Home Blog Page 294

अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू


पुणे – दौंड शहरात पावसाचा पहिला बळी गेला आहे. पावसामुळे भिंत कोसळून येथील ताराबाई विश्वचंद आहिर नामक एका 75 वर्षीय महिलेचा बळी गेला आहे. ही महिला दुकानात बसली होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे अंगावर घराची भिंत पडून एका 75 वर्षीय वृद्ध मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबाई विश्वचंद आहिर असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई एका दुकानात बसल्या होत्या. तेव्हा त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे.

दरम्यान, मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

मलबार हिल परिसरात म्हाडा इमारतीचा भाग कोसळला:रहिवाशांना केले स्थलांतरीत

मुंबई-मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारच्या सुमारास मलबार हिल येथील तीनबत्ती परिसरात एक इमारतीचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही.

मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. आज मलबार हिल परिसरातील तीनबत्ती रोडवरील एका जुन्या म्हाडाच्या इमारतीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान फाउंडेशनचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग आज पावसामुळे कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. भिंतींचा भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक देखील संथ करण्यात आली आहे. तीनबत्तीच्या या रोडवरून मोठी वाहतूक होत असते. व्हीआयपी लोकांचा हा रहदारीचा मार्ग आहे.

दरम्यान, दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील हेरिटेज बाणगंगा तलावाच्या कंपाऊंड भिंतीचा काही भाग रविवारी संध्याकाळी पावसात कोसळला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. महालक्ष्मी मंदिराजवळील ऐतिहासिक स्थळावर कंपाऊंड भिंतीचा 10-15 फूट भाग कोसळला होता.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती, इंदापूर, पुणे जिल्ह्यासह मुसळधार पाऊस असलेल्या अन्य जिल्ह्यांतील परिस्थितीचाही आढावा

0

राज्य व जिल्हा यंत्रणांनी संपर्कात राहून समन्वयानं
नागरिकांच्या बचाव व मदतकार्याला प्राधान्य द्यावं
–मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांची प्रशासनाला सूचना

शेती, पिके, पशुधन, घरांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे
करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश

राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी
आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना मदत करावी
–उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई, दि. 26 :- “मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या घाट परिसरात पावसाचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्हा यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांची सुरक्षितता, बचाव व मदतकार्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. त्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ राबवाव्यात. मुसळधार पावसाची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी सावध रहावे. सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून त्यांच्या सूचनांचे पालन करुन सहकार्य करावे,” असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल मध्यरात्रीच बारामती येथे दाखल झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यांसह पुणे जिल्ह्यातील गावांना भेट देऊन दिवसभर परिस्थितीची पाहणी केली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक विकास तथा क्रीडा व युवककल्याण मंत्री दत्तामामा भरणे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक पृथ्वीराज जाचक, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित गावांचे सरपंच, स्थानिक संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शासनाचे संबंधित अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा करत असतानाच, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यातील पाऊस, धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदतकार्याची माहिती घेतली. शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यातील परिस्थितीचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मुंबई उपनगर रेल्वेसेवेला पावसाचा फटका बसला असून हार्बर रेल्वेसेवा बंद होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवा विलंबाने सुरु होत्या. महाडकडून स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडाकडे जाणारा रस्ता पावसामुळे बंद आहे. पंढरपूरला नदीकाठच्या एका मंदिरात अडकून पडलेल्या तीन पूजाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात थांबून नागरिकांना आवश्यक मदत करावी, अशा सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पाऊस सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी शक्यतो घरीच थांबावे. घरात पाणी भरण्याची शक्यता असल्यास सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. आत्यंतिक गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. राज्य शासन व स्थानिक स्वराज संस्थांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आपले कर्तव्य पार पाडत असताना स्वत:चीही काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाणी काढण्यासाठी पंपाची व्यवस्था

मुंबई- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत दरवर्षी प्रमाणेच सर्वत्र पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा फटका लोकल वाहतुकीला तसेच रस्त्यावरील वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. बीएमसीच्या आपत्ती कक्षातून एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही कंट्रोल रूममधून सगळे स्पॉट बघितले आहेत. म्हणजे जिथे पाणी तुंबले होते जसे हिंदमाता आहे, सबवे असेल, सायन आहे, अंधेरी आहे. आता तुम्ही बघा तिथे पाणी नसेल कारण तिथे पंपाची व्यवस्था केलेली आहे. आपण एक अंदाज बांधत असतो की जूनच्या 10 तारखेपर्यंत पाऊस येईल आणि तशी तयारी आपण करतो. पण पाऊसच अगोदर आला. आता माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे, नरीमन पॉइंटला 252 मिमी पाऊस पडला, महापालिका मुख्याल येथे 216 मिमी पाऊस पडला, कुलाबा येथे 207 मिमी पाऊस पडला. म्हणजे जिथे आपण अपेक्षित धरतो 50-55. पण इथे एवढा पाऊस पडला म्हणजे हे एकप्रकारे ढगफूटीच झाली आहे.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आपली जी यंत्रणा आहे बीएमसीची ती आता कामाला लागली आहे. जिथे जिथे पाणी साचले जोते तिथले पाणी काढण्यात आले आहे. तसेच आता वाहतूक देखील सुरळीत सुरू झाली आहे. लोकल देखील धीम्या गतीने सुरू झाली आहे. आता मला वाटते की या ठिकाणी नालेसफाई देखील सुरू आहे आणि एकंदरीत पावसानेच थोडे लवकर आगमन केल्याने धावपळ झाली आहे. याच्यातून नागरिकांना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी बैठक देखील घेतली होती आपत्ती व्यवस्थापनाची. त्यात रेल्वे, महापालिका, एनडीआरएफ, ही सगळी यंत्रणा अलर्ट आहे आणि नागरिकांना कमीत कमी त्रास होईल असा प्रयत्न केला जाईल.

