Home Blog Page 300

सोनी इंडिया तर्फे BRAVIA 2 II टेलिव्हिजन सिरीजसह 4K एंटरटेनमेंटच्या नव्या युगाचा आरंभ

नवी दिल्ली: सोनी इंडियातर्फे अपग्रेड करण्याची इच्छा असलेल्यांकरता मनोरंजनाचा अनुभव
उंचावण्यासाठी डिझाइन केलेले 4K अल्ट्रा HD LED डिस्प्ले तंत्रज्ञान असलेली आपली सर्वात अलिकडील
नाविन्यपूर्ण BRAVIA 2 II सिरीज आज सादर करण्यात आली. Google TV सह एकत्रित ही सिरिज वापरकर्त्यांना
सहजपणे अॅप्स, स्ट्रीमिंग सेवा आणि लाइव्ह TV चॅनेल्सची विस्तृत श्रेणी त्यांच्या पसंतीनुसार वापरण्याची
परवानगी देते. सोनीची नवीन BRAVIA 2 II सिरीज 108 सेमी (43), 126 सेमी (50), 139 सेमी (55), 164
सेमी (65) आणि 189 सेमी (75) स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध आहे. यात X1 पिक्चर प्रोसेसर असून तो प्रगत
अल्गोरिदम वापरून कोलाहल कमी करतो आणि तपशील वाढवतो. आणखी स्पष्ट 4K सिग्नलसह, तुम्ही जे काही
पाहता ते खऱ्या 4K रिजोल्यूशनजवळ जाते. Live Color तंत्रज्ञानाने हे तेजस्वी रंगांनी समृद्ध आहे.
नवीन BRAVIA 2 II 4K टेलिव्हिजन तुम्हाला आश्चर्यकारक 4K दृश्य अनुभवायला देते. ते वास्तविक जगातील
तपशील आणि टेक्शचरने समृद्ध आहे. 2K किंवा अगदी फुल HD मध्ये शूट केलेले कंटेंट 4K X-Reality™ PRO
द्वारे जवळजवळ 4K रिजोल्यूशनपर्यंत अपस्केल होते. त्यासाठी एक विशेष 4K डेटाबेस वापरला जातो.
Motionflow™ XR नावाच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे वेगवान हालचाली असलेल्या दृश्यांमध्येही विनाअडथळा
आणि ठळक तपशील अनुभवता येतात. ते मूळ चौकटीमध्ये अतिरिक्त चौकटी तयार करतात. हे सलग फ्रेम्समधील
मुख्य दृश्य घटकांचे विश्लेषण करते आणि क्षणात राहून गेलेल्या अॅक्शनचा अंदाज लावते. BRAVIA 2 II
सिरीजमध्ये ओपन बॅफल डाउन-फायरिंग ट्विन स्पीकर्स आहेत. ते 20 वॅट्सचा शक्तिशाली ध्वनी देतात. जोडीला
Dolby Atmos® आणि DTS:X® द्वारे वापरकर्त्यांना एक गुंगवून टाकणारा स्पॅटियल ऑडिओ अनुभव देतात.
ओपन बॅफल स्पीकर्स उत्कृष्ट लो-एंड साउंड देतात. ते चित्रपट, खेळ आणि संगीतासाठी आदर्श आहे.
नवीन BRAVIA 2 II सिरीजसह तुम्ही 10,000 पेक्षा जास्त अॅप्स डाउनलोड करू शकता आणि 700,000 पेक्षा
अधिक चित्रपट आणि TV एपिसोड्ससह, तसेच लाइव्ह TV देखील एका ठिकाणी अॅक्सेस करू शकता. Google
TV प्रत्येकाचा आवडता आशय अॅप्स आणि सबस्क्रिप्शन्समधून आणते आणि सुरळीतपणे त्याची मांडणी करते.
BRAVIA 2 II सिरीज सहजपणे कोणत्याही आधुनिक लिव्हिंग स्पेसमध्ये मिसळून जाणाऱ्या मिनिमलिस्ट
डिझाइनला चालना देते. आपल्या अल्ट्रा-नॅरो बेझेलसह, डिस्प्ले स्क्रीन क्षेत्र वाढवते. त्यामुळे प्रेक्षक सगळ्या क्रियेत
अधिक गुंतून जातात आणि खऱ्या अर्थाने त्यांना सखोल मनोरंजन अनुभव मिळतो.
HDMI 2.1 मध्ये ALLM (Auto Low Latency Mode) सह BRAVIA 2 II कन्सोल जोडल्यावर आणि चालू
केल्यावर ओळखते आणि आपोआप लो लेटन्सी मोडमध्ये स्विच करते. त्यातून वेगवान, उच्च-तीव्रतेच्या गेम्ससाठी
सुलभ आणि प्रतिसादक्षम गेमप्ले सुनिश्चित होतो. Auto HDR Tone Mapping सह HDR सेटिंग्ज PS5™
कन्सोलच्या सुरुवातीच्या सेटअपदरम्यान त्वरित ऑप्टिमाइझ होतात. BRAVIA 2 II सिरीजमध्ये सोनी पिक्चर्स
कोअर समाविष्ट आहे. ही एक चित्रपट सेवा आहे आणि त्यात नवीन सोनी पिक्चर्स रिलीजेस आणि क्लासिक
ब्लॉकबस्टर्सचा समावेश आहे. Pure Stream™ सह तुम्ही HDR चित्रपट 80 Mbps पर्यंत स्ट्रीम करू शकता,
यातून 4K UHD Blu-ray समान चित्रगुणवत्ता मिळते. BRAVIA 2 II टेलिव्हिजनसोबत मूव्ही क्रेडिट्स येतात.
त्यामुळे तुम्ही पाच पर्यंत चित्रपट रिडीम करू शकता आणि नियमितपणे अपडेट होणाऱ्या 100 चित्रपटांच्या
क्युरेटेड निवडीपर्यंत 12 महिने अॅक्सेस मिळवू शकता.
ऑफर्स, किंमत आणि उपलब्धता:
सध्याच्या सवलतींचा भाग म्हणून ग्राहक BRAVIA 2 II टेलिव्हिजन खरेदीवर 5,000/- रु. पर्यंत कॅशबॅक मिळवू
शकतात. जोडीला सुलभ ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. 108 सेमी (43) साठी फक्त 1,849 रु. पासून आणि
139 सेमी (55), 164 सेमी (65) आणि 189 सेमी (75) स्क्रीन आकारांसाठी 2,995 रु. पासून सुरू होतात.
त्यामुळे उत्कृष्ट होम एंटरटेनमेंट अनुभव अपग्रेड करणे सोपे होते.
मॉडेल सर्वोत्तम खरेदी (रु. मध्ये) उपलब्धता दिनांक
K-75S25M2 145,990/- 20 मे 2025 पासून
K-65S25M2 97,990/- 20 मे 2025 पासून

