पुणे : येरवडा कारागृहात मंगळवारच्या घटनेनंतर आज पुन्हा एकदा राडा झाला असून पाच ते सहा जणांनी महंमद जबाल नादाफ (वय ३५) कैद्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन करण्याचा प्रयत्न केला़. नादाफ याची प्रकृती गंभीर आहे़ त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़.
येरवडा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून तिघा जणांनी हिंदु सेनेचा समर्थक तुषार नामदेव हंबीर याच्यावर खिळ्याने वार करुन जखमी केले होते़. हा प्रकार मंगळवारी सकाळी घडल्यानंतर तुषार हंबीर याच्या साथीदारांनी शाहरुख खान याच्यावर हल्ला केला़. त्याला सोडविण्यासाठी गेलेले तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली होती़. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे़.
या घटनेनंतर आज सकाळी महंमद जबाल नादाफ याच्यावर पाच ते सहा जणांनी महंमद याला बेदम मारहाण करुन डोक्यात दगड घातला़ रक्तबंबाळ अवस्थेत तुरुंग अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे़.
येरवडा कारागृहात गेल्या काही दिवसांपासून कैद्यांमध्ये सतत हाणामाऱ्या होत असून नुकत्याच झालेल्या अधिवेशनात या प्रकरणी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता़. मात्र, त्यावर शासनाने जुजबी उत्तर दिले होते़.
लागोपाठ दोन घटनांमुळे येरवडा कारागृहात खळबळ माजली असून सर्व अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल बंद करुन ठेवले आहेत.
कोल्हापूरमध्येही कैद्यांमध्ये दोन दिवसांपूर्वी हाणामारी झाली होती. याप्रकरणाची माहिती घेण्यासाठी आज तुरुंग महानिरीक्षक सुनिल रामानंद हे कोल्हापूर दौऱ्यावर गेले आहेत. आज सायंकाळी येरवड्यातील वाढत्या हाणामारीच्या घटनांवर आपण बैठक घेणार असल्याचे रामानंद यांनी सांगितले. हिंदु राष्ट्र सेनेचा कट्टर समर्थक तुषार नामदेव हंबीर याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर त्याच्या साथीदारांनी तुरुंगात गस्त घालणाऱ्या तुरुंग अधिकाऱ्याला धक्काबुक्की करीत मारहाण केली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी १४ न्यायालयीन बंदींवर गुन्हा दाखल केला आहे.
राहुल बाळासाहेब तुपे, अक्षय ऊर्फ पप्पु मच्छिंद्र हाके, यशवंत ऊर्फ अक्षय राजेंद्र सूर्यवंशी, पृथ्वीराज राजेंद्र सूर्यवंशी, गौरव प्रदीप जाधव, राहुल बाळासाहेब पानसरे, अक्षय आनंदा चौधरी, अनिकेत ऊर्फ बंटी नारायण जाधव, अक्षय लक्ष्मण इंगुळकर, संजय रामचंद्र औताडे, अनिल तुकाराम सोमवंशी, शिवशंकर सस्तानंद शर्मा, प्रविण सुनिल सुतार, निखिल देवानंद पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हे सर्व आरोपींना विविध गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली असल्याने येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहेत.
याप्रकरणी तुरुंग अधिकारी संदीप रतन एकशिंगे (वय ३३) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना येरवडा कारागृहातील सर्कल क्रमांक २ मध्ये मंगळवारी सकाळी १० वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, शाहरुख शेख, सलीम शेख आणि अमन अन्सारी यांनी हिंदु राष्ट्र सेनेचा समर्थक तुषार हंबीर याच्यावर मंगळवारी सकाळी पावणे सात वाजता दगड व लोखंडी खिळ्याने गळ्यावर, मानेवर, हातावर मारुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
या घटनेची माहिती तुरुंगातील इतर आरोपींना समजली. त्यामुळे सर्कल क्रमांक २ मध्ये ठेवण्यात आलेले हंबीरचे साथीदार हे संतापले होते. संदीप एकशिंगे हे सकाळी दहा वाजता सर्कल २ मध्ये गस्त घालत असताना हे आरोपी शाहरुख अस्लम खान याला मारहाण करीत होते. हे पाहून एकशिंगे हे त्याला सोडवायला गेले. तेव्हा त्या आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करुन मारहाण केली. त्यात त्यांच्या हाताला, तोंडाला मुका मार लागला आहे.
