Home Blog Page 2864

‘चित्रभूषण’ व ‘चित्रकर्मी’ पुरस्कार सोहळा संपन्न

0

मुंबई -अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षी चित्रपटसृष्टीच्या विविध विभागांमध्ये प्रदीर्घ काळ महत्त्वपूर्ण  योगदान दिलेल्या मान्यवरांना चित्रभूषण व चित्रकर्मी या पुरस्काराने गौरविले जाते. यंदाच्या चित्रभूषण व चित्रकर्मी’ पुरस्काराचे नुकतेच वितरण करण्यात आले. रवींद्र नाट्य मंदिर येथे पार पडलेल्या भव्य-दिव्य दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थित होती.

चित्रपटसृष्टीत काम केल्याचं समाधान व्यक्त करताना अजूनही खूप काहीतरी करायचं असल्याची भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी चित्रभूषण पुरस्कार स्वीकारताना बोलून दाखवली. चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा चित्रभूषण पुरस्कार मिळवण्याची माझी इच्छा आज पूर्ण झाली असून या पुरस्काराबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व संचालक मंडळाचे यावेळी आभार मानले.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पुरस्कार सोहळ्याला प्रारंभ झाला. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान वेगवेगळ्या नृत्याविष्काराचा आस्वाद उपस्थितांना घेता आला. चित्रपट महामंडळाच्या वाटचालीचा आणि या पुरस्काराविषयीचा आढावा अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी घेतला. मंडळाच्या संचालिका अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंडळाचे प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानत सोहळ्याची सांगता केली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले.

महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, सहकार्यवाह विजय खोचीकर, संचालिका चैत्राली डोंगरे, संचालक सतीश रणदिवे, पितांबर काळे, तसेच महामंडळाचे इतर पदाधिकारी, संचालक, सदस्य यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार मिळालेल्या विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

चित्रभूषण  पुरस्कार 

श्री.विक्रम गोखले (अभिनेता/दिग्दर्शक), श्री.भालचंद्र कुलकर्णी (अभिनेता), श्री.श्रीकांत धोंगडे (कला–प्रसिद्धी) श्री.किशोर मिस्कीन (निर्माता), श्रीमती लीला गांधी (अभिनेत्री/नृत्यांगना), श्रीमती सुषमा शिरोमणी (अभिनेत्री/ निर्माती/ दिग्दर्शिक/वितरक)

चित्रकर्मी  पुरस्कार 

श्री.रमेश साळगांवकर (दिग्दर्शक), श्री.संजीव नाईक (संकलक/निर्माता/दिग्दर्शक), श्री.विलास उजवणे (अभिनेता),

श्री.आप्पा वढावकर (संगीत संयोजक), श्री.नरेंद्र पंडीत (नृत्य दिग्दर्शक), श्री.प्रशांत पाताडे (ध्वनीरेखन), श्री.दिपक विरकूड, विलास रानडे (संकलक), श्री.विनय मांडके (गायक), श्री.जयवंत राऊत (छायाचित्रण), श्री.सतीश पुळेकर (अभिनेता), श्रीमती प्रेमाकिरण (अभिनेत्री/निर्माती), श्रीमती सविता मालपेकर (अभिनेत्री), श्री.चेतन दळवी (अभिनेता), श्री.अच्युत ठाकूर (संगीतकार), श्री.वसंत इंगळे (निर्मिती प्रबंधक/अभिनेता)

अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत केलेल्या कामाबाबत आपण स्वतः समाधानी – योगेश गोगावले

0
पुणे, ता. २० ः ‘शहर अध्यक्ष म्हणून काम करताना सर्वांनी मला सहकार्य केले व प्रेम दिले. त्यामुळे चांगल्या पद्धतीचे संघटनात्मक काम उभे करता आले. नेतृत्वाने टाकलेल्या विश्‍वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न मी केला. आता माधुरी मिसाळ या  अधिक चांगल्या पद्धतीने संघटनेचे काम करतील असा विश्‍वास वाटतो.’ असे प्रतिपादन भाजपचे मावळते शहराध्यक्ष,आणि नूतन प्रदेश उपाध्यक्ष  योगेश गोगावले यांनी येथे केले
तर पुण्या तील विधानसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी प्राधान्य देणार असून, त्याप्रमाणे संघटनात्मक बांधणी करणार असल्याची माहिती भाजपच्या नवनियुक्त शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली.
शहर भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आमदार मिसाळ बोलत होत्या. प्रदेश उपाध्यक्ष योगेश गोगावले, प्रदेश चिटणीस धीरज घाटे, नवनियुक्त सरचिटणीस गणेश बिडकर, मुरली मोहोळ, दीपक मिसाळ, गणेश घोष, महापौर मुक्ता टिळक, आमदार भीमराव तापकीर, जगदीश मुळीक या वेळी उपस्थित होते.
निवडणुकीच्या तोंडावर पक्षश्रेष्ठींनी लोकप्रतिनिधी आणि संघटनेची दुहेरी जबाबदारी टाकली आहे. पक्षातील सर्व सहकार्‍यांच्या मदतीने ती यशस्वीपणे पार पाडू असा विश्‍वास आमदार मिसाळ यांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत जागा वाटपाचा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असेही मिसाळ यांनी सांगितले.

