Home Blog Page 299

साडेनऊशे पेक्षा अधिक अनाधिकृत होर्डिंग पीएमआरडीएची कारवाई सुरु-विरोध केला तर पोलीस कारवाई -आयुक्त

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीत केलेल्या सर्वेक्षणात साडेनऊशे पेक्षा अधिक अनाधिकृत होर्डिंग असल्याचे समोर आले आहे. त्यावर कारवाई सुरू असून या कारवाईला विरोध / अडथळा निर्माण करणाऱ्याविरुद्ध थेट गुन्हे नोंदवणार असल्याची भूमिका पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी घेतली आहे. महानगर आयुक्त यांनी गुरुवारी विभागप्रमुखांची आढावा बैठक घेत, पीएमआरडीए हद्दीतील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढण्याचे निर्देश दिले.

पीएमआयडीएने केलेला सर्वेक्षणात ९६७ अनाधिकृत होर्डिंग आढळून आले आहे. त्यातील जवळपास ९० होर्डिंग अनाधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या माध्यमातून काढण्यात आले आहे. रहदारीस अडथळा आणणाऱ्या तसेच लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल अशा अनाधिकृत होर्डिंगवर सोमवारपासून (दि.२६) धडक कारवाईचे निर्देश महानगर आयुक्त डॉ. म्हसे यांनी दिले आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाखो भाविक पालखी मार्गावरून जात असतात. या मार्गावरील अनाधिकृत होर्डिंग तातडीने काढावेत. यासह उर्वरित होर्डिंगसाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करून ते दोन महिन्यात कसे काढले जातील, त्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश यावेळी डॉ. म्हसे यांनी दिले. पावसाळ्याच्या दृष्टिकोनातून पीएमआरडीए हद्दीतील नालेसफाईला प्राधान्य देत नदी – नाल्याचा प्रवाह मार्गात असलेले राडारोडा दूर करावा. जेणेकरून त्या हद्दीतील नागरिकांना पुराचा धोका निर्माण होणार नाही.

यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, दक्षता अधिकारी तथा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, विकास परवानगी व नियोजन विभागाचे संचालक सुनील मरळे, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या सह आयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, सह महानगर नियोजनकार श्वेता पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, रवींद्र रांजणे यांच्यासह अनधिकृत होल्डिंग काढणाऱ्या संबंधित एजन्सीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हानी झाल्यास गुन्हा नोंदवणार
ज्या ठिकाणी अनाधिकृत होडींमुळे कुठली मनुष्यहानी किंवा इतर काही दुर्घटना घडल्यास त्यास संबंधित जागामालक आणि जाहिरात एजन्सीला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत सणसवाडी आणि भुकूम या ठिकाणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहे.

ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केली नियुक्ती

गुरुग्राम,: ज्युनिपर ग्रीन एनर्जीने अंकुश मलिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे.

वीज क्षेत्रात 15 वर्षांपेक्षा अधिक अनुभव असलेले अंकुश मलिक हे नेतृत्वक्षमता, धोरणात्मक अंमलबजावणी आणि सखोल औद्योगिक ज्ञान यासाठी ओळखले जातात. 12 नोव्हेंबर 2018 पासून त्यांनी ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतिपथावर महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असून, 30 एप्रिल 2024 रोजी त्यांची मुख्य परिचालन अधिकारी (COO) म्हणून संचालक मंडळात नियुक्ती झाली होती. त्यांच्या नेतृत्वामुळे कंपनीच्या शाश्वत भविष्यासाठी स्वच्छ ऊर्जा समाधान पुरविण्याच्या मिशनला अधिक गती मिळाली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) या नव्या भूमिकेत श्री. अंकुश मलिक हे कंपनीच्या दीर्घकालीन वृद्धीच्या धोरणाचे नेतृत्व करतील, तसेच कंपनीच्या सर्व कामकाजांवर, व्यवसाय विकासावर, प्रकल्प विकासावर, बांधकाम प्रक्रियेवर आणि नियामक बाबींवर देखरेख ठेवतील. भारताच्या विकसित होत असलेल्या नवीकरणीय ऊर्जा बाजारात आपली उपस्थिती आणि प्रभाव वाढविण्याच्या उद्दिष्टाने ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या वाटचालीत ही नियुक्ती एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.

आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया देताना अंकुश मलिक म्हणाले, “ही जबाबदारी स्वीकारताना मला अत्यंत सन्मान वाटतो आणि माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी संचालक मंडळाचा आभारी आहे. भारत सध्या ऊर्जा क्षेत्रातील मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यावर आहे आणि अशा वेळी ज्युनिपर ग्रीन एनर्जी भारतात वेगाने वाढणाऱ्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राचा फायदा घेण्यासाठी उत्तम स्थितीत आहे. आपल्या सर्व भागीदारांसोबत आणि टीमसोबत काम करत दीर्घकालीन व शाश्वत मूल्यनिर्मिती करण्यासाठी मी उत्सुक आहे.”

अंकुश मलिक हे आयआयटी दिल्ली आणि आयआयएम लखनौचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी ऑरेंज रिन्युएबल पॉवरमध्ये नेतृत्व पदे भूषविली असून, आयसीआयसीआय बँक आणि लांको इन्फ्राटेकमध्येही मोलाचा अनुभव मिळविला आहे. व्यवसाय विकास, नियामक बाबी आणि कार्यात्मक धोरण, यामध्ये त्यांना सखोल ज्ञान असून, ज्युनिपर ग्रीन एनर्जीच्या प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी ते पूर्णपणे सक्षम आहेत.

श्री. मलिक यांचे त्यांच्या नव्या भूमिकेत स्वागत करताना मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) पराग अग्रवाल म्हणाले, “अंकुश यांची CEO पदावर झालेली बढती ही त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचे नैसर्गिक extension आहे. क्षेत्रातील त्यांचा सखोल अभ्यास, अंमलबजावणीवर असलेला भर आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व या सर्व गुणांमुळे ते ज्युनिपर ग्रीन एनर्जीला पुढील वाढीच्या टप्प्यावर नेण्यासाठी योग्य निवड ठरतात. भविष्यकालीन आणि सक्षम ऊर्जा कंपनी उभारण्यासाठी त्यांच्यासोबत काम करण्याची मला उत्सुकता आहे.”

युरेका फोर्बज् तर्फे स्वच्छ, आरोग्यदायी भारतासाठी श्रद्धा कपूरची ब्रँड अॅम्बेसडर म्हणून नियुक्ती

ही धोरणात्मक भागीदारी भारतातील घरांमध्ये स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी प्रेरणा देणाऱ्या ब्रँडच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे

आरोग्य आणि स्वच्छता उद्योगातील भारतातील आघाडीची कंपनी युरेका फोर्बज् लिमिटेडने त्यांच्या प्रतिष्ठेच्या व्हॅक्युम क्लिनर्सच्या श्रेणीसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूरला ब्रँड अॅम्बेसडर म्हणून घोषित केले आहे. चार दशकांहून अधिक काळ लाखो भारतीय घरांमध्ये विश्वासार्हतेने सेवा देणाऱ्या या कॅटेगरी लीडरच्या या सहयोगामुळे युरेका फोर्बज्च्या स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैलीसाठी घेतलेल्या वचनबद्धतेत महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे.

