Home Blog Page 2946

मानव एकता दिवस-पुण्यामध्ये १२५८ रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

 पुणे : निरंकारी सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या निर्देशानुसार मानव एकता दिनानिमित्त  संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन पुणे झोन च्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम मार्केटयार्ड,पुणे येथे  रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये ससून रुग्णालय रक्तपेढी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय रक्तपेढी,औंध रुग्णालय रक्तपेढी, कमांड हॉस्पिटल रक्तपेढी यांनी १२५८ युनिट रक्त संकलन केले.

    या रक्तदान शिबिराचे उदघाटन  डॉ.अजय चंदनवाले (अधिष्ठाता,जे.जे.हॉस्पिटल मुंबई), यू.टी.पवार (पोलीस अधीक्षक, पुनर्वसन विभाग,येरवडा),रितू छाब्रिया (मुकुल माधव फाउंडेशन), माधुरी मिसाळ (आमदार,पुणे), मुरलीधर तांबे (प्रभारी अधिष्ठाता बी.जे.मेडिकल कॉलेज),यांच्या उपस्थिती मध्ये झाले. या रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक,राजकीय,शासकीय अधिकारी-पदाधिकारी यांनी आवर्जून  भेट दिली.

            मिशनद्वारे नोव्हेंबर १९८६ मध्ये पहिल्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराजांनी स्वतः रक्तदान करून या शिबिराची सुरुवात केली होती आणि संदेश दिला की ‘रक्त नाल्यामध्ये नाही तर नाड्यामध्ये वाहिले पाहिजे’.वर्ष १९८७ पासून हे शिबीर २४ एप्रिल या दिवशी मानव एकता दिवसानिमित्त आयोजित करण्यात येऊ लागले.

बाबाजींच्या या संदेशाने प्रेरित होऊन रक्तदानाला आपल्या भक्तीचे अंग बनवून श्रद्धाळू भक्त या महान अभियानामध्ये मोठ्या संख्येने योगदान देऊ लागले.

              वर्ष १९८६ पासून आतापर्यंत ६०७६ शिबिरांचे आयोजन करून १० लाखाहून अधिक युनिट रक्तदान करण्यात आले आहे.पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत २२ शिबिरांचे आयोजन करून ७००७ युनिट रक्तदान करण्यात आले असून या वर्षी पुण्यामध्ये २८ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

               रक्तदान शिबिराच्या जनजागृती साठी संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन चे स्वयंसेवक, तसेच सेवादल यांनी  पथनाट्य, रॅली चे आयोजन पुणे परिसरात केले होते या जागृती द्वारा प्रेरणा घेऊन समाजाच्या विविध स्थरातील जागरूक नागरिकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिरात आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार श्री.ताराचंद करमचंदानी (संत निरंकारी मंडळ, पुणे झोन इंचार्ज) यांनी केले. रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी पुणे झोन मधील संयोजक, मुखी, सेवादल, संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी योगदान केले.

श्री उंटाडे मारुती मंदिराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन

0

पुणे-श्री.  हनुमान जन्मोत्सवनिमित्त रास्ता पेठमधील के ई एम रुग्णालयासमोरील श्री उंटाडे मारुती मंदिराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी शाहू उद्यानाजवळील संत गाडगे महाराज कार्यालयात हा महाप्रसादाचा लाभ  चार हजार भाविकांनी घेतला .

यावेळी महापूजा व आरती करण्यात आली . यावेळी श्री उंटाडे मारुती मंदिराचे अध्यक्ष सुदर्शन मुदलियार , विश्वस्त प्रदीप मुदलियार , रमेश मुदलियार , आर. एच. कृष्णन , सिंधुताई कन्हेरकर आदी मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

यावेळी शंकुतला साळेकर , महेंद्र साळेकर , कृष्णमूर्ती पिल्ले , जितेंद्र ढमाले  , प्रा. वाल्मिक जगताप , गणेश आचार्य व माधव नाडकर्णी आदींनी विशेष परिश्रम घेतले . 

एन.ई.एम.एस.शाळेत दीक्षांत सोहळा

0

पुणे-एन.ई.एम.एस. पूर्वप्रार्थमिक शाळेतील सीनियर केजीतील मुलांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.

पूर्वप्रार्थमिक शिक्षण पूर्ण करून मुले आता प्रार्थमिक शाळेत प्रवेश करणार आहेत.या निमित्याने शाळेच्या वतीने दीक्षांत सोहळा कार्यक्रमात मुलांना पदवी प्रदान करण्यात आली.

