Home Blog Page 2962

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची मिडीया सेंटरला भेट

0

पुणे,– जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍यासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, राजेश शर्मा, राजीव श्रीवास्‍तव,पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आयुष मनी तिवारी, विजयकुमार चढ्ढा, बारामती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी मिडीया सेंटरला भेट देऊन तेथील व्‍यवस्‍थेची पहाणी केली. लोकसभा निवडणुकीची माहिती प्रसार माध्‍यमांच्‍या प्रतिनिधींना उपलब्‍ध व्‍हावी यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात मिडीया सेंटर स्‍थापन करण्‍यात आले आहे. यावेळी उप जिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, उप संचालक (माहिती) मोहन राठोड, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहायकआयुक्‍त अण्‍णासाहेब बोदडे तसेच विविध माध्‍यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय निरीक्षकांनी पेड न्‍यूज तसेच माध्‍यम प्रमाणीकरणाच्‍या कामाचीही माहिती घेतली. वृत्‍तपत्रातील बातम्‍या, सोशल मिडीयावर तसेच इलेक्‍ट्रॉनिक माध्‍यमातील बातम्‍यांवर योग्‍य लक्ष ठेवण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी केल्‍या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकचे प्रदर्शन पुढे ढकलले

मुंबई-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील ‘पीएम नरेंद्र मोदी’ या हिंदी चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे ५ एप्रिल या नियोजित तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार नाही, असे चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, प्रदर्शनाची पुढील तारिख त्यांनी सांगितलेली नाही, लवकरच ती कळवण्यात येईल असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप मंजुरी मिळाली नसल्याने हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात येत असल्याचे कारण निर्मात्यांच्या वकिलांनी माध्यमांना  सांगितले. दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत सध्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. विरोधकांच्या मते हा मोदींच्या वैयक्तिक प्रचारासाठी बनवण्यात आलेला चित्रपट आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची तक्रार काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शक उमंग कुमार देखील निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डाला एक पत्र पाठवले असून यामध्ये त्यांनी स्पष्ट केले आहे की, या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी परवानगी द्यायची कि नाही हे बोर्डाने ठरवावे, त्यांचा निर्णय हा शेवटचा निर्णय असेल.

दरम्यान, या चित्रपटात मोदींची प्रमुख भुमिका साकारलेला अभिनेता विवेक ओबेरॉय याने विरोधकांवर टीका करताना म्हटले की, वरिष्ठ वकिल असलेले अभिषेक सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी उगाचच या चित्रपटाविरोधात जनहित याचिका दाखल करु नये. ते चौकीदाराच्या काठीला घाबरले आहेत का? असा सवाल करताना मोदींना आम्ही हिरो करण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे त्याने म्हटले आहे. मोदी हे केवळ माझ्यासाठी नाही तर करोडो देशी आणि परदेशी लोकांसाठी हिरो आहेत. ही एक प्रेरणादायी कथा असून ती आम्ही मोठ्या पडद्यावर आणली आहे.

केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी पुणे जिल्ह्यातील निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला

0

पुणे- पुणे जिल्‍ह्यातील निवडणुकीच्‍या कामावरील अधिकारी-कर्मचारी वर्ग प्रशिक्षीत आणि कार्यक्षम असून लोकसभा निवडणूक शांततेत पार पडेल, असा विश्‍वास जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी व्‍यक्‍त केला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत आढावा बैठक झाली, त्‍यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक रजत अग्रवाल, राजेश शर्मा, राजीव श्रीवास्‍तव,पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आयुष मनी तिवारी, विजयकुमार चढ्ढा, बारामती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष डुंबरे, मावळच्‍या कविता द्विवेदी, शिरुरचे रमेश काळे, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी राम यांनी जिल्‍ह्यातील चारही लोकसभा मतदार संघाची माहिती सांगितली. जिल्‍ह्यात 39 लाख 34 हजार 639 पुरुष मतदार तर 35 लाख 88हजार  223 महिला मतदार असून तृतीयपंथी 188 मतदार आहेत. मतदार नोंदणी अभियानाला चांगले यश मिळाल्‍यामुळे 18 ते 19 वर्षे वयोगटातील मतदारांची संख्‍या 54 हजार 115 असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. अधिकारी-कर्मचा-यांना त्‍यांच्‍यावर सोपवण्‍यात आलेल्‍या जबाबदारीची जाणीव असून त्‍याबाबतचे प्रशिक्षण त्‍यांना देण्‍यात आले आहे. बैठकीत सी-व्‍हीजील अॅप, कायदा व सुव्‍यवस्‍था, आदर्श आचारसंहिता, दिव्‍यांग व्‍यक्‍तींसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या सुविधा, एक खिडकी योजना, टपाली मतपत्रिका आदींचीही माहिती देण्‍यात आली.  इलेक्‍ट्रॉनिक वोटींग मशीन आणि व्‍हीव्‍हीपॅटच्‍या प्रात्‍यक्षिकाद्वारे जनतेमध्‍ये जनजागृती करण्‍यात आली आहे. यासाठी 44 वाहनांद्वारे 3257 ठिकाणी पहिल्‍या टप्‍प्‍यात आणि 2796 ठिकाणी दुस-या टप्‍प्‍यात प्रात्‍यक्षिके दाखविण्‍यात आल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

निवडणुका शांत आणि पारदर्शी वातावरणात पार पाडण्‍यासाठी निवडणूक निरीक्षकांनी आवश्‍यक त्‍या सूचना केल्या. दिव्‍यांग व्‍यक्‍तींना मतदान करतांना काहीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्‍याची तसेच निवडणुकीच्‍या कामासाठी तैनात करण्‍यात आलेल्‍या महिला अधिकारी-कर्मचा-यांच्‍या सुरक्षिततेबाबतही त्‍यांनी सूचना केल्‍या. बैठकीनंतर अपर जिल्‍हाधिकारी तथा प्रशिक्षण नोडल अधिकारी ज्‍योत्‍स्‍ना पडियार यांनी व्‍हीव्‍हीपॅट यंत्राचे निवडणूक निरीक्षकांना प्रात्‍यक्षिक करुन दाखविले. बैठकीस विविध विभागांचे समन्‍वय अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी या चित्रपटातील ‘फकिरा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यातून नरेंद्र मोदी यांच्या जीवनातील चढउतार पाहायला मिळतात.

