पुणे : आज सायंकाळी तो अचानक आला ,आणि लोकांच्या आनंदाला पारावर उरला नाही, गोंधळ ,गडबड उडाली,पण त्यात आनंदाचा चं सूर होता .. त्याचे टपोरे थेंब आणि जोरदार तडाखा पाहून आला ..रे … आला … अशी आरोळी ठोकण्याची अनेकांना इच्छा झाली असेल…पण हा आनंद फार काळ टिकला नाही ,साधारण अर्धा तासाची झलक दाखवून तो आला तसा पसार हि झाला ..पण आता मान्सून आला .. पुन्हा येईल ,आणखी जोरदार ,तडाखेबाज दर्शन देईल अशी आस लावून पुण्यातला पाऊस आला तसा निघून गेला .
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पुणेकरांची प्रतीक्षा आज संपली असे वाटत असून पुण्यामध्ये आज पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पुणेकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मान्सून 20 ते 22 तारखेला म्हणजे दोन दिवसात सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. आज पुण्यात सायंकाळी 6.00 च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडालेली पहायला मिळाली.
आला रे आला ,आरोळी ठोकेपर्यंत तो गेलाही …पुण्यात बरसल्या जलधारा (व्हिडिओ)
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासा-मुख्य सचिवांचे आदेश
मुंबई, दि. २१: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने तपासावे, पाण्याची टाकी, मंत्रालयात बसविलेले आरओ यंत्र आणि जलवाहिन्यांची तपासणी मोहीम हाती घ्यावी, असे निर्देश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.
मंत्रालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पाण्यामुळे उद्भवलेल्या त्रासाची दखल घेत मुख्य सचिवांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम, आरोग्य विभाग आणि मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची सफाई काही दिवसांपूर्वीच झाल्याचे सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. असे असूनही कर्मचाऱ्यांना झालेल्या त्रासाची तीव्रता पाहता पिण्याच्या पाण्याचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावे, असे सांगतानाच मुख्य सचिवांनी मंत्रालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णांना झालेल्या त्रासाबाबतची माहिती घेतली.
पाण्याचे नमुने तपासतानाच मंत्रालयात ठिकठिकाणी आर ओ यंत्र बसविले आहेत त्यांची तपासणी मोहीम लगेचच हाती घेण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी दिले. पाण्याच्या टाकीतून मंत्रालयात ज्या वाहिन्यांद्वारे पाणी पुरवठा होतो त्यांची देखील तपासणी करावी, असेही मुख्य सचिवांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री. सगणे, मंत्रालयातील बांधकाम आणि विद्युत विभागाचे अभियंता, आरोग्य विभागाचे अधिकारी, मंत्रालयातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पुणे: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय,भारत सरकार,शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सुचनेनुसार पुण्यामध्ये जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, योगा संघटना, बी.जे.महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बी.जे.महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी.जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ननंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार प्रशांत आवटी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, ऑलिम्पीयन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी प्रार्थनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा ॲण्ड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी योगाभ्यासातील सर्व आसनांची प्रात्यक्षिके केली. यावेळी उपस्थितांना योग मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत उपसंचालक अनिल चोरमले यांनी केले तर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आभार मानले.
समाजवाद संपणार नाही : डॉ अभिजित वैद्य
डीईएसमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रमणबाग कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. प्रा. अपर्णा भुजबळ यांनी योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. पर्यवेक्षिका अनघा बागुल यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. रमणबाग प्रशालेत विद्यार्थ्यांनी योग साधना करण्याची शपथ घेतली. विद्यार्थ्यांकडून प्राणायाम करून घेण्यात आला. संगीत शिक्षक हर्षद गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली योगगीत सादर करण्यात आले. मुख्याध्यापिका तिलोत्तमा रेड्डी यांनी मार्गदर्शन केले.
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. योगाचार्या विदुला शेंडे यांनी योगासने करून दाखविली. मुख्याध्यापक प्रीतम जोशी यांनी मार्गदर्शन केले. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मकरासन, पद्मासन, वृक्षासन, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके सादर केली.
नवीन मराठी शाळेत योगदिनानिमित्त शाळेतील सर्व ११७५ विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकतेरांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. योगशिक्षिका वासंती काळे यांनी योगासनांचे महत्त्व सांगितले. शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठ्ये अध्यक्षस्थानी होत्या. मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी मार्गदर्शन केले. डीईएस प्रायमरी स्कूलमध्ये डॉ. मुलबागुल यांनी शिक्षकांना योगासनांचे प्रशिक्षण दिले.