व्हॅक्युम क्लिनिंगच्या क्षेत्रात बाजारपेठेतील अग्रणी आणि चार दशकांहून अधिक काळ जपलेल्या परंपरेसह युरेका फोर्बज्ने भारतीय घरांमध्ये नेहमीच अत्याधुनिक गृह स्वच्छता तंत्रज्ञान आणले असून त्याला अतुलनीय सर्व्हिस नेटवर्कचा आधार आहे. नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक  व्हॅक्युम क्लिनर्स शक्तिशाली सक्शन आणि वेट मॉपिंग यांचे एकत्रीकरण करून सहजतेने फरशी चकाचक करतात. AI आणि नेक्स्ट-जेन LiDAR तंत्रज्ञानाद्वारे ही स्मार्ट उपकरणे अचूकता, बुद्धिमत्ता आणि अतुलनीय सुविधा पुरवितात. श्रद्धा कपूरसोबत भागीदारी करताना युरेका फोर्बज्चे उद्दिष्ट आजच्या तरुण, शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे आहे. ते स्मार्ट आणि आरोग्यदायी जीवनशैलीला महत्त्व देतात. या भागीदारीद्वारे युरेका फोर्बज् घरांना स्वच्छ आणि आरोग्यदायी उपाय सुविधांनी सक्षम करणे हे आपले ध्येय अधिक बळकट करत आहे.

युरेका फोर्बज् सोबतच्या आपल्या सहभागाबाबत बोलताना श्रद्धा कपूर म्हणाली, “युरेका फोर्बज् कुटुंबाचा भाग होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. स्वच्छ घर हा आरोग्यदायी मन आणि शरीराचा पाया असतो असे मला नेहमीच वाटले आहे. आपण ज्या जागांमध्ये राहतो त्या आपल्या दैनंदिन कार्यक्षमतेवर मोठा प्रभाव टाकतात. युरेका फोर्बज् हा ब्रँड दीर्घकाळापासून स्वच्छ आणि आरोग्यदायी जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करत आला आहे आणि स्वच्छ राहणीमान हे आपले कायमस्वरूपी ध्येय असलेल्या ब्रँडसोबत जोडले जाणे मला अभिमानास्पद वाटते. फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स सारखी नाविन्यपूर्ण उत्पादने बुद्धिमान तंत्रज्ञान आणि सहज, सुलभता यांचा मिलाफ आहेत. त्याद्वारे युरेका फोर्बज् घरगुती स्वच्छतेचे भविष्य नव्याने परिभाषित करत आहे. मला खरोखर आशा आहे की आपण एकत्र मिळून अधिकाधिक लोकांना ही जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करू शकू.”

युरेका फोर्बज् लिमिटेडचे मुख्य विकास अधिकारी श्री. अनुराग कुमार म्हणाले, “युरेका फोर्बज् कुटुंबात व्हॅक्युम क्लिनर्सच्या ब्रँड अॅम्बेसडर म्हणून श्रद्धा कपूरचे स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. सजग जीवनशैली, स्मार्ट निवडी आणि उद्देशपूर्ण नाविन्यपूर्ण उपक्रमांना महत्त्व देणाऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व ती करते. या सर्व गोष्टी आमच्या ब्रँडच्या मूल्यांशी सुसंगत आहेत. युरेका फोर्बज् मध्ये आम्ही 40 वर्षांहून अधिक काळ घरगुती स्वच्छतेच्या उपाययोजनांमध्ये अग्रगण्य आहोत आणि आमच्या नवीन फोर्बज् स्मार्ट क्लिन रोबोटिक्स रेंजसह आम्ही आजच्या घरांमध्ये सहजतेने मिळवू शकणाऱ्या स्वच्छतेचे स्वरूपच बदलून टाकत आहोत. श्रद्धाचा प्रामाणिकपणा आणि आताच्या काळातल्या भारतीय घरांशी असलेली तिची घट्ट नाळ तिला आमच्या ‘एक स्मार्ट घर, एक स्वच्छ भारत’ या प्रवासासाठी परिपूर्ण सहयोगी बनवते.”

ग्राहक-केंद्रित दृष्टीकोनासह युरेका फोर्बज् नेहमीच अशा नाविन्यपूर्ण, सहज समजणाऱ्या आणि कार्यक्षम व्हॅक्युम क्लिनर्सद्वारे बाजारपेठेमध्ये अग्रणी राहिला आहे. हे व्हॅक्युम क्लिनर्स घरगुती स्वच्छता सुलभ आणि प्रभावी बनवतात. रोबोटिक क्लिनर्सपासून डीप-क्लिनिंग व्हॅक्युम्सपर्यंतच्या विस्तृत श्रेणीसह या ब्रँडने आधुनिक घरांच्या सतत बदलणाऱ्या गरजांनुसार स्वतःला सतत विकसित केले आहे.

तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रावीण्य ठरते – धीरज घाटे

वस्ती विभागातील मुलांना खेळाचे साहित्य व गोष्टीची पुस्तकं देऊन भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्षांचा आगळावेगळा सत्कार – संदीप खर्डेकर.

पुणे :आपला जन्म कोणाच्या घरात झाला, आपण कुठल्या भागात राहतो कुठल्या वस्तीत राहतो हे महत्वाचे नाहीये तर तुमची क्षमता किती आणि तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर तुमचं प्रवीण्य ठरते असे भाजपा चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे म्हणाले.छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर किंवा इतर अनेक मंडळींनी बालपणापासूनच कामाला सुरुवात केली आणि त्यांनी देशात, राज्यात मोठं कार्य केलं असं ही ते म्हणाले.
भाजपचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी धीरज घाटे यांची शहर अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सत्कार करण्याचे ठरविले. त्यानुसार वारजे येथील छत्रपती शाहू महाराज वसाहत येथे सेवाव्रत फाउंडेशन च्या वतीने चालविल्या जाणाऱ्या “वृंदावन शैक्षणिक व सर्वांगीण विकास प्रकल्पातील” मुलांच्या हस्ते धीरजजींचा सत्कार आणि धीरजजींच्या हस्ते मुलांना खेळाचे साहित्य भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळी धीरजजी बोलत होते.
यावेळी प्रकल्प समन्वयक प्रदीप देवकुळे, भाजयुमो क्रीडा आघाडी अध्यक्ष प्रतीक खर्डेकर वस्तीतील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.
आम्ही क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून नेहमीच राजकारणापेक्षा समाजकारणावर भर देतो आणि म्हणूनच धीरजजींच्या अभिनंदनाचे फ्लेक्स लावण्यापेक्षा त्यांच्या हस्ते गरजू मुलांना आवश्यक वस्तू देऊन त्यांचा सन्मान करणे आम्हाला अधिक योग्य वाटले असे भाजप चे प्रदेश प्रवक्ते आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ह्या प्रकल्पाला भेट दिली तेव्हा मुलांनी आम्हाला खेळाचे साहित्य द्या अशी मागणी केली, त्यानुसार धीरजजींच्या हस्ते क्रिकेट बॅट बॉल, बास्केटबॉल, फुटबॉल आणि गोष्टीची पुस्तकं देण्यात आल्याचे संदीप खर्डेकर आणि मंजुश्री खर्डेकर म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत व छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला. तसेच धीरजजींना विविध प्रश्न देखील विचारले.हाच धागा पकडून धीरज घाटे यांनी मुलांशी संवाद साधला आणि ” अनेक मोठ्या कार्यक्रमांना जाण्याचा योग येतो पण हा कार्यक्रम आणि येथे झालेला सत्कार मनाला भावला अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मुलांनी स्वहस्ते बनविलेले ग्रीटिंग कार्ड देऊन धीरज घाटेना शुभेच्छा दिल्या.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण

बारामती,: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थेकरिता उद्योजकांच्यावतीने देण्यात आलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीकरिता १ हजार लिटर क्षमतेच्या ६० टाक्या वितरित करण्यात आल्या.

पंचायत समिती परिसरात आयोजित कार्यक्रमाच्यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारामती प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, गट शिक्षण अधिकारी निलेश गवळी, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुशीलकुमार सोमाणी, उद्योजक आदी उपस्थित होते.

श्री. पवार म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, याकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने बारामती तालुक्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्रे, प्राथमिक शाळा आणि पशुसंवर्धन दवाखान्यांना १ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाक्यांचे वाटप करण्यात आले. यामुळे अंगणवाडीतील बालक, विद्यार्थी, कर्मचारी तसेच नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळणार आहे.

आगामी मान्सून काळात स्थानिक पातळीवर स्वच्छता, पाणी, आजारांवर त्वरित उपचार, आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी आदी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना ग्रामपंचायतींनी कराव्यात, अशा सूचना श्री. पवार यांनी यावेळी केल्या.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते शरद सूर्यवंशी, खंडु गायकवाड, सुरेश परकाळे, दिलीप भापकर, प्रशांत जगताप आणि शंकर साळुंखे या उद्योजकांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला.

एमआयडीसी प्रादेशिक कार्यालय आणि पंचायत समिती यांचा संयुक्त प्रयत्न

उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद

बारामती पंचायत समितीच्यावतीने तालुक्यातील अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक शाळा, पशुसंवर्धन दवाखाने शासकीय संस्थांना पिण्याच्या पाणी साठवणूकीकरिता टाक्या मिळण्याबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयाकडे मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यालयाच्यावतीने आवाहन केले असता, उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुरुवातीला या ६० टाक्या उपलब्ध करुन दिल्या आहेत.
0000

गोव्यातील ‘अकेशिया पाम्स’ रिसॉर्ट आता संपूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली

महिलांच्या समावेशासाठी क्लब महिंद्रा पुढाकार

मुंबई : ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड’चा प्रमुख ब्रँड असलेल्या ‘क्लब महिंद्रा’ने एक क्रांतिकारी पाऊल उचलत गोव्यातील अकेशिया पाम्स रिसॉर्टचे रूपांतर पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिसॉर्टमध्ये केले आहे. ‘क्लब महिंद्रा’ संपूर्ण पोर्टफोलिओमधील हे पहिलेच असे रिसॉर्ट असून हा एक ऐतिहासिक टप्पा आहे.

लिंगसमभाव, महिलांचा कामकाजात समावेश आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठीचे योगदान यांविषयी क्लब महिंद्रा किती गंभीर आहे, हे या निर्णयामुळे दिसून येते. या रिसॉर्टचे व्यवस्थापन करण्यापासून क्लबमध्ये येणाऱ्या अतिथींची सेवा करण्यापर्यंतच्या सर्व बाबी केवळ महिलाच सांभाळत आहेत. रिसॉर्ट सांभाळणाऱ्या या महिला विविध पार्श्वभूमीतील आहेत. काहीजणी सुरक्षारक्षक आहेत, तर काहीजणी तांत्रिकी सहाय्य (इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल) अशा अभियांत्रिकी सेवा सांभाळत आहेत. रिसॉर्टमधील उद्यान, स्वयंपाकघर ही ठिकाणेदेखील महिलांच्याच अधिपत्याखाली आहेत. पारंपरिकपणे पुरुषप्रधान असलेल्या क्षेत्रांमध्ये या महिला पहिल्यांदाच काम करीत आहेत. रिसॉर्टमधील कामांमुळे त्या आपले कौशल्य विकसित करू शकत आहेत, एवढेच नव्हे तर आपले करिअरही घडवू शकत आहेत. या उपक्रमामुळे आतिथ्य क्षेत्रात अधिक समावेशक व न्याय्य कार्यसंस्कृती निर्माण होईल आणि जागतिक पातळीवर एक आदर्श उभा राहील.

स्थानिक महिला उद्योजिका व कारागिरांशीही क्लब महिंद्रा सहकार्य करत असून त्यांच्या कौशल्याचा आणि उत्पादनांचा रिसॉर्टच्या सेवा व अनुभवांमध्ये समावेश केला जात आहे. यामुळे स्थानिक समुदायाचा विकास व शाश्वत उपजीविका यांनाही चालना मिळत आहे.

या ऐतिहासिक उपक्रमाविषयी ‘महिंद्रा हॉलिडेज अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज भट म्हणाले, “गोव्यातील आमचे अकेशिया पाम्स रिसॉर्ट आता पूर्णपणे महिलांच्या नेतृत्वाखाली आहे, याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. लिंगसमभाव, समावेश आणि महिला सशक्तीकरणासाठी आमच्या दृढ बांधिलकीचे हे प्रतीक आहे.”

महिंद्रा हॉलिडेजच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख तन्वी चो़कसी म्हणाल्या, “समाजातील कोणत्याही गटाचा खरा समावेश हा केवळ हेतूपुरता मर्यादित नसावा, असे महिंद्रा हॉलिडेजमध्ये आम्ही समजतो. आम्ही अशा कार्यसंस्कृतीचे वातावरण निर्माण करत आहोत, जिथे महिला केवळ टिकून राहत नाहीत, तर त्यांची प्रगती होते, त्या नेतृत्व करतात आणि अभियांत्रिकी, सुरक्षा व स्वयंपाकघर व्यवस्थापन अशा पारंपरिक पुरुषप्रधान भूमिकांमध्ये आपली छाप सोडतात. ‘क्लब महिंद्रा’चे अकेशिया पाम्स रिसॉर्ट महिलांच्या नेतृत्वाखाली रूपांतरित होणे हे रूढकल्पनांना छेद देणारे, क्षमतेला वाव देणारे आणि संपूर्ण आतिथ्य क्षेत्राला प्रेरणा देणारे पाऊल आहे.”

महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पुणे : एकल महिलांचे संघटन करणे, आदिवासी निराधार महिलांचे सक्षमीकरण, तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांना ‘अभया सन्मान’ देऊन गौरविण्यात येणार आहे. वंचित विकास संस्थेतर्फे शनिवार, दि.२४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील गांजवे चौक येथील पुणे श्रमिक पत्रकार भवनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेच्या  मीनाक्षी नवले, तृप्ती फाटक, देवयानी गोंगले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वुमनिया पुणे च्या संस्थापिका प्रीती क्षीरसागर उपस्थित राहणार असून व आधार संस्थेच्या संस्थापक डॉ. नंदा शिवगुंडे या अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. संस्थेतर्फे एकल महिलांसाठी अभया मैत्री गट चालविला जातो. अभया मैत्रीगटातर्फे परिस्थितीशी दोन हात करुन मार्ग काढणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला जातो. त्याला अभया सन्मान असे म्हणतात. यावर्षी अभयाला ११ वर्षे पूर्ण होत आहेत.

बीड मधील केज तालुक्यातील एकल महिलांचे संघटन करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे, संविधानीक मूल्य समाजात रुजविणे हे काम करणाऱ्या अनिता कांबळे, नागपूर मधील पांढराबोडी, रामनगर येथील आदिवासी निराधार महिला व आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या बबीता धुर्वे, पुण्यात तृतीयपंथीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या कादंबरी शेख आणि बीडमध्ये अस्तित्त्वाची लढाई लढणारी कार्यकर्ती रत्नमाला गायकवाड यांना अभया सन्मान देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय संगीता भरत काळे आणि वैष्णवी प्रसाद काळे यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. देशासाठी त्याग करणाऱ्या स्त्रियांच्या गोष्टी आपण पुस्तकांतून वाचतो. परंतु ओल्या हळदीच्या अंगाने सीमेवर जाण्यासाठी हसतमुखाने निरोप देणारी पत्नी वैष्णवी प्रसाद काळे व तिच्या पतीवर राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारी आई संगीता भरत काळे या दोघींचाही आदर्श समाजापुढे ठेवावा म्हणून सर्व भारतीयांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘अभया’तर्फे वाचनकट्टा चालविला जातो. ‘ग्रामपरिवर्तन प्रबोधिनी’, मु. कटगुण, ता. खटाव, जि. सातारा या ग्रंथालयासाठी उपयुक्त पुस्तके आपण भेट कार्यक्रमात देण्यात येणार आहे. वंचित विकास ही सामाजिक काम करणारी नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचे काम संपूर्ण महाराष्ट्र व मध्यप्रदेश येथे स्त्रिया, मुले, दलित, आदिवासी, भटके विमुक्त, शेतकरी, शेतमजुर, शहरी व ग्रामीण गरीब इ. घटकांमध्ये गेली ३९ वर्षे सुरु आहे. तरी अभया सन्मान या कार्यक्रमास पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी कॉंग्रेसची तिरंगा रॅली.

   पुणे-  ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी – बी. एम. संदिप यांच्या प्रमुख उपस्थितीत आज काँग्रेस भवन ते लोकमान्य टिळक पुतळा, मंडई, पुणे पर्यंत ‘‘तिरंगा यात्रा’’ आयोजित करण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

     भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त आज काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र राज्याचे सहप्रभारी मा. बी. एम. संदिप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आहे. यानंतर सर्व धर्मिय प्रार्थना करून  ‘‘तिरंगा यात्रा’’ सुरू करण्यात आली. सदर यात्रेत ‘‘याद करो कुर्बानी’’, ‘जय हिंद’, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

     यात्रेचा समारोप लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे सभा घेवून करण्यात आला. यावेळी मा. बी. एम. संदिप म्हणाले की, ‘‘या मोहिमेच्या माध्यमातून भारताने आपले लष्करी सामर्थ्य संपूर्ण जगाला दाखवले आहे. विशेष म्हणजे भारताच्या या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे आर्थिक तसेच सामरिक नुकसान झाले आहे. दरम्यान, ऑपरेशन सिंदूर राबवताना भारताच्या तिन्ही दलाने आपले शौर्य दाखवले. 

     ऑपरेशन सिंदूरचे दैदिप्यमान यश हे भारतीय सैन्य दलाचे असून संपूर्ण देशाला या पराक्रामचा अभिमान आहे परंतु भारतीय जनता पक्षाचे काही वाचाळवीर जाणीवपूर्वक भारतीय सैन्यदलाचा अपमान करणारी विधाने करत आहेत. भाजपा मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या बद्दल केलेले विधान चीड आणणारे होते, देशभरातून यावर संताप व्यक्त केला जात असतानाच आता भाजपाच्या दुसऱ्या नेत्याने वायफळ बडबड केली आहे. “संपूर्ण देश, देशाचे सैन्य आणि सैनिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.” असे निर्लज्जपणाचे विधान केले आहे.हे विधान भारतीय सैन्य दलाचे शौर्य, संस्कृती व परंपरेचा घोर अपमान करणारे आहे. भाजपाचे नेते बेताल विधाने करत असताना -नरेंद्र मोदी, अमित शाह व जे. पी. नड्डा गप्प का आहेत? भाजपा हा निर्ढावलेला व मस्तीखोर पक्ष आहे, पण जनता हा अपमान सहन करणार नाही. काँग्रेस पक्ष हा लोकशाहीचा आदर करतो. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला पराभूत केले आणि चांगलाच धडा शिकवला. या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्याबद्दल संपूर्ण देशाला भारतीय सैन्याचा अभिमान आहे.’’

     यानंतर शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही आपल्या भाषणातून भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करताना त्यांचे कौतुक केले.

     यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासमवेत, महाराष्ट्राचे प्रभारी बी. एम. संदिप, माजी आमदार मोहन जोशी, दिप्ती चवधरी, अनंत गाडगीळ, वीरेंद्र किराड, अमीर शेख, गोपाळ तिवारी, नगरसेवक लता राजगुरू, अजित दरेकर, रफिक शेख, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी,  मेहबुब नदाफ, नीता रजपूत, प्राची दुधाने, अर्चना शहा, वीरेंद्र किराड, सुनिल मलके, प्रकाश पवार, सुरेश नांगरे, सौरभ अमराळे, चेतन आगरवाल, वाल्मिक जगताप, समिर शेख, बाळासाहेब अमराळे, राज अंबिके, विनोद रणपिसे, अभिजीत महामुनी, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, हेमंत राजभोज, राजू ठोंबरे, रमेश सोनकांबळे, रविंद्र माझीरे, अक्षय माने, विशाल जाधव, अजित जाधव, रमेश सकट, दिलीप तुपे, प्रदीप परदेशी, संदिप मोकाटे, भुषण रानभरे, राजेंद्र शिरसाट, कविराज संघेलिका, प्रियंका रणपिसे, सीमा सावंत, अनिता धिमधिमे, स्वाती शिंदे, सुंदर ओव्‍हाळ, कांचन बालनायक, माया डुरे, ॲन्थोनी जेकब, अरूण वाघमारे, सेल्वराज ॲन्थोनी, अकबर शेख, ॲड. नंदलाल धिवार, हर्षद हांडे आदींसह असंख्य काँग्रेसजन सदर यात्रेत सहभागी झाले होते. 

तेहरान येथील आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेतअथर्व शर्मा, मान केसरवानी जोडीला उपविजेतेपद

पुणे,: तेहरान (इराण) येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय लॉन टेनिस १५-के स्पर्धेत भारताच्या अथर्व शर्मा (पुणे) व मान केसरवानी (लखनऊ) या जोडीने पुरुष दुहेरीचे उपविजेतेपद जिंकले. या स्पर्धेत अथर्व शर्माने मान केसरवानीच्या साथीत चमकदार कामगिरी करत व्हेनेझुएलाच्या जुआन जोश बियांची व ब्रॅंडन पेरेज यांना पराभूत करत अंतिम फेरी गाठली. मात्र, स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्यांना भारताच्याच प्रज्वल देव आणि नितीनकुमार सिंह या जोडीकडून ३-६, ६-७ (३-७) असा पराभव स्वीकारावा लागला. एक तास ३० मिनिटे चाललेल्या या सामन्यात दोन्ही सेटमध्ये अथर्व व मान जोडीला वर्चस्व मिळवता आले नाही.

सुरुवातीला उत्तम सर्व्हिस करत या जोडीने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रज्वल-नितीनकुमार जोडीने आपला आक्रमक खेळ कायम ठेवत गुणांमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत अथर्व व मान यांना तोडता आली. संपूर्ण स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करूनही अंतिम सामन्यात दोन्ही सेटमध्ये पिछाडीवर पडल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तत्पूर्वी, जागतिक क्रमवारीत ५०० आतमध्ये असलेल्या जुआन-ब्रॅंडन जोडगोळीला अथर्व व मान या जोडीने पराभूत केले होते. सध्या अथर्व १६००, तर मान १००० व्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुष गटात अथर्वची ही पहिलीच अंतिम फेरी होती. आता अथर्व उझबेकिस्तान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

अथर्व शर्मा म्हणाला, “आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे ही अभिमानाची गोष्ट आहे. ही आमची पहिलीच अंतिम फेरी असून, माझे आणि मानचे एकत्र खेळणे हेदेखील पहिल्यांदाच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष दुहेरीत माझी ही पहिलीच अंतिम फेरी असून, ती गाठल्याचा खूप आनंद होतोय. येत्या काही आठवड्यांत उझबेकिस्तानमध्येही मानसोबतच हे यश पुढे नेत राहायला आवडेल. या प्रवासात आम्हाला कुटुंबीय, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन व मोलाची साथ लाभली.”

मुसळधार पावसाचा वीजयंत्रणेला मोठा तडाखा;अविश्रांत दुरुस्ती कामांद्वारे वीजपुरवठा सुरळीत

पुणे: पुणे शहर व परिसरात मंगळवारी (दि. २०) सायंकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी दिली. विविध ठिकाणी झाडपडीचे प्रकार तसेच जमिनीवरून वेगाने वाहणार्‍या पाण्याच्या लोंढ्यांनी वीजयंत्रणेला मोठा तडाखा दिला. यात प्रामुख्याने कोंढवा परिसरासह पुणे शहरातील काही भागात तसेच भोसरी व चाकण परिसरामध्ये वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम करीत सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत केला आहे तर कोंढवा परिसरात आज पहाटे टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे शहरात प्रामुख्याने कोंढवा परिसर मुसळधार पावसामुळे जलमय झाला होता. चढउतार असलेल्या या भागात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे ३८ फिडर पिलरमध्ये पाणी शिरले. वीजसुरक्षेची खबरदारी म्हणून कोंढवा, जेके पार्क व कुमारपाम या तीन वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे कोंढवा परिसरातील सुमारे ३८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद झाला. पाऊस व पाणी ओसरल्यानंतर महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्ती कामे सुरू केली. पाणी शिरलेल्या फिडर पिलरमधील पाणी काढून कोरडे करण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यानंतर सकाळी ६ वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने या परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये बिघाड झाला. तसेच वीजखाबांवर झाडे व फांद्या पडल्यामुळे तारा तुटल्या. त्यामुळे महर्षीनगर, मार्केटयार्ड, प्रेमनगरचा काही भाग, मुंढवा, बंडगार्डन, फुरसुंगी, कोथरूड, शिवणे, धानोरी, धायरी फाटा आदी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. याच कारणांमुळे भोसरी गाव, तळवडे, देहू गाव, शेलारवस्ती, चिखली, चऱ्होली, दिघी, भोसरी गाव, यमूनानगर, विठ्ठलवाडी, रूपीनगर, आळंदी रोड, इंद्रायणीनगर, चिंचवड स्टेशन, संतनगर, आदर्शनगर, खडी मशीन, शांतीनगर या भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. या सर्व भागातील वीजपुरवठा तातडीने दुरुस्ती कामे करून रात्री उशिरापर्यंत सुरळीत करण्यात आला.

ग्रामीण भागामध्ये चाकण व परिसरात मुसळधार पावसामुळे महावितरणचे उच्च व लघुदाबाचे १० वीजखांब कोसळले. त्यामुळे चाकण, कुरुळी, निघोजे, सारा सिटी, नाणेकरवाडी, म्हाळुंगे, आंबेठाण या परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. तो पहाटेपर्यंत टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आला आहे.

संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध- वीजपुरवठा खंडित होणे किंवा कोणत्याही प्रकारच्या तक्रारी करण्यासाठी किंवा माहिती विचारण्यासाठी वीजग्राहकांकरिता महावितरणचे मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. या टोल फ्री क्रमाकांवर ग्राहकांच्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाते व लगेचच संबंधित अभियंता व कर्मचाऱ्यांना ‘एसएमएस’द्वारे कळविली जाते. यासह खंडित वीजपुरवठ्याची तक्रार करण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देण्याची किंवा मोबाइलवरून NOPOWER<ग्राहक क्रमांक> हा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ या क्रमांकावर पाठविण्याची सोय उपलब्ध आहे.

