Home Blog Page 3031

मुख्‍य सचिवांनी घेतला विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रमाच्‍या पूर्वतयारीचा आढावा

0

पुणे- पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभ अभिवादन कार्यक्रम येत्‍या 1 जानेवारीस होणार असून याबाबतच्‍या पूर्वतयारीचा आढावा राज्‍याचे मुख्‍य सचिव दिनेशकुमार जैन यांनी आज त्‍यांच्‍या दालनात घेतला. यावेळी गृह सचिव सुनील पोरवाल, पोलीस महासंचालक दत्‍ता पडसलगीकर, अतिरिक्‍त पोलीस महासंचालक परमवीर सिंग, राज्‍य गुप्‍तचर आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम,  जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अशोक मोराळे आदींसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरेगाव भिमा जवळील पेरणे फाटा येथील विजयस्‍तंभाला अभिवादन करण्‍यासाठी अनेक नागरिक येत असतात. गेल्‍या 1 जानेवारीस झालेला प्रकार लक्षात घेवून हा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडावा, यासाठी विशेष दक्षता घेण्‍यात येत आहे. मुख्‍य सचिव जैन यांनी कार्यक्रम परिसरात उपलब्‍ध करुन देण्‍यात येणा-या सोयी-सुविधांची माहिती घेवून उपयुक्‍त सूचना केल्‍या. जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी कार्यक्रम स्‍थळ, वाहनांच्‍या पार्कींगच्‍या जागा, अन्‍न-पदार्थांचे  स्‍टॉल्‍स, पिण्‍याच्‍या पाण्‍याची सोय, रुग्‍णवाहिका, तात्‍पुरते शौचालये, सीसीटीव्‍ही कॅमेरे आदींची विस्‍तृत माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्‍य विभाग तसेच इतर विभागांच्‍या वतीने करण्‍यात येणा-या कामांची माहिती दिली. पोलीस महासंचालक पडसलगीकर यांनी कायदा व सुव्‍यवस्‍थेबाबतचा आढावा सादर केला. कार्यक्रम शांततेत संपन्‍न होण्‍यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्‍त उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.  जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्‍हा पोलीस प्रशासनाच्‍यावतीने योग्‍य ती तयार करण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. सोशल मिडीयावरही विशेष लक्ष ठेवण्‍यात आले असून आवश्‍यकते नुसार कारवाई करण्‍यात येत आहे. समाजातील नागरिकांच्‍या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम आणि जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी विजयस्‍तंभ परिसरात स्‍थानिक प्रशासन आणि नागरिकांच्‍या  वेळोवेळी  बैठका घेवून हा कार्यक्रम शांततेत साजरा करण्‍याचे आवाहन केले. विविध संस्‍था, नागरिकांनी केलेल्‍या सूचनांचा आढावा घेवून त्‍यानुसार योग्‍य पध्‍दतीने नियोजन केल्‍याबद्दल समाधान व्‍यक्‍त करण्‍यात आले.

अशी पापं केली तर.. आत्महत्या करावी लागेल ,असे का कोण कोणास, महापालिकेच्या सभागृहात म्हणाले? (व्हिडीओ)

पुणे :  अशी पापं केली तर झोप येईल का झोप ,आत्महत्या करायची वेळ येणार नाही काय ? असे आज महापालिकेच्या सभागृहात कोण कोणास का म्हणाले ..पहा काही समजतेय का ? सभागृहात झालेल्या या प्रकारचा हा व्हिडीओ..

पुणे महापालिकेत सभागृहाबाहेर पाणी कपात -आणि मंदिरे पाडल्यावरून आंदोलने (व्हिडीओ)

0

पुणे : पाणी कपातीची जलसंपदा कडून सातत्याने मिळणारी धमकी त्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आज महापालिकेत सभागृहाबाहेर अशी आंदोलने झाली ..पहा व्हिडीओ…

जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने शहरात पाणीकपात करण्याचा आदेश दिल्यामुळे सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्याच्या उद्देशाने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेपुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर पाणी भरण्याच्या रिकामी कळशी घेऊन आंदोलन केले. या आंदोलनात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांच्यासह काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

शहराचे पाणी जवळपास अर्ध्यावर आणण्याचा आदेश जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी दिला होता.या आदेशामुळे भाजपवर विरोधक तुटून पडले आहेत. दुसरीकडे प्रत्यक्षात पाणीकपात सुरु केली नसतानाही शहरातील अनेक भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. कसबा पेठ, शनिवार पेठ भागात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. त्यामुळे सध्या शहरात अनियमित पाणीपुरवठा असताना त्यातच भविष्यात पाणीकपातीची टांगती तलवार अशी स्थिती उद्भवल्यामुळे टिळक पुतळ्यापाठोपाठ महापालिकेतही आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या कारभारावर टीका करण्यात आली. आंदोलनप्रसंगी ‘पुण्याचा चौकीदार पाणीचोर’ अशा घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान नगरसेवक प्रकाश कदम ,नितीन कदम ,प्रतिक कदम ,आदींनी महापालिकेच्या सभागृहाच्या दरवाजा पर्यंत गणेश मूर्ती नेऊन ‘मंदिरे पाडल्याच्या निषेधार्थ घोषणा देत आंदोलन केले . यावेळी त्यांनी आयुक्त सौरव राव यांना निवेदन दिले .

