Home Blog Page 2901

2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी भारताचा समग्र दृष्टिकोन

0

दिल्ली;- केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारमन यांनी आज संसदेत 2018-19 वर्षासाठी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. शाश्वत विकास, हवामान बदल, संसाधन दक्षता आणि वायु प्रदूषण संबंधित विविध धोरणे आणि उपाययोजना लागू करून आपल्या प्रगतीची उद्दिष्टे भारताने ठरवल्याचे या अहवालात म्हटले आहे.

2030 चा जागतिक कार्यक्रम अवलंबून गरीबी, लैगिंक भेदभाव, आर्थिक असमानता यापासून मुक्त जगाच्या निर्मितीसाठी अनेक देश पुढे येत आहेत. जेणेकरून भावी पिढ्यांसाठी निरोगी ग्रह सुनिश्चित करता येईल. हे उद्दिष्ट बहुआयामी आणि विविध सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरण संबंधी आयाम एकीकृत करणारे आहे. भारत 2030 च्या शाश्वत विकास उद्दिष्टांसाठी विविध योजना राबवत आहे. भारताचा एसडीजी सूचकांक स्कोर राज्यांसाठी 42 आणि 69 दरम्यान तर केंद्र शासित प्रदेशांसाठी 57 आणि 68 दरम्यान आहे.

शाश्वत विकासासाठी धोरणात्मक पुढाकार

या अहवालात शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने सरकारच्या धोरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये स्वच्छ भारत मिशन, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्रधानमंत्री आवास योजना, स्मार्ट सिटीज, प्रधानमंत्री जनधन योजना, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना आणि प्रधानमंत्री उज्जवला योजना आणि अन्य योजनांचा समावेश आहे.

नमामि गंगे मिशन- एसडीजी-6 साध्य करण्यासाठी एक प्रमुख धोरणात्मक कार्यक्रम म्हणून याची सुरूवात 2015-2020 कालावधीसाठी वीस हजार कोटी रुपये खर्चासह करण्यात आली होती. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन, शहरी आणि ग्रामीण साफ सफाई, औद्योगिक प्रदूषण दूर करणे, जल उपयोग निपुणता आणि गुणवत्ता सुधारणा, आणि स्वच्छ गंगा निधि यांचा समावेश आहे.

भारताने समानता आणि सामान्य सिद्धांताच्या आधारे हवामान बदलासंबंधी कारवाई लागू करण्याप्रति आपली जबाबदारी नेहमीच व्यक्त केली आहे.

आपल्या विकास गरजा व्‍यापक आहेत, भारताच्या जनतेला आधुनिक सुविधा आणि विकास साधनें पुरवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालात हवामान बदलाबाबत जागतिक प्रतिसाद

मजबूत करण्यासाठी पैरीस करारात हवामान निधीवर भर देण्यात आला आहे असे नमूद करण्यात आले आहे. या अहवालात UNCTAD 2014 च्या अहवालाचा दाखला देण्यात आला आहे. एसडीजी साध्य करण्यासाठी विकसनशील देशांच्या गुंतवणूकीत प्रतिवर्ष 2.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची कमतरता आहे. जागतिक समुदायासाठी हवामान संदर्भात कारवाईसाठी वातावरण निर्माण करण्यात भारताने आपली जबाबदारी पार पाडण्याची ही योग्य वेळ असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अर्थ मंत्रालय समावेशक विकासासाठी भारतात किमान वेतन पद्धतीची फेर रचना करण्याचे आर्थिक सर्वेक्षणात आवाहन

0

किमान वेतन पद्धतीच्या प्रभावी आराखड्यासाठी धोरणात्मक शिफारसींची सूचना-

नवी दिल्ली,;-किमान वेतनाची उत्कृष्ट आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी यामुळे वेतन असमानता प्रामुख्याने निम्न स्तरावरची वेतन असमानता कमी करण्यासाठी बळकटी देईल. वेतन वितरणात तळाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात महिला आहेत या पार्श्वभूमीवर हे महत्वाचे आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी 2018- 19 या वर्षासाठी संसदेत आज मांडलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात हे नमूद करण्यात आले आहे.

समाजाच्या तळातल्या वंचीत घटकांना लक्षात घेऊन आखण्यात आलेले किमान वेतन धोरण मागणीला चालना देण्यासाठी आणि मध्यम वर्गाची उभारणी करण्यासाठी आणि त्याला बळकटी देण्यासाठी उपयुक्त असून त्यायोगे शाश्वत आणि समावेशक विकासाला प्रेरणादायी ठरणार असल्याचे या पाहणी अहवालात म्हटले आहे.

किमान वेतन पद्धतीची प्रभावी आखणी करण्यासाठी 2018-19 च्या आर्थिक सर्वेक्षणात धोरणात्मक शिफारसी करण्यात आल्या आहेत –

सुलभीकरण आणि सुसूत्रता

वेतन विधेयकात प्रस्तावीत केल्याप्रमाणे किमान वेतन सुसुत्रीकरणाचे पालन करून त्याला सहाय्य करण्याची गरज आहे.नव्या कायद्यात वेतनाच्या व्याख्येत,विविध कामगार कायद्यातल्या 12 वेगवेगळ्या व्याख्या अंतर्भूत करण्यात आल्या आहेत.

किमान वेतन राष्ट्रीय स्तर निर्मिती

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तर किमान वेतन अधिसूचित करावे,पाच भौगोलिक क्षेत्रात त्यात बदल असू शकतात.त्यानंतर राज्ये त्यांचे किमान वेतन दर निश्चित करू शकतात मात्र हे दर या राष्ट्रीय स्तरापेक्षा कमी असता कामा नयेत.यामुळे देशभरात किमान वेतनात काही प्रमाणात एकसमानता येईल.

किमान वेतन निश्चितीसाठी निकष

अकुशल,अर्ध कुशल, कुशल आणि अति कुशल यांचा समावेश असलेली कुशल श्रेणी-आणि भौगोलिक क्षेत्र यापैकी एका घटकावर आधारित किमान वेतन निश्चिती करण्यावर वेतन कायद्यात विचार करण्यात यावा.

