Home Blog Page 3146

​​ ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर एक दिवसीय ​​ कार्यशाळा संपन्न

शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या 35 प्रतिनिधींचा सहभाग 
पुणे : ‘अमेरिकन कॉन्स्युलेट’ आणि ‘युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाऊंडेशन इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इफेक्टिव्ह डिजिटल स्टोरी टेलिंग’ विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांसाठी आयोजित ही एक दिवसीय कार्यशाळा गुरूवारी हॉटेल प्राईड येथे पार पडली.
कार्यशाळेमध्ये पुणे, सांगली, औरंगाबाद मधील शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचे 35 प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये ‘अवंता फाऊंडेशन’, ‘येरळा वाणी’, ‘अलोचना’, ‘जल बिरादरी’, ‘आस्था फाऊंडेशन’, ‘मशाल’, ‘फ्युएल’, ‘एमकेसीएल’ या संस्थांचा समावेश होता.
बहुमाध्यम (मल्टी मीडिया) तज्ज्ञ डॉ. बाळकृष्ण दिगंबर दामले यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. बाळकृष्ण दामले यांनी कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये एम. एस. (अमेरिका) केले आहे. ते ‘फुलब्राइट स्कॉलर’ असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील ‘एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटर’ मध्ये कार्यरत आहेत.
कार्यशाळेची सुरूवात जोनाथन हवांग (सहाय्यक सांस्कृतिक कार्य अधिकारी, अमेरिकन कॉन्स्युलेट, मुंबई) यांनी केली. सुरंजना दास (कार्यक्रम व्यवस्थापक, युनायटेड स्टेट एज्युकेशनल फाऊंडेशन इंडिया) यांनी स्वागत केले. बाळकृष्ण दामले यांनी ‘डिजिटल स्टोरी टेलिंग टुल्स अ‍ॅण्ड टेक्नीक्स’ या विषयी मार्गदर्शन केले.

खंडपीठ पुण्यातच व्हावे यासाठी खासदार काकडेंनी प्रयत्न करावेत – पुणे बार असोसिएशन

पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात व्हावे ही भूमिका मांडल्याबद्दल पुणे बार असोसिएशनच्या वतीने आज खासदार संजय काकडे यांचे आभार मानले. पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष पवार, सचिव अॅड. लक्ष्मण घुले, खजिनदार अॅड. प्रताप मोरे, अॅड. विजयसिंह ठोंबरे व अॅड. आनंद केकान यांनी खासदार संजय काकडे यांची भेट घेऊन यासंदर्भातील पत्र दिले.

खंडपीठ पुण्यातच व्हावे ही पुणेकरांची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. पुण्यातून मुंबई उच्च न्यायालयात जाणाऱ्या दाव्यांची संख्या पाहता कोल्हापूरच्या तुलनेत ती जास्त आहे. पुण्यातून 60 टक्के दावे उच्च न्यायालयात जातात तर, कोल्हापूर परिसरातून जाणाऱ्या दाव्यांचे हे प्रमाण 40 टक्के आहे. राज्य सरकारकडे यासंदर्भात खासदार संजय काकडे यांनी पाठपुरावा करावा अशी विनंती खासदार संजय काकडे यांना यावेळी त्यांनी केली.

खासदार काकडे यांनी केंद्रिय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी पुण्यात आले असताना एका कार्यक्रमात पुण्यात खंडपीठ व्हावे म्हणून मागणी केली. तसेच, पुणेकरांची मागणी वास्तवाला धरुन असल्याचेही त्यांनी यावेळी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते. गडकरी यांनी यामध्ये लक्ष घालू असे आश्वासनही यावेळी दिले होते. खासदार काकडे यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडल्याबद्दल पुणे बार असोसिएशनने त्यांचे आभार मानले व खंडपीठ पुण्यात व्हावे म्हणून खासदार काकडे यांनी पाठपुरावा करावा अशी त्यांना विनंतीही केली.

भारतीय जनता पक्षाने लोकशाहीला काळिमा फासला. – रमेश बागवे

पुणे-कर्नाटकाचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी कनार्टकामध्ये सरकार स्थापनेसाठी भारतीय जनता
पक्षाला आमंत्रित केले. कर्नाटक निवडणुकीचा निकाल जाहिर झाल्यावर काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर
यांची आघाडी झाली. दोन्ही पक्षांची मिळून एकूण ११५ आमदार व अपक्ष २ असे मिळून एकूण ११७
आमदारांची संख्या राज्यपालांना जनता दल व काँग्रेसच्या नेत्यांनी सादर केली. भारतीय जनता पक्षाचे
१०४ आमदार आहेत असे असताना राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित
करून ससंदिय लोकशाहिचा खून केला आहे आणि भाजपाला बहुमत सिध्द करण्यासाठी १५ दिवसांची
मुदत दिली. याच्या निषेर्धाथ अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दि. १८ मे रोजी संपूर्ण भारतात काँग्रेस
पक्षाने लोकशाहिचा काळा दिवस म्हणून धरणे आंदोलन करावे असे आदेश दिले होते.


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज बेलबाग चौक (सिटी पोस्ट) येथे धरणे आंदोलन
करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या निषेर्धाथ तयार केलेले फलक दाखवून घोषणा दिल्या.
‘संसदिय लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘घटनेचे उल्लंघन करणाऱ्या
मोदी सरकारचा धिक्कार असो’ अश्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. आपल्या भाषणात पुणे शहर
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘मोदी सरकारने सत्तेत आल्यावर वारंवार घटना
बदलण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसच्या द्वेषापोटी काँग्रेसच्या नेत्यांवर वैयक्तिक आणि खालच्या
पातळीवर जाऊन टिका करून जनतेची दिशाभुल करून खोटी आश्वासने देऊन निवडणुक जिंकत आहेत.
गोवा, मणिपूर, मेघालया या राज्यात काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून संख्याबळ असताना सुध्दा
केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाखाली येऊन त्या राज्यांच्या राज्यपालांनी भारतीय जनता पक्षाच्या
आघाडीला सरकार स्थापन करण्यास अनुमती दिली. त्याच निर्णयाप्रमाणे कनार्टकात सुध्दा काँग्रेस, जनता
दल सेक्युलर आघाडीला राज्यपाल सरकार स्थापन करायला आमंत्रित करतील असे वाटत असताना त्यांनी
अल्पमतात असलेल्या भारतीय जनता पक्षाला कनार्टकात सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले व
बहुमत सिध्द करण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. त्यामुळे घोडेबाजाराला उधान आले आहे. सरकार या
आयोग व एस. आर. बुमई खटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला आहे की, जो आघाडी पक्ष
स्थिर सरकार देऊ शकते त्यांनाच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करावे. भारतीय जनता
पक्षाने सत्तेचा गैरवापर करून कुठल्याही टोकाला जाऊन कनार्टकामध्ये सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न
करीत आहे. पारदर्शक आणि स्वच्छ प्रशासनाची भाषा करणारे मोदी सरकारचा पर्दाफाश झालेला आहे. सन
२०१९ च्या निवडणुकीमध्ये देशाची जनता त्यांना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही.’’

