Home Blog Page 2886

आशा भोसले यांना पुण्यात भावला ‘कप केक ‘ चा गोडवा !

0

पुणे :ख्यातनाम पार्श्वगायिका श्रीमती आशा भोसले यांनी नुकतीच पुण्यातील ‘मिसेस बी ‘ज ‘ या कप केक शॉपी ला भेट दिली . देशोदेशीची खाद्यसंस्कृती आणि पाककौशल्यात रुची घेणाऱ्या आशाताईंना ‘कप केक ‘चे वैविध्य आणि माधुर्य आवडले ! त्यांनी वेगवेगळ्या स्वादांच्या कप केक चा आस्वाद घेतला आणि काही सोबतही घेतले .

एरंडवणे येथील मंगेशकर हॉस्पिटल रस्त्यावरील ‘मिसेस बी ‘ज ‘ ही कप केक शॉपी सौ. भारती मंगेशकर आणि राधा मंगेशकर यांनी सुरु केली असून सेलिब्रिटी शेफ विष्णू मनोहर यांनी त्याचे उद्घाटन केले होते .

नुकत्याच पुण्यात आलेल्या आशा भोसले यांनी १७ जुलै रोजी कप केक शॉपी ला भेट दिली . आणि येथे उपलब्ध विविध आकर्षक चवीच्या कप केक ,टी केक्स ,पेस्ट्रीज ,सेलिब्रेशन केक ,कुकीज फ्रेश ब्रेड आणि सँडविचेस या प्रकारांची माहिती घेतली .निर्मितीप्रक्रिया ,लागणारे घटक यांचीही माहिती घेतली . तेथील कर्मचाऱ्यांशी परिचय करून घेतला,थोडा संवाद साधला. सौ. भारती] मंगेशकर यांनी स्वागत केले .

दादा जे. पी. वासवानी यांच्या १०१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

0
  • येत्या २ ऑगस्ट २०१९ रोजी रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचा १०१ वा वाढदिवस.
  • या वाढदिवसानिमित्त पुण्यातील साधू वासवानी मिशन येथे येत्या २७ जुलै ते २ ऑगस्ट २०१९ या काळात कार्यक्रम होणार, तसेच जगभरातील साधू वासवानी सेंटर्समध्येही वाढदिवस साजरा केला जाणार.
  • रेव्ह. दादांचा वाढदिवस जागतिक क्षमा दिन (ग्लोबल फरगिव्हनेस डे) म्हणून तर त्या दिवशी दुपारी दोन ही शांतिक्षण (मोमेंट ऑफ काम) – सर्वांना क्षमा करण्याची वेळ म्हणून पाळली जाणार.

पुणे-रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचा १०१ वा वाढदिवस सेवा, कीर्तने, भजने व रेव्ह. दादा आणि गुरूदेव साधू वासवानी यांची ध्वनिमुद्रित प्रवचने आदी विविध कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. याची सुरवात २७ जुलै रोजी वंचित बालकांसाठी दादा मेळा या मोफत गंमत-जत्रेच्या आयोजनाने होणार आहे. पुढच्या दिवशी म्हणजे २८ जुलैला अखंड महा मंत्र यज्ञाचे उद्घाटन होईल. हा यज्ञ अखंड १०१ तास चालून त्याची सांगता १ ऑगस्टला होईल.

रेव्ह. दादा हे क्षमाशीलतेचे भक्कम समर्थक होते. ते नेहमी म्हणत, “क्षमाशीलता आपल्या जीवनात शांती व आनंद आणते. ती आत्म्यात उफाळलेल्या संघर्षाचा शेवट घडवते आणि सहिष्णुता, जाणीव व समतोल यांच्या मदतीने आपल्याला आयुष्याला समोर जाण्यास शिकवते. ती प्रेम व सकारात्मकतेचा संदेश देते. ती हृदयातून सर्व नकारात्मकता, दुःख, संताप, रागीटपणा, वैर आदी दुर्गुणांचे समूळ उच्चाटन करते आणि आरोग्य व शांतीचा पुरस्कार करते. शांती ही ईश्वराचेच दुसरे नाव आहे त्यामुळे आपण क्षमाशीलता अनुसरतो तेव्हा ईश्वराचीच आपल्या अंतःकरणात प्रतिष्ठापना करतो.” रेव्ह. दादांच्या याच शिकवणुकीचा आदर व गहनता राखत साधू वासवानी मिशनने सन २०१२ मध्ये शांतिक्षण – जागतिक क्षमाशीलता क्षण हा उपक्रम सुरू केला. याअंतर्गत सर्वांनी २ ऑगस्ट रोजी दुपारी दोनला एकत्र येऊन सर्व दुःखे, राग, क्रोध व अपराधीपणा याला क्षमा करुन अंतःकरणात शांतीची लाट अनुभवायची असते. शांतीचा क्षण अनुभवणे हा या उपक्रमांपैकी एक ठरला आहे.

गुरूदेव साधू वासवानी आणि रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांनी लिहिलेल्या व सुरेश वाडकर, शंकर महादेवन्, मीता शहा आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेल्या गीतांची सीडी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहे.

वैशिष्ट्ये :

शनिवार, २७ जुलै २०१९ :

  • सकाळी नऊ ते दुपारी तीन : वंचित बालकांसाठी दादा मेळा

रविवार, २८ जुलै २०१९ :

  • सकाळी सव्वाआठ – हवन व अखंड महामंत्र यज्ञाचे उद्घाटन
  • सायंकाळी पावणेसात ते आठ – सत्संग, गुरूदेव साधू वासवानी यांचा उपदेश व रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचा उपदेश

बुधवार, ३१ जुलै २०१९ :

  • सायंकाळी पावणेसात ते आठ – भजन, कीर्तन, गुरूदेव साधू वासवानी यांचा उपदेश व रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचे जीवन व शिकवणुकीच्या झलकी

गुरूवार, १ ऑगस्ट २०१९ :

  • दुपारी बारा ते दीड – अखंड महा मंत्र कीर्तन यज्ञाची सांगता
  • सायंकाळी साडेसहा ते आठ – रेव्ह. दादा जे. पी. वासवानी यांचे सेट युअरसेल्फ फ्री हे इंग्रजीतील प्रेरणात्मक भाषण

