पुणे-कॉंग्रेसकडे उमेदवार नाहीत असे नाही, उमेदवार आहेत ,पण ते तुल्यबळ आहेत कि नाही हा मुद्दा वेगळा .पण उमेदवार असताना ,शिवाय बाहेरून ही एक पैलवान रेडी असल्याची वृत्ते येत असताना कॉंग्रेसच्या उमेदवाराचे नाव यायला उशीर होणे हे कोडे अजून कोणाला उलगडलेले नाही . अशोक चव्हाण ,पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखे नेते पत्रकारांना म्हणताहेत कि अध्यक्षांना विचार ,आता पुण्यातील उमेदवारांनी थेट राहुल गांधींना फोन करायचा असाच त्याचा अर्थ होतो .त्यांच्या वक्तव्याचे सोडा ,पण विलंबाचा अर्थ मात्र जो तो आपापल्या परीने लावू लागला आहे . काही म्हनताहेत यांच्याकडे तुल्यबळ उमेदवार नाही ,काही म्हणताहेत यांना उमेदवार आयात करावे लागतात ,अजित पवार तर पूर्वीच म्हटलेच होते यांच्याकडे उमेदवार नसल्यानेआणि इथे राष्ट्रवादी प्रबळ झाल्याने हि जागा राष्ट्रवादी लढवेल … कित्येक बातम्यावर बातम्या ..कोणी म्हणाले हर्षवर्धन पाटील,वंदना चव्हाण ,कोणी म्हणाले शरद पवार ..संजय काकडे यांच्या घरवापसी नंतर कॉंग्रेस चा उमेदवार कोण यावर बरीच चर्चा आणि उत्सुकता दिसून आली . प्रवीण गायकवाड यांचे नाव २ माध्यमांनी लावून धरले आणि त्यांनी ते माघारी हि घेतले .अरविंद शिंदे यांच्या नावाचा काळ मोठा गाजावाजा झाला . मोहन जोशी, अभय छाजेड हि मंडळी कधीपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत .एवढेच काय तत्पूर्वी बाळासाहेब शिवरकर ,अनंत गाडगीळ, उल्हास पवार अशा इच्छुकांची नावे प्रदेशच्या पातळीवरच कापली गेली . निवडणूक लढवायला पैका लागतो ..हे त्रिवार सत्य आहे, अर्थात आम्ही चहा पाजू शकत नाही पण निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार याच पुण्यात अधून मधून कुठे तरी दिसतात .या पार्श्वभूमीवर गेली कित्येक वर्षे आमदार ,५ वर्षे मंत्री राहिलेले गिरीश बापट यांना भाजपने रिंगणात उतरविले आहे . शिवाय आता त्यांना त्यांचे एकेकाळचे पक्षातील स्पर्धक संजय काकडे यांचे पाठबळ लाभणार आहे .साम ,दाम ,दंड ,भेद ..आणि मोदी नावाचा जयघोष , फडणवीसांची चतुराई अशी ताकद घेवून बापात रणांगणात आले आहेत .आणि त्यांना सुद्धा आपल्या रिंगणातील स्पर्धकाची प्रतीक्षा आहे . तोवर त्यांचा प्रचार सुरूच आहे.पण नजर मात्र कॉंग्रेसचा कोण येतोय याकडेच आहेत . कधी नव्हे, म्हणजे कित्येक वर्षानंतर कॉंग्रेसच्या उमेदवाराबाबत निर्माण झालेली उत्सुकता ..आता कॉंग्रेस खरोखर किती तुल्यबळ उमेदवार देईल .. यावरच आणखी रोमहर्षक ठरणार आहे. भाजपकडून बापट म्हटले कि कॉंग्रेस मराठा ,बहुजन उमेदवार देईल अशी सर्वांची धारणा आहे .आणि लढत अशीच होईल असेही सर्वांना वाटते आहे. अर्थात तगडा उमेदवार कधीही रिंगणात बोलवा तो सदैव तयार असतो, उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत देखील असा उमेदवार कॉंग्रेस देवू शकते .तोवर कोण कोण माघारीच्या तयारीने अर्ज भरून ठेवतय ..हीही गम्मत असतेच .. पुणेरी बापटांना फाईट द्यायला कोण येतंय याकडेच सर्वांचे तूर्त तरी लक्ष लागून आहे . खरे तर उमेदवार ठरलेला असताना हि उत्सुकता ताणून ठेवण्यामागे नेमका कोणाचा काय फंडा आहे ..ते कळल्याशिवाय देखील राहणार नाहीच पण त्यासाठी थोडी प्रतीक्षा माध्यमांना करावी लागणार आहे हे नक्की .
सिद्धार्थ जाधवने झी चित्र गौरव २०१९ मध्ये पटकावला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ सन्मान
मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करत आहेत. हा पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच. यावर्षी देखील कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०१९’ सोहळ्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यंदा मराठी पाऊल पडते पुढे हा सन्मान महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याला देण्यात आला. हिरो म्हणजे देखणा चेहरा आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व असा समज खोडून काढून आपल्या नावावर हाऊसफुलचा बोर्ड झळकवणारा हिरो अर्थात सिद्धार्थकुमार रामचंद्र जाधव. गेली अनेक वर्षे सहजसुंदर अभिनयातून सिद्धार्थने तमाम मराठी प्रेक्षकांना अभिमानाचे अनेक क्षण दिले. मराठीत हिरोच्या रुबाबाने वावरणारा सिद्धू आता हिंदीत काम करणार अशी जेव्हा चर्चा ऐकू लागली तेव्हा अनेकांनी तर्क लावले की हिंदीत काम करणार म्हणजे एखाद्या दुय्यम भूमिकेतच दिसणार. पण या चर्चेलाही छेद देत हिंदीतल्या हिरोच्या बरोबरीने मैदानात उतरत हिंदी चित्रपट सृष्टीतल्या बड्या बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सिद्धार्थने त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं. केवळ मराठी नाही तर हिंदी टेलिव्हिजनचाही सिद्धार्थ महत्त्वाचा चेहरा ठरला. यावर्षी प्रदर्शित झालेल्या सिम्बा या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत आपला सिद्धू स्क्रिनवर येतो तेव्हा आम्हा मराठी प्रेक्षकांची अभिमानाने कॉलर टाइट होते. केवळ मराठी कलापरंपरेची पताका सर्वदूर पोहोचवणं नव्हे तर ती टिकवण्यासाठी जातिवंत कलाकारच लागतो आणि म्हणूनच पुढे पडणाऱ्या सिद्धार्थच्या प्रत्येक पावलाला साथ देण्यात आनंद मनात झी चित्र गौरव २०१९ मध्ये सिद्धार्थ जाधवला मराठी पाऊल पडते पुढे या गौरवाने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान स्वीकारताना सिद्धार्थची प्रतिक्रिया पाहण्यासाठी बघायला विसरू नका ‘झी चित्र गौरव २०१९’ रविवार ३१ मार्च संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.
