Home Blog Page 2885

संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची नियुक्ती

0

पुणे: संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी खासदार गिरीश बापट यांची आज नियुक्ती करण्यात आली. लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला यांनी त्यांची नियुक्ती केली. या समिती मध्ये लोकसभेमधील ३० सदस्य असणार आहेत.

अर्थमंत्री अंदाजपत्रक मांडत असतात, या अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट केलेल्या अंदाजाची चिकित्सा करणे,शासनाच्या खर्चात काटकसर सुचवून शासकीय धोरणात आणि प्रशासकीय व्यवस्थेत कार्यक्षमता कशी वाढेल या दृष्टीने मार्गदर्शनपर सूचना करणे या सारखी कामे या समितीला करावी लागतात. ही समिती शासकीय धोरणानुसार व योजनांनुसार व अंदाजपत्रकात नमूद केल्याप्रमाणे निधीवाटप केला आहे की नाही याबबत पडताळणी करते. या समितीने केलेल्या शिफारशी स्वीकारण्याचे लोकसभेला बंधनकारक नसल्या तरी समितीच्या सूचना व शिफारशी या मार्गदर्शनपर असतात. समितीच्या स्थापने पासून अनेकदा  या समितीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. या पूर्वी मुरली मनोहर जोशी यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्याने या समिती मध्ये काम केले आहे.

धर्मेंद्रकुमार कश्यप, मोहनभाई कुंडारिया, दयानिधि मारण, के. मुरलीधरन, एस. एस.पलानीमणीक्कम , कमलेश पासवान, के. सी. पटेल, राजवर्धन सिंग राठोड, विनायक राऊत, अशोककुमार रावत, मागुंटा श्रीनिवासुलू रेड्डी, राजीव प्रताप रुडी, फ्रांसिस्को सरडिन्हा, जुगल किशोर शर्मा, धरमवीर सिंग, संगीता कुमारी सिंग देव, केसीनेनी श्रीनिवास, सुनील तटकरे ,प्रवेश साहिब सिंह वर्मा हे या समितीच्या सदस्यपदी असणार आहेत.

 

ग्रामीण भागात ‘इनोव्हेशन’ला अधिक वाव -डॉ. अभय जेरे

0
पुणे : “विद्यार्थ्यांमधील नावीन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ अनेक उपक्रम हाती घेत असून, इनोव्हेशन पॉलिसी तयार करीत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, आवश्यक संसाधनांअभावी त्यांना पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे इनोव्हेशनला अधिक वाव असलेल्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून देण्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहोत. सर्व विद्यापीठात आणि महाविद्यालयात इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशीप, ‘स्टार्ट अप’ सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहोत,” असे प्रतिपादन मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी केले.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय (एमएचआरडी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण मंडळ (एआयसीटीई) यांच्या सहकार्याने दिघी येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये (एआयटी) आयोजित नवकल्पनांच्या आढाव्यासाठी (प्रुफ ऑफ कॉन्सेप्ट) ‘एमएचआरडी-एआयसीटीई रिजनल मेन्टॉरिंग’ कार्यक्रमावेळी डॉ. अभय जेरे बोलत होते. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल 2.0’ आणि ‘अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) 2020’ या विषयावर मार्गदर्शन सत्रे झाली. यावेळी ‘एआयसीटीई’ स्टार्टअप कमिटीचे चेअरमन संजय इनामदार, उपसंचालक डॉ. मधुकर वावरे, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर (निवृत्त) अभय भट, कौन्सिलचे राष्ट्रीय समन्वयक दिपान साहू, विभागीय समन्वयक पंकज पांडे, मनुष्यबळ विकास मंत्रालयातील इनोव्हेशन अधिकारी सरिम मोईन यांच्यासह एंटरप्रेन्युअरशीप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे डॉ. सत्या रंजन आचार्य आदी उपस्थित होते.
डॉ. अभय जेरे म्हणाले, “आपल्याकडे अजून इनोव्हेशन संस्कृती रुजायला वेळ लागेल. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावर आम्ही विविध गोष्टी राबविण्याचा प्रयत्न करतोय. इनोव्हेशन कौन्सिलच्या माध्यमातून आम्ही देशाला उपयोगी पडतील, अशी इनोव्हेशन शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. खासगी व शासकीय संस्थांना इनोव्हेशन, संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी अटल रँकिंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स (एआरआयआयए) सारखी योजना सुरु आहे. चार-साडेचार संस्था आता इनोव्हेशन प्रक्रियेत जोडल्या गेल्या आहेत. मुलांमध्ये कौशल्य विकसित होण्याला, नवकल्पनांना प्रोत्साहन देत आहोत. डिझाईन थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंगवर काम सुरु आहे. उच्च शिक्षणात प्रात्यक्षिकाधारित अभ्यासक्रम आणण्याचा विचार सुरु आहे. आव्हाने शोधून, त्यावर उपाय शोधण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी स्मार्ट इंडिया हाकेथॉनसारखी स्पर्धा आम्ही भरवत आहोत. इसरो, आयुष, जलसंवर्धन व स्वच्छता अशा अनेक क्षेत्रात वेगवेगळी इनोव्हेशन्स होत आहेत. बौद्धिक संपदा, स्वामित्व हक्क, रेव्हेन्यू मॉडेल यावरही काम सुरु आहे.”
 
