Home Blog Page 3022

पुण्यात,महाराष्ट्रात भाजपाचा पराभव निश्चित – चंद्रशेखर आझाद उर्फ रावण

पुणे-मी ज्या राज्यांमध्ये गेलो तिथे भाजपाचा पराभव झाला आहे. आता पुण्यात आणि महाराष्ट्रात आलो आहे त्यामुळे महाराष्ट्रातही भाजपाचा पराभव निश्चित आहे असे भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद उर्फ रावण यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या महात्मा फुले वाड्याला आझाद यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी भाजपावर निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदीही २०१९ मध्ये सत्तेवर राहणार नाहीत असेही म्हटले आहे. फुले वाड्याला भेट दिल्यानंतर त्यांनी लाल महाल या ठिकाणी भेट दिली त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला.

एवढंच नाही तर मला भीमा कोरेगाव या ठिकाणी जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असेही आझाद यांनी म्हटले आहे. भीमा कोरेगावल मी जाणार आणि महाराष्ट्रात भीम आर्मी संघटना बळकट करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. त्याचप्रमाणे नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. माझा काहीही गुन्हा नसताना मला नजरकैदेत ठेवण्यात आलं. भीमा कोरेगाव या ठिकाणी दंगल घडवणारे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे मात्र खुलेआम फिरत आहेत. मला नजरकैदेत का ठेवलं? मी दहशतवादी आहे का? असाही प्रश्न आझाद यांनी विचारला.

तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता, CBI चा असा हा तपास

0

नाशिक- राज्यातील बहुचर्चित तेलगी बनावट स्टॅम्प घोटाळा खटल्यातील सर्व सात आरोपींचीपुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्‍यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी सोमवारी निकाल दिला. या प्रकरणाचा CBI कडे तपास होता.दरम्यान, देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा 2017 मध्ये मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्याची 2003 पासून सुनावणी सुरु होती.

न्यायाधीश देशमुख यांच्याकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. स्टॅम्प घोटाळ्याप्रकरणी 49 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली होती. एकूण 32 हजार कोटींहून अधिकचा हा घोटाळा आहे. इतर आरोपी रेल्वे सुरक्षा बलातील अधिकारी आणि कर्मचारी आहेत. भक्कम पुराव्याअभावी या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

सरिता राठी, आदित्य लोणारी आणि ‘बीस का लक’ शॉर्ट फिल्म यांचा झाला गौरव

0

पुणे :‘ब्लिस इक्विटी’तर्फे सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍यांचा प्रतिवर्षी वर्थनेस बिझनेस अँड एज्युकेशन अवॉर्ड – ‘वॉव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येतो. विविध क्षेत्रातील उद्योजक, कलाकार, दिग्दर्शक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक आणि राजकारणी यांसारख्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी पुण्यातील तीन पुरस्कारार्थी या सन्मानासाठी पात्र ठरले आणि त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये सरीता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन यांच्या सामाजिक संदेश देणार्‍या ‘बीस का लक’ या शॉर्ट फिल्मचा समावेश होता, अशी माहिती सचिन सूर्यवंशी यांनी दिली.

या पुरस्काराबाबत आणि त्यांच्या कार्याबद्दल त्यांनी सोमवार, दिनांक 31 डिसेंबर रोजी श्रमिक पत्रकार संघ येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी सरिता राठी, आदित्य लोणारी, नेविल भास्करन उपस्थित होते.

‘वॉव पुरस्कार’ विविध श्रेणीत देण्यात येतात. यामध्ये सरिता राठी यांना ‘एज्युकेटिंग इंडिया’, आदित्य लोणारी याला ‘महत्वाकांक्षी तरूण उद्योजक’ तर शॉर्ट फिल्म ‘बीस का लक’ ला ‘बेस्ट फिल्म ऑफ द इअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

सरीता राठी यांनी अ‍ॅबॅकसच्या माध्यमातून अनुकरणीय कौशल्याद्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शिक्षण सेवा दिल्याबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. २००६ सालापासून त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थी यांना अ‍ॅबॅकसचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या मते शिक्षकाला उत्तम प्रशिक्षण मिळाल्यास तो अनेक उत्तम विद्यार्थी घडवू शकतो. अ‍ॅबॅकसच्या प्रशिक्षणाने विद्यार्थी सक्रिय आणि समाजशील होतो. त्यांनी आत्तापर्यंत ५००हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थी प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले आहे.

आदित्य लोणारी हा एका शेतकर्‍याचा मुलगा असून, नगर जिल्ह्यातील शिर्डी येथे त्याचे छोटे गाव आहे. आपले गाव विकसित करण्याची त्याची तीव्र इच्छा आणि दृढनिश्चय आहे. या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने माहिती तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले आणि स्वत:ची ‘स्काय व्हरायटी सोल्युशन’ ही सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. आज या कंपनीच्या पुणे, नाशिक आणि औरंगाबाद येथे शाखा आहेत. त्याच्या या उत्कृष्ठ कामगिरीमुळे त्याच्या पालकांना त्यांच्या छोट्याश्या गावात आनंदी जीवन जगता येत आहे. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रयत्न आणि समर्पण यामुळे आपण नशीब आजमावू शकत नाही याविषयी भाष्य करणारी शॉर्ट फिल्म ‘बीस का लक’ ला या पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आले. नशीबवान होण्याच्या संलग्नक बाबींवर लक्षकेंद्रीत केल्याने नशीबवान होता येत नाही तर कठोर परिश्रम आणि प्रयत्नांवर लक्षकेंद्रीत केल्याने नशीब आजमावता येते. आयुष्य जगण्यासाठी कोणतेही शॉर्टकटस् नाहीत, असा विचार या शॉर्ट फिल्मच्या माध्यमातून नेविल भास्करन यांनी मांडला आहे.