यावेळी माजी आमदार मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे
यांचीही भाषणे झाली.
यावेळी काँगेसचे ज्येष्ठ नेते श्रीकांत शिरोळे, गटनेते अरविंद शिंदे, नगरसेवक अजित दरेकर,
सुजाता शेट्टी, नीता रजपूत, मनीष आनंद, रविंद्र धंगेकर, रमेश अय्यर, सोनाली मारणे, मुकारी अलगुडे,
शेखर कपोते, ॲड. म. वि. अकोलकर, नुरूद्दीन सोमजी, जॉन पॉल, शानी नौशाद, प्रकाश पवार, द. स.
पोळेकर, अमित बागुल, बुवा नलावडे, विठ्ठल थोरात, बाळासाहेब अमराळे, सतिश मोहोळ, सुनिल शिंदे,
सुजित यादव, मीरा शिंदे, प्रदिप परदेशी, जयकुमार ठोंबरे, प्रविण करपे, सुमित डांगी, सचिन सावंत,
दिपक ओव्‍हाळ, राजेंद्र जगताप, मुन्नाभाई शेख, सुरेश कांबळे, चेतन आगरवाल, संदिप आटपाळकर,
राजू गायकवाड आदीसंह असंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

वारकऱ्यांच्या सेवेचा विषय सभागृहातून महापौरांच्या अँटीचेंबर मध्ये….

पुणे-संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्याच्या निमित्ताने वारकऱ्यांचे स्वागत करण्यासाठी पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे मंडप यावेळी उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे उभारता येणार नाहीत. याभुमिकेवरून आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर टीकेची झोड  उठविली .अखेर सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी या विषयावर महापौरांच्या दालनात पक्षनेत्यांची बैठक बोलावून मार्ग काढू असे सांगितल्याने या विषयावर त्तापुर्ता सभागृहात तरी पडदा पडला.

सभेच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादीच्या योगेश ससाणे ,भैय्या जाधव या नगरसेवकांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत  येत याचा निषेध व्यक्त केला. पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा महापालिकेने पुरवाव्यात अशी  मागणी यावेळी माजी उपमहापौर दीपक मानकर ,शिवसेनेच्या संजय भोसले,विशाल धनवडे यांच्या सह भाजपच्या अजय खेडेकर ,अमोल बालवडकर आदी नगरसेवकांनी केली.दिलीप बराटे आणि नगरसेवकांनी यावेळी टाळ मृदुंगाचा गजर करत जय जय राम कृष्ण हरी चा नामघोष केला .

न्यायालयाच्या आदेशानुसारकाही  कार्यक्रमावर खर्च करण्यास मज्जाव केल्याने वारीवरील खर्च आणि सोयीसुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यातून प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, तसेच गरज पडल्यास सर्व नगरसेवक आपले मानधन देऊन हा खर्च करतील असे भाजपचे नगरसेवक सुशील मेंगडे यांनी सांगितले.तर अमोल बालवडकर यांनी सलमानखान च्या कार्यक्रमासाठी कायद्याकडे दुर्लक्ष केले जाते मग वारकऱ्यांच्या सेवेसाठी का नाही ? असा सवाल केला . महापौर चषक आणि इतर गोष्टींवर खर्च करायला पैसे आहेत, मग वारकरी सेवेसाठी  का नाही असा सवाल दीपक मानकर यांनी उपस्थित केला.

लोक कायद्यासाठी कि कायदा लोकांसाठी ?गेल्या वर्षी मांडव कमी दिले ,या वर्षी मांडवच बंद ..हे अच्छे दिन अपेक्षित नव्हते असे यावेळी शिवसेनेचे विशाल धनवडे यांनी सांगितले .

काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, हा विषय खर्चाचा नसून प्रशासनाला वारकऱ्यांची सोय आणि धार्मिक उत्सव यातील फरक दिसत  नसून त्यात ते गल्लत करत आहेत. वारकऱ्यांसाठी मंडप उभारणी ही त्यांची सोय आहे. यामध्ये पावसापासून बचाव व्हावा, त्यांना आरोग्य, खाण्याची सोय व्हावी हा उददेश असतो. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची विनंती त्यांनी यावेळी केली.

पुणे महापालिकेच्या बेंच खरेदीत १० कोटीचा घोटाळा -भाजप नगरसेवकाची तक्रार

पुणे- महापालिकेने गेल्या आर्थिक वर्षात सर्व ४१ प्रभागात केलेल्या १८ ते २० कोटी रुपयांच्या बेंच खरेदीत १० ते १२ कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आणि स्थायी समिती सदस्य उमेश गायकवाड यांनी आज मायमराठी शी बोलताना केला .
बाजारात कोणालाही ४२०० रुपयांना मिळणाऱ्या बेंचेची पूर्वगनणपत्रकात १०९०० रुपये किंमत लावून हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला .नेमके पहा आणि एका नगरसेवक गायकवाड यांनी काय म्हटले आहे …..

टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाद्वारे 1,170 तरुणांना केले सबल

पुणे-: टाटा पॉवर ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा कंपनी आपल्या कार्यक्षेत्रात व आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या तरुणांच्या सर्वंकष विकासाच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर राहिली आहे. या अनुषंगाने, टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टने (टीपीसीडीटी) ग्रामीण भागातील तरुणांची कौशल्य वाढवण्यासाठी व त्यांना जवळ्या उद्योगांमध्ये व बाजारात रोजगार मिळण्यासाठी मावळ व भिवपुरी येथे एम्प्लॉएबिलिटी – कौशल विकास प्रोग्रॅम सुरू केला आहे. हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून तीन वर्षांमध्ये, या कार्यक्रमाने 1,170 तरुणांना व्होकेशनल व सेवा उद्योग कौशल्यांमध्ये प्रशिक्षित व प्रमाणित केले आहे.

बहुतांश तरुण दैनंदिन रोजगारावर मजुरी करत असल्याने त्यांना काम करता करता शिकण्याची संधी देणे, हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. मोड्युलर एम्प्लॉएबल स्किल्स ट्रेनिंग प्रोग्रॅम याअंतर्गत टीपीसीडीटीने या तरुणांना अभ्यासक्रमाला अनुसरून तज्ज्ञ शिक्षकांकडून किमान 300 – 750 तासांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण व पुस्तकी ज्ञान दिले.

उपलब्धतेच्या दृष्टीने, ग्रामीण भागातील तलावांच्या पाणलोट क्षेत्रात व प्रकल्पाच्या जवळच्या क्षेत्रात पाच ग्रामीण एम्प्लॉएबिलिटी सेंटर सुरू करण्यात आली. ही केंद्रे ‘कौशल विकास योजना’ योजनेंतर्गत, परिसरातील तरुणांना रोजगार मिळवण्यास व स्वावलंबी होण्यास मदत करण्यासाठी प्रशिक्षित करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आली. प्रशिक्षण देण्यात आलेल्या 70% युवकांना केएसपीजी इंजिनीअरिंग, महिंद्रा अँड महिंद्रा, टीव्हीएस कंपनी, इंटेल इलेक्ट्रॉनिक्स, कामशेत व लोणावळा परिसर, अमेझॉन बॅक एंड ऑफिस; कर्जत व खोपोली परिसरातील इमॅजिका, पाइनवुड रिसॉर्ट येथे प्लेसमेंट मिळाली असून त्यांचे मासिक वेतन 6000 रुपये ते 18000 रुपये आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना, टाटा पॉवरचे सीओओ व कार्यकारी संचालक अशोक सेठी यांनी सांगितले, आम्ही टाटा पॉवरमध्ये नेहमी तरुणांसाठी विकास कार्यक्रमावर विशेष भर दिला आहे. कौशल विकास योजनेच्या अंतर्गत एम्प्लॉएबिलिटी सेंटर स्थापन करून आम्ही समाजाप्रती असलेली आमची बांधिलकी अधोरेखित केली आहे. या विकासाच्या कार्यक्रमाने या परिसरातील 1,170 तरुणांना लाभ झाला आहे व त्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, तसेच भविष्यात अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो जणांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. अशा उपक्रमांद्वारे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी व प्रगतीच्या दिशेने समाज करत असलेल्या वाटचालीमध्ये योगदान देण्यासाठी आम्ही आणखी प्रयत्न करणार आहोत.”

या कार्यक्रमाच्या अंतर्गत, मावळ व भिवपुरी परिसरातील तरुणांना इलेक्ट्रिकल वायरमन, डोमेस्टिक होम अप्लायन्सेस, हेल्थ असिस्टंट, हॉटेल मॅनेजमेंट, मायक्रो ऑफिस स्पेशालिस्ट, सीएनसी मशीन ऑपरेटर, ब्युटी पार्लर तज्ज्ञ, फायनान्शिअल अकाउंटिंग अशा ट्रेडचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एज्युकेशन, महाराष्ट्र टिळक विद्यापीठ, आयसीई, नवी मुंबई, सीआयटी अशा मान्यताप्राप्त संस्था/ व्यवसायिक मंडळाकडून प्रमाणपत्रे दिली आहेत.

राहुल कराड यांचा सुपुत्र चि. आर्यव्रत कराड याचा गायत्रीदीक्षा उपनयन विधि संपन्न

पुणे -मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रांना दशरथांनी तसेच पुरुषोत्तम भगवान् श्रीकृष्णांना त्यांच्या जनकांनी गायत्री दिक्षेनंतरच गुरूंच्या जवळ नेऊन उपनयनानें गुरुकुलवासी केल्यानंतरच ते शस्त्र-शास्त्रदीक्षित झाले. श्रीराम, श्रीकृष्ण हे दोघेहि जन्मानें ब्राह्मण नव्हेत. गायत्री मंत्राचा द्रष्टा विश्‍वामित्र-महर्षि हेहि जन्माने ब्राह्मण नव्हते. परंंतु ही सर्व जन्मानें ब्राह्मणेतर मंडळी गायत्री उपासनेनेंच विश्‍ववन्द्य ठरली. यामुळे गायत्री दीक्षा ही सर्वांसाठीच उज्ज्वल चारित्र्य आणि बौध्दिक तेजस्वितेसाठी केवळ इष्ट नव्हे अत्यावश्यक आहे.
म्हणूनच डॉ. विजय भाटकर आणि एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या आशीर्वाद-मार्गदर्शनाने श्री. राहुल कराड यांचा सुपुत्र चि. आर्यव्रत कराड याचा गायत्रीदीक्षा उपनयन विधि त्यांच्याच निवासस्थानी मी पार पाडला. याप्रसंगी छत्रपति शिवराय या आमच्या राष्ट्रदेवताचा गायत्री संस्कार १६७४ मध्ये गागाभट्टांनी पार पाडला होता. याचे मला प्रेरक संस्मरण झाले. श्री. राहुल कराड यांचेप्रमाणेच आमच्या सर्व समाजबांधवांनी आपापल्या बटूंनां “गायत्रीदीक्षेनें तेजस्वी, यशस्वी, वर्चस्वी करावे” असे आवाहन पं. वसन्तराव गाडगीळ यांनी सर्व समाजाला केले आहे.

