Home Blog Page 2927

पुरस्कारामुळे अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते -डॉ. डी. वाय. पाटील

पुणे, ता. २९ ः पुरस्कारामुळे जबाबदारी वाढते आणि अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते असे मत माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केले.

श्री आदिशक्ती फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा विद्यमान (ओळख पुण्याची) आणि भावी विद्यमान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. पाटील मार्गदर्शन करीत होते.

डॉ. पाटील पुढे म्हणाले, ‘समाजात चांगले काम करणार्‍या व्यक्तींना पुरस्कार दिल्याने चांगल्या गुणांचा गुणगौरव होतो. समाजात आपला ठसा उमटवू इच्छिणार्‍या नवोदितांना काम करण्यांना काम करण्याची दिशा मिळते.’

डॉ. डी. वाय. पाटील, उद्योजक अरुण फीरोदिया, चित्रकार रवी परांजपे, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) बी. टी. पंडित, सराङ्ग हरी शंकर नगरकर, पंडित वसंतराव गाडगीळ, शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नाईक, अभिनेत्री लीला गांधी, पुरातत्त्व तज्ज्ञ डॉ. गो. ब. देगलुरकर, जाहिरात क्षेत्रातील डॉ. दीनकर शिलेदार यांना ‘आदिबंध’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आदिबंध २०१९ या विशेषअंकाचे प्रकाशन करण्यात आले

उद्योजक शंकर बडवे, अशोक चाफेकर, अपर्णा जोशी, डॉ. योगेश चांदोरकर, डॉ. पुष्पराज करमरकर, सागर व मंदार कौशिक, उमेश व योगेश भाटे, नितीन भागवत, जब्बार शेख. काशिनाथ जाधव, महेंद्र व अनिल पाटील, दत्तात्रय काळे यांचा भावी विद्यमान पुणेकर म्हणून सन्मानित करण्यात आले.

आदिशक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष दत्ता पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मंदार बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश शिंदे, संदीप शेळके, ऍड सतीश कांबळे, ऍड यशवंत खंडागळे, किशोर सरपोतदार, अजित कुमठेकर, गिरीश परांजपे, शैलेश सावळेकर, गोविंद हर्डीकर, आर. टी. कुलकर्णी, विकास पाटील, संतोष भरते, अजित भाकरे, जयदीप कुटे यांनी संयोजन केले.

पुणे जिल्ह्यात 458 कृषिपंपांना वीजजोडणी-5 हजार 894 शेतकऱ्यांना वीजपुरवठा

0

मुंबई, दि. 29 मे 2019 : राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना शाश्वत वीजपुरवठा मिळावा, या उद्देशाने जाहिर करण्यात आलेल्या उच्चदाब वीज वितरण प्रणालीचे कामे आता प्रगतीपथावर असून राज्यात आतापर्यंत सुमारे 5 हजार 894 शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे 2017 मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीजपुरवठा देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या अभिनव संकल्पनेला ऊर्जामंत्री ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे व महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी या योजनेच्या माध्यमातून गती दिली. त्यानुसार मार्च 2018 अखेर पैसे भरून प्रलंबित असणाऱ्या 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या प्रणालीद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांना वीजपुरवठा करण्यासाठी सरासरी 2 लाख 50 हजार रूपयांचा अंदाजित खर्च येणार असून 2.50 लाखांपेक्षा जास्त खर्च असणाऱ्या 33 हजार शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेद्वारे वीजपुरवठा देण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यात उच्चदाब वीज वितरण प्रणालीद्वारे 7702 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात येणार असून आतापर्यंत 458 कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आली आहे. उच्चदाब वीज वितरण प्रणाली राबविण्याकरिता राज्यात 5 हजार 48 कोटींचा खर्च होणार आहे. या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना वीजपुरवठा देण्यासाठी प्रामुख्याने 10 व 16 केव्हीएचे सुमारे 1 लाख 30 हजार इतक्या मोठ्या प्रमाणात रोहित्र लागणार आहेत. रोहित्रांची डिझाईन व टाईप चाचणीची मंजुरी मिळविणे, एवढ्या मोठ्या संख्येने रोहित्रांच्या निर्मितीसाठी सामान व साहित्याची पूर्वतयारी करणे अशा काही तांत्रिक अडचणीमुळे उच्चदाब वीज वितरण प्रणालीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत थोडा विलंब झालेला आहे.

राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात येत असलेल्या या प्रणालीची कामे आता जोमाने सुरू झाली आहेत. या प्रणालीचे कामे जलद व उच्चदर्जाची व्हावीत यासाठी महावितरणने देशभरातील नामांकित कंपन्यांना आवाहन केले असून व्होल्टाससहित नामांकित कंपन्यांनी प्रणालीच्या निविदांना मोठा प्रतिसाद दिला आहे. ही योजना फूल-ट्रंकी व पार्शियल-ट्रंकी अशा दोन प्रकारे राबविण्यात येत असून काही जिल्ह्यांमध्ये महावितरण रोहित्रे देणार असून उर्वरित कामे एजन्सींना करावयाची आहेत. यामध्ये 600 एजन्सींना कामे मिळाली आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये रोहित्रांसह 100 टक्के कामे एजन्सीना देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात या प्रणालीतील कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गती येणार असून या प्रणालीतील कामे निर्धारित वेळेनुसार मार्च-२०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन महावितरणने केले आहे.

या योजनेमुळे शेतकऱ्यांना दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार असून 1 किंवा 2 शेतकऱ्यांसाठी समर्पित रोहित्र राहील. शेतकऱ्यांमध्ये रोहित्राप्रती स्वामित्वाची भावना राहणार असून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात वाढ होईल. लघू व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांसाठी या योजने अंतर्गत सिंचनाची उद्दिष्टपूर्ती साधता येईल. तसेच रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होऊन तांत्रिक व वीजहानीचे प्रमाण कमी होईल.

राज्यात सहा हजार टँकर्सद्वारे साडेपंधरा हजार गावांना पाणी

0

मुंबई, दि. 28 : राज्यातील जलाशयांमध्ये केवळ 13 टक्के साठा शिल्लक राहिल्यामुळे दुष्काळाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपाययोजना राबविण्यात येत असून 4920 गावे व 10506 वाड्यांमध्ये 6209 टँकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. राज्यात शेळ्या-मेंढ्यांसह मोठ्या व लहान जनावरांसाठी दीड हजार चारा छावण्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना साडेचार हजार कोटींच्या मदतीचे वाटप करण्यासह विद्युत शुल्कात सवलत, शैक्षणिक शुल्क माफी, कर्जवसुलीस स्थगिती अशा सर्व आघाड्यांवरील उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.