आपले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी देखील माहिती घेतली आहे. मी देखील जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्याशी संपर्क करत आहे. मुख्यमंत्री देखील लक्ष देऊन आहेत. अजितदादा देखील पुण्यात आहेत. यंत्रणा सर्वत्र अलर्ट आहे. शासन आणि प्रशासन एक टीम म्हणून आम्ही काम करत आहोत. लँड स्लाइडच्या बाबतीत विखरोळीच्या भागात ज्या टेकड्या आहेत तिथे देखील रॉक बिल्डिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आता पाण्याचा निचरा झाला आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले, आता कुठलाही पंप बंद पडणार नाही. पूर्ण क्षमतेने पंप सुरू असून पाण्याचा निचरा होत आहे. हिंदमाता येथील पाणी देखील आता गेले आहे. सकल भागात जे काही पाणी साचले होते त्याचा निचरा झाला आहे. नालेसफाईमध्ये देखील एआयचा वापर करण्यात आला आहे. जिथे कुठे पाणी असेल लोकांनी तत्काळ संबंधित विभागाला कळवावे ज्यामुळे त्याची तातडीने दखल घेतली जाईल.

महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले?: हर्षवर्धन सपकाळ

मुंबईकरांचे हाल होण्यास महानगरपालिका व राज्य सरकारच जबाबदार; मुंबईला लुटणा-या भ्रष्ट टोळीला मुंबईकर माफ करणार नाहीत.

रस्ते, हौसिंग सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, रुग्णालये जलमय

मुंबई, दि. २६ मे २०२५

पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई व मान्सूनपूर्व कामावर खर्च करते पण दरवर्षी पहिले पाढे ५५ असे चित्र दिसते. जनतेचा पैशावर कंत्राटदार व सत्ताधारी यांनी डल्ला मारून खिसे भरल्यानेच मुंबईकरांचे हे हाल होत आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

भाजपा युती सरकार व बीएमसी प्रशासनाचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली असून मुंबईच्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबली आहे. रस्ते, हौसिंग सोसायट्या, रेल्वे ट्रॅक, अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन, रुग्णालये जलमय झाली आहेत. एका पावसाने भाजप शिंदेसेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. यांचे कर्तृत्त्व इतके महान आहे की आगामी निवडणुकीत लोकांची मते मागायला यांना बोटीनेच घरोघरी जावे लागेल असे दिसत आहे. मान्सूनपूर्व कामासाठी दरवर्षी महानगरपालिका कोट्यवधी रुपये खर्च करते पण वस्तुस्थिती पाहता हे पैसे जातात कोठे? हा प्रश्न निर्माण होतो. मंत्रालय, मुंबई महापालिका प्रशासन, कंत्राटदार यांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबईचे हे हाल होत आहेत.

मुंबई महानगरपालिकाने सन २५ – २६ या वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला व तो सन २४-२५ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुमारे १४.१९% ने अधिक होता, हा अर्थसंकल्प बीएमसीच्या इतिहासातील सर्वात मोठा ठरला. रस्ते व वाहतूक विभागासाठी या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ५५४५ कोटींची तरतूद केलेली आहे. २०२४ मध्ये नालेसफाईसाठी २४९.२७ कोटी रुपये खर्च केले तर २०२५ मध्ये नालेसफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ३९५ कोटी रुपये खर्च केले, यासाठी ३१ कंत्राटदारांना काम दिले पण एवढा पैसा खर्च करुनही मुंबईतील नालेसफाई झाली नाही तर हातसफाई करुन मुंबईच्या तिजोरीमधील मुंबईकरांच्या कराच्या पैशावर डल्ला मारला आहे. मुंबईला लुटणा-या या भ्रष्ट टोळीला मुंबईकर जनता माफ करणार नाही, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

मुंबई,पुण्यास रेड अलर्ट:मंत्रालय परिसरात गुडघाभर पाणी, अरबी समुद्राला उधाण..महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस

पुण्यास अगोदर रेड नंतर ऑरेंज अलर्ट

मुंबई/पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पावसाच्या स्थितीचा सातत्याने आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. ज्या ठिकाणी नुकसान झाले तेथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्याच्या मुख्य सचिव आणि राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी ते सातत्याने संपर्कात आहेत.

मुंबईत पुढील 24 तास विजांचा गडगडाट आणि वादळी वार्‍यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

राज्यात पुणे, सातारा, सोलापूर, रायगड, मुंबई आणि एमएमआर या भागात अतिवृष्टी झालेली आहे. दौंडमध्ये 117 मि.मी., बारामतीत 104.75 मि.मी., इंदापुरात 63.25 मि.मी. इतका पाऊस झाला.