कला सादरीकरणातून मनाची शांतता प्राप्त होते- राहूल देशपांडे

0

पुणे, ता. १९ ः मनापासून कला सादर करताना आपल्याला उर्जा प्राप्तीची अनुभूती येते, त्याचबरोबर त्याचा आस्वाद घेणार्‍यांना मनाची शांतता प्राप्त होते असे मत प्रसिद्ध गायक राहूल देशपांडे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या ‘अस्तित्व’ कार्यक‘माचे उद्घाटन करताना श्री. देशपांडे बोलत होते. सोसायटीच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. राजश्री गोखले, प्रा. वृषाली महाजन, प्रा. तनुजा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भारतीय संस्कृतीचे अस्तित्व हे पुरातन काळापासून आहे. समृद्धसंपन्न असणार्‍या भारतीय संस्कृतीच्या वारशाचे जतन करणार्‍या ‘अस्तित्व’ या आंतरमहाविद्यालयीन र्सपर्धेचे हे दहावे वर्ष असल्याची माहिती प्राचार्य डॉ. रावळ यांनी प्रास्ताविक भाषणात दिली.
या वर्षी संगीत, नृत्य, चित्रकला, स्केचिंग, ङ्गॅशन शो, चित्रङ्गित निर्मिती, कोडी, निबंध, मेहंदी, शृंगार, ङ्गोटोग‘ाङ्गी, वादन अशा विविध स्पर्धांमध्ये ४७ महाविद्यालयांतील सतराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अनुषा कंचोलेे, सृजा बसू यांनी सूत्रसंचालन आणि सायली तळेकर, अनुष्का कुंभार यांनी आभार प्रदर्शन केले.

चंद्रयान-2 ने पार केला मोठा टप्पा; चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यात यशस्वी, 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरणार

0

श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश) – 22 जुलै रोजी आंध्र प्रदेेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण केलेले चांद्रयान आज सकाळी 9.02 वाजता चंद्राच्या कक्षेत दाखल झाले. यानाला चंद्राच्या कक्षेत पूर्णपणे स्थापित होण्यासाठी अर्ध्यातासाचा वेळ लागला. आजपासून 18 दिवस चंद्राची प्रदक्षिणा घालणार आहे. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी यान चंद्रावर उतरेल.

दरम्यान ‘दिव्य मराठी’ चमूने श्रीहरिकोटातील अंतराळ केंद्राला भेट देत तेथील चांद्रयान मोहिमेसंदर्भात माहिती जाणून घेतली. चांद्रयानापुढील समस्या अद्यापही संपलेल्या नाहीत. पृथ्वीसारखे चंद्रावर वातावरण नसल्याने यानाला उतरताना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, अशी शक्यता येथील शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. चांद्रयानातील इंधनाची गळती रोखण्यास उशीर झाला असता तर मोहीम किमान सहा महिने पुढे ढकलावी लागली असती, असेही शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

चांद्रयान 2 ही इस्रोची मोहीम 6 महिने किंवा वर्षभरसुद्धा पुढे ढकलली जाऊ शकली असती. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा करत ते सात दिवस शास्त्रज्ञांनी मेहनत घेतली आणि अवघड गोष्ट शक्य करून दाखवली. सात दिवसांत हे काम झाले नसते तर पुन्हा चंद्र आणि पृथ्वी यांची ही स्थिती येण्यासाठी किमान 6 महिने वाट पाहावी लागली असती, अशी माहिती सतीश धवन स्पेस सेंटरचे संचालक ए. राजार्जन यांनी दिली.

दहा वर्षांपासून सुरू होते काम
2008 मध्ये चांद्रयान 1 ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. त्यानंतर काही दिवसांतच चांद्रयान 2 ची घोषणा करण्यात आली. मागील 10 वर्षांपासून या मोहिमेबाबत संशोधन आणि अभ्यास सुरू होता. त्यानंतरच चंद्र आणि पृथ्वीची स्थिती, त्या वेळची भौगोलिक परिस्थिती, वातावरण याचा अभ्यास करून 15 जुलै ही तारीख ठरवण्यात आली होती. यानाने अवकाशात झेप घेतल्यानंतर त्याला चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागतात. पुढे 14 दिवस पृथ्वीवरून पाठवण्यात आलेले रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करतील. हे 14 दिवस म्हणजे चंद्राचा एक दिवस. या वेळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंधार असतो व हे लक्षात घेऊन मोहिमेची तारीख ठरवली होती.

भारतात घुसले आयएसआय एजंट्ससह 4 पाकिस्तानी दहशतवादी, देशभर हायअलर्ट जारी

0

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या आयएसआय एजंटसह चार दहशतवाद्यांनी भारतात घुसकोरी केल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे राजस्थान आणि गुजरात सीमेसह संपूर्ण देशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे पाचही दहशतवादी अफगानी पासपोर्टच्या मदतीने भारतात घुसल्याची माहिती आहे. यामुळे गुजरात राजस्थान आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान गुजरात एटीएसने दहशतवाद्याचे स्केच तयार करून ते पोलिस अधिकारी, तपास यंत्रणांना पाठवले आहे.

हे चार दहशतवादी एका एजंटसह भारतीय हद्दीत घुसले आहेत. तसेच कोणत्याही या दहशतवाद्यांकडून घातपात घडवण्यात येऊ शकतो अशी माहिती सिरोही, राजस्थानच्या पोलिस अधीक्षक कल्याणमल मीणा यांनी दिली. याबाबत राजस्थानच्या पोलिस स्टेशन हद्दीत सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गर्दीची ठिकाणे, ढाबा, रेल्वे स्टेशन, बस आणि हॉटेल्सची तपासणी केली जात आहे. तसेच वाहनांची तपासणी देखील पोलिसांकडून करण्यात येत आहे.

