Home Blog Page 2893

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या क्लस्टर पद्धतीने पुनर्विकासासाठी कायदा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : डोंगरी येथील इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील धोकादायक इमारतींबाबत आढावा बैठक घेतली. मुंबईतील ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर करून तसेच पुर्नविकासातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी सर्वंकष कायदा करण्याबाबत निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. अशा इमारतींचा पुर्नविकास म्हाडाच्या माध्यमातून करतानाच सध्या जे रहिवासी अशा इमारतीत राहत आहेत, त्यांच्या निवासाची पर्यायी व्यवस्था करणे तसेच तसे न करता आल्यास दोन वर्षांचे भाडे देणे तसेच रिट ज्युरिडिक्शन वगळता अन्य सर्व कायदेविषयक गतिरोध दूर करणे अशा ठोस तरतुदी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

बैठकीस गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार अमीन पटेल, विनोद घोसाळकर आदी उपस्थित होते.

मुंईबतील मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींचा यावेळी आढावा घेण्यात आला. उपकरप्राप्त ज्या इमारती मोडकळीस आल्या आहेत, त्यांचे क्लस्टर घोषित करायचे. अशा इमारतींचा पुनर्विकास करताना अडथळे येऊ नयेत यासाठी कायदा तयार करण्यात यावा. त्यानंतर अशा मोडकळीस आलेल्या इमारती निष्कासित करून तेथे म्हाडाच्या माध्यमातून पूर्णपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

धोकादायक इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करताना इमारतीतील रहिवाशांसाठी पर्यायी निवासाची सोय करावी. मुंबईतील विविध योजनांमधील तसेच झोपडपट्टी पुनर्विकास, ट्रान्झिट कॅम्प आदी विविध योजनेतून घरे उपलब्ध असतील त्यांची यादी करावी आणि तेथे या रहिवाशांची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

मुंबईतील अनधिकृत बांधकाम केलेल्या इमारतींचा सर्व्हे करून असे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

यावेळी मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर, मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वांच्या एकत्रित सहभागातून यंदाही बकरी ईद सलोख्याने साजरी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

0

आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचे प्रशासनास निर्देश

मुंबई : येणारी बकरी ईद सर्वांनी सलोख्याने साजरी करावी. मुंबई महापालिका प्रशासनाने देवनार पशुवधगृहात आवश्यक सोयी-सुविधा पुरवाव्यात. तसेच पोलीस, वाहतूक आदी विभागांनीही आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करून सर्व समाजाच्या एकत्रित सहभागातून हा सण दरवर्षीप्रमाणे शांततेत साजरा होईल असे नियोजन करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सह्याद्री अतिथीगृह येथे आज यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद काळात करण्यात येणाऱ्या विविध सोयी-सुविधांचे यावेळी मुंबई महापालिकेमार्फत सादरीकरण करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यात मागील पाच वर्षात विविध सण-उत्सव शांततेत साजरे करण्यात आले. सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या सहभागातून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्वांच्या एकत्रित सहभागातून विविध सण-उत्सव शांततेत साजरे केले जातील, असे ते म्हणाले.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृह येथे व्यापारी तसेच जनतेसाठी पाणी, वीज, सुरक्षा आदी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना त्यांनी यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय या ठिकाणी तात्पुरती पोलीस चौकी सुरु करणे, वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत आरोग्य सेवा कक्ष सुरु करणे, हेल्पलाईन सुरु करणे आदीबाबतही कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. मुस्लिम समाज बांधवांना हा सण शांततेत आणि आनंदाने साजरा करता येईल यादृष्टीने प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, असे त्यांनी यावेळी सांगितले.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या यंदा अधिक आहे. मुंबई तसेच नागपूर विमानतळावर हज समितीमार्फत जाणाऱ्या यात्रेकरुंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. मात्र खासगी टूर ऑपरेटरद्वारे प्रवास करणाऱ्या हज यात्रेकरुंना सुविधा मिळत नाहीत, असा मुद्दा बैठकीत उपस्थित करण्यात आला. त्याची दखल घेत खासगी टूर ऑपरेटरद्वारे हज यात्रेस जाणाऱ्या हज यात्रेकरुंनाही सर्व सोयी-सुविधा देण्याबाबत हज समितीस निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही बकरी ईदच्या नियोजनासाठी प्रशासनासमवेत बैठक आयोजित केल्याबद्दल यावेळी उपस्थित आमदार, विविध कुरेशी आणि खाटीक समाजाचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी सर्वांना ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी पदुममंत्री महादेव जानकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, शिक्षणमंत्री अॅड. आशिष शेलार, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, अनिस अहमद, आमदार अमीन पटेल, अबू असीम आझमी, वारीस पठाण, अस्लम शेख, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख, मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम, उर्दू अकादमीचे अध्यक्ष डॉ. अहमद राणा, मुख्य सचिव अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजयकुमार, पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायसवाल, मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी, परिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे, कुरेश जमातीचे अध्यक्ष कुलरेझ कुरेश यांच्यासह विविध कुरेशी तसेच खाटीक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

वारकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू – सुभाष देशमुख

0

मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडवले आहेत, उर्वरित प्रश्न सोडवू, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
आज मंत्रालयात आयोजित वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे असे सांगून श्री. देशमुख म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या  प्रधानमंत्री महोदयांच्या तीन शब्दातच सर्व गोष्टी सामावल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली. याचा केवळ महिलांना लाभ झाला असे नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोडही थांबली. वेळेची बचत होण्यास मदत झाली.
शासनाने प्रत्येक कुटुंबाचा आणि कुटुंबातील सदस्यांच्या हिताचा विचार केला.जनधन  योजनेअंतर्गत गरिबांची बँक खाते उघडून त्यांना पत प्राप्त करून दिली. बँकेच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांना मुद्रा योजनेतून उद्योग-व्यवसायासाठी कर्ज मिळू शकेल अशी व्यवस्था केली. आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यविषयक लाभ दिले. गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणली. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे त्याला सन्मान देणाऱ्या अनेक योजना या शासनाने राबविल्या. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्याच्या शेतमाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केला. या शासनाने शेतमालाला दीडपट हमीभाव दिला. हरभरा, तूर सारख्या पिकांसाठी भावांतर योजनेतून मोठी रक्कम  शेतकऱ्यांना दिली तीही त्यांच्या थेट बँक खात्यात.
जलयुक्त शिवार योजनेमुळे ७० टक्के पाऊस होऊनही आपण कृषी उत्पादन वाढवू शकलो. मुख्यमंत्र्यांनी मिशन म्हणून या योजनेतून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यानी आपल्या संत पंरपरेने घालून दिलेला वृक्षलागवडीचा संस्कार जनमाणसात रुजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कीर्तन-प्रवचनातील शेवटची पाच मिनीटे वृक्षलागवडीसाठी द्या
विकास खारगे यांचे आवाहन
संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे म्हणत वृक्षांना आणि पशु-पक्षांना सगे सोयरे मानलं, वृक्षाचं मानवी जीवनातील महत्व सांगितलं. त्या संतपरंपरेची पताका खांद्यावर घेऊन वारीत जाणाऱ्या वारकऱ्यांनी, प्रवचनकारांनी, कीर्तनकारांनी त्यांच्या व्याख्यानातले,कीर्तनातले, प्रवचनातले शेवटचे पाच मिनिटे वृक्षलागवडीसाठी द्यावेत,त्यात त्यांनी वृक्षांचे मानवी जीवनातील  महत्व समजून सांगून वृक्षलागवड आणि संगोपनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी केले.
देवाचे दर्शन घेऊन जाताना जर प्रसादरूपी वृक्ष मिळाला तर त्याचे त्या वृक्षासोबत एक भावनिक नाते तयार होते, लावलेले ते रोप नक्की जगावे असा त्यांचा प्रयत्न असतो. हीच भावना लक्षात घेऊन महाराष्ट्रातील सर्व मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी प्रसादरुपाने भक्तगणांना रोप दिले जावे यासाठी वन विभाग प्रयत्न करत आहे असे सांगून श्री. खारगे म्हणाले की, नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रमही वृक्षलागवड उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आला आहे. ईशा फाऊंडेशनच्या मदतीने नदीकाठी एक किमी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात येत आहे. विभाग वन शेतीला प्रोत्साहन देत आहे. फळझाड लागवडीतून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे त्याचबरोबर हरित महाराष्ट्राच्या निर्मितीला वेग मिळावा हा त्यामागचा हेतू आहे. इंद्रायणी नदी काठी ही वृक्षलागवड करण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली. वृक्षलागवडीत स्थानिक प्रजातीची रोपे लावली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. सध्या राज्यात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणाची कामे सुरु आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्याची माहिती वृक्षलागवडीच्यावेळी घेतली जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांनी देवराई निर्माणामध्ये पुढाकार घ्यावा असे आवाहन करतांना त्यांनी वन विभागामार्फत वृक्षलागवड, वन शेती, हॅलो फॉरेस्ट,हरित सेना या सर्व उपक्रमांची आणि योजनांची माहिती उपस्थितांना दिली.
बैठकीत वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली मते आणि मागण्या मांडल्या. वारी ने अध्यात्माबरोबर सामाजिक विचारांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच  नशाबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छता अभियान, हरित आणि निर्मल वारी सारखे विषय वारकऱ्यांच्या कीर्तन -प्रवचनाचा एक भाग झाले.  वृक्षलागवड हा त्यातला एक महत्वाचा विषय नक्की आहे आणि  राहील अशी ग्वाही वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.
अनेक देवस्थानच्या स्वत:च्या जागा आहेत तिथे वृक्ष लागवड करण्यासाठी रोपे उपलब्ध करून द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.

जर्मनीतील आंतराष्ट्रीय महोत्सव महाराष्ट्रातील कला, संस्कृती, पाककृतीस जर्मन पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मुंबई : जर्मनीतील कार्ल्सरुह येथे झालेल्या ‘इंडियन समर डेज फेस्टीव्हल २०१९’ मध्ये महाराष्ट्राच्या चमूने सहभागी होत विविध कला आणि संस्कृतींचे सादरीकरण केले. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांचा विविध उपक्रमांद्वारे या महोत्सवात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला. महाराष्ट्रातील पाककृतींचा आस्वाद घेत जर्मन नागरीकांनी महाराष्ट्राच्या वैविध्याविषयी जाणून घेण्यात मोठा रस दाखवला.

जर्मनीतील पर्यटनप्रेमींना भारताविषयी असलेली आस्था आणि भारतभेटीबद्दल विशेषत: महाराष्ट्राबद्दल असलेली उत्सुकता लक्षात घेता महाराष्ट्राने रोड शो, प्रदर्शन, व्हीडीओ अशा विविध माध्यमांसह मोठ्या प्रमाणात भाग घेतल्यास आणि जर्मनीतील विविध शहरे आणि विभागांत महाराष्ट्राविषयी माहिती पोहोचविल्यास त्याचा चांगला लाभ होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया जर्मनीतील पर्यटन व्यावसायिकांनी यावेळी व्यक्त केली.

इंडिया समर डेज या वार्षिक महोत्सवाचे आयोजन KEG Karlsruhe Event Gmbh व भारतीय दूतावास कार्यालय, मुनीच यांच्या सहकार्याने दरवर्षी कार्ल्सरुह, जर्मनी येथे करण्यात येते. महाराष्ट्र शासन व बार्डन बुटन (जर्मनीतील राज्य) या राज्यादरमान्य पर्यटन व विविध क्षेत्रांच्या विषयांशी निगडीत सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने राज्यातील पर्यटनस्थळे, कला, संस्कृती व पाककृती यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनात्मक प्रसिध्दी करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग हा 2017 पासून सातत्याने या कार्यक्रमात सहभागी होत आहे.