समावेश

वेतन विधेयकातली प्रस्तावित संहिता,सर्व क्षेत्रांतल्या रोजगाराना/ कामगारांना तसेच संघटीत आणि असंघटीत अशा दोनही क्षेत्रांना लागू असावी.

नियमित समायोजन आणि तंत्रज्ञानाची भूमिका

किमान वेतनाचे नियमितपणे आणि वारंवार समायोजन करणारी यंत्रणा विकसित करण्यात यावी.

तक्रार निवारण

वैधानिक किमान वेतन न दिल्याच्या तक्रारीसाठी लक्षात ठेवण्यासाठी सुलभ असा निःशुल्क फोन क्रमांक असावा.

प्रभावी किमान वेतन पद्धती उभारणीमुळे विकासाच्या विविध पैलुंवर उपयुक्त परिणाम घडून येणार असल्याने याची तातडीने आवश्यकता असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त साई पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे प्रस्थान

पुणे;-  श्री साईबाबा पालखी सोहळा समिती पुणे आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त श्री साईबाबा पालखी सोहळा २०१९ आयोजित केला आहे . शुक्रवार दि. ५ जुलै २०१९ रोजी सकाळी ९ वाजता कसबा गणपती मंदिर येथून प. पु. श्री रमेश गिरीजी महाराज बेट कोपरगाव यांच्या शुभहस्ते श्री रविसेठ सांकला , रविराज ग्रुप , यांच्या उपस्थितीत व खासदार गिरीश बापट , पुणे , आमदार माधुरीताई सतीशसेठ मिसाळ , शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीन कोल्हे पाटील , श्री साईबाबा संस्थांनचे कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगलीकर , पुणे महापालिका भाजपचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांच्या उपस्थितीत श्री साईबाबा पालखीचे श्री क्षेत्र शिर्डीकडे नगर मार्गे प्रस्थान होणार आहे . हा सोहळा रविवार दि. १४ जुलै २०१९ रोजी शिर्डीस पोहचेल .

या पालखीचे वैशिष्ट्य म्हणजे या पालखीत व्यसनमुक्तीचे उपक्रम राबविले जातात . तसेच , स्वछ भारत अभियानांतर्गत स्वछतेसाठी दहा लाख रुपये किमतीचे तीन आधुनिक मोबाइल टॉयलेट्स समितीने पालखीबरोबर घेतले आहेत . या पालखीत महाराष्ट्राच्या विविध भागातील साईभक्त सहभागी होतात . साईबाबा साईरथ आधुनिक सुसुविधांनी तयार आहे . सध्या साईरथाचे सजावट व पॉलिशचे काम पूर्ण होत आले आहे .

महिला आयोगाचा उपक्रम स्तुत्य : स्वयंसेवी संस्थांचा सूर

पुणे :-आषाढी पालखीनिमित्त `महाराष्ट्र राज्य महिला आयोगा’च्या वतीने `वारी नारीशक्ती`ची या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात राज्यातील विवीध भागात कार्यकरणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या महिला प्रतिनिधींनी वारीतील महिलांना मार्गदर्शन केले.

दैनंदिन जीवनात प्रत्येक ठिकाणी महिलांनी सक्षमपणे काम करावे. तसेच प्रत्येक नारी ही शक्तीशाली असतेच तिच्यात कलागुण असतात. तिला हवे असते ते योग्य मार्गदर्शन महिला आयोगाचा वारी नारीशक्ती हा उपक्रम यासाठी उपयुक्त ठरणार आहे, असे मत यावेळी स्वयंसेवी संस्थांच्या उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केले.

लोणंद मुक्काम ठिकाणी हा उपक्रम झाला, अशी माहिती उषा बाजपेयी (महाराष्ट्र राज्य महिला आयोग, `वारी नारीशक्ती` ) यांनी दिली.

या संपूर्ण उपक्रमाची संकल्पना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांची आहे. त्यांनी उषा बाजपेयी यांच्याकडे दिंडी उपक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवराना आमंत्रीत करणे या नियोजनाची जबाबदारी दिली आहे.

बुधवारी झालेल्या या उपक्रमात भारत विकास परिषद, आराधना चॅरिटेबल ट्रस्ट, दीपिका कोलंबस ट्रस्ट, वंचित विकास, माई बालभवन, पाखर संकुल, उद्योगवर्धिनी, नॅशनल कंझुमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

या सक्षमीकरणाच्या दिंडीमध्ये दररोज एक क्षेत्रातील नामवंतांचा सहभाग असतो.

महिलांना सक्षम करण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा उपक्रम आहे. आर्थिक, सामाजिक, आरोग्य दृष्ट्या महिलांना सक्षम करण्याचा सरकारचा हा उपक्रम स्तुत्य आहे. महिला आयोगातील महिलांसाठी विविध योजना, कायदे सरकार राबवित आहेत परंतु त्याची माहिती गावोगावी पोहोचविण्यासाठी हा उपक्रम वारीच्या माध्यमातून सक्रिय होत आहे, असे विचार स्वयंसेवी संस्थांनी मांडले.

दिंडीमध्ये महिला सक्षमीकरणाचे संदेश देण्यासाठी वारीच्या दोन्ही मार्गांवर फिरता चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिन आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठीची मशिन्स आहेत. सॅनिटरी नॅपकिन वापराबाबत महत्वाचे संदेश देऊन प्रबोधन केले जात आहे. तसेच कीर्तन, पोवाडा आणि भारुडच्या माध्यमातून सक्षमीकरण संदेश दिले जात आहेत.

यामध्ये मराठी चित्रपट कलाकार, डॉक्टर्स, क्रीडापटू, वास्तूरचनाकार, वकील, स्वयंसेवी संस्था, आर्मी ऑफिसर, मुस्लिम महिलांचे पथक यांचा सहभाग आहे.

या उपक्रमातील चित्ररथ आणि महिला सक्षमीकरण दिंडीचा शुभारंभ शनिवारवाडा पुणे येथे झाला.

महिला सक्षमीकरण हा या दिंडीचा प्रमुख उद्देश आहे. आषाढीची वारी हा महाराष्ट्राचा सामाजिक, सांस्कृतिक, अध्यात्मक वारसा आहे. या वारीत लक्षावधीच्या संख्येने वारकरी सहभागी होतात. यात महिलांचा लक्षणीय सहभाग असतो. अध्यात्माचा समाजप्रबोधनासाठी प्रभावी वापर हे वारीचे खरे सूत्रे आहे. या सूत्राला अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याचे कार्य महिला आयोग करत आहे.