राज्यातील 28 हजार 524 गावांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला असून त्यातील 17 हजार 985 गावांना दुष्काळी अनुदान वाटप करण्यात आले आहे. तसेच उर्वरित 10 हजार 539 गावांना इतर आठ सुविधा लागू करण्यात आल्या आहेत. वर्ष 2018 ची लोकसंख्या व पशुधनाची संख्या विचारात घेऊन टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. टँकर मंजुरीचे अधिकार उपजिल्हाधिकाऱ्यांना व चारा छावणी मंजूर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागणी होताच ताबडतोब टँकर व चारा छावणी मंजूर करण्यात येते.

राज्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दीर्घ व अल्प स्वरुपाच्या विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा स्तरावर टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात उप जिल्हाधिकाऱ्याचा नियंत्रणाखाली टंचाई नियंत्रण व समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला आहे. खाजगी विहीर अधिग्रहणाचे दर वाढविण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणासाठी अधिग्रहित केलेल्या विहिरींच्या मोबदल्याचे दर सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार अधिग्रहित पाण्याच्या स्त्रोतामधून टँकर भरण्यासाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याकरिता 12 रुपये प्रति हजार लिटर असा ठरविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिझेल किंवा विद्युत पंपाशिवाय प्रतिदिन 450 रुपये तसेच डिझेल किंवा विद्युत पंपासहित 600 रुपये असे करण्यात आले आहेत. विहीर, तलाव उद्भवावरुन टँकर भरण्यासाठी डिझेल जनरेटरच्या भाड्याचा तसेच डिझेलचा खर्च टंचाई निधीतून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे टंचाई अंतर्गत उपाययोजनांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास निविदेचा कालावधी कमी करण्यात आला आहे. टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठ्यासाठी अन्य गावाच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतून पिण्याच्या पाण्याचे टँकर्स भरले जातात, अशा प्रकरणी वाढीव विद्युत देयक टंचाई निधीमधून देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

टँकर्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार वाहनाच्या एक मेट्रीक टनाकरिता दुर्गम व अतिदुर्गम भागासाठी प्रतिदिन भाडे 338 रुपये प्रति 4.30 कि.मी. प्रमाणे तसेच सर्वसाधारण भागासाठी प्रतिदिन 270 रुपये  प्रति 3.40 कि.मी. असे करण्यात आले आहे. टंचाई अंतर्गत निधी वितरित करण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली असून पाणी पुरवठा विभागाकडून विभागीय आयुक्तांकडे व त्यांच्याकडून जिल्हापरिषदेकडे तसेच मजीप्राकडे प्रदान करण्यात येणारा निधी पाणी पुरवठा विभागाकडून थेट वितरीत करण्यातबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पिण्याच्या पाण्याच्या टंचाई अंतर्गत तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना व नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीच्या 10 टक्क्यांपर्यंतच्या जादा दराच्या निविदा स्वीकृतीचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयीन स्तरावरील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकाऱ्‍यांच्या पथकाकडून टँकरग्रस्त गावांचा आढावा घेण्यात येणार आहे.

टँकरव्दारे पाणी पुरवठा वितरणातील अनियमितता टाळण्यासाठी व कार्यक्षमरित्या संनियंत्रणाच्या दृष्टीने जी.पी.एस. प्रणाली बाबतच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या स्तरावर देण्यात आल्या आहेत. टँकरव्दारे पाणी पुरवठा करताना संबंधित गावे-वाड्या-नागरी क्षेत्रातील कायमस्वरुपी अस्तित्वात असलेल्या सध्याच्या लोकसंख्येनुसार दरडोई दरदिवशी ग्रामीण भागासाठी 20 लिटर तसेच मोठ्या जनावरांसाठी 35 लिटर व लहान जनावरांसाठी 10 लिटर व शेळ्या मेंढ्यांसाठी 3 लिटर पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

दुष्काळातील बाधित शेतकऱ्यांना कृषिविषयक मदत वाटप करण्यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या मदतीपैकी 4562 कोटी 88 लाख रुपयांची मदत राज्याकडे वर्ग केली आहे. राज्य शासनाने 67 लाख 30 हजार 865 शेतकऱ्यांना आतापर्यंत 4508 कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप केले आहे. शेतकऱ्यांना चालू वीज बिलात दिलेल्या 33.5 टक्के सुटीप्रमाणे 673 कोटी 41 लाखाची सवलत देण्यात आली आहे. राज्यातील थकीत विद्युत देयके न भरल्यामुळे बंद असलेल्या पाणी पुरवठा योजनांची विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात आली असून नोव्हेंबर 2018 ते जून 2019 अखेरची विद्युत देयके शासनाकडून भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विद्युत देयकांसाठी मार्च 2019 अखेरपर्यंत 132 कोटी 30 लाख इतका निधी खर्च झाला आहे.

दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्यासाठी 1501 ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये 8 लाख 94 हजार 495 मोठी आणि 1 लाख 9 हजार 919 लहान अशी एकूण 10 लाख 4 हजार 684 जनावरे आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (NDRF) निकषापेक्षाही जास्त दराने मदत देण्यात येत असून मोठ्या जनावरांना प्रतिदिन 100 रुपये तर लहान जनावरांना प्रतिदिन 50 रुपये देण्यात येतात. चारा छावणीत दाखल झालेल्या जनावरांच्या उपस्थितीसाठी आठवड्यातून एकदा स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चारा छावणी चालकांना मागणीप्रमाणे निधी वितरित करण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्तांना 111 कोटी 87 लाख, पुणे विभागीय आयुक्तांना 3 कोटी 79 लाख आणि नाशिक विभागीय आयुक्तांना 46 कोटी 81 लाख निधी वर्ग करण्यात आला आहे.

जलाशयांमध्ये 13 टक्के साठा

राज्यातील जलाशयात 27 मे 2019 अखेर 13.1 टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 23.14 टक्के साठा होता. यावर्षी आणि गेल्या वर्षीचा तुलनात्मक पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. सर्वाधिक जलसाठा कोकण विभागात 33.69 टक्के (39.71) इतका उपलब्ध आहे. तसेच पुणे विभागात 12.6 टक्के (25.05), नाशिक विभागात 13.29 टक्के (23.09), अमरावती विभागात 20.1 टक्के (18.87), नागपूर विभागात 8.85 टक्के (12.43) आणि औरंगाबाद विभागात 2.86 टक्के (20.46) इतका साठा उपलब्ध आहे.

