Home Blog Page 312

धार्मिक स्थळांवर लगेचच कारवाई नाही आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन – राहुल डंबाळे

मदरसा, मस्जिद ॲक्शन कमिटीच्या प्रतिनिधींची आयुक्तांसमवेत समवेत बैठक संपन्न

पुणे -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कुदळवाडी, चिखली परिसरातील अनधिकृत मंदिर, मस्जिद, मदरसा व इतर धार्मिक स्थळांना अतिक्रमण बाबत नोटीस दिली आहे. या बाबत मदरसा, मस्जिद ॲक्शन कमिटीच्या वतीने आक्षेप घेण्यात आला होता. तसे पत्र समन्वयक राहुल डंबाळे आणि प्रतिनिधींनी आयुक्त शेखर सिंह यांना दिले होते. याविषयी मंगळवारी आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. मा. सर्वोच्च न्यायालय व राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन मनपाने करावे. तसेच आक्षेप घेण्यात आलेल्या व प्राप्त झालेल्या पत्रांवर सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी यावेळी आयुक्तांकडे करण्यात आली.
या बैठकीस ॲक्शन कमिटीचे समन्वयक राहुल डंबाळे, फजल शेख, अजीज शेख, शहाबुद्दीन शेख, नियाज सिद्दीकी, बाळासाहेब भागवत, बाबा कांबळे, गुलजार शेख, युसुफ कुरैशी, मौलाना नय्यर नुरी, कारी इक्बाल उस्मानी, सय्यद गुलाम रसुल, याकुब शेख, रशिद सय्यद, शक्रुल्ला पठाण, वाहीद कुरैशी, पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन हिरे आदी उपस्थित होते.
या बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना समन्वयक राहुल डंबाळे व शहाबुद्दीन शेख यांनी सांगितले की, आयुक्त शेखर सिंह यांनी या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आले की, सर्व मशिदी, मदरसे हे खाजगी जागेवर असून त्या राज्य शासनाच्या धोरणानुसार नियमित होण्यास पात्र आहेत. तशी कार्यवाही कमिटीच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ही धार्मिक स्थळे अधिकृत करून द्यावी अशी विनंती केली. राज्य शासनाने यापूर्वीच छत्रपती, कोल्हापूर, मीरा-भाईंदर, मुंबई, नागपुर आदी महानगरपालिका क्षेत्रांमधील हजारो धार्मिक स्थळे नियमित केल्याची बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानंतर या सर्व बाबींची सविस्तर माहिती घेऊन जी धार्मिक स्थळे नियमानुकूल होणे शक्य असेल त्यांच्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन आयुक्तांनी शिष्टमंडळास दिले आहे अशी माहिती डंबळे यांनी दिली.
इतर महापालिकांप्रमाणे धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत यावेळी शिष्टमंडळातील सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. दरम्यान महानगरपालिकेने एकतर्फी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी भीती देखील यावेळी व्यक्त केली. भारत-पाक युद्धाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरांमध्ये अन्य कोणताही तणाव निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर ही कारवाई रद्द करावी अशीही विनंती करण्यात आली होती. दरम्यान नोटीस दिलेल्यांपैकी पाच मशिदींना छत्रपती संभाजी नगर येथील वक्फ ट्रीब्युनल बोर्डाने मनपाने कारवाई करण्यास स्थगिती आदेश दिलेले आहेत हे देखील आयुक्त शेखर सिंह यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. याविषयी शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी पुढील कामाबाबत समन्वय साधण्यात यावा असेही आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले असल्याचे शहाबुद्दीन शेख यांनी सांगितले.

कटकारस्थान करून रात्री-अपरात्री आळंदी घाटांची तोडफोड व विद्रूपीकरण: कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार, चौकशी करा… वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

पुणे दि. १४ मेः  तीर्थक्षेत्र विकासाच्या नावाखाली आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या उत्तर तीरावर सुरू असलेले अत्यंत सुंदर व देखण्या घाटांचे शासनातर्फे रात्री-अपरात्री केले जाणारे विद्रूपीकरण ताबडतोब थांबवून, या मागील तथाकथित भ्रष्टाचाराची सखोल चौकशी केली जावी, अशी मागणी महाराष्ट्रातील समस्त वारकरी संप्रदायातर्फे महाराष्ट्राचे जाणकार व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील नामवंत संत, कीर्तनकार, प्रवचनकार इ. मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन सादर करणार आहेत. अशी माहिती विश्व शांती केंद्र (आळंदी) व कार्याध्यक्ष, श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.