वारी नारीशक्तीची या उपक्रमांतर्गत चित्ररथ आणि महिला सक्षमीकरणाची दिंडी समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहे. महिला सक्षमीकरण या संकल्पनेवर आधारित महिलाचे कीर्तन, भारूड याचे आयोजन करण्यात येत आहे.

पीएनबी मेटलाइफने जाहीर केले ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पिअनशिपचे (जेबीसी) पाचवे पर्व

0

उदयोन्मुख बॅटमिंटन खेळाडूंना प्रगती करण्यास व कौशल्ये वाढवण्यास मदत करण्यासाठी जेबीसी बूट कॅम्प या टेलर-मेड ट्युटोरिअल प्रोग्रॅमचे अनावरण

 

04 जुलै 2019: पीएनबी मेटलाइफ इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (“पीएनबी मेटलाइफ”) या भारतातील आघाडीच्या 10 खासगी लाइफ इन्शुरन्स कंपन्यांपैकी (आर्थिक वर्ष 2019) एक असणाऱ्या कंपनीने आज ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पिअनशिप (जेबीसी)-5 आणि जेबीसी बूट कॅम्प हा व्हर्च्युअल ट्युटोरिअल प्रोग्रॅम जाहीर केला. ब्रँड अम्बेसिडर व लोकप्रिय बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि माजी नॅशनल चॅम्पिअन व प्रशिक्षक यू. विमल कुमार यांच्या उपस्थितीत या दोन्ही उपक्रमांची घोषणा करण्यात आली. उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडूंना मदत व्हावी, या हेतूने, दोन्ही बॅडमिंटन खेळाडू, तसेच पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार श्रीवास्तव यांनी जेबीसी `बूट कॅम्प’ या कस्टमाइज्ड यूट्युब चॅनलचे अनावरण केले.

या वर्षी, पीएनबी मेटलाइफने बॅडमिंटन खेळाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडूंना प्रगती करण्यास व कौशल्ये विकसित करण्यास मदत करण्यासाठी पीएनबी मेटलाइफ जेबीसी बूट कॅम्पच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे. ट्युटोरिअल व्हीडिओंमध्ये तीन स्तर समाविष्ट असतील: बेसिक, इंटरमिजिएट व अॅडव्हान्स. त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये खेळाचे नियम, मैदानाची मापे, विविध सर्व्ह, स्विंग्स, हालचाली व स्मॅशेस, फिटनेस अशा विषयांचा समावेश असेल. प्रेक्षकांना पी. व्ही. सिंधू. यू. विमल कुमार. विजय लॅन्सी व अनुप श्रीधर अशा नामवंत बॅडमिंटन खेळाडूंचे व दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. व्हर्च्युअल ट्युटोरिअलमुळे तरुण बॅडमिंटन खेळाडूंना कोणताही खर्च न करता, देशभरातून कोठूनही व्हर्च्युअल पद्धतीने देशातील मास्ट कोचेसशी जोडले जाता येईल. ही ट्युटोरिअल यूट्युब/पीएनबी मेटलाइफ जेबीसी बूट कॅम्प येथे पाहता येतील.

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) मान्यताप्राप्त पीएनबी मेटलाइफ जेबीसी हा उपक्रम लहान वयात योग्य गुणवत्ता व खेळाडू जोपासून, बॅडमिंटन हा खेळ तळागाळापर्यंत नेतो. या स्पर्धेचा पाचवा हंगाम भारतातील 10 शहरांत खेळला जाणार आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये निरोगी जीवनशैलीला उत्तेजन देण्यासाठी, ही स्पर्धा 5-17 वर्षे वयोगटातील मुलांसाठी खुली असून तिचे विभाजन 9, 11, 13, 15 व 17 वर्षांखालील श्रेणींमध्ये केले जाईल.

पीएनबी मेटलाइफचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष कुमार श्रीवास्तव यांनी सांगितले, “बॅडमिंटन हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे आणि देशात या खेळामध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता उपलब्ध आहे. या खेळाडूंना योग्य प्रशिक्षण व सुविधा मिळाल्यास ते या क्षेत्रात चमकू शकतात. गेली चार वर्षे, आम्ही ज्युनिअर बॅडमिंटन चॅम्पिअनशिप्सद्वारे अशा तरुण खेळाडूंना पाठिंबा देत आहोत. स्पर्धेचे पाचवे पर्व हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचे प्रतिक आहे. स्पर्धेबरोबरच, जेबीसी बूट कॅम्पमुळे अनेक तरुण खेळाडूंना लाभ होईल, अशी अपेक्षा आहे.”

अगोदरच्या वर्षांतील चॅम्पिअनशिप्सना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे व सहभागींकडून उत्तम प्रतिक्रिया मिळाली आहे. जेबीसी-4 हे पर्व देशभरातील 8000+ उदयोन्मुख बॅडमिंटन खेळाडूंपर्यंत पोहोचले. सहभागींकडून पसंती आणि मागील काळात सायना नेहवाल, अश्विनी पोन्नप्पा, दिनेश खन्ना व प्रकाश पदुकोण यांच्याकडून आणि या वर्षी ब्रँड अम्बेसिडर पी. व्ही. सिंधू व नॅशनल चॅम्पिअन यू. विमल कुमार यांच्याकडून कौतुक मिळाल्यानंतर, जेबीसी 5 या यंदाच्या चॅम्पिअनशिपनेही सहभागींच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली असून, देशाच्या कानाकोपऱ्यातून प्रवेशिका येत आहेत.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. संधू यांनी सांगितले, “या खेळाने अलीकडच्या काळात मिळवलेले विजेतेपद व गौरव यामुळे हा खेळ घराघरात पोहोचला आहे. परंतु, अधिक गुणवान खेळाडू घडवण्यासाठी आणखी प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणूनच, तळागाळापासून उत्तेजन देणे गरजेचे आहे. या खेळामध्ये उतरताना नव्या खेळाडूंसमोर येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन यांचा अभाव. जेबीसी बूट कॅम्पमुळे, तरुण बॅडमिंटन खेळाडूंना या खेळातील दिग्गजांकडून योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल. गुणवान खेळाडूंसाठी पोषक वातावरण व व्यवस्था निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे त्यांना व्यावसायिक खेळ म्हणून बॅडमिंटनची निवड करण्यास उत्तेजन देण्यासाठी पीएनबी मेटलाइफशी जोडलेली असल्याचा मला अतिशय आनंद होतो. या देशात या खेळातील गुणवत्तेची वानवा नाही, हे या खेळाच्या वाढत्या लोकप्रियतेवरून दिसून येते.”