संजय इनामदार म्हणाले, “ग्रामीण भागातील नऊवारी नेसणाऱ्या महिलांमध्येही वेगळ्या कल्पना आहेत. त्यालाही चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यपाल, कुलगुरूंच्यामार्फत जवळपास १७ राज्यांमध्ये इनोव्हेशन संस्कृती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. संसाधने आणि दृष्टीकोन असे दोन आव्हाने आज आहेत. ग्रामीण भागात संसाधनांचा, तर शहरी भागात दृष्टीकोनाचे आव्हान आहे. चाकोरीबाहेर जाऊन काम करण्याचा दृष्टीकोन विकसित व्हायला हवा. भारताच्या विकासात माझे योगदान असावे, या भावनेतून विद्यार्थी आणि शिक्षकांनी काम केले पाहिजे. आज त्यापद्धतीने काम करणाऱ्या विद्यार्थ्यांची, शिक्षकांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागात इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीप विकसित होत आहे.”
ब्रिगेडियर अभय भट म्हणाले, “आर्मी इन्स्टिट्यूटमध्ये हा कार्यक्रम होत असल्याने आमच्या विद्यार्थ्यांना इनोव्हेशन, संशोधन करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आमच्याकडे अनेक विद्यार्थी उपयोजित संशोधन करताहेत. स्मार्ट हाकेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये आर्मी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. यापुढेही संस्थेत विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधन, इनोव्हेशन आणि आंत्रप्रेन्युअरशीपसाठी आम्ही प्रोत्साहन देणार आहोत.”
दिपान साहू, पंकज पांडे, सरिम मोईन, डॉ. सत्या रंजन आचार्य यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र व गोवा विभागातील १५० हून अधिक विद्यार्थी, तर १०० पेक्षा अधिक शिक्षक सहभागी झाले होते. दीपशीखा , शिवमकुमार या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले. अभय भट यांनी आभार मानले.

शिवसेनेतर्फे गोखलेनगरला आरोग्य शिबीर संपन्न

0
पुणे- शिवाजीनगर मतदार संघा मध्ये पक्षप्रमुख उद्भवसाहेब ठाकरे व माजी आमदार विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह अंतर्गत विविध ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे पहील्या आरोग्य शिबीराचे आयोजन गोखलेनगर येथे करण्यात आले याचे उद्धाटन शिवसेना शिवाजीनगर विधानसभा संपर्क प्रमुख राम क़दम यांच्या हस्ते करण्यात आले व मतदार संघ प्रमुख आनंद मांजळकर ,माजी नगरसेवक सनी निम्हण ,शहर संघटिका सविताताई मते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला सुमारे सहाशेतीस रुग्णांची तपसनी करण्यात आली चारशे पंच्याहत्तर जणांना चष्मे देण्यात आले
कार्यक्रमाचे आयोजन प्रभाग प्रमुख संजय तुरेकर व उपेश सोनावणे यांनी केले यावेळेस क्षेत्र प्रमुख उमेश वाघ, राजाभाऊ भिलारे,युवासेना विभाग अधिकारी अनिकेत कपोते ,प्रवीण डोंगरे ,हेमंत डाबी, प्रकाश धामणे ,किरण पाटील,रवी म्हस्के , सोनिया मुंडे , सीमा वरखडे, प्राजक्ता गायकवाड आदी. पदाधीकारी उपस्थित होते.दिनांक ६ ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या शिबिरात ग्लोबल हॉस्पिटल भारती हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल यांच्या मदतीने शिबिर होणार आहेत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया ईसीजी तपासणी स्त्रीरोग आदींवर मोफत उपचार होणार आहे.

अखंडित वीजपुरवठा व उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या जबाबदारीला प्राधान्य द्या -ऊर्जामंत्री

0

पुणे : गेल्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात ऊर्जा क्षेत्राचा कायापालट
करण्याचे काम प्रभावीपणे झाले आहे. महावितरणच्या माध्यमातून वीजयंत्रणेच्या
सक्षमीकरणासोबतच ग्राहकसेवा देखील पारदर्शक झाली आहे. त्यामुळे अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी
अखंडित वीजपुरवठा व आपुलकीच्या उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या जबाबदारीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,
असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
सेनापती बापट मार्गावरील ‘प्रकाशभवन’मध्ये शुक्रवारी (दि. 26) आयोजित बैठकीत पुणे, सोलापूर,
सातारा, कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या विविध कामांचा व ग्राहकसेवेचा आढावा
ऊर्जामंत्री  बावनकुळे यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महावितरणचे अध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक
(प्रकल्प) भालचंद्र खंडाईत, प्रभारी प्रादेशिक संचालक  सुनील पावडे उपस्थित होते.
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की येत्या काळात राज्याची मागणी 35 हजार
मेगावॅटवर जाणार आहे. त्यासाठीच्या नियोजनानुसार वीजयंत्रणेची कामे करण्यात येत आहेत.
गेल्या साडेचार वर्षांत महावितरणसह ऊर्जाक्षेत्रात प्रभावी कामे झाली आहेत. महावितरणच्या
माध्यमातून अनेक नवीन प्रकल्प, योजनांची अंमलबजावणी झाली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून
ग्राहकसेवा व अंतर्गत प्रशासकीय कारभार पारदर्शक व ऑनलाईन झाला आहे. महावितरणचे
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक  संजीव कुमार व त्यांच्या टीमने उत्कृष्ट काम केले व
त्याची दखल घेऊन पंतप्रधान  नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनीही महावितरणचा गौरव केला आहे.
उर्जा क्षेत्रातील सर्व विकासकामांचा केंद्रबिंदू हा वीजग्राहकच आहे. त्याचा फायदा हा प्रत्येक
वीजग्राहकाला झाला पाहिजे. त्यामुळे सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व
तत्परतेने ग्राहकसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण बांधील आहे व ग्राहकांना आपुलकीने व
सौजन्याने वागणूक देणे सुद्धा अपेक्षीतच आहे. वीजग्राहकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दौरे
काढून संवाद साधा. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रात दौरे केल्यास 90 टक्के प्रश्न सुटतील.
विजेची उपलब्धता मुबलक आहे. मात्र तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास तो
तत्परतेने सुरळीत केला पाहिजे. यामध्ये हेतुपुरस्सर विलंब लावू नका. नकारात्मक मानसिकतेमुळे
महावितरणची व पर्यायाने शासनाची बदनामी होते. याची जाणीव ठेऊन अभियंता व कर्मचाऱ्यांनी
ग्राहकांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी तत्पर राहावे, असे आवाहन ऊर्जामंत्री ना. श्री.
बावनकुळे यांनी केले. वीजसुरक्षेसाठी कायम दक्षता घ्यावी व विद्युत अपघात होणार नाही
यासाठी वेळोवेळी व तातडीने उपाययोजना करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी यावेळी पुणे,
बारामती व कोल्हापूर परिमंडळातील वीजहानी, ग्राहकांच्या समस्या, अपूर्ण कामे, महावितरणच्या
विविध योजना व प्रकल्पांचा आढावा घेतला. महावितरणने सर्वच ग्राहकसेवा ऑनलाइन केल्या
आहेत. त्याच जलदगतीने कार्यालयीन कामकाज करा. विनाकारण व हेतुपुरस्सर त्रास
वीजग्राहकांना त्रास देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल. तसेच
वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची व वितरण हानीची जबाबदारी ही संबंधीत अभियंते व त्यांच्या
वरिष्ठांवर निश्चित होणार आहे, असे श्री. संजीव कुमार यांनी स्पष्ट केले. यावेळी महावितरणचे
विविध योजना, प्रकल्प व ग्राहकसेवांबाबत संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, संचालक
(प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत यांनी आढावा घेतला. या बैठकीला मुख्य अभियंता श्री. अनिल
भोसले (कोल्हापूर), श्री. सचिन तालेवार (पुणे) यांच्यासहर पुणे प्रादेशिक विभागातील अधीक्षक
अभियंते, कार्यकारी अभियंता व अधिकारी उपस्थित होते.