‘विनर्स ऑफ वर्थनेस -वॉव अवॉर्ड भारतीय उपद्वीपमध्ये अग्रगण्य आहे. या पुरस्काराने भारतात फारच कमी कालावधीमध्ये प्रचंड लोकप्रियता प्राप्त केली आहे. वॉव अवॉर्ड सन्मान समाजात आपले योगदान दाखवण्याची संधी देणारे हे व्यासपीठ आहे. शोभा आर्य या ब्लिस इक्विटी’च्या संस्थापक आहेत.

अलाहाबाद बँक व एसबीआय लाइफ इन्शुरन्स यांनी जाहीर केली भागीदारी

0

कोलकाता: अलाहाबाद बँक ही भारतातील प्रमुख व सर्वात जुनी राष्ट्रीयीकृत बँक आणिएसबीआय लाइफ इन्शुरन्सही देशातील एक आघाडीची खासगी लाइफ इन्शुरन्स कंपनी यांनी ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक नियोजन सुविधा देण्याच्या हेतूने आज बँकाश्युरन्स करारावर सही केली.

देशातील सर्वात मोठ्या बँकाश्युरन्स भागीदारींपैकी एक असणाऱ्या या भागीदारीमुळे, अलाहाबाद बँकेच्या देशभरातील 3,238शाखा एसबीआय लाइफची संरक्षण, संपत्तीनिर्मिती व बचत उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करणार आहेत.यामुळे, ग्राहकांना त्यांच्या सर्व वित्तीय गरजा एकाच ठिकाणी पूर्ण करता येणार आहेत.

अलाहाबाद बँकेचेव्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सीएच. एस. एस. मल्लिकार्जुन राववएसबीआय लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौतियाल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या महत्त्वाच्या कराराबद्दल बोलताना, अलाहाबाद बँकेचेव्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन राव यांनीग्राहकांना एकाच ठिकाणी विविध लाइफ इन्शुरन्स उत्पादने उपलब्ध करण्याच्या आणि बँकेच्या नॉनइंटरेस्ट उत्पन्नास सुरुवात करण्याच्या बँकेच्या उद्दिष्टावर अधिक भर दिला.

या भागीदारीविषयी बोलताना, एसबीआय लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव नौतियाल यांनी सांगितले, ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी आमच्या बँकाश्युरन्स माध्यमामुळे मिळालेले यश विचारात घेता, अलाहाबाद बँकेबरोबरच्या भागीदारीबद्दल आम्ही अतिशय उत्सुक आहोत.ग्राहकांना आता एसबीआय लाइफची संरक्षण, संपत्तीनिर्मिती बचत उत्पादने सहज उपलब्ध होणार आहेत.यामुळे, ग्राहकांना सर्वांगीण आर्थिक नियोजन करणे शक्य होणार आहे. त्यांनी नमूद केले, इन्शुरन्स योजना सर्वसाधारण लोकांना सहजपणे मिळाव्यात, यासाठी आमचे वितरण जाळे महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि अलाहाबाद बँकेशी केलेल्या भागीदारीमुळे या दिशेने एक पाऊल टाकण्यात आले आहे.

 

संगीतामुळे मनाचा एक आयाम जागृत होतो – गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांचे प्रतिपादन

0
पुणे:“समग्र विश्‍व कसे चालते, याचा वेध घेण्याचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. त्यात संगीत कला ही एक सर्वात महत्वपूर्ण साधना आहे. भावना, बुध्दी, तर्क आणि भक्तीने याची अनुभूती घेता येऊ शकते. संगीतामुळेच मनाचा एक वेगळाच आयाम जागृत होतो,”असे प्रतिपादन प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांनी व्यक्त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेतर्फे एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी राजबाग, लोणी-काळभोर येथील विश्‍वराज बंधारा येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय ‘एमआयटी सांस्कृतिक संध्या’ संगीत महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध गायक प्रसिद्ध गायक श्रीनिवास भीमसेन जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी विश्‍वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका प्रा. ज्योती कराड-ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील राय, विश्‍वशांती संगीत कला अकादमीचे महासचिव श्री.आदिनाथ मंगेशकर, प्रा. सुनिता मंगेश कराड व एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉम मॅनेजमेंटचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्रीनिवास भीमसेन जोशी म्हणाले,“ संगीत हे जसे ईश्‍वर प्राप्तीचे एक साधन मानले जाते, तसेच, निखळ आनंद आणि चिंतामुक्त व्हावयाचासुध्दा तो एक उत्तम मार्ग आहे. येथे ज्ञानाची प्राप्ती करावयाची असते. असा संगीतमय कार्यक्रम हा निसर्ग रम्य ठिकाणी झाल्याने आपल्याला ईश्‍वर प्राप्तीची अनुभूति येते. अशा भव्य दिव्य परिसरात सदैव संगीत आणि ज्ञानसाधनेचे कार्य अविरत चालत रहावे.”
प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड म्हणाले,“संगीताच्या माध्यमातून शांतीकडे कसे पोहचता येईल ही विचारधारा घेऊन डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी हा महोत्सव सुरू केला. संपूर्ण विश्‍वात नववर्षाचा जल्लोष केला जातो. परंतू येथे भारतीय परंपरेला धरून नववर्षाचे स्वागत केले जाते. भारत देशात सर्व प्रकारच्या विचारधारा आहेत. त्यामुळे येथे पाश्‍चात्य आणि पौर्वात्य यांचा मिलाफ दिसून येतो. विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वयातून जगात सुख, शांती आणि समाधान प्राप्त करता येऊ शकते. या वर्षी भीमसेन जोशी आणि मंगेशकर घराण्याचा येथे मिलाफ दिसून येतो.”
प्रा.ज्योती कराड-ढाकणे म्हणाल्या, “सरत्या वर्षात प्रत्येकाला काही चांगल्या व वाईट गोष्टींचा अनुभव आला असेल. त्यामुळे नववर्षाचे स्वागत उत्साहाने करतांना येथील होम हवनात आपल्यातील वाईट गोष्टींची आहूती देऊन नवीन संकल्प सोडवा. या संगीत महोत्सावाच्या सुरूवातीच्या काळात येथील मेघडंबरीमध्ये देशातील सर्व प्रसिद्ध गायकांनी उपस्थिति दर्शवून आपली कला सादर केली. त्यावेळेस श्रोते नदीच्या काठावर बसून त्याचा आस्वाद घ्यायचेे. अशी संकल्पना डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी सुरू केली. हा कार्यक्रम देशातील अग्रणी आहे. त्याप्रमाणे येथे संगीत अकादमी चालत असल्यामुळे पुण्यातील दर्दी श्रोत्यांनी याचा आस्वाद घ्यावा.”
डॉ. सुनील राय म्हणाले,“ भारतात संगीताची मोठी परंपरा आहे. त्या परंपरेला जागविण्याचे काम सवाई गंधर्वच्या कार्यक्रमाद्वारे केले जात आहे. नववर्षाचे स्वागत पाश्‍चात देशांमध्ये विशिष्ठ पद्धतीने साजरे केले जाते. मात्र एमआयटी सांस्कृतिक संध्या कार्यक्रमाद्वारे सांस्कृतिक परंपरा रूजविण्यासाठी नववर्षाचे स्वागत केले जाते. भविष्यात युरोप आणि अमेरिकेत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करून नव वर्षाचे स्वागत करतील.”
आदिनाथ मंगेशकर यांनी आपले मनोगत व्यक्त केेले. प्रा. अशोक घुगे व प्रा. पायल शहा यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मिलिंद पांडे यांनी आभार मानले.
एमआयटी सांस्कृतिक संध्येची सुरुवात तुकाराम दैठणकर यांच्या शहनाई वादनाने झाली. श्रृती देवस्थळी, तेजस उपाध्ये व गोदावरीताई मुंडे यांनी आपली कला सादर केली.