सोनी इंडिया तर्फे BRAVIA 2 II टेलिव्हिजन सिरीजसह 4K एंटरटेनमेंटच्या नव्या युगाचा आरंभ

नवी दिल्ली: सोनी इंडियातर्फे अपग्रेड करण्याची इच्छा असलेल्यांकरता मनोरंजनाचा अनुभव
उंचावण्यासाठी डिझाइन केलेले 4K अल्ट्रा HD LED डिस्प्ले तंत्रज्ञान असलेली आपली सर्वात अलिकडील
नाविन्यपूर्ण BRAVIA 2 II सिरीज आज सादर करण्यात आली. Google TV सह एकत्रित ही सिरिज वापरकर्त्यांना
सहजपणे अॅप्स, स्ट्रीमिंग सेवा आणि लाइव्ह TV चॅनेल्सची विस्तृत श्रेणी त्यांच्या पसंतीनुसार वापरण्याची
परवानगी देते. सोनीची नवीन BRAVIA 2 II सिरीज 108 सेमी (43), 126 सेमी (50), 139 सेमी (55), 164
सेमी (65) आणि 189 सेमी (75) स्क्रीन आकारांमध्ये उपलब्ध आहे. यात X1 पिक्चर प्रोसेसर असून तो प्रगत
अल्गोरिदम वापरून कोलाहल कमी करतो आणि तपशील वाढवतो. आणखी स्पष्ट 4K सिग्नलसह, तुम्ही जे काही
पाहता ते खऱ्या 4K रिजोल्यूशनजवळ जाते. Live Color तंत्रज्ञानाने हे तेजस्वी रंगांनी समृद्ध आहे.
नवीन BRAVIA 2 II 4K टेलिव्हिजन तुम्हाला आश्चर्यकारक 4K दृश्य अनुभवायला देते. ते वास्तविक जगातील
तपशील आणि टेक्शचरने समृद्ध आहे. 2K किंवा अगदी फुल HD मध्ये शूट केलेले कंटेंट 4K X-Reality™ PRO
द्वारे जवळजवळ 4K रिजोल्यूशनपर्यंत अपस्केल होते. त्यासाठी एक विशेष 4K डेटाबेस वापरला जातो.
Motionflow™ XR नावाच्या अभिनव तंत्रज्ञानामुळे वेगवान हालचाली असलेल्या दृश्यांमध्येही विनाअडथळा
आणि ठळक तपशील अनुभवता येतात. ते मूळ चौकटीमध्ये अतिरिक्त चौकटी तयार करतात. हे सलग फ्रेम्समधील
मुख्य दृश्य घटकांचे विश्लेषण करते आणि क्षणात राहून गेलेल्या अॅक्शनचा अंदाज लावते. BRAVIA 2 II
सिरीजमध्ये ओपन बॅफल डाउन-फायरिंग ट्विन स्पीकर्स आहेत. ते 20 वॅट्सचा शक्तिशाली ध्वनी देतात. जोडीला
Dolby Atmos® आणि DTS:X® द्वारे वापरकर्त्यांना एक गुंगवून टाकणारा स्पॅटियल ऑडिओ अनुभव देतात.
ओपन बॅफल स्पीकर्स उत्कृष्ट लो-एंड साउंड देतात. ते चित्रपट, खेळ आणि संगीतासाठी आदर्श आहे.
नवीन BRAVIA 2 II सिरीजसह तुम्ही 10,000 पेक्षा जास्त अॅप्स डाउनलोड करू शकता आणि 700,000 पेक्षा
अधिक चित्रपट आणि TV एपिसोड्ससह, तसेच लाइव्ह TV देखील एका ठिकाणी अॅक्सेस करू शकता. Google
TV प्रत्येकाचा आवडता आशय अॅप्स आणि सबस्क्रिप्शन्समधून आणते आणि सुरळीतपणे त्याची मांडणी करते.
BRAVIA 2 II सिरीज सहजपणे कोणत्याही आधुनिक लिव्हिंग स्पेसमध्ये मिसळून जाणाऱ्या मिनिमलिस्ट
डिझाइनला चालना देते. आपल्या अल्ट्रा-नॅरो बेझेलसह, डिस्प्ले स्क्रीन क्षेत्र वाढवते. त्यामुळे प्रेक्षक सगळ्या क्रियेत
अधिक गुंतून जातात आणि खऱ्या अर्थाने त्यांना सखोल मनोरंजन अनुभव मिळतो.
HDMI 2.1 मध्ये ALLM (Auto Low Latency Mode) सह BRAVIA 2 II कन्सोल जोडल्यावर आणि चालू
केल्यावर ओळखते आणि आपोआप लो लेटन्सी मोडमध्ये स्विच करते. त्यातून वेगवान, उच्च-तीव्रतेच्या गेम्ससाठी
सुलभ आणि प्रतिसादक्षम गेमप्ले सुनिश्चित होतो. Auto HDR Tone Mapping सह HDR सेटिंग्ज PS5™
कन्सोलच्या सुरुवातीच्या सेटअपदरम्यान त्वरित ऑप्टिमाइझ होतात. BRAVIA 2 II सिरीजमध्ये सोनी पिक्चर्स
कोअर समाविष्ट आहे. ही एक चित्रपट सेवा आहे आणि त्यात नवीन सोनी पिक्चर्स रिलीजेस आणि क्लासिक
ब्लॉकबस्टर्सचा समावेश आहे. Pure Stream™ सह तुम्ही HDR चित्रपट 80 Mbps पर्यंत स्ट्रीम करू शकता,
यातून 4K UHD Blu-ray समान चित्रगुणवत्ता मिळते. BRAVIA 2 II टेलिव्हिजनसोबत मूव्ही क्रेडिट्स येतात.
त्यामुळे तुम्ही पाच पर्यंत चित्रपट रिडीम करू शकता आणि नियमितपणे अपडेट होणाऱ्या 100 चित्रपटांच्या
क्युरेटेड निवडीपर्यंत 12 महिने अॅक्सेस मिळवू शकता.
ऑफर्स, किंमत आणि उपलब्धता:
सध्याच्या सवलतींचा भाग म्हणून ग्राहक BRAVIA 2 II टेलिव्हिजन खरेदीवर 5,000/- रु. पर्यंत कॅशबॅक मिळवू
शकतात. जोडीला सुलभ ईएमआय पर्याय उपलब्ध आहेत. 108 सेमी (43) साठी फक्त 1,849 रु. पासून आणि
139 सेमी (55), 164 सेमी (65) आणि 189 सेमी (75) स्क्रीन आकारांसाठी 2,995 रु. पासून सुरू होतात.
त्यामुळे उत्कृष्ट होम एंटरटेनमेंट अनुभव अपग्रेड करणे सोपे होते.
मॉडेल सर्वोत्तम खरेदी (रु. मध्ये) उपलब्धता दिनांक
K-75S25M2 145,990/- 20 मे 2025 पासून
K-65S25M2 97,990/- 20 मे 2025 पासून

K-55S25M2 75,990/- सध्या उपलब्ध
K-50S25M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
K-43S25M2 50,990/- सध्या उपलब्ध
K-50S22M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
K-43S22M2 जाहीर करणे बाकी जाहीर करणे बाकी
ही मॉडेल्स भारतातील सर्व सोनी सेंटर्स, प्रमुख इलेक्ट्रॉनिक स्टोअर्स आणि ई-कॉमर्स पोर्टल्सवर उपलब्ध होतील.

