Home Blog Page 2990

‘पर्यावरणीय ,नैतिक, सांस्कृतिक चिंता’ विषयावर ‘पूना इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ‘येथे राष्ट्रीय चर्चासत्र

0
४५ शोध निबंध सादर 
 
पुणे :पूना इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्यरशिप येथे नुकतेच ‘ इंडस्ट्री ४.० :पर्यावरणी ,नैतिक,सांस्कृतिक चिंता या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र  झाले.
चर्चासत्रामध्ये महिंद्रा अँड  महिंद्रा कम्पनीचे माजी उपाध्यक्ष  पी. आर. त्रिवेदी, आयबी मॅनेजमेंट स्कुल (दिल्ली)चे संचालक डॉ. फैसल अहमद, पूना इन्स्टिटयुट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रेन्यरशिप ‘चे संचालक डॉ. शकील अहमद उपस्थित होते.
पी. आर. त्रिवेदी यांनी आधुनिकीकरणावर प्रकाश टाकला. डॉ. फैसल अहमद यानी आपल्या मनोगतामध्ये बदलत्या काळानुसार आपणही बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
र्चासत्राच्या दुस-या दिवशी सेंट जोसेफ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुभाष डिसुझा, आयआयसीएमआर चे  संचालक डॉ. अभय कुलकर्णी, प्राज  कम्पनीचे  समीर कुकडे, इंटेलिमेंट टेक्नॉलॉजीचे प्रशांत पानसरे, मास्क च्या व्यवस्थापक श्रीमती नेहा केजरीवाल, उद्योजिका श्रीमती पल्लवी बंडगर,डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे डॉ. अझरुद्दीन, ओएचआर चे प्रदीप तुपे उपस्थित होते.
यावेळी एकुण ४५ शोधनिबंधाचे प्रकाशन आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये करण्यात आले व पुणे जिल्हा परिसरातुन सुमारे १०५ विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते. डॉ. शीना अब्राहम यांनी  आभार   मानले. चर्चासत्र  यशस्वी होण्यासाठी डॉ. अजुम सैयद, डॉ. शीना अब्राहम यांनी प्रयत्न केले.

होंडा पुण्यामध्ये घेत आहे आजच्या पिढीतील कुशल रेसर्सचा शोध

0

भारतातील व आंतरराष्ट्रीय स्तरावरील रेसिंगमधील संधींचे सोने करू शकतील अशा उदयोन्मुख रायडर्ससाठी प्रभावी मंच

  • देशभरातून सर्वोत्कृष्ट रेसर्सची निवड केली जाणार
  • निवडक रायडर्सना होंडा टेन१० रेसिंग अकादमी मध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाणार

 पुणेपूर्व, दक्षिण व उत्तरेकडील राज्यांमधून सर्वोत्कृष्ट रेसर्सची निवड केल्यानंतर आता इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट ने २०१९ मधील आपला प्रवास पश्चिमेकडून पुण्यातून सुरु केला आहे.

इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट हा होंडाचा अनोखा उपक्रम असून युवा रेसर्समधील गुण  लहानपणापासून अगदी १३ व्या वर्षीपासून हुडकून काढण्याचे काम याद्वारे केले जाते.  यामध्ये होंडा टूव्हिलर्स इंडियातर्फे पुण्यातील युवा रायडर्सपैकी सर्वोत्तम रायडर्सना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चॅम्पिअनशिप्समध्ये रेसिंग करिअर करता यावे यासाठी प्रशिक्षण दिले जाईल.

बंगलोर, चेन्नई, हैदराबाद, आईझवल व दिल्ली या शहरांमध्ये पार पडलेल्या पाच फेऱ्यांनंतर आज हंटच्या सहाव्या फेरीत १३ युवकांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला.  यापैकी सर्वात लहान स्पर्धक फक्त १३ वर्षाचा आहे.

यामध्ये स्पर्धकांना चाचणीच्या तीन फेऱ्या पार कराव्या लागल्या. पहिली फेरी शारीरिक तंदुरुस्ती, दुसरी फेरी रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन व जिगर आणि रेस ट्रॅकवरील रायडींग कौशल्ये.  त्यानंतर ज्युरीनी मुलाखत घेतली  ज्यामध्ये उमेदवार व त्यांच्या पालकांनाही प्रश्न विचारले गेले.  मोटरस्पोर्टविषयी त्यांना किती आत्मीयता व उत्साह वाटतो आणि या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा किती आहे हे यातून समजून घेण्यात आले.

या ज्युरीचे प्रतिनिधित्व होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रभू नागराज, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे मोटरस्पोर्ट्स विभागाचे डिव्हिजनल हेड श्री. चंदन बुर्दक व टेन१० रेसिंगचे डायरेक्टर श्री. रामजी गोविंदराजन यांनी केले.

