Home Blog Page 2944

ताराचंद आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्तपदी गिरीश टिल्लू यांची नियुक्ती

0

पुणे ता.२९ :- शेठ ताराचंद रामनाथ चॅरिटेबल आयुर्वेदीय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने हेल्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉ. गिरीश टिल्लू यांची विश्वस्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर डॉ. राजेंद्र हुपरीकर, गोपाल राठी, महापौर मुक्ता टिळक,सुनील कांबळे यांची याआधीच नियुक्ती झाली होती.अशी माहिती अध्यक्ष दत्ताजी गायकवाड यांनी दिली.

सर्वसामान्यांसाठी शेठ ताराचंद रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदीय रुग्णालयामध्ये दर वर्षी अंदाजे ५५ हजारांहून अधिक पंचकर्म उपचार करण्यात येतात. सर्व वैद्यकीय उपचार व सुविधा याठिकाणी अत्यंत माफक दरात उपलब्ध आहेत.याशिवाय प्रसुती तसेच गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया देखील येथे तज्ज्ञ चिकित्सक हाताळतात.भारताला लाभलेली आयुर्वेद ही एक अमूल्य देणगी आहे. आणि त्या माध्यमातून ही संस्था गेल्या ७० वर्षापासून लोकांच्या सेवेत कार्यरत आहे. येथे रुग्णांना आवश्यक ती सेवा आणि योग्य आयुर्वेदिक उपचार पुरविले जातात.डायललीसिसची सेवा ४५० रुपये इतक्या माफक किंमतीत याठिकाणी उपलब्ध आहे.आर्थिक कारणास्तव कोणाला उपचारात कमतरता भासू नये, म्हणून अत्यल्प दरात ही सेवा अविरतपणे गरजूंना दिली जाते.

पाण्यासाठी पुन्हा महापालिका आणि पाटबंधारे हमरी -तुमरी’ सुरु …

0

पुणे -पुण्याला एवढे पाणी मिळायला हवे असा महापालिकेचा दावा तर चुकीची माहिती देवून महापालिका जादा पाणी लाटू पाहते आहे असा पाटबंधारे चा दावा आता लोकांना नवीन राहिला नाही . ना मुख्यमंत्री ,ना अन्य कोणी यातून अद्याप मार्ग काढला आणि ना हि या दोहोतील हमरी तुमरी संपली ..अशा अवस्थेत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार असल्याचे दिसते आहे.

शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणात महापालिकेला ६९२ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) पाणीपुरवठा करण्यावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण ठाम असल्याने पुणेकरांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिका पुन्हा न्यायालयात धाव घेणार आहे. प्राधिकरणाचा निर्णय अमान्य असल्याचे सांगत तब्बल ५५ लाख लोकसंख्येला पुरेल एवढे; म्हणजे वर्षाकाठी १७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी देण्याची मागणी महापालिका न्यायालयात करणार आहे.तर दुसरीकडे पुण्याला वाढीव पाणी कोटा मिळावा, यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाला सादर केलेल्या पाण्याच्या अंदाजपत्रकात लोकसंख्येच्या आकडेवारीचा ताळमेळ लागत नाही. पाण्याची गळती गृहीत धरता येत नसतानाही ती यात नमूद केली असून, यावर आयुक्तांची स्वाक्षरीही नाही. यामुळे पाटबंधारे विभागाने हे अंदाजपत्रक नाकारत यातील त्रुटी दूर करून पुन्हा नव्याने अंदाजपत्रक सादर करावे, असे पत्र पालिकेला दिले आहे.

राज्य शासनाने पुण्यासाठी मंजूर केलेला पाणी कोट्याचा करार फेब्रुवारी २०१९ संपला आहे. नवीन करार करताना महापालिकेने ११.५० टीएमसीऐवजी १७ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. परंतु हा कोटा देण्यापूर्वी महापालिकेने पाणीवाटपाचे अंदाजपत्रक करावे, तसेच पाण्याच्या वापराबाबतचे अंदाजपत्रक ऑगस्ट २०१९ पर्यंत सादर करावे. त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाने पालिकेले सांगितले होते.

पुणे महापालिकेने पाण्याचे अंदाजपत्रक सुरू केले आहे. तर वाढीव कोट्यासाठी काही दिवसांपूर्वी पाण्याचे वार्षिक अंदाजपत्रक पाटबंधारे विभागाला सादर केले आहे. त्यामध्ये पुण्याची एकूण लोकसंख्या ५६ लाख २० हजार गृहीत धरली आहे. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पालिकेने पाटबंधारे विभागाला पाणी कपात करू नये, असे पत्र पाठविताना त्यामध्ये पुण्याची लोकसंख्या ५० लाख ९० हजार नमूद करण्यात आली होती. आता अंदाजपत्रकात ही लोकसंख्या ५६ लाख २० हजार दाखविल्याने त्यावर पाटबंधारे विभागाने आक्षेप घेतला आहे. महापालिकेने सादर केलेल्या माहितीत तफावत असल्याने ती अयोग्य आहे. एकदम ५ लाख लोकसंख्या वाढल्याने यावर प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक सादर करताना लोकसंख्येचा आकडा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सांख्यिकी विभागाकडून प्रमाणित करून घ्यावा, तसेच हे अंदाजपत्रक महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीनेच सादर करावे, असे पत्रात म्हटले आहे.

प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्याची न्यायालयानेचं  महापालिकेला केली सूचना..

-शहराला सध्या १,३५० एमएलडी पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यानुसार पुणेकरांना रोज एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, महापालिका जादा पाणी घेत असल्याचा दावा करीत, पाटबंधारे विभागाने पाण्याला कात्री लावली होती. त्यावरून महापालिका आणि पाटबंधारे विभागात वाद सुरू आहे. त्यावर तोडगा काढताना प्राधिकरणाने शहराला सध्या ६९२ एमएलडी पाणी द्यावे, अशी भूमिका घेतली. त्यामुळे पुणेकरांच्या पाणीपुरवठ्यात निम्म्याने कपात करावी लागणार होती.

प्राधिकरणाच्या निर्णयाला प्रचंड विरोध झाल्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणीपुरवठ्याला दोनशे एमएलडी इतकी कात्री लावून १,१५० एमएलडी पाणी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता १,३५० एमएलडी पाणी घेण्यावर महापालिका ठाम राहिली आणि सध्या त्यानुसार पाणीपुरवठा होत आहे.

या पार्श्‍वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला दिला. त्यानंतर महापालिका प्रशासनाने आपली बाजू मांडत, नेमकी लोकसंख्या, पाण्याची गरज, मागणी आणि सध्याचे चित्र न्यायालयासमोर मांडले. न्यायालयाने महापालिकेला प्राधिकरणाच्या निर्णयाला आव्हान देण्याची सूचना केली आहे.

 

विमान प्रवाशांना उरला नाही कोणी वाली … १२ तासानंतर हि झाले नव्हते विमानाचे उड्डाण ..अजब कारभाराचे बळी पहा ..

