Home Blog Page 289

नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा सुवर्ण महोत्सव साजरा

पुणे:

बंडगार्डन, येथील नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने २४ व २५ मे २०२५ रोजी दोन
दिवसांच्या रंगतदार कार्यक्रमांसह आपला सुवर्ण महोत्सव साजरा केला.
शनिवारी उत्सवाची सुरुवात भक्तीमय सुंदरकांड पठणाने झाली. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात यश
मिळवलेल्या तरुण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विविध वयोगटातील सभासदांच्या सहभागाने
सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सोसायटीतील ऐक्य आणि उत्साही वातावरणाचा प्रत्यय दिला.
रविवारी कार्यक्रम सौ. पूर्णिमा शिंदे यांच्या सूत्रसंचालनाखाली पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शिवेश
आणि त्यांची कन्या स्वरा यांच्या सुस्वर गणेश वंदनेने झाली. नंतर दिवंगत सभासदांना श्रद्धांजली
वाहण्यात आली आणि अजीत मोरे यांनी तयार केलेल्या ‘डाऊन मेमरी लेन’ या भावस्पर्शी लघुपटाने जुन्या
आठवणींना उजाळा मिळाला.
कार्यक्रमास नामवंत बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे आणि चौधरी कुटुंबीय, श्री. व सौ. वागास्कर, श्री.
लक्ष्मीनारायण आणि वास्तुविशारद रवी कदम यांची उपस्थिती लाभली. श्री. आनंद नाईकनवरे यांच्या
हस्ते सोसायटीचा विशेष कॅटलॉग प्रकाशित करण्यात आला.
कार्यक्रमाचा समारोप प्रा. शशांक दिवेकर आणि त्यांच्या संगीतमय समूहाच्या सुरेल ऑर्केस्ट्राने झाला.
हुतोक्षी वेलिंकर आणि सोसायटीची मॅनेजिंग कमिटी यांच्या संकल्पनेतून आणि आयोजनातून पार पडलेल्या
या सुवर्ण महोत्सवामुळे नवीन सुजाता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या गौरवशाली वाटचालीस
नवयुगीन साज लाभला.

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण बीगॉसचा ब्रॅण्ड अम्बेसिडर म्हणून घोषित

मुंबई२८ मे २०२५ –  आरआर ग्लोबल ग्रुप या प्रसिद्ध इलेक्ट्रिकल सोल्युशन्स कंपनीची निर्मिती असलेल्या बीगॉस या कंपनीने आज प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अजय देवगणला आपला ब्रॅण्ड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली. भारतात वाढत्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची मागणी लक्षात घेता कंपनीने प्रसिद्ध अभिनेता अजय देवगणसोबत केलेली भागीदारी फार महत्त्वाची मानली जात आहे. अभिनेता अजय देवगण यांची सिनेसृष्टीतील यशस्वी कारकिर्द, जनमानसातील प्रतिमा आणि लोकप्रियता बीगॉसला फायदेशीर ठरेल. बीगॉसचा स्मार्ट आणि विश्वासार्ह आणि भविष्यासाठी तयार असलेली गतिशीलता हा संदेश अजय देवगण यांच्या मोठ्या चाहत्यावर्गापर्यंत पोहोचवता येईल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला.

अजय देवगण यांच्याबद्दलची जनमानसांतील मजबूत विश्वासार्हता हा स्वभावगुण बीगॉसच्या कामगिरी, विश्वासार्हता आणि विश्वासाच्या ब्रँण्ड मूल्यांशी उत्तम जुळतो. अजय देवगण यांची भागीदारी झाल्याने देशभरातील अनेक ग्राहक कंपनीशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जातील. यामुळे अनेक ग्राहक इलेक्ट्रिक दुचाकीला स्मार्ट आणि जबाबदार प्रवासाचा पर्याय म्हणून निवडण्यास प्रोत्साहित होतील. ही भागीदारी बीगॉसची सर्वसामान्यांसाठी सोपी आणि आकर्षकरितीने शाश्वत प्रवासाची साधने निर्मित करण्याची कटिबद्धता दर्शवते.

या भागीदारीबद्दल अभिनेता अजय देवगण यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ बीगॉस हा भारतीय ब्रॅण्डने जागतिक दर्ज्याची इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती केली आहे. कंपनीच्या या यशस्वी कामगिरीमुळेच मी त्यांच्याशी जोडलो गेलो आहे. RUV350 ही दुचाकी कंपनीच्या उत्तम दर्ज्याच्या गुणवत्तेचे आणि नव्या तंत्रज्ञानाच्याबद्दलची बांधिलकीचे दर्शन घडवते. ही दुचाकी म्हणजे स्मार्टस्वच्छ गतिशीलतेच्या प्रवासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे.‘ 

अभिनेता अजय देवगण यांच्यासोबतच्या भागीदारीबद्दल बीगॉसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक हेमंत काबरा म्हणाले, ‘‘आम्ही देशातील रस्त्यांवर वापरण्यास सोप्पी आणि विश्वासार्ह वाहनांची निर्मिती करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आमची वाहने याच गोष्टींची ग्वाही देतात. अजय देवगण यांची प्रामाणिक स्वभाव आणि मोठा चाहता वर्ग आमच्या ब्रँण्डच्या मूल्यांशी तंतोतंत जुळतो. आम्हांला विश्वास आहे की, त्यांची ही भागीदारी शाश्वत शहरी वाहतुकीला प्रोत्साहन देत कंपनीच्या व्यवसायवृद्धीस हातभार लावेल.

यासह बीगॉसने ईलेक्ट्रोनिक वाहनांच्या व्यवसायात अजून काही वाहने आणण्याची तयारी दर्शवली आहे. पुढील वर्षापर्यंत इलेक्ट्रिक सायकल आणि आणखी दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली जातील. कंपनी इलेक्ट्रिक दुचाकी प्रकारात सर्वात विविध प्रकारची उत्पादने (रेंज) उपलब्ध करुन देणार आहे. येत्या दोन वर्षांत डीलरशिप नेटवर्किंगमध्ये मोठा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. यामुळे देशभरातील विक्री आणि सेवा मजबूत होईलअसा विश्वास कंपनीच्यावतीने व्यक्त करण्यात आला.