इकोफ्रेंड्सच्या अध्यक्षपदी सुहास कुलकर्णी यांची निवड

0

पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी गेली १४ वर्षे कार्यरत असलेल्या लायन्स क्लब ऑफ पुणे इकोफ्रेंड्सच्या अध्यक्षपदी सुहास कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. कल्पना भालेराव यांची उपाध्यक्षपदी, अरुण कुलकर्णी यांची सचिवपदी, तर महादप्पा अंदुरे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. एमजेएफ लायन सुनिल चेकर यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शपथ दिली. यावेळी इकोफ्रेंड्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष अनिल मंद्रुपकर, रिजनल चेअरपर्सन डॉ. विलास कुलकर्णी, ऍड. बिपीन पाटोळे, शंतनु पेंढारकर, रमेश पसरीजा ,योगेश कदम, गणेश अनेराव यांच्यासह क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.

सध्या असलेला पाणीटंचाईचा प्रश्न लक्षात घेऊन जलसंवर्धनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी शाळा-महाविद्यालये, कार्यालये, सोसायट्यांमधून सेमिनार्स, रॅली, व्याख्याने आयोजित करून पाणीबचतीचा जागृती केली जाणार आहे. याशिवाय, वृक्षारोपण, ऑक्सिजन पार्कची निर्मिती, स्वच्छ स्वागेट बसस्थानक, स्वच्छ पुणे शहर, पर्यावरण शिक्षणासाठी कॅच देम यंग हा उपक्रम, वेदर मॉनिटरिंग स्टेशन आणि किचन गार्डनींग असे नाविन्यपूर्ण उपक्रम क्लबच्या वतीने आगामी वर्षात राबविण्यात येणार असल्याचे सुहास कुलकर्णी यांनी सांगितले.

माहिती अधिकार कायद्याच्या  रक्षणासाठी, अण्णा आम्ही तुमच्या समवेत ..

0

पुणे-माहिती अधिकार कायद्यात बदल करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीवर आक्षेप नोंदविण्यासाठी  अमित बागुल मित्रपरिवाराने  राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन  आरटीआय कायद्यात  होणारा  बदल रोखण्यासाठी  जनआंदोलनात सक्रिय होण्याची ग्वाही दिली.
अमित बागुल आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेल्या बदल्यामुळे या कायद्याला धोका निर्माण झाला आहे . आपल्या पुढाकारातून जनतेला  हा महत्वाचा अधिकार  मिळाला ;पण हे  सरकार ते हिरावून घेत आहे. एकप्रकारे हुकूमशाहीकडे या सरकारची वाटचाल असल्याचे  केंद्र सरकारने माहिती अधिकारात केलेल्या बदल्यामुळे अधोरेखित झाले आहे. या कृत्याचा जाब देशवासीय नक्कीच विचारतील,आपण फक्त निर्देश द्यावेत. देशातील युवक आणि  जनता रस्त्यावर  उतरून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. असेही यावेळी भेट घेऊन सांगितले . याबाबत अमित बागुल म्हणाले कि,  माहिती अधिकार कायद्यात बदल करणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हा कायदा बराच विचार-विनिमय करून तयार करण्यात आला होता तसेच संसदेत तो एकमताने मंजूर झाला होता. मात्र, आता त्यात बदल होऊन तो संपण्याच्या मार्गावर आहे. यातील बदलांमुळे सरकारला विविध सरकारी संस्थांमध्ये माहिती आयुक्तांच्या नियुक्तया त्याच्या अटी, त्यांचा कार्यकाळ आणि वेतन-भत्ते यावर निर्णय घेण्याचा अधिकार मिळणार आहे. माहिती अधिकार २००५ नुसार, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचे वेतन, नियुक्त्यांची नियमावली तसेच भत्ते हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या समान आहेत. त्यामुळे या कायद्यात बदल करून सरकार माहिती आयुक्तांना त्यांच्या अधिकारांपासून वंचित करण्याचा प्रयत्न करीत आहे. असा विविध सामाजिक स्थरातून सूर निघत असून 
 त्यानुसार आम्ही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन जनआंदोलन घेतल्यास त्यामध्ये सर्व युवक सहभागी होतील असेही अमित बागुल यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्या समवेत विश्वास दिघे , जयकुमार ठोंबरे , संतोष गेळे , महेश ढवळे , संतोष पवार , सागर आरोळे,धनंजय कांबळे, अभिजित गायकवाड, इम्तियाज तांबोळी अभिषेक बागुल,भाऊ दोडके,सतीश कांबळे आदी उपस्थित  होते.

