Home Blog Page 2879

१५० महिला चालकांची एसटी मध्ये भरती

0

मुंबई, दि. २ : एसटीत महिला वाहक असतानाच आता चालक म्हणूनही महिला दाखल होणार आहेत. एसटीकडून ‘चालक-वाहक’ म्हणून केल्या जाणाऱ्या भरतीत १५० महिलांची निवड झाली असून ऑगस्ट महिन्यापासून त्यांचे एक वर्ष प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर या महिला सेवेत दाखल होतील. त्यामुळे एसटीचे स्टेअरिंग आता महिलांच्या हाती जाणार आहे.

सध्या एसटी महामंडळाची भरती प्रक्रिया सुरु आहे. यात महिलांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त महिलांचा प्रतिसाद मिळावा यासाठी काही अटींमध्ये बदलही करण्यात आले आहेत. पुरुष व महिलांसाठी अवजड वाहन परवाना व तीन वर्षे वाहन चालवण्याचा अनुभव अशी अट यापूर्वी होती. मात्र अट शिथील करून महिलांसाठी अवजड ऐवजी हलकी वाहने चालवण्याचा एक वर्षांचा परवाना अशी अट ठेवण्यात आली. त्यानुसार महिलांनी अर्ज केले. सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर चालक-वाहक पदासाठी १५० महिला पात्र ठरल्या आहेत. त्यांना अवजड वाहन चालवण्याचा अनुभव नसल्याने त्यांना नियमानुसार एक वर्षाचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर त्या सेवेत दाखल होतील. या महिला चालकांना प्रथम छोट्या अंतरावरील एसटी चालवण्याचा अनुभव दिला जाईल. त्यानंतर लांब पल्ल्याच्या मार्गावर त्यांची नियुक्ती केली जाईल.

महामंडळामार्फत आदिवासी युवतींसाठी ‘वाहन चालक प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. यातून आतापर्यंत २१ आदिवासी युवतींना एसटी महामंडळामार्फत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महिला चालकांसाठी अबोली रंगाच्या रिक्षा

परिवहन विभागामार्फत रिक्षा आणि टॅक्सीसाठी देण्यात येणारे परवाने मुक्त करण्यात येऊन मागील पाच वर्षात सुमारे २ लाख ४० हजार परवाने देण्यात आले. हे परवाने देताना महिलांचाही विचार करण्यात आला. महिला रिक्षाचालकांना ‘अबोली’ रंगाच्या रिक्षा देण्यात येतात. आतापर्यंत १ हजार १०८ इतक्या रिक्षा महिला चालकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई, ठाणे आदी शहरांमध्ये महिला चालक या रिक्षा चालविताना दिसत आहेत.

५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य अ.भा. साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा

0

मुंबई: उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाने दरवर्षीप्रमाणे रुपये ५० लाख इतके अर्थसहाय्य मंजूर केले आहे. मंजूर करण्यात आलेले अर्थसहाय्य महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ३० जुलै, २०१९ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी दिली.

आगामी काळात होणारी विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि आचारसंहितेचा संभाव्य कालावधी लक्षात घेऊन अ. भा. साहित्य महामंडळाला साहित्य संमेलनाच्या नियोजनात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याची काळजी महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. गेल्या 4 वर्षांपासून हे अनुदान विजयादशमीआधीच साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा करण्यात येते.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात

0

मुंबई-ओबीसींच्या राजकीय आरक्षणात कपात करणारा सरकारने नवा अध्यादेश नुकताच जारी केला आहे. ५० टक्क्यांहून अधिक जागांवर आरक्षण दिल्याने ५ जिल्हा परिषदेच्या निवडणुका लटकल्या होत्या. या निवडणुकांना स्थगिती न्यायालयाने स्थगिती दिलेली होती त्यामुळे नागपूरसह वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या. या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण विरोधात विविध याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या. न्यायालयाने ५० टक्क्यांहून अधिक जागांवर आरक्षण देणाऱ्या नियमांमध्ये दुरुस्ती करण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आलेले होते. राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) राजकीय आरक्षणात कपात करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असू नये, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सरकारने 31 जुलै रोजी अध्यादेश जारी केला आहे. अध्यादेशामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतींमध्ये ओबीसींना आता सरसकट 27 टक्के आरक्षण मिळणार नाही. एकूण आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा राखून ओबीसींना आरक्षण देऊन ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात येणार आहे. यामुळे 20 जिल्ह्यातील ओबीसींचं आरक्षणात कपात होणार आहे. 20 जिल्हा परिषदांमध्ये ओबीसींसाठी 431 जागा होत्या. त्यापैकी 105 जागा कमी होतील तर पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमधील ओबीसींच्या जागाही देखील घटणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय आरक्षण दिले जाते. परंतु, ओबीसींना 33 जिल्ह्यांमध्ये सरसकट 27 टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. पण सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला धक्का लागला आहे. ओबीसींचे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अध्यक्षांची संख्या कमी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने 10 मे 2010 रोजी अनुसूचित क्षेत्र वगळून उर्वरित ठिकाणी एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असू नये, असा निकाल दिला होता. त्याआधावर राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू केल्याची प्रकरणं न्यायालयात दाखल झाली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी सुसंगत आरक्षणाची रचना करण्यासाठी राज्य सरकारने, महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये सुधारण करण्याचा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यासंबंधीचे विधेयक विधानसभेत सादर केलं होतं, परंतु ते मंजूर झालं नाही. त्यामुळे राज्य सरकारने एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्यासाठी अध्यादेश काढला आहे. त्यानुसार ग्रामविकास विभागाने राज्यपालांच्या मान्यतेनंतर 31 जुलै रोजी अध्यादेश जारी केला असून त्याची तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. नोकरी आणि शिक्षणात 19 टक्के आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या ओबीसींच्या राज्यात 350 जाती आहेत.