पूर्वप्रार्थमिक विभागाच्या ईनचार्ज सौ.शिल्पा कुलकर्णी  यांनी उपस्थित पालकांचे व मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी दीक्षांत समारंभाच्या विशेष वेषभुषेत उपस्थित होते.

काही विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले व काही विद्यार्थ्यानी नृत्य सादर केले. या कार्यक्रमासाठी  उपस्थित शाळा समितीच्या अध्यक्षा डॉक्टर सविता केळकर यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले.

शाळेतील शिक्षिका स्वाती मर्चट यांनी सूत्रसंचालन केले.कार्यक्रमात सर्व शिक्षिकांचा सक्रिय सहभाग होता.

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अमित सुर्वे यांचा महाराष्ट्र जोशी समाज संघटनेतर्फे सत्कार

0
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या  मर्यादित विभागीय परीक्षा अंतिम  परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन  ,पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अमित भरत सुर्वे यांचा  महाराष्ट्र  जोशी समाज संघटना (महाराष्ट्र राज्य) यांच्यावतीने आज सत्कार समारंभ पार पडला .
पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल सुर्वे यांचे  महाराष्ट्र जोशी समाज संघटना व सर्व पदाधिकारी यांच्याकडून मनःपूर्वक अभिनंदन  करून ,पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या .
 निलेश प्रकाश निकम (उपाध्यक्ष महाराष्ट्र जोशी समाज संघटना,महाराष्ट्र राज्य)  तानाजी सुर्वे,रामदास निकम, बाळासाहेब हेंद्रे, शैलेश हेंद्रे ,सुजित हांडे,गणेश जोशी, कुणाल हेंद्रे कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्यावेळी    निलेश प्रकाश निकम यांनी  सुर्वे यांना  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – सीझन २ सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यात संपन्न

0

पुणे-मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – सीझन २ या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी नुकतीच हयात पुणे या हॉटेलमध्ये उत्साही वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाली. स्पर्धेचे यंदा दुसरे यशस्वी वर्ष असून अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या ३२ स्पर्धकांचे जीवन या स्पर्धेमुळे खरोखरच पालटून गेले. स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गुजरात व गोवा या राज्यांतून सौंदर्य़वतींची निवड करण्यात आली होती. या व्यासपीठाने महिला सक्षमीकरणाला खराखुरा अर्थ प्राप्त करुन देत सर्वसामान्य महिलांनाही त्यांच्यातील कला-गुण-बुद्धिमत्ता सादर करण्यासाठी एक मोठा मंच मिळवून दिला.

स्पर्धकांना तज्ज्ञांकडून पाच दिवस स्पर्धेच्या विविध पैलूंबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यात परिचय, व्हॉइस मॉड्युलेशन, स्टेज प्रेझेन्स, प्रश्नोत्तरे, रॅम्प वॉक यांचा समावेश होता. दिवा पेजंट्सचे तज्ज्ञ मार्गदर्शक कार्ल व अंजना मस्कारेन्हास यांनी या पैलूंमध्ये अधिक सुधारणा घडवून स्पर्धकांना घडवले.

परीक्षक मंडळात महेक चहल (अभिनेत्री), नयनी दिक्षीत (अभिनेत्री), शिबानी कश्यप (गायिका), राज कौशल (दिग्दर्शक), सुमीत कुमार (हयात पुणेचे सरव्यवस्थापक), विवेक मेंडोंसा (लॉरेन्स अँड मेयो), मोना बोरसे (क्वीन ऑफ द वर्ल्ड २०१९), नम्रता दुबे (मिसेस वेस्ट इंडिया २०१८) या नामवंतांचा समावेश होता.

प्रसिद्ध दूरचित्रवाणी अभिनेता अमन यतन वर्मा याने महाअंतिम फेरीचे सूत्रसंचालन शैलीदार आणि कुशलतेने करुन प्रेक्षकांना गुंगवून सोडले. शिबानी कश्यप हिने आपली लोकप्रिय गाणी सादर केली आणि दिवा स्पर्धेच्या माजी स्पर्धकांनी त्याला नृत्याची जोड दिली.