शुक्रवार, २ ऑगस्ट २०१९ :

  • सकाळी साडेसात ते सव्वाआठ – १०९ हवने व १०८ गायत्री मंत्र पठणे
  • सकाळी साडेदहा – दरिद्र नारायण सेवा
  • दुपारी बारा ते सव्वादोन – भजन, कीर्तन, सेवा, रेव्ह. दादा जे. पी. वासवानींचे रुह-रिहान, द मोमेंट ऑफ काम व नंतर लंगर
  • सायंकाळी साडेसहा ते आठ – भजन, कीर्तन, गुरूदेव साधू वासवानींचा उपदेश व रेव्ह. दादा जे. पी. वासवानींचा उपदेश
  • रात्री साडेदहा ते मध्यरात्री बारा – व्हिजिल

या कार्यक्रमांना नामवंत पाहुणे उपस्थित राहतील. सर्व कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

रेव्ह. दादा जे. पी. वासवानींबद्दल :

मी कुणाचाही गुरू नाही, पण शिष्य मात्र सर्वांचा आहे, या शब्दांत साधू वासवानी मिशनचे आध्यात्मिक प्रमुख रेव्ह. दादा जे. पी. वासवानी स्वतःचा परिचय करुन देत.

दादा हे मानवतेचे चित्र, आवाज नसलेल्यांचे देवदूत, महिलांच्या हक्कांचे पुरस्कर्ते, उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञ व अनेक जीवांचे तारणहार होते. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी झाला. ते मानवतेचे, करुणेचे व प्रेमाचे प्रतिक ठरले.

दादांच्या अखंड प्रयत्नांतून त्यांचे गुरू साधू टी. एल. वासवानी यांच्या ध्येय उद्दिष्ट्य व शिकवणुकीने सेवा, शिक्षण, आरोग्य-सुरक्षा, आध्यात्मिकता आदीं उपक्रमांच्या माध्यमातून पुढे पाऊल टाकले.

दादा हे आदर्श शिष्यत्वाचे आदर्श उदाहरण म्हणून नेहमीच ओळखले जातील. ते नेहमीच निस्वार्थी, दाता व खराखुरा परहितदक्ष म्हणून जीवन जगले.

भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात’ ट्राईब छत्री’

0
पुणे:आदिवासी जीवनशैली आणि ‘ बालमुद्रा ‘ या विषयातील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीकृष्ण परांजपे आणि सौ पूर्वा परांजपे हे ६८० भारतीय आदिवासी जमाती निर्मित कलाकुसरीच्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुण्यात ‘ट्राईब छत्री’ नावाने फ्रांचायझी आउटलेट सुरू करीत आहेत.
 पुणे महिला मंडळ, पहिला मजला, पर्वती मुख्य चौक ( पर्वती पायथा चौक )   येथे २७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता   ‘ट्राईब छत्री’  चे उद्घाटन  पूर्वांचलच्या विद्यार्थिंनींच्या हस्ते होणार आहे.   आहेत.केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया'(ट्रायफेड)  चे विभागीय व्यवस्थापक अशोक मिश्रा हे उपस्थित राहणार आहेत.
येथे या वस्तूंचे कायमस्वरूपी प्रदर्शन आणि विक्री व्यवस्था असेल . केंद्रीय आदिवासी विकास मंत्रालयाच्या मान्यतेचे अशा स्वरूपाचे हे महाराष्ट्रातील पहिले फ्रँचायझी आउटलेट असणार आहे.
कपडे,किचन मधील वस्तू,कलाकुसर आणि शोभेच्या वस्तू,शिल्पे,चित्रे ,भेट वस्तू यांचा या प्रदर्शन केंद्रात समावेश असणार आहे.
देशाच्या विविध राज्यातील आदिवासींकडून या वस्तू मागविल्या आहेत.आणि उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात सावरा, प्रधान,कोरकू, माडिया, गोंड अशा  आदिवासी जमातींचा त्यात समावेश आहे.
केंद्र शासनाच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या ‘ट्रायबल को ओपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया'(ट्रायफेड) आणि ‘ट्राइब्ज इंडिया’ च्या मान्यतेने हे केंद्र पुण्यात फ्रँचायझी आउटलेट म्हणून सुरु होत आहे.देशातील  आदिवासींच्या कलेला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांना उपजीविकेचे साधन मिळावे या हेतूने सुरु होणाऱ्या केंद्रीय आदिवासी मंत्रालयाने या केंद्राला मान्यता दिली आहे. भावी काळात आदिवासी ज्ञानविषयक हे ‘ नॉलेज सेंटर ‘ म्हणून विकसित करणार असून ‘ ट्रायबल फूड ‘ देखील उपलब्ध करून देणार असल्याचे श्रीकृष्ण परांजपे, पूर्वा परांजपे यांनी सांगितले.
पुण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची पर्वती ला भेट देण्याची सवय लक्षात घेता पर्वती पायथा येथील महिला मंडळाच्या जागेत हे केंद्र सुरु करण्यात आले असून त्याची सजावट आदिवासींमधील वारली, गोंड चित्रकारांनीच केली आहे. या केंद्राच्या डिझाईनमध्ये संतोष महाडिक ( स्मार्ट डिझाईन स्टुडिओ ) यांनी मदत केली.

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील 11 दशलक्ष ग्राहक आता होंडा दुचाकीवर

मुंबई– होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज पश्चिम भारतातील 19 वर्षांच्या कालावधीत तब्बल 11 दशलक्ष ग्राहकसंख्येचा महत्त्वाचा टप्पा पार केला.

 दर्जा आणि वेगासह पश्चिम भारतातील ग्राहकांचे समाधान

होंडा टुव्हीलर्स इंडिया हा पश्चिम भागातील पहिल्या क्रमांकाचा दुचाकी ब्रँड आहे. होंडाने आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या 14 वर्षांत 5.5 दशलक्ष ग्राहक मिळवले. त्यानंतर गेल्या केवळ चारच वर्षांत ही संख्या तिपटीने वाढवत होंडाने आणखी 5.5 दशलक्ष ग्राहक मिळवले आहेत. होंडा टुव्हीलर्स इंडिया आता गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या पश्चिम राज्यांतील 11 दशलक्ष ग्राहकांना सफरीचा आनंद देत आहे.