बीगॉस RUV350 ही एक मजबूतस्मार्टटिकाऊ आणि आरामदायक इलेक्ट्रिक दुचाकी आहे. शहरातील रस्त्यांवर तसेच लांबच्या पल्ल्यातील आरामदायी प्रवासासाठी ही दुचाकी फायदेशीर ठरते. ही दुचाकी ७५ किमी प्रति तास वेगाने धावते. दुचाकीला एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १४५ पर्यंतची रेंज देते. ही दुचाकी एआरएआय प्रमाणित आहे. ३ हजार ५००W इन व्हील मोटर आणि ३ kWh LFP बॅटरी, मेटल बॉडी१६ इंच अलॉय व्हील्स ही या दुचाकीची ठळक वैशिष्ट्ये आहेत. या दुचाकीत सामान ठेवण्यासाठी बूट स्पेसदेखील उपलब्ध आहे. प्रवासाची सर्व माहिती स्पष्ट दिसावी याकरिता ५ इंचाचा TFT डिस्प्लेयोग्य मार्ग दर्शविणारा टर्न बाय टर्न नेव्हिगेशनक्रूझ कंट्रोलदुचाकी पडल्यास आपोआप बंद होण्यासाठी फॉल सेन्सप्रवासाच्या मार्गात चढण आल्यास दुचाकी मागे घसरणार नाही यासाठी हिल होल्डब्रेक लावल्यावर बॅटरी चार्ज होण्यासाठी रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम या आवश्यक सोयीसुविधांसह दुचाकी उपलब्ध आहे. स्टाईलसह आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार झालेली ही दुचाकी प्रवासासाठी अतिशय आरामदायक आहे.

बीगॉस सी१२ या दुचाकीच्या रेंजमधील नवे मॉडेल आता दोन रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. यात TFT डिस्प्लेसह जुन्या सी१२आय मॉडेल्सची सर्व वैशिष्ट्ये एकत्रित करण्यात आली आहेत. २ हजार ५०० Wची हब मोटर६० किमी प्रति तासाचा टॉप स्पीडएकदा चार्ज केल्यावर १२३ किमीपर्यंतची रेंज उपलब्ध असल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. यात काही नव्या वैशिष्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे. यात २ थीम्ससह ५ इंचाची मोठ्या आकाराचा TFT डिस्प्ले असून २.९ kWh बॅटरी जोडली आहे. बॅटरीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अत्याधुनिक लिथियम सेलचा वापर करण्यात आला आहे. सुरक्षित प्रवासासाठीही दुचाकीत खास तरतुदी उपलब्ध आहेत. क्रूझ कंट्रोलरिव्हर्स मोडटर्न बाय टर्न नेव्हिगेशन, फॉल सेन्सरिजनरेटिव्ह ब्रेकिंग आणि सुरक्षित ब्रेकिंगसाठी सीबीएस ब्रेकिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला आहे. हे मॉडेल शहर आणि उपनगरातींल रस्त्यांसाठी बनवले आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

या दुचाकीच्य निर्मितीला भारत व्हॅल्यू फंडचे मधु आणि महावीर लुणावत आणि विनी कॉस्मेटिक्सचे दर्शन पटले या प्रमुख गुंतवणूकदारांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महापालिका निवडणुकीसाठी ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा कसबा मतदारसंघाचा दौरा

कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम करावे!

पुणे-

विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आज दिल्या. तसेच, मोर्चा आणि आघाडीची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही ना. पाटील यांनी यावेळी दिल्या.

ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कसबा विधानसभा मतदारसंघाचा प्रवास करुन; नवनियुक्त मंडल अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यानंतर विष्णू कृपा कार्यालयात विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर,आ. हेमंत रासने, शैलेश टिळक, स्वरदा बापट, राघवेंद्रबापू मानकर, राजेंद्र काकडे, प्रमोद कोंढरे, दीपक पोटे यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला ना. पाटील यांनी भाजपा संघटन पर्वाअंतर्गत पक्षाची कसबा विधानसभा मतदारसंघातील सर्व मंडलातील आघाड्या-मोर्चाच्यांची कार्यकारिणी लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ग्राऊंडवर उतरून काम केले. त्यामुळे ना-भूतो-ना भविष्यती विजय मिळाला. आगामी महापालिका निवडणुकीत ही आपल्याला तसेच यश मिळवायचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या.

ते पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाबाबत वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील. कार्यकर्त्यांनी त्याची काळजी करु नये. आपल्याला मिळालेली जबाबदारी योग्य पार पाडावी, अशा सूचना ही त्यांनी यावेळी दिल्या. तसेच, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी आपापल्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करावे. पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी समन्वय ठेवावा. जेणेकरून, आणीबाणीच्या प्रसंगातून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

म्हाळुंगे टीपी स्कीमला अंतिम मान्यता मिळावी; अमोल बालवडकर यांची मुख्यमंत्र्यांकडे विनंती

पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला म्हाळुंगे टीपी स्कीम प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या योजनेला स्थानिक शेतकरी आणि नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद असून, त्यांनी योजनेस आपली मान्यता दिली आहे, अशी माहिती अमोल बालवडकर यांनी दिली आहे.

बालवडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या विनंती पत्रात नमूद केले आहे की, या योजनेचा आराखडा लवकरात लवकर तयार होऊन त्याला अंतिम मान्यता मिळावी, जेणेकरून विकासकामांना गती मिळू शकेल.पीएमआरडीएच्या माध्यमातून या योजनेवर गेल्या काही वर्षांपासून काम सुरू आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे अद्याप योजनेस अंतिम मान्यता मिळालेली नाही. परिणामी, या भागातील रस्ते, पाणीपुरवठा व अन्य मूलभूत सुविधा आणि अन्य विकासकामे प्रलंबित आहेत.