पोलिस कॉन्सटेबलने आपल्या दोन सावत्र मुलांवर झाडल्या गोळ्या, दोघांचा मृत्यू
नाशिक- शहरातील उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना येथील अशवमेध नगरमध्ये आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. गोळीबारात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला आहे. सोनू नंदकिशोर चिखलकर(वय25) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर(वय22)अशी मृत मुलांची नावे आहेत. घरगुती कारणातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दुपारी चार वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. नाशिकच्या उपनगर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले संजय भोये कॉन्सटेबल पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या सावत्र मुलांवर गोळीबार केला. यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण घरगुती कारणावरून गोळीबार केला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, आपल्या मुलांवर गोळ्या झाडल्यानंतर आरोपी कॉन्सटेबल संजय भोये हे स्वतःहून पोलिसांना शरण गेले आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. पोलिस सध्या घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमात 11 गावांमध्ये 553 कामे पूर्ण – महावितरणची पुणे ग्रामीणमध्ये धडक मोहीम
पुणे : थेट गावात जाऊन वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या एक दिवसीय त्रिसुत्री मोहिममध्ये पुणे ग्रामीण मंडलातील लोणावळा शहरासह 11 गावांमध्ये 553 विविध कामे करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती तसेच प्रत्यक्ष गावातच नवीन वीजजोडणी उपलब्ध करून देणे आणि वीजबिल व मीटर रिडींग संदर्भात असलेल्या तक्रारींचे जागेवरच निराकरण करणे यासाठी पुणे ग्रामीण मंडल अंतर्गत एकदिवसीय त्रिसुत्री उपक्रम सुरु आहे. गेल्या तीन दिवसांत कळंब, नांदुर, टाकेवाडी, साकोरे (घोडेगाव उपविभाग), अवसरी बुद्गुक, अवसरी खुर्द व लगतच्या दोन वाड्या (मंचर उपविभाग), कुंजीरवाडी व उरळी कांचन (उरळी कांचन उपविभाग), रामनगर, भूशी, खोंडकेवाडी व लोणावळा शहर परिसर (लोणावळा उपविभाग), कुरकुंडी (राजगुरुनगर उपविभाग), आपटाळे (जुन्नर उपविभाग) या गावांमध्ये वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे एकूण 445 कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, वीजखांबाला रंगकाम, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणार्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे, फिडर पिलरला झाकणे लावणे आदी कामांचा समावेश आहे.
याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, सदोष व नादुरुस्त मीटर बदलून देणे, वीजदेयके मिळत नसल्यास ते उपलब्ध करून देणे अशा प्रकारची 57 कामे करण्यात आली तर आवश्यक कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर 51 ग्राहकांना जागेवरच नवीन वीजजोडणी देण्यात आली आहे. यासोबत गावकऱ्याांशी संवाद साधून त्यांना विविध योजनांसह महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा, मोबाईल अॅप आदींची माहिती देण्यात आली व वीजसुरक्षेबाबत प्रबोधनही करण्यात आले.
एक दिवसीय त्रिसुत्री उपक्रमाची पूर्वमाहिती दिल्यानंतर संबंधीत गावात महावितरणचे अभियंता व जनमित्र तसेच बिलिंग स्टॉफ एकाच दिवशी ग्राहकसेवेचे काम करीत आहेत. वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्तीचे कामे तसेच इतर ग्राहकसेवा गावातच उपलब्ध होत असल्याने ग्रामस्थ मोठ्या आनंदाने महावितरणला सहकार्य करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंदेले (मुळशी), किशोर गोरडे (राजगुरुनगर), प्रकाश खांडेकर (मंचर), अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. उमेश चव्हाण (लोणावळा) तसेच उपकार्यकारी अभियंता नवनाथ घाटुळे (घोडेगाव), संतोष तळपे (मंचर), प्रदीप सुरवसे (उरळी कांचन) मनीष कडू (राजगुरुनगर), जयंत गेटमे (जुन्नर), सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यासह जनमित्र या उपक्रमात सहभागी झाले.
वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आता पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण उपयुक्त मंच
पुणे दि. 21: पुणे व परिसरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देणे, वाहतुक विषयक विविध समस्या सोडविण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA) ची स्थापना करण्यात आली आहे. वाहतूक समस्येच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हा उपयुक्त मंच असून या प्राधिकरणातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.