‘सांम्बो’ राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धा उत्साहात

0

– स्पर्धेचा मानकरी सांगली जिल्हा-

सांम्बो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने ‘सांम्बो राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेचे आयोजन बाबुराव सणस मैदान, स्वारगेट, पुणे येथे नुकतेच करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यातील २०० खेळाडू सहभाग घेतला होता. सांम्बो हा खेळ रेसलिंग आणि जुडो यांचे मिश्रण असून यात ९८ टक्के मार्शल आर्ट तर २ टक्के रेसलिंग असते.

या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक हा सांगली जिल्ह्याने पटकवला तर द्वितीय ठाणे तर तृतीय पुणे जिल्ह्याने पटकावला. यामध्ये स्पर्धकांना बक्षीस स्वरूपात गोल्ड, सिल्वर, ट्रॉफी, आणि सर्टिफिकेट असे देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र स्टेट सांम्बोचे सरचिटणीस राम शर्मा, राजेंद्र पवार, अनुप नाईक या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस समारंभ पार पडला.

गुरुद्वारा गुरुनानक दरबारची पूरग्रस्तांना मदत

0
पुणे
सांगली आणि कोल्हापूरमध्ये महापुरामुळे हजारो कुटुंबाची वाताहात झाल्याने पुरग्रस्तांसाठी   गुरुद्वारा गुरुनानक दरबारतर्फे  अंदाजे बारा टन जीवनावश्यक वस्तूंची मदत लष्कराच्या मदतीने हवाई वाहतुकीद्वारे  पोहचविण्यात आल्याची माहिती  गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंह सहानी यांनी दिली.
 गव्हाचे पीठ, तेल, टूथपेस्ट, सॅनिटरी नॅपकिन, काडीपेट्या, मेणबत्त्या यासह   बारा टन जीवनावश्यक वस्तूंची मदत  लष्कराच्या दक्षिण महाराष्ट्र व गोवा मुख्यालयामार्फत हवाई वाहतुकीद्वारे पूरग्रस्त भागात पोहचविण्यात आली.तसेच अतिवृष्टीच्या भागात पुण्यासह अन्य परिसरातही दररोज जेवणाचे पॅकेट पोहचविण्यात आले.पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठीही लवकरच शालेय साहित्याची मदत पूरग्रस्त भागात कार्य करणाऱ्या संस्थांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचेही  सहानी यांनी स्पष्ट केले.    यावेळी चरणजितसिंह सहानी यांच्यासह संतसिंग मोखा, विष्णू चमाडीया , विकी ओबेराय, कुलजितसिंह चौधरी, नरेन्द्रसिंह फुल, दलजितसिंह रँक, करमजितसिंह आनंद, सुरेंद्रसिंह धुप्पर, हरमिंदरसिंह घई आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी चमाडीया डिस्ट्रिब्युटर यांचे विशेष सहकार्य लाभले.

मी विधानसभा लढविणार – भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आ.माधुरी मिसाळांचा निर्धार (व्हिडीओ)

0
पुणे-एक व्यक्ती एक पद असे काही भाजप मध्ये नाहीये ,रावसाहेब दानवे आणि अन्य नेत्यांनी नाही का पदे असताना निवडणुका लढविल्या असे सांगत भाजपच्या नवनिर्वाचित अध्यक्षा आणि पर्वती विधानसभा  मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांना आज अध्यक्षपदाची सूत्रे घेताच धक्का दिला आहे. तर सरचिटणीस पदी निवड झालेले गणेश बिडकर यांनी कसब्यातून निवडणूक लढविण्याची आपली इच्छा आहेच हे सांगत पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडत आलोय आणि पार पाडू असे स्पष्ट केल्याने भाजपा च्या विधानसभा इच्छुकांच्या गोटात खळबळ उडणार आहे.
या दोघांना पक्ष संघटनेत हि पदे मिळाल्यानंतर महापालिकेतील नेते असलेल्या त्यांच्या मतदार संघातील इच्छुकांच्या उमेदवारीचा मार्ग सुकर झाल्याचे मानण्यात येत असताना या दोघांनीही इच्छुकांच्या यादीत आपण आहोतच हे स्पष्ट केले आहे.
आज भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे माधुरी मिसाळ यांनी हाती घेतली यावेळी त्यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयात मोठी गर्दी केली होती . फटाके वाजवून त्यांचे येथे स्वागत करण्यात आले .यावेळी माध्यामंशी बोलताना पहा आणि ऐका नेमके मिसाळ आणि बिडकर काय म्हणाले .

नाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट

0

नवी दिल्ली- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पाटेकर यांनी अमित शहा यांच्याबरोबर २० मिनिटे चर्चा केल्याची माहिती आहे. परंतु, नानांची ही भेट राजकीय होती की अन्य कामांसाठी याबाबतचा तपशील समजू शकला नाही. पाटेकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यानंतर त्यांनी ही भेट खासगी होती, राजकीय नव्हती असे सांगितले आहे. शहा यांना भेटण्याआधी पाटेकर यांनी अंतर्गत सुरक्षा विशेष अधिकारी यांची भेट घेतली.   नाना पाटेकर यांनी कशासाठी घेतली अमित शहा यांची भेट यावर अनेकांच्या भुवया ताणल्या चे दिसत होते .

अभिनेते नाना पाटेकर यांनी दिल्लीतील केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कार्यालयात जाऊन अमित शहा यांची भेट घेतली. नाना आणि शहा यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली याची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु, या दोघांत जवळपास २० मिनिटे चर्चा झाली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. काही दिवसांनंतर राज्यात आचारसंहिता लागू शकते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नाना पाटेकर यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याने याकडे राजकीयदृष्ट्या पाहिले जात आहे. नाना पाटेकर यांनी याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उघडपणे स्तुती केली होती. त्यामुळे ते भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुद्धा रंगली होती. परंतु, नाना पाटेकर यांनी सोशल मीडियावरून मी निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.