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा

0

पुणे : “देशभक्ती दाखवण्यासाठी सैन्यात जाणे आवश्यक नाही, तर तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून समाजात वावरा. ज्या क्षेत्रात कार्य करत आहात, त्यातून देशाच्या प्रगतीला आपला हातभार लागेल, यासाठी प्रयत्न करा.  तीही एक प्रकारे देशसेवाच होईल. सैनिक सीमेवर देशाचे संरक्षण करतील आणि आपण देशहिताचे, मूल्यसंवर्धनाचे काम करून देशभक्ती जागवूया,” असे प्रतिपादन राष्ट्रपतीपदक प्राप्त ग्रुप कॅप्टन (निवृत्त) अश्वनी भाकू यांनी केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी भाकू बोलत होते.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी आणि देशाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी सूर्यदत्ता संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जातात. २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत कारगिल जिंकले. त्यानिमित्ताने २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी विदयार्थ्यांनी सैनिकांचा पोशाख परिधान करून ‘कंधे से मिलते हैं कंधे’ या गाण्यावर नृत्य सादर केले आणि उपस्थितांचे मने जिंकली. डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असलेल्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून युद्धात वीरमरण आलेल्या ५२७ बहादुर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अश्वनी भाकू यांनी कारगिल युद्धामधील त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी कारगिल युद्धातील थरारक अनुभव सांगत कॅप्टन सौरभ कलिया, कॅप्टन अनुज नायर, ग्रेनेडीयर योगेंद्र सिंह यादव, लेफ़्टनंट मनोज पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासारख्या शूरवीरांच्या आठवणी सांगताना प्रेक्षागृहात उपस्थितांचे डोळे पाणावले.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “देशभक्ती आपल्या आयुष्याचा एक भाग असावी. संरक्षण दल आणि पोलिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती सूर्यदत्ता ग्रुपमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजण्याबरोबरच त्यांच्या कार्याची ओळख होते. ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा यांनी अनेकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम राबवतो. वीरनारी आणि वीरांना सन्मानित करण्यासह सैनिकांच्या पाल्यास शिष्यवृत्ती योजना आम्ही राबवित असतो.”

धनगर समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदानावर शेळ्या-मेंढ्या गटाचे वाटप – महादेव जानकर

0

मुंबई : बंदिस्त शेळी-मेंढी पालन प्रकल्प सुरू करण्यासाठी भ.ज.क. प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजातील महिलांच्या सहकारी संस्थांना ७५ टक्के अनुदान देण्याची योजना राबविण्यात येणार असून त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी, असे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी आज येथे दिले.

महिला बंदिस्त शेळी-मेंढी पालन सहकारी संस्थांच्या प्रकल्पाच्या अनुषंगाने श्री.जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज तारापोरवाला मत्स्यालय येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

व्यक्तिगत स्तरावर योजनेचा लाभ घेण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या धनगर व तत्सम समाजातील महिलांना दिलासा देण्यासाठी या योजनेची रचना करण्यात येत आहे, असे सांगून श्री.जानकर म्हणाले की, महिलांच्या नोंदणीकृत सहकारी संस्थांना 75 टक्के अनुदानावर शेळ्यांचे गट देण्याची योजना राबविण्यात येणार आहे. उर्वरित रकमेसाठी व्याजाने रक्कम घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांना कर्ज देण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ ग्रामीण बँकेने पुढाकार घ्यावा, असे श्री.जानकर यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी सांगितले.

एका संस्थेत किमान २० ते कमाल ३० महिला सदस्य असणे आवश्यक असून सदस्य संख्येच्या प्रमाणात प्रतिसदस्य २० शेळ्या किंवा मेंढ्या आणि १ बोकड किंवा नर मेंढा वाटप केले जाणार आहे. उर्वरित २५ टक्के रक्कम महिलांच्या संस्थेने उभी करावयाची आहे. या संस्था कोणत्याही कर्जाशिवाय स्वहिस्सा म्हणून ही रक्कम उभी करु शकतात किंवा २५ टक्केपैकी किमान ५ टक्के स्वहिस्सा आणि २० टक्के बँकेचे कर्ज हा पर्याय दिला जाणार आहे.

या बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मीनारायण मिश्रा, मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रभारी आयुक्त सुमंत भांगे, पदुम विभागाचे उपसचिव विजय चौधरी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.महेश बनसोडे, पदुम विभागाचे अवर सचिव विकास चौधरी, राजेश गोविल, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक संजय वाघ आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जुन्नर शहराचा गौरव – स्वच्छ सर्वेक्षणातील उत्कृष्ट कामगिरी

0
जुन्नर  /आनंद कांबळे
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत पश्चिम विभागात केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये उल्लेखनीय आणि  उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जुन्नर नगर परिषदेला महारष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि राज्याच्या नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवमनिषा म्हैसवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष शाम पांडे, मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर-बोराडे , नगरसेवक समिर भगत,दिपेश परदेशी,( गटनेता शिवसेना, )आरोग्य प्रमुख. प्रशांत खत्री यांनी हा सन्मान स्विकारला.
जुन्नर नगरपरिषदेने केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2018 व 2019 मध्ये विविध उपक्रम राबविले. त्याची पाहणी  केंद्र शासनाच्या थर्ड पार्टी मार्फत जानेवारी  2018 मध्ये करण्यात आली होती. स्पर्धेत देशातील अनेक शहरांचा सहभाग होता.
या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून  4,237  शहरे व  महारष्ट्रातून  391  शहरे सहभागी झाली होती. लोकसंख्येनुसार 25,000 ते 50,000 लोकसंख्या असलेल्या शहरांमधून जुन्नर शहराने देशात  15 वा क्रमांक मिळवला. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम -2016 अन्वये जुन्नर शहरामध्ये 100% घरोघरचा कचरा संकलन, कचराकुंडीमुक्त शहर, घनकच-याचे विलगीकरण, शहर स्वच्छता व साफसफाई, सफाई कर्मचा-यांना वैद्यकीय तपासणी, विमा इ. सुविधा व प्रशिक्षण, पथनाट्य, भाषणे व  स्वच्छता स्पर्धा यांचे आयोजन मानांकन प्रमाणपत्र व ODF + प्रमाणपत्र प्राप्त केले. तसेच जुन्नर शहरातील नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमुळे जुन्नर नगर परिषदेने  स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये यश प्राप्त केले.
विविध उपक्रम राबवित असताना प्रत्येक व्यक्तीने हे शहर आपले आहे ते स्वच्छ ‍ ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, असे मानून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे, अशी भावना नगराध्यक्ष  शाम पांडे यांनी व्यक्त केली. तसेच मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर- बोराडे यांनी प्रशासनाला अशीच साथ देण्याचे आवाहन केले.

