Home Blog Page 3067

घर घर मोदी झाले; आता घर घर दारू ..वाह रे सरकार -राष्ट्रवादीचे आंदोलन (व्हिडीओ)

पुणे-भाजप – शिवसेना जातीयवादी सरकारने महाराष्ट्रातील जनतेला घरपोच दारु पुरवुन जनतेचे संसार उध्वस्त करण्याचा डाव खेळला आहे तसेच महापुरुषांच्या बाबतीत चुकीचा व आक्षेपार्ह मजकुर छापुन महापुरुषांची बदनामी करण्याचा जो उद्योग चालविला आहे त्या सरकार विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली “सदबुद्धी आंदोलन ” करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ -मृदंगाच्या गजरात भजन म्हणून या सरकारला भगवंताने सदबुद्धी देवो अशी प्रार्थना केली.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील म्हणाले सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय विकृत पध्दतीचे लिखाण करण्यात आले आहे तसेच जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पत्नीबद्दल सुध्दा आक्षेपार्ह पध्दतीचे लिखाण याच पुस्तकात झालेले आहे या सर्व गोष्टींसाठी जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी . *दारुचा नियम पहिल्यांदा ५०० मीटर केला नंतर २५० केला आता तर थेट घरपोच दारु पुरवणार आहे या राज्यातील युवकाला रोजगार पाहिजे तो मिळत नाहिये , जनतेला पाणी पाहिजे ते मिळत नाहिये , विज पाहिजे ती मिळत नाहिये पण या भाजपा – शिवसेना सरकारने घरपोच दारु पुरवुन युवकांची माथी भडकवुन दंगली करायच्या आहेत व स्वताची सत्तेची पोळी भाजुन घ्यायची आहे .जनतेला पाणी देणार सरकार पाहिजे दारु देणार नाही २०१४ ला घर घर मोदी हि घोषणा होती आता २०१९ ला घर घर दारु हि घोषणा भाजपा ने केली आहे.

यावेळी बापु पठारे, रवींद्र माळवदकर,बाळासाहेब बोडके,बंडुतात्या गायकवाड, नगरसेवक विशाल तांबे, सुभाष जगताप, सुनिल टिंगरे, वनराज आंदेकर, महेंद्र पठारे, सुमनताई पठारे, नितीन कदम ,लक्ष्मीताई दुधाणे,रुपाली चाकणकर, श्रीकांत पाटील,उदय महाले,नितीन कदम ,नारायण लोणकर,निलेश निकम ,हाजी फिरोज,फहिम शेख ,नंदिनी पाणेकर , महेश हांडे , प्रदिप देशमुख,संतोष नांगरे , अभिषेक बोके , रविकांत वर्पे , प्रेम भांडे पाटील,अच्युत लांडगे ,गणेश नलावडे,रजनी पाचंगे ,किशोर कांबळे, सदाशिव गायकवाड,विकी वाघे,शांतिलाल मिसाळ,ऋषीकेश भुजबळ, धिरज अरगडे ,मयुर गायकवाड,सुनिल बनकर, बाबा पाटील, निलेश वरे, किरण कद्रे, केतन ओरसे असंख्य राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

‘दिशा’ समितीमुळे विकासाचा वेग वाढला-केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर

0

पुणे:- केंद्र शासनाने सुरु केलेल्या विविध योजनांच्या अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा करुन मार्ग काढणे हा ‘दिशा’ समितीचा उद्देश असून, यामुळे विकासाचा वेग वाढला असल्याचे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज येथे व्यक्त केले.

जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक येथील विधान भवन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, खा. शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे, खा.अमर साबळे, आ.बाबुराव पाचर्णे,आ.भिमराव तापकीर, आ.माधुरी मिसाळ, आ.शरद सोनवणे, महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे, सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते.

यावेळी श्री. प्रकाश जावडेकर म्हणाले, येणाऱ्या काळात दर महिन्याला दिशा समितीची बैठक घेऊन योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात येईल. यामुळे योजनांच्या अंमलबजाणीतील अडथळे दूर होऊन, योजनांना गती मिळेल. सुमारे 40 ते 50 योजनांची अंमलबजावणी स्थानिकस्तरावर करण्यात येते. यातील सर्वच योजना महत्वाच्या असून, काही निवडक योजनांचा आढावा प्राधान्याने घेण्यात येईल. पुणे शहराच्या अवतीभवती मोठया प्रमाणावर नागरी वस्ती झाल्यामुळे, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मोठया प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सर्व बाजूंनी मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्याची मागणी होत आहे. दिशा समितीमधील लोकप्रतिनिधींच्या सहभागामुळे योजना राबविणाऱ्या विभागांमध्ये उत्तरदायित्व निर्माण होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.

