Home Blog Page 290

मोरगाव, थेऊर, ओझर, रांजणगाव, महड, पाली, सिद्धटेक मंदिर जीर्णोद्धारास 148 कोटींच्या खर्चास मान्यता

मुंबई, दि. 28 :- उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख रुपये खर्चाच्या ‘अष्टविनायक गणपती मंदिरांचा जीर्णोद्धार व विकास आराखड्या’स सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून त्यासंबंधीचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला आहे. अष्टविनायक विकास आराखड्यामुळे अष्टविनायक मंदिरांचा जीर्णोद्धार तसेच परिसराचा विकास होणार असून देवस्थानांना भेट देणाऱ्या भाविकांना, पर्यटकांना पायाभूत, नागरी सुविधा उपलब्ध होणार आहेत. अष्टविनायक क्षेत्रांच्या विकासामुळे राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात मंत्रालयात सातत्याने संबंधीतांच्या बैठका घेऊन त्यांनी अष्टविनायक मंदिर जीर्णोद्धार आणि विकासाच्या कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे यासंबधीच्या प्रस्तावाला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या माध्यमातून 6 मे 2025 रोजीच्या चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेण्यात आली. मंत्रिमंडळाच्या मान्यनेनंतर दोन आठवड्यातंच 147 कोटी 81 लाख खर्चाचा सुधारीत प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय आज जारी झाला. त्याबद्दल अष्टविनायक भक्तांकडून, स्थानिक नागरिकांकडून अजित पवार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात नमूद केलेली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दर्जाची महत्वाची स्थळे, तीर्थक्षेत्रे परिसर विकास आराखडे यांची व्याप्ती आणि स्वरुप लक्षात घेऊन संबंधीत आराखडे नियोजन विभागामार्फत राबविण्यात येतात. स्थानिक पातळीवरील संबंधित आणि तज्ञांशी चर्चा करुन चौंडी स्मृतीस्थळ जतन व विकास व त्यास लागणाऱ्या निधीचा आराखडा तयार करण्यात येतो. त्यानुसार 2021-22 मध्ये 92 कोटी 19 लाखांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानंतर 2024 मध्ये 147 कोटी 81 लाखांचा सुधारित प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यास आज सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

सुधारीत प्रशासकीय मान्यतेनुसार, पुणे जिल्ह्यातील मोरगावच्या श्रीमयुरेश्वर मंदिरासाठी 8 कोटी 21 लाख, थेऊरच्या श्रीचिंतामणी मंदिरासाठी 7 कोटी 21 लाख, ओझरच्या श्रीविघ्नेश्वर मंदिरासाठी 7 कोटी 84 लाख, रांजणगावच्या श्रीमहागणपती मंदिरासाठी 12 कोटी 14 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील महडच्या श्रीवरदविनायक मंदिरासाठी 28 कोटी 24 लाख, पालीच्या श्रीबल्लाळेश्वर मंदिरासाठी 26 कोटी 90 लाख रुपये खर्चास सुधारित मान्यता मिळाली आहे. अहिल्यानगरच्या श्रीसिद्धटेक मंदिरासाठी 9 कोटी 97 लाख रुपयांच्या खर्चास सुधारीत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी एकूण शंभर कोटी 53 लाख रुपये खर्च करण्यात येणार असून विद्युतीकरण, रोषणाई, वास्तूविशारद, जीएसटी आदी खर्चासाठी 47 कोटी 39 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने 147 कोटी 81 लाख खर्चाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे अष्टविनायक क्षेत्राच्या विकासाला गती मिळणार असून त्याबद्दल भाविकांकडून, नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेचा ९ हजार ६२३ अर्जदारांना लाभ

पुणे, दि. २८: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत २०१८-२५ या कालावधीत पुणे जिल्ह्यात ९ हजार ६२३ अर्जदारांना बँकांनी कर्जवाटप केले आहे. मंजूर कर्जाचे नियमित हप्ते भरून परतफेड करणाऱ्या कर्जदार लाभार्थ्यांना ५९ कोटी ८८ लाख रुपये परतावा दिल्याची माहिती महामंडळाचे विभागीय समन्वयक संकेत लोहार यांनी दिली आहे.

मराठा समाजातील बेरोजगार तरुण, तरुणींनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा, यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने बिनव्याजी कर्ज देण्यात येते. महामंडळाच्या या योजनेंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल १ लाख ४० हजारावर तरुण तरुणींनी १३ हजार २८६ कोटी रुपये कर्ज घेऊन स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरू करीत आदर्श निर्माण केला आहे.

महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर महामंडळाच्या कर्ज परतावा योजनेसाठी अर्जदार पात्र असल्याचे पत्र देण्यात येते. या पत्रासह अर्जदाराने बँकेकडे कर्ज प्रस्ताव करावा लागतो. अर्जदाराने बँकेच्या कर्जाचा हप्ता अदा केल्यानंतर त्याच्या खात्यात व्याजाची रक्कम महामंडळाकडून जमा करण्यात येते.

महामंडळाच्या या वैयक्तिक कर्ज योजनेंतर्गत ११ हजार ८५० अर्जदार पात्र ठरले आहेत. यापैकी राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी ९ हजार ६२३ जणांचे कर्ज प्रस्ताव मंजूर करीत त्यांच्या प्रकल्पासाठी ९०८ कोटी ६९ लाख रुपये कर्जवाटप केले.