K-55S25M2 75,990/- सध्या उपलब्ध
K-50S25M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
K-43S25M2 50,990/- सध्या उपलब्ध
K-50S22M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
K-43S22M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
ही मॉडेल्स भारतातील सर्व सोनी सेंटर्स, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध होतील.

सायबर चोरट्यांच्या बनावट नोकर भरती विरोधात महावितरणने केली तक्रार

मुंबई : सायबर चोरट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली असुन लोकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

फसवणूक करण्याच्या उद्देशाने सायबर चोरट्यांनी  www.mahavitaranmaharashtra.com  ही बनावट वेबसाईट तयार केली. यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले असुन या विरोधात महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली असुन सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी गुंडांची टोळी, उपमुख्यमंत्री अजित पवार या टोळीचे आका आहेत का? : हर्षवर्धन सपकाळ

एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया! आ. अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा.

राज्य महिला आयोग असंवेदनशील, आयोगाच्या अध्यक्षांना महिला सुरक्षेपेक्षा राजकारणात जास्त रस

मुंबई दि. २२ मे २०२५
भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे ? असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधा-यांनी घेतले आहे, त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत, आम्ही आयोगाचा धिक्कार करतो.

अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा.
राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौ-यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीए कडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी असे सपकाळ म्हणाले.

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हजारो लाखो होक्टवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना याचा मोठा फटका बसला आहे पण सरकारकडून मदत देणे दूरच साधे पंचनामे ही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. बियाणे आणि खतांची लिंकींग करून विक्रेत्यांकडून शेतक-यांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सरकारने तात्काळ कठोर करावाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात आमदार बापसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक

पुणे: लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक (ता. २२) आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून हे रुग्णालय पूर्ण होऊनही सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सदर बैठकीमध्ये रुग्णालयाच्या अद्याप पूर्ण न झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. उर्वरित बांधकाम, पाणीपुरवठा लाईन, ड्रेनेज सिस्टिम व विद्युत जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा प्रलंबित आहे. या बाबतीत संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून काम पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार पठारे यांनी दिल्या.

आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. रुग्णालयाची इमारत उभी आहे, पण आरोग्यसेवा सुरू नाही, हे दुर्दैवी आहे. मी या विषयासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता. आता नागरिकांना प्रतीक्षेत ठेवणे योग्य नाही. लोहगावसह इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय ससून रुग्णालयावरचा भार कमी होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल.”

या बैठकीस डॉ. राधाकृष्ण पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ), डॉ. एम. पल्ली (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे), श्रीमती भंडारे (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, अजय पाटील (उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग), घाटकर (शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पठारे यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की रुग्णालय पूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

चाकण येथील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही

पुणे: महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून सुमारे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

चाकण येथील उद्योगांच्या समस्यांबाबत चाकण येथे सर्व संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींसह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, चीन देशातून उद्योग बाहेर पडत असताना ते भारताकडे येत असून त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. मोठ्या उद्योगांबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणा सवलती देण्यात येत असून त्याची माहिती उद्योगांनी घेऊन प्रगती करावी. गेल्या तीन वर्षात दिलेल्या सवलतींपेक्षा पुढील एकाच वर्षात ६ हजार १०० कोटी रुपयांची सवलत (इन्सेंटिव्ह) देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योग मंत्री श्री सामंत यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींच्या वीज, पाणी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आदींबाबतच्या समस्या जाणून घेतल्या.

कामगार रुग्णालयासाठी जागेचे बैठकीतच हस्तांतरण

चाकण येथे कामगार रुग्णालय (ईएसआयसी) उभारण्यासाठी जागा मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक संपेपर्यंत कार्यवाही करून जागा उपलब्ध करून देण्याबद्दल निर्देश दिले. बैठक संपताच विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून उद्योगमंत्री यांच्या हस्ते सादर जागेच्या हस्तांतरणाबाबतचे पत्र संघटनेकडे सुपूर्त करण्यात आले. त्याबद्दल आमदार श्री. काळे आणि उद्योगांनी मंत्री सामंत यांना धन्यवाद दिले.