हे फेकू सरकार आहे – आमदार अनंतराव गाडगीळ

पुणे-मोदी सरकारच्या काळात सर्वात घोटाळे बँकामध्ये झाले असून ७०६०४ कोटी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत . त्यामध्ये पंजाब नॅशनल बँक व आय सी आय सी आय बँक या बँकामध्ये घोटाळे झालेले आहेत ,आतापर्यंत आठ लाख कोटी रुपयांची कर्जे परत आलेली नाहीत त्यामुळे बँकांचा एन पी ए वाढत आहे .,  त्यामुळे मोदी हे फक्त परदेशात बोलतात आपल्या देशात बोलत नाही , त्यामुळे हे फेकू सरकार असल्याचे आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले .

पुणे कॅम्प भागात डेक्कन टॉवर येथे ‘” फेकू सरकार “…..या विषयावर आमदार अनंतराव गाडगीळ यांचे टॉकिंग पॉईंट द्वारे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . त्यावेळी ते  बोलत होते . या कार्यक्रम अध्यक्षस्थानी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष   रमेश बागवे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष करण मकवानी , राजाभाऊ चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आमदार अनंतराव गाडगीळ यांनी सांगितले कि , मोदी सरकरने जाहिरातीवर ३७५५कोटी रुपये खर्च केले . एजन्सीला ११०० कोटी रुपये देण्यात आले . मन कि बातला  १०० कोटी , कॅलेंडरला २९९ कोटी रुपये खर्च करण्यात आला . काँग्रेसच्या आणलेल्या योजनांना दुसरी नावे या सरकारने दिल्या आहे . यामध्ये इंदिरा आवास योजनेला पंतप्रधान आवास योजना , निर्मल ग्राम योजनेला स्वछ भारत अभियान , तर राजीव गांधी जीवनदायी योजनेला महात्मा फुले जीवनदायी योजना नावे दिली आहेत . .आज देशात ८९३ प्रकल्पांचे काम रखडले आहे . काँग्रेसच्या काळात बँकामध्ये १३ टक्केच्या पुढे डिपॉजिट होती , परंतु मोदी सरकारच्या काळात सध्या १० टक्केच्या डिपॉजिट नाहीत. एकीकडे पुण्याला स्मार्ट सिटी बनविणार असल्याचे सांगतात . परंतु आर्थिक तरतुदीमध्ये ७ टक्के खर्च करण्यात आला आहे . पुण्यासाठी ५६ प्रकल्पांचे काम करणार होते . त्यामध्ये फक्त १० प्रकल्पांचे काम झालेले आहे . हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले आहे . काशेवाडी कसबा पेठ स्मार्ट सिटी का करत नाही बाणेर औंध भागच स्मार्ट का करतात असा सवाल आमदार गाडगीळांनी उपस्थित केला . पुणेकरांची शुध्द फसवणूक सुरु आहे . पुण्याची मेट्रो हि पालकमंत्री व खासदार यांच्यामध्ये असलेल्या वादामुळे रखडली . पुण्याचे खासदार मेट्रो जमिनीखालून न्यायचे सांगतात तर पालकमंत्री मेट्रो जमिनीवरून नेण्याचे सांगतात त्यामुळे पुण्याच्या मेट्रोचे काम रखडले .

गेल्या चार वर्षात लघु उद्योगामध्ये ५० टक्के घट झाली आहे . त्यामध्ये ३५ टक्के कामगार या लघु उद्योगांमधून कमी झालेले आहेत . २९८४ कंपन्या करार झाले परंतु पुढे काय झाले नाही . मेक इन इंडिया कागदावरच राहिली . जी एस टी ची कर प्रणाली चुकीच्या पध्दतीने लावण्यात आली . यामध्ये त्यांनी सांगितले सोन्याच्या बिस्किटाला ४ टक्के , खायच्या बिस्किटाला  १८ टक्के , चॉकलेटला २८ टक्के त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थेची वाट लावली आहे . शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये  ५८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरले . एका फॉर्ममध्ये ६० प्रश्न असल्याने शेतकरी वैतागले , त्यामुळे शेतीचे उत्पादन घातले . संपूर्ण बांधकाम क्षेत्रात मंदी आली आहे . त्यामुळे गवंडी , सुतार , प्लंबर , प्लास्टर कामगार , रंगारी , इलेक्ट्रिक्शन कामगार बेरोजगार झाले आहेत . यामध्ये छोटे व्यावसायिक पूर्णपणे संपले . आणि आर्थिक व्यवस्था कोलमडली . अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्प आणला आहे परंतु यामध्ये १२ रेल्वे स्टेशन हे गुजरात मध्ये आहेत तर ४ रेल्वे स्टेशन महाराष्ट्र्रात आहेत तरीदेखील या प्रकल्पासाठी ५० टक्के खर्च हा महाराष्ट्र सरकारकडून घेतला जात आहे. या सरकारची नोटबंदी पूर्णपणे फसली आहे . १२० लोक रांगेत उभे राहून मृत्युमुखी पडले . नोटाबंदी होऊन  देखील जम्मू काश्मीरमध्ये खोट्या नोटा सापडल्या . तसेच ३८ टक्के दहशतवादी वाढले . ऑनलाईन व्यवहार हा परदेशातील कंपन्यांना काम मिळावे म्हणून ऑनलाइन व्यवहार करण्याचा घाट घातला जात आहे . अमेरिकेत आजदेखील फक्त १९ टक्के लोक ऑनलाईन व्यवहार करतात . तसेच फ्रांस व जर्मनीमध्ये  १ टक्के ऑनलाईन व्यवहार करतात . महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक मंत्र्यांचे घोटाळे उघडकीस आले . १८ मंत्र्यांचे घोटाळ्याचे आरोप  झाले . सर्वोच न्यायालयातील ४ न्यायमूर्तीनी या सरकारबदल तक्रार केली . देशामध्ये आजमितीला १०७९ न्यायाधीशांची गरज असून फक्त ६०१ न्यायाधीश नेमण्यात आले आहे . त्यामध्ये उच्चं न्यायालयामध्ये ४० लाख केसेस तर सर्वोच्च न्यायालयात ६०००० केसेस प्रलंबित आहेत . हे सरकार मीडियावर दबाव आणण्याचे काम करीत आहे . मोदी सरकार चार वर्ष झाले सत्तेवर आले असून त्यांनी एकदा देखील पत्रकार परिषद घेतलेली नाही . आपल्या विरोधामधील बातम्या दाबण्याचे काम हे सरकार माध्यमांवर दबाव आणून करीत आहे . आजच्या घडीला ११९५ भारतीयांनी परदेशात पैसे ठेवले आहेत . त्यामध्ये २५४२० कोटी रुपये बाहेर आहेत . त्यामध्ये किती पैसे मोदी सरकराने आणले ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला .

या कार्यक्रम अध्यक्ष पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष   रमेश बागवे यांनी सांगितले कि , पुणे शहर काँग्रेस कमिटीतर्फे मोदी सरकारच्या खोटा चेहरा दाखविण्यासाठी लवकरच पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे , हि पुस्तिका काँग्रेस कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करावे .   काँग्रेस पक्षाने लोकशाही टिकविण्याचे काम केले आहे . जनतेला देखील वाटत आहे कि काँग्रेस सत्तेवर आली पाहिजे . काँग्रेस सरकार चालवू शकते . भाजप दिशाभूल करून सरकार चालवीत आहे . यापुढच्या काळात काँग्रेस पक्ष बूथ कमिट्या मजबूत करण्याचे काम करणार आहे .   माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले .

या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचे संयोजन  पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघातील  कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी केले होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले . तर आभार पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीप परदेशी यांनी मानले .

किन्नर सन्मान सोहळा – एक पाऊल नकाराकडून स्वीकाराकडे

0
पुणे :”किन्नर सन्मान सोहळा “हे शब्द ऐकल्यानंतर आज हि “काय” ? असा प्रति प्रश्न आलंय . हो … येत्या रविवार  २० मे  २०१८ रोजी बालगंधर्व रंग मंदिर पुणे येथे बाबा ग्रुप ऑफ  कंपनीस ,एन २४ इंटरटेन्मेन्ट ,ऑल सोर्स मीडिया  यांच्या संकल्पनेतून दुपारी १२:३० वाजता सुरुवात होणार एका नव्या पर्वाला …. !
किन्नर सन्मान सोहळा – एक पाऊल नकाराकडून स्वीकाराकडे ….. 
    घरामध्ये मुलांचा किंवा मुलीचा जन्म झाला तर आनंद साजरा केला जातो पण किन्नर हि निसर्गाचीच देणगी आहे . अनेक समाज गैर समजातून त्यांना समाजाचा भाग म्हणून देखील स्वीकारले जात नाही. अशा परिस्थिती अनेक पातळयांवर  लढून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले . त्यापैकी कित्येक जणी वैश्या व्यवसायातील भगिनींच्या मुलांना आई आणि बापाचे सुख देत आहेत . विद्यादान ,समाजकार्य या कला क्षेत्रात नाव कमवतात . पण आज हि त्यांना मोठं मोठ्या मॉल मध्ये अपराध्या सारखे वागवून प्रवेश नाकारे  प्रयन्त अविचार केला जातो .
        सत्य समाज -गैरसमजांना संपविण्यासाठी चला एक पाऊल नाकाराकडून स्वीकाराकडे उचलुया ….
तुमच्या आमच्या सारखेच समाजाचे ऋण फेडण्यासाठी त्यांनी श्रम घेतले आहेत . त्याचाही सन्मान करूयात …..!
      हा पुरस्कार सोहळा प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. त्यामध्ये पुण्यनगरीच्या पालकमंत्री नामदार गिरीश बापट ,महापौर सौ मुक्त टिळक ,उपमहापौर डॉ सिद्धार्थ धेंडे ,खासदार
वंदना चव्हाण ,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले हे उपस्थित राहणार आहेत.
  हा पुरस्कार जे तृतीयपंथी असून ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम कामगिरी केली त्यांचा हा गौरव
संपूर्ण महाराष्ट्रातून तृतीयपंथी मधून निवड करण्यात आली. त्यामध्ये १० जणींची निवड करण्यात आली  ते तृतीय पंथी{ पुणे ,मुंबई,दौड ,अकलूज }येथील आहेत.
          किन्नर समाजात अनेक उत्तमोत्तम कलाकार आहेत ,समाजाकडून त्यांची दाखल घेतली जात नाही हे दुर्दव आहे त्यांच्या कलेला दाद मिळावी कामासाठी प्रोत्सहन आणि पुढील वाटचालीसाठी उमेद मिळावी यासाठी चित्रपट महामंडळाने या सोहळ्याला पाठींबा दिला आहे . समाज बदलत असताना तृतीय पंथाने कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे . त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेटले पाहिझे. या भावनेला पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने बळकटी मिळेल . असे अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले म्हणाले.
   प्रामुख्याने मागण्या 
१}नोकरीत आरक्षण पाहिजे
२}बलात्काराच्या घटना रोखण्याच्या दृष्टीने रात्रीच्या वेळी सुरक्षा रक्षक म्हणन आय. टी  कंपन्या ,रेल्वे ,वाहतूक गाड्या ,सोसायटी यामध्ये नेमणूक करावी.
३}प्रवासामध्ये सवलती मिळाल्या नाहीत अशा विविध मागण्याची निवेदन तृतीयपंथी समाजाद्वारे मंत्री  पंकजा मुंडे याना देण्यात आले होते .
           पुरस्कार सोहळ्यामध्ये सरपंच ,शिक्षक ,नृत्यांगना ,कवियत्री ,मेकअप आर्टिस्ट ,सोशल वर्कर यशस्वी होत असलेल्या तृतीयपंथांचा सन्मान करण्यात येणार आहे . अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या साहाय्याने बाबा ग्रुप ऑफ कंपनीस ,एन २४ इंटरटेन्मेन्ट ,ऑल सोर्स मेडिया ,सिद्धांत मीडिया यांच्या पुढाकाराने हि आगळी वेगळी संकल्पना प्रत्यक्षात साकारत आहेत .
      या सन्मान सोहळ्यास सहकार्य अजित पाटील एंटरटेनमेंट ,शैलेंद्र फिल्म्स ,संगीत स्वर साधना ग्रुप ,सुत्रसंचलन दीपिका सोनावणे ,गो लेझर इंटरनॅशनल तसेच कार्यक्रम दिग्दर्शन आणि लेखन प्रवीण जोशी यांनी केले आहे ,आशुतोष वाडेकर स्कीट ग्रुप, प्रतीक डान्स अकादमी ,नृत्यप्रिया हे आहेत.
पुरस्कारार्थी  यांची नावे  
१}रंजिताबाई नायक -तृतीयपंथी प्रमुख गुरु 
२}चांदणी गोरे -एन .जी .ओ  निर्भया आनंदी जीवन 
३}सोनाली दळवी -सोशल वर्कर 
४}पन्ना गुरु -वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या मुलांची शाळा चालवत आहेत 
५}माउली कांबळे -अकलूज 
६}संचित पाटील -सोशल वर्कर 
७}ऐश्वर्या बनसोडे  -सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट 
८}दिशा शेख -कवियत्री 
९}रश्मी पुणेकर -पुणे महानगरपालिका कर्मचारी व आर्टिस्ट 
१०}प्रेरणा वाघेला -अध्यक्ष ह्युमन राईट्स व सोशल वर्कर 