0

पुणे :एकीकडे विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत असताना सरकारी हस्तक्षेपामुळे ,उशिरा येणारी विमाने ,बंद पडणारी विमाने आणि तक्रारींचा पाऊस पडत असताना त्याकडे जाणून बुजून सरकरी व्यवस्थेकडून होणारा दुर्लक्षित कारभार यामुळे सध्याच्या काळात विमान प्रवास सुखाचाचं होईल याची शाश्वती राहिलेली नाही .थोडक्यात विमानाने प्रवास करणाऱ्यांना कोणी वाली राहिला नाही, त्यांच्या हक्काचे कोणाला सोयर सुटक राहिलेले नाही . अशा घटना वारंवार घडत आहेत आणि त्याकडे लक्ष मात्र कोणी देत नाही असे चित्र आहे .

अशीच एक घटना काल पुन्हा घडली आणि विमानतळावर घोषणाबाजी करण्याची वेळ प्रवाशांवर आली .पुण्यावरुन दुबईला जाणारे स्पाइस जेटचे SG51  विमान रविवारी रात्री ११ वाजता उड्डाण करणार होते. मात्र, तांत्रिक खराबीमुळे या विमानाचे उड्डाण रद्द करण्याता आले. त्यामुळे १८० प्रवासी रात्रभर विमानतळावर अडकून पडले. प्रशासनाकडून प्रवाश्यांसाठी काहीही व्यवस्था न केल्याने प्रवाशांना विमानतळावर झोपून रात्र काढावी लागली.

स्पाइस जेटचे SG51 हे विमान रविवारी रात्री ११ वाजता पुणे विमानतळावरुन दुबईसाठी उड्डाण घेणार होते. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने या विमानाचे उड्डाण तब्बल १२ तास लांबले. त्यामुळे विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. त्यांना रात्रभर विमानतळावर ताटकळत रहावे लागले. प्रवाशांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था न केल्याने त्यांना खाली झोपून रात्र काढावी लागली. या विमानाचे उड्डाण आज (सोमवारी) सकाळी साडेदहा वाजेपर्यंत झाले नव्हते. स्पाइस जेटच्या अधिकाऱ्यांकडून विमानाच्या उड्डाणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, संतप्त प्रवाशांनी विमानतळावर घोषणा देत स्पाइस जेट प्रशासनाचा निषेध केला.

दिव्य विवाहम’:पौराणिक विवाह परंपरेवर नृत्यरचना सादरीकरण

0

३ मे रोजी  भारतीय विद्या भवनमध्ये आयोजन

पुणे ः‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘दिव्य विवाहम ‘:पौराणिक विवाह परंपरेवर नृत्यरचना सादरीकरण’ ३ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आले  आहे.

‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

‘कलावर्धीनी चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि डॉ.उषा आर.के. हा कार्यक्रम सादर करणार आहेत.दि. ३ मे,शुक्रवारी सायंकाळी  वाजता ‘भारतीय विद्या भवना’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, सेनापती बापट रस्ता येथे हा कार्यक्रम होणार आहे.

अरुंधती पटवर्धन ,परिमल फडके(पुणे) ,प्राची सावे ,आनंद सच्चीदानंदन ,पवित्रा भट ,अपर्णा आणि निधग करुनाड (मुंबई ),रसिका किरण ,आदित्य पी .व्ही .,आदिती सदाशिवा ,मिथुन श्याम (बंगळुरू ),श्रेयसी गोपीनाथ(दिल्ली ) हे कलाकार सहभागी होणार आहेत .

 ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  होणारा हा ७६ वा कार्यक्रम असून तो विनामूल्य आहे.

 

…तर आपणच मूर्ख ठरु: परेश रावल

0

मुंबई-जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु, असे मत ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केले. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांवर मतदान होत आहे. यात राज्यातील १७ जागांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी अभिनेते परेश रावल आणि त्यांची पत्नी स्वरुप संपत यांनी विलेपार्ले येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर परेश रावल यांनी मतदारांना प्रतिक्रिया दिली. परेश रावल म्हणाले, जनतेने मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहन करतानाच जर आपण मतदान केले नाही आणि फक्त समस्यांचा पाढाच वाचत राहिलो तर आपणच मूर्ख ठरु. मी निष्ठावान आणि प्रामाणिक माणसाला मतदान केले, असे त्यांनी सांगितले.

BJP sitting MP Paresh Rawal & his wife Swaroop Sampat cast their vote at polling booth number 250-256 at Jamna Bai School in Vile Parle.

परेश रावल यांनी २०१४ मध्ये भाजपाच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. ते खासदार म्हणून निवडून देखील आले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत परेश रावल यांनी निवडणूक लढवणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरुन विरोधकांनी परेश रावल यांच्यावर प्रश्नांचा भडीमारही केला होता. मात्र, यासंदर्भात सोमवारी पत्रकारांनी प्रश्न विचारले असता परेश रावल यांनी उत्तर देण्यास नकार दिला.

“तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाची तुला परवा बी कोणाची”

–उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला असून मतदानानंतर प्रतिक्रिया देताना उर्मिला मातोंडकर यांनी “तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाची तुला परवा बी कोणाची”, असे सांगत भावना व्यक्त केल्या.

उत्तर मुंबईत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आणि भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्यात लढत आहे. सोमवारी उर्मिला मातोंडकर यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दरवेळी मी दुसऱ्यांसाठी मतदान करायचे. यंदा स्वत:साठी करतेय. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे असे उर्मिला यांनी सांगितले. तू चाल पुढं तुला र गड्या भीती कोणाच परवा कोणाची, असे सांगत त्यांनी मतदारांनाही मतदान करण्याचे आवाहन केले. मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे आणि आवर्जून मतदान करावे, आधी मतदान करा, मग सुट्टीचा आनंद घ्या, असे त्यांनी सांगितले.

जे मतदान करत नाही ते देशाचे गुन्हेगार-मनोहर जोशी 

–शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी देखील मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन केले आहे. जे मतदान करत नाही ते देशाचे गुन्हेगार असतात, असे मनोहर जोशी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, मावळ, नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, शिरूर आणि शिर्डी अशा १७ मतदारसंघांत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणुकीत ३३ हजार ३१४ मतदान केंद्रे आहेत. एकूण एक कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर एक कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून, मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तब्बल एक लाख ६६ हजार अधिकारी- कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

होंडाचा एकमेव भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पहिल्या पाचात

0

राजीव सेतू एपी २५० रेस २ मध्ये १२ व्या स्थानावर, एआरआरसीच्या एका फेरीत पहिल्यांदाच सर्वाधिक १० गुणांची कमाई

  • तांत्रिक कारणामुळे सेंथिल सेथिंलकडून रेस १ अपूर्ण

 बेंड मोटरस्पोर्ट पार्क, अडलेड  – इडिमेत्सु होंडा रेसिंग इंडिया या एफआयएम आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०१९ (एआरआरसी) मधील एकमेव भारतीय संघाने – आशियातील सर्वात अवघड रोड रेस चॅम्पियनशीपमधील बेंड मोटरस्पोर्ट पार्कमधील ऑस्ट्रेलियन फेरीमधील आजच्या एपी २५० रेस २ मध्ये संमिश्र यश मिळवले.