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेच्या उपायोजना म्हणून स्ट्रीटलाईट, सीसीटीव्ही या उपाययोजना करण्यात याव्यात असे त्यांनी सांगितले. स्ट्रीटलाईटचे काम सुरू असून विशेष बाब म्हणून सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्यात येईल, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी १५० ट्रक उभे राहू शकतील असे ट्रक टर्मिनस आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी औद्योगिक वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी उभे राहतील या दृष्टीने संघटनांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे एमआयडीसी पोलीस विभाग तसेच उद्योग प्रतिनिधींनी संयुक्त सर्वेक्षण करून विकेंद्रीत स्वरूपात छोट्या छोट्या जागा शोधून २५- ३० ट्रक थांबू शकतील अशी व्यवस्था करावी. वाहतुकीला शिस्त लागेल यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने महापारेषण आणि महावितरण कंपनीने समन्वयाने आवश्यक तेथे हाय टेन्शन वाहिन्या, फीडर, डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आदी नवीन पायाभूत सुविधा तसेच अस्तित्वातील सुविधांचे उन्नतीकरण, विस्तारीकरण करावे, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले. त्यानुसार सुमारे ४२० कोटींची कामे सुरू असून ६६४ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या निविदा झाल्या आहेत, असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. ही कामे गतीने आणि टप्प्या टप्प्याने पूर्ण करून लवकरात लवकर उद्योगांना दिलासा द्यावा. वीज यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी आठवड्यात जो खंड घेण्यात येतो त्याचा सोईचा दिवस ठरविण्यासाठी महावितरण, महापारेषणने उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा, आदी सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.

उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी, असे सांगतानाच उद्योगांनीही सांडपाणी प्रक्रिया (टर्शरी ट्रीटमेंट) करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोगात आणल्यास अन्य नवीन उद्योगांना पाणी देता येईल. यासाठी मोठ्या उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी उपलब्ध असाव्यात यासाठी तीन क्रेन उपलब्ध करून देण्यात येतील. वाहतूक नियमनासाठी पोलीसांना साहाय्य करण्यासाठी वॉर्डन उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत १० वॉर्डनची जबाबदारी घेतल्याचे पिंपरी चिंचवड येथील उद्योग संघटनेने जाहीर केले. याबाबत पोलीस विभागाने मागणी केली होती.

एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती गतीने करून घ्यावी. तसेच एमआयडीसी बाह्य भागातील दुरूस्तीसाठी संबंधित यंत्रणेंशी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

भामा आसखेड धरणांतर्गत बुडीत बंधाऱ्यांचे काम करण्यासाठी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार श्री. काळे यांनी केले. त्याबाबत कंपन्यांनी सकारात्मक रहावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

या परिसरातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. तसेच राज्य मंत्रीमंडळाने तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूर जमीनीवरील ६ पदरी मार्गाच्या ४ हजार कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने लवकरच काम सुरू होईल, असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीनेही आपल्या हद्दीतील रस्त्याच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस महापारेषण, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगर, प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000

अंगणातल्या खेळांना पालक-मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:मंत्री चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ यांनीही खेळले अंगणातले खेळ

पुणे : पावसाची भुरभूर असतानाही लगोरी, टिपरीपाणी असे खेळ खेळणारी मुले, भोवरा फिरवण्याचा प्रयत्न करणारी मुले, स्वतः उत्साहाने भोवरा फिरवणारे आजोबा, अंगणातल्या खेळांविषयी मुलांना माहिती सांगणारे पालक तसेच उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनाही खेल खेळण्याचा न आवरता आलेला उत्साह असे वातावरण पुणे बालपुस्तक जत्रेत गुरुवारी होते.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रेचे उद्घाटन गणेश कला क्रीडा मंच येथे झाले. विशेष म्हणजे, या जत्रेच्या उद्घाटनाच्या आधीच पुणेकरांनी गर्दी केली. सकाळपासूनच मुले, पालकांनी जत्रेला हजेरी लावली. जत्रेमध्ये बालकुमार साहित्याची ७०हून अधिक दालने आहेत. त्याशिवाय अंगणातील खेळ, खाऊची दुकाने, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम या जत्रेत होत आहेत. आताच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनमध्ये रमणाऱ्या मुलांना पुस्तके, खेळाची गोडी लावण्याचा या जत्रेचा उद्देश आहे.

‘आम्ही आमच्या लहानपणी अंगणात, वाड्यात खेळ खेळताना तहानभूक विसरून जात होतो. मात्र, आता फ्लॅट संस्कृती, इंटरनेटमुळे अंगणातल्या खेळांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. मात्र, नव्या पिढीला या खेळांची माहिती झाली पाहिजे. पुणे बालपुस्तक जत्रेने या खेळांचा समावेश करून जुन्या काळाचा पुन्हा आनंद दिला, अशी भावना पालकांनी व्यक्त केली.

जितेंद्र रघुवीर यांच्या जादूची धमाल-उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर जादुगार जितेंद्र रघुवीर यांचा जादूच्या खेळांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात रघुवीर यांनी अनोख्या अनेक जादूंचे सादरीकरण केले. मुले, पालकांनी या जादूची धमाल अनुभवली.