भारुड कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

0
पुणे :भारतीय  विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे  सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत   आयोजित भारुडरत्न निरंजन भाकरे यांच्या  भारुड कार्यक्रमाला रविवारी चांगला प्रतिसाद मिळाला. .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम झाला.  भारतीय विद्या भवन चे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले.
माणसांनी नसत्या भानगडी करू नये ,व्यसनं करू नये म्हणून संतांनी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी भारूडं लिहिली असे सांगत निरंजन भाकरे यांनी आत्ताच्या पिढ्यांमधे
समाजात ज्या अनिष्ठ चाली रूढी व्यसनं सवयी आहे त त्यावर बोट ठेवत , आधुनिक दाखले देत वासुदेव, बुरगुंडा,बहुरुपी व नंदी हे काही भारूड प्रकार सादर केले. आज शास्त्रीय प्रथा मागे पडल्यात , अशा अनेक बदलल्या आहेत. सामाजिक चाली,परंपरांवर भाकरे यांनी आपल्या भारूडातून नर्म विनोदाद्वारे बोट ठेऊन आधुनिक भारुड सादर केले. भाकरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन माधुरी कुलकर्णी यांनी केले.
 भारतीय विद्या  भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६६ वा कार्यक्रम होता . हा कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला होता.

वाहतूक सुरक्षा विषयक १० हजार शुभेच्छापत्रांचे वाटप करुन नववर्षाचे स्वागत !

0
पुणे :भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  अँड आंत्रप्रुनरशिप ( आयएमईडी ) च्या  राष्ट्रीय सेवा योजना ( एनएसएस ) विद्यार्थ्याकडून  नववर्षाचे स्वागत करण्यासाठी  वाहतूक सुरक्षा विषयक शुभेच्छापत्रांचे वाटप वाहतूक पोलिस व नागरिकांना करण्यात आले.
३१ डिसेंबर रोजी सकाळी शहरातील विविध ट्रॅफीक सिग्नल्सना उभे राहून  २०० विद्याथ्र्यांनी १० हजार  शुभेच्छापत्रे व ५ हजार  चॉकलेट देऊन वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली.
आयएमईडी ‘ चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी या उपक्रमाचे उद्घाटन कोथरूड डेपो येथे केले.डॉ. अजित मोरे, डॉ.धापटे, डॉ. विजय फाळके, डॉ. भारती जाधव तसेच  राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.

पाण्याच्या पुनर्वापरासाठी गृहप्रकल्पांना ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करा-आबा बागुल