 १२ व्या स्थान मिळवत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राजीव यांनी चांगली सुरुवात केली आणि रेसच्या बहुतांश काळात ते आघाडीच्या समूहासोबत होते. पाचव्या लॅपपर्यंत त्यांनी ११ वे स्थान राखले. सहाव्या लॅपमध्ये मागील चाकाचे ट्रॅक्शन सैलावल्यामुळे त्यांनी १ पोझिशन गमावली, मात्र तरीही सावरत त्यांनी चौकटीच्या झेंड्यापाशी १९:४३:६३६ रेस संपवत १२ वे स्थान मिळवले.

 बेंड मोटरस्पोर्ट पार्कमध्ये दुसऱ्या फेरीत राजीव यांनी एकूण १० गुण मिळवत (एकाच फेरीतील त्यांची ही पहिलीच दुहेरी आकड्यांची कमाई आहे) संपूर्ण चॅम्पियनशीपमध्ये १२ वे स्थान कायम राखले. या फेरीत राजीव यांनी आपला जुना सर्वोत्तम विक्रम तोडत ऑस्ट्रेलियामध्ये २:०९:२५४ ची नवी, सर्वात वेगवान लॅप वेळ नोंदवली.

दरम्यान पहिल्याच लॅपमध्ये बाइकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सेंथिल आज एपी २५० रेस २ पूर्ण करू शकले नाहीत व ते पिटपाशी परतले.

आघाडीवर जपानीरायडर एकि अयोशी यांनी पहिला विजय मिळवला. त्यानंतर थायलंडमधील मुकलाडा सारापुछ (दुसरा क्रमांक) आणि तत्चकोर्न बुआस्री (तिसरा क्रमांक) या होंडाच्या जोडीने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली.

यासह इडिमित्सु होंडा रेसिंग इंडिया एपी २५० क्लासच्या आघाडीच्या सात संघामध्ये मजबूत स्थानावर आहे.

आजच्या क्वालिफायरबद्दल श्री. प्रभ नागाराज, उपाध्यक्ष – ब्रँड अँड कम्युनिकेशन्स, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. म्हणाले, ‘आम्ही आज आणखी चांगली कामगिरी करू शकलो असतो. राजीव यांचे रायडिंग आज खूपच दमदार होते. त्यांना त्यांच्या उंच बाजूची किंमत चुकवावी लागली, पण त्यांनी वेळीच दमदार पुनरागमन करत एक रायडर या नात्याने आपण किती प्रगती केली आहे हे दर्शवत पहिल्या दहांत स्थान मिळवण्यासाठी पात्र असल्याचे दाखवले. दुर्देवाने तांत्रिक अडचणीमुळे सेंथिल त्यांची रेस पूर्ण करू शकले नाहीत. मला खात्री आहे, की संघाचा पूर्ण पाठिंबा आणि रायडिंग मार्गदर्शक व माजी- जीपी रायडर श्री. कोयामा यांची मदत असल्यामुळे पहिल्या दहांतील स्थान ही केवळ सुरुवात आहे. होंडाच्या भारतीय संघासाठी थायलंडमधील फेरी दमदार असेल, कारण राजीव आणि सेथिंल या दोघांनाही तेथील ट्रॅक परिचयाचा आहे.’

ऑस्ट्रेलियन फेरीमध्ये १० गुण मिळवल्यानंतर आणि थायलंडच्या चँग आंतरराष्ट्रीय सर्किटमधील तिसऱ्या फेरीसाठी उत्सुक असलेले राजीव सेतू म्हणाले, ‘आज सुरुवातीलाच बरीच कसरत करावी लागली. कालनंतर, मी शांत राहिलो आणि आतापर्यंतची सर्वोत्तम लॅप वेळ – २.०९ सेकंद नोंदवली व ती पाच लॅपसाठी कायम राखली. मात्र लॅप ५ मधील उंच बाजूने मला मागे ढकलले आणि माझ्यापुढे असलेल्या रायडरबरोबर मी राहू शकलो नाही हे निराशाजनक आहे. मात्र, सकारात्मक गोष्ट अशी, की मी मधले अंतर कमी केले आहे आणि मी सातत्याने लीडरपेक्षा दोन सेकंदांपेक्षाही कमी काळ मागे आहे. ऑस्ट्रेलियातील फेरी आणि आघाडीच्या दहामध्ये प्रवेश मिळवणे माझ्यासाठी चांगले होते. थायलंड टॅलेंट कप सीझन रायडिंग केल्यामुळे पुढील फेरीतील चँग सर्किट (थायलंड) माझ्यासाठी दुसरे घर आहे. अर्थातच चँगमध्ये सरप्राइजही असेल.’

दरम्यान आजचा दिवस सेंथिल कुमार यांच्यासाठी चांगला ठरला नाही, मात्र चँग फेरीत ते पुनरागमन करण्याचे नियोजन करत आहेत. ‘मलेशियातील एआरआरसी पर्दापणाशी तुलना करता, माझे रेस कौशल्य एकंदरीत सुधारले आहे, मग ती माझी देहबोली असो, बाइक हाताळणी असो किंवा ऑस्ट्रेलियातील वादळी आणि ओलसर टरॅमकवरील तांत्रिक बदल समजून घेणं असो… आज मी सुरुवातीला अतिशय स्थिर होतो आणि पहिल्या १५ मध्ये प्रवेशही केला होता, मात्र पाचव्या आणि सहाव्या वळणादरम्यान माझ्या बाइकमध्ये अचानक तांत्रिक अडचण निर्माण झाली आणि मला वेळेआधीच रेसमधून बाहेर पडावे लागले. आता मी सर्व लक्ष चँगवर केंद्रित केले आहे. मला खात्री आहे, की गेल्या वर्षातल्या थायलंड टॅलेंट कप अनुभवामुळे हा ट्रॅक परिचयाचा असून अधिकृत हंगाम प्री- टेस्टिंगसाठई सीबीआर २५० आरआर रायडिंग केल्याचा आघाडीच्या १५ मध्ये परत एकदा स्थान मिळवण्यासाठी फायद्याचे ठरेल.’

इडिमित्सू होंडा रेसिंग इंडिया @ एपी २५० क्लास एफआयएम आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०१९

 

    रायडर  दुसऱ्या फेरीतील रायडरची कामगिरी

(बेंड मोटरस्पोर्ट पार्क, ऑस्ट्रेलिया)

 

एआरआरसी

एपी २५० क्लास

चॅम्पियनशीप स्टँडिंग

टीम  चॅम्पियनशीप स्टँडिंग
राजीव सेतू

२१ वर्ष

 

रेस : १२ वे

एकूण: १९:४३:६३६

सर्वोत्तम लॅप टाइम: २:०९:२५४

रेस १: १० वे

एकूण: १९:४०:६३६

सर्वोत्तम लॅप टाइम: २:१०:२०७

पात्रता – १२ वे

लॅप टाइम

:११:७३८

२०१९ – १२ वे (दुसऱ्या फेरीच्या अखेरीस)

२०१८ – २७ वे

२०१७ – ४६ वे

(एआरआरसी पर्दापण)

 

२०१९ – सहावे (दुसऱ्या फेरीच्या अखेरीस)