राज्यात 6209 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा

राज्यात 27 मे 2019 अखेर एकूण 6209 टँकर्सद्वारे 4920 गावे आणि 10506 वाड्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. यात औरंगाबाद विभागातील सर्वाधिक 2286 गावे आणि 785 वाड्यांना 3233 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर नाशिक विभागात 1066 गावे आणि 4020 वाड्यांना 1377 टँकर्स, पुणे विभागात 853 गावे आणि 4958 वाड्यांना 1000 टँकर्स, अमरावती विभागात 401 गावांमध्ये 424 टँकर्स, कोकण विभागात 274 गावे आणि 743 वाड्यांना 125 टँकर्स आणि नागपूर विभागात 40 गावांना 50 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

प्रभात फिल्म कंपनीचा ९० वा वर्धापनदिन ..1 जून ला …

भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात ‘प्रभात पर्व’ सुवर्णा अक्षरांत नोंदवलं गेलं आहे. पार्वतीबाई दामले ह्यांनी स्थापनेचा मंगल कलश १ जून १९२९ रोजी  ठेवला. ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ मध्ये बाबूराव आणि आनंदराव पेंटर ह्यांच्या हाताखाली चित्रपट निर्मितीचे धडे घेणाऱ्या दामलेमामा, एस फत्तेलाल, व्ही शांताराम आणि धायबर यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’ सोडली. स्वत:ची चित्रपटनिर्मिती कंपनी सुरु करण्याचा ध्यास सर्वांना लागून राहिला होता. कोल्हापूरातील सुप्रसिद्ध सराफी पेढीचे सितारामपंत कुलकर्णी ह्यांची दामलेमामांशी जुनी मैत्री होती. आणि त्यांचा दामलेमामांवर विश्वास होता. त्याकाळात सितारामपंतानी दामल्यांना भांडवल देऊ केलं. दामले– फत्तेलालांबरोबर शांताराम व धायबरही एकत्रित झाले, आणि ‘प्रभात’ची स्थापना १ जून १९२९ रोजी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत झाली. आज ‘प्रभात’च्या स्थापनेस ९० वर्ष होत आहेत.

१९२९ ते १९३२ ह्या दरम्यान प्रभातकारांनी सहा मूकपटांची निर्मिती केली. तर १९३२ साली ‘अयोध्येचा राजा’ ह्या बोलपटाची निर्मिती केली. आजमितीस भारतीय चित्रपटसृष्टीतला हा सर्वात जुना बोलपट सुस्थितीत जतन केला गेला आहे. १९३४ साली प्रभातचं पुण्यातील प्रभातनगर येथे स्थलांतर झालं. दामलेमामांच्या देखरेखेखाली प्रभातची वास्तू उभी राहिली. त्याकाळात आशियातील सर्वात मोठा स्टुडिओ अशी ‘प्रभात’ ची ख्याती होती.

१९३२ ते १९३४ दरम्यान ‘प्रभात’ने ६ बोलपटांची निर्मिती केली. प्रभातचे नाव सिनेजगतात आणि रसिकांमध्ये सुपरिचित झालं. तर १९३३ मध्ये ‘प्रभात’ने भारतातील पहिला रंगीत बोलपट ‘सैरंध्री’ निर्माण केला. आजमितीस  २०१९ साला मध्ये सदर ‘प्रभात’ च्या वास्तू मध्ये ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ मोठ्या दिमाखात उभी आहे. तेथील विद्यार्थी आम्हाला भेटतात तेव्हा प्रत्येकजण भारावल्यासारखा बोलतो. कौतुक आणि आदराने सगळेजण बोलतात ते ‘संत तुकाराम’ बद्दल. आणि १९३४ साली दामले मामांनी कोणत्या विचारानी हा स्टुडिओ उभारला? त्यांना शतश: प्रणाम.

१९३४ ते १९५७ हा ‘प्रभात चा पुण्यातील कालखंड. त्या दरम्यान २६ बोलपटांची निर्मिती झाली.पैकी ९ बोलपटांनी इतिहास घडवला. जागतिक चित्रपटसृष्टीमध्ये ह्या बोलपटांची दखल घेतली गेली.

१९५७ साली प्रभात बंद झाली. १९५७ ते १९५९ ह्या  कालावधीत एस.एच केळकर ह्यांनी प्रभात चालवली. पुढे १९६१ साली भारतीय सरकारने ही कंपनी विकत घेऊन ‘फिल्म अँड टी व्ही इन्स्टिट्यूट’ची स्थापना  झाली. दामले मामांचे एक स्वप्न होतं की ‘प्रभात’मध्ये चित्रपट निर्मितीचं प्रशिक्षण द्यावं. प्रभात मध्ये हे साध्य झालं नव्हते, पण त्यांनी उभारलेल्या वास्तूमध्ये ‘एफ. टी.आय.आय’ दिमाखात उभं आहे.

१९५७ साली ‘प्रभात’ च्या अस्तानंतर सर्व चित्रपटांचे  हक्कही विकले गेले. ‘प्रभात’ चा हा सर्व अमूल्य खजिना हळुहळू पडद्यामागे जाऊ लागला. भारतीय चित्रपटांचा हा इतिहाससुद्धा पुसट होत गेला. एक वेळ अशी आली की, ‘प्रभात’चे हे जगविख्यात चित्रपट पहायचे  कसे?  १९६९ साली उत्तम योग जुळून आला. माझे वडिल अनंतराव दामले ह्यांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांचे हक्क परत मिळवले. त्यानंतर गावोगाव  सदर चित्रपटांचे आठवड्याच्या आठवडे प्रदर्शन  होऊ लागले. रसिकांना हा ठेवा परत  मिळाला. ‘प्रभात’ पर्वाची परत सुरुवात झाली. बदलत्या काळानुरूप व्हिडिओ, डीव्हीडी आम्ही दामले कुटुंबियांनी बनवल्या.  ‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ फोटो,कागदपत्रे चित्रपट ह्या सर्व ठेव्याचं डीजीटायझेशन व संवर्धनाचे काम आम्हा दामले कुटुंबियांतर्फे आजमितीस सुरु आहे.

अरुणाताई दामले (माझ्या आई) यांनी अनेक वर्ष प्रभात गीते कार्यक्रम सादर करून प्रभातच्या अवीट गाण्यांचा आस्वाद रसिकांना दिला. अरुणाताईंनी लिहिलेल्या ‘मराठी चित्रपट ‘संगीताची वाटचाल’  ह्या अभ्यास ग्रंथाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.