दरम्यान, नाना पाटेकर हे अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या साथीने ‘नाम’ या सामाजिक संस्थेमार्फत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम करतात. त्यांच्या या संस्थेने राज्यातील अनेक गावे दत्तक सुद्धा घेतलेली आहेत.

उन्मेष जोशींची सात तास चौकशी, ईडी पुन्हा बोलावणार!

0

मुंबई: कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने सात तास चौकशी केली. ही चौकशी समाधानकारक झाल्याचा दावा उन्मेष जोशींनी केला असून ईडी पुन्हा चौकशीसाठी बोलावणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कोहिनूर प्रकरणी ईडीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार उन्मेष हे आज दुपारी ईडीच्या कार्यालयात हजर झाले. चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवादही साधला होता. मला नोटीस मिळाली असून ईडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी मी आलो आहे. मला ईडीकडून कोणतेही प्रश्न पाठण्यात आलेले नाहीत. मी त्यांना पूर्ण सहकार्य करेन. कदाचित कोहिनूर इमारतीसंबंधी माहिती घेण्यासाठी बोलावण्यात आलं असावं, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. ईडीच्या कार्यालयात गेल्यानंतर त्यांची सात तास चौकशी करण्यात आली. सायंकाळी ७ वाजताच ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. ईडीने केलेल्या चौकशीने आपण समाधानी आहोत. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत, असं सांगतानाच ईडीकडून पुन्हा आपल्याला चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. जोशींनी काही सहकाऱ्यांच्या साथीनं भागिदारीत व्यवसाय सुरू केला होता. त्यात इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएलएफएस) या सरकारी क्षेत्रातील कंपनीने २२५ कोटींची गुंतवणूक केली होती. कालांतराने जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ९० कोटीला कंपनीचे समभाग विकले होते. त्यानंतरही कंपनीला अगाऊ कर्ज देण्यात आलं होतं. या कर्जाचा परतावा करण्यात आला नव्हता. त्यामुळे कोहिनूर सिटी एनएलने २०११मध्ये काही मालमत्ता विकून ५०० कोटींचा परतावा करण्याच्या करारावर सही केली होती. त्यामुळे आरएलएफएसकडून कोहिनूरला पुन्हा १३५ कोटींचं कर्ज देण्यात आलं होतं. या प्रकरणात अनियमितता झाल्याचं आढळून आल्यानं ईडीने त्याची चौकशी सुरू केली आहे.

मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज-तज्ञांचा इशारा

0

मुंबई-आपल्या सभोवती सायबर युद्ध सादृश्यस्थिती तिथी असून, हे आपल्या खासगी, बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. सायबर स्पेस हे एक नवीन युद्धप्रवण क्षेत्र असून आपण एकाही युद्धात हार मानायला नको, नाहीतर आपण सर्व हॅकर्सना बळी पडू. तथापि, आपण सक्षम झाल्यास या युद्धात तग धरू शकू. मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज आहे.असे प्रतिपादन मुंबईस्थित इस्रायलचे वकिलात याकोव्ह फिनकेलेस्टीन यांनी येथे केले तर इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीने आकारलेले नसून ते असुरक्षित आणि हॅक होण्यासारखे आहेत. विविध नियम आणि कायदे असले तरी हॅकर्स केव्हाही व्यक्तीगत अकाऊंटस् हॅक करण्यात यशस्वी होऊ शकतात.अशी माहिती टेल ॲव्हीव्ह विद्यापीठाच्या सायबर सुरक्षा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनिबारझीले यांनी येथे दिली .

मुंबईच्या नेहरू विज्ञान केंद्रात आज सायबर सुरक्षा या विषयावर सार्वजनिक व्याख्यान आणि समूह चर्चा आयोजित करण्यात आली होती. नेहरू सायन्स सेंटर आणि इस्रायलच्या मुंबईस्थित वकिलातीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विविध शाळांमधले विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात भाग घेऊन सायबर सुरक्षा हा विषय तज्ञांकडून समजावून घेतला.गेल्या 15 वर्षांमध्ये जागतिक स्तरावर तंत्रज्ञानात कमालीचा बदल झाला असून इंस्टाग्राम, आर्टिफिशियल इंटलिजन्स, इंटरनेट गेम्स, स्वयंचलित कार इत्यादींचा यामध्ये समावेश आहे. नवीन तंत्रज्ञान जरी मिळाले तरी त्यामुळे उद्‌भवणाऱ्या नवीन आव्हानांना सायबर सुरक्षा तज्ञांना तोंड द्यावे लागत असून दररोज नवीन उपाय शोधून काढावे लागत आहेत. यासाठी आपण हे प्रश्न कसे उद्‌भवणार नाहीत यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.

इंटरनेट हे सुरक्षेच्या दृष्टीने आकारलेले नसून ते असुरक्षित आणि हॅक होण्यासारखे आहेत. विविध नियम आणि कायदे असले तरी हॅकर्स केव्हाही व्यक्तीगत अकाऊंटस् हॅक करण्यात यशस्वी होऊ शकतात.

विविध देशांमधले तज्ञ एकत्रित येऊन सायबर गुन्हे होत असल्याचे कबूल करीत आहेत. यासाठी आपल्याला विविध देशांतर्फे विशेष तज्ञांची आवश्यकता भासणार आहे. बॉम्बसारख्या सायबर धमक्या आपल्याला त्वरित सुरक्षा उपाय शोधण्यासाठी उद्युक्त करत नाहीत. त्यामुळे आपल्याला याचे गांभीर्य लक्षात येत नाही आणि लोकांना आपण अशा प्रकारचे हॅक झाले असल्याचे समजवू शकत नाही, अशी माहिती टेल ॲव्हीव्ह विद्यापीठाच्या सायबर सुरक्षा केंद्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी मेनिबारझीले यांनी सांगितले.