शहरात राबविण्यात येणारा मेट्रो रेल्वे प्रकल्प, जायकाच्या मदतीने सुरु असलेला मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प, विमानतळ विस्तारीकरण, राष्ट्रीय महामार्गातर्फे हाती घेण्यात आलेला रस्ता दर्जा सुधार प्रकल्प, मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना इत्यादी योजनांच्या प्रगतीचा आढावा घेऊन, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. खा.शिवाजीराव आढळराव पाटील, खा.अनिल शिरोळे, खा.अमर साबळे यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.

बैठकीला महसूल, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग व अन्य विभागांचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

मोदींचे मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबूली -आनंद शर्मा : मी टू वर जन की बात करा…आवाहन (व्हिडीओ)

0

पुणे : राफेलच्या संदर्भात पंतप्रधान मोदी यांनी बाळगलेले मौन हीच त्यांच्या गुन्ह्याची कबूली आहे अशी टिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आनंद शर्मा यांनी केले. सगळा देश मी टू वर बोलत असतानाही मन की बात करणाऱ्या नरेंद्र  मोदी यांनी आता जन की बात करावी असे आवाहनही शर्मा यांनी केले.
काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शर्मा म्हणाले, राफेल संबधी मोदी ना संसदेत बोलत आहेत ना जनतेत. सगळीकडे संशय पसरला असताना त्याचे निराकरण करणे हे त्यांचे काम आहे. या व्यवहाराविषयी काँग्रेसने अनेक मुद्दे उपस्थित केलेत, मात्र मोदी व भाजपा त्याची उत्तरे द्यायला तयार नाहीत। मोदी यांचे या विषयातील मौन ही एकप्रकारे त्यांच्या गुन्ह्याची कबुलीच आहे.
देशात मी टू चे वादळ घोंगावत आहे. केंद्रीय राज्यमंत्र्यावर काही आरोप झालेत. त्याविषयीही मोदी काही बोलत नाहीत. ते मंत्रीमंडळाचे नेत्रुत्व करतात. त्यांनी बोलले पाहिजे. पण मन की बात करणारे मोदी बेटी बचाव वर बोलतात आणि अकबर यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मौन बाळगतात. आता त्यांनी मन की बात सोडून जन की बात करावी असे शर्मा म्हणाले.

पद्मभूषण डॉ.विजय भटकर यांच्या वाढदिवसानिमित्त विजयसंध्याचे आयोजन

0

पुणे: जागतिक कीर्तीचे संगणक तज्ज्ञ, परम १००० या भारताच्या पहिल्या महासंगणकाचे जनक, नालंदा विश्‍वविद्यालयाचे कुलपती, इंडिया इंटरनॅशनल मल्टिव्हसिर्टीचे संस्थापक कुलपती व संतवृत्तीचे शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय पांडुरंग भटकर यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे विजयसंध्या या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. १७ ऑक्टोबर २०१८ ( खंडेनवमी ) रोजी सायं. ५.१५ वा. कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्‍वर सभागृह येथे होणार आहे.
यांच प्रसंगी डॉ. विजय भटकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जाहीर सत्कार होणार आहे. या समारंभासाठी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ विश्‍वनाथ दा. कराड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.एस.बी.मुजुमदार हे असतील. वरील समारंभासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शारदा ज्ञान पीठ्मचे संस्थापक पं.वसन्त अनन्त गाडगीळ यांनी केले आहे.

आशियाई जुनियर स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या अर्णव सरिनला रौप्यपदक

0

पुणे- चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या 25व्या आशियाई जुनियर  स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत 15 वर्षाखालील मुलांच्या गटात पुण्याच्या अर्णव सरिन याने भारतासाठी अविस्मरनीय  रौप्यपदकाची कमाई केली आहे.

15 वर्षाखालील गटात भारतातील अव्वल खेळाडू, आशियातील  क्र.  2 व जागतिक क्र. 6 असलेल्या अर्णवचा पुना क्लब तर्फे सन्मान करण्यात आला. अर्णव सेंट मेरी हायस्कुल येथे दहाव्या इयत्तेत शिकतो. अर्णव हा पुना क्लब येथे दिपक मुलानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. अर्णवने 2012 साली वयाच्या नवव्या वर्षी  स्क्वॅश   खेळायला सुरवात केली. अर्णवने कोलोन जुनियर कप सीजेसी 2018 या स्पर्धेत तिसरा क्रमाक पटकावला. तर ब्रिटीश जुनियर ओपन बीजेओ 2018 स्पर्धेत सहावा क्रमांक पटकावला. 2017 साली  अॅमस्टरडॅम येथे  पार पडलेल्या डच जुनियर ओपन स्पर्धेत अर्णवने भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी जॉर्डन येथे पार पडलेल्या आशियाई जुनियर  स्क्वॅश  अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. याच वर्षी अर्णवने 6 राष्ट्रीय विजेतेपदे पटकीवली.