दामले कुटुंबियांतर्फे निर्मित दोन माहितीपटांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ‘इट्स प्रभात’ हा माहितीपट ‘प्रभात’च्या ७५ व्या स्थापनेच्या वर्धापन वर्षी म्हणजे २००४ साली निर्माण केला होता. तर २०१२ साली ‘विष्णुपंत दामले’ बोलपटांचा मुकनायक हा माहितीपट निर्माण केला. प्रभातची धुरा पुढे नेताना ह्या तीन राष्ट्रीय पुरस्कारांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

अलीकडे नव ‘प्रभात स्टुडिओ’ ह्या नावाने सुरु केलेल्या उपक्रमांमार्फत माहितीपटांचं संकलन केलं जातं आहे. प्रभातकारांनी १५ लघुपटांची / माहितीपटांची निर्मिती केली होती. त्यापैकी काही लघुपट जतन करून आम्ही त्याच्या डीव्हीडी तयार केल्या आहेत. एक काळ असा होता की,  चित्रपटक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकारास तंत्रज्ञांना ‘प्रभात’ मध्ये काम मिळवून काही तरी नवीन शिकायला मिळेल. ह्यासाठी यावसं वाटायचं. प्रभातकारांनी अनेक सामान्य माणसांतून अचूक निवड करून अनेक कलाकार घडवले. ही एक चित्रपटक्षेत्रास ‘प्रभात’ने दिलेली देणगीच होती. देव आनंद या सुप्रसिद्ध कलाकाराचं चित्रपटसृष्टीत  पदार्पण १९४६ साली  प्रभातच्या ‘हम एक है’ ह्या चित्रपटातून झालं.

५/६वर्षापूर्वी आम्ही ‘मादागास्कर’ बेटावर गेलो होतो. तेथील विशेष प्राणी ‘लेम्युर’ पहाण्यास एका अभयारण्यात गेलो. तिथे ‘लेम्युर’ प्राण्यावर थ्री.डी फिल्म बनवण्याचं शूटिंग सुरु होतं. त्यामुळे तीन दिवस तेथे जाण्यास कोणालाच परवानगी नव्हती. आम्ही खजिल झालो. तेव्हा  माझी पत्नी  तेथील एका महिला अधिकाऱ्यास म्हणाली आम्ही भारताहून हा खास प्राणी पाहण्यास आलो आहोत. माझा नवरा अनिल दामले हा भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहे. त्याच्या आजोबांनी ‘संत तुकाराम’ ‘संत ज्ञानेश्वर’ असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. ते ऐकून ती  महिला (तीच नाव पॅट्रोशीया राईट)खुर्चीत उठून उभी राहिली. मोठ्या आदरपूर्वक आवाजात म्हणाली आमच्या केलीफोर्निया येथील फिल्म मेकिंग कोर्समध्ये प्रभातचा ‘संत तुकाराम’ हा चित्रपटांत प्रथम दाखवतो. तुम्ही त्या प्रभातच्या दामले कुटुंबियातील आहात म्हणत तिचा एक सहकारी आमच्याबरोबर दिला. व अभयारण्यात जाण्याची परवानगी दिली. प्रभात महिमा अजूनही टिकून आहे. आणि तो असाच कायम राहील कारण ‘प्रभात’च्या त्या अजरामर कलाकृती !

प्रभातचा महिमा आणि जादू इतकी जबरदस्त होती की,  देशभरात गावोगावी ‘प्रभात’ नावाची अनेक सिनेमा थिएटर्स अस्तित्वात आली. आजही प्रत्येक मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची  सुरुवात ‘प्रभात’ मधील ‘लख लख चंदेरी’ गाण्याने होते’.

‘प्रभात’ च्या ९० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाच्या पाऊलखुणा :

१. १९३० – बालकलाकारांची प्रमुख भूमिका असणारा ‘बजर बट्टू’  हा भारतातील पहिला चित्रपट.

२. १९३२ – मराठीतील पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा.’

३. १९३३ – ‘प्रभात’च्या ‘जलती निशानी’ हा चित्रपट अफ्रिकेत प्रदर्शित झाला.

– भारतातील पहिला रंगीत चित्रपट ‘सैरंध्री’ची निर्मिती.

– ‘सिंहगड’ चित्रपटाच्या पुस्तिकांसाठी एम.एफ.हुसेन यांनी चित्र रंगवली आहे.

४. १९३५ – अमृतमंथन’ चित्रपट व्हेनिस चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला.

– ‘प्रभात’च्या ‘धर्मात्मा’ चित्रपटात बालगंधर्वांनी संत एकनाथांची भूमिका केली होती.

५. १९३६ – ‘प्रभात’ निर्मीत आणि दामले-फत्तेलाल दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ चित्रपटास व्हेनिस चित्रपट महोत्सवात

‘जगातील ३ उत्कृष्ट चित्रपटांतील एक असा सन्मान मिळाला. भारतीय चित्रपटसृष्टीतील हा पहिला चित्रपट

ज्याला आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला.

 

– ‘अमरज्योती’ चित्रपटातून भारतीय पडद्यावर दर्यावर्दी जीवनाची पार्श्वभूमी या चित्रपटातून प्रथम दिसली.

‘संत तुकाराम’ चित्रपटांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अनेक विक्रम केलेत. सलग ५७ आठवडे हा

चित्रपट चालला. आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा हा पहिला भारतीय चित्रपट.

 

६. १९३७ – ‘कूंकु चित्रपटातील एका गाण्यात पार्श्वसंगीताचा वापर न करता गाणं चित्रित केलं. भारतातील हा पहिला प्रयोग होता.

– ‘कुंकू’ ह्या प्रभातच्या मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदाच इंग्रजी भाषेमध्ये गाणं चित्रित केलेले हा देखील

मराठीतील पहिलाच प्रयोग होता.

 

७. १९३८ – ‘दुनिया न माने’ चित्रपट व्हेनिस येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत प्रदर्शित. ह्याच चित्रपटास ‘गोहर

गोल्ड मेडल’ मिळालं.

 

८. १९३९ – ‘माणूस’ चित्रपटात बहुभाषिक गाणी चित्रित केलं हा सुद्धा पहिलाच प्रयोग होता.

९. १९४१ – ‘संत ज्ञानेश्वर’ चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला हा भारतातला पहिला चित्रपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.

१०. १९४२ – व्ही. शांताराम ह्यांनी प्रभात सोडलं.

११. १९४५ – दामले मामांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन.