महामंडळाचे प्रत्येक जिल्ह्यात फक्त एकच जिल्हा कार्यालय आहे. महामंडळाच्या नावाखाली कोणी त्रयस्त व्यक्ती पैसे घेत असेल, स्वतःला महामंडळाचा कर्मचारी किंवा अधिकारी म्हणून संबोधित असेल तर त्यांच्यावर महामंडळाच्या आदेशानुसार गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात यावा. मराठा समाजातील बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा समन्वयक सचिन लांबोटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

अतिक्रमण, उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करा अन्यथा अधिकाऱ्यांवर कारवाई :महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

पुणे दि. २८ : पुणे शहरातील कात्रज,बिबवेवाडी ,धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत प्लॉटींग करुन ते विकणे तसेच अवैध उत्खनन प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.मंत्रालयात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी हे आदेश देण्यात आले. बैठकीला आमदार योगेश टिळेकर आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, कात्रज,बिबवेवाडी ,धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अनधिकृत अतिक्रमणे काढण्यात आली पण ती पूर्णपणे काढण्यात आली नाहीत. विधान परिषदेत आश्वासन दिल्यानंतर त्याची कार्यवाही करण्यात अधिकाऱ्यांनी चालढकल करु नये. अतिक्रमण करणाऱ्यांना केवळ नोटीस देऊन चालणार नाही. दंड भरुन घेतला म्हणजे सर्व काही झाले असे नाही. त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागतील. तसेच या ठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्यांवर देखील तीन दिवसात गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेशही त्यांनी दिले.

ते पुढे म्हणाले, कात्रज,बिबवेवाडी, धनकवडी कोंढवा, येवलेवाडी येथील अतिक्रमणे आणि बेकायदेशीर अतिक्रमित प्लॉटींग याबाबत त्या विभागातील अधिकारी, तहसिलदार आणि महानगरपालिका आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल. त्यामुळे पुढील तीन दिवसात कारवाई करुन याबाबतचा अहवाल सादर करण्यात यावा.

अमनोराकडून मिळालेल्या वाहनांमुळे पोलीस दलाची कार्यक्षमता वाढणार : अमितेश कुमार

अमनोरा सिटी कॉर्पोरेशनतर्फे पोलीस दलाकडे नऊ वाहने सुपूर्द

पुणे : अमनोरा सिटी कॉर्पोरेशनने पोलीस दलाला दिलेल्या नऊ वाहनांमुळे पोलिसांची कार्यक्षमता वाढीस लागण्यास उपयोग होणार आहे. पोलीस दल नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटीबद्ध आहे. पुण्यातील वाहतूक प्रश्नासह महिला सुरक्षा, रस्त्यांवरील गैरप्रकार, अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाई करून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.
सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा) यांनी सी. एस. आर. फंडामधून पुणे शहर पोलीस दलास नऊ चारचाकी वाहने (किया कॅरेन्स) रितसर खरेदी प्रक्रिया राबवून पोलीस दलाकडे सुपूर्द केली. वाहने हस्तांतरणाचा सोहळा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत आज (दि. 28) अमनोरा पार्क टाऊन क्लब, हडपसर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते. सिटी कॉर्पोरेशन लि. (अमनोरा)चे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांनी वाहनांच्या चाव्या पोलीस आयुक्तांकडे या वेळी सुपूर्द केल्या. आदित्य देशपांडे, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकात अनिरुद्ध देशपांडे यांनी अमनोराच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, महिलांचे सबलीकरण, पाणी बचतीचा संदेश, आरोग्य, शिक्षण या क्षेत्रात कार्य केले जात आहे. आरोग्य उपक्रमांतर्गत 1200 महिला पोलिसांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. अमनोरा येथील घरेलु कामगार महिलांना (अवंतिका) पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यात आले असून येत्या वर्षभरात शंभर कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला आहे. खामगाव येथे पारधी मुलांच्या शाळेची जबाबदारी घेण्यात आली असून तेथील 150 विद्यार्थ्यांना कौशल्यविकास उपक्रमाअंतर्गत प्रशिक्षित करण्यात आले असून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. ते पुढे म्हणाले, शहर सुरक्षेसाठी पोलीस दल सतत कार्यरत असते. यात महिला पोलीस शक्तीचा मोठा वाटा आहे. त्यांच्या सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात प्रथमच पोलीस दलात किया कॅरेन्स ही वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
महिला पोलीस सारथ्य करत असलेल्या नऊ किया कॅरेन्सला पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अनिरुद्ध देशपांडे, आदित्य देशपांडे हिरवा झेंडा दाखविला व वाहने पोलीस दलात सामिल करून घेण्यात आली.
अमितेश कुमार पुढे म्हणाले, पुण्यासारख्या सातत्याने विस्तारित होणाऱ्या शहरात नागरिकांच्या सुरक्षेसाठी कार्य करणे अवघड आहे; परंतु तंत्रज्ञान, मनुष्यबळ यांच्या मार्फत नागरिकांचे सुरक्षा, वाहतूकप्रश्न सोडण्यासाठी पोलीसदल कटीबद्ध आहे. नागरिकांनी आमच्या कामास सहकार्य करून सहभागही नोंदविल्यास पोलीस दलाची कार्यक्षमता वाढण्यास तसेच शहराला शिस्त लागण्यास मदत होईल.
नागरिकांनी मोकळेपणाने आपल्या अडचणी आणि प्रश्न 112 या क्रमांकावर पोलीस विभागाकडे मांडावे. प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा करत रहावा. आम्ही त्याचे कायमस्वरूपी निराकरण करण्याचा प्रयत्न करू. या परिसरात रस्त्यावर, पादचारी मार्गांवर स्पिकरवर मालाचा भाव सांगत, आरडाओरडा करून वस्तूंची विक्री करणारे फेरीवाले पाहण्यात आले. अशा प्रकारे रस्तेवाहतूक आणि नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू, असे आश्वासनही त्यांनी दिले.
सूत्रसंचालन स्नेहल जाधव, तहसीन बेग यांनी केले तर आभार डॉ. राजकुमार शिंदे यांनी मानले.

