मॉस्को(रशिया): 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला असून भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त 73 फुटी तिरंगा युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर फडकवला असून 10 वर्षाचा साई कवडे, तुषार पवार, भूषण वेताळ , सागर नलावडे आनंद बनसोडे यांचा या मोहिमेत समावेश आहे. आनंद बनसोडे यांनी जुलै 2014 मध्ये हे शिखर सर केले होते आता या टीमला मार्गदर्शक म्हणून पुन्हा या मोहिमेवर आले आहेत.
15 ऑगस्ट पूर्वसंध्येला भारताचा 73 फुटी तिरंगा युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या बेसकॅम्पवर फडकला
सलग २५ तास गायन करून देशाला मानवंदना
पुणे : सलग २५ तास देशभक्तीपर गीते, कवितांचे गायन करून ७३व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटच्या वतीने देशाला मानवंदना देण्यात आली. ‘सूर्यदत्ता काव्यथॉन २०१९’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सुरुवात १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता झाली. १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजेपर्यंत सलग २५ तास देशभक्तीपर गाणी, कवितांचे सादरीकरण झाले. शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. संस्थेच्या बावधन कॅम्पसमध्ये माजी सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन डॉ. जयश्री तोडकर, गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे मनीष विष्णोई यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ऐ मेरे वतन के लोगो, सारे जहाँ से अच्छा, बलसागर भारत होवो, संदेसे आते है, माँ तुझे सलाम, वंदे मातरम अशा देशभक्तीपर गीतांनी परिसर भारावून गेला होता. प्रत्येकाला गायनासाठी तीन मिनिटांचा वेळ होता. जवळपास ५०० गाणी यामध्ये गायली गेली. सलग २५ तास गायनाबरोबरच संस्थेशी संलग्नित प्रत्येक विद्यालयाने विविध कार्यक्रम आयोजिले होते. या उपक्रमाची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसह लिमका बुक आणि वर्ल्ड बुक ऑफ रेकॊर्ड्समध्येही होणार आहे.
डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “फँशन टेक्नॉलॉजीतर्फे ‘विविधतेतून एकता’ संकल्पनेवर फँशन शो झाला. भारतातील विविध राज्यांची प्रादेशिक वेशभूषा, ‘स्वदेशी’ संकल्पनेत खादीपासून बनवलेले, भरतकाम केलेले कपडे, तसेच आधुनिक कपड्यांच्या साहाय्याने रेखाटलेला तिरंगा ध्वजाचे यांचे सादरीकरण झाले. ‘वॉक द हीरो’मधून स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावशाली व्यक्तींचे दर्शन घडले. राखी बनवणे, मेहंदी/रांगोळी काढणे, ज्वेलरी बनविणे, पोस्टर बनवणे अशा विविध उपक्रमांची जोड याला मिळाली. हॉटेल मॅनेजमेंटचे विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण पाककलेचे दर्शन घडवले. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांनी विविध राज्यांचे स्टॉल लावले होते. त्यातून त्या त्या राज्याची संस्कृती, तेथील पर्यटन स्थळे, खाद्यपदार्थ आणि त्या राज्याची वैशिष्ट्ये प्रदर्शनातून मांडण्यात आली होती. इव्हेंट मॅनेजमेंटया विद्यार्थ्यांनी या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनातं पुढाकार घेतला होता.”
भानुप्रताप बर्गे म्हणाले, “स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवणारा हा अनोखा उपक्रम आहे. ‘काव्यथॉन’मधून क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक आणि सीमेवरील सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण केले. शहीद हा कधीच मरत नसतो. आपण त्यांना विसरलो तरच ते मरतात. विद्यार्थ्यांना एकात्मतेचे महत्व समजण्यासाठी हा उपक्रम अतिशय महत्वाचा आहे. सलग २५ तास गाण्यांतून, कवितांमधून देशप्रेमाचे जागरण करण्याच्या या ऐतिहासिक क्षणी मला उपस्थित राहता आले, यासाठी मी भाग्यवान आहे.”
डॉ. जयश्री तोडकर म्हणाल्या, “स्वातंत्र्यदिनाच्या सर्वाना शुभेच्छा. नेहमी काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या सूर्यदत्ता संस्थेने राष्ट्राला दिलेली ही अतिशय अनोखी मानवंदना आहे. अशा कार्यक्रमामुळे मुलांना आपल्या देशाविषयी प्रेम निर्माण होते. अतिशय सुंदर पद्धतीने या कार्यक्रमाचे नियोजन केले असून, याची नोंद अनेक बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हावी, असे वाटते.”
मनीष विष्णोई म्हणाले, “सलग २५ तास देशभक्तीपर गायन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अशा आगळ्या उपक्रमाची नोंद करण्यासाठी आम्ही या उपक्रमाचे निरीक्षण करत आहोत. सूर्यदत्ता संस्थेने अतिशय नियोजनबद्ध आणि सुरेख पद्धतीने हा कार्यक्रम राबविला असून, याची नोंद विक्रमात होणार असे दिसते.”