रमजानच्या उपवासानिमित्त बाजारपेठेत ७० प्रकारचे खजूर बाजारात

पुणे-रमजानच्या उपवासानिमित्त पुणे लष्कर भागातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील बाजारपेठेत ७० प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत . परदेशातून मोठ्या प्रमाणावर खजूर विक्रीस आलेले आहेत . इराण , इराक , सौदी परदेशातून खुजर विक्रीस भारतात येत असतात .या खुजरमध्ये अजवा , कलमी ,मदिना ,  मगजोल , फरत , सुलतान , केमिया , रुकसार , हसना , हार्मोनियम , मुज्जरब , बुरारी , गुड , अल्जेरियन असे अनेक प्रकारचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत . अशी माहिती मदिना डेट्सचे खजुरचे व्यापारी दानेश फरीद शेख यांनी दिली .

रमजानचा उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक खजूरची खरेदी करीत असतात . मध्ये सर्वात जास्त मदिना या खुजराला मागणी असते ताई सर्वात महागडा मगजोल  हा खजूर बाजारपेठेत उपलब्ध आहे. सुमारे अडीचशे रुपये किलोपासून तर १८०० रुपये किलोपर्यंत खजूर विक्रीस उपलब्ध आहे . मुस्लिम बांधव सायंकाळी उपवास सोडण्यासाठी प्रथम खजूर खाऊन उपवास सोडतात . त्यामुळे रमजानच्या महिन्यात खजूरला महत्व आहे . कलमी , फरद , हे इराणी खजूर जास्त ग्राहकांची मागणी असते . खजूर खाल्ल्याने रक्त वाढ होते . तसेच व्हिटमन्ससुध्दा मिळते . खजूर खरेदी करण्यासाठी कोंढवा , हडपसर , शिवापूर , खडकी , पिंपरी , चिंचवड , लोणावळा , अहमदनगर आदी भागातून मोठया प्रमाणावर ग्राहक येतात . अशी माहिती खुजरचे व्यापारी असिम सईड शेख यांनी माहिती दिली .

संघर्षानंतरच मिळाले यशः अंकिता रैना

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र झाल्याबद्दल लक्ष्य, पीएमटीडीए व पीवायसी हिंदू जिमखाना तर्फे अंकिताचा गौरव
 
पुणे, दि.17 मे 2018ः मी आज फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. परंतु हे यश मला खडतर संघर्ष केल्यानंतरच मिळाले आहे, असे भारताची अव्वल मानांकित टेनिसपटू अंकिता रैना हिने यावेळी सांगितले. 
 
फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी पात्र ठरल्याबद्दल लक्ष्य, पीएमटीडीए व पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या तर्फे अंकिता रैनाचा गौरव करण्यात आला. यावेळी पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील, सुंदर अय्यर, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव कुमार ताम्हाणे, अंकिताची आई ललिता रैना आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
आपल्या संघर्षाच्या काळात मदत करणार्‍या सर्वांना तिने धन्यवाद दिले. तसेच, त्यांच्या सहकार्यामुळे मी इथपर्यंत मजल मारू शकले, असे तिने नमुद केले. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पुर्वतयारीसाठी डब्लुटीए स्पर्धा, चीनमधील स्पर्धा खेळून सराव केल्याचे तिने सांगितले. तसेच, आपला आवडता सरफेस ग्रासकोर्ट असल्याचे सांगून अंकिता म्हणाली की, क्ले कोर्टवर होणार्‍या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेसाठी वेगळा सराव केला आहे. तसेच, आगामी विंबल्डन टेनिस स्पर्धेतही मी सहभागी होणार आहे. 
 
युरोप किंवा अमेरिकेतील अधिक तंदरूस्त आणि बळकट शरीरयष्टी असलेल्या खेळाडूंशी तोंड देण्यासाठी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव केला आहे. अशा खेळाडूंचा सामना करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सज्ज असणे आवश्यक असते. परंतु मी आता बरीच वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा खेळत असल्यामुळे अशा खेळाडूंना तोंड देण्याचा मला पुरेसा अनुभव आहे.  पीवायसी आणि लक्ष्य यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे मला इथपर्यंत वाटचाल करता आली. पीवायसी हिंदू जिमखाना, लक्ष्य, प्रशिक्षक हेमंत बेंद्रे आणि सुंदर अय्यर यांचे मला वेळोवेळी बहुमोल साहाय्य लाभले आहे. 
 
पीएमडीटीएचे अध्यक्ष किशोर पाटील म्हणाले की, अंकिता फ्रेंच ओपनसाठी पात्र ठरल्यामुळे युवा खेळाडूंना यातून अधिक प्रेरणा मिळेल. यामुळे एक सर्वसाधारण घरातील मुलगी ही ग्रँड स्लॅमपर्यंत मजल मारू शकते, हा आत्मविश्वास उद्योन्मुख खेळाडूंच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. 
 