0
पुणे -आगामी काळात पुण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे, त्यामुळे आतापासून नियोजन करण्यासाठी उपाययोजना आवश्यक असून त्यासाठी ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प काळाची गरज आहे. त्यामुळे गृहप्रकल्पांना ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प बंधनकारक करावे आणि पाणी बचत करणाऱ्या गृहप्रकल्पांना सवलती देण्याबरोबरच पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करावे अशी मागणी माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी आबा बागुल यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे .
याबाबत आब बागुल म्हणाले कि,  शहरातील पुणेकरांना पाणी कपातीला वारंवार सामोरे जावे लागत आहे. शहराला  पाणी किती ? शेतीला किती ? यावरून होणाऱ्या वादात पुणेकरांचे हाल होत आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाणीसाठा हे लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन चोख होणे आवश्यक आहे. त्यातही पाणीबचतीला प्राधान्य देण्यासाठी उपाययोजना आवश्यकही  आहेत असेही आबा बागुल यांनी नमूद केले.
पाण्याचे स्रोत शोधणे हे जसे आवश्यक  आहे तसे  पाण्याच्या पुनर्वापराला प्राधान्यही महत्वाचे आहे. त्यानुसार प्रत्येक गृहप्रकल्पाला ग्रे -वॉटर प्रक्रिया प्रकल्प सक्तीचे करणे आवश्यक आहे. अंघोळीचे आणि स्वयंपाकाच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी अन्य वापरासाठी उपलब्ध होईल. परिणामी पिण्याच्या पाण्याची बचतही होईल आणि खऱ्या अर्थाने पाण्याचे नियोजन होईल. त्यासाठी शहरातील गृहप्रकल्पामध्ये ग्रे वॉटर प्रक्रिया प्रकल्प उभारून  ७० टक्के पाण्याचा  पुर्नवापर करणे बंधनकारक करावे.या प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रोत्साहन म्हणून गृहप्रकल्पाना सवलत तसेच वॉटर बचत  सोर्स पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करावे. जेणेकरून पाण्याची बचत, पुर्नवापराला चालना सहजशक्य होईल.असा प्रस्ताव पालिका प्रशासनाला दिला आहे असेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी स्पष्ट केले.    

सारा अली खान आणि ईशान खत्तर बनले ‘टॉप डेब्यूंटांट ऑफ दि इयर’

0

सध्या सारा अली खानची फिल्म सिम्बा ब्लॉकबस्टर झाल्याची चर्चा असतानाच स्कोर ट्रेंड्स इंडियाकडून सारा अली खानला दूहेरी आनंद मिळालाय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या डेब्यूटांट चार्टवर सारा सर्वाधिक लोकप्रिय डेब्यूटांट ऑफ दि इयर बनली आहे. एकिकडे सारा अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असल्याचे समोर येतेय. तर दूसरीकडे अभिनेत्यांमध्ये ईशान खत्तर जास्त लोकप्रिय आहे.

करण जोहरच्या ‘ध़डक’मधून बॉलीवूडमध्ये डेब्यू करणा-या जान्हवी कपूरला मागे टाकत साराने पहिले स्थान पटकावले आहे. बॉलीवूडमध्ये 2018मध्ये पदार्पण करणा-यांच्या लिस्टमध्ये सारानंतर जान्हवीचाच दूसरा क्रमांक आहे.

2018 मध्ये साराच्या केदारनाथ आणि सिम्बा ह्या दोन फिल्म्स रिलीज झाल्या. तर ईशानचेही बिय़ॉन्ड दि क्लाउड्स आणि धडक हे दोन चित्रपट रिलीज झाले होते.

बॉलीवूड अभिनेत्रींच्या 2018च्या रँकिंगमध्ये डिजिटल न्यूज़मध्ये साराचा तिसरा क्रमांक लागतो. तर न्यूज़पेपर रँकिंगमध्ये सारा दूस-या स्थानावर आहे. वायरल न्यूज़ रँकिंगमध्ये ती पाचव्या पदावर आहे. तर साराची प्रतिस्पर्धक मानली जाणारी जान्हवी डिजिटल न्यूजमध्ये नवव्या क्रमांकांवर आहे. न्यूजपेपर रँकिंगमध्ये दहाव्या आणि वायरल न्यूज रँकिंगमध्ये सहाव्या स्थानावर आहे.

अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे  ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल म्हणतात, “सारा आणि जान्हवी दोघींच्या पहिल्या सिनेमाने भरपूर लोकप्रियता मिळवली नव्हती. मात्र साराच्या बाबतीत तिच्या दूस-या सिनेमाने ही कसर भरून काढली. साराची दूसरी फिल्म सिम्बाच्या प्रमोशनने साराच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली. सोशल प्लेटफॉर्म, वर्तमानपत्र आणि वायरल न्यूज़ रँकिंगमध्ये साराची लोकप्रियता सिनेमाच्या रिलीजच्या सूमारास वाढलेली दिसून आलीय. ”

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

स्कायबस मेट्रोपेक्षा पाच पटीने स्वस्त-नितीन गडकरी

0

औरंगाबाद- स्कायबस मेट्रोपेक्षा पाच पटीने स्वस्त असल्याचे स्पष्ट करत .. देशात प्रथमच स्कायबसने प्रवास शक्य होणार आहे. ही स्काय बस प्रायोगिक तत्त्वावर सर्वप्रथमच औरंगाबादमधून धावेल. केंद्रीय भूपृष्ठ व जलवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे आढावा बैठकीत ही घोषणा केली. वाळूज ते जालना अशा ८५ किमी मार्गासाठी गडकरी यांनी ही स्कायबस सुचवली. मेट्रोच्या तुलनेत हा खर्च कमी असल्याचे ते म्हणाले.

गडकरी रविवारी एका लग्नसमारंभासाठी औरंगाबादेत होते. तत्पूर्वी त्यांनी सायंकाळी विभागीय आयुक्तालयात मराठवाड्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गांचा आढावा घेतला. या वेळी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

स्कायबस मेट्रोपेक्षा स्वस्त..
वाळूज-जालना जोडण्यासाठी मेट्रो द्यावी अशी मागणी आ. अतुल सावे यांनी केली होती. याचा उल्लेख करत गडकरी म्हणाले, मेट्रोचा खर्च २५० कोटींवर आहे. मी ऑस्ट्रेलियात जी स्कायबस पाहिली ती अवघ्या ५० कोटींत होईल. डॉफेल मेअर या ऑस्ट्रेलियन व रॉबॅकस या भारतीय कंपनीचे अधिकारी औरंगाबादला १६ जानेवारीला सादरीकरण करतील.