यंदाचा महोत्सव हा दि. 13 व 14 जुलै, 2019 रोजी आयोजित करण्यात आला होता. नेहमीच्या प्रथेनूसार यावर्षी देखील राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयामार्फत या महोत्सवात महाराष्ट्र दालन उभारुन सहभाग घेण्यात आला. महोत्सवात महाराष्ट्रातील समुद्र किनारे, वन्य पर्यटन, साहसी पर्यटन, धार्मिक पर्यटनस्थळे, ऐतिहासिक पर्यटनस्थळे, जागतिक वारसा स्थळे, पारंपारिक सण (गुढीपाडवा), महाराष्ट्रातील पारंपारिक हस्तकला (पैठणी), पारंपारिक वेशभूषा (पगडी, फेटे, गांधी टोपी, जिरेटोप) व महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, पारंपारिक नृत्ये यांचे प्रदर्शन करण्यात आले. महोत्सवात जर्मन व भारतीय पर्यटकांनी महाराष्ट्र दालनाला मोठ्या संख्येने भेटी देऊन महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे, कला-संस्कृतींची ओळख करुन घेतली व खाद्यपदार्थांचा आस्वादही घेतला.

महाराष्ट्र दालनाला भेट देणाऱ्या जर्मन पर्यटकांचे पारंपारिक पध्दतीने फेटे बांधून स्वागत करण्यात आले. महिला व पुरुष पर्यटकांनी पारंपारिक महाराष्ट्रीयन वेशभूषा करुन सेल्फी काढून घेतले. दोन दिवसीय महोत्सवात स्थानिक जर्मन तसेच विदेशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला.

बेंगळुरू, नागपूर, मुंबई येथे 420 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह स्मार्ट कॅम्पस उभारण्याची जीआयआयएसची योजना

0

मुंबई – सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल भारतातील पहिला स्मार्ट कॅम्पस पुणे येथे लाँच करणार आहे. सिंगापूरमध्ये 2018 मध्ये लाँच करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय पुरस्कारक प्राप्त स्मार्ट कॅम्पसची संकल्पा हडपसर आणि बालेवाडी येथे अमलात आणली जाणार आहे. नव्या पिढीला 21 व्या शतकातील कौशल्ये शिकवण्याच्या उद्दिष्टाने या कॅम्पसची स्थापना करण्यात येणार आहे.

जीआयआयएस भारतात अस्तित्वात असलेल्या कॅम्पसमध्ये समान अध्यापन तंत्र आणि उपक्रम राबवले जाणार असून त्यासाठी येत्या काही वर्षांत 420 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

स्मार्ट कॅम्पसमध्ये स्मार्ट कॅम्पस अध्यापन तंत्रासह विद्यार्थ्यांना शिकवण्यातून मिळणारे निष्कर्ष उंचावण्यासाठी आणि त्यांना भविष्याकरता तयार करण्यासाठी खास वैशिष्ट्ये वापरात आणण्यात आली आहेत.

स्मार्ट कॅम्पसतर्फे जागतिक विद्यार्थी आदानप्रदानासाठी डिजिटल आणि व्हर्च्युअल वर्ग, विद्यार्थ्यांची उपस्थिती व कॅम्पसच्या सुरक्षेसाठी फेशियल रेकग्निशन, संशोधन, कृत्रिम बुद्धीमत्ता, रोबोटिक्स आणि औद्योजिकता स्टुडिओज अशाप्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. विद्यार्थ्यांना नवी कौशल्ये आत्मसात करता यावीत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हरित व शाश्वत शिक्षणाचे वातावरण उपलब्ध व्हावे यासाठी या सुविधा दिल्या जातात.

त्याचबरोबर भारतात पहिल्यांदाच जीआयआयएसद्वारे शालेय स्तरावर क्रीडा विश्लेषण सुरू केले जाणार असून त्याद्वारे विद्यार्थ्यांची माहिती आणि सांख्यिकी माहितीद्वारे मैदानावरील कामगिरीवर देखरेख केली जाईल व ती उंचावण्यासाठी मदत केली जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉल आणि सॉकर या खेळांच्या संघांसाठी हे तंत्र वापरले जाते.

पुण्यात सुरू होणार असलेल्या भारताच्या पहिल्या स्मार्ट कॅम्पसविषयी जीआयआयएसचे सह- संस्थापक आणि अध्यक्ष श्री. अतुल तैमुर्णीकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना जागतिक मंचावरील आपल्या भविष्याकरता तयार करण्यासाठी स्मार्ट कॅम्पसवर नेक्स्टजेन लर्निंगची निर्मिती करण्यासाठी शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल बांधील आहे.’

विद्यार्थ्यांना 21 व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करता यावीत यासाठी जीआयआयएसतर्फे कौशल्यांवर आधारित स्टुडिओज सुरू करण्याचे जीआयआयएसचे नियोजन असून त्यात डिजिटल डिझाइन, रेडिओ आणि टीव्ही स्टुडिओ, मेकर स्पेसेस, किंग आणि इतरही बऱ्याच स्टुडिओजचा समावेश असेल व त्यामागे भविष्यातील तंत्रज्ञानाविषयीचे ज्ञान उंचावण्याचा हेतू असेल. शिक्षण आणि अनुभूती उंचावण्यासाठी काहींची खास निवड केली जाणार असून त्यात दृकश्राव्य यंत्रणा, विद्यार्थी व शिक्षकांसाठी स्मार्ट आयडी कार्ड्स, कॅशलेल पेमेंट यंत्रणा, स्मार्ट टॉयलेट्स, मोशन सेन्सर्स इत्यादींचा समावेश असेल.

लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलबद्दल

119 पुरस्कारांचे विजेते ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूल (जीआयआयएस) हे उच्चभ्रू आंतरराष्ट्रीय स्कूल्सचे नेटवर्क असून सिंगापूर, मलेशिया, जपान, थायलंड, यूएई, व्हिएतनाम आणि भारतातील 19 कॅम्पसमध्ये मिळून 15 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २००२ मध्ये स्थापन झालेल्या जीआयआयएसद्वारे शिशुगट ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला जातो. यामध्ये इंटरनॅशनल बक्लोरियूट डिप्लोमा प्रोग्रॅम (आयबीडीपी), केंब्रिज आयजीसीएसई, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) आणि ग्लोबल माँटेसरी प्लस प्रोग्रॅमचा समावेश आहे.

 

9 जीईएमएस पद्धतीद्वारे तरुण मनांचा विकास करून त्यांचे जागतिन नेते आणि संशोधकांमध्ये रुपांतर करणे हे जीआयआयएसचे ध्येय असून हा एक सर्वांगीण दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये शिक्षणाची क्रीडा, परफॉर्मिंग आर्ट्स, उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाशी सांगड घालण्यात आली आहे. जीआयआयएस ही ग्लोबल स्कूल्स फाउंडेशनची (जीएसएफ) सदस्य आहे. जीएसेफ ही प्रशासनाचे उच्च मापदंड आणि प्रस्थापित शैक्षणिक निकष यांसाठी जगभरात ओळखली जाते. तिला गेल्या 15 वर्षांत 100 पेक्षा जास्त पुरस्कार मिळालेले आहेत.

आघाड्या आणि सेल बळकट करा :राष्ट्रवादी चा मंत्र

0
पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस च्या पुणे शहर आणि पुणे जिल्हा ओबीसी सेल च्या कार्यकारिणीची बैठक १७ जुलै रोजी निसर्ग मंगल कार्यालय (मार्केट यार्ड ) येथे झाली . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेल बळकट करा ,त्यातून जनतेशी संवाद वाढवून पक्ष बळकट करा ,असा मंत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या   पदाधिकाऱ्यांना देण्यात आला . पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे यांचा नियुक्तीबद्दल यावेळी सत्कार करण्यात आला .
‘माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,खा.सुप्रिया सुळे,प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी खास सूचना दिल्या असून विधानसभा स्तरावर पक्षाच्या सर्व  आघाड्या आणि सेल नव्या कार्यकारिणीसह कृती कार्यक्रम घेवून जनतेसमोर येणार आहेत .हा कृती कार्यक्रम धडाक्यात यशस्वी करा ‘ , असे आवाहन प्रदेश समन्वयक सुहास  उभे यांनी केले

बुधवार दिनांक १७ जुलै पुणे जिल्हा व पुणे शहर ओबीसी  सेल ची बैठक निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी झाली . यावेळी  ओबीसी सेलचे  प्रद्रेशध्यक्ष ईश्वर  बाळबुधे ,पुणे जिल्हाध्यक्ष  प्रदीप गारटकर , पुणे शहराध्यक्ष चेतन तुपे ,  प्रदेश समन्वयक सुहास  उभे  यांनी  मार्गदर्शन केले .   आगामी   विधानसभा निवडणुकीत   पुणे जिल्हातील जागा जिंकण्यासाठी  कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी ओबीसी  सेलच्या माध्यमातून सज्ज रहावे, राष्ट्रवादी पक्षाचे काम सेलच्या पदाधिकारी यांनी समाजातील तळागाळापर्यंत जावून पोहचावे ,म्हणजे विधानसभेला सर्वाधिक  आमदार निवडून येतील . बहुजन समाजासाठी ,प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक शरद पवार यांनी सर्वाधिक योगदान दिले आहे . त्याची माहिती कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारांपर्यंत पोहोचवली पाहिजे ,असेही आवाहन करण्यात आले .

यावेळी ओबीसी सेलचे  प्रद्रेशध्यक्ष ईश्वर  बाळबुधे , पक्षाच्या सर्व आघाड्या आणि सेलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे  ,ओबीसी  जिल्हाध्यक्ष  शिवदास उबाळे,संतोष नांगरे(ओबीसी सेल पुणे शहराध्यक्ष),रुपेश आखाडे(पुणे)  ,नितीन शेंडे (बारामती),  राज पाटील( इंदापूर), शिवाजी झगडे , सौ नुसरत इनामदार( बारामती) ,संदिपान वाघमोडे (दौंड ), बाळासाहेब झोरे( मुळशी ),संदीप थोरात( वाघोली) तसेच सेल चे सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित होते*

स्थायी समितीतून सल्लागारांचे ‘चांगभले ‘….

0

पुणे – माविलमत्तांसाठी व्यवस्थापन प्रणाली विकसित करण्यासाठी पालिकेने ‘अर्नेस्ट अँड यंग’ कंपनीच्या पाच सल्लागारांची नेमणूक केली असून त्यांच्या वर्षभराच्या वेतनासाठी तब्बल 1 कोटी 5 लाख रुपये मोजले जाणार आहेत.यामुळे विकासकामांच्या नावाखाली सल्लागारांचे खिसे गरम करणाऱ्या पालिकेतील स्थायी समितीचा उधळपट्टीचा आणखी एक प्रकार समोर आला आहे.