राजा हसन आणि शशी सुमन यांनी हे गाणे गायले आहे. तर, सदारा यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच हे गाणे ट्विटरवर शेअर केले आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=4&v=kupkSwdKSl4

‘पीएम नरेंद्र मोदी’ बायोपिक हा सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. अनेक वादविवादातही हा बायोपिक अडकला. मात्र, आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या ५ एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय.

https://www.youtube.com/watch?v=4oAWl0up_Tg

 

आम्ही कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही – शरद पवार

0

उस्मानाबादच्या जाहीर सभेत शरद पवारांनी मोदींना दिले प्रत्युत्तर…

उमरगा– आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतून आलो आहोत. कुणाची कळ काढत नाही परंतु कुणी कळ काढली तर जागा दाखवल्याशिवाय राहत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना दिला. उस्मानाबादचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी मोदींवर तोफ डागतानाच त्यांनी केलेल्या टिकेलाही चोख प्रत्युत्तर दिले.

पंतप्रधान मोदी मला विचारतात की, संरक्षण खाते तुमच्याकडे असताना तुम्ही काय केले. तुमच्या कार्यकाळात देशावर जेवढे हल्ले झाले तेवढे हल्ले आम्ही होवू दिले नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.उस्मानाबाद मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह यांच्या प्रचारासाठी सर्व पुरोगामी विचारांचे नेते आज व्यासपीठावर एकवटले होते.

गेली अनेक वर्षे डॉ. पद्मसिंह पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात काम केले आहे. हा भाग नेहमीच पाण्यापासून वंचित होता. अशा डॉक्टरसाहेबांकडे पाटबंधारे विभागाची जबाबदारी आली आणि आपल्या अधिकाराच्या माध्यमातून डॉक्टर साहेबांनी इथल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राणा जगजितसिंह यांनी ती जबाबदारी घेतली. लोकांनी आमदारकीच्या माध्यमातून उस्मानाबाद जिल्ह्यात राणा जगजितसिंह यांना सत्ता दिली आणि या सत्तेचा उपयोग राणा यांनी जिल्ह्याचा विकास गतिमान करण्यासाठी केला असे उदगारही शरद पवार यांनी काढले.

मी असेन किंवा शिवराज पाटील चाकुरकर असतील आम्ही देशासाठी अतोनात काम केले. आता वेळ आली आहे तरुणांनी पुढे येण्याची. त्यामुळेच आम्ही राणा जगजितसिंह यांचे नाव निवडले. मला खात्री आहे राणा जगजितसिंह योग्यप्रकारे उस्मानाबादचे प्रतिनिधित्व लोकसभेत करतील त्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठिशी खंबीर उभे रहा असे आवाहन शरद पवार यांनी केले.

लातूरमध्ये भूकंप झाला त्यावेळी परिस्थिती बिकट होती मात्र केंद्रसरकार आमच्या पाठिशी उभे होते म्हणून आम्हाला संकटावर मात करता आली. या सगळ्यात शिवराज पाटील यांची भूमिका महत्त्वाची होती. लातूरकडून विलासराव मदतीला धावून आले होते. त्यामुळे या भागाला पुन्हा कणखर नेतृत्वाची गरज आहे असेही शरद पवार म्हणाले.

महाआघाडीने यावेळी सर्वच मतदारसंघात तरुण उमेदवार दिले आहेत. आम्ही जाणीवपूर्वक तरुणांची निवड केली आहे अशी पक्षाची स्पष्ट भूमिकाही शरद पवार यांनी मांडली.

गेली पाच वर्षे भाजपचे राज्य आहे. दिलेले राज्य लोकांसाठी वापरायचे असते पण ते गेल्या पाच वर्षात झाले नाही. ७० वर्षात देशात काहीच विकास झाला नाही असे मोदी बोलत आहेत. ७० वर्षात अटलबिहारी वाजपेयी ही पंतप्रधान होते मग अटलबिहारी वाजपेयी यांनीही काम केले नाही असे मोदींना म्हणायचे आहे का ? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फक्त नेहरू आणि गांधी घराण्यावर टीका करायला जमतं. खरंतर मोदींना इतिहासच माहिती नाही. स्वातंत्र्य चळवळीत नेहरूंनी ९ वर्षे तुरुंगात घालवली, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जग पातळीवर पाठिंबा मिळवला आणि भारताला महाशक्ती बनवण्यास सक्षम असे काम केले.लालबहादूर शास्त्री यांच्या कणखर नेतृत्वाने पाकिस्तानला धडा शिकवला, इंदिरा गांधी यांनी अनेक ठोस निर्णय घेतले. त्यांनी इतिहास घडवला नाही तर भूगोल बदलून टाकला, राजीव गांधी यांनी भारतात तंत्रज्ञान आणले, फोन, इंटरनेट आणले हे काँग्रेसचे कर्तृत्व आहे असेही शरद पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

आताचे पंतप्रधान लष्कराच्या कामगिरीवर स्वतःचा प्रचार करत आहेत. या सरकारला कुलभूषण जाधव यांना अजूनही सोडवता आले नाही. कुठे गेली ५६ इंचाची छाती ? असा संतप्त सवालही शरद पवार यांनी केला.