येथील विधानभवन कार्यालयाच्या सभागृहात पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरण (PUMTA)ची पहिली बैठक प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील, पोलीस उपायुक्त (उपायुक्त) पंकज देशमुख, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, महाराष्ट्र मेट्रो रेलचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एस. एस. साळुंखे, प्राधिकरणाचे सचिव तथा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणकुमार देवरे उपस्थित होते.
डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे महानगर क्षेत्रातील वाहतूक विषयक आव्हानांचा सामाना करण्यासाठी तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. या प्राधिकरणात पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांची भूमीका अत्यंत महत्वाची आहे. वाहतूक समस्या ही सर्व शहरांसमोरील मोठी समस्या आहे. पुणे शहर आणि परिसरासाठी तर ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करून दीर्घकालीन उपाययोजना आखून त्यावर कृती करण्याची गरज आहे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. प्राधिकरणाचे काम करताना यामध्ये सर्वसमावेशकता येण्यासाठी सामाजिक काम करणाऱ्या संस्थांबरोबरच वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
यावेळी सौरभ राव म्हणाले, पुणे शहरात वाहतुकीची समस्या गंभीर असून पुणे महानगरपालिकेने तयार केलेली वाहतूक योजना व हॉकर्स योजना लवकरच लागू होणार आहे. कोणताही एक विभाग संपूर्ण वाहतूक व्यवस्थापन करू शकत नाही, त्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. शहरात सुरू असणाऱ्या मेट्रो सारख्या वाहतूक प्रकल्पांनी बाधित असणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महानगरपालिका विशेष प्रयत्नशील आहे. वाहतूकीची समस्या मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याबरोबरच लोकप्रिय करण्यावर भर दिला जाणार आहे, तसेच पुणे शहराची हरवलेली सायकलचे शहर ही ओळख नव्याने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्राधिकरणाच्या मदतीने वाहतूक समस्येवर तोडगा काढण्यासाठी समन्वयाने काम करणार असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी सांगितले.
या बैठकीत महामेट्रा कॅरिडोर 1 व 2 पुणे मेट्रो लाईन 3 कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. एचसीएमटीआर तसेच रिंग रोडच्या कामाचा आढावा घेण्यात आला. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसच्या पार्किंग सुविधेवर चर्चा करण्यात आली. ई वाहनांच्या चार्जिंग स्टेशनच्या संख्येत वाढ करण्याबाबच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्राधिकरणातील अशासकीय सदस्यांनी सादरीकीकरण केले.
या बैठकीला पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या संबंधित सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
**
योगामुळे मानसिक-शारीरिक मजबुती – महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे
मुंबई : योग एक प्रकारची ऊर्जा आहे. योगाच्या विविध आसनांमधून मानसिक आणि शारीरिक आरोग्याबरोबरच चांगुलपणाची भावना निर्माण होते. योग मानवी मनशक्तीला गतिमान करतो. बौद्धिक पातळी सुधारते आणि भावनांना स्थिर ठेवून उच्च पातळीच्या एकाग्रतेमध्ये वाढ करण्यास मदत करते, असे ग्रामविकास, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
डोंगरी येथील निरीक्षण गृह, बालगृहातील मुलींसोबत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
श्रीमती मुंडे म्हणाल्या, 21 जून रोजी संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात केली असून योग ही भारताची हजारो वर्षापासूनची परंपरा आहे. नित्य योग साधना केल्याने शरीर निरोगी राहते. बाल वयापासूनच योग केल्यास त्याचा अधिक प्रमाणात लाभ मिळतो, त्यामुळे बालगृहात येऊन बालकांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांच्यासोबत योग साधना करुन आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड येथे आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
नांदेड :- प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगाचे अत्यंत महत्त्व असले पाहिजे. योगाच्या माध्यमातून आपले जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने तसेच विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी योगगुरु स्वामी रामदेव बाबा, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार डॉ. तुषार राठोड आदींसह हजारो योग साधक उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, संयुक्त राष्ट्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व हा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात सर्वात कमी कालावधीत मंजूर झाला. आज जगातील 150 पेक्षा अधिक देशात सुदृढ आरोग्यासाठी योगासने केली जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमास महाराष्ट्रात येण्याची विनंती बाबाजींना केली असता, त्यांनी ती तातडीने मान्य केली. त्यांना आम्ही हा कार्यक्रम मराठवाड्यातील नांदेड येथे घेण्यात येणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, भारताची प्राचीन योग विद्या योगगुरु रामदेवबाबा यांनी संपूर्ण देशाबरोबरच ती जागतिक स्तरावरही पोहोचविली, याचा अभिमान असून आज नांदेडच्या पावनभूमीत प्रत्यक्ष रामदेवबाबा हे आपल्याला योग विद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी आले आहेत. या संधीचा लाभ घेऊन नांदेड जिल्हावासियांनी निरोगी व आरोग्यदायी जीवनासाठी नियमित योगासने करण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
भारत देश हा प्राचीन योग विद्येच्या माध्यमातून अध्यात्म महाशक्तीकडे वाटचाल करत आहे. तसेच या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजनैतिकदृष्ट्या भारत अधिक सुरक्षित होत असल्याचे रामदेवबाबा यांनी सांगून सन 2040 ते 2050 दरम्यान भारत विश्वातील सर्वात मोठे सामर्थ्यशाली राष्ट्र होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच शरीर व मन निरोगी राहिल्याने जीवनमानातही वाढ होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात नियमित योगासने करुन आपले जीवन आरोग्यदायी व सुखकर बनविण्याचे आवाहन रामदेवबाबा यांनी केले.