संभाजी उद्यानात आर्किटेक्ट विद्यार्थ्यांचा ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ‘ च्या विद्यार्थ्यांनी बर्नार्ड वॅन लिअर फाउंडेशन ,पुणे पालिकेच्या सहकार्याने टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक असा ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘  संभाजी उद्यानात तयार केला आहे .पाच वर्षापर्यंतच्या लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून हा  ‘आर्टिस्टिक कॉर्नर ‘ करण्यात आला आहे. 
  कॉलेजच्या बी -आर्क अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी वाहनांचे जुने टायर ,पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून अनेक कलात्मक गोष्टी उद्यानाच्या कोपऱ्यात तयार केल्या आहेत .
त्यात रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांचा उपयोग करून झाडांना संरक्षणाचा पार तयार करण्यात आला आहे ,वाहनांच्या जुन्या टायरपासून लांब सापाचे कुंपण ,खेळण्यासाठी टायरची ‘जंगल जीम ‘ तयार करण्यात आली  आहे तसेच पुण्याची शिवकालापासून मेट्रोपर्यंत प्रगती दाखविणारी ग्राफिटी वॉल रंगविण्यात आली आहे .
विद्यार्थ्यांना प्राचार्य लीना देबनाथ ,प्रा . अमीर पटेल यांनी मार्गदर्शन केले . ‘अर्बन -९५’ अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला .

मंदिरे (?) पाडली .. हॉटेलांचे काय ?.. महापालिकेला सवाल ..

0

पुणे- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने च काय सर्वांनींच वागावे ..यात दुमत नाही पण सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले नाही कि मी आदेश देईपर्यंत प्रत्येक बेकायदा गोष्ट .. तशीच राहू द्यात .. पुण्यातील रस्त्याला ,वाहतुकीला अडथळा ठरणारी अनेक गणेश मंडळाच्या ‘मूर्ती ‘ ठेवलेली ‘मंदिरे ‘ भल्या रात्री , लोक साखर झोपेत असताना .. दरोडा टाकावा त्याप्रमाणे ..महापालिकेने पाडली …. बेकायदा बांधकामांवर कारवाई करावी..हरकत नाही ..आणि त्याला कायदा सुव्यवस्था ..राखावी म्हणून .. लोकांना समजू न देता .. ती अंधारात गुपचूप पाडली, ठीक आहे  ..दिवसा अशा कारवाया करण्यास सहसा पोलीस धजावत नाहीत ,लोकांच्या धार्मिक भावना लगेच उफाळून येतात .. आणि मग पोलिसांना त्रास होतो ..त्यांना कायदा सुव्यवस्था राखणे कठीण होते ..ठीक आहे ..
पण प्रश्न असा आहे ,याच पोलिसांना वाहतुकीचा अडथळा करणारी हॉटेल दिसत नाहीत काय ? याच महापालिकेला वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे हॉटेल्स ,व्यावसायिक बांधकामे दिसत नाहीत काय ? शहर आणि परिसरात हजारी हॉटेल्स अशी आहेत ज्यांनी पार्किंगच्या जागा  बळकावून हॉटेल्स सुरु ठेवली आहेत . तर कित्येकांना पार्किंगची सोय नसताना हॉटेल्स महापालिकेने बिनधास्त उभारा म्हणून जणू सांगितले असावे  . रस्त्याच्या कडेला ,कॉर्नरला , फ्रंट आणि साईड मार्जिन मध्ये किंवा चक्क रस्त्यावर फुटपाथवर किती हॉटेल्स चालतात .. त्यांनी वाहतुकीला अडथला होत नाही काय ? वाहतुकीची आणि लोकांच्या जीवन मरणाची काळजी घेणाऱ्या पोलीस आयुक्तांनी हेल्मेट सक्ती चा फतवा राबविण्याचा निर्धार केला आहे . हा निर्धार करताना ,किंवा तो राबविण्यापूर्वी ..आयुक्त साहेब, महापौर साहेब , तुमची इच्छया नाही  काय … अशी सर्व हॉटेल्स पाडून जागा मोकळ्या करून त्या पार्किंगला मुक्त करण्याची …
किती गणेश मंडळांनी आपापल्या मुर्त्या .. अशा रस्त्यावर, किंवा कडेला, किंवा साईड मार्जिन मध्ये बेकायदा  बांधकामे करून ठेवल्यात ..? आणि किती हॉटेल्स अशी आहेत / याचा सर्वे आयुक्त साहेब तुम्ही केलाय काय ?
शिवाजीराव पवार नावाचे नगर अभियंता होऊन गेले. तेव्हा आम्ही ..अशा बेकायदा हॉटेल्सच्या सर्वेची यादी मागितली होती .. आणि त्यांना सहायक नगर अभियंता म्हणून काम करणाऱ्या हरिहर यांनी आम्हाला ती दिली होती  तेव्हा .. त्या यादीत कलमाडींच्या तत्कालीन पुना  कॉफी हाऊस, रामकृष्ण मोरेंच्या टिळक रस्त्यावरील ,आणि ढोले पाटलांच्या कपिला हॉटेल सह, थिटे यांच्या मार्केट यार्डातील हॉटेल सह  सुमारे ४०० हॉटेलांचा समावेश होता… आज काय स्थिती आहे .. हि सारी हॉटेल्स आज त्या स्थितीत नसतील बडी नेते मंडळी नसतील .. पण बेकायदा बांधकामे केलेल्या हॉटेल्स ची संख्या किती असेल ?  आणि त्यामुळे पुण्यातील ,पार्किंगला ,वाहतुकीला किती अडथळा होत असेल .. याचा सर्वे गेल्या 25 वर्षात कोणी केलाय काय ? …
असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा .. तुमच्याकडून होणाऱ्या कारवायांबाबत ..शंका निर्माण होतात . तुमच्या कारवाया राजकीय तर नाहीत … अशी शंका डोकावल्या शिवाय राहत नाही .पेट्रोल डीझेल दरवाढ ,जीएसटी,हेल्मेट सक्ती,पिण्याचे पाणी मीटर लाऊन विकत देण्याचा घाट , वाहतुकीची कोंडी , बेरोजगारी ,कंत्राटी कामगारांची छळणूक अशा विविध  कारणांनी जनतेचा रोष तर तुम्ही अंगावर घेत आलाच आहात ,आता निवडणुकीत तुम्हाला उपयोगी ठरणारी असंख्य  गणपती मंडळांचाही तुम्ही रोष पत्करत आहात  … आम्ही तर एवढेच म्हणू ..हे गणराजा.. एखाद्या सातारा रोडवरील मठाचे बांधकाम वाचविण्यासाठी  कोट्यांवाधींचा उड्डाणपूल जे उभारतील …बुधवार पेठेतील भक्तांच्या गळ्यातील ताईत बनलेले मंदिर  अडथळा ठरले तरी त्याकडे दुर्लक्ष करतील ..पण छोट्या छोट्या मंडळांच्या ..म्हणजे कमजोर व्यक्तींवरच कारवाया  करतील .. अशा स्वरूपाची  वृत्ती सोडून … या सर्वांना खऱ्या अर्थाने सर्वत्र ..सारख्या पद्धतीने कायदा राबविण्याची शक्ती मिळो… .पहा आता तूच पावलास आणि तूच धावलास तर ..यांना सद्बुद्धी मिळेल …निव्वळ बेकायदा बांधकामे करणाऱ्या हॉटेल्सवर कारवाया केल्या तरी वाहतुकीचा कोंडलेला श्वास बराचसा मोकळा होईल …बाकी सारे… तुझ्या हातही नाही गणराज ,सारे काही ..या बड्या कायदा रक्षकांच्या हाती ….. 