पहिल्या टप्प्यात निवड झाल्यानंतर पुणे टॅलेंट हंटच्या सर्वोत्कृष्ट उमेदवारांना होंडा टेन१० रेसिंग अकॅडेमीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल व दुसऱ्या टप्प्यात ट्रॅकवर राईड करण्याची संधी दिली जाईल.  या उमेदवारांमधून होंडा सर्वोत्कृष्ट रायडर्सची निवड करेल . त्यांनतर त्यांना काटेकोर प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक बळ व स्टॅमिनावर भर दिला जाईल.  विशेष तज्ञ त्यांच्यातील रेसिंग कौशल्ये विकसित करतील.  हे सर्वोत्तम रायडर्स १२ निवडक रायडर्ससोबत २०१९ मधील होंडा टॅलेंट कप सीबीआर १५०आर विभागात रेसिंग करतील.

यावेळी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे ब्रँड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रभू नागराज यांनी सांगितले, इदेमित्सु होंडा इंडिया टॅलेंट हंट हा मोटरस्पोर्ट्समध्ये आम्ही सुरु केलेल्या नवीन उपक्रमाचा भाग असून देशात युवा गुणांना, कौशल्यांना वाव देणे हा आमचा उद्देश आहे. भारतातील युवकांना सर्वोत्तम रायडर्स बनण्यासाठी विकसित करण्याचा संकल्प आम्ही घेतला असून आमच्या टॅलेंट हंटमधील स्टार्स मिखाईलने व कृतिक हबीबने इदेमित्सु होंडा टॅलेंट कप२०१८ मध्ये अनुक्रमे पहिला व तिसरा क्रमांक पटकावला.   पुण्यातील या फेरीत युवकांची मोटरस्पोर्ट्सबद्दलची  जिगर व उत्साह पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला आहे.  मला पक्की खात्री आहे की, हे नव्या पिढीचे रायडर्स भारतात मोटरस्पोर्ट्सचा चेहरामोहरा बदलवतील व आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला नावलौकिक मिळवून देतील.”

 यानंतर आता होंडा टॅलेंट हंट कोईम्बतूरमध्ये (तामिळनाडू) २३ फेब्रुवारी, २०१९ रोजी आयोजित केले जाईल.

शिवजयंती अभिवादन मिरवणूकीत दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

0

पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दहा हजार  विद्यार्थ्याचा सहभाग असलेल्या  अभिवादन मिरवणुकीचे आयोजन आझम कॅम्पस ते लाल महाल मार्गावर करण्यात आले होते .

सोमवार, दि. 19 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार आणि डॉ एन वाय   काझी यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला .  मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले . लाल महाल येथे पुष्पहार अर्पण करून सांगता झाली

पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील  दहा हजार विद्यार्थी,शिक्षक ,प्राद्यापक ,सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी शिवजयंतीदिनाची अभिवादन मिरवणूक होती  . मिरवणुकीचे हे 18 वे वर्ष होते .

आझम कॅम्पस ,पूना कॉलेज, क्वार्टर गेट,  सोन्या मारुती चौक,  मार्गे  निघालेल्या या मिरवणुकीची लाल महाल येथे  सांगता झाली . मिरवणूकीत शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे लेझीम पथक, तुतारी, नगारे देखील सहभागी झाले .

‘शिवजयंती उत्सव सुरु करणारे महात्मा फुले ’ हा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला .कॉलेज ऑफ फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी प्रा  जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तो सादर केला . दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात.

शिवछत्रपतींच्या मार्गावरच हा महाराष्ट्र पुढे जाईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
जुन्नर /आनंद कांबळे 
सामान्य रयतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली. दीन, दलित, आदिवासी, शोषीत, शेतकरी, शेतमजूर, महिलांच्या कल्याणाची प्रेरणा शिवछत्रपतींच्या कार्यातूनच आम्हाला मिळाली असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच महाराष्ट्र पुढे जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.
      किल्ले शिवनेरी ता. जुन्नर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला. त्यानंतर मराठा सेवा संघाच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्त आयोजित अभिवादन सभेत मुख्यमंत्री श्री फडणवीस बोलत होते.
यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार शरद सोनवणे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अभिवादन कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे उपस्थित होते.
      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ज्या काळात भारतातील अनेक राजे गुलामगिरी पत्करून होते, त्या काळात मॉ जिजाऊंच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. समाजातील आठरापगड जाती-धर्मातील मावळ्यांना एकत्र करून रयतेच्या स्वराज्याची निर्मिती महाराजांनी केली.
      छत्रपतींच्या प्रेरणेनेच शासनाने विविध प्रश्न मार्गी लावल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणासह विविध प्रश्न शासनाने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांवरील ८० टक्के गुन्हे मागे घेतल्या असून उर्वरीत केसेस मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रीया सुरू आहे.
      छत्रपती शिवाजी महाराज हे जगातील सर्वात महान राजांपैकी एक होते. त्यांची प्रत्येक गोष्ट पथदर्शी असून त्यांचे स्मारकही त्यांच्या कार्याएवढेच भव्य दिव्य स्वरूपात अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. महाराजांच्या स्मारकाला प्रत्येक सामान्य माणूस भेट देवू शकेल अशी व्यवस्था शासनाच्यावतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
      शासनाच्यावतीने खासदार छत्रपती संभाजीमहाराज यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगडाच्या संवर्धनाचे चांगले काम सुरू आहे. आतापर्यंत या कामासाठी शासनाच्यावतीने ६०६ कोटी रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे सांगत त्याच धर्तीवर राज्यातील इतर महत्वाच्या गडकोटांच्या संवर्धनाचे काम सूरू असून शासन याकामासाठी सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच शिवनेरीच्या पर्यटन विकासाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
      सुरुवातीला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्माच्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा सोहळा पार पडला. यावेळी पारंपारिक वेशातील महिलांनी शिवछत्रपतींची महिती सांगणारा पाळणा म्हटला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवछत्रपतींची पालखी आपल्या खांद्यावर घेत काही अंतर पार केले. यावेळी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या श्री तळेश्वर लेझिम पथकाच्यावतीने पारंपारिक लेझिम खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. पोलीस बँड पथकाच्यावतीने राष्ट्रगीत सादर केले. पोलीसांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली.
      शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने राज्यभरातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने शिवनेरी किल्यावर आले होते.