बारामतीत 25 घरांशी अंशत: पडझड झाली असून, पुरात अडकलेल्या 7 जणांना वाचविण्यात आले आहे. 70 ते 80 कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मोबाईल सेवा काल विस्कळित झाल्या होत्या. त्या आता पूर्ववत होत आहेत.

इंदापूर येथे 2 जणांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यात आले आहे.

फलटणमध्ये 163.5 मि.मी. इतका पाऊस झाला. एनडीआरएफची एक चमू फलटणमध्ये आहे. 30 नागरिक दुधेबावी गावाशेजारी अडकले होते. त्यांना निवास आणि भोजनाची सुविधा पुरविण्यात आली आहे.

सोलापूरमध्ये 67.75 मि.मी. पाऊस झाला. माळशिरस तालुक्यात 6 नागरिक पुरात अडकले होते, त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पंढरपूर येथे भीमा नदी पात्रात 3 जण अडकले, त्यांचे बचावकार्य सुरु आहे.

रायगडमध्ये एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर महाड ते रायगड किल्ला रस्ता अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आला आहे.

मुंबईत 24 तासात 135.4 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत एकूण 6 ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. एकूण 18 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्याच्या तर 5 ठिकाणी इमारतीच्या भींती पडण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुंबई महापालिका, अग्निशमन दल, मुंबई पोलिस आणि इतरही सर्व यंत्रणा सज्ज आहेत. कुठेही प्राणहानी झालेली नाही. मुंबईत 5 ठिकाणी एनडीआरएफ टीम कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी सज्ज आहेत.

मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी 7-8 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. काळ्याकुट्ट ढगांमुळे मुंबईतील दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका हवाई सेवेला बसला आहे.

भूमिगत मेट्रोची दाणादाण – मुंबईतील पावसाचा मेट्रो-3 प्रकल्पाला फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होत आहे. परिणामी, रेल्वेने मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भुयारी मेट्रोकडे जाणारे गेटही बंद करण्यात आले आहे. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच सुरू करण्यात आली होती. पण आता पहिल्याच पावसात तिला फटका बसला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे रविवारी सुमारे 35 वर्षांनंतर महाराष्ट्रात मान्सूनचे वेळेआधी आगमन झाले. राज्यात साधारण 5 जूनच्या आसपास मान्सून प्रवेश करतो. पण यावेळी तो 10 दिवसांपूर्वीच धडकला आहे. यापूर्वी 20 मे 1990 रोजी मान्सून वेळेपूर्वी पोहोचला होता.हवामान खात्याने आज दिनांक 26 मे रोजी पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत रत्नागिरी, पुणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.सततच्या पावसामुळे रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जगबुडी नदीची पाणीपातळी वाढली असून, आज (२६ मे) दुपारी १२.३० वाजता ती इशारा पातळीच्या वर आहे

खाली पहा जेजुरीच्या मंदिराच्या पायऱ्यावरून वाहणारे पाणी


मान्सून मुंबईत दाखल अन् मुंबईला रेड अलर्ट
मुंबईच्या प्रादेशिक हवामान खात्याने मान्सून मुंबईत दाखल झाल्याची घोषणा केली आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्याच्या उस्मानाबादपर्यंत मान्सून पोहोचला आहे. मुंबईत सकाळी 8.30 वाजेपर्यंत 135.5, तर सांताक्रूझमध्ये 33.5 मिलिमीटर पाऊस झाला आहे.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे. मध्य महाराष्ट्रातील हार्ट रिजनमध्येही हा अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईत पहिल्याच पावसात भुयारी मेट्रो स्टेशन तुंबलं आणि मोडतोड झाली.

आजचा पाऊस / एकुण
यवत. 96•00 / 306.00
केडगाव.73•00/ 310.00
पाटस. 71•00/ 298.00
दौड. = 43•00/ 322•00
रावण गांव =42•00 / 236•00
बोरीबेल =104.00 / 233.00
भिगवण = 98•00 / 268•00
पळसदेव=20•00/ 207.00
शेटफळ=325•00/ 688.00
इदापूर =54•00/ 310.00

पावसाने अवघ्या महाराष्ट्रभर जोरदार हजेरी लावली आहे. पर्यटन नगरी असलेल्या लोणावळ्यामध्ये देखील गेल्या 24 तासांत तब्बल 233 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी याच काळात शून्य मिलिमीटर पाऊस कोसळला होता. यावर्षीचा आज पर्यंत तब्बल 410 मिलिमीटर पाऊस कोसळलेला आहे. त्यापैकी निम्मा पाऊस गेल्या 24 तासांत कोसळला आहे.