नेतृत्वहिन पुण्यात भाजपला धोका ?

0

पुणे-‘घर घर मोदी’ला घरघर लागली. देशात एक हाती सत्ता एक नाव डोळ्यासमोर ठेऊन जनतेने दिली. पुढे या एका नेतृत्वाने केलेल्या जगाच्या सफरी बाबत लोकांना घेणे देणे नाही पण या नेतृत्वाने घेतलेले ,आणि लादलेले  निर्णय थेट लोकांशी,प्रत्येक नागरिकांशी  संबधित होते आणि त्यामुळे घर घर पोहोचलेल्या या नेतृत्वाला आता घरघर लागली आहे . राज्यातही याहून अधिक वेगळे असे चित्र नाही . राज्यात देवेंद्र सरकार आहे .भाजप सरकार नाही अशी प्रतिक्रीया भाजपचे मंत्री,आमदार ,नगरसेवक देत आहेत . पुण्यापुरते सांगायचे झाले तर ,पुण्याचे नेतृत्व ना खासदार अनिल शिरोळे यांच्याकडे आहे ,ना पालकमंत्री गिरीश बापटांकडे आहे,ना शहराध्यक्ष गोगावले यांच्या कडे आहे .महापालिकेतील सत्ताधारी प्रत्येक समस्या घेऊन तर जातात यांच्याकडे पण हि समस्या तरीही सुटत नाही , आणि म्हणून खासदार उपोषणाचा इशारा देण्यापर्यंत मजल मारतात आणि अन्य प्रतिनिधींना पालकमंत्र्यांना घेऊन कधी तर कधी न घेता  मुख्यमंत्र्यांकडे जावे लागते . आणि तिथे गेले तरीही समस्या सुटेलच याची हमखास अशी शाश्वतीही आता अनेक अनुभवाने उरलेली नाही . असे या पक्षातील लोकप्रतिनिधींची धारणा आहे . शिवसेनेने गेली 4 वर्षे जे भोगले तेच भाजपच्या अन्य प्रतिनिधींनी हि थोड्याफार प्रमाणात अनुभवले आहे .
आणि राज्यातील विविध भागातील आमदारांची आणि मंत्र्यांची याहून फारशी वेगळी अशी अवस्था नाही .असेअसले तरी मुख्यमंत्री हे जनतेत लोकप्रिय असतील तर भाजपला धोका नाहीच नाही .पण त्यांनी लोकांना थेट फायदा पोहोचेल असे निर्णय घेतले आहेत काय ? या प्रश्नाचा वेध त्यासाठी घ्यावा लागणार आहे .तो घेताना आता सर्वात आधी उत्तर येते ते ‘मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय घेतला म्हणून… पण यावर अनेक लोकांची विविध मते आहे,विविध शंका आहेत .मराठा आरक्षण हि मागणी  ७० राजकीय आणि ३० टक्के सामाजिक अशी मानली गेली पाहिजे असे समीक्षकांचे मत आहे .त्यामुळे या निर्णयाने फरक पडेल पण तो फार अल्पसा पडेल .कारण या निर्णयाने मुख्यमंत्र्यांनी जनतेच्या प्रश्नांना ,समस्यांना थेट हात घातला कि नाही याबाबत साशंकता व्यक्त होते , या विषयाला असंख्य कंगोरे आहेत.मात्र मुख्यमंत्र्यांनी  या निर्णयाने राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी केली यावर सर्वांचे एकमत होते आहे .म्हणजे विरोधकांची कोंडी करण्यात खमक्या राजकारणी म्हणून त्यांची गणना होईल .पण ….
या शिवाय बेरोजगारी ,कंत्राटी पद्धतीने वेठबिगार बनलेले कामगार ,गरिबी ,अशा स्थितीत जगणाऱ्यांना.. मुख्यमंत्री असलेल्या या नेतृत्वाने दिलेले आजतागायत काही मिळाले नाही , काही पोहोचलेले नाही . राहिला मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांचा प्रश्न तर ते पुण्याच्या राजकिय झुल्यात नेहमीप्रमाणे झुलत राहिले आहेत . त्यांना भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांबद्दल फारशी आस्था नव्हती आणि नाहीही .पण त्यांना बदलून हि परिस्थितीत काही फरक पडला नाही हि त्यांची व्यथा आहे.
अशा स्थितीत पुण्याच्या राजकारणात मुख्यमंत्री हेच पुण्याचे नेते असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे. नागपुरातून लढणारे, मुंबईत बसणारे मुख्यमंत्री हे पुण्याला खूप काही देऊ शकतात .पण …. का कोण जाणे अजून का काही मिळाले नाही … मेट्रो चे काम सुरु झाले म्हणून पुणेकर संतुष्ट होतील .. केवळ याच भ्रमात जर भाजप राहणार असेल तर … देव त्यांचे भले करो असे म्हनावे लागेल ..लोक शिवसृष्टी बाबत हि फारसे काही म्हणनार नाहीत ,पण पेट्रोल डीझेल च्या किमतींनी प्रत्येकाच्या खिशात हात घातला ,ना राज्याने आपला कर कमी केला ना महापालिकेने आपला कर कमी केला. वाहने घेताना लावल्या जाणाऱ्या करणे तर ती खरेदी करणाऱ्यांचे कर पाहून  डोळे पांढरे होतात .पण एवढा कर घेऊन हि पुढे पुन्हा हाल अपेष्टा सहन करताना ..काय तो सरकारला दुवा देत असेल काय याचा विचार सरकार करताना दिसत नाही.
घर घेणे मुश्कील , नौकरी ,काम धंदा मिळविणे मुश्कील,रस्त्याने फिरणे मुश्कील सारे काही मुश्कील  आणि  निवडून आलेल्या नेत्याकडे जाऊन हात पसरणे मुश्कील .. कारण तोच म्हणतो ..भाऊ माझ्या हाती काही नाही सारे काही मुख्यमंत्र्यांच्या हाती  ….
जनतेची हि अवस्था असताना , लोकप्रतिनिधी अनेकदा हतबल झाल्याचे स्पष्ट दिसले आहे . महापालिकेतील विविध प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलेले दिसले. पण तरी हि पुणेकर संभ्रमातच राहिले .
मुख्यमंत्र्यांनी पुण्याचे नेतृत्व बापट ,शिरोळे किंवा कोणत्याही पुण्याच्या नेतृत्वावर न सोपविता पुण्याला नेतृत्वहीन करून काय दिले हे ..ते आता निवडणुकीनंतर काय मिळविणार, यावरच स्पष्ट होणार आहे. पण पक्षाला मात्र केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांचीच एकाधिकारशाही जर असेल आणि होती असे मानलेच तर  ..  आता ती मानवेलच  ची शाश्वती  उरलेली नाही  हे निश्चित …

सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली, आर्य स्पोर्ट शिवसैनिक यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0
पुणे- पुणे जिल्हा परीषद सदस्य रोहित पवार यांच्या तर्फे आयोजित सृजन करंडक क्रिकेट स्पर्धेत पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा तर आर्य स्पोर्ट शिवसैनिक संघाने कॅम्प बॉईज् संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
लेजेन्डस् क्रिकेट क्लब, मुंढवा येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत स्वप्निल सातवच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली  संघाने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा 5 गडी राखून सामना जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना राहुल सातव  व  नदिम अन्सारी यांच्या अचूक गोलंदाजीने एल्व्हन स्टार बारामती 15 संघाचा डाव 6 षटकात 4 बाद 52 धावांत रोखला. 52 धावांचे लक्ष स्वप्निल सातव, राहुल सातव व उमेश कत्रे यांच्या प्रत्येकी 11 धावांच्या बळावर पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली संघाने 5.3 षटकात 5 बाद 53 धावा करून पुर्ण करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
 
दुस-या उपांत्य फेरीच्या लढतीत वौभव पांडूलेच्या नाबाद 22 धावांच्या बळावर आर्य स्पोर्ट शिवसैनिक  संघाने कॅम्प बॉईज् संंघाचा 9 गडी राखून दणदणीत पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. नाबाद 22 धावा करणारा वौभव पांडूले सामनावीर ठरला. 
 

स्पर्धेचा सविस्तर निकाल- उपांत्य फेरी  
एल्व्हन स्टार बारामती 15- 6 षटकात 4 बाद 52 धावा(इमरान पठान 12, दिपक कुदळे 11, अभिजीत एकशिंगे 11, राहुल सातव 2-10, नदिम अन्सारी 2-21) पराभूत वि पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली- 5.3 षटकात 5 बाद 53 धावा(स्वप्निल सातव 11, राहुल सातव 11, उमेश कत्रे 11, मोईन भागवत 1-19, अभिजीत एकशिंगे 2-15, प्रविण भोसले 1-14) सामनावीर-  स्वप्निल सातव
पै सचिन भाडळे प्रतिष्ठान वाघोली  संघाने 5 गडी राखून सामना जिंकला.
 
कॅम्प बॉईज्- 6 षटकात 3 बाद 50 धावा(शरद संघेला 23, प्रशांत चौधरी 1-10, निळकंठ पवार 1-21, सौरभ दोडके 1-12) पराभूत वि आर्य स्पोर्ट शिवसैनिक- 3.5 षटकत 1 बाद 52 धावा(वौभव पांडूले नाबाद 22, राजेंद्र पानेसर नाबाद 16, अफजल मकदुम 1-15) सामनावीर- वौभव पांडूले 
आर्य स्पोर्ट शिवसैनिक  संघाने 9 गडी राखून सामना जिंकला.  