बालवडकर यांनी स्पष्ट केले की, “मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक अडचणी दूर करून या योजनेला तातडीने अंतिम मान्यता द्यावी, जेणेकरून संपूर्ण परिसराचा चेहरामोहरा बदलेल आणि सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल.”या प्रकल्पाची अंमलबजावणी झाल्यास परिसराचा एकात्मिक आणि नियोजित विकास सुनिश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

वैष्णवी हगवणेंच्या वडिलांची हात जोडून विनंती:मुलगी गेली आता शिंतोडे तरी उडवू नका.. आवाहन करताना अश्रू अनावर

पुणे-माझ्या मुलीवर आरोप करणाऱ्या वकिलांना देखील मुली-बाळी असतील. आता माझे लेकरु तर गेले आहेच. मात्र, तीच्यावर एवढे वाईट शिंतोडे उडवू नका, अशा शब्दात वैष्णवी हगवणेचे वडिल अनिल कस्पटे यांनी हात जोडून विनंती केली आहे. माझ्या लेकराची अशी बदनामी करु नका, असे म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी न्यायालयात केलेले सर्व दावे त्यांनी फेटाळले आहेत.वैष्णवी हगवणे प्रकरणात आरोपीच्या वकिलांनी केलेले सर्व दावे तीचे वडिल अनिल कस्पटे यांनी फेटाळून लावले आहेत. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी हगवणे कुटुंबावर अनेक आरोप केले. तसेच माझ्या मुलीच्या खुनात नीलेश चव्हाण यांचा जवळचा संबंध असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

या संबंधी बोलताना कस्पटे म्हणाले की, वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे चुकीचे आहे. मोबाईल मधील चॅट बाबत आम्हाला कोणतीही पुसटशीही कल्पना कोणीच दिलेली नाही. उलट माझ्या जावयाला मी एक लाख 52 हजार रुपयांचा मोबाईल घेऊन दिला. त्याची पावती देखील कस्पटे यांनी दाखवली आहे. या मोबाईलचे हप्ते मी आजही फेडत असल्याचे ते म्हणाले.हगवणे कुटुंबाकडे पाच कोटी रुपयांच्या गाड्या असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला होता. मात्र हा दावा कस्पटे यांनी फेटाळून लावला आहे. त्यांच्याकडे केवळ एकच स्फोर्ड कंपनीची गाडी असून मी दिलेली फार्च्युनर गाडी त्यांनी मागितली होती. मी आधी दुसरी गाडी बुक केली होती. मात्र त्यांना फार्च्युनर गाडी हवी होती. मला तीच द्या नसता मी गाडीला हाथ लावणार नाही, असे त्यांनी मला सांगितले होते. त्यानंतर फार्च्युनर गाडी बुक केली असल्याचा दावा कस्पटे यांनी केला आहे.

हगवणे यांनी वैष्णवीची दोन लग्न मोडली असल्याचा दावा देखील पुन्हा एकदा कस्पटे यांनी केला आहे. मात्र या विषयी मी सध्या काही जास्त बोलू शकत नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे. या माध्यमातून कस्पटे यांनी हगवणे परिवाराकडून आम्हाला धमकवले जात असल्याचा अरोप पुन्हा एकदा केला आहे.

आपली सून मयत झाली हे सोडून हगवणे यांना बाळाला नीलेश चव्हाणकडे देणे कसे सुचले? असा प्रश्न कस्पटे यांनी उपस्थित केला. बाळ वैष्णवीच्या जवळच घरात होते. मग ते बाळ नीलेश चव्हाणकडे कसे पोहोचले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. नीलेश चव्हाण देखील माझ्या वैष्णवीच्या खुनाच्या कटात सामील आहे, असा माझा ठाम आरोप असल्याचे कस्पटे यांनी म्हटले आहे.

धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठीक ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा – संदीप खर्डेकर.

वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा – संदीप खर्डेकरांची आयुक्तांकडे मागणी.

पुणे- धरणातून विसर्ग केल्यावर पुराचे पाणी शिरणाऱ्या ठीक ठिकाणी केलेल्या उपाययोजनांची माहिती जाहीर करा,वर्षानुवर्षे पुराने बाधित होणाऱ्या कुटुंबियांची ससेहोलपट थांबविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय केली ते दाखवा अशी मागणी भाजपचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
आयुक्त्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे कि,’ या वर्षी पाऊस 106% पडणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
सालाबादप्रमाणे धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यावर नदीपात्रालगत च्या इमारतींमध्ये किंवा वस्त्यांमध्ये पाणी शिरणार आणि मग “नेमीची येतो मग पावसाळा” ह्या काव्यपंक्ती प्रमाणे मनपा पुरामुळे बाधितांची कोणत्यातरी शाळेत व्यवस्था करणार, त्यांना जेवण, कपडे व इतर गोष्टी उपलब्ध करणार, अनेक स्वयंसेवी संस्था व राजकीय सामाजिक कार्यकर्ते त्यांना माणुसकीच्या नात्याने संसारोपयोगी साहित्याची मदत करणार, पाणी ओसरले की बाधित कुटुंब पुन्हा आपल्या घरी जाणार आणि मग पुढच्या वर्षीचा पाऊस, धरणातून विसर्ग, बाधित कुटुंबियांचे तात्पुरते स्थलांतर हे चक्र सुरूच राहणार.मी ह्या निवेदनाद्वारे आपणास आग्रही मागणी करत आहे की ” हे दुष्टचक्र थांबविण्यासाठी प्रशासनाने काही कायमस्वरूपी योजना केली असेल तर त्याचा तपशील जाहीर करावा, त्यातील काही अडचणी असतील तर त्या देखील पुणेकरांसमोर खुल्या कराव्यात आणि ज्या 50/100 ठिकाणी धरणातून विसर्ग झाल्यावर पाणी शिरते त्याच्या सद्यस्थितीबाबत अवगत करावे”

पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव!

पुणे-वाढीव एफएसआय देऊन पुण्यातील कालवा उखडून देणार नाही ,कालव्याची जागा शहराची ऑक्सिजन झोन नलिका बनली पाहिजे या दृष्टीने या जागेवर पर्यावरण पूरकच कामे व्हावीत , या जागेचा किंवा या जागेवर वाढीव FSI देऊन हि जागा कॉंक्रीटच्या डायनोसॉर पासून वाच्विलीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत,चाफेकरनगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, शंकर थोरात व प्रशांत कांबळे, सुभाष करंडे, फॅबियन सॅमसन यांनी पत्रकार परिषद घेत पुण्याच्या मध्यवर्ती भागातून जाणारा मुठा डावा कालवा गिळंकृत करण्याचा डाव काही बिल्डर महापालिकेच्या मदतीने राबवीत असल्याचा आरोप केला आहे.