२०१८ – १५ वे

*

* एकमेव भारतीय संघ या नात्याने पर्दापण

 

सेंथिल कुमार

१८ वर्ष

रेस : डीएनएफ

रेस : १७ वे

एकूण: २०:१८:११३

सर्वोत्तम लॅप टाइम:

२:१२.४५९

पात्रता – १८ वे

लॅप टाइम २:१३:८७६

२०१९ – १७ वे

(एआरआरसी पर्दापण)

 

 एफआयएम आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप २०१९ बद्दल

एफआयएम आशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) ही आशियातील सर्वात स्पर्धात्मक मोटरसायकल रोड रेसिंग स्पर्धा असून सध्या तिचे २४ वे वर्ष सुरू आहे. २०१९ च्या हंगामात पाच देशांत (मलेशिया *, २ ऑस्ट्रेलिया, थायलंड * २, जपान आणि दक्षिण कोरिया) सात फेऱ्या होणार आहेत. मलेशियातील सीपांग सर्किट येथे झालेल्या पहिल्या फेरीनंतर बेंड मोटरसायकल पार्क ऑस्ट्रेलियाची फेरी झाली आहे. यानंतर थायलंडच्या चँग आंतरराष्ट्रीय सर्किट येथे तिसरी फेरी होणार आहे.

 २०१९ एआरआरसीमध्ये चार क्लासचा समावेश आहे – नव्याने समाविष्ट करण्यात आलेली एशिया सुपरबाइक १००० (एएसबी १०००), सुपरस्पोर्ट्स ६०० (एसएस६००), एशिया प्रॉडक्शन २५० (एपी२५०) आणि अंडरबोन क्लास (यूबी १५०)

या स्पर्धेत एकमेव भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या इडिमित्सु होंडा रेसिंग इंडियाच्या दोन रायडर्सनी म्हणजेच राजीव सेतू आणि नव्याने दाखल झालेल्या सेथिंल कुमार यांनी सीबीआर२५०आरआरवरून लढत दिली.

” बैसाखी दी रौनक ” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न

0

पुणे-पंजाबी कल्चरल असोसिएशन व शीख जनसेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ” बैसाखी दी रौनक ” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला . पुणे लष्कर भागातील कोयाजी रोडवरील हॉटेल शीतल आर्चमध्ये झालेल्या या कार्यक्रमास उद्योजक बारी मल्होत्रा , महापौर मुक्ता टिळक ,माजी आमदार  मोहन जोशी ,  शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा , सेक्रेटरी चरणजितसिंग सहानी , पंजाबी कल्चरल असोसिएशनचे काश्मिरी नागपाल , अजितसिंग राजपाल,जगजितसिंग खालसा ,लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले , काँग्रेसचे शहर अध्यक्ष रमेश बागवे , सतीश चढ्ढा ,संजय नहार ,दीपक कुदळे , बॉबी म्यानी , इंद्रजितसिंग सहानी , संदीप खर्डेकर , अशोक आगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात पंजाबी कल्चरल असोसिएशनच्यावतीने स्मरणिकेचे प्रकाशन उद्योजक दीपक कुदळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले . यामध्ये पंजाबी गाण्यावरील लोकनृत्य सादर करण्यात आले . तसेच भांगडा नृत्यावर सर्वानी नृत्याचा आनंद लुटला . यामध्ये पंजाबी व शीख समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

पंजाबमध्ये आपल्या शेतामध्ये पिके चांगली आल्यानंतर तेथील शेतकरी बांधव आनंदोत्सव साजरा करतात , त्याला बैसाखी म्हटले जाते , तो आनंदोत्सव आज पुण्यातील  पंजाबी व शीख समाज बांधव एकत्रित येऊन साजरा करीत आहे , अशी माहिती शीख जनसेवा संघाचे अध्यक्ष संतसिंग मोखा यांनी दिली . यावेळी उद्योजक बारी मल्होत्रा यांनी सांगितले कि , पंजाबी इंटरनॅशनल फेडरेशन असोसिएशनची सुरुवात पुणे शहरातून करता येईल . यामध्ये जगातील सर्व पंजाबी बांधवाना एकत्रित आणता येईल . त्याचा नावलौकिक जगात करू .

या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत  पंजाबी कल्चरल असोसिएशनचे काश्मिरी नागपाल यांनी केले तर सूत्रसंचालन शीख जनसेवा संघाचे सेक्रेटरी चरणजितसिंग सहानी यांनी केले तर आभार अजितसिंग राजपाल यांनी मानले . 

बीव्हीजी लाईफ सायन्सेस म्हणजे कृषी विस्ताराचे विद्यापीठ : चंद्रकांत दळवी

0
पुणे :
बीव्हीजी लाईफ सायन्सेस नावाची कंपनी कृषी विस्ताराचे विद्यापीठ असल्याचे मत माजी जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी व वितरकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बीव्हीजी समुहाचे चेअरमन हणमंतराव गायकवाड, उमेश माने, दिप शुक्ला, बी.टी. गोरे, गणेश लिमये व भालचंद्र पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, कृषी विद्यापीठे शेती संशोधन व कृषी विस्ताराचे कार्य करतात. त्याच प्रमाणे बीव्हीजी लाईफ सायन्सेच काम सुरु आहे. गेल्या ३ वर्षात बीव्हीजी लाईफ सायन्सेसने कृषी विद्यापीठांपेक्षा अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.
कृषी विस्ताराला विपणनाची जोड देण्यात बीव्हीजीला यश मिळाले आहे. बीव्हीजीचे शास्त्रज्ञ हेच बीव्हीजी लाईफ सायन्सेसच्या पाठीचा कणा आहे.
बीव्हीजीने देशाची प्रगती करण्यासाठी ग्रामिण भागातील शेती अधारित गुंतवणूक वाढवली आहे.त्यामुळे बीव्हीजीने शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्याने त्यांनी शेतकऱ्यांची विश्वासहार्ता जिंकली आहे. विषमुक्त शेतमाल विक्रीची बाजारपेठ निर्माण करण्यासाठी बीव्हीजीने पुढाकार घेतला आहे. यापुढे शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीची चिंता राहिली नाही.
या वेळी बोलताना गायकवाड म्हणाले की, ‘ बीव्हीजी लाईफ सायन्सेसने विष मुक्त शेती व निरोगी भारत घडविण्याची चळवळ देशात सुरु केली आहे. चळवळीला बळ देण्यासाठी यंदा नव्याने ३ हजार कृषी पदवीधरांची भरती बीव्हीजीमध्ये करणार आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. परंतु आता शेती हा व्यवसाय म्हणून करणे गरजेचे आहे. शेतीसाठी खर्च कमी केलाच पाहिजे. जास्त उत्पादन मिळावे, या आशेने रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात होत आहेत. हे शेतीसाठी व माणवाच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.  शेतकऱ्यांनी प्रथम माती व पाणी परिक्षण करुन घ्यावे. शेतीत नवनवीन जैविक खते व तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती हा यशस्वी व्यवसाय होईल. यापुढे प्रत्येक शेतकरी व नागरिकाने विषमुक्त शेतीसाठी प्रचार व प्रसाराबरोबर प्रत्यक्ष अनुकरण करावे. वाढलेले आजार हे आहारातून होत आहेत म्हणून आता पुन्हा सेंद्रीय उत्पादन अर्थात विषमुक्त शेतीकडेच वळले पाहिजे. तरुणांना बाहेरच्या देशात नोकरी व व्यवसायासाठी मोठी संधी आहे. प्रत्येकाकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्याचा वापर करा. कौशल्य आधारित शिक्षण घेत व्यवसाय करा. यश नक्की मिळेलच संघर्ष जीवनाला घडवत असून भारत निर्माण कंपनी ही शेती, स्वच्छता, आरोग्य या क्षेत्रात मोठे काम करत आहे. नव्याने अनेक योजना राबवून देतांना सुमारे दहा कोटी जनतेच्या आयुष्यात परिवर्तन करण्याचा मनोदय असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे संचालक गणेश लिमये यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्मिता पोफळे यांनी केले. बीव्हीजी लाईफ सायन्सेसचे कृषी विभागाचे प्रमुख भालचंद्र पोळ यांनी आभार व्यक्त केले.