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिवस साजरा:वार्षिक पुरस्कारांचे वितरण

गुणवत्तापूर्ण कामातून ग्रामीण भागात रोजगार उपलब्धी होईल : प्रसाद कुलकर्णी
पुणे : पुणे ही माझी कर्मभूमी असली तरी माझ्या जन्मभूमीसाठी देखील मी उद्योग-व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू इच्छित आहे. ज्यायोगे ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बघताना भारत उत्पादन क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कार्यरत असल्याने ग्रामीण भागात पुरेशा व्यवस्था उपलब्ध करून गुणवत्तापूर्वक काम केल्यास भारताच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होतील आणि विकास साधला जाईल, असे प्रतिपादन सॅप पार्टस्‌‍चे कार्यकारी संचालक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा (पीएमए) 49वा स्थापना दिवस आणि वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा ऑटो क्लस्टर येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रसाद कुलकर्णी बोलत होते. पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील, उपाध्यक्ष प्रदीप तुपे, राहुल जोशी तसेच ‌‘सकाळ‌’चे संपादक सम्राट फडणीस, ॲकॅडेमिक अलायन्सचे ऋषिकेश धांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : राजेंद्र चोडणकर, फर्स्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : के. केशवन, वुमेन आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर : स्वाती वितोंडे, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट ऑफ द इयर : एसपीपीयू, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम, एनजीओ विथ सोशल इम्पॅक्ट : सेवा वर्धिनी, इन्क्युबेटर ऑफ द इयर : एआयसी पिनॅकल, स्टुडस्टंस्‌‍ चॅप्टर ऑफ द इयर : एआयएसएसएमएस, सीओई ऑफ द इयर : पीएमए सीओई – एचआर, एक्सपोर्टर ऑफ द इयर : सुप्रिया लाईफसायन्स लि. यांचा या प्रसंगी गौरव करण्यात आला. पुरस्कारांचे वितरण तसेच एचआर मित्र या त्रैमासिकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.
प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले, ग्रामीण भागात उद्योग-व्यवसाय वाढीस लागल्यास शिक्षित युवा पिढीचा मोठ्या शहरांकडे असलेला ओढा कमी होऊन शहरी व्यवस्थेवरील ताण कमी होण्यास मदत होईल.

सम्राट फडणीस म्हणाले, उद्योग, व्यवसाय, शिक्षण यासह पुण्याची सांस्कृतिक ओळखही महत्त्वाची आहे. या क्षेत्रांमध्ये पुण्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. उद्योग, व्यवसाय क्षेत्रात भरारी घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पुणे मॅनेजमेंट असोसिएशनने दीपस्तंभासारखे कार्य करत रहावे. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे काय होईल, याचा पुरेसा अंदाज नसल्यामुळे पीएमए सारख्या संस्थांनी स्वत:च्या कार्यक्षेत्राची व्याप्ती वाढवावी. उद्योजक आणि व्यावसायिकांनी भारतीय संस्कृती व्यवस्थापनातील कौशल्य, संयम बाळगत नेटाने प्रगती करावी. भारतीय संस्कृतीला लाभलेला अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाचा धागा धरून ठेवत यशस्वी व्हावे.
शैक्षणिक संस्था आणि उद्योग-व्यवसायातील संधी यांच्यातील परस्पर संबंध उलगडत ऋषिकेश धांडे म्हणाले, विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. या करिता विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन या विषयात गेली 25 कार्यरत आहे. या उपक्रमांमुळे विद्यार्थी फक्त पुस्तकी शिक्षण न घेता प्रत्यक्ष कार्यक्षेत्राविषयी माहिती प्राप्त करून घेत भविष्यातील उज्ज्वल वाटा शोधू शकतो.
स्वागतपर प्रास्ताविकात बाळ पाटील यांनी पीएमएच्या 49 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला. नव्या तंत्रज्ञानाला आपलेसे करत व्यवस्थापन विकास क्षेत्रात पीएमएतर्फे विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्त्यांचा परिचय प्रसाद मिरासदार आणि डॉ. संजय गांधी यांनी करून दिला. प्रा. अभिजित खुरपे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. निधी बिष्णोई, डॉ. गिरीश तेलंग यांनी सूत्रसंचालन केले तर आभार राहुल जोशी यांनी मानले.

