Home Blog Page 2982

तळजाई :वृक्षवल्लीचे रक्षण कि भक्षण ? -दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये संघर्ष

पुणे- पुण्याचा श्वास ,पुण्याची फुफुसे ,पुण्यातले मिनी महाबळेश्वर अशी ख्याती असलेल्या तळजाई टेकडीचे आणि तेथील निसर्गसंपदेचे रक्षण कि भक्षण ?  या प्रश्नावरून कॉंग्रेस राष्ट्रवादीचे २ ज्येष्ठ नगरसेवक म्हणजे आबा बागुल आणि सुभाष जगताप यांच्यात संघर्ष निर्माण झाला असून , तळजाई टेकडीच्या आणि येथील वृक्षवल्ली च्या रक्षणार्थ जगताप यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे तर येथील  झाडांची कत्तल होते आहे हा अपप्रचार असल्याचा ठपका ठेवून जैववैविध्य पार्क च्या मंजूर प्रकल्पानुसार येथे काम होत असल्याचा दावा आबा बागुल यांच्याकडून केला जातो आहे. महापालिका आयुक्त यांनी या ठिकाणी पोलीस संरक्षणात जैववैविध्य पार्क चा घटक असलेले सोलर सिस्टीम चे शेड उभारावेत असे आदेश दिले आहेत .या सर्व प्रकारात  तळजाई च्या जंगलाच्या अस्तित्वाशी निगडीत असा दोन ज्येष्ठ आणि बलशाली मानल्या जाणाऱ्या राजकारण्यांमध्ये संघर्ष निर्माण झाल्याचे दिसून येते आहे .
भवन रचना विभागाचे अधीक्षक अभियंता शिवाजी लंके यांनी आयुक्तांना लेखी पत्र देवून मिळविलेल्या आदेशानंतर हा वाद आता पराकोटीला पोहोचत असल्याची चिन्हे आहेत .
आबा बागुल यांनी तळजाई येथे जैववैविध्य पार्क मुख्य सभेत मंजूर करवून घेतले आणि त्याबाबतचे काम सुरु झाले .यामध्ये सुमारे अडीच एकराच्या भूखंडावर महापालिकेच्या लेखी पत्रानुसार (जे तळजाई येथे पोस्टर बनून झळकते आहे )सोलर सिस्टीम करिता शेड उभारण्याचा प्रस्ताव आहे .मात्र येथे केवळ सोलर साठी शेड होत नाही तर सोलर सह वाहनतळ देखील उभारले जाते आहे .सोलरसिस्टीम करता शेड उभारण्याचा प्रस्ताव तब्बल ९९ लाख ९६ हजार रुपयांचा असल्याचे या पत्रात म्हटले आहे आणि २० टक्के कमी दराने आलेले रोहित कंसट्रक्शन चे तेंद्र त्यासाठी मान्य करण्यात आलेलं आहे .प्रभाग क्रमांक ३५ ,सर्वे नंबर ६७ ते ७३ या ठिकाणी आबा बागुल यांच्या आग्रही मागणीनुसार हि टेंडर मागविण्यात आली आणि वर्क ऑर्डर देण्यात आली असे या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे .मात्र संबधित ठेकेदाराने प्लेन टेबल सर्वे चे काम सुरु केले तेव्हा काही अज्ञात लोकांनी यास अडथला आणला त्यामुळे १९ डिसेंबर २०१८ रोजी ठेकेदाराने महापालिकेला आणि पोलिसांना सुरक्षा पुरवा असे सांगितले .त्यानंतर पुन्हा काम सुरु केले ,आणि अडथळा ठरणाऱ्या वृक्षांचा सर्वे सुरु केला तेव्हा , याच प्रभागातील स्वीकृत सदस्य जगताप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनाई करून काम थांबविले .त्यानंतर सुभाष जगताप यांना भेटून या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी या कामास विरोध केला आणि काम करू नये असे सांगितले .एकीकडे जगताप यांचा विरोध आणि दुसरीकडे आबा बागुल यांच्या कडून काम पूर्ण करवून घेण्यासाठी वारंवार होणारी विचारणा …अशा परिस्थितीत काय करावे हे आपणच सांगा असे पत्र भवन विभागच्या शिवाजी लंके यांनी आयुक्तांना दिले . ज्यावर पोलीसबंदोबस्त  घेवून काम करावे असा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांनी दिले. यावर आयुक्त सौरव राव यांनी देखील सही केली आहे .
आज हे पत्र तळजाई येथे पोस्टर च्या स्वरूपात झळकले आणि वृक्ष प्रेमींच्या सह्यांची मोहीम सुरु करण्यात आली .
 या सर्व प्रकरणात येथील झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करणे झाडांना आगी लावणे अशा घटना येथे होत असल्याचा आरोप एकीकडून होतो आहे तर दुसरीकडून आबा बागुल यांनी हा अपप्रचार आहे असे सांगितले  आहे .तळजाई टेकडी वर ३०० हुन अधिक देशी झाडांची कत्तल करण्याचा घाट पुणे महानगपालिका प्रशासन व स्थानिक नगरसेवक घालत आहेत. त्यासाठी आज हा घाट हाणून पाडण्यासाठी सकाळी ६ वाजल्या पासून सही मोहीम राबविली आहे.  2000 हुन अधिक नागरिकांनी या स्वाक्षरी मोहिमे मध्ये सहभाग घेतला.प्रशासन व स्थानिक नगरसेवकांनी वेळेत निर्णय बदलावा. निसर्ग व पर्यावरणाची हानी रोखावी.असे आवाहन सुभाष जगताप यांनी केले आहे .आज सोशल मिडिया च्या माध्यमातूनही त्यांनी या प्रकरणी जागृती करण्याचा प्रयत्न केला .
 तर ज्या जागेत सोलर रूफ पार्किंग होणार आहे.  तिथे केवळ ६६ वृक्ष आहेत आणि त्यांचे पुनर्रोपण नियमानुसारच होणार आहे , विघ्नसंतोषी लोकांनी वृक्षांची कत्तल होणार असल्याचा केलेला आरोपच  निराधार आहे.  केवळ  निवडणुका डोळ्यासमोर ठेवून  आणि  व्यक्तिगत स्वार्थासाठी निवासीकरणाला  चालना देऊन तळजाईचे अस्तित्व नष्ट करण्यासाठीच विघ्नसंतोषी लोकांनी  हे रचलेले षडयंत्र आहे. असा आरोप आबा बागुल यांनी केला आहे .
तळजाई टेकडी वन्यजीव अधिवासासह पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी माझ्या संकल्पनेतून आणि पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून  जैववैविध्य उद्यानाचा महत्वपूर्ण प्रकल्प नियमानुसार  होत आ,  असा दावाही त्यांनी केला आहे.  

सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडेल- जिल्‍हाधिकारी राम

0

पुणे- आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या दृष्टिने सर्व समन्वय अधिका-यांनी ( नोडल ऑफीसर्स) योग्‍य ती पूर्वतयारी केल्‍याबद्दल जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी नवल किशोर राम यांनी समाधान व्‍यक्‍त केले असून सर्वांच्‍या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडली जाईल, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला.

जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, बारामती लोकसभा मतदार संघाचे सुभाष डुंबरे, शिरुर लोकसभा मतदार संघाचे रमेश काळे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी श्री. राम यांनी प्रारंभी समन्‍वय अधिका-यांकडून त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची आणि त्‍यांनी केलेल्‍या पूर्वतयारीची माहिती  घेतली. निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक घटकाची जबाबदारी महत्‍त्‍वाची असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. मतदार जागृतीसाठी (स्‍वीप कार्यक्रम) विविध सामाजिक व स्‍वयंसेवी संस्‍थांची मदत घेण्‍यात येणार असून पथनाट्ये, पोस्‍टर्स, वैयक्तिक भेटी, कलापथक अशा विविध साधनांचा वापर केला जाणार आहे. वृत्‍तपत्रे,  रेडिओ, दूरचित्रवाणी, तसेच सोशल मिडीयाद्वारेही जनजागृती केली जाणार आहे.

बैठकीत मतदान केंद्रे, मतदान केंद्रावरील मुलभूत सुविधा,( रॅम्‍प, वीज, पाणी, प्रसाधनगृहे),  दिव्‍यांग मतदार याबाबत माहिती घेण्‍यात आली.

वाणिज्य क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध – ऋता चितळे यांचे मत

0

उद्यम बॅंकेतर्फे सत्कार संपन्न….

पुणे-वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी अनेक संधी उपलब्ध असून बारावी किंवा बी कॉम झालेल्या विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी यासाठी मार्गदर्शन करणार असल्याचे ऋता चितळे म्हणाल्या.इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड ॲकाउंटंट्स ऑफ इंडिया च्या पुणे शाखेच्या अध्यक्षपदी ऋता चितळे यांची निवड झाली या प्रित्यर्थ उद्यम सहकारी बॅंकेतर्फे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.सनदी लेखापालांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ही त्या म्हणाल्या.

सनदी लेखापालांचा राष्ट्राउभारणीत मोठा सहभाग असून जास्तीतजास्त करसंकलन हे त्यांच्या मार्फतच होत असते त्यामुळे त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असून हे शासकीय यंत्रणा व नागरिकांनी ही समजून घेतले पाहिजे असे मत उद्यम सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले.यावेळी नगरसेवक महेश लडकत,बॅंकेचे संचालक मनोज नायर,सीताराम खाडे,गोकुळ शेलार,पांडुरंग तथा पी के कुलकर्णी,राजन परदेशी,सनदी लेखापाल शशीकांत पत्की,महेंद्र काळे,दिनेश गांधी,बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे उपस्थित होते.
यावेळी ऋता चितळे यांच्या भावी कारकीर्दीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ‘ विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा

0
पुणे :भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात  ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता),इंटरनेट ऑन थिंग्स  ‘ विषयावर ३ दिवसीय कार्यशाळा ‘ग्लोबल अकॅडेमिक  इंटर्नशिप प्रोग्रॅम ‘ च्या सहकार्याने नुकतीच धनकवडी कॅम्पस मध्ये आयोजित करण्यात आली होती . राजेश गोपाल (अध्यक्ष ,गुरुकुल )  मंजुनाथ रोडगी आणि आदर्श कुमार (सदस्य ,मोझिला कॅम्पस क्लब ) यांनी मार्गदर्शन केले .


भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आनंद भालेराव अध्यक्षस्थानी होते . महाविद्यालयाचे १२० विद्यार्थी सहभागी झाले . ‘कोट्यवधी उपकरणे जगभरात इंटरनेट द्वारे जोडली जात असून त्यामुळे प्रचंड मोठी बाजारपेठ निर्माण होत आहे . उत्पादन वाढविण्यासाठी उद्योगजगत त्याचा उपयोग करीत आहे ,’स्मार्ट फॅक्टरी ‘ उदयास येत आहेत .  अशावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ‘इंटरनेट ऑन थिंग्स ‘या अत्याधुनिक संकल्पनांचा अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी कसून अभ्यास केला पाहिजे ‘,असे प्रतिपादन   प्राचार्य डॉ . आनंद भालेराव यांनी उदघाटन सत्रात केले .

राजेश गोपाल (अध्यक्ष ,गुरुकुल )  मंजुनाथ रोडगी  यांनी प्रत्यक्ष उदाहरणे देऊन दोन्ही संकल्पनांचे विवेचन केले . ‘तंत्रज्ञानाचा वेग वाढत असताना विद्यार्थ्यांनी नव्या ज्ञानाने स्वतःला अद्ययावत ठेवावे ‘,असे आवाहन त्यांनी केले .

महापारेषणची 132 केव्ही भूमिगत वाहिनी जेसीबीने तोडली पुणे शहराच्या मध्यवस्तीत पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याचे प्रयत्न

0

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा शनिवारी (दि. 2) सकाळी 11.33 वाजता बंद पडला. परिणामी महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला व त्याचा सुमारे दोन लाख वीजग्राहकांना फटका बसला.

पुणे शहरातील रास्तापेठ, कसबा पेठ आदी सर्व पेठांचा मध्यवर्ती परिसर तसेच लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्याचे महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. यात दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 70 टक्के भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

दरम्यान 132 केव्ही वाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापारेषणकडून प्रयत्न सुरु झाले तरी या कामास 8 दिवसांचा कालावधी लागणार आहे, असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. या कालावधीत 132 केव्ही रास्तापेठ जीआयएस उपकेंद्र बंद राहणार आहे. त्यामुळे इतर पर्यायी व्यवस्थेतून सुमारे 75 ते 80 मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करावे लागणार आहे. मात्र वाढत्या उन्हामुळे काही परिसरात विजेचे भारव्यवस्थापन शक्य झाले नाही तर नाईलाजास्तव 2 ते 3 तासांचे चक्राकार पद्धतीने तात्पुरते भारनियमन करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी, की पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात जलवाहिनी संबंधात पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून जेसीबीद्वारे गेल्या 10 दिवसांपासून खोदकाम सुरु आहे. महापारेषणच्या पर्वती 220 केव्ही उपकेंद्रातून भूमिगत वाहिनीद्वारे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राला वीजपुरवठा करण्यात येतो. ही भूमिगत वाहिनी या खोदकामात तोडली जाण्याची शक्यता असल्याने पुणे महानगरपालिकेला वीजवाहिनी असलेल्या भागात खोदकाम करू नये असे वारंवार सांगण्यात आले होते. भूमिगत वाहिनी असलेली जागाही दाखविण्यात आली होती. मात्र यानंतरही त्या जागेवार सुरु असलेल्या खोदकामात आज सकाळी 11.33 वाजता महापारेषणची 132 केव्ही वीजवाहिनी तोडण्यात आली, अशी माहिती महापारेषणकडून देण्यात आली. त्यामुळे रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद पडला आणि पुणे शहराच्या मध्यवस्तीमधील रास्तापेठ, कसबा पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, गंज पेठ आदी सर्व पेठा तसेच लक्ष्मी रोड, गुलटेकडी, लुल्लानगर, कॅम्प, मंडईचा काही भाग, हाईडपार्क, स्वारगेट, मार्केट यार्ड, शंकरसेठ रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला.

या भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला जॉईंट चेन्नईवरून तातडीने विमानाद्वारे मागविण्यात आला आहे. मात्र या दुरुस्तीकामाला सुमारे 8 दिवसांचा कालावधी लागणार असल्याने रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा बंद राहणार आहे असे महापारेषणकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 75 ते 80 मेगावॉट विजेचे व्यवस्थापन करून येत्या आठवडाभर पुणे शहरातील सुमारे दोन लाख वीजग्राहकांना होणारा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

सध्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने भारनियमन टाळण्यासाठी किंवा त्याचा कालावधी कमीत कमी राहील यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत. येत्या आठ दिवसांत या परिसरातील वीजग्राहकांनी विजेचा वापर आवश्यकतेनुसार व कमीतकमी करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. विजेचा वापर कमी झाल्यास विजेचे भारव्यवस्थापन करणे सुलभ होईल व विस्कळीत झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेद्वारे सुरळीत ठेवता येईल. परंतु काही भागात विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागल्यास महावितरण दिलगिर आहे व या आपात्कालिन परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

युनिक इंग्लिश मिडियम स्कूलच्या ‘विज्ञान आनंद ‘ मेळाव्यास चांगला प्रतिसाद

0
पुणे : ईगल एज्युकेशन सोसायटीच्या ‘ युनिक इंग्लिश मिडियम स्कूल’ कात्रज,  येथे ‘विज्ञान आनंद मेळावा आणि  विज्ञान प्रदर्शन  ‘  नुकतेच आयोजित करण्यात आले होते .  प्रदर्शनाचे उद्घाटन ईगल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर.ए.मुलाणी  यांच्या हस्ते झाले. त्यावेळी संस्थेचे पदाधिकारी डॉ.शरद इनामदार ,  एड . तारिक अन्वर पटेल , शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. जयश्री जाधव , उपमुख्याध्यापिका  सौ. चांदगुडे शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रीय विज्ञानदिनानिमित्त आयोजित या प्रदर्शनात इ.१ली ते इ.११वी च्या विद्यार्थांनी  विज्ञान, भूगोल, गणित, इतिहास व कला या विषयावर विविध प्रकल्प तयार केले.प्रदर्शनात स्वयंचलित पथदिवे, जलशोधक पथ, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, धुरशोषक यंत्र, सौरउर्जेवर चालणारा पंप, मूत्रपिंडाची प्रतीकृती हे प्रकल्प लक्षवेधक ठरले.  प्रदर्शनाला भेट देणाऱ्या विज्ञानप्रेमींसाठी व पालकवर्गासाठी इ. ११वी च्या विद्यार्थ्यांनी आनंदमेळाव्याचे आयोजन केले होते. त्यालाही पालकांनी चांगला प्रतिसाद दिला .

बँक ऑफ महाराष्ट्रला भारत सरकारचा सुधारणा श्रेष्ठता पुरस्कार प्रदान

0

पुणे: भारत सरकारतर्फे दिला जाणारा “EASE  ईझ” अर्थात एन्हांस्ड अॅक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स” बँकिंग सुधारणा पुरस्कार केंद्रीय अर्थमंत्री श्री अरुण जेटली यांच्या हस्ते बँक ऑफ महाराष्ट्रला दिला गेला. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए एस राजीव तसेच कार्यकारी संचालक श्री ए सी राउत यांनी शीर्ष सुधारक गटातील प्रथम उपविजेता पुरस्कार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दिल्ली मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात स्वीकारला.

“ईझ” हा भारत सरकारतर्फे सादर केला गेलेला उपक्रम आहे आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सुधारणेबाबत भारतीय बँक्स संघटनेच्या (आयबीए) माध्यमातून हा उपक्रम देशातील सरकारी मालकीच्या बँकाकरीता राबविला गेला आहे. बोस्टन कन्सल्टन्सी ग्रुप (बीसीजी) ही अग्रगण्य संस्था आयबीएने या कामासाठी नियुक्त केली गेली होती आणि तिच्या माध्यमातून सहा विषयांतर्गत येणार्‍या 140 उद्देशांच्याद्वारे सरकारी मालकीच्या बँकांच्या कामगिरीबाबत अभ्यास बीसीजीद्वारे केला गेला. बँक ऑफ महाराष्ट्राने या सहाही विषयांतर्गत सुधारणेमध्ये प्रशंसनीय कामगिरी करून शीर्ष सुधारक श्रेणीतील उपविजेता पुरस्कार पटकावला आहे.

पुरस्कार प्राप्त केल्यावर बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री राजीव म्हणाले, “हा पुरस्कार प्राप्त करताना बँकिंग सेवांबाबतीतील यापेक्षा अधिक श्रेष्ठ सुधारणा करण्याची आमच्यावरील जबाबदारी खात्रीने वाढली आहे. आमच्या सर्व भागधारकांच्या अपेक्षांप्रत राहण्याचा आमचा पराकाष्ठेचा प्रयत्न असेल. हा पुरस्कार म्हणजे आमच्या सर्व सन्माननीय ग्राहक यांच्या प्रती बांधीलकी असल्याचा आम्ही आणि बँकेचे कर्मचारी पुनरुच्चार करतो. एक जबाबदार आणि स्वच्छ बँकिंग सेवा देण्यासाठी तसेच “ईझ” हा विषय पुढे नेण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र सातत्याने प्रयत्न करेल.”