बाल पुस्तक जत्रा राज्यभरात व्हावी – उदय सामंत

राज्य सरकार पुढाकार घेणार असल्याची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची माहिती; पुणे पुस्तक जत्रेचा थाटात शुभारंभ

पुणे : मुलांना वाचनाची गोडी लावणारी बाल पुस्तक जत्रा ही पुण्यापुरती राहता कामा नये, तर तिचा प्रसार राज्यभरात व्हायला हवा. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात बाल पुस्तक जत्रेचे आयोजन व्हायला हवे. त्यासाठी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा मंत्री श्री. उदय सामंत यांनी गुरुवारी दिली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महानगरपालिका आणि संवाद पुणे यांच्या वतीने आयोजित पुणे बाल पुस्तक जत्रेच्या उद्घटनाप्रसंगी श्री. उदय सामंत बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष श्री. मिलिंद मराठे, पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री. राजेश पांडे, महापालिकेचे अधिकारी श्री सुनील बल्लाळ, श्री.राजेश कामठे, लेखिका संगीता बर्वे, ज्येष्ठ चित्रकार श्री.ल. म. कडू, बालसाहित्यकार श्री.राजीव तांबे, संवाद पुणेचे श्री.सुनील महाजन, प्रसेनजित फडणवीस आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांच्या स्मृतिपित्त उभारलेल्या जालनाचे उद्घाटन करण्यात आले. या दालनात प्रकाशकांची साधारण ७० पुस्तकांची दालने असून, त्यात बालसाहित्याला वाहिलेल्या दालनांचा समवेश आहे.

श्री. सामंत म्हणाले की, पूर्वीची लहान मुले आणि आताची लहान मुले यांच्यातील फरक आपला स्पष्ट जाणवतो. पूर्वीच्या मुलांना आजार होत नाही, तर आताच्या मुलांची प्रकृती फार लवकर बिघडते. पुस्तकांची जत्रा नावीन्यपूर्ण उपक्रम असून, त्याला जोड भारतीय पारंपरिक खेळांची दिल्याने मुलांसोबतच पालकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मराठी भाषेला पाठबळ देणारा मित्र उदय सामंतसोबत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत. त्यामुळे पुणे पुस्तक बालचत्रेसारखे उपक्रम राज्यभरात उत्साहाने पडावेत, अशी इच्छा सामंत यांनी व्यक्त केली.

मिसाळ म्हणाल्या की, लहानपणी भरपूर खेळ खेळल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो, हे आज कळतं आहे. आपण शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त होण्यासोबतच आपल्या व्यक्तिमत्त्वात भर पडते. अशाच पद्धतीने लहानपणी पुस्तके वाचण्याची सवय लागली. त्याचा फायदा आज होत असून, अनेक ऐतिहासिक पुस्तके आपण वाचलेली असतात. पुस्तक हातात घेऊन, वाचण्याची गंमत लॅपटॉप किंवा संगणकावर वाचून मिळत नाही. त्यामुळे मुलांनी वाचण्यासोबतच पारंपारिक भारतीय खेळ खेळण्यावर भर द्यायला हवा.पांडे म्हणाले की, दिल्ली येथे भरणाऱ्या येथे वर्ल्ड बुक फेअरमध्ये मुलांसाठी शैक्षणिक आणि साहित्यिक उपक्रम राबविण्याबाबत कल्पना सुचली. या कल्पनेचे पुणे पुस्तक बाल जत्रेत रूपांतर करण्यात आले. पुणेकरांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे येत्या रविवारपर्यंत पुणे पुस्तक बाल जत्रेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पांडे यांनी केले. पुणे पुस्तक महोत्सवाप्रमाणे राज्यात नागपूर आणि आणखी काही शहरात पुस्तक महोत्सव होणार असल्याचे मिलिंद मराठे यांनी सांगितले.खडकी कॉलेजचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी सूत्रसंचालन केले

पाटील म्हणाले की, भारतीय खेळ खेळल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहते. मुलांच्या बुद्धीचा विकास भरपूर होतो. मुलांचे व्यक्तिमत्त्व विकास चांगल्या पद्धतीने होतो. त्यामुळे पारंपरिक खेळ खेळण्याचा मुलांनी प्रयत्न करायला हवा आणि त्यासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यायला हवे. राजेश पांडे यांनी राजकारणासोबतच साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करीत असून वाचन संस्कृती वाढण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करीत आहेत. अशा उपक्रमांना राज्य सरकारचा नेहमीच पाठिंबा राहील, अशी माहिती पाटील यांनी दिल

टेकड्यांच्या संरक्षणासाठी मंजूर 26 कोटींचा निधी वापरात नाही;तातडीने अंमलबजावणीची आमदार हेमंत रासने यांची मागणी

पुणे, दि. 22 मे :
पुणे शहरातील पाचगाव-पर्वती, भांबुर्डे आणि वारजे येथील टेकड्यांच्या संरक्षणासाठी 2022 ते 2027 या कालावधीसाठी पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने 26 कोटी 25 लाख रुपयांचा पंचवार्षिक खर्च मंजूर केला असला, तरी आजवर या निधीचा वापर झालेला नाही. परिणामी टेकड्यांवरील सुरक्षा आणि पर्यावरणीय संवर्धनाच्या उपाययोजना रखडल्या असून, हा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

रासने म्हणाले, “2021 मध्ये स्थायी समितीने प्रत्येक वर्षी 5 कोटी 25 लाख रुपये याप्रमाणे 2027 पर्यंत 26 कोटी 25 लाख रुपयांचा खर्च करण्यास मंजुरी दिली होती. परंतु आयुक्त आणि प्रशासकांच्या कार्यकाळात हा निधी वापरातच आला नाही. आता ही टाळाटाळ थांबवून हा निधी तातडीने वापरात आणावा, म्हणजेच टेकड्यांचे संवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करता येईल. सुरक्षा भिंतीचे बांधकाम, वृक्षारोपण, रोपवाटिका उभारणे आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक, सीसीटीव्ही यंत्रणा बसविणे आदी कामांचा समावेश संयुक्त वन व्यवस्थापन योजनेत केली जातात.”