सारस्वत बँकेतर्फे पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत
- पुणे : सहकार क्षेत्रातील अग्रणी सारस्वत बँकेतर्फे कोल्हापूर-सांगलीसह राज्याच्या इतर भागातील पुरग्रस्तांसाठी एक कोटी रुपयाचा मदतनिधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’स देण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने सह्याद्री अतिथी गृह येथे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन एक कोटींचा धनादेश त्यांच्याकडे सुपूर्त केला. बँकेचे अध्यक्ष गौतम एकनाथ ठाकूर, उपाध्यक्ष शशिकांत साखळकर, ज्येष्ठ संचालक किशोर रांगणेकर, संचालक हेमंत राठी, कार्यकारी संचालिका श्रीमती स्मिता संधाने व मुख्य महाव्यवस्थापक अजयकुमार जैन यावेळी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रातील सांगली-सातारा आणि कोल्हापूरसह कोकण, उत्तर महाराष्ट्रातील भागांना महापुराचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये अनेकजण मृत्युमुखी पडले, तर अनेकांचे संस्कार उघडयावर आले आहेत. पुर ओसरल्यानंतर या भागांचे पुनर्वसन करण्यासाठी व जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासन आणि अनेक सामाजिक संस्था पुढाकार घेत आहेत. सारस्वत बँक महाराष्ट्राची हक्काची बँक असून, बँकेने यापूर्वीही आपत्तीजनक परिस्थितीमध्ये योगदान दिले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना बँकेत नोकरी देऊन त्यांना आधार देण्यात आला होता. समाजचे ऋण फेडण्याची सामाजिक बांधिलकीची भावना सारस्वत बँकेने कायम जपली असून, पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एकदा बँकेने पाऊल उचलले आहे, अशी भावना संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
मर्सिडिज-बेंझ कडून महाराष्ट्राच्या मदत निधीसाठी 28.60 लाख रुपये; उत्तर कर्नाटक व केरळ येथील मदतकार्यासाठी मदत निधीसाठी 20 लाख रुपये
पुणे: मर्सिडिज-बेंझ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झरी कार उत्पादकाने कोल्हापूर, सांगली, वडोदरा, कालिकत, कोची आणि या शहरांतील आजूबाजूच्या परिसरांतील पुराने बाधित ग्राहकांसाठी तातडीने अनेक ग्राहक सेवा उपाय जाहीर केले आहेत. मर्सिडिज-बेंझ इंडियाने पूरग्रस्त शहरे व आजूबाजूचा परिसर येथी पुरामध्ये ज्या ग्राहकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत करण्यासाठी क्रॉस-फंक्शनल टास्क फोर्स सज्ज केले आहे. ही क्रॉस-फंक्शनल टीम प्रत्यक्षातील परिस्थितीचे बारकाईने मूल्यमापन करत आहे आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी अल्प ते दीर्घ कालावधीसाठी आकस्मिक योजना आखत आहे. मर्सिडिज-बेंझ इंडियाने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, केरळ आणि आजूबाजूचा परिसर येथील पूरग्रस्तांच्या मदतकार्यास हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी स्वेच्छेने 48.60 लाख रुपयांचे योगदान देण्याची घोषणा केली आहे.
मर्सिडिज–बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांनी नमूद केले, “मुसळधार पाऊस आणि पूर यामुळे कोल्हापूर, सांगली, वडोदरा, उत्तर कर्नाटक, कालिकत व कोची येथे कमालीचे नुकसान होत असल्याने; मर्सिडिज-बेंझ इंडिया आणि या भागांतील आमचे डीलर पार्टनर यांनी बाधित ग्राहकांना कोणतीही सेवा व विमा या बाबतीत तातडीने मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. पूरस्थितीमुळे अगोदरच अनेक आव्हानांना तोंड देत असणाऱ्या आमच्या ग्राहकांसाठी आम्ही मोफत टोइंग, स्पेअर पार्ट्सचा जलद पुरवठा, विम्याच्या दाव्यावर जलद प्रक्रिया आणि अन्य काही सेवा देणार आहोत. परिस्थिती हाताळण्यासाठी ग्राहक सेवा, वित्तीय सेवा व तांत्रिक सेवा यांचा समावेश असणारी, मर्सिडिज-बेंझ इंडिया, डीएफएस इंडिया व डीलर पार्टनर यांची क्रॉस-फंक्शनल टास्क फोर्स टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम प्रत्यक्षातील परिस्थितीची बारकाईने पाहणी करत आहे आणि मर्सिडिज-बेंझ ग्राहकांपर्यंत पोहोचून त्यांच्या वाहनांसाठी आवश्यक असलेली सर्व प्रकारची मदत देत आहे.”
श्वेंक म्हणाले, “या संकटाच्या क्षणी आम्ही यंत्रणांसोबत व अधिकाऱ्यांसोबत आहोत आणि एक जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन या नात्याने, आम्हाला मदतकार्यामध्ये खारीचा वाटा उचलायचा आहे. मर्सिडिज-बेंझ इंडिया पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, केरळ आणि आजूबाजूचा परिसर येथील पूरग्रस्तांच्या मदतकार्यास हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीसाठी स्वेच्छेने 45 लाख रुपयांचे योगदान देणार आहे. सर्व परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, अशी आशा आहे.”
