसराफ, अभिषेक धनगर यांनीही मनोगत व्यक्त केले. चेतन कोळी यांनी प्रास्ताविक केले. मृदगंधा दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. अक्षय शिंपी यांनी पुस्तकातील निवडक उतार्‍यांचे अभिवाचन केले. आभार मृदगंधा दीक्षित यांनी केले.

सफाई कामगार यांना स्वच्छता सैनिकांचा दर्जा द्यावा : डॉ सुधाकर पणीकर

उत्कृष्ट स्वच्छता सैनिकांना शासनाने पुरस्कार द्यावेत : संगीता तिवारी

पुण्यात अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसतर्फे सफाई कामगारांचा झाला विशेष सन्मान

पुणे – देशाच्या सीमेवर लढणारे जवान हे भारतीय नागरिकांचे रक्षण करतात, तर देशांतर्गत कार्यरत स्वच्छता कामगार हे भारतीयांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झटत असतात. त्यामुळे खऱ्या अर्थाने सफाई कामगार असा उल्लेख करण्याऐवजी त्यांना यापुढे स्वच्छता सैनिक म्हटले गेले पाहिजे. आज स्वच्छता सैनिकांच्या मागण्यांबाबत मनपा प्रशासन व सरकार आडमुठी भूमिका घेते. त्यामुळे आगामी काळात जोरदारपणे संघटित होऊन तीव्र आंदोलन करण्याचा आजच निर्धार करा, असे आवाहन अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसचे राष्ट्रीय महामंत्री डॉ सुधाकर पणीकर यांनी केले.

अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या वतीने श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात सफाई कामगार व त्यांच्या पाल्यांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला, त्या वेळी डॉ सुधाकर पणीकर बोलत होते. सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संगीता तिवारी होत्या.या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे, गणेश भोसले, विकास कुचेकर, अॅड. रशिद सिद्दिकी, गुलाब चव्हाण, मनोहर परमार, प्रमोद कोटियाना,चंद्रकांत चव्हाण, कैलास बिडलान, वनिता घोरपडे, रवी भिंगानिया, परवीन लालबिगे, गणेश लालबिगे आदी पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट सफाई कामगार, तसेच कामगार नेत्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला,तसेच याप्रसंगी रुक्मिणीबाई लालबिगे यांचा सर्वोत्कृष्ट माता पुरस्कार देऊन विशेष गौरव करण्यात आला. याशिवाय कार्यक्रमात सफाई कामगारांच्या दहावी-बारावीतील गुणवंत पाल्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. चिमुकली सर्पमित्र हर्षदा लोहिरे हिचादेखील सत्कार करण्यात आला.

संगीता तिवारी या वेळी म्हणाल्या की, शहरांना सुशोभित ठेवण्यात सफाई कामगारांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कोरोना महामारीच्या काळात सफाई कामगारांच्या कार्याची महती खऱ्या अर्थाने कळली. तुमच्या कार्याला खरंच आम्ही सॅल्यूट केले पाहिजे, परंतु असे असतानादेखील महापालिका प्रशासन हे सातत्याने सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आलेले आहे, त्यामुळे आता सर्वांनी संघटित होऊन कायदेशीर मार्गाने लढा देऊन आपल्या मागण्या सोडवण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे गरजेचे आहे.

संस्थापक अध्यक्ष सतीश लालबिगे या वेळी म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून अ. भा. सफाई मजदूर काँग्रेसच्या झेंड्याखाली कामगारांच्या मागण्यांसाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. मनपा प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात आगामी काळात सर्व सफाई कामगारांनी संघटित होऊन जोरदार लढा द्यावा. तसेच पुढच्या वर्षीपासून कामगारांच्या सत्कारासह संघटना कामगारांना आर्थिक मदत देणे, संसारोपयोगी वस्तू प्रदान करणे, कामगारांचे आरोग्य तसेच त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्याच्या दृष्टीने मदत दिली जाईल.