नीरा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा- मागील चार ते पाच दिवसापासून नीरा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे वीर धरणाच्या खालील मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे सद्यस्थितीत नीरा नदी पात्रात अंदाजित 30000 Cusecs इतका विसर्ग वाहत आहे. तसेच नीरा नदी पात्रातील को.प. बंधाऱ्यांमध्ये आधीपासून पाणीसाठा आहे. नीरा नदी पात्रातील पुराच्या पाण्यास अडथळा होऊ नये म्हणून बंधाऱ्यांचे वरील बर्गे काढण्याचे काम या विभागाकडून हाती घेण्यात आलेले आहे. तथापि पावसाचा जोर वाढत गेल्यास नीरा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील येवामुळे नीरा नदीच्या पात्रातील बंधा-यांवरून पाणी वाहण्याची शक्यता आहे. तरी नीरा नदी काठावरील गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

15 वर्षीय मुलीचेअपहरण करून लैंगिक अत्याचार:गर्भपात करत वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले

आशुतोष राजपूत याने मुलीचे अपहरण करत तिला एका खोलीत डांबून ठेवले होते. तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीता गर्भवती राहिली. तिला एका दुसऱ्या महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. त्यानंतर पुन्हा काही जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्या ठिकाणाहून या मुलीला मुस्कान शेख नावाच्या एका महिलेच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते तिथे या पीडितेला वेश्या व्यवसायात ढकलत आले. तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरूच असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केलाय. तर या प्रकरणात आशुतोष राजपूत हा अद्याप फरार आहे आणि पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


मुंबई-डोंबिवली येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. मसाला विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत. या लैंगिक अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिली. तेव्हा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला. यानंतर पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले. येथे या दाम्पत्याने तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.हा संपूर्ण प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने उघडकीस आल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत या पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली आहे. तसेच पोलिसांनी महिलेसह तिचा पती व दोन पुरुष अशा चौघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या मुस्कान शेख या महिलेच्या विरोधात यापूर्वी देखील पीटा अंतर्गत गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली येथे राहते. तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून आशुतोष राजपूत या तरुणाचे घरी येणे जाणे होते. तो मसाले विक्री करायचा. घरी येणे जाणे सुरू झाले व यात या तरुणाने अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवली. दहावीची परीक्षा झाल्यानंतर आई व तिच्यात काही कारणांवरून भांडण झाले होते. आईशी झालेल्या भांडणाच्या रागातून मुलीने आशुतोषचे घर गाठले. आई व मुलीच्या भांडणाचा फायदा घेत आशुतोषने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले.

मुलगी घरी परतली नाही म्हणून आईने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी आशुतोष हा तिच्या घरी आईला भेटत होता व सांगत होता की मुलीला या ठिकाणी पाहिले तसेच मुलगी शहरातच आहे, असे सांगत होता. यावर आईने देखील विश्वास ठेवला. राग शांत झाल्यावर येईल घरी असे म्हणत दोन महीने उलटले पण मुलगी काही परतली नाही म्हणून आईला संशय आला व तिने टिळक नगर पोलिस ठाण्यात अपहरण झाल्याची तक्रार नोंदवली.

पोलिसांनी मुलीचा शोध घेण्यास सुरू केले. यावेळी मुलगी डोंबिवली जवळ एका ग्रामीण भागात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला व मुलीची सुटका केली. पीडित मुलीने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला व त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व मुस्कान शेख व तिच्या नवऱ्यासह आणखी दोघांना अटक केली.

मोहोळ यांचे आठ महिन्यात आठ जनता दरबार,भर पावसातही कसबावासियांचा मोठ्ठा प्रतिसाद

  • केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जाणून घेतले थेट नागरिकांचे प्रश्न

पुणे-

सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटावेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे आणि त्यांच्या नव्या कल्पनांना विकासकामांमध्ये स्थान मिळावे, या उद्देशाने खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सुरू केलेल्या खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा दुसरा टप्पा सध्या सुरू असून या दुसऱ्या टप्प्यातील दुसरे अभियान रविवारी कसबा विधानसभा मतदारसंघात नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात संपन्न झाले. कसबा विधानसभा मतदारसंघात झालेला हा दुसरा आणि सलग आठवा जनता दरबार होता. भर पावसातही या अभियानाला नागरिकांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच समाधानकारक होता. यावेळी नागरिकांनी वैयक्तिक प्रश्न, सोसायट्यांचे विषय, नागरी समस्या आणि विकासकामासंदर्भात नव्या कल्पना याबाबत मंत्री मोहोळ यांची भेट घेतली. आलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसंदर्भात संबंधित विभागांना तात्काळ सूचित केले असून येत्या काही दिवसांतच हे विषय निश्चितच मार्गे लागतील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

पुण्यनगरीचा खासदार या नात्याने मंत्री मोहोळ यांच्या वतीने सर्वसामान्यांना नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने खासदार जनसंपर्क सेवा अभियान अर्थात जनता दरबार विधानसभा मतदारसंघनिहाय आयोजित केला जात आहे. कसबा विधानसभा मतदारसंघात रविवारी झालेला जनता दरबार हा सलग आठवा जनता दरबार असून पहिल्या सात जनता दरबारातील नागरिकांचे प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी कसब्याचे आमदार हेमंत रासने, शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर तसेच कसबा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभियानादरम्यान मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या विविध योजना समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी योजनांचे स्टॉल्स विभागवार उपलब्ध करून देण्यात आले होते. शिवाय दाखल्यांसंदर्भातील अडचणी सोडण्यासाठीही वेगळ्या स्टॉलची उपलब्धता होती. यावेळी महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल, महावितरण यांच्यासह शासनाच्या विविध विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यासंदर्भात माहिती देताना मंत्री मोहोळ म्हणाले, ‘भर पावसातही कसबावासियांनी या अभियानाला मोठा प्रतिसाद दिला. वैयक्तिक प्रश्नांसह नागरिक मला सार्वजनिक प्रश्न, सोसायट्याचे विषय आणि अपेक्षित विकासकामे याबाबत भेटले. जनता दरबार हा केवळ एक दिवसाचा इव्हेंट न राहता त्यावर दुसऱ्या दिवसापासूनच प्रश्न सोडवण्यासाठी कार्यवाहीला सुरुवात होते. या अभियानात सहभागी नागरिकांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्याचे समाधान एक लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच मिळत असून माझ्या खासदारकीच्या संपूर्ण कार्यकाळात हा उपक्रम राबवला जाणार आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील पहिल्या अभियानालाही उत्तम प्रतिसाद लाभला होता शिवाय दुसऱ्या अभियानाला ही संख्या वाढलेली आहे. याचाच अर्थ जनता दरबार पुणेकरांच्या पसंती संदर्भात असून आपले प्रश्न शोधण्यासाठी जनता दरबारात प्राधान्य देत आहेत. ही निश्चितच समाधान देणारी बाब आहे’