बारझीले पुढे म्हणाले की, ‘द इंटरव्ह्यू’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्यानंतर सोनी कॉर्पोरेशनवर सायबर अटॅक झाला होता. या हल्ल्याला तोंड देण्यास सोनी कॉर्पोरेशन सक्षम नव्हते. अशा वेळी सरकारने खासगी कॉर्पोरेशनच्या वतीने उभे राहायला हवे. इंटरनेट हा अब्जावधी कॉम्प्युटर डिव्हायसेसचा भाग असतो. या सर्व कॉम्प्युटर्सना हॅक होण्याची संभावना  जास्त असते. त्यामुळे आपल्या खासगी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या कंपन्यांमधील बहुतांश डाटा, युझर स्वत:च्या लाभासाठी हॅक करू शकतो. याचा अनुभव अलिकडेच अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आला.

मुंबईस्थित इस्रायलचे वकिलात याकोव्ह फिनकेलेस्टीन म्हणाले की,  आपल्या सभोवती सायबर युद्ध सादृश्यस्थिती तिथी असून, हे आपल्या खासगी, बँक अकाऊंटच्या सुरक्षिततेसाठी करण्यात येत आहे. सायबर स्पेस हे एक नवीन युद्धप्रवण क्षेत्र असून आपण एकाही युद्धात हार मानायला नको, नाहीतर आपण सर्व हॅकर्सना बळी पडू. तथापि, आपण सक्षम झाल्यास या युद्धात तग धरू शकू. मोबाईल आणि टॅबलेट ही आपली युद्ध अवजारे असून आपण आपल्या इंटरनेटचे चौकीदार होण्याची गरज आहे.

सायबर बुलिंग उघडकीस आणण्याची गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सोनाली पाटणकर यांनी नमूद केले.

महाराष्ट्र सरकारच्या पोलीस विभागाचे उपायुक्त सचिन पांडकर म्हणाले की, सायबर गुन्ह्यांविरुद्ध सरकारने कडक यंत्रणा अवलंबिली असून मुलांना सायबर धमक्या मिळण्यापासून वाचवण्यात येत आहे.

आयआयटी मुंबईचे कॉम्प्युटर विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचे डॉ. मनोज प्रभाकरन् यांनी स्पष्ट केले की, व्हॉटसप सारख्या ॲपद्वारे सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढा देता येऊ शकतो. सायबर गुन्हा म्हणजे एकीकडे भाषण स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यादरम्यान वाढवण्यात येणारा ताण आहे. तर दुसरीकडे कूटनीती आणि उपयोगकर्त्यांचे अधिकार जपणे आवश्यक आहे.

नेहरू विज्ञान केंद्राचे संचालक शिवप्रसाद खेनेड तसेच मुंबईस्थित इस्रायलच्या उपवकिलात निमरोड कालमार उपस्थित होते.

पूरग्रस्त भागात एक हेक्टरपर्यंत पीक कर्ज माफ – पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची घोषणा

0
  • बाधित कुटुंबांना तीन महिने गहू आणि तांदूळ मोफत वाटप
  • तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण, शहरी भागात अनुक्रमे 24 आणि 36 हजार रुपये
  • घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत देणार
  • कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित
  • जनावरांच्या गोठ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अर्थसहाय्य
  • छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई
  • पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई, दि. 19: पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यांना एक हेक्टर मर्यादेपर्यंत पिकासाठी बँक नियमाप्रमाणे जे कर्ज दिले जाते, ते पीक कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घोषित केला. त्यासोबतच पडझड झालेल्या घरांचे बांधकाम प्रधानमंत्री आवास योजनेतून करतानाच केंद्राच्या निधीसोबतच राज्य शासनाकडून अतिरिक्त एक लाख रुपये तसेच घरांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या निवासासाठी ग्रामीण भागात 24 आणि शहरी भागात 36 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम, बाधित कुटुंबांना तीन महिने प्रत्येकी 10 किलो गहू आणि तांदूळ मोफत देण्याचा तसेच कृषिपंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

जुलै ते ऑगस्टदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत निर्णय घेण्यासाठी गठित मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज वर्षा निवासस्थानी झाली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रवींद्र चव्हाण यावेळी उपस्थित होते.

या बैठकीबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण, नाशिक यासह अन्य भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या भागातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. शहरी भागातील पाणीपुरवठा योजना पूर्ववत झाल्या आहेत. स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पायाभूत सुविधांची कामे मिशन मोडवर सुरू असून त्याबाबत दर आठवड्याला ही समिती आढावा घेणार आहे.