येरवडा पोलिसांनी या १४ जणांविरुद्ध दंगल माजविणे, सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण करणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
येरवडा कारागृहात .. दंगल सदृश्य वातावरण -एकाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न
कात्रज कोंढ्वा रस्त्यावरील धोकादायी खड्ड्यात ‘बोटिंग ‘करत मनसेचे आंदोलन (व्हिडिओ)
कात्रज-कोंढवा रस्त्याच्या संपूर्ण भूसंपादन न करता केलेले सुरु केलेले काम ३६ महिन्यांच्या मुदतीत संपेल की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. याच प्रश्नावर आज मनसेच्या वतीने खोदण्यात आलेल्या खड्ड्यात होडी चालवून अनोखे आंदोलन करण्यात आले. ४० हुन अधिक बळी घेणा़ऱ्या ८४ मीटर डीपी रस्त्यासाठी २०१२ सालापासुन अनेक राजकीय आंदोलने करण्यात आली.सुमारे ४ वेळा या रस्त्याची निविदा विविध कारणाने रद्द झाली.राजकीय श्रेयवादात अडकलेल्या ३ किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांना यामध्ये लक्ष घालावे लागले.तीन महामार्गांना जोडणारा हा रस्ता आता पुणे महानगरपालिकेचा पथदर्शी प्रकल्प म्हणुन या रस्त्याचे काम सुरु केले आहे. मात्र पालिका कर्मचारी जरी भूसंपादन झाले असल्याचे दावे करीत असले तरी चाललेल्या संथ गतीमुळे हे काम वेळेत पूर्ण होईल का यामध्ये शंका निर्माण होत आहे.
सुमारे १४९.५२ कोटी रुपयाचे हे काम ३६ महिन्यांत पूर्ण करायचे आहे.मात्र पहिल्या आर्थिक वर्षात (२०१८-१९ ) मध्ये फक्त ३ कोटी रुपये या रस्त्यासाठी देण्यात आले.आता या आर्थिक वर्षात (२०१९-२०) मध्ये ३० कोटी रुपये या कामासाठी देण्यात आले आहेत. म्हणजे सुमारे दीड वर्षाच्या कामासाठी फक्त ३३ कोटी पालिकेने दिले आहेत.तीन वर्षाच्या या प्रकल्पाच्या फक्त सुमारे २२ टक्केच रक्कम देण्यात आली आहे.
कात्रज – कोंढवा रस्त्याची पाहणी केली असता अजून पालिकेने २० टक्के देखील जागा ताब्यात घेतलेली दिसत नाही.मात्र, पालिका अधिकारी येथील 70टक्के जागा ताब्यात आल्याचा खोटा दावा करीत आहेत.असा आरोप मनसेचे गटनेते वसंत मोरे,व नगरसेवक साईनाथ बाबर यांनी यावेळी केला आजे.त्यांनी यावेळी सांगीतले फक्त कमिशन साठी ह प्रकल्प सुरु केला आहे.येथील अनेक नागरीकांची घरे व दुकाने देखील या रस्ता रुदिकरणात बाधीत होत आहेत मात्र त्यांचे पुनर्वसन अजून करण्यात आलेले नाही.फक्त शत्रुजय मंदीर व उन्नती धाम येथेच खड्डे खोदण्यात आले आहेत.पावसाने या खड्डयामध्ये पाणी साचले आहे,त्यामध्येच मनसेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.यावेळी हडपसर मतदार संघातील मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी वसंत मोरे यांनी हे काम रखडण्यासाठी स्थानिक आमदार व प्रभाग क्रमांक ३८ व ४१ चे नगरसेवक जबाबदार असल्याचे सांगितले.व पुढील काळात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.
कोकणातील तिवरे धरण फुटले ….
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक पोलिस आणि बचाव पथकासह एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, अनेक जण अजुनही बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तिवरे धरण 2000 मध्ये बांधण्यात आले होते. स्थानिकांनी या धरणफुटीसाठी प्रशासनाला जबाबदार धरले आहे. धरणाच्या भिंतींना तडे गेल्याची तक्रार दोन वर्षांपूर्वीच प्रशासनाकडे करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पाण्याची गळती सुद्धा दिसून आली होती. प्रशासनाने वेळीच डागडुजीचे काम केले होते.