ड्रिप कॅपिटलने सिरीज बी फंडिंग मध्ये 25 मिलियन डॉलर्स उभारले

●       ड्रिप कॅपिटलने सिरीज बी फंडिंग मध्ये 25 मिलियन डॉलर्स उभारले. 55 मिलियन डॉलर्सच्या कर्जासहित आजपर्यंत एकूण 45 मिलियन डॉलर्सचे समभाग उभारण्यात आले

●       ड्रिप कॅपिटलने भारतातून होत असलेल्या सीमापार व्यापाराला 500 मिलियन डॉलर्सचा वित्तपुरवठा केला आहे; आर्थिक वर्ष 2020 पर्यंत 1 बिलियन डॉलर्सचा टप्पा गाठण्याचा उद्देश्य करत भारतीय निर्यातदारांसाठी खरा वित्तपुरवठादार बनण्याचे लक्ष्य

●       फंडिंगच्या नव्या फेरीबरोबर मेक्सिको आणि यूएईपासून सुरुवात करत नव्या भौगोलिक प्रदेशांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्याची व निर्यातदारांसाठी नवीन उत्पादने उपलब्ध करून देण्याची ड्रिपची योजना

मुंबई: पालो आल्टो आणि मुंबईस्थित फिनटेक फर्म ड्रिप कॅपिटलने भांडवलउभारणीच्या दुस-या फेरीमध्ये (सीरीज बी फंडिंग) 25 मिलियन डॉलर्स उभारले आहे. एक्सेल या भांडवलपुरवठादार कंपनीच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या दुस-या फेरीमध्ये सिकोईया इंडिया, विंग व्हीसी आणि वाय कोंबिनेटर या विद्यमान गुंतवणूकदार कंपन्यांचाही समावेश होता. या फेरीत सहभागी झालेल्या नव्या गुंतवणूकदारांमध्ये जीसी1 व्हेंचर्स आणि ट्रस्टेड इन्साइट या इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा समावेश होता. कंपनीने आजपर्यंत 45 मिलियन डॉलर्सहून अधिक समभाग उभारले आहे आणि 55 मिलियन डॉलर्सचे कर्ज असे एकूण 100 मिलियन डॉलर्सचे फंडिंग उभे केले आहे.

 जागतिक व्यापाराला गती देण्यासाठी तसेच उदयोन्मुख बाजारपेठांतील लहान कंपन्या व उद्योजकांना सक्षम बनविण्यासाठी ड्रिप कॅपिटल तंत्रज्ञानाचा वापर करतो. केवळ एका क्लिकसरशी ड्रिपच्या उपाययोजना छोटा निर्यातदारांना त्यांच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी गरज असलेले खेळते भांडवल पुरवते. सध्या जागतिक स्तरावरील व्यापारी भांडवलपुरवठ्यातील तुटीचे प्रमाण 1.5 ट्रिलियन डॉलर्स इतके आहे. भांडवलाची गरज आणि पुरवठा यांमधली ही दरी प्रामुख्याने उदयोन्मुख बाजारपेठांतील छोट्या निर्यातदारांमध्ये अधिक जाणवत आहे. दुस-या शब्दांत सांगायचे तर खेळत्या भांडवलाच्या अभावामुळे 1.5 ट्रिलियन डॉलर्सचा व्यापार होऊ शकत नाहीये. 2016 साली भारतातील पहिला वित्तपुरवठा करणा-या ड्रिप कॅपिटल कंपनीने हाच प्रश्न सोडविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

 ट्रेड फायनान्स हे बँकांचे वर्चस्व असणारे एक अत्यंत जुने, कागदपत्रांवर चालणारे उद्योगक्षेत्र आहे, जे प्रामुख्याने विशाल आकाराच्या, प्रस्थापित कॉर्पोरेट ग्राहकांवर लक्ष केंद्रित करते. म्हणूनच भारतातून होणा-या निर्यातीमध्ये 50% वाटा असूनही छोटे उद्योग मोठ्या प्रमाणात दुर्लक्षितच राहतात. या सर्व छोट्या व्यापारी निर्यातदारांसाठी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील उदयोन्मुख बाजारपेठेतमध्ये समान संधी देणारे क्षेत्र लाभावे हे आमचे ध्येय आहे”, असे ड्रिप कॅपिटलचे सह-संस्थापक आणि को-सीईओ पुष्कर मुकेवार म्हणाले.

 ड्रिप आंतरराष्ट्रीय ट्रेड फायनान्सच्या पायाभूत यंत्रणांच्या मुख्य भागांची पुनर्उभारणी करत आहे. सीमापार होणा-या बीटूबी व्यवहारांची हमीपत्रे वेगाने तयार करण्यासाठी व त्यांना वित्तपुरवठा कऱण्यासाठी कंपनी इलेक्ट्रॉनिक डेटा आणि तंत्रज्ञानाचा वापर करते.

 स्वयंचलित यंत्रणेच्या सहाय्याने ड्रिप विनाखंड ग्राहक अनुभव पुरवते व केवळ एका क्लिकसरशी एखाद्या शिपमेंटला वित्तपुरवठा करू शकते. यासाठी ड्रिप अनेक इलेक्ट्रॉनिक डेटा स्त्रोतांचे एकत्रीकरण करून प्रत्येक शिपमेंटची हमी घेण्यासाठी प्रोप्रायटरी अल्गोरिदम्स तयार केले आहेत,” असे ड्रिप कॅपिटलचे सह-संस्थापक आणि को-सीईओ नील कोठारी म्हणाले.