अण्णाभाऊंची जन्मशताब्दी समाजपरिवर्तन वर्ष म्हणून साजरे करणार

0
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ‘आरपीआय’च्या वतीने अभिवादन महासभा
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज परिवर्तनासाठी आपले आयुष्य झिजवले. मातंग समाजासह इतर वंचित समाजाच्या व्यथा त्यांनी आपल्या साहित्यातून, वाणीतून मांडल्या. आजही मातंग, दलित समाज मागासलेला आहे. समाजाचे परिवर्तन करण्यासाठी अण्णाभाऊ यांची जन्मशताब्दी सामाजिक परिवर्तन वर्ष म्हणून साजरी करणार आहे,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (A) वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी प्रारंभी त्यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सारसबाग परिसरात पक्षाच्या वतीने झालेल्या अभिवादन महासभेत हनुमंत साठे बोलत होते. याप्रसंगी शहराध्यक्ष अशोक कांबळे, नगरसेविका सोनाली लांडगे, महाराष्ट्राचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष महेंद्र कांबळे, शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, संजय सोनावणे, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, शैलेंद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
हनुमंत साठे म्हणाले, “देशातील विविध समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असताना अजूनही मातंग समाज पाठीमागे राहिलेला आहे. या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांचे विविध प्रश्न सोडविले पाहिजेत. तसेच समाजातील व्यक्तींनी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वाचून त्यांचे विचार अमंलात आणले, तर समाज प्रगती करेल. समाजाच्या विकासासाठी महामंडळाला भरघोस निधी सरकारने द्यावा. कर्जवाटप लवकरात लवकर सुरु करावे. तसेच समाज घडविण्याचे काम करणाऱ्या अण्णाभाऊंना भारत सरकारने भारतरत्न सन्मान द्यावा.”
परशुराम वाडेकर म्हणाले, “साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रत्येक कार्यकर्ता मोठ्या उत्साहात साजरी करतो. परंतु त्यांचे विचार अंमलात आणत नाही. जोपर्यंत त्यांचे विचार कार्यकर्त्यांना समजणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही. त्यामुळे अण्णाभाऊ समजून घ्यायला हवेत. अण्णाभाऊच्या प्रत्येक कादंबरीत महिला नायिका होती. कारण पुरुषाबरोबर महिलेलादेखील समान हक्क मिळाला पाहिजे, ही त्यांची भावना होती. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी आपल्या लेखनीतून आणि भाषणातून आवाज उठवला होता.”
अशोक कांबळे म्हणाले, “रिपब्लिकन पक्षाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजिले जाणार आहेत. त्यामध्ये अण्णाभाऊंचे साहित्य आणि त्यांचा जीवनप्रवास तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.” बाळासाहेब जानराव, महेंद्र कांबळे, अशोक शिरोळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. महिपाल वाघमारे व बाबुराव घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा कांबळे यांनी आभार मानले.

‘चांद्रयान-२ मोहीमे’वर मराठी विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यान

0
पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो चांद्रयान-२ मोहीम व अवकाश मोहीमेत युवकांना उपलब्ध संधी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे. येत्या मंगळवारी (दि. ६ ऑगस्ट) सायंकाळी ६.०० वाजता शिवाजीनगर येथील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सच्या सभागृहात हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे. भारतातील नासाच्या प्रतिनिधी अपूर्वा जाखडी आणि लीना बोकील या मार्गदर्शन करणार आहेत. अमेरिकेच्या सॅन डिएगो येथे नासामार्फत आयोजित अंतराळ संशोधन अभ्यासासाठी अपूर्वा आणि लीना यांना निवडले होते. अपूर्वा अवकाश शिक्षिका, तर लीना उद्योजिका आहेत.
 
इस्रोच्या ‘चांद्रयान-२’ चे २२ जुलैला यशस्वीपणे प्रक्षेपण करण्यात आले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ७ सप्टेंबर रोजी ‘विक्रम’ लँडेर अलगदपणे उतरणार आहे. त्यानंतर ‘प्रज्ञान’ नावाचा रोव्हर तेथील माहिती संकलन करून ती इस्रोला पाठवणार आहे. ही मोहीम कशा प्रकारे काम करते? आणि या मोहिमेचा उद्देश काय? तसेच अवकाश तंत्रज्ञानात युवकांना कोणत्या संधी आहेत, अशा विविध मुद्यांवर अपूर्वा आणि लीना बोलणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष विनय र. र. यांनी दिली.

फेविक्रिल आणि पार्किन्सन डिसीज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी यांच्यातर्फे रंगोत्सव साजरा

मिनी कॅनव्हासच्या सहाय्याने भारताचा सर्वात मोठा नकाशा बनवून लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्याचा प्रयत्न

  मुंबई : पिडीलाईट इंडस्ट्रीजच्या फेविक्रिल या कला आणि हस्तकला क्षेत्रातील आघाडीच्या ब्रॅण्डतर्फे #AllCanArt हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘फ्लुइड आर्टटेक्निक’चा वापर करून कौशल्य आणि परिपूर्णतेच्या कल्पनांच्या पलीकडे प्रत्येकाला कलेसाठी प्रोत्साहित करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे. सर्वसाधारणपणे रंग व चित्रकला यांच्याविषयी तांत्रिक माहिती नसल्याने लोक कॅनव्हासवर आपली कल्पना मांडण्यास टाळाटाळ करतात. परंतु ‘फ्लुइड आर्ट’मुळे लोकांना मुक्तपणे पेंटिंग करण्याची आणि आपली सर्जनशीलता दाखवून देण्याची संधी मिळते.