महाअंतिम फेरीतील स्पर्धकांनी मुकूट जिंकण्यासाठी आपली अजोड तयारी दाखवून देताना स्वतःमधील आत्मविश्वास आणि दिमाखाचेही उत्कृष्ट दर्शन घडवले. उपांत्य फेरीतील १६ स्पर्धकांतून सिल्व्हर (वय २० ते ३६) आणि गोल्ड (वय ३७ व पुढे) या दोन श्रेणींमध्ये केवळ ६ सर्वोत्तम स्पर्धकांची निवड करणे परीक्षकांनाही कठीण गेले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :

शीर्षक विजेते :

मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – सिल्व्हर : वार्तिका पाटील

मिसेस वेस्ट इंडिया – एम्प्रेस ऑफ वेस्ट इंडिया २०१९ – गोल्ड : हेतल कास्लीवाल

फर्स्ट रनर अप – सिल्व्हर : सिंथीया फुर्टाडो

फर्स्ट रनर अप – गोल्ड : मंजू कटारिया

सेकंड रनर अप – सिल्व्हर – स्वाती गुंडावार

सेकंड रनर अप – गोल्ड – इरफाना शेख

 

पश्चिम भारतातून चार विभागीय क्वीन्सही निवडण्यात आल्या.

क्वीन ऑफ मुंबई – प्राची म्हात्रे

क्वीन ऑफ नाशिक – कुंदा शिंदे

क्वीन ऑफ नागपूर – प्रीती देशमुख

क्वीन ऑफ पुणे – मंजू नानकानी

 

विजेत्यांना मोदसूत्र, लॉरेन्स अँड मेयो, द टॅरट लेडी, स्किनवर्क्स व रॉयल ऑर्गेनिक यांच्याकडून दिमाखदार मुकूट, रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले.

समारंभाची ही शानदार सायंकाळ दिवाचे डेअर, ड्रीम, डॅझल हे बोधवाक्य सार्थ करणारी होती आणि त्याचसोबत ही स्पर्धाही पश्चिम भारतातील सर्वांत मोठ्या सौंदर्य़ स्पर्धांपैकी एक ठरली.

समता परिषदेला ‘राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ जाहीर

0
पुणे: डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ मुंबईतील झोपडपट्टी व मागासवर्गीय वस्त्यांमध्ये रचनात्मक विधायक कार्य करणार्‍या ‘समता परिषदे’ला जाहीर करण्यात आला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
सावित्रीबाई फुले  पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. नेहरू उमराणी यांच्या हस्ते येत्या शनिवारी (ता. २७ एप्रिल) सायंकाळी सहा वाजता फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अम्फीथिएटरमध्ये हा कार्यक‘म होणार आहे. सोसायटीचे परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, परिषद व नियामक मंडळाचे उपाध्यक्ष महेश आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
 
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी दिल्लीच्या एकल विद्यालय फाउंडेशनला आणि दुसरा पुरस्कार रा. स्व. संघ जनकल्याण समितीला देण्यात आला होता.

भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास प्रतिसाद

0
पुणे :भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या १४ व्या वार्षिक माजी विद्यार्थी मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला . धनकवडी कॅम्पस मध्ये झालेल्या या मेळाव्यास मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गिरीश मालपाणी हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते .टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (इंग्लंड )चे सल्लागार सचिन भावसार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  भारती अभिमत विद्यापीठाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव हे उपस्थित होते.
मिलिंद जगताप(सॉफ्टहार्ड ऑटोमेशन प्रा. लि.)यांना’बेस्ट अल्युमनी आंत्रप्रुनर अवॉर्ड’देऊन गौरविण्यात आले.उमेश  जगताप,अमित कौलगुड,दिनेश धाडवे,नितीन गोळे,अभिषेक भल्ला या यशस्वी व्यावसायिकांचाही सत्कार करण्यात आला.
गिरीश मालपाणी,सचिन भावसार,डॉ आनंद भालेराव यांनी मेळाव्यात मार्गदर्शन केले.सचिन चव्हाण यांनी स्वागत केले.प्रा.संजय लेंभे यांनी अहवाल सादर केला . प्रा . शामला  शिंदे यांनी आभार मानले.
‘इंटरनेट ऑन थिंग्स एनेबल्ड इंडस्ट्रियल हेल्मेट’ या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला माजी विद्यार्थ्यांतर्फे प्रायोजकत्व देण्यात आले. माजी विद्यार्थी संघटनेच्या अहवालाचे प्रकाशन गिरीश मालपाणी,सचिन भावसार आणि डॉ.आनंद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले . हा कार्यक्रम २० एप्रिल रोजी पार पडला .

वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याचे महावितरणकडून आवाहन

0

पुणे : पुणे परिमंडलातील वीजग्राहकांना माहे एप्रिल/ मे महिन्याच्या देयकांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र देयक देण्यात येत आहेत. या सुरक्षा ठेवीच्या रकमेचा ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्षातील एका महिन्याच्या सरासरी एवढे देयक सुरक्षा ठेव म्हणून जमा करावे लागते. वीजग्राहकांनी मूळ सुरक्षा ठेव याआधी जमा केली असली तरी वीजदर, वीजवापर आणि पर्यायाने देयकांची रक्कम वाढलेली आहे. त्यामुळे मूळ सुरक्षा ठेव आणि गेल्या आर्थिक वर्षातील एका महिन्याचे सरासरी वीजदेयक यातील फरकाच्या रकमेचे देयक अतिरिक्त सुरक्षा ठेव म्हणून ग्राहकांना देण्यात येत आहे. वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवर कालावधीनुसार व्याज देण्याचे महाराष्ट्र विद्युत आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार महावितरणकडून एप्रिल/ मे/ जून या महिन्यांच्या वीजदेयकांत ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवरील व्याजाची रक्कम समायोजित केली जाते.

पुणे परिमंडलातील लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती तसेच ऑनलाईन पेमेंटची सोय महावितरणच्या अधिकृत www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरण मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा भरणा ऑनलाईन करण्यासाठी ‘मेक पेमेंट’चा पर्याय निवडल्यानंतर येणार्‍या देयकाच्या माहितीत सिक्युरिटी डिपॉझिटवर क्लीक केल्यास अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेची माहिती उपलब्ध होईल व ती रक्कम ऑनलाईनद्वारे भरता येईल.

श्रीलंका बॉम्बस्फोटातील मृतात्म्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने श्रद्धांजली

0
पुणे : श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात मृत्युमखी पडलेल्या १३ भारतीयांसह ३२१ नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे (A) आज बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, ससून रुग्णालयासमोर पुणे स्टेशन येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेणबत्य्या लावून मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच हा दहशतवादी भ्याड हल्ला करणाऱ्यांचा निषेध करण्यात आला. 
 
शहराध्यक्ष अशोक कांबळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, संयोजक संजय सोनवणे, संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, निलेश आल्हाट, मंदार जोशी, महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, चिंतामण जगताप, महादेव कांबळे, गौतम शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

‘दगडूशेठ’ मंदिरात मोगरा महोत्सव..(व्हिडीओ)

0
पुणे : मोग-याच्या फुलांची आकर्षक सजावट… चाफा, झेंडू, गुलाब, लिलीसारख्या फुलांनी सजलेला गाभारा आणि शुंडाभूषण, मुकुट, कान व पुष्पवस्त्र परिधान केलेले दगडूशेठच्या गणपती बाप्पाचे विलोभनीय रुप पाहण्याकरीता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपतीला मोग-यांसह १ कोटी सुवासिक फुलांचा महाअभिषेक करण्यात आला. सुवासिक फुलांनी सजलेले मंदिर आणि गणरायाचे रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासोबत मोबाईल कॅमे-यामध्ये हे क्षण अनेकांनी टिपले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, युवराज गाडवे, शिरीष मोहिते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सुर्यवंशी यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि सहका-यांनी  पुष्परचना केली.
सोमवार (दि.२२) पासून या पुष्पसजावटीची तयारी तब्बल ३०० महिला व २५० पुरुष कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये १३०० किलो झेंडू, २३०० किलो मोगरा यांसह चाफा, लिली, गुलाब, गुलछडी, जास्वंद, कमळ, जाई-जुई, चमेली आदी प्रकारची लाखो फुले वापरण्यात आली. गोल रिंगांची झुंबरे आणि कमानी हे यंदाच्या सजावटीचे वैशिष्टय होते.
मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ कीर्तनकारांसह युवा वारक-यांनी देखील मोठया उत्साहाने सहभाग घेतला. श्रीं च्या चांदीच्या मूर्तीस चंदन, कस्तुरी याच्या उटीचे लेपन करण्यात आले होते.