सक्षम सरकार येण्यासाठी नागरिकांकडून ‘व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान
पुणे : एकमेकांत गुंतलेले, आघाडी-युतीच्या वादात सापडलेले सरकार आणण्यापेक्षा कोणत्याही एकाच चांगल्या पक्षाची निवड करावी, यासाठी शंभर टक्के मतदान होणे गरजेचे आहे. आपण प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे बजावला तर एक सक्षम सरकार या देशात येऊ शकते. त्यासाठी शहरातील जबाबदार नागरिकांनी एकत्र येत ’व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ अभियान सुरु केले आहे. नागरिकांशी संवाद साधून मतदान जागृती करण्याचा प्रयत्न या ’व्होट फॉर स्ट्रॉन्ग गव्हर्नमेंट’ कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या अभियानाविषयी माहिती देण्यासाठी नागरिकांनी पत्रकार परिषदेत घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अभियानाचे सदस्य यशवंत घारपुरे, विलास रबडे, मिलिंद भागवत, अभय भंडारी, नचिकेत भंडारी, रविंद्र खाडिलकर यांच्यासह इतर उपस्थित होते.
यशवंत घारपुरे म्हणाले, शिपायाची नोकरी करण्यासाठीही दहावी-बारावी शिक्षण असावे लागते. मात्र, राज्याची धुरा सांभाळणार्या राजकारण्यांना शिक्षणाची अट नाही. लोकशाहीच्या नावाखाली निरक्षर लोकांना निवडून द्यावे का हा विचार केला पाहिजे. राजकारण किंवा सगळेच राजकारणी वाईट नाहीत. त्यात अनेक चांगले आणि धडपडीने काम करणारे आहेत. तेव्हा आहे चांगल्या सुसंस्कृत आणि सुशिक्षित राजकारण्याला निवडून देण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचारी राजकारण्यांना दूर ठेवायचे असेल, तर आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. मतदान करणे सोडल्यामुळे आणि निवडणुकीची सुट्टी फिरायला जाण्यात घालवणे यामुळे आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. त्याचाच फायदा घेऊन मूठभर राजकारण्यांनी राजकारण बदनाम केले शिवाय देशाच्या प्रगतीत खोडा घातला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्याला समस्या सोडवाव्यात, आपल्या प्रश्नाची उत्तरे द्यावीत, असे वाटत असले, तर आपण प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे आहे. तेव्हा जागे व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. मनाशी पक्के करा की यंदा मतदानाचा हक्क बजावणारच. उमेदवार निवडताना त्याचे शिक्षण, त्याची सामाजिक जाणीव, निष्ठा, प्रामाणिकपणा, हे सगळे तपासून बघा. तुमचे मत अमूल्य आहे. ते देताना नीट विचार करून द्या. चांगला आणि सुयोग्य उमेदवार निवड. त्यातून देशाचे भवितव्य उज्ज्वल असेल.
विलास रबडे म्हणाले, योग्य व्यक्तीला मतदान करा व चांगल्या सरकारची अपेक्षा करा. आम्ही जनतेने 100% मतदान करावे म्हणून 1,00,000 बिल्ले तयार केले आहेत. या बिल्यावर ‘Vote for strong government and protect Nation. योग्य उमेदवाराला चांगले सरकार बनविण्यासाठी मतदान करा व देश अपात्र व गुन्हेगारी प्रवृत्तींच्या उमेदवारापासून वाचवा. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही फक्त चांगले सरकार निवडून येण्यासाठी मतदान करावे व या मोहीमेत सहभागी व्हावे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी 9822502078, 9820026265 यावर संपर्क साधावा. भेटेल त्याला मतदान करण्याचे आवाहन केले जात असून, खेड्यामध्ये जावूनही याबाबत जनजागृती केली जाणार आहे. सध्या एकूण २० ग्रुप वेगवेगळ्या भागात काम करत आहेत.
सूर्यनारायणाने घेतले भुलेश्वराचे दर्शन , दुर्मिळ योग पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
पुणे-जिल्ह्यातील श्री क्षेत्र भुलेश्वर मंदिरात गुरुवारी (दि. २८) सकाळी सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणाने शिवलिंगाचे दर्शन घेतले. याप्रसंगी भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने आजूबाजूचा परिसर दुमदुमुन गेला. हा किरणोत्सव पाहण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये २८ मार्च रोजी भुलेश्वर मंदिरात किरणोत्सव होतो .यामुळे आज किरणोत्सव होणार हे भाविकांना माहीत असल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी शिवलिंगासमोरील खिडकीतुन सूर्याची किरणे साधारण शंभर फुट आंतर पार करत मंदिराच्या गाभा-यातील भिंतीवर पडली. मंदिरातील वीज बंद करण्यात आल्यामुळे आतमध्ये पूर्ण अंधार होता. यामुळे सूर्याची किरणे अधिक प्रखर दिसत होती.सूर्य उगवल्यानंतर किरणे मंदिरात आली. व हळूहळू शिवलिंगाकडे येऊन भुलेश्वरच्या मुखवट्यावर पडली. आणि भुलेश्वर महाराज की जय च्या जयघोषाने भुलेश्वरचा परीसर दुमदुमुन गेला. भुलेश्वरच्या मुखवट्याचे तेज पाहुन भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. त्यानंतर मुखवटा बाजुला ठेवण्यात आला. व सुयार्ची किरणे शिवलिंगावर जाऊन पडली. शिवलिंग तेज होऊन सोनेरी दिसु लागले. हा क्षण पहाण्यासाठी भाविक पहाटेपासुन थांबुन होते. भुलेश्वर देवस्थानचे पुजारी राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले की सप्टेंबर महिन्यात सुर्यकिरण पिंडीपर्यंत येणे हा दुर्मिळ योग आसतो. यावेळी ढगाळ वातावरण असते. माञ २८ मार्च ला हमकाश सुर्येकिरण शिवलिंगावर पडते.यावेळी भुलेश्वर पंचक्रोशीतील माळशिरस, टेकवडी , यवत ,कासुर्डी अशा परिसरातील भाविकांनी गर्दी करतात .