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कार्यक्रमामध्ये पहिल्या “ईझ” अंतर्गत सुधारणा विषयक अहवालाचे अनावरण केले आणि विविध श्रेणीतील सरकारी मालकीच्या पुरस्कार प्राप्त बँकांना सन्मानित केले. अहवालाचे अनावरण केल्यानंतर श्री जेटली म्हणाले की, या क्रमवारीमुळे स्पर्धात्मकता वाढते आणि बँकांना इतरांपेक्षा अधिक उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते.

जून 2017 पासून बँक ऑफ महाराष्ट्रने विविध संरचनात्मक, पद्धतशीर आणि रणनैतिक बदल अवलंबिल्याने कार्यरत कार्यक्षमता, मालमत्तेची गुणवत्ता आणि ताळेबंद यामध्ये सुधारणा झाली आहे.बँकेच्या टर्न-अराऊंड धोरणामुळे प्रभावी मूल्य-व्यवस्थापन आणि पद्धती आणि एकाच भागातील शाखांच्या सुसूत्रीकरणामुळे वृद्धीला चालना मिळाली आहे. बँक प्रगती वृद्धीसाठी मार्गक्रमण करत असून भविष्यात किरकोळ कर्जे (रिटेल), कृषी आणि लघु उद्योग सारख्या प्रमुख क्षेत्राला वित्त पुरवठा वाढवण्याचे उद्दीष्ट ठेवत आहे.

बँकेला नुकताच आयबीएचा उत्कृष्ट माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील माध्यम श्रेणीतील बँकेमधील जोखीम व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षेमधील पुढाकार या अंतर्गत असणारा प्रतिष्ठीत पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे.

आंतरशाखीय संशोधनावर भर द्यायला हवा -विक्रम साळुंखे यांचे मत

0
विद्यार्थी गृहात ‘यंत्र अभियांत्रिकी’वर कार्यशाळा
पुणे : “आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले उत्पादन घेऊन जायचे असेल, तर आपल्याला आंतरशाखीय संशोधनावर भर द्यायला हवा. अभियांत्रिकीच्या विविध शाखांच्या एकत्रीकरणातून नाविन्यपूर्ण उत्पादन निर्मिले पाहिजे. त्यातून रोजगाराच्याही अनेक संधी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यंत्र अभियांत्रिकीसह इतर शाखांचेही ज्ञान आत्मसात करावे,” असे मत ऍक्युरेट गेजिंग अँड इंस्ट्रुमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंखे यांनी व्यक्त केले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यायाच्या वतीने आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने ‘यंत्र अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रगती’ या संकल्पनेवर दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक व अधिष्ठाता सुनील रेडेकर, प्रा. राजेंद्र कडुसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश नेरकर, उपप्राचार्य डॉ. के. जी. कुलकर्णी, यंत्र अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शिवाजी गवळी आदी उपस्थित होते.
या कार्यशाळेत मलेशिया येथील डॉ. अब्दुल खालीफ, रशीद आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ डॉ. विजय वऱ्हाडे, डॉ. सबिन मिश्रा, डॉ. नजीब खान, डॉ. प्रदीप हेगडे शारजा मेन्स कॉलेज, दुबई यांनी मार्गदर्शन केले.  डॉ. एम. एम. भूमकर व डॉ. जी. एम. मोडक यांनी कार्यशाळेचे समन्वयन केले. डॉ. पी. जी. कुलकर्णी व डॉ. न. गो. जैस्वाल यांनी आभार केले.

विज्ञान साहित्याची चळवळ उभा राहावी- डॉ. फुला बागुल

0
पुणे : “विज्ञान कथांमधून विज्ञान शोधाची प्रेरणा मिळते. मराठी विज्ञान साहित्यामध्ये अनेक संभवनीयता आहेत. या संभवनीयतेला अनेक आयाम आणि पैलू आहेत. आजच्या संभवनीयता उद्या वैज्ञानिक क्रांतीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. त्यामुळे विज्ञान साहित्याची चळवळ उभी राहून नवनवीन विज्ञान साहित्य निर्माण व्हावे,”.असे प्रतिपादन धुळे येथील एस. पी. डी. एम. महाविद्यालयातील संशोधक प्राध्यापक डॉ. फुला बागुल यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माधवराव पटवर्धन सभागृहात ‘मराठी विज्ञान साहित्यातील संभवनीयता’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. फुला बागुल बोलत होते. याप्रसंगी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. विद्याधर बोरकर, सचिव नीता शहा, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आदी उपस्थित होते.
डॉ. फुला बागुल म्हणाले, “मराठी साहित्यात विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि कवितेतून मांडलेले कल्पित हे वैज्ञानिक संभवनीयता आहे. हेच कल्पित विज्ञानातील संशोधनाच्या आधारे भविष्यात अनेकदा वास्तव दर्शवणारे असल्याचे आपण पहिले आहे. लेखक-कवी यांनी पूर्वी चंद्र, मंगळ येथे मानवी वस्ती असल्याचे चित्र रंगवले. आज ते चित्र प्रत्यक्षात उतरू पाहत आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने वास्तवात आणल्या आहेत. मानवी मनात विज्ञान साहित्याने कुतूहल निर्माण केले, तर हेच कुतूहल शमविण्याचे काम विज्ञानातील अनेक शोधांनी केले. या शोधांमागे विज्ञान साहित्यातील हे कल्पित आहे.”