विशेष म्हणजे, यातील एकाचे मासिक वेतन तब्बल 3 लाख 24 हजार रुपये असून उर्वरित दोघांना प्रतीमाह 2 लाख 89 हजार रुपयांचे वेतन महापालिका देणार आहे. स्थायी समितीने कोणतीही माहिती न घेता या उधळपट्टीस मान्यता दिली आहे. त्यामुळे सल्लागारांना एवढे वेतन देणार असेल, तर महापालिकाच सल्लागारांना चालविण्यास का देत नाहीत, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

महापालिकेच्या सुमारे 10 हजार 200 मिळकती आहेत. या मिळकतींचे रेकॉर्डही पालिकेकडे उपलब्ध आहे. यातील अनेक जागा संस्था, व्यावसायिकांना भाडेकराराने दिलेल्या आहेत. यापूर्वी दोन वेळा या माहितीचे संगणकीकरण केले आहे. त्यासाठी सुमारे 50 लाखांहून अधिकचा निधी खर्च केला आहे.मात्र, या मिळकतींची पुन्हा नोंदणी करून त्यांची नेमकी जागा निश्‍चित करून याचे जीपीएस मॅपिंग तसेच त्याचा योग्य वापर करून त्याद्वारे महापालिकेस उत्पन्न मिळविणे यासाठी हे सर्वेक्षण महापालिका करणार आहे. त्यासाठी शासन निर्णयानुसार या संस्थेची नेमणूक केली आहे.

सल्लागार कशासाठी?
हे सल्लागार केवळ महापालिकेला उत्पन्नवाढीसाठीचा आराखडा तयार करून देणार आहेत. प्रत्यक्षात या मिळकतींचे जीपीएस मॅपिंग केले जाणार असून हे काम कोणत्या कंपनीला द्यायचे, हे सल्लागार ठरविणार आहेत. प्रत्यक्षात मालकीच्या मिळकती आरक्षणापोटी पालिकेस आल्या आहेत. या मिळकती ताब्यात घेतानाच त्याचे मोजमाप तसेच नकाशे घेतले जातात. या नकाशांचे डिजिटायझेशनसुद्धा पालिकेने केलेले आहे. तर मिळकतींचे जीआयएस मॅपिंग यापूर्वीच महापालिकेने एन्टरप्रायझेस जीआयएसच्या माध्यमातून केले आहे. त्यामुळे या प्रकल्पांची जवळपास आवश्‍यक माहिती महापालिकेकडे आधीच उपलब्ध आहे. मात्र, केवळ ती विस्कळीत असल्याचे दाखवित सल्लागारांवर ही उधळपट्टी केली जात आहे.

सल्लागारांची मुदत संपतच नाही
महापालिकेकडून या पूर्वीही स्मार्ट सिटी अंतर्गत अशाच प्रकारे काही सल्लागार कंपन्यांचे प्रतिनिधी महापालिकेत कराराने घेतले होते. मात्र, हे सल्लागार अद्यापही पालिकेच्याच वेतनावर आहेत. अशाच प्रकारे हे नवीन सल्लागार तूर्तास 12 महिन्यांसाठी घेण्यात आले, तरी नंतर त्यांना सोयीनुसार मुदतवाढ देऊन त्यांचे पुनर्वसन महापालिकेतच केले जात आहे. अशा प्रकारे काही कंपन्यांच्या सल्लागारांना अद्यापही पालिकाच वेतन मोजत असल्याचे वास्तव आहे.

विधानसभा निवडणूक- राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे फिफ्टी फिफ्टी जागांचा आग्रह

0

मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय पक्ष आणि आघाड्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत चांगल्या प्रदर्शनाचा दावा करणाऱ्या राष्ट्रवादीने काँग्रेसकडून जास्त जागांची मागणी केली आहे. लोकसभेतील चांगली कामगिरी पाहता आपल्याला काँग्रेस एवढ्याच समान जागा मिळाव्या अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लावून धरली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या मुद्द्यावर मंगळवारी बैठक झाली. त्यामध्येच काँग्रससमोर राष्ट्रवादीने हा प्रस्ताव ठेवला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या व्यूहरचनेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या चर्चेत लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि ईव्हीएमचा मुद्दा देखील महत्वाचा ठरला. उल्लेखनीय बाब म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या. त्याचाच दाखला देत राष्ट्रवादीने आघाडीमध्ये सम-समान जागा वाटपाची मागणी केली आहे. आधी परिस्थिती वेगळी होती आणि आता ती बदलली आहे असेही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या बैठकीत म्हटले आहे.

महाराष्ट्रात 288 जागांसाठी येत्या दोन ते तीन महिन्यांत निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. त्यावरूनच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1999 पासून आघाडी आहे. परंतु, 2014 ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेग-वेगळी लढवली होती. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसने 25, राष्ट्रवादीने 20 आणि इतर सहकारी पक्षांनी 3 जागांवरून निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीने त्यापैकी 4 आणि काँग्रेसने केवळ एका जागेवरून विजय मिळवला. तत्पूर्वी 2014 च्या लोकसभेत काँग्रेसला केवळ दोन आणि राष्ट्रवादीला 4 जागा मिळाल्या होत्या. एकूणच राष्ट्रवादीचा निकाल काँग्रेसपेक्षा चांगला होता.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार – सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई : आपल्या साहित्यातून सामान्य माणसांच्या दु:खाला वाचा फोडणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी शासन साजरी करत आहे. या निमित्ताने १ ऑगस्ट २०१९रोजी त्यांचे टपाल तिकिट प्रकाशित करणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आज श्री. मुनगंटीवार यांनी विशेष सहाय्य योजनांचा आढावा घेतला त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाप्रित्यर्थ  राज्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अर्थसंकल्पात १००कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला असल्याची माहिती देऊन श्री. मुनगंटीवार म्हणाले की, विशेष सहाय्य अंतर्गत येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांमधील लाभार्थींना दर दोन महिन्यांनी नियमित अनुदान मिळेल अशी व्यवस्था विभागाने तत्काळ करावी,अनुदानापासून गरीब जनतेस, निराधार जनतेस वंचित ठेऊ नये.
विशेष सहाय्य योजनांचे लाभार्थी, त्यांची नावे आणि याद्या या सगळ्या बाबी संगणकीकृत कराव्यात अशा सूचनाही मंत्रीमहोदयांनी यावेळी दिल्या. लाभार्थींचे बँक खाते आधारलिंक केल्यास डुप्लीकेशन टाळता येईल, त्यामुळे सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थींची खाती आधारलिंक करण्यास गती द्यावी असेही ते म्हणाले. विशेष सहाय्य योजनांच्या काही लाभार्थींचे खाते  हे इंडियन पोस्टल पेमेंट बँकेत आहे. त्यांचीही एकदा बैठक आयोजित करण्यात यावी अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या.
योजनांचे लाभ देताना जिल्हाधिकारी आणि मंत्रालय यामधली यंत्रणा म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंट युनिट निर्माण केल्यास विशेष सहाय्य योजनांचे लाभ लाभार्थींना सुरळितपणे देणे शक्य होईल. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करणार असल्याचे श्री. वाघमारे यांनी यावेळी सांगितले. महाडीबीटी पोर्टलवरून विशेष सहाय्य योजनांच्या लाभार्थींना अनुदान वितरित करण्याबाबत विभाग काम करत असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
विभागाच्या वतीने आज श्री. मुनगंटीवार यांच्या समोर संजय गाधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. योजनांची माहिती, लाभार्थींची संख्या आणि अनुदानाचे स्वरूप यावर त्यात माहिती होती.