दि. ५ जुलै १९८८ रोजी ह्या घाटांच्या बांधणीची सुरुवात झाली. त्यापूर्वी, इंद्रायणीचे तीर अत्यंत गलिच्छ आणि ओंगळवाण्या अवस्थेत होते. त्याचे सुशोभीकरण आणि वारकर्‍यांना सुरक्षित व स्वच्छ घाटांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीत स्नान व इतर उपचार करून देण्याचे स्वप्न, अनेक संत सज्जनांनी पाहिले. त्यात वारकरी परंपरेचे अध्वर्यू ह.भ.प. वै. धुंडा महाराज देगलूरकर, ह.भ.प. वै. शंकरबापू शिंदे-आपेगांवकर, ह.भ.प. वै. बाळासाहेब भारदे, ह.भ.प. वै. किसन महाराज साखरे, पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. पी.जी. भिडे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. माधवराव सूर्यवंशी, आळंदीचे तत्कालीन नगराध्यक्ष श्री. सुरेश गांधी आणि त्यांचे सहकारी व महाराष्ट्रातील इतर हजारो वैष्णव वारकरी इ.चा समावेश होता.
वाट खडतर होती, अनेक अडथळे येऊन सुध्दा महाराष्ट्रातील लाखो वारकर्‍यांच्या प्रत्यक्ष सहभागाने, सुमारे १८ – २० वर्षांच्या कालावधीत हे कार्य पूर्ण झाले आणि नदीच्या दुतर्फा अत्यंत देखण्या आणि टिकाऊ अशा घाटांची निर्मिती झाली. घाट बांधून झाल्यावर, इंद्रायणी नदीच्या दक्षिण तीरावर विश्वरूप दर्शन मंच देखील उभारण्यात आला.
योगायोगाने, या कार्यासाठी भारताचे तत्कालीन शिक्षणमंत्री व संत वृत्तीचे शास्त्रज्ञ असलेले डॉ. मुरली मनोहर जोशी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. हे संपूर्ण कार्य श्रीक्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र (आळंदी) यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्णत्त्वास नेण्यात आले.
  परंतु, सुमारे महिन्याभरापूर्वी रात्रीच्या वेळी अचानक आळंदी इंद्रायणी नदीच्या उत्तर तीरावरील घाट फोडण्याच्या कामास सुरूवात झाली. चौकशी करता असे सांगण्यात आले की, तीर्थक्षेत्र विकासाच्या आराखड्याखाली सांडपाण्याचे पाईप टाकण्याचे काम जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार केले जात आहे. अधिक चौकशी असे लक्षात आले की, सदरील आदेश हा सुमारे १३ महिन्यांपूर्वीचा म्हणजे १५ मार्च २०२४ चा असून, सुमारे १२ कोटी रुपयांचे हे काम एक वर्षाच्या विलंबाने का सुरू झाले आहे, हे कळू शकले नाही.
या प्रकरणांमुळे खालील प्रश्न निर्माण होतात.
१. कार्याची एकूण व्याप्ती बघता त्यासाठी १२ कोटी रुपयांचा खर्च खरंच आवश्यक आहे का?
२. हे घाट सुमारे १५-२० वर्षाच्या कालावधीमध्ये पुण्यातील श्री क्षेत्र आळंदी-देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र (आळंदी) या दोन संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने आणि महाराष्ट्रातील समस्त वारकरी भाविकभक्तांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष योगदानाच्या माध्यमातून बांधले गेले आहेत. सदरील घाटांचे सर्व संमतीप्राप्त नकाशे वरील संस्थांकडे उपलब्ध असताना देखील अशा प्रकारचे कार्य अचानकपणे आणि त्यांना विश्वासात न घेता का सुरू करण्यात आले?
३. घाट बांधतानाच त्यांच्याखाली सुमारे ६ फूट उंच व ४ फूट रुंदीची काँकीटची गटारं बांधण्यात आली होती, जी आळंदी शहराचे सांडपाणी वाहून नेण्यास समर्थ होती, असे असतानादेखील नवीन सांडपाण्याची व्यवस्था करण्याची काय गरज होती?
४. हे कार्य शक्यतोवर रात्रीच्या वेळेतच करण्यात आले, त्यामागचे कारण काय?
५. सदरील घाटावर वारकरी संप्रदायातील अनेक अध्वर्यू संतमंडळींच्या समाध्या आहेत. या समाध्यांना बांधकामा दरम्यान हानी पोहोचली असून, या समाध्यांची शासनातर्फे कशा प्रकारे दुरुस्ती करण्यात येणार आहे?
या सर्व प्रकारामुळे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेला व भावनेला तडा गेलेला आहे. तसेच माऊलींच्या आणि जगद्गुरूंच्या पवित्र कार्याला काळीमा फासला गेला आहे, अशी भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. या व अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आणि या किळसवाण्या प्रकाराची चौकशी करून यावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार जसे ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे, ह.भ.प. श्री.  धर्मराज महाराज हांडे, ह.भ.प. श्री. बाळासाहेब बडवे, ह.भ.प. श्री. यशोधन महाराज साखरे, ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. श्री. शालीकराम खंदारे, ह.भ.प. श्री. महेश महाराज नलावडे,  माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवीकुमार चिटणीस, प्रकुलगुरू डॉ. मिलींद पांडे, कुलसचिव श्री. गणेश पोकळे, डॉ. महेश थोरवे   इ. मा. मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याची वेळ मागून, त्यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर निवेदन देणार आहेत.
या परिषदेला डॉ. स्वाती कराड-चाटे, हभप यशोधन साखरे महाराज, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, डॉ. संजय उपाध्ये व डॉ. महेश थोरवे  उपस्थित होते.

भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ

न्यायमूर्ती गवई हे दुसरे दलित सरन्यायाधीश असतील

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी आज भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपला.सरन्यायाधीश खन्ना यांच्यानंतर न्यायमूर्ती गवई यांचे नाव ज्येष्ठता यादीत होते. म्हणूनच न्यायमूर्ती खन्ना यांनी त्यांचे नाव पुढे केले. त्यांचा कार्यकाळ फक्त ७ महिन्यांचा आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवरील त्यांच्या प्रोफाइलनुसार, न्यायमूर्ती गवई यांना २४ मे २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. त्यांची निवृत्ती तारीख २३ नोव्हेंबर २०२५ आहे.यमूर्ती गवई यांचा जन्म २४ नोव्हेंबर १९६० रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांनी १९८५ मध्ये त्यांच्या वकिली कारकिर्दीला सुरुवात केली. १९८७ मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र वकिली सुरू केली. यापूर्वी त्यांनी माजी अॅडव्होकेट जनरल आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले.

१९८७ ते १९९० पर्यंत मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली. ऑगस्ट १९९२ ते जुलै १९९३ पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहाय्यक सरकारी वकील आणि अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती. १४ नोव्हेंबर २००३ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदोन्नती. १२ नोव्हेंबर २००५ रोजी ते मुंबई उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले.

न्यायमूर्ती गवई हे देशातील दुसरे दलित सरन्यायाधीश असतील. त्यांच्या आधी न्यायमूर्ती केजी बालकृष्णन हे भारताचे सरन्यायाधीश झाले. २००७ मध्ये न्यायमूर्ती बालकृष्णन सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले.सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून, न्यायमूर्ती गवई यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यामध्ये मोदी सरकारच्या २०१६ च्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणे आणि निवडणूक रोखे योजना असंवैधानिक घोषित करणे समाविष्ट आहे.ज्येष्ठता यादीत न्यायमूर्ती गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा क्रमांक लागतो. त्यांना ५३ वे सरन्यायाधीश बनवले जाण्याची शक्यता आहे.