अटलजींच्या काळातही काेकणात प्रकल्प उभारण्याची झाली हाेती तयारी, मात्र १० वर्षांत गुंडाळण्याची नामुष्की

तत्कालीन पंतप्रधान अटलजींच्या कार्यकाळात २००३ मध्ये सर्वप्रथम काेकणात स्कायबस प्रकल्प मंजूर झाला हाेता. मात्र पात्र कंपनी पुढे न आल्याने व वाढीव खर्च न झेपल्याने सुरू हाेण्यापूर्वीच २०१३ मध्ये हा प्रकल्प गुंडाळण्याची नामुष्की ओढवली. प्राथमिक चाचण्यांनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला हाेता. तरीही गाेव्याच्या मडगावमध्ये १० मीटर उंचीवर १.६ मीटरचा ट्रॅक व दाेन एसी काेच तयार केले हाेते. मात्र ५० काेटी खर्च व्यर्थ गेला. या प्रकल्पातील तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आणखी १०० कोटी खर्च लागेल. ताे झेपत नसल्याचे कोकण रेल्वेचे तत्कालीन एमडी भानुप्रकाश तायल म्हणाले हाेेते.

‘भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक संबंध जुनेच-उद्धव ठाकरे

0

पुणे – भाजप-राष्ट्रवादीचे अनैतिक राजकीय संबंध जुनेच असून महाराष्ट्रातील सध्याच्या सरकारचा जन्मच मुळात या संबंधांतून झाला आहे. अहमदनगरमधील नव्या पॅटर्नमुळं फक्त ते उफाळून आले इतकेच,’ अशी जहरी टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
अहमदनगर महापालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला ‘कात्रजचा’ घाट दाखवून भाजपनं राष्ट्रवादीच्या साथीनं सत्ता मिळवली आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये संताप आहे. शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून उद्ध ठाकरे यांनी आज या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. ‘बारा महिने तप केलं अन् गाढवासंगं पाप केलं…’ या कवितेच्या ओळींचा आधार घेऊन उद्धव यांनी भाजप, राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे…

1)राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर नगरला भाजपचा महापौर, उपमहापैर बसला आहे. राष्ट्रवादीने हा पाठिंबा बिनशर्त दिल्यामुळे दोघांचेही खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे पुन्हा दिसून आले

2)२०१४ साली याच राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी असाच बिनशर्त पाठिंबा देऊ केला होता. म्हणजे भाजप व राष्ट्रवादीचे हे लफडे जुनेच आहे व आमचे कोणतेही अनैतिक संबंध नाहीत असे ते उगाच सांगत असतात. यानिमित्ताने दोघेही नागडे झाले आहेत व महाराष्ट्र त्यांच्यावर हसत आहे.

३)विधानसभा निवडणुकीनंतर बिनशर्त पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीने सिंचन घोटाळ्यातील त्यांच्या पुढार्‍यांना कवचकुंडले मिळवली व आता नगर महापालिकेत पाठिंबा देऊन केडगाव खून प्रकरणातील स्वतःच्या आमदारांना साफ करून घेतले. ही एक प्रकारे सौदेबाजीच म्हणावी लागेल.

३)एका बाजूला म्हणायचे शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. दोघांची विचारधारा हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होता कामा नये व दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादीशी अनैसर्गिक, अनैतिक संबंध ठेवून सत्ताभोग घ्यायचा. खरी युती हिंदुत्ववादाशी नसून भ्रष्टवादाशी आहे हे राष्ट्रवादीशी संबंध ठेवून भाजपने सिद्ध केले आहे.

4)कोडगेपणाचा कळस असा की, भाजपचे (‘ईव्हीएम गडबड’ फेम) मंत्री गिरीश महाजन म्हणतात, राष्ट्रवादीचा पाठिंबा आम्ही विकासासाठी घेतला. मग तुमचे मुख्यमंत्री सिंचन घोटाळ्यातील आरोपींना ऊठसूट तुरुंगात पाठवण्याच्या धमक्या देतात ती सर्व जुमलेबाजीच म्हणावी काय?

5)नगरमध्ये त्यांना ईव्हीएम घोटाळे करणे जमले नाही. कारण हवा शिवसेनेची होती व ती स्पष्ट दिसत होती. भाजप खासदारांचे पुत्रही त्यांच्या घरच्या मैदानात शिवसेनेकडून पराभूत झाले.

6)नगरचे चित्र असे आहे की, सासरा भाजपात, तर जावई राष्ट्रवादीत, हे दोघे एकत्र आले. राष्ट्रवादी व भाजपचे लफडे नव्याने समोर आले. आता म्हणे राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांवर कारवाई होणार आहे. हे सर्व ढोंग आहे.

7)राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार किंवा त्या पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांना नगरमधील भाजप-राष्ट्रवादीच्या या ‘प्रकरणा’विषयी जराही कल्पना नव्हती असे आता सांगितले जात आहे. शरद पवार यांना माहिती होती की नाही हे त्यांचे त्यांनाच माहीत; पण नगरमधील ही ‘लोकशाही’ उद्या ‘बेबंदशाही’ होऊ शकते.

8) या निवडणुकीत काँग्रेस पक्षही तटस्थ राहिला म्हणे. राधाकृष्ण विखे-पाटलांचा हा जिल्हा; पण त्यांचेही आतून कीर्तन वरून तमाशा असेच सुरू असते. राष्ट्रवादीच्या पायात त्यांचीही टांग आहेच. भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी युतीचा हा नवा ‘नगर पॅटर्न’ कुठपर्यंत जातोय ते पाहायचे.