ते म्हणाले,’ पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेला मुठा डावा कालवा (किलोमीटर 8 ते 27) म्हणजे 20 किलोमीटर लांबीचा कालवा हा पुणे शहरात वारजे ते गणेशखिंड रोड असा मध्यवर्ती भागातून जातो. यातील काही ठिकाणी या कॅनॉलमध्ये पाईप टाकून रस्ता बंदिस्त करण्यात आला आहे तर काही ठिकाणी हिरवाई जोग्गिंग ट्रॅक व तत्सम वॉकिंग, सायकल ट्रॅक बनवण्यात आलेले आहेत. वाहतूक समस्येमुळे काही ठिकाणी हा पथ एकेरी वाहतुकीसाठी तर काही ठिकाणी पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठी वापरला जातो. काही भागावर वृक्षरोपण केले गेले आहे. मॉडेल कॉलनी भांडारकर रोड भागात या रस्त्यावर वृक्षांचे हिरवे आच्छादन तयार झालेले आहे.

परंतु आता पुणे महानगरपालिकेने काही बांधकाम व्यावसायिक यांच्या फायद्यासाठी अधिकचा एफएसआय मिळावा यासाठी, या कॅनॉलला थेट पोहोच/ अप्प्रोच रस्ता म्हणूनच संबोधले आहे. या शहर विकास आराखड्यात वॉटर बॉडी दर्शवण्यात आलेल्या कॅनॉल रोडला थेट १२ मीटर रुंदीचा पोहोच रस्ता संबोधून बेकायदेशीर रित्या वाढीव एफएसआय सहित बांधकाम नकाशे मान्य करण्यात आले आहेत. यासाठी बिल्डरला पाटबंधारे विभागाशी कॅनाल / कालव्याचा सेवापथ वापराचा एक वर्षाचा खंडित होणारा तात्पुरत्या स्वरूपाचा भाडेकरार करण्यास करण्यास सांगितले जात असून त्याद्वारे पाटबंधारे विभाग,मनपा बांधकाम विभाग आणि कॅनॉल शेजारील खाजगी जमीन मालक, बिल्डर हे संगनमताने बेकायदेशीर व्यवहार करीत आहेत. यासंदर्भातील अधिकृत बांधकाम नकाशे, भाडे करार आणि विकास आराखडे पत्रकार परिषदेत आप चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी दाखवले.

1995 साली पुणे शहरातून जाणाऱ्या कॅनॉल / कालव्याचा सेवारस्ता म्हणून खंडित स्वरूपात पुणे महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग यांच्यामध्ये करार करण्यात आला होता. त्यानुसार दुचाकींसाठी दिवसा हा रस्ता पुणेकर नागरिकांसाठी खुला करण्यात आला. आता या 20 किलोमीटर रस्त्यावर काही ठिकाणी वृक्ष काही ठिकाणी जोग्गिंग , वॉकिंग, सायकल रस्ता अशा सुविधा करण्यात आल्या आहेत. परंतु भवितव्याचा विचार करता शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही.

या कॅनॉल रस्त्याच्या गैरफायद्याचे प्रकरण आम आदमी पार्टीने आज उघड केले. शिवाजीनगर मधील आयुक्त बंगल्यासमोरील हरेकृष्ण मंदिर रोड वरील जीवन प्रदीप को-ऑपरेटिव्ह सोसायटी ने पाटबंधारे विभाग सोबत एक वर्षाचा भाडेकरार केला आहे. पुणे महानगरपालिकेची या रस्त्याबाबत पाटबंधारे विभागाने यापूर्वीच करार केलेला असतानाही या नव्या कराराद्वारे या कॅनॉल रोडचा वापर करण्यास पाटबंधारे विभागाने बेकायदेशीर परवानगी दिली. या तात्पुरत्या स्वरूपातील भाडे कराराला पोहोच रस्ता समजून या सोसायटी च्या बिल्डरने वाढीव एफएसआय घेत नवे नकाशे मान्य करून घेतले आहेत. याच धर्तीवर कॅनॉल हाच रस्ता दाखवून त्याद्वारे वाढीव एफएसआय मिळवण्याचे षडयंत्र पुणे शहरातील मध्यवर्ती प्रभात रोड, भांडारकर रोड, मॉडेल कॉलनी या तब्बल वीस किलोमीटर लांबीच्या कॅनॉल रोडवर केले जाऊ शकते. यामुळे आम आदमी पार्टी तसेच चाफेकर नगर येथील स्थानिक रहिवाशी यांनी मिळून पुणे महानगरपालिका आयुक्त ,बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग यांची भेट घेतली. परंतु त्याकडे महानगरपालिकेने सहेतुक दुर्लक्ष केले. त्यामुळे आता यासंदर्भात आम आदमी पार्टी चे मुकुंद किर्दत तसेच चाफेकर नगर नागरिक कृती समितीचे श्रीकांत भिसे, गणेश खेंगरे, प्रभाकर तिवारी, सागर किंजालास्कर, गुलाब वाघ आदींनी सीपीसीच्या कलम 80 नुसार आयुक्त मनपा, कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग, बांधकाम विभाग पुणे व नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन यांना नोटीस बजावली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेने सदरचे नकाशे रद्द करावेत व बांधकाम विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे, अन्यथा आम आदमी पार्टी व चाफेकरनगर वस्ती नागरिक आयुक्तांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.

शहरात असा २० किलोमीटर जमिनीचा पट्टा गणेशखिंड ते वारजे असा उपलब्ध आहे. शहर विकास आराखड्यामध्ये मात्र हा पूर्ण कालवा वॉटर बॉडी म्हणूनच राखून ठेवण्यात आलेला आहे. आराखड्यात या जागी कोणताही रस्ता प्रस्तावित नाही. असे असल्याने भविष्यात त्याचा अतिशय उत्तम वापर युरोपियन / जर्मनी च्या धर्तीवर जॉगिंग, व्यायाम , सायकल व पादचारीवापरासाठी, कलाकार कट्टा, शालेय विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी आदीसाठी वापरता येईल. शहराला हा ऑकसीजन झोन/ ब्रीधिंग झोन म्हणून वापरता येईल. मध्य शहरातील एफएसआय वाढवण्यासाठी याचा वापर होऊ नये अशी अपेक्षा आहे.