एक हेक्टरपर्यंतच्या पिकासाठी कर्जमाफी

पूरग्रस्त भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एक हेक्टर मर्यादेपर्यंतच्या पिकाच्या नुकसानीसाठी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. पिकांना बॅंकेच्या निकषानुसार जे कर्ज दिले जाते, त्यानुसार हे कर्ज माफ करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले नाही, त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईच्या तीनपट रक्कम देण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात पुरामुळे पडझड झालेल्या घरांचे नव्याने बांधकाम केले जाईल. प्रधानमंत्री आवास योजनेचे पोर्टल त्यासाठी उघडण्यात येईल केंद्र शासनाकडून जो निधी मिळेल त्यात राज्य शासनाकडून एक लाख रुपये अतिरिक्त देण्यात येईल. घरांच्या बांधकामासाठी जो कालावधी लागणार आहे, त्यासाठी वार्षिक भाड्यापोटी ग्रामीण भागात 24 हजार तर शहरी भागात 36 हजार रुपये दिले जातील. घर बांधकामासाठी प्रत्येकी पाच ब्रास वाळू आणि मुरूम मोफत दिला जाईल. ज्या भागात पुरामुळे घरांचे नुकसान झाले तेथे पुन्हा घरे न बांधता त्यांचे त्याच गावात पुनर्वसनासाठी शासनामार्फत मोफत जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय समितीने घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

छोट्या व्यावसायिकांना 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई

जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले असल्यास त्यासाठी देखील अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. पुरात वाहून गेलेल्या व मृत्युमुखी पडलेल्या जनावरांच्या संदर्भात तलाठी, सरपंच, दूध संघाचे पदाधिकारी यांनी केलेले पंचनामे ग्राह्य धरण्यात येतील. दुधाळ जनावरांच्या नुकसान भरपाई रकमेत देखील वाढ करून ती 30 हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. छोटे व्यावसायिक, मूर्तिकार, हस्तकलाकार यांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 50 हजार रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कृषिपंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित

कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिने स्थगित करण्याचे या बैठकीत निर्णय झाल्याचे सांगताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देताना स्वतंत्र कुटुंब म्हणून मदत देण्यासाठी शिधापत्रिके सोबतच दोन स्वतंत्र वीजबिल, दोन स्वतंत्र गॅस जोडणी, दोन स्वतंत्र घरे हे ग्राह्य धरण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांना जीएसटी सवलतीसाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार

या भागातील व्यापाऱ्यांना जीएसटी सवलत देण्याबाबत आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेणार असून आयकर भरण्याची मुदत वाढवून देणे, जीएसटी परिषदेची बैठक बोलावून त्याबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्र शासनाकडे विनंती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पूर परिस्थिती व उपाययोजनेच्या अभ्यासासाठी तज्ज्ञ समिती गठित

पूर परिस्थिती निर्माण होण्याची कारणे, भविष्यात अशी परिस्थिती होऊ नये यासाठी करावयाची उपाययोजना यासाठी तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे त्याचे अध्यक्ष असतील असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. समितीत एमडब्ल्यूआरआरएचे तांत्रिक सल्लागार, जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे, केंद्रीय जल आयोगाचे नित्यानंद रॉय, निरी नागपूरचे संचालक, आयआयटी मुंबईचे संचालक, एमआरसॅकचे संचालक, भारतीय हवामान विभागाचे मुंबई उपमहासंचालक, आयआयटीएम पुणे संचालक, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव, लाभ क्षेत्र विकास सचिव, मुख्य अभियंता जल विज्ञान नियोजन यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती पूर येण्याची कारणे, नुकसान, भविष्यातील उपाययोजना, पावसाचा अंदाज, पायाभूत सुविधा आदी बाबींचा अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करणार आहे.

पूरग्रस्त भागात ज्या स्वयंसेवी संस्था गावे दत्तक घेणार आहेत त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये भर घालावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ज्या नागरिकांची कागदपत्रे गहाळ झाली त्यांची सर्व कागदपत्रे महाऑनलाईनच्या मदतीने मोफत नव्याने तयार करून देण्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी आ.माधुरी मिसाळ; योगेश गोगावले आता प्रदेश उपाध्यक्ष

पुणे- आज भाजपच्या पुणे शहर अध्यक्षपदी पर्वती च्या आमदार माधुरी मिसाळ यांची निवड झाली तर मावळते अध्यक्ष योगेश गोगावले यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली .’माय मराठी’ ने दिलेल्या वृत्तानुसार आज भाजपच्या पदाधिकारी बदलाची नावे अखेर जाहीर झाली .महापालिकेतील स्वीकृत  गणेश बिडकर यांची पुणे शहर सरचिटणीस पदी निवड झाली. प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची नावे घोषित केली .

भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. सुभाष भामरे, किरीट सोमय्या, प्रवीण पोटे पाटील, योगेश गोगावले, अशोक कांडलकर

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या. प्रदेश उपाध्यक्षपदी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खा. डॉ. सुभाष भामरे (धुळे), माजी उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील (अमरावती), माजी खासदार किरीट सोमय्या (मुंबई), मा. योगेश गोगावले (पुणे) व अशोक कांडलकर (जळगाव) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा, प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विकास रासकर तर उपाध्यक्षपदी भूषणसिंह होळकर यांची नियुक्ती केली आहे.
 प्रदेशाध्यक्षांनी काही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या असून त्या पुढीलप्रमाणे – पुणे शहराध्यक्ष आ. माधुरीताई मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस गणेश बिडकर, जालना जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे, नाशिक शहराध्यक्ष गिरीश पालवे व यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा.
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्तेपदी माधव भांडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील माध्यमांच्या संपर्कप्रमुखपदाच्या जबाबदारीसह मा. केशव उपाध्ये यांची सहमुख्य प्रवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त प्रवक्ते पुढीलप्रमाणे – मधु चव्हाण, गिरीश व्यास, गणेश हाके, शिरिष बोराळकर, विश्वास पाठक, अतुल शाह, अर्चना डेहणकर, शिवराय कुलकर्णी, भालचंद्र शिरसाट, श्वेता शालिनी, इजाज देशमुख, सुनील नेरळकर.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
अन्य काही जबाबदाऱ्यांमध्ये गुंतल्यामुळे व वैयक्तिक कारणांमुळे पुढील पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे – प्रदेश उपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आर. सी. पाटील व रमेश कुथे, प्रदेश सरचिटणीस डॉ. संजय कुटे, अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विजय चौधरी, कामगार आघाडी संयोजक संजय केणेकर व व्यापारी आघाडी दिलीप कंदकुर्ते.