गुरुपौर्णिमेनिमित्त नृत्य परंपरेचा घडला अनुग्रह !

0
तंजावूर राजघराण्याकडून डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार
पुणे :गुरुपौर्णिमेनिमित्त  ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट ‘तर्फे  १६ जुलै  रोजी ‘अनुग्रह ‘ हा नृत्य कार्यक्रमात  ज्येष्ठ नृत्य गुरु डॉ . सुचेता भिडे -चापेकर  यांच्या १० शिष्यानी नृत्य सादर करून गुरुवंदना दिली ! तर डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांनी गुरु संकल्पनेवर  नृत्य सादर करून शिष्यांवर ‘अनुग्रह’ केला !
   ‘तंजावूर नृत्य प्रबंध’ ही  विशेष  नृत्य संकल्पना   ‘अनुग्रह ‘ या कार्यक्रमात सादर करण्यात आली .  कर्नाटकच्या तंजावूर राजघराण्याच्या मराठी नृत्य परंपरेचे  विलोभनीय दर्शन
 या कार्यक्रमातून घडले.प्रताप सिंहराजे यांनी सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कार केला.
 डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांची   कन्या ,शिष्या आणि   ‘कला वर्धिनी’ चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव अरुंधती पटवर्धन यांनी स्वागत केले . तंजावूर राजघराण्याचे १४ वे वंशज  प्रतापसिंहराजे भोसले   प्रमुख पाहुणे म्हणून या कार्य्रक्रमाला उपस्थित होते.
. अंजली बागुल,धनश्री,आपटे,केतकी शेणोलीकर,तेजश्री अडीगे,केतकी नेवपुरकर,शिल्पा देशमुख,लालन देसाई,सायली काणे,अरुंधती पटवर्धन,या शिष्यांनी सहभाग घेतला.वैभवी जोगळेकर यांनी यांनी निरुपण केले.डॉ . सुचेता भिडे -चापेकर यांच्या ‘गुरु ‘ संकल्पनेवरील नृत्याने उपस्थितांची वाहवा मिळवली . ‘अनुग्रह ‘ चे हे सहावे वर्ष होते
 व्यंकोजीराजे, शहाजीराजे, सरफोजीराजे यांनी तंजावरच्या प्रांतात कलांना, परंपरांना प्रोत्साहन दिले. रसिक, कलाविज्ञ, नाटककार अशी या घराण्याची ख्याती आहे. या घराण्याने नृत्य संगीताची नवनिर्मिती केली. त्याचे विलोभनीय दर्शन या कार्यक्रमात घडले.
 ‘ तांडवनृत्य करी गजानन ‘, यासह  शहाजीराजांच्या रचनांवर नृत्य रचना ‘ कृष्णा ‘ , ‘ लाजेस लाज नाही ‘ देखील सादर करण्यात आल्या.सरफोजी महाराज यांच्या  रचनाही दाद मिळवून गेल्या. सरफोजी राजांचा तिल्लानाही सादर करण्यात आला.
‘ डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी तंजावूर नृत्य परंपरा पुढे आणण्यासाठी, त्याचे दस्तावेजी करण करण्यासाठी १९६० पासून प्रयत्न केले ते महत्वपूर्ण आहेत. ‘ तंजावूर नृत्य प्रबंध ‘ हा अतिशय उत्तम कार्यक्रम असून त्यांनी तंजावूरला येऊन ‘ संगीत महाल ‘ पॅलेस मध्ये सादर करावा ‘, असे उद्गार प्रतापसिंहराजे यांनी काढले.
‘ जीव- शिवाचे अद्वैत मानणारे तंजावूर राजघराण्याने कला -परंपरा जपण्याचे अलौकिक सांस्कृतिक कार्य केले आहे. स्वतःचे व्यक्तिमत्वाची ओळख करुन ज्ञानाची कवाडे गुरू उघडतो. गुरु -शिष्य परंपरा ही देशाचे भूषण असून ती पुढे नेली पाहिजे. ‘ असे मनोगत डॉ. सुचेता भिडे -चापेकर यांनी व्यक्त केले.
 शिवप्रसाद (गायन ), श्रीराम ( मृदंग ), बालसुब्रमण्यम् (व्हायोलिन ) यांनी साथसंगत  केली. त्यांचा सत्कार प्रताप सिंहराजे यांनी केला.सुचेता भिडे -चापेकर यांचा सत्कारही त्यांनी केला.

आता सरपंचही घेणार… मंत्री, आमदारांप्रमाणे पद आणि गोपनियतेची शपथ

0
 
 
मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) –  मंत्री, आमदारांप्रमाणेच थेट जनतेतून निवडून आलेले सरपंचही आता पद आणि गोपनियतेची शपथ घेणार आहेत, राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतीच या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांची ग्रामपंचायतबाबत असलेली बांधिलकी आणि गावाच्या विकासाच्या दृष्टीने असलेली जबाबदारी याबाबत गावातील जनतेमध्ये तसेच लोकप्रतिनिधीमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या शपथ घेण्यामागचा उद्देश असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा केल्यानंतर ग्रामविकास विभागाने यासंदर्भात जो प्रस्ताव सादर केला होता, त्यास मान्यता देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.