उत्तमता, प्रतिभेच्या वाटचालीतून यशप्राप्ती हीच देशभक्ती : अविनाश धर्माधिकारी

‘उत्तुंग’चा ३०वा वर्षपूर्ती आनंदोत्सव आणि ‘उत्तुंग’ वार्षिक सन्मान समारंभ उत्साहात

पुणे : मानवी संस्कृतीच्या विकासासाठी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये प्रतिभेचा आविष्कार असणे आवश्यक आहे. स्वत:ला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात मूलभूत अभ्यास, विचार करत त्या त्या क्षेत्रातील उत्तमता व प्रतिभेची वाटचाल करत यश प्राप्त करणे हीच आजची खऱ्या देशभक्तीची व्याख्या आहे. कला क्षेत्र हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहे, असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, चाणक्य मंडल परिवार संस्थापक आणि संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले. आजच्या युवा पिढीला मानवी जीवनातील सर्व प्रतिभांचे व्यसन लागावे, अशी अपेक्षा व्यक्त करत माधवराव आणि आशाताई खाडिलकर यांच्याकडे कलेच्या क्षेत्रातील उत्तम, प्रतिभावंत आणि आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिले जाते, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

संस्कृती संवर्धन आणि समाज प्रबोधनाच्या उद्दिष्टाने कार्यरत असलेल्या उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट या संस्थेचा ३०वा वर्षपूर्ती आनंदोत्‍सव आणि उत्तुंग वार्षिक सन्मान प्रदान समारंभ रविवारी (दि. २५) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांना स्व. विजय वामन गाडगीळ स्मृती उत्तुंग जीवनसाफल्‍य सन्‍मान (रु. पंचाहत्तर हजार), ‘चतुरंग’ प्रतिष्ठानचे संस्थापक विद्याधर निमकर यांना उत्तुंग गुणगौरव सन्‍मान (रु. पंचवीस हजार), स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांना उत्तुंग राष्‍ट्रविचार सन्‍मान (रु. पंचवीस हजार) आणि मराठी रंगभूमी तसेच ललित कलांच्या प्रसारासाठी कार्य केलेल्या महाराष्ट्र कल्चरल सेंटर, पुणे या संस्थेला उत्तुंग आदर्श संस्था सन्मान (रु. पंचवीस हजार) देऊन गौरविण्यात आले. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि धनादेश असे पुरस्कारांचे स्वरूप होते. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिर प्रशालेच्या आवारातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण झाले. त्या वेळी ते बोलत होते. उत्तुंग परिवार ट्रस्टच्या विश्वस्त विदुषी आशा खाडिलकर, सह विश्वस्त ओंकार खाडिलकर मंचावर होते.

अविनाश धर्माधिकारी पुढे म्हणाले, मूळ भारतीय संस्कृतीत असणारी उदारता, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता आज कमी झाल्याचे दिसून येत आहे. माणसांच्या नात्यांमधील ताण-तणाव वाढताना जाणवत आहे. यातूनच युवा पिढीत व्यसनाचे प्रमाण वाढत चालले आहे. अशा वेळी पुरस्कारप्राप्त असामान्य प्रतिभावान व्यक्तींचे कार्य समाजासाठी आदर्शवत ठरत आहे.

पुरस्कारार्थींच्या वतीने मनोगत व्यक्त करताना डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, चार वेगवेगळ्या क्षेत्रातील सन्मानमूर्ती एकाच मंचावर आहेत याचे श्रेय माधवराव व आशाताई खाडिलकर यांनी स्थापन केलेल्या उत्तुंग संस्थेचे आहे. आम्ही सर्वजण आपआपल्या क्षेत्रात मनापासून कार्यरत आहोत. आमच्याकडे आलेले ध्येय आम्ही नम्रपणे स्वीकारत अविरतपणे कार्यरत आहोत यातून आम्हाला मनाचे उत्तम समाधान मिळत आहे तसेच अशा पुरस्कारांच्या माध्यमातून समाजाची पावतीही मिळत आहे, याचा आनंद आहे.
कार्यक्रमाची सुरुवातीस वेदश्री खाडिलकर-ओक आणि मानसी दीक्षित यांनी उत्तुंग गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.आनंदसोहळ्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ गायिका विदुषी पद्मश्री कै. माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीवर्ष शुभारंभाच्या निमित्ताने माणिक स्वरशताब्दी (२०२५-२०२६) या उपक्रमाअंतर्गत माणिक वर्मा यांच्या शिष्या आणि ज्येष्ठ गायिका विदुषी आशा खाडिलकर यांच्या संकल्पनेवर आधारित ‘माणिकस्मृती’ हा सांगीतिक आदरांजली वाहणारा विशेष कार्यक्रम सादर झाला. युवा गायिका केतकी चैतन्य, वेदश्री खाडिलकर-ओक, सावनी दातार-कुलकर्णी आणि मीनल माटेगावकर यांनी माणिक वर्मा यांच्या निवडक प्रचलित गीतांचे सादरीकरण केले. अभिजीत जायदे, सारंग भांडवलकर, उदय कुलकर्णी आणि तुषार दीक्षित साथसंगत केली. या अवीट गोडीच्या गाण्यांचा रसिकांनी भरभरून आनंद लुटला. ज्येष्ठ सुसंवादिका मंजिरी धामणकर यांनी कार्यक्रमाची गुंफण केली.