अतिदुर्गम माळवाडी, धानवली गावांच्या विद्युतीकरणाचे आव्हान पुर्णत्वाकडे

0

बारामती: ऐतिहासिक रायरेश्वर पठारावर अन्‌ समुद्रसपाटीपासून सुमारे 4750 फूट उंचीवर वसलेल्या माळवाडी व धानवली (ता. भोर, जि. पुणे) या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणकडून उभारण्यात येणाऱ्या वीजयंत्रणेचे काम पूर्णत्वाकडे आहे. या गावांमध्ये सुमारे 100 वीजखांब व एक रोहित्र उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून लवकरच या गावांचा वीजपुरवठा सुरु होणार आहे.

अतिदुर्गम व सह्याद्री डोंगररागांच्या कुशीत अन् घनदाट जंगल तसेच वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नसलेल्या पुणे जिल्ह्यातील माळवाडी व धानवली गावांमध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून विद्युतीकरणाचे काम सुरु आहे. डोंगरदऱ्या व कातळ कडा चढत वीजखांब व इतर विद्युत साहित्य अक्षरशः खांद्यावर वाहून नेत हे विद्युतीकरणाचे काम सुरु असल्याने नियोजित वेळेपेक्षा थोडा उशिर झाला आहे.

लोकसभा निवडणुकीत अतिदुर्गम रायरेश्वर पठारावरील मतदान केंद्रामुळे माळवाडी व धानवली गावे नुकतीच चर्चेत आली होती. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी या गावांच्या विद्युतीकरणासाठी उभारण्यात येत असलेल्या वीजयंत्रणेचा आढावा घेतला व ही दोन्ही गावे लवकरच प्रकाशमान होतील असा विश्वास व्यक्त केला.

भोरपासून सुमारे 40 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या या दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था नाही. खोल दऱ्या, दाट झाडी, उंच सुळके व आडवळणीचा घाट अशा अत्यंत दुर्गम व 11 किलोमीटर अखंड असलेल्या रायरेश्वर पठारावर रायरी ग्रामपंचायत अंतर्गत माळवाडी हे 10 घरांचे गाव वसलेले आहे. त्यापुढे अडीच किलोमीटरवर धानवली हे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे 35 घरांचे गाव आहे. रायरेश्वर पठारावरील माळवाडी येथे जाण्यासाठी 300 फूट उंचीचा कातळ कडा लोखंडी शिडीच्या सहाय्याने चढावा लागतो तर तेथून धानवली गावात जाण्यासाठी 235 फुटाचा कातळ कडा उतरावा लागतो. अशा स्थितीत वीजखांबांसह इतर विद्युत साहित्य खांद्यावर वाहून नेण्यात येत आहे.

माळवाडी व धानवली गावांसाठी जिल्हा नियोजन विकास समितीने 35 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून रायरेश्वर मंदिरापासून 50 वीजखांबांद्वारे सुमारे 3.5 किलोमीटर उच्चदाब वीजवाहिनीचे काम सुरु आहे. माळवाडी येथे 63 केव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येत आहे. माळवाडी येथून पुढे आणखी 50 वीजखांब उभे करून दोन किलोमीटरवर असलेल्या धानवली या गावाला वीजपुरवठा करण्यात येणार आहे. या दोन्ही गावांच्या विद्युतीकरणसाठी 100 वीजखांब, एक रोहित्र, 21 किलोमीटर उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्या व इतर साहित्य हे 11 किलोमीटरच्या पायरस्त्याने व डोंगरदऱ्यातून नेण्यात येत आहे.

बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे हे या दोन्ही गावांच्या विद्युतीकरणाकडे विशेष लक्ष देत आहेत. प्रभारी अधीक्षक अभियंता श्री. केशव काळुमाळी, सासवड विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. अरविंद वनमोरे यांच्यासह भोर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सतीश चव्हाण, महावितरणचे कर्मचारी तसेच कंत्राटदार एम.आर.के इलेक्ट्रिकल्सचे कर्मचारी माळवाडी व धानवली गावांच्या विद्युतीकरणासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक व डोंगराळ परिस्थितीत सुरु असलेले विद्युतीकरणाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. रोहित्र व वीजखांब उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ही वीजयंत्रणा पूर्ण झाल्यानंतर माळवडी व धानवली येथील 45 घरांना नवीन वीजजोडणी उपलब्ध होणार आहे.