या जाहीर सभेत उस्मानाबादचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह यांनीही आपले विचार जनसमुदायासमोर मांडले.

१८ एप्रिलला मतदान आहे यावेळी आपल्या समस्या मार्गी लावणारा, केंद्राच्या योजना आणणारा नेता आपल्याला आणायचा आहे.पाच वर्षापुर्वीचे दिवस आठवा प्रत्येक गोष्टीचे आश्वासन देण्याशिवाय या सरकारने वेगळे काहीही केले नाही. नोटाबंदी, जीएसटीमुळे तरुणांचे रोजगार सुटले अनेक संकट ओढवली असल्याचे राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

आपल्या जिल्ह्यात जे काही प्रकल्प आले ते सर्व कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या प्रयत्नातून पुर्ण करण्यात आले. असाच प्रयत्न करुन आपल्या जिल्ह्यासाठी कृष्णा मराठवाडा प्रकल्प पुढे आणून पुर्ण करायचा ध्यास मी घेतला आहे. मागील पाच वर्ष हा प्रकल्प केवळ रखडून ठेवण्याचे काम झाले असल्याचा आरोपही राणा जगजितसिंह पाटील यांनी केला.

माझ्या राजकीय वाटचालीत पवार साहेबांनी माझ्यावर अनेक जबाबदारी टाकल्या त्या पेलवत मी आपल्या भागात अनेक कामे पूर्ण करण्यात यशस्वी झालो असल्याचेही राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे यासाठी २५०० एकरवर एमआयडीसी करण्याचा प्रयत्न आपण केला. मात्र मागील पाच वर्षांत सत्तारूढ पुढाऱ्यांनी एक बैठक देखील घेतली नाही. आज शेतकऱ्यांचे प्रश्न कोण मांडतोय याकडेच लोकांचे लक्ष आहे. आपण सत्तेत असताना शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसोबत एक ना अनेक योजना राबवल्या. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रसनेच केल आहे असेही राणा जगजितसिंह पाटील म्हणाले.

सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा कुमारी सक्षणा सलगर यांनीही आपले विचार मांडले.

कसब्यातील इच्छुकाची स्थायी समितीवर नियुक्ती …

0

पुणे- महापालिकेत 10 नगरसेवकांचे बळ असलेल्या शिवसेने ची  कसबा विधानसभा मतदार संघावर आता विशेष नजर असताना या मतदार संघातील इच्छुक असलेले नगरसेवक विशाल धनवडे यांची आज पालिकेच्या स्थायी समितीवर नियुक्ती करण्यात आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला . संख्याबळानुसार शिवसेनेचा एक नगरसेवक स्थायी समितीवर निवडून जाऊ शकतो . त्यानुसार नगरसेविका संगीता ठोसर या स्थायी समितीवर २ वर्षे कालावधी साठी निवडून गेल्या होत्या. मात्र त्यांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला . याबाबत आपल्याला पक्षाने आदेश दिल्याने आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.प्रत्येक नगरसेवकाला 1 वर्षे संधी द्यावी यानुसार ५ वर्षात ५ नगरसेवकांना संधी मिळेल असे सेना प्रमुखांचे आदेश आल्याने आपण राजीनामा दिला असे त्या म्हणाल्या . तर नगरसचिव सुनील पारखी म्हणाले , निवडणूक प्रक्रिया आज झाली नाही , मात्र ठोसर यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेली जागा शिवसेनेची असल्याने त्यांच्या जागेवर श्व्सेनेच्या धनवडे यांची नियुक्ती करण्यात आली.

धनवडे यांनी मात्र कसब्यातून  आपण जोरदार मुसंडी घ्यावी यासाठी स्थायी चे बळ पक्षाने आपल्याला दिल्याचा दावा केला आहे . दरम्यान आज अनेक शिवसैनिकांनी धनवडे यांना भेटून त्यांचे अभिनंदन केले .दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आणि त्यांनतर काही दिवसच महापालिकेत स्थायी समिती आणि मुख्य सभेला कामकाजासाठी मिळू शकतील आणि त्यानंतर तातडीने विधानसभेची आचारसंहिता जाहीर होईल असे दिसते आहे .

आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब टेनिस स्पर्धेत पीवायसी अ व ब संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

0
पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)तर्फे आयोजित आठव्या शशी वैद्य मेमोरियल आंतर क्लब अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत इलाईट डिव्हिजन गटात पीवायसी अ आणि पीवायसी ब या संघांनी अनुक्रमे पीवायसी क व सोलारिस 2 या संघांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.
 
पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पीवायसी अ संघाने पीवायसी क संघाचा 24-07 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. सामन्यात 100अधिक गटात पीवायसी अ संघाच्या अभिषेक ताम्हाणे व सत्यमूर्ती यांनी पीवायसी क संघाच्या हर्षा हळबे व डॉ. साठे यांचा 6-1 असा तर, खुल्या गटात पीवायसी अ संघाच्या केतन धुमाळ व ऋतू कुलकर्णी यांनी ध्रुव मेड व सारंग देवी यांचा 6-2 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. 90अधिक गटात पीवायसी अ संघाच्या जयंत कढे व प्रशांत सुतार या जोडीने पीवायसी क संघाच्या हनीफ मेमन व अमित नाटेकर य जोडीचा 6-0 असा तर, खुल्या गटात केदार शहाने डॉ.अभय जमेनीसच्या साथीत पीवायसी क संघाच्या कौस्तुभ शहा व मिहीर दिवेकर यांचा 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करून संघाला विजय मिळवून दिला.
दुसऱ्या सामन्यात हिमांशू गोसावी, अनुप मिंडा, सारंग पाबळकर, अमोघ बेहेरे, योगेश पंतसचिव, सुंदर अय्यर, वरुण मागिकर यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर पीवायसी ब  संघाने सोलारिस 2 संघाचा 24-02 असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्यपूर्व फेरी: इलाईट डिव्हिजन:
पीवायसी अ वि.वि.पीवायसी क 24-07(100अधिक गट: अभिषेक ताम्हाणे/सत्यमूर्ती वि.वि.हर्षा हळबे/डॉ. साठे 6-1; खुला गट: केतन धुमाळ/ऋतू कुलकर्णी वि.वि.ध्रुव मेड/सारंग देवी  6-2; 90अधिक गट: जयंत कढे/प्रशांत सुतार वि.वि.हनीफ मेमन/अमित नाटेकर 6-0; खुला गट: केदार शहा/डॉ.जमेनीस वि.वि.कौस्तुभ शहा/मिहीर दिवेकर 6-4);     
 
पीवायसी ब वि.वि.सोलारिस 2 24-02(100अधिक गट: हिमांशू गोसावी/अनुप मिंडा वि.वि.मनोज पालवे/महेंद्र गोडबोले 6-0; खुला गट: सारंग पाबळकर/अमोघ बेहेरे वि.वि.संतोष दळवी/राजेंद्र देशमुख 6-2; 90अधिक गट: योगेश पंतसचिव/सुंदर अय्यर वि.वि.राजू पिंपळे/बापू पायगुडे 6-0; खुला गट: अनुप मिंडा/वरुण मागिकर वि.वि.सुबोध पेठे/महेंद्र गोडबोले  6-0). 

दिल से दिल तक….(लेखिका -पूर्णिमा नार्वेकर)

0

दिल से दिल तक

आपल्या बालपणीच्या सवंगड्यांशी खूप वर्षांनी गाठ भेट झाली की त्या भेटीचा परमानंद विलक्षण असतो याचा नुकताच प्रत्यय आला. निमित्त होत हर्ष च्या लग्नाचं. ज्या दिवसाची घरातील सगळेच आतुरतेने वाट पहात होते ….

“रमाकांत तमे आजू आयवा नथी, क्यां छो…?”  इति बटुककाका. माझ्या काकाने म्हणजेच रमाकांतने सांगितले, ‘पूर्णिमा आली की निघतोच.’ बटुककाकांच्या मुलाच्या म्हणजेच हर्षुच्या लग्नाच्या रिसेप्शनला जायचे होते आम्हा सगळ्यांना. खरं तर अंमळ उशीरच झाला होता. काका आणि बाबा कधीचेच तयार होऊन बसले होते, कधी पूर्णिमा येतेय, आम्ही हॉलवर पोहोचतोय आणि सगळ्या जुन्या सवंगड्यांना भेटतोय, असं या दोघांना झालं होतं.

हॉलवर पोहोचताक्षणी  काका-बाबांची नजर सगळ्यांना शोधायला लागली. समोरच पहिले दर्शन झाले ते आरतीभाभीचे. आमच्याच बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्यावर ती राहायची. गर्दीतून *वाट* काढत आमच्या समोर आली. खूप वर्षांनी भेटल्याचा आनंद तिच्या *चेहऱ्यावर* दिसून येत होता. काय बोलू आणि किती बोलू, असं तिला झालं होतं. आई, निलेश तसेच सहदेवकाका (आम्हा चारपाच जणांच्या घरी सहदेवकाका जवळजवळ 50 वर्षं घरकामाला होते. ते आता गावी असतात. आमच्या कुटुंबातीलच एक सभासद आहेत ते.) घरातल्या सगळ्यांची तिने आपुलकीने चौकशी केली.

जयेंद्र भुवन – दादरमध्ये आमचे जुने घर याच बिल्डिंगमध्ये आहे. ए आणि बी विंगमध्ये स्नेहलता शाळा आहे. तर सी विंगमध्ये पूर्वी आम्ही राहायचो. आताही घर आहे पण हल्ली  आम्ही दहिसरला राहतो.

आज रिसेप्शनच्या निमित्ताने सगळे भेटणार होते.   बटुककाकाने सगळ्या मित्रमंडळींना, जुन्या शेजारी-पाजा-यांना लग्नाला आवर्जून बोलावलं होतं. जयेंद्र भुवनमधील ब-याचशा जुन्या भाडेकरुंनी आपापली घरं विकून मुंबईच्या उपनगरात राहणं स्वीकारलं. काही शेजाऱ्यांनी नोकरीच्या निमित्ताने, काहींनी मोठे कुटुंब-जागा लहान म्हणून तर काहींनी अजून काहीबाही कारणांनी दादर सोडलं. आरतीभाभी भेटल्या आणि या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या.

मुकेशकाका, नलिनीकाकी, चिंटू आणि त्याची फॅमिली, रिद्धी वगैरे…एकेकांना भेटत-भेटत आम्ही पुढे जात होतो. काका-बाबांनाही खूप आनंद झाला होता.  तेवढ्यात समोरून आवाज आला…’अरे मामा (मामा म्हणजेच रमाकांतकाका, बिल्डिंगमधले सगळे त्याला ‘मामा’ याच नावाने हाक मारतात) कसा आहेस?’ आणि गिरीशकाकाने, माझ्या काकाला कडकडून मिठी मारली. हा दोन मित्रांमधील स्नेहभाव होता, आपुलकी होती. थेट दिल से दिल तक…! किती वर्षांनी भेटले दोघे जण.  दोघांनाही झालेला आनंद अवर्णनीय होता. गिरीशकाका, दीपककाका, भाईलाल…जुने सगळे शेजारीपाजारी वेळ काढून आवर्जून लग्नाला आले होते, ते याच कारणासाठी की आज सगळ्यांची भेट होणार.  गप्पांची मस्त मैफल रंगली होती. ख्यालीखुशाली, जुन्या आठवणीमध्ये सगळे दंग झाले होते. फ्लॅट संस्कृतीमध्ये राहणारे सगळे जुन्या चाळ संस्कृतीच्या अघळपघळ गप्पांची मजा घेत होते. दिलखुलास गप्पा चालल्या होत्या. मीही त्या गप्पांमध्ये सामील होते आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरील ओसंडून जाणारा आनंद टिपत होते.

बटुककाकाने रिसेप्शनचे आमंत्रण सगळ्यांना दिले होते आणि आवर्जून सगळे त्या आमंत्रणाला मान देऊन आले होते. काका-बाबा रात्रीचे आठ वाजले तरी कुठेच हॉलमध्ये दिसले नाही, म्हणूनच बटुककाकाचा फोन आला होता याचे कारण मला उमगले.

जेवण सगळ्यांचं बाकी होतं. गप्पा मारूनच पोट भरलं होतं.  नवोदित जोडप्याला शुभेच्छा देऊन सगळे जेवायला गेलो. मेजवानीचा आस्वाद घेत-घेत गप्पाटप्पा अधिकच रंगत होत्या. छान भारावलेले वातावरण होते.  काका आणि बाबांना खूप दिवसांनी असं दिलखुलास गप्पा मारताना पाहून मलाही खूप आनंद झाला होता.

जेवणही झालं होतं. ‘आता निघायचं का?’ असं मी काकाला विचारणार तोच आमच्या मजल्यावरील आमचे शेजारी प्रफुल्लकाका समोर येऊन उभा राहिला. काकाला भेटल्याचा काय तो त्याला आनंद झाला होता!  प्रफुल्लकाका तर काकाला म्हणाला की “आताच घरी चल.” रात्र खूप झाली होती, त्यामुळे भेटायला येण्याचे काकाने आश्वासन दिले प्रफुल्लकाकाला.

काकाचा आणि बाबांचा दोघांचाही घरी जाण्यासाठी पाय काही हॉलमधून निघत नव्‍हता. सगळ्यांचा निरोप घेत घेत परत असेच ‘दिल से दिल तक’ भेटून गप्पा मारायचे ठरवून आम्ही निघालो.

या जुन्या सवंगड्यांकडे कुठे त्यावेळी मोबाईल होते की ते आता सारखे व्‍हॉट्ससपला चिटकून असतात, पण त्यांची त्यावेळची मैत्री खऱ्या अर्थाने मैत्रीचा अर्थ समजून केलेली मैत्री होती आणि अजूनही आहे. खूप वर्षं गाठभेट झाली नाही तरी  आजही मनाच्या कोपऱ्यात ती कायमची ताजीतवानी आहे, दिल से दिल तक…!

पूर्णिमा नार्वेकर

पुष्पक अपार्टमेंट, ब्लॉक नं 203,

भिकाजी लाड मार्ग,

दहिसर फाटक जवळ,

दहिसर (प.),

मुंबई – 400068

महायुतीच्या बारामती विजयासाठी व्यूहरचना-महसूलमंत्र्यांसमवेत खासदार काकडे व निवडक पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक

पुणे: भाजप-शिवसेना व मित्रपक्ष महायुतीच्या उमेदवार कांचन कुल यांना बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून आणण्यासंदर्भात आज सकाळी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भोर व खडकवासला विधानसभा मतदारसंघातील निवडक व मोजक्याच पदाधिकाऱ्यांसमवेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संजय काकडे यांनी निवडणुकीचे नियोजन केल्याची खात्रीशीर माहिती आहे.

भोर व खडकवासला विधानसभा मतदार संघात भाजप व शिवसेनेची ताकद असून खासदार संजय काकडे यांना माननाऱ्यांचे मोठे जाळे या दोन्ही मतदार संघात मोठे आहे. त्यामुळे या दोन्ही मतदार संघातून कांचन कुल यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देण्यासंदर्भात नियोजन झाले असून बारामतीची जागा जिंकण्यासंदर्भातले गनिमीकावे निश्चित करून खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्याची व्यूहरचना पक्की झाल्याची माहिती आहे.

खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी महसूलमंत्री पाटील यांच्यासमवेत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला माजी आमदार शरद ढमाले, शिवसेनेचे कुलदिप कोंडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाळासाहेब दळवी, रमेश कोंडे, स्वाती ढमाले, भाजपाचे नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, भाजपा माथाडी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष दिनेश धाडवे, महेश पासलकर आदी मान्यवर या बैठकीस उपस्थित होते.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज सकाळीच खासदार काकडे यांच्या घरी पोहोचले. यावेळी काकडे कुटुंबातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

मुंबई वृत्तपत्र व वृत्तवाहिनी संघाची पुणे शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी घोषित…कार्याध्यक्ष पदी सुभाषचंद्र जाधव तर सेक्रेटरी पदी शाम राठी ….