मी पुन्हा येईन….मुख्यमंत्री यांचा निर्धार
मुंबई : महाराष्ट्रासमोरचे प्रश्न अनेक आहेत. ते पूर्णत: सुटलेले नाहीत. आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्न मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठठलरूप मानत त्यांच्या विकासाच्या वारीत मी सहभागी झालो, असे भावूक उदगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काढले.
अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी `मी पुन्हा येईन/ नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी/ जलयुक्त शिवारासाठी/ दुष्काळ मिटवण्यासाठी/ युवामित्रांना शक्ती देण्यासाठी कवितेच्या ओळी सादर केल्या.
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका कवितेने भाषणाचा समारोप केला.
मी पुन्हा येईन..
याच निर्धारानं, याच भूमिकेत,याच ठिकाणी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन..
गावांना जलयुक्त करण्यासाठी,शहरांचा चेहरा बदलण्यासाठी
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी..
मी पुन्हा येईन….
माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
मी पुन्हा येईन….
याच निर्धारानं,याच भूमिकेत,याच ठिकाणी
प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हाती घेत
माझ्या महाराष्ट्राला एक नवं रूप देण्यासाठी
नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी…
मी पुन्हा येईन….
दरम्यान विरोधी बाकांसह सर्व सदस्यांनी त्यांच्या या उदगाराची प्रशंसा केली. संविधानाला सर्वोच्च महत्व देत शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करत मी महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेलाच देव मानले असे फडणवीस म्हणाले. आजही महाराष्ट्र सर्व राज्यात अग्रणी असलेले राज्य आहे. ते पुढे नेण्यासाठी सतत प्रयत्न करू असेही ते म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या `कदम मिलाके चलना होगा’ या काव्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले, की मी प्रत्येकाला समवेत घेवून चाललो. दुष्काळ मिटवण्याचे प्रयत्न केले. गुंतवणूक खेचून आणली, विदर्भातला अनुशेष दूर करण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्रीनिधीचा वापर रूग्णांच्या मदतीसाठी करण्यास प्रारंभ केला. शेतीचे प्रश्न सोडवले असेही ते म्हणाले.
मी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार?- एकनाथ खडसे भावुक
मुंबई: विधानसभेतील 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट आणि नालायक आमदार म्हणून मी आज इथे उभा असल्याचे उद्गार खडसे यांनी निराश होत विधानसभेत काढले. सभागृहातील विरोधक आणि सत्ताधारी आमदारांपैकी कोणीही माझ्यावर आरोप केले नाहीत. बाहेरच्या व्यक्तीने माझ्यावर आरोप केले. दाऊदच्या बायकोशी माझे बोलण्याची संबंध जोडले गेले. दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटलं हे मला कळलंच नाही. एटीएस आणि इतर यंत्रणांनी केलेल्या चौकशीत काहीच सिद्ध झालं नाही, त्यामुळे मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही बरं वाटलं, असं उपरोधकपणे खडसे विधानसभेत म्हणाले.
भाजपा-शिवसेना सरकारच्या काळातील शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत एकनाथ खडसे भावनिक झाले.
त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ही सल अजूनही खडसेंच्या मनात आहे. वारंवार त्यांनी ही सल बोलूनही दाखवली आहे. आजही ही सल बोलून दाखवताना खडसे भावनिक झाले होते. तसंच आपल्यावरील आरोपांचे स्पष्टीकरण देताना खडसेंनी आपल्याच सरकारला शालजोडे लगावले.
माझ्या जीवनात मी एकही निवडणूक हरलो नाही. 40 वर्षात आपल्यावरील एकही आरोप सिद्ध झालेला नाही. आरोप – प्रत्यारोप सभागृहात होत राहणार, मात्र पण विरोधी पक्षनेता म्हणून मी कायम पुराव्यांसह आरोप केले आहेत. कारण बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात हे मला माहिती असल्याचे खडसे यांनी आपल्यावरील आरोपांवर स्पष्टीकरण देताना सांगितले.