बंधुता साहित्य परिषद व ‘काषाय’तर्फे डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्कार

0
पुणे : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व काषाय प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने विसाव्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष व ज्येष्ठ समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे. गुरुवार, दिनांक २० डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, भोसरी येथील भगवान महावीर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश जवळकर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे असतील.
डॉ. सबनीस यांच्या सत्कार सोहळ्याबरोबरच प्रबोधनयात्री कविसंमेलन आयोजिले आहे. यामध्ये मुंबईचे दीप पारधे, संदीप कांबळे, दौंडचे बबन धुमाळ, ठाण्याचे विजय जाधव, अमरावतीचे गुलाब फुलमाळी, पुण्याचे डॉ. भीम गायकवाड, संतोष हुले, पिंपरीचे शंकर आथरे व सांगवीच्या मधुश्री ओव्हाळ या कवींचा सहभाग असणार आहे, अशी माहिती काषाय प्रकाशनचे संचालक व कवी चंद्रकांत वानखेडे यांनी दिली.

अमृता फडणवीस यांच्या हस्ते ‘सीएम चषक’चे उदघाटन

0
मुंबई: एकीकडे मुंबईसह महाराष्ट्रात सीएम चषकसाठी जोरदार प्रतिसाद मिळत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही आज सीएम चषक स्पर्धेत भाग घेतला. अमृता फडणवीस यांनी आज मुंबईतील खेतवाडी स्थित भगिनी सभागृह येथे सीएम चषक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी स्वतः हातात बॅडमिंटन रॅकेट घेत मैदानात उतरल्या आणि उपस्थित महिला खेळाडूंमध्ये उत्साह भरला. या कार्यक्रमाला स्पर्धेतील सहभागी गृहिणी आणि तरुणींचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी कार्यक्रमाला मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगलप्रभात लोढा, गिरगावच्या नगरसेविका अनुराधा पोतदार-झवेरी, वाळकेश्वरच्या नगरसेविका ज्योत्स्नाबेन मेहता, ताडदेवच्या नगरसेविका सरिता पाटील, मलबार हिल भाजपा अध्यक्षा श्वेता मांजरेकर आणि भाजप तसेच भाजयुमोचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मलबार हिल विधानसभा मतदार संघातील महिलांनी काढलेल्या आकर्षक आणि भव्य अशा विविध रांगोळ्यांना भेट देत स्पर्धकांचे अमृता फडणवीस यांनी कौतुक केले तसेच स्वतः रांगोळीही काढली . ‘सीएम चषकच्या निमित्ताने अनेक युवा खेळाडूंना आणि मुख्यत्वे तरुणी आणि गृहिणींना हक्काचे क्रीडा-कला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. अनेक खेळाडू या स्पर्धेशी जोडले गेल्याचे चित्र महाराष्ट्राकरता आशादायी आहे’, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अमृता फडणवीस या स्वतः राज्यस्तरीय टेनिसपटू राहिल्या असून त्यांच्या उपस्थितीने सीएम चषकमधील सहभागी महिलांचा आत्मविश्वास आणखी दुणावला असल्याचे यावेळी भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
महाराष्ट्रभरातून सीएम चषकला उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत एकूण ३५ लाखांहून अधिक खेळाडूंनी यात सहभागी घेतला आहे. महिलाही यात मागे नसून आतापर्यंत ५ लाखांहून जास्त महिलांनी सीएम चषकमध्ये सहभाग घेतला आहे. १२ जानेवारी रोजी मुंबईत भव्य कार्यक्रमरूपाने या स्पर्धेची समाप्ती होणार आहे.
6 Attachments

१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उद्घाटन

0

१४ ते २० डिसेंबर मध्ये सिटी लाईट सिनेमा येथे महोत्सवाचे आयोजन …

१७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे. शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ला सिटीलाईट सिनेमा मुंबई येथे अनेक मान्यवरांच्याउपस्थिती मध्ये १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले. या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी, आशियाईचित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर श्री.सुधीर नांदगावकर , प्रभात चे सचिव  श्री संतोष पाठारे , दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशनऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार ही मंडळी उपस्थित होती. मृणाल कुळकर्णी यांनी दीप प्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात केली.  ‘वेलकम होम’ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दर वर्षी प्रमाणे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाद्वारे,  सिनेमा आणि सिनेमा निगडित चळवळी मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना सत्यजित रे मेमोरियल अवॉर्ड दिलाजातो . हा मानाचा अवॉर्ड मानला जातो . यावर्षी तो फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी  इंडियाचे  उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार यांना त्यांच्या आजवरच्या   सिनेमा आणि सिनेमा निगडितचळवळीमधील कामाचा गौरव म्हणून देण्यात आला .

उदघाटनादरम्यान सांगताना, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम यांनी सांगितले   –  ” आशियाई सिनेमा जगात मोठा झाला आहे. महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्णभारतात होत असलेला हा एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे याचा आम्हाला अभिमान आहे. वेलकम होम आणि इतर तीन मराठी सिनेमे या महोत्सवात प्रेक्षकांना पाहायला मिळतील.त्याचबरोबर आम्ही शासनाचे आभार मानतो कारण शासन मदत करत असल्यामुळे हा महोत्सव सुरू आहे, मात्र खंत एवढीच आहे पहिल्या वर्षी जेवढी मदत मिळत होती तेवढीच मदत सरकारकडून१७व्या वर्षी सुद्धा मिळत आहे त्यामुळे त्यांनी ही मदत थोडीशी तरी वाढवावी कारण या मदतीतून आमचे फेस्टिवल ला जाण्यायेण्याचा खर्च सुद्धा निघत नाही. या वेळी एलआयसी आणि झी टॉकीजनेकेलेल्या स्पॉन्सरशिपसाठी मी आभार मानतो आणि त्यांनी आणि इतर लोकांनी अशीच मदत केली तरच आम्हाला हा महोत्सव दरवर्षी करण्याची हिम्मत येईल. सर्व प्रेक्षकांनी चित्रपटगृह हाऊसफुल्लकेल्यामुळे मी सर्वांचा आभारी आहे “

 प्रमूख पाहुण्या मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुळकर्णी यांनी त्या अभिनय करत असलेला वेलकम होम या चित्रपटाची ओपनिंग फिल्म म्हणून निवड केली याबद्दल त्यांनीमहोत्सव कार्यकारणी चे आभार मानले.वेलकम होम ची संपूर्ण टीम यावेळी उपस्थित होती.

राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा कासव आणि “वेलकम होम” चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुखथनकर यांनी सांगितले की, ” २००४ मध्ये आशियाई चित्रपट महोत्सवात  दाखवलेल्या देवराईचित्रपटासाठी  अतुल कुलकर्णी यांना मिळालेला अवॉर्ड हा आमच्यासाठी आजही खास आहे . चित्रपट महोत्सवात ज्या प्रमाणे अनेक उत्तम चित्रपट एकत्र दाखवले जातात आणि  चित्रपटप्रेमी , चित्रपटसमीक्षक एकत्र बसून चित्रपट अनुभवतात ही पद्धत अतिशय उत्तम आहे कारण त्यामुळे सिनेमा पाहण्याची एक वेगळी भावना निर्माण होते . आणि चित्रपट  महोत्सव आयोजित करणाऱ्या टीम चेखरंच कौतुक आहे त्यांची या महोत्सव आयोजित करण्याची मेहनत भरपूर आहे. आज आमच्या चित्रपटाने या महोत्सवाचे उदघाटन होत आहे .  एक दिग्दर्शक म्हणून मला दडपण आले आहे आणिआशा करतो तुम्हा चित्रपट प्रेमींना आमचा चित्रपट आवडेल . “

१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मुंबईकर येथे प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळालेले चित्रपट व लघुपटांचा आस्वाद घेता येणार आहे. अर्जुन दत्ता या बंगालीदिग्दर्शकाचा ‘अव्यकतो  हा चित्रपट व शेखर बापू रानखांबेचा ‘पॅम्पलेट’ हा तीस मिनिटांचा  लघुपट आशियाई महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत. ‘अव्यकतो ही  इंद्र नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याचीआई साथी, वडील  कौशिक व  त्याचा मित्र रुद्र जे त्याचे लाडके काका आहेत. या तीन व्यक्तिरेखेच्या संमिश्र नातेसंबंधातून इंद्राची झालेली मानसिक जडणघडण आपल्याला ‘अव्यक्त’ मध्ये पाहायलामिळते.

शेखर बापू रानखांबेच्या ‘पॅम्पलेट’ मधील  हा एक स्वछंद मुलगा आहे. तो अभ्यासापेक्षा पतंग उडवण्यात अधिक रमतो. त्याच्या हाती एक व्यक्ती पॅम्पलेट देतं. ह्या पॅम्प्लेटच्या झेरॉक्स काढूनवाटल्या नाहीत तर तुझा घरावर अरिष्ट येईल. अशी भीती त्याचा मित्र त्याला घालतो. ह्या घटनेने भावविश्व ढवळून निघते, समाजातील अंधश्रद्धेवर ‘पॅम्प्लेट’ नेमकेपणाने बोट ठेवतं

या दोन कलाकृतींच्या बरोबरीने अनेक लघुपट महोत्सवात यशस्वी ठरलेले ‘गोची ‘( दिग्दर्शक प्रियाशंकर  घोष )’ प्रॉन्स’ (दिग्दर्शक स्वप्नील शेट्ये ) ‘द ड्रेनेज’ (दिग्दर्शक विक्रांत रामदास ) ‘परसेप्टिव्ह‘(दिग्दर्शक आदिनाथ कोठारे) ‘बेहरुपीया ‘(दिग्दर्शक पंकज बांगडे) ‘द  नॉट’  (दिग्दर्शक पंकज बांगडे ) हे पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मोबाईलच्या आसक्ती मुळे  संपर्क तुटलेल्या नायक (नंदू माधव) आपल्याला ‘द ड्रेनेज’ मध्ये आपल्याला पाहता येईल. ‘परसेप्टिव्ह’मधून आदिनाथ कोठारे ने धार्मिक सोहळ्यांकडे पाहण्याचा आगळावेगळा दृष्टिकोन चित्रित  केला आहे. ओली अंडरवेअर वाळवंताना चुकून घर मालकाच्या छपरावर पडल्यानंतर ती काढताना नायकाची झालेली ‘गोची’ आपल्याला मनमुराद हसू  येईल,  मुलालाशिकवायला हवे ह्या निर्णया पर्यन्त आलेला एक  मच्छिमार आपल्याला ‘प्रॉन्स ‘ मध्ये भेटेल.

यंदाच वर्ष ग. दि. माडगूळकर, पूल देशपांडे, व  सुधीर फडके ह्या दिग्ग्ज कलावंताचं जन्म शताब्दी वर्ष  आहे. ह्याच अवचित्य साधून १९५० साली प्रदर्शित झालेला ‘पुढचं पाऊल’ हा राजपरांजपेदिग्दर्शित चित्रपट महोत्सवातील सेंटर पीस म्हणून दाखवण्यात येणार आहे. ह्या चित्रपटाची पटकथा, गीते, ग. दि. माडगूळकर ह्यांनी  लिहिली असून सुधीर फडकेनी संगीत दिले आहे.  पूल देशपांडे वग. दि. माडगूळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. महोत्सवात इटलीचे स्पेगेटी वेस्टर्न, महिला दिग्दर्शक, स्पेक्ट्रम आशिया, इंडियन व्हिस्टा असे सेक्शन आहेत.