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, “विज्ञानाची पाठ्य पुस्तके मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्यात अपयशी ठरली आहेत. त्यातली क्लिष्ट परिभाषा आणि शिक्षकांनी रंजक पद्धतीने विज्ञान न शिकविणे यामुळे विद्यार्थी विज्ञान विषयक लेखन वाचत नाहीत. कल्पना ते वास्तव हा प्रवास विज्ञान साहित्यामुळे शक्य होऊ शकतो. आजवर आपण केवळ विज्ञानाचे पदवीधर तयार केले विज्ञाननिष्ठ समाज मात्र तयार झाला नाही समाजाला विज्ञाना भिमुख करण्यासाठी विज्ञान साहित्याची गरज आहे.”
“समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान परिषदेतर्फे सातत्याने विज्ञानविषयक उपक्रम राबवले जातात. आपली मराठी भाषा आणि विज्ञान याचा मेळ घालून दोन्ही गोष्टी समृद्ध करण्याचे कार्ये केले जात आहे. तज्ज्ञांची व्याख्याने, वैज्ञानिक वर्षासहल, विज्ञानविषयक पुस्तकांचे प्रकाशन, विज्ञान रंजनस्पर्धा आदी उपक्रमांचा यात समावेश आहे,” असे नीता शहा यांनी प्रास्ताविकात सांगितले. दीपक करंदीकर यांनी सुत्रसंचालन केले. शशी भाटे यांनी आभार मानले.

पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत

0

पुणे : पुणे शहरातील सर्व पेठांच्या मध्यवर्ती परिसरातील 98 टक्के तर लुल्लानगर, कोंढवा, गुलटेकडी, कॅम्प, स्वारगेट, मंडई, लक्ष्मी रोड, सिंहगड रोड आदी परिसरातील 100 टक्के भागात खंडित झालेला वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून शनिवारी (दि. 2) सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु करण्यात आला आहे. यातील दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे 70 टक्के भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.

पुणे महानगरपालिकेच्या खोदकामात महापारेषण कंपनीची 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने महापारेषणच्या रास्तापेठ जीआयएस 132 केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा आज सकाळी 11.33 वाजता बंद पडला आहे. त्यामुळे महावितरणच्या 6 उपकेंद्रांचाही वीजपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये पर्वती, बंडगार्डन, शिवाजीनगर, पद्मावती व रास्तापेठ विभागातील सुमारे 2 लाख वीजग्राहकांना फटका बसला. पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यासाठी मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे यांच्यासह अभियंते व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर तांत्रिक उपाययोजना सुरु केली. यामध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने रास्तापेठ विभागातील नाना पेठ, रास्तापेठ, भवानी पेठ, दारुवाला पुल, रविवार पेठ, गणेश पेठ आदी परिसर वगळता उर्वरित सर्वच 100 टक्के भागांमध्ये पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. रास्तापेठ विभागामध्ये वीजपुरवठा खंडित असलेल्या परिसरात रात्री उशिरापर्यंत पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे.

धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व योजना लागू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात ‘टीस’ टाटा सामाजिक विज्ञान संस्था या संस्थेने दिलेल्या अहवालावर पुढील कार्यवाही गतिमान करण्यासाठी तसेच केंद्र सरकारकडे करावयाची शिफारस यासाठी हा अहवाल राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला.
उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये सुयोग्य बाजु मांडण्यासह या संपूर्ण प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय समितीने घेतानाच आदिवासी विकास विभागाच्या सर्व योजना आता धनगर समाजालाही लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना या निर्णयांची माहिती दिली.  मुख्यमंत्री म्हणाले, अस्तित्त्वातील आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला आदिवासी विकास विभागांतर्गत सुरु असलेल्या सर्व येाजनांचा लाभ देण्यात येईल. ज्या विविध योजनांचा लाभ आदिवासी समाज बांधवांना मिळतो तोच लाभ धनगर समाजाला मिळेल. यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. टीसच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक गरज असलेल्या भागात तत्काळ शासकीय आश्रमशाळा उभारण्यात येतील. अतिदुर्गम तालुके, गावांमध्ये आदिवासी आश्रमशाळेसारख्याच समर्पित आश्रम शाळा, मॅट्रीकपूर्व आणि मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, इंग्रजी माध्यमांच्या नामांकीत शाळेत प्रवेश आदी सर्व योजनांचा समावेश असेल. पहिल्या टप्प्यात राज्याच्या सहाही विभागात वसतीगृहे बांधण्यात येतील. धनगर समाजासाठी स्वतंत्र घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 10 हजार  घरकुलांची निर्मिती करण्यात येईल. भूमीहिनांसाठी असलेल्या जमीन देण्याच्या येाजनाही धनगर समाजाला लागू करण्यात येतील. चरई- कुरण जमीन देण्यासंदर्भात वन विभागाने निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी नावात बदल करुन आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास व शेळी-मेंढी विकास महामंडळ  या नावाने हे महामंडळ ओळखले जाईल. यामार्फत उद्योजकता विकास, कौशल्य विकास, बिन व्याजी कर्जासंबंधीच्या योजना राबविल्या जातील. या सर्वांसाठी आवश्यक त्या निधीची तरतुदही करण्यात येईल.