एकही इंच जमीन घेतली नसताना, सर्व नियमांचं पालन केलेले असतानाही माजी न्यायमूर्ती झोटिंग यांची समिती नेमली गेली. अँटी करप्शन विभागाकडून दोनदा चौकशी झाली, इन्कम टॅक्सची घरी धाड पडली. माझ्या बायका, पोरांना चौकशीसाठी नेण्यात आलं. मी जमीनदाराचा मुलगा आहे. माझ्या शेतीव्यतिरिक्त माझा एकही उद्योग नाही. संपूर्ण मालमत्तेची चौकशी करून अपसंपदा आढळली नाही. माझी एकही शैक्षणिक संस्था नाही कारण माझ्यात डोनेशन घेण्याचा दमच नव्हता, असे खडसे याबाबत बोलताना म्हणाले.
मी शेवटच्या दिवशी उभा आहे कारण भ्रष्ट, नालायक, चोर, उच्चका सदस्य असा शिक्का घेऊन मला या सभागृहातून जायचं नाही, म्हणून मी हे बोलतोय. मी सभागृहाला आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की हा डाग मला घेऊन जायची संधी देऊ नका, अशी भावनिक विनंती खडसे यांनी यावेळी बोलताना केली.
खोटे आरोप करणाऱ्यांना शिक्षा करण्याचा कायदा करा, अशी मागणी करत विनापुरावे आरोप झालेला व्यक्ती आज घरी आहे, काय न्याय आहे या राज्यात? असा सवाल त्यांनी करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांकडे बोट केलं. कोणाच्या जीवनात असा प्रसंग येऊ नये, यापेक्षा वाईट आपल्या जीवनात काही होऊ शकेल असे वाटत नाही, असे सांगत काही चुकीचं बोललो असेल तर सर्वांची क्षमा मागतो, असं सांगत खडसेंनी आपल्या भाषणाची सांगता केली.
आयुक्त साहेब इकडे लक्ष द्या हो …15 उत्तुंग,विशाल वृक्षांच्या जीवावर उठला , शेतकी विद्यापीठाचा कारभार…
कामगार राज्यमंत्री ..आले हो ……
आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्याकडून पहाणी
पुणे दि. 2. – हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. मृत्यू पावलेल्या व्यक्ती छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील असून त्यांचे मृतदेह त्यांच्या गावी पाठविण्यात येत आहेत. एनडीआरएफ आणि प्रशासन यांच्या वतीने बचाव कार्य पूर्ण करण्यात आले आहे. आंबेगाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
तत्पूर्वी राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन कोंढवा तसेच आंबेगाव बुद्रुक येथील घटनेचा आढावा घेतला. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री कटारे, उपविभागीय अधिकारी सचिन बारावकर कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. भेगडे यांनी भारती हॉस्पीटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे उपस्थित होते.
सासवड वारी मार्गावर केले हजारो कडुनिंबाचे वृक्षारोपण
एमआयटी फार्मसीच्या रासेयोच्या विद्यार्थ्यांचा उपक्रम
पुणे: सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी निर्मल वारी हरित वारी या महासंकल्प अभियानामध्ये माईर्स महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या ३५ राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. तसेच, सासवड येथील वारी मार्गावर झालेल्या वृक्षरोपणानाच्या उपक्रमात ७०० वृक्षांचे रोपन करण्यात आले. ज्यात महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले.
पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १६ हजार ७३१ राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंसेवकांनी कडुनिंबाची रोपे वाटण्याचा विश्वविक्रम स्थापित केला. त्यानंतर या कडुनिंबाचे रोपे वारी मार्गावर लावण्यासाठी सुध्दा या स्वयंसेवकांनी सहभाग दर्शविला.
वरील सर्व उपक्रमाचे नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. रणजित गाढवे व प्रा. श्रध्दा चौधरी यांनी केले. तसेच, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एम.कुचेकर यांनी मार्गदर्शन केले.
पुण्याच्या रिया केळकरला तीन पदके
पुणे: गुजरात येथे 30 ते 31 जून या कालावधीत पार पडलेल्या जिम्नॅस्टिक फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या तर्फे आयोजित जिम्नॅस्टिक सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या रिया केळकर हिने लक्षवेधी कामगिरी करत तीन पदकांची कमाई केली आहे.