माधुरी मिसाळ यांचा परिचय –

माधुरी सतीश मिसाळ
शिक्षण : बी. कॉम.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश मिसाळ यांच्या पत्नी
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या क्रांतिकारक केशवराव देशपांडे यांची नात

सन २००७ पुणे महापालिकेवर महात्मा फुले मंडई वॉर्डातून नगरसेविका म्हणून निवड
सन २००९ पर्वती विधानसभा मतदारसंघातून आमदार
सन २०१४ पर्वती विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार (राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य)
सन २०१७ पुणे महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा (पर्वतीतून २५ नगरसेवक)

चिटणीस, महाराष्ट्र प्रदेश भाजपा
संयोजिका, बेटी बचाव, बेटी पढाओ अभियान
सन २०१४ पुणे लोकसभा प्रभारी
सन २०१९ बारामती लोकसभा प्रभारी

माजी सदस्या, महिला आणि बालकल्याण समिती, महाराष्ट्र राज्य
माजी सदस्या, लोकलेखा समिती, महाराष्ट्र राज्य
सदस्या, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र राज्य

माजी अध्यक्षा, विद्या सहकारी बँक लिमिटेड
संचालिका, उद्यम सहकारी बँक लिमिटेड
अध्यक्षा, सतीश धोंडिबा मिसाळ प्रतिष्ठान

  • भाजप हा जगातील सर्वाधिक सदस्य असलेला पक्ष आहे. भाजपच्या पुणे शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी मोठी आहे. पुणे शहर भाजपची मी पहिली महिला अध्यक्षा आहे याचा मला विशेष आनंद होत आहे. पुणे शहरातील पक्षाचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. त्यासाठी पक्षाचा विचार आणि शासनाच्या विकासाभिमुख योजनांचा अधिकाधिक प्रसार करण्यावर भर देणार आहे. आगामी काळात पक्षाने माझ्यावर टाकलेली लोकप्रतिनिधी आणि संघटनात्मक अशी दुहेरी जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडीन असा विश्वास व्यक्त करते.
  • -आमदार माधुरी मिसाळ

 

 

मारुतीनंतर आता महिंद्रांची वेळ; 1500 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

0

नवी दिल्ली : जगभरात मंदीचे ढग दाटू लागलेले असताना त्याची सर्वाधिक झळ भारतीय ऑटोमोबाईल कंपन्यांना बसू लागल्याचे दिसत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये खळबऴ उडाली असून केंद्र सरकारही नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत आहेत. देशातील मारुती सुझुकी, अशोक लेलँडने कर्मचारी कपात करण्यास सुरूवात केली असताना आता महिंद्रानेही यामध्ये उडी घेतली आहे. ऑटोमोबाईल सेक्टरशी जोडधंद्यांमध्ये सुमारे 5 लाख नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जमशेदपूरमध्ये टाटा मोटर्सने उत्पादन घटविले आहे. यामुळे या कंपनीला स्पेअर पार्ट पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी टाळे ठोकले आहे. जवळपास 30 कंपन्या बंद झाल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती इन्शुरन्स, सेवा आदी क्षेत्रात निर्माण झाली आहे.सोशल मिडीयावर कमालीचे अॅक्टीव्ह असलेल्या आनंद महिंद्रा यांच्या महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने कर्मचारी कपात सुरू केली आहे. व्यवस्थापकीय संचालक पवन गोएंका यांनी कोलंबोमध्ये सांगितले की, कंपनीने 1 एप्रिलपासून जवळपास 1500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. एवढे करूनही जर मंदी सुरूच राहिली तर आणखी कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे. फॅक्टरीतील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांपेक्षा डीलर आणि सप्लायरच्या कर्मचाऱ्यांना नोकरी जाण्याचा जास्त धोका आहे. भारतातील पुढील उत्सवी सिझन वाहन उद्योगासाठी खूप महत्वाचा आहे. अन्यथा याचा नकारात्मक परिणाम नोकरी आणि गुंतवणुकीवर होणार असल्याचा इशारा गोएंका यांनी दिला आहे. ऑटो सेक्टरला गेल्या 19 वर्षांत मोठा फटका बसला आहे. विक्रीमध्ये मोठी घटही झाली आहे. ही घट 18.71 टक्के आहे. यामुळे गेल्या दोन-तीन महिन्यांत ऑटो सेक्टरमधील लाखो नोकऱ्या गेल्या आहेत. कर्नाटकमधील टोयोटा प्लँटमध्येही इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनरचे उत्पादन कमी करण्यात आल्याचे वृत्त आहे. 

दुसऱ्या वाईल्ड इंडिया चित्रपट महोत्सवाचे आयोजन

0

 पुणे; फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे आणि महाराष्ट्र राज्य वनविभाग वन्यजीव (पश्चिम) ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ ऑगस्ट २०१९ ते २५ ऑगस्ट २०१९ दरम्यान वाईल्ड इंडिया वन्यजीव चित्रपट महोत्सवाचे आयोजन फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँफीथिएटरमध्ये करण्यात आले आहे. हे महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सृष्टी फाऊन्डेशन आणि  ऍड-व्हेंचर  फाऊन्डेशन ह्या महोत्सवाचे सहआयोजक आहेत. ह्या निमित्ताने भारतातील अनेक नामवंत वन्यजीव चित्रपट दिग्दर्शक/निर्माते ह्यांचे प्रसिद्ध चित्रपट आणि माहितीपट सर्वांना पाहता येतील.