यावेळी बोलताना पुना क्लबचे क्रीडा विभागाचे चेअरमन मनिष मेहेता म्हणाले की,  अर्णव हा अनेक मुलांसाठी आदर्श आहे. तो अत्यंत स्पर्धात्मक खेळाडू आहे. तो एक महत्वकांक्षी व उदयोन्मुख युवा खेळाडू आहे. आम्हाला त्याचा सन्मान करताना आनंद होत आहे.

यावेळी अर्णवचे प्रशिक्षक दिपक मोमीन, पुना क्लबचे सदस्य मनिष मेहेता, शशांक हळबे, माजी लेफ्टनंट कर्नल अशोक सरकार, अर्णवचे पालक व शहरातील अन्य  स्क्वॅश  खेळाडू उपस्थित होते.

स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करा

0
नागरिकांसाठी आरोग्य तपासणी केंद्रे 
सुरू करा :माजी उपमहापौर आबा बागुल 
 
पुणे –स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेच्या शाळांसह शहरातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी तसेच नागरिकांसाठी विविध ठिकाणी  आरोग्य तपासणी केंद्रे तातडीने  सुरू करावीत अशी मागणी माजी उपमहापौर आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
आयुक्त सौरभ राव यांना दिलेल्या निवेदनात  माजी उपमहापौर आबा बागुल यांनी म्हटले आहे कि , यंदाही स्वाईन फ्लूचा उद्रेक  वाढला आहे. ५० नागरिक स्वाईन फ्लूचे बळी पडले आहेत. जीवघेण्या स्वाईन फ्लूचा वाढता उद्रेक पाहता उपाययोजनांसाठी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यानुसार पालिकेच्या शाळांसह शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून अत्यावश्यक औषधोपचार करणे अनिवार्य आहे.
पालिकेच्या राजीव गांधी ई -लर्निंग स्कुलमधील विद्यार्थ्यांची  आरोग्य तपासणी सुरु केली आहे .त्यानुसार सर्वच शाळांमध्ये तातडीने आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे.  त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याची दक्षता घेण्यासाठी विशेषतः स्वाईन फ्लूची तपासणी करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी आरोग्य तपासणी केंद्र तातडीने सुरु करावीत जेणेकरून स्वाईन फ्लूबाधित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देऊन या आजाराला आळा घालणे शक्य  होईल.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली बाल लैंगिक अत्याचार आढावा बैठक संपन्न

0

पुणे –  पुणे शहर तसेच ग्रामीण भागात बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडतांना दिसत आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या.

शासकीय विश्रामगृहात बाल लैंगिक अत्याचार आढावा बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के पद्मनाभन, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, महिला व बाल कल्याण विभागाच्या पुणे विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या स्वरदा बापट, पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, मनोज खंडाळे, दिपाली मोरे, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होते.

पालकमंत्री बापट म्हणाले, लहान मुलांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या मानसिकतेला नष्ट करणे गरजेचे आहे. फक्त कायदेशीर कारवाईवर न थांबता प्रबोधन आणि जनजागृती होणे देखील महत्त्वाचे आहे. बाल गुन्हेगारांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करायला हवेत. महाविद्यालये, शाळा येथे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे. महिला अत्याचार व बलात्कारांच्या गुन्ह्यामधील आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न करायला हवेत. पोलीस प्रशासनाचे काम उत्तम असून असे गुन्हे घडणारच नाहीत, यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे देखील श्री. बापट  म्हणाले. या क्षेत्रात काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुन्हे कमी होण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृतीची मानसिकता नष्ट करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या श्रीमती बापट यांनी विविध पर्याय व प्रबोधनाबाबत माहिती दिली.