७०० मेगावॅट पीपीएला पुढील पाच वर्षांसाठी मंजुरी दिली
मुंबई-महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन (एमईआरसी)ने टाटा पॉवर या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक वीज कंपनीच्या वितरण व्यवसायाला त्यांच्या निर्मिती व्यवसायासोबत पॉवर पर्चेस अॅग्रीमेंट (पीपीए)साठी मंजुरी दिली आहे. या कराराअंतर्गत, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२४ या पाच वर्षांच्या काळात निर्मिती व्यवसायाच्या ट्रॉम्बे थर्मल आणि हायड्रो प्लांट्समधून ७०० मेगावॅट वीजेचा पुरवठा केला जाणार आहे.
मुंबईतील टाटा ग्राहकांसाठी पुरवठ्यातील विश्वासार्हता आणि स्पर्धात्मक दराची हमी यांची योग्य खातरजमा केल्यानंतर माननीय आयोगाने २६ मार्च २०१९ रोजी या कराराला मंजुरी दिली.
“टाटा पॉवर शतकाहून अधिक काळ मुंबई शहराला सेवा देत आहे आणि यापुढेही आपल्या ग्राहकांना सर्वात विश्वासार्ह व स्पर्धात्मक दरात वीज पुरवून त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास बांधिल आहे,” असे टाटा पॉवरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले.
याआधी, जानेवारी २०१९ मध्ये माननीय आयोगाने टाटा पॉवर आणि बेस्टदरम्यानच्या ८७७ मेगावॅटच्या पॉवर पर्चेस अॅग्रीमेंटला (पीपीए) मान्यता दिली होती.
आपल्या ग्राहकांसाठी वितरण व्यवसाय ऊर्जा भागीदारीची ही प्रक्रिया १ एप्रिल २०१९ पासून हाती घेत आहे. सध्याची भागीदारी ३१ मार्च २०१९ रोजी संपुष्टात येत आहे.
यामुळे मुंबईकरांना स्वस्तात वीज मिळण्यासोबतच कमी खर्चिक अशा जलविद्युत केंद्रातील वीजेचा अतिरिक्त लाभ मिळेल. त्याचप्रमाणे टाटा पॉवर थर्मल आणि हायड्रो जनरेटिंग स्टेशन्समुळे मुंबईला अखंडित वीज मिळण्याची खातरजमा होईल.
शब्दांगण साहित्य पुरस्कार ‘आषाढ’ काव्यसंग्रहाला प्रदान
पुणे-अभिनेत्री, निर्माती, कवयित्री भाग्यश्री देसाई यांच्या ‘आषाढ’ या त्रैभाषिक काव्यसंग्रहाला नुकताच चौथा मानाचा पुरस्कार मिळाला. शब्दांगण साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यासपीठ आणि दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा यंदाचा “चैतन्य शब्दांगण साहित्य गौरव पुरस्कार” देसाई यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या प्रसंगी प्रा.भीमराव धुळूबुळू, डॉ. यशवंत पाटणे, गौरी भोगले, सुप्रिया वकील, राजेंद्र नागरगोजे, नामदेव भोसले, ऋजुता माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भाग्यश्री देसाई त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की ‘आषाढ’ या माझ्या काव्यसंग्रहाला शब्दांगण साहित्य पुरस्कार आपण दिल्याबद्दल आपली मी ऋणी आहे. मी नामदेव भोसले आणि इतर मान्यवरांचे आभार मानते. हा पुरस्कार म्हणजे माहेरचा आहेर असल्याने त्याचे महत्त्व अधिक आहे अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
नामदेव भोसले यावेळी म्हणाले की भाग्यश्री देसाई यांच्या काव्यसंग्रहाला पुरस्कार देवून आम्हाला आनंद झाला. कारण ‘आषाढ’ हा काव्यसंग्रह दर्जेदार असून त्यातील कविता मनाचा आणि अंतर्मनाचा ठाव घेतात. योग्य व्यक्तीला पुरस्कार मिळाल्याच आम्हाला समाधान आहे.
टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 2V (एबीएस) नव्या रेसिंग वैशिष्ट्यांसह दाखल
होसुर: टीव्हीएस मोटर कंपनी या जगातील प्रतिष्ठित टू-व्हीलर्स व थ्री-व्हीलर्स उत्पादक कंपनीने संपूर्ण टीव्हीएस अपाचे आरटीआर सीरिज एबीएसने अपडेट केल्याचे जाहीर केले आहे. अपाचे आरटीआर 160 2V, अपाचे आरटीआर 160 4V व अपाचे आरटीआर 180 यासाठीच्या सुपर मोटो एबीएसमुळे रायडरना अत्यंत सुरक्षितता प्राप्त होणार आहे. टीव्हीएस अपाचे आरटीआर सीरिज मोटरसायकलमध्ये बसवलेले अत्याधुनिक एबीएस युनिट विशेष अल्गोरिदम, रेसिंग ट्रॅक विचारात घेऊन तयार केले आहे. यामुळे रायडरना वेग कमी न करता वळणावर पटकन वळण्यासाठी मदत होईल.
अपाचे आरटीआर 200 4V रेस एडिशन 2.0 मध्ये यापुढेही ड्युएल-चॅनल एबीएस व आरएलपी (रिअर व्हील लिफ्ट-ऑफ प्रोटेक्शन) कंट्रोल उपलब्ध असणार आहेत आणि त्यामुळे व्हील लॉक शोधणे व रिकव्हरी झटपट होणार आहे. यामुळे, ब्रेकिंगच्या बाबतीत दर्जेदार कामगिरी केली जाईल व जास्तीत कॉर्नरिंग नियंत्रण मिळेल. सर्व मॉडेलमध्ये एबीएसचा वापर केल्यामुळे, टीव्हीएस अपाचे आरटीआर सीरिज लेट ब्रेकिंग हाताळण्यासाठी अधिक सज्ज राहील व कॉर्नरवर उत्तम नियंत्रण प्राप्त होईल. या व्यवस्थेमुळे उत्कृष्ट ब्रेकिंग नियंत्रण शक्य होते.