अर्जुन किर्तने, श्रावणी देशमुख, सार्थ बनसोडे, कौशिकी समंथा यांना विजेतेपद

0

पुणे, 24 एप्रिल: पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) व केपीआयटी यांच्या संलग्नतेने तर्फे 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए केपीआयटी कुमार चॅम्पियनशिप सिरीज 2019 स्पर्धेत 12 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अर्जुन किर्तने व श्रावणी देशमुख यांनी व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात सार्थ बनसोडे व कौशिकी समंथा यांनी विजेतेपद पटकावले.

मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ लॉन टेनिस अकादमीच्या टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलांच्या गटात तिस-या मानांकीत अर्जुन किर्तनेने पृथ्विराज हिरेमथचा 4-1,4-1 असा सरळ सेटमध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. अर्जून बिशप्स स्कुल, कॉम्प येथ सहावी इयत्तेत शिकत असून केदार शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली बाऊंस टेनिस अकादमी येथे सराव करतो. या वर्षातील त्याचे हे पहिले विजेतेपद आहे.

12 वर्षाखालील मुलींच्या गटात बिगर मानांकीत श्रावणी देशमुखने आठव्या मानांकीत रितिका मोरेचा 4-1,4-0 असा सहज पराभव करत विजेतेपद पटकावले. श्रावणी सिंहगड स्प्रिंगडेल स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून धरणीधर मिश्रा व राजेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मंडळ येथे सराव करते. या वर्षातील तीचे हे तिसरे विजेतेपद आहे.

14 वर्षाखालील मुलांच्या गटात चौथ्या मानांकीत सार्थ बनसोडेने दुस-या मानांकीत आदित्य राय याचा 4-1,4-2 असा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. सार्थ माउंट सेंट पॅट्रीक स्कुल येथे नववी इयत्तेत शिकत असून मदन गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली डेक्कन जिमखाना येथे सराव करतो. त्याचे या वर्षातील हे पहिले विजेतेपद आहे.

14 वर्षाखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकीत कौशिकी समंथाने सहाव्या मानांकीत अलिना शेखचा संघर्षपुर्ण लढतीत 4-1,1-4,5-4(7-5) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजेतेपद पटकावले. कौशिकी आर्मी पब्लिक स्कुल येथे आठवी इयत्तेत शिकत असून हेमंत बेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पीवायसी हिंदू जिमखाना येथे सराव करते. तीचे हे या वर्षातील पहिले विजेतेपद आहे.

स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पोलिस इस्पेक्टर अशोक कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक धरणीधर मिश्रा यादी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: 12 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:

अर्जुन किर्तने(3) वि.वि अर्जुन परदेशी 7-0

पृथ्विराज हिरेमथ वि.वि निव कोठारी 7-1

अंतिम फेरी- अर्जुन किर्तने(3) वि.वि पृथ्विराज हिरेमथ 4-1,4-1
12 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
रितिका मोरे(8) वि.वि मृणाल शेळके 7-2
श्रावणी देशमुख वि.वि निशिता देसाई (7)7-2
अंतिम फेरी- श्रावणी देशमुख वि.वि रितिका मोरे(8) 4-1,4-0

14 वर्षाखालील मुले: उपांत्य फेरी:
सार्थ बनसोडे(4) वि.वि अनिश रांजळकर (5) 7-3
आदित्य राय(2) वि.वि पार्थ देवरूखकर (3) 7-6(4)
अंतिम फेरी- सार्थ बनसोडे(4) वि.वि आदित्य राय(2) 4-1,4-2

14 वर्षाखालील मुली: उपांत्य फेरी:
कौशिकी समंथा(1) वि.वि सिमरन छेत्री (7) 7-2
अलिना शेख(6) वि.वि श्रृती नानजकर (4) 7-4
अंतिम फेरी- कौशिकी समंथा(1) वि.वि अलिना शेख(6) 4-1,1-4,5-4(7-5)