समेध शिखरजीच्या सरंक्षणार्थ जैन समाज रस्त्यावर

0

पर्यटनाचा निर्णय रद्द करण्यासाठी झारखंड सरकारच्या विरोधात जैनसमाजाचा पुण्यात मूकमोर्चा

पुणे: झारखंड राज्यातील समेध शिखरजी या जैन धर्मियांच्या पवित्र तीर्थस्थळाच्या संरक्षणार्थ आज पुणे येथे जैन समाजाच्या वतीने विशाल मुकमोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात पुण्यातील जैन बांधव मोठ्या सहभागी झाले होते. या मोर्च्यात हजारो जैन बांधव सहभागी झाले होते. झारखंड सरकारने सेध शिखरजीवर होणारे पर्यटन रद्द करावे या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

मूकमोर्चामध्ये प.पू. आचार्य युगभूषणजी म.सा., प.पू. पुलक सागरजी म.सा., प.पू. भावदर्शन सुरिश्वरजी म.सा., साध्वी सुधा म.सा., अॅड. एस के जैन, अचल जैन, मिलिंद फडे, फत्तेचंद रांका, शर्मिला ओसवाल, अभय छाजेड, बाळासाहेब ओसवाल, राजेंद्र बाठिया, शरद शहा, नितीन जैन, दिलीप मेहता, राजेश घीवाला, जितेंद्र दोषी, रमेश राठोड, राजु ओसवाल, भारत सुराणा आदी मान्यवर उपस्थित होते.

झारखंड सरकारने समेध शिखरजी येथे पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतल्याने त्याठिकाणी मांस, मटन दारु, रेस्टॉरंट सुरु होत आहेत. समेध शिखरजी येथे जैन धर्माच्या 24 तीर्थकरांपैकी 20 तीर्थंकरांचे निर्वाण झाले आहे. या तीर्थक्षेत्रावर हेलिपॅड बनविण्यात आले आहे. ते हेलिपॅड पर्यटनक्षेत्रासाठी तयार करण्यात आले असेल तर त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. आणि जर ते संरक्षणार्थ असेल तर त्याला आमचा विरोध नाही. पर्यटनाच्या निर्णयामुळे या पवित्र स्थानाचे पावित्र्य धोक्यात आल्याने जैन समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे हा विशाल मूकमोर्चा काढण्यात आला आहे. असेही जैन बांधवांकडून सांगण्यात आले. यावेळी जैन समाजाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्च्यात तरुणाईही मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.

गोव्या मध्ये दिवो कॅफे आणि बार, ग्लोबल फूड आणि लाइव्ह संगीताची मजा

0

कलंगुट – जागतिक स्तरावरचे रूचकर खाद्यपदार्थ, आकर्षक कॉकटेल्स आणि या सर्वाच्या जोडीला धुंद करणारं संगीत यांची अनुभूती देणारं नवं ठिकाण कळगुंट, गोवा इथं मोठ्या धामधुमीत सुरू झालं आहे. भारतातील हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात नवा मापदंड तयार करण्याच्या दूरदृष्टीकोनातून श्री. त्रिवेश आजगांवकर आणि त्यांचे भागीदार श्री. शिकर कुमार या तरुण व धडाडीच्या उद्योजकांनी गोव्याच्या प्रमुख समुद्रकिनाऱ्यावर हा उच्चभ्रू कॅफे आणि बार सुरू केला आहे.

श्री. आजगांवकर दिवो कॅफे अँड बारचे कामकाज हाताळणार असून या लाँचदरम्यान ते म्हणाले, “एप्रिल महिन्यातल्या एके दिवशी मी आमच्या तरुण, उत्साही टीमबरोबर व्यवसाय विस्तारासाठी नवनव्या संकल्पनांवर चर्चा करत होतो. आम्हाला नाविन्यपूर्ण आंतरराष्ट्रीय स्वादाची चव देणारं आणि महत्त्वाचं म्हणजे गोव्याचा वारसा दर्शवणारं एक आधुनिक रेस्टॉरंट उभारायचं होतं. त्यातूनच दिवो कॅफे अँड बार उभारण्याची संकल्पना जन्माला आली. आम्ही खाद्यसंस्कृतीच्या जाणकारांकडून आमच्या खाद्यपदार्थांबद्दल अभिप्राय जाणून घेतला व त्यातून वैविध्यपूर्ण आणि रूचकर पदार्थांचा समावेश असलेला मेन्यू तयार झाला.”

कळंगुटच्या मुख्य रस्त्यावर वसलेल्या दिवो कॅफे अँड बारला रिहा कुमार आणि प्रसिद्ध गोवन इलस्ट्रेटर मॅन्युएला मेंडोंन्सा गोम यांनी उत्साही, आकर्षक रूप  दिला आहे. काचेची अप्रतिम रचना करून या हॉटेलची अंतर्गत सजावट बाहेरच्या गजबजत्या रस्त्याशी जणू एकरूप करण्यात आली आहे. बारला आलिशान रूप देण्यासाठी आणि तरीही कॅफेची संकल्पना कायम राखण्यासाठी राखाडी रंगाची लाल आणि हिरव्या अशा तजेलदार रंगांबरोबर रंगसंगती करण्यात आली आहे. शिवाय झाडं आणि कलात्मक वस्तूंनी दिवोला कॅज्युअल तरीही शानदार लूक दिला आहे.