टीव्हीएस मोटर कंपनीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी के. एन. राधाकृष्णन यांनी सांगितले, “निर्मिती केल्यापासूनच, टीव्हीएस अपाचे सीरिजने फॅक्टरी रेसिंग व्हर्जनमधील अद्ययावत तंत्रज्ञान सादर करून बाइकच्या कामगिरीमध्ये कमालीचे बदल आणले आहेत. 2011 मध्ये, भारतीय टू-व्हीलर उद्योगात अपाचे आरटीआर 180 मध्ये ट्विन चॅनल एबीएस (अँटि-लॉक ब्रेकिंग सिस्टीम) वापरणारे आम्ही पहिले उत्पादक होतो. ही परंपरा कायम राखत, आरटीआर 160; आरटीआर 160 4V व आरटीआर 180 आवृत्तींमध्ये आज सुपरमोटो एबीएसचा समावेश करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. हे वैशिष्ट्यपूर्ण व रेसिंगपासून प्रेरित एबीएस तंत्रज्ञान उत्तमोत्तम कामगिरी शक्य करते, तसेच ग्राहकांना अद्ययावत सुरक्षा तंत्रज्ञानही उपलब्ध करते. केंद्र सरकारने निश्चित केलेल्या नियमनात्मक बाबींची पूर्तता करण्यासाठी मोटरसायकल विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहेत.”
कंपनीने नवीन वैशिष्ट्यांचा समावेश असणारी टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 2V (एबीएस) दाखल केल्याचेही जाहीर केले आहे. नव्या मॉडेलमध्ये पूर्णतः नवा, बॅक-लिट स्पीडोमीटर व डायल-आर्ट आहे, नव्या सीट व अधिक स्थिरतेसाठी व अचूकतेसाठी नवा हँडल-बार एंड डॅम्पनर आहे. नव्या वैशिष्ट्यांमध्ये टीव्हीएस रेसिंगपासून प्रेरित ग्राफिक अधिक वेधक असणार आहे.
एबीएस असणारी संपूर्ण टीव्हीएस अपाचे आरटीआर मालिका भारतातील सर्व टीव्हीएस मोटर कंपनी शोरूममध्ये उपलब्ध आहे.
किंमत (एक्स-शोरूम दिल्ली)
एबीएससह टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 फ्रंट डिस्क (ड्रम) – 85,510 रुपये
एबीएससह टीव्हीएस अपाचे आरटीआर 180 – 90,978 रुपये
एबीएससह टीव्हीएस अपाचे आरटीआर 160 4V (ड्रम) – 89,785 रुपये
एबीएससह टीव्हीएस अपाचे आरटीआर 200 (कार्ब) – 1,11,280 रुपये
टीव्हीएस मोटर कंपनीविषयी
ही कंपनी प्रतिष्ठित टू व थ्री-व्हीलर उत्पादक आहे आणि 7 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या टीव्हीएस समूहाची प्रमुख कंपनी आहे. वाहतुकीद्वारे प्रगती करण्यावर आमचा भर आहे. विश्वास, मूल्य, ग्राहकांप्रती व अचूकतेप्रती पॅशन या आमच्या 100 वर्षे जुन्या परंपरेला अनुसरून, नावीन्यपूर्ण व शाश्वत प्रक्रियेद्वारे अत्यंत दर्जेदार अशी आंतरराष्ट्रीय स्तराची उत्पादने बनवताना आम्हाला अभिमान वाटतो. 60 देशांतील आमच्या सर्व टच पॉइंटमध्ये ग्राहकांना उत्तम अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असतो. प्रतिष्ठेचे डेमिंग प्राइझ मिळालेली ही एकमेव टू-व्हीलर कंपनी आहे. गेली चार वर्षे, जे. डी. पॉवर आयक्यूएस व अपील सर्वेक्षणांमध्ये आमची उत्पादने त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये आघाडीवर राहिली आहेत. सलग तीन वर्षे म्ही जे. डी. पॉवर कस्टमर सर्व्हिस सॅटिसफॅक्शन सर्व्हेमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे.
वडगावशेरीत महायुतीला सर्वाधिक मताधिक्य देऊ कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार
पुणे- वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात भाजप, सेना, आरपीआय, रासप व शिवसंग‘ाम महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांना पुणे शहरात सर्वाधिक मतदान व मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार बुधवारी झालेल्या महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात करण्यात आला.
महायुतीचे उमेदवार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचीक, शहराध्यक्ष महादेव बाबर, आरपीआयचे अध्यक्ष अशोक कांबळे, उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक या प्रमुख नेत्यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले. मेळाव्यात एक हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी बोलताना श्री. बापट म्हणाले, ‘वडगावशेरीत महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे मोठे काम आहे. अनेक वर्षांपासून आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे विस्तृत जाळे गुंङ्गले आहे. मतदारसंघातील महायुतीच्या नगरसेवकांची सं‘या एक वरून सतरा इतकी वाढली आहे. महापालिकेत सत्तेत आल्यानंतर उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशी महत्त्वाची पदे या मतदारसंघात दिली. त्यामुळे या भागाच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. महायुतीचे कार्यकर्ते एकसंघपणे प्रचारात उतरले आहेत. आम्ही सकारात्मक प्रचारावर भर देणार आहोत.’
गिरीश बापट तीन लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील असा विश्वास खासदार काकडे यांनी व्यक्त केला. महायुतीचे मताधिक्य वाढविण्यासाठी प्रभाग स्तरावर नियोजन करण्याची आवश्यकता कुचीक यांनी व्यक्त केली. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून सुरू केलेल्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन गोगावले यांनी केले. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे तपशिलवार नियोजन करीत असल्याचे बाबर यांनी सांगितले.
बूथ स्तरावरील भाजपची यंत्रणा सक्षम असून महायुतीची मदत मिळाल्याने ती अधिक बळकट झाली असल्याचे आमदार मुळीक यांनी सांगितले. सामान्य कार्यकर्त्याच्या मनाचा वेध घेऊन काम करणारा कार्यकर्ता अशी बापटाची प्रतिमा असल्याने कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. दोन वर्षांतील विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन भोसले यांनी केले. संतोष राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले.