# प्रत्येक विभागात विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह
# मॅट्रिकपूर्व आणि मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, नामांकित शाळांमध्ये प्रवेश
# सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव
# उद्योजकता विकासासाठी महामंडळ सक्षम करणार, 10 हजार घरेही बांधणार


आदिवासी समाजाच्या योजना धनगर समाजाला लागू केल्यामुळे धनगर समाजाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे धनगर समाजाची प्रगती होणार  – पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर

 
मुख्यमंत्र्यांनी आमची फसवणूक केली असून बारामती मध्ये घोषणा केल्याप्रमाणे आम्हाला ST समाजाचे जात प्रमाणपत्र हवे आहे. –परमेश्वर केळेकर, सदस्य, धनगर आरक्षण कृती समिती
 
टीस संस्थेने धनगर आरक्षाणावर दिलेला अहवाल गेल्या दीड वर्षांपासून धूळखात पडला आहे. आता निवडणुकींच्या तोंडावर धनगर समाजाला अनूसुचित जमातीच्या सवलती देऊ, टीएसपीच्या सवलती देऊ, बजेटमध्ये विशेष तरतूद करु अशी गाजरं दाखवली जात आहे. बजेट आताच झालं ना? मग का तरतूद केली गेली नाही ? – विपने धनंजय मुंडे

शास्त्रीय नृत्यातून जिवंत झाली ‘ शिव ‘ रुपे

0
पुणे :महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आयोजित  ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘ शिवार्पणम’या शिवस्तुतीपर नृत्य कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
 हा कार्यक्रम  ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे झाला.
या कार्यक्रमात भरतनाट्यम ,कथक ,कुचिपुडी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींमध्ये शिवस्तुतीपर विविध  रचना सादर करण्यात आल्या.
  कार्यक्रमाची संकल्पना अनुजा बाठे यांची होती. शिवांजली डान्स अकॅडमीने हा कार्यक्रम सादर केला. अनुजा बाठे ,साक्षी पासकंठी ,दर्शना पासकंठी ,अनुष्का भंडारी ,मैथली बहिरट,अनुजा  चव्हाण ,धनश्री पुणतांबेकर ,वैष्णवी पुणतांबेकर ,राजलक्ष्मी बागडे  यानी भरतनाटयम रचना सादर केल्या . चिन्मयी गोडबोले ,अतिशा हर्षे कथक रचना  आणि  गौतमी गोडसे कुचीपुडी रचना सादर  केल्या.
या  कार्यक्रमात कैलासवासी शंकर नृत्यसभेत नृत्य करताना पाहायला मिळाले, तांडव नृत्य ही रोमांचित करुन गेले.
 उमापती, महादेव,तांडव प्रिय शंभो, नटेश्वर, रुद्र  ,तिन्ही लोकांचा पालनकर्ता अशी रुपेही नृत्यातून सादर झाली.ध्यानस्थ,त्रिगुण स्वरूप परब्रह्म शिवमुद्राही रसिकांना अनुभवता आल्या.
शिवतांडव स्तोत्र,शिव स्तोत्र तसेच थाळीनृत्यालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
 ‘ भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत होणारा हा ७० वा कार्यक्रम होता.
श्रुती कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी  स्वागत केले.

पुण्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी तृतीयपंथीयाची निवड

0

पुणे – शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रथमच एका तृतीयपंथीयाची निवड करण्यात आली. पुण्यातील तृतीयपंथी चांदणी गोरे यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पुण्याचे उपाध्यक्ष पद देण्यात आले. शुक्रवारी ही नियुक्ती करण्यात आली. पुणे महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या हस्ते चांदणी गोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

आगामी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पुण्यात नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा रुपाली चाकणकर, निरीक्षक रजनी पाचंगे, कालिंदी गोडांबे, तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित होत्या.यावेळी बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि पुरोगामी महाराष्ट्राचा विचार पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यामुळेच आम्ही चांदणी गोरे यांची महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली.