श्री. आजगांवकर यांच्या मते आज गोव्यातील रेस्टोबारचे डिझाइन नारळाच्या झावळ्या आणि लाल दगडांच्या पलीकडे जात आधुनिक, सुटसुटीत आणि  आकर्षक झाली आहे. ते म्हणाले, ‘गोव्याचा श्रीमंत वारसा आणि कला यांच्या पासून प्रेरणा घेतलेली अंतर्गत सजावट करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत केली आहे. शिवाय, भारतातील प्रसिद्ध इलस्ट्रेटर मारियो मिरांडा यांच्या कलेपासून प्रेरणा घेत एका भिंतीची आम्ही खास सजावट केली आहे. मारियो मिरांडा वॉल ही या कॅफेमधील सर्वात लक्षवेधी गोष्ट असून, गोव्याच्या या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकाराला आम्ही मानवंदना दिली आहे.’

लक्षवेधी अंतर्गत सजावटीखेरीज दिवो कॅफे आणि बारमधील खाद्यपदार्थांची चव जीभेवर रेंगाळणारी आहे, मग तो सकाळचा नाश्ता असो, दुपार किंवा रात्रीचं जेवण असो, त्यात प्रत्येकालाच परफेक्ट पदार्थ चाखायला मिळतात. जेवणाची सुरुवात साध्या पण रूचकर टोमॅटो किंवा बेसिल सूपने करता येईल. रंगीबेरंगी आणि फोटोजनिक असे दिवोची खासियत असलेले, फ्राइजबरोबर सर्व्ह केले जाणारे सँडविच पोट पटकन भरण्यासाठी एकदम योग्य आहे. हाताने बनवलेले, नाजूकपणे तयार केलेले आणि खाण्यास एकदम तयार असलेले वॉटरमेलन फेटा सॅलड प्रत्येक घासागणिक परफेक्ट लागते. मेडिटेरियन मसाल्यांमध्ये मॅरिनेट केलेले ग्रिल्ड चिकन या पदार्थाला उत्तम चव देते. अगदी पूर्वीच्या काळात सर्वात प्रसिद्ध कॉकटेल म्हणजे मॉस्को म्यूल. हे प्राचीन कॉकटेल आमच्या मेन्यूमध्येही समाविष्ट करण्यात आले असून ते पारंपरिक पद्धतीच्या हायबॉस कॉपर मगमध्ये सर्व्ह केले जाते. त्याशिवाय किवी आणि बनाना स्मूदीसारख्या हेल्दी पर्यायानेही वीकेंडची धमाल सुरुवात करता येऊ शकते.

दिवो कॅफे अँड बारचे दैनंदिन कामकाज हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातले उत्साही आणि पॅशनेट व्यवस्थापक श्री. साहिल जोशी यांच्यातर्फे हाताळले जाणार आहे. किचनचे काम कार्यकारी शेफ मानस पात्रा सांभाळणार असून ते आपली समर्पित टीम तसंच सर्वोत्तम काँटिनेंटल व जागतिक पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत.

तेव्हा या पार्टी सीझनमध्ये दिवो कॅफे अँड बारमध्ये   अप्रतिम सजावट व स्वादिष्ट मेन्यूचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पसंती देताना दिसत आहेत .