 होंडाच्या या महत्त्वपूर्ण कामगिरीविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष – श्री. यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, आमच्या ब्रँडवर सातत्याने प्रेम आणि विश्वासाचा वर्षाव केल्याबद्दल पश्चिम भारतातील 11 दशलक्ष ग्राहकांचे आम्ही आभारी आहोत. गेल्या इतक्या वर्षांत ग्राहकांना होंडाप्रती वाटणारा विश्वास मोठ्या प्रमाणात वाढला असून होंडा जॉय क्लब या 100 टक्के डिजिटल लॉयल्टी प्रोग्रॅमच्या माध्यमातून आम्ही ग्राहकांना आणखी आनंद देत आहोत. या उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या भागिदारींद्वारे होंडा करन्सी विविध टचपॉइंट्समध्ये वापरण्यासाठी भरपूर पर्याय दिले जातात.

गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा ही तीन राज्ये देशातील एकूण दुचाकी विक्रीमध्ये 15 टक्के योगदान देतात. बाजारपेठेतील 40 टक्के हिश्श्यासह होंडा आर्थिक वर्ष 2015 पासून पश्चिम भारतात आघाडीचे स्थान राखून आहे.

 पश्चिम भागातील समाजाप्रती होंडाची बांधिलकी

होंडाने विथलापूर, गुजरात येथे (2016 मध्ये) चौथा कारखाना उभारला असून त्याची वार्षिक क्षमता 1.2 दशलक्ष युनिट्स आहे.

 व्यवसायापेक्षाही होंडाला समाजाला आपलीशी वाटणारी कंपनी बनण्याची आकांक्षा असून कंपनीने आतापर्यंत पश्चिम भागात ग्रामीण शिक्षण, महिला सबलीकरण, आरोग्यसेवा, रस्ते सुरक्षा आणि समाज विकास उपक्रमांद्वारे 5.1 लाख नागरिकांचे हित साधले आहे. होंडाने पश्चिम भारतात सात कौशल्य विकास केंद्रे (आयटीआय) दत्तक घेतली असून त्याद्वारे नाशिक, पालघर, धुळे, पुणे, राजकोट, गांधीनगर आणि अहमदाबाद येथील तरुणांना नोकरीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवली जातात. रस्ता सुरक्षेचा प्रचार करण्यासाठी होंडाने महाराष्ट्रात दोन ट्रॅफिक प्रशिक्षण पार्क्स उभारली आहेत. (येवले आणि ठाणे)

 *एसआयएएमचा राज्यानुसार अहवाल (आर्थिक वर्ष 2015- आर्थिक वर्ष 2019)

आजपासून पुन्हा सुरू होणार महिनाभरापासून बंद असलेली केंब्रिज शाळा

0

मुंबई : महिनाभरापासून बंद असलेली पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध मुंबई केंब्रिज इंटरनॅशनल शाळा शुक्रवारपासून पुन्हा सुरू होणार. अंधेरी पूर्व येथे असलेल्या या शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालकांच्या प्रचंड गर्दीत आणि शाळेच्या व्यवस्थापकांच्या उपस्थित मुंबई भाजप अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज ही घोषणा केली. महापालिकेच्या उच्च अधिकाऱ्यांशी संवाद साधून आमदार लोढा यांनी तात्काळ शाळेचे पाणी आणि विद्युत पुरवठा पुन्हा सुरू करण्याची कारवाई केली. भाजप अध्यक्ष लोढा यांच्यासह यावेळी शाळेच्या परिसरात स्थानिक आमदार पराग अलवणी, भाजपचे महामंत्री अमरजीत मिश्र, नगरसेवक सुनील यादव तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अंधेरी येथील जे बी नगर येथे असलेली केंब्रिज इंटरनॅशनल शाळा गेल्या महिनाभरापासून बंद असून, महिन्याभरापासून त्रस्त असलेले विद्यार्थी व पालकांनी येथे गुरुवारी सकाळपासूनच मोठी गर्दी केली होती. ही शाळा पुन्हा सुरू व्हावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून केली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने शाळेचा विद्युतप्रवाह खंडित करून पाणीपुरवठा देखील थांबला होता. यामुळे निराश असलेले शाळेचे व्यवस्थापक आणि महानगरपालिका यांच्या तर्फे दाखवण्यात येणारा असहयोग पाहता शाळा पुन्हा सुरू होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. यावेळी आंदोलनात सहभागी झालेला काही लोकांनी मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार लोढा यांना संपर्क करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आमदार लोढा यांनी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन भविष्यात विद्यार्थ्यांना होणारे नुकसान त्वरित थांबवण्यात करिता शाळेचे विद्युत व पाणी पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यासाठी दबाव निर्माण केला. शुक्रवारपासून शाळा पुन्हा सुरू होण्याच्या बातमीने शाळा व्यवस्थापक संतुष्ट असून, हजारो विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महिनाभरापासून बंद असलेल्या मुंबई केंब्रिज इंटरनॅशनल शाळा शुक्रवारी पुन्हा सुरू होण्याच्या घोषणेने महिनाभरापासून त्रस्त असलेले विद्यार्थी आणि पालकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी शाळा व्यवस्थापक आणि पालकांनी भाजपाध्यक्ष लोढा आणि आमदार अलवणी यांचे आभार व्यक्त केले. शाळेच्या परिसरात जमलेल्या शेकडो पालकांनी शाळा सुरू होण्याच्या घोषणेचे टाळ्या वाजवून स्वागत केले.

जानेवारी पासून पुण्यात बहुसंख्य रस्त्यांवर पे अँड पार्क

0
  • पुणे- विधानसभा निवडणुका होईपर्यंत जनतेवर कोणताही भार टाकणाऱ्या योजना राबवू नयेत असे स्पष्ट आदेश राज्य सरकारमधील बड्या ह्स्तीने  दिल्याने आता पुण्यातील बहुसंख्य रस्त्यांवर सर्व प्रकरची वाहने पार्क करण्यास शुल्क आकारण्याची तयारी महापालिका प्रशासन जानेवारी पासून सुरु करेल असे संकेत मिळत आहेत .