12 वी परीक्षा :डगमगू नका,आत्मविश्वासाने पेपर लिहा,यश तुमचेच : चाटे सर

0

पुणे-
येत्या २१ तारखेपासून बारावीची परीक्षा सुरु होते आहे या पार्श्वभूमीवर आज चाटे शिक्षण समुहाचे संचालक प्रा. फुलचंद चाटे सर यांनी ‘माय मराठी’च्या माध्यमातून बारावीच्या विद्यार्थ्यांशी साधलेला हा संवाद .. बारावीच्या विद्यार्थ्यांना नक्कीच बळ देणारा त्यांचा हा मार्गदर्शन पर संवाद ..विद्यार्थी आणि पालकांनी निश्चित ऐकावा असा…

खडकवासला ,हडपसर आणि वडगावशेरीसह कसब्यावर करणार शिवसेना दावा

0

 

पुणे :गिरीश बापट लोकसभा लढवतील असे सांगत कसब्यासह खडकवासला,हडपसर आणि वडगाव शेरी विधानसभा मतदार संघावर वर शिवसेनेने दावा करायचा निर्धार केल्याचे सांगण्यात येत आहे . त्यामुळे भीमराव तापकीर ,योगेश टिळेकर  आणि जगदीश मुळीक यांना आपापल्या विधानसभा उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागण्याची चिन्हे आहेत .

भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीची घोषणा आज झाली. युतीत झालेल्या जागावाटपानुसार 2009 च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा शिवसेनेला तब्बल 21 जागा अधिक मिळाल्या आहेत. फिफ्टी-फिफ्टीचा फार्म्युला विधानसभे साठी वापरण्यात येणार आहे त्यामुळे खडकवासला ,हडपसर आणि वडगाव शेरीसह कसब्यावर  शिवसेना दावा करेल असे सांगितले जाते आहे .भाजपचे सध्या पुण्यात आठ आमदारआहेत या जागांमधील पुण्यातील आठपैकी नेमक्‍या कोणत्या जागा शिवसेनेला सोडाव्या लागणार याची चर्चा आता सुरू झाली आहे. लोकसभा निवडणूक गिरीश बापट लढविणार असा कयास धरून शिवसेना कसब्यावर हक्क सांगेल असेही म्हटले जाते आहे .खडकवासल्यात राष्ट्रवादी नेमोथा जोर लावला आहे या पार्श्वभूमीवर सातत्याने निवडून आलेले तापकीर यांच्या ऐवजी शिवसेनेला हि जागा देवून रमेश कोंडे चा येथून विचार होऊ शकतो असे काहींचे म्हणणे आहे.

खडकवासला , हडपसर,कसबा, वडगाव शेरी  या चार   जागा शिवसेनेकडून मागितल्या जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे युतीसाठी भाजपच्या  विद्यमान आमदार भीमराव तापकीर  व हडपसरचे आमदार योगेश टिळेकर आणि वडगाव शेरी चे मुळीक यांना संघर्ष  करावा लागण्याची शक्‍यता राजकीय वर्तुळात वर्तविली जाऊ लागली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. त्याआधी 2009 च्या निवडणुकीत दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढले. त्यावेळी कोथरूडमधून चंद्रकांत मोकाटे तर हडपसरमधून महादेव बाबर निवडून आले होते. त्यामुळे शिवसेनेला वाढून मिळालेल्या जागांमध्ये कोथरूड व हडपसरची जागा मिळावी, असा आग्रह शिवसेनेकडून राहण्याचीहि शक्‍यता पक्षातील काही जणांनी  व्यक्त केली आहे.याशिवाय काहींचे मत असेही आहे कि आता कोथरूड मध्ये भाजपचे प्राबल्य आहे त्यामुळे कोथरूड भाजपकडेच राहील आणि वडगाव शेरी च्या जागे साठी महापालिकेतील गटनेते संजय भोसले आग्रही असल्याने त्यांच्या साठी वडगाव शेरीच्या जागेचा आग्रह धरला जाईल .