समाज परिवर्तनात सेवाभाव व समन्वयाची भूमिका महत्त्वाची – डॉ. उमराणी

0
पुणे-उत्तम शिक्षणातून नीतिमत्ता वाढीबरोबर रोगजार निर्मिती होते. त्यातून समाज परिवर्तन अपेक्षित असते. समाज परिवर्तन होत असताना सेवाभाव आणि समन्वयाची भूमिका  महत्त्वाची असते असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. नेहरु उमराणी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात येणारा या वर्षीचा ‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार’ मुंबईत रचनात्मक आणि विधायक कार्य करणार्‍या ‘समता परिषदे’ला प्रदान करताना डॉ. नेहरु उमराणी बोलत होते. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
समता परिषदेच्या वतीने अध्यक्ष आमदार भाई गिरकर यांनी पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. सामाजिक कार्यकर्ते भिकूजी तथा दादा इदाते, सोसायटीचे कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, माजी अध्यक्ष डॉ. अजित पटवर्धन, निवृत्त हवाई दल प्रमुख भूषण गोखले, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. आर. जी. परदेशी, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्राची वैचारिक नाडी आणि धाटणी जरा वेगळी आहे. त्यामुळे धोरणकर्त्यांचे विशेष लक्ष असते. या जडणघडणीत शाहू, ङ्गुले, आंबेडकरांच्या मूलभूत विचारांची महत्त्वाची भूमिका आहे. या विचारांबरोबर संतांची चळवळ आणि नीतिमान उद्योजकांची परंपरा आहे. या सगळ्या विचारांचे सूत्र ‘समता’ आहे. समता परिषद याच उद्देशाने कार्यरत आहे. अशा संस्थांमध्ये नवीन प्राध्यापक आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यर्थ्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.’
श्री. इदाते म्हणाले, ‘समन्वय व सेवा या सूत्रांचा विस्तार केल्यास समरसतेची स्थापना होते. आपल्या देशाच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक एकात्मतेचे प्र‘गटीकरण म्हणजे समरसता. देश एकात्म करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. हा मार्ग आपआपल्या काळात शोधणे आवश्यक आहे. त्यानुसार कृती करणे सामजिक परिवर्तनासाठी आवश्यक आहे.’
श्री गिरकर म्हणाले. ‘बहुजन व दलितांनी एकत्र येऊन समाजाचा विकास होईल या भावनेतून समता परिषदेचे कार्य सुरू आहे. समन्वय व सेवेच्या माध्यमातून समाज परिवर्तन व समाज जोडण्याचे काम आम्ही करतो. शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात आम्ही काम करतो. सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळावीत यासाठी परिषदेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली आहे.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी सामाजिक जागृतीचा वसा घेऊन कार्यरत आहे. देशभक्त युवक तयार करण्याच्या ध्यासातून संस्थेचे कार्य सुरू आहे. समाजातील मागासलेल्या घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची संस्थेची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत.’ डॉ. श्रीकृष्ण कानेटकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. प्रसन्न देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशीष पुराणीक यांनी परिचय करून दिला.

पुरंदर हवेलीत रंगली विधानसभेची रंगीत तालीम – लोकसभेचे निकाल वाढवणार अनेकांची चिंता

0
सासवड-बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना रंगला आहे.  यापूर्वीच्या निवडणुका आणि आताची निवडणूक यात मोठा फरक असून एकास एक अशी थेट लढत असल्याने ती विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे.
                राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि दौंड तालुक्यातील कुल घराण्यातील स्नुषा कांचन कुल असा दुहेरी सामना महायुती आणि आघाडीचे पुरंदर तालुक्यातील भविष्य निश्चित करणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पुरंदर तालुक्यातील दोन बलाढ्य पक्ष मानले जातात. दोन्ही एकत्र झाल्यास शिवसेनेला ते शह देऊ शकतात असे जाणकार सांगतात. लोकसभा निवडणूक ही त्याचीच कसोटी ठरणार आहे. शिवसेना एकट्याच्या बळावर तालुक्यात मोठा पक्ष असला तरी त्यांचा मित्रपक्ष असलेला भाजप तितकासा प्रबळ नाही. तालुकापातळीवर पक्षसंघटनेचा सांगाडा असला तरी गावपाळीवर आवश्यक असलेले नेटवर्क भाजपकडे नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांना मदती करून भाजपाने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला होता परंतु या निवडणुकीत अशा सर्वांनी भाजपला टांग दिली आहे. त्यामुळे भाजपची नौका पूर्णपणे शिवसेनेच्या बळावर तरणार का हा महत्वाचा प्रश्न आहे.
                माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकजूट घडवून आणली होती. तसाच प्रयत्न आता शिवतारे यांना पराभूत करण्यासाठी केला जात आहे. परंतु शिवतारे यांच्याकडे असलेल्या काही जमेच्या बाजू आघाडीला अडचणीच्या ठरणार आहेत. मागील ५ वर्षाच्या काळात तालुक्यात रस्ते, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत चांगली प्रगती पाहायला मिळत आहे. ग्रामीण रस्त्यांना चांगले दिवस आले आहेत. आघाडीच्या वारूला तो अडसर ठरणार का हे २३ मे च्या निकालात स्पष्ट दिसेल. मात्र पुरंदर हवेलीत कमळ कोमेजले तर तो शिवतारे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे. वेगवेगळ्या गावातील अंदाज घेतला असता आघाडीच्या एकोप्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली असे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीचे कार्यकर्ते आघाडीच्या एकजुटीला तितक्याच निर्धाराने सामोरे गेल्याचेही दिसते.  या लढाईत महायुती पुढे गेल्यास एकदिलाने एकत्र येऊनही आघाडीला फारसा फायदा होत नाही असे म्हणता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज लोकसभेला भाजपचा उमेदवार असताना शिवसैनिक ज्या ताकदीने उतरले त्यापेक्षा अधिक ताकदीने ते शिवतारे यांच्यासाठी मैदानात उतरतील. पुरंदरच्या दऱ्याखोऱ्यातील, वाडीवस्तीवरील चिवट शिवसैनिक ही सेनेची खरी ताकद मानली जाते. तर सहकार, संस्थात्मक कार्य यातून निर्माण झालेली कार्यकर्त्यांची फळी ही आघाडीची ताकद मानली जाते.  या दोनही ताकदीचा लोकसभेच्या रणांगणात अभूतपूर्व सामना पार पडला. विधानसभेला कोण वरचढ ठरणार याचा सरळ संदेश २३ मे च्या निकालातून मतदारांमध्ये जाणार आहे हे मात्र निश्चित.
अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा …
            सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यमंत्री विजय शिवतारेंना ‘पुढच्या वेळी कसा आमदार होतो ते बघतोच’ असे थेट आव्हान दिले होते . मी ठरवलं तर काहीही करू शकतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुरंदरचे दिवंगत आमदार ज्ञानेश्वरबापू खैरे, अनंतराव थोपटे, दादा जाधवराव, चंदुकाका जगताप, हर्षवर्धन पाटील अशा अनेकांना पवारांच्या तिरक्या चालींनी गारद व्हावे लागले होते. निर्भीड आणि सडेतोड समजले जाणारे विजय शिवतारे या चालींना कसे सामोरे जातात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी सहायक समितीला एक कोटीची देणगी