ताज्या घटनेत तळजाई टेकडीवर फिरायला गेलेल्या एका युवकाला दोन चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून दीड लाख रुपयांची सोनसाखळी लुटली. याआधी बाणेर टेकडीवर कोरियातील अभियंत्यालाही अशाच प्रकारे लुटण्यात आले होते. यामुळे टेकड्यांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टेकड्यांवरील सुरक्षेसाठी सीसीटीव्ही, पॅनिक बटण आणि पोलीस गस्त यांसारख्या उपाययोजनांना निधी मंजूर केला होता. मात्र, अद्याप त्याची ही प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही, याकडे रासने यांनी लक्ष वेधले आहे.

रासने म्हणाले, “पुणे शहरात सन 2006 मध्ये वनखाते, पुणे महापालिका आणि स्थानिक नागरिकांच्या सहभागाने नागरिक संयुक्त वनव्यवस्थापनाला सुरुवात झाली. त्यासाठी महापालिका आर्थिक मदत करते. 2006 ते 2011 या कालावधीसाठी 10 कोटी 23 लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी 9 कोटी 61 लाख रुपयांची विकासकामे केली. 2014 ते 2019 या कालावधीसाठी 4 कोटी 80 लाख रुपयांचा निधी दिला होता. त्यापैकी 2 कोटी 31 लाखांचा निधी खर्ची पडला. 2022 ते 2027 या कालावधीसाठी तब्बल 26 कोटी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. या खर्चाच्या धोरणास मी स्थायी समितीचा अध्यक्ष असताना मान्यता दिली होती. परंतु प्रशासकीय कार्यकाळात निधी वापरला गेला नाही. तो तातडीने उपलब्ध करून द्यावा.”

बारावीची लेखी परीक्षा 24 जून ते 16 जुलै, तर दहावीची 24 जून ते 8 जुलै या कालावधीत

पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै ये कालावधीत घेतली जाईल.

राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्य मंडळाने ५ मे रोजी बारावीचा, तर १३ मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला. या परीक्षांतील अनुत्तीर्ण, एटीकेटी प्राप्त विद्यार्थी, श्रेणी सुधार करू इच्छिणारे विद्यार्थी यांना संधी मिळण्यासाठी पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. आतापर्यंत पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेतली जात होती. मात्र, यंदा ही परीक्षा लवकर घेतली जाणार आहे. सविस्तर वेळापत्रक https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २४ जून ते ११ जुलै या कालावधीत बारावीची प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जाणार आहे. बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान या विषयांची परीक्षा ऑनलाइन पद्धतीने अनुक्रमे १५ जून, १६ जून रोजी घेतली जाणार आहे, तर २४ जून ते ८ जुलै या कालावधीत दहावीचे प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन केले जाणार आहे.

वैष्णवी मृत्यू प्रकरणी राजेंद्र हगवणे अन् सुशील हगवणेंना अटक; दोघंही 7 दिवसांपासून होते फरार

पुणे-वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे गेल्या काही दिवासांपासून फरार होते. आज (23 मे) सकाळी पहाटे 4.30 वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आली. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गेल्या सात दिवसांपासून कुठे लपून बसले होते, अटक कशी करण्यात आली, याबाबत पोलिसांकडून थोड्याच वेळात माहिती सांगितली जाण्याची शक्यता आहे.

सासरच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी वैष्णवीचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिश्मा राजेंद्र हगवणे यांना मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी याआधीच अटक करण्यात आली होती. सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे व दीर सुशील राजेंद्र हगवणे हे गेल्या 7 दिवसांपासून फरार होते. त्यांच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आज राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे.

निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल-कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरुन निलेश चव्हाणच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सहाय्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी वैश्नवीच्या माहेरचे लोक तीच्या नऊ महिन्यांच्या बाळाला घेण्यासाठी कर्वे नगर भागातील निलेश चव्हाणच्या घरी गेले असता निलेश चव्हाणने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून हीसकाऊन लावले होते‌ . कस्पटे कुटुंबीयांनी बाळाचा ताबा मागीतल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता. वैश्नवीचे काका मनोज कस्पटे यांनी निलेश चव्हाण विरोधात वारजे पोलीसांकडे बाळाला बेकायदेशीर डांबून ठेवल्याची तक्रार दीली. मात्र पोलीसांनी धमकावल्याच्या आरोपाखाली निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केलाय. निलेश चव्हाण हा वैनवीचा नवरा शशांक आणि वैश्नवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र आहे.

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकऱणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केलीय. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक झालीय. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक झालीय. वैष्णवी हगवणे हिने शुक्रवारी (16 मे) राहत्या घरात गळफास घेतला. वैष्णवी यांचे वडील आनंद कस्पटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वैष्णवीच्या लग्नात 51 तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी, चांदीची भांडी देण्यात आली. त्यानंतर लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून शशांक व तिचे सासू-सासरे यांनी घरातील किरकोळ कामाच्या वादातून तिच्याबरोबर भांडण सुरू केले. तिच्या चारित्र्यावरून बोलणं वैष्णवीला सासऱ्याच्या लोकांनी शारीरिक व मानसिक त्रास देणं चालू केलं होतं. पती, सासू-सासरे, नणंद, दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक छळ करून कुर वागणूक दिली. पोस्ट मार्टममध्ये वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळले होते.

झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाचा चौफेर विकास, रोजगार संधी !