वादातीत झालेल्या पे अ‍ॅन्ड पार्क’ धोरणाला महापालिकेच्या मुख्य सभेची अल्पांशी मान्यता मिळाली असली तरी अद्याप त्याचीहि  अंमलबजावणी सुरु झालेली नाही. विधानसभेच्या निवडणुकांमुळे सत्ताधारी मंडळीही धोरणाच्या अंमलबजावणीसाठी धजावत नाहीत. त्यामुळे ही योजना गुंडाळली जाते आहे असे भासविण्यात येते  आहे. प्रशासनाने वाहतूककोंडीवर उपाय काढण्याच्या नावाखाली  आणि रस्त्यावरील वाहनांच्या संख्येला आवर घालण्याच्या नावाखाली  वाहन चालकांना विविध मार्गे कसा त्रास देता येईल  यासाठी हेल्मेट सक्ती ,वाहनचालकांवर कडक कारवाई अशी धोरणे यापुढे कडक स्वरूपात राबविण्याचे सरकारचे धोरण आहे.

तत्कालीन आयुक्त कुणाल कुमार यांनी आखलेल्या या धोरणाला सुरुवातीला विरोध झाला. परंतू, प्रशासनाने पदाधिकारी आणि नगरसेवकांची संमती मिळवलीच. धोरणाला मुख्य सभेची मान्यताही मिळालेली आहे. परंतू, अंमलबजावणीच न झाल्याने केवळ कागद रंगविण्याचे काम प्रशासनाने केले की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पाच रस्ते निवडण्यात आले. या रस्त्यांवर पे अ‍ॅन्ड पार्क योजना राबविण्यात येणार होती. परंतू, हे पाच रस्ते नेमके कोणते असावेत याबाबत प्रशासनालाच अद्याप निर्णय घेता आलेला नाही. नागरिकांकडून रस्त्यावर पार्किंगसाठी पैसे द्यायला विरोध होऊ शकतो, दरावरुन तसेच पार्किंग ठेकेदारांकडून चांगली वागणूक न मिळाल्यास वाद उद्भवू शकतात अशा अनेक शक्यतांचाही विचार सत्ताधारी करीत आहेत. त्यातच विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. त्यामुळे तुर्तास ही योजना राबविण्यास सत्ताधारीही फारसे उत्सुक नाहीत.

राष्ट्रवादी फोडणार नाही मात्र शिवसेना वाढवणार-सचिन अहिर

0

मुंबई-बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे हे आता आमचं स्वप्न आहे असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याचवेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे. सचिन अहिर यांचं उद्धव ठाकरेंनी स्वागत केलं. राजकारण हे राजकारणासारखं करावं लागतं. पक्ष फोडणं ही शिवसेनेची वृत्ती नाही, आम्ही आमच्या कामाने शिवसेना वाढवली आहे. मला फोडलेली माणसं नकोत, मनं जिंकलेली माणसं हवी आहेत.

सचिन अहिर यांच्या रुपाने एक चांगला नेता शिवसेनेला मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सचिन अहिर हे राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे. बुधवारीच त्यांनी त्यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आणि मला पुढेही अशीच साथ द्या असे म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून सचिन अहिर शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घर आणि कारखान्यावर आयकर विभागाचा छापा

0

पुणे-: राष्ट्रवादीचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानासह साखर कारखान्यावर गुरुवार (25 जुलै) रोजी आयकर विभागाने छापा टाकला. या छाप्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आयकर विभागाच्या या छाप्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने हसन यांच्यासह त्यांच्या पुण्यात राहणाऱ्या मुलाच्या घरावर व टाकाळा परिसरात राहणाऱ्या साडूच्या घरावरही छापा टाकला आहे.

हसन मुश्रीफ हे कोल्हापुरातील कागल मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यामान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा मुस्लीम चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही ते निवडून आले होते. हसन मुश्रीफ शरद पवार यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जातात.

दरम्यान या कारवाईमागे भाजपची राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही दिवसापासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसुलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना भाजप प्रवेशासाठी खुले आव्हान दिल्याचे पहायला मिळत होते. कदाचित मुश्रीफ यांनी ही ऑफर नाकारल्याच्या शक्यतेने त्यांच्यावर सुडाचे राजकारण केले जात असल्याची राजकीय चर्चा जोर धरू लागली आहे.

… मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। सचिन अहिरांवर नवाब मलिक यांची टीका

0
मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं। सचिन अहिरांवर नवाब मलिक यांची टीका
मुंबई:‘प्रवाहाविरोधात लढण्याची हिंमत ज्याच्याकडे असते, तो कोणत्याही परिस्थितीत ठामपणे उभा राहतो. ज्याच्याकडं ती हिंमत नसते तो प्रवाहाबरोबर वाहून जातो,’ अशी तिखट प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरावर प्रतिक्रिया देताना मलिक बोलत होते. ‘अहिर यांना पक्षानं १५ वर्षे लाल दिवा दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली. त्यांचा हा निर्णय अत्यंत दु:खद आहे,’ असं मलिक म्हणाले. ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी पक्षासोबतच आहेत. कुणीही अहिर यांच्यासोबत गेलेलं नाही. मुळात त्यांची ताकदच तेवढी नव्हती. तसं असतं तर ते प्रवाहाविरुद्ध पोहले असते. एखादी जबाबदारी झेपत नव्हती तर त्यांनी पक्षाला तसं सांगायला हवं होतं,’ असं मलिक म्हणाले.
अहिर यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला धक्का वगैरे अजिबात बसलेला नाही. शिवसेना व भाजप वाढत असल्याचा भ्रम आहे. पुढच्या निवडणुकीत मुंबईत आम्ही त्यांचा पराभव करू,’ असा विश्वाही मलिक यांनी बोलून दाखवला. अहिर यांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर मलिक यांनी एका हिंदी कवितेच्या ओळीही ट्विट केल्या आहेत. ते ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

आंदोलनाच्या तयारीत धनगर समाज (लेखक -संजय सोनवणी)

0

धनगरांना आदिवासी दर्जा न देता आदिवासींच्या (आरक्षणाव्यतिरिक्तच्या) सवलती लागू करण्याची पोकळ घोषणा काय किंवा बजेटमध्ये हजार कोटींची तरतूद करण्याची शिफारस काय, धनगरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे.