रिया ही अभिनव इंग्लिश मिडीयम शाळेत शिकत असून छत्रपती पुरस्कार विजेत्या सविता मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. रियाने या स्पर्धेत सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, बॅलन्सिंग बीम सिल्व्हर गटात रजत पदक आणि वैयक्तिक अजिंक्यपदक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले.
या स्पर्धेत 16 राज्यांतून 80 हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. रियासह पुण्याच्या तन्वी कुलकर्णीने देखील या स्पर्धेत आपला सहभाग नोंदविला होता.
२०० गाणी ,१८ तासांहून अधिक काळ गायनाचा पुण्यात विक्रम !
पुणे :रोटरी क्लब ऑफ पुणे शनिवार वाडा आणि व्ही पी म्युझिक अकॅडमी च्या सलग २०० गाण्यांचा विक्रमाला आज सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. २ जुलै रोजी सकाळपासून ‘ म्युझिकल शो ‘ चे आयोजन अण्णाभाऊ साठे सभागृह (पद्मावती ) येथे करण्यात आले होते.
या उपक्रमाचे उदघाटन रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते झाले. रोटरी क्लब पुणे शनिवार वाडा च्या अध्यक्ष अनिता पाटील, संयोजन समिती अध्यक्ष श्याम ढवळे, विवेक पांडे पुण्याच्या विविध क्षेत्रातील मान्यवर उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते.
‘ नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचा आणि रोटरीच्या समाजोपयोगी उपक्रमांना बळ देण्याचा हा उपक्रम प्रशंसनीय आहे ‘ , असे रवी धोत्रे यांनी यावेळी उद्घाटनपर भाषणात सांगितले.
राष्ट्रगीताने उपक्रमाचा प्रारंभ झाला, महाराष्ट्रगीताने समारोप झाला. या कार्यक्रमात ६० गायक सहभागी झाले . ऑर्केस्ट्रा सोबत मराठी -हिंदी गाणी गाण्यात आली . सकाळी ७ पासून मध्यरात्री पर्यंत हा उपक्रम सलग १८ तास चालला .
‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स ‘मध्ये या विक्रमाची नोंद करण्यात येणार आहे .
चिंतन मोढा ,अर्जुन साठे ,हर्षद गनबोटे ,ऋतुराज कोरे ,फिरोज रमजानी,विजय चेन्नूर ,रियाझ शेख ,शफी शेख ,घनश्याम अगरवाल ,मनीष गोखले , प्रभाकर पाटील आदी कलाकार यात सहभागी झाले.
छायाचित्रकाराचे समाजासाठी मौल्यवान योगदान -चित्रकार रवी देव
पुणे- छायाचित्रकार क्षण टिपण्याचे काम करतो. जे सर्वसामान्य माणसाला दिसत नाही ते त्याला दिसते. त्यातून तो सर्वसामान्यांना दृष्टि देत असतो. त्याचे समाजासाठी मौल्यवान योगदान असते असे मत ज्येष्ठ चित्रकार रवी देव यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील छायाचित्रण विभागाच्या वार्षिक प्रदर्शनाचे उद् घाटन करताना श्री. देव बोलत होते. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, विभागाचे प्रमुख राजेंद्र महामुनी, चित्रकार मिलिंद आपटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले. ‘संगीत, नाटक, नृत्य, साहित्य, चित्रकला आदी कलांमधून जीवन समृद्ध होते. नवीन दृष्टि आणि चांगले संस्कार मिळतात. दृष्टिकोन, शोधवृत्ती, तांत्रिक गोष्टींचे ज्ञान, परिस्थितीचे भान आणि ध्यास घेऊन काम करण्याची तयारी कलाकारांनी ठेवली पाहिजे.’ पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
येरवडा कारागृहात दोन गटात मारहाण; तुषार हंबीर जखमी
पुणे : खुनाच्या प्रकरणातील दोन आरोपींमध्ये झालेल्या वादातून मंगळवारी सकाळी सात वाजता येरवडा कारागृहात मारहाणीची घटना घडली. त्यामध्ये एका कैद्याच्या डोक्यासह मानेवर खिळ्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी ससुनमध्ये दाखल करण्यात आले आहे. तुषार हंबीर असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर शाहरुख शेख असे मारहाण करुन वार करणाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहात असलेल्या तुषार हंबीरवर शाहरुख शेख याने खिळ्याने वार केले. हंबीर हा हिंदू संघटनेचा संघटक असून तो हडपसर येथील मोहसीन शेख खुनातील आरोपी आहे. या हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या हंबीर याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थली दाखल झाले होते. ही घटना घडल्यावर तुरुंग प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
कारागृहाबाहेरही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळे तुरुंगातील कैद्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तुरुंग प्रशासनाकडून घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
”दोन्ही आरोपी खुनाच्या गुन्हयामध्ये शिक्षा भोगत आहेत. त्यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद झाले असण्याची शक्यता आहे. बराकीतून त्यांना सकाळी बाहेर सोडण्यात आल्यावर शाहरुख शेखने हंबीरवर खिळ्याने वार केले. यानंतर हंबीरला तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असून यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”,असे कारागृह प्रशासनतर्फे सांगण्यात आले आहे.