गाड्यांचे महत्त्वाचे भाग लवकर उपलब्ध करण्यासाठी, मर्सिडिज-बेंझ इंडियाने ग्राहकांवर अधिक खर्चाचा भार न टाकता, हे भाग जर्मनी व सिंगापूर लॉजिस्टिक्स सेंटर्स येथून एअरफ्रेटने मागवायचे ठरवले आहे. देशभरातील मर्सिडिज-बेंझ डीलर पार्टनर्सनी स्पेअर पार्ट उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य देण्याचे आणि अतिरिक्त संसाधने देण्याचे मान्य केले आहे. यामुळे वेळेची बचत होईल आणि वाहनांच्या दुरुस्तीचा वेग वाढेल, तसेच जास्तीत जास्त वाहनांची दुरुस्ती केली जाईल.
त्याचबरोबर, मर्सिडिज-बेंझ ऑन-रोड असिस्टन्स टीम बाधित वाहने ताब्यात घेणार आहे, तसेच रिटेल नेटवर्क टीमनी ग्राहकांना मदत करण्याच्या हेतूने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करायचे ठरवले आहे. ग्राहक-केंद्री दृष्टिकोन अंगिकारत, मर्सिडिज-बेंझने व कंपनीच्या भागीदारांनी कारसाठीच्या टोइंगचा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॅमलर फिनान्शिअल सर्व्हिसेस इंडियाही इन्शुअर्ड कारच्या विम्यावर वेगाने प्रक्रिया करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्राहकांसाठी विम्याच्या दाव्याची प्रक्रिया झटपट करून त्यांना मदत करण्याच्या हेतूने, डीएफएस इंडियाची टीम कारचे झालेले नुकसान, इंजिनाचे झालेले नुकसान व खरेदी केलेली विमा योजना यांचे मूल्यमापन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटी देणार आहे.
मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरू
पुणे, दि. 14 : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुणे जिल्हयातून विविध सामाजिक संस्था, उद्योजक, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू आहे. महसूल, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्याकडे आज अनेकांनी मदतीचे धनादेश सुपूर्द केले.
पूरग्रस्त भागात गतीने पुनर्बांधणी व्हावी, पूरग्रस्त भागातील प्रत्येक सर्वसामान्य कुटुंबाचा संसार नव्याने उभा करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी विठठल् परशुराम महाजन यांच्याकडून 50 हजार, इंदापूर नगरपरिषद, इंदापूर अधिकारी, कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन एक लाख 16 हजार 882, श्री राजेंद्र सोपान भोसले यांच्याकडून 5 हजार 555, कै.सौ. शशिकला कोठारी ट्रस्ट यांच्याकडून 10 हजार, श्रीरंग प्रकाश दर्प, पेट कम्फर्ट संस्था यांच्याकडून 5 हजार तर बुधवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी दिवसभरात विश्वस्त मंडळ श्री. क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून दोन लाख 51 हजार रुपये, श्री. सुभाष पी. शेलार यांच्याकडून 11 हजार रूपये, श्री. गौरीशंकर निलकंठ कल्याणी व श्रीमती रोहीणी गौरीशंकर कल्याणी यांच्याकडून एक लाख रूपये, कल्याणी फोर्ज ली. यांच्याकडून एक लाख रूपये, मुळशी तालुका पोलीस पाटील सेवकाची सहकारी पतसंस्था मर्या. यांच्याकडून 25 हजार रूपये यांच्यासह विविध संस्था, संघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे येत आहेत.
अपोलो हॉस्पिटल्समध्ये हृदय प्रत्यारोपण
मुंबई : जागतिक अवयव दान दिनानिमित्त जगात प्रत्यारोपणाद्वारे जीवन देण्याचा चमत्कार साजरा होत असताना, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सने आज अखेरच्या टप्प्यातील हृदयरोगाचे निदान झालेल्या 33 वर्षांच्या पुरुषावर हृदय प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण केण्याची घोषणा केली. अवयव दानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी प्रत्येक वर्षी 13 ऑगस्ट रोजी जागतिक अवयव दान दिन साजरा केला जातो.
अपोलोचे ह्रदय व फुफ्फुस प्रत्यारोपण सर्जन सल्लागार डॉ. संजीव जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्पेशल हार्ट ट्रान्सप्लांट टीमने वाशीच्या एमजीएम रूग्णालयातून एका मृत देणगीदाराचे हृदय मिळवले आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये 33 वर्षांच्या पुरूष रुग्णावर त्या हृदयाचे यशस्वी प्रत्यारोपण केले. वाशीच्या एमजीएम रुग्णालयापासून नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलपर्यंत हे हृदय खास ग्रीन कॉरिडॉरद्वारे 10 मिनिटांत 12 किमी अंतर पार करून आणण्यात आले. या हृदयाचा दाता एक 61 वर्षांचा पुरूष होता, ज्याचा मेंदू मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्याच्या कुटुंबियांशी अवयव प्रत्यारोपणाबाबत चर्चा करण्यात आली होती व त्यांनी त्यास मान्यता दिली होती.
या हृदयाचा प्राप्तकर्ता अहमदनगर येथील 33 वर्षीय राजीव वाघमारे होता. त्याला पूर्वीपासूनच हृदयविकार होता. जून 2017 मध्ये त्याची छातीत दुखण्याची तक्रार आली आणि त्याला तातडीने अहमदनगरच्या वैद्यकीय केंद्रामध्ये नेण्यात आले. तेथे अँजिओग्राफी केली असता, त्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे दिसून आले. त्याच्यावर तेथे उपचार करण्यात आले व डिस्चार्ज देण्यात आला. परंतु नोव्हेंबर 2017 मध्ये पुन्हा त्याने छातीत दुखणे आणि श्वासोच्छवासाची तक्रार केली. त्यावेळी त्याला मुंबईतील वैद्यकीय केंद्रामध्ये आणण्यात आले व तेथे त्याच्यावर अँजिओप्लास्टी झाली.त्यानंतर वारंवार आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यांमुळे रुग्णाला अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या हृदयाचे कार्य केवळ २० टक्के होत असल्याच्या अवस्थेत नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्स येथे त्याला पाठविण्यात आले. येथे हृदयविकाराच्या खास विभागात त्याच्यावर उपचार करण्यात आले. हृदय प्रत्यारोपणासाठी त्याचे नाव प्रतीक्षा यादीमध्ये नोंदविण्यात आले. 27 जुलै 2019 रोजी त्याच्या शरीराला जुळणारे हृदय उपलब्ध झाले, तेव्हा सामान्य जीवन जगण्याची दुसरी संधी त्याला मिळाली. 27 जुलै रोजीच त्याच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. सल्लागार व हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव आणि कार्डिओव्हॅस्क्युलर व थोरॅसिक सर्जन डॉ. शांतेश कौशिक यांनी हे प्रत्यारोपण केले.
नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्समधील हृदय व फुफ्फुस प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. संजीव जाधव म्हणाले, “नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल येथे आज प्रथमच प्रत्यारोपित हृदयाचा ठोका एेकू आला आहे. हृदयविकारामुळे वारंवार रुग्णालयात दाखल करावे लागणाऱ्या या रुग्णास केवळ औषधांवर जगावे लागत होते. त्याच्या हृदयाचे कार्य अगदी मर्यादीत होत असल्याने हृदय प्रत्यारोपण हाच अत्यावश्यक आणि एकमेव उपाय होता. त्याच्या शरिराला जुळेल असे हृदय मिळविण्यात तो भाग्यवान ठरला. मधमाश्या चावल्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन त्यानंतर हृदयाचे कार्य कमी झाल्याने पुन्हा सतत झटके येण्याचे हे असले प्रकरण मी प्रथमच पाहिले आहे. वाघमारे याला दुसऱ्या आयुष्याची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे, प्रत्यारोपणात कोणताही अडथळा न येता हा रूग्ण बरा झाल्याचे समाधान आम्हाला लाभले आहे.
या हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेस 90 मिनिटांचा वेळ लागला. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. येथील अत्याधुनिक व विविध उपकरणांनी सुसज्ज अशा कार्डिओथोरॅसिक आयसीयूमध्ये हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी विशेष स्वरुपाचे बेड आहेत, ज्यांमुळे रुग्णांना नर्सिंगची सेवा देणे अतिशय सोपे जाते, तसेच जंतुसंसर्ग टाळता येतो. राजीव वाघमारे हा रूग्ण आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाला, “जेव्हा माझे हृदय सतत अपयशी ठरत होते, तेव्हा मी सामान्य जीवन जगण्याची आशा गमावली होती. या जीवनरक्षक शस्त्रक्रियेकडून मला मोठ्या आशा व अपेक्षा आहेत आणि मी माझ्या कुटुंबासमवेत सामान्य जीवनात परत येण्याची वाट पाहत आहे. अपोलो हॉस्पिटलमधील टीमने माझी काळजी घेतल्याबद्दल व वेळेवर केलेल्या कृतीबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. त्यांच्यामुळेच मला आयुष्यात दुसरी संधी मिळू शकली. अवयवदान करण्यास सहमती देणाऱ्या देणगीदाराच्या कुटुंबाचा मी कायम कृतज्ञ राहीन. दुर्दैवी अपघातामुळे हरवलेल्या एका आयुष्यातून माझे आयुष्य निर्माण झाले, हा अत्यंत हृदयस्पर्शी विचार आहे. मी लवकरच सामान्य जीवनात परतण्यास उत्सुक आहे! ”
नवी मुंबईच्या अपोलो हॉस्पिटल्सचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे म्हणाले, “आमच्या रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यारोपण झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची आणि अवयव प्रत्यारोपणाच्या कौशल्याची ही चाचणीच ठरली आहे. गंभीर आजार असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यात व त्यांना उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरविण्यात आम्ही सतत कार्यशील राहू.”हृदय प्रत्यारोपण केल्यानंतर रुग्णाच्या शरीराने हा नवीन अवयव नाकारू नये, यासाठी त्याला विशेष औषधे दिली जातात. त्यामुळे हे रूग्ण बरे होऊन दीर्घ आणि उत्पादक आयुष्य जगतात. अपोलो हॉस्पिटल्स समुहाला अशा ठणठणीत बरे झालेल्या आणि 10 वर्षांनंतरही चांगले आयुष्य जगणाऱ्या प्रत्यारोपित रुग्णांचे आशीर्वाद लाभले आहेत. या समुहाच्या हॉस्पिटल्समध्ये समर्पित मल्टी-डिसिप्लिनरी हार्ट ट्रान्सप्लांट टीम आहे. तीमध्ये ट्रान्सप्लांट सर्जन, ट्रान्सप्लांट कार्डियोलॉजिस्ट, इंटेंसिव्हिस्ट / क्रिटिकल केअर स्पेशालिस्ट, पल्मनॉलॉजिस्ट, इन्फेक्टीव्ह डिसिज कन्सल्टंट्स, इम्यूनॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेटर, प्रशिक्षित आयसीयू आणि वार्ड नर्स आणि एक संपर्क अधिकारी यांचा समावेश आहे. येथील अत्याधुनिक व सुसज्ज अशा प्रत्यारोपण केंद्रांमध्ये रुग्णांचे खास निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये अवयव स्वीकारण्यास रुग्णाच्या शरीराचा नकार आणि संसर्ग या गोष्टींबाबत खास खबरदारी घेतली जाते. इम्यूनोसप्रेसिव्ह थेरपीच्या या काळात जंतुसंसर्ग, अवयव नकार, मधुमेह आणि ऑस्टिओपोरोसिस यांसारखी गुंतागुंत टाळण्यासाठी सावधपणे येथे काम करण्यात येते.
अपोलो हॉस्पिटलबद्दल ..
डॉ. प्रताप रेड्डी यांनी चेन्नईमध्ये अपोलो हॉस्पिटल या नावाने भारतातील पहिले कॉर्पोरेट रुग्णालय 1983 मध्ये सुरू केले. अपोलो हॉस्पिटलमध्ये देशात सर्वात जास्त हृदयविषयक उपचार केले जातात. एक लाख साठ हजाराहून अधिक हृदय शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये झालेल्या आहेत. तसेच कर्करोगावर उपचार करणारे जगातील ते सर्वात मोठे रुग्णालय आहे. अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया करणारे ते जगातील एक प्रमुख केंद्र आहे. 2014-15 या एका वर्षात येथे दीड हजार अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत.
अपोलो हॉस्पिटल्स हा आशियातील सर्वांत मोठा व विश्वासार्ह आरोग्यसेवा पुरवणारा समूह म्हणून गणला जातो. या समुहातील 71 रुग्णालयांमध्ये 12 हजार बेड्स आहेत. 3300 औषधांची दुकाने, 90 हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे, टेलिमेडिसीनची 110 केंद्रे, 15 हून अधिक वैद्यकीय शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र असा हा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात पोचला आहे. आरोग्य विमा सेवांसह एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणाऱ्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जागतिक प्रकल्प सल्ला सेवा केंद्र, वैद्यकीय शिक्षण केंद्रे, जागतिक क्लिनिकल चाचण्यांवर लक्ष केंद्रित करणारे तसेच सार्वजनिक आरोग्यविषयक अभ्यास करणारे संशोधन विभाग, स्टेम सेल आणि जनुकीय संशोधन हे उपक्रमही चालतात. वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन शोध लावण्यात अग्रगण्य असलेल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये चेन्नई येथे प्रोटॉन थेरपी केंद्र सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण आशिया, आफ्रिका व ऑस्ट्रेलिया खंडांमध्ये हे अशा प्रकारचे एकमेव केंद्र आहे. अपोलो हॉस्पिटल्स समूह हा प्रत्येक व्यक्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा देण्याच्या आपल्या मोहिमेत लाखो नागरिकांच्या सतत संपर्कात असतो.
भारत सरकारने ‘अपोलो’च्या या अमूल्य योगदानाच्या स्मरणार्थ एक टपाल तिकीटही काढले आहे. एखाद्या वैद्यकीय संस्थेसाठीचा हा एक दुर्मिळ स्वरुपाचा सन्मान ‘अपोलो’ला लाभला आहे. अपोलो हॉस्पिटल्सचे अध्यक्ष डॉ. प्रताप सी. रेड्डी यांना 2010 मध्ये प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो हॉस्पिटल्स समुहाने 34 वर्षांपेक्षा जास्त काळ वैद्यकीय संशोधन, जागतिक दर्जाची वैद्यकीय सेवा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांत व्यतित केला आहे. आधुनिक वैद्यकीय सेवा आणि संशोधनासाठी अपोलो हॉस्पिटल्स ही जगभरात उत्कृष्ट रुग्णालयांमध्ये गणली जातात.
डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने पूरग्रस्त भागात वैद्यकीयआरोग्य पथक रवाना
पुणे – पिंपरी येथील डॉ. डी. वाय पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयाच्यावतीने कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात वैद्यकीय आरोग्य पथक रवाना करण्यात आले आहे. कोल्हापूर वसांगली या दोन भागासाठी दोन वैद्यकीय पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये सर्व सेवासुविधांनी युक्त रुग्णवाहिका,डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, दहा लाखांहून अधिक किमतीची
आवश्यक औषधे तसेच पाणी शुद्ध करण्यासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय साहित्य, व उपकरणांचा यात समावेश आहे.
यावेळी डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाच्या उपाध्यक्षा मा. भाग्यश्रीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस भवाळकर, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच चव्हाण उपस्थित होते.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. डी. पाटील, ट्रस्टी डॉ स्मिता जाधव, कोशाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही दोन्ही वैद्यकीय आरोग्य पथके कोल्हापूर व सांगलीतील पूरग्रस्त भागात पाठविण्यात अली आहे.
कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताह साजरा
पुणे -कर्वेनगर येथील कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये समाजकार्य महाविद्यालयाच्या वैद्यकीय व मनोवैद्यकीय समाजकार्य विभागाच्या वतीने एरवाडी दिवस व स्तनपान सप्ताहानिमित्त चर्चासत्र व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
सन २००१ मध्ये तामिळनाडू मधील एरवाडी येथील एका मनोरुग्नालयामध्ये साखळदंडाने बांधून ठेवण्यात आलेल्या २८ मनोरुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता व याच अपघाताची आठवण म्हणून मानसिक आरोग्य क्षेत्रांमध्ये “त्या” मनोरुग्णांना श्रद्धांजली वाहून मनोरुग्ण सेवा व काळजीबाबत जागृती करण्यासाठी हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात येतो.
याच दिवसाचे औचित्य साधून तसेच स्तनपान सप्ताहानिमित्त कर्वे समाज संस्थेच्या वैद्यकीय व मनोवैद्यकीय समाजकार्य विभागाच्या प्रथम व व्दितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यावतीने स्तनपान आणि येरवाडी प्रसंग माहितीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या दोन्ही दिवस व सप्ताहाचे महत्व, गरज व काळजी यावर पोस्टर प्रदर्शन, व्याखाने आदींचे सादरीकरण करून चर्चासत्रामध्ये सहभाग घेतला.
संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, वैद्यकीय व मनोवैद्यकीय समाजकार्य विभागाचे प्राध्यापक व समुपदेशन विभाग प्रमुख प्रा. चेतन दिवाण, ज्येष्ठ प्रा. डॉ अनुराधा पाटील व प्रा. सुयश नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सादरीकरण करून चर्चा घडवून आणली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सायली रावराणे, स्नेहल माहुलकर, मुकेश ठोके, रोहिणी हलदार, निखील डोंगरे, आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कोमल उबाळे यांनी केले तर आभार दत्ता करचे यांनी मानले.
भारती अभियांत्रिकी महाविद्यालय -झेन्सार मध्ये करार
भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव ,महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर पाटील,लवळे येथील भारती अभिमत विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एन पाटील आणि ‘आरपीजी झेन्सार टेक्नॉलॉजीज’ चे कौशल्य प्रशिक्षण प्रमुख अमोल नितवे ,सदस्य वैष्णवी बाजरे यांनी या करारावर सह्या केल्या .
मधुसुदन हडकर यांचे निधन
पुणे – माहिती कार्यालयातील सेवानिवृत्त छायाचित्रकार मधुसुदन रामचंद्र हडकर यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते 75 वर्षाचे होते. शासकीय छायाचित्रकार म्हणून त्यांनी मंत्रालय, मुंबई आणि पुणे विभागीय माहिती कार्यालयात 30 वर्षे सेवा केली. विविध महत्त्वाचे शासकीय समारंभ आपत्कालीन स्थिती अशा अनेक घटनांचे त्यांनी छायाचित्रण केले. त्यांच्या पश्चात महसूल विभागातील निवृत्त ज्येष्ठ लघुलेखीका नंदा हडकर, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रामदास आठवले यांच्याकडून पुन्हा दिलगीरी; मातंग व बौध्द समाजाने बंधुभाव जपावा
पुणे : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नव्हता. आजच्या तरुणाईबद्दल भाष्य करण्यासाठी केलेल्या विडंबनात्मक काव्याचा विपर्यास करून काही मंडळींनी मातंग आणि बौद्ध समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून पिंपरीची जागा देण्यासंदर्भात चर्चा सुरु आहे. पिंपरीची जागा आरपीआयला मिळू नये, यासाठीच काही धर्मांध शक्तींनी माझ्या वाक्याचा विपर्यास केला. तरीही माझ्या अनावधाने केलेल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या मजकुरावर मातंग आणि बौद्ध समाजाने अवलंबून न राहता सामाजिक एकोपा जपावा,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना भारतरत्न मिळण्यासाठी पुढाकार घेणार असून, लवकरच मातंग समाजाच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घडवून आणणार असल्याचे आश्वासन आठवले यांनी बैठकीवेळी दिले.
भीमाशंकरला एमटीडीसी पर्यटक निवासाचे उदघाटन
पुणे- भीमाशंकर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) भव्य पर्यटक निवास पर्यटकांच्या सेवेत रुजू केले आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, विश्वस्त सुनील देशमुख, प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे वरिष्ठ व्यवस्थापिका क्षिप्रा बोरा यांच्या उपस्थितीत या पर्यटक निवासाचे उद्घाटन करण्यात आले.
सर्व सोयींनी युक्त अशा या दुमजली पर्यटक निवासात तळमजल्यावर 30 डीलक्स रूम, 3 व्हीआयपी सूट, भव्य रेस्टॉरंट असून पहिल्या मजल्यावर 48 डीलक्स रूम आहेत. या ठिकाणी 8 लोकनिवास असून 2 कॉन्फरन्स हॉल आहेत. कॉन्फरन्स हॉल प्रोजेक्टरसह सर्वसोयीनी युक्त असून या ठिकाणी 45 कव्हर्ड कार पार्किंग तयार आहेत. वाहन चालकांसाठी स्वतंत्र सोय आहे. पर्यटक निवासातील रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट शाकाहारी भोजनाची व्यवस्था असून येथील खोल्या परवडणाऱ्या दरात पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येत आहेत, अशी माहिती प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी दिली
दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून पूरग्रस्तांपर्यंत मदत वाटप करण्याचे आवाहन
पुणे-
ज्या दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी सस्थांना पूरग्रस्तांसाठी मदत करावयाची आहे, त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क करुन त्यांच्यामार्फतच मदत साहित्य वाटप करणे आवश्यक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 34 (ल) नुसार मदत साहित्य वाटप करताना स्वयंसेवी स्ंस्थांनी कोणताही भेदभाव न बाळगता समान पध्दतीने वाटप करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांना कळविण्यात येत आहे की, आपणांस कोणत्याही स्वरुपात पूरग्रस्तांना मदत साहित्य पुरवावयाचे असल्यास संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्या समन्वयाने वाटप करण्यात यावे. जिल्हयाचे संपर्क अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे आहेत.
सांगली – श्रीमती वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी- 9307839910
कोल्हापूर- श्रीमती राणी ताटे, जिल्हा पुरवठा अधिकारी- 9623389673
श्री रविकांत अडसुळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य प्रशासन)- 9923009444
सातारा- श्रीमती स्नेहा किसवे, जिल्हा पुरवठा अधिकारी- 9604146186
इतर जिल्हयातील ज्या स्वयंसेवी सस्थांना / दानशूर व्यक्तींना मदत साहित्य पुणे येथे जमा करावयाचे आहे त्यांनी कृपया विभागीय आयुक्त कार्यालय, कौन्सिल हॉल, पुणे 411001 येथे साहित्य जमा करावे. त्यासाठी संपर्क अधिकारी खालीलप्रमाणे आहेत.
1. श्रीमती अस्मिता मोरे, उपजिल्हाधिकारी – 8412077899
2. श्री विकास भालेराव, तहसिलदार – 8007533144
ज्या संस्थांना वा दानशूर व्यक्तींना सरळ या दोन्ही जिल्हयात वाटप करावयाचे आहे त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे पूर्व कल्पना देवून गेल्यास वाटपात समन्वय व सुसूत्रता येईल.
मदत पुरविण्यापूर्वी कोणत्या वस्तूंची त्या जिल्हयामध्ये सध्या जास्त गरज आहे, याची माहिती संबधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी.
सर्व गरजूंना समान पध्दतीने वाटप होईल व कोणीही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी कोणत्याही दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थेने परस्पर मदत साहित्य वाटप करु नये, असे नम्र आवाहन पुणे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी केले आहे.