लिफ्ट वापरणार नाही -जिण्याचा वापर करणार -महापौर मुक्ता टिळकांचा नव्या वर्षासाठी संकल्प

0
पुणे :महापौर मुक्ता टिळक यांनी  जुन्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरक सवयी पुन्हा अंगीकारल्या पाहिजेत असे सांगत लिफ्ट ऐवजी जिन्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प आज येथे जाहीर केला.
नव वर्ष सुरु होताना  पर्यावरणस्नेही  जीवनशैलीचा संकल्प मांडणाऱ्या  ‘शाश्वत जीवनशैली ‘ विषयावरील  वनराई वार्षिक विशेषांकाचे ३० डिसेंबर रोजी सायंकाळी प्रकाशन माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते झाले.
ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या  कार्यक्रमाला  महापौर मुक्ता टिळक  ,महाराष्ट्र  साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा . मिलिंद जोशी  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित  होते .  ‘वनराई ‘ चे अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी स्वागत केले .
हा कार्यक्रम वनराई च्या ‘इको ‘ सभागृह (मित्रमंडळ ,पर्वती, पुणे ) येथे झाला.
डॉ . एम . एस .स्वामिनाथन ,डॉ . माधव गाडगीळ ,डॉ . हेमा साने ,डॉ . भूषण पटवर्धन ,गीता अय्यंगार इत्यादी मान्यवरांचे लेख या वार्षिक विशेषांकात आहेत . ‘वनराई ‘ चे अध्यक्ष रवींद्र धारिया हे वनराई मासिकाचे संपादक असून अमित वाडेकर हे कार्यकारी संपादक आहेत .
यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून  ‘  नववर्षाचा पर्यावरणस्नेही संकल्प ‘ मांडला.   तसेच पर्यावरण विषयक लेखन करणाऱ्या ज्येष्ठ मान्यवरांचा सत्कारही श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘ वृक्षराजी कमी होत असल्याने पर्यावरण आणि मानवी जीवन धोक्यात आले आहे. प्रत्येकाने वृक्ष लावले पाहिजेत आणि वाढवले पाहिजेत. अंत्यसंस्काराला लाकडे लागतात, म्हणून जबाबदारीने झाडे लावली पाहिजेत. देवराया वाचवल्या पाहिजेत.
 ‘ रोजच्या कामात कागदाचा वापर कमी केला तरी पर्यावरणाचे रक्षण प्रत्येकाला करता येईल. मी स्वतः कागदाचा कमीत कमी वापर करतो. जमेल तसा पुनर्वापरही करतो. ‘ असे श्रीनिवास पाटील यांनी सांगितले. पुणेकरांनी पाणी काटकसरीने आणि काळजीपूर्वक  वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वृक्षसंपदा वाढविण्याचे प्रयत्न वनराई ‘ ने प्रारंभीपासून केले आहेत. ते कौतुकास्पद आहे., असेही ते म्हणाले.
रवींद्र धारिया यांनी प्रास्ताविकात वनराईच्या कार्याची आणि ‘शाश्वत जीवनशैली ‘ या विशेषांकाची माहिती दिली. शाश्वत विकास हेच वनराईच्या कामाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगीतले. जवळच्या अंतरासाठी दुचाकीऐवजी सायकल चालविण्याचा संकल्पही त्यांनी आपल्या भाषणात सांगीतला.
महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या पुण्यात २५  इलेक्ट्रॉनिक बस २६ जानेवारीला कार्यान्वित होत आहेत. अशा ३०० बसचे उद्दीष्ट आहे. पुण्याच्या पर्यावरणासाठी सायकलींचा वापर वाढविणे आवश्यक आहे. जुन्या जीवनशैलीतील पर्यावरणपूरक सवयी पुन्हा अंगीकारल्या पाहिजेत. लिफ्ट ऐवजी जिन्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘ पुणेकरांना ठाम मत असते. त्यांनी शाश्वत जीवनशैली साठी पर्यावरणपूरक सवयी साठी ठाम मत केले पाहिजे.
उल्हास पवार यांनी आपल्या भाषणात विशेषांकाचे व वनराईच्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यकारी संपादक अमित वाडेकर यांनी ‘ शाश्वत जीवनशैली ‘ अंक प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली.वनराई ‘ चे विश्वस्त रोहिदास मोरे यांनी आभार मानले

‘प्लास्टिकला नाही म्हणा’ संकल्पनेवर आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा

0
पुणे : ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ अर्थात ‘गो-ग्रीन से नो टू प्लास्टिक’ या संकल्पनेवर येत्या ५ जानेवारी २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. पुण्यात मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कुलमध्ये सकाळी ९ ते ११ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे. पुण्यातील सुपरमाईंड फाऊंडेशन, रोटरी क्लब ऑफ युवा, नटराज निकेतन, नागपूर व सामवेद इंटरनॅशनल या संस्थांनी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. सुपारीच्या पानांपासून बनवलेल्या प्लेटवर ही चित्रे काढायची आहेत, अशी माहिती आयोजकांनी नुकतीच दिली.
प्रसिद्ध कार्टूनिस्ट चारुहास पंडित पहिले चित्र काढून स्पर्धेची सुरवात करणार आहेत. आमदार मेधा कुलकर्णी, पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशन, सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडके, ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल यांच्यासह पुण्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्लास्टिक बंदीबाबत जागृती करण्यासाठी कागदाऐवजी सुपारीच्या पानापासून बनविलेल्या प्लेटवर ही चित्रे काढण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चित्रकला स्पर्धा जगातील आगळीवेगळी स्पर्धा ठरणार आहे. एशिया बुक ऑफ रेकॉर्ड व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे या स्पर्धेची विशेष दखल घेण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी येणार्‍या शालेय विद्यार्थी स्पर्धकांना विनामूल्य प्लेट देण्यात येणार आहेत.
माँटेसरी ते ज्येष्ठ नागरिक या गटातील सर्वजण भाग घेऊ शकतात. ही स्पर्धा भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, मध्यप्रदेश, छत्तीसगड यासह देशातील अनेक प्रमुख शहरांच्या ठिकाणी एकाच वेळी घेण्यात येणार असून, सहभागी होणार्‍या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सर्व शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागासाठी प्रोत्साहित करावे व ‘प्लास्टिकचा वापर टाळा व त्या ऐवजी नैसर्गिक घटकांचा वापर करा’ असा संदेश पोहचवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सहभागी शाळांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी 9049992809/7 या क्रमांकांवर किंवाwww.supermindfoundation.org या संकेतस्थळावर नावनोंदणी करता येईल, अशी माहिती सुपरमाईंड फाउंडेशन संस्थेच्या मंजुषा वैद्य व सामवेद इंटरनॅशनलचे मुकुंद पात्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रोटरी क्लब युवाचे श्रीकांत जोशी व सुपरमाईंड फाउंडेशच्या दया कुलकर्णी उपस्थित होत्या.