“आता नाही तर कधीच नाही!” असे घोषवाक्य घेत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाने रणशिंग फुंकले आहे. राज्यात सर्वत्र बैठका होत आणि आंदोलनाची दिशा ठरवली जात आहे. २०१४ साली लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर धनगर समाजाने बारामती येथे महा-आंदोलन केले होते. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी समाजाला आश्वासन दिले. देवेंद्र फडणवीस यांनी आपण पहिल्या कॅबिनेट बैठकीत आपण धनगर आरक्षणाचा प्रश्न निकालात काढू असे आश्वासन दिले. पुढे कसलाही संवैधानिक दर्जा नसलेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सला धनगर आदिवासी आहेत की नाही हे तपासून पाहण्याचे व अहवाल सादर करायचे काम दिले. खरे म्हणजे राज्य सरकारनेच धनगर समाजाला भटक्या जमातीचा, म्हणजे नोमॅडिक ट्राईबचा आणि म्हणजेच भटके आदिवासी म्हणून मान्यता दिली आहे हे सरकार विसरले. असे असतांना पुन्हा धनगरांची ओळख तपासून पाहण्याची आवश्यकता नव्हती. तरीही अहवाल मागितला गेला. तो सादरही झाला. पण तो अद्याप पटलावर आणला गेलेला नाही. किंबहुना धनगरांचा कोणताही प्रश्न सोडवायचाच नाही याच दिशेने राज्य व केंद्र सरकारची पावले पडलेली आहेत असे दिसून येईल.

मराठ्यांचा प्रश्न मात्र सरकारने तातडीने मार्गी लावला. कायदाही केला. केंद्र सरकारने उच्चवर्णीय पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळांना न मागताही घटनेत बदल करून दहा टक्के आरक्षणाची तरतूद केली. म्हणजे राजकीय व सामाजिक दृष्ट्या बलाढ्यांचे प्रश्न सोडवण्यात सरकारला रुची आहे पण मेंढपाळासारख्या आदिम व्यवसायावर जगण्याऱ्या आणि राजकीयदृष्ट्या पूर्ण असंघटित आणि पिछाडीवर असलेल्या धनगर समाजाकडे ढुंकुनही पहायला सरकारकडे वेळ नाही असे चित्र निर्माण झालेले असल्याने धनगर समाजात मोठी खदखद आहेच. आणि ती आता राज्यव्यापी आंदोलनातून बाहेर पडेल अशी चिन्हे दिसत आहेत.

खरे तर हा प्रश्न धनगरांचे अज्ञान आणि सर्व सरकारांची बनचुकेगिरी यामुळे निर्माण झालेला आहे. खरे तर याबाबत पूर्वीच हालचाली झाल्या होत्या कारण अनुसूचित जमातींच्या यादीत झालेली एक भाषिक चूक. ‘र’ या शब्दाचा उच्चार इंग्रजीत अनेकदा ‘ड’ असा केला जातो. उदा. ‘बोरो’ जमात ‘बोडो’ म्हणून उल्लेखली जाते तर ‘जाखर’चे ‘जाखड’ असे स्पेलिंग केले जाते. महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींमध्ये ‘ओरांव’ व ‘धनगड’ यांचा समावेश केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ‘ओरांव’ जमातीचे फक्त एक कुटुंब १९९१च्या जनगणनेत नोंदले आहे तर “धनगड’ असे उच्चारली जाणारी/म्हणवणारी एकही जात-जमात महाराष्ट्रात नाही. तरीही ‘धनगड’ व ‘धनगर’ या वेगळ्या पृथक अशा जमाती आहेत असाच घोषा महाराष्ट्र सरकारने राज्याच्या स्थापनेपासून लावलेला आहे. ‘ओरांव’ (अथवा ओरान) समाजातील धान्याच्या शेतीवर काम करणाऱ्या समाजांना कधीकही “धांगड’ असेही म्हटले जाते. इंग्रजीत ‘धांगड’ व ‘धनगड’चे स्पेलिंग एकच होत असल्याने आम्हाला “धांगड’ अभिप्रेत आहेत, ‘धनगड’ किंवा ‘धनगर’ नाही असला अजब युक्तिवाद शासनाने केला. खरे तर ‘ओरान’ लोकांना आपल्याला “धांगड’ म्हटलेले आवडत नाही. या नावाची कोणतीही जात-जमात देशात अस्तित्वात नाही. अनुसूचित जमातींच्या यादीत ‘ओरांव’, ‘धनगड’ अशी नोंद आहे, ‘ओरान’ किंवा ‘धनगड’ अशी नाही. म्हणजेच ‘ओरान’पेक्षा वेगळी जमात अभिप्रेत आहे हे उघड आहे. आणि केंद्राला याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा प्रयत्नही केला. १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या ‘Bibliography on SC and ST and marginal tribes’ (पृष्ठ क्र. २९४) वर ‘धनगर’ (धनगड नव्हे) ही अनुसूचित जमात आहे असे प्रसिद्ध केलेले आहे. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीतही अशीच नोंद आहे. याचीही दखल राज्य सरकारने घेतलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने जनतेचा दबाव वाढल्यावर केंद्र सरकारला २६ मार्च १९७८ रोजी शिफारस केली होती की धनगरांचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करावा. पण गंमत अशी की, ९-२-८१ रोजी केंद्र सरकारने या संदर्भात आपल्या राज्य सरकारला पत्र लिहिले की ७-३-८१ पूर्वी याबाबत आपले म्हणणे मांडा पण महाराष्ट्र सरकारने उत्तरच दिले नाही. उलट ६-११-८१ रोजी महाराष्ट्र सरकारने आपला मुळ प्रस्तावच मागे घेतला. त्यामागील एकही कारण आजतागायत महाराष्ट्र सरकारने दिलेले नाही.२००२ मधे ‘The Scheduled Castes and Scheduled Tribes Orders (Second Amendment) Bill’ आले. या बिलानुसार समान व्यवसाय पण जमात-जातीनामे वेगळी यांचा समावेश करण्याची तरतूद होती. तसे अनेक जमातींबाबत झालेही. महाराष्ट्र सरकारने मात्र आपला हट्ट सोडला नाही. ‘धनगड’ व ‘धनगर’ या वेगळ्या पूर्णतया स्वतंत्र जमाती आहेत अशीच भूमिका रेटली. त्यामुळे ‘Standing Committee on labour and Welfare’ ने ताशेरा ओढला की महाराष्ट्र सरकारने सुधारीत अनुसूचित जमातींच्या यादीत धनगरांचा समावेश करावा, अशी शिफारसच केली नसल्याने त्यांचा समावेश सुधारीत यादीत झालेला नाही.