0
  • महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
  • विदर्भासाठी सोन्याचा दिवस.!

•मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लढ्याला यश

मुंबई, दि .२२ : झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल विदर्भाचा चौफेर विकास व रोजगाराच्या संधीची दारे विस्तारित करणारा आहे. ४५ वर्षांपासून सुरू असलेल्या एकजुटीच्या प्रयत्नाला आज यश आले. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीच्या प्रयत्नांना यश आले. खऱ्या अर्थाने, आजचा दिवस विदर्भासाठी सोन्याचा दिवस आहे, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री व नागपूर, अमरावतीचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

विशेष म्हणजे,आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस आहे. यंदा निसर्गासोबत सामंजस्य आणि सतत विकास अशी संकल्पना घेऊन हा दिवस साजरा होत असताना, सर्वोच्च न्यायालयाने झुडपी जंगलाबाबत निर्णय दिला. या निर्णयाचे स्वागत करतो.

बावनकुळे म्हणाले की, या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. विदर्भात झुडपी जंगलामुळे व इतर छोट्या कारणांमुळे या निर्णयाअभावी विकासाचे, सिंचनाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात रखडले होते. आजपासून विकासाची गंगा अधिक वेगाने प्रवाहित होईल. ८६ हजार हेक्टर झुडपी जंगलावर कोणतेही झाडे झुडपे नसताना त्याची नोंद झुडपी जंगल केली होती. प्रगतीच्या व विकासाच्या प्रत्येक कामात झुडपी जंगलामुळे बाधा यायची. सीपी अँड बेरारमधून विदर्भाचा भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाला. त्यावेळी महसुली रेकॉर्डमध्ये झुडपी जंगल असे लिहिले गेले. मध्यप्रदेशात आपला रेकॉर्ड दुरुस्त केला आणि आपल्याकडे मात्र अडचण निर्माण झाली. त्यामुळे विदर्भाचा विकास थांबून गेला होता. गेल्या दहा वर्षांत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासासाठी हा लढा आम्ही लढत होतो. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्यावतीने योग्य बाजू मांडली गेली. मुख्यमंत्र्यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणाऱ्या सर्व कायदेतज्ञांना अनेक कायदेशीर मार्ग व बाजू समजून सांगितल्या. त्यासाठी अनेक बैठकीही घेतल्या, त्या प्रयत्नांना यश आले. आजचे यश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचे यश आहे,असे माझे मत आहे.

नागपूरचा पालकमंत्री म्हणून आनंदाची गोष्ट अशी आहे की, माझ्या गोरगरीब नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचा मार्ग खुला झाला. नागपुरात झोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, मात्र झुडपी जंगल या शब्दामुळे सगळे फोल ठरत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यावर एक समिती स्थापन केली होती. समितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. त्यानंतर गेली काही याच अहवालावर सुनावण्या होत होत्या. अनेक मुद्दे पुढे आले, आणि शेवट गोड झाला, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ पुस्तकाचेनाना पाटेकर यांच्या हस्ते रविवारी (ता. २५) प्रकाशन

पुणे: सातारा जिल्ह्यातील निढळ (ता. खटाव) या एकेकाळी दुष्काळी व अविकसित असलेल्या गावचे भूमिपूत्र व आयएएस अधिकारी, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ, नोकरवर्ग व व्यावसायिकांच्या सहभागातून गेल्या ४१ वर्षांत परिपूर्ण व स्मार्ट व्हिलेज म्हणून नावारुपाला आले आहे. लेखक सुनील चव्हाण यांनी ‘निढळ’ची हीच प्रगतशील वाटचाल ‘निढळ: ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न’ या पुस्तकाच्या रुपाने पुढे आणली आहे. देशातील सर्व गावांच्या विकासाला उपयुक्त ठरणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशन येत्या रविवारी (ता. २५) सकाळी ११.१५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, पुणे येथे ज्येष्ठ अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. नाना पाटेकर यांनीच या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.

चंद्रकांत दळवी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला पुणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील असतील. पीआरएम सॉफ्ट सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक राजेंद्र शिंदे, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची विशेष उपस्थिती राहील. यावेळी एस. बी. प्रॉडक्शन्सने तयार केलेल्या व शंकर बारवे दिग्दर्शित ‘निढळ गाव: परिवर्तनाचा प्रवास’ या माहितीपटाच्या टीझरचे अनावरण होणार आहे. शिक्षण, पाणलोट विकास, कृषी, ग्रामस्वच्छता, वनविकास, संस्थात्मक आर्थिक विकास, उद्योजकता, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात ‘निढळ’ गावाने समृद्ध वाटचाल केली आहे. देशातील सर्वच गावांना ही वाटचाल पथदर्शी ठरावी, या उद्देशाने हे पुस्तक महत्वपूर्ण आहे.