 अखेरीस चार नाही तर पुण्यातून किमान तीन जागा सोडण्याचा आग्रह शिवसेनेकडून होणार आहे,असा अनेकांचा विश्वास आहे. जर बापट लोकसभा लढले नाहीत तर त्यात हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी असा शिवसेनेचा आग्रह राहील असे बोलले जाते .

महादेव बाबर हडपसरमधून तर चंद्रकांत मोकाटे कोथरूडमधून युतीचे आमदार होते. हे दोघे आता माजी आमदार असून पुणे शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत.  मात्र कोथरूड हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. .कोथरूडमधून निवडून आलेल्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात कामाचा झपाटा लावला आहे. त्यामुळे इतका भक्कम मतदाररसंघ शिवसेनेसाठी सोडण्यास भाजपा सहजासहजी तयार होईल, असे वाटत नाही. हडपसरमध्ये भाजपचा पहिल्यांदाच आमदार झाला आहे. येथे पक्षाच्या नगरसेवकांची संख्या जास्त आहे. टिळेकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आहेत.मात्र मनसे च्या वसंत मोरेंच्या उमेदवारीने त्यांना मोथे आवाहन निर्माण केले आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर चा धोका पत्करायचा कि नाही यावर पक्षाला निर्णय घ्यावा लागणार आहे .

हा मैं हू खलनायक !!!

0

नुकताच अभिनेता स्वप्नील जोशीची मुख्य भूमिकेत असलेला ‘मी पण सचिन’ नावाचा सिनेमा चित्रपट गृहात प्रदर्शित झालाय .या सिनेमात नायकाबरोबर विशेष लक्षात राहिला आहे तो म्हणजे या चित्रपटातील खलनायक . तर हा खलनायक दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे अभिनेता अभिजीत खांडकेकर . अभिजीत खांडकेकर  झी मराठी वरील माझ्या नवऱ्याची बायको या सुपर हिट मालिकेतून घराघरात पोचलेला . हा गुणी कलाकार त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेच पण त्याचा गोड स्वभाव , कामासाठीचा असलेला त्याचा प्रोफेशनल ऍप्रोच आणि मुख्य म्हणजे मिळालेली कोणतीही भूमिका अतिशय मेहनतीने करणे यासाठीसुद्धा तो इंडस्ट्रीमध्ये ओळखला जातॊ. मी पण सचिन मधली त्याची खलनायकाची भूमिका त्याचा आवेश या सगळ्यांना प्रेक्षकांबरोबरच चित्रपट समीक्षकांनी सुद्धा दाद दिलीय .

मूळचा गोड स्वभाव असेलेला सगळ्यांचा आवडता गॅरी म्हणजेच अभिजीतने अनेक मराठी सिनेमे आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे . एक उत्तम कलाकार आणि आजपर्यत नायकाच्या भूमिकेत दिसलेला अभिजीतने खलनायकही तेवढ्याच ताकदीने वठवला . यात महत्वाचं असं की या क्षणाला छोट्या पडद्यावर तो नायकाच्या भूमिकेत दिसत असून मोठ्या पडद्यावर तो खलनायकाच्या भुमिकेत दिसत आहे .आणि दोन्ही भूमिका प्रेक्षकांना आवडल्या आहेत .

नायक आणि खलनायक एकाचवेळी रागवण्याबद्दल अभिजीत ला विचारले असता अभिजीत म्हणाला , ‘एकाच वेळी नायक आणि खलनायक किंबहुना या दोन्हीमधली मधली काहीतरी वेगळी छटा मला रंगवायला मिळत आहे . त्यामुळे कलाकार म्हणून मला नेहमी वाटतं जे माझ्या वाट्याला काम येईल त्याला मी पूर्णपणे न्याय दिला पाहिजे . सध्या मी नायक आणि खलनायक या दोन्ही रंगवणं चॅलेंजिंग वाटतं . आणि भविष्यात अजून अशी चॅलेंजेस मिळावी ही आशा करत होतो’

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिका-यांनी कर्तव्ये जबाबदारीने पार पाडावीत-उपजिल्हाधिकारी ज्योत्स्ना हिरेमुठ