सायबर चोरट्यांच्या बनावट नोकर भरती विरोधात महावितरणने केली तक्रार

मुंबई : सायबर चोरट्यांनी महावितरणची बनावट वेबसाईट बनवून नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केल्याबद्दल महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केलेली असुन लोकांनी या बनावट जाहिरातीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

फसवणूक करण्याच्या उद्देशाने सायबर चोरट्यांनी  www.mahavitaranmaharashtra.com  ही बनावट वेबसाईट तयार केली. यात शिपाई, वॉचमन, वाहतूक कामगार व सफाई कामगार या पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले असुन या विरोधात महावितरणने सायबर क्राइम विभागाकडे तक्रार केली असुन सायबर चोरट्यांच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे आवाहन केले आहे.

राष्ट्रवादी गुंडांची टोळी, उपमुख्यमंत्री अजित पवार या टोळीचे आका आहेत का? : हर्षवर्धन सपकाळ

एकनाथ शिंदे लुटारुंच्या टोळीचे मुखिया! आ. अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा.

राज्य महिला आयोग असंवेदनशील, आयोगाच्या अध्यक्षांना महिला सुरक्षेपेक्षा राजकारणात जास्त रस

मुंबई दि. २२ मे २०२५
भाजप महायुतीच्या सत्ताकाळात राज्यात गुन्हेगारीने नवा उच्चांक गाठला आहे. बहुतांश गुन्हेगारी घटनांतील आरोपी हे सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून त्यांना सरकारचे अभय असल्याचे वारंवार दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात घडलेल्या विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पक्षाशी संबंधित लोकांचा मोठा सहभाग दिसून आला आहे, हे अत्यंत गंभीर असून राष्ट्रवादी काँग्रेस ही गुंडांची टोळी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे या टोळीचे आका आहेत का? असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, बीडच्या मस्साजोगच्या घटनेतील आरोपी, पुण्याच्या पौर्शे कार ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह प्रकरणातील आरोपी, कोयता गॅंग, शेल्टर होमच्या नावाखाली तरुणींच्या लैंगिक करणारा शंतनू कुकडे, त्याचा सहकारी राष्ट्रवादीचा दीपक मानकर आणि वैष्णवी हगवणे या भगिणीचा हुंड्यासाठी छळ करून तिचा जीव घेणारे राजेंद्र हगवणे हे सर्व आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. या सगळ्या प्रकरणातले आरोपी अजित दादांच्या पक्षातलेच कसे ? असा संतप्त सवाल करून या सगळ्या गुंडांचे पालकत्व सत्ताधा-यांनी घेतले आहे, त्यामुळे अशी घृणास्पद कृत्ये करण्याची यांची हिंमत होते का? या संपूर्ण प्रकरणात राज्य महिला आयोगाचा असंवेदनशीलपणा पुन्हा दिसून आला आहे. महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर एक निष्पाप जीव वाचला असता पण आयोगाच्या अध्यक्षांना महिलांच्या सुरक्षेपेक्षा राजकारण चमकवण्यात जास्त रस असल्याने राज्यात महिला अत्याचाराच्या दुर्देवी घटना घडत आहेत, आम्ही आयोगाचा धिक्कार करतो.

अर्जुन खोतकर व त्यांच्या पीएला तात्काळ अटक करा.
राज्यातले भाजप शिंदे व अजित पवार गट महायुतीचे सरकार हे भ्रष्टाराच्या पायावर उभे असून या सरकारमधील सहभागी मंत्री आमदारांकडून फक्त लूट सुरु आहे. धुळ्याच्या दौ-यावर असलेल्या विधिमंडळाच्या अंदाजपत्रकीय समितीचे प्रमुख आ. अर्जुन खोतकर यांच्या पीए च्या खोलीतून जवळपास दोन कोटी रुपयांची रक्कम सापडली. ही या सरकारच्या लुटीचा भक्कम पुरावा आहे. धुळे भागातील कंत्राटदारांकडून ही रक्कम उकळल्याची चर्चा आहे. आमदाराच्या पीए कडे एवढी मोठी रक्कम सापडली आहे तर आमदाराकडे किती रक्कम असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या भ्रष्टाचाराला पाठिंबा नसेल तर त्यांनी खोतकर व त्यांच्या पीएवर गुन्ह दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी. तसेच शिंदेच्या सर्व आमदारांची लाचलुचपत विभाग, ईडी व इन्कमटॅक्स कडून चौकशी करावी असे सपकाळ म्हणाले.

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. हजारो लाखो होक्टवरील पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. कांदा उत्पादक शेतक-यांना याचा मोठा फटका बसला आहे पण सरकारकडून मदत देणे दूरच साधे पंचनामे ही केले जात नाहीत. दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर आला आहे. बोगस बियाणे आणि खतांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे. बियाणे आणि खतांची लिंकींग करून विक्रेत्यांकडून शेतक-यांची पिळवणूक आणि फसवणूक केली जात आहे. अशा विक्रेत्यांवर सरकारने तात्काळ कठोर करावाई करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लोहगाव उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात आमदार बापसाहेब पठारे यांची महत्त्वपूर्ण बैठक

पुणे: लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक (ता. २२) आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. गेल्या अनेक वर्षांपासून हे रुग्णालय पूर्ण होऊनही सुरु न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.

सदर बैठकीमध्ये रुग्णालयाच्या अद्याप पूर्ण न झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. उर्वरित बांधकाम, पाणीपुरवठा लाईन, ड्रेनेज सिस्टिम व विद्युत जोडणी यांसारख्या मूलभूत सुविधा प्रलंबित आहे. या बाबतीत संबंधित विभागांनी तातडीने कारवाई करून काम पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना आमदार पठारे यांनी दिल्या.

आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाची प्रतीक्षा नागरिक करत आहेत. रुग्णालयाची इमारत उभी आहे, पण आरोग्यसेवा सुरू नाही, हे दुर्दैवी आहे. मी या विषयासंबंधी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आवाज उठवला होता. आता नागरिकांना प्रतीक्षेत ठेवणे योग्य नाही. लोहगावसह इतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना या रुग्णालयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय ससून रुग्णालयावरचा भार कमी होणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक बळकट होईल.”