सत्कार सोहळ्यात डॉ सुधाकर पणीकर यांचाही विशेष कर्मवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगर पालिकेचे अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने सचिव सूर्यकांत यादव आणि एमएमजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र वाईकर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सफाई कामगार व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त मंगलमय वातावरणात रंगली धम्म पहाट

विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने आयोजन

पुणे : बुद्धम् शरणम् गच्छामि….,  साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले.. , साऱ्या विश्वाला बुद्ध हवा… अशा बुद्ध – धम्म गीतांनी आणि  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाच्या माध्यमातून बुद्ध – कबीर अन् तुकोबांच्या विचारांचा जागर करत बुद्ध पौर्णिमेची धम्म पहाट मंगलमय वातावरणात रंगली. 

जगाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुध्द जयंती निमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेच्या वतीने ‘धम्मपहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बुध्द्ध-भिम गीतांनी सजलेला हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, पुणे स्टेशन येथे संपन्न झाला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती, पुणेचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पुण्याच्या माजी उपमहापौर सुनीता वाडेकर, महोत्सव समितीचे सरचिटणीस दिपक म्हस्के, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, श्रामणेर, भंते यांच्यासह असंख्य बौद्ध अनुयायी उपस्थित होते. याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. 

सामूहिक बुद्ध वंदना आणि त्रिशरण पंचशील पाठणाने धम्मपहाट कार्यक्रमाला सुरूवात झाली. पहाटेच्या हलक्याशा गारव्यात  राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज वाबळे (माऊली) यांनी वारकरी आणि बुद्ध विचारांचे नाते उलगडले. वारकरी समाजाचा पाया तथागत गौतम बुद्धाच्या विचारातच असल्याचे सांगताना त्यांनी जगदगुरु संत तुकारांच्या अभंगाचा बुद्ध तत्वज्ञानाशी असलेला संबंध आपल्या ओघवत्या वाणीतून उपस्थितांना सांगितला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला न्याय आणि समतेचा संदेश देणारे बुद्ध तत्वज्ञान व वारकरी संप्रदायातील संताच्या विचारातून आल्याचेही वाबळे महाराजांनी नमूद केले. 

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात “बोलो जय भीम….., सरे रात काळी …….,  भारत भू के  क्रांती सूर्य को प्रणाम.., भीमरायाने किमया ही केली.., माझी आजी म्हणायची..” अशा एकाहून एक सरस बुद्ध – भीम गीतांचे सादरीकरण सा.रे.ग.म.प. फेम प्रसिद्ध पार्श्वगायक कुणाल वराळे, सा.रे.ग.म. फेम अनुष्का शिकतोडे, पार्श्वगायिका स्वप्नजा इंगोले, गायक संविधान खरात, गायक स्वप्निल जाधव आणि त्यांच्या वाद्यवृंदाने  सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. 

धम्म पहाट कार्यक्रमाबद्दल बोलताना आयोजक परशुराम वाडेकर म्हणाले, यंदा धम्मपहाट कार्यक्रमाचे 20 वे वर्षे आहे. जगभरात बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. त्याप्रमाणे पुणे शहारातही आम्ही धम्मपहाट कार्यक्रमाच्या माध्यमातून बुद्ध पौर्णिमा साजरी करीत आहोत. बुद्ध पौर्णिमेच्या काही तास आधी भारत – पाकिस्तान मधील युद्धबंदी चा निर्णय म्हणजे जगाला युद्ध नव्हे तर बुद्ध हवा हाच संदेश देणार आहे.

धम्म पहाट कार्यक्रमाची सांगता  पाहेलगाम हल्ल्या तील मृतांना आणि त्यानंतर पाकच्या गोळीबारात शाहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.  कार्यक्रमाची निर्मिती आणि निवेदन दीपक म्हस्के यांचे होते.