0

बारामती  :- आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नव्याने करण्यात आलेल्या मतदानप्रकीयेतील सुधारणांची ‍ माहिती घेवून क्षेत्रीय अधिका-यांनी आपली कर्तव्ये पार पाडावीत, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योत्स्ना ‍हिरेमुठ यांनी आज केले. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हयातील ‍ बारामती लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिका-यांसाठी पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन तहसिल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिल्पा करमळकर,तहसिलदार हनुमंत पाटील, प्रशिक्षण अधिकारी निलेश खांडगे, रवींद्र रापतवार, नायब तहसिलदार आर.सी.पाटील, संजय पांढरपट्टे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी हिरेमुठ यांनी क्षेत्रीय अधिका-यांना निवडणूकविषयक कामे जबाबदारीने करावीत तसेच नवीन मार्गदर्शक सूचनांची माहिती घेवून त्याचे पालन करावे. अशा सूचना करुन नवीन मशीनची हाताळणी योग्य पध्दतीने कशी करावी, क्षेत्रीय अधिका-यांचे अधिकार व कर्तव्ये त्याचबरोबर मतदानपूर्व मतदान केंद्राबाबत व मतदानपूर्व असुरक्षित मतदान केंद्राबाबत तसेच मतदानाच्या पूर्वसंध्येला पार पाडावयाच्या जबाबदा-या, C-VIGIL ॲप, तसेच निवडणूकविषयक कामामध्ये क्षेत्रीय अधिका-यांनी घ्यावयाची खबरदारी त्याचबरोब दिव्यांग मतदारांच्या सोईकरीता सर्वच क्षेत्रीय अधिका-यांनी त्यांच्या मतदान केंद्रामध्ये नोंदणी असलेल्या दिव्यांग मतदारांचा तपशील तपासून त्यांच्याकरीता रॅम्प व इतर आवश्यक सोई सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना मतदान करण्याकरीता प्राधान्य देण्यात यावे याविषयांवर मार्गदर्शन करुन क्षेत्रीय अधिका-यांच्या शंकेचे निरसन केले.
यावेळी ‍ निवडणूक प्रशिक्षण अधिका-यांकडून उपस्थित क्षेत्रीय अधिका-यांना ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट मशीन हाताळणीविषयक प्रशिक्षण देखील देण्यात आले.

फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील निरोप समारंभ

0

पुणे-फर्ग्युसन कनिष्ठ महाविद्यालयातील इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरोप समारंभाच्या अल्पोपहारासाठी ठेवलेला निधी ‘पुलवामा’ येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी दिला. त्या प्रसंगी SIRF (soldier independent rehabilitation foundation)च्या सुमेधा व योगेश चिंधडे यांना २५०००/- रु. चा धनादेश सुपूर्त करण्यात आला. शिक्षकांनीही व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उस्फुर्तपणे जमा केलेली रक्कम त्यांना सुपूर्त करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, उपप्राचार्य एन.ए. कुलकर्णी, पर्यवेक्षिका डॉ. सविता केळकर तसेच पालक शिक्षक संघाच्या रुबिना शेख व श्री. संजय रसाळ व शिक्षकांपैकी श्री. जगदीश पाटील व सौ. उज्ज्वला गोरे उपस्थित होते. सुमेधा चिंधडे यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या  उस्फुर्त प्रतिसादाबद्दल त्यांना शाबासकी दिली. डॉ. शरद कुंटे याप्रसंगी म्हणाले की, आम्हाला या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो, तर प्रायार्यांनी, विद्यार्थ्यांना उत्तम नागरिक म्हणून घडविण्याच्या यशस्वी प्रयत्नाबद्दल पालकांचे अभिनंदन केले

मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव करा : विखे पाटील म्हणाले …

0

पुणे- पुण्यात भाजपकडून पोलीस यंत्रणेचा गैरवापर केला जात असून मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव करा अशी मागणी राज्यातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली .
महापालिकेतील जलपर्णी घोटाळ्यासंदर्भात आंदोलन करताना कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या चुकीचे मी समर्थन करणार नाही ,पण या संदर्भात संबधित अधिकाऱ्याची चौकशी होऊन त्यावर कारवाई झाली पाहिजे असे सांगत विधानसभेतील विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात भाजप कडून  पोलीस यंत्रणेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोप केला आणि मस्तवाल आधिकाऱ्यांना अटकाव सरकारने करावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने अटकाव करू असा इशारा हि दिला ..नेमके विखे पाटील काय म्हणाले ते ऐका आणि पहा ….

चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर

0
पुणे : नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशन आणि मराठी चित्रपट परिवारतर्फे आयोजित ९ व्या चित्रपदार्पण पुरस्कारांची नामांकने जाहीर करण्यात आली. यामध्ये रेडू, चुंबक आणि हॉस्टेल डेज या चित्रपटांना सर्वाधिक नामांकने मिळाली आहेत. रेडू, मंत्र, चिठ्ठी, चुंबक, अबक, फर्जंद, पुष्पक विमान या चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी स्पर्धा आहे. सागर वंजारी (रेडू), दिग्पाल लांजेकर (फर्जंद), हर्षवर्धन (मंत्र), राम शेडगे (अबक), संदिप मोदी (चुंबक), वैभव डांगे (चिठ्ठी) वैभव चिंचाळकर (पुष्पक विमान) यांच्यामधून सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरणार आहे, अशी माहिती डिव्हाईन कॉज सोशल फौंडेशनच्या प्रमुख प्रिती व्हिक्टर आणि सुनंदा काळुसकर यांनी दिली.
सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागासाठी शुभंकर एकबोटे (चिठ्ठी), सौरभ गोगटे (मंत्र), सुव्रत जोशी (शिकारी), अंकित मोहन (फर्जंद), साहिल जाधव (चुंबक) यांना नामांकने मिळाली आहेत, तर अभिनेत्रीसाठी प्रणाली घोगरे (रणांगण), तृप्ती तोरडमल (सविता दामोदर परांजपे), नेहा खान (शिकारी), मालविका गायकवाड (मुळशी पॅटर्न ), गौरी किरण (पुष्पक विमान), धनश्री काडगांवकर (चिठ्ठी), गायत्री जाधव (बबन) यांच्यामध्ये चुरस आहे. नॉन फिल्मी म्युझिक अल्बम विभागामध्ये यु अ‍ॅन्ड मी (व्हिडीओ पॅलेस), चल ऊसामंदि जाऊ, झिलमिल, तू नसताना रिमझिम रिमझिम, हलकेच निळा घन आला, साहिबा या गाण्यांना विविध विभागामध्ये नामांकने मिळाली आहेत. सर्वोत्कृष्ट कथा, पटकथा, संवाद यांसह २२ विविध विभागांध्ये पुरस्कार देण्यात येणार आहेत