 #AllCanArt चा एक भाग म्हणून, फ्लुईड आर्ट तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रातील लोकांनी बनविलेल्या पेंटिंग्ज आणि मिनी कॅनव्हसेससह, भारताच्या सर्वात मोठ्या नकाशासाठी लिम्का रेकॉर्ड तयार करण्याचे ‘फेविक्रिल’ने लक्ष्य बाळगले आहे.

 पार्किन्सन डिसिज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी (पीडीएमडीएस) या संस्थेच्या आवारात या उपक्रमाची नुकतीच सुरुवात करण्यात आली. पीडीएमडीएस ही स्वयंसेवी संस्था पार्किन्सन या आजाराने ग्रस्त असलेल्यांना समुदाय आधारित मदत केंद्रांमध्ये ‘मल्टीडिस्प्लीनरी थेरपी’ देते. पार्किन्सनने ग्रस्त लोकांना मुक्त शारिरीक हालचाली आणि समन्वय यांची अडचण भासत असते. याही परिस्थितीत ‘फ्लुइड आर्ट टेक्निक’मुळे त्यांना कॅनव्हासवर चित्रकलेचे प्रयोग करणे सहज साधते. याचे कारण या तंत्रामध्ये कोणत्याही व्यावसायिक कौशल्याची आवश्यक नाही.

 पार्कीन्सनच्या 60 हून अधिक रुग्णांनी ‘फेव्हिक्रील’च्या कार्यशाळेत भाग घेतला आणि ‘फ्लुइड आर्ट’ तंत्राचा वापर करून कॅनव्हासवर रंग भरून आपली सर्जनशीलता मुक्त  केली. शारिरीक समस्यांना सामोरे जाण्याचे आव्हान असूनही, या विशिष्ट कला प्रकारामुळे या रुग्णांना त्यांच्यात लपलेल्या कलाकौशल्याचे प्रदर्शन मांडण्याची संधी मिळाली.

 ‘पार्किन्सन डिसिज अँड मूव्हमेंट डिसऑर्डर सोसायटी’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मारिया बरेटो म्हणाल्या, “आमच्या रुग्णांना #AllCanArt उपक्रमात सहभागी  होण्याची भारी संधी मिळाली. आमचा विश्वास आहे की त्यांच्या भावनिक आरोग्यासाठी आणि एकंदरीत कल्याणासाठी कला ही अतुलनीय योगदान देऊ शकते. सर्जनशील अभिव्यक्ती सक्षम केल्यामुळे रुग्णांना ही कला आरामशीर वाटली. आमच्या पार्किन्सनच्या सहाय्य गटाच्या सदस्यांनी या सत्राचा पुरेपूर आनंद लुटला.  पूर्वी कधीही न अनुभवलेली कौशल्ये शोधण्याचा हा प्रयोग खरोखरीच अवर्णनीय होता, असे त्यांनी म्हटले. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही फेविक्रिल आणि ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज’चे आभारी आहोत. तसेच ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’चा भाग होण्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे.”

 ‘पिडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड’च्या कंझ्युमर प्रॉडक्ट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु भांजा म्हणाले, “#AllCanArt च्या माध्यमातून, आम्ही हे सांगू इच्छितो की आता सर्जनशील मन असणारी कोणतीही व्यक्ती आता सहजपणे पेंटिंग करू शकेल व स्वतःमधील जादू दाखवू शकेल. त्यासाठी तिला औपचारिक प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नाही. फ्लुइड आर्ट ही मुक्तपणे उपलब्ध आहे. एखाद्या हौशी कलाकाराद्वारेदेखील तिचा सराव करून मोठ्या कलाकृती बनविता येतात. त्यामुळे प्रत्येकासाठी हा एक उत्कृष्ट कलाप्रकार बनला आहे. पीडीएमडीएसमधील रुग्णांनी या  कार्यशाळेचा अनुभव घेतल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे आणि अशा प्रकारच्या सहकार्यांचीच आम्हाला अपेक्षा आहे.”

 या उपक्रमाचा दुसरा भाग मालाड येथील एमकेईएस स्कूल येथे शुक्रवार, दि. 2 ऑगस्ट रोजी होईल. येथे 300 हून अधिक शालेय विद्यार्थी या अनोख्या कला प्रकारात त्यांचे हात रंगवून घेतील. त्याचप्रमाणे शहरभरातील कॉर्पोरेट्सकडून कॅनव्हासेस तयार करुन त्यांचे योगदान दिले जाईल.

 त्यानंतर 11 ऑगस्ट रोजी ‘सीवूड्स ग्रँड सेंट्रल मॉल’मध्ये भारताचा सर्वात मोठा नकाशा तयार करण्यासाठी सर्नशील कलाकृती एकत्र ठेवल्या जातील. त्यांचे अनावरण 11 ऑगस्ट रोजी होऊन स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल.