१२. १९४६ – ‘प्रभात’ निर्मित ‘हम एक है’  ह्या चित्रपटातून देव आनंद ह्यांचं चित्रपटसृष्टीत पदार्पण.

१३. १९५७ – ‘प्रभात’ कंपनी एस.एच.केळकर ह्यांनी विकत घेतली.

१४. १९५९ – केळकरांनी कंपनी भारत सरकारला विकली.

१५. १९६१ – एफ.टी.आय.आय ची स्थापना.

१६. ‘प्रभात’च्या सर्व चित्रपटांचे हक्क अनंतराव दामले (माझे वडील) श्री. मुदलियार ह्यांकडून परत मिळाले. स्टुडिओचा

अस्त झाल्यापासून १२-१४ वर्ष हे जगप्रसिद्ध चित्रपट काळाच्या आड गेले होते. त्यानंतर अनेक गावांतून सिनेमा

थिएटरमध्ये प्रभातचे बोलपट दाखवण्यात आले. ‘प्रभात’ पर्वाची पुन्हा सुरुवात झाली. बदलत्या कालानुरूप व्हिडीओ

कॅसेट्स, डीव्हीडी अशा माध्यमात या चित्रपटांचे जतन व संवर्धन प्रभातच्या दामले कुटुंबियांतर्फे केलं जात आहे.

‘प्रभात’ काळातील अनेक दुर्मिळ पत्र, लेख, फोटो ह्या सर्वांचा सांभाळ करून डिजिटायझेशनचं काम सुरु आहे.

अरुणाताई दामलेंनी (माझी आई) अनेक वर्ष ‘प्रभात गीते’ कार्यक्रम सादर केला. जुन्या व नव्या तरुण पिढीला ह्या

सुमधुर अवीट गोडीच्या गाण्यांचा खजिना सादर केला. पुढे अरुणाताईंच्या ‘मराठी चित्रपट संगीताची वाटचाल’ या

अभ्यासग्रंथास राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला तर दामले कुटुंबातर्फे निर्मित दोन माहितीपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त

झाले. २००५ साली ‘It’s Prabhat’ व २०१२ साली ‘विष्णुपंत दामले बोलपटांचा मूक नायक’ या दोन्ही माहितीपटांना

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. अलीकडे नवप्रभात स्टुडिओ’ ह्या उपक्रमांतून दामले कुटुंबीय शॉर्ट फिल्म्सच्या

संकलनाचा उपक्रम करत आहेत.

 

१७. १९७२ – मुंबई दूरदर्शन वरील मराठी चित्रपट प्रक्षेपणाचा मुहूर्त १९४० साली ‘प्रभात’ ने निर्माण केलेल्या

‘संत ज्ञानेश्वर’ ह्या चित्रपटाने झाला.

 

चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत सर्वज्ञ सरोदे , श्रावी देवरे , अथर्व येलभर, रित्सा कोंदकर यांना विजेतेपद

पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील चौथ्या आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत  सर्वज्ञ सरोदे ,   श्रावी देवरे ,  अथर्व येलभर व  रित्सा कोंदकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत विजेतेपद पटकावले. 

मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लब, कोथरूड येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपदाच्या लढतीत सर्वज्ञ सरोदेने नील बोंद्रेचा 7-0 असा सहज पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात नील बोंद्रेने अचिंत्य कुमारचा टायब्रेकमध्ये 6-5(6) असा तर, दुसऱ्या सामन्यात सर्वज्ञने दुस-या मानांकीत क्रिशय तावडेचा 6-3 असा पराभव केला होता.  मुलींच्या गटात अव्वल मानांकीत श्रावी देवरेने सृष्टी सुर्यवंशीचा 7-4 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

10 वर्षाखालील मुलांच्या गटात बिगर मानांकीत अथर्व येलभर याने चौथ्या मानांकीत राम मगदुमचा 7-3 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. अथर्व हा म्हाळुंगे येथे जिल्हा परिषद शाळेत चौथी इयत्तेत शिकत असून ओडीएमटी येथे प्रशिक्षक मारूती राऊत व संतोष कु-हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. मुलींच्या गटात दुस-या मानांकीत रित्सा कोंदकरने चौथ्या मानांकीत आरोही देशमुखचा 7-5 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. रित्सा भुगाव येथे संस्कृती स्कुलमध्ये तिसरी इयत्तेत शिकत असून मेट्रोसिटी स्पोर्ट्स अँड हेल्थ क्लबमध्ये नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी येथे प्रशिक्षक नवनाथ शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण  मेट्रोसिटी ग्रुपचे सदस्य सुधिर धावडे, फिनआयक्यूचे प्रोजेक्ट मॉनेजर सागर पाषाणकर व फिनआयक्यूचे स्पोर्टस् मॉनेजर सुशील जोसेफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.     

स्पर्धेचा सविस्तर निकाल- 8 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी

नील बोंद्रे वि.वि  अचिंत्य कुमार 6-5(6)

सर्वज्ञ सरोदे वि.वि. क्रिशय तावडे(2)  6-3

अंतिम फेरी- सर्वज्ञ सरोदे वि.वि  नील बोंद्रे 7-0

8 वर्षाखालील मुली- उपांत्य फेरी  

श्रावी देवरे(1) वि.वि स्वरा जवळे(3) 6-2  

 सृष्टी सुर्यवंशी वि.वि  अनुष्का जोगळेकर 6-4

अंतिम फेरी- श्रावी देवरे(1) वि.वि सृष्टी सुर्यवंशी 7-4

10 वर्षाखालील मुले- उपांत्य फेरी 
अथर्व येलभर वि.वि  समिहन देशमुख 6-1

राम मगदुम(4)वि.वि  दक्ष पाटील(2) 6-3

अंतिम फेरी- अथर्व येलभर वि.वि  राम मगदुम(4) 7-3

10 वर्षाखालील मुली- उपांत्य फेरी   

आरोही देशमुख(4) वि.वि   प्रेक्षा प्रांजल  6-4

रित्सा कोंदकर(2) वि.वि  स्वानीका रॉय(3) 6-4

अंतिम फेरी-  रित्सा कोंदकर(2) वि.वि  आरोही देशमुख(4) 7-5

एक लाख सॅनेटरी नॅपकिन्स वाटप

पुणे-सॅनेटरी  नॅपकिन्स जागरुकता अभियानाच्या व्याख्यान देण्यात आले . या उपक्रमामध्ये प्रत्येक विद्यार्थीनीना  वर्षभराचे सॅनेटरी  नॅपकिन्स मोफत  वाटप करण्यात आले .