 मुंबईस्थित स्टील उत्पादनांच्या निर्यातदार व 2017 पासून ड्रिप कॅपिटलचे ग्राहक असलेले इझिनॉक्स लिमिटेड या  कंपनीचे संचालक सिद्धार्थ गुप्ता म्हणाले, ”मध्यम आकाराचे निर्यातदार असल्याने आम्हाला बँकांच्या सेवा मर्यादित स्वरूपात उपलब्ध होत्या. यामुळे आमचा व्यापार खुटू लागला. मात्र आपल्या तारणाची मागणी न करणा-या व ऑनलाइन ट्रेड फायनान्सची प्रक्रिया पार पाडणा-या ड्रिपमुळे आम्हाला अधिक ऑर्डर्स पूर्ण करण्याइतकी फ्लेक्सिबिलिटी मिळाली व त्यामुळे आमच्या महसुलात खूप भर पडली.” 

 भारतामध्ये आगमन केल्यापासून ड्रिपच्या बिझनेस प्रणालीने गेल्या दोन वर्षांत दहा पट वाढीचा दर गाठून आपल्या प्रचंड क्षमतेचे प्रदर्शन केले आहे. 400 हून अधिक निर्यातदारांसाठी कंपनीने 500 मिलियन डॉलर्स किंमतीच्या व्यापाराला वित्तपुरवठा केला आहे. आर्थिक वर्ष 2020 पर्यंत भारतात स्त्रोत असलेल्या 1 बिलियन डॉलर्सच्या व्यापाराला वित्तपुरवठा करण्याचे ड्रिपचे लक्ष्य आहे. फंडिंगच्या नव्या फेरीमुळे आणि यशस्वी सिद्ध झालेल्या मॉडेलमुळे कंपनी जागतिक स्तरावर आपल्या पाऊलखुणा उमटवण्याची योजना आखत आहे व त्यानुसार 2019 मध्ये कंपनीने युनायटेड अरब एमिरेट्स आणि मेक्सिको येथे आपल्या व्यापाराचा विस्तार केला आहे,” असे मुकेवार पुढे म्हणाले.          

 भांडवलउभारणीबद्दल अधिक विस्ताराने सांगताना एक्सेलचे अभिनव चतुर्वेदी म्हणाले, ”आम्ही ड्रिपच्या अगदी स्थापनेपासून तिच्या भांडवलउभारणीच्या प्रत्येक फेरीमध्ये या कंपनीच्या बरोबर आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये या कंपनीने केलेली प्रगती प्रेरणादायी आहे. या कंपनीकडून वाढीचा पुढला टप्पा गाठला जात असताना व ही कंपनी आपले बिझनेस मॉडेल जागतिक स्तरावर घेऊन जात असताना त्यांना आपले पाठबळ देण्याबाबत आम्ही अतिशय उत्साही आहोत.

 छोटे उद्योग हे जगभरातील आर्थिक विकासाचे आणि रोजगारनिर्मितीचे प्रमुख सूत्रधार असतात. ड्रिप आपले कार्यक्षेत्र नव्या भौगोलिक प्रदेशांमध्ये विस्तारत असताना तेथील बाजारपेठांच्या विकासाला वेग देण्याची संधी कंपनीसमोर आहे. ताजे फंडिंग आणि अत्यंत कणखर ग्लोबल टीम यांच्या साथीने ड्रिप कॅपिटल प्रत्येक देशातील प्रत्येक आकाराच्या निर्यातदारांना समान संधीचे क्षेत्र तयार करून देण्यासाठी सज्ज आहे.

चिंचोलीचे संदिप पानसरे यांना शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर.

0
जुन्नर /आनंद कांबळे
चिंचोली (ता- जुन्नर) येथील रहिवाशी व मावळ तालुक्यातील उर्से येथील महिंद्रा सी.आय.ई. कंपनीतील संदिप दत्तात्रय पानसरे यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाला आहे. कामगार व लोकांमधून अभिनंदन करण्यात येत आहे.
संदिप पानसरे २१ वर्षापासून महिंद्रा कंपनीत कार्यरत आहे. काम करीत असताना कामगारांच्या विविध समस्या सोडविणे. कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देणे. अनाथ, गरीब मुलांना शालेय साहित्याचे वाटप करणे. दिव्यांग, मतिमंद, अपंग, मुलांना, साहित्य, धान्य वाटप करणे. निराधार वृद्धांना मदत मिळवून देणे. तळेगाव परिसरात वृक्षारोपण करणे.
शालेय मुलींना वैयक्तिक स्वच्छता व आरोग्य या बाबत महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या मदतीने मार्गदर्शन शिबीर आयोजित करून मोफत सॅनेटरी नॅपकीनचे वाटप करणे. शाळां- शाळांमधून जाऊन “मुठभर धान्य निराधार आजी- आजोबासाठी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.
या सर्व समाजोपयोगी  कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना गुणवंत कामगार पुरस्कारासाठी निवड केली आहे.

‘फिक्की फ्लो’कडून वृक्षारोपण

0

पुणे : ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ची (फिक्की) महिला शाखा असलेल्या ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन’ अर्थात ‘फ्लो’ या संस्थेच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले. पुणे शुद्ध हवेचे ठिकाण व्हावे, याकरिता शहर आणि परिसरालगतच्या भागात संस्थेच्या वतीने वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाला ‘ट्री पब्लिक फाऊंडेशन’चे सहकार्य लाभले. विविध प्रकारची शेकडो झाडे या सप्ताहादरम्यान लावण्यात आली. वाढते शहरीकरण, पर्यावरणातील बदल, मोठया प्रमाववर होणारी वृक्षतोड, जंगलांचे घटते प्रमाण, पक्ष्यांचे स्थलांतरण यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहेत. त्यासाठी मोठया संख्येत वृक्षारोपण होणे गरजेचे आहे, हीच बाब लक्षात घेऊन शहर हरीत तसेच पर्यावरणपूरक व्हावे, यासाठी संस्थेच्या वतीने नियमित उपक्रम राबविले जात आहेत, असे ‘फ्लो’च्या अध्यक्षा रितू छाब्रिया म्हणाल्या.