झगमगाटामागील तपश्चर्येचे विस्मरण होऊ नये : प्रकाश जावडेकर

शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान आयोजित सुवर्णरत्न पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
पुणे – “प्रतिभेचा अंश दैवी असू शकतो, पण तो अंश फुलवण्यासाठी आवश्यक परिश्रम, संघर्ष आपल्याला दिसत नाहीत. झगमगाटामागे तपश्चर्या असते, हे आपण विसरता कामा नये”, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी येथे केले. ‘यशामागील अशा तपश्चर्येचा सन्मान सुवर्णरत्न पुरस्काराच्या निमित्ताने होतो, हे कौतुकास्पद आहे’, असेही जावडेकर म्हणाले.
शिक्षण, पर्यावरण रक्षण तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत ‘शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित ‘सुवर्णरत्न पुरस्कार’ वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केलेल्या मान्यवरांना सुवर्णरत्न पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा सोहळा पार पडला.
पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये मकरंद देशपांडे (अभिनय, दिग्दर्शन, लेखन) यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गश्मीर महाजनी (अभिनय), केतकी माटेगावकर (गायन), समिधा गुरू (अभिनय), शिव ठाकरे ( स्टाईल आयकान), वलय मुळगुंद (गीतलेखन), वनिता बोराडे (स्त्रीशक्ती पुरस्कार), सूरज खटावकर (सोशल मिडिया प्रभाव), शेफ संदीप सोनार (उद्योजक), सुयश जाधव (क्रीडा – भारतीय पॅरा जलतरणपटू), अशोक अष्टेकर (ज्वेलर्स) यांचा समावेश होता. शाल आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्काराचे हे सहावे वर्ष होते.
यावेळी सुवर्णरत्न पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. सागर पौलस्ते, उपाध्यक्ष समीर पौलस्ते, शांतिदूत धर्मादाय प्रतिष्ठानचे संस्थापक जयवंत पौलस्ते, संचालिका सोनाली सागर पौलस्ते, तसेच राज्याचे माजी प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे, गाडगीळ ज्वेलर्सचे संचालक पराग गाडगीळ, गायक आनंद भाटे, पं. नंदकिशोर कपोते, अभिनेत्री किशोरी शहाणे, आनंद माडगूळकर आदी मान्यवरही याप्रसंगी उपस्थित होते.
“यशामागे मेहनत, चिकाटी, जिद्द असते. पण सर्वसामान्यांना फक्त यशानंतरचा झगमगाट दिसतो. त्यासाठी त्या त्या व्यक्तीने केलेली तपश्चर्या नजरेआड राहते. सुवर्णरत्न पुरस्कारांच्या निमित्ताने अशा तपश्चर्येचा गौरव होतो, हे स्वागतार्ह आहे”, अशा शब्दांत जावडेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
सुवर्णरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित मकरंद देशपांडे म्हणाले, “जीवनगौरव म्हणजे थांबलेले काम, पण मी हा कामाचा नसून जीवनाचा गौरव समजतो. माणूस जीवन जगतो विंगेत आणि सादरीकरण करतो व्यासपीठावर, असे अभिनेता म्हणून मला वाटते. जगताना जे अनुभव मिळाले, ते शिकवणारे ठरले. अभिनय आपण सर्वजण करतो. आम्ही तो अधिक जाणीवपूर्वक करतो. आपल्याला जे प्रश्न पडतात, त्यांची उत्तरे खरे तर जीवनच देत असते. ती समजून घेण्यासाठी भगवद्गीता उपयोगी पडते कारण गीता प्रत्येक वयात मार्गदर्शक आहे, असे मला वाटते”.
गश्मीर महाजनी म्हणाले, ‘माझे पदार्पण याच नाट्यगृहात झाले होते. तिथेच आज हा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद वाटतो. मी आता निर्मितीच्या क्षेत्रातही पदार्पण करत आहे’.
शिव ठाकरे म्हणाले, ‘एका टप्प्यावर मिळालेली शाबासकी म्हणून मी या पुरस्काराकडे पाहतो’. ज्वेलर्स अशोक अष्टेकर यांनी ज्वेलरीच्या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक कलाकारांसाठी दागिने घडवता आले, याचा आनंद वाटतो, अशी भावना व्यक्त केली. अभिनेत्री समिधा गुरू यांनी हा भावनात्मक क्षण असून, एका कलाकाराची नागपूर – मुंबई वाटचालीची आठवण या निमित्ताने झाल्याचे सांगितले. केतकी माटेगावकरने चित्रपटगीत सादर केले. ‘प्रत्येकाला एक बीज मिळालेले असते. ते ओळखून फुलवणे आवश्यक आहे’, असे ती म्हणाली.
पॅरा जलतरणपटू सुयश जाधव यांनी एका अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतरची पॅरा आलिंपिकपटू होण्यापर्यंतची वाटचाल कथन केली. “माझ्या परिस्थितीतही मी एवढे करू शकलो, तुम्ही सारे धडधाकट आहात, तर कितीतरी करू शकता”, हे त्यांचे उद्गार उपस्थितांना अंतर्मुख करून गेले.
वलय मुळगुंद म्हणाले, ‘हा माझ्यासाठी मोलाचा व आनंदाचा क्षण आहे. मला पुढील कामासाठी ऊर्जा देणारा हा पुरस्कार आहे’. शेफ संदीप सोनार यांनी राज्य, राष्ट्रीय स्तरावरचे काम आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचल्याचे सांगितले. आमच्या केटरिंग कंपनीला थेट इंग्लंडमधून मागणी आल्याचे ते म्हणाले. खाऊ घालण्याचे समाधान ही माझी पॅशन होती आणि मी पॅशन जगतो, असे ते म्हणाले. समाज माध्यमाच्या व्यासपीठावरून मला माणूस हा विलक्षण जगण्याचा प्रकार आहे, हे समजले, अशी भावना सूरज खटावकर यांनी व्यक्त केली. सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सर्पविषयक गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोनातून जगजागृती आणि प्रबोधनाचे कार्य सुरू असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक सागर तसेच समीर पौलस्ते यांनी आभार मानले. आपल्या कार्यक्रमाचा हेतू प्रेरणादायी असावा, असे मानून हा उपक्रम केल्याचे ते म्हणाले. प्राजक्ता मांडके यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.

23.5 कोटी रुपयांचे हेरॉईन आणि मेथाम्फेटामाइन केले जप्त चार जणांना केले अटक

नवी दिल्ली, 28 मे 2025
 देशाच्या ईशान्येकडील भागात अमली पदार्थ आणि प्रतिबंधित औषधांच्या तस्करी विरोधात केलेल्या कारवाईचा भाग म्हणून, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय), 19 बीएन आसाम रायफल्सच्या सहकार्याने 21.5.2025 रोजी मणिपूरमधील नोनी येथे एनएच-37 या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या एका ट्रक मधून 569 ग्रॅम हेरॉईन आणि 1,039 ग्रॅम मेथाम्फेटामाइन या बंदी घालण्यात आलेल्या औषधाच्या गोळ्या जप्त केल्या. ट्रकच्या चेसिसवर खास तयार केलेल्या पोकळीत/ चेंबरमध्ये प्रतिबंधित अमली पदार्थांची पाकिटे लपवून ठेवल्याचे  आढळली.

आणखी एका कारवाईत डीआरआयने आसाम रायफल्स एफआययू युनिट सिलचरच्या सहाय्याने 22.05.2025 रोजी आसाममधील हैलाकांडी जिल्ह्यातील अलोइचेरा येथे एका ट्रक मधून 2,640.53 ग्रॅम हेरॉईन जप्त केले. ट्रकच्या बेडलोड फ्लोअरवर खास बांधलेल्या/तयार केलेल्या पोकळीत खोलवर अमली पदार्थांची पाकिटे लपवून ठेवली होती.

आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात सुमारे 23.5 कोटी रुपये मूल्य असलेले हे प्रतिबंधित पदार्थ  एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आले असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे.

यंदाच्या जानेवारी महिन्यापासून डीआरआयने देशाच्या ईशान्य भागात केलेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये 173 कोटी रपये किमतीचा गांजा, मेथाम्फेटामाइनच्या गोळ्या आणि हेरॉईन यासारखे प्रतिबंधित पदार्थ जप्त केले असून, 26 जणांना अटक केली आहे.  

पर्यावरण दिनानिमित्त ‘वृक्षाथॉन- २०२५’चे १ जून रोजी आयोजन

पुणे, दि. २८: आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन ५ जूनच्या निमित्ताने पुणे पोलीस, वन विभाग, व पुणे स्थित वृक्षाथॉन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या १ जून रोजी ‘वृक्षाथॉन- २०२५’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

वृक्षाथॉनचे हे ४ थे वर्ष असून या स्पर्धेचा मुख्य उद्देश हा नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी असा आहे. या स्पर्धेमध्ये देशभरातून १० हजारावर स्पर्धक सहभागी होणार आहेत. प्रत्येक सहभागी स्पर्धकास वनविभागामार्फत एक झाडाचे रोपटे देऊन त्याचे संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ही स्पर्धा एकूण ३ किमी, ५ किमी, १० किमी व २१ किमी (हाफ मॅरेथॉन) अशा चार प्रकारामध्ये आणि १८ ते ३० वर्षे, ३१ ते ४५, ४६ ते ६० आणि ६१ वर्ष व त्यावरील अशा चार वयोगटामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांसाठी इलेक्ट्रिक दुचाकी, इलेक्ट्रिक सायकल तसेच लाखो रुपयांची पर्यावरणपूरक पारितोषिके असणार आहेत.

या सर्व स्पर्धांची सुरूवात पोलीस मुख्यालय होऊन निश्चित मार्गाने जाऊन परत पोलीस मुख्यालय येथेच शेवट होईल.

२१ कि.मी. अर्धमॅरेथॉनचा प्रारंभ पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे होऊन – चापेकर चौक – ई-स्क्वेअर – चतुश्रुंगी चौक – पाषाण रोड – अभिमान श्री – एनसीएल मंदिर – डिआरडीओ गेट – पाषाण सर्कल – बावधन – चांदणी चौक येथून युटर्न घेऊन परत त्याच मार्गाने पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे शेवट होईल.

प्रत्येक स्पर्धकांस आयोजकांमार्फत टी शर्ट, बीब्ज, गॉडी बॅग, स्नॅक्स, पाण्याची बाटली देण्यात येणार असून मार्गावर ठिकठिकाणी हायड्रेशन पॉईंट लावण्यात येणार आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथक तसेच स्पर्धकांच्या मदतीसाठी स्वंयसेवक असणार आहेत.

स्पर्धेच्या दिवशी वाहतूक बदल करण्यात येणार असून पर्यायी वाहतूक मार्गांची माहिती कळविण्यात येईल.

पुणे शहर, पिंपरी चिंचवड व महाराष्ट्र तसेच देशभरातील पर्यावरण प्रेमी, नागरिक व धावपटू यांनी या स्पर्धेमध्ये आवर्जून सहभागी होऊन वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धनासाठी आपला सहभाग नोंदवावा. सदर स्पर्धेकरीता https://www.vrukshathon.com या लिंकवर भेट देऊन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय वन अधिकारी (प्रसिद्धी व माहिती, वने) रेश्मा व्होरकाटे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

शिरुर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्याचे आवाहन

पुणे, दि. २८ : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह गोलेगाव रोड, शिरुर या संस्थेत २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून इच्छुक मुलींनी प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, अनाथ व शारिरीकदृष्ट्या दिव्यांग आदी प्रवर्गातील विद्यार्थींनींना वसतिगृहात मोफत प्रवेश देण्यात येणार आहेत.

शासकीय वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थींनींना विनामुल्य भोजन व निवासाची व्यवस्था असून क्रमीक पुस्तके, शैक्षणिक साहित्य इत्यादी शासनाने ठरवून दिलेल्या आर्थिक मर्यादेपर्यंतची रक्कम विद्यार्थींनीच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. तसेच दरमहा निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. शिवाय विद्यार्थीनींकरीता ई-ग्रंथालय व सुसज्ज व्यायामशाळा आदी अनेक सुविधा येथे उपलब्ध आहेत.

विद्यार्थीनी बाहेरगावची परंतू शिरुर मध्ये शिक्षण घेणारी असावी. प्रवेशासाठी मागील वर्षाची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र, वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ज्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित झाला आहे तेथील बोनाफाईड दाखला, अधिवास प्रमाणपत्र, आधारकार्ड (विद्यार्थीनीचे व वडीलांचे), शिधापत्रिकेची दुय्यम प्रत सोबत आणाव्यात. वसतीगृह प्रवेश प्रक्रिया https://hmas.mahaait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. अधिक माहितीसाठी गृहपाल मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, गोलेगाव रोड, पुणे-नगर हायवे, शिरुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती ए. एस. सूर्यवंशी यांनी केले आहे.

भीम नगर वासीयांची  फसवणूक होऊ देऊ नका – मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

पुणे : एरंडवणे  येथील भीम नगर झोपडपट्टी चे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी असे आदेश उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिले आहेत. 

भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत,  मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टी धारकांनी या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे.  या संदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री  चंद्रकांत  पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता.  या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील व झोपडपट्टी धारकांचे  प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली.  या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही, याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टी धारकांना दिले. तसेच झोपडपट्टी धारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी असे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.  

मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी झोपडपट्टी धारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ ,प्रभु सूनगर,  जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात शुक्रवारी  विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल असे देखील ठरवण्यात आले आहे.