0
दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांच्याकडून समितीच्या नव्या वसतिगृहासाठी पाच कोटीची देणगी देण्याबाबत सामंजस्य करार
पुणे : ग्रामीण भागातून पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युवा परिवर्तन केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थी सहायक समितीला माजी विद्यार्थ्यांकडून एक कोटी रुपयांची देणगी सुपूर्त करण्यात आली. विद्यार्थी सहायक समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड यांच्याकडे माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश शनिवारी देण्यात आला. तसेच या दुबईस्थित उद्योजक विनोद जाधव यांच्याकडून समितीच्या नव्या वसतिगृह उभारणीसाठी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याच्या सामंजस्य करारावरही यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. समितीच्या फर्ग्युसन रस्त्यावरील डॉ. अच्युत शंकर आपटे वसतिगृहात झालेल्या या सोहळ्यावेळी समितीचे विश्वस्त रमाकांत तांबोळी, भाऊसाहेब जाधव, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी, खजिनदार दिनकर वैद्य यांच्यासह माजी विद्यार्थी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रतापराव पवार म्हणाले, “माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन एक कोटी रुपयांचा निधी संकलित केला, हा संस्थेच्या दृष्टीने मोठा क्षण आहे. संस्थेच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा सहभाग आणि आत्मीयता हीच संस्थेची खरी ताकद असते. समितीच्या माजी विद्यार्थ्यांनी नेहमीच संस्थेच्या हितासाठी काम केले आहे. शिक्षणासाठी ग्रामीण भागातून पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा निर्माण करण्यासाठी या निधीची मदत होईल. निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला जाईल. समितीच्या कामकाजात माजी विद्यार्थ्यांचा यापुढेही असाच सहभाग राहावा, अशी अपेक्षा आहे.”
 समाजहितासाठी दिलेले पैसे गरजूंपर्यंत पोचतात की नाही याबाबत शंका असल्याने लोक मदत करीत नाहीत. मात्र ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनी मदत केलीच पाहिजे. माझी मुले म्हणतात की, तुम्ही गेल्यानंतर तुमची संपत्ती आम्हाला नको, तुम्ही ती दान करा. कारण आम्ही सक्षम आहोत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधण्याचे वडिलांचे स्वप्न होते. पण त्यांना ते पूर्णत्वास नेता आले नाही. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न केला आहे. वसतिगृहाचा फायदा झालेल्या १० टक्के विद्यार्थ्यांनी समाजसेवा केली, तरी त्याचा चांगला परिणाम होवू शकतो.” अशी भावना समितीला ५ कोटी रुपयांचा निधी देणारे विनोद जाधव यांनी व्यक्त केली.
भाऊसाहेब जाधव म्हणाले, “एक हजार विद्यार्थ्यांचे वसतिगृह तयार करायचे असे स्वप्न आहे. विजय कदम यांनी समितीसाठी व्यक्तीगत भरीव मदत केली. तसेच जाधव यांना विनंती केल्याने ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होवू शकला. जाधव यांचा जीवनप्रवास अतिशय खडतर आहे. त्यामुळे त्यांनी दिलेल्या देणगीचे महत्त्व वेगळे आहे. समाजिक जाण ठेवत त्यांनी पाच कोटी रुपये दिले. त्यांनी आत्तापर्यंत अनेक संस्थान मदत केली आहे. यापुढेही ते मदत करीत राहतील असा विश्‍वास आहे.”
रमाकांत तांबोळी म्हणाले, “लोकांना चांगल्या कामासाठी पैसे द्यायचे आहेत. मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोचलो पाहिजे. १० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे ध्येय आहे.” गायकवाड म्हणाले, “हे वसतिगृह नसून युवा परिवर्तन केंद्र आहे. आईवडिलांविषयी श्रद्धा असते तशी आमची समीतीविषयी धारणा आहे. माझी विद्यार्थ्यांची ताकद अशीच समितीच्या मागे उभी राहिली तर आपण भारतभर पोहचू.” एक कोटी रुपयांचा निधी जमा झाल्याने रमाकांत तांबोळी यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन सुप्रिया केळवकर यांनी केले. आभार जीभाऊ शेवाळे यांनी मानले.

राहुल गांधींचा मुक्काम नगर जिल्हयासाठी संस्मरणीय ….

0

संगमनेर -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी संगमनेरात झालेली प्रचार सभा खुद्द राहुल गांधी आणि आमदार बाळासाहेब थोरात यांची ‘राजकीय उंची’ वाढवणारी ठरली. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरची सभा रद्द करुन ती संगमनेरात आणण्यापासून ते गांधींना मुक्कामी ठेऊन त्यांचा मराठमोळा पाहुणचार करण्यापर्यंतच्या प्रत्येक गोष्टीचे  नियोजन थोरातांना करण्याची संधी प्राप्त झाली . शिर्डी मतदारसंघाचा एकहाती तंबू सांभाळणार्‍या आमदार थोरात यांनी  गांधी घराण्याशी साधलेली जवळीक त्यांना नगर जिल्हयातून सहानुभूती मिळवून देणारी ठरते आहे.
राहुल गांधी यांच्या नियोजनातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व नंदुरबार येथील सभा सुरक्षा तसेच काही कारणाने रद्द झाल्या. त्यानंतर संगमनेर येथे शिर्डी लोकसभेचे काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे राहुल गांधी यांना शुक्रवारी बालासोरहून निघण्यास उशीर झाला. त्यामुळे त्यांचे विमान नाशिकला रात्री आठच्या सुमारास उतरले. पुढचा प्रवास संगमनेरकडे असल्याने तसेच रात्री हेलिकॉप्टरनेही जाता येत नसल्याने त्यांना पुढच्या प्रवासासाठी रस्तेमार्गाशिवाय दुसरा पर्याय नव्हता. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचे रात्री आठच्या सुमारास ओरिसातील बालासोरहून नाशिक विमानतळावर आगमन झाल्यानंतर अतिविशेष सुरक्षा असलेल्या राहुल यांच्यासोबतच्या १८ गाड्यांचा ताफा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिकच्या द्वारका सर्कलवरून संगमनेरच्या दिशेने रवाना झाला. देशातील एका मोठ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि तेही ऐन निवडणुकीच्या धामधुमीत तब्बल ९० किलोमीटरचा प्रवास रस्तेमार्गाने करण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी.

पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

थोरात, तांबे कुटुंबियासह काँग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधींच्या साधे व सहजपणाचा अनुभव आला. सुरक्षा रक्षकांना रात्र जागून काढावी लागली. रात्री मुक्कामी असताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, सत्यजीत तांबे व डॉ. हर्षल तांबे इतक्या मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत राज्याच्या राजकारणातील अनेक ‘खलबते’ही झाली. त्यामुळं सर्वच नेत्यांना त्यांच्यासोबत मनमोकळेपणानं बोलता आलं. रात्री त्यांनी आवर्जून मराठमोळं जेवण घेतलं. त्यामधे पिठलं व भाकरीचा आस्वादही घेतला. सकाळी राहुल यांनी दही व थालपिठावर ताव मारला. रात्री धुतलेली कपडेच घालून आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ते आमदार थोरात यांच्यासह हेलिकॉप्टरने मुंबईकडे दिवसभराच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

अंगावरचे कपडे स्वत:च धुतले
संगमनेरातील जाणता राजा मैदानावर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान सभा संपल्यानंतर ‘सत्यजितजी देर हो गयी है. मै आज यही हॉल्ट करूंगा.’ कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वाक्याने युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सुखद धक्काच बसला. त्यानंतर अर्थातच धावपळ सुरू झाली. राहुल यांच्याकडे रात्री बदलण्यासाठी कपडे नव्हते. रात्री साडेअकरा वाजता संगमनेर मधील एका कापड दुकानातून त्यांनी शॉर्ट, टी शर्ट खरेदी केले. अंगावरचे कपडे रात्रीच धुवून सकाळसाठी तयार केले. संगमनेर येथील अमृत वाहिनी कॉलेज येथील अमृत कुटीच्या एका लहानशा गेस्ट हाऊसमध्ये राहुल गांधीचा काल रात्री अचानक मुक्काम झाला.

दरम्यान, संगमनेरच्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांमधे राहुल गांधी यांचा अकस्मात झालेला मुक्काम कौतुक व अभिमानाचा विषय ठरला आहे. यासर्व घडामोडी संगमनेरची मान उंचावणार्‍या आणि भविष्यात संगमनेरच्या माध्यमातून जिल्ह्याला पहिल्यांदाच राज्यातील मोठी संधी देणार्‍या ठरणार आहेत.

सूर्यदत्ता ग्रुप आणि आयआयएमबीएक्स (बंगलोर) यांच्यात शैक्षणिक सामंजस्य करार

0
पुणे : “विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्याधारित आणि प्रत्यक्ष अनुभवाचे शिक्षण मिळण्यासाठी ‘आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’ उपयुक्त ठरणार आहे. आजच्या डिजिटल, इंडस्ट्री ४.० च्या काळात विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना नाविन्यपूर्ण शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे. आपल्यातील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी हे एक महत्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांसाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे,” असे मत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) बंगलोरच्या डिजिटल लर्निंग सेंटरचे प्रमुख प्रा. डॉ. पी. डी. जोस यांनी व्यक्त केले.
पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये आयआयएम बंगलोरच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या ‘आयआयएमबीएक्स बी-स्कूल पार्टनरशिप प्रोग्राम’चे उदघाट्न डॉ. जोस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्ट्रैटर्जिक फोरसाईट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, टाटा (टॅको) ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद गोयल, संचालक शैलेंद्र कासंडे, संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, कार्यकारी संचालक अक्षित कुशल, सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी सूर्यदत्ता आणि आयआयएमबीएक्स बंगलोर यांच्यात यासंदर्भात सामंजस्य करार झाला. या उपक्रमांतर्गत एमबीए व पीजीडीएम विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि कौशल्य वाढविण्यासाठी, तसेच जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयआयएमबीएक्स बंगलोर’तर्फे प्रमाणपत्र मिळणार आहेत.
प्रा. डॉ. पी. डी. जोस म्हणाले, “या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी-शिक्षकांना जागतिक दर्जाचे व आधुनिक शैक्षणिक आणि व्यावसायिक कौशल्य विकसित होतील. आयआयएम ही आशियातील अग्रगण्य व्यवस्थापन संस्था आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात आयआयएम बंगलोरला प्रथम क्रमांकाचा दर्जा प्राप्त झाला आहे. पदवी, पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमाबरोबरच पोस्ट डॉक्टरल शिक्षण येथे उपलब्ध आहे. आयआयएमबीमध्ये नेतृत्व आणि उद्योजक घडण्यासाठी आवश्यक कौशल्य देण्यावर भर असतो. आजच्या काळात तीच यशाची गुरुकिल्ली मनाली जाते. येथे मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्स (एमओयूसीएस) कार्यक्रम आहे. ज्यामुळे व्यवस्थापनाचे विद्यार्थी अधिक चांगले घडतात. आर्थिक किंवा प्रादेशिक अडथळ्यांना न जुमानता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी डिजिटल शिक्षण उपक्रम सुरु केला आहे. सूर्यदत्ताशी झालेल्या या करारामुळे पुण्यातील विद्यार्थी-प्राध्यापकांना त्याचा लाभ होईल.”

डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “भारतात मॅनेजमेंटचे शिक्षण देणाऱ्या सुमारे चार हजार पेक्षा अधिक संस्था कार्यरत आहेत. जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट नेहमीच अग्रभागी राहिलेली आहे. अशा जागतिक दर्जाच्या संस्थांबरोबर सूर्यदत्ता ग्रुपचा सामंजस्य करार होणे हा संस्थेचा बहुमान आहे. यामुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, टेकनॉलॉजिकल डेव्हलपमेंट, आधुनिक शिक्षण मुलांना मिळेल. त्यातूनच उद्योगाला आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण होईल. शिक्षकांनाही बेंगलोरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार आहोत. शिक्षकांनाही विविध पद्धतीचे प्रात्यक्षिक अनुभव असणे गरजेचे आहे. तसे झाले तर चांगल्या रीतीने ते विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवू शकतात.”

सचिन इटकर म्हणाले, “गेल्या काही वर्षात सूर्यदत्ता ग्रुप सातत्याने दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जागतिक दर्जाच्या विविध संस्थांशी भागीदारी करीत कौशल्याधारित, नाविन्यपूर्ण आणि संशोधनकेंद्री शिक्षण दिले जात आहे. संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी केले जात असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत.”
अरविंद गोयल म्हणाले, “इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वतःशीच स्पर्धा करून आपल्यातील क्षमता विकसित करत राहिले पाहिजे. त्यातून आपला आत्मविश्वास वाढतो. कोणत्याही टप्प्यावर आलेल्या अपयशाने खचून न जाता उर्वरित काळात मिळणाऱ्या संधींचा लाभ कसा उठवता येईल, याचा विचार करावा.” डॉ. शैलेंद्र कासंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कॅप्टन शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी आभार मानले.