 ‘पिडीलाईट’बद्दल :

पिडीलाईट इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी अधेजिव्हज आणि सीलंट्स, बांधकामासाठीची रसायने, कारागीर उत्पादने, डीआयवाय (डू-इट-यूवरसेल्फ) उत्पादने आणि पॉलिमर इमल्शन्स यांची अग्रगण्य निर्माती आहे. आमच्या उत्पादनांच्या श्रेणीमध्ये पेंट रसायने, ऑटोमोटिव्ह रसायने, कला साहित्य आणि स्टेशनरी, फॅब्रिक केअर, देखभालीची रसायने, औद्योगिक अधेजिव्हज, औद्योगिक रेजिन आणि सेंद्रीय रंगद्रव्ये आणि त्यांची मिश्रणे हीदेखील समाविष्ट आहेत. यातील बरीच उत्पादने आमच्या अत्याधुनिक इन-हाऊस विकास व संशोधन विभागात विकसित करण्यात आलेली आहेत. फेव्हिकॉल हे आमचे ब्रॅन्डेड उत्पादन देशभरातील कोट्यवधी नागरीक नियमितपणे वापरत असतात. देशातील सर्वात विश्वासार्ह ब्रँडमध्ये त्याला स्थान मिळालेले आहे. एम-सील, फेविक्विक, फेविस्टीक, रॉफ, डॉ. फिक्सिट आणि फेव्हिक्रील ही आमची अन्य काही ब्रॅन्डेड उत्पादने आहेत.

लॅसिक लेझर द्वारा चष्मा घालविण्यासाठी शस्त्रक्रिया

0
पुणे : ‘एशियन आय हॉस्पिटल’ च्या ‘एशियन आय फाउंडेशन’ या चॅरिटेबल शाखेच्या वतीने नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ९, १० आणि ११ ऑगस्ट २०१९ रोजी संस्थेच्या ३४ व्या वर्धापन दिनानिमित्त हे शिबीर होणार आहे. या शिबिरात लॅसिक लेझर द्वारा चष्मा घालविण्यासाठी शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्यात येणार आहेत. यात तपासणी, गॉगल व औषधे मोफत देण्यात येतील, अशी माहिती नेत्रतज्ञ डॉ. वर्धमान कांकरिया यांनी पत्रकाद्वारे दिली.
शिबिराचा हेतू सांगताना डॉ. कांकरिया म्हणाले, ‘चष्मा हा आज दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. चष्म्यामुळे लोकांना बऱ्याच संधींना मुकावे लागते. आज जर सैन्यात जायचे असेल, पोलिसांत भरती हवी असेल, तसेच मुलींना लग्नामध्ये अडचणी येतात. या सामाजिक दृष्टिकोनांचे भान ठेवून चष्मा घालविण्यासाठी लेझर शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.’
युवक-युवतींना केवळ चष्मा असल्याने विवाह व नोकरीच्या वेळी अडचण निर्माण होते. त्यांना महत्वाच्या संधी गमवाव्या लागतात, म्हणून दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात येते. साधारणपणे १८ ते ४० वयोगटातील लोकांवर चष्मा घालविण्यासाठी लॅसिक, फेम्टोलॅसिक, रिलेक्स स्माईल या प्रगत जर्मन तंत्रज्ञानावर आधारित उपचार पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे.
ही लेझर पद्धती लॅसिक, ब्लेडविरहित लॅसिक व स्माईल लेझर (जर्मनी) या जगातील सर्वोत्कृष्ट उपकरणांवर होते. लेझरला १० मिनिटे लागतात. तसेच यासाठी कोणतेही भूल, इंजेक्शन, टाके पद्धतीची गरज नसते. लेझरनंतर ३ दिवसांमध्ये दैनंदिन कामाला सुरुवात करू शकतो.’
डॉ. कांकरियांनी १९८५ सालापासून चष्मा घालविण्याच्या शस्त्रक्रिया सुरू केल्या. व मागील ३४ वर्षांपासून असंख्य रुग्णांचे चष्म्याचे नंबर घालविले आहेत. लॅसिक लेझरचे जनक प्रोफेसर पॅलिकॅरिस (अमेरिका) यांच्याकडे शिकणारे डॉ. वर्धमान कांकरिया हे एकमेव भारतीय नेत्रतज्ञ आहेत.
‘एशियन आय हॉस्पिटल’ला महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट नेत्रालय पुरस्कारही नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते देण्यात आला. ‘एशियन आय फाउंडेशन’ ही एशियन आय हॉस्पिटलची चॅरिटेबल शाखा आहे.

 अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी :-
‘एशियन आय हॉस्पिटल’, पुणे स्टेशनजवळ, जहागीर नर्सिंग होम समोर, पुणे.
फोन नं. : ०२०-२६१६२४२४ / ७०६६४२४६९९ सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत संपर्क साधावा.

टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स एकत्र येऊन भारतातील इलेक्ट्रिक दळणवळणाला देणार चालना

महत्त्वाच्या शहरांमध्ये ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार

प्रारंभिक ऑफर म्‍हणून टाटा मोटर्स ईव्‍ही ग्राहक पुढील ३ महिन्‍यांसाठी घेऊ शकतात मोफत चार्जिंगचा लाभ

पुणे-टाटा पॉवर आणि टाटा मोटर्स यांनी आर्थिक वर्ष २०च्या अखेरीपर्यंत वेगवान चार्जिंगची सुविधा देणारी ३०० केंद्रे उभारण्यासाठी भागीदारी करत असल्याची घोषणा केली आहे. मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरु आणि हैदराबाद अशा पाच महत्त्वाच्या शहरांमध्ये ही केंद्रे उभारली जातील. या दोन्ही कंपन्यांनी एकत्रितरित्या पुण्यात त्यांच्या पहिल्या सात चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन केले. यामुळे, शहरातील ईलेक्ट्रिक दळणवळणाला चालना मिळणार आहे. पुढील दोन महिन्यांत इतर चार शहरांमध्ये आणखी ४५ चार्जर्स बसवण्यात येणार आहेत. टाटा मोटर्स डीलरशीप्स, टाटा ग्रुपची काही रीटेल आऊटलेट्स तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी ही केंद्रे उभारली जातील.

