सासवड-बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युती विरुद्ध कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असा सरळ सामना रंगला आहे. यापूर्वीच्या निवडणुका आणि आताची निवडणूक यात मोठा फरक असून एकास एक अशी थेट लढत असल्याने ती विधानसभेची रंगीत तालीम ठरणार आहे.
राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि दौंड तालुक्यातील कुल घराण्यातील स्नुषा कांचन कुल असा दुहेरी सामना महायुती आणि आघाडीचे पुरंदर तालुक्यातील भविष्य निश्चित करणार आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पुरंदर तालुक्यातील दोन बलाढ्य पक्ष मानले जातात. दोन्ही एकत्र झाल्यास शिवसेनेला ते शह देऊ शकतात असे जाणकार सांगतात. लोकसभा निवडणूक ही त्याचीच कसोटी ठरणार आहे. शिवसेना एकट्याच्या बळावर तालुक्यात मोठा पक्ष असला तरी त्यांचा मित्रपक्ष असलेला भाजप तितकासा प्रबळ नाही. तालुकापातळीवर पक्षसंघटनेचा सांगाडा असला तरी गावपाळीवर आवश्यक असलेले नेटवर्क भाजपकडे नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांना मदती करून भाजपाने हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला होता परंतु या निवडणुकीत अशा सर्वांनी भाजपला टांग दिली आहे. त्यामुळे भाजपची नौका पूर्णपणे शिवसेनेच्या बळावर तरणार का हा महत्वाचा प्रश्न आहे.
माजी राज्यमंत्री दादा जाधवराव यांना पराभूत करण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने एकजूट घडवून आणली होती. तसाच प्रयत्न आता शिवतारे यांना पराभूत करण्यासाठी केला जात आहे. परंतु शिवतारे यांच्याकडे असलेल्या काही जमेच्या बाजू आघाडीला अडचणीच्या ठरणार आहेत. मागील ५ वर्षाच्या काळात तालुक्यात रस्ते, जलसंधारण आणि पायाभूत सुविधांच्या बाबतीत चांगली प्रगती पाहायला मिळत आहे. ग्रामीण रस्त्यांना चांगले दिवस आले आहेत. आघाडीच्या वारूला तो अडसर ठरणार का हे २३ मे च्या निकालात स्पष्ट दिसेल. मात्र पुरंदर हवेलीत कमळ कोमेजले तर तो शिवतारे यांच्यासाठी आत्मचिंतनाचा विषय ठरणार आहे. वेगवेगळ्या गावातील अंदाज घेतला असता आघाडीच्या एकोप्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांची धावपळ उडाली असे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीचे कार्यकर्ते आघाडीच्या एकजुटीला तितक्याच निर्धाराने सामोरे गेल्याचेही दिसते. या लढाईत महायुती पुढे गेल्यास एकदिलाने एकत्र येऊनही आघाडीला फारसा फायदा होत नाही असे म्हणता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आज लोकसभेला भाजपचा उमेदवार असताना शिवसैनिक ज्या ताकदीने उतरले त्यापेक्षा अधिक ताकदीने ते शिवतारे यांच्यासाठी मैदानात उतरतील. पुरंदरच्या दऱ्याखोऱ्यातील, वाडीवस्तीवरील चिवट शिवसैनिक ही सेनेची खरी ताकद मानली जाते. तर सहकार, संस्थात्मक कार्य यातून निर्माण झालेली कार्यकर्त्यांची फळी ही आघाडीची ताकद मानली जाते. या दोनही ताकदीचा लोकसभेच्या रणांगणात अभूतपूर्व सामना पार पडला. विधानसभेला कोण वरचढ ठरणार याचा सरळ संदेश २३ मे च्या निकालातून मतदारांमध्ये जाणार आहे हे मात्र निश्चित.
अजित पवारांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा …
सुप्रिया सुळे यांच्या सांगता सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यमंत्री विजय शिवतारेंना ‘पुढच्या वेळी कसा आमदार होतो ते बघतोच’ असे थेट आव्हान दिले होते . मी ठरवलं तर काहीही करू शकतो अशी पुस्तीही त्यांनी जोडली. पुरंदरचे दिवंगत आमदार ज्ञानेश्वरबापू खैरे, अनंतराव थोपटे, दादा जाधवराव, चंदुकाका जगताप, हर्षवर्धन पाटील अशा अनेकांना पवारांच्या तिरक्या चालींनी गारद व्हावे लागले होते. निर्भीड आणि सडेतोड समजले जाणारे विजय शिवतारे या चालींना कसे सामोरे जातात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.