अ. भा. मराठी साहित्य संमेलन उद्यान देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल : उदय सामंत

गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारात भूमिपूजन सोहळा
.. हाच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार : उदय सामंत

पुणे : आज आपण मातृभाषेला विसरत चाललो आहोत. अशा परिस्थितीत 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख दर्शविणारे उद्यान हा देशाच्या इतिहासात नोंद होणारा उपक्रम ठरेल, असा विश्वास मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. सरहद संस्थेत काश्मिरी भगिनीने गायलेले महाराष्ट्र अभिमान गीत हेच मराठी भाषेचे संवर्धन आहे; हाच मराठी भाषेचा खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार आहे, असेही ते गौरवाने म्हणाले.
गुजर-निंबाळकरवाडी येथील सरहद संस्थेच्या आवारात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्यान उभारण्यात येत असून या उद्यानाचे भूमिपूजन आज (दि. 22) मंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. सरहद, पुणेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, समन्वयक लेशपाल जवळगे, झाहिद भट, वैभव वाघ, प्रमोद भानगिरे, संतोष बालवडकर उपस्थित होते.
उद्यानाचे भूमिपूजन माझ्या हस्ते होत आहे याचा आनंद आहे, असे सांगून उदय सामंत पुढे म्हणाले, उद्यानाच्या माध्यमातून देशातील पहिले साहित्य दालन सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व स्वागताध्यक्ष यांच्या कार्याची ओळख जगासमोर येणार आहे. सरहदच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी तसेच मराठी भाषाप्रेमी एकत्र येण्यासाठी महत्त्वाचे कार्य सातत्याने घडत आहे. मराठी साहित्य व मराठी भाषेसाठी उत्तमोत्तम संकल्पना राबवून त्या परिपूर्णत्वास नेणे हे संजय नहार यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. याच कार्यातून परदेशातही मराठी भाषेचा जागर व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. इंग्रजी भाषेला पर्यायी मराठी शब्द शोधण्यासाठी सरहदने पुढाकार घेऊन मोहीम राबवावी, असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
साहित्य संमेलन उद्यानाच्या संकल्पनेची माहिती सांगताना संजय नहार म्हणाले, या उद्यानाच्या माध्यमातून आजपर्यंत झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या अध्यक्ष व स्वागताध्यक्षांची ओळख जगासमोर आणली जाणार आहे. साहित्य, भाषा, कला, संस्कृती यांचा सुंदर मिलाफ साधणारे हे केंद्र ठरेल. ‌‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा‌’ ही कविकल्पना न राहता ती सत्यात आणण्यासाठी सरहद सतत कार्यरत आहे.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलने ही महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असतात. समाजाला वैचारिक दिशा देण्याचे कार्य करतात. शंभराव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे वाटचाल सुरू असताना सरहदच्या माध्यमातून निर्माण होणारे हे उद्यान वैचारिक उर्जा देणारे केंद्र ठरेल. साहित्यिकांच्या विचारांच्या सावलीत साहित्यप्रेमी अनोखा आनंद घेतील. साहित्य संमेलनांचे अध्यक्ष वेगवेगळ्या विचारधारांचे असले तरी सर्वसमावेशक भूमिका घेऊन समाजाला दिशा देण्याचे कार्य करतात तसेच कार्य या उद्यानाच्या माध्यमातून घडेल असा विश्वास वाटतो. साहित्य संमेलन संपले की, काही महिन्यातच संयोजकांचे नाते तुटते, परंतु सरहदच्या या अनोखा उपक्रमातून संजय नहार यांनी हा धागा कधीच तुटू दिला नाही. ते अंतर्बाह्य साहित्यप्रेमीच आहेत. प्रा. जोशी पुढे म्हणाले, राजकारण्यांनी भाषेचा स्तर राखणे ही खूप मोठी जबाबदारी असते; कारण भाषा ही संस्कृतीची निदर्शक असते. मराठी भाषा टिकविण्यासाठी शासन, साहित्य मंडळे, शिक्षण संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे कार्य करणे आजच्या काळाची गरज आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस काश्मिरी गायिका शमिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. उद्यानाची उभारणी करण्यात मोलाचे योगदान देणारे राजेश दुधाणे, किरण भामरे, रणजित पायगुडे, सचिन सानप यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेशपाल जवळगे यांनी केले तर आभार वैभव वाघ यांनी मानले.

सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) तर्फे “सीएसआर (CSR) प्रॅक्टिशनर्ससाठी सर्टिफिकेट कोर्स (CCCSRP)” ची घोषणा

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) क्षेत्रात व्यावसायिकांना सकारात्मक सामाजिक बदल घडवण्यासाठी सशक्त बनविणारा अभ्यासक्रम

पुणे, २२ मे २०२५ – भारतातील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) तर्फे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर मध्ये काम करणाऱ्यांसाठी सर्टिफिकेट कोर्स (CCCSRP) ची घोषणा करण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम सीएसआर क्षेत्रातील व्यावसायिक, कॉर्पोरेट आणि सामाजिक बदलासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना व्यावसायिक सीएसआर उपक्रम राबवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

सीएसआर आणि शाश्वत विकास आजच्या व्यावसायिक जगतातील महत्त्वाचे घटक बनले असताना, हा सहा महिन्यांचा विशेष अभ्यासक्रम पुस्तकी आणि प्रात्यक्षिक शिकवण यांचा समतोल साधतो. या अभ्यासक्रमाचा उद्देश म्हणजे सीएसआर संकल्पना, धोरणे, अंमलबजावणी व मूल्यांकनाचे सखोल ज्ञान देणे आणि व्यावसायिकांना सामाजिकदृष्ट्या परिणामकारक प्रकल्प राबवण्यासाठी सक्षम बनवणे हा आहे.