‘कल्याणी स्कूल’तर्फे “किड्स फॉर टायगर्स” उपक्रम सुरू

0

पुणे: विख्यात वन्यजीवन प्रेमी आणि पर्यावरणीय कार्यकर्ते बिट्टू सहगल यांनीकिड्स फॉर टायगर्सया शैक्षणिक उपक्रमाची स्थापना 2000 मध्ये केली. भारतातील ग्रामीण आणि शहरी मुलांसाठी निसर्गातून भटकंती, विविध  उत्सव आणि कार्यशाळा आयोजित करण्यातून हा उपक्रम सुरू झाला. सुरुवातीस नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बंगळूरसारख्या शहरांमधून सादर होणाराकिड्स फॉर टायगर्सउपक्रम आता अन्य शहरे गावांमधील 10 लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचत आहे.

किड्स फॉर टायगर्सहा उपक्रम कल्याणी स्कूलमध्येही सुरू करण्यात आला आहे. गेल्या दि. 23 जुलै रोजी या शाळेत पर्यावरण क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञांच्या उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास दीपक दलाल, बिट्टू सहगल, डॉ. परवेश पंड्या, बिक्रम ग्रेवाल आणि मधु भटनागर यांची उपस्थिती लाभली. प्रेक्षकांमध्ये इतर शाळांचे शिक्षक प्राचार्य, तसेच वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

प्रख्यात बाल कथाकार, निसर्गप्रेमी भटकंती करण्यात रमणारे दीपक दलाल हे या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे होते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने शाळा कसे बदल घडवून आणू शकेल, यावर त्यांनी प्रेक्षकांना मार्गदर्शन केले. गेटा थर्नबर्ग यांच्या क्रांतिकारी भाषणातून एक उद्धृत मजकूर त्यांनी वाचला हवामान बदलाशी संबंधित लढा देण्यासाठी तत्काळ हालचाली करायला हव्यात, असे समजावून दिले.

यानंतर डॉ. परवेश पंड्या आणि बिट्टू सहगल यांनी एका दृकश्राव्य स्वरुपाच्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. ‘निसर्गाचे म्हणणे एेका’, या विषयावरील या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

बिक्रम ग्रेवाल यांनी नंतर प्रेक्षकांना भारतातील विविध पक्षी प्राणी यांच्या प्रजातींची झलक दाखवली. त्यांनी नागालँडच्या काही पर्यावरणीय कार्यकर्त्यांच्या कार्याचे प्रदर्शन केले. अमूर फाल्कन, या एका स्थलांतर करीत येणाऱ्या पक्षाची शिकार थांबवण्यासाठी हे कार्यकर्ते प्रयत्न करीत आहेत.

पृथ्वीचे दर सेकंदाला काही प्रमाणात नुकसान करणाऱ्या पर्यावरणविषयक संकटांबद्दल मधू भटनागर यांनी आपल्या भाषणात चिंता व्यक्त करीत, या संकटांना सामोरे जाण्याची गरज व्यक्त केली. कल्याणी स्कूलमध्येही त्या पर्यावरणशास्त्र शिकवीत असतात.

या सर्व सादरीकरणांनंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. उत्साही प्रेक्षकांद्वारे विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहुण्यांनी दिली.

वाघ या प्राण्याला नामशेष होण्यापासून वाचविण्यासाठी काही प्रयत्न करायला हवेत, असा संदेश घेऊन तशा निवेदनावर अतिथी प्रेक्षकांनी स्वाक्षऱ्या केल्या या कार्यक्रमाचा समारोप झाला.

२६-वर्षीपासूनचा ट्यूमर १७ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर काढला

0
  • २६ वर्षापासून असलेल्या ट्यूमर मध्ये आढळले कॅन्सरचे विषाणू
  • डॉक्टरांच्या १७ तासाच्या शर्तीच्या प्रयात्नानंतर मिळाली अडीच किलोच्या ट्यूमर पासून मुक्तता

पुणे-४७ वर्षीय भाग्यश्री मांगले यांचा २६ वर्ष पासून असलेला छाती व खांद्याच्या मधील ट्यूमर काढण्यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील डॉक्टरांना यश मिळाले आहे. अतिशय दुर्मिळ आणि अनोखी शस्त्रक्रिया यावेळी भाग्याशी यांच्या वर करण्यात आली. खांदा आणि छातीच्या मध्ये आलेल्या ट्यूमर कडे अनेक वर्ष भाग्याशी यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे त्याचे रुपांतर कर्करोगाच्या ट्यूमर मध्ये झाले.

मुळच्या रोहा, जिल्हा रायगडच्या असणाऱ्या भाग्याशी मांगले या पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर येथे उजव्या हाताचे दुखणे व अर्धांगवायूच्या उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये आल्या होत्या. यावेळी डॉक्टरांच्या असे निदर्शनास आले की त्यांच्या छाती व खांद्याच्या मध्ये २० सेंटीमीटर एवढा मोठा ट्यूमर आहे. हा ट्यूमर त्यांना १९९३ साला पासून असून तो कमी करण्यासाठी त्यांनी काही शस्त्रक्रिया देखील केल्या होत्या मात्र त्या अयशस्वी ठरल्या. त्यांनी एलोपॅथिक व आयुर्वेदिक उपचार केले तसेच काही ढोंगी डॉक्टरांच्या उपचारामध्ये त्या ट्यूमर वर गोंदवून देखील घेतले होते, मात्र कोणताही गुण आला नाही. आता तो ट्यूमर एवढा मोठा झाला होता की त्यामुळे श्वासनलिका दबली जाऊन त्यांना श्वासोच्छवास घेणे अशक्य होत होते. तसेच उजव्या हाताकडे जाणाऱ्या सर्व रक्त वाहिन्या देखील दाबल्या गेल्या होत्या व हात निकामी झाला होता.