वर्ल्ड कार्पोरेट सोशल रिस्पॉंबिलिटी डे दिवशी मुंबई येथे हॉटेल ताज मध्ये झालेल्या जागतिक परिषदेमध्ये युग फाऊंडेशन  या पुण्यातील एकमेव सामाजिक संस्थेस पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले .

गेली दोन वर्षांपासून हे अभियान राबविण्यात येत असून १००० मुलींना एक लाख सॅनेटरी  नॅपकिन्स वाटप करण्यात आले . हे सामाजिक अभियान  यशस्वी करण्यासाठी युग फाऊंडेशनचे मुख्य समन्वयक कनव चव्हाण , युग फाऊंडेशनच्या अध्यक्ष कुणाल जेधे, विश्वस्त परी हमदुले , प्रतीक्षा चरण , गोपी कसोटे , ऍड. राहुल बालगोहिरे , मयुर चव्हाण , मिझबाह शरीफ , सिध्दांत सारवान , अक्षय चरण , तिरुपती रेड्डी , निकेत चव्हाण आदींनी विशेष परिश्रम घेतले .

जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस ‘मासिक पाळी स्वच्छता दिन’ म्हणून जाहीर केला आहे. यानिमित्त मासिक पाळी व्यवस्थापन उपक्रमाची माहिती, प्रसार तसेच जनजागृती करण्यात आली . सॅनेटरी नॅपकिनच्या वापराबद्दल मुली, महिलांमध्ये जागृती नसल्यामुळे त्यांना जंतुसंसर्गाची बाधा होते. सॅनेटरी नॅपकिन विकत घेण्याची परिस्थिती नसल्याने अनेक मुली-महिलाही कपड्यांचा वापर करतात. पुणे  येथील ‘ युग  फाऊंडेशन’च्या वतीने याच अडचणींवर मात करण्यासाठी  सॅनेटरी नॅपकिन्स वाटप व जागरुकता अभियान राबविले . मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती होण्यासाठी तसेच मासिक पाळीच्या कालावधीत स्वच्छतेची काळजी कशाप्रकारे घ्यावी याविषयी मार्गदर्शन या सामाजिक उपक्रमात राबविण्यात आले . 

मुठेश्वर मंडळातर्फे ” चैतन्यस्पर्श सोहळा ” उत्साहात प्रारंभ

पुणे-शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळातर्फे  भारतातील अकरा संताच्या पादुका ( साईबाबा , स्वामी समर्थ , गजानन महाराज शंकर महाराज रामास्वामी, टेबे स्वामी , रामदास स्वामी , ज्ञानेश्वर महाराज , दत्त गुरु करुणा पादुका ) तसेच सुवर्ण दत्त गुरु आणि पारद शिवलिंग अशा या चैतन्यमय संतांच्या पादुकांच्या व हस्त स्पर्शित वस्तूंच्या दर्शनाचा लाभ सर्व भाविकांनी होण्यासाठी  ” चैतन्यस्पर्श सोहळा ”  सिध्द हस्त योगी स्वामी उमेशानंदजी (हिमालयवासी)यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित  करण्यात आला.  हा कार्यक्रम शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळ , स्वामी ध्यान कुटी , पुणे येथे होत आहे .

    आज पहिल्या दिवशी सर्व पादुकांची नगर प्रदक्षिणा श्री साई रथातून शनिवार पेठेतील मुठेश्वर मंडळापासून ओंकारेश्वर मंदिर , रमणबाग ,केसरी वाडा वरून पुन्हा मुठेश्वर मंडळापाशी झाली  .

  बुधवार दिनांक  २९  मे २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत हा  ” चैतन्यस्पर्श सोहळा ” चालू राहणार आहे . सकाळी १० वाजल्यापासून अखिल भारतीय स्तरावरील गायक शैलेंद्र भारती , अजित कडकडे , देवेंद्र गंगाणी , शेखर खांजो  , व्हायोलिन वादक जोहर अली यांची गायन सेवा सादर करण्यात येणार आहे . तसेच याचदिवशी  महाप्रसाद , भजन , कीर्तन देखील होणार आहे . संध्याकाळी ८ ते ८.३० वाजता फ्युजन संगीताद्वारे ओंकार नादाची विश्वनादानुभूती सादर करण्यात येणार आहे .

राष्ट्रीय गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत आर्यमान सिंगची चमकदार कामगिरी

0

पुणे:  बंगळुरू येथे पार पडलेल्या आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 स्पर्धेत पुण्यातील गुणवान गोल्फपटू आर्यमान सिंग याने चमकदार कामगिरी केली. बंगळूर येथील क्लोव्हर ग्रीन्स येथे  20 ते 24 मे या कालावधीत पार पडलेल्या या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील अव्वल कुमार गोल्फपटूंनी सहभाग नोंदविला होता.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यमानने या स्पर्धेतील क गटात उपविजेतेपदाचा मान मिळवला.

आर्यमानने एकूण तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील की गटात 69, 71 व 68 अशा तीन फेऱ्यांमधील गुणांबरोबरच एकूण 2 अंडर पार अशा गुणांकाची नोंद करीत दुसरा क्रमांक पटकावला.  बंगळुरू येथे जाहली आयजीयू साऊथर्न इंडिया कुमार गोल्फ अजिंक्यपद 2019 ही स्पर्धा भारतातील सर्वोत्तम व प्रतिष्ठित अशा 4 कुमार गटाच्या  स्पर्धांमधील एक स्पर्धा मानली जाते. तसेच या स्पर्धेत पदक मिळविण्यात यशस्वी ठरलेला आर्यमान हा महाराष्ट्राचा एकमेव गोल्फपटू ठरला.