योग्य व इच्छित व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी, जेबीसीने क्राय (चाइल्ड राइट्स अँड यू) बरोबर केलेला सहयोग विचारात घेता, एक प्रकल्प म्हणून जेसीबी अधिक महत्त्वाची ठरते. गेल्या चार वर्षांत, सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, पीएनबी मेटलाइफ भारतातील गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती देत आहे. गेल्या चार वर्षांत, पीएनबी मेटलाइफने 56 गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे आणि भारतातील 375 गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. यंदा, आगामी जेबीसीसाठी जवळजवळ 100 गरजू विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात असून, त्यापैकी 32 मुलांना बॅडमिंटन हा खेळ जोपासण्यासाठी वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

पीएनबी मेटलाइफचे चीफ मार्केटिंग ऑफिसर निपुण कौशल म्हणाले, “एक स्पर्धा म्हणून जेबीसी हे बॅडमिंटनप्रेमींसाठी एक सर्वात मोठे वार्षिक राष्ट्रीय खुले व्यासपीठ बनले आहे, यात शंकाच नाही. या खेळाची गुणवत्ता असणाऱ्या, परंतु ती साध्य करण्यासठी साधनांची कमतरता असणाऱ्या मुलांना मदत करण्यासाठी जेबीसी हे प्रभावी माध्यम ठरले आहे. ही स्पर्धा लहान वयात योग्य गुणवत्ता जोपासण्यासाठी मदत करते, त्यामुळे मुलांच्या प्रगतीला आणि जागतिक स्तरावर कामगिरी करण्याची क्षमता विकसित करण्याला चालना मिळते.”

स्वतंत्र नोंदणी लिंकद्वारे जेबीसीसाठी ऑनलाइन नोंदणी करता येऊ शकते. तसेच, 200 हून अधिक मायक्रो-कम्युनिटीज व 6,000 मम ब्लॉगर्स यांच्यामार्फतही नोंदणी करता येऊ शकते. नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी (+919172530523) या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करावा. तसेच, भारतभरातील इच्छुकांना सहभागी करून घेण्यासाठी, शाळा, क्रीडा अकादमी व बॅडमिंटन संघटनाही सहभागी होणार आहेत.

मृत कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता द्यावा खासदार गिरीश बापट यांचे संसदेत निवेदन

पुणे :   पुण्यातील कोंढवा तसेच आंबेगाव येथे झालेल्या अपघातात बांधकाम मजूर मृत झाले. असे प्रकार बांधकाम व्यावसायिकांच्या हलगर्जीपणामुळे होत असून असा हलगर्जीपणा करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई करण्यात यावी. तसेच अशा प्रकारच्या अपघातात मृत झालेल्या असंघटित कामगारांच्या नातेवाईकांना निर्वाह भत्ता मिळावा अशी विनंती आज खासदार गिरीश बापट यांनी आज संसदेत केली.
खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर आज पहिल्यांदा खासदार गिरीश बापट यांनी  संसदेत निवेदन केले. आपल्या निवेदनात ते म्हणाले,पुण्यात घडलेल्या या घटना या पुणे महापालिका तसेच महाराष्ट्र राज्याचा विषय असला तरीही देशभरात अशा घटना घडत आहेत. बांधकाम व्यवसायिकांच्या हलगर्जीपणामुळे अशा घटना घडत आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम व्यवसायिकांच्यावर काही निर्बंध लावणे आवश्यक आहे. बांधकाम व्यावसायिक सातत्याने नियमांचे उल्लंघन करत आहेत. बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करण्यासाठी यामध्ये केंद्र सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांवर बंदी घालण्यात यावी. त्याचबरोबर बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणावरून योग्य अंतरावर कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची परवानगी द्यावी. या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा किंवा दंड आकारण्याचे प्रावधान करावे, तसेच प्रत्येक नगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्यात यावा. या माध्यमातून अशा आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचवता येईल. असे आपत्कालीन कक्ष नगरपालिकेत कार्यरत करण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला कोणते निर्देश दिले आहेत का? किंवा तसे निर्देश देण्याचा केंद्राचा विचार आहे का?  याबाबत माहिती देण्याची विनंती त्यांनी केंद्र सरकारला केली. अशाप्रकारच्या असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना अशा दुर्दैवी घटनेनंतर त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालावा यासाठी त्यांना आयुष्यभर भत्ता देणारी कोणतीही संस्था नाही. असा निर्वाह भत्ता मिळावा यासाठीही त्यांनी केंद्राला विनंती केली.

ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश गिळंकृत :’ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात आरोप

0

पुणे :’ईव्हीएम ‘ हॅकिंग मुळे देश, लोकशाही गिळंकृत झाली असल्याचा सूर ‘ ईव्हीएम चे सत्य’ कार्यक्रमात उमटला.

ईव्हीएम विरोधी राष्ट्रीय जनआंदोलन’च्या ‘ ईव्हीएम चे सत्य’ या जाहीर कार्यक्रमास बुधवारी चांगला प्रतिसाद मिळाला.माजी न्या.बी.जी. कोळसे – पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. बुधवार,दि. ३ जुलै २०१९ रोजी संध्याकाळी ५ ते ८ या वेळात पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन व कलादालन, घोले रोड, पुणे येथे हा कार्यक्रम झाला.

अनुपम सराफ, विद्यूत, धनंजय शिंदे, फ़िरोज़ मिठीबोरवाला, रवि भिलाने, संतोष शिंदे, नगरसेवक अविनाश बागवे, श्वेता होनराव व्यासपीठावर उपस्थित होते.