५ हजार शहाळ्यांमध्ये ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पा विराजमान

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला. शिव-पार्वतीच्या घरी वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या शुभदिनी दुर्मती राक्षसाच्या वधार्थ झालेला हा अवतार आहे. वैशाख शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्यावेळी गणेश जन्माची पूजा व अभिषेक झाला. तसेच मंदिरामध्ये गणेशयाग देखील करण्यात आला

वैशाख वणव्यापासून तमाम भारतीयांचे रक्षण व्हावे, दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष, शेतकऱ्यांच्या समस्या दूर होण्यासोबत आरोग्यसंपन्न भारताकरीता दगडूशेठ गणपती बाप्पांसमोर प्रार्थना करीत शहाळे महोत्सवात ५ हजार शहाळ्यांचा महानैवेद्य बाप्पाला दाखविण्यात आला. श्री गणेशांचे विविध लीला स्वरुपात अनेक अवतार पाताळ, पृथ्वी व स्वर्गलोकात झाल्याचे आपल्या पुराणात सापडते. त्यापैकी एक म्हणजे पुष्टिपती विनायक अवतार. पुष्टिपती विनायक जयंतीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात हा शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला होता.दुर्मती राक्षसाने पृथ्वी-पाताळ-स्वर्गलोक जिंकून सर्वत्र विध्वंस चालविलेला होता त्याचा नित्पात करण्याकरिता पार्वती मातेला दिलेल्या वरानुसार भगवान श्री गणेशांनी विनायक अवतारामध्ये प्रगट होऊन दुर्मती राक्षसाचा वध केला त्यामुळे वैशाख शुद्ध पौर्णिमेचा दिवस हा पुष्टिपती विनायक जयंती म्हणून साजरा केला जातो

गाभाऱ्यासह सभामंडपात शहाळ्यांची व वृक्षांची नयनरम्य आरास करण्यात आली होती.पहाटे गायिका सानिया पाटणकर आणि सहकाऱ्यांनी आपली गायन सेवा गणपती चरणी अर्पण केली श्रीगणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथामध्ये या अवताराचा संदर्भ आढळतो. या अवतारामध्ये पुष्टी ही भगवान विष्णुंच्या घरी त्याची मुलगी म्हणून जन्म घेते व श्री गणेश हे विनायक स्वरुपात शंकर-पार्वती यांच्या घरी जन्म घेतात.

वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. उत्तर भारतामध्ये वैशाखी हा सण याच दिवशी विशेषत्वाने साजरा केला जातो. वैशाख वणव्यापासून देशवासियांचे रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या सद्भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य दरवर्षी अर्पण करण्यात येतो. तसेच, दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

गोखले पुलाचे भाजप मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई:शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे प्रकल्प लांबणीवर पडला – आमदार अमीत साटम

मुंबई: गोखले पुलाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि अंधेरी (पश्चिम) येथील भाजप आमदार अमीत साटम यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यामध्ये आमदार अमीत साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

याप्रसंगी बोलताना आमदार अमीत साटम यांनी अलिकडच्या काळात बीएमसीने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणून गोखले ब्रिजचे वर्णन केले. गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. हा एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. हा बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक आहे, असे आमदार साटम म्हणाले.

गोखले पुलासारखे विक्रमी काम भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर होण्याकरता मुंबईकरांना आशीर्वादाची साद आमदार साटम यांनी यावेळी घातली.

यावेळी बोलताना भाजप मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की हा पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक आहे. त्यामुळे पुल- एक यशाची गाथा असे पुस्तक आमदार साटम यांनी लिहावे.

याउलट, ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरू झाले असले तरी, पाच वर्षांच्या विलंबानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

आमदार साटम यांनी पुढे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे पुलाचे काम लांबणीवर पडल्याची टीका केली. जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर बीएमसीने कोसळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू केला. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबनंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. तरीही, प्रत्यक्ष काम नोव्हेंबर २०२१ मध्येच सुरू होऊ शकले. त्यातही रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे किंवा बीएमसी कोण बांधणार याची स्पष्टता नव्हती, असे आमदार साटम यांनी सांगितले.