या बैठकीस डॉ. राधाकृष्ण पवार (उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ), डॉ. एम. पल्ली (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे), श्रीमती भंडारे (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, अजय पाटील (उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग), घाटकर (शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग) यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पठारे यांनी अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, की रुग्णालय पूर्ण कार्यक्षमतेने सुरू झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे.

चाकण येथील उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याची ग्वाही

पुणे: महाराष्ट्र हे उद्योगांना प्रोत्साहन देणारे राज्य असून सुमारे १५ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य शासनाने आणली आहे. मोठ्या उद्योगांसोबतच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणात सवलती देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. चाकण औद्योगिक वसाहतीतील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यशासन आवश्यक ते सर्व प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी दिली.

चाकण येथील उद्योगांच्या समस्यांबाबत चाकण येथे सर्व संबंधित शासकीय विभाग आणि उद्योग संघटनांसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार बाबाजी काळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त बापू बांगर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम आदींसह उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. सामंत म्हणाले, चीन देशातून उद्योग बाहेर पडत असताना ते भारताकडे येत असून त्याचा सर्वाधिक फायदा महाराष्ट्राला झाला आहे. मोठ्या उद्योगांबरोबरच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन म्हणून मोठ्या प्रमाणा सवलती देण्यात येत असून त्याची माहिती उद्योगांनी घेऊन प्रगती करावी. गेल्या तीन वर्षात दिलेल्या सवलतींपेक्षा पुढील एकाच वर्षात ६ हजार १०० कोटी रुपयांची सवलत (इन्सेंटिव्ह) देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी उद्योग मंत्री श्री सामंत यांनी उपस्थित उद्योग प्रतिनिधींच्या वीज, पाणी, वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आदींबाबतच्या समस्या जाणून घेतल्या.

कामगार रुग्णालयासाठी जागेचे बैठकीतच हस्तांतरण

चाकण येथे कामगार रुग्णालय (ईएसआयसी) उभारण्यासाठी जागा मिळण्याबाबतचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे उद्योजकांनी सांगितले. त्यावर उद्योगमंत्री सामंत यांनी बैठक संपेपर्यंत कार्यवाही करून जागा उपलब्ध करून देण्याबद्दल निर्देश दिले. बैठक संपताच विभागाने आवश्यक ती कार्यवाही करून उद्योगमंत्री यांच्या हस्ते सादर जागेच्या हस्तांतरणाबाबतचे पत्र संघटनेकडे सुपूर्त करण्यात आले. त्याबद्दल आमदार श्री. काळे आणि उद्योगांनी मंत्री सामंत यांना धन्यवाद दिले.

चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये सुरक्षेच्या उपायोजना म्हणून स्ट्रीटलाईट, सीसीटीव्ही या उपाययोजना करण्यात याव्यात असे त्यांनी सांगितले. स्ट्रीटलाईटचे काम सुरू असून विशेष बाब म्हणून सीसीटीव्ही बसविण्यासाठी निधी देण्यात येईल, असेही उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले.

या ठिकाणी १५० ट्रक उभे राहू शकतील असे ट्रक टर्मिनस आहे. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी औद्योगिक वाहतूक करणारे ट्रक या ठिकाणी उभे राहतील या दृष्टीने संघटनांनी पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. तसेच एमआयडीसीतील मोकळ्या जागांचे एमआयडीसी पोलीस विभाग तसेच उद्योग प्रतिनिधींनी संयुक्त सर्वेक्षण करून विकेंद्रीत स्वरूपात छोट्या छोट्या जागा शोधून २५- ३० ट्रक थांबू शकतील अशी व्यवस्था करावी. वाहतुकीला शिस्त लागेल यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.

सुरळीत वीज पुरवठ्याच्या अनुषंगाने महापारेषण आणि महावितरण कंपनीने समन्वयाने आवश्यक तेथे हाय टेन्शन वाहिन्या, फीडर, डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मर आदी नवीन पायाभूत सुविधा तसेच अस्तित्वातील सुविधांचे उन्नतीकरण, विस्तारीकरण करावे, असे निर्देशही श्री. सामंत यांनी दिले. त्यानुसार सुमारे ४२० कोटींची कामे सुरू असून ६६४ कोटी रुपयांच्या विविध कामांच्या निविदा झाल्या आहेत, असे महापारेषणच्यावतीने सांगण्यात आले. ही कामे गतीने आणि टप्प्या टप्प्याने पूर्ण करून लवकरात लवकर उद्योगांना दिलासा द्यावा. वीज यंत्रणेच्या दुरूस्तीसाठी आठवड्यात जो खंड घेण्यात येतो त्याचा सोईचा दिवस ठरविण्यासाठी महावितरण, महापारेषणने उद्योग प्रतिनिधींशी चर्चा करून निर्णय घ्यावा. उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी नोडल अधिकारी नेमावा, आदी सूचना श्री. सामंत यांनी दिल्या.

उद्योगांना सुरळीत पाणीपुरवठा होईल याची काळजी घ्यावी, असे सांगतानाच उद्योगांनीही सांडपाणी प्रक्रिया (टर्शरी ट्रीटमेंट) करून ते पिण्याव्यतिरिक्त इतर उपयोगात आणल्यास अन्य नवीन उद्योगांना पाणी देता येईल. यासाठी मोठ्या उद्योगांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही श्री. सामंत यांनी केले.

वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी कायमस्वरुपी उपलब्ध असाव्यात यासाठी तीन क्रेन उपलब्ध करून देण्यात येतील. वाहतूक नियमनासाठी पोलीसांना साहाय्य करण्यासाठी वॉर्डन उपलब्ध करून देण्यासाठी उद्योग संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्र्यांनी केले. त्याला तात्काळ प्रतिसाद देत १० वॉर्डनची जबाबदारी घेतल्याचे पिंपरी चिंचवड येथील उद्योग संघटनेने जाहीर केले. याबाबत पोलीस विभागाने मागणी केली होती.

एमआयडीसी क्षेत्रातील रस्त्यांची दुरूस्ती गतीने करून घ्यावी. तसेच एमआयडीसी बाह्य भागातील दुरूस्तीसाठी संबंधित यंत्रणेंशी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

भामा आसखेड धरणांतर्गत बुडीत बंधाऱ्यांचे काम करण्यासाठी कंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पुढाकार घेण्याचे आवाहन आमदार श्री. काळे यांनी केले. त्याबाबत कंपन्यांनी सकारात्मक रहावे, असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

या परिसरातील रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध कामे सुरू आहेत. तसेच राज्य मंत्रीमंडळाने तळेगाव ते चाकण ४ पदरी उन्नत मार्ग आणि चाकण ते शिक्रापूर जमीनीवरील ६ पदरी मार्गाच्या ४ हजार कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने लवकरच काम सुरू होईल, असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीनेही आपल्या हद्दीतील रस्त्याच्या कामाची माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीस महापारेषण, महावितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पुणे महानगर, प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0000