व्हीके शॉटगन कप’ राष्ट्रीय स्पर्धेत लक्ष्य शेरॉन व सौम्या गुप्ता ला सुवर्ण

0

विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमी तर्फे राष्ट्रीय शॉटगन ट्रॅप शुटींग स्पर्धेचे बालेवाडी स्टेडियम आयोजन

ऑलिंपिक, खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त सहा खेळाडू सहभागी

‘व्हीके शॉटगन कप’ साठी देशभरातील 50 नामांकित शुटर्सचा सहभाग

पुणे: विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीच्या वतीने राष्ट्रीय शॉटगन ट्रॅप शुटींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या ‘व्हीके शॉटगन कप’ मध्ये पुरुष गटात लक्ष्य शेरॉन ने सुवर्ण, अन्वर सुलतानने रौप्य व रियान रिझवीने कास्य पदक पटकाविले. महिला गटात सौम्या गुप्ताने सुवर्ण, शगुन चौधरीने रौप्य तर, श्रेयसी सिंगने कांस्य पदक मिळविले.

विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीच्या वतीने आयोजित ‘व्हीके शॉटगन कप’ या राष्ट्रीय शॉटगन ट्रॅप शुटींग स्पर्धेसाठी देशभरातील नामांकित 50 हून अधिक शुटर्स सहभागी झाले होते. ऑलिंपिक, कॉमनवेल्थ, एशियन चॅम्पियनशीपसह राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेले आणि खेलरत्न व अर्जुन पुरस्काराने सन्मानित सहा खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात लक्ष्य शेरॉन ने 46 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला, दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या अन्वर सुलतानला 39 तर, तिसऱ्या क्रमांकावरील रियान रिझवीला 33 गुण मिळाले. महिला गटात सौम्या गुप्ताला 40 गुण, शगुन चौधरीला 38 आणि श्रेयसी सिंगला 29 गुण मिळाले. त्यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक पटकाविले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, ग्रॅव्हिटस फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा उषा काकडे, पोलीस उपायुक्त श्रीकांत पाठक, कोमल देशमुख, मालपाणी ग्रुपचे संचालक आशिष मालपाणी, अर्जुन व खेलरत्न पुरस्कार विजेते मानवजीतसिंग संधु, अर्जुन पुरस्कार विजेते मनशेर सिंग, अन्वर सुलतान व श्रेयसी सिंग आणि ऑलिंपिक मध्ये खेळलेली पहिली महिला शगुन चौधरी उपस्थित होते.

‘व्हीके शॉटगन कप’ स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी बालेवाडी येथील विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीमध्ये पार्थ पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अर्जुन व खेलरत्न पुरस्कार विजेता आणि चारवेळा ऑलिंपिक खेळलेले मानवजीत सिंग संधु, अॅकॅडमीचे प्रमुख विक्रम काकडे, रोहन देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शुटींग अॅकॅडमीचा उपयोग देशातील शुटींग स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडू निर्माण करण्यासाठी निश्चित होईल. सर्व सुविधांयुक्त ही अॅकॅडमी खेळाडुंसाठी उपयुक्त ठरेल. विक्रम काकडे हे क्रीडा क्षेत्रात अतिशय चांगलं काम करीत आहेत, असे पार्थ पवार यांनी उद्घाटनप्रसंगी सांगितले.

ऑलिंपिकसारख्या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविण्यासाठी देशात मुलभूत सुविधा हव्या आहेत. विक्रम काकडे शुटींग अॅकॅडमीच्या माध्यमातून खेळाडुंना चांगल्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याप्रकारच्या स्पर्धांचा फायदा देशासाठी सर्वोत्कृष्ठ खेळाडू निर्माण करण्यासाठी निश्चित होईल, असे चारवेळा ऑलिंपिक खेळलेला अर्जुन व खेलरत्न पुरस्कार प्राप्त मानवजीत सिंग संधु यांनी यावेळी सांगितले.