बॉलिवूड भीतीपोटी नरेंद्र मोदींना समर्थन देत आहे – प्रिया दत्त
मुंबई-माजी खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रिया दत्त यांनी नरेंद्र मोदी सरकारला बॉलिवूडकडून मिळणारं समर्थन हे भीतीपोटी असल्याचं म्हटलं आहे. प्रिया दत्त यांना मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रिया दत्त दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. 2014 च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता. यावेळी पुन्हा एकदा प्रिया दत्त यांची पूनम महाजन यांच्याशी लढत असणार आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.
यावेळी त्यांना सध्या बॉलिवूड अभिनेते राजकीय भाष्य करत असून केंद्र सरकारची बाजू मांडत असल्याबद्दल विचारण्यात आलं. यावर हे भीतीपोटी होत असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘तुम्हाला वाटत नाही का यामागे भीती हे कारण आहे ? मला तरी असंच वाटतं. नाहीतर अचानक इतका बदल कसा झाला असता?’, असा प्रश्न प्रिया दत्त यांनी विचारला आहे.
‘प्रत्येकाचं नुकसान झालं आहे. प्रत्येक नागरिकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. समाजावर ते प्रभाव पाडतात. पण त्यांच्यावरही जबाबदारी असते. त्यामुळे त्यांनी स्पष्ट मत मांडलं पाहिजे’, असं प्रिया दत्त यांनी म्हटलं आहे. यावेळी प्रिया दत्त यांनी राजकारणातून ब्रेक घेण्यासंबंधी आणि पुन्हा निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यासंबंधीही सांगितलं.
‘मी दोन ते तीन वर्ष राजकारणात सक्रीय होते. पण मला माझ्या वैयक्तिक कामांवरही लक्ष द्यायचं होतं. मी नर्गिस दत्त फाऊंडेशनसाठी काम करत होते. ती नेहमीच माझी आवड राहिली आहे. मी राजकीयदृष्या सक्रीय नव्हते. मला माझ्या मुलांना सर्व वेळ द्यायचा होता जो मी गेल्या दहा वर्षात देऊ शकले नव्हते’, असं प्रिया दत्त यांनी सांगितलं आहे.
अंतर्गत राजकारणामुळे आपण निर्णय घेतला ही चर्चा चुकीचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ‘लोक खूप अंदाज लावतात. माझं कारण वैयक्तिक होतं. मी प्रत्येकाला त्याप्रमाणे कळवलं होतं. आमच्यात अनेक वैचारिक मतभेद होते हे मान्य आहे, पण आम्ही त्यावर चर्चा करुन तोडगा काढला आहे’, अशी माहिती प्रिया दत्त यांनी दिली.
ओबीसी लोकप्रतिनिधींचीदेखील भाजपमध्ये अवहेलना : राहुल गांधी
नवी दिल्ली -ओबीसींना कॉंग्रेस न्याय मिळवून देईल .आपल्याच पक्षातील ओबीसी लोकप्रतिनिधींची देखील भाजप मध्ये अवहेलना होते आहे असा आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याच्या घोषणेचा पुनरुच्चार करतानाच भाजपाने गरिबांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने गरिबीविरोधात सर्जिकल स्ट्राइक करेल , असे आश्वासन दिले आहे. .
राजस्थानमधील गंगानगर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी काँग्रेसच्या गरिबी हटाव योजनेची माहिती दिली. किमान वेतनाची हमी आम्ही दिली असून या योजनांमुळे २०१९ नंतर देशातील गरिबी नष्ट होईल, असा दावा त्यांनी केला. भाजपाने गरिबांना संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने थेट गरिबीविरोधातच सर्जिकल स्ट्राईक केले, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पुन्हा एकदा ‘गरिबी हटाव’चा नारा दिला असून देशातील सर्वाधिक गरीब असलेल्या २० टक्के कुटुंबांना वर्षाला प्रत्येकी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी केली होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे विधान केले आहे.
मंगळवारी सभेत राहुल गांधी पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षांमध्ये दोन भारत तयार झाले. एक भारत जो फक्त श्रीमंतांचा आहे आणि दुसरा भारत जो शेतकरी, छोटे दुकानदार आणि व्यापारी, नोकरदार, कामगार वर्गांचा आहे. मात्र, आपल्या देशाचा झेंडा एक आहे, तर देशात असे विभाजन नको. मोदीजींच्या भारतात फक्त श्रीमंत स्वप्न पाहू शकतात. तर शेतकरी, गरीब, लहान मुले स्वप्न पाहू शकत नाही. प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये, दोन कोटी तरुणांना रोजगार, शेतकरी कर्जमाफी अशी विविध आश्वासनं मोदींनी दिली. पण यातील एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेले नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. नोटाबंदीद्वारे मोदींनी गरिबांकडील पैसे हिसकावून घेतले, गब्बर सिंह टॅक्स (जीएसटी) आकारला, मोदी हे स्वत:ला चौकीदार म्हणतात, पण ते देशातील जनतेचे नव्हे तर अंबानींचे चौकीदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. मोदी सरकारच्या काळात बँकांची चावी नीरव मोदी सारख्यांच्या हाती आहे, पण काँग्रेसची सत्ता आल्यास तर बँकांची चावी गरिबांच्या हाती असतील, असे त्यांनी सांगितले.
‘बापट साहेब, तुम्ही कसब्यात प्रचाराला येऊच नका….
पुणे- गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ गिरीश बापट कसब्याचे आमदार आहेत. तसेच, या भागामध्ये भारतीय जनता पक्ष-शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभेचे कार्यक्षेत्र मोठे असल्याने ‘बापट साहेब, तुम्ही कसब्यात प्रचाराला येऊच नका. तुम्हांला सर्वाधिक मताधिक्य देण्याची जबाबदारी आमच्यावर’, अशा शब्दांत भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बापट यांनी निश्चिंत राहण्याविषयी सुचविले आहे.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइंचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांना त्यांच्या पारंपरिक कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार युतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. भाजपचे हजारीभाग प्रमुख आणि शिवसेनेचे गटप्रमुख यांच्या माध्यमातून मतदान वाढविण्यावर भर देण्याचा संकल्प करण्यात आला.