महाविद्यालयीन युवकांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून नोंदणी करावी

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

मुंबई,दि.१४:- आपत्ती व्यवस्थापन, वैद्यकीय सेवा, पोलीस दल, अग्निशमन दल यासारख्या आपत्कालीन क्षेत्रांमध्ये युवकांचा सक्रिय सहभाग असणे महत्त्वाचे आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास युवकांद्वारे रक्तदान करून, देशसेवेचे स्वप्न साकार करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी,राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून स्वतःची नोंदणी करावी.असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या वतीने, केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यातील राष्ट्रीय सेवा योजना NSS पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन बैठक पार पडली. यावेळी राज्यातील राष्ट्रीय सेवा योजनेतील सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, https://mybharat.gov.in/pages/civil_registration या लिंकवर नोंदणी सुरू आहे. नोंदणी करताना विद्यार्थी आठवड्यातून किती दिवस आणि किती तास सेवा देऊ इच्छितात हे देखील नमूद करू शकतात. ही नोंदणी जिल्हा स्तरावर केली जाणार असून, संबंधित माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाशी शेअर केली जाणार आहे. आपत्तीकालीन किंवा युद्धजन्य परिस्थितीत या सिव्हिल डिफेन्स वॉरिअर्सची मदत घेता येणार आहे. देशासाठी उभे रहा सिव्हिल डिफेन्स वॉरिअर व्हा हा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जाणार आहे.असेही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.

आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी  उपक्रम 

पुणे :’विचारवेध असोसिएशन’च्या पुढाकाराने आंतरजातीय विवाह संकल्पनेला पाठिंबा देण्यासाठी नवे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली  पुण्यात झालेल्या बैठकीत या उपक्रमांची घोषणा करण्यात आली.या उपक्रमांत इच्छुक युवक-युवतींसाठी समुपदेशन व मार्गदर्शन, आर्थिक सहाय्याचे सल्ला, जोडपे एकत्र आणण्यासाठी कार्यक्रम, व्याख्याने तसेच सुरक्षित निवासासाठी ‘सेफ हाऊस’ यांचा समावेश आहे. समाजात आंतरजातीय विवाहाबाबत असलेले गैरसमज दूर करून, विवाह करणाऱ्यांना आधार देण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. ‘विचारवेध असोसिएशन’च्या वतीने सरिता आव्हाड यांनी पुण्यात प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. 

या उपक्रमांद्वारे केवळ विवाहासाठी आधारच नव्हे, तर सामाजिक बदलाची प्रक्रिया गतिमान करण्याचीही अपेक्षा आहे. इच्छुकांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी अनिकेत साळवे  ८७९६४०५४२९  या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा– राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश

मुंबई : सर जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामास गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

आज सर जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली. आणि आढावा बैठक घेतला.
या प्रसंगी सचिव श्री. धीरज कुमार, आयुक्त श्री. राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चांदनवाले, अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

राज्यमंत्री मिसाळ यांनी कार्डीओ, मज्जातंतू शल्यचिकित्सा, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग, नर्सिंग होम आदी विभागांची पाहणी केली. त्यांनी या विभागांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती घेतली. तसेच, रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण, रिक्त पदांची भरती व डॉक्टर्ससाठी हॉस्टेल सुविधा याबाबतही त्यांनी आढावा घेतला. रुग्णालयातील अन्न गुणवत्तेची पडताळणी, स्कॅनिंग सुविधा, ऑपरेशन थिएटर व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बदलत्या काळानुसार वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गरजांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना उत्तम सुविधा पुरविण्यासंदर्भात सुचना त्यांनी दिल्या.

सर जे. जे. रुग्णालय हे १८० वर्षांची परंपरा लाभलेले प्रतिष्ठित संस्थान असून, ‘बेस्ट इंटरनॅशनल व्हिडिओ अब्स्ट्रॅक्ट’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या विकासासाठी सुरु असलेले सुपरस्पेशालिटी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ यामालिकेतून पद्मिनी कोल्हापुरे टेलिव्हिजनवर राजमातेच्या रूपात पुनरागमन करणार

मुंबई: ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ या आपल्या आगामी ऐतिहासिक मालिकेतून सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन पराक्रम, नेतृत्व आणि शूर वारशाची कहाणी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे. या भव्य मालिकेत पृथ्वीराज चौहान राजाची एका युवा, भाबड्या राजकुमारापासून ते भारतातील एक महान योद्धा राजा बनण्याच्या प्रवासाची कहाणी उलगडणार आहे. या मालिकेत त्याची युवावस्था, त्याचा संघर्ष, त्याने मिळवलेले विजय आणि त्यातून आकाराला आलेला एक महान शासनकर्ता असा एक दिव्य प्रवास प्रेक्षक बघतील.

या मालिकेच्या राजेशाही थाटाला साजेशा राजमातेच्या शालीन भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे दिसणार आहे. परंपरा आणि नवतेशी जुळवून घेण्याची वृत्ती यांचा समतोल सांभाळत, आपल्या अढळ प्रेमाने आणि सूक्ष्मदृष्टीने ती भावी राजाला मार्गदर्शन देते. तिच्या उपस्थितीतच राज्याचा आत्मा आहे. आपल्या शांत दृढतेने आणि सखोल प्रभावाने तिने साम्राज्य जोडून ठेवले आहे.

टेलिव्हिजनवर पुनरागमन करण्याबाबत आणि आपल्या भूमिकेविषयी बोलताना पद्मिनी कोल्हापुरे म्हणते, “‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिकेच्या विश्वास पाऊल ठेवणे माझ्यासाठी खूप विशेष गोष्ट आहे- केवळ मी एक दमदार भूमिका करत असल्यामुळेच नाही, तर जवळजवळ 11 वर्षांनंतर मी
टेलिव्हिजनवर परतत आहे म्हणून. टेलिव्हिजनवरील माझ्या प्रवासाची सुरुवात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनपासूनच झाली होती. आणि आता इतक्या वर्षांनी, या आव्हानात्मक आणि समाधान देणाऱ्या भूमिकेद्वारे मी पुन्हा त्याच वाहिनीवर परतत आहे. ही भूमिका जेव्हा मला देऊ करण्यात आली, तेव्हा राजमातेची व्यक्तिरेखा मला तात्काळ आपलीशी वाटली. इतकी सखोलता, ग्रेस आणि शांततेची ताकद दाखवणारी भूमिका क्वचितच करायला मिळते. ती केवळ एक राणी किंवा माता नाही- ती या राज्याचा आत्मा आहे. राजमाताची भूमिका करताना पडद्याच्या मागे राहून शांतपणे इतिहासाला आकार देणाऱ्या त्या सर्व खंबीर महिलांना आदारांजली वाहत असल्याची भावना मनात येते. तिचे पृथ्वीराजशी सुंदर नाते आहे. ती त्याची मार्गदर्शक, आधार आहे आणि तिचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे. अशी दमदार आणि बारकाईने रेखाटलेली व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळणे ही गौरवाची गोष्ट आहे. मला आशा आहे की माझ्या प्रमाणेच प्रेक्षकांना देखील तिचा प्रवास आपलासा वाटेल.” ‘चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान’ मालिका लवकरच सुरू होत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर

जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान यांच्यावतीने “मातृनाम प्रथम” या कार्यक्रमाचे आयोजन

पुणे,- राज्य शाशनाने ११ मार्च २०२४ महिन्यात महिला दिनाच्या निमित्तानं चौथं महिला धोरण लागू केलं. त्याअंतर्गत महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत झालेल्या बैठकीत शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लावणं बंधनकारक करण्यात आले. मात्र पुण्यातील यशवंत क्लासेसच्या वतीने मातृनाम प्रथम हा उपक्रम गेल्या चार वर्षांपासून सुरु करण्यात आला होता. दरवर्षी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने यशवंत क्लासेस यांच्यावतीने “मातृनाम प्रथम” या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या या उपक्रमाच्या पाचव्या वर्षी “मातृनाम प्रथम” कार्यक्रमाद्वारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विद्यार्थी व पालक यांच्याहस्ते विशेष सत्कार करण्यात येणार आहे. शनिवार, १७ मे रोजी सकाळी ७:३० वाजता सातारा रोडवरील अण्णाभाऊ साठे सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती यशवंत क्लासेसचे संचालक प्रा. शीतल पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर दत्तात्रय धनकवडे आणि यशवंत क्लासेस बालाजी नगर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा संपन्न होत आहे. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि यशवंत क्लासेसचे ब्रँड अँबेसिडर संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या “आई” या कवितेचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी आई विषयी हितगुज करणार आहेत. खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांचीही या कार्यक्रमाला उपस्थितीत असणार आहे.

शीतल पाटील म्हणाले की, आईला अविस्मरणीय भेट देण्यासाठीचा विशेष कार्यक्रम म्हणजे “मातृनाम प्रथम” यशवंत क्लासेस चे विद्यार्थी या दिवशी आपल्या नावामध्ये आईचे नाव आणि नंतर वडिलांचे नाव असा बदल करून आपले नाव, सोशल मीडियावरचे नाव हे सर्व बदलतात आणि आपल्या आईला मी भरपूर अभ्यास करून माझ्या करिअरचा स्वराज्य निर्माण करेल आणि तुझं नाव लावून अभिमानाने मिरवेल अशा आशयाची शपथ ग्रहण करतात. या शपथविधी सोहळ्याला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत. आईच्या नावाची व तिच्या कामाची दखल सरकार तर्फे देखील घेण्यात आल्यामुळे व अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली हे शक्य झाल्यामुळे आमचे सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आणि माता अजितदादांच्या अभिनंदनचा ठराव मांडणार आहेत. याच कार्यक्रमांमध्ये यशवंत क्लासेसचे ब्रँड अँबेसिडर संकर्षण कऱ्हाडे त्यांच्या “आई” या कवितेमुळे सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात आणि विद्यार्थी आणि मातांच्या हृदयात पोहोचलेले आहेत. ते आपली कविता सादर करणार असून विद्यार्थ्यांबरोबर आई या विषयाशी संबंधित हितगुज करणार आहेत.

आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने देण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान तर्फे करण्यात येत आहे.

पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू -सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार

कसबा, रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार -मंत्री उदय सामंत

पुणे, दि. १४ : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मराठी भाषा व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यावेळी मंत्री ॲड. शेलार बोलत होते. कार्यक्रमास आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचयाचा आहे. संभाजी महाराज प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना त्याला ९ वर्षे सळो की पळो केले.

छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे, असेही ॲड. शेलार म्हणाले.

कसबा, रत्नागिरी येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार -मंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील कसबा या गावात संभाजी महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक राज्य शासनाच्यावतीने उभारण्यात येईल, अशी घोषणा उद्योगमंत्री श्री. सामंत यांनी केली.

छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपट दीड महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला. तसेच महाराष्ट्रातील संभाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा रत्नागिरीत असल्याचे पहायला मिळेल. आता कसबा येथे सर्वांना अभिमान वाटेल असे स्मारक उभारण्यात येईल, असे ते म्हणाले.

आमदार विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्याला प्रचंड ऐतिहासिक वारसा असल्याचे सांगून पुरंदर किल्ल्याचा विकास आराखडा व्हावा अशी मागणी केली.

प्रारंभी मंत्री श्री. सामंत आणि ॲड. शेलार यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थानी पारंपरिक वेशातील महिलांनी महाराजांचा महती सांगणारा पाळणा गायला.

यावेळी मंत्री ॲड. शेलार यांच्या हस्ते पुरंदर प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे प्रदान करण्यात आले.

पत्रकार असल्याचं सांगून ब्लॅकमेलिंग,महिलांना वेश्याव्यवसाय करायला भाग पाडायचा; बाप-लेकाला अटक

0

पुणे- बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईवेळी स्पा सेंटरमध्ये हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती समोर आलीय. बाणेरमधील बालेवाडी फाटा भागात ‘वेदा स्पा’ मध्ये मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहिमुद्दीन अहमद अली (वय २२), तसेच मसाज पार्लर चालविणारी महिला आणि जागा मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.याप्रकरणी अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये (पिटा) गुन्हा दाखल करण्यात आला असून, मसाज पार्लरचा व्यवस्थापक मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली, अशी माहिती बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली.

पोलिसांनी या प्रकरणात बाप लेकासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणी सिराज चौधरी आणि वसीम चौधरी या बाप-लेकाला अटक करण्यात आलीय. याशिवाय एका महिला व्यवस्थापकावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे हे स्पा सेंटर हाय प्रोफाइल भागात असल्याने या रॅकेटमध्ये असलेले ग्राहक आणि महिला उच्चभ्रू असल्याची माहिती समजते.बाणेर पोलिसांनी या स्पा सेंटरवर बनावट ग्राहक पाठवले. त्यानंतर स्पा सेंटरमधले काळे धंदे समोर आले. तिथं स्पा सेंटरच्या नावाखाली प्रत्यक्षात वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं. पोलिसांनी संबंधित स्पा चालक, व्यवस्थापक आणि जागा मालकावर महाराष्ट्र वैश्याव्यवसाय प्रतिबंधक कायद्यानुसार (PITA Act) गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी बाप लेकाला अटक केली असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलंय. पुढील तपास पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

पोलिस बाणेरमधील इतर स्पा सेंटरवरही छापा टाकत असून यात आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते.मुलगा वसीम आणि सिराज चौधरी हे एका वृत्तपत्राच्या माध्यमातून सिराज चौधरी हे लोकांना ब्लॅकमेल करत असल्याचाही दावा केला जात आहे. सिराज यांचा मुलगा वसीम हा २४ थाई स्पाचा मालक आहे. सिराजला याआधी ठाणे पोलिसांनी एका महिलेवर बलात्कार प्रकरणी अटक केली होती. तर मुलगा वसीम हा पत्रकार म्हणून इतर स्पा, ब्युटी सलूनला भेटी देऊन स्पाय कॅमेऱ्यात काही गोष्टी रेकॉर्ड करायचा. त्याचा वापर करून तो ब्लॅकमेल करत असे. महिलांना वेश्या व्यवसाय करायला भाग पाडत होता अशीही माहिती समोर आली.

बेकायदा बांधकाम प्रकरणात आदेशाची वाट न पाहता स्वत: अंमलबजावणी करा! हायकोर्टाने पुणे महापालिकेला फटकारले

पुणेबांधकामावर कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयाने पुणे महापालिकेला फटकारले आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही, महापालिकेने स्वतःहून ही कार्यवाही करायला हवी, असे न्यायालयाने ठणकावले.हडपसर येथील अवैध बांधकामावर कारवाई होत नसल्याने महेश तुपे व श्रीनिवास इंदलकर यांनी याचिका दाखल केली आहे. न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. संबंधित बांधकाम अवैध असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही पुणे पालिकेने त्यावर कारवाई केलेली नाही. याचा खुलासा पुणे पालिका आयुक्तांनी प्रतिज्ञापत्र सादर करून करावा, असे आदेश न्यायालयाने दिले. यावरील पुढील सुनावणी 16 जून 2025 रोजी होणार आहे.

बेकायदा बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पुणे पालिकेला लागू होतात की नाही हेही आयुक्तांनी प्रतिज्ञापत्रावर स्पष्ट करावे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश बंधनकारक असतील तर हडपसर येथील अवैध बांधकामांवर कारवाई न होण्यामागे कोणता अधिकारी जबाबदार आहे याचा खुलासा आयुक्तांनी करावा, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
अवैध बांधकामांवर कारवाई झालीच पाहिजे असे आदेश वारंवार सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाचे पालन सर्वांनीच करायला हवे.
यामध्ये दुमत असू शकत नाही, असेही न्यायालयाने बजावले आहे.
कारवाई करण्याचे आदेश असतानाही अनधिकृत बांधकाम करणाऱयांवर जाणीवपूर्वक कारवाई होत नाही, असे गंभीर निरीक्षण खंडपीठाने नोंदवले
.

निवडणुकीच्या तोंडावर pmpml ची तिकीट दरवाढ भाजपाला परवडणार ?

  • पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) तिकीट दरवाढ करण्याचा निर्णय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. तिकीट जवळपास दुटीने वाढल्याने असल्याने प्रवास महागणार असला तरी दोन किलोमीटरच्या टप्प्याऐवजी पाच किलोमीटरचा टप्पा असणार आहे.
  • त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासाही मिळणार आहे.

पीएमपीचा संचलनातील तोटी दरवर्षी जात असून, गेल्यावर्षी तब्बल ७६६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. पीएमपीने गेल्या ११ वर्षात तिकीट दरवाढ केलेली नव्हती, त्यातुलनेत पगार, सीएनजी, डिझेल व देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढलेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यापासून तिकीट दरवाढीसंदर्भात चर्चा होती.

आज अखेर संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पीएमपीची सेवा ही पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) हद्दीमध्ये दिली जाते. रोज १२ लाख प्रवासी प्रवास करत आहेत.

पाच ऐवजी १० रुपये तिकीट

यापूर्वी पीएमपीचे पहिल्या टप्प्यासाठी सर्वात कमी तिकीट हे पाच रुपये होते. पण आता सर्वात कमी तिकीट हे १० रुपये असणार आहे. पहिला टप्पा हा पाच किलोमीटरचा असणार आहे. पूर्वी हा दोन किलोमीटरचा टप्पा होता. पाच किलोमीटरसाठी १० रुपये तिकीट असणार आहे.

४२ ऐवजी ११ टप्पे

यापूर्वी पीएमपीचे ४२ टप्पे होते, हे टप्पे कमी करून केवळ ११ केले आहेत. अंतर वाढविल्याने टप्पे कमी झाले आहेत. त्यामुळे त्याचा फायदा लांबचा प्रवास करणाऱ्यांना होणार आहे. यापूर्वी १ ते ७८ किलोमीटरसाठी २ किलोमीटरच्या अंतराने १ ते ४० पर्यंत टप्पे होते.

नव्या निर्णयानुसार १ ते ३० किलोमीटर अंतरासाठी ५ किलोमीटरच्या अंतराने ६ टप्पे केले आहेत. त्यापुढे ३० ते ८० किलोमीटरच्या अंतरासाठी १० किलोमीटरच्या अंतराने ५ टप्पे असे एकूण ११ टप्पे केले आहेत. या टप्प्यानुसार तिकिटाची रचना केली आहे.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये बदल नाही

तिकीट दर फेरबदलामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीसाठी प्रचलित असलेल्या दैनिक पास ४० रुपये (एक महापालिका हद्दीसाठी) आणि मासिक पास ९०० रुपये (एक महापालिका हद्दीसाठी) असा होता. आता दोन्ही महापालिकांसाठी एकच पास असणार आहे. पण त्याचा दर वाढला आहे.

दैनिक पास ७० रुपये व मासिक पास १,५०० रुपयांचा असणार आहे. पीएमआरडीएच्या हद्दीसाठी दैनिक पास १२० रुपये ऐवजी १५० रुपयांचा असणार आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांच्या दैनंदिन व मासिक पासच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही.

अशी आहे दरवाढ

प्रस्तावित स्टेज- प्रस्तावित किलोमीटर.. – प्रस्तावित दर रुपये – ३ ते १२ वर्ष वयोगटासाठी दर

१ – १ ते ५ -१० – ५

२ – ५.१ ते १० – २० – १०

३ – १०.१ ते १५ – ३० – १५

४ – १५.१ ते २० – ४० – २०

५ – २०.१ ते २५ – ५० – २५

६ – २५.१ ते ३० – ६० – ३०

७ – ३०.१ ते ४० – ७० – ३५

८ – ४०.१ ते ५० – ८० – ४०

९ – ५०.१ ते ६० – ९० – ४५

१० – ६०.१ ते ७० – १२० – ६०

११ – ७०.१ ते ८० -१२० – ६०

पीएमपीने तिकीट दरात वाढ करताना, प्रवासाच्या टप्प्यांचे अंतर वाढवले आहे. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाच्या पासच्या दरात वाढ केलेली नाही. ११ वर्षानंतर ही तिकीट दरवाढ केली आहे.’

  • दीपा मुंडे-मुधोळ, व्यवस्थापकी संचालक, पीएमपी

गजा मारणे कैदेत असताना त्याची मटण पार्टी झोडणारे पोलीस सस्पेंड

पुणे : गजा मारणे कैदेत असताना त्याची मटण पार्टी झोडणाऱ्या पुणे पोलिस दलातील १ अधिकाऱ्यासह ४ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. गजा मारणेला पुण्याहून सांगली कारागृहात घेऊन जाताना मारणे याने पोलिसांच्या समक्ष ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता.मकोकाचा आरोपी असूनही ढाब्यावर पोलिस व्हॅन थांबवून त्याला मटण खाऊ दिल्याने एकच खळबळ उडाली होती. यामुळे पुणे पोलिसांवर प्रश्नचिह्न उभे राहिले होते.

या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु यासह हवालदार महेश बामगुडे, हवालदार सचिन मेमाणे, हवालदार रमेश मेमाणे, पोलिस शिपाई राहुल परदेशी यांना निलंबित करण्यात आळे आहे. मोक्का कारवाई अंतर्गत गजा मारणे पुण्यातील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याला सांगली तुरूंगात नेण्यात येत होते

गजा मारणेला पुण्यातील येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला घेऊन पोलीस व्हॅन सहाय्यक पोलिस निरीक्षक व चार पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सांगलीच्या दिशेने निघाली. मात्र थेट कारागृहात पोहोचण्याआधी साताऱ्यात असलेल्या ढाब्या वर व्हॅन थांबली पोलिस कर्मचाऱ्यांनी तिथे जेवण केले.

दरम्यान पोलीस व्हॅनच्या मागावर असलेल्या मारणे टोळीची गाडी सुद्धा त्याठिकाणी येऊन थांबली. मारणेच्या गॅंगच्या गुंडांनी ढाब्या मधून एक मटण प्लेट आणली आणि थेट व्हॅन मध्ये बसलेल्या मारणे याला दिली. ही सगळी घटना ढाब्यावर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पुणे पोलिस आयुक्तांना प्रकार समजला आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची तपासणी करण्यासाठी सर्व सीसीटीव्ही तपासले. त्यातून ही मटण पार्टी झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

पोलिस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी ही यानंतर पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. तर गुंड गजा मारणेला ढाब्यावर भेटलेल्या सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ तसेच बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला आहे.

पुण्याला पुण्याचे नेतृत्व का नको ?

पुणे – पुण्याला आज कोणा पुण्याच्याच नेत्याचे नेतृत्व उरलेले आहे असे दिसत नाही. सुरेश कलमाडी हे पुणे शहराचे अखेरचे नेतृत्व मानावे लागते.कलमाडी पुण्याचे नेते असतानाच अजित पवारांना पुण्याचे नेतृत्व करण्याची इछ्या होती आणि ते त्या स्पर्धेत उतरले देखील.पण कलमाडी आणि त्यांचे वारंवार खटके उडत. कलमाडी यांच्याशी जमवून घेण्याची शरद पवार यांची सूचना मानून अजित पवारांनी सपत्नीक कलमाडी हाउसला जाऊन स्नेह भोजन देखील केले.या राजकीय ऐतिहासिक घटनेची अनेक जाणकारांना माहिती असेल. पण पुढे दिवस बदलले, ज्या BRT च्या नावाने अजित पवारांनी कलमाडींचे नेतृत्व बदनाम केले, महापालिकेत सत्ता प्राप्तीसाठी मोठे बळ त्यावरच मिळविले ती BRT त्यांनी सत्ता प्राप्ती नंतरही सुरूच ठेवली.अखेरीस कलमाडी राष्ट्रकुल घोटाळ्यात अडकले आणि ९ महिन्याचा आजामिनपात्र तुरुंगवास त्यांनी भोगला.वर्षानुवर्षे त्यांच्यावर हा डाग राहिला,राजकीय पटलावरून त्यांचे नाव पुसले गेले.ते शाररीक,मानसिक दृष्ट्या कमजोर पडल्यावर तब्बल १५ वर्षांनी त्यांच्यावरील आरोप मागे घेण्याची प्रक्रिया सुरु झाली .तोवर कलमाडी यांच्या नेतृत्वाचा अस्त झाला होता.

त्या पूर्वी पुण्यात विठ्ठलराव गाडगीळ आणि जयंतराव टिळक असे २ नेते होते. दोघे कॉंग्रेसचेच.पण शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांना शह देत त्यांचा राजकीय आखाडा रंगवायला सुरेश कलमाडींना आणले.कलमाडी यांनी आगळ्या वेगळ्या राजकारणाचा प्रारंभ केला आणि संपूर्ण राजकारणाची दिशा बदलून टाकली. गाडगीळ यांचा गट टिकून ठेवण्यात प्रकाश ढेरे यांचा सिंहाचा वाटा होता.जयंतराव टिळकांच्या गटाची धुरा अजित आपटेंनी कायम वाहिली.पण ती त्यांच्या एकटयापुरती ठरत गेली.गाडगीळ,टिळक हे दोन्ही गट संपल्यावर कलमाडींची पुण्यावर एक हाती प्रचंड शक्तिशाली नेतृत्वाची वज्र मुठ कायम राहिली.

कलमाडींच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यावर पुण्यातील कॉंग्रेस मध्ये दलित नेता म्हणून केवळ रमेश बागवे एवढेच काय ते उरले होते..बागवे,दीपक मानकर जे कधी काळी कलमाडी यांचे कवच मानले जात.पण तत्पूर्वीच कलमाडी यांनी अध्यक्षपद नाकारून,डावलल्याने मानकर पक्ष सोडून बाहेर पडले होते.मोहन जोशी, शरद रणपिसे,बाळासाहेब शिवरकर,उल्हास पवार असे अनेक नेते कॉंग्रेस मध्ये होते.पण कार्यकर्त्यांची मोठी फळी आणि शक्ती किंवा कार्यकर्त्यांचा समूह असलेले नेते केवळ बागवे आणि मानकर आणि आबा बागुल एवढेच नेते होते.पण बागवे आणि बागुलांना केवळ आपल्या विधानसभा मतदार संघातच रस होता.आणि मानकर पक्षा बाहेर पडले होते, हर्षवर्धन पाटलांचे नाव तेव्हा पुढे आले होते पण तेही भाजपात गेले.त्यामुळे कलमाडी यांच्या नेतृत्वाचा अस्त झाल्यावर कॉंग्रेस ने सामुहिक नेतृत्वाची कल्पना मांडली,नेते वीस पण कार्यकर्ते कासावीस अशी अवस्था तेव्हाच कॉंग्रेसची झाली, आणि भाजपा गिरीश बापटांच्या नेतृत्वाखाली बळकट होत गेला.भाजपा मध्ये अण्णा जोशी, अरविंद लेले यांच्या नंतर गिरीश बापट आणि अनिल शिरोळे हे दोघे नेते शक्तिशाली होत गेले.आणि पुढे भर म्हणून संजय काकडे देखील भाजपला मिळाले. पुण्यात महापालिकेची सत्ता प्रस्थापित करण्यात काकडे यांचे मोठे सहाय्य भाजपने मिळविले. आणि बापट कि काकडे कि शिरोळे यांच्यातील कोणाकडे पुण्याचे नेतृत्व असा प्रश्न सातत्याने उपस्थित झाला.पण ना बापटांना शहराचे नेतृत्व मिळू दिले गेले.,ना काकडे यांना,ना शिरोळे यांना..शिरोळे यांनी आपल्या मुलाच्या राजकीय कारकिर्दीला महत्व दिले.पण बापटांनी जीवात जीव असेपर्यंत लढा दिला.त्यांचे निधन झाल्यावर आणि पुण्यातून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ झाल्यावर ते केंद्रात मंत्री देखील झाले.पण..पुण्याचे नेतृत्व..मात्र ते अजूनही स्वतः कडे मिळवू शकलेले नाहीत.आता महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर पूर्वीप्रमाणे पुण्याच्या नेतृत्वाच्या स्पर्धेत कार्यकर्ते एकत्रीत ठेवण्याची कला अवगत असल्याने दीपक मानकर यांचे नाव सारखे सारखे पुढे येत राहिले.आणि मानकर यांना त्यामुळे कायम संघर्षाचा सामना करावा लागला.आजही याच संघर्षात अडकून त्यांची पीछेहाट केली जाते कि काय असा प्रश्न साहजिकच कार्यकर्ते विचारू लागले.पुण्याच्या नेतृत्वाच्या गणतीत महापालिकेला मोठे महत्व असल्याचे मानले जाते.आणि महापालिकेची निवडणूक होणार असेल तर पुण्यातून कोणता नेता जास्त नगरसेवक निवडून आणून देऊ शकतो असा प्रश्न साहजिक निर्माण होतो.जो नेता सर्वाधिक नगरसेवक आपल्या नेतृत्वाच्या कौशल्याने, राजकीय रणनीतीने निवडून आणू शकतो साहजिक त्याच्याकडे पुण्याचा नेता म्हणून पहिले जाऊ शकते .पण सध्याची राजकीय स्थिती मोठी अस्थिर, म्हणजे पुण्याच्या नेतृत्वासाठी अजूनही अस्थिरच आहे. पुण्याला पुण्याचे नेतृत्व मिळू द्यायला मुंबईत किंवा दिल्लीत बसलेल्या बड्या हस्ती तयार नसाव्यात.असे वाटणारी आहे.

शेवटी प्रश्न अनुत्तरीतच राहतो..आजही कलमाडी यांच्यानंतर पुण्याचे नेतृत्व कोणाकडे? असा प्रश्न जेव्हा जेव्हा पुढे येईल..तेव्हा तेव्हा सामुहिक…असे उत्तर दिले जाईल,म्हणजेच नेते वीस आणि कार्यकर्ते कासावीस हीच स्थिती पुण्यात कायम राहील असे दिसते आहे.आणि पुण्याची धुरा मुंबईत ज्याची सत्ता असेल त्याच सत्ता प्रमुखाच्या हाती कायम राहील कि काय,पुण्याला पुण्याचे नेतृत्व लाभणारच नाही कि काय ? असे प्रश्न पुन्हा पुन्हा पुढे उभे ठाकत राहतील.