या स्पर्धेमध्ये ऑलिंपिक स्पर्धा खेळलेले, खेलरत्न व अर्जुन पुरस्काराने सन्मानित झालेले सहा शुटर्स खेळाडू सहभागी झाले. देशपातळीवर प्रथमच एवढ्या मोठ्या स्तरावरील शॉटगन ट्रॅप शुटींगची स्पर्धा पुण्यात झाली. शॉटगन ट्रॅप शुटींग प्रकारात देशाला ऑलिंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारे खेळाडू घडविण्यासाठी ही अॅकॅडमी सुरु केली आहे. ऑलिंपिकसाठी खेळायला जाणाऱ्या काही खेळाडूंचा संपूर्ण खर्च अॅकॅडमीच्या वतीने करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील गुणवान खेळाडूंना मोफत प्रशिक्षण अॅकॅडमीतर्फे दिले जाणार आहे. खेळामध्ये जगात देशाची मान उंचावण्यासाठी आणि देशाला शुटींग स्पर्धेत जागतिक स्तरावर गौरव प्राप्त करुन देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचाच भाग म्हणून देशपातळीवर इतक्या मोठ्या स्तरावर पहिल्यांदाच अशी स्पर्धा पुण्यातील बालेवाडी क्रीडानगरीत आयोजित केली. पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात आणखी उंचावण्याठी हा अल्पसा प्रयत्न सर्वांच्या मदतीने केला आहे, असे विक्रम काकडे यांनी यावेळी सांगितले.

तुटता..तुटता..जुळलं हो.. भाजप सेना युतीची झाली ‘ मन से ‘ घोषणा(व्हिडीओ)

0

मुंबई- शिवसेना आणि भाजपचं तुटता..तुटता..जुळलं आहे.आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांत अखेर युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत केली. यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.वरळी येथील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये आयोज‍ित संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात होण्यापूर्वीअमित शहा यांनी शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या तर उद्धव ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढणार आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत ‘फिफ्टी-फिफ्टी’ अर्थात 144/144 जागा लढवणार आहे.काही मुद्द्यांमुळे भाजप-शिवसेनेमध्ये मतभेद आहे. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. राज्यातील शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे कर्जमाफीपासून वंचित शेतकर्‍यांना लाभ मिळणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. शेतकरीहिताच्या न‍िर्णयांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पीकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील नाणार प्रकल्पाची जागेबाबत स्थान‍िकांना विश्वासात घेण्यात येणार आहे.शिवसेना आणि भाजपमध्ये पदासाठी नव्हे तर जनहितासाठी चर्चा झाली. मुंबईतील 500 चौरस फुट  घरांना कर लागणार नाही.

दरम्यान, अमित शहा यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये युतीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 45 मिनि‍टे चर्चा झाली. विशेष म्हणजे त्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे एकाच गाडीतून पत्रकार परिषदेच्या ठिकाणी अर्थात वरळी सीफेस येथील हॉटेल ब्लू सीमध्ये पोहोचले. गाडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे देखील बसले होते.

पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण मुद्दे..

काही मुद्द्यांमुळे भाजप-शिवसेने मध्ये मतभेद- मुख्यमंत्री

 दोन्ही पक्षांमध्ये हिंदुत्त्वाचा दुवा- मुख्यमंत्री

 लोकसभा-विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेनेत युती, मुख्यमंत्र्यांकडून युतीची घोषणा

 शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना आग्रही- मुख्यमंत्री

 कर्जमाफीपासून वंचित शेतकर्‍यांना लाभ मिळणार- मुख्यमंत्री

 शेतकरीहिताच्या न‍िर्णयांना प्राधान्य देण्यात येणार- मुख्यमंत्री

 पीकविम्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार- मुख्यमंत्री

 कोकणातील नाणार प्रकल्पाची जागा बदलणार, स्थान‍िकांना विश्वासात घेणार

 दोन्ही पक्षात जनहितासाठी झालेली चर्चा- मुख्यमंत्री

 मुंबईतील 500 चौरस फुटाच्या  घरांना कर नाही

लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 तर भाजप 25 जागा लढणार

 विधानसभा निवडणुकीत फिफ्टी-फिफ्टीचे सूत्र

पालघरची जागा शिवसेनेला दिली जाईल. जागावाटपातही फिफ्टी-फिफ्टी’चे सूत्र असेल. उपमुख्यमंत्रिपद मात्र नसेल. मुख्यमंत्रिपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन्ही पक्षांतील आघाडीची बोलणी आता जागावाटपापर्यंत नेली आहे. यासाठी दिल्लीपासून मुंबईपर्यंत दोन्ही पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांच्या सतत बैठका सुरू आहेत. शरद पवारही स्वतः माढ्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज आहेत.

असे असेल सूत्र
– उद्धव ठाकरे यांनी पालघरचे स्वर्गीय आमदार चिंतामण वनगा यांच्या मुलाला खासदार करण्याचे आश्वासन दिले असल्याने शिवसेना पालघरसाठी आग्रही होती.
– अखेर काँग्रेसमधून भाजपमध्ये येत खासदार झालेल्या राजेंद्र गावित यांच्या नावावर फुली मारून मुख्यमंत्र्यांनी पालघर शिवसेनेला देण्याचे मान्य केले.
-युती झाल्यानंतर सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रिपद नसेल आणि शिवसेना-भाजपला अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचा कालावधी देण्याबाबत सहमती.