अरुंद गल्लीमध्ये अडकली आठ महिन्यांची गरोदर गाय…

0

पुणे- येथील ताडीवाला रोड वरील एका अरुंद गल्लीत आठ महिन्यांची गरोदर गाय आज पहाटे अडकली. झोपडपट्टीतील गल्लीत गाय अडकल्यानंतर अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले.काही तासांच्या प्रयत्नानंतर सायंकाळी अग्निशामक दलाच्या जवानांनी गरोदर गायीची सुटका केली. त्यानंतर स्थानिकांनी गायीच्या सुटकेचा निश्वास सोडला.
पुण्यातील ताडीवाला रोड येथील झोपडपट्टीत एका अरुंद गल्लीमध्ये आठ महिन्यांची गरोदर असलेली गाय अडकली होती. गाय अडकल्याने अग्निशमन दलाची दोन वाहने दाखल होत सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. गाय अडकल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट, रश्शी, पुली अशा विविध उपकरणांच्या साहाय्याने अडकलेल्या गायीला बाहेर काढण्यास सुरुवात केली. यावेळी एल आकार अरुंद गल्लीमुळे (दीड ते दोन फूट) मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. पुली लावून गायीचे अडकलेले पाय बाहेर काढून उभे करण्याचा प्रयत्न केला. जवळपास सर्व प्रकारे प्रयत्न करीत असताना मदतीकरिता वाईल्ड लाईफ रेस्क्यु टीम दाखल झाली. त्याचवेळी त्यांनी ही विविध उपकरणे वापरत सुटकेचे प्रयत्न केले.शेवटी गल्लीमधील रहिवाशांच्या घराबाहेरील चार जीने आणि कट्टे काढून हळुवारपणे गायीला बाहेर काढण्यात यश आले. या सर्व कामगिरीकरिता जवळपास दहा तासांचा अवधी लागला. गाय बाहेर येताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला.ताडीवाला रोड येथील जुनी पोलीस चौकी येथे पहाटे एक गाय अरुंद गल्लीमध्ये अडकली होती. जिथे गाय अडकली आहे, ती लेन अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाला अडचणीचा सामना करावा लागला. अग्निशमन दलाच्या जवानांनी कसोशीने प्रयत्न केले. गल्ली अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाला कसरत करावी लागली. अग्निशमन दलाकडून क्रेनच्या साहाय्याने गायीला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले होते. गेल्या आठवड्यात देखील एक गाय एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकली होती

पुण्यात रस्त्याची नदी झाली अन इनोव्हा वाहून गेली

पुणे-पावसाच्या हाहाकारामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील एक इनोव्हा कार वाहून गेली. अवकाळी पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पा झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसाने स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. काही काळासाठी वाहतूक ठप्प झाली. या दरम्यान एका ठिकाणी कार वाहून गेल्याची घटना घडली.स्वामी चिंचोली व निंबोडी परिसरातील ओढ्या नाल्यांचे येणारे पाणी स्वामी चिंचोली गावाजवळ तीन वाजण्याच्या सुमारास महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली. चिंचोली परिसरात महामार्गाची उंची जमिनी लगत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा प्रवाह आला. यामुळे रस्ता बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरणाचे अधिका-यांनी याठिकाणी खबरदारीच्या उपाय योजना न केल्याने अशी परिस्थिती उद्भवल्याचे ग्रामस्थांनी आरोप केला आहे.महामार्ग परिसरातील नाल्यांची व्यवस्थित साफसफाई न केल्याने संततधार पावसाने या ठिकाणी महामार्गावर पाणी तुंबले. यामुळे या ठिकाणी काही काळ ट्राफिक जॅम झाले

जोरदार सुरू झालेल्या पावसाने सोलापूर पुणे महामार्गावर भिगवन जवळ तब्बल पाच किलोमीटर ट्राफिक जाम झाले होते. पुण्याहून भिगवन जवळ रस्त्यावर पाणी आल्याने एक वाहन वाहून गेल्याचे सांगण्यात आले त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी दक्षता म्हणून एक एक करून वाहने सोडली त्यामुळे सफल पाच किलोमीटर रांगा दिसून होत्या.
भिगवन जवळ ढगफुटी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ओढे नाल्यानी रौद्ररूप धारण केल्याचे दिसून आले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पीडित जगदाळे कुटुंबियांची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली भेट