आजच्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून येथे जमलेल्या प्रत्येक नागरिकांने योगधर्म, मानवधर्म, राष्ट्रधर्म व सेवाधर्माचा प्रामाणिकपणे अंगीकार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद
एकाचवेळी एकाच ठिकाणी 91 हजार 323 लोकांनी योगासने करण्याचा पूर्वीचा जागतिक विक्रम नांदेड येथील आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनादिवशी मोडला जाऊन नांदेडच्या पावनभूमीत एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी एकाच ठिकाणी रामदेवबाबा यांनी योग विद्येचे प्रशिक्षण दिले व नवीन जागतिक विक्रमाला नांदेडकरांनी गवसणी घातली.
यावेळी गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डचे प्रतिनिधी मनीष विष्णूई यांनी ड्रोनद्वारे प्राथमिक गणनेनुसार नांदेड येथील योग कार्यक्रमास एक लाख 10 हजारापेक्षा अधिक लोक असल्याची माहिती दिली. जागतिक विक्रम नांदेडकरांनी प्रस्थापित केल्याचे गोल्डन बुक प्रमाणपत्र श्री. विष्णुई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांना यावेळी दिले. आयुष विभागाने तयार केलेल्या ‘पवनी’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. पतंजलीच्या वतीने स्वदेशी समृद्धी कार्ड अंतर्गत पतंजली कार्यकर्त्यांना मदत देण्यात येत असते. नांदेड येथील पतंजली कार्यकर्त्याचा अपघात होऊन जायबंदी झालेल्या कार्यकर्त्यांना पाच लाखाचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.
मेरा जीवन-मेरा मिशन
रामदेवबाबा यांच्या जीवनावर आधारित “मेरा जीवन, मेरा मिशन” या आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचे विमोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या आत्मचरित्राच्या पुस्तकांची प्रकाशनापूर्वीची विक्रीची नोंदणी आजपासून सुरु झाली. यावेळी श्री. फडणवीस यांनी या आत्मचरित्राच्या 100 पुस्तकांची आगाऊ मागणी नोंदविली असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.
प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रामदेवबाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी रामदेवबाबा यांनी व्यासपीठासह सर्व योग साधकांना शरीराला ऊर्जा प्राप्त करुन देणाऱ्या योगींग-जॉगींग आसनाने सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योगासनांचे विविध प्रकार केले. यावेळी सकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत रामदेवबाबा यांनी सूर्यनमस्कार, ताडआसन, त्रिकोण आसन, वृक्षासन, गरुडासन आदी अनेकविध आसनांचे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. जयदीप आर्या यांनी केले. या कार्यक्रमास सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांची उपस्थित होती.
‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘जागतिक योग दिन’ उत्साहात साजरा
पुणे : २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना पुण्यातही स्किल डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आपल्या सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला आरोग्याची काळजी घेण्यासाठी फारसा वेळ मिळत नाही, अशावेळी योगासने करणे हे मात्र प्रत्येकाला सहज शक्य आहे, असे सांगून फक्त सूर्यनमस्कार जरी दररोज नियमितपणे केले तरी आपल्याला त्याचा भरपूर लाभ होईल असे मत प्रसिद्ध योग प्रशिक्षक मनाली देव यांनी यावेळी सांगितले.