पुणे जिल्ह्याचा ६०,६३० कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर

पुणे -जिल्ह्याचा सन २०१९-२० या वार्षाचा ६०,६३० कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार
बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून या पत आराखड्याचे प्रकाशन
. जिल्हाधिकारी पुणे श्री.नवलकिशोर राम,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व प्रभारी अतिरिक्त सी ई ओ जिल्हा परीषद पुणे ,प्रभाकर गावडे यांचे हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र परीमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री.सुधीर कुलकर्णी, भारतीय रिझर्व बँकेचे एल.डी.ओ.
बी.एम.कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आनंद बेडेकर, आदी मान्यवर
यावेळी उपस्थित होते.
पत आराखाड्याची वैशिष्ट्ये सांगताना जिल्हाधिकारी श्री.नवलकिशोर राम म्हाणाले की हा पत आराखाडा ६०,६३० कोटीरुपयांचा असून
मागील वर्षापेक्षा तो ८ % टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी ३७,४६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती
एकून पतपुरवठ्याच्या 62% टक्के आहे. कृषी कर्जासाठी ६५५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता
कर्जापैकी १७ % टक्के एवढे आहे.कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती, फ़ुले व फ़ळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी

यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फ़लोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे. पतपुरवठा आराखाड्यात सुक्ष्म,लघु व मध्यम (एम.एस.एम.इ.) साठी २२९०८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी ८००९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती
सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामिण बँकेसह ४१ बँकांच्या १७९४ शाखांचा सहभाग आहे.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी दिनांक ३१.३.२०१९ अखेर प्राथमिकता क्षेत्रात रुपये ३५,१०८ कोटी रुपयांचे मागील आर्थिक वर्षात (२०१८-
१९) वाटप करून आराखड्याची 100% उदिष्ट पुर्ती केलेली आहे.
सदर उद्दिष्ठ पूर्तीसाठी जिल्हाधिकारी श्री.नवल किशोर राम यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक व सर्व बँकांचे अभिनंदन करून चालू
आर्थिक वर्षात अधिक गतीने उद्दिष्ठ पूर्ण होईल हा विश्वास व्यक्त केला.

महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभाल, दुरुस्तीचे कामे पुर्णत्वाकडे

पुणे : महावितरणकडून पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीजयंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून ही कामे करण्यात येत आहेत.

पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे संभाव्य धोके टाळण्यासाठी महावितरणकडून दरवर्षी देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जातात. यात प्रामुख्याने वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या लहान फांद्या तोडून टाकणे, तुटलेले पीन व डिस्क इन्सूलेटर्स बदलणे, वितरण रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, उपकेंद्गातील ब्रेकर्सची दुरुस्ती, बॅटरी चार्जींग, फ्यूज बदलणे, भूमिगत केबल टाकणे, खांब आणि तारांचे मजबुतीकरण, वीज खांब, तारा बदलणे किंवा झोल काढणे, जुन्या फिडर पिलरमध्ये इन्सूलेशन स्प्रे मारणे तसेच पावसाचे पाणी साचणाऱ्या परिसरातील फिडर पिलरची जमिनीपासून उंची वाढविणे अशा विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. रोहित्र तसेच वीजयंत्रणेच्या ठिकाणी नागरिकांनी टाकलेला कचराही या मोहिमेत साफ करण्यात येत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून भर उन्हात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी देखभाल व दुरुस्तीच्या कामांना वेग दिला आहे. यामध्ये विविध ठिकाणी झाडांच्या छोट्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. तर धोकादायक असलेल्या मोठ्या फांद्यांबाबत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थांना माहिती देण्यात आली आहे. याशिवाय सुमारे एक हजार डिस्क व पीन इन्सूलेटर बदलण्यात आले आहेत. उन्हात तापलेल्या अवस्थेत असलेल्या डिस्क व पीन इन्सूलेटरवर पावसाच्या पाण्याचे थेंब पडल्यास त्याला किंचितशी भेग पडली तरी वीजपुरवठा खंडित होतो. त्यामुळे खराब झालेले हे दोन्ही इन्सूलेटर बदलण्यात येत आहेत. तसेच 559 फिडर पिलरची दुरुस्ती करण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात फिडर पिलरच्या ठिकाणी नवीन 76 रिंग मेन युनिट लावण्याचे काम पूर्ण झाले आहे.

खासगी किंवा संस्थांच्या मालकीच्या जागेतील झाडे किंवा मोठ्या लांबीच्या फांद्या वादळी व मुसळधार पावसामुळे वीजवाहिन्यांवर कोसळण्याची शक्यता असते. या शक्यतेचा अंदाज घेऊन संभाव्य धोका निर्माण करणार्‍या झाडांची किंवा मोठ्या फांद्यांची संबंधीतांनी महानगरपालिकेची परवानगी घेऊन कटाई करावी. त्यासाठी आवश्यकतेनुसार सहकार्य करण्यात येईल, असे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध

शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे कॉल सेंटर 24 तास उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदविण्यासाठी 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 किंवा 1912 या तीन टोल फ्री क्रमांकावर कोणत्याही कंपनीच्या लॅण्डलाईन किंवा मोबाईलद्वारे वीजग्राहकांना संपर्क करण्याची व वीजसेवेविषयक कोणत्याही प्रकारची तक्रार व माहिती देण्याची सोय उपलब्ध आहे.

पावसाळी ड्रेनेज लाईनला रेनवॉटर हार्वेस्टिंगची जोड द्या: आबा बागुल

‘लोका सांगे ब्रम्हज्ञान… ‘पेक्षा भूजल पातळी वाढवा ;पालिका प्रशासनाला खडे बोल  
पुणे 
एकीकडे भूजल पातळी घटत असताना गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळी ड्रेनेज लाईनमधून पावसाचे  कोट्यवधी लिटर पाणी नदी – नाल्यांमधून वाया जात  आहे,असे असताना पाण्याची बचत आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा डंका पिटणाऱ्या  पुणे महापालिकेकडून ‘ लोका सांगे ब्रह्मज्ञान … ‘ याधर्तीचा कारभार सुरु आहे. रस्तेच काय पदपथही  सिमेंटचे असल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे ? याकडे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लक्ष वेधून पावसाळी ड्रेनेजलाईनला रेनवॉटर हार्वेस्टिंगची  जोड देऊन त्यासाठी स्वतंत्र ‘पिट’ तयार करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली आहे. 
याबाबत आयुक्त सौरभ राव यांना आबा बागुल यांनी निवेदन दिले आहे, त्यात म्हटले आहे कि, पुणे शहरात भूगर्भातील पाणीसाठ्याची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे मात्र प्रशासकीय स्तरावर त्याबाबत गंभीरता नाही. एकीकडे आपण पाण्याची काटकसर करा असा उपदेश पुणेकरांना देत आहोत ;पण पावसाचे पाणी मात्र थेट नदी – नाल्यांमध्ये वाहू देत आहोत. मग रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेची व्याप्ती  कशी वाढणार ? हा प्रश्न आहे. त्यातही सर्व शहरात आपण सिमेंट क्रॉंक्रीटचे रस्ते साकारले आहेत आणि फुटपाथही सिमेंट ब्लॉकचे आहे मग पावसाळयात पावसाचे पाणी जमिनीत मुरणार कसे ? याचाही  विचार पालिका प्रशासनाने केलेला नाही. त्यामुळे पाणी जमिनीत मुरून भूगर्भातील पाणीसाठा वाढण्याला बाधा निर्माण झाली आहे आणि पावसाचे पाणी थेट नदी – नाल्यातून वाहून जात आहे. पावसाळी ड्रेनेज लाईन मधून हे पाणी नदी – नाल्यात जात आहे,असे करोडो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे पावसाळी ड्रेनेजलाईनला रेनवॉटर हार्वेस्टिंग योजनेची खास जोडणी करण्यासाठी दर शंभर मीटरवर  ‘पिट’ तयार करावे जेणेकरून पावसाचे पाणी वाया न जाता ते भूगर्भात मुरेल आणि पाणीसाठा वाढेल. तसेच शहरातील पदपथावर असलेले सिमेंट ब्लॉक बदलून छिद्रे असणारी ब्लॉक बसविल्यास त्यातून पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास निश्चित हातभार लागेल. त्यामुळे ‘लोका सांगे ब्रम्हज्ञान… ‘ हा कारभार करण्यापेक्षा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रभावी वापर करण्यासाठी पावसाळी ड्रेनेज लाईनची खास जोडणी शहरात सर्वत्र केल्यास  नदी – नाल्यातून वाया जाणारे करोडो लिटर पावसाचे पाणी खऱ्या अर्थांने जमिनीत मुरेल तसेच याच धर्तीवर शहरातील पदपथावरील सिमेंट ब्लॉक बदलून छिद्रे असणारे ब्लॉक बसवावे जेणेकरून पावसाचे पाणी जमिनीत मुरून खऱ्या अर्थाने भूगर्भातील जलसाठा वाढेल ,असा आशावादही आबा बागुल यांनी व्यक्त केला आहे.  

युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के

पुणे :
कात्रज : कात्रज- कोंढवा रोड येथील युनिक इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेच्या जमुना नालकोल हिने प्रथम क्रमांक आणि  समृद्धी नाईक हिने दुसरा क्रमांक मिळवला. तसेच विज्ञान शाखेच्या संदेश आगलावे याने प्रथम क्रमांक मिळवला. तर जुईली गायकवाड हिने दुसरे स्थान निश्चित केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी, प्राचार्य सौ. जयश्री जाधव आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९८.३६ टक्के

अथर्व चांडकने ९५% मिळवत प्रथम क्रमांक पटकावला

पुणे : टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचालित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९८.३६ टक्के लागला आहे. अथर्व चांडक (९५%), साईराज कांबळे (९२%), सिमरन खन्ना आणि अपूर्वा होतकर (९१%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. अथर्वने ९५ टक्के मिळवत जेईईच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन श्रीमती सुमन घोलप यांनी अभिनंदन केले. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थ्यानी कौतुकास्पद कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले. चांडक याची जेईई परीक्षेत निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांचा जेवढा हातभार असतो, तेवढाच शिक्षकांचाही हातभार असतो, असे सांगत सर्व शिक्षकांचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख सौ. रेखा दराडे, विद्यार्थी मार्गदर्शक प्रथमेश आबनावे, सौ. ज्योती हिरे, कार्यकारी मंडळ सदस्य प्रसाद आबनावे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने चांगले गुण मिळवून विद्यार्थी आमची मान उंचावतात. दरवर्षी विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का हा वाढतच जातो, याबद्दल मला अभिमान आहे, असे संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी सांगितले.

महापालिकेत डुकरे सोडण्याचा सेनेचा प्रयत्न-भानगिरेंच्या आंदोलनात भाजपा आमदारही सहभागी(व्हिडिओ)

पुणे- हडपसर विधानसभा मतदार संघ आणि महापालिकेचा प्रभाग २६ मध्ये झालेला डुकरांचा सुळसुळाट,पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट आणि अन्य समस्या बाबत महापालिकेतील या प्रभागाचे शिवसेना नगरसेवक आणि हडपसर विधानसभेसाठी इच्छुक असलेले नाना भानगिरे यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे आज थेट महापालिकेवर मोर्चा आणला आणि यावेळी शिवसैनिकांनी महापालिका भवनाच्या आवारात डुकरे सोडण्याचा प्रयत्न केला . पोलीस आणि सुरक्षा रक्षक यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न गेटवरच केला पण तो असफल झाला ,मात्र याच वेळी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर बसून या आंदोलनात नाना भानगिरे यांच्या समवेत सत्ताधारी असलेले भाजपचे हडपसर येथील आमदार योगेश टिळेकर आणि नगरसेवक उमेश गायकवाड हे देखील सहभागी झालेले दिसले .

शंभरावर पत्रे दिली पण या परिसरातील डुकरांचा बंदोबस्त केला जात नाही,डुकरांनी लहान मुलांना अपघात होण्याचे प्रकार वाढत चालले आहेत . या परिसरात अतिक्रमणांनी हिंदोस मांडून वाहतुकीचा बट्ट्याबो ळ केला आहे आणि अतिक्रमण प्रमुख आपल्या हस्तकाकरवी हप्ते खात आहेत . अशी अवस्था झालेली असताना आता या परिसरात पाण्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले जात आहे . पिण्याच्या पाण्यापासून या परिसराला वंचित ठेवले जाते आहे असा आरोप करत हा मोर्चा नगरसेवक नाना भानगिरे यांनी काढला . यावेळेची पहा हि  व्हिडिओ दृश्ये ….

आझम कॅम्पस मधील शाळांचे बारावी परीक्षेत यश

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ चा निकाल ९१ टक्के आणि  ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘चा बारावी परीक्षेचा निकाल ८२ टक्के लागला आहे . आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ चे प्राचार्य आयेशा शेख ,उपप्राचार्य अब्दुल गफार सय्यद , ‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘ च्या प्राचार्य परवीन शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .
आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स ‘ च्या वाणिज्य शाखेत आयेशा इरफान खान ९० टक्के गुण  मिळवून प्रथम आली . शास्त्र शाखेत आलिया झुबेर शेख ८८ टक्के मिळवून प्रथम आली .कला शाखेत हुमेरा अफझल मेमन ८८ टक्के  गुण मिळवून प्रथम आली . व्होकेशनल मध्ये उझ्मा शफिक चौधरी ८२ टक्के गुण मिळवून प्रथम आली .

‘अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल ‘च्या   शास्त्र शाखेत प्रसाद ठोंबरे ८९ टक्के गुण मिळवून प्रथम आला,वाणिज्य शाखेत जॉन जोसेफ ८६ टक्के प्रथम आला . कला शाखेत सौद चौधरी ७८ टक्के गुण मिळवून प्रथम आला .