‘जीएचआर कनेक्ट’ परिषदेचे आयोजन

0
पुणे : रायसोनी शिक्षण समूहातर्फे औद्योगिक आणि शिक्षण संस्थांमधील (इंडस्ट्री-अ‍ॅकॅडमिया) समन्वय वाढविण्याच्या उद्देशाने ‘जीएचआर कनेक्ट’ एक दिवसीय परिषदेचे आयोजन केले आहे. ‘एंगेजिंग विथ मिल्लेन्नियल’ संकल्पनेवर आधारित ही परिषद येत्या शनिवारी (दि. २७ एप्रिल २०१९) पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे होणार आहे, अशी माहिती रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रायसोनी शिक्षण संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन्सचे संचालक नागेंद्र सिंग, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. के. के. पालिवाल, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. आर. डी खराडकर आदी उपस्थित होते.
अजित टाटिया म्हणाले, “रायसोनी संस्थेकडून पहिल्यांदाच अशा परिषदेचे आयोजन केले आहे. उद्योगांतील प्रमुख पदाधिकारी, लघु व मध्यम उद्योजक आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासह उद्योग व संबंधितांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचा प्रशिक्षण कार्यक्रम (इंटर्नशीप प्रोग्रॅम) व त्याच्या अंमलबजावणीतील आव्हानांविषयी जागृत करण्याच्या उद्देशाने ही परिषद आयोजिली आहे. कुशल मनुष्यबळाचा अभाव ही आज भारतीय उद्योगांसमोरील समस्या आहे. त्यावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना सहा आठवड्यांच्या आणि सहा महिन्यांच्या प्रशिक्षणाची, प्रात्यक्षिकांची संधी मिळावी. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनीही प्रशिक्षण कार्यक्रमाचे धोरण आखण्याच्या सूचना केल्या आहेत.”
डॉ. आर. डी. खराडकर म्हणाले, “ परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. रघुनाथ शेवगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष दीनानाथ खोळकर, एल अँड टीचे श्री. हरी यांचे बीजभाषण होईल. रायसोनी शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या परिषदेत सरव्यवस्थापक व त्यावरील ५० हुन औद्योगिक पदाधिकारी, तर आयटी, उत्पादन, अ‍ॅटोमोबाईल, पायाभूत सुविधा क्षेत्रातील १५० पेक्षा अधिक उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.”
“परिषदेत आयोजित तीन चर्चासत्रांमध्ये रामेलेक्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष राम जोगदंड, आयनॉटिक्सचे उपाध्यक्ष बळीराम मुटगेकर, टाटा टेक्नॉलॉजीचे उपाध्यक्ष डॉ एम. मनी, एम्फासिसचे वरिष्ठ व्यवस्थापक माजीद खान, बजाज ऑटोचे सहाय्यक सरव्यवस्थापक श्री. ठक्कर, थरमक्सचे प्रशांत कुलकर्णी, किर्लोस्कर ऑईल इंजिन्सचे सरव्यवस्थापक डॉ. आर. आशेदार, भारत इलेक्ट्रॉनिक्सचे अतिरिक्त सरव्यवस्थापक धनराज कोल्हे, बीओ पीईईचे सल्लागार विकास राबले, भारत फोर्जच्या वरिष्ठ व्यवस्थापक लीना देशपांडे, एस्सार स्टीलचे सहायक सरव्यवस्थापक ऑलविन डीसूझा सहभागी होणार आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना उद्योगांत इंटर्नशीपसाठी आवश्यक कौशल्यांची माहितीही हे तज्ज्ञ देणार आहेत. यावेळी विविध पुरस्कारांचे वितरणही करण्यात येणार आहे.”
उद्योगातील प्रमुख, पदाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, संचालक, अधिष्ठाता आदींनी या परिषदेत सहभागी व्हावे. ही परिषद सर्वांसाठी विनामूल्य आहे, परंतु, मर्यादित आसन क्षमतेमुळे नोंदणी आवश्यक आहे.

प्लास्टिकचे विघटन, पुनर्वापर यावर संशोधन व्हावे-डॉ. राजीव बसर्गेकर

0

पुणे : “प्लास्टिक स्वस्त आणि वापरण्यास सोयीचे असल्याने त्याचा सर्रास वापर केला जातो. बंदीनंतर पुण्यासह इतर ठिकाणी प्लास्टिक मोठ्या प्रमाणात वापरले जाते. भविष्यातही प्लास्टिकचा वापर कमी होणार नाही. त्यामुळे बंदी घालण्यापेक्षा प्लास्टिक कचऱ्याचे विघटन कसे करता येईल किंवा त्याचा पुनर्वापर करण्यावर अधिक संशोधन व्हायला हवे,” असे मत डॉ. राजीव बासर्गेकर यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात ‘पॉलीमर आणि प्लास्टिक’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. राजीव बासर्गेकर बोलत होते. यावेळी विज्ञान परिषदेचे विनय र. र., शशी भाटे यांच्यासह विज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्लास्टिक बंदी व त्यानंतर पुण्यातील चित्र, मानवी जीवनात प्लास्टिकचे महत्त्व अशा मुद्यांवर यावेळी चर्चा झाली.