उष्म्याने लाही लाही …

0

पुणे-उन्हाने आणि उकाड्याने आज शनिवारी हि लाही लाही होत असल्याने पुणेकरांनी दुपारी घराबाहेर पडणे शक्यतो वर्ज्य केल्याचे दिसून आले.पुण्यात आज कामाल तापमान 42.6 एवढे नोंदवले गेले .दुपारनंतर आकाश ढगाळ आणि हवा कोरडी असे चित्र होते .या पुढील दिवसात म्हणजे उद्यापासून 3 मे पर्यंत साधारणतः प्रती दिवस 1 या प्रमाणे तापमान कमी होत जाईल . ३मे रोजी अंदाजे ३८ कमाल तापमान असेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.२९ एप्रिलला मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक पावसाची शक्यता राहील . ३० व 1 मे ला कोकण आणि गोव्यात तुरळक  पावसाची शक्यता राहीलअसेही हवामान खात्याने म्हटले आहे.

हवामान खात्याने दिलेला इशारा –

२७-२८एप्रिल  – विदर्भात  बऱ्याच ठिकाणी,मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात  तुरळक  ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता. उत्तर मध्य  महाराष्ट्रात  व मराठवाड्यात काही  ठिकाणी रात्री  तापमान जास्त्त राहील.

२९एप्रिल : विदर्भात  बऱ्याच  ठिकाणी ,मराठवाड्यात काही ठिकाणी तरमध्य महाराष्रात तुरळक  ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

३०एप्रिल -१ मे: विदर्भात  तुरळक  ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

आज नोंदविले गेलेले महाराष्ट्रातील तापमान –

मुंबई(कुलाबा) ३४.०, सांताक्रूझ३४.१, अलिबाग ३१.८,रत्नागिरी ३३.२, पणजी (गोवा) ३३.७,डहानु३५.६,पुणे ४२.६, अहमदनगर ४४.९,जळगाव ४४.४, कोल्हापूर ४१.०, महाबळेश्वर ३६.१, मालेगाव ४३.२, नाशिक४१.७, सांगली ४३.०, सातारा ४१.६, सोलापूर४४.३,उस्मानाबाद ४३.८,औरंगाबाद४३.०,परभणी  ४५.७, नांदेड ४४.५, बीड ४४.२, अकोला ४६.४,अमरावती ४५.४,बुलढाणा४३.१, ब्रम्हपुरी४५.८, िंद्रपूर४५.६,गोंदीया ४३.८,नागपूर४५.२,वाशिम ४४.२, वर्धा  ४५.७,यवतमाळ ४४.५.

बारामती शहरात आज गेल्या अनेक वर्षातील उच्चांकी म्हणजे तब्बल 43 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या काही दिवसात उन्हाचे बारामतीकरांची लाही लाही होत होती, आज मात्र उन्हाने कहर केला.दुपारी बाहेर पडलेल्या बारामतीकरांना या उन्हाने अक्षरशः भाजून काढले. आज अनेकांच्या स्मार्ट फोनवर बारामतीचे तापमान तब्बल 43 अंश सेल्सियस दाखवत होते. या उन्हाच्या तीव्रतेने बाजारपेठेवरही परिणाम जाणवत असून उन उतरल्याशिवाय लोक घराबाहेर पडत नसल्याचे दिसत आहे.

कुशल मनुष्यबळासाठी उद्योगांनी घ्यावा पुढाकार-डॉ. रघुनाथ शेवगावकर

0
पुणे : “शिक्षण आणि उद्योग ही क्षेत्रे एकमेकांवर अवलंबून आहेत. दोन्ही क्षेत्रातील लोकांनी एकमेकांच्या गरजा ओळखून सम्नवय साधायला हवा. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी उद्योगांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी औद्योजिक सामाजिक बांधिलकीचा (सीएसआर) निधी शिक्षण क्षेत्रात अधिक गुंतवला पाहिजे. शिक्षण क्षेत्रावरील गुंतवणूक वाढली, तर गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासह कुशल मनुष्यबळ निर्मिती होईल,” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रघुनाथ शेवगावकर यांनी केले.
वाघोली येथील रायसोनी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित ‘जीएचआर कनेक्ट’ या एकदिवसीय परिषदेच्या उद्घाटनावेळी डॉ. शेवगावकर बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या ‘ऐंगेजिंग विथ मिलेनियल्स’ या संकल्पनेवर या परिषदेला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (टीसीएस) उपाध्यक्ष दीनानाथ खोळकर, रायसोनी शिक्षण संस्थेचे विश्वस्त संचालक अजित टाटिया, रायसोनी शिक्षण संस्थेच्या कॉर्पोरेट रिलेशन्सचे संचालक नागेंद्र सिंग, रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड मॅनेजमेंटचे संचालक डॉ. के. के. पालिवाल, रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. आर. डी खराडकर, संचालिका डॉ. प्रीती बजाज, ग्लोबल एज्युकेशनचे संचालक आदित्य भंडारी आदी उपस्थित होते.

 

डॉ. रघुनाथ शेवगावकर म्हणाले, “आजच्या शिक्षणपद्धतीत विद्यार्थ्यांची गुणवत्ता उद्योगांसाठी पूरक नसते. अशावेळी त्यांना प्रात्यक्षिक ज्ञान आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला, तर ते उद्योग क्षेत्रात कुशलतेच्या जोरावर रोजगार मिळवू शकतील. कौशल्य, संशोधन आणि इनोव्हेशन या गोष्टींवर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनीही लक्ष द्यायला हवे. नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय करू शकतील, अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळाले, तर देशाच्या विकासातही चांगली भर पडेल. त्यामुळे उद्योगांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी द्यायला हवी. शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यातील नाते एकमेकांना विकसित करणारे असावे.”
दीनानाथ खोळकर म्हणाले, “उद्योगात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यानी आंतरशाखीय कौशल्य आत्मसात करावीत. प्रशिक्षणाचा कालावधी जास्त ठेवला तर विद्यार्थ्यांना अधिक शिकायला मिळेल. रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत, पण कुशल मनुष्यबळ नाही, अशी आजची स्थिती आहे. हे बदलण्यासाठी इंटर्नशीप उपक्रम महत्वाचा ठरेल. उद्योग क्षेत्राला विद्यार्थी-शिक्षक यांच्याबरोबर काम करण्यात उत्सुकता आहे.”
या परिषदेत आयटी, उत्पादन, अ‍ॅटोमोबाईल, पायाभूत सुविधा क्षेत्रातील १८० पेक्षा जास्त उद्योग प्रतिनिधींनी भाग घेतला. औद्योगिक व शैक्षणिक संस्थाचा सहयोग वाढवण्यासाठी यावेळी ‘जीएचआर पुरस्कार’ देण्यात आले. एकूण २९ जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध विषयांवर यावेळी तीन चर्चासत्र झाली. डॉ. प्रीती बजाज यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. प्रा.कौशल खात्री यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नितीन कोरडे यांनी आभार मानले.