यावर ज्युपिटर हॉस्पिटल मधील ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर म्हणाले की “ अडीच किलोचा हा ट्यूमर खांद्या व छातीच्या अवघड अशा भागात पसरला होता. तो काढण्यासाठी रुग्णाचे कॉलर हाड व छातीचे स्नायू कापावे लागले. तसेच हा ट्यूमर तेथील नसांमध्ये गेला होता. या शस्त्रक्रिये दरम्यान आमची पहिली प्राथमिकता रक्तवाहिन्या वाचवणे व त्याच वेळी कॉलर हाडाचे पुनर्निर्माण करणे ही होती. १७ तास चाललेली ही शस्त्रक्रिया अनोखी असून यात ज्युपिटर हॉस्पिटल मधील अनेक तज्ञांचे योगदान आहे.“

यावेळी ज्युपिटर हॉस्पिटलचे प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल म्हणाले कि “ ही पुण्यातील नव्हे तर भारतातील दुर्मिळ केस आहे. पुण्यातील अनेक दिग्गज डॉक्टरांनी ही शस्त्रक्रिया करण्यास नकार दिला होता मात्र ज्युपिटर हॉस्पिटलने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आता रुग्णाची प्रकृती चिंताजन नसून त्यांना घरी देखील सोडण्यात आले आहे.”

या शस्त्रक्रिये मध्ये ओन्कोलॉजिस्ट आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. आशिष पोखरकर, प्लॅस्टिक सर्जन डॉ. राहुल दलाल, भूलतज्ञ डॉ. ब्रिश्निक भट्टाचार्य तसेच डॉ. परितोषा दलाल व डॉ. अमित पाटील यांचा देखील समावेश होता.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 5,800 वरुन 11,632 होणार

0

मुंबई( प्रतिनिधी ) – राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या निर्णयामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 5,800 वरुन 11,632 होणार असल्याचे मत शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या मागणीला यश असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यावेळी मुलाणी म्हणाले की, राज्यात विविध शासकीय / निम शासकीय कार्यालयात आस्थापने वरील कंत्राटी, बाह्यस्त्रोत कंत्राटी, मानधना वरील कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. त्यात मंत्रालय आस्थापना, आयुक्तालय, संचालनालय, महामंडळे, स्थानिक स्वायत्त संस्था यांमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने चोख काम करत आहेत. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कर्मचारी काम करत आहे. हे कर्मचारी आस्थापना विभागाशी संबंधित असल्याने संबंधित आस्थापना महाराष्ट्र शासन कामगार विभाग ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 1948’ प्रमाणे वेतन देते. त्यानुषंगाने 7 व्या वेतन आयोगाप्रमाणे राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे, जेणेकरून कंत्राटी कर्मचारी वेतनात वाढ होईल. अशी मागणी दि. 31/03/2019 रोजी महाराष्ट्र शासन मंत्रालय मुख्य सचिव यांच्या सह प्रधान सचिव सामान्य प्रशासन (सेवा) व प्रधान सचिव कामगार विभाग यांच्या कडे आपले सरकार तक्रार निवारण प्रणाली वरून तक्रार करत मागणी शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली होती.

यावर कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांनी राज्यातील दुकाने व आस्थापना येथे कार्यरत असलेल्या कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला, ही वाढ सुमारे दुप्पट असणार आहे. गेल्या नऊ वर्षापासून ही वाढ प्रलंबित होती. राज्यातील 10 लाख दुकाने आणि आस्थापना यांच्यावरील सुमारे एक कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे. किमान वेतन अधिनियम 1948 च्या कलम 03 अन्वये दर 5 वर्षांनी महाराष्ट्र किमान वेतन सल्लागार मंडळाच्या सल्ल्याने रोजगाराचे किमान वेतन पुनर्निधारीत करण्यात येते. मात्र गेल्या नऊ वर्षापासून तांत्रीक कारणास्तव किमान वेतन पुनर्निधारीत करता आले नव्हते. कामगार मंत्री कुटे यांच्या पाठपुराव्यामुळे कामगार वर्गाला किमान वेतनवाढ मिळणे शक्य झाले आहे. यात महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र तसेच महानगरपलिका क्षेत्रापासून 20 कि.मी.पर्यंतचे औद्योगिक क्षेत्र व छावणी क्षेत्र या परिमंडळात काम करणाऱ्या कुशल कामगारांना 5,800 वरुन 11,632, अर्धकुशल कामगांना 5,400 वरुन 10,856, अकुशल कामगारांना 5,000 वरुन 10,021 तर नगरपरिषद परिमंडळातील कुशल कामगारांना 5,500 वरुन 11,036, अर्धकुशल कामगारांना 5,100 वरुन 10,260, अकुशल कामगारांना 4,700 वरुन 9,425 व या दोन परिमंडळ वगळून महाराष्ट्र राज्याच्या उर्वरित क्षेत्रात कुशल कामगारांना 5,200 वरुन 10,440, अर्धकुशल कामगारांना 4,800 वरुन 9,664, अकुशल कामगारांना 4,400 वरुन 8,828 एवढी पुनर्निधारीत करण्यात आलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना दि.24 जुलै 2019 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामगार कल्याण मंत्री डॉ. संजय कुटे यांचे राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने शाहरुख मुलाणी मंत्रालयीन सचिव महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघ यांनी आभार व्यक्त करत कंत्राटी कर्मचारी यांना कायम करण्याची मागणी केली आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष मुकूंद जाधवर, मंत्रालयीन सचिव शाहरुख मुलाणी, कोषाध्यक्ष विकास डेकाटे, कार्याध्यक्ष सचिन जाधव, राज्य सचिव बाबासाहेब कोकाटे, सरचिटणीस शहाजी नलवडे, सह कार्याध्यक्ष सचिन पाटील आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.