डॉ. राजीव बासर्गेकर म्हणाले, “आजघडीला प्लास्टिकइतकी स्वस्त आणि सोयीस्कर दुसरी वस्तू बाजारात उपलब्ध नसल्याने प्लास्टिक्सचा वापर टाळला जात नाही. प्लास्टिकचे जैवविघटन होत नाही. परंतु, त्यातून दूषित पदार्थ तयार होत नाही किंवा प्रदूषणही होत नाही. प्लास्टिकचा कचरा मात्र होतो. परंतु, या कचऱ्याचा पुनर्वापर करणे शक्य आहे. त्यासाठी संशोधन, प्रशिक्षण आवश्यक आहे. पण अजूनतरी तसे संशोधन किंवा प्रशिक्षण भारतात विकसित झालेले नाही. चीन जगातील ५०% प्लास्टिक कचरा विकत घेतो आणि त्याचा पुनर्वापर करतो. आपल्याकडेही त्याप्रमाणे विघटन आणि पुनर्वापर यावर भर दिला पाहिजे.”

“सांडपाणी प्रक्रिया संयंत्रेप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. समुद्रात प्लास्टिक न जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर नागरिक आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या जबाबदार वर्तणुकीशिवाय प्लास्टिक कचऱ्याची तात्कालीन अडचण दूर होणे अवघड आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित येत प्रयत्न करायला हवेत.”

विनय र. र. यांनी अध्यक्षीय समारोप केला. शशी भाटे यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले यांची आगेकूच

0

पाचगणी, : रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या  एमएसएलटीए योनेक्स सनराईज रवाईन हॉटेल नॅशनल सिरिज 16 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या  संजीवनी कुतवळ, सोनल पाटील, जिया परेरा, ख़ुशी शर्मा, रिया भोसले, रुमा गायकैवारी, आर्या पाटील या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पाचगणी येथील रवाईन हॉटेल येथील टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 16 वर्षाखालील मुलींच्या गटात पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या महाराष्ट्राच्या संजीवनी कुतवळ हिने कर्नाटकाच्या सुरभी श्रीनिवासचा 6-2, 2-6, 6-2 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव केला. ख़ुशी शर्मा हिने कर्नाटकाच्या विद्युल मणिकांतीचे आव्हान 6-1, 5-7, 6-4 असे मोडीत काढले. सोनल पाटीलने वेदा मधुसूदनचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून आगेकूच केली. महाराष्ट्राच्या जिया परेराने तेलंगणाच्या वैष्णवी वकीतीला 6-4, 6-1 असे नमविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी(मुख्य ड्रॉ): 16वर्षाखालील मुली:

संजीवनी कुतवळ(महाराष्ट्र)वि.वि.सुरभी श्रीनिवास(कर्नाटक)6-2, 2-6, 6-2;

सोनल पाटील(महाराष्ट्र)वि.वि.वेदा मधुसूदन(महाराष्ट्र)6-3, 6-2;

अमिशी शुक्ला(मध्यप्रदेश)वि.वि.माहिका गुप्ता 7-5, 6-2;

जिया परेरा(महाराष्ट्र)वि.वि.वैष्णवी वकीती(तेलंगणा) 6-4, 6-1;

ख़ुशी शर्मा(महाराष्ट्र)वि.वि.विद्युल मणिकांती(कर्नाटक) 6-1, 5-7, 6-4;

रिया भोसले(महाराष्ट्र)वि.वि.जननी रमेश(तामिळनाडू)6-0, 6-1;

रुमा गायकैवारी(महाराष्ट्र)वि.वि.साज तंडेल(महाराष्ट्र)6-1, 6-1;

दीपशिका श्रीराम(कर्नाटक)वि.वि.पुनर्वा शहा 6-1, 6-1;

अपूर्वा वेमुरी(तेलंगणा)वि.वि.माही पांचाळ(गुजरात)6-2, 6-1;

अनुपमा बगाडे(कर्नाटक)वि.वि.इलिना झा(दिल्ली) 6-0, 6-1;

सुहिता मारूरी(कर्नाटक)वि.वि.कनिष्का मल्लेला(कर्नाटक)6-0, 6-1;
आर्या पाटील(महाराष्ट्र)वि.वि.कुमकुम नीला(तेलंगणा) 6-0, 6-4;

लक्ष्मी अरुणकुमार वि.वि.सिया देशमुख(महाराष्ट्र) 6-4, 6-4.