भाजपने सेनेला युतीसाठी इडीची भीती घातली कि चिरीमिरी ? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल

0

पुणे- भाजपने सेनेला युतीसाठी इडीची भीती घातली कि चिरीमिरी द्यायचा प्रयत्न केला ?असा सवाल तिकडे मुंबईत सेना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांत युतीसाठी बैठक होत असताना पुण्यात कॉंग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी पत्रकार परिषदेतून केला .ज्यांनी भाजपवर आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रचंड टीका केली.जे कालपर्यंत एकमेकांची औकात काढत होते, जबड्यात हात घालून दात मोजण्याची भाषा करीत होते, तेच आज पुन्हा केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालायला निघाले आहेत. ही युती महाराष्ट्राच्या जनतेची मोठी फसवणूक आहे. पण महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. अशा अनैतिक, अभद्र आणि स्वार्थी, मतलबी युतीला धडा शिकवायचा, हे जनतेने अगोदरच ठरवून टाकले आहे, असा इशाराही विखे पाटील यांनी यावेळी दिला. चारच महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंनी भाजपला निर्लज्ज म्हटले होते. ‘चौकीदार चोर है’चा नाराही त्यांनी बुलंद केला होता. अगदी आजसुद्धा सामनाच्या अग्रलेखात भाजप पुलवामातील शहिदांच्या मढ्यावरचे लोणी खात असल्याचे शिवसेनेने म्हटले होते,त्यांनी चर्चेला जाणे म्हणजे मांडवली करायला जाणे होय  असे सांगत पहा आणि ऐका राधाकृष्ण विखे पाटील नेमके काय म्हणाले …. 

अभ्यासातील सातत्य, सराव हेच यशाचे गमक-शादाब हुसेन

0
पुणे : “कोणत्याही परीक्षेच्या अभ्यासातील सातत्य, सराव हेच यशाचे गमक असते. नियोजनबद्ध अभ्यास, नियमित केलेला सराव, स्वयंअध्ययन आणि बदलत्या गोष्टींबाबत स्वतःला ‘अपडेट’ ठेवल्यानेच कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल परीक्षेत प्रथम क्रमांकाचे यश मिळवू शकलो. त्यामुळे या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासातील सातत्य आणि सरावाला महत्व द्यावे,” असा सल्ला सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला आलेल्या राजस्थान येथील सीए शादाब हुसेन याने विद्यार्थ्यांना दिला.
पुण्यातील व्हीस्मार्ट अकॅडमीतर्फे सनदी लेखापाल (सीए) परीक्षेत देशात पहिला आलेल्या शादाब हुसेन व संयुक्तपणे तिसरा आलेले सीए जय बोहरा आणि सीए पुलकित अरोरा यांच्यासह गुणवत्ता यादीत आलेल्या ३६ यशस्वीतांचा सत्कार करण्यात आला. शिवदर्शन पर्वती येथील मुक्तांगण शाळेच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी व्हीस्मार्ट अकॅडमीचे संस्थापक सीए विशाल भट्टड, संचालक राजेश राकेश, संचालक डॉ. उज्ज्वल भट्टड, संचालिका भारती राकेश सीए प्रा. दर्शन खरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रस्त्यावरील आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या ‘सार्थक’ संस्थेला एक लाखाची देणगी व्हीस्मार्ट अकॅडमीच्या वतीने देण्यात आली.
शादाब हुसेन म्हणाला, “सीएची परीक्षा दहावी-बारावीपेक्षाही कठीण आहे. १२-१३ तासांचा अभ्यास, नवीन माहितीची जाण, भाषेवरील प्रभुत्व आणि तणावमुक्त सराव यामुळे यशस्वी झालो. इतर शाखेतील मुलांशी संवाद साधला, तर अभ्यासातील ताण कमी होतो. व्हीस्मार्ट अकॅडमीने सरावासाठी भरपूर साहित्य आणि मार्गदर्शन दिल्याचा मला फायदा झाला.”
पुलकित अरोरा म्हणाला, “कठोर परिश्रम घेतले, तर यश हमखास मिळते. आत्मविश्वास आणि प्रोत्साहन गरजेचे असते. शिवाय, अशा स्पर्धात्मक परीक्षांत ‘शॉर्टकट’ नसतो. त्यामुळे आपल्यातील क्षमता ओळखून जे विषय अवघड वाटतात, त्यावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करावा. सातत्य आणि इच्छाशक्ती आपल्याला यशाच्या शिखरावर नेते.”
सीए विशाल भट्टड म्हणाले, “सीए परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांकडून प्रेरणा मिळावी. त्यांच्या यशाचा मार्ग समजावा, या उद्देशाने सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाच्या पद्धती व्हीस्मार्ट पुरवते. व्हीस्मार्ट’च्या माध्यमातून देशात ३६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा विक्रम केला, ही अभिमानाची बाब आहे.”
सीए विजय सारडा व मुग्धा गोखले यांनी सूत्रसंचालन केले. सीए दर्शन खरे यांनी आभार मानले.