कात्रज – देहूरोड बायपास होणार सहा पदरी : २२३.४६ कोटी निधी मंजूर

0

पुणे : पुणे शहरातून जाणारा मुंबई महामार्ग वाढत्या वाहतूक कोंडीमुळे कात्रजवरून बाह्यवाहतूक वळण मार्ग काढण्यात आला. तसेच पर्यायी  मार्ग म्हणून कात्रज नवीन बोगदा मार्गे वाहतूक वळविण्यात आली. त्याच कारणाने या देहूरोड बायपास मार्गावर वारंवार अपघात व वाहतूक कोंडी होऊन देखील दुर्लक्ष होऊ लागले. मात्र, याचा वारंवार पाठपुरावा करून खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुरव्यामुळे सदर महामार्गाचे रुंदीकरणासाठी ९६.७७ कोटी व कात्रज चौकातील पूलासाठी १२६.६९ कोटी रुपयांचा निधी उभारणीसाठी मंजूर करण्यात आला आहे.
दिवसेंदिवस रस्त्यावरील वाढत्या वाहनांमुळे कात्रज देहूरोड बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनधिकृत पार्किंग व अधिक अनधिकृत दुकाने यामुळे महामार्ग रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला होता त्यामुळे अपघाताची संख्या वाढत होती. बऱ्याच वेळा प्रशासनाला दुरुस्तीसाठी सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जात होते.परंतु, या मार्गाचे सहा पदरी करणामुळे रस्ता रुंद सुरू होऊन महामार्ग वाहतुकीस योग्य ठरेल या महामार्गावरील गरजेनुसार रस्ते किंवा भुयारी मार्ग तयार केले .मात्र, त्यानंतर या रस्त्याचा विकास किंवा रुंदीकरण किंवा भुयारी मार्गाची निर्मिती न केल्याने वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले होते. आंबेगावला जोडणारा दत्तनगर येथे राजमाता भुयारी मार्ग वाढत्या लोकसंखेमुळे कमी पडू लागला आहे. सदर रस्त्याचे रुंदीकरण कोणी करायचे याबाबत मतभेद असल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाले नव्हते त्यास अखेर मुहूर्त मिळाला.
या महामार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे, 3.88 किलोमीटर लांबीच्या कात्रज ते वडगाव नवले ब्रीज सहापदरी रस्त्याच्या कामासाठी 96.77 कोटी व कात्रज चौकातील फ्लाय ओव्हर उभारणीसाठी 126.69 कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याने काही दिवसात या वाहतूक कोंडीतून सुटका होणार हे निश्चित झाले आहे.
याबाबत महामार्ग प्रशासनाचे अधिकारी गणेश चौरे यांनी सांगितले की ,कात्रज ते नवले पूल या बायपास महामार्गाच्या सहापदरी रुंदीकरण तसेच दोन्ही बाजूने दोन पदरी सेवा रस्त्याचे तसेच आंबेगाव शिवसृष्टी आणि दत्तनगर येथील भुयारी मार्गाचे रुंदीकरण, तसेच दोन पादचारी मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे, निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. काही दिवसात महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कात्रज येथील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा सुरू होता, त्याला यश लाभले.असून वडगाव नवले ब्रीज ते कात्रज चौक या ६ पदरी रस्त्यासाठी निधीला मंजुरी मिळाली आहे.या उपाययोजनांमुळे आता वाहतूक कोंडी होणार नाही.वाढत्या शहराचा विकास व पायाभूत सुखसुविधा देण्यावर माझा कटाक्ष असेल.

‘एक घर मंतरलेलं’गूढ आणि रहस्यमय नवीन मालिका

0

छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री सुरुची अडारकर. यापूर्वी ‘का रे दुरावा’ या मालिकेत ही जोडी बराच काळ एकत्र दिसली. त्यानंतर त्यांचं ‘स्ट्रॉबेरी’ हे नाटक आलं. सुयश आणि सुरुची यांच्यातला ‘दुरावा’ संपला आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय. झी युवा वरील ‘एक घर मंतरलेलं’ या नव्या मालिकेमध्ये हे दोघे दिसणार आहेत.

घराची ओढ प्रत्येकालाच असते, पण असंही एक घर असतं जे तुम्हालाचं ओढून घेतं…हे वाक्य जेवढं गूढ आहे तशीच ही मालिका सुद्धा आहे . काहीतरी अनपेक्षित  गूढ आणि रहस्यमय अशी ही नवीन मालिका ‘एक घर मंतरलेलं’ ४ मार्चपासून  सोमवार ते शनिवार रोज रात्री ९:३० वाजता झी युवा वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत सुरुची एका न्यूज रिपोर्टरची भूमिका साकारणार असून सुयशच्या व्यक्तिरेखेबद्दल अजूनही गुप्तता बाळगण्यात आली आहे. पण सुयशची भूमिका देखील तितकीच दमदार आणि वेगळी असेल यात शंकाच नाही. तूर्तास ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येतेय आणि या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेचे वेध लागले असून ते या मालिकेची आतुरतेने वाट बघत आहेत. ही वेगळ्या धाटणीची मालिका आणि त्यातील सुरुची व सुयशची अनोखी भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही.