Home Blog Page 2956

मनुवाद्यांना प्राधान्य द्यायचं कि पुरोगामी ,सर्वधर्म समभाव मानणाऱ्याना प्राधान्य द्यायचं ,हे ठरविणारी हि निवडणूक -रमेश बागवे

पुणे-मनुवाद्यांना प्राधान्य द्यायचं कि पुरोगामी ,सर्वधर्म समभाव मानणाऱ्याना प्राधान्य द्यायचं ,हे ठरविणारी हि निवडणूक आहे असे मत आज पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे ,राष्ट्रवादी चे अध्यक्ष चेतन तुपे पाटील यांनी शुक्रवारी काँग्रेसभवनात झालेल्या पत्रकारपरिषदेत सांगितले .भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पालकमंत्री गिरीश बापट यांनी मतदानानंतर शहरात अधिकची पाणी कपात केली जाणार की नाही, याबाबत स्पष्ट भूमिका तत्काळ मांडावी, असे आवाहनही त्यांनी बापट यांना दिले. दरम्यान, ‘पुण्याच्या ‘चौकीदारा’वर असलेले आरोप पाहता हा चौकीदार चोरच आहे,’ अशी टीका बागवे यांनी बापट यांचे नाव न घेता या वेळी केली.
याप्रसंगी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे तसेच विविध दलित आणि अल्पसंख्याकआघाडीचे नेते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे, रिपब्लिकन युवामोर्चाचे नेते राहुल डंबाळे, आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव, आरपीआय गवई गटाचे बबनराव अडसूळ, दलित पैंथरचे प्रकाश साळवे, आंबेडकरवादी गटाचे विठ्ठलराव
गायकवाड , रिपाईचे मोहम्मदभाई शेख, रिपब्लिकन युवामोर्चाचे अखिल दोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख किरण कद्रे आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.
प्रारंभी शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले, सध्याची लोकसभा निवडणूक ही  धर्मांध आणि पुरोगामी विचारांची लढाई आहे. मोदी सरकारच्या राजवटीत विशिष्ट धर्माच्या लोकांना तसेच मागासवर्गीयांना सापत्नभावाची वागणूक देण्यात येत आहे. त्यातूनच मॉब लिंचिंगसारख्या संतापजनक घटना घडत आहेत. या सर्वांना रोखण्यासाठी निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये म्हणून दलित-अल्पसंख्याक आघाडीतर्फे जनजागरण करण्यात येणार आहे. त्यासाठी झोपडपट्टी आणि मोहल्य्यात जाऊन प्रचार करण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन तुपे म्हणाले, दीनदुबळ्यांना ताठ मानेने जगण्यासाठी संविधानाचे रक्षण करण्याची गरज आहे. देशाचे हित डोळ्यासमोर ठेवूनच या निवडणुकीत ‘संविधान वाचवा -देश वाचवा’हे अभियान सुरु करण्यात आले असून त्यास सर्व धर्मनिरपेक्ष मतांच्या लोकांनी पाठिंबा देण्याची गरज आहे. रिपब्लिकन युवामोर्चाचे नेते राहुल डंबाळे म्हणले, मॉब लिंचिंगसारख्या घटना हे मोदी सरकारचे फार मोठे अपयश आहे. याप्रकरणी न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने वरवरची
कारवाई करण्यापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे लोकशाहीविरोधी मोदी सरकार पराभूतकरण्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तिहीन एकत्र येऊन काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.

आरपीआय कवाडे गटाचे प्रकाश भालेराव म्हणाले, नरेंद्र मोदी यांना देशात हुकूमशाही आणावयाची आहे त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान बदलण्याची थेट भाषा करण्यात येत आहे. त्यासाठी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षवादी काँग्रेस पक्षाला विजयी करण्याची गरज आहे.
श्री विठ्ठलराव गायकवाड यांनी आभार मानले.

थापेबाजी बाबतीत गिरीश बापट म्हणजे छोटा मोदी – मोहन जोशी

पुणे-पुण्याच्या विकासाच्या बाबतीत खोटी माहिती देऊन गिरीश बापट यांनी सातत्याने प्रचारात
फेकुगिरी चालवली आहे त्यांचा हा प्रकार पाहिल्यानंतर गिरीश बापट हे छोटे मोदीच ठरले आहेत
अशी टीका काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली. वडगाव शेरी
विधानसभा मतदार संघातील पदयात्रेचा समारोप करताना ते म्हणाले की, पुण्याच्या विकासासाठी
स्मार्ट सिटी मार्फत पुण्याला साठ हजार कोटी रुपये दिल्याचे बापट सांगतात पण प्रत्यक्षात स्मार्ट
सिटी साठी केंद्र सरकारकडून जेमतेम तीनशे कोटी रुपयेच आले आहेत अशा प्रकारे फेकुगिरी
करणाऱ्या या छोट्या मोदीला पुणेकर या निवडणुकीत धडा शिकवतील असे जोशी म्हणाले. ही
विशाल पदयात्रा आयोजन करण्यात बापूसाहेब पठारे, प्रकाश मस्के, सुनील टिंगरे, विकास टिंगरे,
किशोर विटकर आदींचा विशेष पुढाकार होता.
या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस चे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी भाजप वर घणाघाती टीका
केली. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुण्याचा जो विकास केला त्याच्या १% देखील विकास काम
भाजपने पुण्यात केले नाही. असे सांगून वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून मोहन जोशींना
आम्ही सर्वाधिक्य मतदान देऊ असे टाळ्यांच्या गजरात त्यांनी घोषित केले.
वडगावशेरी विधानसभा मतदार संघात आज कळस विश्रांतवाडी चौक येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. काँग्रेस-
राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्र पक्षांचे झेंडे घेऊन शेकडो कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झालेत. अनेक
चौकांमध्ये जोरदार फटाके उडवले गेले. मार्गावर ठीक ठिकाणी व्यापारी व नागरिक तसेच गणेश
मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पदयात्रेतील सहभागींना थंड पाणी, उसाचा रस, लिंबू सरबत देऊन त्यांचे
जोरदार स्वागत केले. ही पदयात्रा धानोरीगाव – गोकुळ नगर – टिंगरे नगर – बर्माशेल – कलवड – खेसे
पार्क – गुरुद्वारा – वडगाव शिंदे – निरगुडी लोहगाव येथे समाप्त झाली. या पदयात्रे नंतर मोहन जोशी यांनी
परिसरातील मान्यवरांच्या भेटीगाठी घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले.
या पदयात्रेत आमदार शरद रणपिसे, बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सुनील मलके, संगीता देवकर,
सतीश मस्के, रेखा टिंगरे, राजेंद्र शिरसाठ, किशोर विटकर, अमृता मस्के, हुलगेश चलवादी, राहुल शिरसाठ,

उषा गलांडे, संतोष गलांडे, रमेश खांदवे, राजेंद्र खांदवे, संपत देवकर, सुभाष काळभोर, अर्जुन गरुड, संदीप
मोझे, पांडुरंग खेसे, भगवान जाधव, राजेंद्र कांबळे, नाना नलावडे, जॉन पॉल, अरुण वाघमारे, ज्ञानेश्वर मोझे,
विनायक माळी, जितेंद्र गुप्ता, बाबा नायडू, शिवानी माने, सुनील गोगले, विशाल मलके, रमेश सकट, आशुतोष
जाधव, बंटी मस्के, विकास टिंगरे, सुनिता भोसले, संतोष आरडे, सुनील मोझे, विजय साबळे, कातुरे यांसह
कॉंग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

पुण्यातील पाणीवाटपाची सरकारची भूमिका 22 एप्रिलपर्यंत सादर करा-उच्च न्यायालय

0

पुणे – एकीकडे पुण्यात २३ एप्रिल ला लोकसभेसाठी मतदान होत असताना ,दुसरीकडे पुण्यातील पाणीवाटपाची भूमिका जाहीर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने  राज्य सरकारला दिले.या पार्श्वभूमीवर मतदान होईपर्यंत पाणी कपात भासू द्यायची नाही आणि मतदानानंतर मात्र धरणातील पाणी साठ्याचा मुद्दा उपस्थित करत पाणी कपात तर करण्यात येणार नाही ना ? असा प्रश्न नागरिकांना भेडसावू लागला आहे. आणि आता याबाबत खरोखर २२ एप्रिल ला तरी चित्र स्पष्ट होईलका हा हि मुद्दा उपस्थित होतो आहे .

पुणे महापालिकेच्या हद्दीतील वाढत्या लोकसंख्येनुसार शहराचा पाण्याचा कोटा वाढवून देणार, की यापूर्वी निश्‍चित केलेल्या कोट्यानुसारच पाणी देणार याबाबतचा निर्णय घ्यायचा असून, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेसाठी ठरवून दिलेला पाण्याचा कोटा मान्य नसल्यास महापालिकेने त्याविरोधात न्यायालयात बाजू मांडावी, असेही आदेशात म्हटले आहे.

शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन, पुण्यासाठी 18 टीएमसी पाणी मिळावे, अशी याचिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे योगेश खैरे आणि संतोष पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. याशिवाय पुण्यासाठी निश्‍चित केलेल्या पाण्यापेक्षा अतिरिक्त पाणी दिले जात असल्याने ग्रामीण भागातील शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची तक्रार करत एका शेतकऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. खैरे आणि पाटील यांच्या याचिकेवरील सुनावणी बुधवारी झाली.

जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यातील पाणीवाटपाचा करार फेब्रुवारीमध्येच संपला असून, नव्याने करार करताना सध्याचा कोटा कायम ठेवला जाणार आहे, की त्यात वाढ करण्यात येणार आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. या संदर्भातील सरकारची भूमिका 22 एप्रिलपर्यंत सादर करावी, अशा सूचना न्यायालयाने बुधवारच्या सुनावणीवेळी दिल्या. मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या याचिकेसह शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मागणीबाबतच्या याचिकेची सुनावणी एकत्र घेणार असल्याचेही न्यायालयाने यावेळी नमूद केले.

दरम्यान, जलसंपत्ती प्राधिकरणाने दिलेला निर्णय महापालिकेला मान्य नसेल, तर त्याविरोधात दाद मागण्याचा पर्याय खुला असल्याचे न्यायालयाने महापालिकेला सांगितले. शहराच्या 2011 च्या जनगणनेनुसार 33 लोकसंख्येसाठी आवश्‍यक 8.15 टीएमसी पाणीच शहराला देण्यात यावे, असा निर्णय प्राधिकरणाने घेतला होता. मात्र, पुण्याच्या पाण्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे स्पष्ट करत सध्याचा दैनंदिन पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र तरीही पाटबंधारे खात्याने तीन वेळा पुण्याचे पाणी तोडले होते.

जल न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या पुढे असून, त्याचे सर्व पुरावे जोडून महापालिकेने पाणी कोटा वाढवून देण्याचा सविस्तर प्रस्ताव नुकताच जलसंपदा विभागाला सादर केला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर त्यावर निर्णय होणे अपेक्षित असून, तत्पूर्वी पुढील सुनावणीवेळा न्यायालयाकडून काही अंतरिम आदेश दिले जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नरेंद्र मोदी पुण्यात मुक्कामी, मात्र पुण्यात सभा नाही ….

0

पुणे-पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात मंगळवारी (१६ एप्रिल) पुणे मुक्कामी येत असून, त्यांची बुधवारी (१७ एप्रिल) सकाळी अकलूजमध्ये (जिल्हा सोलापूर) प्रचारसभा होणार आहे. मोदींची पुण्यात सभा होणार नसली, तरी पुणे मुक्कामी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक राजकीय गणिते बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मोदी शुक्रवारी (१२ एप्रिल) नगरमध्ये जाहीर सभा घेणार असून, पाठोपाठ लगेचच पाचच दिवसांत पुन्हा पुण्यात दाखल होणार आहेत. पुणे मुक्कामी मोदी निमंत्रितांशी पश्चिम महाराष्ट्रातील १२ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याचे समजते.

गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सभा होणार आहेत. त्या वेळी नगर, सोलापूर आणि पुणे अशा तीन सभा झाल्या होत्या. यंदा मात्र, नगर, सोलापूर (अकलूज) अशा दोन सभा होणार आहेत. मोदी भुवनेश्वर येथील सभा आटोपून पुण्यात रात्री नऊच्या सुमारास दाखल होणार आहेत. राजभवन येथे त्यांचा मुक्काम असेल.

मोदींच्या पुणे मुक्कामाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, विशेष सुरक्षा यंत्रणाही येत्या दोन दिवसांत पुण्यात दाखल होणार आहे. मोदी पुणे विमानतळ ते राजभवन तसेच राजभवन ते पुणे विमानतळ असा प्रवास करणार आहेत. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास राजभवन येथून मोदी पुणे विमानतळावर जातील. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने अकलूजला प्रचाराला जातील.

ही सभा आटोपून ते हेलिकॉप्टरने पुणे विमानतळावर दाखल होतील. तेथून ते विमानाने राजकोट येथे पुढील प्रचार सभेसाठी जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मोदी यांची पुण्यात सभा व्हावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र, पुण्याच्या जवळ बारामती लोकसभा मतदारसंघात मोदी यांची सभा घेण्याचा वरिष्ठ नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

महापालिका उपायुक्त जगतापांसह सहा जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल

0

पुणे-अधिकृत परवाना असूनही अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई करून माल जप्त केल्याप्रकरणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्तांसह निरीक्षक आणि कर्मचारी अशा एकूण सहा जणांवर दत्तवाडी पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामकृष्ण मठासमोरील हातगाडी आणि त्यावरील माल उचलून नेण्यात आला होता. संबंधित व्यावसायिकाने न्यायालयात धाव घेतल्यानंतर, न्यायालयाच्या आदेशाने दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बालाजी रघुनाथ वायकर (शिवमंदिराच्या पाठीमागे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून माधव केशवराव जगताप (उपायुक्त, अतिक्रमण विभाग, पुणे महापालिका), मेघा सचिन राऊत (सहायक अतिक्रमण निरीक्षक), गणेश रामचंद्र तारू, सुभाष रामचंद्र जगताप, संजय दत्तात्रय कुंभार, मंगेश गायकवाड अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वायकर यांचा सिंहगड रस्त्यावरील रामकृष्ण मठासमोर हातगाडीवर खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. ३ जानेवारी २०१९ मध्ये अतिक्रमण विरोधी विभागाने कारवाईत करताना त्यांची हातगाडी व त्यावरील माल उचलून नेला. दरम्यान, वायकर यांच्याकडे हातगाडी परवाना आहे. तरीही त्यांची गाडी उचलून नेण्यात आली, असे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. या संदर्भात त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार १५८ (३) नुसार दत्तवाडी पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकाराबाबत अपील केले आहे. ही तक्रार पूर्णपणे खोटी आणि अनधिकृत पथारी व्यवसायांवर कारवाई होऊ नये, यासाठी केलेली दिसते. खोट्या तक्रारींसाठी सबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बिबवेवाडीत जुगार अड्ड्यावर छापा; २६ जण ताब्यात

0

पुणे-बिबवेवाडी परिसरातील एका बंगल्यात चालणाऱ्या जुगार अड्डयावर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी दुपारी छापा टाकून २६ जणांना ताब्यात घेतले. या वेळी पोलिसांनी २७ मोबाइल आणि सहा लाख ७३ हजार ६६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले सर्वजण परिसरातील प्रतिष्ठीत असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी क्‍लबचा मालक योगेश किशोर नांगरे, मॅनेजर शेंडे गुंडेराव कडाजीराव यांच्यासह तेथे जुगार खेळण्यासाठी आलेल्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि पथकाने ही कारवाई केली.

बिबवेवाडी परिसरातील स्वामी समर्थनगर येथील बंगला क्रमांक २१ मध्ये एक जुगार अड्डा (क्‍लब) सुरू असल्याची माहिती भानुप्रताप बर्गे यांना मिळाली होती. त्यानुसार सहायक निरीक्षक अश्‍विनी जगताप, कर्मचारी शंकर संपते, नीलेश पालवे, सुधीर इंगळे, राहुल सकट आणि प्रमोद माळी यांच्या पथकाने क्‍लबवर छापा टाकला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास बिबवेवाडी पोलिस करीत आहेत.

आ. छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘परोपकारी नेता’ चा पुण्यात शुभारंभ.

0

पुणे –  शिवलीला फिल्म्स च्या वतीने  ‘परोपकारी नेता’ हा  छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची  निर्मिती करत आहे. महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने​ त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून  चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटातील युवा कलाकार तंत्रज्ञ निर्माते दिग्दर्शक उपस्थित होते. ‘परोपकारी  नेता’ या चित्रपटात करण जाधव, प्रसन्न जोगदेव, अर्जुन प्रधान हे नवोदित कलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहेत. शिवलीला फिल्मचे शिवम लोणारी यांनी चित्रपटाच्या निर्मिती बरोबरच दिग्दर्शन आणि लेखनाची बाजू सांभाळली आहे. लोणारी यांच्या बरोबर सुरज कदम तसेच चिंतन मोकाशी संवाद लेखन करत आहेत. चित्रपटाचे संगीत मानस माळी यांचे असून वेशभूषा कीर्ती जंगम यांची आहे. चित्रपटाचे कला दिग्दर्शन शंतनू कुलकर्णी करणार असून ग्राफिक्स व व्हीएफएक्सची विराज पंध्ये सांभाळणार आहेत. क्रिएटीव्हज श्रीपाद जाधव करणार आहेत. चित्रपटाचे छायांकन अथर्व वाघ करणार असून  नीरज वळसंगकर आणि प्रतिक जोशी हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते असून वळसंगकर संकलनाची जबाबदारी पार पाडणार आहेत तसेच संकेत भंसाली आणि निखिल लिमये हे लाईन प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहेत.

छगन भुजबळ यांचा  बालपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास या चित्रपटातून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे निर्माते-दिग्दर्शक शिवम लोणारी यांनी सांगितले. ते म्हणाले, छगन भुजबळ एक राजकारणी म्हणून लोकांना परिचित आहेत परंतु या चित्रपटातून त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू, त्यांची जडणघडण, संघर्ष तसेच त्यांच्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग लोकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे व  यासाठी सर्व भुजबळ कुटुंबियांचा पाठिंबा आणि सहकार्य आम्हाला मिळत आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुणे मुंबई आणि नाशिक याठिकाणी करणार असून चित्रपट नऊ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यास चा आमचा मानस असल्याचे लोणारी यांनी सांगितले.

पुण्यातील मुकुंद नगरमध्ये २० लाख जप्त

0

पुणे-मुकुंद नगर भागातील रांका हॉस्पिटल चौकात पोलिसांच्या स्वारगेट पोलिसांच्या भरारी पथकानं आज २० लाखांची रोकड जप्त केली. पहाटे तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गाडीच्या डिकीमध्ये ही रक्कम लपवण्यात आली होती. जप्त रक्कम ज्या गाडीत ठेवण्यातआली होती, ती गाडी राजेश रतनचंद ओसवाल, (वय ४९) यांच्या मालकीची आहे. ओसवाल हे तेलाचे व्यापारी आहेत. दिवसभराच्या व्यवहारांतून ही रक्कम जमा झाली असल्याचं ओसवाल यांच्यातर्फे सांगण्यात आलं आहे. जप्त रक्कम स्वारगेट पोलीस ठाण्याकडं जमा करण्यात आली असून या प्रकरणी तपास सुरू आहे.

मावळ आणि शिरुर लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीचा जिल्‍हाधिकारी राम यांच्‍याकडून आढावा

0

पुणे- केंद्रीय निवडणूक निरीक्षकांच्‍या उपस्थितीत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्‍या तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात झालेल्‍या बैठकीस मावळ लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक अशोक कुमार सिंग,शिरुर लोकसभा मतदार संघासाठीचे सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक एस. हरीकिशोर,पोलीस ऑब्‍झर्व्‍हर आभासकुमार, मावळच्‍या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरुरचे निवडणूक निर्णय अधिकारी रमेश काळे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप जिल्‍हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह, अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त एम.एम. रानडे, पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे, समन्‍वय अधिकारी नंदिनी आवडे, अजित रेळेकर, महेश आव्‍हाड, दिलीप गावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

लोकसभा निवडणुकीच्‍या चौथ्‍या टप्‍प्यात मावळ आणि शिरुर लोकसभा मतदार संघाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत वेगवेगळ्या माहिती-तंत्रज्ञान साधनांचा वापर करण्‍यात येत आहे,त्‍यानुसार निवडणुकीशी संबंधित सर्व अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्‍यात आले असल्याचे जिल्‍हाधिकारी राम यांनी सांगितले. दिव्‍यांग मतदारांवरही यावेळी विशेष लक्ष केंद्रीत करण्‍यात आले असून एकही मतदार सुटता कामा नये, हे लक्षात घेवून मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील, असेही त्‍यांनी सांगितले.

बैठकीत सी-व्‍हीजील अॅप, एक खिडकी योजना, टपाली मतपत्रिका, वेब कास्‍टींग, सूक्ष्‍म निरीक्षक,निवडणूक खर्च देखरेख आदींची माहिती देण्‍यात आली.

जिल्‍हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी अवैध शस्‍त्रजप्‍ती, कायदा व सुव्‍यवस्‍था याबद्दलची माहिती दिली. जिल्‍ह्यातील निवडणूक तयारी उत्‍तम दिसत असून निवडणुका शांत आणि नि:पक्ष वातावरणात पार पडतील असा विश्‍वास निवडणूक निरीक्षकांनी व्‍यक्‍त केला.

कॉंग्रेस भवनात साकारले राहुल गांधींचे ५० फुटी कटआउट- बागवे म्हणाले ,हि आमच्या विजयाची पताका …

0

पुणे- राहुल गांधी आणि प्रियांका गांधी हे आमचे आणि संपूर्ण देशाचे आशास्थान आहे, देश संकटात असतो तेव्हा तेव्हा गांधी यांच्या नेतृत्वा कडेच देश आशेने पाहतो ,कॉंग्रेस भवनात साकारलेले राहुल गांधी यांचे ५० फुटी कटआउट हि आमच्या विजयाची पताका आहे असे मत आज शहर कॉंग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे यांनी व्यक्त केले ..पहा..आणि ऐका  नेमके या वेळी बागवे यांनी काय म्हटले आहे ….

फुले दाम्पत्याप्रमाणेच ‘बा-बापूं’चे सहजीवन प्रेरणादायी-सुनीती सु. र. यांचे प्रतिपादन

0

पुणे : “महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समानतेचा आदर्श घालून दिला. त्याच वाटेवर महात्मा गांधी (बापू) आणि कस्तुरबा गांधी (बा) यांचे सहजीवन प्रेरणादायी आहे. अखेरच्या काही दिवसांत बा आणि बापू यांच्यातील भावनिक नाते, करावासातील दिवस, कस्तुरबांचे, सहकारी महादेवभाई देसाईंचे निधन, बापूंच्या मनातील अस्वस्थता यासह अनेक गोष्टींचा दैनंदिनी स्वरूपातील आढावा आपल्याला बापू नव्याने उलगडणारा आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुनीती सु. र. यांनी केले.

कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्ट इंदोर महाराष्ट्र शाखा, सासवड आणि नगर रस्त्यावरील गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी आगाखान पॅलेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पूज्य ‘बा’ अर्थात कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘बापूंच्या कारावासाची कहाणी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी सुनीती सु. र. बोलत होत्या. हिंदी लेखिका स्वर्गीय डॉ. सुशीला नैय्यर लिखित मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. शोभनाताई रानडे यांनी केला आहे. आगाखान पॅलेस येथील कस्तुरबा स्मृती सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी ट्रस्टचे माजी अध्यक्ष धीरूभाई मेहता, अध्यक्ष डॉ. करुणाकर त्रिवेदी, उपाध्यक्षा गायत्रीदास दीदी, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे उपस्थित होते.

सुनीती सु. र. म्हणाल्या, “डॉ. सुशीला बापूंच्या सोबत होत्या. त्यामुळे बापूंचे दैनंदिन जीवन त्यांनी शब्दबद्ध केले होते. डॉ. शोभनाताईंनी समर्पक असे त्याचे मराठीत रूपांतर केले आहे. आगाखान पॅलेसमधील त्या भरलेल्या दिवसांची आठवण या पुस्तकामुळे होत आहे. त्याचबरोबर आजच्या गंभीर कालखंडात हे पुस्तक दिशा दाखवणारे ठरेल. लोकशाही वाचविण्यासाठी या पुस्तकातील मूल्ये उपयुक्त ठरतील.”

अरुण खोरे म्हणाले, “गांधी दाम्पत्याच्या शेवटच्या काळातील सहजीवन उलगडणारे हे पुस्तक आहे. आगाखान पॅलेसमधील दिवस हे भारताच्या इतिहासाला वळण देणारे होते. कस्तुरबांविषयीच्या लेखनाला लेखकांनी उशिरा सुरुवात केली. परंतु, अलीकडे चांगली पुस्तके येताहेत, ही आनंदाची बाब आहे. आजच्या गढूळ वातावरणात अशा प्रकारची पुस्तके मार्गदर्शक ठरतील.”

अध्यक्षीय भाषणात डॉ. करुणाकर त्रिवेदी म्हणाले, “गांधीजींनी आपले महत्वाचे दिवस पुण्यात आणि महाराष्ट्रात घालवले. त्यांचे कार्य नव्या पिढीला समजण्यासाठी अशी पुस्तके व्हायला हवीत. लवकरच या पुस्तकाला डिजिटल स्वरूपात आणले जाणार आहे. गांधी विचार पोहोचवण्यासाठी ट्रस्ट नियमितपणे कार्यरत आहे.”

धीरूभाई मेहता, गायत्रीदास दीदी, डॉ. शोभनाताई रानडे यांनीही मनोगते व्यक्त केली. पुस्तकनिर्मितीतील सहकार्याबद्दल हनुमंता जगनगडा, चतुराताई यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन शेवंताताई चव्हाण यांनी केले. आशा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश धोत्रे यांनी आभार मानले.

कॉंग्रेसच्याच राज्यात पुण्याचा विकास रखडला -आमदार प्रा. मेधा कुलकर्णी

पुणे-शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी १९८७ च्या विकास आराखड्यात प्रस्तावित करण्यात आलेला ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’(एचसीएमटीआर) हा प्रकल्प कॉंग‘ेस सरकारला राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे तीसहून अधिक वर्षे मार्गी लावता आला नाही. केंद्र, राज्य व महापालिकेत सत्ता आल्यानंतर यावर्षी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम आम्ही सुरू केले. त्यामुळे कॉंग‘ेच्याच राज्यात पुण्याचा विकास रखडला होता असा आरोप कोथरूडच्या आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार मेधा कुलकर्णी बोलत होत्या. शिवसेनेचे संपर्क नेते प्रशांत बधे, राजेंद्र शिंदे, मंदार जोशी उपस्थित होते.
प्रा. कुलकर्णी म्हणाल्या, ‘पुणे शहरातील सर्व उपनगरे व प्रमुख साठ रस्त्यांना जोडणारा ३६ किलोमीटर लांबीचा व २४ मीटर रूंदीचा सहा मार्गिका असणारा या प्रकल्पाचे काम वेळेत सुरू झाले असते तर आज शहरात होणारी वाहतुकीची कोंडी कमी झाली असती, वाहनचालकांचा वेळ वाचला असता, इंधन बचत झाली असती, प्रदूषणाची पातळी कमी झाली असती, प्रकल्पाचा खर्च ही कमी झाला असता. परंतु कॉंग‘ेसच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे पुणेकरांना त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पासाठी आम्ही सल्लागारची नियुक्ती केली असून काम सुरू करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून आवश्यक असणारा निधी मिळवून देणार आहोत. मु‘यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांचे या प्रकल्पावर विशेष लक्ष आहे.’
प्रा. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, ‘चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प, नळस्टॉप चौकातील उड्डाणपूल, बाणेर परिसरातील स्मार्ट सिटीची विकासकामे, समान पाणीपुरवठा योजना, कोथरूड मतदारसंघातून जाणारे दोन मेट्रो प्रकल्प यामुळे या भागातील नागरीक महायुतीच्या कारभारावर खूष आहेत. गेल्या लोकसभेत महायुतीला ९१ हजार मतांची आघाडी मिळाली होती. महायुतीच्या नगरसेवकांची सं‘या दोन वरून बावीस गेली आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये मतदारांमध्ये खुषीचे वातावरण असून, गिरीश बापट यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य देण्याचा कार्यकर्त्यांनी संकल्प केला आहे.
एकजुटीने महायुतीचा प्रचार करण्याचा निर्धार
पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी महापालिकेतील माजी नगरसेवक व निवडणूक लढविलेल्या उमेदवारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
निवडणुकीसाठी एकाहून अधिक उमेदवार इच्छुक असतात. परंतु निवडणुक लढविण्याची संधी एकाच कार्यकर्त्याला मिळते. परंतु महायुतीचे सर्वच कार्यकर्ते एकजुटीने प्रचार करतात. आताही सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. याच जोषाने कार्यकर्त्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन गिरीश बापट यांनी यावेळी केले
शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत मोकाटे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, प्रशांत बधे, अजय भोसले यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला १२५ हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
घरोघरी जाऊन प्रचारावर भर द्या
गिरीश बापट यांचे आवाहन
पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्त्यांनी जाहीर प्रचाराबरोबर शासनाच्या समाजकल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्पांची माहिती देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर द्यावा असे आवाहन महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी केले.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करताना श्री. बापट बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे, शिवसेनेचे नेते अजय भोसले, भाजपचे मतदारसंघ अध्यक्ष जयप्रकाश पुरोहीत, शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र मोरे यांची प्रमुुख उपस्थिती होती.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्य देण्यासाठी कार्यकर्त्यांनी झटून काम करण्याचे आवाहन खासदार अनिल शिरोळे यांनी केले.
कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या नगरसेवकांची सं‘या एकहून पंधरापर्यंत गेली आहे. गेल्या पाच वर्षांत विकासाची अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. कार्यकर्त्यांनी या विकासकामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवावी. या निवडणुकीत कॅन्टोन्मेंटमधून पन्नास हजाराहून अधिक मताधिक्य मिळवून देऊ.

अमळनेर येथील हाणामारीमुळे भाजपतील नव्या संस्कृतीचे ‘उदात्त’ दर्शन – डॉ. कुमार सप्तर्षी

0

पुणे –  महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री  गिरिश महाजन यांच्या उपस्थितीत, अमळनेर येथील भाजपच्या प्रचारसभेत झालेल्या जोरदार हाणामारीमुळे, भाजपच्या राजकीय संस्कृतीचे खरेखुरे ‘उदात्त’ दर्शन घडले असून, साने गुरूंजींचे जन्मगाव असलेल्या अमळनेर सारख्या खानदेशातील शैक्षणिक माहेरघर मानल्या गेलेल्या सुसंस्कृत शहरात असा प्रकार घडावा, हे अतिशय क्लेशकारक असून, सर्वसामान्य लोकांना मान खाली घालावी लागत असल्याची सणसणीत टीका, ज्येष्ठ समाजवादी नेते आणि मतदार जागृती परिषदेचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केली. ते मतदार जागृती परिषदेच्या वतीने आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

वरील हाणामारीचा प्रकार येथील भाजपच्या आमदार श्रीमती स्मिता वाघ यांचे लोकसभेचे तिकीट ऐनवेळी कापून, ते श्री. उत्कर्ष पाटील यांना जाहीर झाल्यापासूनच पक्षामध्ये असंतोष धुमसत होता आणि शेवटी त्याची परिणती माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना प्रचारसभेसाठी उपस्थित असलेल्या लोकांसमोरच व्यासपीठावर लाथाबुक्क्यांनी मारण्यात आले, तसेच श्री. गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली, हा प्रकार खरंतर कोणत्याही राजकीय पक्षाला शोभा देणारा नसून, भाजपच्या वाढणा-या सत्तेच्या लालसेपोटी ठिकठिकाणी घडत असल्याबद्दल डॉ. सप्तर्षी यांनी अशा हिंसकवृत्तीचा निषेध व्यक्त केला. मागील पाच वर्षात दिल्ली ते गल्लीत सुरू असलेल्या दंडेलशाहीतून सार्वजनिक जीवनात अरेरावी, मस्तवालपणा आणि हिंसा रुजविण्याचा भाजपने नेहमीच प्रयत्न केला असून, हीच प्रवृत्ती आता भाजप व संघ परिवारावर उलटत असून, लोकांनी महात्मा गांधी, साने गुरूजीं, या महनीय नेत्यांचे स्मरण करून महाराष्ट्रात मतदानातून अशा प्रवृत्तींना वेसण घालून परिवर्तन घडवावे असेही, आवाहन डॉ. सप्तर्षी यांनी शेवटी केले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव श्री. अन्वर राजन, प्रशांत कोठडिया, जांबुवंत मनोहर, मयूरी शिंदे, आप्पा अनारसे, चित्रलेखा जेम्स, इस्माईल शेख, आदींनीही कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मतदार जागृती परिषदेचे सचिव श्री. संदीप बर्वे यांनी या मेळाव्याचे सूत्रसंचालन केले.