दुसरी दुदैवी बाब अशी की महाराष्ट्र सरकारने व्हीजे/एनटी अशी वेगळीच वर्गवारी निर्माण करून विमुक्त व भटक्या जमातींना ओबीसीअंतर्गत आरक्षण दिले. खरे तर संपूर्ण देशात अशी वर्गवारी कोठेही नाही. ते एकतर अनुसुचित जाती किंवा जमातींतच गृहित धरलेले आहेत. ए. के. मोहंती या मानववंश शास्त्रज्ञाने म्हटले आहे की भटक्या आणि विमुक्त जमातींची अवस्था डोंगरदऱ्यातील स्थिर आदिवासींपेक्षाही भयानक असतांना महाराष्ट्र शासनाने त्यांचा समावेश अनुसुचित जमातीत न करून देशातले एकमेव बौद्धिक मागास राज्य असल्याचे सिद्ध केले आहे.

वरील अल्प विवेचनावरून लक्षात येईल की ‘धनगरां’चा समवेश अनुसूचित जमातींमध्येच केला गेलेला आहे. ‘ओरान’ आणि ‘धनगड’ एक नव्हेत तर पृथक जमाती आहेत. शिवाय ‘ओरानां’चे अस्तित्व महाराष्ट्रात नाममात्र आहे. म्हणजेच महाराष्ट्र शासनाने ‘धनगर’ हेच ‘धनगड’ म्हणून नोंदले गेले आहेत हे गृहित धरून अध्यादेशाद्वारे ‘धनगरां’ना अनुसूचित जमातींचे आरक्षण लागू करायला हवे होते. पण तसे का झाले नाही याचीही राजकीय कारणे आहेत.

‘धनगर’ समाज लोकसंख्येने मोठा असल्याने त्यांना अनुसूचित जमातींचे अारक्षण लागू झाले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलतील याचे भय उच्चवर्णीय जातींना आहे. दुसरे असे की सध्याचे स्थिर आदिवासी धनगरांच्या एसटीतील समावेशाला विरोध करत आहेत. त्यांनाही आपल्यात कोणी वाटेकरू नको आहे. त्यांना दुखावण्याची राजकीय इच्छाशक्ती नसलेले नेतृत्व आता चूक मान्य करून धनगरांशी न्याय करण्याच्या मानसिकतेत नाही. खरे तर हा प्रश्न सामाजिक न्यायाचाही आहे त्यामुळे “अमच्यात वाटेकरू नको’ ही भूमिका कितपत न्याय्य आहे? पण धनगरांना आदिवासी दर्जा न देता आदिवासींच्या (आरक्षणाव्यतिरिक्तच्या) सवलती लागू करण्याची पोकळ घोषणा काय किंवा बजेटमध्ये हजार कोटींची तरतूद करण्याची शिफारस काय, धनगरांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. याबाबत निषेधाचा जेवढ्या सूर उमटायला हवा होता तेवढा उमटलेला नाही.

याचे कारण म्हणजे धनगरांकडे एकजिनसी सर्वमान्य नेतृत्व नाही. राजकीय व आर्थिक तत्वज्ञानाचा अभाव आहे. धनगरांचे अनेक नेते असून त्यांचे गट-तट व प्रश्नांबाबतची सखोल जाणीव नसणे हा एक मोठा दोष आहे. उच्च वर्गांमध्ये जेवढी राजकीय व सामाजिक जाणीव तीव्र आहे तेवढी धनगरांमध्ये अजून विकसित झालेली नाही. आणि याची कारणेच मुळात ते मुख्य समाजधारेपासून आपल्या भटक्या व्यवसायामुळे तुटक राहण्यात आहेत. त्यामुळे त्यांची मागणी न्याय्य असली तरी भाबडेपणा व अतिभावनिकतेच्या आहारी गेल्याने दिली जाणारी आश्वासने मुळात राज्य सरकार कशी पूर्ण करणार आणि करत नसल्यास कशी पूर्ण करून घ्यावी याची ठोस आखणी त्यांच्याकडे नाही.

धनगर समाजातील काही सुजाण नेत्यांनी उच्च न्यायालयाचाही दरवाजा ठोठावला असला तरी तारखांवर तारखांतच ते घोळवले जात आहेत. अन्य समाजांबाबत असे चित्र दिसलेले नाही. म्हणजेच न्यायव्यवस्थेने आणि सरकारने दुर्बल घटकांबद्दल, राजकीय लाभ-हानी न पाहता न्याय्य भूमिका घेण्याची स्थिती नाही. प्रत्येक न्याय्य गोष्टही लढूनच प्राप्त करावी हे आपल्या लोकशाहीचे मुलभूत वैशिष्ट्य झाले आहे. आता तरी या नव्या लढ्यातून किमान आपल्या मागणीत एकवाक्यता आणत घटनात्मक व्यवस्थेने त्यांची जी ओळख दिली आहे ती मिळवण्यात धनगर समाज यशस्वी व्हावा अशी अपेक्षा जात-जमातीच्या भेदात न पडता सरकारकडून करणे गैर नाही, पण ती वांझच अपेक्षा ठरण्याचीच शक्यता अधिक!

पण धनगर समाजातल्या या खदखदीतून या समाजात राजकीय व सामाजिक प्रामाणिक नेतृत्व तरी उभे राहील आणि आज ना उद्या त्यांचा घटनात्मक अधिकार त्यांना मिळेल अशी अपेक्षा मात्र नक्कीच आहे!

संजय सोनवणी, लेखक आणि संशोधक आहेत.