आसावरीच्या यशाचे केले कौतुक, पुनर्वसनासाठी ठोस पाठपुराव्याची ग्वाही

“या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही” – डॉ. नीलम गोऱ्हे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली जबाबदारी; शिवसैनिकांकडून तातडीने जगदाळे कुटुंबाला दिलासा

पुणे, दि. २५ मे २०२५ : पहलगाम येथे पीडित जगदाळे कुटुंबाची विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. या भेटीत त्यांनी आसावरी जगदाळे हिच्या नुकत्याच लागलेल्या निकालाबाबत तिचे अभिनंदन केले. आसावरीने कायदेविषयक डिप्लोमा परीक्षेत गुणवत्तेने यश मिळवले असून, ती सध्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या मॅनेजमेंट अभ्यासक्रमासोबतच लेबर लॉ या क्षेत्रातही शिक्षण पूर्ण करत आहे. तिच्या शैक्षणिक यशाच्या पार्श्वभूमीवर तिच्या कुटुंबाची अपेक्षा आहे की, पुणे शहरातच सरकारी क्षेत्रात तिला रोजगाराची संधी मिळावी, जेणेकरून ती आपल्या आई व कुटुंबासोबत राहू शकेल.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल संपूर्ण जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शहर प्रमुख नाना भानगिरे आणि शिवसेना कार्यकर्त्यांना जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नाना भानगिरे, सुधीर जोशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आज तातडीने कुटुंबाला भेट दिली. या भेटीत त्यांच्या कायदेशीर आणि पुनर्वसनासंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. कुटुंबाने दिलेला अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पुणे महापालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात येणार असून, त्या सर्व बाबींचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

भेटीदरम्यान त्यांनी एक भावनिक क्षणही सांगितला की, आज आसावरीचा निकाल लागला तेव्हा तिचे वडील तिच्यासोबत जेवायला असायचे, परंतु या वेळी ते अनुपस्थित होते, ही भावना सर्वांना हेलावून गेली. हा जो घाला भारतावर झालेला आहे, त्याचे उत्तर दोषींना केंद्रसरकारने दिले तरी जोपर्यंत पाकिस्तानी वा ईतर दहशतवाद चालु राहिल तोपर्यंत न्यायासाठी लढाई चालूच राहील त्यात भारताय यश मिळावे , अशी ईश्वरचरणी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या प्रकरणाचा न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा थांबणार नाही, असा संकल्पही यावेळी करण्यात आला.

महायुतीमध्ये आमच्या पक्षावर अन्याय, रामदास आठवलेंनी व्यक्त केली खंत

आमच्यावर अन्याय होतोय ही खरी गोष्ट आहे. मला एकट्याला मंत्रिपद मिळाले असले तरी माझ्या कार्यकर्त्यांना देखील सत्तेचा सहभाग मिळायला हवा. शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडी बरोबर असताना आमचे 6 ते 7 जण विधान परिषदेवर होते, 3 ते 4 मंत्री देखील झाले होते. त्यामध्ये मी मंत्री झालो, शेगावकर मंत्री झाले होते, दयानंद म्हस्के मंत्री झाले होते, मुंबईत आमचा महापौर झाला होता. पुण्यात देखील आमचा उपमहापौर झाला होता. त्या काळात आम्हाला अनेक ठिकाणी सत्ता मिळाली. मात्र, आता महायुतीच्या काळात आरपीआयला सत्ता मिळत नाही अशी परिस्थिती असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

मुंबई-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे. महायुती सरकारमध्ये आरपीआयला एकही मंत्रिपद न मिळाल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातील अनुभवाची आठवण करून दिली. आता महायुतीच्या काळात आमच्या पक्षाला सत्ता मिळत नाही. मात्र, शरद पवारांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाला सत्ता मिळायची. आता महायुतीमध्ये आम्ही असूनही आमच्यावर अन्याय होत आहे, असे रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

रामदास आठवले यांनी याआधीही महायुतीकडून होणाऱ्या वागणुकीवर नाराजी दर्शवली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरपीआयने दोन जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना एकही जागा मिळाली नाही. त्याचप्रमाणे, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आणि विधानपरिषदेत देखील आरपीआयला एकही जागा मिळाली नव्हती. तेव्हा देखील आठवले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती.

आज आमची अडचण अशी आहे की आता मला एक मंत्रिपद मिळालेले आहे. पण माझ्या पक्षाचा एकही खासदार किंवा आमदार नाही. तरीही माझ्या पक्षाची जी काही छोटी-मोठी ताकद आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती आहे. त्यामुळे मला तीन वेळा त्यांनी मंत्रिमंडळात घेतले. मात्र, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. दिल्लीतही काही पद मिळत नाही आणि महाराष्ट्रात नाही, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

पुण्याला आणखी पाच नवीन सायबर पोलीस ठाण्यांची गरज -आमदार हेमंत रासने

पुणे-

सायबर गुन्ह्यांमधील वाढती संख्या आणि प्रलंबित प्रकरणे लक्षात घेता, पुण्यातील सध्याचे एकमेव सायबर पोलीस ठाणे हे अपुरे पडत असून, पाचही परिमंडळामध्ये प्रत्येकी एक सायबर ठाणे निर्माण करावे अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

पुण्यातून अमेरिकन नागरिकांना “डिजिटल अरेस्ट”च्या बनावट धमक्या देत गिफ्ट कार्डच्या माध्यमातून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या खराडी येथील एका बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. पुणे शहरातील सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे.
सन 2022 मध्ये 10 हजार 692 सायबर गुन्ह्यांची नोंद झाली, 2023 मध्ये ही संख्या 11 हजार 974 होती तर 2024 मध्ये तब्बल 12,954 गुन्ह्यांची नोंद झाली होती. याचाच अर्थ सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी केवळ 6,204 (2022), 7,069 (2023) आणि 1,739 (2024) गुन्ह्यांचाच न्यायालयीन निकाल लागलेला असून उर्वरित प्रकरणे अद्याप प्रलंबित असल्याकडे रासने यांनी लक्ष वेधले.