सुरूवातीच्‍या ५० चार्जर्ससाठी भारत स्टँडर्ड (१५ किलोवॅट) मानांकनानुसार चालवल्या जाणाऱ्या या चार्जर्सचे कार्यचलन टाटा पॉवरकडे असेल. अधिक पुढे जात आम्‍ही ३०-५० किलोवॅट डीसी सीसीएस२ स्‍टँडर्ड मानांकनानुसार चालवली जाणारी चार्जिंग स्‍टेशन्‍स देखील सादर करणार आहोत. वरील मानांकनांसाठी सुयोग्य अशा कोणत्याही गाडीसाठी इलेक्ट्रिक वाहन चालकाला हे चार्जर्स वापरता येतील. टाटा मोटर्स ईव्ही ग्राहकांसाठी टाटा पॉवर आणि टाटा मोटर्सतर्फे आकर्षक दर सादर करण्यात आले आहेत.

या प्रसंगी टाटा पॉवरचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीप्रवीर सिन्हा म्हणाले, “हरित तंत्रज्ञान पर्याय उपलब्ध करून देण्याची सरकारची महत्त्वाकांक्षा ध्यानात घेऊन भारताला ईव्हीसाठी सज्ज करण्यास आणि भारतातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आम्ही बांधिल आहोत. सर्व भारतीयांना वेगवान ईव्ही चार्जिंग सहज उपलब्ध व्हावे, हा आमचा उद्देश आहे. यात टाटा मोटर्ससोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. त्यांच्यासोबत आम्ही संभाव्य ईव्ही चालकांना सोयीची पडतील अशी प्राधान्यक्रमाची ठिकाणे शोधली आहेत.”

या भागीदारीबद्दल टाटा मोटर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीगुंटर बुश्चेक म्हणाले, “भारतात सर्वसमावेशक ईव्ही चार्जिंगची सुविधा विकसित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकताना टाटा पॉवरसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद आहे. परिपूर्ण परिसंस्था पर्याय आणि आमच्या ग्राहकांना मन:शांती देण्याच्या आमच्या प्रवासात ही भागीदारी म्हणजे एक महत्त्वाचा टप्पा आहे. दळणवळणाचे शाश्वत पर्याय देण्यास आम्ही बांधिल आहोत आणि ग्राहकांसाठी महत्त्वाकांक्षी ई-मोबिलिटी पर्याय सातत्याने सादर करून देशातील ईलेक्ट्रिक व्हेइकल्सच्या वापरासाठी प्रयत्न करत राहू.”

मुंबईत सध्या टाटा पॉवरच्या ईव्ही सुविधांमध्ये ४२ केंद्रे आहेत आणि हैदराबाद, बेंगळुरु व दिल्ली अशा अनेक शहरांमध्ये या सेवा उपलब्ध आहेत. विविध ठिकाणी अशी ८५ चार्जिंग केंद्रे सध्या सुरू आहेत. एचपीसीएल, आयओसीएल आणि आयजीएल रीटेल आऊटलेट्समध्ये व्यावसायिक पातळीवरील ईव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी कंपनीने महत्त्वाचे सामंजस्य करार केले आहेत. याआधीही कंपनीने टाटा मोटर्ससोबत भागीदारी करत महाराष्ट्रात सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापून ई-मोबिलिटीला चालना देण्याच्या राज्य सरकारच्या मोहिमेला साह्य केले होते.

इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ पुस्तकाचे प्रकाशन

0
पुणे :
‘डॉ.अब्दुल कादर मुकादम यांचे ‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ हे पुस्तक मराठी भाषेत इस्लामी तत्वज्ञानाची मांडणी करणारे महत्वपूर्ण पुस्तक आहे, संवेदनशील विषयावर त्यांनी केलेली मांडणी वस्तुनिष्ठ आणि विवेकवादी परंपरा पुढे नेणारी आहे .पुरोगामी संघटनांनी , इस्लामविषयी जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने  हे पुस्तक मुळातून वाचले पाहिजे, ‘  असे उद्गार   राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी काढले.
‘इस्लाम :ज्ञात आणि अज्ञात ‘ या डॉ. मुकादम लिखित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देवी,प्रमोद मुजुमदार,  अन्वर राजन ,कलिम अजीम    यांच्या हस्ते झाले. त्यावेळी डॉ. देवी बोलत होते. याच कार्यक्रमात डॉ. मुकादम यांचा सत्कार करण्यात आला.
देवी पुढे म्हणाले, ‘भाषा आणि तत्त्वज्ञानाची सांगड या  पुस्तकात घालण्यात आलेली आहे .राष्ट्र सेवा दलात  मुकादम यांची जडणघडण झाल्याने सेवा दलाचे संस्कार त्यांच्या लिखाणात दिसून येतात .मी या पुस्तकाचा कानडी अनुवाद करण्यासाठी प्रयत्न करेन आणि लवकरच ते कानडी वाचकांनाही उपलब्ध करून देण्यात येईल . ‘
यावेळी बोलताना डॉक्टर मुकादम म्हणाले , ‘मागील पंधरा वर्षांपासून इस्लाम फोबिया सुरू आहे .मी इस्लाम तत्वज्ञानाची मांडणी आणि अभ्यास 40 वर्षांपासून करीत आलो आहे .त्यासाठी मी पाश्चात्य संदर्भ वापरले आहेत. इस्लाम बद्दल मराठीत वाचायला  मिळणारे लेखन  शंकास्पद आहे. ‘
‘पुरोगामी संघटनांच्या सहवासातून माझी वैचारिक जडणघडण झाली इस्लाम कडे पाहण्याचा दृष्टिकोण निर्माण झाला ‘,असेही त्यांनी सांगितले .
साने गुरुजी स्मारक ( राष्ट्रसेवा दल )येथे नुकताच (29  july )हा प्रकाशन समारंभ झाला. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद मुजुमदार यांनी डॉ. मुकादम यांची प्रकट मुलाखत घेतली .सर्फराज अहमद यांनी सूत्रसंचालन केले .’दि मुस्लिम अकादमी’ ,’दक्षिणायन ‘आणि ‘ सलोखा’ या संस्थांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .
यावेळी अन्वर राजन ,कलिम अजीम, मिनार सय्यद, अन्वर शेख,शमसुद्दीन तांबोळी ,प्रवीण सप्तर्षी, हयात मोहम्मद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते

जुगारात बायकोही हरला, मित्रांनी केला सामूहिक बलात्कार-उत्तर प्रदेश ची गुन्हेगारी

0

जाफराबाद -उत्तर प्रदेशमधील जौनपूरमध्ये सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका जुगाऱ्याने आपल्या पत्नीलाही पणाला लावले. तो जुगार हारल्यानंतर पतीच्या मित्रांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. पीडित महिलेने यासंदर्भात पोलिसांकडे धाव घेतली असता पोलिसांना गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यानंतर या महिलेने थेट न्यायलयात धाव घेतल्यानंतर या सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जफराबाद पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हे प्रकरण असून आरोपी पतीला दारुचे आणि जुगाराचे व्यसन आहे. अरुण आणि अक्षय या दोन मित्रांबरोबर राहत्या घरी जुगार खेळताना सर्व पैसे संपल्याने त्याने आपल्या पत्नीलाच पणाला लावले. पत्नीला पणाला लावल्यानंतर डाव हरल्यानंतर या व्यक्तीच्या मित्रांनी त्याच्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केला. या सर्व प्रकाराने हदरलेल्या या महिलेने पोलिसांकडे धाव घेतली मात्र पोलिसांनी या आरोपींविरुद्ध तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला. त्यामुळेच ही महिला स्वत:च्या माहेरी जाऊन राहू लागली. हे सर्व प्रकरण मागील वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये घडले आहे.

महिलेने केलेल्या तक्रारीनुसार ती माहेरी जाऊन राहयला लागली. मात्र तिचा पती सतत तिला फोन करुन घरी परत येण्यास सांगायचा. अखेर ९ डिसेंबर २०१८ रोजी पतीने सासरवाडीला जाऊन या महिलेला पुन्हा असं वागणार नाही असं सांगत तिची माफी मागून तिला परत घरी घेऊन येण्यास निघाला. मात्र वाटेतच त्याने गाडी थांबवून अरुण आणि अनिल या मित्रांना गाडीमध्ये बसवले. या दोघांनी पुन्हा या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात पोलिसही लक्ष घालत नसल्याने न्यायलयाकडे तक्रार करावी लागत असल्याचे महिलेने याचिकेमध्ये म्हटले आहे. त्यामुळेच आता न्यायलयाने पोलिसांना फैलावर घेत या प्रकरणात गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायलयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवून घ्यावा असा आदेश न्यायलयाने दिला आहे. तसेच गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर एफआयआरची एक प्रत न्यायालयात द्यावी असे आदेशही पोलिसांना देण्यात आले आहेत.

भाजपला बॅलेट पेपर ची भीती का वाटते ? ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्टला मोर्चा

0
मुंबई-आमच्या एवढ्या जागा येतील ,मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या ना बॅलेट पेपरची भीती का वाटते आहे ?असा सवाल करत ‘ईव्हीएम’ हद्दपार करून पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी मैदानात उतरलेले महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद बोलावली . मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शेकापचे जयंत पाटील, लोकभारतीचे कपिल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते .जनतेकडून अर्ज भरून घेणार आहे कि आम्हाला बॅलेट पेपर वर मतदान हवे आहे ..त्यानंतर २१ ऑगस्ट ला मोर्चा काढण्यात येणार आहे. आमच्या इव्हिएम मशीन ची मशीन अमेरिकेत बनून येणार असेल तर आम्ही त्यावर विश्वास कसा ठेवायचा ? असा हि सवाल या वेळी करण्यात आला .इव्हिएम वर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनीही अविश्वास दाखविला आहे .असेही यावेळी सांगण्यात आले .