अॅड. अभय छाजेड, दत्ता बहिरट, , रूपाली ठोंबरे-पाटील यांनी अनुभव कथन केले.प्रश्र्नोत्तरेही झाली. माहिती -तंत्रज्ञान तज्ज्ञ धनंजय माने यांनी ईव्हीएम हॅकिंग बद्दल माहितीचे सादरीकरण केले.

‘ ईव्हीएम हे उद्योगपती ,ब्राहमण वर्चस्ववादी आणि संघाने आणलेली व्यवस्था आहे. या देशात माणसं मॅनेज होतात, तर मशीन का होत नसेल ? म्हणून ईव्हीएम व्यवस्थेविरोधात लढण्याची गरज आहे ‘ , असे उद्गार न्या.बी.जी. कोळसे – पाटील यांनी काढले.

ते म्हणाले, ‘कोणतेही सरकार देशात असले तरी संघाचेच वर्चस्व राहिलेले आहे. मोदी -शहा यांच्या विरोधात न्या. कृष्णा अय्यर तसेच न्या.सावंत यांनी कारवाईची शिफारस केलेली असताना ती झाली नाही.बाबरी प्रकरण झाले नसते, तर गोध्रा झाले नसते, गोध्रा झाले नसते, तर २००२ चा हिंसाचार झाला नसता.

धनंजय शिंदे म्हणाले, ‘ईव्हीएम द्वारे मतांची चोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला. संशय असल्याने प्रगत देशातही ईव्हीएम चा वापर थांबवला आहे. पण, भारतीय निवडणूक आयोग ईव्हीएम ला चिकटून आहे.जेव्हा उमेदवाराची नावे, चिन्हे मशीनमध्ये भरली जातात, त्याच क्षणी घोटाळा केला जातो. हॅकेथॉन स्पर्धत परदेशी कंपन्यांना का प्रवेश दिला नाही ? मतदानावर आक्षेप चुकला तर मतदारालाच शिक्षा होण्याची भीती आयोगाने घातलेली आहे.
.
फिरोज मिठीबोरवाला म्हणाले, ‘ इलेक्ट्रॉनिक व्होट मॅनेजमेंटच्या जोरावर केंद्र सरकार निवडून आली आहे. सर्व यंत्रणा नियंत्रित करून १०० जागांचा घोटाळा मोदी सरकारने केला आहे. पुलवामा आणि एअर स्ट्राईकवर २३ राजकीय पक्षांना ठामपणे शंका घेता आली नाही, हे मोठे अपयश ठरले.ईव्हीएम विरोधी लढाईत देशपातळीवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘

अनुपम सराफ म्हणाले, ‘ ईव्हीएम ही हातचलाखीची जादू आहे. निवडून आलेल्या उमेदवाराला मिळालेली मते ही जनतेने दिलेली मतेच आहेत, हे ठामपणे निवडणूक आयोग सांगू शकत नाही.व्हीव्हीपॅट हे व्होटर डिस्प्ले आहे, व्होटर व्हेरीफाइड स्लीप नव्हे. पाच व्हीव्ही पॅट मॅनेज करणे खूप सोपे आहे. मतदार याद्या कायद्याप्रमाणे तयार होत नाहीत. हे एक प्रकारे बूथ कॅप्चरिंग आहे.आधार नंबर व्होटरला जोडणे हाही भ्रष्टाचार आहे. जनधन खाती उघडणे हा थेट सबसिडीने प्रभावित करणे शक्य होते. सोयीचे मतदार प्रभावित करणे शक्य होते.

अभय छाजेड म्हणाले, ‘ पोलिंग एजंट, काऊटिंग एजंट ना २०१४ मeये ईव्हीएम विषयी जागरुकता नव्हती. मात्र, तेव्हापासून ईव्हीएम घोटाळा सुरु झाला होता. माझ्या निवडणुकीत उच्च न्यायालयात ईव्हीएम विरोधात धाव घेतली. मात्र, उपयोग झाला नाही.माहिती अधिकारात मशीन निर्मितीची माहिती मिळू शकत नाही. दुसरीकडे वातावरण निर्मिती केली जाते. समर्थन करणारा बुध्दीवादी वर्ग तयार ठेवला जातो. तरीही ,ईव्हीएम टॅंपरिंग कसे होते, याचा कायदेशीर शोध घेतला पाहिजे. मतदाराला आपले मत कोठे गेले, ते व्हीव्ही पॅट स्लीप द्वारे कळले पाहिजे.

रुपाली ठोंबरे – पाटील म्हणाल्या, ‘ २०१२ साली मी २१०० मतांनी निवडून आले होते. २०१७ ला १४ हजार हून अधिक मते मिळाली , पण नवख्या उमेदवाराला २५ हजार मते मिळाली. मोदी सरकार खरंच लोकप्रिय आहे तर त्यांनी बैलेट पेपरवर निवडून येऊन दाखवावे. लोकशाही जगवायची असेल तर निवडणुकांना बॅलेट पेपरवर आणावे लागेल.

दत्ता बहिरट म्हणाले, ‘ माझ्या निवडणुकीत छाननीपासून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव होता. मतदानावेळी मतदान भलतीकडेच जात होते. न्यायलयातही तारखा पुढे पुढे जातात. निकाल लागत नाहीत. ‘

. संतोष शिंदे म्हणाले, ‘ ईव्हीएम ऐवजी बॅलट पेपरवर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक घेण्यासाठी आंदोलन झाले पाहिजे.

रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे म्हणाले, ‘ निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचे संघटन असल्याप्रमाणे वागत आहे. संसदीय लोकशाही संपण्याचा धोका आहे. ‘

रवी भिलाने म्हणाले, ‘ सर्व समाज या सरकारच्या विरोधाात आहे. फक्त, ईव्हीएम यांच्या सोबत आहे. हा देशाला गिळून टाकणारा घोटाळा आहे. त्या विरोधात उभे राहिले पाहिजे.

जांबुवंत मनोहर यांनी प्रास्ताविक केले. संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले.