सरपंच व सदस्यांना शपथ देण्यासंदर्भात परिपत्रक निर्गमित करण्याच्या सूचना प्रधान सचिव, ग्रामविकास यांनी नुकत्याच दिल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 33(2) अन्वये जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेला अधिकारी पहिल्या सभेचे अध्यक्षस्थान स्विकारेल, पहिल्या सभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी अध्यासी अधिकारी थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच यांना शपथ देईल आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम,1964 चा अवलंब करून कार्यवाही सुरू करेल. अध्यासी अधिका-यांनी गण संख्येसंबंधी कार्यवाही पूर्ण केल्यानंतर सरपंच हे पहिल्या सभेचे अध्यासी अधिकारी म्हणून काम पाहतील. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच ग्रामपंचायती मधील नवनियुक्त इतर सदस्यांना सामुदायिक शपथ देतील व त्यानंतर उपसरपंचांची निवडणूक पार पाडली जाणार आहे, असे प्रस्तावात नमुद करण्यात आले आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणूकीनंतर हा प्रस्ताव लागू होणार आहे.

जि. प. अध्यक्षांनाही शपथ देण्याचा विचार
सरपंचांप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि सदस्य तसेच पंचायत समितीच्या सभापती आणि सदस्य यांना देखील शपथ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे मंत्री पंकजा  मुंडे यांनी सांगितले.

राजेंद्र निंबाळकरांच्या जागेवर शंतनू गोयल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदावर ..

0

मुंबई : पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी शंतनू गोयल यांची बदली करण्यात आली.भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) कार्यरत असलेल्याराज्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. यामध्ये गोयल यांचा समावेश आहे. गोयल हे २०१२ च्या बॅचचे अधिकारी असून ते भंडारा येथे येण्यापूर्वी नागपूर महापालिकेत अतिरिक्त आयुक्त होते .त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील उपविभागीय अधिकारी या पडा पासून केली .

याशिवाय सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी एस. आर. दौंड यांची कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स आयुक्तपदी बदली झाली. याशिवाय अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. नवी मुंबईचे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची कामगार आयुक्तपदी, मुंबई येथे बदली करण्यात आली.

तसेच जात पडताळणी समितीचे अध्यक्ष यू.ए. जाधव यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बदली झाली आहे.

पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाचा बाद फेरीत प्रवेश

0
पुणे पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना व पीवायसी हिंदू जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरी कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स संघाने पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स संघाचा 42-34 असा पराभव करत सलग तिस-या विजयासह बाद फेरीत प्रवेश केला.  8 वर्षाखालील मिश्र गटात श्रावी देवरेने अचिंत्य कुमारचा 4-3(5) असा टायब्रेक मध्ये पराभव करत विजयी सुरूवात केली. 10वर्षाखालील मुलांच्या गटात नील केळकरने सय्यम पाटीलचा 4-0 असा सहज पराभव केला. 14 वर्षाखालील मुलांच्या गटात अनमोल नागपुरेने सार्थ बनसोडेचा 6-4 असा तर मुलींच्या गटात रुमा गाईकैवारीने अनन्या देशमुखचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
14वर्षाखालील दुहेरी गटात  अर्जुन अभ्यंकर व वेदांत ससाणे यांनी मोक्ष सुगांधी व आदित्य भट्टेवारा यांचा 6-1 असा तर मिश्र दुहेरी गटात डेलीशा रामगट्टा व अथर्व जोशी यांनी सिमरन छेत्री व अभिनीत शर्मा यांचा 6-0 असा पराभव करत संघाला विजय मिळवून दिला.
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:  
कोद्रे फार्म्स रोअरिंग लायन्स वि.वि पुणे ओपन स्ट्रायकिंग जॅगवॉर्स: 42-34(एकेरी: 8वर्षाखालील मिश्र गट: श्रावी देवरे वि.वि अचिंत्य कुमार 4-3(5); 10वर्षाखालील मुले: नील केळकर वि.वि सय्यम पाटील 4-0, 10वर्षाखालील मुली: काव्या देशमुख पराभूत वि आस्मी टिळेकर 1-4, 12 वर्षाखालील मुले: आरूष मिश्रा पराभूत वि अभिराम निलाखे 3-6, 12 वर्षाखालील मुली: रितीका मोरे पराभूत वि वैष्णवी सिंग 2-6, 14 वर्षाखालील मुले: अनमोल नागपुरे वि.वि सार्थ बनसोडे 6-4, 14 वर्षाखालील मुली: रुमा गाईकैवारी वि.वि अनन्या देशमुख 6-0, कुमार दुहेरी गट: प्रणव इंगोले/रैन मुग्गुले पराभूत वि अर्णव बनसोडे/अमोद सबनीस 3-6, 14 वर्षाखालील दुहेरी गट: अर्जुन अभ्यंकर/वेदांत ससाने वि.वि मोक्ष सुगंधी/ आदित्य भट्टेवारा 6-1, 10 वर्षाखालील दुहेरी गट: समिहन देशमुख/आर्यन किर्तने पराभूत वि मनन अगरवाल /दक्ष  पाटील 1-4,  मिश्र दुहेरी गट: डेलीशा रामगट्टा/अथर्व जोशी वि.वि सिमरन छेत्री/अभिनीत शर्मा 6-0)

 

सुरेश वाडकर, राजीव नाईक आणि सुहास जोशी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार,समीहन कशाळकर यांना ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कार’ झाकीर हुसेन ठरले ‘अकादमी रत्न’