निवडणूक होत असताना पारदर्शकता बाळगली गेलीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. त्याचमुळे ईव्हीएमला आमचा विरोध आहे. विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली गेली पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली. लोकशाहीत हे घडता कामा नये असेही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सगळ्यांच्या वतीने भूमिका मांडली आणि त्यामध्ये त्यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीत EVM नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली आहे.  ईव्हीएम विरोधात २१ ऑगस्ट रोजी आम्ही मोर्चा काढणार आहोत. ही जनभावना आहे त्यामुळे या मोर्चात एकाही पक्षाचा झेंडा नसेल. लोकांचं म्हणणं काय आहे? ते आम्ही मांडणार आहोत असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ईव्हीएमला विरोध करण्यासाठीच आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यायला हवी ही आमची नाही तर जनतेची भावना आहे ती आम्ही मांडतो आहोत असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जपान, नेदरलँड आणि अमेरिकेत या तीन देशांमध्येच Evm ची चीप तयार होते. अमेरिकेत ट्रम्प यांच्या निवडीवरच प्रश्न निर्माण झाला आहे अशात आम्ही त्याच देशात आमच्या देशातल्या Evm ची चीप आणली जाते तर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.  ३७१ मतदारसंघांमध्ये घोळ आहे, ५४ लाख मतांचा गोंधळ आहे असाही आरोप राज ठाकरे यांनी केला.

ज्या देशांनी ईव्हीएमची निर्मिती केली किंवा पद्धत अंगिकारली त्या देशांनीही आता ईव्हीएमची पद्धत बाजूला ठेवली आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे तर लोक तुम्हाला पुन्हा निवडणून देतील. तुम्हाला बॅलेट पेपरला घाबरण्याची गरज काय? असं छगन भुजबळ यांनी विचारलं आहे. लोकांची भावना लक्षात घेऊन आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. लोकांची भावना काय आहे ते लक्षात घेण्यासाठी आम्ही घराघरांमधून ईव्हीएम नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी करणारा एक फॉर्म महाराष्ट्रातल्या घरांघरांमधून भरुन घेतला जाईल असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मातंग समाजासाठी १ लाख घरे – मुख्यमंत्र्यांची घोषणा

0

मुंबई, दि. ०१ : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन रंगशारदा सभागृह, वांद्रे येथे केले होते. त्यावेळी श्री.फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, अण्णा भाऊ साठे यांनी ४९ वर्षाच्या खडतर आयुष्यात वंचित शोषितांच्या व्यथांना आपल्या साहित्यातून आवाज दिला. अण्णा भाऊंची साहित्य निर्मिती जगासाठी आकर्षण बिंदू होती. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये भाषांतरीत होण्याचा विक्रम आहे. यातच त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्य दिसून येते. अण्णा भाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचार, साहित्य शेवटच्या घटकांपर्यत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.

मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी जे जे प्रयत्न करावे लागतील त्यासाठी शासन पूर्ण ताकदीनिशी योगदान देईल. मातंग समाजाला एक लाख घरे देण्यात येतील. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल. यासाठीही आवश्यक तो निधी देण्यात येईल. क्रांतिवीर लहूजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाने मातंगांच्या विकासासाठी केलेल्या शिफारशीचीही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सर्वसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अण्णा भाऊ साठे यांनी सदैव प्रयत्न केले. शासनाच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जन्मशताब्दी वर्षात प्रयत्न करु.

वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले, अण्‍णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. वंचितांसाठी लढणाऱ्या अण्णांचे टपाल तिकीट केंद्र सरकारने केवळ आठच दिवसात मंजूर केले. वंचितांच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहू.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी अण्णा भाऊंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर महामंडळामार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते टपाल तिकिटाचे अनावरण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम, जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद्‌घाटन तसेच जळगाव तरुण भारतच्या जन्मशताब्दी विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले.

यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आमदार दिलीप कांबळे, सुधाकर भालेराव, भाई गिरकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, पोस्ट मास्तर जनरल मुंबई क्षेत्राच्या श्रीमती स्वाती पांडे व नागरिक उपस्थित होते.

महाराष्ट्रातील उद्योगात भूमिपुत्रांना ८० टक्के प्राधान्य – उद्योगमंत्री सुभाष देसाई

0

मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्यात उभारल्या जाणाऱ्या उद्योगातील नोकरीत स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. आजही राज्यातील उद्योगात भूमिपुत्रांना 80 टक्के प्राधान्य दिले जाते, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

श्री. देसाई म्हणाले, सध्या राज्यात 3 हजार 52 मोठे व विशाल प्रकल्प असून त्या माध्यमातून 9 लक्ष 69 हजार 495 रोजगारांची निर्मिती झाली आहे. यात पर्यवेक्षीय श्रेणीत 84 टक्के तर इतर श्रेणीत 90 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाली आहे. तर, 10 लक्ष 26 हजार 992 सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमंच्या माध्यमातून सुमारे 60 लक्ष रोजगार निर्मीती झाली आहे. त्यातही पर्यवेक्षीय श्रेणीत 84 टक्के तर इतर श्रेणीत 90 टक्के स्थानिकांना नोकरी मिळाली आहे.

भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये, यासाठी हे धोरण अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात उद्योग स्थापन करणाऱ्या कंपन्यांना वस्तु व सेवा कराच्या परताव्यातून दरवर्षी उद्योगाने केलेल्या भांडवली गुंतवणुकीवर अनुदान दिले जाते. 2018 – 19 यावर्षी ही परताव्याची एकूण रक्कम (पीएसआय) रुपये 3035 कोटी रुपये होती. नव्या प्रस्तावानुसार जे उद्योग राज्य निर्णयाप्रमाणे स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्यांचे बंधन पाळणार नाहीत, त्यांच्या प्रोत्साहन रकमेचा परतावा रोखून धरण्यात येईल. या आर्थिक नाकेबंदीमुळे महाराष्ट्रात स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये डावलण्याची हिम्मत कोणतीही कंपनी दाखवू शकणार नाही.