पुणे लोकसभेसाठी बापट यांची उमेदवारी जाहीर करून मंगळवारी भाजपने प्रचार सभा घेतली. या सभेनंतर विधानसभा मतदारसंघनिहाय युतीच्या पदाधिकाऱ्यांचे मेळाव्यांना सुरुवात करण्यात आली. बापट यांचे कार्यक्षेत्र असलेल्या कसबा विधानसभेतील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.
बापट १९९५पासून कसबा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. तसेच, दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपला कसब्यातून चांगले यश प्राप्त झाले होते. लोकसभेच्या निवडणुकीतही कसबा मतदारसंघातून भाजपला कायमच मताधिक्य मिळाले आहे. यंदाच्या निवडणुकीत बापटच उमेदवार असल्याने त्यांचे मताधिक्य आणखी वाढविण्याची खूणगाठ दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बांधली आहे. कसब्यात होणाऱ्या एकूण मतदानापैकी ८० टक्क्यांहून अधिक मतदान बापट यांनाच होईल, यासाठी एकदिलाने प्रयत्न करण्याची ग्वाही दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत दिली.
गिरीश बापटांना बेसिक नॉलेजही नाही, सोशल मीडियावर खिल्ली
पुणे शहर हे विद्यावंतांचे माहेरघर मानले जाते. गिरीश बापट १९८३पासून पुण्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. आतापर्यंत चारवेळा ते कसबा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. बीएमसीसीसारख्या नामवंत कॉलेजमधून त्यांनी बीकॉमची डिग्री मिळवली आहे. बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन शक्ती फत्ते झाल्याची घोषणा केली. भारताने तयार केलेल्या अॅन्टी सॅटेलाइट मिसाइलने परीक्षणासाठीच तयार केलेल्या भारतीय उपग्रहाचाच नाश केला. डीआरडीओच्या शास्त्रज्ञांच्या या कामगिरीसाठी मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पण मोदींनी काय सांगितले हे नीट ऐकून न घेता, कोणत्याही डीआरडीओच्या शास्त्रज्ञाशी चर्चा न करता ,मीडियाचे रिपोर्टही न वाचता बापट यांनी निर्धोकपणे फेसबुक ट्विटरवर पोस्ट केली. शत्रू राष्ट्राच्या टेहाळणी करणाऱ्या उपग्रहाचा भारताने नाश केला असा जावईशोधच त्यांनी लावला. यामुळे सोशल मीडियावर बापटांची प्रचंड खिल्ली उडवण्यात आली. बापटांना बेसिक ही माहित नाही असं म्हणत नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केलं. अनेकांनी त्यांच्या अज्ञानावर बोट ठेवलं. आपली चूक लक्षात आल्यावर बापट यांनी लगेच सोशल मीडियावरची पोस्ट डिलीट केली. पण या चुकीमुळे विरोधकांनी बापट यांच्यावर निशाणा साधला आहे. पुणेकरांनो तुम्ही अशा माणसाला निवडून देणार का असा प्रश्न मनसे नेते सुधीर धवडे यांनी विचारला आहे. तर भाजप नेते प्रसिद्धीसाठी हपापले असून खऱ्या-खोट्याची तपासणीही करत नाही अशी टीका काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी केली आहे.
वीज बिलाचा भरणा करताना हस्तलिखित पावत्या स्वीकारू नये-संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात – महावितरणचे आवाहन
मुंबई : ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा बिनचूक, वेळेत व त्यांच्या खात्यावर समायोजित व्हावा यासाठी महावितरणकडून ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तसेच असे प्रकार आढळून आल्यास ग्राहकांनी त्वरित नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
ग्राहकांना विविध सेवा-सूविधा, सोप्या व सुरक्षित पध्दतीने मिळाव्यात म्हणून महावितरणकडून सातत्याने विविध उपाययोजना करण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून महावितरणने आपली सर्व वीज बिल भरणा केंद्रे (पोस्ट ऑफीस सोडून) केंद्रीकृत संगणकीय प्रणालीवर आणली आहेत. त्यामुळे ग्राहकांनी केलेल्या वीज देयकाचा भरणा अचूक व त्वरित त्यांच्या खात्यावर समायोजित होतो. तसेच यामध्ये ग्राहकांना संगणकीकृत पावत्या देण्यात येतात. परंतू काही ठिकाणी देयकांच्या भरणाची पावती हस्तलिखित स्वरुपात देवून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे वीज ग्राहकांनी महावितरणच्या कोणत्याही प्रकारच्या रक्कमेचा भरणा करताना संगणकीकृत क्रमांक असलेली संगणकीय पावतीचाच आग्रह धरावा. हस्तलिखीत पावती स्वीकारु नये. महावितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी सर्व प्रकारच्या ऑनलाईन भरणा करण्यासाठी विविध पर्याय महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in महावितरणच्या मोबाईल ॲपवर उपलब्ध करुन दिले आहेत. तसेच अशा ऑनलाईन भरणा करणाऱ्या ग्राहकांना बिलाच्या रकमेच्या 0.25 टक्के सूट महावितरणकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सुट ऑनलाईन भरणा केल्यावर पुढील बिलात समायोजित करण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी ऑनलाईल सुविधांचा वापर करावा असे आवाहन महावितरणने केले आहे.
डे डिझाईन्स, केएसबीए, एमपी स्ट्रायकर्स, पंडित जावडेकर असोसिएट्स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स, कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, क्यू क्लब वॉरियर्स संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
पुणे- पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित तेराव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पांडे डिझाईन्स, केएसबीए, एमपी स्ट्रायकर्स, पंडित जावडेकर असोसिएट्स, कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स, कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, क्यू क्लब वॉरियर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत राष्ट्रीय स्नूकर खेळाडू ब्रिजेश दमानी, अनुज उप्पल यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पांडे डिझाईन्स संघाने बीएसएए मास्टर्स संघाचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. पंडित जावडेकर असोसिएट्स संघाने एलसीएसए संघाचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.