मुस्लिम धर्म स्थळांवर एकतर्फी कारवाई नको : मुस्लिम शिष्टमंडळाची मागणी

पुणे : केवळ हिंदुत्ववाद्यांचा अट्टाहास पुरवण्यासाठी मुस्लिम धर्मस्थळावर केली जाणारी एकतर्फी कारवाई अन्यायकारक असून अशा प्रकारच्या कारवाईला कायदेशीर विरोध केला जाईल. तसेच यासंदर्भात लवकरच आंदोलन देखील उभारले जाईल, असा स्पष्ट इशारा नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने आज पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आला.

पुणे शहरातील विविध भागांमध्ये मज्जित, मदरसा व दर्ग्यांवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे.  ही कारवाई धर्मनिरपेक्षपणे केली जात नसल्याने तातडीने थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने शिष्टमंडळाद्वारे पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे, माजी नगरसेवक अॅड. आयुब शेख, माजी नगरसेवक रफिक शेख,गफूर पठाण   काँग्रेस पक्षाचे नेते महबूब शेख यांच्यासह मोहसिन शेख,रफीक शेख, महबूब नदाफ,जावेद खान, शहाबुद्दीन शेख, जावेद शेख, किसान जाफरी, रॉय शेख इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान, शहरांमध्ये दहा हजार पेक्षा अधिक धार्मिक स्थळे अनधिकृत आहेत. मात्र केवळ मुस्लिम धर्मस्थळावरच कारवाई करणे ही कायद्यातील असमानता दर्शवणारी बाब असून हा मुस्लिमांवरील धार्मिक अत्याचार असल्याने तो तातडीने थांबवण्यात यावा अशी भूमिका राहुल डंबाळे यांनी मांडली आहे.

तसेच सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या निर्देशानुसार नियमित होणाऱ्या धार्मिक स्थळांना नियमित करावे व कोणत्याही  धार्मिक स्थळांवर कारवाई करू नये; अशी भूमिका ज्येष्ठ नगरसेवक आयुब शेख यांनी मांडली

देशात तणावाची परिस्थिती असताना संपूर्ण देश धार्मिक शक्ती विरोधात एकत्रित येत आहे. असे असताना भारतीय जनता पक्ष मात्र धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत असेल व त्यासाठी ते मंदिर – मशीद असा वाद करत असतील तर ते निंदाजनक असल्याचे रफिक शेख यांनी सांगितले

तर कारवाई करताना कोणताही धर्म न पाहता कारवाई करणे अपेक्षित असताना; प्रशासन मात्र अत्यंत चुकीची भूमिका घेत कारवाई करत आहे. या विरोधात प्रसंगी न्यायालयीन लढाई देखील लढली जाईल अशी माहिती यावेळी महबूब नदाफ यांनी घेतली आहे.

एअर इंडियाची दुबई फ्लाइट; तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली प्रवाशांचा छळ!:पाच तास विमानात उपाशीपोटी, मुलांचा आक्रोश

मुंबई विमानतळावरून दुबईकडे जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI909 फ्लाइटने प्रवाशांच्या सहनशक्तीची कसोटी पाहिली. जवळपास 300 प्रवाशांना तब्बल 5 तास बंद विमानात AC शिवाय उपाशीपोटी बसवून ठेवण्यात आलं. यामध्ये लहान मुलांचा आक्रोश, महिलांचा संताप आणि प्रवाशांची असहाय्यता दिसून आली.

28 मे रोजी सकाळी 8.25 वाजता उड्डाण होणारं हे विमान, अचानक तांत्रिक बिघाडाच्या कारणाने 9.30 पर्यंत पुढे ढकललं गेलं. त्यानंतर काहींना अमिराती एअरलाईन्सचा पर्याय देण्यात आला. मात्र 180 प्रवाशांना 12 वाजताच्या विमानात बसवून विमान धावपट्टीवर नेत पुन्हा तांत्रिक कारणाने थांबवण्यात आलं.

तासाभराचं म्हणत तब्बल पाच तास उशीर

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात एसी बंद होता, पिण्यास पाणी नव्हतं, खाण्याची व्यवस्था नव्हती. छोट्या बालकांना भूक लागून ते ओरडू लागले. आई-वडिलांना मुलांना शांत करणे कठीण झाले. एअर इंडियाचा स्टाफ मात्र अरेरावीची भाषा वापरत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.

सकाळी 5 पासून विमानतळावर थांबलेलो, विमानात बसलो तर हाल सुरू. AC बंद, पाणी नाही, मुलं रडतायत, स्टाफ उत्तर देत नाही… आम्ही काय गुन्हा केला होता? – असा प्रश्न एका प्रवाशाने पत्रकारांपुढे उपस्थित केला. एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र या प्रकारामुळे सामान्य प्रवाशांचा संयम सुटला असून, सोशल मीडियावरही यावर संताप व्यक्त होत आहे. अनेक प्रवाशांनी एअर इंडियाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कडक कारवाईची मागणी केली आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेला 100 कोटीचा निधी गेला कुठे? सवाल करत शिवसेनेचे आंदोलन…यापुढे रेल रोकोचा इशारा