0
पुणे- मुंबई वृत्तपत्र व वृत्तवाहिनी संघाच्या  पुणे शहर व जिल्ह्याची कार्यकारिणी राज्य मराठी पत्रकार संघाचे संस्थापक संघटक संजय भोकरे आणि मुबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाचे कार्याध्यक्ष  उमेश कुलकर्णी तसेच पुणे शहर आणि जिल्हा अध्यक्ष शरद लोणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येथे घोषित करण्यात आली .यावेळी प्रथम पत्रकार संघाचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय संजय दिनकर कुलकर्णी यांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली वाहण्यात आली .या प्रसंगी संदीप भटेवरा हि उपस्थित होते. कार्यकारिणी पुढील प्रमाणे
कार्याध्यक्ष -सुभाषचंद्र जाधव,
सेक्रेटरी- शाम राठी ,
उपाध्यक्ष-हरीश शर्मा, विवेक तायड़े,
खजिनदार-राम झोंड,
सहचिटणीस -गौरव कुलकर्णी आणि शब्बीर मुजाहिद,
कार्यकारिणी सदस्य – नरेंद्र शिंदे, अनिल सोनपाटकी आणि अभिषेक अरुण लोणकर

बापटांच्या मालमत्तेत पाच वर्षांत सव्वा दोन कोटींनी वाढ-रोकड फक्त 75 हजार

0

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत आजच्या बाजारमूल्यांनुसार सुमारे दोन कोटी 15 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. त्यांच्याकडे सध्या एकूण
सव्वापाच कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री बापट यंदा लोकसभेची निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी पाच वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक लढविली. होती. त्यावेळी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती सुमारे 3 कोटी 10 लाख 71 हजार रुपये इतकी होती. लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

बापट यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे रोख रक्कम अवघी ७५ हजार रुपयांची असून, पत्नीकडे फक्त २६ हजार रुपये आहेत. बापट यांच्या विविध १५ बँकांमध्ये मुदत ठेवी असून, या मुदत ठेवींची रक्कम ५२ लाख २७ हजार ९३४ रुपये आहे. विविध बचत खात्यांमध्ये त्यांच्या नावावर ३२ लाख २१ हजार १८७ रुपये आहेत. त्यांनी शेअर्समध्ये १८ हजार ३२० रुपयांची गुंतवणूक केली आहे.

पोस्ट खात्यामध्ये त्यांच्या नावावर १३ लाख ६८ हजार ६१८ रुपयांची रक्कम आहे. बापट यांच्या नावावर चार वाहने असून त्यामध्ये १९८३ या वर्षातील मर्सडिज मोटार असून, त्याची किंमत दोन लाख ३० हजार रुपये आहे. २०११ मधील पजेरो ही कार असून, तिची किंमत १८ लाख रुपये आहेत. त्यांच्याकडे १९७७ मधील बजाज स्कूटर असून त्याची किंमत एक हजार रुपये दाखविण्यात आली आहे. बापट यांच्याकडे एक लाख ३३ हजार रुपयांचे सोने आहे.

बापट यांना अमरावतील चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथे वारसाहक्काने मिळालेली जमीन आहे. या गावामध्ये त्यांनी एक हेक्‍टर १९ गुंठे जागा २०१४ मध्ये खरेदी केली आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या नावावर जागा असून, त्या जागेची बाजारमूल्यानुसार किंमत १६ लाख १३ हजार रुपये आहे. या ठिकाणी २००३ मध्ये १५ गुंठे जागा खरेदी केली असून, त्याची किंमत ३५ लाख ४० हजार रुपये आहे. बापट यांच्या नावावर शनिवार पेठमध्ये तीन सदनिका आहेत. बिबवेवाडी येथे एक सदनिका असून त्याची किंमत ७६ लाख २३ हजार रुपये आहे. अंधेरी येथे राजयोग सोसायटीमध्ये एक सदनिका असून त्याची बाजारमूल्यानुसार किंमत एक कोटी २८ लाख ६३ हजार रुपये दाखविण्यात आली आहे.
बापट यांच्या पत्नीकडे १४ बँकांमध्ये १५ लाख २१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. सहा बचत खात्यांमध्ये सुमारे १६ लाख रुपये आहेत. याशिवाय ३५ हजार ७०० रुपयांचे शेअर्स असून, एलआयसी आणि पोस्ट खात्यामध्ये पाच लाख ७० हजार ९०० रुपयांच्या ठेवी आहेत.

बापट यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार-
पाच कोटी २६ लाख रुपये – स्थावर आणि जंगम मालमत्ता
५३ लाख ५४ हजार रुपये – पत्नीच्या नावावरील मालमत्ता
विविध १५ बँकांमध्ये मुदत ठेवी.
नावावर चार वाहने.
शनिवार पेठेत तीन सदनिका. बिबवेवाडी आणि अंधेरीमध्ये प्रत्येकी एक सदनिका.

 

मोहन जोशी यांच्याकडे ६.७६ कोटींची संपत्ती

0

पुणे : विधान परिषदेतील माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे पावणेसात कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीसाठी जोशी यांनी दिलेल्या शपथपत्रात कौटुंबिक संपत्तीचा उल्लेख केला आहे.

जोशी यांच्याकडे जंगम मालमत्ता 67 लाख 47 हजार रुपये असून, त्यांच्यापत्नीच्या नावे 26 लाख 72 हजार रुपये इतकी आहे. त्यामध्ये दागिने, वाहन,बँकेतील बचत खात्यातील रक्‍कम यांचा समावेश आहे. जोशी यांच्याकडे एक लाख 72 हजार 380 रुपयांची रोकड तर, पत्नीकडे एक लाख 44 हजारांची रोकड आहे.