लक्ष्यचे अभिजीत कुंटे म्हणाले की, अपयशी ठरत असतानाही अंकिताने धीर आणि संय्यम न सोडता सातत्याने प्रयत्न करणे सुरू ठेवले. या गुणांचा आदर्श सर्व खेळाडूंनी ठेवला पाहिजे.
 
अंकिताने बालपणापासून केलेली मेहनत आणि तिच्या आईने केलेला त्याग याची माहिती सुंदर अय्यर यांनी दिली. 16 वर्षाची असताना तिने 18 वर्षाखालील राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आणि आता पुण्यात  सराव करून ग्रँड स्लॅमपयर्र्त पोहचणारी ती पहिली पुणेकर खेळाडू ठरली आहे. तिच्यातील गुणवत्ता पाहून  तिला लक्ष्यने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता आणि आपल्या कामगिरीने तो तिने सार्थ ठरविला आहे. आम्हांला अंकितासाठी अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी कंपन्यातील भारतीयांनीदेखील आर्थिक मदत केली आहे. तसेच, शासनाने देखील तिला टॉप स्किम अंतर्गत मदत करण्याचे मान्य केले आहे. तिच्या आगामी वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतो. 

पाण्याची गळती थांबवा-अण्णा जोगदंड

0
पिंपरी-भोसरी-टेल्को रोड वर होणारी पाण्याची गळती थांबवा अशी मागणी   मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी केली आहे.
भोसरी-टेल्को रोड वर थरमॅक्स कंपनीच्या गेट समोर पि.चिं.मनपा व एम.आय.डी. सी च्या दोन मोठ्या पाईप लाईन एकमेकांना चिकटून गेल्या आहेत.
    तेथे गेल्या दोन महिन्यांपासून 3HP मोटरणे जेवडे पाणी सोडले जाते त्या पेक्षा  पाणी वाया जात आहे गेल्या अनेक दिवसापासून याठिकाणी  एवढ्या मोठ्या  प्रमाणात पाणी गळती होते.लाखो लिटर पाणी रात्रंदिवस वाया जाते.थरमॅक्स कंपनीतील कर्मचारी दशरथ शितोळे यांनी एम.आय.डी. सी व पालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार कल्पना दिली परंतु त्यांनीं दाद दिली नाही.
       मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी एम.आय.डी. सी चे मुख्य कार्यकारी अभियंता कल्पेश लाहीवाल व मनपाचे मुख्य कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत यांच्याशी संपर्क साधला असता या दोघांनी पालिकेच्या वतीने रवी पवार व एम.आय.डी. सी च्या वतीने संतोष तावल यांच्या उपस्थितीत पाहणी केली.विद्युत वितरण कंपनीचा खांब असल्यामुळे तो काढल्याशिवाय खोदकाम करता येणार नाही म्हणून दोन्ही अधिकारी यांनी हात झटकले. शेवटी आम्ही म.रा.विद्युत वितरणाचे कार्यकारी अभियंता शेळके साहेब यांची भेट घेतली त्यांनी भोसरी येथील सहाय्यक कार्यकारी अभियंता बी.बी.भरणे यांना खांब काढण्यासाठी पत्र देण्याचे सांगितले.त्यांनी पत्र दिल्यानंतर शेवटी विद्युत खांब निघाल्याशिवाय गळती थांबणार नाही हे निश्चित झाले.मी पाणी वाचवण्यासाठी पंधरा दिवसांपुर्वी पाणी वाचवा रॅलीद्वारे अभियान राबवून नागरीकांना पाणी बचतीचे आवाहान करीत असताना पिंपरी चिंचवड मनपा व एम, आय. डी. सी. जबाबदारीचे एकमेकाकडे बोट करत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.  जर याठिकाणी लवकर पाणी गळती थांबवली नाही तर तेथे आम्ही पाणी गळती थांबावी म्हणून शहरातील सर्व नागरीकांना त्याठिकाणी उपस्थित राहाण्याचे आवहान करुन  शहराचे महापौर व  पिंपरी चिंचवड मनपाचे आयुक्त यांच्या प्रतिमेची पुजा करुन पाणी गळती थांबवावी म्हणुन साकडे घालू   असे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी सांगितले.
     यावेळी संस्था अध्यक्ष विकास कुचेकर,उपाध्यक्ष विकास शहाने,मुरलीधर दळवी,सौ.संगिता जोगदंड,ऍड.सचिन काळे उपस्थित होते.