जाम्बुवन्त मनोहर, डॉ सुरेश बेरी, दिलिप सिंग विश्वकर्मा, रुपाली पाटील, क्षितिज यामिनी श्याम, प्रशांत कनोजिया, नागेश भोसले, समिर गांधी, सुकेश पासलकर, सुभाष कारंडे व सहकारी यांनी आयोजन केले . माजी आमदार मोहन जोशी यांनीही सभागृहात येऊन वक्त्यांची भेट घेतली

मायानगरी एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

मुंबईला ‘स्वप्ननगरी’ म्हटलं जातं. डोळ्यात असंख्य स्वप्नं घेऊन दररोज अनेकजण या शहरात येत असतात.  इथल्या चित्रपटसृष्टीचं, ग्लॅमरच आकर्षण अनेकांना असतं. चित्रपटसृष्टीत नाव कमवायला, नशीब आजमावयला आलेल्यांसाठी तर ही ‘मायानगरी’च असते. प्रत्येक क्षेत्राच्या चांगल्या व वाईट बाजू असतात. चित्रपटसृष्टीही त्याला अपवाद नाही. ग्लॅमरविश्वातील प्रसिद्धी अनेकांना खुणावते पण, या झगमगत्या ग्लॅमरच्या पाठचा चेहरा त्यांना दिसत नाही. त्यातूनच आर्थिक फसवणूक, कास्टिंग काऊच यासारखे गैरप्रकार घडत असतात. चित्रपटसृष्टीच्या याच काळ्या बाजूवर प्रकाशझोत टाकणारा मायानगरी एक सत्य हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्री सद्गुरू प्रोडक्शन निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन गजानन बाकले यांचे तर निर्माते कैलास पाटील उंडे आहेत. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच भरत दिघे साहेब(फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर अचिव्ह ग्रुप ऑफ कंपनी) यांच्या हस्ते संपन्न झाला.

ग्लॅमरच्या मोहापायी चूक किंवा बरोबर याचा सारासार विचार न करता अनेकजण चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. अशा नवोदितांसाठी मायानगरी एक सत्य हा चित्रपट डोळ्यात अंजन घालणारा असल्याचे मत निर्माते कैलास पाटील उंडे व दिग्दर्शक गजानन बाकले यांनी व्यक्त केले.

ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, हर्षदा गुप्ते, रेखा निर्मल, पुरूषोत्तम उपाध्याय, प्रदीप पाटील, तुषार किरण, ज्ञानदेव शिंदे, गजानन बाकले, कैलास पाटील उंडे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. सहनिर्माते बाबसाहेब पारखे तर सहदिग्दर्शक तुषार नन्नवरे आहेत लेखन, पटकथा, संवाद कैलास उंडे यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचे छायांकन व्ही.डी नाईक करणार आहेत. कॅमेरा सेटअप व कॉश्च्युमची जबाबदारी आयुष स्टुडिओ सांभाळणार आहे. रंगभूषा प्रदीप दादा तर वेशभूषा मुन्नादादा यांची आहे. प्रकाशयोजना किशोरभाई सांभाळ आहेत.

छत्रपती शाहू महाराजांच्या वारसांच्या वाढदिवसानिमित्त सोफोश संस्थेला मदत

पुणे-मालोजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त  सतीश गायकवाड मित्र परिवाराच्यावतीने ससून रुग्नालयातील सोफोश या सामाजिक संस्थेस आर्थिक मदत व लहान मुलांना फळे व बिस्किटांचे वाटप   करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला . संस्थेच्या आवारात झालेल्या या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक , माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे , नगरसेवक महेशभाऊ  लडकत , नगरसेवक योगेश समेळ , नगरसेवक आदित्य माळवे , नगरसेविका मंजुश्री खर्डेकर , नगरसेविका पल्लवी जावळे , भाजप नेते संदीप खर्डेकर , माजी नगरसेवक दिलीप उंबरकर , स्वीकृत नगरसेवक अरविंद कोठारी , उध्दव मराठे , जयप्रकाश पुरोहित ,  रिपाई युवक नेते निलेश आल्हाट , कैलास पिसाळ , गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी , पुरुषोत्तम पिल्ले , किशोर कुटे , गोरख दुपारगुडे , शिरीष कुलकर्णी , भिकन सुपेकर , विशाल कोंडे , शुभांगी वैरागे , नाना तांबे , दत्तात्रय दरेकर, सागर शेंडगे , नितीन परदेशी  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , कुठ्ल्यायीही नेत्याचा वाढदिवस हा सामाजिक संस्थांना मदत करून करण्याचे प्रशंसनीय काम सतीश गायकवाड करत असून सर्वानी  यांचे अनुकरण करावे .

यावेळी माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले कि ,  छत्रपती शाहू महाराज यांचे वारस असलेली मालोजीराजे छत्रपती यांचा आज वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा होत आहे . ज्या  छत्रपती शाहू महाराजांनी  समाजातील दिन दलितांसाठी आयुष्य वेचले . त्यांच्या वारसाच्या वाढ दिवसानिमित्त एक आदर्श पायंडा पाडला आहे .

यावेळी भाजप नेते संदीप खर्डेकर यांनी सांगितले कि , भाजपने  संभाजी राजे यांना खासदार केले आता मालोजीराजे छत्रपती यांना आमदार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली .

यावेळी सोफोश संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी  शर्मिली सय्यद यांच्याकडे दिलीप कांबळे यांच्याहस्ते मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले . यावेळी मुलांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते .

मालोजीराजे छत्रपती यांच्यावर माझी नितांत श्रद्धा असून छत्रपती शाहू महाराज यांच्याप्रमाणेच मालोजीराजे देखील सामान्य जनतेसाठी कार्यरत असतात ,त्याच्यातील विनम्रता हा त्यांच्यातील मोठेपणा असल्याचे कार्यक्रमाचे संयोजक सतीश गायकवाड यांनी सांगितले .

या कार्यक्रमाचे आयोजन सतीश गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप खर्डेकर यांनी केले तर आभार दिलीप उंबरकर यांनी मानले .