त्यासाठी पुण्यातील पाच परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक अशी पाच सायबर पोलीस ठाणी स्थापन केल्यास सायबर गुन्ह्यांची जलद आणि तांत्रिक तपासणी शक्य होईल. तसेच अतिरिक्त पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, ई-ऑफिस प्रणालीद्वारे सायबर पोलीस ठाण्यांचे आधुनिकीकरण करावे, प्रशिक्षित मनुष्यबळाची भरती करावी अशा मागण्याही रासने यांनी आपल्या पत्रात केल्या आहेत.

बाल पुस्तक जत्रेचे मॉडेल राज्यभरनेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेणार-शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे

0

पुणे : सध्याच्या मोबाइल आणि एआयचा काळात मातीशी नाळ तुटणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी मुलांना पुस्तकांकडे, वाचनाकडे वळवणे महत्त्वाचे आहे. त्या दृृष्टीने बालपुस्तक जत्रा पुण्यापुरती राहू नये. बालपुस्तक जत्रेचे प्रारुप विभाग, जिल्हा, तालुका पातळीवर नेण्यासाठी शिक्षण विभाग पुढाकार घेईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी केली.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, संवाद पुणे यांच्यातर्फे गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित पुणे बालपुस्तक जत्रा कार्यक्रमात भुसे बोलत होते. राष्ट्रीय पुस्तक न्यासचे विश्वस्त आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक श्री राजेश पांडे, बालभारतीचे संचालक श्री. कृष्णकुमार पाटील, किशोर मासिकाचे संपादक श्री.किरण केंद्रे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य श्री सागर वैद्य, श्री.प्रसेनजित फडणवीस, संवाद पुणेचे श्री.सुनील महाजन या वेळी उपस्थित होते. याच कार्यक्रमात किशोर मासिकाच्या अंकासह साने गुरुजी, श्यामची आई या इंग्रजीत अनुवादित पुस्तकांचे प्रकाशन भुसे यांच्या हस्ते झाले.

श्री दादाजी भुसे म्हणाले, पुणे बालपुस्तक जत्रा हा नवीन प्रयोग निर्माण झाला. त्यातून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकायला मिळाले आहे. हे प्रारुप राज्य, जिल्हा पातळीवर नेण्याचा शिक्षण विभाग प्रयत्न करेल. संयुक्त पद्धतीने राज्यभर आयोजन करण्यात येईल. शिक्षण विभाग राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी काम करत आहे. हसतखेळत शिक्षण, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. आताच्या काळात आर्थिक परिस्थिती असलेले पालक मुलांना इंग्रजी, इतर माध्यमांत शिकवतात. दुसरीकडे जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये गोरगरीबांची मुले जातात. त्यातून एकप्रकारची दरी निर्माण होत असल्याचे दिसते. मात्र, गोरगरीब मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. त्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास देशपातळीवर व्यापक पातळीवर शिकवला गेला पाहिजे ही मागणी त्यांनी लगेचच मान्य करून तत्काळ अंमलबजावणीचे निर्देशही दिले. तसेच अभिजात दर्जा मिळालेली मराठी इतर माध्यमांत सक्तीची केली पाहिजे अशी मागणी केली. त्यानुसार सीबीएसईने महाराष्ट्रात मराठी शिकवण्याचे निर्देश दिले आहेत. आणखीही काही विषयांत केंद्राचे सहकार्य मिळणार आहे. राज्यात पहिली ते बारावीचे दोन कोटी बारा लाख विद्यार्थी, सात लाख शिक्षक, अनेक संस्था आहेत. शिक्षण हे फार मोठे क्षेत्र आहे. जितके चांगले काम करता येईल त्यासाठी प्रयत्न आहे. येत्या वर्षभरात सकारात्मक बदल दिसतील, असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.

पुणे बालपुस्तक जत्रेला
२५ हजारांहून अधिक मुलांनी भेट
बालपुस्तक जत्रा हा प्रयोग पहिल्यांदा केला आहे. अशी जत्रा महाराष्ट्रात, देशात कुठेही होत नाही. खेळ, पुस्तके, खाऊ हे सगळे येथे मुलांना एका ठिकाणी उपलब्ध झाले आहे. पुणेकरांनी आणि मुलांनी या जत्रेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. तीन दिवसांत २५ हजारांहून अधिक मुलांनी जत्रेला भेट दिली. त्यामुळे येत्या काळात मुलांच्या भावविश्वाला ही जत्रा आकार देईल असा विश्वास आहे, असे श्री.राजेश पांडे यांनी सांगितले.