ब्रिटनच्या गृहमंत्रीपदी गुजराती महिला प्रीती पटेल

0

नवी दिल्ली -ब्रिटनचे माजी परराष्ट्र मंत्री आणि लंडनचे माजी महापौर बोरिस जॉन्सन ब्रिटन यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. माजी पंतप्रधान थेरेसा मे यांनी राजीनामा दिल्यानंतर बोरिस जॉन्सन हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. बोरिस यांच्या मंत्रीमंडळाचीही घोषणा झाली असून त्यामध्ये एका भारतीय वंशाच्या महिलेचा समावेश आहे. बोरिस यांच्या मंत्रीमंडळात प्रीती पटेल यांना गृहमंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. गृहमंत्री पदी विराजमान होणाऱ्या पटेल या भारतीय वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. विशेष म्हणजे पटेल यांच्या नियुक्तीमुळे ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच एक गुजराती व्यक्ती गृहमंत्री झाली आहे.

ब्रेग्झिटवरुन ब्रिटन सरकारवर उघडपणे टिका करणाऱ्या पटेल या बोरिस यांच्या समर्थक आहेत. पटेल या कंझर्वेटीव्ह पक्षाच्या ‘बॅक बोरिस’ मोहिमेच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होत्या. बोरिस यांना पाठिंबा देणाऱ्या पटेल यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. ‘नवे मंत्रीमंडळ हे आधुनिक ब्रिटन आणि कंझर्वेटीव्ह पक्षाच्या आधुनिक धोरणांचा पुरस्कार करणारे असावे,’ असं मत पटेल यांनी मंत्रिमंडळाची घोषणा होण्याच्या काही तास आधी केली होती. मूळच्या गुजराती असणाऱ्या पटेल या ब्रिटनमधील भारतीयांमध्ये लोकप्रिय आहेत. भारतीयांनी आयोजित केलेल्या अनेक कार्यक्रमांना पटेल आवर्जून उपस्थित राहतात. पटेल या भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठ्या समर्थक आहेत.

नियुक्तीनंतर प्रीति पटेल म्हणाल्या…

प्रीति यांनी गृहमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. ‘मी ब्रिटनला, ब्रिटनमधील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारीविरुद्ध लढण्यासाठी मला शक्य होईल ते सर्व काही करेन. पुढील आव्हानांची मी वाट पाहत असून गृहमंत्री म्हणून काम करण्यास तयार आहे,’ असे मत प्रीति यांनी व्यक्त केले आहे.

४७ वर्षीय प्रीति यांनी पहिल्यांदा २०१० मध्ये एसेक्स मधील विथम येथून कंझर्वेटीव्ह पक्षाच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडूण आल्या. त्या २०१४ साली पटेल यांनी ज्युनियर मिनिस्ट्रीयल आणि ट्रेजरी मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. २०१५ च्या सर्वाजनिक निवडणुकीनंतर पटेल यांच्या खांद्यावर कामगार मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर २०१६ साली त्यांना ‘डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ विभागामध्ये राज्य सचिव पदावर नियुक्त करण्यात आले होते.

भारत आणि ब्रिटन संबंधांबद्दल म्हणाल्या…

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘कंझर्वेटीव्ह पक्षाचे नेतृत्व करणारे नेते आणि ब्रिटनचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा ब्रिटनच्या सार्वभौमत्ववर विश्वास आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी ते नक्कीच नवीन दृष्टीकोन देतील’ असे मत प्रीति यांनी व्यक्त केले आहे. भारत आणि ब्रिटनमधील संबंधांबद्दल बोलताना प्रिति यांनी ‘दोन्ही देशांमधील मैत्रिपूर्ण संबंधांना एका नवीन उंचीवर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे’ असे मत व्यक्त केले.

‘शरद पवारांची साथ सोडल्याचं दुःख, बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणार’

0

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीच्या तोंडावर धक्का बसला आहे. कारण राष्ट्रवादीचे सचिन अहिर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सचिन अहिर यांनी स्वतःच प्रसारमाध्यमांना दिली आहे. अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. मला शिवसेनेत जात असल्याचा आनंद होतो आहे. सकाळी ११ वाजता मातोश्री या ठिकाणी ते उपस्थित राहणार आहेत असेही त्यांनी सांगितले आहे. सचिन अहिर यांच्या या निर्णयामुळे मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसेनेचे बळ वाढले आहे.

मी गेल्या आठवड्यात शरद पवार यांना फोन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांचे जे स्थान आहे ते माझ्या हृदयात कायम राहणार आहे. मात्र अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात असे अहिर यांनी म्हटले आहे. तसेच आदित्य ठाकरे यांच्या कामामुळे प्रभावित झालो आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

बुधवारी सचिन अहिर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मला तुमची कायम साथ लाभली आहे अशीच साथ पुढे कायम ठेवा. यापुढे आपल्याला अधिक ताकदीने लढायचे आहे असे म्हणत सचिन अहिर यांनी कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. तसेच रात्रीच्या सुमारास त्यांच्या स्वीय सचिवांनी सगळ्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अकरा वाजता मातोश्री या उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थांनी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या सगळ्या घडामोडींमुळे सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित आहे. सचिन अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील चेहरा मानला जात होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसाठी तो मोठा धक्का मानला जातो आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहिर यांना रोखण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र ते अयशस्वी ठरले आहेत. सचिन अहिर हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार ही अफवा असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. मात्र सचिन अहिर आता शिवसेनेत जाणार हे स्पष्ट झाले आहे.

मी शिवसेनेत जाणार ही निव्वळ अफवा: भुजबळ

0

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवनेनेत जाणार या वृत्ताचा खुद्द भुजबळ यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. आपण शिवबंधन बांधून घेणार नसून आपल्या मनगटावर घड्याळच राहील असे सांगत शिवसेना प्रवेशाची चर्चा ही निव्वळ अफवा असल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.अनेक वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त आज सकाळपासून प्रसारित करण्यास सुरुवात केली. मात्र भुजबळांनी हे वृत्त अफवा असल्याचे म्हणत या चर्चेला पूर्णविराम दिला.

आज ११ वाजता गुजरातसह समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणाऱ्या राज्यातील पहिल्या प्रकल्पाचे उद्घाटन नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील देवसाने येथे माझ्याच हस्ते होत आहे. आपण या कार्यक्रमात गुंतलेलो असून माझ्या शिवसेना प्रवेशाबाबतच्या चर्चेच काहीएक तथ्य नाही असे भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

कृत्रिम पाऊस यंत्रणेसाठी १०० कोटी लागले तरी देऊ – कृषिमंत्र्यांचा निर्धार

0
पुणे – शेतकऱ्यांवरील संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी कृत्रिम पावसाच्या प्रणालीवर १०० कोटी खर्च झाले तरी सरकार मागे-पुढे पाहणार नाही, असा निर्धार कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

कृषिमंत्री पुढे म्हणाले, कृत्रिम पावसाच्या प्रणालीत ४० ते ४५ टक्के यश मिळण्याची शक्यता असते. गारपिटीसारखे नैसर्गिक संकट टाळण्यासाठीही ही यंत्रणा कायमस्वरूपी राबणार आहे. सोलापूर, औरंगाबाद, नागपूर येथे कृत्रिम पावसाची रडार यंत्रणा बसवली आहे. त्याद्वारे ४०० किमी परिघामध्ये पाऊस देऊ शकतील असे ढग दिसताच विमानातून फवारणी केली जाईल. त्यामुळे आसपासच्या जिल्ह्यांना कृत्रिम पावसाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण मराठवाडा व विदर्भात कृत्रिम पाऊस पडू शकतो. त्यातून संभाव्य दुष्काळी परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न राहील, असे बोंडे म्हणाले.

उत्पादन खर्च कमी करण्यासाठी झीरो बजेट शेती : उत्पन्न वाढवण्यासाठी उत्पादन खर्च कमी करावा लागेल. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी झीरो बजेट शेतीसारखे प्रयोग राबवण्यासाठी सरकार अग्रेसर असून डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनसाठी १०० कोटी राखून ठेवले आहेत. रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या अन्नधान्यांच्या तुलनेत सेंद्रिय अथवा जैविक पद्धतीने पिकवलेल्यास दीडपट जास्त भाव मिळतो. त्यासाठीही प्रयत्न केले जातील, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुबार पेरणी करावी लागल्यास योजना तयार
राज्यातील मराठवाडा, विदर्भातील १६ जिल्ह्यांत पावसाने सरासरी न गाठल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. दुबार पेरणीसाठी १ लाख क्विंटल खरीप पिकांचे बियाणे तयार आहेत. जुलैअखेर व आॅगस्टमध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यास अडीच ते चार महिन्यांत घेता येतील, अशी ज्वारी, बाजरी इत्यादी पिके घेता येतील, असे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

ढग दिसताच फवारणी
सोलापूर, औरंगाबाद आणि नागपुरात कृत्रिम पावसाची रडार यंत्रणा तयार असून ढग दिसताच विमानाद्वारे रसायनांची फवारणी केली जाईल, असे बोंडे म्हणाले.

पीक विम्यासाठी आणेवारीच्या नियमात बदल करण्याची केंद्राकडे शिफारस
राज्य सरकारकडे पीक विमा योजनेविषयी आलेल्या सूचनांचा विचार करून योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बनवता येईल. ५० टक्के आणेवारीच्या नियमात बदल करावा तसेच जोखीम स्तर ८० टक्क्यांवर नेण्याच्या नियमात बदल करण्यासाठी केंद्राला शिफारस केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणीनंतर अथवा उभे पीक तसेच सुगीनंतरच्या नुकसानीत ४८ तासांच्या आत कंपन्यांना कळवण्याच्या नियमात शिथिलता आणून जिल्हा व तालुकास्तरीय समितीने कंपन्यांना कळवले तरी चालेल. समित्यांत २ शेतकरी प्रतिनिधी असतील, असेही ते म्हणाले.

रशियाची एनएलएमके कंपनी राज्यात 800 कोटींची गुंतवणूक करणार

0

मुंबई : रशियामधील सर्वात मोठी स्टील कंपनी नोव्होलिपटेस्क स्टिल (एनएलएमके) महाराष्ट्रात सुमारे आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यासाठी कंपनीच्या वरिष्ठ संचालकांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रशियाचे वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह उपस्थित होते.

इलेक्ट्रिक स्टील निर्मितीसाठी एनएलएमके कंपनीची जगभर ओळख असून ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडॉर)शेंद्रा किंवा बिडकीनमध्ये या कंपनीने प्रकल्पासाठी जागा पाहिली असून ती देण्याची तयारी शासनाने दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात आठशे कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 2022 मध्ये दुसऱ्या टप्प्याला सुरूवात होईल. त्यावेळी सुमारे सहा हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

औरंगाबादच्या ‘ऑरिक’मध्ये (औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी) हा प्रकल्प होणार असून प्रकल्प सुरू करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कंपनीचे प्रतिनिधी प्रयत्नशील आहेत. कंपनीच्या प्रतिनिधींनी आतापर्यंत तीन वेळा वरील जागेची पाहणी केली असून संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर लवकरच कंपनीच्या कामाला सुरुवात होणार आहे.

कंपनीच्या वरिष्ठ संचालकांसह रशियाचे मुंबईतील वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह यांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन प्रस्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. तसेच शासनाच्या विविध विभागाकडून कंपनीच्या नियोजित प्रकल्पास सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी मागणी शिष्टमंडळाने श्री. देसाई यांच्याकडे केली. दरम्यान, या कंपनीमुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होण्यास मदत होणार असून अनेकांना रोजगार मिळणार आहे, त्यामुळे या कंपनीला शासन स्तरावर सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.

भारतात मागील तीस वर्षांत वीजेची मागणी अत्यंत वेगाने वाढलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक सबस्टेशनची गरज तीस पटींनी वाढलेली आहे. वीज वहन व ट्रान्सफॉर्मरसाठी लागणारे विशेष दर्जाचे स्टील एनएलएमके कंपनी तयार करते. एनएलएमके सध्या भारताला 20 टक्के ट्रान्सफॉर्मर स्टील पुरवत आहे. ही कंपनी महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत स्टील उपलब्ध होणार आहे, अशी माहिती यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी सादरीकरणाद्वारे दिली.

यावेळी डीएमआयसीचे संचालक गजानन पाटील, एनएलएमके कंपनीचे संचालक व्ही. शेव्हलेव्ह, ए. काव्होसीन, कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह, आदी उपस्थित होते.