चुरशीच्या झालेल्या सामन्यात मध्यप्रदेशच्या एमपी स्ट्रायकर्स संघाने पीवायसी वॉरियर्सचा 2-1 असा संघर्षपूर्ण पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सामन्यात एमपी स्ट्रायकर्सच्या अनुराग गिरीने पीवायसी वॉरियर्सच्या योगेश लोहियाचा 68(68)-00, 53-61, 49-10, 115(115)-04 असा पराभव करून संघाला 1-0अशी आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या सामन्यात एमपी स्ट्रायकर्सच्या केतन चावलाला पीवायसी वॉरियर्सच्या आदित्य देशपांडेने 13-44, 14-55, 15-33 असे पराभूत करून संघाला बरोबरी साधून दिली. तिसऱ्या व निर्णायक लढतीत एमपी स्ट्रायकर्सच्या भरत सिसोडिया याने कडवी झुंज देत राजवर्धन जोशीचा 10-53, 58-50, 25-41, 75-19, 49-16असा पराभव करून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
खार जिमखाना संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत कॉर्नर पॉकेट क्युईस्टचा 2-0 असा पराभव करून आगेकूच केली. कर्नाटकाच्या केएसबीए संघाने अमनोरा द फर्न क्लब संघाचा 2-0 असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. विजयी संघाकडून एम.एस.अरुण, योगेश कुमार यांनी सुरेख कामगिरी केली. क्यू क्लब वॉरियर्स संघाने वाडेश्वर विझार्डसवर 2-1 असा विजय मिळवला. संदीप गुलाटी, शिवम अरोरा, शोएब खान यांनी केलेल्या अफलातून कामगिरीच्या जोरावर कॉर्नर पॉकेट वॉरियर्स संघाने द बॉल हॉग्जचा 3-0 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उप-उपांत्यपूर्व फेरी:
खार जिमखाना वि.वि.कॉर्नर पॉकेट क्युईस्ट 2-0(ईशप्रित चड्डा वि.वि.राहुल सचदेव 04-(65)65, 71-24, 73(73)-00, 79-16; स्पर्श फेरवानी वि.वि.हसन बदामी 47-00, 59-48, 36-16);
पंडित जावडेकर असोसिएट्स वि.वि.एलसीएसए 2-0(मोहम्मद हुस्सेन वि.वि.अक्षय कुमार 46-12, 60-71, 46-11, 84(52)-50; कमल चावला वि.वि.शोबीत चंद्रा 29-18, 50-39, 44-22);
केएसबीए वि.वि.अमनोरा द फर्न क्लब 2-0(एम.एस.अरुण वि.वि.विजय निचानी 32-29, 15-(55)66, 35-26, 72-22; योगेश कुमार वि.वि.दिलीप कुमार 81-23, 07-71, 51-08, 66-21);
कॉर्नर पॉकेट चॅलेंजर्स वि.वि.कॉर्नर पॉकेट शूटर्स 2-0(लक्ष्मण रावत वि.वि.संकेत मुथा 44-22, 88(67)-02, 43-00; फैझल खान वि.वि.साद सय्यद 47-06, 54-39, 46-06);
एमपी स्ट्रायकर्स वि.वि.पीवायसी वॉरियर्स 2-1(अनुराग गिरी वि.वि.योगेश लोहिया 68(68)-00, 53-61, 49-10, 115(115)-04;केतन चावला पराभूत वि.आदित्य देशपांडे 13-44, 14-55, 15-33;भरत सिसोडिया वि.वि.राजवर्धन जोशी 10-53, 58-50, 25-41, 75-19, 49-16);
क्यू क्लब वॉरियर्स वि.वि.वाडेश्वर विझार्डस 2-1(शाहबाज खान वि.वि.आशुतोष पाधी 19-34, 72-08, 41(41)-00, 57-08; अल्तमेश सैफी पराभूत वि.हिमांशू जैन 47-01, 06-63, 08-35, 22-(58)66; आशिक मुदसिर वि.वि.ह्रितिक जैन 25-35, 69-55, 88-20, 76-14);
कॉर्नर पॉकेट वॉरियर्स वि.वि.द बॉल हॉग्ज 3-0(संदीप गुलाटी वि.वि.लौकिक पठारे 43-09, 61-24, 38-49, 73-00; शोएब खान वि.वि.आदित्य अगरवाल 32-24, 72-01, 01-34, 102-15; शिवम अरोरा वि.वि.रोहन साकळकर 52-01, 72-48, 20-45, 75-40);
पांडे डिझाईन्स वि.वि.बीएसएए मास्टर्स 2-0(ब्रिजेश दमानी वि.वि.आनंद रघुवंशी 44-28, 73-21, 40-01; अनुज उप्पल वि.वि.रोविन डिसुझा 42-00, 58-24, 39-25).
उद्यापासून तिसरा टप्प्यातील ‘नॉमिनेशन’ प्रक्रिया; पुणे, बारामतीसह १४ मतदारसंघात उमेदवारी अर्ज उद्यापासून भरण्यास प्रारंभ
पुणे -जिल्ह्यातील पुणे शहर व बारामती लोकसभा मतदारसंघात उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसने अद्यापही उमेदवारी जाहीर केलेली नाही. तर बारामती मतदारसंघात भाजपच्या रंजना कुल आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान तिस-या टप्पामध्ये महाराष्ट्रातील 14 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी आजपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. आज दि. 28 मार्च ते 4 एप्रिल 2019 पर्यंतच्या कालावधीत तिसरा टप्पा करीता नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहे. तिसरा टप्पा करीता 28 मार्च 2019 उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. 23 एप्रिलला मतदान होणा-या या तिस-या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघामध्ये ३-जळगाव लोकसभा मतदारसंघ, ४-रावेर लोकसभा मतदारसंघ, १८-जालना लोकसभा मतदारसंघ, १९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ, ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ, ३४-पुणे लोकसभा मतदारसंघ, ३५-बारामती लोकसभा मतदारसंघ, ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ, ४३-माढा लोकसभा मतदारसंघ, ४४-सांगली लोकसभा मतदारसंघ, ४५-सातारा लोकसभा मतदारसंघ, ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ, ४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ, ४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे. या 14 मतदारसंघात अजूनही काही राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर केलेली नाहीत तर काही जागांवर उमेदवार नावे जाहीर केलेली आहेत. लोकसभेच्या तिस-या टप्प्यातील निवडणुकीसाठी उद्या गुरुवारपासून 28 मार्च 2019 उद्यापासून अर्ज भरण्यास सुरवात होत आहे. मात्र, कॉंग्रेस आघाडीतील उमेदवारांच्या नावाबाबत अद्यापपर्यंत घोळ सुरूच आहे. उद्या गुरुवार 28 मार्चपासून संबधित जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हे नामनिर्देशनपत्रे 4 एप्रिल 2019 पर्यंत (सार्वजनिक सुटीव्यतिरीक्त) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहेत. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र विहीत नमुना 2 अ मध्ये सादर करणे आवश्यक आहे. उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे. सदर प्रस्तावक हा संबंधित लोकसभा मतदारसंघाचा मतदार असावा. स्वतंत्र व मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षाचा उमेदवार असल्यास त्यांना 10 प्रस्तावक असणे आवश्यक आहे. व तो नामनिर्देशनपत्र ज्या लोकसभा मतदारसंघातून भरणार आहे त्या लोकसभा मतदारसंघातील मतदार असणे आवश्यक आहे. नामनिर्देशन पत्रासोबत निवडणूक आयोगाचे आदेशानुसार विहीत प्रपत्रातील प्रपत्र 26 (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन)चे शपथपत्र शपथआयुक्त किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकारी किंवा लेख प्रमाणक यांच्यासमोर शपथबद्ध करणे आवश्यक आहे. शपथपत्रातील सर्व रकाने भरणे आवश्यक असून, कोणताही रकाना रिक्त ठेवू नये. कोणत्याही बाबींच्या संबंधात कोणताही रकाना न लिहिता रिक्त ठेवू नये. निरंक (Nil) किंवा लागू नाही (Not Applicable)) किंवा माहीत नाही (Not Known) असे त्या रकान्यामध्ये नमूद करावे. भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार शपथपत्रात भाग ‘अ’ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी ई-मेल आयडी, संपर्क दूरध्वनी क्रमांक, समाजमाध्यम खाते असल्यास नमूद करणे आवश्यक आहे. ज्या लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवावयाची आहे, त्या मतदारसंघात उमेदवारांचे नाव नसल्यास ज्या मतदारसंघातील मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत नामनिर्देशन पत्रासोबत सादर करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म नामनिर्देशन पत्रासोबत किंवा नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या अंतिम दिनांकास दुपारी ३ वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक आहे. मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अमानत रक्कम सर्वसाधारण उमेदवारांसाठी 25 हजार व अनुसूचित जाती – जमातीसाठी 12 हजार 500 रुपयेप्रमाणे आवश्यक आहे. अनामत रक्कम रोख किंवा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया, शासकीय कोषागार येथे चलनद्वारे भरावी, धनादेश स्वीकारले जाणार नाही. नामनिर्देशन पत्रासोबत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे. निवडणूक खर्चाचे नियंत्रण सुलभ व्हावे, म्हणून उमेदवाराने नामनिर्देशन पत्र सादर करावयाच्या किमान एक दिवस अगोदर बँकेत स्वत:चे नावे व फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे आवश्यक आहे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात निवडणूक निर्णय अधिकारी यांना देणे आवश्यक आहे. गुरुवार दिनांक 4 एप्रिल 2019 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे स्वीकारली जातील. एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते. तसेच एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते. नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत – जास्त चार व्यक्ती असे एकूण जास्तीत-जास्त पाच व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कक्षात हजर राहू शकतात. नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्ती कमाल तीन वाहनांच्या मर्यादेस अधीन राहून निवडणूक निर्णय अधिकारी यांचे परिसरात वाहने आणू शकतात.
लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा – असा आहे कार्यक्रम
गुरुवार – 19 मार्च : नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात
गुरुवार 4 एप्रिल : नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक
मंगळवार – 5 एप्रिल : नामनिर्देशन पत्राची छाननी
गुरुवार 8 एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक
गुरुवार 23 एप्रिल : मतदान
गुरुवार 23 मे : मतमोजणी
तिसऱ्या टप्यातील 14 लोकसभा मतदारसंघ-
३-जळगाव लोकसभा मतदारसंघ
४-रावेर लोकसभा मतदारसंघ
१८-जालना लोकसभा मतदारसंघ
१९-औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
३२-रायगड लोकसभा मतदारसंघ
३४-पुणे लोकसभा मतदारसंघ
३५-बारामती लोकसभा मतदारसंघ
३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघ
४३-माढा लोकसभा मतदारसंघ
४४-सांगली लोकसभा मतदारसंघ
४५-सातारा लोकसभा मतदारसंघ
४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ
४७-कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
४८-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
लोकसभा निवडणूक उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे-
नामनिर्देशन पत्र विहीत नमुना २ अ
नामनिर्देशन पत्रासोबत विहीत प्रपत्रातील प्रपत्र २६ (भाग-अ, भाग-ब आणि सत्यापन) चे शपथपत्र
मतदार यादीत उमेदवाराचे नाव आहे, त्या मतदारसंघातील मतदार यादीची प्रमाणित प्रत
राष्ट्रीय पक्ष, राज्यस्तरीय पक्ष, मान्यता प्राप्त पक्षाचा उमेदवार असल्यास अ व ब फॉर्म
मतदारसंघ राखीव असल्यास नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र
नामनिर्देशन पत्रासोबत अनामत रोख रक्कमेची पावती, चलन सादर करणे आवश्यक आहे.
बँकेत स्वत:चे नावे फक्त निवडणूक खर्चासाठी खाते उघडणे व सदर खाते क्रमांकाची माहिती नामनिर्देशन पत्रासोबत लेखी स्वरुपात देणे आवश्यक आहे.
उमेदवारचे फोटो/रहिवास पुरावा/पॅन कार्ड साक्षांकीत प्रत
उमेदवार मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे असल्यास एक प्रस्तावक आवश्यक आहे.
अपक्ष उमेदवार असल्यास त्यांना १० प्रस्तावक असणे आवश्यक आहे.
एक व्यक्ती जास्तीत-जास्त चार नामनिर्देशन पत्रे सादर करु शकते.
एक व्यक्ती जास्तीत जास्त दोन लोकसभा मतदार संघातून नामनिर्देशन पत्र सादर करु शकते.
नामनिर्देशन पत्र सादर करताना उमेदवार व इतर जास्तीत – जास्त चार व्यक्ती हजर राहू शकतात.
नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी येणाऱ्या व्यक्तीना कमाल तीन वाहनांची मर्यादा आहे.
(लेखक-चंद्रकांत भुजबळ, पॉलिटीकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो (प्राब))