महाळुंगे-माण नगररचना योजनेतबाबत मिटकॉनमध्ये कार्यशाळा

0

पुणे-पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (पीएमआरडीए) महाळुंगे-माणद्वारे विकसित
केल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा विकास कामे ठरविण्यासाठी नगररचना योजना क्र.१च्या पुणे, बालेवाडी मिटकॉन येथे
दि.१६ ऑक्टोबरला मंगळवारी सकाळी १०.०० वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
पीएमआरडीएच्यावतीने महाळुंगे-माण येथे तब्बल ७०० एकरमध्ये नगररचना योजनेद्वारे काम चालू आहे. मागील एक
वर्षांमध्ये जमीन धारकासोबत राहून प्लांनिग स्कीमचे काम चालू आहे. महाळुंगे-माण टीपीस्कीममध्ये ५० टक्के जमीन
मूळ मालकाकडे, तर १० टक्के मोकळ्या जागांसाठी, १८ टक्के पायाभूत सुविधासाठी, ५ टक्के अॅमीनिटी स्पेससाठी याचा
वापर केला जाणार आहे. तर १२ टक्के जागा या नगर विकास रचनेतून पीएमआरडीएला मिळणार आहेत.
दि.१९/९/२०१८ रोजी पीएमआरडीएने प्रारूप नगर रचना योजनेस मंजुरी दिली आहे. ही प्रारूप नगररचना योजना
अंतिम करण्यासाठी राज्यसरकारकडून लवाद म्हणून धनंजय खोत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाळुंगे हायटेक सिटीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पीएमआरडीए सुमारे ६०० कोटी रुपये गुंतवणूक
करणार आहे. सध्या या भागात रस्ते व प्लॉटचे मार्किंग व मोजणी सुरु आहे. यामध्ये परदेशी कंपन्या देखील गुंतवणूक
करणार आहेत. त्यामुळे रोजगारात वाढ होऊन नक्कीच विकासाला हातभार लागणार आहे. प्रामुख्याने महाळुंगे-माणमध्ये
पायाभूत सुविधेसह वीज, पाणी, रस्ते आदी सोयीसुविधा सर्वांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
महाळुंगे-माण नगर रचना योजनेचे ठिकाण हिंजवडी आयटीपार्क शेजारी असल्याने या टाऊनशीपमध्ये सुद्धा माहिती व
तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या, रहिवाशी तसेच वाणिज्यीक क्षेत्र विकास करण्यासाठी खूप मोठी संधी आहे. त्यामुळे
पीएमआरडीएने पहिल्या नगररचना योजनेमध्ये महाळुंगे हायटेक सिटी स्थापन करण्याचे ठरविले आहे.
पायभूत सुविधांमधील होणाऱ्या कामांची माहिती जमीन मालकांना देऊन त्यांचेकडून सूचना प्राप्त करण्यासाठी उद्या दि.
१६ ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तरी सर्व जमीन धारकांनी कार्यशाळेला उपस्थित राहावे
असे आवाहन महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.

सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘अशी ही आशिकी’च्या निमित्ताने नवीन वर्षात ‘व्हॅलेन्टाईन डे’ ऐवजी साजरा होणार ‘AHA’ डे

0

अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले सचिन पिळगांवकर यांनी त्यांच्या ६०व्या वाढदिवसाला प्रेक्षकांसाठी एक खास भेट म्हणून त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि खास सरप्राईज ठरलेला तो मराठी चित्रपट म्हणजेच ‘अशी ही आशिकी’. चित्रपटाचे नाव जाणून घेतल्यावर या चित्रपटातील कलाकार कोण हे जाणून घेण्याविषयी प्रेक्षकांची कुतूहलता वाढली. चित्रपटाचे नावंच इतके यंग आणि हटके आहे की या चित्रपटासाठी कलाकारांची निवड पण तितकीच हटके असणार. तर ‘अशी ही आशिकी’ मध्ये अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे युथफूल हिरोची भूमिका साकारणार आहे. आता अभिनयची हिरोईन कोण, हे देखील प्रेक्षकांसाठी सुंदर सरप्राईज असेल. पण प्रेमाच्या महिन्यात अर्थात १४ फेब्रुवारीला प्रेमाचे नवे रंग, नवा अर्थ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ‘अशी ही आशिकी’

‘        अशी ही आशिकी’ च्या निमित्ताने तब्बल पाच वर्षांनी सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. दिग्दर्शनासह सचिनजी यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे, तसेच कथा-पटकथा-संवाद ही सचिनजी यांचेच आहेत. ‘अशी ही आशिकी’चा प्रेमाचा रोमँटिक प्रवास प्रेक्षकांसाठी नक्कीच नवीन अनुभव ठरेल.

 

गुलशन कुमार आणि भूषण कुमार प्रस्तुत, ‘अशी ही आशिकी’ चित्रपटाची निर्मिती ‘टी-सीरिज’ आणि ‘सिलेक्ट मिडिया’ यांनी केली असून सहनिर्मिती सुश्रिया चित्र यांनी केली आहे. वजीर सिंह, जो राजन आणि सुप्रिया पिळगांवकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. मनोरंजनाचे माध्यम ठरलेली टी सीरिज कंपनीने अनेक हिंदी सिनेमे आणि गाणी यांच्या मार्फत प्रेक्षकांची अभिरुची जाणून त्यांच्यासाठी नेहमीच मनोरंजक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली आहे.

सचिन पिळगांवकरांच्या दिग्दर्शनाच्या शैलीतून अजून सुंदररित्या खुलून दिसणार आणि प्रेमाची नव्याने उजळणी करणार ‘अशी ही आशिकी’.