संस्थेच्या शिवाजीनगर येथील हॉटेल मेनेजमेंट एन्ड केटरिंग स्किल सेंटर येथे ‘योग’ दिनानिमित्त प्राणायाम व विविध योगासनांची प्रात्याक्षिके करण्यात आली. यावेळी ऑफिसमध्ये बैठे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘डेस्क योगा’ ची प्रात्यक्षिकेही करून दाखवण्यात आली.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक व अन्य कर्मचारी यांनीही आपला सहभाग नोंदवला.तसेच योग दिन आयोजनासाठी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले.
लोकप्रतिनिधी-अधिकाऱ्यांतील विसंवादाने अनेक कामे प्रलंबित- महेश झगडे
पुणे : “भारतीय राज्यघटनेने लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे दिली आहेत. मात्र, बऱ्याचदा त्याचे पालन होत नाही. परिणामी लोक अधिकाऱ्यांकडून करावयाची कामे घेऊन लोकप्रतिनिधींकडे जातात. या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव आणि विसंवाद वाढतो. त्यातूनच जनतेची अनेक कामे प्रलंबित राहतात. त्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या कर्तव्यांप्रती प्रामाणिक राहत एकमेकांशी संवाद ठेवला पाहिजे,” असे स्पष्ट मत राज्याचे माजी प्रधान सचिव महेश झगडे यांनी व्यक्त केले.
सृजन फाऊंडेशन आणि एमपीएससी स्टुडंट्स राईट्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय स्पर्धा परीक्षा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी ‘अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात सुसंवादाची गरज’ या विषयावर झगडे बोलत होते. गणेश कला क्रीडामंच येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी उद्योजक सतीश मगर, सनदी अधिकारी आनंद पाटील, मायविश्व टेक्नॉलॉजीचे संचालक मंदार जोगळेकर, रक्षक ग्रुपचे रणजितसिंह पाटील, सृजन फाऊंडेशनचे संस्थापक, बारामती ऍग्रो फूड्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार, एमपीएससी स्टुडंट्स राईट्सचे महेश बडे, किरण निंभोरे आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेतील अपयशानंतर वेगळी वाट निवडत स्वयंरोजगाराकडे वळणाऱ्या युवकांचा सन्मान यावेळी करण्यात आला. तरुणांना सर्व क्षेत्रांत नोकऱ्यांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी सृजन करिअर ऍपचे यावेळी लोकार्पण झाले.
महेश झगडे म्हणाले, “अलीकडे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची खोली उथळ झाली आहे. आपण ज्या क्षेत्रात काम करू इच्छितो, त्यावर प्रभुत्व मिळवले पाहिजे. आपल्यामध्ये उत्साह आणि मार्केटिंग करण्याची कला असेल, तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते. केवळ नोकरीच्या मागे न लागत ‘डिस्टरपटिव्ह इनोव्हेशन’ करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये खासगी, सरकारी नोकर्यात ६५ टक्के कपात अटळ आहे. त्यामुळे व्यवसाय व स्वयंरोजगाराच्या संधी आपण शोधायला हव्यात. अधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी आपली कर्तव्य पार पाडून लोकांची कामे तत्परेने करावीत.”
सतीश मगर म्हणाले, “चाळीस वर्षांपूर्वी मीही अधिकारी बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, अल्पावधीत तो नाद सोडून दिला आणि स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी धडपड सुरु केली. शेती, डेअरी क्षेत्रात काम करत होतो. त्याकाळी जमिनी विकण्याचा प्रवाह होता. अनेक गुंठामंत्री बनून कालांतराने तिथेच पडेल, ते काम करत होते. त्यामुळे जमिनी न विकत आपण उत्पन्न देऊ शकणारा व्यवसाय करायचा, या हेतूने मगरपट्टा सिटीची उभारणी सुरु झाली. आज दीडशे पेक्षा जास्त कुटुंबाना यातुन उत्पन्न मिळत आहे. ८० हजार लोक काम करतात. एकही शेतकरी विस्थापित होऊ दिला नाही. मराठी माणसाला धंदा करता आला पाहिजे. त्यासाठी आपण अहंकार सोडून देणे गरजेचे आहे. जे जमेल ते काम प्रामाणिकपणे करून त्यात यश मिळवण्याचा दृष्टीकोन आपण जपला पाहिजे. कितीही मोठ्या पदावर गेलात, तरी आपले पाय जमिनीवर असावेत.”