शनिवारी पुण्यात ख्रिस्ती हक्क परिषदेचे आयोजन

पुणे : रिजनल ख्रिश्चन सोसायटी यांच्या वतीने पुण्यात येत्या शनिवारी (31 मे)  ख्रिस्ती हक्क परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत विविध विषयांवर चर्चा होणार असल्याची माहिती रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत (लुकस) केदारी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुणे पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला राहुल डंबाळे, अॅड. अंतुन कदम, जॉन मंतोडे,  जुबेर मेमन, पिटर डिसूझा, के.  बी. एन.  सॅमसन  आदि मान्यवर उपस्थित होते. 

पुढे बोलताना प्रशांत (लुकस) केदारी म्हणाले,  ख्रिस्ती हक्क परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून, बिशप थॉमस डाबरे, राज्यसभेचे खासदार पी. विल्सन (DMS, तमिळनाडू) , श्री. दिलीप नाईक, श्री. पिटर डिसूझा, सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहेमान, पा.पिटर जॉर्ज, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,आमदार बापूसाहेब पठारे, काँग्रेस अरविंद शिंदे, प्रशांत जगताप,सतिश मेहेंद्रे, ऍंथोनी जेकब उपस्थित राहणार आहेत. शनिवार, दि. 31 मार्च रोजी सकाळी  10 ते सायंकाळी 4 यावेळेत ही परिषद पापल सेमिनरी हॉल, नगर रोड, रामवाडी, वडगावशेरी, पुणे येथे होणार आहे. 

परिषदे विषयी अधिक माहिती देताना केदारी म्हणाले, यंदाची ख्रिस्ती हक्क परिशद ही सहावी परिषद आहे. यामध्ये समाजाच्या उन्नतीविषयी विविध विषयांवर चर्चा, ठराव आणि मागण्या मांडण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने राज्यातील ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ असावे, राज्यात 45 लाखांहून अधिक लोकसंख्या ख्रिस्ती समाजाची आहे, त्यापैकी 80 टक्के समाज आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्यांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक विकास महामंडळ, विधान परिषद वा राज्यसभेत संधी, समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचाराला आळा बसावा, महिला सशक्तीकरणासाठी पावले उचलणे, पुणे शहरात ख्रिस्ती समाजासाठी सांस्कृतिक भवन असावे आदि बाबींचा समावेश असल्याचे केदारी यांनी सांगितले.  तसेच परिषदेच्या दिवशी समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे त्यांचे उद्घाटन याप्रसंगी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

डी. पी. रोडवर रात्री उशिरा एका कॅफेसमोर कोयते घेऊन दहशत माजविली..पण पोलिसात तक्रारच नाही

पुणे: शहरातील एरंडवणे नजीकच्या उच्चभ्रू डी. पी. रोडवर उशिरा सुरू असलेल्या एका कॅफेसमोर तोंडाला रुमाल बांधलेल्या आणि हातात कोयते, तत्सम हत्यारे असलेल्या तीन तरुणांनी दहशत माजवल्याची घटना घडली आहे. त्यांनी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना २७ मे रोजी रात्री १२ वाजता घडली असून, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.प्राप्त माहितीनुसार, तीन अनोळखी तरुण एका दुचाकीवर कॅफेजवळ येतात, तोंडावर रुमाल बांधलेले आणि हातात कोयता व इतर धारधार शस्त्रं असतात. अवघ्या दीड मिनिटांत त्यांनी कॅफेमध्ये प्रवेश केला आणि लगेच बाहेर येताच वाहनांवर हल्ला केला. पार्किंगमध्ये उभ्या दुचाकीची तोडफोड करण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची प्रतिक्रिया अथवा कॅफे चालकाने दिलेली तक्रार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे स्थानिकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.विशेष म्हणजे, घटनेनंतर तीन दिवस उलटूनही कोणतीही अधिकृत तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झालेली नाही. ना गुन्हा नोंदवण्यात आला आहे, ना पोलिसांकडून कोणती कारवाई झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील मूळ कारण व वादाचे स्वरूप अद्याप अस्पष्ट आहे.दरम्यान अलंकार पोलीस चौकीपर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे मात्र हॉटेल मालक ,चालक तक्रार द्यायला धजावत नसल्याचे वृत्त आहे

प्रत्येकी ३ भारतीय व्यक्तीपैकी १ जण पेय म्हणून करतो दूधाचे सेवन : गोदरेज जर्सी

पुणे, 29 मे, 2025 – जागतिक दूध दिनाच्या निमित्ताने, गोदरेज जर्सीने “बॉटम्स अप… इंडिया सेज चिअर्स टू मिल्क!” या अहवालाद्वारे भारतीय ग्राहकांच्या बदलत्या पसंतींचा गौरव केला आहे. या निष्कर्षांनुसार, दर तीनपैकी एक भारतीय व्यक्ती पेय म्हणून दूधाचे सेवन करते तर पुणेस्थित 39 टक्के ग्राहक पेय म्हणून दुधाला प्राधान्य देतात.

जोडीला, 39% ग्राहक फ्लेवर्ड दूध पिणे पसंत करतात किंवा घरी दूधात फ्लेवर मिसळून मग ते दूध पितात. पालकही आता फ्लेवर्ड दूध हे पोषणमूल्यपूर्ण, सोयीचे आणि आनंददायक पेय म्हणून आपल्या मुलांना देऊ लागले आहेत. दिवसभरात 37% पालक तर 41% खेळाच्या वेळेत फ्लेवर्ड दूध हे एक रिफ्रेशिंग पर्याय म्हणून मुलांना देतात.