बँकेमधील बचत खात्यात एकूण आठ लाख 85 हजार रुपये तर, पत्नीच्या नावे दोन लाख 66 हजार रुपये आहेत. वाहनांच्या ताफ्यात टोयाटो इनोव्हा आणि क्रेस्टा या दोन गाड्या आहेत. सध्या बाजारभावानुसार त्यांची किंमत सुमारे 25 लाख रुपये आहे. त्यांच्याकडे 127 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत 3 लाख 61 हजार रुपये आहे. त्यांच्या पत्नीकडे 440 ग्रॅम सोन्याचे दागिने असून, त्याची किंमत सुमारे 13 लाख 61 हजार रुपये इतकी आहे. जोशी यांची कौटुंबिक स्थावर मालमत्ता सुमारे पाच कोटी 80 लाख रुपये इतकी आहे. त्यात मुळशी तालुक्‍यात अर्धा एकर जमीन असून, त्याचे बाजारभावानुसार मूल्य सात लाख रुपये आहे. याशिवाय, पुण्यातील शुक्रवार पेठ आणि मुंबईतील अंधेरी येथे दोन सदनिका आहेत. त्यांचे मूल्य सुमारे एक कोटी 53 लाख रुपये आहे. तर, पत्नीच्या नावे सोपानबाग येथील सदनिकेची किंमत सुमारे 3 कोटी 40 लाख रुपये आहे.

सुप्रिया सुळे यांचे कुटुंबीय अब्जाधीश

0

पार्थ, सुनेत्रा पवारांकडून घेतली ५५ लाखांची उसनी रक्कम; प्रतिज्ञापत्रात नमूद

पुणे-बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६५ कोटी ४२ लाख ८९ हजार रुपयांच्या घरात पोहोचली आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात ३२ कोटी रुपयांची भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ६.४१ कोटी रुपये असूनही त्यांनी आपले बंधू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्याकडून ५५ लाख रुपये उसने घेतले आहेत.

संपत्तीची विभागणी पुढील प्रमाणे –

(एकूण संपत्ती – १६५.४२ कोटी)

 ५८.७८ कोटी-सुप्रियांची संपत्ती

 ९३.५३ कोटी-सदानंद सुळे

८.९२ कोटी-रेवती सुळे

 ४.१८ कोटी-विजय सुळे

सुळे यांनी उमेदवारी अर्ज भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. सुप्रिया यांच्यासह त्यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणी मुलगा विजय या चौघांच्या नावावरील एकूण संपत्ती १६५.४२ कोटी रुपये आहे. सुप्रिया यांच्या नावावर ५८ कोटी ७८ लाख ७५ हजार रुपये, सदानंद सुळे यांच्या नावावर ९३ कोटी ५३ लाख ९२ हजार रुपये, मुलगी रेवती हिच्या नावावर आठ कोटी ९२ लाख आठ हजार रुपये आणि मुलगा विजयच्या नावावर चार कोटी १८ लाख १३ हजार रुपयांची संपत्ती दाखविण्यात आली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत सुळे कुटुंबाच्या नावावर १३३.३६ कोटी रुपयांची मालमत्ता होती. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांची स्थावर आणि जंगम मालमत्ता एकूण ४६ कोटी नऊ लाख ५८ हजार रुपये होती. सदानंद सुळे यांच्याकडे ८४ कोटी ४५ लाख ५० हजार रुपये, रेवतीच्या नावावर एक कोटी ४३ लाख ३० हजार आणि विजयच्या नावावर एक कोटी ४६ लाख ९६ हजार रुपये दाखविण्यात आले होते. याचाच अर्थ सुळे कुटुंबीयांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत सुमारे ३२ कोटी रुपयांची भर पडली आहे. सुप्रिया आणि सदानंद सुळे यांच्याकडे अनुक्रमे ~ २८ हजार ७७० आणि ~ २३ हजार ५० रुपये रोख रक्कम आहे. सुप्रिया यांच्याकडे दोन कोटी ८३ लाख २० हजार रुपयांच्या मुदत ठेवी असून, त्यांनी समभागांमध्ये सात कोटी ७७ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. या शिवाय राष्ट्रीय बचत योजना आणि पोस्टाच्या योजनांमध्ये सुमारे सात लाख १३ हजार ५०० रुपये गुंतविले आहेत.

सुळे यांच्याकडे ५२ लाख ५४ हजार रुपयांचे सोने, दोन लाख ६७ हजार रुपयांची चांदी आणि एक कोटी ६९ लाख रुपयांचे हिरे आहेत. त्यांच्या नावावर बारामती तालुक्‍यात माळेगाव आणि ढेकळवाडी येथे जमीन असून, त्यांची किंमत एक कोटी तीन लाख सहा हजार रुपये आहे. मुंबई आणि पुण्यात (कोरेगाव पार्क) येथे फ्लॅट आहेत. या स्थावर मालमत्तेची किंमत १८ कोटी ४० लाख रुपये आहे. आश्चर्याची बाब म्हणजे १६५ कोटींची संपत्ती असणाऱ्या सुळे कुटुंबीयांच्या नावावर एकही वाहन नसल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. सदानंद यांच्याकडे ८३ कोटी ९६ लाख २४ हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये ९५ लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. त्यांच्याकडे एक कोटी ८५ लाख रुपयांचे सोने, चांदी आणि हिरे आहेत. त्यांच्या नावावर जमीन नसून, पुण्यात मोदीबाग येथे फ्लॅट आहे. या फ्लॅटची किंमत चार कोटी १५ लाख रुपये आहे.

पार्थ, सुनेत्रा पवारांकडून उसनी रक्कम

सुळे कुटुंबाने पार्थ पवार यांच्याकडून २० लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये घेतले आहेत. त्यांच्यावर अन्य कोणत्याही संस्थेचे कर्ज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कंपन्यांना दिली सुळे दाम्पत्याने कर्जे

सुळे दाम्पत्याने भागीदारी संस्था आणि कंपन्यांना कर्जे दिली आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सहा कोटी ७६ लाख रुपयांची, सदानंद यांनी ३८ कोटी ३७ लाख ११ हजार रुपयांची कर्जे दिली आहेत.