हर घडी बदल रही है रूप जिंदगी … ऐका अमृता फडणवीस यांच्या आवाजात … (व्हिडिओ)

0

मी सामान्य जगणे आवडणारी ‘वर्किंग वूमन’ ’- गौरी शाहरुख खान

पुणे : ‘‘पती शाहरुख खान आणि मुले यांना असलेल्या प्रसिद्धीच्या वलयाचा तुमच्या जीवनावर कसा परिणाम होतो, असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो. परंतु मी कोणत्याही प्रकारची नकारात्मकता दूर ठेवून केवळ सकारात्मक गोष्टीच घेते. मी एक ‘वर्किंग वूमन’ असून इतरांसारखेच सामान्य जीवन जगायला मला आवडते. ‘इंटिरिअर डिझायनर’ म्हणून माझ्या असलेल्या कामाविषयी मला अत्यंत प्रेम आहे.’’ अशा शब्दांत गौरी खान यांनी आपली स्वतःची असलेली वेगळी ओळख उपस्थितांसमोर मांडली.या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी ‘हर घडी बदल रही है रूप जिंदगी ‘ गाण्याचे कडवे गावून प्रेक्षकांची दाद मिळविली .

गौरी खान यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी व सामाजिक कार्याबरोबरच आपल्या आवडीनिवडी जोपासणा-या अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली .महिला सक्षमीकरण व बालकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या २५  मान्यवरांचा गौरी खान व अमृता फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. तसेच गौरी खान आणि ‘सीरम इन्स्टिट्यूट’चे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांचा या वेळी  पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
या वेळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी गौरी आणि अमृता यांची मुलाखत घेतली. इंटिरिअर डिझायनिंगमध्ये अगदी छोट्या स्तरावर केलेली सुरूवात, आव्हानात्मक प्रकल्प पूर्ण करताना मिळणारा आनंद आणि ग्राहकांच्या मनासारखे काम झाल्यावर मिळणारे समाधान याविषयी गौरी खान भरभरून बोलल्या. शाहरुख हा पाठीशी उभा राहणारा पती आणि अतिशय उत्तम पिता आहे असे नमूद करायलाही त्या विसरल्या नाहीत.
‘‘देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसते तरी मला त्यामुळे काही फरक पडला नसता. कारण मुळातच त्यांचे व्यक्तिमत्त्व मला आवडते, ’’ असे सांगत अमृता फडणवीस यांनीही आपल्याला सामान्य जीवनच जगायला आवडत असल्याची भावना व्यक्त केली. ‘‘मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींविषयी अनेक प्रकारची मते व्यक्त केली जातात. मी त्यातील केवळ सकारात्मक टीका घेते.’’ असे त्या म्हणाल्या. ‘‘माझ्या माहेरी अनेकजण डॉक्टर असून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याही कुटुंबात अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामाजिक कार्याकडे माझा ओढा राहिला.’’, असे सांगून शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण यासाठी काम करणे आपल्याला महत्त्वाचे वाटते असे त्यांनी सांगितले.
‘डोअरस्टेप स्कूल’च्या संस्थापिका रजनी देशपांडे, ‘एग्झिस्टेन्शियल नॉलेज फाऊंडेशन’च्या रंजना बाजी, ‘लेक लाडकी अभियाना’च्या वर्षा देशपांडे, लेखिका वंदना खरे, बियाणे संरक्षक राहीबाई पोपरे, सामाजिक कार्यकर्त्या रितू बियाणी, ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’च्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर, तृतीयपंथी कार्यकर्त्या आणि कवयित्री दिशा शेख, तब्बल १२५ जागतिक विक्रम प्रस्थापित करणारे पहिले भारतीय डॉ. दीपक हरके, ‘निवांत अंध विकासालया’च्या संस्थापिका मीरा बडवे, ‘नासा’मध्ये स्थान मिळवलेल्या भारताच्या प्रतिनिधी लीना बोकिल, ‘शांतीवन’ संस्थेच्या संचालिका कावेरी नागरगोजे, ‘तेर पॉलिसी सेंटर’च्या संचालिका डॉ. विनीता आपटे, बालकल्याण समिताच्या प्रिया चोरगे, ‘सखी’ संस्थेच्या संचालक अंजली पवार, ‘लोकधारा’च्या राष्ट्रीय समन्वयक पल्लवी रेणके, ‘जगन प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा मनिषा टोकले, पत्रकार जयंती बरूडा यांनापुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संजय राजपूत यांची पत्नी सुषमा राजपूत यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

‘मुंबईचा डबेवाला’ विषयावर व्यवस्थापनशास्त्र व्याख्यानास प्रतिसाद

‘आयएमईडी’ मध्ये एमबीए विषयार्थ्यांसाठी इंडक्शन प्रोग्राम 

पुणे :भारती विद्यापीठ ‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’ मध्ये ‘मुंबईचा जगप्रसिद्ध डबेवाला’ या  विषयावरील व्यवस्थापनशास्त्र व्याख्यानास प्रतिसाद चांगला  प्रतिसाद मिळाला . व्यवस्थापनशास्त्र  व्याख्याते डॉ पवन अगरवाल यांनी मुंबई डबेवाल्यांच्या अचूक सेवा आणि यशाचे रहस्य सांगितले .

‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप  डेव्हलपमेंट ‘आयएमईडी’  चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी विद्यार्थ्यांना व्यवस्थापनशास्त्र  शाखेतील कारकिर्दीच्या संधींची माहिती दिली . एमबीए च्या नव्या वर्षाच्या तुकडीचा इंडक्शन प्रोग्राम (स्वागत सोहळा ) ३ जुलै रोजी सकाळी पार पडला . ‘आयएमईडी’ च्या पौड रस्ता येथील कॅम्पस मध्ये हा कार्यक्रम झाला. व्यवस्थापनशास्त्राचे विद्यार्थी ,प्राध्यापक उपस्थित होते

नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व अधिका-यांनी दक्ष रहावे-राज्यमंत्री संजय भेगडे