स्पोर्ट्स नर्सरी तर्फे आयोजित तंदरुस्ती मूल्यांकन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
सहभागी खेळाडूसाठी वैयक्तिक अहवाल उपलब्ध
पुणे: आजच्या प्रत्येक क्रीडा प्रकारात सहभागी होणाऱ्या कोणत्याही खेळाडूच्या मानसिक व शारीरिक तंदरुस्तीचा कस, सराव व स्पर्धा यातील प्रत्येक टप्प्यावर लागत असतो. त्यामुळे या प्रत्येक टप्प्यावर खेळाडूंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. ही आव्हाने पेलताना त्यांना आपल्या तंरुस्तीविषयी अचूक माहिती आणि त्यामध्ये सुधारणा करण्याकरिता मार्गदर्शन आवश्यक ठरते.त्यामुळेच स्पोर्ट्स नर्सरी यांच्या तर्फे व डेक्कन जिमखाना जलतरण विभाग यांच्या वतीने १० व १४ वर्षाखालील मुले-मुलींसाठीच्या तंदरुस्ती (फिटनेस असेसमेंट) मूल्यांकन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ६० मुला-मुलांनी आपला सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेत स्पोर्ट्स नर्सरीचे संचालक महेंद्र गोखले आणि डेक्कन जिमखाना जलतरण विभागाचे अमित गोळवलकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
याविषयी अधिक माहिती देताना स्पोर्ट्स नर्सरीचे संचालक महेंद्र गोखले यांनी सांगितले कि, या तंदरुस्ती (फिटनेस असेसमेंट) मूल्यांकनाचा उपयोग मुलांच्या जलतरणातील कामगिरीत सुधारणा करण्यासाठी होणार आहे. यामध्ये प्रत्येक मुलाची ताकद, दमश्वास, सहनशक्ती, लवचिकता, शरीर रचना अशा विविध प्रकारामध्ये खेळाडूंची क्षमता आजमावण्यासाठी तंदरुस्ती चाचणी (फिटनेस टेस्ट) घेण्यात आली. तसेच, या सर्व घटकांमध्ये आपल्या मुलाच्या कामगिरीत कशाप्रकारे सुधारणा करता येईल आणि त्याचा प्रत्यक्ष स्पर्धेत मुलांना कशाप्रकारे उपयोग करून घेता येईल, याविषयी मुलांच्या पालकांनाही मार्गदर्शन करण्यात आले. विशेष म्हणजे या तंदरुस्ती चाचणी (फिटनेस टेस्ट)चा वैयक्तिक अहवाल या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक खेळाडूला देण्यात येणार असून या खेळाडूंनी आपल्या तंदरुस्तीत कोणत्या प्रकारे सुधारणा करण्याची गरज आहे हे या अहवालात नमूद करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा उपयोग करून मुलांना व त्यांच्या पालकांनाही भविष्यात कामगिरीत सुधारणा करण्यासाठी लक्षणीय मदत होणार आहे.
या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुला-मुलींनी व त्यांच्या पालकांनी या उपक्रमाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले आणि अशा प्रकारच्या कार्यशाळा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात याव्यात अशी अपेक्षाही व्यक्त केली.