या निष्कर्षांवर भाष्य करताना गोदरेज जर्सीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूपेंद्र सुरी म्हणाले, “गोदरेज जर्सीमध्ये आम्ही ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. चव, ताजेपणा आणि पोषण यांचा समतोल राखून, ब्रँड नवीन पिढीसाठी दूध म्हणजे काय याची व्याख्या नव्याने करत आहे. गोदरेज जर्सी बदाम दूध हे केवळ चवीलाच आनंद देणारे नसून एक आरोग्यदायी, संपूर्ण पोषण देणारा पर्याय आहे. फक्त वर्ल्ड मिल्क डेपुरताच मर्यादित नाही तर हे दूध दररोज पिण्यासाठी योग्य पेय आहे.”

“भारत जसजशी अधिक सजग आणि जाणिवपूर्वक वापर करणारी संस्कृती स्वीकारतो आहे, तसतशी दुधाबाबतची धारणा बदलते आहे. आता केवळ परंपरेपुरते मर्यादित न राहता आधुनिक जीवनशैलीशी सुसंगत अशा नाविन्यपूर्णतेपर्यंत हे पोहोचले आहे. गोदरेज जर्सी या बदलाचे नेतृत्व करत असून, परंपरेला नव्या कल्पनांशी जोडून दूध हे दररोजच्या पोषणाचा एक महत्त्वाचा भाग बनवत आहे,” असेही ते म्हणाले.

“बॉटम्स अप.. इंडिया सेज चीयर्स टू मिल्क” या शीर्षकाखाली झालेल्या सर्वेक्षणात दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे आणि चेन्नई यांसारख्या प्रमुख शहरांमधून माहिती गोळा करण्यात आली. त्यात  दुग्धजन्य पदार्थांना असलेली पसंती आणि गुणवत्तेची अपेक्षा यावर लक्ष केंद्रित केले गेले.

या निष्कर्षांमधून असे स्पष्ट होते की, दुग्धक्षेत्राने ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी सुसंगत राहण्यासाठी नाविन्यपूर्णता आणि गुणवत्तेचा मिलाफ साधत भविष्यातील वाढीस चालना दिली पाहिजे.

या सर्वेक्षणाची रचना आणि अंमलबजावणी YouGov मार्फत केली गेली. गोदरेज ग्रुपच्या गोदरेज अ‍ॅग्रोव्हेट लिमिटेड (GAVL) या वैविध्यपूर्ण अन्न व कृषिव्यवसाय क्षेत्रातील उद्योगसमूहाची उपकंपनी असलेल्या क्रीमलाइन डेअरी प्रॉडक्ट्स लिमिटेड मार्फत या उत्पादनांची गोदरेज जर्सी या ब्रँड नावाने विक्री केली जाते. 

भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न:आरोपीला अटक

पुणे-खडकवासला मतदारसंघाचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांच्या धनकवडीतील घरात घुसण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शंकर सर्जेराव धुमाळ (वय 47, रा. पुणे) या इसमाला पुणे पोलिसांनी अटक केली असून, त्याने फक्त घरात घुसण्याचाच नव्हे, तर पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचेही उघड झाले आहे.या प्रकारामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, तापकीर यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना पत्र लिहून लक्ष वेधलं. त्यानंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.या प्रकरणात मुंबई दारूबंदी अधिनियम कलम 85(1), भारतीय दंड संहिता कलम 352, 351(2)(3) (धमकी व झटापट), 132, 333 (सरकारी कर्मचाऱ्यास दुखापत), तसेच पोलिस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम 1922 अंतर्गत कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुमाळने तीन वेळा तापकीर यांच्या धनकवडीतील निवासस्थानी घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ केली, धमकावलं आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा निर्माण केला.

या प्रकरणी तापकीर यांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी अजित गणपत देवघरे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सुरुवातीला या व्यक्तीवर किरकोळ स्वरूपात कारवाई झाली होती. मात्र त्यानंतरही आरोपीने वारंवार गोंधळ घालत धमक्या देत राहणं सुरू ठेवलं.गंभीरता लक्षात घेता आमदार तापकीर यांनी थेट पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली. त्यानंतर उपायुक्तांच्या आदेशानुसार सहकारनगर पोलिसांनी बुधवारी रात्री आरोपीला अटक केली.

भीमराव तापकीर हे भाजपचे कार्यक्षम आमदार आणि मंत्रिपदाचे हक्काचे दावेदार असलेले ज्येष्ठ नेते मानले जातात. त्यांनी 2001 मध्ये पुणे महापालिकेपासून राजकारणाची सुरुवात केली, आणि सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. 2011 च्या पोटनिवडणुकीत खडकवासला मतदारसंघातून विधानसभेत पदार्पण, त्यानंतर 2014, 2019 आणि नुकत्याच पार पडलेल्या 2024 च्या निवडणुकीत सलग विजय मिळवून आमदार झाले आहेत.

सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई, दि. 28 : पंढरपुरची ‘आषाढी वारी’ पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. वारकरी आणि वारी राज्याचे वैभव वाढविणारी आहे. यावर्षी पावसाचे आगमन लवकर झाले असून या पार्श्वभूमीवर सर्व मानाच्या पालख्यांना आणि वारकऱ्यांसाठी पाणी, आरोग्य सुविधा, फिरती शौचालये आणि पोलीस बंदोबस्तासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. ही वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठकीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांच्यासह वित्त, नियोजन, सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानाच्या 10 दिंड्यांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते.
पुण्याच्या प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वारीच्या तयारीची माहिती सादरीकरणातून दिली. त्यानंतर प्रमुख दिंडीचे प्रतिनिधी, विश्वस्त यांनी वारीसंबंधात सूचना, अडचणी मांडल्या.
पुणे शहराच्या ठिकाणी विविध स्वागत मंडप, लाऊड स्पीकरवर बंदी, प्रत्येक पालख्यांना जास्तीचा पोलीस बंदोबस्त, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण, वाखरी मॉडेल वारकरी तळ, पालखीसोबत साध्या ॲम्ब्युलन्ससोबत कार्डियाक ॲम्ब्युलन्स, दर्शन पासची संख्या, वॉटर प्रूफ टेंट, पाण्याचे टँकर, मुबलक औषध साठा, पालख्यांच्या पारंपरिक मार्गाचा विकास, फिरती शौचालये, याबाबत सूचना मांडण्यात आल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, वारीचे योग्य नियोजन करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आयुक्तांनी पालख्यांच्या स्वागतासाठी वेगळी व्यवस्था करावी. रस्त्याच्या बाजूला मंडप टाकून स्वागत करावे, मात्र पालख्यांना विलंब होवू नये, याची दक्षता घ्यावी. वारीच्या यशस्वी नियोजनासाठी आपत्ती व्यवस्थापनाने दक्ष राहावे.
विभागीय आयुक्तांनी समन्वयाने काम करावे
राज्यातील विविध भागातून पालख्या पंढरपूरला येतात. नाशिक, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणाहून येणाऱ्या पालख्यांना पालखी मार्गात सोयीसुविधा देण्यासाठी नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी समन्वयांनी बैठक घेवून उपाययोजना कराव्यात. आपापल्या जिल्ह्यातून पालख्या जाताना स्थानिक प्रशासनाने रस्ते, पाणी, वीज, पोलीस बंदोबस्त, आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी तत्काळ बैठका घेवून नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पोलीस महासंचालक यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य समन्वय साधून पालख्यांच्या बंदोबस्ताची, वाहतूक, अपघात होणार नाहीत, यासंदर्भात दक्षता घ्यावी. सर्व मानाच्या पालख्यांना सेवा सुव्यवस्थित राहील याची व्यवस्था करावी. जिल्ह्याची हद्द संपल्यावर पोलीस बंदोबस्तासाठी पुढील जिल्ह्यातील पोलिसांनी अगोदरच हजर राहून कोणतीही पालखी, दिंडी पोलिसांविना राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.
वाखरी : मॉडेल वारकरी तळ करणार
सर्व संतांच्या मानाच्या पालख्या वाखरीजवळ एकत्र येतात. राज्यभरातून शेकडो पालखी सोहळे पंढरीची वाट चालत असताना पालख्यांच्या स्वागतासाठी संत नामदेव महाराजांची पालखी वाखरी येथे येते. याठिकाणी पालख्यांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी योग्य नियोजन करून दक्षता घ्यावी. नामदेव महाराज यांचा ओट्याचा पुनर्विकास करावा. गर्दी लक्षात घेवून वाखरीचे विशिष्ट मॉडेल वारकरी तळ होण्यासाठी आराखडा तयार करणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
यावर्षीही राहणार समूह विमा
पंढरपूर येथील वारीमध्ये दरवर्षी 15 ते 20 लाख वारकरी सहभागी होतात. पंढरपूर दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांचे आजारपण, अपघात किंवा मृत्यू झाल्यास या संदर्भात संबंधितांना दिलासा देण्यासाठी शासनाने मागील वर्षी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी विमा छत्र योजना’ सुरु करण्याचा निर्णय घेतला. यावर्षीही वारीमध्ये सामील होणाऱ्या वारकऱ्यांना समूह विमा राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मानाच्या पालखीमधील वारकऱ्यांना यापुढे दर्शन पास योग्य प्रमाणात वाढवून दिले जातील, असेही त्यांनी सांगितले.
‘निर्मल वारी, हरित वारी’साठी काम वाढवून आराखडा करा
वारी कालावधीमध्ये ‘निर्मल वारी, हरित वारी’ हा उपक्रम अत्यंत महत्वाचा आहे. पालखी मार्गातील जिल्ह्यात प्रशासनाने निर्मल वारीचे अधिक काम होण्यासाठी प्रयत्नशील रहावे. शिवाय हरित वारीने निसर्ग पर्यावरणपूरक आहे. रस्त्याच्यी दुतर्फा देशी, सावली देणारी झाडे लावण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिल्या.
36 वॉटरप्रुफ मंडप
पुढील काही दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार असल्याचा अंदाज असल्याने वारकऱ्यांच्या निवाऱ्यासाठी पालखी मुक्काच्या ठिकाणी 36 वॉटरप्रुफ मंडपाची तयारी केली आहे. आवश्यकता भासल्यास आणखी वॉटरप्रुफ मंडप वाढविण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
वारीमध्ये प्रयागराजच्या धर्तीवर महिलांचाही विचार करण्यात आला असून हिरकणी कक्षासह महिलांना स्नानासाठी वेगळ्या स्नानगृहांची सोय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
वारकऱ्यांची गैरसोय टाळणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्याने विविध मानाच्या पालख्यांच्या सूचना लक्षात घेवून वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता शासन घेणार आहे, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. शुद्ध पिण्याचे पाणी, वीज, वॉटर प्रुफ टेंट, जास्तीत जास्त आरोग्यसुविधा, फिरते शौचालये, पुरविण्यात येणार आहे. अम्ब्युलन्सबाबत कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता आरोग्य विभाग घेईल. महिलांच्या आरोग्याबाबतही विशेष काळजी घेण्यात आली असून वारकऱ्यांना अधिक बसेस, रेल्वे उपलब्ध होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. रस्त्यावर चिखल होणार नाही, ते सुस्थितीत राहतील याची दखल घेण्यात येत असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
यावेळी वारकरी, पालख्यांसाठी विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केलेल्या सोयीसुविधांबाबतची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी दिली.
विविध पालखी संस्थानच्या वतीने योगी निरंजननाथ, चैतन्य कबीर महाराज, जालिंदर मोरे, सोमनाथ घाटेकर, अक्षय महाराज भोसले, श्री. साधू यांनी सूचना मांडल्या.