मोहम्मद रफी जयंतीनिमित्त ‘माधुर्य मधुरता’ शुक्रवारी

0
पुणे : स्वरसम्राट मोहम्मद रफी यांच्या जन्मदिनानिमित्त महक व म्युझिक इंडिया प्रस्तुत ‘माधुर्य मधुरता’ या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
ज्यांच्या गायनात माधुर्य आणि मधुरता आहे, अशा मोहम्मद रफी आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या युगुलगीतांची मैफल रंगणार आहे. शुक्रवार, दि. २१ डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल रंगणार आहे.
प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल आणि गफार मोमीन यांच्या जोडगोळीने रसिकांना आतापर्यंत मंत्रमुग्ध केलेले आहे. ‘माधुर्य मधुरता’मधूनही या दोघांना ऐकण्याची संधी पुन्हा एकदा पुणेकर रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन सईद खान करणार आहेत, तर मैफलीला आकार देणारे निवेदन संदीप पंचवाटकर करणार आहेत.

वैद्य पाटणकर दांपत्याची आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड

0
पुणे : पुण्यातील आरोग्यवर्धिनी चिकित्सालयाचे वैद्य डॉ. हरीश पाटणकर व डॉ. स्नेहल पाटणकर या दाम्पत्याची आठव्या जागतिक आयुर्वेद परिषदेसाठी निवड झाली आहे. अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॉन्व्हेंशन अँड एक्झिबिशन सेंटर येथे होणाऱ्या परिषदेत डॉ. पाटणकर दाम्पत्य ‘केस विकारांच्या निदानासाठी आधुनिक पद्धतीचा उपयोग व वापर’ या विषयावर प्रबंध सादर करणार आहेत. केशायुर्वेद या भारतातील पहिल्या आयुर्वेदीय हेअर टेस्टिंग लॅब व संशोधन केंद्रामार्फत डॉ. हरीश व डॉ. स्नेहल यांनी संशोधन केले आहे.
  
आयुष मंत्रालय, गुजरात सरकार आणि वर्ल्ड आयुर्वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या परिषदेत जगभरातून ५००० प्रतिनिधी सहभागी होत आहेत. तीस सत्रांत १५० पेक्षा अधिक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
बदलत्या काळात केसांना लावण्यासाठी बाजारपेठांमध्ये हजारो उपलब्ध उत्पादने येत आहेत. परंतु आपल्या केसांसाठी कोणते तेल पोषक आहे, हा प्रश्न सामान्य जनतेला नेहमीच पडलेला असतो. नव्या पिढीला आयुर्वेदाचे महत्व पटवून देण्यासाठी, तसेच आयुर्वेदिक पद्धतीने आधुनिक उपचारांद्वारे केसांच्या समस्या दूर करण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. पाटणकर दाम्पत्याने व्यक्त केला.

गहलोत मुख्यमंत्री, तर सचिन पायलट उपमुख्यमंत्री..राजस्थानातला सस्पेंस संपला

0

जयपूर – मुख्यमंत्रिपदावरून राजस्थानात दोन दिवसांपासून सुरू असलेला सस्पेन्स संपला आहे. अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री, तर सचिन पायलट उपमुख्यमंत्री होतील. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. औपचारिक घोषणा अद्याप बाकी आहे. यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यासोबत दोन तासांपेक्षा जास्त बैठक घेतली. बैठकीनंतर राहुल यांनी पायलट-गहलोत यांचा फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले- राजस्थानात एकजुटीचा रंग. तथापि, यापूर्वी गुरुवारी राहुल यांनी ज्योतिरादित्य सिंधिया आणि कमलनाथ यांच्यासह फोटो शेअर केला होता.

अशोक गहलोत- सर्वात मोठी ताकद
– दोन वेळा मुख्यमंत्री, गांधी कुटुंबाच्या तीन पिढ्या म्हणजेच इंदिरा, राजीव आणि राहुल यांच्यासोबत काम केले.
– गहलोत दोन वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 1998 ते 2003 आणि 2008 ते 2013 दरम्यान.
– 4 वेळा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री. दोन वेळा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत.
– गहलोत यांनी गुजरात, कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला नवे रूप दिले. निवडणुकीच्या रणनीतीवर काम केले.
– एकुणात अनुभवी चेहरा म्हणून पक्षात सर्वात पुढे आहेत.

सचिन पायलट का..
– तरुण नेते म्हणून ओळख. चांगले वक्ते आहेत.
– विपरीत परिस्थितीमध्येही प्रत्येक कार्यकर्त्यांला भेटून पक्षाला बळकटी दिली. सातत्याने संपर्कात राहिले.
– जेव्हापासून गादी सांभाळली आहे, तेव्हापासून पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजयच झाला होता.

15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018-19 स्पर्धेत गालाघर, सायबेज संघांची आगेकुच

0
पुणे- आयडीयाज्‌ अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट  2018-19 स्पर्धेत गालाघर संघाने अॅटॉस्‌ संघाचा तर सायबेज संघाने टाटा टेक्नोलॅजीज् संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. 
 