‘स्मार्टसिटी’मुळे नवउद्योजकांना संधी उपलब्ध डॉ. राजेंद्र जगताप यांचे मत

0
पुणे : “स्मार्टसिटी या संकल्पनेत तंत्रज्ञान आणि कौशल्याचा अंतर्भाव असल्याने नव उद्योजकांना अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरुणांनी तसे ज्ञान आत्मसात करून या संधीचा लाभ घेतला पाहिजे. टाकाऊतून टिकाऊ, स्वच्छ वातावरण निर्मिती आणि सौर ऊर्जेचा वापर वाढवणे यावर उद्योजकांनी नवीन कल्पना दिल्यास त्या स्मार्टसिटीला उपयुक्त ठरतील,” असे मत पुणे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.
आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये (डिवायपीआयएमएस) आयोजित उद्योजकता विकास शिबिरात डॉ. जगताप बोलत होते. प्रसंगी ‘मिटकॉन’चे संस्थापक डॉ. प्रदीप बावडेकर, उद्योजिका शिल्पा जोशी, मनाली शेनॉय, आलोक नायर, संस्थेचे संचालक डॉ. आशुतोष मिसाळ, सल्लागार संचालक प्रा. डी. आर. करनुरे, हेड कॉर्पोरेट रिलेशनचे डॉ. जयसिंग पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. प्रदीप जावडेकर म्हणाले, “आपण स्वतःतील क्षमतांचा विचार करायला पाहिजे. कोणत्याही एका क्षेत्रांमध्ये नैपुण्य मिळवले पाहिजे. सर्व क्षेत्रात आपण करू शकूच असे नाही. त्यामुळे आपल्या आवडीच्या आणि शक्य असलेल्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून त्यानुसार आपल्यातील उद्योजक घडवला पाहिजे. उद्योग करताना आपल्यात झपाटलेपण असणे आवश्यक असते.”
संस्थेचे कार्यकारी संचालक विंग कमांडर पीव्हीसी पाटील, डॉ. जयसिंग पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डॉ. आशुतोष मिसाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन स्वामीनी लुंगे व मृणाली मोरानकर यांनी केले. डॉ. शिल्पा कानकोनकर यांनी आभार मानले.

नळ स्टॉप चौकात दुमजली पूल व करिष्मा चौकात उड्डाण पूल बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात – महापौर मुक्ता टिळक व मुरलीधर मोहोळ यांची ग्वाही.

0

पुणे-कर्वे रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नळ स्टॉप चौकात दुमजली पूल व करिष्मा चौकात उड्डाण पूल बांधण्याच्या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल तसेच मेट्रोचे काम ही वेगात सुरु असून याद्वारे कोथरुडकरांची लवकरच रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल असे महापौर मुक्ता टिळक व मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्ट केले.कोथरूड नवरात्र महोत्सवात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही ग्वाही दिली.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सतत कार्यरत राहणारे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी समाजकार्याचा आदर्श घडविला असल्याचे ही ते म्हणाले.पुणेकरांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून पुढील चार वर्षात बहुतांश प्रकल्प मार्गी लागले असतील असेही महापौर मुक्ता टिळक यांनी आवर्जून सांगितले.

राम गणेश गडकरी यांचा पुतळा आता तरी सन्मानाने बसवावा – अभिनेते शरद पोंक्षे

0
पुणे-कलाकारांनी महापालिकेकडे सुपूर्त केलेला राम गणेश गडकरी यांचा पुतळा आता तरी सन्मानाने बसवा अशी मागणी अभिनेते शरद पोंक्षे यांनी महापौर मुक्ता टिळक आणि स्थायीसमितीचे माजीअध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत  कोथरूड नवरात्र महोत्सवाचा सत्कार स्वीकारताना केली .
अभिनेते शरद पोंक्षे यांचा त्यांच्या कार्याबद्दल व वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी हेमंत बर्वे यांची संकल्पना आणि शरद पोंक्षे यांचे निवेदन असलेला स्वतंत्रते भगवती हा कार्यक्रम सादर करण्यात आला.या कार्यक्रमादरम्यान निवेदन करताना अभिनेते शरद पोंक्षे यांनी ” कलाकारांनी पुणे मनपा ला भेट दिलेला राम गणेश गडकरींचा पुतळा पुन्हा सन्मानाने स्थापित केला जावा अशी आग्रही मागणी मंडळी “. कोथरूड मध्ये गदिमांचे स्मारक उभे राहत आहे ही आनंदाची बाब असून ” स्मारक उभारताना पहिले त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करावी अशी मार्मिक टिप्पणी ही त्यांनी केली.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली ते छत्रपती शिवाजी महाराज ते स्वातंत्र्यवीर सावरकर अश्या वंदनीय महापुरुषांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकतानाचाच त्यांच्यावरील गीतांनी व निवेदनातून उपस्थित रसिक भारावून गेले.
यावेळी नगरसेविका हर्षाली माथवड,नगरसेविका वासंतीताई जाधव व नगरसेविका छायाताई मारणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप खर्डेकर यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत उत्सव प्रमुख विशाल भेलके व उमेश भेलके यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

लावणी कलावंतांना सरकारने सेवाधन, निवृत्ती वेतन द्यावे : माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील

0

पुणे-थकल्या, भागल्या जिवांचे आयुष्यभर मनोरंजन करणार्‍या, वृद्ध लावणी कलाकरांना सेवाधन, निवृत्ती वेतन सरकारने द्यावे आणि रसिकांनी या कलेला दाद द्यावी असे आवाहन लावणी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.

पुणे नवरात्रौ महोत्सवातील लावणी महोत्सवाचे उद्घाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नारळ वाढवून झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार, नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल मंचावर उपस्थित होते. दुपारी 12 ते रात्री 12 असा हा लावणी महोत्सव दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी या लावणी महोत्सवाला भेट दिली. आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितेने उपस्थितांची मने जिंकली आणि आपल्या कवितेतून आबा बागुल यांना शुभकामना दिल्या. नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून आबांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून वैचारिक दिशा दिली आहे अशा शब्दात कौतुक केले. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनही मी त्यांना शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या राजकारणात आपण वेगळे असतो पण, भारतीय म्हणून आपण एक आहोत त्यामुळे माझे या व्यासपीठावर येण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे ते म्हणाले.

उद्घाटनपर बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, लावणी म्हणजे सौंदर्य, नजाकत, ठेका धरायला लावणारी कला. लावणी म्हणजे लवण. लवण म्हणजे मीठ. आपल्या जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते. लावणी कलावंत आयुष्यभर रसिकांचे मनोरंजन करीत असतात. त्या कलावंतांच्या वृद्धापकाळी त्यांचे आयुष्य समाधानात व्यतित व्हावे यासाठी सरकारने त्यांच्या वृद्धापकाळची सोय करावी. याबाबत सरकारचा काही योजनांचा विचार चालू आहे. आता त्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. रसिकांनीही या कलावंत मुलींचा योग्य तो सन्मान राखायला हवा, असेही यावेळी बोलताना पाटील म्हणाले.

लावणी ही महाराष्ट्राची लोककला. रसिकांनी ती जपलेली आहे म्हणून ती जिवंत आहे. या कलेला उत्तेजन देण्यासाठी या उत्सवात आम्ही लावणी महोत्सव गेली 23 वर्षे साद करीत आहोत, असे प्रास्तविकात बोलताना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अंध्यक्ष नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.

अमित बागुल आणि नंदू बानगुडे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीनिवास पाटील यांचा आणि उल्हास पवार यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार आबा बागुल यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून आणि अभिनेत्री श्वेता शिंदेचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते झाला. विकी खन्ना, अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, माजी नगरसेवक विजय मोहिते, अभिषेक बागुल, रिपब्लीकन पक्षाचे बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, असित गांगुर्डे, मंदार जोशी, आयुब शेख आदी यावेळी उपस्थित होते.

गण गौळणीने लावणीच्या सादरीकरणाला सुरवात झाली. नंतर या रावजी बसा भाऊजी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, मला आमदार झाल्यासारख वाटत गं, तुमच्या पुढ्यात कुटतेय मी ज्वानीचा मसाला, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सादर करण्यात आल्या. बुगडी माझी सांडली गं, तुझ्या उसाला लागलं कोल्हा, आई मला नेसव शालू नवा या जून्या लावण्यांनी वेळी सार्‍या गणेश कला रंगमंच येथे टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला.

लावणी महोत्सवातील महासंग्राम या कार्यक्रमात ’पाहुणं फक्त तुमच्यासाठी’, ’लावणी धमाका’, ’तुमच्यासाठी कायपण’, ’छत्तीस नखरेवाली’, ’ढोलकीच्या तालावर’ या शिर्षकाखाली वेगवेगळ्या लावणी संस्थांनी ठसकेबाज लावण्या सादर केल्या या महोत्सवला प्रचंड गर्दी होती. महिलांचा सहभाग त्यात लक्षणीय होता.