पुणे दि.3 : जिल्हयात उदध्वणा-या संभाव्य आपत्तीच्या निवारणासह आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवत नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत दक्ष रहावे, अशा सूचना कामगार, पर्यावरण, मदत व पुनर्वसन ,भूकंप पुनर्वसन संजय (बाळा ) भेगडे यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली हवेली तालुक्यातील कोंढवा व आंबेगाव येथील दुर्घटनेच्या अनुशंगाने उपाययोजनाबाबतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, आमदार भिमराव तापकीर, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. विपीन शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यासह सबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व विभागांनी आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवणे आवश्यक असल्याचे सांगून भेगडे म्हणाले, कोंढवा व आंबेगाव येथील घटनांसारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, कामगारांच्या वास्तव्याची जागा सुरक्षित आहे का, याबाबतची पाहणी करणे आवश्यक आहे, ज्या अधिका-यांकडून या कामात दिरंगाई होईल त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल, त्यासोबतच असंघटित कामगारांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महानगरासोबतच ग्रामीण भागात अनेक कामगार काम करतात, त्यांच्यासाठी शासनाच्या अनेक सुविधा आहेत, त्या सविधा पुरविण्यासाठी सबंधित विभागाने कार्यवाही करावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम म्हणाले, नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत सर्व विभागांचा समन्वय आवश्यक आहे. ज्या भागात अडचणी आहेत, त्या भागात तातडीने उपाययोजना करा, दोन दिवसाच्या आत बांधकामाची तपासणी करून अहवाल सादर करा, जुन्नर, आंबेगाव भागात दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी येणा-या कालावधीत दक्ष रहावे, आगामी पावसाच्या कालावधीत दक्ष राहून नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून ग्रामीण भागातही सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक पुलांची पाहणी करून तसा अहवाल सादर करावा, असे सांगून नैसर्गिक आपत्तीच्या कालावधीत समन्वयाने काम करूया, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

दादर – पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये… शिवनेरीच्या तिकीट दरात कपात मंत्री, दिवाकर रावते यांची घोषणा…

0

नवे तिकीट दर ८ जुलै लागू
मुंबई:
मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८० ते १२० रुपयां पर्यंत भरगोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री, व एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री. दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे ८ जुलै पासून लागू होणार आहेत.
गेली १५ वर्षे मुंबई-पुणे मार्गावर अत्यंत लोकप्रिय असलेली एसटीची “शिवनेरी” हि बस सेवा या मार्गावरील कोणत्याही दळणवळण सेवेपेक्षा किफायतशीर, सुरक्षित व आरामदायी आहे. सध्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ७ मार्गावर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या केल्या जातात, याद्वारे दरमहा सुमारे दीड लाख प्रवाशांना दर्जेदार सेवा दिली जात आहे. या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, हि प्रतिष्टीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीतजास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचे श्री. रावते यांनी स्पष्ट केले. मागील काही काळात मुंबई-पुणे मार्गावर कमी दरात चालणाऱ्या ओला,उबेर सारख्या टॅक्सी सेवेमुळे शिवनेरीच्या प्रवासी संख्येवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तिकीट दर कमी केल्यामुळे हा प्रवाशी वर्ग सुद्धा शिवनेरीकडे वळेल .
एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सध्या प्रवाशांना या मार्गावर उपलब्ध असलेल्या वाहतूक व्यवस्थेचा विचार करून स्पर्धात्मक तिकीट दर कपातीचा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार लवचिक भाडेवाढ अथवा कपातीच्या संदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार हि दर कपात करण्यात आली आहे. येत्या सोमवार पासून कमी झालेले नविन तिकीट दर लागू होतील अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आली.

विधानसभा:राज्यभरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ४९ उमेदवार

पुणे-राज्यामध्ये माझ्या शिवाय विधानसभा निवडणूका लढवण्यास सक्षम असे उमेदवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात ४९ ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उमेदवार उभे केले जाणार आहेत. तसेच, भाजप आणि शिवसेना सोडून अन्य पक्षांबरोबर चर्चा करण्यासाठी आमचे दरवाजे खुले आहेत. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. पुण्यात त्यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजीत पत्रकार परिषदेत आगामी विधानसभा निवडणूक लढवणार का ? या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी शेट्टी यांना तुमच्या पक्षाची विधानसभा निवडणुकीची तयारी कशाप्रकारे सुरू आहे ? तुम्ही स्वतः ही निवडणुक लढणार आहात का? की उमेदवार उभे करणार आहात? असा प्रश्न विचारण्यात आला असता पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतांना सांगितले की, माझ्या शिवाय देखील विधानसभा निवडणूक लढवण्यास सक्षम असे उमेदवार आमच्याकडे आहेत. आम्ही राज्यभरातील ४९ विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. येत्या महिनाभरात आम्ही या तयारीचा अंदाज घेऊ. राज्यात आम्ही महाआघाडीचा भाग होतो त्यामुळे जागा वाटपासंदर्भात काही जर निर्णय घ्यायचा असेल तर महिनाभरात घ्यावा. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन आम्ही यादी जाहीर करू व निवडणूकीच्या कामाला सुरूवात करणार आहोत. त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय त्या अगोदरच घेतला जावा, असे त्यांनी सांगितले.

याशिवाय आपली स्वबळावर लढण्याची तयारी आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना शेट्टींनी सांगितले की, आम्ही एक महिनाचा कालावधी चर्चेसाठी राखलेला आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्य कार्यकारणीची बैठक घेऊन आमचा निर्णय जाहीर करू. लोकसभा निवडणुकीतील निकाल लक्षात घेता. आम्ही विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागलो असून राज्यातील प्रत्येक ठिकाणी संघटनेची ताकद कशा प्रकारे वाढली पाहिजे. या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देखील करण्यात आल्या असल्याचे ते म्हणाले.

‘मैने प्यार किया ‘ वाल्या भाग्यश्री चा पती जुगार अड्डा चालविल्याच्या आरोपावरून अटकेत

0

मुंबई : ‘मैने प्यार किया’ चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री भाग्यश्रीचा पती हिमालय दासानीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. जुगाराचा अड्डा चालवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. दरम्यान हिमालयची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यापासून पोलीस दासानीच्या मागावर होते. गेल्या महिन्यात धाड टाकून पोलिसांनी जुगार अड्डा उद्ध्वस्त केला होता. त्यात १५ जणांना अटक करण्यात आली होती. याच प्रकरणात आता दासानीला अटक करण्यात आली आहे. अंधेरीतील आंबोली पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली. दासानीला न्यायालयात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, ‘मैने प्यार किया’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर १९९० मध्ये हिमालय आणि भाग्यश्री विवाहबद्ध झाले. त्यानंतर लगेचच भाग्यश्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला होता. दासानी बांधकाम व्यवसायात असल्याचे सांगितले जाते.