अभ्यासक्रमाची प्रमुख उद्दिष्टे:

सीएसआरच्या मूलभूत संकल्पना आणि त्यांचे आधुनिक व्यवसायात महत्त्व समजून घेणे
सीएसआर प्रकल्प रचना, अंमलबजावणी आणि मूल्यमापन कौशल्य विकसित करणे
सीएसआर संबंधित कायदेशीर, नैतिक आणि नियामक बाबींचे सखोल ज्ञान मिळवणे
जागतिक सीएसआर ट्रेंड, स्टेकहोल्डरशी प्रभावी संवाद आणि शाश्वततेवर आधारित रणनीती समजून घेणे

व्यावसायिक संधी:

सीएसआर मॅनेजर, सस्टेनेबिलिटी कन्सल्टंट, इएसजी विश्लेषक, एथिकल सोर्सिंग आणि कंप्लायन्स मॅनेजर, पब्लिक अफेयर्स व कॉर्पोरेट कम्युनिकेशन मॅनेजर, सोशल इम्पॅक्ट कन्सल्टंट, सीएसआर व सस्टेनेबिलिटी पॉलिसी अॅनालिस्ट, सीएसआर ट्रेनर/शिक्षक, आणि सीएसआर क्षेत्रातील संशोधक.

अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये:

कालावधी: ६ महिने

पात्रता: कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक

नोंदणी कालावधी: नोंदणी एका शैक्षणिक वर्षासाठी वैध आहे

अभ्यासक्रमाचे विभाग:

सीएसआर नैतिकता आणि प्रशासनाची मूलतत्त्वे

सीएसआर धोरण, नियोजन व अनुपालन

सीएसआर प्रकल्प व्यवस्थापन व अंमलबजावणी

सीएसआर परिणाम व समुदाय सहभाग

सीएसआर मध्ये लेखापरीक्षण व कर व्यवस्थापन

सीएसआर संवाद, निधी पर्याय व भविष्यातील प्रवृत्ती

शेवटी कॅपस्टोन प्रकल्प – प्रत्यक्ष प्रकल्पावर आधारित मूल्यांकन

या क्षेत्रात व्यावसायिक कारकीर्द करू इच्छिणाऱ्यांना भविष्यासाठी तयार करणे त्याच बरोबर पुस्तकी आणि प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाची जोड देऊन नैतिक शाशन व शाश्वत विकासामधील कठीण आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करतो. हा कोर्स सीएसआर क्षेत्रात व्यावसायिक निर्णय घेण्याची क्षमता वाढवतो आणि दीर्घकालीन सामाजिक मूल्यनिर्मितीसाठी व्यासपीठ तयार करतो.

प्रवेश सुरू आहेत. अधिक माहितीसाठी कृपया सिंबायोसिस सेंटर फॉर डिस्टन्स लर्निंग (SCDL) च्या https://www.scdl.net/programs/pg-certificate/distance-learning-certificate-course-in-csr-for-practitioners.aspx अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाईची करा ; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

“महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

“उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैष्णवीला न्याय मिळावा यासाठी ठाम भूमिका घेतली असून, शासन तिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कटीबद्ध आहे”

मुंबई, दि. २२ मे २०२५ : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तातडीची पत्रकार परिषद घेऊन या घटनेतील गंभीर बाबींवर चिंता व्यक्त केली. वैष्णवीने वैवाहिक आणि कौटुंबिक अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, ही घटना अत्यंत वेदनादायक आणि अमानुष असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आवश्यक पुरावे उपलब्ध झाले आहेत. वैष्णवीचा मृत्यू हा सामाजिक व कौटुंबिक दबावाचा परिणाम असून, ती एका अन्यायकारक व्यवस्थेची बळी ठरली, असे डॉ. गोऱ्हे म्हणाल्या.

तिच्या पतीसह कुटुंबीयांनी केलेल्या मानसिक आणि सामाजिक छळामुळे तिला आत्महत्येस प्रवृत्त व्हावे लागले. तिच्या मृत्यूनंतर तिचे लहान बाळ तिसऱ्या व्यक्तीच्या ताब्यात असल्याची माहितीही त्यांनी दिली. इतक्या कालावधीतील अत्याचारानंतरही तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचू न शकणे, ही अत्यंत वेदनादायक बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत, प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. सर्व आरोपींना त्वरित अटक करून कठोर कारवाई व्हावी, आणि तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष राहावी यासाठी कार्यक्षम सरकारी वकील व अधिकारी नेमावेत, अशी त्यांची विनंती आहे.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे आणि वैष्णवीच्या मुलाच्या भविष्यासाठी शासनाने जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. यासोबतच अशा घटना टाळण्यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन पातळीवर समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. पोलिस विभाग आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत हुंडाबळी, कौटुंबिक अत्याचार, महिलांचे हक्क याबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवावी, असेही त्यांनी सुचवले.

तसेच, आज सायंकाळी चार वाजता शिवसेना महिला आघाडीचे कांता पांढरे, मनीषा परांडे, सारिका पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ बावधन पोलीस ठाण्यात भेट दिली असून, या घटनेमागील सूत्रधारांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी न्यायालयीन पातळीवरही प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाचा मागील सहा महिने ते वर्षभर काळात गंभीर छळ झाला असून, त्याची दखल घेतली गेली नाही, ही वस्तुस्थिती असून सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून पीडितेला गप्प बसवले जात असल्याची तीव्र शक्यता डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली. अशा घटना रस्त्यावर नव्हे तर घराघरातल्या सामान्य मुलींनाही भेडसावत आहेत, हे लक्षात घेता, गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दोष सिद्धीचे प्रमाण वाढवण्यावर भर द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

“महिन्याला दीड हजार रुपये देणे हीच जबाबदारी नाही, तर प्रत्येक बहिणीच्या पाठीशी भाऊ म्हणून उभा आहे. कोणत्याही महिलेला कौटुंबिक छळाचा सामना करावा लागत असेल, तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा,” असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः डॉ. गोऱ्हे यांना सांगितले, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.