‘पुण्यभूषण’ने अनुकरणीय परंपरा निर्माण केली – डॉ. सतीश देसाई

‘सिनर्जी’ फाऊंडेशनतर्फे डॉ. सतीश देसाई यांचा सत्कार
पुणे : ’नावीन्यपूर्ण संकल्पना ,टीमवर्क, सातत्य या जोरावर  पुण्यभूषण फाऊंडेशन’ने अनेक उपक्रम यशस्वी केले,  जगभर त्याचे  अनुकरण झाले ‘’ असे प्रतिपादन ’पुण्यभूषण फाऊंडेशन’चे संस्थापक डॉ. सतीश देसाई यांनी केले.
‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज‘ आणि ‘सिनर्जी फाऊंडेशन’ यांच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक योगदानाबद्दल डॉ. सतीश देसाई यांचा सत्कार मंगळवार, दि. 15 मे रोजी सायंकाळी करण्यात आला.
 ’सिनर्जी’चे संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर, गणेश जाधव यांच्या हस्ते हा सत्कार झाला. एरंडवणे येथील ’सिनर्जी’च्या कार्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला.
’सिनर्जी संवाद’ या उपक्रमातंर्गत झालेले हे दुसरे संवाद पुष्प होते.
यावेळी डॉ. सतीश देसाई यांनी ’पुण्यभूषणचे दिवस’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला.
डॉ. देसाई म्हणाले, ’स्वातंत्र्यसैनिकांची आठवण चिरंतन ठेवण्यासाठी ’त्रिदल’ संस्थेची स्थापना झाली, तर स्वातंत्र्योत्तर पिढीच्या योगदानाची दखल घेण्यासाठी एस.एम.जोशी यांच्या प्रेरणेने ’पुण्यभूषण’ फाऊंडेशन ‘ ची स्थापना झाली.
पहिला ‘पुण्यभूषण ‘ पुरस्कार भीमसेन जोशी यांना देण्यात आला. आता हा पुरस्कार जगद्विख्यात झाला असून, गावोगावी त्याचे अनुकरण सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहर जोशी पुण्यभूषण कार्यक्रमाला आल्यावर त्यांच्या पुढाकाराने ’महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू झाला. ’पुण्यभूषण’ परंपरेला आता 30 वर्षे पूर्ण झाली. उपराष्ट्रपती, राष्ट्रपतीदेखील या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला पाहुणे म्हणून येऊन गेले आहेत. ही एकमेवद्वितीय घटना आहे.
’आम्ही जे करू, ते उत्तम करू आणि जगभर अनुकरण होईल, असे करू, या ध्यासातूनच  पुण्यभूषण पुरस्कारानंतर पुढे ’ पुण्यभूषण पहाट दिवाळी’, ’पुण्यभूषण दिवाळी अंक’ हे उपक्रम सुरू झाले. ’पहाट दिवाळी’चे जगभर अनुकरण झाले, तर ’पुण्यभूषण’ हा शहराला वाहिलेला अनोखा संग्राहय दिवाळी अंक ठरला. हा अंक दरवर्षी पुरस्कार मिळवत असतो.
आम्ही सर्वजण  कार्यकर्ते म्हणून पुण्यभूषण टीममध्ये काम करतो, आमच्याकडे पदाधिकारी नाहीत. रसिकांच्या अंतकरणात आम्ही घर केले आणि अजोड अशी विश्‍वासार्हता मिळवली’, असेही डॉ. देसाई म्हणाले.
पु.ल. देशपांडे जन्मशताब्दी निमित्त आगामी वर्षांत 5 खंडांत 53 शहरात होणार्‍या ’ग्लोबल पुलोत्सव’ उपक्रमाची माहितीही त्यांनी दिली.
दीपक बीडकर यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र आवटे यांनी आभार मानले.

पावसाळ्यात वीजयंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन

पुणे: मान्सूनपूर्व वादळी पाऊस, गारपीट तसेच पावसाळ्यातील अतिवृष्टी, झाडाच्या फांद्या पडल्याने किंवा वादळामुळे तुटलेल्या वीजतारा व शॉर्टसर्कीट आदींमुळे दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा व उपकरणांपासून सतर्क राहावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणार्‍या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी 24 तास सुरु असणार्‍या कॉलसेंटर्सचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे या टोलफ्री क्रमांकावर वीजग्राहकांना तक्रार दाखल करता येते. वीजसेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय उपलब्ध आहे. पूर किंवा अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी प्रतिकूल स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रोहित्र आणि वीजपुरवठा बंद करण्यात येतो. अशा स्थितीत संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावे. विशेषतः टिनपत्र्याच्या घरात राहणार्‍या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. याशिवाय विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत किंवा विद्युत खाबांना तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

किशनचंद तनवाणींच्या प्लॉटकडे जाणारा रस्ता मोकळा करण्यासाठीच घडवली दंगल- धनंजय मुंडे

0

औरंगाबाद- शहागंज येथील फेरीवाल्यांकडून मिळणारे हप्ते आणि एका माजी आमदाराच्या प्लॉटकडे जाण्यासाठी रस्ता असावा यासाठी शुक्रवारची दंगल घडवण्यात आली. गुप्तचर विभागांनी माहिती दिल्यानंतरही पोलिस काहीच करत नाहीत तेव्हा राज्यातील गृह विभाग कोठे आहे, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.दरम्यान 1950 मध्ये शासनाने माझ्या आजोबांना दिलेले एक दुकान येथे आहे. ते सध्या काकांच्या ताब्यात आहे. याशिवाय आमच्या कुटुंबाची येथे कोणतीही मालमत्ता नाही. जर मुंडे यांनी भूखंड शोधला असेल तर मी लगेच त्यांच्या नावे करून देतो. त्यांनी भूखंड शोधून स्वत:ची मालमत्ता वाढवावी. असे भाजपचे माजी आमदार तनवाणी यांनी म्हटले आहे .

माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचा या परिसरात प्लॉट असून त्याकडे जाण्यासाठी रस्ता मोकळा व्हावा यासाठी येथील दुकाने जाळून टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर माझा या परिसरात कोणताही भूखंड नाही. मुंडे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आहेत. अशा जबाबदार व्यक्तीने माहिती असेल तरच बोलावे. दंगलीनंतर येथे शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रयत्न करण्याऐवजी ते पुन्हा लोकांना भडकवण्यासाठी अशी विधाने करत असल्याचा आरोप तनवाणी यांनी केला आहे. मुंडे यांनी मंगळवारी सकाळी शहागंज, राजाबाजार या भागाची पाहणी केली. त्यांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पाहणीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे यांनी दंगलीची तीन कारणे सांगितली. पहिले म्हणजे येथील फेरीवाल्यांकडून हप्ते घेण्यावरून वाद, दुसरे माजी आमदार तनवाणी यांच्या प्लॉटकडे जाणारा रस्ता मोकळा करणे आणि तिसरे म्हणजे येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या उर्वरितपुतळ्यासाठी आलेला निधी खर्च करणे. या तीन कारणांनीच दंगल झाल्याचे ते म्हणाले. दंगल हाताळण्यात पोलिस सर्वस्वी अपयशी ठरले आहेत. राज्यात गृह विभाग आहे की नाही असा प्रश्न आहे. माणसे मेल्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन हाती घेण्यात आले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावरही कारवाई व्हावी. मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी २५ लाख तर जखमींना प्रत्येकी २ लाख रुपये भरपाई देण्यात यावी. या दंगलीची चौकशी विद्यमान न्यायाधीशामार्फत करण्यात यावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, असेही ते म्हणाले.अडीच महिन्यांपूर्वी शहागंज भागात वाद होऊ शकतो, असा अहवाल गुप्तचर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिला होता. त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्या अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली.