Home Blog Page 287

भारतातील यस बँक जपानी सुमितोमो बँकेला विकण्याच्या व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करा: विश्वास उटगी

यस बँकेची विक्री भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा आणणारी, कोणाच्या हितासाठी यस बँक विक्रीचा घाट घातला जात आहे.

मुंबई, दि. ३० मे २०२५
जपानमधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशनने (SMBC) अलीकडेच भारतातील खाजगी क्षेत्रातील महत्वाच्या YES बँकेत सुमारे ₹१३,००० कोटींची गुंतवणूक करून २०% हिस्सा विकत घेतला आहे. पुढील टप्प्यात ₹३०,००० कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करून ५१% हिस्सेदारीसह YES बँकेवर संपूर्ण ताबा मिळवण्याची त्यांची योजना आहे. हा व्यवहार भारताच्या बँकिंग सार्वभौमत्वावर गदा असून या संपूर्ण व्यवहाराची न्यायालयीन चौकशी करावी तसेच ही यस बँक परदेशी बँकेच्या हाती जाऊ देऊ नये, अशी मागणी बँकिंग क्षेत्रातील अभ्यासक व काँग्रेस नेते विश्वास उटगी यांनी केली आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना विश्वास उटगी म्हणाले की, सध्या YES बँक आर्थिकदृष्ट्या सुदृढ स्थितीत आहे. या बँकेत ₹२,८५,००० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर कर्जवाटप ₹२,४८,००० कोटीचे आहे, गुंतवणूक पोर्टफोलिओ ₹८६,००० कोटींचा आहे. अशा चांगल्या स्थितीत असलेली YES बँक RBI आणि केंद्र सरकार एका परदेशी बँकेकडे का सोपवत आहे? YES बँक एकेकाळी आर्थिक संकटात होती पण RBI व केंद्र सरकारने “Too Big To Fail” या संकल्पनेअंतर्गत बँकेला वाचवले आहे. भारतीय स्टेट बँक आणि आठ खासगी बँकांनी लोकांचे पैसे गुंतवून YES बँकेचे पुनरुज्जीवन केले आहे. SBI कडे या बँकेचा सध्या सुमारे २४% हिस्सा आहे आणि २०२० पासून प्रशांत कुमार यांच्या नेतृत्वाखाली YES बँकेचा कारभार SBI संचलित करत आहे. तर मग आता केंद्र सरकार आणि RBI यस बँकेतील आपला हिस्सा जपानी बँकेला का विकत आहे? हे कुणाच्या हितासाठी आहे? असे प्रश्न उटगी यांनी उपस्थित केले आहेत.

या व्यवहारावर महत्त्वाचे धोरणात्मक प्रश्न निर्माण झाले आहेत. बँकिंग नियामक संस्था म्हणून रिझर्व्ह बँकेची भूमिका काय आहे? अर्थ मंत्रालय आणि केंद्र सरकार यांची जबाबदारी काय आहे? सेबी, जो शेअर बाजाराचा नियामक आहे, तो गप्प का? एक व्हिसलब्लोअरचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट सध्या सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध झाला आहे (२०१४–२०२५ कालावधीसाठीचा YES बँकेचा). हा रिपोर्ट बँकेतील गंभीर आर्थिक गैरव्यवहार, NPA विक्रीतील संशयास्पद व्यवहार, तसेच चुकीच्या पद्धतीने नफा दाखवण्यासारख्या गंभीर प्रकारांची माहिती देतो. पण केंद्र सरकार, RBI आणि इतर संबंधित संस्थांनी या रिपोर्टकडे दुर्लक्ष केले आहे. परंतु सेबी, रिझर्व्ह बँक व अर्थ मंत्रालय यांचे उत्तरदायित्व निश्चित करावे, यस बँकेचा सुमितोमो बँकेकडून होणारा ताबा त्वरित थांबवावा. जर यस बँकेसारखी नव्या पिढीची खासगी बँक परदेशी बँकेकडे सहज विकली जात असेल, तर मग भारतातील कोणतीही बँक सुरक्षित राहणार नाही. हा व्यवहार झाला तर IDBI बँकसह इतर सार्वजनिक बँकांनाही अशाच “स्पॉन्सर केलेल्या” गुंतवणूकदारांकडून ताब्यात घेण्याचा धोका निर्माण होईल.

सार्वजनिक बँकिंग व्यवस्था ही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या कणा आहेत. देशाला मजबूत सार्वजनिक तसेच खासगी बँकिंग व्यवस्था हवी आहे त्यामुळे YES बँक जर खरोखरच अपयशी ठरत असेल तर तिचा ताबा स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा इतर सार्वजनिक बँकेकडे दिला जावा. १९६९ साली बँकांचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर गेल्या ५६ वर्षांत अनेक खासगी बँका सार्वजनिक बँकांमध्ये विलीन करण्यात आल्या आहेत. RBI आणि केंद्र सरकारने या प्रश्नांना उत्तर द्यायलाच हवे, असे विश्वास उटगी यांनी म्हटले आहे.

विश्वनाथ दा कराड यांना ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग’ ह्या पुरस्कारा ची घोषणा

अमेरिकेहून प्रतिनिधी २ जून ला पुण्यात येऊन करतील सत्कार!

पुणे दि.३० मे: गेल्या चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्वज्ञान, अध्यात्म, जागतिक शांती, सांप्रदायिक सद्भाव, वैश्विक बंधुत्व आणि इतर क्षेत्रात अहोरात्र कार्य करणारे, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, यांना अमेरिकेतील विविध संस्थांतर्फे ‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस, हार्मोनी अँड इंटरफेथ डायलॉग’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य रेक्टर प्रो.डॉ. मधू कृष्णन यांनी दिली.  
विश्वशांतीसाठी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या समर्पित जीवनाची दखल घेत यूएसए येथील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस यांच्या वतीने हा पुरस्कार २ जून २०२५ रोजी दुपारी ४ वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या संत ज्ञानेश्वर सभागृहा मध्ये देण्यात येणार आहे. यूएसए येथील या संस्थेचे प्रतिनिधी स्वतः पुण्यात येऊन डॉ. विश्वनाथ कराड यांच्या सत्कार करणार आहेत.
तसेच, डॉ. कराड यांना चार सन्मानपत्र ही देण्यात येणार आहेत. यामध्ये ‘द अमेरिकन युनिव्हर्सिटी यूएसए’, यांच्या वतीने ‘प्रोमोनन्ट ऑफ ग्लोबल पीस अवार्ड २०२५’, ‘सर्टीफिकेट ऑफ एक्सलेन्स’,‘बेस्ट नॅशनल बिल्डर्स लीडर्स अ‍ॅवार्ड २०२५’ आणि युनायटेड नेशन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस यांच्या वतीने ‘पीस अ‍ॅम्बेसेडर’ ह्या सन्मानाचा समावेश आहे.
डॉ. विश्वनाथ कराड हे एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आहेत. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मूल्याधारित वैश्विक शिक्षण प्रणाली अंमलात आणण्याचे त्यांचे उदात्त ध्येय आहे. जगातील सर्वात मोठ्या विश्व शांती घुमटाची निर्मिती केली आहे. यामध्ये अध्यात्मशास्त्राची वैज्ञानिक प्रयोगशाळा म्हणून त्याला ओळखले जाते. त्यामाध्यमातून जगाला शांतीचा सर्वधर्मसमभावाचा आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला जात आहे.

उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देणे दूरच GST च्या माध्यमातून शेतक-यांची लूट : हर्षवर्धन सपकाळ

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांना समज द्यावी अन्यथा शेतकरी व काँग्रेसच समज देईल.

मुंबई, दि. ३० मे २०२५
केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत केवळ ४५ टक्केच वाढ केली आहे. एमएसपीमधील ही किरकोळ वाढ म्हणजे राजा उदार झाला दिला आणि हाती भोपळा दिला अशीच आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, सरकारने एकीकडे हमी भावात थोडीशी वाढ करून दुसरीकडे शेतीसाठी लागणा-या साहित्यात प्रचंड महागाई केली आहे. युपीए सरकारच्या काळात ४८ रुपये लिटर असलेले डिझेल आता ९६ रुपयांवर गेले आहे. किटकनाशके, खते व वीजेवरील सबसीडी बंद करण्यात आली आहे. कृषी साहित्यावर १८ टक्के जीसीएसटी लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे. त्यामुळे एमएसपी मधील वाढ ही दिखावा आहे. वाढत्या महागाईमुळे ती प्रत्यक्षात शेतक-यांना मिळतच नाही. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे, शेती हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. पण दुर्देवाने तेच भाजपाच्या सत्ताकाळात दुर्लक्षित आहे.

२०२३-२४ सालात देशात ज्वारीचे उत्पादन ४७ लाख ३७ हजार टन झाले पण फक्त फक्त ३ लाख २३ हजार टन खरेदी केली. मक्याचे उत्पादन ३७६ लाख ६५ हजार टन झाले सरकारने फक्त ५ हजार टन खरेदी केली. बाजरीचे उत्पादन १०७ लाख १६ हजार टन झाले मात्र सरकारी खरेदी फक्त ७ लाख टनांचीच झाली. नाचणी (रागी) चे उत्पादन १६ लाख ७० हजार टन झाले, सरकारी खरेदी फक्त २ लाख ३१ हजार टनांची झाली. हरभ-याचे उत्पादन ११५ लाख ७६ हजार टन झाले पण सरकारी खरेदी फक्त ४३ हजार टनांचीच झाली. यामुळे शेतकऱ्यांना बहुतांश शेतमालाची अत्यंत कमी भावात खासगी व्यापा-याला विक्री करावी लागली त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान होतं आहे.
महाराष्ट्रात दरवर्षी सरकार घोषणा करते पण खरेदी केंद्रांची बोंबाबोंब असते. ही खरेदी केंद्रे सुरु झाली तरी त्याच्या किचकट प्रक्रियेमुळे त्याचा फायदा शेतक-यांपेक्षा व्यापारीच घेतात. यावर्षी सोयाबीनचा सरकारी खरेदी दर ४८०० रुपये होता प्रत्यक्षात शेतक-यांना ४ हजार रुपये एवढ्याच दराने आपला माल खासगी व्यापा-यांना विकावा लागला. संसदेच्या कृषी विभागाच्या स्थायी समितीने आपल्या अहवालात MSP ला कायदेशीर हमी देण्याची व शेती आणि शेतकऱ्यांवर लावलेला कर काढून टाकण्याची शिफारस केली होती पण सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. काँग्रेस पक्षाने एमएसपीला कायदेशीर हमीचा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास त्याची अंमलबजावणी नक्की करेल.

यवतमाळच्या दाभडी गावात ३ जून रोजी काँग्रेसचे ‘क्या हुआ तेरा वादा’? आंदोलन

नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणूक प्रचारावेळी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेऊन राणाभिमदेवी थाटात शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या होत्या. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, शेतमालाला खर्चाच्या दीडपट हमी भाव देणार, स्वामीनाथन समितीचा अहवाल लागू करणार व शेतकऱ्याची एकही आत्महत्या होऊ देणार नाही, असे आश्वासन दिले होते. यातील एकही आश्वासन मोदींनी मागील ११ वर्षात पूर्ण केले नाही. उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्यामंध्ये वाढ होत आहे, दररोज ६ शेतकरी आत्महत्या होत आहेत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्ष ३ जून रोजी दाभडी गावात ‘क्या हुआ तेरा वादा’? असा प्रश्न विचारत पदयात्रा काढणार आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.

कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना समज द्या..
“माझ्या मंत्रिमंडळातील कोणालाही चुकीचे काम करू देत नाही” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते पण त्यांचेच सहकारी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करुन शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आधी या मंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात अशी मुक्ताफळे उधळली आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का? असा उद्धट प्रश्न केला आहे. या कृषी मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मंत्र्याला समज द्यावी अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी राज्यसभा खासदार कुमार केतकर उपस्थित होते.

माहिती कार्यालयातील वाहनचालक विलास कुंजीर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

शासन सेवेत प्रामाणिकपणे सेवा निभावण्याला महत्त्व – उपसंचालक डॉ. किरण मोघे

पुणे, दि. ३०: पुणे विभागीय माहिती कार्यालयातील वाहनचालक श्री. विलास मारुती कुंजीर हे ३० वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. शासकीय सेवेत शासन-प्रशासनाशी प्रामाणिक राहून सेवा निभावण्याला महत्त्व असून श्री. कुंजीर यांची कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावना वाखाणण्याजोगी आहे, असे कौतुकोद्गार माहिती उपसंचालक डॉ. किरण मोघे यांनी याप्रसंगी काढले.

सत्कार समारंभाला जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, माहिती अधिकारी सचिन गाढवे, श्री. कुंजीर यांची पत्नी सुरेखा कुंजीर व सर्व कुटुंबीय तसेच विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

उपसंचालक डॉ. मोघे म्हणाले, शासकीय सेवा करत असताना नियुक्ती ते सेवानिवृत्ती या दोन बिंदूंमधील प्रवास सुखकर करुन इतरांना आनंद देता येणं महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांनी आपापसात समन्वय ठेऊन काम केल्यास शासन सेवेतील कालावधी सुखकर होतो. वरिष्ठांच्या शब्दाला नेहमीच मान देतांना सहकाऱ्यांशी उत्तम समन्वय ठेवता आल्याने श्री. कुंजीर यांचा शासकीय सेवेतील प्रवास सुखकर झाला. सेवानिवृत्तीनंतर कुटुंबाला वेळ द्यावा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवावा, स्वत:च्या व कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा माहिती कार्यालयातील वाहनचालक विष्णू शिंदे यांनी देखील वाहनचालक आणि कॅमेरामन अशा दोन भूमिका एकाच वेळी निभावून शासनाची प्रामाणिकपणे सेवा केली. वाहनचालक पदावर काम करत असूनही फोटोग्राफीमध्ये कौशल्य त्यांनी दाखवले, असे कौतुकोद्गार डॉ. मोघे यांनी काढले. त्यांनी यावेळी श्री. कुंजीर व श्री. शिंदे यांना सेवापूर्तीनिमित्त पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ. रवींद्र ठाकूर, सचिन गाढवे, विलास कसबे तसेच सुनील झुंजार यांनी मनोगत व्यक्त केले.

‘एमआयटी एडीटी’च्या प्रा.केदारींची पदकांची हॅट्ट्रिक!

आशियाई इनडोअर रोइंग स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकासह रचला इतिहास पट्टाया

(थायलंड) / पुणेः थायलंडची राजधानी पट्टाया येथे झालेल्या आशियाई इनडोइअर रोइंग अजिंक्यपद स्पर्धेत येथील एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या (एडीटी) ‘स्कुल ऑफ लाँ’चे प्राध्यापक आदित्य रविंद्र केदारी यांनी पदकांची हॅटट्रिक पूर्ण करत भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्ण, २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात रौप्य आणि ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारात कांस्य मिळवत महाराष्ट्रासह विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. 

प्रा.केदारींनी स्पर्धेत सर्वप्रथम २ किमी पुरुष मास्टर्स एकेरी स्कल प्रकारात आव्हान देताना ६:२७.५ अशी वेळ नोंदवित रौप्य कामगिरी केली. या गटात त्यांचा भारतीय सहकारी सिद्धार्थ याने (६:२५.१) याने सुवर्णपदक पटकाविले तर सौदी अरेबियाच्या हिशामने ६ः४०.७ वेळेसह कांस्य पदक पटकाविले. यानंतर  प्रा.केदारींनी २ किमी मास्टर मिश्र दुहेरी प्रकारात भारतीय सहकारी हरप्रित कौर यांच्यासह दमदार कामगिरी करताना आपली सुवर्णपदकाची भूक पूर्ण केली. त्यानंतर, ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारातही त्यांनी दमदार झुंज देत कांस्य पदकाला गवसणी घालताना एकाच स्पर्धेत तीन पदके जिंकून भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. 

प्रा.केदारी हे आशियाई स्पर्धेचे गतवर्षीचे ५०० मीटर मास्टर एकेरी प्रकारातले सुवर्णपदक विजेते आहेत. यंदा, पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय इनडोअर रोइंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्यानंतर त्यांची भारतीय रोइंग संघात निवड झाली होती. भारतीय रोइंग संघटनेच्या (आरएफआय) अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांच्याकडून संघातील निवडीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर प्रा.केदारींनी 

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या बोट क्लबमध्ये संदीप भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव करताना, आपल्या वेळेत कमालीची सुधारणा केली. त्यामुळे, प्रा. केदारी हे सध्या पूर्णवेळ नोकरी करत आशियाई स्तरावर पदकांची हॅटट्रिक करणारे भारतातील एकमेव खेळाडू आहेत. तसेच, आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात सलग दुसऱ्यांदा निवड झालेले ते महाराष्ट्राचे एकमेव खेळाडू देखील होते. 
या कामगिरीनंतर माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड, कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा. डाॅ.सुनीता कराड, 

कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी, 

डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक प्रा.पद्माकर फड, स्कुल ऑफ लाॅच्या अधिष्ठाता डाॅ.सपना देव, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

फरार आरोपी नीलेश चव्हाणच्या नेपाळमधून आवळल्या मुसक्या


पुणे-वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात प्रमुख आरोपींमध्ये समावेश असल्याचा आरोप केला जाणारा नीलेश चव्हाण याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. नीलेश गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र आता त्याला नेपाळमधून पोलिसांनी अटक केली आहे. नीलेश चव्हाण याच्यावर बाळाची हेळसांड केल्याचा तसेच कस्पटे कुटुंबावर बंदूक रोखण्याचा देखील आरोप आहे. नीलेश चव्हाण याच्या अटकेनंतर आता या प्रकरणात अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी संबंधित प्रकरणात पीडित कस्पटे कुटुंबीयांना धमकावल्या प्रकरणी नीलेश चव्हाण या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणावर वैष्णवीचे बाळ घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या कुटुंबीयांना धमकावल्याचा आरोप आहे. तसेच त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष छळ व तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केल्याची संतापजनक बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. त्याला आता नेपाळमधून अटक करण्यात आली आहे. त्याला आज रात्रीपर्यंत पुण्यात आणले जाणार आहे.नीलेश चव्हाण हा वैष्णवी हगवणेचे पती शशांक हगवणे आणि बहिण करिष्मा हगवणे यांचा मित्र आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्याच्यावर त्याच्या पत्नीचा अमानुष छळ केल्याचा ठपका आहे. तो स्पाय कॅमेऱ्याच्या मदतीने आपल्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडिओ चित्रित करायचा. या प्रकरणी त्याच्यावर 2019 मध्ये पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच ठाण्यात नीलेश चव्हाणवर वैष्णवी हगवणेचे बाळ मागण्यासाठी गेलेल्या तिच्या माहेरच्यांना पिस्तुल दाखवून धमकावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधीच्या माहितीनुसार, नीलेश चव्हाणचे लग्न 3 जून 2018 रोजी झाले. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये त्याच्या पत्नीला आपल्या बेडरूममधील सीलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याचा संशय आला. तिने याविषयी नीलेशला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पुढच्या फेब्रुवारी महिन्यात त्याच्या पत्नीला घरातील एसीलाही काहीतरी संशयास्पद वस्तू अडकवण्यात आल्याची बाब निदर्शनास आली. यावेळी तिचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर तिने आपल्या पतीला म्हणजे नीलेश चव्हाणला त्याचा जाब विचारला.

त्यावर नीलेशने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर त्याच्या पत्नीने त्याचा लॅपटॉप उघडून पाहिला असता त्यात त्यांच्या शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याने रेकॉर्ड केल्याचे तिला आढळले. एवढेच नव्हे तर नीलेशचे इतर मुलींसोबतचे आक्षेपार्ह स्थितीतील व्हिडिओही तिच्या निदर्शनास आले. तिने या प्रकरणी नीलेशकडे विचारणा केली असता त्याने घरातील चाकू दाखवून तिला धमकावले. तिचा गळा दाबला. एवढेच नाही तर तिच्याशी बळजबरीने शारिरीक संबंध ठेवले.नीलेशच्या पत्नीने या प्रकाराची माहिती त्याच्या आई-वडिलांना व घरातील इतर सदस्यांना दिली. त्यानंतर त्यांच्याकडूनही तिचा छळ सुरू झाला. त्यानंतर पुढील अनेक महिने नीलेशने पीडित महिलेचा म्हणजे आपल्या पत्नीचा अतोनात छळ केला. त्यामुळे तिने आपले घर सोडण्याचा निर्णय दिला. त्यानंतर 14 जून 2022 रोजी तिच्या तक्रारीनुसार नीलेश व त्याच्या कुटुंबीयांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळण्यात आल्यानंतरही वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन मंजूर केला.

नीलेश चव्हाण हा बांधकाम व्यावसायिक आहे. त्याचा पोकलेन मशीनचाही व्यवसाय आहे. नीलेश चव्हाण हा मयत वैष्णवी हगवणेचा पती शशांक हगवणे याची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे. शशांक व वैष्णवी यांच्यातील वादात अनेकदा त्याने हस्तक्षेप केल्याचीही माहिती आहे. कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत नीलेशच्या वडिलांचे 3 फ्लॅट आहेत.

पीओके प्रमाणे, काँग्रेस नव्हे तर ‘भ्रष्टाचारी व्याप्त भाजप’कॉँग्रेस प्रवक्ते तिवारींचे प्रत्युत्तर !

फडणवीसांकडून बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन..!
पुणे  : एकीकडे ‘वायूसेना प्रमुखांच्या’ वक्तव्यातून ‘संरक्षण खात्याची वास्तवता’ समोर आल्याने, सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे.  राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचे सिद्ध झाले असल्याने त्यांची  भुमिका जागरुक व समंजस विरोधी पक्ष नेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असुन देशभर प्रशंसा होत आहे. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचेच् बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे देशातील विरोधी पक्षाचे नेत्यावर अश्लाघ्य व अतार्किक टिका करत फडणवीस आपल्या बौद्धिक दिवाळखोरी व विकृतीचेच प्रदर्शन करत असल्याची प्रखर टीका काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केली.

ते पुढे म्हणाले की, खरेतर फडणवीसांना पीओके प्रमाणे प्रमाणे तुलनाच करायची असेल तर ती काँग्रेस नव्हे तर भाजप सोबतच चांगल्या पध्दतीने होऊ शकते. ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजप’ने भ्रष्टाचार मुक्त देशाची घोषणा करून एकीकडे ११ वर्षात ‘एकाही भ्रष्टाचारी नेत्यावर’ खटला चालवून, त्यास गजाआड टाकण्याचे काम केलेले नाही, तर उलटपक्षी ‘भ्रष्टाचार व्याप्त वा काँग्रेस व्याप्त भाजप’ करण्याचे पवित्र कार्य करून अनायसे काँग्रेस सह अन्य राजकीय पक्ष स्वच्छ करण्याचेच कार्य केले आहे.
देशाच्या “संरक्षण वा गृह खात्याची” जबाबदारी असलेले भाजप नेते, देशाच्या वा राज्याच्या सुरक्षा विषयक प्रश्नांवर वा आपल्या संविधानीक ऊत्तरदायीत्वावर चकार शब्द न बोलता वा स्वराजधर्माचे पालन न करता, जनतेने प्रश्न विचारण्यास निवडून दिलेल्या प्रतिनिधींवरच अश्लाघ्य आरोप करण्यात धन्यता मानत असून आपल्या ‘राजकीय नादानपणाचे व बेजबाबदारपणाचे’ प्रदर्शन करत असल्याचे प्रतिपादन काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

देशाच्या विरोधी पक्ष नेत्यावर वा राष्ट्रीय प्रश्नांवर तारे तोडण्यापेक्षा, स्व-अखत्यारीतील व राज्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काही करावे, एमएमआरडीच्या हजारो कोटी भ्रष्टाचाराकडे लक्ष केंद्रित करावे तसेच कायदा – सुव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बीड, परभणी, बदलापूर, पुणे जिल्हा इ मधील खुनांच्या तपास प्रकरणांना गती द्यावी, धुळे मंत्री महोदयांच्या स्वीय सहाय्यकांच्या खोलीत मिळालेल्या १॥ कोटी रकमे बाबत बोलावे, पोर्शे कार प्रकरणी, वाढत्या ड्रग्ज व सायबर गुन्हे प्रकरणी अधिक लक्ष केंद्रित करावे व ‘राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री’ नात्याने, जनतेप्रती संविधानीक कर्तव्यांची पुर्तता करावी व अपेक्षित राजधर्माचे पालन करावे.. असे खडे बोल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या प्रसिद्धी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांनी सुनावले.

‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ विषयावरील दोन दिवसीय परिषद ३१ पासून

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे  

पुणे दि.३० मे: देशातली व्यावसायिकतेची परंपरा समाजातल्या काही घटकांपुरती मर्यादित न राहता इतर अपारंपारिक समाज घटकांपर्यंत पोहोचावी. शेती प्रधान देश उद्योजकता प्रधान व्हावा आणि सर्वसमावेशक आर्थिक विकासासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावे. तसेच  उद्योजकता, आर्थिक स्वातंत्र्य, स्टार्टअप व नवनवीन कल्पनेला प्रोत्साहन देण्याचा मुख्य उद्देश ठेवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्यावतीने दोन दिवसीय ‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद ३१ मे व १ जून रोजी नाशिक येथील हॉटेल शेरेटन मध्ये संपन्न होईल. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे प्र-कुलगुरू डॉ.मिलिंद पांडे आणि एमआयटी स्कूल ऑफ बिझनेसचे सहअधिष्ठाता प्रा.डॉ. गौतम बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘कम्युनिटी बिल्डींग फॉर इन्कलुसिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’ या परिषदेचा उद्घाटन सोहळा ३१ मे रोजी दुपारी २.३० वा. होणार आहे. यावेळी कोल्हापूर येथील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड हे असतील.
तसेच, बीव्हीजी इंडिया लिमिटेडचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक डॉ. हणमंतराव आर. गायकवाड, चितळे ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गिरीश चितळे, इंन्फोटेक सॉफ्टवेअर अँड सिस्टमचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशिम पाटील व तौराल इंडिया प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी भरत गिते हे उपस्थित राहतील.

या परिषदेत विनजीत टेक्नॉलॉजी प्रा.लि.चे सह संस्थापक अश्विन कंडोई, नाशिक येथील सह्याद्री फर्मचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, आर्मस्ट्राँग डेमॅटिकचे चेअरमन विनीत माजगावकर, एएमटी ग्रुप कंपनिजचे संचालक चेतन सावंत, थॉयोकेअरचे संस्थापक डॉ. ए. वेलूमणी, टु ब्रदर्स ऑर्गेनिक फॉर्मचे संस्थापक अजिंक्य हांगे आणि सत्यजीत हांगे, थॅर्माकॉल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख असणारे माने ग्रुपचे संस्थापक रामदास माने, नाशिक येथील वेदमुथा इंडिस्ट्रीज लि.चे व्यवस्थापकीय संचालक अजय वेदमुथा, टिमस लाईफ स्टाइलचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित तिवारी, स्लाइडवेल मेल्यूअर टेक प्रा.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबर प्रधान, निर्मिती प्रोमॅक कन्स्लटन्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक राहुल वैद्य हे आपली यशस्वी गाथा मांडतील.
या परिषदेचा समारोप १ जून रोजी दुपारी ३.३० वा. होणार आहे.

 सैयारा या चित्रपटाचा टीझर रिलीज

यशराज फिल्म्सने बहुप्रतिक्षित मोहित सुरी दिग्दर्शित सैयारा या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे आणि ही अहान पांडे आणि अनीत पड्डा अभिनीत एक तीव्र प्रेमकथा आहे!

यशराज फिल्म्स (YRF) निर्मित आणि मोहित सुरी दिग्दर्शित, सैयारा या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, तो YRF आणि मोहित यांना एकत्र आणतो, जे कालातीत प्रेमकथा तयार करण्यासाठी ओळखले जातात.

आज, YRF ने ‘सैयारा’ चा टीझर प्रदर्शित केला, ही एक तीव्र प्रेमकथा आहे जी अहान पांडेला हिंदी चित्रपटसृष्टीत एक नायक म्हणून ओळख करून देते आणि त्यात अनित पद्डा (ज्याने बहुचर्चित मालिका ‘बिग गर्ल्स डोन्ट क्राय’ मध्ये तिच्या उत्कृष्ट अभिनयाने मन जिंकले) ही मुख्य अभिनेत्री म्हणून आहे. ‘सैयारा’ कंपनीचे सीईओ अक्षय विधानी यांनी निर्मित केली आहे.

सैयारा चा टीझर पहा :

‘सैयारा’ या शीर्षकाबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे आणि टीझरने त्याचा अर्थ उलगडला आहे. ‘सैयारा’ चा अर्थ स्पष्टपणे भटकणारा खगोलीय पिंड असा होतो, परंतु कवितेत ते बहुतेकदा एखाद्या (किंवा एखाद्या व्यक्तीला) चमकदार, अलौकिक किंवा परलोकीय – एक भटकणारा तारा – नेहमी चमकणारा, नेहमी मार्गदर्शन करणारा, परंतु नेहमीच पोहोचाबाहेर असलेल्या – चे वर्णन करण्यासाठी वापरले जाते.

YRF, त्याच्या ५० वर्षांच्या इतिहासात, भारताला यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेले काही कल्ट रोमँटिक चित्रपट देण्यासाठी ओळखले जाते. सध्या चित्रपटसृष्टीत २० व्या वर्षी असलेल्या मोहित सुरीने आशिकी २, मलंग, एक व्हिलन इत्यादी काही सर्वात आवडत्या रोमँटिक चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.

‘सैयारा’ हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

”सातारा कारागृहात क्षयमुक्त भारत 2025 कार्यक्रम”

सातारा-राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत सन 2025 पर्यंत क्षय मुक्त भारत करण्याचे केंद्र शासनाचे तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरण आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा क्षयरोग केंद्र, साताराचे जिल्हा क्षयरोग अधिकारी श्री डॉक्टर श्री सचिन पाटील यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा शासकीय रुग्णालय येथील इतर अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून तसेच अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर, कारागृह उप महानिरीक्षक स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 26.5.2025 ते 29.5.2025 पर्यंत सलग 4 दिवस सदर “क्षयमुक्त भारत 2025 या शिबिराचे” आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये सातारा जिल्हा कारागृहामधील एकूण 15 महिला बंदी व 350 पुरुष बंदी यांची AI बेस डिजिटल एक्स-रे मशीनद्वारे क्षयरोग तपासणी करून सर्वांचे एक्स-रे काढण्यात आले. यानुसार ज्या बंदयांच्या एक्स-रेमध्ये काही दोष आढळून येतील त्यांचे उपचार तातडीने सुरू करण्यात येणार आहेत, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर सचिन पाटील यांनी सांगितले.

पंडित सी. आर. व्यास भारतीय शास्त्रीय संगीतातील ‘चिंतामणी रत्न’

पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित शशी व्यास, श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : पंडित सी. आर. व्यास यांचे सुरांशी अनोखे नाते होते. गाण्यातील सातत्य, रियाज संगीताला प्रवाहित ठेवते या विचारांनी पंडित व्यास यांनी आपल्या सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या गायन साधनेला आध्यात्मिक बैठक होती. क्षमाशिलता ही त्यांची मोठी ताकद होती. ते संन्यस्त गृहस्थ होते. त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताप्रती विलक्षण ओढ होती. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रांतात ते चिंतामणी रत्नच होते, अशा शब्दांत पंडित सी. आर. व्यास यांचा सांगीतिक जीवनपट उलगडला.

निमित्त होते ग्रेस फाऊंडेशनचे प्रमुख शशी व्यास आणि श्रुती पंडित लिखित ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे. हिराबाग येथील श्रीराम लागू रंगअवकाश (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे पॉप्युलर प्रकाशनतर्फे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शशी व्यास, श्रुती पंडित, पंडित सुहास व्यास, मोनिका गजेंद्रगडकर, अपर्णा केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या. पॉप्युलर प्रकाशनच्या अस्मिता मोहिते यांनी संवाद साधला. पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे.
पंडित सी. आर. व्यास यांचे ज्येष्ठ सुपुत्र व शिष्य पंडित सुहास व्यास म्हणाले, वडिलांनी आपल्याला कायमच इतर शिष्यांप्रमाणेच गुरूच्या भूमीकेतून संगीताचे ज्ञान दिले. संगीताच्या रियाजाविषयी ते कायम आग्रही होते. ‘सा’ची साधना धनाच्या अपेक्षेशिवाय करा ही बाबांची शिकवण होती.
शशी व्यास म्हणाले, पंडित सी. आर. व्यास यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा द्यावा, बंदिशकार म्हणून असलेली त्यांची महती, त्यांच्या सृजनशीलतेचा काळ, गुरूंसाठी केलेला संघर्ष वाचकांसमोर यावा या हेतूने त्यांचा सांगीतिक जीवनप्रवास ‘चिंतामणी : एक चिरंतन चिंतन’या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडण्यात आला आहे.
श्रुती पंडित म्हणाल्या, पुस्तक लिहिताना संगीत क्षेत्रातील वंदनीय व्यक्तीला आपण न्याय देऊ शकू का याविषयी मी साशंक होते. परंतु पंडित सुहास व्यास यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे मी लिहिती झाले. त्यांची संगीत कलेविषयी असलेली विलक्षण ओढ, राजबिंडे व्यक्तीमत्त्व, स्वभाववैशिष्ट्ये या पुस्तकाद्वारे उलगडली गेली आहेत.
या दिग्गज कलाकाराच्या जीवनप्रवास उलगडणाऱ्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिणे माझ्यासाठी आनंददायक असले तरी ही एक धाडसी जबाबदारी होती, असे सांगून मोनिका गजेंद्रगडकर म्हणाल्या प्रस्तावना लिखाणातून मी माझाच शोध घेत गेले. पुस्तकाची रचना ललित अंगाने जाणारी असून चरित्ररूपात न बसणारे, संवाद स्वरूपातील वाचनिय पुस्तक संगीतप्रेमींसाठी उपलब्ध झाले आहे. पंडित सी. आर. व्यास यांची गायकी घराण्याच्या पलिकडे जाणारी आणि आध्यात्मिक अधिष्ठान असणारी होती.
पंडित सी. आर. व्यास यांच्या शिष्या, प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर म्हणाल्या, पंडित सी. आर. व्यास यांनी साहित्य व रागाचे चलन यांच्या कल्पना आपल्या बंदिशींमधून मांडल्या आहेत. राग सादरीकरण सुरू झाल्यानंतर त्याचा चेहरा दिसला पाहिजे ही त्यांची शिकवण होती. मकरंद केळकर यांनी पंडित सी. आर. व्यास यांच्या आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस अपर्णा केळकर यांची गायन मैफल रंगली. त्यांनी राग स्वानंदीमधील गुणीदास रचित ‘जियरा मानत नाही तुम बिन’ ही बंदिश सादर केली. त्याला जोडून पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी रचलेला ‘दिम तमदिम तन देरेना’ हा तराणा ऐकविला. गुरू पंडित सी. आर. व्यास रचित ‘चतुर तुम हो प्राणप्रिया’ या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. सुरेल, सुमधूर व संयत गायनाने रसिकांना अनोखी सांगीतिक पर्वणी मिळाली. त्यांना कौशिक केळकर (तबला), अमेय बिचू (संवादिन), श्रुती डोरले, श्रावणी अत्रे (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे ज्येष्ठ पुत्र जयंत जोशी, डॉ. विकास कशाळकर, शीला देशपांडे, डॉ. शुभांगी बहुलीकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुश्री वझे यांनी केले.

सोन्याच्या दागिन्यांमध्ये भेसळीचे प्रमाण वाढले:शुद्धता तपासणी मशीनची मागणी वाढली

पुणे-साेन्याचे दागिने परीधान करणे ही आपल्याकडील अनेक कुटुंबात परंपरा आहे. परंतु सध्या साेन्याचा किंमती सुमारे एक लाख प्रति १० ग्रॅम झाले असल्याने दागिन्यांत भेसळ करुन विक्रीचे प्रमाण देखील वाढत असल्याचे तक्रारी माेठ्या प्रमाणात येऊ लागल्या आहेत. ग्राहक नवीन दागिन्यांसाठी जुन्या – दागिन्यांची अदला बदली माेठ्या प्रमाणावर करत आहेत. त्यामुळे पुनर्नूतनीकरण केलेल्या साेन्याच्या व्यवहारात वाढ झाली आहे. तसेच साेन्याचे दागिने गहाण ठेऊन देखील कर्ज काढण्याचे प्रमाण वाढलेले असल्याने साेन्याची तात्काळ शुध्दता तपासणे महत्वपूर्ण बनले असून साेने शुध्दतेची तपासणी करणाऱ्या एक्सरे मशीन मागणी वाढत असल्याचे मत गाेदरज एंजटरप्राइजेस ग्रुपच्या सुरक्षा समाधान व्यवसायाचे प्रमुख पुष्कर गाेखले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे.

गाेखले म्हणाले, साेने हे माैल्यवान दागिने असल्याने त्याची सुरक्षा देखील महत्वाची मानली जात आहे. परंतु ते साेनार किंवा बँकेकडे गहाण ठेवण्यासाठी ग्राहक आल्यावर त्याची शुध्दता तात्काळ तपासणीसाठी गाेदरेजने डिफेंडर ऑरम प्राे राॅयल उपकरण आणले आहे. ज्वेलरी रिटेल, हाॅलमार्किंग केंद्रे व साेने कर्ज सेवात संलग्न बँका यांच्यासाठी शुध्दता तपासणीसाठी ते महत्वपूर्ण ठरत आहे. त्याचप्रमाणे घरफाेडीचे प्रमाण देखील वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने जमीनी खालील लाॅकरची मागणी वाढली आहे. सेंट्रल व्हिस्टा, लष्करी संस्थेसह अनेक महत्वपूर्ण ठिकाणी आम्ही लाॅकर देत असून जीपीएस ट्रॅकिंग व्यवस्था, रिमाेट वापर यांना देखील मागणी आहे. सध्या साेने कर्ज व्यवसाय २८ ते ३० टक्क्यांनी वाढलेला असून साेने कर्ज तारण याेजनेत अनेक कंपन्या, बँका उतरल्या आहेत. साेन्याचे भाववाढीमुळे तात्काळ छाेट कर्ज घेण्यासाठी साेने तारण कर्ज वाढल्याने त्याची सुरक्षा देखील महत्वपूर्ण ठरत आहे.

आंबेगाव पठारावर भर रस्त्यात महिलेवर हत्याराने वार करून खून

पुणे- आंबेगाव पठार परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे . एका ३१ वर्षीय महिलेचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आला. ही महिला २० मे रोजी रात्री नऊच्या सुमारास शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या सेवा रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडली होती. उपचारादरम्यान तीचा मृत्यू झाला

प्रिती सचिन वाखारे (रा. खोपडेनगर ) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीवरून आंबेगाव पठार पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांनी प्रिती वाखारे यांना खासगी अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दिनांक २१ मे रोजी पहाटे तीचा मृत्यू झाला. पोलीस तपासादरम्यान समजले की, मयत महिलेला डोक्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून त्या धारदार हत्याराने झाल्या आहेत. ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन अहवालानुसार ही मृत्यूचे कारण “डोक्याला इजा असे नमूद करण्यात आले आहे.

प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की, प्रिती वाखारे या नवले पुल परिसरात कामासाठी जात असत, आणि तिथे त्यांचे काही अनोळखी व्यक्तींशी वाद झाले होते. सध्या अज्ञात इसम विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास भारती विद्यापीठ पोलीस करीत आहेत.

पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या घटनेविषयी काहीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. आरोपीचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणास प्रतिबंध आदेश जारी

पुणे दि. ३०: पुणे ग्रामीण जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

जिल्ह्यात ड्रोन, रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून आणि तत्सम सर्व हवेत उडणाऱ्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणतीही खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट व छायाचित्रण करणारे व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस अगोदर संबंधित पोलीस ठाण्याला देवून परवानगी घेणे बंधनकारक आहे.

आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे पात्र राहतील, असेही अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
0000

रास्तभाव दुकानातून तीन महिन्याचे धान्य मिळणार जूनमध्येच

पुणे :-पावसाळा तसेच परिणामी पूर इत्यादि प्रतिकूल परिस्थितीमुळे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना अन्नधान्याची उचल व वाटप करताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता एनएसएफए अंतर्गत लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वेळेत वितरण करण्यासाठी तीन महिन्यांचे अर्थात ऑगस्टपर्यंतचे धान्य जूनमध्येच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.या धान्याची उचल ३१ मे पर्यंत व वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, भोर, वेल्हा, पुरंदर, हवेली या तालुक्यातील तहसिलदारांनी त्या अनुषंगाने एनएसएफए अंतर्गत करण्यात येणाऱ्या ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या अन्नधान्याची उचल व वाटप विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत तातडीने आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पात्र लाभार्थ्यांनी माहे ऑगस्ट २०२५ पर्यंतच्या धान्याची उचल रास्तभाव दुकानामधून करावी, असे आवाहनही जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. सुधळकर यांनी केले आहे.