महापुरग्रस्त 3.15 लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत
पुणे: कोल्हापूर व सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून थैमान घातलेल्या महापुरामुळे खंडित झालेला किंवा संभाव्य धोका टाळण्यासाठी बंद करण्यात आलेल्या सुमारे 3 लाख 15 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा मंगळवार (दि. 13)पर्यंत सुरळीत करण्यात आला आहे. महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी पूरस्थितीतही अविश्रांत परिश्रम घेऊन वीजग्राहकांना दिलासा दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विविध भागातील पूरस्थितीमुळे 44 उपकेंद्रांसह कृषी व अकृषक अशा एकूण 593 वीजवाहिन्यांवरील 17,189 वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी सुमारे 5 लाख 70 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला होता. यामध्ये 1 लाख 69 हजार कृषीपंपांसह सुमारे 4 लाख शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांचा समावेश होता. पूरस्थिती ओसरल्यानंतर प्रामुख्याने सध्या पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त जवळपास सर्वच भागातील वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. यामध्ये 76280 कृषिपंपांसह पुणे जिल्ह्यातील 1 लाख 4 हजार, कोल्हापूर -1 लाख 25 हजार, सांगली – 48,250, सातारा – 22,920 तर सोलापूर – 13660 अशा एकूण सुमारे 3 लाख 15 हजार घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर अशा अकृषक वीजग्राहकांचा समावेश आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 132 ग्राहक वगळता सोलापूर, पुणे, सातारा जिल्ह्यातील शहरी भागात 100 टक्के वीजपुरवठा सुरु झाला आहे. तर ग्रामीण भागामध्ये पुणे – 112, सातारा -3140 व सोलापूर जिल्ह्यातील 49 अशा एकूण 3301 ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या बंद आहे. हे सर्व ग्राहक अतिदुर्गम तसेच डोंगराळ भागातील असल्याने तेथील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीला अडथळे येत आहेत. महापुराचा मोठा फटका बसलेल्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये पूरस्थिती ओसरत असून शहरी व ग्रामीण भागातील सुमारे 1 लाख 58 हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा सुरु करण्याचे अविश्रांत प्रयत्न सुरु आहेत.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे व बारामती परिमंडलातून 25 हजार नवीन वीजमीटर, 40 हजार किलोलिटर आॅईल, 100 केव्हीए क्षमतेचे 80 रोहित्र तसेच 410 वीजखांब, उच्च व लघुदाब वीजवाहिन्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्याच्या पुरग्रस्त भागात पाठविण्यात आले आहेत. याशिवाय औरंगाबाद, लातूर, उद्गीर, नांदेड, निलंगा, ठाणे, वसई, वाशी, कल्याण आदी ठिकाणांहून वीजयंत्रणेचे विविध साहित्य कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दाखल झाले आहेत. अनेक ठिकाणी पुरामुळे घरात पाणी साचल्याने ग्राहकांचे वीजमीटर नादुरुस्त झाले आहेत. अशा ग्राहकांचे वीजमीटर महावितरण स्वखर्चाने बदलून देणार आहे.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे साहित्य व कुशल मनुष्यबळ पुरविण्याचे सर्व नियोजन करण्यात आले आहे. राज्याचे ऊर्जामंत्री ना. चंद्रशेखऱ बावनकुळे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार हे वीजपुरवठ्याच्या कामांचा दैनंदिन आढावा घेत आहेत. पुणे प्रभारी प्रादेशिक संचालक श्री. सुनील पावडे हे गेल्या आठवड्याभरापासून कोल्हापूर व सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. श्री. पावडे व कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. अनिल भोसले हे आवश्यक साधनसामग्रीसह अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्याचे नियोजन तसेच इतर शासकीय यंत्रणेसोबत समन्वयासाठी कार्यरत आहेत. वीजयंत्रणेची दुरुस्ती व कार्यान्वित करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शन करीत आहेत. पुणे, बारामती व सातारा येथील पथकांसह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे अभियंते व कर्मचारी आणि कंत्राटी कुशल कर्मचारी असे सुमारे 5 हजार अभियंता व कर्मचारी वीजयंत्रणा दुरुस्ती व वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
पूरग्रस्त्यांना पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाकडून प्रत्यक्ष मदत
पुणे : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागले असून पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेकांनी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघातर्फे दैनंदिन लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे पॅकिंग करुन पूरग्रस्तांना ते पॅकिंग देण्यात आले. पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्रह्मनाळ व आसपासच्या गावांतील नागरिकांना ही थेट मदत करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे यांनी दिली.
जीवनावश्यक वस्तुंचे पॅकिंग घेऊन पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळीच कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाकडे रवाना झाले. सहा टेम्पो भरून हा जीवनावश्यक वस्तुंचा माल घेऊन पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, भिलवडी न आसपासच्या गावांमध्ये या जीवनावश्यक वस्तू थेट पीडित नागरिकांनाच देण्यात आल्या. या पॅकिंगमध्ये तांदूळ, साखर, फरसाण, तेल, मेणबत्ती, चहा पावडर, दूध पावडर, बिस्किटे, काडीपेटी, उपवासाचे पदार्थ, लहान मुलांसाठी खाऊचे पदार्थ, शेंगदाणा चटणी व चपाती, पाण्याच्या बाटल्या या पदार्थांचा समावेश होता. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस ही मदत करण्यात आली.
आता पुढच्या टप्प्यात आणखी जादा मदत करण्याचा संकल्प पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने करण्यात आला असून मदत देण्यासाठी सचिन निवंगुणे, नवनाथ सोमसे, उमेश यादव, सुनील गेहलोत, भवर चौधरी, दिलीपसिंग राजपुरोहित, सतीश राजपुरोहित, रविंद्र सारुक, दादा भेलके, अमित कानिटकर, उमेश बुडमेवार, कन्हैयालाल परिहार आदी 30 पदाधिकारी प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात गेले होते, असेही सचिन निवंगुणे म्हणाले.