रामदास आठवले यांची भीमा कोरेगाव येथे अभिवादन सभा-वाहनांना टोलमाफ

0
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहर यांच्या वतीने शौर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव विजयस्तंभाजवळील पेरणे फाटा येथे जाहीर अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, दि. १ जानेवारी २०१९ रोजी दुपारी ३.०० वाजता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले अभिवादन सभेला मार्गदर्शन करणार आहेत, असे पक्षाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव म्हणाले, “शौर्य दिवसाचे औचित्य साधून भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाजवळ दरवर्षी अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या वर्षी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा ही अभिवादन सभा पेरणे फाटा टोलनाक्याजवळील परिसरात होणार आहे. येथे २० हजार स्क्वेअर फूटाचा मंडप घालण्यात आला आहे. पुण्यातून १०० बसेसची व्यवस्था पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. तुळापूर नाक्यापासून प्रशासनाने ठेवलेल्या पीएमपीएलच्या बसने सभास्थळी पोहोचावे. त्याचबरोबर भीमा कोरेगाव परिसरातील वातावरण सुरक्षित राहावे, यासाठी पक्षाचे अनेक स्वयंसेवक त्यादिवशी कार्यरत राहणार आहेत.”
या अभिवादन सभेला रिपाईचे राष्ट्रीय सहसचिव अविनाश महातेकर, केंद्रीय कोषाध्यक्ष एम. डी. शेवाळे, केंद्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष भुपेश थुलकर, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचे चेअरमन राजाभाऊ सरोदे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव,  रिपाई नेते परशुराम वाडेकर, हनुमंत साठे, महेश शिंदे, चंद्रकांता सोनकांबळे, सूर्यकांत वाघमारे, अशोक कांबळे, ऍड.आयुब शेख, अशोक शिरोळे, बसवराज गायकवाड, संजय सोनवणे, शैलेश चव्हाण, महिपाल वाघमारे यांच्यासह राज्यभरातील रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 
आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ
भीमाकोरेगाव येथे  १ जानेवारी रोजी शौर्यदिनानिमित विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या लाखो आंबेडकरी जनतेची भावना लक्षात घेऊन रामदास आठवले यांच्या सूचनेनुसार वाहनांना टोल माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांना टोलमाफ होणार आहे.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे कोल्हापूर संघाला विजेतेपद

0

पुणे : महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसऱ्यांदा मान मिळविला. प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला.

स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर शनिवारी (दि. 29) रात्री 7 वाजता तीन दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक 38 गुण मिळविणाऱ्या कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांच्याहस्ते हा करंडक कोल्हापूर संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनी सुद्धा टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत कोल्हापूर संघाचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार (पुणे), श्री. अनिल भोसले (कोल्हापूर), श्री. सुनील पावडे (बारामती), श्री.भूजंग खंदारे (मुख्यालय), श्री. शंकर तायडे (गुणवत्ता नियंत्रण) अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार, अंकुर कावळे, भाऊसाहेब इवरे, वादिराज जहागिरदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेत्या व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. कमलाकर चौधरी व सौ. मृदुला शिवदे यांनी केले व सौ. सारिका सातपुते यांनी आभार मानले.

राज्यातील 16 परिमंडलाचे औरंगाबाद (जळगाव), लातूर (नांदेड), कल्याण (नाशिक), सांघिक कार्यालय (भांडूप व रत्नागिरी), नागपूर (चंद्गपूर व गोंदिया), अकोला (अमरावती), पुणे (बारामती) व कोल्हापूर अशा 8 संयुक्त संघांतील 592 पुरुष व 176 महिला असे एकूण 768 खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेतील विविध सामन्यांचे अंतिम निकाल पुढीलप्रमाणे.

सांघिक खेळांचे अंतिम निकाल – अनुक्रमे विजेता व उपविजेता : क्रिकेट – कल्याण व नागपूर संघ, व्हॉलिबॉल – पुणे व कोल्हापूर संघ, कबड्डी – सांघिक कार्यालय व कोल्हापूर संघ, बॅडमिंटन – नागपूर व कोल्हापूर संघ, टेबल टेनिस – सांघिक कार्यालय व नागपूर संघ, मैदानी स्पर्धा – कोल्हापूर संघ व संयुक्तपणे औरंगाबाद – पुणे संघ, कुस्ती – कोल्हापूर व पुणे संघ, 4 बाय 100 रिले – पुरुष गट पुणे व सांघिक संघ, महिला गट – सांघिक कार्यालय व नागपूर संघ.