ह्या महोत्सवाचे उद्घाटन सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार श्री. शेकर दत्तात्री ह्यांच्या हस्ते २२ ऑगस्ट रोजी सायं. ६.०० वाजता करण्यात येणार आहे. ह्या प्रसंगी महाराष्ट्र राज्य वनविभाग अप्पर प्रधान मुख्य वन संरक्षक(वन्यजीव, पश्चिम)    श्री. सुनील लिमये; पुणे पोलीस आयुक्त डॉ.वेंकटेशम के.; पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. सौरभ राव; आणि एअर मार्शल(निवृत्त) श्री. भूषण गोखले, लीला पूनावाला फाउंडेशनच्या अध्यक्षा पद्मश्री श्रीम. लीला पूनावाला ह्यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर शेकर दत्तात्री निसर्गप्रेमींशी संवाद साधणार आहेत तसेच त्यांनी बनवलेल्या माहितीपटातील काही दृश्यांची झलकही ह्या वेळी निसर्गप्रेमींना पाहायला मिळेल.

दि. २३ ऑगस्ट रोजी सायं. ६.३० वाजता सुप्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार श्री. नल्ला मुत्थू ह्यांच्याशी सुप्रसिद्ध अभिनेते श्री. सुयश टिळक संवाद साधणार आहे. ह्या वेळी नल्ला मुत्थू ह्यांच्या एकंदर कारकीर्दीवर श्री. सुयश टिळक प्रकाश टाकणार असून ह्यावेळी निसर्गप्रेमींनाही नल्ला ह्यांच्याशी संवाद साधता येईल. ह्या अगोदर सायं. ५ वाजता काही वन्यजीव चित्रपट दाखवले जातील. आणि ह्या मुलाखतीनंतर नल्ला ह्यांचा ‘क्लॅश ऑफ टायगर्स’ हा नवीन प्रदर्शित झालेला वन्यजीव चित्रपट दाखवण्यात येईल.

तसेच सदर महोत्सवादरम्यान इतर दिवशी भारतातील प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार श्री. नल्ला मुत्थू, श्री. शेकर दत्तात्री, श्री. माईक पांडे, श्री. संदेश कडूर, श्री. विनोद बारटक्के, श्रीम. रिटा बॅनर्जी, श्री. किरण घाडगे,  इ. चे  वाघ, सिंह, कासव, हिमबिबट्या, क्लाऊडेड लेपर्ड ह्या जीवांवरील तसेच निसर्गातील इतर बाबींनाही स्पर्श करणारे अत्यंत दुर्मिळ आणि जरूर पाहावे असे चित्रपट आणि माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. ह्याशिवाय ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील बाबींवर प्रकाश टाकणारे दोन वन्यजीव माहितीपटही दाखवण्यात येणार आहेत. दि. २३ ऑगस्ट सायं. ५ वा. आणि  दि. २४ ऑगस्ट रोजी सायं. ४ वा. माहितीपट दाखवण्यास सुरुवात होणार असून दि. २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. आणि सायं. ३.३० वा. अशा दोन सत्रात माहितीपट दाखवले जाणार आहेत.

प्रसिद्ध वन्यजीव चित्रपटकार श्री. नल्ला मुत्थू ह्यांच्या कौशल्यांचा आणि अनुभवांचा फायदा सर्वांना व्हावा ह्यासाठी दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १.३० ते ३.३० ह्या दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात एका चित्रपट निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तसेच भारतातील अत्यंत दुर्मिळ खनिजे आणि जीवाश्म व वन्यजीवनाचे प्रतिबिंब असेलेली नाणी, स्टँप ह्यांचे प्रदर्शनही २४ ऑगस्ट आणि २५ ऑगस्ट रोजी फर्ग्युसन महाविद्यालय येथे मांडण्यात येणार असून ते सर्वांसाठी  स. १० ते सायं. ५ या वेळेत विनामुल्य खुले असणार आहे. ह्या प्रदर्शनाचे उद्घाटन २४ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ ह्यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे. तसेच २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ, प्रा. श्री.द.महाजन, डॉ. विलास बर्डेकर अशा काही तज्ञ मंडळींसोबत खुल्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

ह्या महोत्सवाचे खास आकर्षण म्हणजे महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी दि. २५ ऑगस्ट रोजी जगप्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार श्री. ध्रीतीमान मुखर्जी सायं. ६.१५ ते ८.३० ह्या दरम्यान निसर्गप्रेमींशी संवाद साधणार आहेत. ह्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार असून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. शरद कुंटे आणि प्रादेशिक पारपत्र अधिकारी श्री. अनंत ताकवले ह्यांची प्रमुख उपस्थिती ह्या कार्यक्रमास लाभणार आहे.

सदर महोत्सवाला रावेतकर हाउसिंग आणि ‘सोसायटी फॉर वाईल्डलाईफ एज्युकेशन आणि कॉन्सर्वेशन’ प्रमुख प्रायोजक म्हणून लाभले असून क्रेडाई-पुणे मेट्रो ‘व्यंकटेश बिल्डकॉन’, ‘ पंडित जावडेकर, ‘ट्रुस्पेस’ सह-प्रायोजक म्हणून लाभले आहेत. तसेच ह्या महोत्सवाला सी.एम.एस. वातावरण’, ‘ग्लोबल टायगर फोरम’, ‘द टेरेटोरी’ वाईल्डलाईफ अनलिमिटेड आणि ‘हेरीटेज डिझाईन्स’ ह्यांचे पाठबळ लाभले आहे. हा महोत्सव सर्वासाठी विनामुल्य असून जास्तीत जास्त निसर्गप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.