पुणे- रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आलेला 100 कोटीचा निधी गेला कुठे? असा सवाल करत आज येथे शिवसेनेने आंदोलन केले. याप्रसंगी पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, राज्य संघटक वसंत मोरे, उत्तम भुजबळ, राजेश मोरे, अनिल परदेशी, किशोर रजपूत, रुपेश पवार, महिला आघाडी निवडणूक समन्वयक विद्या होडे, ज्योती चांदेरे, रोहिणी कोल्हाळ, सविता गोसावी, विजया बेंगळे, नसीम कांबळे, पार्वती कांबळे, संपदा कांबळे, योगेश इंगुळकर, पंकज बरिदे, सागर गंजकर, संजय व्हालेकर, अजय परदेशी, गिरीश गायकवाड, मनीष सिंग, संजय लोहोट, राहुल शेडगे, संतोष होडे, बंडूनाना बोडके, नागेश खडके, किशोर रजपूत, जुबेर शेख, नितिन निगडे, विजय पालवे, अभिषेक जगताप, दत्तात्रय घुले, प्रकाश पुजारी, विजय रावडे, मिलिंद पत्की, अजय परदेशी, प्रवीण रणदिवे साहिल पिरजादे, जुबेर तांबोळी, संतोष गवळी, महेश मोरे, सागर लांडगे, संतोष बनसोडे, नितीन जगताप, नितीन शेलार, जयवंत गिरी, मेजर खोमणे, मंगेश रासकर, मोहन पांढरे अशोक रसाळ आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. आंदोलनानंतर रेल्वे व्यवस्थापक राजेश वर्मा यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार त्यांनी सर्व जुने 59 कॅमेरे हे निकामी असल्याचे मान्य केले. आम्ही 30 जून पर्यंत सर्व 166 नवीन सीसी टीव्ही कॅमेरा बसवून घेणार आहोत. तसेच स्कॅनिंग मशीन लावून घेउ. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जीआरएफ व लोहमार्ग पोलीस यांची कुमक तैनात करू. प्रवाशांना वेटींगसाठी आणखी जागा उपलब्ध करून देउ. अशी अनेक आश्वासन दिली आहेत.
यासर्व मागण्या पूर्ण केल्या नाहीतर रेल रोको आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेच्या वतीने सांगितले.

यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले,’ पुणे रेल्वे स्टेशनला लाखो प्रवासी रेल्वेने ये जा करत असतात. त्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. परंतु रेल्वे प्रशासन याबाबत उदासीन असल्याचे निदर्शनास येते. आताची रेल्वे स्टेशनची परिस्थिती ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशी झालेली आहे. आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून प्रवाशांच्या सुरक्षेचे संदर्भात अनेक निवेदनं दिली व आंदोलन सुद्धा केले. त्यावेळी आम्हाला त्या वेळेचे डी आर एम दुबे मॅडम यांनी दिनांक 23 मार्च 2023 रोजी सांगितले होते की लवकरच रेल्वे बोर्डाकडून पुणे रेल्वे स्टेशन येथे 120 सीसी कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. परंतु आत्तापर्यंत कुठेही सीसी कॅमेरे लावलेले नाही. याचा अर्थ रेल्वे प्रशासन सुरक्षिततेच्या बाबतीत चालढकल करीत आहे. असे आमच्या निदर्शनास येत आहे. पुणे रेल्वे स्टेशन येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भातील मागण्या रेल्वे प्रशासनाने त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे आपणास 27 मार्च 2025 रोजी समक्ष भेटून दिलेल्या पुणे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षततेबाबतच्या मागण्यांचे निवेदनात नमूद केले होते.

दिल्ली रेल्वे बोर्डाकडून 100 कोटींचा निधी सन 2023 मधे नवीन 120 सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी व सुरक्षा यंत्रणांना प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आला होता. त्याचे काय झाले व त्या निधीचे काय केले ? याचे उत्तर आजतागायत आपणाकडून जाहिर केले नाही. जुन्या झालेल्या 59 सीसी टिव्ही ऐवजी नवीन अत्याधुनिक यंत्रणा असलेले 120 सीसी टिव्ही बसविण्याचे जाहिर केले होते. नवीन अत्याधुनिक यंत्रणेचे सीसी टिव्ही लावले गेले नाहीतच. पण 100 कोटीच्या निधीचा अपहार झाल्याचा संशय आपल्या उदासीनतेमुळे सर्वसामान्य जनतेमधे निर्माण झाला आहे. हे मात्र नक्की. हा भ्रष्टाचार शिवसेना सहन करणार नाही. आमच्या लेखी प्रवाशांची सुरक्षा महत्वाची आहे. काही काही घटना घडल्यानंतर पश्चात्ताप करून उपयोग नाही. वेळीच उपाययोजना करणे महत्वाचे आहे. म्हणून आम्ही सातत्याने प्रवाशांच्या सुरक्षेविषयी भूमिका मांडत आहोत. परंतू रेल्वे प्रशासन ऐकून घेण्याच्या व कार्यवाही करण्याच्या भूमिकेत नाही. उदासीन आहे. असेही मोरे यांनी यावेळी सांगितले.


2025-26 साठी विद्यमान 1.5% व्याज अनुदानासह (आयएस) सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

नवी दिल्ली, 28 मे 2025

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 2025-26 या वित्तीय वर्षासाठी सुधारित व्याज अनुदान योजना (एमआयएसएस) अंतर्गत व्याज अनुदान (आयएस) घटक सुरू ठेवण्यास मान्यता दिली आणि आवश्यक निधी व्यवस्थांना मान्यता दिली.एमआयएसएस ही एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे ज्याचा उद्देश शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) द्वारे परवडणाऱ्या व्याजदराने अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत:

  • शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) द्वारे 7% च्या अनुदानित व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे अल्पकालीन कर्ज मिळाले, ज्यामध्ये पात्र कर्ज देणाऱ्या संस्थांना 1.5% व्याज अनुदान दिले गेले.
  • याव्यतिरिक्त, कर्जाची त्वरित परतफेड करणारे शेतकरी त्वरित परतफेड प्रोत्साहन (पीआरआय) म्हणून 3% पर्यंत प्रोत्साहनासाठी पात्र आहेत ज्यामुळे केसीसी कर्जावरील त्यांचा व्याजदर प्रभावीपणे 4% पर्यंत कमी होतो.
  • केवळ पशुपालन किंवा मत्स्यपालनासाठी घेतलेल्या कर्जांसाठी, व्याज लाभ 2 लाख रुपयांपर्यंत लागू आहे.

योजनेच्या रचनेत किंवा इतर घटकांमध्ये कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत.

देशात 7.75 कोटींहून अधिक केसीसी खाती आहेत. शेतीला संस्थात्मक कर्जाचा ओघ टिकवून ठेवण्यासाठी या मदतीत  सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जे उत्पादकता वाढविण्यासाठी आणि छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आर्थिक समावेशन सुनिश्चित करण्यासाठी अत्यावश्यक आहे.