रामेश्‍वर (रुई) येथे प्रभू श्रीराम जन्मसोहळा व भारतीय संस्कृती दर्शन – ‘श्रीराम’ रथ यात्रेचे आयोजन.

0
पुणे- विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे व रामेश्‍वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने रामेश्‍वर (रुई ) ता. जि. लातूर  येथे चैत्र शुध्द ९, रामनवमी, शनिवार, दि. १३ एप्रिल २०१९ रोजी सकाळी ठीक ८.१५ वाजता भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञान, त्याग आणि समर्पणाचे मूर्तीमंत प्रतीक, तसेच, समस्त भारतीयांचे श्रध्दास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मसोहळ्याच्या निमित्ताने  सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले भारतीय संस्कृती दर्शन – ‘श्रीराम’ रथ यात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
  भारतीय संस्कृती दर्शन – श्रीराम रथ यात्रा सोहळ्यास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस हे सन्माननीय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस. एन. पठाण हे असतील.
पूर्णब्रह्मयोगिनी त्यागमूर्ती श्रीमती प्रयागअक्का दादाराव कराड यांनी श्रीराम मंदिरास अर्पण केलेल्या सुंदर, रेखीव व वैशिष्ट्यपूर्ण अशा भारतीय संस्कृती दर्शन- श्रीराम  रथाची, मानवतातीर्थ म्हणून साकार झालेल्या रामेश्‍वर गावची ग्रामप्रदक्षिणा सकाळी ८.१५ वा. निघेल.
       या रथयात्रेनंतर सकाळी १०.०० वाजता ह.भ.प. श्री. बालयोगी हरिहर महाराज दिवेगावकर (बनकरंजा, ता. केज) यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
       रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर या गावी, हिंदू-मुस्लिम व इतर सर्व धर्मियांच्या परस्पर सहकार्यातून उभारण्यात आलेले अत्यंत सुंदर व देखणे श्री राम मंदिर, हजरत जैनुद्दीन चिस्ती दर्गा व जामा मस्जिद हे रामेश्‍वर (रुई) गावातील ‘हिंदू-मुस्लिम ऐक्याचे व राष्ट्रीय एकात्मतेचे’ एक मूर्तिमंत प्रतीक आणि खर्‍या अर्थाने ज्ञानकेंद्र म्हणून उदयास येणार आहे, असा आम्हाला विश्‍वास वाटतो. सदरील श्रीराम रथ यात्रेचे मुस्लिम बांधवांकडूनही स्वागत केले जाणार आहे.
        श्री राम मंदिराबरोबरच, सोनावळा नदीचे तीरावरील दक्षिणेस असलेले श्री गोपाळबुवा महाराजांचे मंदिर, उत्तरेस असणारा हजरत जैनुद्दीन चिस्ती दर्गा व जामा मस्जिद, ‘विश्‍वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू’ व तथागत भगवान गौतम बुध्द विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्‍वशांती भवनाची भेट हाही एक चांगला अंतर्मुुख करणारा अनुभव असेल. म्हणूनच रामेश्‍वर (रूई) हे गाव मानवतातीर्थ म्हणून ओळखले जात आहे.
रामेश्‍वर (रुई) गावच्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भारतीय संस्कृती दर्शन – श्रीराम रथ यात्रेमध्ये सहभागी व्हावे व श्रीराम रथ सोहळ्याची दैवी अनुभूती घ्यावी, असे आवाहन विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड  यांनी केले आहेे.

डिक्कीच्या वर्धापनदिनाचे आयोजन 

0

पुणे :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीदिना निमित्त दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या(डिक्की) १४ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम येत्या शनिवारी १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत हॉटेल लेमन ट्री येथे होणार आहे. यावेळी डिक्कीचा १४ वर्षांचा प्रवास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक विचार आणि आजचे महत्त्व, चौथी औद्योगिक क्रांती आणि राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना, विविध क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योजक व डिक्की महाराष्ट्राचे मेंटॉर अशोक खाडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, डिक्की पश्चिम विभाग उपाध्यक्ष अविनाश जगताप,डिक्की नॅशनल वुमन विंगच्या मेंटॉर सीमा कांबळे, डिक्की महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संतोष कांबळे,डिक्की पुणे अध्यक्ष अनिल ओव्हाळे उपस्थित राहणार आहेत.हा कार्यक्रम सशुल्क असून इच्छुक सभासदांनी कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन  डिक्कीच्या वतीने करण्यात आली आहे.