पुण्यातील मातब्बर नेते दीपक मानकर यांचा अजित पवारांकडे राजीनामा…

पुणे- शहरातील मातब्बर म्हणून गणल्या जाणाऱ्या आणि नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात कायम राहून,आपल्यावरआपले राजकीय अस्तित्व संपविण्याच्या दृष्टीने होणारे हल्ल्यावर हल्ले पचवून पुन्हा पुन्हा उभारी घेत पुढे येत असलेल्या पुण्याच्या दीपक मानकर यांनी आपला राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा आज संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो असलेले नेते अजित पवार यांच्याकडे सोपविला आहे. पोलिसांच्या मदतीने मानकर यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचे कायम प्रयत्न झाले. पण गेली ४ दशके त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्यात कोणालाही यश आले नाही.कॉंग्रेस मध्ये असताना सुरेश कलमाडी यांनी त्यांना डावलून त्यांच्या नेतुत्वाला खच्ची करण्याचे प्रयत्न केले.त्यानंतर ते कॉंग्रेस मधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादीत आले . त्यानंतर भाजपचे राज्यात सरकार असताना त्यांनी कोथरूड च्या शिवसृष्टी साठी आवाज टाकला आणि पुन्हा त्यांचे पोलीसंकरवी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला. पुढे अजित पवार भाजपच्या सरकार मध्ये सामील झाल्यावर त्यांनी अजित दादांचे नेतृत्व स्वीकारले आणि राष्ट्रवादीची धुरा आक्रमकपणे शहरात राबविली. याच वेळी आपल्या आजवरच्या कामाचे श्रेय आमदारकीच्या रूपातून तरी मिळावे या राजकीय महत्त्वाकांक्षेच्यासाठी नेत्यांची दारे ठोठावली पण त्यांना आश्वासना शिवाय काही मिळाले नाहीच तरीही त्यांनी पक्षाचे काम अविरत पणे सुरु ठेवले. आता महापालिका निवडणुका समोर असताना आणि खुद्द अजित दादा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असतानाही मानकर यांच्यावर पोलिसांनी एका जमिनीच्या व्यवहारात त्यांना मिळालेल्या रकमेबाबतचे कागदपत्रे बोगस असल्याचा दावा करत मानकर यांच्यावर गुन्हा दाखल केला.हा त्यांना मोठा धक्का होता . खुद्द अजित दादा पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना त्यांच्याच शहर अध्यक्षांवर गुन्हा दाखल होण्यापूर्वीच हि माहिती अजितदादांना नसेल असे मानायला कोणी तयार नसताना आज पुन्हा भावनिक होऊन दीपक मानकर यांनी अखेरीस आपल्या शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

मानकर यांनी अजितदादांना दिलेल्या पत्रात काय म्हटले आहे वाचा जसेच्या तसे …..

आदरणीय दादा,आपल्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली मी सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश केल्यानंतर पक्ष वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी मी सदैव प्रामाणिक प्रयत्न केले. आपण मला विधानसभा निवडणूक २०१४ मध्ये कसबा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली तेव्हापासून आजपर्यंत उपमहापौर, नगरसेवक, शहराध्यक्ष ह्या विविध पदांची जबाबदारी देऊन मला सामाजिक व राजकीय काम करण्याची संधी दिली.
जुलै २०२३ मध्ये झालेल्या राजकीय बदलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाचे विभाजन झाले व आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला त्यावेळी क्षणाचा न विचारता मी आपल्यासारख्या भक्कम नेतृत्वासमवेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आपणही माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत दिनांक ६ जुलै २०२३ रोजी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
मला शहराध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी त्यावेळी पक्षाचे नाव व चिन्ह यांचा निर्णय होण्याअगोदर पक्षाला पाठींबा म्हणून मा. सर्वोच्च न्यायालयात जी प्रतिज्ञापत्र द्यायची होती त्यामध्ये पुणे शहरातून मी सुमारे ९५०० प्रतिज्ञापत्र गोळा करून महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, मुंबई येथे जमा केले आहेत. शहराध्यक्ष पदाची धुरा सांभाळत असताना महाराष्ट्रात नसेल इतकी मोठी जम्बो कार्यकारिणी करत फादर बॉडी, महिला, युवक, युवती, विद्यार्थी यांसह विविध सेलवर सुमारे १५०० पेक्षा जास्त पदाधिकात्यांची नियुक्ती करून पक्षाचे व आपले काम करण्याची संधी देत पुणे शहरात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराअंतर्गत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य, साहित्य-कला, क्रीडा, वारकरी सांप्रदाय, सांस्कृतिक यासह विविध क्षेत्रात २०० पेक्षा जास्त कार्यक्रम घेत तळागाळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची व आपली भूमिका स्पष्टपणे पोहचवली. तसेच माझ्या माध्यमातून पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुमारे १ लाख सभासद करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून सभासद नोंदणी पुस्तिकांचे आमदार, नगरसेवक, तसेच पदाधिकारी यांना वाटप करण्यात आलेले आहे. त्यातील अनेक सभासद नोंदणी पुस्तिका पक्ष कार्यालय येथे जमा झालेले आहेत. आपल्या आदेशाप्रमाणे तसेच प्रदेशाध्यक्ष खा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या सुचनेनुसार आपला पक्ष व पक्षाची विचारधारा ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुणे शहरातील सर्व घटकातील सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवत असून नागरिकांच्या समस्या आजही सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.
मात्र माझा वाढता राजकीय आलेख पाहता, काही समाजकंटकाकडून माझी राजकीय बदनामी केली जात आहे. मी काही वर्षापूर्वी केलेल्या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात आता ३-४ दिवसांपूर्वी या जमिनीच्या आर्थिक व्यवहारात शासनाची फसवणूक केली असल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. परंतु हा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही. सदर गुन्ह्यातील सत्यता न पडताळता येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक तसेच माझे राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. सदर आर्थिक व्यवहार हा माझ्या जमिनीसंदर्भात झालेला असून त्यामध्ये माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा फसवणुकीचा प्रकार झालेला नाही. या प्रकरणामुळे आपल्या पक्षाची व आपली नाहक बदनामी होत असून त्यामुळे पक्षश्रेष्ठींना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आदरणीय दादा, आपण आणि प्रदेशाध्यक्ष खा.श्री.सुनील तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद कायम ठेवण्यासाठी मी अध्यक्ष झाल्यापासून प्रामाणिक प्रयत्न करीत आलेलो आहे.
तरी आपणास नम्र विनंती करतो की, माझा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर अध्यक्ष पदाचा राजीनामा मंजूर करण्यात यावा.