मिर्झा मशिद ट्रस्ट, रजाशाह हॉल (दर्गा), जोग दर्गा, हजरत सिद्दिक शाह मोल्ला दर्गा अशा अतिक्रमणांवर कारवाईसाठी आमदार टिळेकर रस्त्यावर आक्रमक …

पुणे- शहरातील गुरुवार पेठेतील मिर्झा मशीद ट्रस्ट, रजाशाह हॉल दर्गा, बलवार आळी जोग दर्गा, हजरत सिद्दीक शाह मौला दर्गा येथील अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करून येथील आरक्षित जागा पुणे महानगरपालिकेने तात्काळ ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली. या अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

अतिक्रमणांविरोधात व हिंदूंवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शिवाजी रस्त्यावरील फडगेट पोलिस चौकीसमोर हजारो हिंदू बांधवांनी रस्त्यावर ठिय्या देत आंदोलन केले. विविध हिंदू संघटना, संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका प्रशासन लेखी निवेदनाद्वारे पंधरा दिवसात आरक्षित जागा ताब्यात घेऊ, असे आश्वासन देत नाही, तोवर रास्ता रोको सुरूच ठेवणार, अशी भूमिका घेतल्याने वाहतूकही खोळंबल्याचे पाहायला मिळाले. जवळपास अडीच ते तीन तास रास्ता रोखून धरला.

योगेश टिळेकर म्हणाले, हा लढा कोणत्याही दर्ग्याच्या विरोधात नाही. मात्र, त्याच्या आडून इथे होत असलेली अतिक्रमणे आणि त्यातून घडणाऱ्या राष्ट्रविरोधी घटना रोखण्यासाठी हा जनआक्रोश आहे. या परिसरात महानगरपालिकेचे भाजी मंडईचे आरक्षण आहे. मात्र, ४० वर्षांपासून पालिका येथील अतिक्रमणांवर कारवाई करत नाही व आरक्षित जागा ताब्यात घेत नाही. ही जागा ताब्यात घेऊन येथे नागरिकांसाठी भाजी मंडई उपलब्ध करून द्यावी. महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करतेय, याचे उत्तर आम्हाला मिळाले पाहिजे.

महापालिका प्रशासनाने हा प्रश्न गांभीर्याने घेत तात्काळ कारवाई करावी. प्रत्येकवेळी पोलिसांना पुढे करून महापालिकेने याकडे दुर्लक्ष करू नये. अतिक्रमणे आणि त्याबरोबर होणाऱ्या राष्ट्रविरोधी घटनांना आळा घालण्यासाठी येथील हिंदू समाज जागरूकपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असेही योगेश टिळेकर यांनी नमूद केले.दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर योगेश टिळेकर आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन संपल्याचे जाहीर केले.

‘फर्ग्युसन’मध्ये सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन

पुणे, 28 मे 2025 – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त फर्ग्युसन महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले.

सावरकरांच्या क्रांतिकारी कार्याची साक्ष असलेली महाविद्यालयातील ऐतिहासिक खोली क्रमांक 17 नागरिकांसाठी आज खुली ठेवण्यात आली होती.

1902 ते 1905 या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकर यांचे वास्तव्य या खोलीत होते. या खोलीतूनच ‘अभिनव भारत’ सारख्या संघटनेची पायाभरणी, स्वदेशी चळवळीची सुरुवात, विदेशी वस्त्रांची होळी यांसारख्या क्रांतिकारी उपक्रमांची आखणी करण्यात आली होती. तसेच इथेच त्यांनी ‘सिंहगडाचा पोवाडा’, ‘बाजीप्रभू देशपांडे’ यांसारखी राष्ट्रप्रेरक काव्यरचना केली.

या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे गणवेश, वैयक्तिक वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रांचे संग्रह पाहायला मिळतो. ही खोली आजही अनेकांना देशभक्तीची प्रेरणा देणारे ठिकाण म्हणून ओळखली जाते.

1905 साली विदेशी वस्त्रांची होळी प्रकरणामुळे त्यावेळचे प्राचार्य रँग्लर परांजपे यांनी सावरकरांना वसतिगृहातून वगळले होते, त्यावर लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून जोरदार निषेध केला होता.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन केले असून दरवर्षी सावरकर यांच्या जयंती आणि पुण्यतिथीला ही खोली सर्वांसाठी खुली केली जाते.

आजच्या कार्यक्रमात डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष ऍड. अशोक पलांडे, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य श्याम मुडे आणि उपप्राचार्य प्रा. स्वाती जोगळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावरकरांच्या अर्धपुतळ्याला सकाळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.

श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी 260 कोटी खर्चास प्रशासकीय मान्यता

मुंबई, दि. 28 :- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा मंदिर (कोल्हापूर) येथील सर्वसमावेशक विकास आराखड्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपये खर्चास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील नियोजन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय आज (दि. 28 मे) नियोजन विभागाने जारी केला आहे. या विकास आराखड्यातील अंमलबजावणी व संनियंत्रणाची जबाबदारी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामागे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. श्री क्षेत्र जोतिबा हे राज्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक श्रद्धास्थान असून, त्याचा विकास करण्यासाठी शासनाने विविध पातळ्यांवर व्यापक विचार करून आराखडा तयार केला आहे.

या विकास आराखड्याअंतर्गत श्री जोतिबा मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, यमाई मंदिर संवर्धन व दुरूस्ती करणे, श्री जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण करणे, श्री जोतिबा डोंगर कड्यांचे संवर्धन करणे, देवस्थान समिती/प्राधिकरण नवीन कार्यालय बांधणे, श्री जोतिबा डोंगरावर दोन ठिकाणी ज्योत स्तंभाची निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर नवे तळे परिसर विकास करणे, श्री जोतिबा डोंगरावर केदार विजय गार्डन निर्मिती करणे, श्री जोतिबा डोंगरावर यमाई परिसर विकास (चाफेवन) करणे, श्री जोतिबा डोंगरावर कर्पूर तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर चव्हाण तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर ऐतिहासिक अंगारकर वाडा व बाब संवर्धन करणे, श्री जोतिबा डोंगरावर वाहनाकरिता पार्कंग व्यवस्था करणे, श्री जोतिबा डोंगरावर पाणपोई व शौचालय बांधणे आदी बाबींचा समावेश आहे. या कामांवर पहिल्या टप्प्यात 259.59 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यापैकी 81.60 कोटींच्या कामे थेट नियोजन विभागामार्फत करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पाची अंमलबजावणी 31 मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाची तत्त्वतः जपणूक करत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे होणार आहेत. संबंधित कामांसाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय आणि पुरातत्त्वीय परवानग्या घेण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात येणार असून या समित्यांचे संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांकडे राहील.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या जोतिबा देवस्थानाच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.