व्हिजन क्रिकेट अकादमी मौदान येथे झालेल्या सामन्यात निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांच्या बळावर गालाघर संघाने अॅटॉस्‌ संघाचा 5 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना अॅटॉस्‌  संघाने 20 षटकात 5 बाद 167 धावा केल्या. यात महेश भोसलेने नाबाद 43 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. 167 धावांचे लक्ष निखिल भुजबळच्या नाबाद 76 धावांसह गालाघर संघाने 18 षटकात 5 बाद 169 धावा करून सहज पुर्ण केले. गौरव बाजपैने नाबाद 45 धावा करून निखिलला सुरेख साथ दिली. नाबाद 76 धावा करणारा निखिल भुजबळ सामनावीर ठरला.
दुस-या सामन्यात हर्षल वाडकरच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर  सायबेज संघाने टाटा टेक्नोलॅजीज् संघाचा 6 गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना टाटा टेक्नोलॅजीज् संघाने 20 षटकात 8 बाद 134 धावा केल्या. यात  राकेश वाल्मिकीने 40 व कुमार वाल्हेकरने 35 धावा केल्या. हर्षल वाडकर व अभिषेक गोसावी यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. 134 धावांचे लक्ष प्रतिक पंडितच्या 36, संकेत ऐकलच्या नाबाद 33 व अविनाश माळीच्या नाबाद 32 धावांसह सायबेज संघाने 18.4 षटकात 4 बाद 135 धावा करून पुर्ण केले. 24 धावांत 3 गडी बाद करणारा हर्षल वाडकर सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी  
अॅटॉस्‌ – 20 षटकात 5 बाद 167 धावा(संदिप भागवत 21, विशाल स्लाथीया 22, वौभव पेडणेकर 30, महेश भोसले नाबाद 43, सुमेध मन्वर 21, शुबेंदू पांडे 2-27) पराभूत वि  गालाघर- 18 षटकात 5 बाद 169 धावा(निखिल भुजबळ नाबाद 76, शुबेंदू पांडे 22, गौरव बाजपै नाबाद 45, मंगेश सांगोडकर 3-14) सामनावीर- निखिल भुजबळ
गालाघर संघाने 5 गडी राखून सामना जिंकला. 
 
टाटा टेक्नोलॅजीज् – 20 षटकात 8 बाद 134 धावा(राकेश वाल्मिकी 40, कुमार वाल्हेकर 35, हर्षल वाडकर 3-24, अभिषेक गोसावी 3-24) पराभूत वि सायबेज- 18.4 षटकात 4 बाद 135 धावा(प्रतिक पंडित 36, संकेत ऐकल नाबाद 33, अविनाश माळी नाबाद 32, राकेश वाल्मिकी 2-17) सामनावीर- हर्षल वाडकर
सायबेज संघाने 6 गडी राखून सामना जिंकला. 

विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडणार – जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम

0

पुणे- तरुण वर्गापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवून त्‍यांच्‍यामध्‍ये सकारात्‍मक सक्षमता निर्माण करण्‍याची गरज आहे, असे प्रतिपादन करीत येत्‍या 1 जानेवारी रोजी विजयस्‍तंभ येथे होणारा अभिवादन कार्यक्रम शांततेत संपन्‍न होईल, असा विश्‍वास जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, उपमहापौर डॉ. सिध्‍दार्थ धेंडे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, ज्‍योती कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पखाले आदी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अन्‍यायग्रस्‍त समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी जीवनभर कार्य केले. त्‍यांनी कधीही हिंसेचा मार्ग अवलंबला नाही. देशाला सर्वोत्‍तम राज्‍य घटना देऊन सर्वसामान्‍य जनतेला न्‍याय मिळवून दिला. त्‍यांच्‍या विचार आणि वाणीमध्‍ये खूप मोठी ताकत होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्‍या विचारांवर विश्‍वास आणि श्रध्‍दा असणारे विजयस्‍तंभ येथे अभिवादन करण्‍यासाठी येत असतात. येथील 1 जानेवारीचा कार्यक्रम अत्‍यंत शांततेत पार पाडण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जनता यांच्‍या एकत्रित समन्‍वयातून हा कार्यक्रम यशस्‍वी होईल, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

अभिवानद कार्यक्रमासाठी मोठ्या संख्‍येने नागरिक येतील त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था राखणे आणि येणा-या नागरिकांना पार्कींग, पिण्‍याचे पाणी, शौचालयांची व्‍यवस्‍था आदी बाबी उपलब्‍ध होतील याची काळजी घेतली जाईल, असे जिल्‍हाधिकारी राम म्‍हणाले. अन्‍न-पदार्थांच्‍या स्‍टॉलवर भेसळयुक्‍त पदार्थ नसतील, याबाबत दक्षता घेण्‍याची सूचनाही त्‍यांनी केली. रस्‍ते दुरुस्‍ती, सीसीटीव्‍ही कॅमेरे, ड्रोन कॅमेरे, बॅरीकेड्स, वीजपुरवठा आदींबाबतही त्‍यांनी मार्गदर्शन केले.  25 हून अधिक रुग्‍णवाहिकांची सोय करण्‍यात येणार असून पिण्‍याचे पाणी, पार्कींग, रुग्‍णवाहिका याबाबतची माहिती उपलब्ध करुन दिली जाईल, असेही ते म्‍हणाले.

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस प्रशासनाने केलेल्‍या नियोजनाची माहिती दिली.  सोशल मिडीयावर बारकाईने लक्ष ठेवण्‍यात आले असून प्रतिबंधात्‍मक कार्यवाही चालू आहे. देशविघातक, समाजविघातक शक्‍ती कार्यरत असतात, जाती-जातींमध्‍ये भांडणे लागावीत हाच त्‍यांचा हेतू असतो, अशा शक्‍तींपासून आपण सावध रहायला हवे. प्रशासन त्‍यांच्‍यावर योग्‍य ती कारवाई करत आहे. प्रत्‍येक नागरिक हा पोलीस असतो असे नमूद करुन नागरिकांनी त्‍यांना काही नकारात्‍मक बाबी आढळून आल्‍यास प्रशासनाच्‍या निदर्शनास आणाव्‍यात, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

उपमहापौर डॉ. धेंडे यांनीही अभिवानद कार्यक्रम यशस्‍वी होण्‍यासाठी उपयुक्‍त सूचना केल्‍या.

प्रारंभी विविध संस्‍था, संघटना आणि व्‍यक्‍तींनी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा व्‍यक्‍त केल्या. यावेळी  विविध संघटना, पक्षांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.