कृषी कर्जातील ठळक बाबी:

  • केसीसीद्वारे संस्थात्मक कर्ज वितरण 2014 मधील 4.26 लाख कोटी रुपयांवरून डिसेंबर 2024 पर्यंत 10.05 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले.
  • एकूण कृषी कर्ज ओघ देखील वित्तीय वर्ष 2013-14 मधील 7.3 लाख कोटी रुपयांवरून वित्तीय वर्ष 2023-24 मध्ये 25.49 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला.
  • ऑगस्ट 2023 मध्ये किसान ऋण पोर्टल (केआरपी) सुरू करण्यासारख्या डिजिटल सुधारणांमुळे दाव्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे.

सध्याचा कर्ज खर्चाचा कल, सरासरी एमसीएलआर आणि रेपो दरातील हालचाली लक्षात घेता, ग्रामीण आणि सहकारी बँकांना पाठबळ देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना कमी किमतीच्या कर्जाची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी व्याज अनुदान दर 1.5% वर राखणे आवश्यक आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा हा निर्णय शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, ग्रामीण पत परिसंस्था मजबूत करण्यासाठी आणि वेळेवर आणि परवडणाऱ्या कर्ज उपलब्धतेद्वारे कृषी विकासाला चालना देण्यासाठी सरकारच्या अढळ वचनबद्धतेला बळकटी देतो.

भारतीय रेल्वेच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


या प्रकल्पांमुळे प्रवासाची सुविधा वाढेल, लॉजिस्टिकच्या खर्चात कपात होईल, तेल आयात कमी होईल आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यासाठी हातभार लागेल, ज्यायोगे शाश्वत कार्यक्षम रेल्वे परिचालनाला बळ मिळेल

नवी दिल्ली, 28 मे 2025
 
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने  आज प्रवासी आणि मालवाहतूक सुरळीत आणि जलद गतीने व्हावी, यासाठी भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली.

प्रकल्प पुढील प्रमाणे:

1.   रतलाम- नागदा तिसरा व चौथा मार्ग
2.   वर्धा- बल्हारशाह चौथी मार्ग
 

या प्रकल्पांचा एकूण खर्च 3,399 कोटी रुपये (अंदाजे) इतका असून, 2029-30 पर्यंत ते पूर्ण होतील.

हे प्रकल्प मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटीसाठीच्या पीएम-गति शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लान चा भाग असून,एकात्मिक नियोजनाद्वारे हे शक्य झाले आहे, आणि ते नागरिक, वस्तू आणि सेवांच्या अखंड वाहतुकीसाठी कनेक्टिव्हिटी प्रदान करतील.

महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या चार जिल्ह्यांमधून जाणाऱ्या या दोन प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे 176 किलोमीटर भर पडेल.

प्रस्तावित मल्टीट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे 19.74 लाख लोकसंख्या असलेल्या सुमारे 784 गावांची कनेक्टिव्हिटी (दळणवळण) सुधारेल.

कोळसा, सिमेंट, कोळसा, जिप्सम, फ्लाय अॅश, कंटेनर, शेतीमाल आणि पेट्रोलियम उत्पादने यासारख्या वस्तूंच्या वाहतुकीसाठी हे आवश्यक मार्ग आहेत. क्षमता वाढवण्यासाठी होत असलेल्या या प्रकल्पांमुळे 18.40  एमटीपीए (दशलक्ष टन प्रतिवर्ष) इतकी अतिरिक्त मालवाहतूक होईल. रेल्वे हे पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम वाहतुकीचे साधन असल्यामुळे, ते हवामान बदलाबाबतची उद्दिष्टे साध्य करण्यात आणि देशाचा लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यात मदत करेल, तेल आयात (20 कोटी लिटर) कमी करेल आणि कार्बन (CO2) उत्सर्जन (99 कोटी किलो) कमी करेल, जे 4 कोटी झाडे लावण्याच्या बरोबरीचे आहे.

बांधकामा दरम्यान हे प्रकल्प सुमारे 74 लाख मानवी दिवसांचा थेट रोजगार देखील निर्माण करतील.

या उपक्रमांमुळे प्रवासाच्या सोयीत सुधारणा होईल, लॉजिस्टिक खर्च कमी होईल, तेलाची आयात कमी प्रमाणात करावी लागेल तसेच कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन कमी करण्यात देखील हातभार लागेल आणि शाश्वत तसेच कार्यक्षम रेल्वे वाहतुकीला पाठबळ मिळेल. कंटेनर्स, कोळसा, सिमेंट, कृषी उत्पादने आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी महत्त्वाच्या असलेल्या मार्गांवर रेल्वेलाईनची क्षमता वाढवून हे प्रकल्प लॉजिस्टिकल कार्यक्षमता देखील सुधारतील. या सुधारणा पुरवठा साखळीची अनुकूलता मोठ्या प्रमाणात वाढवतील अशी अपेक्षा असून त्यायोगे वेगवान आर्थिक विकास सुलभतेने साध्य होईल.

वाढीव क्षमतेच्या रेल्वे लाईन्समुळे गतिशीलतेत लक्षणीय भर पडेल आणि त्यातून भारतीय रेल्वेची परिचालनात्मक क्षमता आणि सेवेची विश्वासार्हता सुधारेल. रेल्वेचे हे बहु-पदरीकरण प्रस्ताव रेल्वेचे परिचालन सुरळीत करतील आणि गाड्यांचा खोळंबा कमी करतील.हे प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या भारताच्या संकल्पनेशी सुसंगत असून एखाद्या भागाचा सर्वसमावेशक विकास साधण्यातून त्या भागातील लोकांना “आत्मनिर्भर” करतील आणि त्यामुळे त्या भागातील लोकांच्या रोजगार/स्वयंरोजगार संधींमध्ये वाढ होईल.