आनंद पाटील म्हणाले, “समाज आणि अधिकारी या एकमेकांना पूरक आहेत. प्रशासनात काम करताना अनंत अडचणी येतात. त्यावर मात करून पुढे जायचे असते. मातृभाषेत समाज जोडता येतो. आव्हानात्मक परिस्थितीतून आपले व्यक्तिमत्व घडत जाते. समाज भावनिक गोष्टीत अडकतो. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्या भावना समजून कठीण परिस्थितीतही संयमाने वागले पाहिजे. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. नागरिकांच्या समस्या सोडविण्याला अधिकाऱ्यांचे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे.”
मंदार जोगळेकर म्हणाले, “उघड्या डोळ्यांनी उपलब्ध संधींचा अवास्तव अपेक्षा न ठेवता लाभ घ्यायला हवा. मन लावून काम करा. हार मानायची नाही. जगाच्या भाषा शिका. घराबाहेर पडून जग बघा. वेळेचे नियोजन आणि सकारात्मक उर्जा असेल, तर तुम्ही मोठे कार्य उभारू शकता. प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच त्याला उपाय देण्यासाठी प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. ग्राहकाची गरज ओळखून व्यवसाय करा.
पुढच्या काळात नोकरी नाही, तर व्यवसाय हाच योग्य मार्ग आहे.”
रोहित पवार म्हणाले, “विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरेल. ज्यांना स्पर्धा परीक्षांत यश येणार नाही, अशांनी खचून जाऊ नये. इतर क्षेत्रात नोकरी आणि व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा फायदा घ्यायला हवा. या संधी एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी सृजन एप्लिकेशन काम करेल.”
माधव जगताप यांनी प्रास्ताविक केले. निलेश आरडळे, त्रिवेणी काहलकर, आरिप पटेल यांनी सूत्रसंचालन केले. अभिषेक अवचार यांनी आभार मानले.
पुणे विद्यार्थी गृहामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा
शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीसाठी योगसाधना सर्वोत्तम – तालेवार
महावितरणमध्ये योग दिन उत्साहात
पुणे- अत्यंत धकाधकीच्या विद्युत क्षेत्रात काम करताना स्वतःची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती कायम ठेवण्यासाठी दररोज योगसाधना करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन महावितरणचे मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार यांनी शुक्रवारी (दि. 21) केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महावितरणच्या वतीने रास्तापेठ येथील सभागृहात योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुख्य अभियंता श्री. तालेवार बोलत होते. यावेळी महावितरणचे कर्मचारी व योग प्रशिक्षण श्री. सुरेश जाधव यांनी विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व, फायदे सांगितले व प्रशिक्षण सुद्धा दिले. योग प्रशिक्षणाच्या या कार्यक्रमात मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, अधीक्षक अभियंता श्री. वादिराज जहागिरदार, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र म्हकांळे, सौ. माधुरी राऊत, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींंद्र बुंदेले, मधुकर घुमे, बाळासाहेब हळनोर, संजीव नेहेते, प्रणाली विश्लेषक श्री. मोहन कोळेकर आदींसह कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
डीईएसच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) शाळांतील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे आणि शाला समितीचे अध्यक्ष अशोकराव पलांडे यांच्या हस्ते आज गुणवतांचा सत्कार करण्यात आला.
उत्तीर्ण प्रमाण ः ९५.६२ टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
अद्वैत रीसबूड – ९८.४० टक्के, अनिष आडकर ९७.६० टक्के
मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालय
उत्तीर्ण प्रमाण ः १०० टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
अथर्व दगडे – ९७.४० टक्के, हृतेश शहा आणि सुदर्शन गरगटे – ९६.४० टक्के
न्यू इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल
उत्तीर्ण प्रमाण ः १०० टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
अपूर्वा पिंगळे – ९३.४० टक्के, सानिका ठिगळे ९२.६० टक्के
डीईएस सेकंडरी स्कूल
उत्तीर्ण प्रमाण ः १०० टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
प्रज्ञा गोखले आणि सोनावी मेहेंदळे – ९७.२९ टक्के, वरुण बर्वे ९६.८० टक्के
उत्तीर्ण प्रमाण ः ९८.६५ टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
श्रावरी पाठक – ९९.०० टक्के, सर्वज्ञा बराटे ९७.४० टक्के
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळा
उत्तीर्ण प्रमाण ः ८०.३७ टक्के
शाळेत अनुक‘मे पहिले दोन विद्यार्थी
शिवम तांबे – ९४.२० टक्के, अनिष आडकर ९३.४० टक्के