0

नवी दिल्ली  : प्रसिध्द गायक  सुरेश वाडकर, नाटककार राजीव नाईक आणि प्रसिध्द अभिनेत्री सुहास जोशी या महाराष्ट्रातील कलाकारांना वर्ष 2018 चा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. शास्त्रीय गायक समीहन कशाळकर यांची उस्ताद बिस्मील्ला खाँ युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर, तबला नवाज झाकीर हुसेन यांना ‘अकादमी रत्न’ ही मानाची फेलोशीप जाहीर झाली आहे.
कला क्षेत्रात सर्वोच्च समजल्या जाणा-या संगीत नाटक पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली आहे. संगीत, नृत्य, नाट्य आणि लेाककला क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारांचा संगीत नाटक अकादमीतर्फे गौरव केला जातो. ‘वर्ष २०१८ च्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी’ देशभरातील 40 कलाकारांची तर‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कारासाठी 32 कलाकारांची निवड करण्यात आली आहे. चार कलाकारांना उल्लेखनीय योगदानासाठी‘अकादमी रत्न’ ही फेलोशीप जाहीर झाली आहे.
सुरेश वाडकर यांच्या सुगम संगितातील योगदानाची दखल
‘मेघारे मेघारे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी…’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यामुळे चाहत्यांच्या मनावार गारुड  करणारे प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांना सुगम संगितातील योगदानासाठी संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. सुरेश वाडकर यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपटांतून पार्श्वगायन केले आहे. यासोबतच त्यांनी भोजपुरी, कोकणी,मल्याळी ,गुजराती,बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत.
नाटय क्षेत्रातील योगदानासाठी प्रसिध्द नाटककार राजीव नाईक यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. नाटककार आणि कथाकार म्हणून राजीव नाईक यांनी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नाईक यांनी लिहीलेली ‘अनाहत’, ‘वांधा’, ‘अखेरचं पर्व’, ‘साठेंच काय करायचं’ आदी नाटके प्रसिध्द आहेत. राजीव नाईक लिखीत‘नाटकातलं मिथक’, ‘खेळ नाटकाचा’, ‘नाटकातला काळ आणि अवकाश’ ,‘न नाटकाचा’ आदी पुस्तके नाटकाच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरली आहेत.
ज्येष्ठ अभिनेत्री सुहाश जोशी यांना नाटय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी संगीत नाटक आकदमी पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक नाटक, चित्रपट आणि मालिकांतून आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
१ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
तबला नवाज झाकीर हुसेन यांना अकादमी रत्न पुरस्कार
अवघ्या जगाला तबल्याच्या तालात बांधाणारे भारतीय शास्त्रीय संगीताला एका वेगळया उंचीवर नेऊन ठेवणारे तबलानवाज उत्साद झाकीर हुसेन  यांना यावर्षी संगीत नाटक अकादमीचा अकादमीची मानाची ‘अकादमी रत्न’ फेलोशिप जाहीर झाली आहे. ३ लाख रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
समीहन कशाळकर  यांना ‘युवा पुरस्कार’
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील योगदानासाठी ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिध्द गायक व पंडीत उल्हास कशाळकर यांचे पूत्र समीहन कशाळकर यांना २०१८ चा ‘उस्ताद बिस्मील्ला खाँ’ युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. 25 हजार रूपये रोख , ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
दरवर्षी एका शानदार सोहळयात राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि फेलोशीप प्रदान करण्यात येते.

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी अधिवेशनात वारसा हक्क चा निर्धार

0

भाईंदर. ( प्रतिनिधी ) – मिरा भाईंदर महानगरपालिका 538 सफाई कामगार यांना वारसा हक्क मिळावा म्हणून 10 वे राज्यव्यापी अधिवेशनात गोविंद परब यांनी मांडला असता अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी अनुमोदन दिल्याने सामाजिक न्याय मंत्री डॉ. सुरेख खाडे यांनी लवकरच मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन सोडवण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी गोविंद परब म्हणाले की, सफाई कामगारांना लाड / पांगे समितीच्या शिफारस लागू असताना मिरा भाईंदर मनपा मधील कामगारांना का ? मिळत नाही. भारत देश लोकशाही वर चालणारा देश आहे. सर्व कर्मचाऱ्यांना एकच कायदा आहे. मग येथील कर्मचाऱ्यांना वेगळा न्याय का ? मिरा भाईंदर महानगरपालिका आस्थापनेवरील 538 सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करणे तसेच अनुकंपा करण्यासंदर्भात कायद्याने तसेच नियमाने मिळणे आवश्यक आहे. सफाई कामगार म्हणून सन 1993 पासून कर्मचारी काम करत आहेत, या कर्मचाऱ्यांना सन 2000 मध्ये लाड / पांगे समिती च्या शिफारस नुसार कायम करण्यात आले. अशा कर्मचाऱ्यांच्या आयुष्याची 10 – 12 वर्षे वाया जाऊ नये म्हणून ते पूर्ण भरून काढण्यासाठी त्यांना सेवा ज्येष्ठते मध्ये त्याचा लाभ मिळावा. ज्या कर्मचाऱ्यांना सफाई कामगार मधून प्रमोशन करण्यात आले आहेत. 538 कर्मचारी पैकी 50 ते 60 कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत तर 50 कर्मचारी मयत झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर आज उपास मारीची वेळ आली आहे. पण कुटुंब सेवेत येण्यासाठी हक्कदार आहेत. म्हणून राज्यव्यापी अधिवेशनात हा मुद्दा मांडण्यात आला. असल्याचे परब यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान सांगली लोकसभा मतदार संघाचे खासदार संजयकाका पाटील यांच्या समवेत चर्चा केली. यावेळी मिरा भाईंदर कामगार सेनेचे अध्यक्ष गोविंद परब, देवानंद पाटील, वसंत पेंढारे, उल्हास आंग्रे, दत्तात्रेय जाधव, परशुराम सिंगाराम अन्य सहकारी तथा पदाधिकारी उपस्थित होते.