आमदार साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची माहिती देताना ते म्हणाले की नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळाला भेट दिली. त्या भेटीदरम्यान बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला. त्यात पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आल्याचे आमदार साटम यांनी सांगितले.

त्यानंतर आमदार अमित साटम यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. चहल त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन मुंबई उपनगरमंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी आणि रेल्वे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आणि त्यात एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली. तेव्हापासून, प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली, असे आमदार साटम म्हणाले.

आमदार साटम पुढे म्हणाले की, जुना पूल पाडण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही नियमित प्रकल्पस्थळी भेटी दिल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहभागाचा या प्रकल्पाला फायदा झाला. त्यांनी या पुलाला दोनदा भेट दिली. या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा एक भाग उघडण्यात झाला – तोही बंद झाल्यानंतर फक्त १५ महिन्यांनी. त्यानंतर दुसऱ्या भागाचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आज गोखले पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असे आमदार साटम पुढे म्हणाले.

महाराष्ट्र हरिजन सेवक संघ अध्यक्षपदी,माजी आमदार मोहन जोशी

0

पुणे : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी माजी आमदार, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांची पाच वर्षांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे.

हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शंकर कुमार संन्याल यांनी मोहन जोशी यांना नियुक्तीचे पत्र नुकतेच दिले. हरिजन सेवक संघाच्या वतीने आदिवासी भागात वसतीगृहे आणि शाळा चालविल्या जातात. तसेच ग्रामीण भागात गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, अभ्यासिका चालविल्या जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसाराचे कार्य हरिजन सेवा संघातर्फे करण्यात येते त्याचा विस्तार आगामी काळात केला जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

हरिजन सेवक संघाच्या स्थापनेला यंदा ९३ वर्षे झाली आहेत. ही संस्था शताब्दी कडे वाटचाल करत आहे. त्यादृष्टीने सेवक संघात सर्व जाती धर्माच्या युवक, युवतींचा सहभाग वाढावा, त्यादृष्टीने प्रयत्न रहातील आणि युवा वर्गाकडून नवनवीन कल्पना घेऊन कार्याला आधुनिकतेची जोड दिली जाईल, असे मोहन जोशी यांनी निवडीनंतर सांगितले.

गांधीवादी नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी महाराष्ट्र हरिजन सेवक संघाचे अध्यक्षपद अनेक वर्षे भूषविले आणि सेवक संघाच्या महाराष्ट्रातील कार्यात मोलाचे योगदान दिले. हरिजन सेवक संघाचा कारभार आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरला असून, अनेक विचारवंत, संशोधक, सामाजिक आणि राजकीय नेते यात सहभागी आहेत.

कळावे.

आपला,
मोहन जोशी,
माजी आमदार,
उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस.

नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हक्काचे केंद्र -ना. चंद्रकांतदादा पाटील

पाषाण-सुतारवाडीतील नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

पुणे:नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र असून, कोथरुड मतदारसंघातील संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या लोकोपयोगी योजनांचा लाभ पोहोचवण्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरुड मतदारसंघातील पाषाण-सुतारवाडी भागातील नागरिकांसाठी नवीन जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण ना. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भाजप उत्तर मंडल अध्यक्ष लहू बालवडकर, सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सायकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, प्रकाश तात्या बालवडकर, उत्तरचे माजी अध्यक्ष सचिन पाषाणकर, दक्षिणचे माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले की, नागरी समस्या सोडविण्यासाठी जनसंपर्क कार्यालय हे हक्काचे केंद्र आहे. मतदारसंघातील विविध जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासोबतच; शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना जनतेपर्यंत पोहोचविल्या. त्यामुळे या जनसंपर्क कार्यालयाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सुकन्या समृद्धी योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड प्रदान करण्यात आले.