विदेशी बँकांमध्येही गुंतवणूक

सुळे यांनी सुमारे दोन कोटी १४ लाख २८ हजार रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. त्यांचे पती सदानंद यांनीही तीन कोटी ५८ लाख ५८ हजार रुपयांची गुंतवणूक विदेशी बँकांमध्ये केली आहे.

 

कांचन कुल यांच्या नावे 1 कोटी 87 लाखांची मालमत्ता

0

पुणे – बारामती भाजपचे उमेदवार कांचन कुल यांच्याकडे स्थावर व जंगम मिळून 1 कोटी 87 लाख रुपयांची मालमत्ता आहे. तर त्यांचे पती आमदार राहुल कुल यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 2 कोटी 57 लाख रुपयांची मालमत्ता आहे.

उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रात ही मालमत्ता नमूद करण्यात आली असून उत्पनाचे स्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. कांचन कुल यांच्याकडे रोख रक्कम 50 हजार रुपये तर पती राहुल कुल यांच्याकडे 1 लाख 20 हजार रुपयांची रोख रक्कम आहे. कांचन कुल यांच्याकडे 3 लाख 97 हजार रुपयांच्या मुदतठेवी; तर 21 हजार रुपयांचे शेअर्स आहेत. एलआयसीमध्ये 5 लाख 50 रुपयांची रक्‍कम आहे. त्यांच्याकडे 2015 मध्ये खरेदी केलेली इनोव्हा कार असून त्याची किंमत 15 लाख रुपये इतकी आहे. तर 18 लाख रुपयांचे 550 ग्रॅम सोने तर साडेतीन किलो चांदी आहे. 44 लाख 70 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. राहू ता. दौंड येथे शेतजमीन आहे. येरवडा येथे 1 हजार 170 चौरस फुटांची सदनिका असून सध्या त्याचे मूल्य 82 लाख 23 हजार रुपये इतके आहे. या स्थावर मालमत्तेची एकूण किंमत 1 कोटी 42 हजार रुपये इतकी आहे. तसेच, कांचन कुल यांनी पीक कर्ज आणि वाहन कर्ज घेतले असून एकूण 6 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज त्यांच्या नावावर आहे.

त्यांचे पती राहुल कुल यांच्याकडे 24 लाख 41 हजार रुपयांच्या मुदतठेवी आहेत. तसेच, 1 लाख 12 हजार रुपयांचे शेअर्स असून एलआयसीमध्ये 14 लाख 57 हजार रुपयांची गुंतवणूक आहे. कुल यांच्याकडेही इनोव्हा कार आहे. 225 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 7 लाख 38 हजार रुपये इतकी असून दीड किलो चांदी आहे. राहुल कुल यांच्याकडे 67 लाख 42 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. स्थावर मालमत्तेमध्ये राहू 3 हेक्‍टर जमीन असून येथेच 21 हजार चौरस फूटांचे बांधकाम आहे. राहुल यांच्यावर 15 लाख 59 हजार रुपयांचे कर्ज आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

0

पुणे : गेल्या काही वर्ष भारतीय जनता पक्षातून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या अनिल जाधव यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुणे लोकसभा मतदार संघासाठी तिकीट देण्यात आले आहे. बुधवारी त्यांनी मोठी रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

वंचित बहुजन आघाडीचे मार्गदर्शक भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ढोल ताशांच्या गजरात फुले वाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मिरवणूक काढण्यात आली.’एमआयएम’चे शहराध्यक्ष लियाकत खान ,भारिपचे शहराध्यक्ष अतुल बहुले, वसंत साळवे आदी सहभागी झाले होते. भारिप बहुजन महासंघ,’एमआयएम’सह वंचित बहुजन आघाडीतील घटक पक्षांचे कार्यकर्तेही मिरवणुकीत सहभागी होते. जिल्हाधिकारी कार्यालयात जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी ‘एमआयएम’च्या नगरसेविका आणि गटनेत्या अश्विनी लांडगे, अतुल बहुले, लियाकत खान, अंजुम इनामदार आदी उपस्थित होते. ‘काँग्रेस आणि भाजपा दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू असून, त्यामुळेच पुण्याचा विकास योग्य पद्धतीने झालेला नाही. वाहतूक, पाणी, कचरा आणि शिक्षण या शहराच्या प्रमुख गरजा आहेत. परंतु, आजपर्यंत भाजप आणि काँग्रेस ,राष्ट्रवादी या मूळ गरजा पूर्ण करू शकले नाहीत. हे काम आम्ही करू. प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांद्वारे आघाडी नव्या विकासाची दृष्टी देईल. देशात आणि राज्यात अत्यंत उपेक्षित समाजाला उमेदवारी देऊन आघाडीने नवा इतिहास घडवला आहे. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे,’असे जाधव यांनी सांगितले.

जाधव हे भाजपचे पिंपरी-चिंचवडमधील आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अत्यंत जवळची व्यक्ती मानली जात. जाधव हे भाजपचे सदस्य नसले तरी त्यांनी पक्षाच्या अनेक उपक्रमांत सहभाग घेतला होता. गेल्या 15 वर्षांपासून ते सामाजिक कार्य करीत आहेत. त्यांची राज्य सरकारच्या जिल्हा जेल समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान 6 महिन्यांपूर्वी त्यांनी या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

युवक असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांना प्रेरित होऊन ते भाजपचे काम करू लागले. मात्र आपला केवळ सत्तेसाठी वापर करण्यात येत आहे. सत्तेत जाण्याची वेळ येते तेव्हा प्रस्थापित एकत्र येऊन बहुजनांना डावलतात हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांना भेटून पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी केली होती, अशी माहिती वंचित आघाडीकडून देण्यात आली.