वैयक्तिक खेळांचे अंतिम निकाल (कंसात संघ) -अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे – 100 मीटर धावणे – पुरुष गट – 1) गुलाबसिंग वसावे (पुणे) व शेख जाकिर अली (लातूर), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व सरिता सरोटे (नागपूर), 200 मीटर धावणे – पुरुष गट – संकेत वाकडे (औरंगाबाद) व महेंद्र पाटील (नागपूर), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व सरिता सरोटे (नागपूर), 400 मीटर धावणे – पुरुष गट – गुलाबसिंग वसावे (पुणे) व विराज कोमटेकर (सांघिक), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व श्वेतांबरी अंबाडे (नागपूर), 800 मीटर धावणे – पुरुष गट – अरविंद कोठेकर (सांघिक कार्यालय) व मोहन मोरे (कल्याण), महिला गट – प्रिया पाटील (सांघिक कार्यालय) व पुजा ऐनापुरे (कोल्हापूर), उंच उडी – पुरुष गट – चेतन केदार (औरंगाबाद) व महादेव जाधव (कोल्हापूर), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर) व अश्विनी देसाई (कोल्हापूर), लांब उडी – पुरुष गट – नीलेश वैद्य (अकोला) व शुभम निंबाळकर (कोल्हापूर), महिला गट – सरिता सरोटे (नागपूर) व माया येवंडे (पुणे), गोळा फेक – पुरुष गट प्रवीण बोरावके (पुणे) व हणमंत कदम (कोल्हापूर), महिला गट – पुजा ऐनापुरे (कोल्हापूर) व स्नेहा सपकाळ (सांघिक कार्यालय), थाळी फेक – पुरुष गट – तुषार अहेर (कल्याण) व महादेव मेटकरी (कोल्हापूर), महिला गट – हिना कुंगे (सांघिक कार्यालय) व पुजा ऐनापुरे (कोल्हापूर), भाला फेक – पुरुष गट – भारत उकालकर (औरंगाबाद) व रघुनाथ परदेशी (सांघिक कार्यालय), महिला गट – अश्विनी जाधव (पुणे) व सरिता सरोटे (नागपूर), बॅडमिंटन – पुरुष एकेरी – भारत वसिष्ठ (कल्याण) व पंकज पाठक (लातूर), पुरुष दुहेरी – भारत वसिष्ठ – प्रशांत चव्हाण (लातूर) व प्रफुल्ल लांडे-प्रशांत काकडे (नागपूर), महिला एकेरी – अनिता कुलकर्णी (पुणे) व प्रज्ञा वंजारी (नागपूर), महिला दुहेरी – वीणा सगदेव-मनीषा चोक्सी (नागपूर) व कमलरुख दारुखानवाला-निशा पाटील (पुणे), टेबल टेनिस – पुरुष एकेरी – राजेश चांदणे (कोल्हापूर) व रितेश सव्वालाखे (नागपूर), पुरुष दुहेरी – रितेश सव्वालाखे – प्रमोद मेश्राम (नागपूर) व सागर मटकरी – बी. बी. खंदारे (सांघिक कार्यालय), महिला एकेरी – छाया कांबळे (सांघिक कार्यालय) व वंदना देवपुजारी (नागपूर), बुध्दीबळ – पुरुष गट – नीलेश बनकर (नागपूर) व सौरभ माळी (अकोला), महिला गट – ऋुतुजा तारे (पुणे) व रश्मी पाटील (कोल्हापूर) कॅरम – पुरुष एकेरी – अनंत गायत्री (सांघिक कार्यालय) व अनिकेत बैसारे (नागपूर), पुरुष दुहेरी – अनंत गायत्री – विनोद गोसावी (सांघिक कार्यालय) व सुधीर पाटील – अनिकेत बैसारे (नागपूर), महिला एकेरी – पुष्पलता हेडाऊ (नागपूर) व तेजस्वी गायकवाड (सांघिक कार्यालय), महिला दुहेरी – तेजस्वी गायकवाड – प्रियांका उबाळे (सांघिक कार्यालय) व विजया माळी – स्नेहल घारगे (कोल्हापूर), ब्रिज– उल्हास लिमये- प्रशांत गोंधळेकर (सांघिक कार्यालय) व वैभव थोरात-एम. आर. बांधे (नागपूर), टेनिक्वाईट – महिला एकेरी – प्रियांका उगले (सांघिक कार्यालय) व शितल नाईक (पुणे), महिला दुहेरी – प्रिया पाटील – सायली कांबळे (सांघिक कार्यालय) व मंजुषा पालकर-स्नेहल घारगे (कोल्हापूर), कुस्ती – 57 किलो – गोरख रंगे (कोल्हापूर) व आकाश लिंभोरे (पुणे), 61 किलो – विनोद गायकवाड (अकोला) व सतीश म्हात्रे (कल्याण), 65 किलो – राजकुमार काळे (पुणे) व कैलास घोलवे (नागपूर), 70 किलो – चंद्रकांत दरेकार (पुणे), ज्योतिबा आऊलकर (कोल्हापूर), 74 किलो – संदीप नेवारे (अकोला) व जयकुमार तळेगावकर (लातूर), 79 किलो – युवराज निकम (कोल्हापूर) व महादेव दहिफळे (लातूर), 86 किलो – संदीप सावंत (कोल्हापूर) व महादेव कोसरे (नागपूर), 92 किलो – हसनुद्दिन शेख (अकोला) व शशिकांत कुंभार (कोल्हापूर), 97 किलो – प्रमोद ढेरे (कोल्हापूर) व महेश कोळी (पुणे) आणि 125 किलो – हणमंत कदम (कोल्हापूर) व दीपक गुंड (कल्याण).