राष्ट्रवादीकडे 8 पैकी 3 मतदार संघातच बलशाली उमेदवार ..8 मतदारसंघात एकूण ५२ इच्छुक
पुणे-राष्ट्रवादी कॉंग्रेस कडे पुण्याच्या 8 मतदार संघात ५२ कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली असून या साठी पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत ,प्रत्यक्षात मुंबईत या अर्जांची प्रादेशिक पातळीवर छाननी होणार आहे. असे असले तरी एकूण 8 मतदारसंघातील इच्छुकांची नावे पहिली तर अवघ्या 3 मतदार संघातच राष्ट्रवादी कडे चांगली लढत देवू शकतील असे बलाढ्य उमेदवार असल्याचे मानले जाते आहे. कसबा, कँटोन्मेंट ,शिवाजीनगर सह एकूण ५ मतदार संघात निवडून येतील अशा उमेदवारांची वानवा दिसून येते आहे .असा राजकीय समीक्षकांचा दावा आहे .सर्वात जास्त इच्छुकांची संख्या हडपसर मतदार संघात आहे . 13 इच्छुकांनी येथून उमेदवारी मागितली आहे. चेतन तुपे हे शहर राष्ट्रवादी चे अध्यक्ष आहेत. मात्र ते हडपसर मतदारसंघातूनच काय पण कुठूनही इच्छुक नसल्याचेच स्पष्ट दिसते आहे .मात्र ‘पक्षाने आदेश दिला तर आपण निश्चित विधानसभा लढवू ‘असे ते माध्यमांना सांगत असले तरी त्यांनी स्वतः हून पक्षाकडे उमेदवारीच मागितलेली नाही याकडे लक्ष वेधण्यात येते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशावरून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यास चांगला प्रतिसाद मिळाला असून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघातून एकूण 52 इच्छुकांनी पक्षाकडे विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केलेली आहेत.
विधानसभा मतदारसंघ निहाय इच्छुकांची नावे खालीलप्रमाणे.
वडगाव शेरी मतदार संघ-
बापूसाहेब पठारे,सुनील टिंगरे,सतीश म्हस्के,
सौ तबस्सुम इनामदार,भीमराव गलांडे.
शिवाजीनगर मतदार संघ-
नीलेश निकम,प्रदीप देशमुख,बाळासाहेब रानवडे,दयानंद इरकल.
कोथरूड मतदारसंघ-
बंडू केमसे,सौ.लक्ष्मी दुधाने,विजय डाकले,संदीप बालवडकर,माणिक दुधाने,बाळासाहेब बराटे,स्वप्निल दुधाने,गणेश घोरपडे.
खडकवासला मतदार संघ-
दत्ता धनकवडे,दिलीप बराटे,सचिन दोडके,सौ. रुपाली चाकणकर,काका चव्हाण,बाबा धुमाळ,सौ. भाग्यश्री कामठे.
पर्वती आमदार संघ-
अश्विनी कदम, संतोष नांगरे, नितीन कदम, शशिकांत तापकीर, अर्चना हनमघर, निखिल शिंदे.
हडपसर मतदार संघ-
लाला गायकवाड,अनिस सुंडके,सुरेश घुले,आनंद अलकुंटे,वैशाली बनकर, प्रवीण तुपे, प्रशांत जगताप, गफूर पठाण, बंडू गायकवाड, अशोक कांबळे, योगेश ससाणे, फारूक इनामदार, सौ.नंदा लोणकर.
पुणे कँटोन्मेंट मतदार संघ-
शांतीलाल मिसाळ, शैलेंद्र जाधव,अशोक कांबळे.
कसबा मतदार संघ-
गणेश नलावडे, रवींद्र माळवदकर, विशाल गजरे, वनराज आंदेकर, अशोक राठी, गोरख भिकुले.
मालाडमध्ये भिंत कोसळून १८ ठार, ५०हून अधिक जखमी
मुंबई -मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे. या दुर्घटनेत १८ जण ठार झाले असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. तर, चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. एक महिला तिच्या बाळासह ढिगाऱ्याखाली असल्याचं आढळून आलं आहे. तिला सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जखमींवर शताब्दी रुग्णालयात आणि जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.मुंबईत सोमवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर आजही कायम असून अंधेरीतील चांदिवली येथील संघर्ष नगर इथं जमीन खचून मोठं भगदाड पडलं आहे. त्यामुळं आसपासच्या तीन रहिवाशी इमारती प्रशासनानं तातडीनं खाली केल्या आहेत.