स्थानिकांना उद्योगात नोकरीत प्राधान्य द्यावे या धोरणाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याला तर राज्यस्तरावर उद्योग आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत आहे. राज्यातील उद्योजकांनी या संदर्भातील माहिती ऑनलाईन भरणे आवश्यक करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यापुढे कंत्राटी कामगारांचीही नोंद करुन त्यातही भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.

स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के नोकऱ्या दिल्याच पाहिजे, असा शासन निर्णय 1968 मध्ये जारी करणारे महाराष्ट्र हे पहिले व एकमेव राज्य आहे.

18 नोव्हेंबर 1968 रोजी महाराष्ट्र शासनाने पहिला शासन निर्णय जारी केला, आणि दुर्लक्षित मराठी तरुण-तरुणींसाठी नोकऱ्यांचे दरवाजे उघडले, अशी माहितीही श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

भाजपा हाऊसफुल्ल, आता भरती बंद – मुख्यमंत्री

0

मुंबई-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली आहे. अमरावतीमधील गुरुकुंज मोझरी येथून जनयात्रेला सुरुवात केली असून यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या सरकारने १५ वर्षात केलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवलं असा दावा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. पुन्हा भाजपाचं सरकार येणार असल्याचा आत्मविश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील यावेळी उपस्थित होते.

भाजपात सुरु असलेल्या पक्ष प्रवेशावर बोलताना आता भाजपा कोणाच्याही मागे फिरत नाही. वेगवेगळे नेते, पुढारी आमच्या मागे फिरतात आणि प्रवेश द्या अशी विनंती करतात. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो बाकीच्यांना हाऊसफुल्ल आहे सांगतो असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. “दुष्काळाशी हात करण्यासाठी पुढची पाच वर्ष घालवायची आहेत असं सांगताना पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही”, असा निर्धार त्यांना यावेळी व्यक्त केला.

“जनता हीच आमची राजा आहे. जनता आमचं दैवत आहे. आम्ही मालक नाही, सेवक आहोत”, असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “तसंच आपण केलेली कामं हे जनतेकडे जाऊन सांगायचं आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी चाललो आहे. आपण केलेल्या कामांची माहिती देणार आहोत आणि पुन्हा एकदा जनादेश घेऊन येणार आहोत”, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात सर्व समस्या आम्ही संपवल्या असा दावा करणार नाही, पण गेल्या सरकारने १५ वर्षात केलं नाही त्याच्यापेक्षा दुप्पट आम्ही करुन दाखवलं असं सांगत विरोधकांवर टीका केली. तसंच कोणत्याही व्यासपीठावर येऊन चर्चा करायला आपण तयार आहोत असं खुलं आव्हान विरोधकांना दिलं. जर आपला पराभव झाला तर जनादेश घेण्यासाठी बाहेर पडणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

आपण केलेल्या कामाचा पाढा वाचताना विदर्भात गेल्या पाच वर्षात दीड लाख शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पैसा विदर्भाच्या नावे घ्यायचा आणि आपल्या खिशात टाकायचा अशी अवस्था होती अशी टीका मागील सरकारवर करताना युतीच्या सरकारने उद्योग आणले असं त्यांनी सांगितलं.

“३० हजार किमीचे रस्ते बांधले असं सांगताना आजपर्यंत कोणी करुन दाखवलं नाही पण या महाराष्ट्र सरकारने करुन दाखवलं”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्राचा शिक्षणातला क्रमांक १८ वा होता, फक्त तीन वर्षात देशावर तिसऱ्या क्रमांकावर आणण्याचं काम आमच्या सरकारने केलं. येत्या काळात पहिल्या क्रमांकावर येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

“औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देशात सर्वात जास्त रोजगार निर्मिती महाराष्ट्रात झाली. देशात जेवढी रोजगार निर्मिती झाली त्यातील २५ टक्के राज्यात झाली”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. “याआधीच्या सरकारमधील नेते जेव्हा दिल्लीला जायचे तेव्हा हात हलवत परत यायचे. पण मी जेव्हा कधी दिल्लील गेलो तेव्हा मोदींनी मला भरभरुन दिलं. मोदींनी महाराष्ट्राला काही कमी पडू दिलं नाही”, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी मोदींचे आभार मानले.

शपथ घ्या …पवारसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ हे कर्तव्य -राष्ट्रवादीवर कार्यकर्त्यांना शपथ देण्याची वेळ

0

पुणे : फडणविसांच्या जादू टोण्यापुढे मेगा ओहोटी सुरु असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर  आपल्या कार्यकर्त्यांना ,पदाधिकाऱ्यांना आज शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी शपथ देण्याची वेळ आली . पुण्यात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी युवा संवाद कार्यक्रमात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत ही शपथ अंकुश काकडे यांनी दिली .

काय दिली गेली शपथ?
‘मी आज शपथ घेतो, की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा क्रियाशील कार्यकर्ता आहे. आदरणीय श्री. शरदराव पवार यांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांशी माझी बांधिलकी आहे.

गेली 55 वर्षे राजकारणात आपला ज्यांनी वेगळा ठसा निर्माण केला.

अशा पवारसाहेबांच्या कठीण काळात त्यांना साथ देणे, हे माझे प्रथम कर्तव्य आहे आणि त्यासाठी पडेल ते कष्ट घेण्यास मी सदैव तत्पर राहीन. माझ्या शरीरात जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत मी पवार साहेबांची साथ सोडणार नाही. जयहिंद! जय महाराष्ट्र ! जय राष्ट्रवादी !